Home Blog Page 394

गडांचा राजा : राजगड

सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीतील पहिला भक्कम पाया या गडाने घातला. तब्बल पंचवीस वर्षे स्वराज्याची राजधानी म्हणून राजगडाने अनेक ऐतिहासिक घटना, शौर्यगाथा, राजकीय निर्णय आणि युद्धांचा साक्षीदार होण्याचा मान मिळवला. मराठ्यांच्या पराक्रमाला व स्वराज्याच्या कर्तृत्वाला दिशा देणारा हा गड, केवळ एक किल्ला नसून स्वराज्याच्या आत्म्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे.

राजगड किल्ल्यावर पोहोचण्याचा प्रवास रोमांचकारी आहे. दाट जंगलातून जाणाऱ्या पायवाटा, खडतर चढण आणि सह्याद्रीच्या निसर्गसौंदर्याचा आनंद यामुळे हा प्रवास अविस्मरणीय ठरतो. गडावर पोहोचल्यानंतर दिसणारे विस्तीर्ण पर्वत आणि खोल दऱ्यांचे विहंगम दृश्य थकवा दूर करून मन भारावून टाकते. इतिहास, साहस आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम राजगडावर अनुभवता येतो. हा किल्ला केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे दार आहे. इथली शांतता, प्राचीन वास्तू आणि डोंगरमाथ्यावर वाहणारा गार वारा प्रत्येकाला पुन्हा-पुन्हा येथे येण्यासाठी प्रेरित करतो.

प्राचीन इतिहास

आजचा राजगड किल्ला मुळात “मुरुंबदेव” या नावाने ओळखला जात होता. विविध राजवटींच्या अखत्यारीत असताना या ठिकाणी फक्त बालेकिल्ल्याचा भाग अस्तित्वात होता. परंतु इ.स. १६४३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेताच त्याचे पुनर्निर्माण सुरू झाले. तेव्हाच या गडाला “राजगड” म्हणजेच गडांचा राजा हे साजेसे नाव लाभले आणि स्वराज्याची राजधानी म्हणून तो घोषित करण्यात आला.

या गडावर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. इथेच शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांचा जन्म झाला. त्यांची पत्नी सईबाई यांचे याच ठिकाणी दुःखद निधन झाले. १६६४ मध्ये सूरत लुटल्यानंतर मिळालेल्या संपत्तीचे संरक्षण याच गडावर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक महत्त्वाच्या लढायांची रणनीती राजगडावर आखली. भक्कम तटबंदी, मजबूत बुरुज आणि चतुराईने बांधलेल्या रचना यामुळे हा किल्ला अभेद्य बनला. मुघल आणि आदिलशाही सैन्याने कित्येक वेळा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला.

आजही राजगड हा इतिहास, साहस आणि निसर्ग सौंदर्याचा संगम आहे. पर्यटनासाठी हा किल्ला एक उत्तम ठिकाण आहे. किल्ल्यावरील सुवेळा माची, संजीवनी माची आणि बालेकिल्ला ही विशेष आकर्षणाची ठिकाणे. राजगडावरून दिसणारे सह्याद्रीचे डोंगर आणि धुके भरलेले निसर्गदृश्य मन मोहून टाकतात. इतिहासप्रेमी, साहसिक पर्यटक आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी राजगड एक अनोखा अनुभव देणारे ठिकाण आहे.

नैसर्गिक रचना आणि संरक्षण व्यवस्था

राजगड किल्ला मध्ययुगीन स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना आहे. सुमारे ४० किलोमीटर परिघ असलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची १३७६ मीटर आहे. भक्कम तटबंदी आणि सुयोग्य रचना यामुळे हा किल्ला संरक्षण आणि प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला.

या किल्ल्याचा मध्यभाग पद्मावती माची म्हणून ओळखला जातो. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान होते. पद्मावती देवीचे मंदिर, पद्मावती तलाव आणि राजवाड्याचे अवशेष येथे पाहायला मिळतात. ही माची केवळ निवासासाठीच नव्हे, तर सैन्याच्या हालचालींसाठीही अत्यंत महत्त्वाची होती.

किल्ल्याच्या पश्चिमेला संजीवनी माची आहे. येथे तीन स्तरांमध्ये बांधलेली तटबंदी आजही मराठ्यांच्या लढाऊ कौशल्याची साक्ष देते. शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी ही संरचना अत्यंत उपयुक्त ठरली. पूर्व बाजूला सुवेळा माची आहे. येथून दिसणारे निसर्गसौंदर्य विलोभनीय आहे. याच ठिकाणी “नेढे” नावाची मोठी नैसर्गिक दगडी कमान आहे. हा भूशास्त्रीय चमत्कार किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालतो. बालेकिल्ल्यावरून सह्याद्री पर्वतरांगेचे अप्रतिम दृश्य दिसते. पूर्वी येथे राजवाडा होता आणि याच ठिकाणी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असत.

राजगडाची भौगोलिक व लष्करी रचना अतिशय अद्वितीय आहे. किल्ला डोंगरांच्या उंचसखल उतारांवर बांधलेला असल्याने तो जिंकणे जवळजवळ अशक्य होते. एका सरळसरळ तटबंदीवर अवलंबून न राहता तीन प्रमुख माच्या – पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा या गडाला त्रिसूत्री स्वरूपात जोडलेल्या आहेत. या प्रत्येक माचीचा आपापला वेगळा उपयोग होता :

•पद्मावती माची – गडाचे हृदय मानली जाणारी ही माची प्रशासनिक व निवासी केंद्र होती. येथे राजसदर, पद्मावती देवीचे मंदिर, महाराजांचे निवासस्थान, राणीवसा तसेच मंत्र्यांचे निवासस्थान यांचा समावेश होता. मोठमोठ्या पाण्याच्या टाक्यांमुळे या माचीवर वर्षभर पाणी उपलब्ध असे.

