Home Blog Page 412

खंडणीसाठी डॉक्टर चे अपहरण करणारा प्रवीण ओव्हाळ गजाआड

पुणे -जिल्ह्यातील आंबेगाव परिसरात मंचरमधील एका नामांकित डाॅक्टरचे सराईत गुन्हेगाराने अपहरण करून २० लाखांची खंडणी मागत गोळीबार केल्याचा प्रकार घडला होता.या डॉक्टरकडून एक लाखांची खंडणी घेऊन त्यांना निर्जन स्थळी सोडून पसार झालेल्या आरोपीला अटक करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रवीण उर्फ डाॅलर सीताराम ओव्हाळ (वय ३२, रा. वाळद, ता. खेड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत संबंधित डाॅक्टरने मंचर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली होती. तक्रारदार डाॅक्टर ४ जानेवारी रोजी पेठ ते मंचर या मार्गावरून दुचाकीवरून जात होते. मोटारचालक आरोपी पवन सुधीर थोरात (रा. मंचर, जि. पुणे) आणि ओव्हाळ त्यांच्या मागावर होते.दुचाकीस्वार डाॅक्टरला कारने जोरात धडक दिल्याने ते रस्त्यात पडल्यावर त्यांचे जबरदस्तीने अपहरण करून निघोटवाडी परिसरात चोरट्यांनी नेले. तेथे त्यांना बेदम मारहाण करुन २० लाख रुपयांची खंडणी मागितली. डाॅक्टरांना धमकावून त्यांनी पिस्तुलातून एक गोळी देखील हवेत झाडली, तसेच त्यांच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी उकळली. त्यानंतर पेठ घाटात डाॅक्टरला सोडून आरोपी थोरात आणि ओव्हाळ कारमधून पसार झाले.पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. आरोपी ओव्हाळ आणि थोरात सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.फरार झालेला आरोपी थोरात याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली. त्याच्याबरोबर असलेला ओव्हाळ पसार झाला होता. गेले दोन महिने पोलीस ओव्हाळच्या मागावर होते. पसार झालेला ओव्हाळ आळेफाटा एसटी स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी अक्षय नवले यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून ओव्हाळला पकडले. त्याच अंगझडती घेण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस कर्मचारी दीपक साबळे, अक्षय नवले, संदीप वारे, राजू मोमीन, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, नीलेश सुपेकर यांनी ही कामगिरी केली. प्रकरणाचा पुढील तपास आळेफाटा पोलिसांकडून करण्यात येत आहे. आरोपी ओव्हाळ याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भाषा हर्षवर्धन सपकाळांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी देणारी: अतुल लोंढे

धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने करणाऱ्या मंत्री नितेश राणेंवर देशद्रोहाचा गुन्हा कधी दाखल करणार?

नागपूर दंगल प्रकरणी पोलीस इंजेलिजन्स फेल, पोलिसांवर हल्ले होत असतील तर फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.

मुंबई, दि. १८ मार्च २५
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेबाच्या कारभाराची व देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना केली पण त्याचा विपर्यास करून सपकाळ यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापली काय, डोळे फोडले, काय अशी चिखवणीखोर विधाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहेत, हे अत्यंत आक्षेपार्ह असून हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर हल्ला व्हावा, अशी भडकाऊ विधाने शिंदे करत आहेत, असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलाताना अतुल लोंढे म्हणाले की, हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला त्यावेळी साधा निषेध तरी केला का? सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करणारे, भडकाऊ भाषा वापरणाऱ्या मंत्री नितेश राणेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची धमक एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते असे विधान करून छत्रपतींचा अपमान करणाऱ्या भाजपा खासदाराचा निषेध करण्याची धमक शिंदे यांच्यात आहे का? असा सवाल लोंढे यांनी केला आहे.

नागपूर दंगलीवर बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, नागपूर शहर हे शांतताप्रिय शहर आहे. हिंदू मुस्लीम दोघेही आजपर्यंत शांततेने रहात आहेत. राम नवमीला दोन्ही समाजाचे लोक उत्साहाने सहभागी होतात. तर ताजुद्दीनबाबाच्या उरुसामध्येही हिंदू मुस्लीम एकोप्याने सहभागी होतात, अशा शहरात धार्मिक दंगल होतेच कशी, सरकारला याची काहीच कल्पना नव्हती का, हे सरकारचे अपयश आहे. पोलिस इंटेलिजन्स काय करत होते आणि पोलिसांवरच हल्ले होत असतील तर गृहमंत्री पदावर फडणीस रहातात कसे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
मध्य नागपूरमध्ये ही घटना झाली असून याच भागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे घर आहे. स्थानिक भाजपा आमदार प्रविण दटके पोलिसांना दोष देत असतील तर त्याची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे पण दंगलीचा फायदा कोणाला होतो हे सर्वांना माहित आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत, महिला अत्याचारांच्या घटना सातत्याने होत आहेत, शेतमालाला भाव नाही, तरुणांना नोकऱ्या नाहीत, बेरोजगारी व महागाई वाढली आहे या मुळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा प्रयत्न आहे असेही लोंढे म्हणाले. नागपुरकारांनी अफवांना बळी न पडता शांतता राखावी असे आवाहनही अतुल लोंढे यांनी केले आहे.
विधिमंडळात पत्रकारांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावेळी निषेध केला.

