काँग्रेस पक्षाने ७५ वर्षात काय दिले असा प्रश्न काही लोक विचारत असतात. काँग्रेस पक्षाने रोजगार दिला, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, औद्योगीकरण, तंत्रज्ञानासह चौफेर विकास केला. काँग्रेसने ७५ वर्षात केलेल्या कामांचा हिशोब लिहिण्यास बसलो तर कागद संपतो पण भाजपाने काय दिले याचा हिशोब केला तर फक्त खोटारडेपणा व चॉकलेटच दिले, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज वसमत, भोकर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतल्या. यावेळी खासदार प्रा. रवींद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील, नांदेड शहराध्यक्ष अब्दुल सत्तार अब्दुल गफूर, सुरेंद्र घोडसकर, तिरुपती पाटील कोंढेकर, सुरेश दादा गायकवाड, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बालाजी गाडे, भारतीताई पवार, रेखाताई चव्हान, तौसिफ इनामदार, आदिनाथ चिंताकुटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशाच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान आहे ते कोणीही नाकारू शकत नाही. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंत विकासाची शिखरे काँग्रेस सरकारने गाठली. पण २०१४ पासून सत्तेत आलेल्या भाजपाने काय दिले, तर फक्त खोटी आश्वासने दिली. नोटबंदी केली पण काळा पैसा बाहेर आला नाही, अतिरेकी कारवाया थांबल्या नाहीत फक्त सर्वसामान्य जनतेला त्रास झाला. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांचे उत्तपन्न दुप्पट करणार हे सर्व हवेतच विरून गेले. नरेंद्र मोदींच्या राजवटीत अदानी व अंबानी तुपाशी आणि जनता मात्र उपाशी अशी परिस्थिती आहे..
काँग्रेस पक्षाने भोकरला खूप काही दिले. आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण भोकरला आल्यावर मात्र… नाम बडे और दर्शन खोटे, अशी परिस्थिती होती, अशा लोकांचा इतिहास विसरू नका. भोकरचे ते डरपोक लोक मोदींच्या कळपात जाऊन बसले, ‘जो डर गया ओ मर गया’, त्यांनी गद्दारी केली, पळून गेले आता शेठ, सावकारांचे राज्य नको, जनतेचे राज्य हवे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे जाणते नेतृत्व आहेत, त्यांनी राज्याच्या विकासासाठी, समाजकारणासाठी आपली हयात खर्ची घातली, वैचारिक मतभेद असू शकतात पण आज सत्ताधारी पक्ष त्यांना त्रास देत आहे, ते अशोभनीय आहे. शरद पवार यांचा पक्ष फोडला, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला. पूर्वी पोरं चोरणारी टोळी होती आता भाजपा हा पक्ष फोडणारी टोळी बनली आहे, याचा धिक्कार करतो असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
नागपूर -पंकजा मुंडे यांचे पीए गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली याबद्दल मला संपूर्ण माहिती मिळालेली नाही. प्राथमिक माहिती मला मिळाली आहे. पोलिसांनी संपूर्ण माहिती दिली की याबद्दल बोलता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून मी एवढेच सांगतो की आम्हाला संपूर्ण भागाचा विकास करायचा आहे. निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे. अनेक वेळा भाषणांमध्ये आपण काही गोष्टी बोलतो त्याचा अर्थ तसा कधीच नसतो. आमचे सहकारी जरी काही बोलले असतील तरी त्यांचा अर्थ तसा नाही ते देखील भेदभाव करणार नाही, असे म्हणत फडणवीसांनी अजित पवारांच्या विधानावर सारवासारव केली आहे. अजित पवारांनी केलेले वक्तव्य हे निवडणुकीपुरते आहे. निवडणुकांच्या वेळी अशी वक्तव्य केली जातात. निवडणुकीनंतर काही तसे वागत नसतात सर्वच शहरांचा विकास करावा लागतो. उद्या मी प्रचाराला गेलो तर मी ही आमच्या उमेदवारासाठी तसेच बोलेल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात आमच्या महायुतीला जनता निवडून देईल. काही ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढत असलो तरीही जनता महा युतीच्याच पाठीशी आहे. त्यानंतर आम्ही चांगला विकास करू. हा वेड्याचा बाजार आहे काही माध्यमेदेखील वेडी झाली आहेत, आमच्यामध्ये आणि एकनाथ शिंदेंमध्ये काहीही दुरावा नाही. आम्ही एकमेकांना बोललो नाही असे काही नाही आमच्यात चर्चा झाली न बोलण्यासारखे काहीही घडले नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिकलेल्या तरुणांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या कामांसाठी केला पाहिजे. पण त्यांच्या डोक्यात हे घालणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. तिथे त्याचा जात-धर्म न बघता ठेचून काढावे लागेल. मुस्लिम तरुणांनी अब्दुल कलमांचा आदर्श घ्यावा दुसऱ्यांचा आदर्श घेण्याची गरज नाही.
गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण-गौरीच्या कुटुंबियांचा ही आत्महत्या नाही तर हत्याच दावा
मुंडेंनी पोलिसांना फोन करायला हवा होता-एफआयआर करायला वेळ लागला
मुंबई-मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केली. डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्येप्रकरणी आता विविध आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. गौरीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नाही तर हत्याच असल्याचा दावा केला आहे. डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्येनंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी गौरीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत गर्जे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत.
