अध्यक्षा ॲड. सुशिबेन शाह यांनी घेतली गंभीर प्रकरणांची दखल
पुणे -महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील विविध बालहक्क प्रकरणांवर दिनांक १७ व १८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे दोन दिवसीय सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान बालकांच्या शिक्षण हक्कांशी संबंधित प्रकरणे, मूलभूत हक्कांचे उल्लंघन, तसेच विविध कायद्यांतर्गत प्राप्त तक्रारींवर सखोल चर्चा करण्यात आली.
या सुनावणीत एकूण ६० प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली. त्यामध्ये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिनियम, २००९ अंतर्गत प्राप्त तक्रारी, POCSO अधिनियम अंतर्गत लैंगिक शोषणासंदर्भातील प्रकरणे, JJ Act (जुवेनाईल जस्टिस कायदा) अंतर्गत प्रकरणे आणि बाल हक्क उल्लंघनासंदर्भातील विविध तक्रारींचा समावेश होता.
सुनावणीदरम्यान विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बालकल्याण समिती, पुणेचे अध्यक्ष आणि सदस्य, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी (पुणे महानगरपालिका), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच शिक्षण संचलनालयातील अधिकारी व कर्मचारी या सुनावणीत सहभागी झाले.
या सुनावणीत शिक्षण विभागाशी संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने काही शाळांनी शिक्षण विभागाशी संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने काही शाळांनी सुनावणी दरम्यान आयोगाने दखल दिल्यामुळे पालक व शाळा यांच्यामध्ये सामंजस्याने पालकांना त्यांच्या पाल्याची शाळा सोडल्याचे दाखले दिल्या बाबतचा अहवाल सादर केला. तसेच पोलीस विभागाशी संबंधित प्रकरणांमध्ये झालेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोगासमोर सादर करण्यात आला.
मुलांच्या शिक्षणाच्या हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. तसेच, POCSO आणि JJ Act अंतर्गत प्रकरणांमध्ये कठोर कायदेशीर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले. बालकांचे हक्क संरक्षित राहावे आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग कटिबद्ध आहे, असे यावेळी आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशिबेन शाह यांनी सांगितले.
सदर सुनावणीस आयोगाचे सदस्य संजय सेंगर, जयश्री पालवे, चैतन्य पुरंदरे, सायली पालखेडकर, प्रज्ञा खोसरे देखील उपस्थित होते.
पुणे- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी च्या वतीने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ औंध गाव येथे कर्तुत्वावान महिलांचा सन्मान करण्यात आला शिवाजी नगर उपविभाग संघटिका सौ.सोनाली ताई जुनवणे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते . सदर कार्यक्रमाला ७० हून अधिक विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला उपस्थित होत्या त्यांना ट्रॉफी, शाल आणि फुलांची कुंडी असे देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पीएसआय स्नेहल पाटील चतुःशृंगी पोलीस चौकी, शिवसेना विभाग प्रमुख रमेश जुनवणे तसेच महिला आघाडीच्या रोहिणी कोल्हाळ, ज्योती चांदिरे, रेखा कोंडे, करुणा घाडगे, विजया मोहिते, तसेच अनेक शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या
पुणे- आज विधानसभेत आमदार भीमराव तापकीर यांनी महापालिकेच्या कारभारावर एकूणच आपल्या सौम्य भाषेत ताशेरे ओढले. समाविष्ट गावांच्या प्रश्नानंतर त्यांनी महापालिकेतून गुंठेवारीची कागदपत्रे गहाळ झाल्याचा गौप्यस्फोट केला आणि बोगस गुंठेवारी सुरु असल्याचा देखील आरोप करत या संदर्भात अधिकाऱ्यावर कारवाई ची मागणी केली .
तत्पूर्वी आज समाविष्ट गावातील मिळकत कर , पाणीपुरवठा यावर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित करत महापालिकेच्या प्रशासनावर नाराजी व्यक्त केली
: आयुक्तांची गावांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात होणार बैठक
पुणे : पुण्यामध्ये नव्याने समाविष्ठ झालेल्या ३२ गावांनी पुणे महापालिकेला किती मिळकत कर दिला? आणि महापालिकेने काय सोयी सुविधा उपलब्ध करून दिला? पुणे महापालिका आयुक्तांनी या गावांबाबत कोणताच निर्णय घेतला नाही त्यांच्याकडे ती क्षमताच नाही अशी खरमरीत टीका खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसेभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली.
पुणे शहराच्या चोहू बाजूने असलेल्या ३२ ग्रामंपंचायती पुणे महापालिकेत विसर्जित करून पुणे शहाराचा विस्तार करण्यात आला. त्यामुळे या गावांचा महसुली कर ग्रामपंचायत ऐवजी महापिलेकत जमा होत आहे. ३२ गावांतून कोट्यवधी रुपयांचा कर महापालिकेला मिळत आहे मात्र त्या तुलनेत या गावांमध्ये ना रस्ते, ना ड्रेनेज, ना शुध्द पाणीपुरवठा महापालिकेत पुरवते आहे, त्यामुळे या गावांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन करून अनेकवेळा आंदोलन केले आयुक्तांना निवेदने दिली आहेत. मात्र आयुक्तांनी त्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे आमदार भीमराव तापकीर यांनी ३२ गावांचा प्रश्न विधानसभेत विचारला.
