Home Blog Page 401

बिल्डरांनी सेन्सर आधारीत वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली कार्यान्वित करावी -पुणे महापालिकेचे निर्देश

पुणे- पुण्यातील वाढते प्रदूषण लक्षात घेऊन पुणे महापालिकेने आज पर्यावरण विषयक बैठक बोलावून बांधकाम व्यावसायिकांनी सेन्सर आधारीत वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली कार्यान्वित करावी असे निर्देश दिले असल्याची माहिती उपायुक्त संतोष वारुळे यांनी येथे दिली .या बैठकीला पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पर्यावरण विभागाचे उप आयुक्त संतोष बरुळे, अधिक्षक अभियंता राजेश बनकर तसेच बांधकाम परवाना विभागातील अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीस डब्ल्यूआरआय इंडिया, क्रेडाई, मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन, नारेडको, संस्थेचे प्रतिनिधी आणि सेन्सर उत्पादक उपस्थित होते.

राज्यातील अनेक शहरांमध्ये पी.एम २.५ आणि पी. एम. १० या धुलीकणांमुळे बायू प्रदूषण वाढत असल्याने राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, यांच्या दि.२/११/२०२३ रोजी पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६, कलम ५ अन्वये देण्यात आलेल्या निर्देशानुसार बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर-आधारित वायू गुणवत्ता तपासणीसाठी प्रणाली उभारणे आवश्यक आहे. प्रदूषणाची पातळी निर्देशित केलेल्या मयदिपेक्षा जास्त होते तेव्हा त्यास नियंत्रित करण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग व बांधकाम परवाना विभाग आणि डब्ल्यू.आर. आंय. इंडिया (WRI India) यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर-आधारित वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली कार्यन्वित करण्याकरिता चर्चा करण्यासाठी क्रेडाई (CREDAI), मराठी बांधकाम व्यावसायिक, नारेडको आणि सेन्सर उत्पादक यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या कमी करण्याकरिता बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर-आधारित वायू गुणवत्ता तपासणीसाठी प्रणाली उभारणेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या दिलेल्या निर्देशानुसार बैठकी दरम्यान संतोष वारूळे, उपआयुक्त, पर्यावरण विभाग यांनी प्रास्ताविक केले. डब्ल्यूआरआय इंडियाचे संचालक श्रीकुमार कुमारस्वामी यांनी सेन्सर-आधारित बायू गुणवत्ता तपासणी प्रणालीवावत सादरीकरण केले.
बैठकीदरम्यान शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी पुणे शहर हे राहण्यायोग्य शहर (livable city) आहे परंतु सद्यस्थितीत बांधकाम सेक्टर तसेच रोड डस्टचे प्रमाण अधिक आहे यामुळे बांधकाम व्यावसायिक यांनी तातडीने बांधकामाचे मोठे प्रोजेक्ट्स या ठिकाणी सेन्सर आधारीत वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली कार्यान्वित करावी असे आवाहन केले.
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सेत्सर आधारीत बायू गुणवत्ता तपासणीं प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधितांच्या सूचना व शिफारसींचा समावेश करण्यासाठी Task Force Committee स्थापन करून बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर-आधारित बापू गुणवत्ता तपासणीसाठी प्रणाली उभारून केंद्रीकृत डॅशबोर्डशी एकत्रित करण्याच्या सूचना दिल्या. या प्रणालीच्या साहाय्याने वास्तविक वेळेतील (real-time) माहिती उपलब्ध होईल आणि धूळ व वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक ती तात्काळ उपाययोजना करता येईल.

छायाचित्रकार नसते तर कळला नसता देशाचा इतिहास– खासदार प्रणिती शिंदे


पुणे-

छायाचित्रकार नसते तर देशाचा इतिहास कधीच कळला नसता. छायाचित्रांमुळे आपल्या देशाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचतो. तो इतिहास जपण्याची आणि टिपण्याची मोठी जबाबदारी छायाचित्रकारांवर आहे,असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
गणेशोत्सवानिमित्त पुणे फेस्टिव्हल व पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील विविध वृत्तपत्रांतील ४५ छायाचित्रकारांनी टिपलेली सुमारे ३०० छायाचित्रे बालगंधर्व कलादालन येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अ‍ॅड. अभय छाजेड, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदे पुढे म्हणाल्या, समाजमाध्यमांमुळे वृत्तपत्रातील छायाचित्रकारांची जबाबदारी अधिक वाढली आहे. समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या छायाचित्रांची सत्यता अनेकदा कमी असते; मात्र वृत्तपत्रातील छायाचित्रकारांना एकेक छायाचित्र टिपण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. ते समाजातील भावना टिपतात. अनेक छायाचित्रे बोलकी ठरतात, हीच त्यांची खरी कला आहे. पुढील पिढी जेव्हा ही छायाचित्रे पाहील, तेव्हा तिला आपले भविष्य आणि समाजाची दिशा समजू शकेल.
उल्हास पवार म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केली. हा फेस्टिव्हल आज जगभरात पोहोचला आहे. छायाचित्रांचे महत्त्व आजही तेवढेच आहे. पुणे फेस्टिव्हलने हे प्रदर्शन भरविले, हे कौतुकास्पद आहे.
प्रा. डॉ. पराग काळकर यांनी सांगितले,वृत्तपत्रातील छायाचित्रकार समाजमन ओळखून त्यातील भावना लोकांपर्यंत पोहोचवतात. छायाचित्रांचे प्रदर्शन होणे गरजेचे आहे.
प्रास्ताविक पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक अ‍ॅड. अभय छाजेड यांनी केले. ते म्हणाले, पुणे फेस्टिव्हल यंदा ३७व्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदा पुणे श्रमिक पत्रकार संघ आमच्या उपक्रमात सहभागी झाला असून, त्यानिमित्ताने छायाचित्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. विविध विषयांवरील छायाचित्रे यामध्ये प्रदर्शित केली आहेत. पुण्यातील संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आडेकर यांनी केले. तसेच व्यवस्थापन सचिन आडेकर व आबा जगताप यांनी केले.हे छायाचित्र प्रदर्शन शनिवार, ३० ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व कलादालन येथे सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