•संजीवनी माची – पश्चिमेकडे पसरलेली ही माची मजबूत तटबंदी, अर्धगोलाकार बुरुज आणि पहारेकऱ्यांसाठी सोयीस्कर स्थानांनी युक्त होती. संरक्षण आणि आक्रमण अशा दोन्ही दृष्टींनी ती अत्यंत महत्त्वाची मानली जात असे.

•सुवेळा माची – पूर्वेकडे असलेली ही माची अरुंद व उग्र कड्यांवर पसरलेली आहे. येथे पाण्याची टाकी, पहारेकऱ्यांची ठाणी आणि गुप्त, अरुंद प्रवेशद्वार होते. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी हे स्थान अनन्यसाधारण उपयोगी ठरत असे.

या तिन्ही माच्या एका ठिकाणी येऊन मिळतात – तो म्हणजे बालेकिल्ला. उंच मनोरे, भक्कम भिंती आणि विस्तीर्ण परिसरावर नजर ठेवणारा हा भाग म्हणजे गडाचा सर्वोच्च आणि अंतिम संरक्षणस्तर. गडाच्या प्रवेशासाठी पाली, गुंजवणे व अळू दरवाजा हे मार्ग वापरले जात. तसेच खडकात कोरलेल्या असंख्य टाक्यांमुळे पाणी व धान्यसाठा अखंड उपलब्ध राहावा याची काळजी घेण्यात आली होती.

गडाचे वैशिष्ट्य

राजगडाच्या बांधणीत केवळ संरक्षणाचा विचार केलेला नव्हता, तर राजकारण, प्रशासन, सैनिक व्यवस्थापन आणि दीर्घकालीन टिकाऊपणा या सर्व बाबी लक्षात घेऊन गड उभारण्यात आला. वळणावळणाच्या पायवाटा, धान्यकोठारे, पहारेकऱ्यांच्या चौक्या यामुळे गड एक परिपूर्ण राजधानी ठरला.

सांस्कृतिक वारसा

आजचा राजगड हा फक्त एक पुरातन अवशेष नाही, तर जिवंत वारशाचे प्रतीक आहे. येथे होणारे उत्सव गडाच्या ऐतिहासिक महत्त्वाची आठवण करून देतात. दिवाळीच्या वेळी होणारा दीपोत्सव संपूर्ण गडाला दिव्यांच्या उजेडात न्हाऊ घालतो. शिवजयंतीच्या दिवशी तर हजारो लोक गडावर जमतात. पारंपरिक वाद्ये, भाषणे, शिवचरित्रावर आधारित नाटिका यामुळे गड पुन्हा एकदा इतिहासाच्या सोनेरी क्षणात जगू लागतो.

जागतिक ओळख

इतिहास, वास्तुकला, युद्धतंत्र आणि सांस्कृतिक महत्त्व यांचा अनोखा संगम असलेला राजगड आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या मालिकेत समाविष्ट होऊन भारताचे आणि मराठ्यांचे वैभव जगभर पोचवत आहे. राजगड किल्ला केवळ ऐतिहासिक वारसा नाही, तर तो एक साहस, एक प्रवास आणि मराठ्यांच्या अदम्य शौर्याला वाहिलेली आदरांजली आहे. येथील प्रत्येक दगड भूतकाळाच्या कथा सांगतो. इतिहासप्रेमींना येथे मराठ्यांच्या विजयगाथांचा अनुभव येतो. ट्रेकिंगच्या चाहत्यांसाठी हा किल्ला एक रोमांचक आहे. निसर्गप्रेमींना येथे सह्याद्रीच्या भव्य सौंदर्याचे दर्शन होते. येथील शांतता आणि वारा मनाला ताजेतवाने करतो.

राजगड महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि पराक्रमाचे साक्षीदार असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. येथे आल्यावर प्रत्येक क्षण संस्मरणीय वाटतो. एकदा का तुम्ही येथे पोहोचलात, तर हा प्रवास केवळ एक ट्रेक राहणार नाही, तर तो एक ऐतिहासिक अनुभव बनून हृदयात कोरला जाईल. राजगड तुमची वाट पाहतो आहे, चला निघा “गडांच्या राजाला” भेट द्यायला!

संजय डी.ओरके
विभागीय संपर्क अधिकारी,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
मंत्रालय, मुंबई