आरटीई प्रवेश प्रक्रियेमधील फसवणूक व भ्रष्टाचार रोखा : आप पालक युनियन

पुणे-जिल्ह्यातील मुळशी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खोटी कागदपत्रे व भ्रष्टाचारातून प्रवेश घेतले जात असल्याची तक्रार आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली होती. मागील वर्षी सुद्धा काही पालकांनी खोटी कागदपत्रे तयार केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात आज आम आदमी पार्टी / आप पालक युनियन तर्फे शिक्षण संचालक शरद गोसावी यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली व निवेदन दिले. काही प्रशासनातील अधिकारीही या अवैध फेरफार करण्याला मदत करीत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला होता. पालक प्रशासनाच्या भीतीमुळे पुढे येत नाहीत. शासकीय कागदपत्रे तयार करणाऱ्या अवैध एजंट यामध्ये अधिकाऱ्यांना सहकार्य करीत आहेत. या आरोपाची दखल घेत संचालक शरद गोसावी यांनी तातडीने नाईकडे, जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला व सदरच्या जागीचे बदली केले गेलेले शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गोडसे यांना जुन्नर येथे तातडीने रुजू होण्यास सांगण्यात आलेले आहे. त्यांच्या संदर्भात पालकांनी तक्रारी केल्या होत्या. श्रीमती मोमीन यांना मुळशी येथील अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

आरटीई पहिल्या लॉटरीमध्ये प्रवेश मिळालेल्या पालकांनी शाळा प्रवेश घेण्याची मुदत संपली असून आता प्रतीक्षा यादीतील प्रवेश सुरु होणार आहेत. असे असताना काल दिनांक 16 तारीख अखेर मुळशी भागातील 676 रिक्त जागापैकी केवळ 92 जागी प्रवेश झाले होते. परंतु आज तक्रारीची दखल घेत पडताळणी पूर्ण झालेल्या पाल्यांचे शाळा प्रवेश करून घेण्यात येत असल्याचे शरद गोसावी यांनी सांगितले.चुकीच्या व फेरफार झालेल्या अवैध कागदपत्रांवर दिलेले प्रवेश तातडीने रद्द करावेत तसेच पडताळणी समितीमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. यात त्रुटी राहिल्यास आणि भ्रष्टाचाराबाबत अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आप पालक युनियन यांनी केली आहे.
यावेळी आप पालक युनियन चे मुकुंद किर्दत , श्रीकांत भिसे, गणेश खेंगरे, हनुमंत शिंदे, प्रभाकर तिवारी उपस्थित होते

कारागृहातील महिला कैद्यांकरिता ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन

चंद्रपूर/पुणे-कारागृहे हि शिक्षगृहे न बनता ती सुधारगृहे बनावीत या उद्देशाने कार्यरत असलेल्या कारागृह विभागाने चंद्रपूर जिल्हा कारागृहमध्ये महिला कैद्यांकरिता ब्युटी पार्लर प्रशिक्षण सुरु केले आहे.
कारागृह सेवा ही अत्यंत संवेदनशिल सेवा असुन कारागृहामध्ये वेगवेगळ्या गुन्हयातील आरोपी बंदीस्त असतात. कारागृहामध्ये येणाऱ्या बंदयांच्या गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये बदल घडवून बंदयांत सुधारणा व पुर्नवसनाच्या दृष्टीने कार्य करण्यात येते. तसेच सुधारणा व पुनर्वसन हे महाराष्ट्र कारागृहाचे ब्रीद वाक्य असून कारागृहातील बंदयाकरीता विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे साहेब यांचे प्रयत्नातून इनरव्हिल क्लब ऑफ चंद्रपूर व चंद्रपूर जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हा कारागृहमध्ये आज दिनांक 17/03/2025 रोजी श्रीमती सुचिता जेउरकर, अध्यक्ष इनरव्हिल क्लब ऑफ चंद्रपूर यांचे हस्ते फीत कापून महिला बंदी करीता 15 दिवशीय” ब्युटी पार्लर ” प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आलेले आहे. श्रीमती अवनी कासमगोटूवार प्रशिक्षक व श्रीमती वैशाली पंडीले प्रशिक्षक. चंद्रपूर यांनी कारागृहातून महिला बंदी बाहेर पडल्यानंतर त्यास उपजिविकेचे साधन उपलब्ध होण्याचे दृष्टीने इनरव्हिल क्लब ऑफ चंद्रपूर अंतर्गत सुरु असलेल्या ब्युटी पार्लर व्यावसायीक प्रशिक्षणा बद्दल मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम, श्रीमती सुचिता जेउरकर, श्रीमती कविता झाडे, श्रीमती वैशाली अडकिने, श्रीमती स्वेता मस्के, श्रीमती अल्का चांदेकर, श्रीमती विद्या ताकसांडे, श्रीमती अश्विनी तुराणकर, श्रीमती रजनी गुरनुले, श्रीमती शितल भगत यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. सदर प्रशिक्षणाचा 39 महिला बंदीनी लाभ घेतलेला आहे.

\

सेन्सॉर बोर्डाकडून दलितांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न – डॉ. नितीन राऊत

नामदेव ढसाळ यांच्या वरील चित्रपट ‘चल हल्ला बोल’ प्रदर्शित करण्याची विधानसभेत मागणी

मुंबई दिनांक – १८/०३/२०२५
मराठी साहित्य विश्वातील क्रांतिकारी बंडखोर कवी तथा दलित पँथर चळवळीचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारून दलितांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे, असे वक्तव्य करून चित्रपटाला कुठलीही कात्री न लावता हा चित्रपट तात्काळ प्रदर्शित करण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री आणि आमदार डॉ. नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली.

‘चल हल्ला बोल’ चित्रपट १ जुलै २०२४ रोजी मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डाकडे सबमिट करण्यात आला होता. हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. चित्रपट सिनेमा रिवायजिंग कमेटीकडे दिला असून त्याची रीतसर फी देखील भरण्यात आली असल्याचे डॉ. राऊत यांनी आज सभागृहाला सांगितले.

पुढे बोलतांना डॉ. राऊत म्हणालेत लोकांचा सिनेमा’ या चळवळीच्या माध्यमातून लेखक, दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी लोक वर्गणीतून ‘चल हल्ला बोल’ हा सिनेमा बनविला. “गोलपीठा ” या कविता संग्रहातून काही कवितांचा समावेश या चित्रपटात करण्यात आला आहे.