आंबेडकरी चळवळीचे आशिष विजय वाकोडेंचा शकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश.

मुंबई, दि. २८ ऑगस्ट २०२५

लोकनेते शहीद विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष विजय वाकोडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षाचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला अभिप्रेत असा भारत उभा करण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे परंतु भाजपा मात्र हे संविधानच संपवायला निघाले आहे. मनुवादी व संविधानवादी अशा दोनच जाती आहेत, तोडा फोडा व राज्य करा ही भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची निती आहे तर काँग्रेस पक्ष मात्र सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. एकिकडे संविधान संपवण्याचे प्रयत्न सुरु असताना हे संविधान अबाधित ठेवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांनी परभणीत येऊन या कुटुंबियांची भेट घेतली. आंबेडकरी समाजावर अत्याचार झाला तर काँग्रेस पक्ष खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभे राहिल हा संदेश राहुल गांधी यांनी दिला आहे.

राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यावेळी म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राज्यघटना घराघरात पोहचवली. भाजपा सरकार राज्य घटनेनुसार काम करत नाही हेही राहुल गांधी यांनी दाखवून दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची लढाई काँग्रेस पक्ष व राहुल गांधी लढत आहे आणि जातीयवादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे रहा, असे आवाहन खासदार हंडोरे यांनी केले.

या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्जा, प्रदेश काँग्रेसचे सचिव मुजाहिद खान, परभणी शहर जिल्हा अध्यक्ष नदीम इनामदार, सुहास पंडित आदी उपस्थित होते.

नितीन गडकरींच्या मुलाला सोन्याची खाण सापडली ? :20 दिवसांत तब्बल 60 टक्क्यांची अफलातून वाढ; अंजली दमानिया यांनी उपस्थित केला सवाल

सोन्याची खाण हाती लागली का?ज्या कंपनीच्या शेयर ची किंमत जुलै 2024 पर्यंत, ₹42 होती त्या कंपनीत असे काय झाले की त्या कंपनीच्या शेअर्स ची किंमत एका वर्षात ₹701 झाली? सोन्याची खाण सापडली का? ही जादूची कंपनी Cian Agro आहे आणि त्या कंपनीच्या मालकांच्या बाबांच्या हातात सत्ता आहे म्हणून त्यांनी इथेनॉल वापरायला आपल्याला भाग पाडले आणि मुलाच्या कंपनी ला भरमसाठ प्रॉफिट, असेही दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाच्या इथेनॉल निर्मिती कंपनीच्या शेअरचा भाव 20 दिवसांत तब्बल 60 टक्क्यांनी वाढल्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निखील गडकरींची कंपनी इथेनॉल निर्मिती करते. त्यामुळेच त्याचे बाबा (नितीन गडकरी) आपल्या डोक्यावर E20 म्हणजे 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल ठोकत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर हा पर्यावरणपूरक आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. इथेनॉल हे उसासारख्या पिकांपासून तयार केले जाते, ते पेट्रोलमध्ये मिसळल्याने जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी होते आणि कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनात घट होते. पर्यायाने हवेची गुणवत्ता सुधारून हरितगृह वायूंचे प्रमाण कमी होते. भारतासारख्या कृषिप्रधान देशात, इथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. यामुळे केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे.

निखील गडकरींचे बाबा म्हणत…

अंजली दमानिया गुरूवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाल्या की, Cian Agro ह्या कंपनीचा भाव 5 ऑगस्टला ₹398 होता, तो आज 28 ऑगस्ट ला ₹701 कसा झाला? 20 दिवसात 60% वाढ? इतकी अफलातून वाढ कशी झाली? ही कंपनी निखिल गडकरी ह्यांची आहे. त्याचे नाव पूर्वी Umred Agro ह्या नावाने होती. ही कंपनी इथेनॉल निर्मिती करते आणि म्हणून ह्या निखिल गडकरींचे बाबा, आपल्या डोक्यावर E20 म्हणजे, 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल ठोकत आहेत.