पुणे जिल्ह्यातील 99 गाव आदिवासी बहुल ; 17420 कुटुंब पात्र लाभार्थी

पुणे, दि. ३ : आदिवासी समाजासाठी तळागाळातील नेतृत्व घडविण्यासाठी केंद्र शासनाच्या जनजातीय कार्य मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या “आदी कर्मयोगी अभियान” अंतर्गत पुणे जिल्ह्यात आज जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. त्यात शासकीय अधिकारी आदिकर्म योगी असतील तर युवक नेतृत्व, शिक्षक, डॉक्टर्स आणि समाज सेवक हे आदि सहयोगी असतील. आदि साथी म्हणून आदिवासी नेते, स्वयं सेवक, बचत गटातील महिला कार्य करतील असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर, आंबेगाव खेड, मावळ, हवेली आणि पुरंदर या तालुक्यातील 99 गावे आदिवासी बहुल असून यातील कुटुंब संख्या 17,420 एवढी आहे तर हीं लोकसंख्या 85 हजार 304 एवढी आहे. यासाठी आदिवासी नागरिकांमध्ये 17 विभागाच्या योजना पोहचविण्यासाठी प्रत्येक गटा मध्ये 30 प्रशिक्षणार्थी तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यात मुख्य प्रशिक्षक म्हणून एकूण 9 अधिकारी असणार आहेत. त्यात प्रामुख्याने जिल्हा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी व सोनु कोतवाल, मोमीन अस्मा बेगम या दोन प्रशिक्षकांनी माहिती दिली.
या अभियानाचे मूलभूत मूल्ये सेवा, संकल्प आणि समर्पण ही असून देशभरात २० लाख “आदी कर्मयोगी” घडविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून १० लाख आदिवासी गावे, ५५० पेक्षा अधिक जिल्हे तसेच ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहोच साधली जाणार आहे. एकूण १०.५ कोटी आदिवासी नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवणे हा अभियानाचा उद्देश आहे.
अभियानात “आदी कर्मयोगी” म्हणजे शासकीय अधिकारी, “आदी सहयोगी” म्हणजे शिक्षक, डॉक्टर व व्यावसायिक मार्गदर्शक तर “आदी साथी” म्हणजे स्थानिक स्वयंसेवक, महिला बचतगट सदस्य आणि आदिवासी नेते अशी तीन स्तरांवरील कार्यकर्त्यांची संरचना करण्यात आली आहे.
या अभियानात शासन व आदिवासी समाजातील विश्वास दृढ करणे, सहभागी नियोजनाद्वारे सर्वसमावेशक विकास घडविणे तसेच दुर्गम भागांमध्ये शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचविणे या बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे. यासाठी शासनाच्या विविध राष्ट्रीय मोहीम व योजनांशी अभियानाचे एकत्रिकरण केले जाणार असून ग्रामदृष्टिकोन २०३० कृती आराखडे तयार केले जातील.
पुणे जिल्ह्यातील घोडेगाव, आंबेगाव, खेड, मावळ, हवेली व पुरंदर तालुक्यातील ९९ गावे या अभियानात निवडण्यात आली आहेत. एकूण १७,४२० कुटुंबे व सुमारे ८५ हजार लोकसंख्या या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सहभागी होणार आहे.

जिल्हास्तरीय उन्मुखीकरण कार्यशाळेनंतर ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान जिल्हा प्रक्रिया प्रयोगशाळा, १५ सप्टेंबरपासून तालुका कार्यशाळा आणि १८ सप्टेंबरपासून गावपातळीवरील कृती आराखडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. विशेष ग्रामसभेद्वारे २ ऑक्टोबर रोजी गाव कृती आराखड्यांना अंतिम मान्यता दिली जाईल.

या अभियानासाठी पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, उपवनसंरक्षक, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग तसेच ग्रामीण पाणीपुरवठा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी “जिल्हा मास्टर ट्रेनर” म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने ११५ उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस

पुणे, दि. ३ सप्टेंबर :
राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मेळाव्यात अनुकंपा उमेदवारांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली.

या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील ४४ विभागांतील एकूण १२६ रिक्त पदांवर नियुक्तीसाठी प्रतिक्षा यादीतील १६५ उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यापैकी ११५ उमेदवारांचा पसंतीक्रम घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने संबंधित विभागांकडे नियुक्तीकरिता शिफारस करण्यात आली आहे. सर्व विभागीय स्तरावर कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून या उमेदवारांना १५ सप्टेंबरपर्यंत नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.

या माध्यमातून जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असून कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे.

मेळाव्यात तहसीलदार उमाकांत कडनोर, विविध विभागांचे प्रतिनिधी, तसेच अनुकंपा तत्त्वावरील उमेदवार उपस्थित होते. यावेळी उमेदवारांना शासन निर्णय आणि अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि ग्रंथमित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. ३ : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यरत ग्रंथालय संचालनालयामार्फत सन २०२४-२५ या वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार, डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्काराकरिता ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, नागरिकांना उत्कृष्ट ग्रंथालयीन सेवा मिळावी आणि वाचनसंस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. शहरी व ग्रामीण विभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ व ‘ड’ वर्गातील उत्कृष्ट ग्रंथालयांना अनुक्रमे १ लाख, ७५ हजार, ५० हजार व २५ हजार रुपये इतकी रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात येतो. त्याचबरोबर राज्यातील एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपये तर प्रत्येक महसुली विभागातून निवडलेल्या उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथभेट दिली जाईल.
इच्छुक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह विहीत मुदतीत तीन प्रतींमध्ये आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची गुणयादी पुन:श्च प्रसिद्ध

पुणे, दि. ३: ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २०२५’ च्या निकालाची गुणयादी व गुणपत्रक उमेदवारांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in/ या संकेतस्थळावर पुन:श्च उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांपैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेचा निकाल १८ ऑगस्ट २०२५ रोजी तर राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी. एल. एड. परीक्षेतील ६ हजार ३२० उमेदवारांपैकी २ हजार ७८९ उमेदवारांचा निकाल २८ ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.
0000

रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकरीता उपाययोजना करा – अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर

▪️ जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न

पुणे, दि. ३ :
जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व संबंधित विभागाने प्रयत्न करावेत. अपघातग्रस्त भागांचा (ब्लॅकस्पॉट) सविस्तर अभ्यास करून योग्य उपाययोजना राबविण्यावर भर द्यावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, अनुराधा भंडारे, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पिंपरी-चिंचवडचे संदेश चव्हाण, बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील अपघातांचा आढावा देताना श्री. बाविस्कर यांनी सांगितले की, वार्षिक ९०० पेक्षा अधिक मृत्यू होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे जास्त अपघाती भागांचा सर्वेक्षण करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी २३ जून २०२५ रोजीच्या बैठकीत दिलेल्या सुचनेनुसार प्रादेशिक परिवहन विभागाने ब्लॅकस्पॉटचे सर्वेक्षण करुन उपाययोजना सुचविल्या असून त्यानुसार संबंधित विभागांनी कार्यवाही करावी. हिंजेवाडी आणि चाकण परिसरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस व परिवहन विभागाने विशेष उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले.

