सुनीता विल्यम्सच्या वडिलांच्या गावी मिरवणूक, दिवाळीसारखा आनंदोत्सव
वाशिंग्टन-तब्बल नऊ महिने अंतराळात अडकून पडलेल्या ‘नासा’च्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स बुधवारी पहाटे ३.२८ वाजता फ्लोरिडाच्या समुद्रात सुखरुप लँड झाली. तिच्यासोबत बेरी विल्मोर, निक हेग व रशियाचे अॅलेक्झांडर गोरबुनोव हेही होते. भारतीय वेळेनुसार मंगळवारी सकाळी १०.३५ वाजता आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या स्पेसएक्स या ‘ड्रॅगन कॅप्सूल’द्वारे पृथ्वीच्या दिशेने त्या निघाल्या होत्या. त्यांचा हा प्रवास १७ तासांचा होता. टेकऑफपूर्वी जपानचे अंतराळवीर ताकुया ओनिशी यांना कॅप्सूल व स्पेस स्टेशनच्या दरम्यान हॅच सीलवर धुळीचे कण दिसले. सील एअरटाइट होण्यासाठी हे कण हटवणे आवश्यक होते. ओनिशी यांनी हे काम फत्ते केले, यानंतर टेकऑफला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आतापर्यंत ‘ड्रॅगन’ १० वेळा अंतराळ यात्रींना स्पेस स्टेशनला घेऊन गेला. पैकी ९ वेळा सुखरूप परतला. अाता त्यांचा दहावा प्रवासही सुखरुप पार पडला. सुनीता विल्यम्स व विल्मोर यांना अंतराळात फक्त ८ दिवस राहायचे होते, पण तांत्रिक अडचणीमुळे २८६ दिवस त्यांना अडकून पडावे लागले. यादरम्यान त्यांनी ४५०० वेळा पृथ्वीची परिक्रमा केली.
नासाचे अधिकारी रॉब नावियास यांनी सांगितले, ‘अंतराळातील ही सर्वात मोठी मोहीम नसली तरी आव्हानात्मक अाहे.’ सुनीता तीन मिशनमध्ये एकूण ६०९ दिवस अंतराळात राहिली. ती नवव्या क्रमांकावर आहे. रशियाचे ओलेग कोनोनेन्को १११० दिवस राहून पहिल्या स्थानी आहे. टॉप १० मध्ये रशिया/ सोव्हिएत संघाचे ८ व अमेरिकेचे २ अंतराळवीर आहेत. पेगी विटसन (६७५ दिवस) यांच्यानंतर सुनीता सर्वाधिक काळ अंतराळात राहणारी अमेरिकन ठरली आहे.
सुनीता विल्यम्सच्या सुरक्षित परतीसाठी त्यांच्या वडिलांचे गाव झुलासणमध्ये दिवाळीसारखी तयारी केली होती. सुनीता सुखरुप आल्याचे कळताच या गावात जल्लोष साजरा झाला. सुनीता यांचे चुलत भाऊ नवीन पंड्या यांनी सांगितले की, त्यांच्या स्वागतासाठी एक मोठी मिरवणूक काढण्यात आली. यात प्रार्थना आणि आतषबाजीसह दिवाळी आणि होळीसारखे वातावरण हाेते. मिरवणुकीत सुनीतांचे छायाचित्र होते. ग्रामस्थ त्यांच्या सुरक्षित परतीसाठी प्रार्थना करत होते. अखंड ज्योतही लावण्यात आली होती. ही ज्योत सुनीता अंतराळात गेल्या तेव्हापासून जळत आहे. ग्रामप्रमुख विशाल पंचाल यांनी सांगितले की, शाळकरी मुलेही १५ दिवसांपासून त्यांच्या सुरक्षित परतीसाठी रामधून गात आहेत. सुनीता यांचे वडील दीपक पंड्या यांचे मूळ गाव झुलासण आहे. ते १९५७ मध्ये अमेरिकेत गेले होते. गावातील लोक सुनीता यांच्या परतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. भविष्यात त्या गावी आल्यास त्यांचे भव्य स्वागत करण्याचा बेत आखत आहेत. उल्लेखनीय म्हणजे सुनीता यांनी आतापर्यंत ६२ तासांचे नऊ स्पेसवॉक पूर्ण केले आहेत.
ड्रॅगन कॅप्सूल अंतराळ स्थानकातून निघाले ड्रॅगन पृथ्वीवर परतले
३:२३ वा. : पुनर्प्रवेश टप्पा पूर्ण झाल्यानंतर कॅप्सूलशी संपर्क पुन्हा स्थापित.