जितके इथेनॉल मिश्रित पेट्रोल आपण वापरू, आपल्या गाड्यांचे एवरेज कमी होणार व मेंटेनेंस चा खर्च वाढणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे अंजली दमानिया यांनी यापूर्वी अनेकदा नितीन गडकरी व त्यांच्या पूर्ती उद्योग समुहावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी त्यांच्यात मोठा वाद रंगला होता.

जिल्हा माहिती अधिकारी पदी युवराज पाटील रुजू

पुणे, दि.२८:: पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी त्यांचे स्वागत केले.

श्री. पाटील यांनी यापूर्वी सहायक संचालक मंत्रालय, सहायक संचालक विभागीय माहिती कार्यालय,पुणे तर अकोला, वाशिम,सातारा,लातूर आणि जळगाव येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम केले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयामार्फत शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम आणि विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणारे महत्वाचा दुवा मानला जातो. शासनाची ध्येयधोरणे आणि जनहिताचे कार्यक्रम प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असेही श्री. पाटील म्हणाले.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती,त्याचे काय झाले?

दिल्लीतून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवा: हर्षवर्धन सपकाळ

फडणवीस इंग्रजांची तोडा ,फोडा, झोडा नीती अवलंबत आहेत

मराठा समाजाला आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी देणे हास्यास्पद; तीन महिने सरकार झोपले होते काय?

सत्तेत येताच सात दिवसात मराठा आरक्षण देण्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेचे काय झाले?

मुंबई, दि. २८ ऑगस्ट २०२५

सरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सरकार ते करत नाही. भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासन पाळावे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. राज्यात प्रचंड मोठे बहुमत असून त्यांनी दिल्लीत जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी. राजधर्माचे पालन करत तातडीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा करावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील समाजासह मुंबईत पोहचत असताना सरकारने या आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. आता केवळ एक दिवसाची परवानगी दिली ती हास्यास्पद असून तीन महिन्याआधी आंदोलनाची घोषणा केली होती तर सरकार एवढे दिवस काय झोपा काढत होते का?

काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. महाराष्ट्र विधिमंडळात भाजपा युती सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा ठराव पास केला त्याला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता. सत्तेत येताच ७ दिवसात मराठा आरक्षण देतो अशी भीमगर्जना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती त्याचे काय झाले? धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन फडणविसांनी दिले होते, त्याचे काय झाले? ‘सागर’ बंगल्यावर मंथन करून अमृत पिऊन विष मात्र समाजावर व विरोधी पक्षावर टाकण्याचे पाप फडणवीस व भाजपा करत आहे. फोडा व राज्य करा या इंग्रजांच्या नितीप्रमाणे भाजपा व फडणवीस काम करत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना नवी मुंबईत रात्रीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेऊन गुलाल उधळला होता, त्याचे काय झाले? या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. आज जे तीन पक्ष सत्तेत आहेत तेच त्यावेळीही सत्तेत होते असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

आरक्षणावर जातनिहाय जनगणना हा रामबाण उपाय आहे हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्पष्ट केले असून त्यासाठी त्यांचा आग्रहही आहे. काँग्रेसशासित तेलंगणा व कर्नाटकात जातनिहाय जनगणना केलेली आहे. भाजपा सरकारमध्ये जर इच्छाशक्ती असेल तर त्यांनीही जातनिहाय जनगणना करावी व मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मराठा मोर्चा दरम्यान जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हार्टअटॅकमुळे मृत्यू, मनोज जरांगे म्हणाले,’सतीश भैय्याचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही

पुणे-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे निघालेल्या एका आंदोलकाचा जुन्नरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असे मृत पावलेल्या आंदोलकाचे नाव असून, ते केज तालुक्यातील वरडगाव येथील रहिवासी होते. या घटनेवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देताना संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणसाठी याआधीही अनेकांनी बलिदान दिले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने पदयात्रा सुरू केली आहे. मोर्चाचा जुन्नर येथे पहिला मुक्काम होता. सतीश देशमुख हे देखील मनोज जरांगेसोबत मोर्चात सहभागी झाले होते. जुन्नरमध्ये असताना सतीश देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी सतीश देशमुख यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे मराठा समाजामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

आंदोलकाच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर मनोज जरांगे यांच्यासह संपूर्ण मराठा आंदोलकांमध्ये दु:खाची लाट पसरली. याबाबत जरांगेंनी देखील संवेदना व्यक्त केल्या आहेत. मराठा आरक्षणाचा लढा मुंबईच्या दिशेनं जाताना ही दुर्दैवी घटना घडली. सतीश भैय्याचे आताच बलिदान गेले. हे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही. त्यामुळे आपण संयमाने आंदोलनाची लढाई लढू, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणासाठी लातूरच्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यात एका मराठा बांधवाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मनोज जरांगे मुंबईला निघण्याच्या एक दिवसआधी घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. बळीराम मुळे (वय ३५) असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बळीराम मुळे याने आपल्या खिशात एक चिठ्ठी ठेवून विष प्राशन केले. या चिठ्ठीत त्याने सरकारवर ‘मराठा आरक्षणावर वेळकाढूपणा’ करत असल्याचा आणि ‘जरांगे पाटलांना वारंवार उपोषणाची वेळ आणत असल्याचा’ आरोप केला. या घटनेची माहिती मिळताच, नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्याला तात्काळ लातूरच्या रुग्णालयात दाखल केले, ज्यामुळे त्याचा जीव वाचला.