वाहनधारकांना वाहन खरेदीवेळी हेल्मेट उपलब्ध करून देण्यासाठी वाहन विक्रेत्यांसोबत बैठक घेऊन त्यांना सूचना द्याव्यात, असेही निर्देश श्री. बाविस्कर यांनी दिले. रस्ते सुरक्षा सुधारणा आणि अपघातांची नोंद करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने तयार केलेल्या एकात्मिक रस्ते अपघात डेटाबेस (आयआरएडी) मध्ये वस्तुनिष्ठ माहिती भरावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात येत्या जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

बैठकीत श्रीमती अर्चना गायकवाड, श्री. संदेश चव्हाण व श्री. सुरेंद्र निकम यांनी ब्लॅकस्पॉट सर्वेक्षण व उपाययोजनांची माहिती दिली. तर श्री. संजय कदम यांनी महामार्गावरील उपाययोजनांचा आढावा सादर केला. सेव्ह लाईफ फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी बारामती शहरात २७ जुलै रोजी झालेल्या अपघाताचे निरीक्षण व त्याअनुषंगाने आवश्यक उपाययोजना यावर सादरीकरण केले.
या बैठकीत एनएचआयटी संस्थेच्यावतीने रस्ते सुरक्षा नियमांबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले साहित्य व प्रसिद्धीपत्रकाबाबत माहिती दिली.

राज्य शासनाचा पुढाकार: कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून निर्माण होतोय रोजगार

देशासह राज्यात वाढती बाजारपेठ, कमी किंमतीत उत्पादनाचे ठिकाण आणि कुशल मनुष्यबळाचे स्रोत लक्षात घेता देशात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे स्थानिक, राष्ट्रीय, जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. या संधींच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेत शाश्वत वृद्धी आणि विकास होण्यासाठी प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ असणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर विविध उद्योग व इतर क्षेत्रांतील रोजगाराच्या संधींचा तरुण वयोगटातील उमेदवारांना लाभ घेता यावा, अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानानुरुप कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे उत्पादनक्षम बनविण्याच्यादृष्टीने “कौशल्य विकास” कार्यक्रमास राष्ट्रीय प्राधान्य देवून राष्ट्रीयस्तरावर कौशल्य विकास कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘स्किल इंडिया’ संकल्पनेनुसार राज्य शासनाने “कुशल महाराष्ट्र रोजगारयुक्त महाराष्ट्र” हे ध्येय समोर ठेवले आहे. यामाध्यमातून बेरोजगारांना रोजगारक्षम करणे, उद्योगांना प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे या उद्देशाने बेरोजगार युवक-युवतींना, कामगार वर्गाला उद्योगधंद्यात लागणारी कौशल्य विकसित करण्याकरिता कौशल्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील युवक-युवतींच्या अंगी असलेल्या कौशल्याचा विकास आणि त्यामाध्यमातून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात येत आहे. कुशल मनुष्यबळ असलेल्या क्षेत्रांमध्ये लागणारे मनुष्यबळ उपलब्धीकरिता बेरोजगार युवक-युवतींकरिता जिल्ह्यातील प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता राज्यातील १५ ते ४५ वयोगटातील उमेदवारांची राज्य शासनाच्या प्रशिक्षण संस्थेच्यावतीने अभ्यासक्रमनिहाय निवड करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने समाजातील अनुसूचित जाती-जमाती, महिला, दिव्यांग, अल्पसंख्यांक आदी घटकांच्या सहभागावर विशेष भर देण्यात येत आहे. या प्रशिक्षण संस्थेद्वारे उमेदवारांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येते. प्रशिक्षणाअंती उमेदवारांना विविध खाजगी आस्थापनांमध्ये ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ची सुविधा प्रशिक्षण संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात येते.

कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्याउद्देशाने जिल्ह्यातील महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील एकूण ५० महाविद्यालये यामध्ये सहभागी असून त्यापैकी १३ महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत या महाविद्यालयात ७५८ उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत, ३० उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे तसेच प्रशिक्षण कालावधीत एकूण २४ उमेदवारांनी आंतरवासिता पूर्ण केली आहे.

ग्रामीण भागातील युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करण्याकरिता प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ३० प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे कामकाज करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ८७६ उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत तर ९६७ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

युवकांनो, राज्य शासनाच्यावतीने रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने कौशल्य विकासाअंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, किमान कौशल्य विकास कार्यक्रम, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आदी कौशल्य विकास योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाच्या धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. सोबतच पंडित दीनदयाळ उपाध्याय मेळाव्याचे आयोजनाच्यामाध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगारासाठी सहाय्य करण्यात येत आहे. या संधीचा लाभ घेण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे तसेच कार्यालयाच्या ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा punerojgar@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा.

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र :

  • सुरेश वराडे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास
    ‘कुशल महाराष्ट्र, रोजगार युक्त महाराष्ट्र” या राज्य शासनाच्या ध्येयानुसार तसेच सद्यस्थितीत कुशलतेला प्राप्त झालेल्या महत्त्वानुसार, जिल्ह्यातील रोजगार शोधक युवक-युवतींना याद्वारे आवाहन करण्यात येते की, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विषयक विविध योजना अंतर्गत कौशल्य प्रशिक्षण घेऊन आपली रोजगार क्षमता वाढवावी.’

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहात प्रवेश सुरु

पुणे, दि. ३: राज्य शासनाच्या इतर मागास, बहुजन कल्याण विभागामार्फत सुरु असलेल्या योजनेंतर्गत इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी १८ सप्टेंबर २०२५ पर्यंत https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक खुशाल गायकवाड यांनी केले आहे.

पुणे विभागांतर्गत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता १२ वी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थ्यांनी योजनानिहाय वेळापत्रकानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. गायकवाड यांनी केले आहे.