दलित पँथर, युवक क्रांती दल या चळवळींच्या पार्श्वभूमीवर दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक, मुस्लिम, शेतकरी, स्त्रिया आदींच्या शोषणाविरुद्ध लढ्याची भूमिका या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी नाकारली. नामदेव ढसाळ हे केवळ कवी नव्हते, तर दलित पँथर चळवळीचे एक महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या कवितांनी दलितांचे दुःख, अन्याय आणि विद्रोह मांडला. अशा व्यक्तिमत्त्वावर आधारित चित्रपटाची अडवणूक करणे म्हणजे दलितांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सेन्सॉर बोर्ड करित आहे. यावेळी डॉ. राऊत यांनी चित्रपटाला कुठलीही कात्री न लावता तात्काळ प्रदर्शित करण्याची मागणी विधानसभेत केली.

अधिकारी म्हणतात, कोण ढसाळ?
सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी रेवणकर व सय्यद रबी हश्मी यांनी चित्रपट निर्मात्यांना पाठवलेल्या एका नोटीसीत नामदेव ढसाळ कोण हेच आम्हाला माहिती नसल्याचा अजब दावा केला. ढसाळ यांना वर्ष १९९९ मध्ये पद्मश्री आणि वर्ष २००४ मध्ये साहित्य अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे.
सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी यांना जर दलित साहित्यामध्ये आणि मराठी साहित्याला विद्रोहाचा आयाम देणारे पद्मश्री नामदेव ढसाळ माहित नसतील, तर त्यांना त्या पदावर राहण्याचा काडीमात्र अधिकार नाही. अकलेचे तारे तोडत कोण नामदेव ढसाळ ? अशी विचारणा करून पद्मश्री नामदेव ढसाळ यांची अवहेलना करणाऱ्या सेन्सर बोर्ड अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ.नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली.

लोहगावसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारा; आमदार पठारे यांची अधिवेशनात मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी (ता. १८) कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात आमदार बापूसाहेब पठारे यांनी सरकारकडे महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. १९ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री कोयता गॅंगकडून झालेल्या तोडफोडीच्या घटनेवरून त्यांनी सर्वांचे विशेष लक्ष वेधले.

सदर घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, की “धानोरी व लोहगाव परिसरातील साठेवस्ती, कलवड वस्ती या ठिकाणी डिसेंबर महिन्यात अमली पदार्थ सेवन करून कोयता गॅंगने दुकानाच्या, वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. येरवडा, विश्रांतवाडी तसेच टिंगरेनगर या भागांमध्येही अशाच पद्धतीच्या अनेक घटना घडून येत आहेत. वारंवार तक्रारी करूनही या गोष्टीला आळा बसत नाही.” गुन्हेगारांवर कारवाई करण्यासंबंधी व या वाढत्या उपद्रवावर आळा घालण्यासाठी लोहगाव भागात स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारण्याची मागणी पठारे यांनी सरकारपुढे मांडली.
तसेच, अमली पदार्थांवर आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यासंबंधी यंत्रणा उभी करण्याबाबत मागणी केली. एकूणच वडगावशेरी मतदारसंघात अशा पद्धतीच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत सक्षमता आणणे व नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे फार गरजेचे असल्याचे,पठारे यांनी सांगितले.यावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत राज्य सरकार याबाबत सजग असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी असे नमूद केले, की या घटनांमध्ये विधी संघर्षित बालकांचा सहभाग असल्याचे आढळले असून, दिशा कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यात सुधारणा घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
लोहगाव भागाचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या व सतत घडणाऱ्या व घडू शकणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची आवश्यकता दिसून येते. सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध पोलीस दलावर मोठा ताण असून, लोहगावसह आजूबाजूच्या भागांसाठी लोहगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून वेगळी यंत्रणा निर्माण झाल्यास, कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखता येऊ शकते.

वासंती देव, मनीषा पवार यांना स्नेहाधार गौरव पुरस्कार

पुणे : स्नेहालय, अहिल्यानगर संचलित स्नेहाधार पुणे परिवारातर्फे ‌‘स्नेहाधार गौरव पुरस्कार‌’ वितरण सोहळा शनिवार, दि. 22 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता निवारा सभागृह, नवी पेठ येथे होणार आहे. पेण येथील प्रामुख्याने महिलांसाठी काम करणाऱ्या ‌‘अहिल्या महिला मंडळ‌’ या संस्थेच्या संस्थापिका वासंती श्रीकांत देव आणि कळसंबर (ता. बीड) येथे अनाथांसाठी ‌‘आपला परिवार‌’ या वृद्धाश्रमाची स्थापना करणाऱ्या मनीषा भाऊराव पवार यांना ‌‘स्नेहाधार गौरव पुरस्कार‌’ सन्मापूर्वक प्रदान केला जाणार आहे. निष्णात गिर्यारोहक, गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक उमेश झिरपे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती स्नेहाधार, पुणेच्या सहसंचालिका गौरी पाळंदे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

माहेर आणि सासरकडून मिळालेला सामाजिक कार्याचा वारसा वासंती देव पुढे चालवित आहेत. समाजातील महिलांना आत्मनिर्भर करावे आणि त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करावा या हेतूने वासंती देव यांनी समविचारी महिलांना एकत्र करून शिक्षण, आरोग्य, समाजस्वास्थ आणि स्त्री सक्षमीकरण या चतु:सुत्रीचा अवलंब करत पेण येथे सुमारे 25 वर्षांपूर्वी अहिल्या महिला मंडळाची स्थापना केली.