भाजप कार्यकर्त्याविरुद्ध तक्रार दिल्याने महिला इन्स्पेक्टरची वरिष्ठांनी केली बदली,न्यायाधिकरणाने दिला तडाखा

पुणे : एका भाजपा आमदाराच्या अगदी जवळच्या कार्यकर्त्याने केलेल्या अश्लील स्पर्शामुळे त्याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिलेल्या महिला पोलीस इन्स्पेक्टरला वरिष्ठांकडून जाचक विनंत्या होऊ लागल्याने त्या रजेवर गेल्या आणि रजेवरून परत आल्यावर मागील तारखेचे पत्र बनवून त्या आधारे या महिला अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. या अन्यायाविरोधात त्यांनी प्रशासकीय न्यायाधिकरणाचे दरवाजे ठोठावल्यावर प्रशासकीय न्यायाधिकरणाने पोलिसांची कानउघाडणी करणरे आदेश दिले आहेत आणि या महिला इन्स्पेक्टर ची बदली करणारे वरिष्ठांचे आदेश रद्द केले आहेत. सुसंस्कृत पुण्याला आणि पुण्याच्या पोलीस दलाला या आदेशाने ‘आरसा ‘ दाखविण्याचे काम केले आहे.यामुळे एकीकडे पुरावे असल्याने संबधित कार्यकर्त्याला अटक केल्याचे म्हटलेल्या पोलिसांनी नंतर लगेचच या महिला पोलीस अधिकाऱ्यावरही बदलीची कारवाई करून दोन्ही बाजूंनी समजूत काढण्याचे जणू प्रयत्न केले होते असे निष्पन्न झाले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांवर करण्यात आलेला बदली आदेश प्रशासकीय न्यायाधिकरणाने रद्द केला आहे. हा बदलीचा आदेश ‘दंडात्मक’ स्वरूपाचा आणि ‘सूडबुद्धी’ने काढल्याचे दिसून येते,असे निरीक्षण न्यायाधिकरणाने स्पष्ट केले आहे,या निर्णयामुळे संबंधित महिला अधिकाऱ्यास मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित महिला वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची जुलै २०२४ मध्ये बदली होऊन पुणे शहरात नेमणूक झाली होती. जून २०२५ मध्ये त्या बंदोबस्त ड्युटीवर असताना शिवाजी रस्त्यावर त्यांचा विनयभंग झाला. त्यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती देऊन फरासखाना पोलिस ठाण्यात आरोपी प्रमोद कोंढरे विरुद्ध गुन्हा नोंदवला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्तांनी संबंधित अधिकारी महिलेला अन्य ठिकाणी बदली स्वीकारण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यावर अधिकारी महिलेने ठामपणे नकार देत सांगितले, ‘मी गुन्हा दाखल केला आहे; आता बदली झाली, तर समाजात चुकीचा संदेश जाईल,’ असे सांगून त्यानंतर त्या रजेवर गेल्या.रजेवरून परत आल्यानंतर २१ जुलैला त्यांना वाहतूक शाखेत बदली झाल्याचा आदेश मिळाला. हा आदेश पोलिस स्थापना मंडळाच्या निर्णयानुसार घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात आदेश ‘मनमानी, दंडात्मक आणि महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा’ असल्याचे त्यांनी न्यायाधिकरणात मांडले.
ठळक मुद्दे…
गुन्हा दाखल केल्यानंतर
,दोन दिवसांत काढला आदेश,अन्याय्य बदली आदेश,आदेश दंडात्मक व सूडबुद्धीने घेतल्याचे वाटते आदेश रद्द;
महिला पोलिस निरीक्षकाच्या बदलीचा आदेश आधीच्या तारखेचा आहे. ‘कारणे दाखवा नोटीस’ न देता आदेश प्रसिद्ध केला गेला. निरीक्षकाच्या विरोधात अहवाल शनिवारी तयार करून दोन दिवसांतच आदेश काढला गेला. त्यांच्या शिस्तीवर कधीही कारवाई झालेली नव्हती, उलट त्यांना प्रशस्तिपत्रके व पुरस्कार मिळाले आहेत, असे त्यांनी न्यायाधिकरणात मांडले.

माझी राजकीय कारकीर्द संपविण्याचा डाव :दरम्यान यातील आरोपी कोंढरे यांनी माय मराठी ला फोन करून सांगितले कि, आता प्रकरण न्यायालयात आहे आणि न्यालायावर माझा विश्वास आहे , मी यात पूर्ण निर्दोष आहे , कोणीतरी माझा राजकीय गेम केला आहे. आणि सर्वच पोलीस अधिकाऱ्यांच्या बद्दल मला आदर देखील आहे. मी कोणाची बदली करा म्हणून सांगितले नाही, प्रशासनाने त्यांची बदली केली आणि त्यांनी दाद मागितली या प्रकरणात पुन्हा माझे नाव त्याच प्रकरणाला उजाळा देत आणले गेले व पुन्हा बदनामीला मला सामोरे जावे लागते हा माझ्यावर अन्याय आहे माझी निव्वळ राजकीय कारकीर्द नाही तर वैयक्तिक आयुष्यावरही यामुळे परिणाम होत आहे.