गणेश कला क्रीडा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा

▪️ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उदघाटन

पुणे, : पंचायत राज संस्थांना सक्षम, गतिमान व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन ४ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश कला क्रिडा, पुणे येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार करणार असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा “सर्वांना सोबत घेवून चला” या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या ध्येयावर आधारित उपक्रम असून त्याचे प्रमुख घटक सुशासनयुक्त पंचायत निर्माण करणे, पंचायत संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, जलसमृद्ध व हरित गावांची निर्मिती, मनरेगा व इतर योजनांचा अभिसरण, ग्रामपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण, उपजीविका व सामाजिक न्याय सुनिश्चित करणे तसेच लोकसहभागातून लोकचळवळ निर्माण करणे असे आहेत.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हा परिषदेमार्फत सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच तालुका व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी यांना कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम पंचायत राज संस्थांच्या सामर्थ्यवर्धनासाठी, विविध योजनांचा समन्वय व अंमलबजावणीसाठी तसेच स्थानिक लोकांच्या सक्रिय सहभागासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून यामुळे ग्रामीण भागातील विकासाला नवे बळ मिळेल.

अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

0

  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: (३ सप्टेंबर) राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याची धोरण सन्माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व श्री. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने घेतले होते. त्यानुसार २१ ऑगस्ट पासून अटल सेतू सह मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग तसेच समृद्धी महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्यात येत असल्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन कर अधिनियम १९५८ अंतर्गत निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना वाहनांना ठराविक मार्गांवरून प्रवास करताना टोल नाक्यांवरून सूट देण्यात आली आहे.

शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, खालीलप्रमाणे इलेक्ट्रिक चारचाकी व बस वाहनांना टोल करातून सूट दिली आहे .

इलेक्ट्रिक चारचाकी वाहने (M2, M3, M6 श्रेणीतील)

इलेक्ट्रिक बसेस -राज्य परिवहन उपक्रम ( STU ) तसेच खासगी इलेक्ट्रिक बसेस (M3, M6) प्रकारातील

वरील वाहनांना राज्यातील ठराविक महामार्ग व मार्गावरील टोल नाक्यांवरून टोल कर भरण्यापासून सूट राहील.

ही सूट २२ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्री पासून लागू झाली आहे. शासनाचा हा निर्णय राज्यातील पर्यावरणपूरक वाहतूक व स्वच्छ ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

विसर्जन मिरवणूक : कोणता गणपती किती वाजता कुठे ? पोलिसांचे सर्वसमावेशक नियोजन जाहीर

मानाचा पहिला गणपती सव्वादहा वाजता तर पाचवा १२ वाजता बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावर असेल

दगडूशेठ ४ वाजता लक्ष्मी रस्त्यावर,पाठोपाठ, साडेपाच वाजता जिलब्या मारुती ,बाबू गेनू ,भाऊ रंगारी आणि मंडई गणपती देखील लक्ष्मी रस्त्यावर येतील – पोलिसांचे नियोजन

पुणे-यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे नियोजन पुणे पोलिसांनी केले असून त्यानुसार विसर्जन मिरवणुकीत ४ वाजता दगडूशेठ बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावर येईल , पाठोपाठ साडेपाच वाजता जिलब्या मारुती ,बाबू गेनू , भाऊ रंगारी आणि मंडई गणपती देखील लक्ष्मी रस्त्यावर येतील…अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी येथे दिली. प्रत्येक मंडळापुढे २ ढोल ताशा पथकांना परवानगी असेल असेही ते म्हणाले.

गणेश विसर्जन मिरवणुक वेळेचे नियोजन व कार्यपद्धती/मार्गदर्शक तत्वे.

अ) वेळेचे नियोजन-

१) मानाचा पहिल्या गणपतीचे टिळक पुतळा, मंडई या ठिकाणी सकाळी ०९/१५ वा. आगमन होईल.

२) मानाचा पहिला गणपती, कसबा गणपती मंडळाची पुजा इ संपवुन मिरवणुक सकाळी ०९/३० वा. टिळक पुतळा, मंडई येथून सुरुवात होवुन ०९/३० वा. बेलबाग चौक याठिकाणी पोहचेल व १०/१५ वा. मिरवणुक बेलबाग चौक येथुन लक्ष्मी रोड वर मार्गस्थ होईल.

३) मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, बेलवाग चौक येथून मानाचा पहिला गणपतीचे मागे मुख्य मिरवणुकीमध्ये सामील होईल, व बेलबाग चौक येथुन १०.३० वा लक्ष्मी रोड वर मार्गस्थ होईल.

४) मानाचा तिसरा गुरुजी तालिम गणपती, बेलबाग चौक याठिकाणी १० मिनिटे गुलाल उधळूण व १५ मिनिटे आरती करुन मुख्य मिरवणुकीच्या रांगेमध्ये सामील होईल, व बेलबाग चौक येथुन ११.०० वा लक्ष्मी रोड वर मार्गस्थ होईल.

५) मानाचा चौथा तुळशीबाग गणपती व मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती, व सर्व मानाचे गणपती हे १२.०० वा. पर्यंत बेलबाग चौक येथुन लक्ष्मी रोडवर मार्गस्थ होतील. त्यानंतर ६ व्या क्रमांकावर महानगर पालिका गणपती मंडळ व ७ व्या क्रमांकावर त्वेष्ठा कासार गणपती मंडळ हे १३/०० वा. पर्यंत बेलबाग चौकाचे पुढे जावून मुख्य मिरवणुकीमध्ये सामील होतील.

६) त्यानंतर सिटी पोस्ट ऑफिसकडून लक्ष्मीरोडने व श्री दत्तमंदिराकडून शिवाजीरोडने येणारी मंडळे बेलबाग चौक याठिकाणाहून १५/४५ वा. पर्यंत रांगेमध्ये लागलेल्या क्रमानुसार मुख्य मिरवणुकीत सामील होण्याकरीता सोडण्यात येतील.

७) श्रीमंत दगडुशेठ गणपतीची मिरवणुक १६/०० वा. बेलबाग चौकामध्ये आगमन होवुन तेथून मुख्य मिरवणुकीमध्ये सामील होईल.