अंजली दमानिया म्हणाल्या की, डॉक्टर गौरी पालवे गर्जे या आत्महत्या करण्यासारख्या नव्हत्या. तिच्या आई-वडिलांची परिस्थिती काय आहे त्यांना जेव्हा मुलीच्या आत्महत्येविषयी कळाले तेव्हा ते एका लग्नात होते.ते पूर्ण रात्र प्रवास करत वरळी पोलिस ठाण्यात आले. त्यांना रुग्णालयात अशा अवस्थेत मुलीली पहावे लागले. यावर काय बोलावे मला कळत नाही.
अंजली दमानिया म्हणाल्या की, पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर करायला वेळ लागला कारण त्यात तिने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. पण तिच्या वडीलांनी तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला हे आम्हाला माहिती नाही. पोलिसांनी तसे करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर पोस्टमार्टममध्ये जर हत्या केल्याचे समोर आले तर पोलिस 302 चा गुन्हा दाखल करणार आहेत.
अंजली दमानिया म्हणाल्या की, महाराष्ट्रात डोकं सुन्न करणाऱ्या गोष्टी होत आहेत, अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे हेच पुन्हा पुन्हा म्हणून काय फायदा ही प्रकरणं महाराष्ट्रात वाढत आहेत. संपदा, गौरी आणि वैष्णवी ह्या सर्वांसोबत हे झाले. गौरी पालवे ही खूप खंबीर होती ती आत्महत्या करेल असे वाटत नाही. अनंत गर्जे हा पंकजा मुंडे यांचा पीए होता त्यांना हे कळले असले तरी पोलिसांना फोन करत कारवाई करा असे म्हटले नाही त्यांनी ते करायला हवे. पंकजा मुंडे यांनी एका मुलीसाठी ठामपणे उभे रहावे, आणि माझा पीए असेल तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे पंकजा मुंडेंनी बोलले पाहिजे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, गर्जेची बहीण देखील गौरीला मानसिक त्रास देत होती. म्हणून या प्रकरणी अनंत गर्जे, त्यांची बहीण आणि दीरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत गर्जेच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये सत्य बाहेर आले पाहिजे, असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे. अनंत गर्जेला पोलिसांनी अटक केलेली नाही पण त्याला अटक करु असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
मुंबई -भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच, 7 फेब्रुवारी रोजी अनंत गर्जे आणि डॉ. गौरी यांचा मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता.
प्राथमिक माहितीनुसार, काल (शनिवारी, 22 नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास डॉ. गौरी गर्जे यांनी वरळीतील बीडीडी चाळीतील त्यांच्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्या केईएम रुग्णालयाच्या दंतचिकित्सा (डेंटिस्ट) विभागात कार्यरत होत्या. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे. वरळी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला असून, प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
काल दोघांमध्ये मोठे भांडण
आत्महत्या करणाऱ्या डॉ. गौरी यांच्या कुटुंबियांनी मात्र या प्रकरणाला वेगळी दिशा दिली आहे. त्यांच्या मामाने टीव्ही 9 वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले की, अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर होते. यावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत होती आणि याबद्दल गौरीने आपल्या वडिलांना माहिती दिली होती, तसेच चॅटिंगचे काही स्क्रीनशॉट ही पाठवले होते. काल गौरीने आत्महत्या केली, काल दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते आणि भांडणादरम्यान तिने स्वतःला संपवले, अशी माहिती अनंत गर्जेने दिली. महत्त्वाचे म्हणजे, गौरी स्वतःला संपवत असताना अनंत गर्जे घरात उपस्थित होता आणि तोच तिला दवाखान्यात घेऊन गेला होता, असेही कुटुंबियांनी सांगितले.
गौरीच्या कुटुंबीयांचा आरोप
डॉ. गौरी यांच्या मामांनी पुढे सांगितले की, त्यांच्या मुलीचा (गौरीचा) सासरच्या मंडळींकडून छळ होत होता. लग्नाच्या अवघ्या 10 महिन्यांत असे टोकाचे पाऊल उचलणे म्हणजे आत्महत्या नाही तर हत्याच असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. आपली मुलगी गमावल्यामुळे दुःखी असलेले कुटुंबीय बीडवरून मुंबईत दाखल झाले असून, त्यांनी आपल्या मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. वरळी पोलिसांनी या गंभीर आरोपांची नोंद घेतली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू केली आहे.
पुणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, याचे सेलिब्रेशन करण्याच्या उत्सवी मानसिकतेतून आपण अद्याप बाहेर आलेलो नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर पुढे काय, याविषयी चर्चा झाली. राज्य शासनाने मात्र उत्सव बाजूला ठेवून काम सुरू केले आहे. भाषिणी ॲपचा पहिला ट्रान्सक्राईब उपयोग मराठीने प्रथम यशस्वी करून दाखवला. आता अभिजात दर्जाप्राप्त भारतीय भाषांचे एकत्रित नेतृत्व मराठीने स्वीकारावे, यादृष्टीने शासनाने रोड मॅप आखला आहे, अशी माहिती राज्याच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी दिली. मराठी भाषा अभिजात आहे हे देशाला दाखवून देण्यासाठी सरकार, साहित्यसंस्था आणि महामंडळाने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सरहद संस्थेने दिल्ली येथे आयोजित केले होते. या संमेलनापूर्वी घेण्यात आलेल्या ९८ साहित्यिक कार्यक्रमांच्या स्मरणिकेचे प्रकाशन आज (दि. २२) करण्यात आले. यावेळी डॉ. किरण कुलकर्णी बोलत होते. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे अध्यक्षस्थानी होते. सरहद, पुणेतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी, सरहद, पुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, अनुज नहार व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले, अभिजात दर्जा याविषयीचे अनेक पैलू मांडणारे नवभारत आणि हेमांगी या अंकांचे विशेषांक प्रकाशित करण्यात आले आहेत. तसेच चक्रधर, संत ज्ञानेश्वर यांच्या पूर्वीचे मराठीचे स्वरूप काय व कसे होते, याविषयीच्या संशोधनासाठी प्रस्ताव विचाराधीन आहेत. अभिजात दर्जा प्राप्त झालेल्या अन्य ११ भारतीय भाषांचे एकत्रित संमेलन शासनाने अमरावती येथे आयोजित केले होते.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ज्ञान रसाळपणे सर्वसामान्यांपर्यंत सर्वप्रथम नेणारी मराठी ही पहिली भाषा आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी हे महत्कार्य केले. आधुनिक काळात, अभिजात भारतीय भाषांच्या विकासाचे, दिशादर्शनाचे नेतृत्वही मराठी भाषेने स्वीकारले पाहिजे. असे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर स्वीकारणे, हे शासनाचे कर्तव्य आहे, तर शासनाच्या पाठीशी सर्व साहित्यसंस्था, लेखक, संशोधकांनी स्वतःहून उभे राहणे, ही आपली जबाबदारी आहे. त्याचा स्वीकार करावा, असे आवाहन यांनी केले. भाषांच्या सर्वांगीण विकासासाठी इको सिस्टीम तयार करणारे नेतृत्व महाराष्ट्रातून उभे राहावे. मराठी भाषेसाठी आता इको सिस्टीम उभारण्याची गरज आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, त्यामध्ये महाराष्ट्रीय प्राकृतचे स्थान अनन्यसाधारण आहे. मध्ययुगीन कालखंडापेक्षा पूर्वीच्या काळात मराठी भाषेचे स्वरूप काय व कसे होते, याविषयी संशोधन आवश्यक आहे. महाराष्ट्री प्राकृतविषयीचे पाठ्यपुस्तकातील पाठ आम्ही तयार केले, पण दुर्दैवाने एकही शाळा, कनिष्ठ महाविद्यालय त्यासाठी अजून पुढे आलेले नाही. स्वतःच्या कक्षा ओलांडून राज्यविस्तार करण्यासाठी बाहेर पडलेले मराठेच पहिले होते. तंजावूरच्या भोसले घराण्याचे भाषाविषयक कार्य महत्त्वाचे आहे. (रेनेसा कालखंडात) प्रबोधनकाळातही अग्रेसर महाराष्ट्रच होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता नव्या काळात अभिजात भाषांच्या विकासासाठीचे नेतृत्व स्वीकारणे, हे देखील महाराष्ट्राचे कर्तव्य आहे आणि सर्व मराठी साहित्यसंस्थांनी यासाठी शासनाच्या पाठीमागे उभे राहणे, ही त्यांची जबाबदारी आहे, असे आग्रही प्रतिपादन मोरे यांनी केले. संजय सोनवणी यांनी स्मरणिकेच्या संपादनाविषयी माहिती दिली. स्मरणिकेतील सर्व मजकूर दर्जेदार असून, दिल्ली येथील साहित्य संमेलनाने सर्वसामान्यांना कसे जोडून घेतले, याचे दर्शन यातून वाचकांना घडेल, असे ते म्हणाले. विनोद कुलकर्णी यांनी ९८व्या संमेलनासाठी दिल्लीची निवड जाणीवपूर्वक केल्याचा उल्लेख केला. स्मरणिकेचा उपक्रम स्तुत्य असून, एक चांगले दस्तऐवजीकरण झाल्याचे ते म्हणाले. संजय नहार यांनी भाषिक द्वेष नसावा, हे मराठीने शिकवले, असे सांगून दिल्ली संमेलनाचे काही अनुभव सांगितले. शैलेश वाडेकर यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. सुषमा नहार यांनी स्वागत केले. लेशपाल जवळगे यांनी आभार मानले.
पुणे : मालेगाव येथील तीन वर्षे वयाची यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर एका नराधमाने विकृत पद्धतीने अमानुष अत्याचार करून तिची हत्या केली. या घटनेचा तीव्र निषेध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)पक्षातर्फे करण्यात आला.