अदानींनी 1000 कोटींना खरेदी केले 10वे जेट:32 कोटींमध्ये बनवले 5 स्टार हॉटेलसारखे इंटेरिअर

अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी अमेरिकन विमान कंपनी बोईंगकडून ७३७-मॅक्स ८-बीबीजे मालिकेचे एक आलिशान बिझनेस जेट (व्हीटी-आरएसए) खरेदी केले आहे. त्याची किंमत सुमारे १००० कोटी रुपये आहे. ते लंडनला न थांबता उड्डाण करू शकते, तर ते एकाच इंधन भरण्यावर अमेरिका-कॅनडापर्यंत पोहोचू शकते.

अदानी यांच्या नवीन विमानाने स्वित्झर्लंडच्या बासेल शहरापासून ९ तासांत ६३०० किमी अंतर कापले आणि बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी १० वाजता अहमदाबाद विमानतळावर उतरले. पाण्याच्या तोफांच्या सलामीने त्याचे स्वागत करण्यात आले.

रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनीही २४ ऑगस्ट २०२४ रोजी या मालिकेतील एक विमान खरेदी केले. तसे, बोईंग ७३७ मॅक्स २०० आसनी विमाने अकासा, एअर इंडिया एक्सप्रेस, स्पाइसजेट देखील वापरतात. आता उद्योगपती देखील ते त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी वापरत आहेत.अदानींच्या बिझनेस जेटचे इंटीरियर ३५ कोटी रुपये खर्चून स्वित्झर्लंडमध्ये करण्यात आले आहे. हे अल्ट्रा-लक्झरी एअरक्राफ्ट सूट बेडरूम, बाथरूम, प्रीमियम लाउंज, कॉन्फरन्स रूमसारख्या सुविधांनी सुसज्ज आहे आणि ३५ हजार फूट उंचीवर उड्डाण करणाऱ्या पंचतारांकित हॉटेलच्या बरोबरीचे आहे. विमानाचे इंटीरियर पूर्ण करण्यासाठी २ वर्षे लागली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाच्या कर्णावती एव्हिएशन कंपनीकडे नवीन विमानांसह १० व्यावसायिक विमानांचा ताफा आहे. यामध्ये अमेरिकन बोईंग-७३७ सर्वात महाग आहे. यासोबतच कॅनेडियन, ब्राझिलियन आणि स्विस मालिकेतील विमाने देखील आहेत. त्याच वेळी, अदानी यांनी बी-२००, हॉकर्स, चॅलेंजर मालिकेतील ३ जुनी विमाने विकली आहेत.
बिझनेस वेबसाइट गुड रिटर्न्सनुसार, गौतम अदानी सध्या मुकेश अंबानी नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे $60.3 अब्ज (सुमारे 5 लाख कोटी रुपये) आहे. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ते टॉप 30 मध्ये आहेत आणि सध्या ब्लूमबर्गच्या यादीत ते 21 व्या क्रमांकावर आहेत.

‘दगडूशेठ’ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती

पुणे : ओम गं गणपतये नमः:… ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षीच्या गणेशोत्सवात उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, पुणे विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर, न्यायाधीश किरण क्षीरसागर, प्रसेनजीत फडणवीस, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, राजाभाऊ चव्हाण, शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पाऊस असला तरी पारंपरिक वेशात मध्यरात्री २ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. उपक्रमाचे ४० वे वर्ष होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप, गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना या गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. महिलांनी मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. मोरया मोरया दगडूशेठ मोरया… असा गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे भारतासह विविध ठिकाणांहून महिला मोठ्या संख्येने या उपक्रमासाठी आल्या आहेत. गणेशाचरणी लीन होत असताना बाप्पाच्या आशीर्वादाने सगळ्यांना आरोग्य, प्रगती आणि भरभराटीचे हे वर्ष जावो, अशी प्रार्थना त्यांनी केली. अर्चना भालेराव, प्रा. गौरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

दाक्षिणात्य अभिनेता विजय व त्याच्या बाउन्सर्सविरुद्ध गुन्हा दाखल

तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) नेता आणि अभिनेता थलापती विजय आणि त्याच्या बाउन्सर्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात २१ ऑगस्ट रोजी मदुराई येथे झालेल्या विजयच्या पक्ष सभेदरम्यान एक कार्यकर्ता जखमी झाल्याचा आरोप आहे.पोलिसांनी विजय आणि त्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांविरुद्ध बीएनएसच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शरत कुमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. तो म्हणतो की तो विजय ज्या रॅम्पवरून चालत होता त्या रॅम्पवर चढण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर बाउन्सर्सनी त्याला ढकलले. शरतने सांगितले की त्याने पाईप धरून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी तो खाली पडला आणि त्याच्या छातीत दुखापत झाली.