आमदार तापकीर म्हणाले की, ३२ गावांनी मिळून महापालिकेला आत्तापर्यंत किती टॅक्स दिला आहे. तो आकडा मंत्रीमहोदयांनी द्यावा तो आता उपलब्ध नसेल तर तातडीने या गावांच्या समस्या सोडविण्यासाठी एक बैठक घ्यावी आणि त्यावेळी या गावातून मिळालेले महसूली उत्पन्न सांगावे. गावनिहाय कराची रक्कम सांगावे. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत तातडीने बैठक घेण्याची सुचना मंत्री उदय सामंत यांना दिली.
कौशल्य विकास केंद्र लवकरच तब्बल १९० कोटी रुपयांचे देशातील सर्वात मोठे कौशल्य विकास केंद्र पुण्यामध्ये लवकरच होणार आहे. उद्योजक रतन टाटा हयात असताना याबाबत निर्णय झाला आहे. त्यासाठी १६० कोटी रुपये टाटा ग्रूपकडून सीएसआर व्दारे मिळणार आहे तर उर्वरित रक्कम पुणे महापालिका देणार आहे. याची बैठक लवकरच होणार असून त्या बैठकीला सर्वांना बोलाविण्यात येईल अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
पुणे- नव जागृती मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव डी. जे. ला फाटा देत टाळ मृदुंग च्या भक्ती सुरात व मर्द मराठा मैदानी खेळाच्या गजरात साजरा करण्यात आला. दिनांक 17 मार्च 2025 शिवशके 351 शिवजन्मोत्सव रोजी शिवनिर्णय दिनदर्शिका आमदार सुनील कांबळे,लेखक, व्याख्याते प्रा. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते व अध्यक्ष राहुल शर्मा यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक रित्या प्रकाशित करण्यात आले. नागपूर येथे धार्मिक तेढ निर्माण झाली असता पुण्यात मात्र एकते चे सकारात्मक दृश्य दिसले , भक्ती शक्ती संगम च्या अंतर्गत शिवजन्मोत्सव दिनी येथेच मुस्लिम बांधव यांच्या सोबत रोजा इफ्तार करण्यात आले.
हा कार्यक्रम मंगळवार पेठ येथील नव जागृती मित्र मंडळ यांनी आयोजित करण्यात आला बजमे तहा, बजमे रहेबर व युनिटी फ्रेंड सर्कल यांनी संयुत रित्या सहभाग घेतला.अध्यक्ष राहुल भाऊ शर्मा, राकेश यादव, पंकज अगरवाल, अक्षय बारसकर, कुणाल यादव, कपिल अगरवाल, सागर कदम, जुनेद तांबोळी, आयाज खान, राजू शेख, अजहर तांबोळी, समीर पठाण, तारिक शेख, सलीम शेख, इस्माईल यार खान, रफिक शेख, फराज खान, अकबर कुरेशी, इकबाल शेख आदी सहभागी व अनेक रोजदार उपस्थित होते.
मुंबई-बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राध्यापक आणि विद्यार्थी असल्याचे भासवून लंडन येथे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आठ जणांना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. हे सर्व विद्यार्थी हरियाणातील आहेत. यातील तिघेजण हे अल्पवयीन आहेत. मानवी तस्करीचा हा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असल्याचे सांगण्यात आले. सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन तरुणांनी मुंबई विमानतळावरील इमिग्रेशन काऊंटरवर पडताळणीसाठी त्यांचा पासपोर्ट आणि व्हिसा सादर केला. त्यांच्याकडे इंग्लंडचा व्हिजिट व्हिसा होता. हरियाणातील एका विद्यापीठाचे विद्यार्थी असून प्राध्यापकांसह लंडनला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, इतर प्रश्न विचारल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही.त्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांच्यासह आणखी ६ जण लंडनला जाणार असल्याची माहिती मिळाली. या सर्वांना गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्यावर पारपत्र कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे प्रकरण गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले असून ते याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. व्हिसा मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची सुटका करण्यात आली.
गृहमंत्र्यांना पोलिसांना सुरक्षित ठेवता येत नसेल तर राज्य कसे सुरक्षित ठेवणार?
मुंबई-नागपूरमध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर हात टाकल्याची बातमी येतेय. गृहखात्यासाठी ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना गृहमंत्री सुरक्षित ठेवू शकत नसतील तर राज्य सुरक्षित कसे सुरक्षित ठेवणार? असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.सुषमा अंधारे म्हणाल्या की, नीतेश राणेसारख्या अतिशय भंपक, बेताल माणसाला जाणीवपूर्वक मोकळीक देणे ही फडणवीसांची पूर्वनियोजित योजना आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नागपूरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारादरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात 33 पोलfस जखमी झाले. ही दंगल सुरू असताना काही समाजकंटकांनी महिला पोलिसाचा विनयभंग केल्याच्या घटना समोर आली आहे. यावरुन अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
नागपूर मध्ये झालेल्या दंगलीवर आरोप प्रत्यारोप होत असतानाच आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये दंगल नियंत्रण करण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या दंगली दरम्यान करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्यापर्यंत या दंगेखोरांची मजल गेल्याने आता या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नितेश राणेसारख्या भंपक, बेताल माणसाला जाणीवपूर्वक मोकळीक देणे ही फडणवीसांची पूर्वनियोजित योजना आहे. नागपूरमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर हात टाकल्याची बातमी येतेय. गृहखात्यासाठी ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. पोलिसांना सुरक्षित ठेवू शकत नसाल तर राज्य सुरक्षित कसे राहील?