ही श्रद्धांजली सभा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या ग्रंथालय सेल शहर अध्यक्ष प्राजक्ताताई जाधव यांनी आयोजित केली होती. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला अध्यक्ष स्वातीताई पोकळे, गौरीताई कदम, सिनियर सिटीझन शहर अध्यक्ष दादा सांगळे, तेजस मिसाळ, उपस्थित होते. या प्रसंगी मेणबत्या प्रज्वलित करून, यज्ञा दुसाने हिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पालक महिलांनी सतत मोबाईल, टीव्ही यावर गुंतून न रहाता मुलांच्या सुरक्षेची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. मुलांना संगत कोणाची आहे? मुलांची शारीरिक मानसिक वाढ व्यवस्थित होत आहे ना? या विषयांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मुला-मुलींना सर्व बाबतीत समान वागणूक द्यायला हवी, असे प्राजक्ता जाधव यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
अशा घटनांमुळे संबंधितांचे आर्थिक, मानसिक नुकसान होते. या परिणामांचे भान ठेवायला पाहिजे, असे मत प्राजक्ता जाधव यांनी याप्रसंगी झालेल्या सभेत व्यक्त केले.
सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथे शनिवारी(दि.२२) भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ९ ते १० जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी ही क्रुझर गाडी (एम एच २४ व्ही ४९४८) सोलापूर-हैदराबाद महामार्गावरुन जात होती. या गाडीतील प्रवासी सोलापूरवरुन नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी धाराशिवमधील अणदूर (ता.तुळजापूर) येथील चिवरी पाटी येथील परिसरात त्यांच्या क्रुझरचे टायर्स अचानक फुटले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही क्रुझर जीप एका ट्रॅक्टरला धडकून रस्त्यावर पलटी झाली.
ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीच्या एका भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. या जबर धडकेमुळे गाडीत बसलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर ९ ते १० प्रवासी जखमी झाले. जखमींना तत्काळ पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रूग्णलयात पाठवण्यात आले आहे. जखमींपैकी तीन ते चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातातील नातेवाईकांची शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी झालेली आहे.
या अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्व प्रवासी दक्षिण उळे सोलापूर येथील असल्याचे समजते. यामध्ये आकाश कदम, हरीकृष्ण शिंदे, माऊली कदम, अंजली आमराळे, ओमकार शिंदे, रुद्र शिंदे, कुणाल शिंदे, श्लोक शिंदे, बालाजी शिंदे, शिवांश कदम, कार्तिक आमराळे (रा.उळे, जि. सोलापूर ) अशी जखमींची नावे आहेत.
अपघात होताच आजूबाजूचे नागरिक तात्काळ मदतीसाठी धावले. नागरिकांनी तातडीने एकत्र येत जोर लावून पलटी झालेली क्रुझर गाडी सरळ केली. त्यानंतर गाडीतून मृतदेह आणि गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना बाहेर काढले. स्थानिक नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून प्रशासनाला माहिती दिली. अपघाताच्यावेळी गाडीत क्षमतेपेक्षा जास्त लोक कोंबून बसवले असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, सध्या पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य आणि पुढील तपास सुरू आहे.
पुणे: दोन वर्षांपूर्वीच घेतलेल्या नवीन प्रकल्पातील सदनिकेत गळती आणि अन्य दोष आढळून आल्याने विकासकाविरोधात केलेल्या तक्रारीवर सुनावणी करताना ‘महारेरा’ने ३० दिवसांच्या आत सदनिकेतील ही गळती आणि दोष दुरुस्त करण्याचे, तसेच यासंदर्भात भविष्यात कोणतीही तक्रार येणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. व्ही. आर. कुलकर्णी असोसिएट्स आणि एस. आर. कुलकर्णी डेव्हलपर्स या बांधकाम कंपनीविरोधात पुण्यातील तळजाई परिसरात ‘मेघदूत टॉवर कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी’चे माजी अध्यक्ष व वकील ऍड. अमित शहा यांनी ‘महारेरा’कडे तक्रार दाखल केली होती.
व्ही. आर. कुलकर्णी असोसिएट्स आणि एस. आर. कुलकर्णी डेव्हलपर्स यांनी पुण्यातील तळजाई परिसरात ‘मेघदूत टॉवर कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी’ हा प्रकल्प उभारला आहे. या सोसायटीमध्ये ऍड. अमित शहा यांची सदनिका आहे. सदनिका घेतल्यानंतर काही दिवसांतच बांधकामाचा दर्जा दुय्यम असल्याचे, तसेच मोठी गळती, इतर दोष असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी विकासकाकडे तक्रार करत दुरुस्ती करण्याची मागणी केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत विकासकाने त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे ऍड. अमित शहा यांनी ‘महारेरा’कडे धाव घेतली. ऍड. अमित शहा यांनी दुय्यम बांधकाम, गळती, अर्धवट अमेनिटीज आदी गोष्टींचे फोटो ‘महारेरा’कडे सादर केले. लिफ्ट, त्यासाठी आवश्यक बॅकअप, ट्रान्सफॉर्मर्स, लिफ्टमधील कॅमेरे, क्लब हाऊस, जिम, स्विमिंग पूल यासह अन्य सदोष गोष्टी निदर्शनास आणून दिल्या आहेत. ‘महारेरा’ने या सर्व गोष्टी अधोरेखित केल्या असून, विकासकाला येत्या ३० दिवसांत सदनिकेतील अडचणी सोडवण्यास सांगितले आहे.