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये शरत रॅम्पवरून घसरताना दिसतो. तो प्रथम रेलिंग धरतो पण काही वेळाने त्याचा हात घसरतो आणि तो खाली पडतो.तक्रारदार शरत कुमार म्हणाला, “मला त्यांना पहायचे होते, म्हणून मी रॅम्पवर चढलो. बाउन्सर्सनी मला ढकलले आणि मला दुखापत झाली. म्हणूनच मी तक्रार दाखल केली आहे आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.”

मदुराईतील परापाठी येथे झालेल्या या परिषदेत लाखो समर्थक जमले होते. कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक सादरीकरणे, ध्वजारोहण आणि पक्षाच्या नेत्यांच्या संकल्पाने झाली.

विजय सुमारे ३०० मीटरचा रॅम्प चढून भव्य शैलीत स्टेजवर पोहोचला. यावेळी शरतने त्याला जवळून पाहण्याचा प्रयत्न केला.

पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. विजय राजकारणात सक्रिय आहे. तो ‘तमिलगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) चा संस्थापक अध्यक्ष आहे. विजयने २ फेब्रुवारी २०२४ रोजी या पक्षाची स्थापना केली होती.

मृतांमध्ये 34 वैष्णोदेवी यात्रेकरूंचा समावेश:जम्मू-काश्मिरात पावसाचा कहर; 41 मृत्युमुखी, नद्या कोपल्या, रस्ते-पूल तुटले, 58 गाड्या रद्द

१९१० नंतरचा सर्वाधिक पाऊस,जम्मूमध्ये २४ तासांत ३८० मिमी पाऊस-
गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस व पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसासंबंधी दुर्घटनांमुळे मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. त्यापैकी ३४ भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात होते. त्यांचा वाटेत भूस्खलन झाल्याने मृत्यू झाला. दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये रेल्वे व रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. उत्तर रेल्वेने बुधवारी जम्मू – कटरा येथून ये-जा करणाऱ्या ५८ गाड्या रद्द केल्या तर ६४ गाड्या मध्यावर थांबवण्यात आल्या. बुधवारी पाऊस थांबल्यानंतर मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले. मुसळधार पावसामुळे अनंतनाग व श्रीनगरमधील झेलमने धोक्याची पातळी ओलांडली. पाणी निवासी भागात घुसले. प्रमुख पूल व व्यावसायिक प्रतिष्ठानांसह पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. किश्तवारमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे डोंगराळ भागात पूर आला. अनेक घरे, वाहने व दुकाने वाहून गेली. ढिगाऱ्यात व पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. २२ तासांहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर दूरसंचार सेवा अंशतः पूर्ववत करण्यात आल्या आहेत. काश्मीर खोऱ्यातही रात्रभर मुसळधार पाऊस पडला. जम्मू-काश्मीरच्या पूरग्रस्त भागातून १०,००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

हवामान विभागाने सांगितले – जम्मूमध्ये २४ तासांत ३८० मिमी पाऊस पडला. तो १९१० नंतरचा सर्वाधिक आहे. मंगळवारी सकाळी ८:३० वाजल्यापासून २४ तासांत पाऊस पडला. उधमपूरमध्येही विक्रमी ६२९.४ मिमी पाऊस पडला. जुलै २०१९ मध्ये उधमपूरमध्ये ३४२ मिमी व ऑगस्ट १९७३ मध्ये जम्मूत २७२.६ मिमी पाऊस पडला.

लावैष्णोदेवी यात्रा तात्पुरती थांबवली, नातेवाइकांचा शोध सुरू..मंगळवारी, कटरा ते वैष्णोदेवी यात्रा मार्गादरम्यान अर्धकुनारीजवळ भूस्खलनात २० जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैष्णोदेवीकडील दोन मार्गांपैकी बुधवारी सकाळी हिमकोटी मार्गावरील यात्रा थांबवली होती. पावसामुळे यात्रा तात्पुरती थांबवली.
भारतीय हवाई दलाचे C-130 वाहतूक विमान बुधवारी जम्मूमध्ये पोहोचले, ते यात्रा मार्गावरील लोकांसाठी मदत – बचाव साहित्य घेऊन गेले.
माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावरील अपघातानंतर, कटरा बेस कॅम्पमध्ये अस्वस्थता होती. तिथेच प्रियजनांच्या शोधात भटकणारे व्यथित नातेवाईक आहेत. शुभम साहू जबलपूरहून ११ जणांसह आला होता. परतताना रस्ता खचला. त्याचे तीन मित्र बेपत्ता आहेत.
पंजाबमधील सुभाष देखील चार साथीदारांचा शोध घेत रुग्णालय आणि मदत केंद्राच्या फेऱ्या मारत आहे. आतापर्यंत २० मृतांची ओळख पटली आहे,

यात्रा थांबवल्यानंतर कटरा येथे राहिलेल्या भाविकांत परतायचे की थांबायचे याबद्दल गोंधळ आहे. दिल्लीतील नैना म्हणाल्या, हेलिकॉप्टर तिकिटे बुक केली होती. परंतु सतत पाऊस, गाड्या थांबल्यामुळे सर्वकाही ठप्प आहे.