सुषमा अंधारे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, नीतेश राणेसारख्या अतिशय भंपक, बेताल माणसाला जाणीवपूर्वक मोकळीक देणे ही फडणवीसांची पूर्वनियोजित योजना आहे का? नागपूरमध्ये महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर हात टाकल्याची बातमी येतेय. गृहखात्यासाठी ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना गृहमंत्री सुरक्षित ठेवू शकत नसतील तर राज्य सुरक्षित कसे सुरक्षित ठेवणार? विधानसभेत लाडक्या बहिणीची ढाल केली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मढी उकराताहेत? विकासाचं गाठोडं काय अरबी समुद्रात बुडवलं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, सध्या महाराष्ट्रात महापुरुषांची बदनामी करण्याची स्पर्धा लागली आहे.अशा वक्तव्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांना शिवसेना उबाठा पक्ष कदापिही माफ करणार नाही, असा इशारा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे. तर महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या कोरटकर यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देणार असल्याचे सांगितले.
पुणे — हिंजवडी परिसरात एका मिनी बसला आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत 4 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त असून , दोघे जण गंभीर भाजलेत. हिंजवडी पोलिस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी या भीषण अपघाताची माहिती दिली. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला ही आग लागली. यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण जखमी आहेत. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे. या बसमध्ये एकूण 12 कामगार होते. मात्र, मागचा दरवाजा न उघडल्याने ही चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
फेज १ रोडवर, व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल MH14 CW 3548 बस ला अचानक आग लागली होती. सदर आगीत टेम्पो मधील एकूण 12 प्रवासी पैकी 04 प्रवाश्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. सदर जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचार कामी पाठविण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्याने संबंधित भीषण घटना घडली
सुनीता विल्यम्सच्या वडिलांच्या गावी मिरवणूक, दिवाळीसारखा आनंदोत्सव
वाशिंग्टन-तब्बल नऊ महिने अंतराळात अडकून पडलेल्या ‘नासा’च्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स बुधवारी पहाटे ३.२८ वाजता फ्लोरिडाच्या समुद्रात सुखरुप लँड झाली. तिच्यासोबत बेरी विल्मोर, निक हेग व रशियाचे अॅलेक्झांडर गोरबुनोव हेही होते. भारतीय वेळेनुसार मंगळवारी सकाळी १०.३५ वाजता आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या स्पेसएक्स या ‘ड्रॅगन कॅप्सूल’द्वारे पृथ्वीच्या दिशेने त्या निघाल्या होत्या. त्यांचा हा प्रवास १७ तासांचा होता. टेकऑफपूर्वी जपानचे अंतराळवीर ताकुया ओनिशी यांना कॅप्सूल व स्पेस स्टेशनच्या दरम्यान हॅच सीलवर धुळीचे कण दिसले. सील एअरटाइट होण्यासाठी हे कण हटवणे आवश्यक होते. ओनिशी यांनी हे काम फत्ते केले, यानंतर टेकऑफला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आतापर्यंत ‘ड्रॅगन’ १० वेळा अंतराळ यात्रींना स्पेस स्टेशनला घेऊन गेला. पैकी ९ वेळा सुखरूप परतला. अाता त्यांचा दहावा प्रवासही सुखरुप पार पडला. सुनीता विल्यम्स व विल्मोर यांना अंतराळात फक्त ८ दिवस राहायचे होते, पण तांत्रिक अडचणीमुळे २८६ दिवस त्यांना अडकून पडावे लागले. यादरम्यान त्यांनी ४५०० वेळा पृथ्वीची परिक्रमा केली.
नासाचे अधिकारी रॉब नावियास यांनी सांगितले, ‘अंतराळातील ही सर्वात मोठी मोहीम नसली तरी आव्हानात्मक अाहे.’ सुनीता तीन मिशनमध्ये एकूण ६०९ दिवस अंतराळात राहिली. ती नवव्या क्रमांकावर आहे. रशियाचे ओलेग कोनोनेन्को १११० दिवस राहून पहिल्या स्थानी आहे. टॉप १० मध्ये रशिया/ सोव्हिएत संघाचे ८ व अमेरिकेचे २ अंतराळवीर आहेत. पेगी विटसन (६७५ दिवस) यांच्यानंतर सुनीता सर्वाधिक काळ अंतराळात राहणारी अमेरिकन ठरली आहे.