ऍड. अमित शहा म्हणाले, “दोन्ही विकासकांना तोंडी आणि लेखी स्वरूपात अनेकदा विनंतीपत्र दिले. मात्र, त्याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे न्यायासाठी महारेरा प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली. ‘महारेरा’ने माझे म्हणणे ऐकून घेत माझ्या सदानिकेतील गळती आणि दोष दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. मला काही प्रमाणात न्याय मिळाल्याचे समाधान आहे.”
पुणे, दि. 21 ऑक्टोबर : पुणे ग्रँड चॅलेंज दूर सायकलिंग स्पर्धा 2026 आयोजित करण्यात येत असून या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता व वाहतूक व्यवस्थापन लक्षात घेता मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 तसेच शासन गृह विभागाच्या 19 मे 1990 च्या अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी 19 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 00.01 वा. ते 20 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 24.00 वा. तसेच 24 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 24 वा. ते 26 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 24 वा. या कालावधीत सिंहगड परिसरातील खालीलप्रमाणे वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने या कालावधीत सिंहगड किल्ला मार्ग पूर्णपणे बंद राहणार आहे. मौजे पानशेत, खानापूर, डोणजे, अतकरवाडी या बाजूने सिंहगड घाटमार्गाने खेड-शिवापूरकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात येत आहे.
उक्त परिसरातील नागरिकांनी डोणजे चौक – खडकवासला – किरकटवाडी – नांदेड सिटी – वडगाव धायरी मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (पुणे–बेंगळुरू महामार्ग) वापरून खेड-शिवापूरकडे प्रवास करावा.
नागरिकांनी स्पर्धेच्या सुरळीत आयोजनासाठी वाहतूक यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.
कसबा पेठेतील नवदिप तरुण मंडळ ट्रस्ट तर्फे आयोजन पुणे : दादला नको ग बाई, असला नवरा नको ग बाई… फाटकं लुगडं आणि फाटकी साडी… अशा विनोदी गाण्यांच्या माध्यमातून गोविंद महाराज गायकवाड यांनी भारुड हा कलाप्रकार सादर करत कुटुंब व्यवस्था, व्यसनाधी ,सामाजिक विषयांवर प्रबोधन करत रसिकांचे मनोरंजन केले. कसबा पेठेत पारंपरिक पद्धतीने साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमाला पुणेकरांनी मोठी गर्दी केली.
कसबा पेठेतील फडके हौद चौकाजवळील नवदीप तरुण मंडळ ट्रस्ट तर्फे देवदिवाळीनिमित्त गोविंद महाराज गायकवाड यांच्या समाज प्रबोधन पर भारुडाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष तुषार शिंदे आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जनजागृती भारूड मंडळ, आळंदी देवाची यांच्यातर्फे गोविंद महाराज गायकवाड व सहकारी यांनी भारुडाचे सादरीकरण केले. यावेळी लोककलावंतांचा विशेष सन्मान करण्यात आला.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ या स्तोत्राने गोविंद महाराज गायकवाड यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ केला. आल्या पाचही गवळणी ही गवळण सादरीकरण करताना व्यासपीठावरच काही क्षणात पाच साड्या एकामागे एक बदलण्याचे आपले कौशल्य दाखवत गोविंद महाराज गायकवाड यांनी उपस्थित प्रेक्षकांमधील महिलांनाही आश्चर्यचकित करून सोडले. त्यानंतर त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेत कार्यक्रम रंगतदार केला.
काही कार्यकर्त्यांना त्यांनी कडेवर घेत कुटुंब नियोजनाचे महत्त्व तसेच व्यसन या सामाजिक विषयावर भाष्य केले. स्थानिक कलाकारांचा सहभाग, विनोदी किस्से, गाणी, गण, गवळण, भारुड अशा लोककला प्रकारांचे अप्रतिम सादरीकरण यामुळे कार्यक्रम अधिकाधिक रंगत केला. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या स्वरूपात दाद देत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.