यात्रा का थांबवली नाहीजम्मू -काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आश्चर्य व्यक्त करून हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतरही वैष्णोदेवी यात्रा थांबवली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. यात्रेकरूंना का हलवले नाही? नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दुर्घटना ढगफुटीने घडली. यात्रा थांबवली. पीडितांना आर्थिक मदत दिली जाईल, असे जाहीर केले.

‘दगडूशेठ’ च्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिर सजावटीच्या विद्युतरोषणाईचे उद्घाटन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; गणेशोत्सवाचे १३३ वे वर्ष

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षी गणेशोत्सवात केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. श्री गणेश चतुर्थीला मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाले.

यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर. हे मंदिर श्री वैष्णव परंपरेत श्री विष्णूंचे पवित्र निवासस्थान मानले जाणारे १०८ दिव्य देसमांपैकी म्हणजेच निवास स्थानांपैकी एक आहे. अत्यंत पवित्र असलेल्या या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात साकारण्यात आली आहे. तसेच विद्युत रोषणाईने ती उजळून निघाली आहे.

पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत ५ थरांचा गोपुर आहे. त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात आले आहेत. तर, गाभा-यात विष्णू लक्ष्मी, शिवपार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती आहेत. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात आली आहे. नानाविध वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी आहे.

प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच आहे. यामध्ये ३० भव्य खांब असून ५०० देवी-दैवता, ऋषीमुनी यांच्या मूर्ती आहेत. गाभारा सुवर्ण रंगाने सजलेला असून संपूर्ण छताचा भाग अष्टकोनी स्वरूपात साकारण्यात आला आहे. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल.

पुण्यात शुक्रवारी ३२० पदक विजेत्‍यांचा गौरव,क्रीडादिनी मिशन लक्ष्यवेध योजनेचा शुभारंभ

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शुक्रवार २९ ऑगस्‍ट रोजी आंतरराष्ट्रीय पदकविजेत्‍यांसह राष्ट्रीय क्रीडा स्‍पर्धेतील ३२० पदकविजेत्‍यांना रोख पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे. यावेळी मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्‍स सेंटरचा शुभारंभही केला जाणार आहे.

पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग सभागृहात शुक्रवार २९ ऑगस्‍ट रोजी दुपारी चार वाजता राष्ट्रीय क्रीडा दिन समारंभ होईल. याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रिय राज्‍यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषदेच्‍या उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्‍यमंत्री माधुरी मिसाळ, पुणे जिल्‍हातील खासदार, आमदार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रनजीतसिंह देओल, क्रीडा आयुक्‍त शीतल तेली-उगले आदी मान्‍यवर उपस्‍थित रहाणार आहे.

उत्तराखंड येथे फेबुवारीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रने गौरवशाली कामगिरी केली होती. ५५ सुवर्ण, ७० रौप्य व ७६ कांस्य अशी एकूण २०१ पदके पटकावून, सहभागी राज्यांमध्ये प्रथम क्रमांक संपादन केला. या स्‍पर्धेतील ३१४ पदकविजेत्‍या खेळाडूंचा गौरव केला जाणार आहे. सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकविजेत्‍यांना अनुकमे रू. ७, ५, ३ लाख रोख बक्षिस दिले जाणार आहे. मार्गदर्शकांना अनुक्रमे रू. ५०, ३० व २० हजारांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्‍यांमध्ये ऑलिम्‍पिक पदक विजेता स्‍वप्‍नील कुसाळे, आशियाई पदक विजेती राही सरनोबत, आदिती स्‍वामी, ऑलिम्‍पिकपटू देवेंद्र वाल्‍मिकी, विश्व करंडक विजेती प्रियंका इंगळे या दिगज्‍ज क्रीडापटूंचा समावेश आहे. सर्वाधिक ८ पदकांचा विक्रम करणाऱ्या आदिती हेगडे हिला ३२ लाखांचे बक्षिस प्राप्‍त होणार आहे. राज्याच्या क्रीडा धोरण-२०१२ नुसार,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शकांना रु.28.७० कोटी रकमेची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. आंतराराष्ट्रीय स्‍पर्धेत पदकाची लयलूट करणाऱ्या ६ पदकविजेत्‍यांचाही गौरव केला जाणार आहे

कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या मिशन लक्ष्यवेध या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ व बोधचिन्‍ह अनावरण केले जाईल. वार्षिक रु.१६० कोटी इतका खर्च मंजुर करण्यात आलेला या योजनेत १२ क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आलेली असून, या सर्व क्रीडा प्रकारातून राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, पहिल्या टप्प्यातील सहा क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षण योजनेचा शुभांरभ शुक्रवारी होईल. यामध्ये ॲथलेटिक्‍स, हॉकी, कुस्‍ती, वेटलिफ्टिंग, रोईंग व लॉन टेनिस खेळाचा समावेश असल्‍याची माहिती सहसंचालक सुधिर मोरे यांनी दिली आहे.