सुनीता विल्यम्सच्या सुरक्षित परतीसाठी त्यांच्या वडिलांचे गाव झुलासणमध्ये दिवाळीसारखी तयारी केली होती. सुनीता सुखरुप आल्याचे कळताच या गावात जल्लोष साजरा झाला. सुनीता यांचे चुलत भाऊ नवीन पंड्या यांनी सांगितले की, त्यांच्या स्वागतासाठी एक मोठी मिरवणूक काढण्यात आली. यात प्रार्थना आणि आतषबाजीसह दिवाळी आणि होळीसारखे वातावरण हाेते. मिरवणुकीत सुनीतांचे छायाचित्र होते. ग्रामस्थ त्यांच्या सुरक्षित परतीसाठी प्रार्थना करत होते. अखंड ज्योतही लावण्यात आली होती. ही ज्योत सुनीता अंतराळात गेल्या तेव्हापासून जळत आहे. ग्रामप्रमुख विशाल पंचाल यांनी सांगितले की, शाळकरी मुलेही १५ दिवसांपासून त्यांच्या सुरक्षित परतीसाठी रामधून गात आहेत. सुनीता यांचे वडील दीपक पंड्या यांचे मूळ गाव झुलासण आहे. ते १९५७ मध्ये अमेरिकेत गेले होते. गावातील लोक सुनीता यांच्या परतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. भविष्यात त्या गावी आल्यास त्यांचे भव्य स्वागत करण्याचा बेत आखत आहेत. उल्लेखनीय म्हणजे सुनीता यांनी आतापर्यंत ६२ तासांचे नऊ स्पेसवॉक पूर्ण केले आहेत.
ड्रॅगन कॅप्सूल अंतराळ स्थानकातून निघाले ड्रॅगन पृथ्वीवर परतले
३:२३ वा. : पुनर्प्रवेश टप्पा पूर्ण झाल्यानंतर कॅप्सूलशी संपर्क पुन्हा स्थापित.
३:२४ वा. : कॅप्सूल स्पष्ट दिसले, दोन्ही पॅराशूट उघडले. ३:२५ वा. : आणखी दाेन पॅराशूट उघडले ३:२६ वा. : ड्रॅगन कॅप्सूल उतरण्यासाठी तयार ३:२८ वा. : कॅप्सूल समुद्रात उतरली३:३२ वा. : दोन नाैका कॅप्सूलजवळ पाेहाेचल्या ,२५ मिनिटांनी सर्वांना बाहेर काढण्यात आले.
सुनीता यांचे यान समुद्रात लँड होताच २ सुरक्षा बोटींतून आलेल्या अभियंत्यांनी ड्रॅगन कॅप्सुलची तपासणी केली. यानंतर रिकव्हरी शिप आणले. (इन्सेटमध्ये) कॅप्सुलमध्ये सुनीता उजवीकडे, बाजूला क्रूचे कमांडर व पायलट, डावीकडे विल्मोर. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील झुलासण येथे प्रार्थना करण्यात आली.केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १ मार्च रोजी सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहिले. त्यांनी ‘भारताच्या कन्येबद्दल’ चिंता व्यक्त केली. त्यांनी लिहिले, ‘हजारो मैल दूर असलात तरी तुम्ही आमच्या हृदयाजवळ आहात. भारतातील लोक तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करत आहेत. तुम्ही परतल्यावर भारतात तुमचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. भारतासाठी आपल्या सर्वात प्रतिष्ठित मुलींपैकी एकीचे आतिथ्य करणे ही अभिमानाची गोष्ट असेल. श्रीमती बोनी पंड्या (सुनीताची आई) तुमच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहत असतील. मला खात्री आहे की दिवंगत दीपक (वडील) यांचे आशीर्वादही तुमच्यासोबत आहेत.
सुनीता पृथ्वीवर तेव्हा स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकणार नाहीत, नॉर्मल होण्यास लागेल दीड महिना; पहिल्या टप्प्यात चालण्याचे प्रशिक्षण
सुमारे ९ महिने त्या गुरुत्वाकर्षणाशिवाय अंतराळात राहत आहेत. त्यांना स्ट्रेचरवर रुग्णालयात नेण्यात आले . नासाच्या माहितीनुसार, यानंतर त्यांची रिकव्हरी प्रक्रिया सुरू झाली . डॉक्टरांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात त्यांच्या चालण्यावर, लवचिक होण्यावर व मांसपेशी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. सर्वसामान्यांप्रमाणे होण्यासाठी त्यांना ६ आठवडे लागू शकतात. या काळात विशेष व्यायाम, पोषक आहारावर लक्ष दिले जाईल. स्पेस स्टेशनमध्ये नवीन व जुन्या क्रूमध्ये ५ दिवसांचा ‘हस्तांतरणाचा काळ’ असतो. यात नवीन क्रूला संपूर्ण माहिती दिली जाते. पण यंदा नासाने स्पेस स्टेशनवर भोजनाची बचत व्हावी म्हणून ही मुदत २ दिवस केली. अनिश्चित वातावरणात क्रू ९ मधील सदस्यांना परतीसाठी अधिक वेळ मिळावा, हेही कारण होते. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या मोहिमेला गती मिळाली. ट्रम्प यांनी सुनीता व विल्मोर यांना परत आणण्याची जबाबदारी इलॉन मस्कवर सोपवली हाेती.