कार्यक्रमासंदर्भात अध्यक्ष श्री.तुषार शिंदे म्हणाले, भारुड हा मराठी लोककलेपैकी एक महत्त्वाचा प्रकार आहे. ही लोककला आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत आणि विशेषत: लहान मुलांपर्यंत पोहोचावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारुड मराठी मातीतील कला तरुण मुलांपर्यंत पोहोचली तर, ती आपोआपच पुढील पिढी पर्यंत जाते. अशा प्रकारे संस्कृती आणि लोककला जपण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे याचे आम्हाला समाधान वाटत आहे. भारुड ही लोककला केवळ विनोदी नाही. तर या कलेच्या माध्यमातून सामाजिक विषयांवरही चांगल्या प्रकारे भाष्य करता येते. त्यामुळेच हा प्रकार नवीन पिढीने आत्मसात करून त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे आयोजन(२४ ते ३० नोव्हेंबर पर्यंत विविध क्षेत्रातील वक्त्यांची व्याख्याने)
पुणे, दि.२२ नोव्हेंबर: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत सोमवार, दि. २४ नोव्हेंबर ते रविवार, दि. ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ३०वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, माईर्स एमआयटीचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पात्रे व संचालक डॉ. महेश थोरवे उपस्थित होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं ४.०० वा. होईल. या समारंभासाठी स्पेस अॅप्लिकेशन सेंटर इस्त्रोचे माजी संचालक पद्मश्री डॉ.प्रमोद काळे व नवी दिल्ली येथील प्रसिद्ध लेखक, संशोधक आणि आध्यात्मिक शास्त्रज्ञ डॉ. सी.के.भारद्वाज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड हे उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानमालेचा समारोप रविवार, दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. होईल. प्रसिद्ध लेखक व ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्री.विश्वास पाटील हे प्रमुख पाहुणे असतील. तसेच एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत हे अध्यक्षस्थान भूषवतील. २५ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सायं. ४.०० वा. होणार्या व्याख्यानमालेत वैश्विक स्तरावरील किमया आश्रमचे स्वामी कृष्णा चैतन्य (आधुनिक जीवन पद्धती आणि अध्यात्म), इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू (मेडिसीन २५, पारंपारिक ज्ञानातील मुळे आणि शांतता), पुणे येथील डीआरडीओचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर (संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता हे विश्वगुरू भारताच्या दिशेने एक पाऊल), ओरिजिनोट वेलनेस चे सीईओ केशव वेल्हाळ (ओम टू क्वांटम कॉम्प्युटिंग-ए पाथवे फॉर वर्ल्ड पीस) आणि सनदी अधिकारी व महाराष्ट्र राज्याचे उपलोकायुक्त डॉ. संजय भाटिया (जनसेवेत विश्वशांती)अशा मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. या व्याख्यानमालेला जोडूनच सकाळी ८.४५ ते १२.०० पर्यंत कार्यशाळा होणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ.संजय उपाध्ये, किंकर विठ्ठल रामानूज व किंकर विश्र्वेशरै आनंदा, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे सह. अधिष्ठाता डॉ.बी.एस.नागोबा, यशदा पुणेचे संचालक रंगनाथ नाईकडे, फिल्म निर्माता व अभिनेता मुकेश खन्ना, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिच्या एलटीसीचे संचालक सुनील लोढा व दिपाली लोढा, वरिष्ठ अभियंता विष्णू भिसे, सुप्रसिद्ध गीतकार समिर अंजान, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रभारी डॉ. ताहेर एच. पठाण, परमपूज्य स्वामी सवितानंद, प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण हे विविध विषयांवर विचार मांडतील. प्रत्येक व्याख्यानानंतर वक्ता व श्रोते यांच्यामधील प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम या व्याख्यानमालांचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे या मध्ये २५ ते २९ नोव्हेंबर पर्यंत माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ संकुलातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी स. ७.०० ते ८.०० या वेळात योगासन वर्गाचे आयोजन क्रीडा विभागाचे संचालक अभय वाघ व योगगुरु श्री. अनंत कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. ‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल’, हे स्वामी विवेकानंदांचे वचन व तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या ज्ञानेश्वरी व गाथेतील ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वदर्शन हा या व्याख्यानमालेचा मुख्य हेतू आहे. या व्याख्यानमालेसाठी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, तसेच साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित केले असून, मानवी आणि आध्यात्मिक मूल्यांचे या व्याख्यानमालेद्वारे संवर्धन व्हावे, हा या व्याख्यानमाले मागील प्रमुख उद्देश आहे. ही व्याख्यानमाला विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड यांच्या प्रेरणेने तसेच, माईर्स एमआयटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे.
मुंबई -मराठी तरुण स्व. अर्णव खैरे याला रेल्वेमध्ये भाषेवरून झालेल्या मारहाणीच्या धक्क्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आल्याच्या अत्यंत वेदनादायक घटनेनंतर राज्यभरात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर समाजात भाषावाद व प्रांतवादाच्या आधारावर विष पसरविण्याचे राजकारण काही राजकीय पक्षांकडून केले जात असल्यामुळे भारतीय जनता पार्टी मुंबईकडून यावेळी निषेध करण्यात आला.या भाषवाद प्रवृत्तींना सदबुद्धी यावी या हेतूने आज शनिवार, दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमीत साटम यांच्या नेतृत्वाखाली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाजवळ छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर (मुंबई) येथे “सद्बुद्धी द्या” अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
स्व. अर्णव खैरे याच्या निधनाबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतो. काही राजकीय व्यक्ती आणि पक्ष भाषेच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याचा आम्ही तीव्र निषेध करतो. समाजात वैमनस्य नव्हे तर ऐक्य राहावे, हीच आमची भूमिका आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर प्रार्थना करून अशा प्रवृत्तींच्या लोकांना सद्बुद्धी मिळो असे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम म्हणाले.