कार्यक्रमासाठी सुमारे ३०० खेळाडू, १०० मार्गदर्शक आणि १०० पदाधिकारी, क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षणार्थी असे एकूण ८०० जण उपस्थित राहणार आहेत.

मनोज जरांगेंचे मुंबई पोलिसांना हमीपत्र:कायदा व सुव्यवस्था राखण्यासह दिली 20 आश्वासने, पोलिसांची अटींसह आंदोलनाला परवानगी

मुंबई- मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिल्यानंतर, त्यांनी पोलिसांना हमीपत्र सादर केले आहे. या हमीपत्रात जरांगे यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच पोलिसांच्या अटी-शर्तींचे पालन करण्यासाठी 20 आश्वासने दिली आहेत. आंदोलनादरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करूनच सर्व कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे हमीपत्र मनोज जरांगे यांच्या स्वाक्षरीसह त्यांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात सादर केले.

या आश्वासनांमध्ये खालील प्रमुख बाबींचा समावेश

मी, कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मागणी केल्यावर, त्यास दाखवण्यासाठी दिलेली परवानगीची मूळ प्रत सोबत बाळगेल.
मी, पोलीस नियमित संपर्क करू शकतील अश्या पांडुरंग मारक या जबाबदार व्यक्तीची प्रतिनियुक्ती करेल.
मी, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी विचारविनिमय करून, पिण्याचे पाणी (टँकरद्वारे पुरवठा करून) आणि प्रथमोपचार/वैद्यकीय मदत यांची देखील सभास्थळी आणि धरणे/निदर्शन कालावधीत पर्याप्त व्यवस्था करेल.
मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, धरणे,निदर्शने, इत्यादी सुव्यवस्थित रीतीने करण्यात येईल आणि वाहतुकीच्या सामान्य ओघामध्ये अडथळा आणणार नाही आणि वाहनतळ आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यात येईल.
मी आणि इतर व्यक्ती,धरणे-निदर्शने, इत्यादीमध्ये सहभागी होणाऱ्यांची मर्यादा,माझ्या निवेदनात विनिर्दिष्ट केलेल्या संख्येपर्यंतच मर्यादित ठेवील आणि कोणत्याही परिस्थितीत त्यात वाढ होऊ देणार नाही.
मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, पोलिसांना सहाय्य करण्यासाठी पुरेशा संख्येतील स्वयंसेवकांना त्या स्थळी आणि त्या स्थळाभोवती तैनात करण्यात येईल आणि तसेच संपर्काच्या तपशिलासह स्वयंसेवकांची यादी आगाऊ स्वरुपात पोलिसांना पुरवील.
मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, धरणे-निदर्शनं,सभा,इत्यादी विहित ठिकाणी/स्थळीच घेण्यात येईल.
मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, धरणे-निदर्शने, इत्यादी विहित कालावधीत, म्हणजेच सकाळी 09:30 ते सायंकाळी 05:30 या वेळेत घेण्यात येईल.
मी आणि इतर आयोजक, ध्वजांसाठी/फलकांसाठी 2 फुटांपेक्षा अधिक लांबीची काठी वापरणार नाही. ध्वजाचा/फलकाचा आकार 9 फूट 6 फूट किंवा त्यापेक्षा कमी असे असेल. सहभाग घेणाऱ्या व्यक्ती, काठीवरील ध्वज/फलक, इत्यादी केवळ प्रदर्शनाच्या हेतूनेच जवळ बाळगतील.
मी आणि इतर आयोजक याची खात्री करतील की, धरणे-निदर्शने इत्यादींमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती, आक्रमणकारी हत्यार म्हणून वापरले जाण्याचा संभव असतील अशा लाठ्या,अग्निशस्त्रे, भाले, तलवारी आणि इतर वस्तू जवळ बाळगणार नाहीत. मी याची खात्री करील की,सहभागी होणारी कोणतीही व्यक्ती,ज्यामुळे मानवी जीवितास किंवा त्याच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अथवा सार्वजनिक शांतता भंग होईल किंवा दंगा उसळेल असे कोणतेही नकली किंवा इतर कोणतेही अग्निशस्त्र जवळ बाळगणार नाहीत.
मी आणि इतर आयोजक, याची खात्री करतील की, सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती,चिथावणीखोर भाषणे करणार नाही किंवा जमावाच्या भावना भडकवणारी किंवा त्यांना चिथावणी देणारी किंवा विविध गटांमध्ये धर्म, वंश, स्थान किंवा जन्म, निवास, भाषा, इत्यादी कारणावरून शत्रुत्व निर्माण करणारी किंवा तसा संभव असणारी भाषा वापरणार नाही अथवा अशा गटांमधील सलोखा राखण्यास बाधक ठरणारी किंवा सार्वजनिक शांतता बिघडवणारी अशी कोणतीही कृती कोणत्याही रीतीने करणार नाही.
मी आणि इतर आयोजक, हमीपत्रातील मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करतील आणि पोलिसांना सर्व परिस्थितीत सहकार्य करतील.