८) श्रीमंत दगडुशेठ गणपती मंडळ मिरवणुकीचे मागे लक्ष्मीरोड व शिवाजी रोड वरील रांगेत लागलेली गणपती मंडळे बेलबाग चौकामधून नियमित मुख्य मिरवणुकीत १७.३० वा. पर्यंत सामील होतील.

९) १७.३० वाजेनंतर जिलब्या मारुती गणपती, हुतात्मा बावु गेनु मंडळ, श्रीमंत भाउसाहेब रंगारी गणपती, अखिल मंडई गणपती मंडळ मिरवणुकीमध्ये सामील होतील व हे चारही मंडळे १९.०० वाजेपर्यंत बेलबाग चौक सोडतील.

१०) विद्युत रोषणाई असलेली गणपती मंडळे यांचेसाठी मिरवणुक १९/०० वा. नंतर चालु राहील.

११) लक्ष्मीरोड वरील गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये सिटी पोस्ट ऑफिसकडून लक्ष्मीरोडने व श्री दत्तमंदिरकडून शिवाजीरोडने येणारी मंडळे ही बेलबाग चौकामधूनच मुख्य मिरवणुकीत सामील होतील. इतर कोणत्याही मार्गाने लक्ष्मीरोड वरील मुख्य मिरवणुकीमध्ये सामील होणार नाही.

१२) कसबा गणपती हा अलका टॉकीज चौक येथुन पास होईपर्यंत दुस-या कोणत्याच मार्गावरील गणपती मंडळ हे अलका टॉकीज चौक येथे येणार नाही.

ब) सर्वसाधारण सूचना-

१) मुख्य मिरवणुकी दरम्यान दोन मंडळामध्ये अंतर राहणार नाही. तसेच कोणतेही मंडळ रांग सोडून मिरवणुकीमध्ये घुसणार नाही.

२) प्रत्येक मंडळाने आपले गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त ०२ ढोल ताशा पथक नेमावेत. एका पथकामध्ये वादक सदस्य व मदतीकरीता सहायक असे एकुण-६० सदस्य राहतील.

३) तसेच अलका टॉकीज चौक येथे गणपती विसर्जन मिरवणुक संपल्यानंतर ढोल ताशा पथकामधील सदस्य हे आपले वादनाचे साहित्य घेऊन मिरवणुकाच्या विरुध्द दिशेने येणार नाहीत.

४) मानाचे गणपती मिरवणुकीमध्ये टिळक पुतळा, मंडई ते बेलबाग चौक दरम्यान कोणतेही ढोलताशा पथक वाद्य वाजविणार नाहीत. बेलबाग चौकापासून ढोलताशा पथके मिरवणुकीमध्ये सामील होवुन वाद्य वाजवतील.

५) गणपती मंडळाच्या मिरवणुकीमध्ये मंडळासोबत डीजे अथवा ढोल ताशा पथक पैकी एकाचीच परवानगी राहील.

६) बेलबाग चौक येथे परिशिष्ट १,२ व ३ मध्ये असलेली मडंळे सोडुन जे मंडळ प्रथम येईल त्या मंडळास मिरवणुकीमध्ये सामील होण्यास प्राधान्य देण्यात येईल.

७) कोणतेही मंडळाचे ढोल ताशा पथक हे स्थीर वादन करणार नाही.

८) टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोडवर, कोणतेही मंडळ आपली मिरवणुक १०.३० च्या पूर्वी सुरु करणार नाही.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्यावतीने कौशल्य स्पर्धेचे आयोजन

0

पुणे, दि. २:: शांघाई येथे सन २०२६ मध्ये आयोजित होणा-या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ६३ क्षेत्रांशी संबंधित कौशल्य स्पर्धा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल, विविध औदयोगिक आस्थापना यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य तसेच देश पातळीवर करुन निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष आहे. ॲडीटिव्ह मॅन्युफॅक्चरींग, क्लाऊड कंप्युटिंग, सायबर सुरक्षा, डिजीटल कंस्ट्रक्शन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नोलॉजी, मेकॉट्रॉनिक्स, रोबोट सिस्टम इंटिग्रेशन, वॉटर टेक्नोलॉजी, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, इंडस्ट्री ४.० , ऑप्टोइलेक्ट्रानिक टेक्नोलॉजी, डेंटल, प्रोथेस्टिक्स आणि एअरक्राफ्ट मेंटेनंस या क्षेत्राकरिता उमेदवारांचा जन्म १ जानेवारी २००१ किंवा त्यांनतरचा असणे आवश्यक आहे. इतर 50 क्षेत्राकरिता उमेदवारांचा जन्म १ जानेवारी २००४ किंवा त्यांनतरचा असणे आवश्यक आहे.

सर्व शासकीय आणि खाजगी औदयोगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई, दूल रुम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविदयालये, तंत्रनिकेतन महाविदयालये, आयएचएम/हॉस्पिटॅलिटी इन्स्टिट्यूट्स, कॉर्परिट टेक्निकल इन्स्टिट्यूट, स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य कौशल्य विदयापीठ, एमएसबीवीईटी, खाजगी कौशल्य विदयापीठ, फाइन आर्टस कॉलेज, फ्लॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंग तसेच इतर सर्व महाविदयालये व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था मधील उमेदवारांना स्पर्धेकरिता नोंदणी करता येईल.

इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in/ या वेबपोर्टलला भेट देऊन ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी नाव नोंदणी करावी. जिल्हयातील सर्व संबंधित संस्थांनी पुढाकार घेऊन कौशल्य स्पर्धेबाबतची माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी असे, आवाहन सु.रा.वऱ्हाडे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा त्वरित वापर करण्यास मान्यता

0
  • परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक

मुंबई : ( दि. ०२ सप्टेंबर)
राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी. महामंडळ) ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्त्वावर वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक -खाजगी भागिदारीतुन विकसित होणाऱ्या प्रकल्पाच्या भाडेपट्टीची मुदत ही ६० वर्षावरून ९८ वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की, सरकारच्या सुधारित धोरणानुसार, एसटी कडील अतिरिक्त जमिनींचा विकास सार्वजनिक-खाजगी सहभाग (PPP) पद्धतीने करण्यात येणार असून त्यासाठीची भाडेपट्टा कालमर्यादा ४९ वर्षे + ४९ वर्षे अशी एकूण ९८ वर्षे इतकी असेल. या कालावधीत संबंधित जमिनींचा व्यापारी वापर करून मिळणाऱ्या उत्पन्नाचा / व्यापारी क्षेत्राचा ठराविक हिस्सा एसटी महामंडळाला जमा करणे बंधनकारक असेल.

तसेच, मुंबई महानगरातील एसटीच्या जागांचा विकास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी आणि महामंडळाच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी डी.सी.पी.आर.-२०३४ व यु.डी.सी.पी.आर.-२०२० नुसार व्यापारी वापरास परवानगी दिली जाणार आहे.

या निर्णयामुळे महामंडळाच्या ताब्यातील निष्क्रिय जमीन उपयुक्त वापरात आणली जाईल, नव्या प्रकल्पांना चालना मिळेल तसेच एस.टी. महामंडळाला मोठा आर्थिक फायदा होऊन प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरविण्यास मदत होईल.

प्रताप सरनाईक,परिवहन मंत्री

मनोज जरांगेनी उपोषण सोडले:हैदराबाद गॅझेटियर लागू होणार, सरकारचा GR जरांगेंनी स्वीकारला; गावाकडे निघण्याची घोषणा

0

मुंबई-मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरील उपोषण संपल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. त्यासंबंधीचे जीआरही सरकारने काढले आहे. त्यामुळे जरांगेंनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून लिंबू सरबत घेऊन आपले उपोषण सोडले. यामुळे गत शुक्रवारपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा तिढा यशस्वीपणे सुटला आहे.

आमचे सरकार सोबतचे वैर संपले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार या तिघांनी येथे येऊन आमचे उपोषण सोडवावे, असे जरांगे म्हणाले. त्यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी जरांगेंना प्रथम उपोषण सोडण्याची विनंती केली. हे तिघेही बाहेर असल्यामुळे ते येणे शक्य नसल्याचे ते म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू होता. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करत या लढ्याला वेगळे वळण दिले. या पूर्वी देखील मनोज जरांगे यांनी अनेकवेळा आंदोलन केले, मोर्चे काढले होते. मात्र, आरक्षण काही मिळत नव्हते. अखेर आता शेवटची लढाई म्हणत मनोज जरांगे यांनी 27 ऑगस्ट रोजी त्यांनी हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली.

मनोज जरांगे यांनी मुंबईची वाट धरली आणि टप्प्या-टप्प्यावर हजारोंच्या संख्येने असलेले मराठा बांधव लाखोंच्या संख्येत वाढत गेले. मुंबईमध्ये दाखल होण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी शिवसेनरीला भेट दिली. महायुती सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हालचाली तोपर्यंत वाढल्या होत्या आणि त्यानुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष बनवले आणि मंत्र्यांच्या बैठकांना सुरुवात झाली.

मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. त्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. त्यानुसार मुंबईच्या दिशेने असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी नाकारली. असा निर्णय आलेला असताना देखील मनोज जरांगे यांची मुंबईच्या दिशेने कूच सुरूच राहिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलकांसाठी मुंबईत येण्यासाठी एक रस्ता निश्चित केला. आणि अखेर 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचले. यावेळी संपूर्ण राज्यातून मराठा समाज हा मुंबईत दाखल झाला होता.

आंदोलनाला सुरुवात झाली आणि मुंबईत सगळीकडे मराठा बांधवांची गर्दी पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर मराठ्यांनी ठाण मांडला. आझाद मैदान देखील मराठा बांधवांनी भरून गेले. उपोषणाला बसल्यावर मनोज जरांगे यांनी सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले तसेच यावेळी भाषणात त्यांनी महायुती सरकारवर विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

एकतर विजयी यात्रा नाहीतर अंत्ययात्रा...मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती थोडी खालावली. तसेच मराठा आंदोलकांची मुंबईत गैरसोय होत असल्याचे त्यांना समजले व त्यांनी सायंकाळी भाषण करताना मराठा बांधवांना त्रास देऊ नका तसेच अन्न-पाण्याची सोय करण्यात यावी अशी सरकारकडे विनंती केली. त्यानंतर राज्यभरातून गावागावातून मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी जेवण पाठवण्यास सुरुवात झाली. तसेच सरकारकडून केवळ बैठकाच सुरू असल्याने मनोज जरांगे यांनी भाषणात महायुतीवर टीका केली. आता ही शेवटची लढाई आहे, आता एकत्र आपली विजयी यात्रा निघेल, नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल, असा निर्धारच मनोज जरांगे यांनी बोलून दाखवला.