याप्रसंगी आ. अतुल भातखळकर, आ. प्रसाद लाड, मुंबई सरचिटणीस गणेश खणकर, आचार्य पवन त्रिपाठी तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे- पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली १०५ जणांच्या पथकाने मध्यप्रदेशातील बेकायदा शस्त्रांचे कारखाने असलेल्या उमरटी गावात पहाटे छापा घालून मोठ्या प्रमाणावर शस्त्र साठा पकडण्यात आला आहे.या कारवाईत ३६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांच्याकडून २१ पिस्तुले, काडतुसे, तसेच पिस्तुले तयार करण्यासाठी लागणारी सुट्टे भाग जप्त करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे. गेल्या काही दिवसांत शहरात टोळीयुद्ध वाढले आहे. त्यातून एकमेकांवर हल्ला करण्यासाठी पिस्तुलांचा वापर झाला आहे.या गुन्ह्यांत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे पिस्तुलाबाबत चौकशी केली असा ती मध्य प्रदेशातून आणल्याचे स्पष्ट झाले होते. चौकशीत पोलिसांना महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेजवळ असलेल्या उमराटी गावात पोलादापासून चाकू, सुरी करणाऱ्या कारागिरांकडून देशी बनावटीचे पिस्तुले तयार करण्यात येतात, असे समजले होते. त्यानंतर पोलिसांनी उमराटी गावातील पिस्तुले तयार करणाऱ्या कारखान्यांवर छापा घालण्याचे निश्चित केले’, अशी माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी शनिवारी (ता. २२) पत्रकार परिषदेत दिली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, उपायुक्त निखिल पिंगळे, संदीप भाजीभाकरे आणि सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यावेळी उपस्थित होते.
महिनाभरात २१ पिस्तुले जप्त
गेल्या महिन्याभरात विमानतळ पोलिस ठाणे, काळेपडळ पोलिस ठाणे, खंडणी विरोधी पथक, तसेच गुन्हे शाखेच्या पथकांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात कारवाई करून सराइतांकडून २१ पिस्तुले जप्त केली होती. विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपासात उमराटी गावातून पिस्तुले आणल्याचे माहिती मिळाली होती.
१०० पोलिसांचा सहभाग
या कारवाईसाठी पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. गुन्हे शाखेची पथके, पोलिस मुख्यालयातील गॅस गन पथक, क्लिक रिस्पॉन्स टिम, बिनतारी संदेश यंत्रणा पथक (वायरलेस), मोबाइल सर्व्हेलन्स पथकासह १०० पोलिस कर्मचारी शनिवारी पहाटे उमराटी गावात पोहोचले. तेथे विरोध होण्याची शक्यता असल्याने पथकातील सर्वांनी बुलेटप्रुफ जॅकेट परिधान केले होते. पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई करताना बॉडी कॅमेऱ्यांचा वापर केला. पोलिसांच्या पथकाने शनिवारी पहाटे तेथे छापा टाकला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, नितीनकुमार नाईक,कल्याणी कासोदे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, पठाण, तांबेकर, रोकडे, रणपिसे यांच्यासह १०० पोलिस कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.
पोलाद वितळविण्याच्या ५० भट्ट्या उद्ध्वस्त
एका ठरावीक क्षमतेच्या पोलादापासून ही पिस्तुले बनविण्यात येत होती. पिस्तुलासाठी लागणारे पोलाद वितळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ५० भट्ट्या या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आल्या. अनेक घरांत या भट्ट्या होत्या. कारवाई करण्यापूर्वी पोलिसांनी तेथे ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला. ड्रोनच्या आधारे परिसराची माहिती घेण्यात आली होती.
अशी केली जात पिस्तुलांची विक्री
उमराटी गावातील कारागिरांकडून गेल्या काही वर्षांपासून देशी बनावटीची पिस्तुले तयार करुन त्यांची विक्री केली जाते. हे कारागीर प्रत्यक्ष पिस्तुले विक्रीसाठी शहरात येत नाही. पुण्यातील गुंड टोळ्यांना मध्यस्थांमार्फत पिस्तुलांची विक्री केली जाते. ‘उमराटी शिकलगार ब्रॅँड’ (यूएसए) असा सांकेतिक शब्दाचा वापर करून पिस्तुलांची विक्री केली जाते. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगडमधील सराइतांना पिस्तुलांची विक्री केली जात, असे चौकशीतून समोर आले आहे.
मध्य प्रदेशातील उमराटी गावात देशी बनावटीची पिस्तुले तयार केली जातात, अशी माहिती आम्हांला मिळाली होती. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पिस्तुले तयार करणाऱ्या कारखाने उद्ध्वस्त केले आहेत. तेथून ३६ संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू आहे. शनिवारी पहाटे पोलिसांनी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
सोमय मुंढे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ चार
पुणे शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारीविरोधात मोठी मोहीम राबवत आंतरराज्यीय अवैध शस्त्र उद्योगाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पुणे शहरातून २१ पिस्तुले आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. त्यानंतर पुढील तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारावर मध्य प्रदेशात छापेमारी करून ३६ संशयितांना ताब्यात घेतले.या तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशातील उमराटी गावात पहाटे छापा टाकण्यात आला. येथे पोलिसांनी अवैध शस्त्रनिर्मितीचा मोठा अड्डा उघडकीस आणला. या कारवाईत ३६ संशयितांना जेरबंद करण्यात आले.छापेमारीत मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि त्यांचे सुटे भाग जप्त करण्यात आले. पोलिसांनी शस्त्रे बनवणारे ५० अड्डे बुलडोझरने उद्ध्वस्त केले. तसेच, शस्त्रांवर नावे उमटवण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही जप्त करण्यात आले.