३:२४ वा. : कॅप्सूल स्पष्ट दिसले, दोन्ही पॅराशूट उघडले. ३:२५ वा. : आणखी दाेन पॅराशूट उघडले ३:२६ वा. : ड्रॅगन कॅप्सूल उतरण्यासाठी तयार ३:२८ वा. : कॅप्सूल समुद्रात उतरली३:३२ वा. : दोन नाैका कॅप्सूलजवळ पाेहाेचल्या ,२५ मिनिटांनी सर्वांना बाहेर काढण्यात आले.
सुनीता यांचे यान समुद्रात लँड होताच २ सुरक्षा बोटींतून आलेल्या अभियंत्यांनी ड्रॅगन कॅप्सुलची तपासणी केली. यानंतर रिकव्हरी शिप आणले. (इन्सेटमध्ये) कॅप्सुलमध्ये सुनीता उजवीकडे, बाजूला क्रूचे कमांडर व पायलट, डावीकडे विल्मोर. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील झुलासण येथे प्रार्थना करण्यात आली.केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १ मार्च रोजी सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहिले. त्यांनी ‘भारताच्या कन्येबद्दल’ चिंता व्यक्त केली. त्यांनी लिहिले, ‘हजारो मैल दूर असलात तरी तुम्ही आमच्या हृदयाजवळ आहात. भारतातील लोक तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करत आहेत. तुम्ही परतल्यावर भारतात तुमचे स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. भारतासाठी आपल्या सर्वात प्रतिष्ठित मुलींपैकी एकीचे आतिथ्य करणे ही अभिमानाची गोष्ट असेल. श्रीमती बोनी पंड्या (सुनीताची आई) तुमच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहत असतील. मला खात्री आहे की दिवंगत दीपक (वडील) यांचे आशीर्वादही तुमच्यासोबत आहेत.
सुनीता पृथ्वीवर तेव्हा स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकणार नाहीत, नॉर्मल होण्यास लागेल दीड महिना; पहिल्या टप्प्यात चालण्याचे प्रशिक्षण
सुमारे ९ महिने त्या गुरुत्वाकर्षणाशिवाय अंतराळात राहत आहेत. त्यांना स्ट्रेचरवर रुग्णालयात नेण्यात आले . नासाच्या माहितीनुसार, यानंतर त्यांची रिकव्हरी प्रक्रिया सुरू झाली . डॉक्टरांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात त्यांच्या चालण्यावर, लवचिक होण्यावर व मांसपेशी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. सर्वसामान्यांप्रमाणे होण्यासाठी त्यांना ६ आठवडे लागू शकतात. या काळात विशेष व्यायाम, पोषक आहारावर लक्ष दिले जाईल. स्पेस स्टेशनमध्ये नवीन व जुन्या क्रूमध्ये ५ दिवसांचा ‘हस्तांतरणाचा काळ’ असतो. यात नवीन क्रूला संपूर्ण माहिती दिली जाते. पण यंदा नासाने स्पेस स्टेशनवर भोजनाची बचत व्हावी म्हणून ही मुदत २ दिवस केली. अनिश्चित वातावरणात क्रू ९ मधील सदस्यांना परतीसाठी अधिक वेळ मिळावा, हेही कारण होते. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर या मोहिमेला गती मिळाली. ट्रम्प यांनी सुनीता व विल्मोर यांना परत आणण्याची जबाबदारी इलॉन मस्कवर सोपवली हाेती.
८ दिवसांच्या मोहिमेवर गेले, पण त्यांना ९ महिन्यांहून अधिक काळ लागला
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंग आणि नासाच्या ८ दिवसांच्या संयुक्त ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’वर गेले. या मोहिमेचा उद्देश बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाची अंतराळवीरांना अंतराळ स्थानकात नेण्याची आणि परत आणण्याची क्षमता तपासणे हा होता.अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावरील त्यांच्या ८ दिवसांच्या कालावधीत संशोधन आणि अनेक प्रयोग करावे लागले. पण थ्रस्टरमध्ये समस्या आल्यानंतर, त्यांचे ८ दिवसांचे मिशन ९ महिन्यांहून अधिक काळ वाढवण्यात आले.
अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतण्यासाठी १७ तास लागले-ड्रॅगन कॅप्सूल वेगळे झाल्यापासून ते समुद्रात उतरेपर्यंत सुमारे १७ तास लागले. १८ मार्च रोजी सकाळी ८:३५ वाजता, अंतराळयानाचा दरवाजा उघडला गेला. १०:३५ वाजता अंतराळयान आयएसएसपासून वेगळे झाले.१९ मार्च रोजी पहाटे २:४१ वाजता डीऑर्बिट जळण्यास सुरुवात झाली. म्हणजेच, अंतराळयानाचे इंजिन कक्षापासून विरुद्ध दिशेने चालवण्यात आले. यामुळे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू शकले आणि पहाटे ३:२७ वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील पाण्यात उतरले.