८ दिवसांच्या मोहिमेवर गेले, पण त्यांना ९ महिन्यांहून अधिक काळ लागला सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंग आणि नासाच्या ८ दिवसांच्या संयुक्त ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’वर गेले. या मोहिमेचा उद्देश बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाची अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात नेण्याची आणि परत आणण्याची क्षमता तपासणे हा होता.अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावरील त्यांच्या ८ दिवसांच्या कालावधीत संशोधन आणि अनेक प्रयोग करावे लागले. पण थ्रस्टरमध्ये समस्या आल्यानंतर, त्यांचे ८ दिवसांचे मिशन ९ महिन्यांहून अधिक काळ वाढवण्यात आले. अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतण्यासाठी १७ तास लागले-ड्रॅगन कॅप्सूल वेगळे झाल्यापासून ते समुद्रात उतरेपर्यंत सुमारे १७ तास लागले. १८ मार्च रोजी सकाळी ८:३५ वाजता, अंतराळयानाचा दरवाजा उघडला गेला. १०:३५ वाजता अंतराळयान आयएसएसपासून वेगळे झाले.१९ मार्च रोजी पहाटे २:४१ वाजता डीऑर्बिट जळण्यास सुरुवात झाली. म्हणजेच, अंतराळयानाचे इंजिन कक्षापासून विरुद्ध दिशेने चालवण्यात आले. यामुळे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकले आणि पहाटे ३:२७ वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील पाण्यात उतरले.
पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी २० व २१ मार्च रोजी सकाळी १० ते ६ यावेळेत कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त विजय शिखरे यांनी कळविली आहे.
बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन हे आधुनिक तंत्रज्ञान असून हे किफायतशीर होण्यासाठी टँक उभारल्यानंतर प्रत्यक्ष मत्स्यबीज संचयनापूर्वी पूर्वतयारी बरोबरच मत्स्यसंवर्धनामध्ये खाद्य व्यवस्थापनासह शास्रोक्त पद्धतीने माशांच्या आरोग्य व्यवस्थापनाविषयी माहिती या प्रशिक्षणात देण्यात येणार आहे. या तंत्राबाबत शास्त्रज्ञ, प्राध्यापक, तज्ज्ञ अधिकारी व अनुभवी बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धक यांच्यामार्फत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन प्रकल्पस्थळी भेटीद्वारे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.
प्रशिक्षणामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना व परभणी या जिल्ह्यांतील बायोफ्लॉक प्रकल्प असलेल्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा (पीएमएमएसवाय) अंतर्गत बायोफ्लॉक कल्चर योजनेतील सर्व बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन प्रकल्पधारकांनी तसेच बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन प्रकल्प मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी ९४२३७५८८२४, ९८८१६००९५१ व ८२०८४१३०११ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. शिखरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 0000
पुणे,: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा परिसर सोमवारी सायंकाळी धीरगंभीर झाला होता. सायंकाळचा मंद वारा या वातावरणात आशेची झुळुक घेऊन येत राहिला. त्यासोबत तिथे पद्मश्री गिरीश प्रभुणेंचे साहित्य आणि लेखनविषयक विचार उपस्थित विद्यार्थ्यांना नव्या भारताच्या निर्मितीचे दिग्दर्शन करणारा ठरला.एक सेकंदही न टिकणाऱ्या वर्तमानात दंग न होता, खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पाहण्याचे व ते आपल्या लेखणीद्वारे टिपण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
पुणे विद्यापीठात आयोजित ‘मी लेखक होणारच’ या कार्यशाळेच्या निमित्ताने जमलेल्या सर्व विद्यार्थी-प्राध्यापकांसाठी हा अनुभव कार्यशाळेतील एक महत्त्वाचा प्रेरणादायी टप्पा ठरला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर, सागर वैद्य आणि अधिष्ठाता डॉ. संजय तांबट यांनाही या प्रभुणे यांचे मार्गदर्शन हे जागेवर खिळवून ठेवणारे ठरल्याचे सोमवारी दिसून आले.
नवलेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठामध्ये राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या मदतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत प्रभुणे यांनी सावित्रीबाई फुले- महात्मा फुले यांच्या जीवनानुभवांपासून आपल्या मार्गदर्शनाची सुरुवात केली. फुले दाम्पत्याचे कार्य हे आपल्याला एखाद्या महाकाव्याप्रमाणे भासते. लेखनाच्या हिशेबाने नवलेखकांनी आपल्याकडील असे अनुभव टिपणे गरजेचे ठरेल. त्यासाठी आपल्याकडील सामाजिक समस्या, त्यामधील नाट्यमयता, योग्य शब्दांमधून आणि योग्य पद्धतीने मांडली, तर त्या आधारे दर्जेदार साहित्यनिर्मिती शक्य असल्याचे प्रभुणे यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून पटवून दिले.प्राचार्य डॉ. चाकणे यांनी प्रास्ताविक केले. मंठाळकर यांनी प्रभुणे यांचा परिचय करून दिला. डॉ. तांबट यांनी आभार मानले.
फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे हे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. दुसऱ्याचे घर पेटवायला निघालेल्या लोकांनी हे लक्षात घ्यावे की तुमचे घर पेटले आहे. औरंगजेबाची कबर यांना का आठवत आहे? कारण सरकारचे अपयश लपण्यासाठी हे सगळे सुरू आहे. लाडकी बहीण, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या हे मुद्दे बाजूला करण्यासाठी हा घाट घातला जात आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मी जे बोललो नाही आणि जे बोललो त्याची सरमिसळ करून सांगितले जात आहे. माझ्या विधानावर मी ठाम आहे. देवेंद्र फडणवीस यांची व्यक्ती म्हणून मी औरंगजेबाशी तुलना केली नाही, त्यांच्या कारभाराची तुलना केलेली. औरंगजेबने फितुरी, फोडाफोडी केली म्हणून आम्ही त्याला क्रुर म्हणतो. फडणवीस यांच्या काळात हे सर्व करणा-या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. स्वारगेट बलात्कार, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड, महिला अत्याचार वाढले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येने कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. औरंगजेबाने जसा जिझिया कर लावला होता तसाच कर आता सरकारने लावला आहे. शालेय वस्तूंवर कर, स्मशानातील लाकडावरही कर लावला आहे. मी कुठलीही शिवीगाळ केलेली नाही, अपशब्द वापरलेला नाही त्यामुळे ते वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी शेंगाच खाल्ल्या नाही तर टरफलं का उचलू ? असे सपकाळ म्हणाले.
सपकाळ पुढे म्हणाले की, औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारी गॅंग ही भाजप स्पॉन्सर आहे का, असा देखील प्रश्न उपस्थित होतो. एकनाथ शिंदे यांना औरंगजेब असा उल्लेख भावला म्हणून ते आज फुल फॉर्मात बोलले. त्यांच्या बोलण्याचा आशय धमकी स्वरूपाचा नसला तरी तसाच होता. अजित पवार यांनी देखील अशीच भूमिका मांडली आहे. माझ्याकडे 70 -75 हजार कोटी नसल्याने, चुलत्याच्या खांद्यावर बसून मला राजकारण करता आले नसल्याने तसेच माझ्याकडे साखर कारखाना नसल्याने माझी उंची कमी आहे. मला दिलेलं काम वैचारिक पद्धतीने करायचं आहे.
नरेंद्र मोदी मागच्या जन्मी शिवाजी महाराज होते असे भाजपाच्या एका खासदाराने म्हटले आहे. आता कोणीतरी भविष्यात म्हणेल की देवेंद्र फडणवीस मागच्याच्या मागच्या जन्मात शिवाजी महाराज होते. हा शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? पण अपमान करा आणि सुरक्षा मिळवा असा प्रकार राज्यात सुरू आहे. असे विधान करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाच्या कबरी बाबत जी भूमिका घेतली तशीच भूमिका इंग्रजांच्या हस्तक असणाऱ्या, पेंशन घेणाऱ्या, देशाला स्वातंत्र्य मिळू नये म्हणून काम करणाऱ्यांच्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणा-यांच्या बाबतीत घ्यावी. त्यांचे पुतळे स्मारके राज्यात आहेत, त्याबाबत त्यांनी भूमिका जाहीर करावी असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
मुंबई,दि.१७ : मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करून विकास व सहाय्य समिती स्थापन करा. ऊस तोडणी कामगारांसाठी शासनाच्या योजना एकाच प्लॅटफॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करावे, ट्रॅकींग सिस्टीम,रेशनची पोर्टिबीलीटी यासारख्या अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने योजना राबवण्यावर भर द्यावा.बीड जिल्ह्या प्रमाणे इतर जिल्ह्यातही काम केले जावे.अपघात ग्रस्त ऊस तोडणी कामगारांना तात्काळ मदत देण्यात यावी अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केल्या.
विधान भवन येथे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हयातील गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात गठीत समिती अहवाल – मंत्रालयीन विभागाने केलेल्या कार्यवाहीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी या बैठकीला दूरदृश्यप्रणालीव्दारे सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथु रंगानाईक,गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र गोरवे,साखर आयुक्तालय पुणे साखर आयुक्त दिपव तावरे,जिल्हाधिकारी धाराशिव किर्तीकुमार पुजार,नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,परभणीचे जिल्हाकारी रघुनाथ गावडे,बीडचे जिल्हाधिकारी आविनाश पाठक,लातुरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे,छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी,हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल,पुणे विभागीय आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त आर.आनंदकर,महिला व बालविकास विभागाचे सहसचिव विलास ठाकूर,महिला व बालविकास सहआयुक्त राहुल मोरे,आरोग्य विभागाचे डॉ.अमोल भोर,कामगार विभागाचे संकेत कानडे यावेळी उपस्थित होते.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणावर झाल्याच्या घटना निदर्शनास आल्यानंतर राज्य शासनाने २६ जून २०१९ रोजी समिती स्थापन केली होती.गेल्या तीन वर्षांत बीड जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांबाबत तपासणी समितीने केली.सामाजिक न्याय विभाग,महिला व बालविकास विभाग,शिक्षण विभाग,साखर आयुक्त,कामगार आयुक्त,आरोग्य विभागाचे अधिकारी,स्वयंसेवी संस्था यांनी प्रत्येक जिल्ह्याने काम करावे.तसेच या विभागांना येणा-या अडचणींचा अहवाल तात्काळ पाठवावा जेणेकरून यामध्ये असणा-या त्रुटीबाबत सुधारित शासनाच्या मार्गदर्शक सूचना धोरणात्मक निर्णय घेवून कारता येतील.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,आरोग्य विभागाने ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या प्रत्येक महिलेला आरोग्य कार्ड देणे. ऊस तोडणीला जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर महिलांची आरोग्य तपासणी करणे.साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ऊस तोडणीच्या ठिकाणी महिलांची वैद्यकीय तपासणी करणे. तज्ज्ञांनी केलेल्या एसओपीचा सर्व खासगी रुग्णालयांनी वापर करूनच शस्त्रक्रिया करावी.खासगी स्त्रीरोगतज्ज्ञांनी त्यांच्याकडील गर्भपिशवी शस्त्रक्रियांचा अहवाल दरमहा जिल्हा शल्य चिकित्सकांना पाठवावा.आरोग्य विषयक योजनांची जनजागृती करणे यावर भर द्यावा.महिलांना मासिक पाळीसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे.ज्या परिसरात ऊस तोड कामगार आहेत तिथे स्वच्छतागृह उभारणे साठी ऊस तोड कामगार महामंडळाचे १० टक्के निधीची तरतुद करावी.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, साखर आयुक्त, साखर कारखाने, कामगार आयुक्तांनी सर्व ऊसतोड मजूरांची नोंदणी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे करावी. त्यांना ओळखपत्र देण्यात यावीत.प्रत्येक जिल्ह्यात यासाठी काम केले जावे. गाळप हंगामात कारखाना परिसरात उस तोडणीसाठी आलेल्या कामगारांना पिण्याचे पाणी,स्वच्छतागृह व अन्य मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी.ऊसतोडणी मजुरांसाठी कारखाना परिसरात घरकुल धर्तीवर घरे बांधण्यात यावीत.महिला व बालकल्याण विभागाने कारखान्याच्या ठिकाणी उसतोड मजुरांच्या मुलांसाठी पाळणाघर तयार करावे.मजूरांच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह व हंगामी शाळा कारखान्यांच्या ठिकाणी सुरू कराव्यात. बालविवाह प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून राज्यात ५००० बालविवाह रोखले असून यामध्ये ४०० एफआयर नोंद करण्यात आले आहेत.आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभागांनी त्याचबरोबर शासनाच्या सर्व विभागांनी ऊस तोड कामगारांसाठी योजनांची माहिती त्यांच्या मोबाईलवर द्यावी. अन्न नागरी पुरवठा विभागाने उस तोडणीला जाण्याआधी मजूरांना रेशनकार्ड वितरीत करावे.यावेळी प्रत्येक विभागाने व जिल्ह्यांनी ऊस तोड कामगारांसाठी सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी तथा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने मंगळवारी प्रशांत कोरटकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यामुळे कोरटकर याच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. आता त्याच्यापुढे पोलिसांपुढे शरण येण्याशिवाय दुसरा कोणताही पर्यात उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.
प्रशांत कोरटकर याच्यावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकावल्याचा आरोप आहे. स्वतः सावंत यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिली होती. त्यांनी त्याची ऑडिओ क्लिपही सार्वजनिक केली होती. तेव्हापासून चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी प्रशांत कोरटकर फरार झाला होता. या कालावधीत त्याने कोल्हापूर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. कोर्टाने सोमवारी (17 मार्च) त्याच्या अर्जावरील सुनावणी पूर्ण करत आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल कोर्टाने आज दिला. त्यात कोर्टाने त्याची याचिका धुडकावून लावली आहे. यामुळे त्याच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे.या प्रकरणाची माहिती देताना सरकारी वकील म्हणाले की, कोर्टाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला आहे. हा अर्ज फेटाळल्यानंतरही त्याने कोर्टाला आपल्या अंतरिम जामिनाची मुदत 7 दिवसांची वाढवण्याची एक नवी विनंती केली होती. यासाठी त्याने मुंबई हायकोर्टाच्या एका खटल्याचा दाखला दिला. आणि आपल्याला पुन्हा 7 दिवसांचा दिलासा देण्याची विनंती केली. त्याच्या या युक्तिवादावर आम्ही आक्षेप घेता. कोरटकरांनी दाखला दिलेले प्रकरण वेगळे होते. त्या प्रकरणात आरोपी स्वतः कोर्टापुढे हजर होता. पण इथे तशी परिस्थिती नाही. त्यामुळे हा अर्ज मंजूर करण्याचे कारण नाही. विशेषतः एकदा जामीन नाकारल्यानंतर पुन्हा परत जामीन देणे चुकीचे ठरेल अशी बाब आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. कोर्टाने आमचा युक्तिवाद मान्य करत कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच त्याची 7 दिवसांचे प्रोटेक्शन देण्याची विनंतीही धुडकावून लावली. यामुळे त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोर्टाने नुकताच आपला आदेश दिला आहे. त्यामुळे या प्रकरणी कोर्टाने घातलेल्या अटी वगैरे पहायला मिळाल्या नाहीत. कोर्टाची ऑर्डर उद्या अपलोड होईल. त्यानंतर ती पहायला मिळेल. हा विषय अत्यंत संवेदनशील होता. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष त्याकडे लागले होते. राष्ट्रपुरुषांविषयी काही उद्गार काढणे हे योग्य नाही असे वाटले असावे. त्यात काय लिहिले आहे हे आपण अजून पाहिले नाही. पोलिसांनी या प्रकरणी लावलेल्या कलमांवर अद्याप उहापोह झाला नाही. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यावर उहापोह होईल.पत्रकारांनी यावेळी वकिलांना प्रशांत कोरटकरने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली तर त्याला तिथे अटकेपासून संरक्षण मिळू शकते का? असा प्रश्न केला. त्यावर हा मुद्दा हायकोर्टाच्या अखत्यारीतील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशांत कोरटकर मुळचा माहुरचा आहेत. त्याने हिंगणघाट येथे शिक्षण घेतले. चंद्रपूर येथून त्यांनी जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी 2000 साली नागपूरमधून टीव्ही पत्रकारिता सुरु केली. त्यांनी वेगवेगळ्या वृत्तवाहिनीमध्ये काम केले. त्यानंतर ‘विदर्भ माझा’ या यूट्यूब चॅनलचा ही संपादकही होता . कोरटकर सोशल मीडियावर विशेषतः फेसबुकवर खास सक्रीय होता . याशिवाय त्याचा उच्च पदावरील नेते व अधिकारी यांच्याशी ही चांगला संपर्क आहे.त्याने एका विदेशी विद्यापीठाकडून पी. एच. डी. मिळवली आहे.