मागील तीन आठवड्यांपासून विमानतळ, काळेपडळ, गुन्हे शाखा आणि एईसी पथकांनी केलेल्या धडक कारवाईत एकूण २१ शस्त्रे जप्त झाली होती. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या धाडीसाठी शीघ्र कृती दल, गॅस गन सेक्शन, वायरलेस आणि सीसीटीव्ही टीम यांसह मोठा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला होता. मोबाइल सर्व्हिलन्स व्हॅन, बुलेटप्रूफ जॅकेट्स आणि बॉडी वॉर्न कॅमेरे यांचाही वापर करण्यात आला.तपासातील प्राथमिक निष्कर्षानुसार, जप्त केलेली अवैध शस्त्रे “उमराटी शिकलगार आर्म्स (USA)” या नावाने तयार करून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत पुरवली जात असल्याचा संशय आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांवर कायदेशीर कारवाई केली जात असून, अवैध शस्त्र पुरवठा साखळीचा पूर्ण उलगडा करण्यासाठी तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पुणे- कोरेगाव पार्कातील द हेवन हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी विदेशी आणि परराज्यातील महिलांकडून करवून घेतल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेने हि कारवाई केली . हॉटेलमध्ये चालु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकुन ०१ पिडीत विदेशी महिला व ०२ परराज्यातील महिलांची सुटका केली आणि एका आरोपीला अटक केली . दिनांक २०/११/२०२५ रोजी पोलीस अंमलदार तुषार भिवरकर अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पुणे शहर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कोरेगाव पार्क पुणे परिसरामध्ये इसम (एजंट) हा विदेशी व परराज्यतील मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणुन त्यांचेकडुन वेश्या व्यवसाय करुन घेत असलेबाबत माहिती प्राप्त झाली. या बाबत पोलीस निरीक्षक श्रीमती आशालता खापरे यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक बनुन सदर बातमीची खात्री करुन द हेवन हॉटेल येथे अचानक छापा टाकुन आरोपी आदित्य अनिलकुमार सिंह, वय ३१ वर्षे, रा. साईबाबा मंदिर, जर्मन बेकरी जवळ, कोरेगाव पार्क, पुणे. यास पकडून त्याने वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या ०१ पिडीत विदेशी महिला व ०२ परराज्यातील महिलांची सुटका करण्यात आली. सदर प्रकरणी वरील दोन्हीं आरोपींविरुध्द दि.२१/११/२०२५ रोजी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन गु.र.नं. १३३/२०२५, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३,४,५, व भा. न्या. सं. कलम १४३, ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. ३, शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती आशालता खापरे, पोलीस उप-निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार, दत्ताराम जाधव, बबनराव केदार, तुषार भिवरकर, ईश्वर आंधळे, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, वैशाली खेडेकर, रेश्मा कंक, वैशाली इंगळे, भुजबळ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.
पुणे : परिमंडळ ५ मधील ९ पोलीस ठाण्याच्या परिसरातून हरविलेले १७१ मोबाईल परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाले असून हडपसर येथील मांजरी रोडवरी नेताजी मंगल कार्यालया आयोजित एका कार्यक्रमात पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते हे मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले. मोबाईल ही केवळ एक वस्तू नसून तिच्याशी आमच्या भावना जोडल्या होत्या, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामधील ९ पोलीस ठाण्याकडील सेंट्रल इक्विपमेंट आयटेंटीटी रजिस्टर या पोर्टलवरुन प्राप्त तक्रारीमधील तसेच पुणे शहर पोलीस वेबसाईट वरील लॉस्ट अँड फाऊंड या पोर्टलवरील तक्रारींमधील १७१ हरविलेले मोबाईल हस्तगत करण्यात आले होते.पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सीईआयआर प्रणाली कशी कार्य करते. हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांकडून वापर केल्या जाणार्या तांत्रिक पद्धतीचा वापर याबाबत सर्वसमावेशक माहिती दिली. डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले की, ‘‘मोबाईल आजच्या युगात आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. मोबाईल हरवला की व्यक्ती अस्वस्थ होतो, अशा वेळी पोलिसांवर ठेवलेला विश्वास आम्ही योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतो. नागरिकांच्या सुरक्षेसाठी, विश्वासाठी आणि सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. ’’
यावेळी मोबाईल मिळालेल्या नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मोबाईलच्या किंमतीपेक्षा आमच्या भावना अनमाल आहेत. आमच्या आठवणी याच्याशी निगडीत आहेत. मोबाईल हे आम्हाला आमच्या जवळचया व्यक्तींकडून भेट म्हणून आलेले आहेत. आमच्या महत्वाचा डेटा आमच्या मोबाईलमध्ये होता. हरविलेला मोबाईल परत मिळेल, म्हणून आम्हाला अपेक्षा नव्हती. परंतु, पोलिसांनी आमचे हरविलेले मोबाईल परत मिळविण्यामुळे आमचा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास वाढला आहे, अशा भावना व्यक्त करुन पोलिसांचे आभार व्यक्त केले.
हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी प्रास्ताविक केले. फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शंभुराज जाधव यांनी सुत्रसंचालन केले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख, पोलीस अंमलदार संदीप राठोड, समीर पांडुळे, बापू लोणकर, माधुरी डोके, सोनाली कुंभार, विक्रम भोर, प्रकाश सावंत, सुनिल आव्हाड, स्वप्नील भुजबळ, तुकाराम झुंजार, अमोल दणके, महावीर लोंढे यांच्या पथकाने केली आहे़