मनिषा पवार या बीड तालुक्यातील कळसंबर येथे ‌‘आपला परिवार‌’ नावाने वृद्धाश्रम चालवत आहेत. ज्यांचे जगाच्या पाठीवर कोणीही नाही अशा अंध, अपंग, बेघर व निराधार आजी-आजोबांचे वृद्धाश्रामत वास्तव्य आहे. पवार यांनी या कार्यासाठी स्वतःचे घर, दोन एकर जमीन संस्थेला दान केली आहे. आजी-आजोबा हिच आपली मुले आहेत या भावनेतून त्यांनी स्वत:ला मूल होऊ दिले नाही आणि आयुष्य समाजासाठी समर्पित केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील स्वराज्यासाठी सातत्याने परिश्रम घेऊ -गणेश बिडकर

पुणे-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील स्वराज्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि मुख्यमंत्री देवेन्द्रा फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण सातत्याने परिश्रम घेऊ असे येथे महापालिकेचे माजी सभागृहनेते गणेश बिडकर यांनी म्हटले आहे. जय भवानी जय शिवाजी या जयघोषात राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.तर पुणे शहराचा पूर्व भाग म्हणून ओळख असलेल्या सोमवारी पेठेतील विजय मित्र मंडळ ट्रस्ट आणि सम्राट ग्रुप चे आधारस्तंभ भाजपचे नेते पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बिडकर,तसेच विशाल दरेकर आणि संस्थापक अध्यक्ष शुभम पवार हे मागील तीन दशकांपासून भव्य दिव्य भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करीत आले आहेत.तर यंदाच्या वर्षी हिरकणी फेम सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी शिवजयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून रसिक प्रेक्षकांची मन देखील जिंकली.

या कार्यक्रमा दरम्यान भाजपचे नेते माजी सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, सोमवारी पेठेतील विजय मित्र मंडळ ट्रस्ट आणि सम्राट ग्रुप च्या माध्यमांतून वर्षभर विविध उपक्रम हाती घेण्यात येतात आणि आपण वर्षभर ज्या दिवसाची वाट पाहत असतो,तो दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जगभरात शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी होत आहे.त्या प्रमाणेच आपल्या पुणे शहरातील पूर्व भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोमवारी पेठेत देखील मोठया उत्साहाच्या वातावरणात जयंती साजरी केली जात आहे.याबद्दल मला खूप आनंद होत आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक पिढीला प्रेरणा आणि संदेश देण्याच काम केल आहे.त्यामुळे मी आणि आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या मार्गावर काम करित राहिले पाहिजे.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील जो महाराष्ट्र होता.जे स्वराज्य होत,ते सर्वांनी मिळून आणण्याचा प्रयत्न करावा,तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारच्या माध्यमातून तो प्रयत्न करीत असून या कामासाठी चळवळ उभारली गेली पाहिजे,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

तसेच या कार्यक्रमा दरम्यान मर्दानी खेळाचे आणि सुरेख अशा मल्लखांब चे प्रात्यक्षिक तरुणांनी करून दाखविले.तर उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवून जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करीत प्रात्यक्षिक करणार्‍या मुलांचे कौतुक देखील केले.या सोहोळ्यास हर्षल दिघे ,ऋषिकेश मोहिते, मानव मोहिते ,शुभम पगारे, धवल मोहिते, अभिषेक गायकवाड, किशोर गायकवाड, प्रणय पगारे ,आर्यन पिसाळ सुमित रामबाडे,अजिंक्य शेळके, निखिल बहिरट ,वसीम शेख, हेमंत शिंदे सनी परदेशी,रोहित गरुड ,आनंद पाटील यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

मनाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सकारात्मक विचार करा-डॉ. दत्ता कोहिनकर 

सूर्यदत्त’मध्ये प्रख्यात प्रतीक अदा शर्मा व अभिनेता ईश्वर सिंग त्यांच्याशी परीक्षा संवाद

पुणे: “अभिनयातून प्रेरणा प्रेरणाचे काम होते. फांदीची कथा प्रेरणात्मक असेल तरच मी ती स्वीकारते. ‘सूर्यदत्त’च्या चांगल्या आर्थिक लाभार्थी क्षेत्रासाठी प्रेरणा. आपल्या मतपूर्तीचा उपयोग. प्रत्येकाने स्वयंप्रेरणे नात्यातील किंवा करियर निर्णय घ्या,” असे प्रख्यात अदा शर्मा यांनी व्यक्त केले.’तुमच्या माझ्या कसम’ याच्या फायनाको कॅम्पस सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूट्सच्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित विद्यार्थी संवादादरम्यान अदा शर्मा बोलते. ‘मला मराठी आणि मी मराठीतून संवाद साधण्याचा प्रयत्न करतो’ या त्यांच्या वाक्यावर उत्स्फूर्तपणे बोलल्या वाजवून दाद दिली. ‘स्त्रीसूत्र’ उपक्रम त्यांनी ‘र्यदत्त’चे अभिनंदन केले.

कार्यक्रमाला ‘सूर्यदत्त’चे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. इंडिया, सहयोगी चॉकलेट चोर स्नेहल नवलखा, प्रेरक वक्ते डॉ. दत्ता कोहिनकर, प्रशांत पितालिया, एस. रामचंद्रन, किरण राव, कुंभाराचे विविध विभागांचे प्राचार्य प्रमुख, शिक्षक-शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी मोठ्याने उपस्थित होते. अव्वा रेशु अगरवाल (शिक्षण), एड. रूपल चोरडिया (पत्रकारिता), शोभा कुलकर्णी (सूत्रसंचालन व अध्यामिक सेवा) यांना ‘सूर्यदत्त स्त्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. डॉ. दत्ता कोनकर ‘मन दलहि’ विषयावर कार्यशाळा. या कार्यशाळेत १००० परीक्षानी प्रवेश दाखल.

अभिनेता ईश्वाक सिंग म्हणाले, “कष्ट, आवड आणि प्रयत्न या त्रिसूत्रीच्या आधारे आपल्या क्षेत्राची यशस्वी आहे. ग्लॅमरस देशासाठी आपली उत्सुकता जाणून घेण्यासाठी आहे. स्वत:चीच ओळख गरजेची आहे. भेट येत आहे. आपण जरूर पाहा.

