“संपूर्ण महाराष्ट्राला हसविणाऱ्या तमाशा सम्राट काळू-बाळू यांचे स्मारक नसल्याने मान्यवरांनी व्यक्त केली खंत”

मुंबई-विनोद सम्राट काळू बाळू यांची विनोदाची शैली निरागस होती, त्यांची वाणी शुद्ध होती, भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते, त्यांचा विनोद अजिबात अश्लील नव्हता. असे प्रशंसापर उद्गार लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी लोककला अकादमीच्या एका कार्यक्रमात काढले. तर महाराष्ट्रात अद्याप या विनोद सम्राटाचे स्मारक उभे राहू शकले नसल्याची खंत यावेळी आयोजित केलेल्या चर्चा सत्रात अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने तमाशा क्षेत्रातील जुन्या पिढीचे विनोद सम्राट काळू-बाळू कवलापूरकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी “रंगबाजी”सांस्कृतिक कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमाला रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी आणि लोकजीवन फाउंडेशन, मुंबई यांनी नियोजन केले होते.
.महाराष्ट्रात अजूनही या महान विनोद सम्राटाचे स्मारक होवू शकले नाही. ही दुर्दैवाची बाब असून आता तरी नव्या पिढीला काळू बाळू कवलापूरकर यांची ओळख रहावी म्हणून लवकर उचित स्मारक होणे आवश्यक आहे, तसेच त्यांच्या नावे शासनाने विनोदी क्षेत्रातील कलावंतासाठी “विशेष पुरस्कार ” सुरू करणे गरजेचे आहे. असे स्पष्ट मत यावेळी जेष्ठ पत्रकार आणि लोककलेचे अभ्यासक खंडूराज गायकवाड यांनी व्यक्त केले.
समकालीन रंगभूमीला खरी ऊर्जा काळू बाळू यांच्या सारख्या लोककलावंतांमुळे प्राप्त झाली. अशा भावना अभिनेते दिग्दर्शक संतोष पवार यांनी व्यक्त केल्या.
काळू बाळू खरोखर विनोदाची जोड गोळी होती. आमच्या लोककला अकादमीत आम्ही काळू बाळू यांची रंगबाजी पदवीधर विद्यार्थ्यांना शिकवितो.असे मत लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दरम्यान काळू बाळू यांचे नातू सूरजकुमार, निलेशकुमार यांनी "जहरी प्याला" या वगनाट्यातील काळू बाळू यांनी साकारलेल्या हवालदाराची भूमिका करून कार्यक्रमात रंगत आणली, त्यांचे अजून एक नातू अनुपकुमार यांनी प्रधानाची भूमिका केली. यावेळी काळू बाळू यांचे चिरंजीव विजयकुमार खाडे यांनी गण आणि भैरवी सादर करून काळू बाळू यांच्या आठवणीला उजाळा दिला. लोककला अकादमीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. शिवाजी वाघमारे यांनी काळूबाळू यांनी लोकप्रिय केलेला मित्राचा कटाव सादर केला.
या कार्यक्रमाला मुंबई विद्यापिठाचे सिनेट सदस्य धनेश सावंत, काळूबाळू यांचे नातू आनंद खाडे, राज्यपालाचे निवृत्त उपसचिव देवेंद्र खाडे, अकॅडमी ऑफ थिएटर आर्टचे संचालक योगेश सोमण, माजी आमदार बाबुराव माने, तसेच काळू बाळू यांच्या कुटूंबियांना एका चित्रपटात काम देणारे निर्माते/ दिग्दर्शक महेंद्र देवळेकर,शाहीर आप्पासाहेब उगले आदी मान्यवर उपस्थित होते.