मुंबई उच्च न्यायालयाने घेतली कठोर भूमिका…मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. कोर्टाने आज दुपारी या प्रकरणी झालेल्या संक्षिप्त सुनावणीत मुंबईत जे काही सुरू आहे ते पूर्णतः बेकायदा सुरू असल्याचे स्पष्ट केले. राज्य सरकारने दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वकाही सुरळीत केले नाही, तर कोर्ट या प्रकरणी अत्यंत कठोर भूमिका घेईल, असे कोर्टाने म्हटले होते.उच्च न्यायालयाने मराठा आंदोलकांनी नियम मोडल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलकांना केवळ आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी होती, मात्र त्यांनी या नियमाचे उल्लंघन केले, असे न्यायालयाने नमूद केले. तसेच तुम्ही अजूनही आझाद मैदान व आसपासचा परिसर रिक्त का करू शकला नाहीत? आंदोलकांना तिथून हटवण्यासाठी तुम्हाला जरांगे यांचीच मदत का घ्यावी लागतेय? असे प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारलाही खडेबोल सुनावले. यानंतर सुनावणी दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीत मनोज जरांगेंच्या वकिलांनी उद्याचा वेळ मागितला. यावर उच्च न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी उद्या 3 सप्टेंबर दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील मसुदा घेऊन आझाद मैदानात-मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच इकडे सरकारच्यावतीने शिष्टमंडळ मसुदा घेऊन मनोज जरांगे यांना दाखवण्यासाठी निघाले. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांची भेट घेत त्यांना मसुदा दाखवला. यावेळी मनोज जरांगे यांनी त्यांच्या वकिलांच्या टीमच्या मार्फत मसुदा वाचन केले. त्यानंतर फक्त मसुदा नको तर जीआर पाहिजे, अशी मागणी केली. त्यानुसार राधाकृष्ण विखे पाटलांनी एक तासात जीआर येणार असे आश्वासन दिले.राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सगेसोयरेच्या अध्यादेशावर 8 लाख हरकती आल्याचे जरांगे यांना सांगितले. यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जरांगेंना सातारा गॅझेट लागू करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर जरांगेंनी यासाठी सरकारला 1 महिन्याचा वेळ देण्याची तयारी दर्शवली.

हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय-मंत्री विखे पाटील यांनी यावेळी मनोज जरांगे यांना सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. जरांगे याविषयी बोलताना सांगितले, सरकारने हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे. सातारा संस्थानच्या गॅझेटियरमध्ये पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण बसतो. सातारा गॅझेटियर तथा पुणे व औंध गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याच्या मुद्यावर कायदेशीर बाबी तपासून जलदगतीने निर्णय घेण्यात येईल असे सरकारने सांगितले आहे. या प्रकरणी 2-3 मुद्यांवर कायदेशीर त्रुटी आहेत. पण सरकारने त्यावरही 15 दिवसांत योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे.

मराठा – कुणबी एकच असल्याच्या मुद्यावर सरकारला 2 महिन्यांची मुदत-मनोज जरांगे यांनी यावेळी मराठा व कुणबी एकच असल्याच्या मुद्यावर सरकारला 2 महिन्यांची मुदत देण्याची घोषणा केली. ते म्हणाले, आम्ही सरकारकडे 58 लाख नोंदींच्या आधारावर मराठा व कुणबी एकच असल्याचा जीआर काढण्याची मागणी केली होती. त्यावर सरकारने हा मुद्दा क्लिष्ट असल्यामुळे त्यावर निर्णय घेण्यासाठी महिन्याभराची मुदत मागितली होती. मी त्यांना दीड महिन्यांची मुदत दिली. पण विखे पाटलांचा हात थोड जड आहे. त्यांनी 2 महिन्यांचा वेळ मागितला. त्यानुसार आम्ही त्यांना ही मुदत दिली. या मुदतीनंतर मराठा व कुणबी एकच असल्याचा जीआर काढला जाईल.

कोथरुडकर वारकरी बांधवांसाठी श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये भवन-ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

पुणे-कोथरुड मतदारसंघातून आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हक्काची निवारा उपलब्ध झाला असून, ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून श्री क्षेत्र पंढरपूर मधील कुंभार गल्ली परिसरात वारकरी भवन उभारण्यात आले आहे.

आषाढी आणि कार्तिक महिना आला की, विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेले कोथरुड मतदारसंघातील कोथरुड, बाणेर-बालेवाडी, कर्वेनगर,सूस-म्हाळुंगे, पाषाण आदी भागांसह वारजे, वडगाव आदी भागातील हजारो वारकरी दरवर्षी श्री क्षेत्र पंढरपुरच्या दिशेने पायी जात असतात. तिथे पोहोचल्यानंतर, त्यांच्या निवाऱ्याची आणि गैरसोईची समस्या नेहमीच सतावत असे. त्यामुळे वारकरी बांधवांसाठी पश्चिम हवेली वारकरी सेवा संस्था भवन उभारण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र, काही कारणांमुळे हा संकल्प पुर्णत्वास जाण्यास अनंत अडचणी येत होत्या. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असताना, सदर विषय त्यांच्या समोर आला असता, त्यांनी तात्काळ यासाठी पुढाकार यांनी अडचणी दूर केल्या. तसेच, लोकसहभागातून निधी गोळा करुन अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त वारकरी भवन उभारले.

या भवनाचे 30 ऑगस्ट रोजी लोकार्पण झाले. त्यावेळी बोलताना, ना. पाटील म्हणाले की, वारकरी बांधवांची सेवा म्हणजेच विठूरायाची सेवा आणि आज या पुण्यकार्याचा भाग होण्याचे भाग्य मला लाभले. आणि या सेवाभावी कार्यात मला खारीचा वाटा उचलण्याची संधी लाभली याचा अपार आनंद होत आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, ना. पाटील यांच्या कार्याप्रति कोथरुडमधील वारकरी बांधवांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून, या भवनामुळे आषाढी आणि कार्तिकी वारीकाळात श्री क्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची मोठी सोय झाली आहे, अशी भवना, पश्चिम हवेली वारकरी सेवा संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी व्यक्त केली.

या लोकार्पण प्रसंगी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, भाजप उपाध्यक्ष विठ्ठल आण्णा बराटे, माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, अभिजीत राऊत, गिरीश भेलके, विवेक मेथा, प्रणव परिचारक, शंकरभाऊ मोकाटे, हरिभाऊ बराटे, संतोष बराटे, संग्राम दांगट, पंढरीनाथ दांगट, विठ्ठल चौधरी, रमेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर व वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.