प्रा. डॉ. संजय बी. ते म्हणाले, “महिन्याभर सुरू झालेल्या ‘स्त्री’ कार्यक्रमाचे महिन्यांत विद्यार्थी संवादाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ‘तुमचा माझा कसम’ फॉनल कथा संवदेनशील असून महिला उमेदवार आहेत. काही शिकता यावे, याकरिता हा उपक्रम आहे. प्रत्येकाने योग्य निर्णय घेणे आणि योग्य ज्ञान प्राप्त करणे आपल्या आवडी निवडीबद्दल वागणे आणि कठोर परिश्रम करावे.

डॉ. दत्ता कोहिनकर, “बाह्यमन अंतर्मनाला ज्याप्रकारे सूचना, त्याप्रकारे संप्रेरकांची तुमच्या शरीरातील काम अंतर्भूत करते. स्वतः नियमितपणे सकारात्मक विचार करा आणि स्वतःवर प्रेम करावे. विचार करा, तसे घडत असताना. तुम्ही ९० टक्के सामाजिक व्यक्ती. मनाशी संबंधित असतात. मनावर नियंत्रण हवे. सकारात्मक राहण्यावर भर द्या.”

प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. स्नेह नवलखा यांनी आभार मानले.

समाजाचा ढळलेला तोल सावरण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे स्मरण आवश्यक!

‘समाजभूषण’ पुरस्काराचे मानकरी भावेश ओझा यांचे प्रतिपादन

पुणे-‘सध्या सामाजेचा तोल ढळताना दिसत आहे, ही चिंतेची बाब आहे. पूर्वी नाना, आबा, अप्पा अशी नावे ऐकू यायची. आता मात्र भाई, खोक्या, आका ही नावे कानावर आदळत आहेत. ही समाजाची अधोगतीच मानली पाहिजे.यातून समाजाला सावरण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे स्मरणच समाजाला योग्य मार्ग दाखवेल,’ असे प्रतिपादन औंधमधील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते भावेश ओझा यांनी आज केले. औंधमधील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे त्यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार रामदासजी मुरकुटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. श्रीकांत गोविंद पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

भावेश ओझा म्हणाले की, ‘संस्कार कमी पडत असल्यामुळे समाजात अनैतिकता, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, वाढत असून, चांगल्या समाजनिर्मितीसाठी प्रत्येकाने श्री स्वामी समर्थांचे स्मरण सतत करण्याचे गरजेचे आहे. त्यांच्या स्मरणाने मनाला आधार मिळतोच, शिवाय चांगले संस्कारही मनावर घडतात,’ असे सांगून त्यांनी गेली २५ वर्षे चालू असलेल्या श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव केला.‘मला मिळालेला ‘समाजभूषण’ पुरस्कार श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करीत आहे,’ असे ते म्हणाले.

प्रारंभी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. श्रीकांत गोविंद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की,‘उच्चशिक्षित व परदेशात असणारी उत्तम संधी सोडून उद्योजक भावेश ओझा भारतात परतले. पुण्यात औंध येथे स्थायिक झाले असून, ते सातत्याने औंधच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले आहेत. तसेच धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील ते योगदान देत आहेत. त्यांचे कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सतत फुलत राहील,’ असे ते म्हणाले. संस्थेच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावाही त्यांनी घेतला.

याप्रसंगी ज्ञानेश्वर तापकीर यांचेही भाषण झाले. हृषीकेश कोल्हे यांनी मानपत्राचे वाचन केले. गंधाली भिडे यांनी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले. औंधमधील उमाशंकर कॉम्प्लेक्स परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ज्ञानेश्वर तापकीर, सुहास ढोले, तानाजी चोंधे, दत्तात्रय तापकीर, वसंत माळी, दीपक कालापुरे, निवृत्ती कालापुरे, संग्राम मुरकुटे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी व सचिव दिलीप वाणी यांसह शेकडो स्वामीभक्त उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता स्वामींच्या आरतीने आणि महाप्रसादाने झाली.

भाजपला महाराष्ट्राचा मणिपूर करायचाय: सत्ता राबवता येत नाही, तिथे दंगली घडवतात, आदित्य ठाकरे यांचा आरोप

मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नागपूर येथील हिंसाचाराच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपची महाराष्ट्राचा मणिपूर करण्याची इच्छा आहे. त्यांना ज्या ठिकाणी सत्ता राबवता येत नाही, त्या ठिकाणी ते दंगली घडवतात, असे ते म्हणालेत.खुलताबाद स्थित औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरून सोमवारी रात्री नागपूर येथे हिंसाचार झाला. त्यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाले. या प्रकरणाचे विधिमंडळातही तीव्र पडसाद उमटलेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. ते विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, नागपुरात हिंसाचाराची घटना घडली. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद किंवा माहिती देण्यात आली नाही. जेव्हा अफवा पसरल्या तेव्हाही मुख्यमंत्री कार्यालयाने आपली प्रतिक्रिया दिली नाही. असे का झाले? असा प्रश्न मला पडला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाचे काम मी अगदी जवळून पाहिले आहे. राज्यात एखाद्या ठिकाणी अशी घटना घडते, तेव्हा तत्काळ मुख्यमंत्री कार्यालयाला त्याची माहिती मिळते. गृह विभागालाही माहिती व रिपोर्ट मिळतो. त्यामुळे या विभागांना असे काही होणार आहे याची कल्पना आली नाही का? नागपूर हे तर स्वतः मुख्यमंत्री महोदयांचे शहर आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, भाजपला महाराष्ट्राचा मणिपूर करण्याची इच्छा आहे असा माझा आरोप आहे. मागील वर्षभरात मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. तिथे कुणाला जाळले जात आहे, तर कुणाला मारून टाकले जात आहे. आता तिथे एखादी गुंतवणूक जाईल का? कुणाला तिथे पर्यटनाला जाता येईल का? याचे उत्तर नाही असेच आहे. हेच आता त्यांना महाराष्ट्रात करायचे आहे. त्यांना महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती निर्माण करायची आहे. कारण, जिथे भाजपला सत्ता राबवता येत नाही, तिथे दंगली घडवण्याचे काम केले जाते.

भारत एक शक्तिशाली देश आहे. पण भाजपवाले आपल्या देशातील शक्ती तोडू पाहत आहेत. देशातील लोकांना धर्माच्या नावाखाली विभागले जात आहे. देशातील लोकांना जातीपातील विभागले जात आहे. असे केल्याने देशाची खरी ताकद जगाला दाखवता येणार नाही. भाजप सरकारचे हे अपयश आहे. महाराष्ट्रात मागील 3-4 महिन्यांपूर्वी भाजपचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेअर बाजारातही मोठी पडझड सुरू आहे. या सर्व गोष्टी पुढे येऊ नयेत. या ज्वलंत प्रश्नांकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे, यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उखरून काढण्यात आला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित रूपक कुलकर्णी यांचे रंगले सहवादन

पुणे : जगविख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे ज्येष्ठ शिष्य आणि प्रसिद्ध बासरीवादक पंडित रूपक कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‌‘बांसुरी परंपरा‌’ या अनोख्या सांगितीक महोत्सवात चार पिढ्यांच्या वादनातून बासरीचे सुमधूर स्वर अनुभवायला मिळाले. या सहवादनात 9 ते 75 या वयोगटातील 80 कलाकारांचा समावेश होता.
भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात गुरू-शिष्य परंपरेच्या माध्यमातून ज्ञान प्रवाहित ठेवताना प्रत्येक गुरूला आपल्या शिष्याची प्रगती पाहून आनंद होतो तसेच हे ज्ञान अखंडितपणे पुढील पिढीकडे दिले जाईल याचे शाश्वत समाधानही मिळते. ‌‘बांसुरी परंपरा‌’ या महोत्सवाच्या माध्यमातून अखंडितपणे सुरू असलेली बारसी वादनाची परंपरा प्रवाहित होताना पाहून पुणेकर रसिकांचे मनही समाधान पावले. तसेच शिष्य वर्गालाही आपल्या गुरूंसमवेत सादरीकरण करण्याचा अनोखी संधी लाभली. पंडित रूपक कुलकर्णी म्युझिक फाऊंडेशन आणि मृगेंद्र मोहाडकर यांच्या ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशनतर्फे द पूना वेस्टर्न क्लब, भूगाव येथे दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
‌‘बांसुरी परंपरा‌’ महोत्सवात जगविख्यात बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्यासह त्यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित रूपक कुलकर्णी यांचे रंगलेले बासरीवादन महोत्सवाचा कळसाध्याय ठरले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंडित रूपक कुलकर्णी यांच्यासह त्यांचे ज्येष्ठ शिष्य तसेच पुढील पिढीतील शिष्य यांच्या बासरी सहवादनाने ऋतुचक्राच्या उलगडलेल्या छटा रसिकांना मोहित करून गेल्या.
भारतीय शास्त्रीय संगीतात राग आणि ऋतू यांचे अनोखे भावबंध जुळलेले दिसतात. ऋतुनुसार मानवी भावनांचे बदलते रूप या स्वराविष्कारातून प्रभावीपणे मांडण्यात आले. बसंत ऋतूतील सादरीकरण करताना राग, प्रेम, आनंद आणि नाविन्यतेचे प्रतिक मानला जाणारा हिंडोल राग सादर करण्यात आला. ग्रीष्म ऋतूचे दाहक दर्शन घडविताना कलाकारांनी वृदांवनी सारंग रागाचे प्रकटीकरण केले.
त्यानंतर पंडित रूपक कुलकर्णी यांनी रचलेली मियाँमल्हार आणि मेघमल्हार रागांचे अनोखे मिश्रण दर्शविणारी रचना ऐकवून वर्षा ऋतूच्या आगमनाने आनंदीत झालेल्या सृष्टीचे जणू गाणेच ऐकविले. शांत आणि प्रसन्न भावना दर्शविणाऱ्या शरद ऋतूचे वर्णन बासरीवादनातून साकारताना नटभैरव रागातील सुंदर रचना सादर केली. हेमंत रागाचे वैशिष्ट्य उलगडताना राग यमनमधील कलात्मकतेने केलेले सादरीकरण रसिकांना भावले. तर शिशिर ऋतूचा स्वराविष्कार सादर करताना राग किरवाणीचे मोहक सादरीकरण करून सर्व कलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली.
पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित रूपक कुलकर्णी यांनी राग खमाजवर आधारित शब्दप्रधान गायकी असणाऱ्या ठुमरीचे स्वर बासरी वादनातून ऐकविल्यानंतर उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद देत पंडितजींना मानवंदना दिली. गुरूंच्या छत्रछायेत बहरलेल्या शिष्यांना पाहून रसिकांनी टाळ्यांचा वर्षाव केला. पंडित अरविंदकुमार आझाद (तबला), सौरभ गुळवणी (बेस तबला), शंतनू पांडे (की-बोर्ड) यांनी समर्पक साथसंगत केली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी तनिष्क अरोरा यांचे गायन झाले. त्यानंतर मृगेंद्र मोहाडकर आणि जयकिशन हिंगु यांच्या बासरीवादनाची जुगलबंदी रंगली. पहिल्या दिवसाची सांगता सुप्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने झाली. कलाकारांना पंडित भरत कामत, दिपिन दास, सपन अंजारिया (तबला), सुयोग कुंडलकर, आकाश नाईक (संवादिनी) यांनी साथसंगत केली.

‌‘प्यारभरे स्वरोंका और दिल का रिश्ता मन को आनंदित करता है‌’ : पंडित हरिप्रसाद चौरसिया

व्यासपीठावर मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या शिष्यांना पाहून पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेली ही मुले सर्वच कला क्षेत्रात उत्तम पद्धतीने ज्ञान संपादन करत आहेत ही गोष्ट खूप आनंददायी आहे, असे सांगून पुढील वर्षी या महोत्सवात येईन आणि त्या वेळी इथे उपस्थित प्रत्येक पुणेकराच्या हातात बासरी असावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. शिष्यांचे वादन ऐकून प्रसन्नचित्त झालेल्या पंडितजींनी ‌‘प्यारभरे स्वरोंका और दिल का रिश्ता मन को आनंदित करता है‌’ अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.

‘फुलपंखी डोळ्यातील मोरपंखी गुन्हा’ मांडणाऱ्या कवितांना मिळाली दाद

‘करम कोलाज’मधून मानवी भावनांचा काळीजकल्लोळ

पुणे : वसंत ऋतूमधील उत्फुल्ल निसर्गरंगांचे मानवी जीवनातले अनेक अंश, विविध कविता आणि गझलांच्या माध्यमातून रविवारी प्रकट झाले. सहा कवयित्रींनी साकारलेला हा विविध भावभावनांचा कल्लोळ करम कोलाजच्या व्यासपीठावरून रसिकांनी अनुभवला आणि मनमोकळी दादही दिली.

निमित्त होते ‘करम प्रतिष्ठान’ आयोजित नामवंत कवयित्रींच्या सुश्राव्य कविता व गझलांच्या मैफिलीचे. ‘करम कोलाज’ या शीर्षकांतर्गत सादर झालेल्या या मैफिलीत प्राजक्ता पटवर्धन, निरुपमा महाजन, वैजयंती आपटे, प्राजक्ता वेदपाठक, वैशाली माळी आणि चिन्मयी चिटणीस या कवयित्रींनी कविता, गझल सादर केल्या. कर्वे रस्त्यावरील सावरकर अध्यासन केंद्र येथे ही मैफिल रंगली.

करम कोलाज संकल्पनेविषयी करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर म्हणाले, आजच्या काळात मराठी भाषेत अत्युत्कृष्ट काव्यलेखन होत आहे. हे अस्सल काव्य लेखन रसिकांसमोर येणे अतिशय गरजेचे आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होणे यात अनेक महान व्यक्तींचे प्रयत्न आहेत. मात्र त्या दर्जाच्या योग्यतेचे लेखन करणाऱ्या कवयित्रींच्या कविता एकत्रित स्वरूपात जनमानसापुढे आणण्याचे काम करम प्रतिष्ठान करत आहे. रसिक या प्रयोगाला उत्कट दाद देत आहेत.

यावेळी बाबूल पठाण, अविनाश सांगोलेकर, ज्योत्स्ना चांदगुडे, सुवर्णा सोहोनी, अलका साने तसेच आनंदी वृद्धाश्रमाच्या संचालिका रोहिणी ताकवले आणि त्यांचे सहकारी महेंद्र वांजळे यांचा सत्कार करण्यात आला. ऋचा कर्वे यांनी कवयित्रींचा परिचय करून दिला. प्रज्ञा महाजन, वासंती वैद्य, मुक्ता भुजबले यांनी संयोजन केले तर शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

सहाही कवयित्रींच्या कविता, गझलांमधून मानवी प्रेमभावना, निसर्ग, ऋतू, हळव्या प्रेमभावनांचे मोरपिशी सूर तर प्रकट झालेच, पण कुटुंब, नाती, घराचा जिव्हाळा, दूरदेशी उडून गेलेली पाखरे, त्यांच्याविना सुनी झालेली आईवडिलांची भावविश्वे, आई, बाबा या आत्मीय नात्यांचे अनेक पदरही उलगडत गेले. या कवितांनी रसिकांना कधी सुखाच्या हिंदोळ्यावर झुलविले तर कधी गहिवरून टाकले.

किती दिवस अबोला
असा घेणार शब्दांनो,
गोड कवितेची ओळ
कधी येणार शब्दांनो,
असा प्रश्न चिन्मयी चिटणीस यांना पडला होता, तर

वासे फिरले तशी माणसे निघून गेली फ्लॅटवर
चोवीस तास राबूनसुद्धा फ्लॅट बनला नाही घर,
असा साक्षात्कार वैशाली माळी यांनी कवितेतून मांडला. वैशाली यांच्या कवितेतील
फुलपंखी डोळ्यातील मोरपंखी गुन्हा
काळजाच्या ओसरीला येई पुन्हा पुन्हा,
या कवितेनंही दाद मिळवली.

वैजयंती आपटे यांच्या कवितेतून
उत्सव माझा हिरवाईचा
नयनांमध्ये तुझ्याच हसला
ऋतू फुलांचे फुलवत येता
बहर तुला मी बहाल केला
, असे प्रीतीचे, समर्पणाचे आणि निसर्गाचे अनोखे एकरूपत्व प्रकट झाले.

प्राजक्ता पटवर्धन यांच्या कवितेतून,
दूर चालला लेक उडूनी उंच भरारी घेण्या
घरटे स्मरते त्याच्या साऱ्या हळव्या बालकहाण्या
, या शब्दांतून घरोघरची पाखरे उडून जाताना इथेच राहणार्या आईवडिलांचे कातर मन व्यक्त झाले.

निरुपमा महाजन यांनी जत्रा या कवितेतून लेक जरा नजरेआड झाल्यावर बाबाच्या मनाची जी उलघाल होते, त्याचे प्रत्ययकारी चित्रण केले होते.

गेलीच कशी अवचीत सोडुनी हात घट्ट धरलेला
जाणुनी जगाची रीत कल्पनातीत बाप भ्यालेला,
या त्यांच्या ओळी रसिकांना अंतर्मुख करून गेल्या.

प्राजक्ता वेदपाठक यांची आई ही कविता तर रसिकांच्या नेत्रकडा पाणावणारी होती.

काय लिहू आईवर
आई शब्दात मावेना
आई अवकाश खुले
माझा परीघ पुरेना,
या त्यांच्या शब्दांनी सुरुवातीला पकड घेतली.

आई चव अमृताची
जन्मभर उरणारी
आई प्रार्थनेची ओळ
घरभर तेवणारी,
या ओळी मनात साठवतच या मैफिलीची सांगता झाली.

कौतुकाची थाप कलाकारांसाठी प्रेरणादायी : शुभांगी दामले

नाट्य परिषद कोथरूड शाखा, शिवसाम्राज्य प्रतिष्ठानतर्फे महिला कलाकारांचा सन्मान

पुणे : समाजाकडून कलाकारांना मिळणारी कौतुकाची थाप आनंददायी आणि प्रेरणादायी असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी दामले यांनी केले. जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे देवाचे वास्तव्य असते आणि जिथे देवाचे वास्तव्य असते तिथे सुख, समाधान नांदते, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
अखिल भारतीय नाट्य परिषदेची कोथरूड शाखा आणि शिवसाम्राज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कलाक्षेत्रातील महिला कलाकरांचा सन्मान सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी सत्कारार्थींच्यावतीने शुभांगी दामले यांनी मनोगत व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे रौप्य महोत्सवी वर्ष आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शुभांगी दामले, संगीत क्षेत्रात रुची असलेल्या शीला देशपांडे, संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा जोगळेकर, संगीत रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर, सिने नाट्य अभिनेत्री अश्विनी थोरात, निवेदिका रत्ना दहीवेलकर, उद्योजिका साधना विसाळ, सिने-नाट्य अभिनेत्री नीता दोंदे आणि गायिका राधिका अत्रे यांचा सन्मान करण्यात आला.
देवकीताई पृथ्वीराज सुतार यांच्या हस्ते महिला कलाकारांना सन्मानित करण्यात आले याप्रसंगी अखिल भारतीय नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, कार्यवाह सत्यजित धांडेकर, दीपक गुप्ते, नाट्यगृहाच्या व्यवस्थापिका सुजाता देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. मान्यवरांचे स्वागत सुनील महाजन, सत्यजित धांडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.
सत्कार सोहळ्यानिमित्त ‘ती’च्या आयुष्यातील आनंद क्षणांची उधळण करणाऱ्या ‘चांदण्यात फिरताना’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गफार मोमिन, राधिका अत्रे, भाग्यश्री डुंबरे यांनी गीते सादर केली. कार्यक्रमाची संकल्पना धनंजय पूकर यांची होती. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. मानसी अरकडी यांनी केले तर सत्यजित धांडेकर यांनी आभार मानले.

काळू बाळू यांच्या वंशजानी वगाचे सादरीकरण करून जुन्या आठवणीला दिला उजाळा…..!

“संपूर्ण महाराष्ट्राला हसविणाऱ्या तमाशा सम्राट काळू-बाळू यांचे स्मारक नसल्याने मान्यवरांनी व्यक्त केली खंत”

मुंबई-विनोद सम्राट काळू बाळू यांची विनोदाची शैली निरागस होती, त्यांची वाणी शुद्ध होती, भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते, त्यांचा विनोद अजिबात अश्लील नव्हता. असे प्रशंसापर उद्गार लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी लोककला अकादमीच्या एका कार्यक्रमात काढले. तर महाराष्ट्रात अद्याप या विनोद सम्राटाचे स्मारक उभे राहू शकले नसल्याची खंत यावेळी आयोजित केलेल्या चर्चा सत्रात अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने तमाशा क्षेत्रातील जुन्या पिढीचे विनोद सम्राट काळू-बाळू कवलापूरकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी “रंगबाजी”सांस्कृतिक कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमाला रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी आणि लोकजीवन फाउंडेशन, मुंबई यांनी नियोजन केले होते.
.महाराष्ट्रात अजूनही या महान विनोद सम्राटाचे स्मारक होवू शकले नाही. ही दुर्दैवाची बाब असून आता तरी नव्या पिढीला काळू बाळू कवलापूरकर यांची ओळख रहावी म्हणून लवकर उचित स्मारक होणे आवश्यक आहे, तसेच त्यांच्या नावे शासनाने विनोदी क्षेत्रातील कलावंतासाठी “विशेष पुरस्कार ” सुरू करणे गरजेचे आहे. असे स्पष्ट मत यावेळी जेष्ठ पत्रकार आणि लोककलेचे अभ्यासक खंडूराज गायकवाड यांनी व्यक्त केले.
समकालीन रंगभूमीला खरी ऊर्जा काळू बाळू यांच्या सारख्या लोककलावंतांमुळे प्राप्त झाली. अशा भावना अभिनेते दिग्दर्शक संतोष पवार यांनी व्यक्त केल्या.
काळू बाळू खरोखर विनोदाची जोड गोळी होती. आमच्या लोककला अकादमीत आम्ही काळू बाळू यांची रंगबाजी पदवीधर विद्यार्थ्यांना शिकवितो.असे मत लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी व्यक्त केले.

 सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दरम्यान  काळू बाळू यांचे नातू सूरजकुमार, निलेशकुमार यांनी "जहरी प्याला" या वगनाट्यातील  काळू बाळू यांनी साकारलेल्या हवालदाराची भूमिका करून कार्यक्रमात रंगत आणली, त्यांचे अजून एक नातू अनुपकुमार यांनी प्रधानाची भूमिका केली. यावेळी काळू बाळू  यांचे चिरंजीव विजयकुमार खाडे यांनी गण आणि भैरवी सादर करून  काळू बाळू यांच्या आठवणीला उजाळा दिला. लोककला अकादमीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. शिवाजी वाघमारे यांनी काळूबाळू यांनी लोकप्रिय केलेला मित्राचा कटाव सादर केला. 
या कार्यक्रमाला मुंबई  विद्यापिठाचे सिनेट सदस्य धनेश सावंत,  काळूबाळू यांचे नातू आनंद खाडे, राज्यपालाचे निवृत्त उपसचिव देवेंद्र खाडे, अकॅडमी ऑफ थिएटर आर्टचे संचालक योगेश सोमण, माजी आमदार बाबुराव माने, तसेच काळू बाळू यांच्या कुटूंबियांना एका चित्रपटात काम देणारे निर्माते/ दिग्दर्शक महेंद्र देवळेकर,शाहीर आप्पासाहेब उगले आदी मान्यवर  उपस्थित होते.