मुंबई-सरकार आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे. हे अपयश लपवण्यामध्ये आणखी अपयशी ठरत आहे. भाजपला प्रश्न विचारायचा आहे. तुमचे हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे ढोंग आम्ही पाहिलेले आहे. तुम्हाला हिरव्या रंगाचा एवढा राग असेल, तर प्रथम तुमच्या झेंड्यावरचा हिरवा काढून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. भाजपने आधी पक्षाच्या झेंड्यातील हिरवा रंग काढावा, मग हिंदू-मुस्लिम करावे, असा टोला ठाकरे यांनी लगावला.एका बाजुला हिंदुस्थान-पाकिस्तान करायचे आणि पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळायची. ती मॅच दुबई करायची आणि त्या मॅचला ह्यांची पोरं हजेरी लावणार. म्हणजे अमित शहांचा मुलगा हा मॅच आयोजित करणार. इकडे गरिबांच्या मुलांना हिंदुस्थान-पाकिस्तान करून लढवायचे आणि तिकडे दुबईत जाऊन मॅच बघायची. हे हिंदुत्व कोणते? बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. ही माहिती आल्यानंतर त्याच बांगलादेशसोबत मॅच खेळायची. त्यात शेख हसीनांना इकडे सहारा दिला. सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्याच्यावर तुम्ही राजकारणाची पोळी भाजायची, हे अत्यंत घृणास्पद राजकारण आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली.
नागपूर दंगलीवरून उद्धव ठाकरे यांनी आज महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. थडगे काढण्यासाठी आंदोलने करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे जाऊन औरंगजेबाचे थडगे काढण्याची मागणी करा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला. औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार संरक्षण देतेय, तर मग औरंगजेब तुमचा कोण लागतो. नागपूरची घटना पूर्वनियोजित असेल, तर तुमचे गृह खाते झोपा काढत होते का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून बलाढ्य सत्तेला नमवून जे हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते, त्या स्वराज्यावर महाराजांच्या निधनानंतर चालून आला होता. औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता, पण महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही जिंकू शकला नाही. महाराजांपासून स्फूर्ती आणि प्रेरणा घेतलेल्या असंख्य मावळ्यांनी त्याला मूठमाती दिली. अशा औरंगजेबाचे समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही. त्यामुळे कोणी त्याचे थडगे काढण्याची भाषा करत असेल, तर बोलणे आणि आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार नुसते वाफा सोडतेय का?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाची कबर उघडण्यामध्ये असमर्थता दाखवली आहे. त्या कबरीला केंद्राचे सरंक्षण आहे. केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल, तर मग केंद्र सरकार किंवा भाजपला आम्ही विचारतोय की, तो औरंगजेब तुमचा कोण लागतो. औरंगजेब असो, अफज़ल खान असो, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत. ते नष्ट करायचे असेल, आंदोलन काय करताय? तुम्ही केंद्र सरकारकडे जा, मोदींकडे जा आणि त्यांना म्हणा की, गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब ज्याला महाराष्ट्राने मुठमाती दिली. त्याची कबर तुम्ही उद्ध्वस्त करा. कबर उखडण्याचा जेव्हा सोहळा कराल, तेव्हा चंद्राबाबू आणि नीतेश कुमारांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा. औरंगजेबाची कबर हटवणे सोपा विषय आहे. त्यात दंगल करायचे कारण काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
गृहमंत्र्यांचे घर आणि आरएसएसचे मुख्य कार्यालय हे नागपूर आहे. अशा नागपूरमध्ये हिंदू खतरे में कसा काय? मग इतके वर्ष तुम्ही नेमके केले काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. नागपूरची घटना पूर्वनियोजित असेल, तर तुमचे गृह खाते झोपा काढत होते का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला कसा नाही? जर आला असेल, तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले का? अशी प्रश्नांची सरबत्ती उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली.