Home Blog Page 392

गुढीपाडव्यानिमित्त विविध रथांसह, मर्दानी खेळ व ग्रामगुढीचा समावेश करत नववर्षाचे होणार स्वागत

पुणे : गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात रविवार, दिनांक ३० मार्च रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन  करण्यात आले आहे. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी ८.३० वाजता शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात हजारो पुणेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर व सहसंयोजक अश्विन देवळणकर यांनी दिली.

लोकमान्य टिळक पुतळ्यापासून शोभायात्रेला प्रारंभ होणार असून तुळशीबाग राममंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे समारोप होणार आहे. यावेळी रा.स्व.संघाचे अधिकारी व विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विविध महिलांच्या हस्ते गुढी उभारण्यात येणार आहे.

मातृशक्ती केंद्रीत गुढी पाडवा साजरा होत असून अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंतीनिमित्त अहिल्यादेवी  होळकर रथ , भजनी मंडळ, पर्यावरणचे भान राखून प्रबोधन पर पाणी ह्या विषयावर रथ, छत्रपती शिवाजी महाराज रथ, तसेच वंदे मातरम ह्या काव्याला १५० वर्ष पूर्ण झाली आहेत, त्या बद्दल माहितीचा रथ, प्रभू श्रीराम रथ, छत्रपती शिवाजी महाराज रथ, ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, मर्दानी खेळ, वेत्रचर्म पथक देखील सहभागी होणार आहेत. सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे तसेच मराठी अभिजात भाषा रथ यांसह अनेक विशेष रथ देखील शोभायात्रेत सहभागी होणार आहेत.

याशिवाय विविध भजनी मंडळे, अध्यात्मिक समूह, सनातन धर्माभिमानी मंडळी, प्रभू राम-लक्ष्मण-सीता हनुमान यांच्या मूर्ती, पारंपरिक वेषभूषा आणि ऐतिहासिक, अध्यात्मिक, स्वातंत्र्यलढ्यातील थोर व्यक्ती इत्यादींचा आदर्श ठेवून केलेल्या वेशभूषेतील नागरिक मोठ्या संख्येत सहभागी होतील. पुणेकरांनी देखील भगव्या टोप्या, भगवे फेटे घालून, धर्मध्वज (भगवा) हातात घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या नूतनीकृत पुतळ्याचे अनावरण

बारामती, दि. 28: साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळावा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कारखान्याचे चेअरमन ॲड. केशवराव जगताप, माजी चेअरमन बाळासाहेब तावरे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, रणजीत तावरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सोमेश्वर सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन राजवर्धन शिंदे आदी उपस्थित होते.

जनतेला गुढीपाडवा आणि रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला रयतेचे राज्य म्हणून ओळखले जात होते. त्यांनी निर्माण केलेल्या आदर्शांचे स्मरण करून राज्यशासन काम करत आहे. महापुरुषांच्या पुतळ्यांच्या बाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे काम नेहमीच होणे गरजेचे असून माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 1984 साली उभारलेल्या या पुतळ्याचे नूतनीकरण करून घेतली आहे.

ते पुढे म्हणाले, या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकरी, उद्योग, आरोग्य, रोजगार, शिक्षण आदी बाबींना अधिकचे महत्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे. विकास कामांवर परिणाम होऊ न देता महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कृषी पंपांना वीजबील माफी, लाडकी बहीण योजनेला निधीची तरतूद आदींसाठी तरतूद केली आहे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याजाची सवलतीची सुमारे बाराशे कोटी रुपयांची रक्कम जिल्हा सहकारी बँकांना देण्यात आली असून त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्ज भरावे, असे आवाहनही त्यांनी केले. दुधाच्या अनुदानाची रक्कम दुग्ध संस्थांपर्यंत पोहोविण्यात येत असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

यावर्षी ऊस पीकासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचे (एआय) आधुनिक तंत्रज्ञान बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने आणले असून त्याचा ऊस उत्पादनवाढीसाठी तसेच पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी मोठा फायदा होणार आहे. हे पाहता या वर्षीच्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली असून आवश्यकतेनुसार पुढील पुरवणी मागण्यांमध्ये अधिकची तरतूद करण्यात येईल. एआय तंत्रज्ञान सोयाबीन, कापूस, केळी, फळबागा आदींसाठीही वापरण्यात येईल, असेही म्हणाले.

लवकरच पुण्यात ॲग्री हॅकेथॉन भरविण्यात येणार असून त्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, नवोद्योग (स्टार्टअप्स), कृषी तज्ज्ञ, शेतकऱ्यांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीसंबंधी समस्या सोडविण्याचा प्रयत्न खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने राज्य्‍ाशासन करणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल, खर्च कसा कमी होईल यासाठी नवकल्पक संशोधकांना चालना मिळण्यासाठी या हॅकेथॉनचा उपयोग होणार असून येत्या जूनपर्यंत अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्मार्ट शेती, हवामान अंदाज, स्वयंचलित सिंचन तंत्रज्ञान, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा योग्य वापर, कीड नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा वापर आदींवर संशोधन करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम बनविण्याचा मानस आहे.

राज्यशासन साखर कारखान्यांना आणि त्या माध्यमातून उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काम करत असून केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे मोलॅसिसवरील २८ टक्के उत्पादन व सेवा कर (जीएसटी) ५ टक्क्यावर आणला गेला आहे. राज्यशासनाच्या पाठपुराव्यामुळे कारखान्यांवर आकारण्यात आलेला सुमारे २० वर्षापासूनचा आयकर केंद्र शासनाने माफ केल्यामुळे कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारखान्यांचे इथेनॉल, सहवीज निर्मिती प्रकल्पांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

माळेगाव कारखान्याने उच्च दराची परंपरा राखल्याबद्दल अभिनंदन करुन श्री. पवार पुढे म्हणाले. कारखान्याने २०२२-२३ मध्ये प्रतीक्विंटल ३ हजार ४११ रुपये, २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी राज्यात विक्रमी ३ हजार ६३६ रुपये दर दिला आहे. माळेगाव व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अधिकचा ऊस उपलब्ध व्हावा यासाठी जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या बंद पाईपलाईनच्या कामासाठी राज्यशासनाने ४६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. कऱ्हा-नीरा उपसा सिंचन योजना उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणास निधी देण्यात आला असून त्या कामाला सुरूवात झाली आहे. कारखान्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.

साखर कारखान्यांनी कारखान्यातून निघणाऱ्या खराब रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीवेज ट्रीटमेंट प्लँट उभारावेत व ते पाणी आसपासच्या शेतीसाठी उपलब्ध करुन द्यावे, अशाही सूचना त्यांनी केल्या. साखर कारखाना कामगारांच्या वेतनवाढीच्या अनुषंगाने त्रिपक्षीय समितीला बैठकीबाबत सूचना देण्यात येतील, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात ॲड. केशवराव जगताप म्हणाले, यावर्षी ११ लाख २१ हजार मे. टन ऊस गाळप करुन ११ लाख १७ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले असून इथेनॉल तसेच सहवीज निर्मितीही चांगल्या प्रकारे केली आहे. चालू गळीत हंगामात ३ हजार १३२ रुपये दर दिला असून खोडकी आणि दिवाळीतही पुढील बिले देण्यात येतील. कारखान्याच्या सुमारे ३ हजार ५०० शेतकऱ्यांनी एकरी १०० टनाच्या वर उत्पादन घेतले आहे असे त्यांनी सांगितले.

व्हाईस चेअरमन राजेंद्र ढवाण पाटील यांनी स्वागत केले.

कार्यक्रमास कारखान्याचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विश्वासराव आटोळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन ॲड. रवींद्र माने, बारामती तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन संजय कोकरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे सभासद शेतकरी, कामगार आदी उपस्थित होते.

प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलिस कोठडी:असीम सरोदे यांचा पुरावे नष्ट केल्याचा आरोप

डेटा स्वतः च डिलीट केल्याची कोरटकरची कबुली
कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रशांत कोरटकरचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. कोल्हापूर कोर्टाने त्याला आज 2 दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली. फिर्यादी पक्षाने कोरटकरने फरार असताना कुठे व कसा प्रवास केला? विशेषतः त्याने या कालावधीत कोणत्या वाहनांचा वापर केला? याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती. कोर्टाने ती मान्य केली.प्रशांत कोरटकरवर कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्यासह छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याचा आरोप आहे. त्याला 4 शेजारच्या तेलंगणातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

आजच्या सुनावणीसाठी पोलिसांनी कोल्हापूर कोर्ट परिसरात कडक बंदोबस्त लावला होता. पण त्यानंतरही अमित कुमार भोसले नामक वकिलाने प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच त्यांना धरल्याने पुढील प्रसंग टळला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकरच्या कोठडीवरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर वकील अमित भोसले कोर्टरुममध्ये आले. त्यांनी तिथेच कोरटकरवर ‘ये पश्या’ म्हणत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रसंगामुळे कोर्ट परिसरात एकच धावपळ उडाली होती.

इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे म्हणाले की, प्रशांत कोरटकर यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात आला त्यावेळी आरोपी फरार होता. तो फरार असताना मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. यात इंदोर, हैदराबाद, सिंकदराबाद अशा अनेक ठिकाणी तो फिरला आहे. इतक्या ठिकाणी फिरताना त्यांच्याकडे एक गाडी होती असे वाटत नाही, एकपेक्षा जास्त गाड्या त्यांने वापरल्या आहेत, त्यांची माहिती घ्यायची असल्याचे म्हणत पोलिसांकडून पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. प्रशांत कोरटकर खोटारडे आहेत, हे समोर आले आहे. त्याने पुरावे नष्ट केले आहेत, हे स्पष्ट होत आहे. एका सट्टा बुकीच्या तो संपर्कात आहे. त्याची माहिती समोर येणे सुद्धा आता गरजेचे आहे.सरकारी पक्षातर्फे वकील सूर्यकांत पोवार, इंद्रजीत सावंत यांच्या तर्फे अँड.असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले आहेत. तर प्रशांत कोरटकर यांच्या तर्फे सौरभ घाग हे प्रत्यक्ष वकील म्हणून उपस्थित होते.

सरकारी वकील सूर्यकांत पोवार म्हणाले की, दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य प्रशांत कोरटकर ने केले आहे. या आरोपीला कोणत्या संघटनेने किंवा व्यक्तीने मदत केली आहे का? हा तपास करावा लागणार आहे. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा हेतू आरोपीचा होता. फोन केलेला आवाज त्याचाच होता, हे सिद्ध होत आहे. त्याला समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कोण मदत करत आहे का? याचा तपास करावा लागणार आहे.

यावेळी पोलिस चौकशीत कोरटकरने काही नाव घेतली आहेत. त्यात खरंच त्यांचा सहभाग आहे का? याची चौकशी करण्याची आहे. असा गंभीर गुन्हा असताना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा, धीरज चौधरी याने मदत केल्याचे यात सांगितले जात आहे. काही हॉटेलमध्ये थांबलो होतो हे देखील कोरटकर याने सांगितले आहे. यावेळी कोणतीही ऑनलाईन पैसे दिले नाहीत, त्यामुळे याला कुणी मदत केली हे पहावे लागेल. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी 5 दिवसांची पोलिस कोठडी हवी आहे, अशी मागणी केली होती. पण कोर्टाने 2 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत कोरटकर (50, रा. नागपूर) याच्या आवाजाचे नमुने बुधवारी फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी घेतले. तत्पूर्वी मंगळवारी मध्यरात्रीपासून ते बुधवारी पहाटेपर्यंत पोलिसांनी त्याची पाच ते सहा तास कसून चौकशी केली. यामध्ये मोबाइलमधील डेटा स्वतः डिलीट केल्याची कोरटकरने कबुली दिली असून अटक टाळण्यासाठी तो हैदराबादमार्गे चेन्नईला पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आजही दिवसभर कोरटकर याची चौकशी सुरू होती.

हक्कभंग प्रस्ताव म्हणजे काय रे भाऊ …. ?

समज देऊन सोडून देण्यापासून तुरुंगवास ठोठावण्यापर्यंत कोणतीही शिक्षा देण्याचा विधिमंडळाला दिलेला विशेषाधिकार

भारतीय राज्यघटनेच्या कलम 194 अन्वये हक्कभंगाचा प्रस्ताव हा विधिमंडळाला दिलेला विशेषाधिकार आहे. सभागृहाचा हक्कभंग आणि सभागृह सदस्यांचा हक्कभंग अशा दोन प्रकारे हक्कभंगाचे प्रस्ताव आणले जातात. विधिमंडळ सभासदाकडून तक्रार, विधानसभा सचिवांचा अहवाल, याचिका आणि सभागृह समितीचा अहवाल अशा 4 माध्यमांतून हक्कभंगाचा प्रस्ताव मांडता येतो.

विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये हक्कभंग प्रस्ताव आणला जातो. दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना हक्कभंग आणण्याची सूचना करण्याचा अधिकार असतो. हक्कभंग प्रस्ताव दाखल करणाऱ्यांनी माहिती द्यावी लागते, तो प्रस्ताव कुणाविरुद्ध आहे आणि काय आहे? हक्कभंग करणाऱ्याला विधिमंडळाकडून नोटीस पाठवली जाते. यापूर्वी अनेक राजकीय नेते, पत्रकार आणि इतरांवर विधिमंडळात हक्कभंगाचे प्रस्ताव आणल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.

माजी संसदीय कामकाज मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या ‘विधानगाथा’ या पुस्तकात हक्कभंग मांडण्याची प्रक्रिया सांगितली आहे. या पुस्तकात नमूद माहितीनुसार,

एकूण सदस्य संख्येपैकी 1/10 सदस्यांच्या स्वाक्षऱ्या प्रस्तावावर असाव्यात.अध्यक्ष विचारतात की, या हक्कभंग प्रस्तावाला कोणाची सहमती आहे, तेव्हा 29 सदस्यांनी उभे राहत पाठिंबा दर्शवावा लागतो.
हक्कभंगाची नोटीस अगोदर द्यावी लागते.
हक्कभंग प्रस्ताव दाखल करणाऱ्यांनी माहिती द्यावी लागते, तो प्रस्ताव कुणाविरुद्ध आहे आणि काय आहे?
हक्कभंग करणाऱ्याला विधिमंडळाकडून नोटीस पाठवली जाते. ज्याच्या विरुद्ध हक्कभंग नोटीस जारी होते, त्याला समोर यावंच लागतं.
जर हक्कभंग प्रस्ताव विधिमंडळात मंजूर झाल्यास, हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकारही सभागृहाला असतो.
आरोपी तिर्‍हाईत असेल तर समज देऊन सोडून देण्यापासून तुरुंगवास ठोठावण्यापर्यंत कोणतीही शिक्षा होऊ शकते.
आरोपीला समन्स पाठवून विधानसभेत बोलावले जाऊ शकते. समज देणे, ताकीद देणे, दंड आकारणे, अटक करून तुरुंगवास किंवा सभागृहाला योग्य वाटेल ती शिक्षा करण्याची तरतूद कायद्याने केली आहे.आरोपी आमदार असल्यास निलंबन किंवा हकालपट्टी करणे असेही अधिकार आहेत .

मराठी नववर्षानिमित्तसानिया पाटणकर, अमरेंद्र धनेश्वर यांचे बहारदार गायन तर कला रामनाथ यांच्या व्हायोलिनच्या सुरात रसिक चिंब

0

पुणे : जगविख्यात व्हायोलिन वादक विदुषी कला रामनाथ यांचे सुरेल वादन, ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अमरेंद्र धनेश्वर यांचे बहारदार गायन आणि जयपूर-अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या सुमधुर सादरीकरणाने मराठी नववर्षाची अनोखी भेट रसिकांना मिळाली. निमित्त होते मराठी नववर्षानिमित्त प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे एस. एम. जोशी सभागृहात आयोजित गायन-वादन मैफलीचे.
मैफलीची सुरुवात विदुषी सानिया पाटणकर यांनी जयपूर घराण्यातील विलंबित तीन तालातील ‌‘कहा मैं गुरू ढूंढन जाऊ‌’ या अर्थपूर्ण बंदिशीने केली. त्याला जोडून गुरू डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांनी रचलेली ‌‘गुरू बिन कौन बतावें बाट‌’ ही बंदिश सुमधूर आवाजात सादर केली. पाटणकर यांनी आपल्या मैफलीची सांगता जगविख्यात गायक पंडित कुमार गंधर्व यांनी रचलेल्या ‌‘त ना रे तानी दोम‌’ या तराण्याने केली. लय आणि जटील तानांवर प्रभुत्व असणाऱ्या विदुषी सानिया पाटणकर यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना प्रशांत पांडव (तबला), अमेय बिचू (संवादिनी), रुची शिरसे, क्रांतिशीला ठोंबरे, करिश्मा टापरे (गायन-तानपुरा) यांनी साथ केली.
यानंतर पंडित अमरेंद्र धनेश्वर यांनी बसंत रागातील बडा ख्याल आणि छोटा ख्याल ऐकविला. ‌‘नबी के दरबार‌’ ही महमंद पैगंबर यांना उद्देशून असलेली सूफी रचना सादर केली. यानंतर फाल्गुन महिन्याचे वर्णन करणारी ‌‘फगवा ब्रिज देखन चलो री‌’ ही रचना सादर करून त्याला जोडून ‌‘तनन दे रे ना तदानी दिन‌’ हा तराणा ऐकविला. ‌‘वारी जांगी मै तेरे‌’ हा खमाज रागातील टप्पा ऐकवून पंडित धनेश्वर यांनी संत कबीर रचित
‌‘कैसे दिन कटी है बताए जय्यो रामा‌’ ही चैती प्रभावीपणे सादर केली. त्यांना प्रशांत पांडव (तबला), प्रज्ञा देसाई (व्हायोलिन) यांनी साथ केली.
कार्यक्रमाची सांगता जगविख्यात व्हायोलिनवादक विदुषी कला रामनाथ यांच्या वादनाने झाली. संगीत क्षेत्रात सातव्या पिढीचा वारसा पुढे नेणाऱ्या विदुषी कला रामनाथ यांनी मैफलीची सुरुवात शुद्ध कल्याण रागाने केली. व्हायोलिनमधून उमटणाऱ्या स्वर्गीय सुरांनी रसिक संमोहित झाले. मैफलीची सांगता दीपचंदी तालातील ‌‘होरी खेलत शाम बिहारी‌’ या होरीने केली. विदुषी कला रामनाथ यांनी आपल्या अद्वितीय वादनातून रसिकांना जणू परिसस्पर्शच केला. विदुषी कला रामनाथ यांना जगविख्यात तबला वादक पंडित नयन घोष यांचे चिरंजीव व शिष्य ईशान घोष यांनी तबला साथ करताना तबला वादनातील आपले प्रभुत्व दर्शवून रसिकांना स्तिमित केले. ईशान घोष यांच्या तबला सहवादनातून युवा पिढी सांगीतिक वारसा सक्षमतेने पुढे नेत आहे याची प्रचिती रसिकांना आली.


सांगीतिक क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे सुप्रसिद्ध गायक पंडित अजय चक्रवर्ती यांच्या शिष्या डॉ. ममता मिश्रा यांचा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. कलाकारांचा सत्कार विदुषी सानिया पाटणकर, नितीन महाबळेश्वरकर, विवेक देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन स्वाती प्रभूमिराशी यांनी केले.

गावची जत्रा, पुढारी सत्रा …शनिवारी तमाशा शिबिराचा समारोप

माजी आमदार कवि लहू कानडे, भारत गणेशपुरे यांची उपस्थिती लाभणार

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी आयोजित तमाशा सम्राट काळू बाळू कवलापूरकर यांना समर्पित केलेल्या तमाशा शिबिराचा समारोप समारंभ शनिवार दिनांक 29 मार्च रोजी संपन्न होत असून यावेळी गावची जत्रा, पुढारी सत्रा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेत. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर उपस्थितीत राहणार असल्याची माहिती या शिबीराचे संचालक तथा लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी दिली.
सांस्कृतिक कार्य विभाग, आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने तसेच मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या सहकार्याने गेली दहा दिवसाचे तमाशा प्रशिक्षण शिबीर लोककला अकादमी (मुंबई विद्यापीठ) येथे सुरू होते.या शिबिरामध्ये तमाशा परंपरेनुसार शास्त्रशुद्ध पद्धतीने गण, गौळण, बातवणी, रंगबाजी असे तमाशा कलेचे विविध कला प्रकार या क्षेत्रातील अभ्यासकांनी या दरम्यान शिकविले.त्यानुसार तमाशा शिबिरात सहभागी झालेल्या विदयार्थ्यांनी शेवटच्या दिवशी एक पारंपारिक तमाशा सादर करायचा असतो. त्यामुळे शनिवारी (ता. 29मार्च) पारंपारिक तमाशा कला रसिकांना विनामूल्य बघायला मिळणार आहेत.
या शिबीराच्या समारोपाला माजी आमदार, जेष्ठ कवि लहू कानडे,”चला हवा येऊ दया” फेम भारत गणेशपुरे, सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक संतोष पवार, चित्रपट अभिनेत्री, लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे, जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड, प्रा. डॉ. मंगेश बनसोड यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे.
यावेळी तमाशा शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थी गावची जत्रा, पुढारी सतरा हा तमाशा सादर करणार आहेत. हे शिबिर सुरू झाल्यावर श्री. कृष्णा मुसळे (ढोलकी)श्री. मदन प्रसाद (हार्मोनियम गायकी )श्रीमती हेमाली म्हात्रे(नृत्य),श्री. योगेश चिकटगावकर (अभिनय ) लावणी सम्राधणी प्रमिला लोदगेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
शनिवार दि. 29 मार्च रोजी दुपारी 2.00 वाजता कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या शाहिर पट्ठे बापूराव कला दालन सांस्कृतिक भवन तिसरा मजला (गेट नंबर दोनच्या बाजूला) येथे या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहेत. सदर कार्यक्रम प्रवेश विनामूल्य आहे.

कुणाल कामरा, सुषमा अंधारेंवरील हक्कभंग स्वीकारला :दोघांनाही आजच नोटीस जारी होण्याची शक्यता

मुंबई-भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा व शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात दाखल केलेला हक्कभंग स्वीकारण्यात आला आहे. या प्रकरणी आजच या दोघांनाही नोटीस बजावण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामरा व अंधारे या दोघांच्याही अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान परिषदेत कुणाल कामरा व ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग दाखल केला होता. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांचा हक्कभंग स्वीकारला आहे. सभापती राम शिंदे यांच्या स्वाक्षरीनंतर हा प्रस्ताव विधिमंडळाच्या हक्कभंग समितीकडे वर्ग करण्यात आला आहे. ही समिती कुणाल कामरा व सुषमा अंधारे यांना कदाचित आजच खुलासा करण्यासंबंधीची नोटीस बजावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंधारे व कामरा या दोघांच्याही अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी शिवसेनेने कामरा याच्या हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही कामराचे गाणे म्हणून शिंदे गटाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला होता.

कुणाल कामराची मद्रास हायकोर्टात धाव:अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी

मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्ताधारी पक्ष यांच्यावरील टीकात्मक गाण्यामुळे अडचणीत सापडलेल्या कुणाल कामराने अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.कामराच्या वकिलाने आपल्या अशिलाला सातत्याने जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा केला आहे. कामरा यांच्या इन्स्टाग्राम बायोनुसार तो सध्या पद्दुचेरीत आहे.स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्याच्या या विधानामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कामराच्या हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कामराविरोधात समन्स बजावला आहे. यामुळे त्याच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे.

या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने मद्रास हायकोर्टात धाव घेऊन अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, कुणाल कामराने आपल्या वकिलांकरवी ही अटकपूर्व याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी आपल्याविरोधात दाखल एफआयआर संदर्भात ट्रान्झिट अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे. त्याच्या याचिकेवर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर कुणाल कामराविरोधात शून्य एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर नंतर मुंबई स्थित खार पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 353 (1) (ब), 353(2) व 356(2) (मानहानी) चा दाखला दिला आहे.

थकीत वीजबिल भरा सहकार्य करा; महावितरणचे आवाहन

पुणे, दि. २८ मार्च २०२५: पुणे परिमंडलामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांकडे अद्यापही ८२ कोटी ९७ लाख रुपयांच्या वीजबिलांची थकबाकी आहेत्यामुळे नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. सोबतच थकीत वीजबिलांचा भरणा करता यावा यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २९), रविवारी (दि. ३०) व सोमवारी (दि. ३१) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. 

वारंवार आवाहन करूनही वीजबिल भरले नसल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. आतापर्यंत गेल्या २७ दिवसांमध्ये पुणे परिमंडलात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ३३ हजार ३२९ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात पुणे शहरातील १३ हजार २२२, पिंपरी चिंचवड शहरातील १० हजार ८२० आणि ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, राजगड, हवेली तालुक्यांतील ९ हजार २८७ थकबाकीदारांचा समावेश आहे. सद्यस्थितीत एकूण घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे पुणे शहरात ३६ कोटी ८६ लाख पिंपरी चिंचवड शहरात १८ कोटी ६५ लाख आणि  आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, राजगड, हवेली तालुक्यांत २७ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे.

वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २९), रविवारी (दि. ३०) व सोमवारी (दि. ३१) या सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीजग्राहकांच्या माहितीसाठी –

१)      देयकाचा तत्पर भरणा सवलत (प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंट) –वीजदेयकाच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये वीजबिलाच्या रकमेचा तत्पर भरणा केल्यास १ टक्के सवलत दिली जाते. देयकाच्या तत्पर भरण्याची (प्रॉम्टपेमेंट) तारीख संबंधित देयकामध्ये नमूद केली जाते.

२)      नलाइन भरणा केल्यास ०.२५ टक्के सवलत – क्रेडिट कार्ड, डेबीट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल वॉलेट, मोबाइल बँकींगद्वारे वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केल्यास ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येत आहे.

३)      थकबाकीवरील व्याज – वीज देयकांच्या देय तारखेपासून असलेली थकबाकी ६० ते ९० दिवसांदरम्यान भरल्यास – १२ टक्के व्याज आणि वीज देयकाची थकबाकी ९० दिवसांनंतर भरल्यास – १५ टक्के

४)       विलंब शुल्क आकारणी – संबंधित महिन्याचे वीज देयक देय तारखेच्या मुदतीत न भरल्यास १.२५ टक्के विलंब शुल्क आकारणी केली जाते.

लावणी प्रशिक्षण शिबीरातील विदयार्थ्यांनी सादर केलेल्या झगडा कला प्रकाराला रसिकांनी दिली दाद….!

पुणे-सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित सणसवाडी (जि. पुणे ) येथील “लावणी प्रशिक्षण शिबीरा”चा समारोप संपन्न झाला.संचालिका रेश्मा परितेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसांचे लावणी प्रशिक्षण शिबीर सणसवाडी (जि. पुणे) येथे सुरू होते.

नवोदित लोककलावंतांना लोककलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे, म्हणून शासन दरवर्षी विविध प्रशिक्षण शिबीर आयोजित करते. त्या अनुषंगाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात या लावणी प्रशिक्षण शिबीराचा वाखण्याजोगा समारोप झाला.
दहा दिवसाच्या शिबिरात नृत्य शिकलेल्या विदयार्थ्यांनी सुंदर अशा लावण्या सादर केल्या. परंपरेनुसार गण,मुजरा,गवळण (श्रुगारिक ), आम्ही काशीचे बाम्हण ही बैठकीची लावणी,पाहुणीया चंदवदन,वाटल होत तुम्ही याल,आशुक मासुक नीर नशिकची, राया मला सोडून जाऊ नका,बाई ग बाई -(छक्कड), मी तुमची मैना तुम्ही माझे राघु,पाया मघ्ये चाळ बांधुनी (छक्कड), पारंपारिक झिल, अशा विविध लावणी कला प्रकार यावेळी सादर केला.याला सभागृहातील रसिकांनी भरभरून दाद दिली.
विशेषतः गावचा पाटील आणि एक लावणी नृत्यांगणा यांच्यातील झगडा हा लावणीचा कला प्रकार नम्रता अंधारे आणि उमा काळे यांनी अंत्यत उत्कृष्ट अभिनयातून सादर केला.आणि रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. स्वतः हा रेश्मा परितेकर यांनी रंगमंचा ताबा घेवून आपल्या लोककलेची झलक दाखविली.
सुप्रसिद्ध ढोलकी वादक पांडुरंग घोटकर,नटरंग फेम ढोलकीपट्टू कृष्णा मुसळे यांची यावेळी चांगलीच जुगलीबंदीची झलक ऐकायला मिळाली. यांना विठ्ठल या ढोलकीपट्टूने साथ दिली होती.या समारोपाला लोक साहित्याचे अभ्यासक डॉ. विश्वानाथ शिंदे, प्रभाकर ओव्हाळ, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड,सहयोगी प्राध्यापक डॉ. नवनाथ शिंदे, सणसवाडी कला केंद्राच्या संचालिका सुरेखा पवार, अप्सरा जळगावकर, उपस्थितीत होते. यावेळी या मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षित विदयार्थ्यांना सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दिले जाणारे प्रमाणपत्र सन्मानपूर्वक देण्यात आले.

अभिनेत्री नेहा शितोळे चे लेखन क्षेत्रात पदार्पण

लोकप्रिय मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा शितोळे आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. नेहा लेखिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी ‘सीतारामम’ या दक्षिण भारतीय चित्रपटासाठी हिंदी संवाद लेखन केलेल्या नेहाने आता देवमाणूस ह्या सिनेमाच्या पटकथा आणि संवाद लेखनाची जबाबदारी उचलली आहे.

तेजस देवस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ निर्मित आहे.

लेखकाच्या भूमिकेत पदार्पण करताना नेहा सांगते, “लेखनाची आवड मला नेहमीच होती आणि ‘देवमाणूस’साठी पटकथा आणि संवाद लेखन करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. हा चित्रपट एक थरारक कथा मांडतो आणि त्याला एक भावनिक बाजूसुद्धा आहे. अभिनेत्री ह्या नात्याने आत्ता पर्यंत भावना व्यक्त केल्या होत्या, त्यामुळेच ते सर्व लिखाणात उतरवताना आधीच्या अनुभवाची मदत झाली”

ती पुढे म्हणते, ”‘लव फिल्म्स’ने माझ्यावर विश्वास ठेवला, याबद्दल मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे. तसेच दिग्दर्शक तेजस देऊसकर यांनी मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचीही ऋणी आहे. ‘देवमाणूस’साठी लेखन करणे ही माझ्यासाठी आयुष्याला कलाटणी देणारी संधी होती. हा प्रवास खूप आव्हानात्मक आणि त्याचबरोबर खूप समृद्ध करणारा ठरला. विशेषतः अशा प्रतिभावान टीमसोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता.”

लव फिल्म्स प्रस्तुत, “देवमाणूस” या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर ह्यांनी केले आहे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

‘गुलकंद’ मधील ‘चल जाऊ डेटवर’ हे रंगतदार गाणं प्रदर्शित…

काही दिवसांपूर्वी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेटक्लाऊड प्रोडक्शन निर्मित ‘गुलकंद’मधील ‘चंचल’ हे गोड प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. ‘चंचल’ गाण्याला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीनंतर चित्रपटातील दुसरं गाणं ‘चल जाऊ डेटवर’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे .गंमतीदार अंदाजातील या गाण्याचे बोल, संगीत प्रेक्षकांना नक्कीच भावेल. हे गाणं ऐकायला जितकं छान आहे, तितकंच त्याचं सादरीकरणही अप्रतिम आहे. वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपूवार यांच्या शब्दांची व अविनाश विश्वजीत यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे.

गाण्यात सई आणि समीरची भन्नाट केमिस्ट्री दिसत असून समीर आणि सईचे नृत्य एक सरप्राईज आहे. सई समीरची ही ढवळे फॅमिली कुठे आणि कशी डेटवर जाणार आणि तिथे काय धमाल होणार, याची उकल १मे २०२५ ला गुलकंद प्रदर्शित झाल्यावर होणार आहे. तोवर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचेल हे नक्की!

दिग्दर्शक व निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, “या गाण्यातील सई, समीर आणि प्रसाद, ईशा यांची केमिस्ट्री मजेशीर असून प्रेक्षकांना हसवणारी आहे. गाण्याचे बोल, संगीत सगळंच खूप छान आहे. एक वेगळाच मूड बनवणारं हे गाणं असल्यानं त्याचं चित्रीकरण तसंच होणं गरजेचं होतं. मस्त कलरफुल ठिकाणी चित्रित करण्यात आलेलं हे गाणं संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल. गाण्यात सई -समीर जरी डेटवर जात असल्याचे दिसत असले तरी १ मे रोजी सर्वांनी आपल्या कुटुंबियांसह ही डेट एन्जॉय करावी.’’

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, ” चित्रपट यशस्वी करण्यात गाण्यांचा मोठा सहभाग असतो. कधी कधी कथेतून जी गोष्ट, भावना मांडता येत नाहीत त्या गाण्यातून मांडता येतात. असंच हे गंमतीशीर गाणं आहे. हे या चित्रपटातील दुसरं गाणं आहे. पहिले गाणं रोमँटिक होते, हे गाणं अतिशय एनर्जेटिक असून प्रत्येकाला थिरकायला लावणारे आहे. चित्रपट पाहातानाही प्रेक्षक हे गाणं अतिशय एन्जॉय करतील.”

सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारखे तगडे कलाकार आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दिशा सालियन वडिलांच्या अफेअरमुळे होती त्रस्त,तणावातून आयुष्य संपवल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये दावा

मुंबई-बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात एक नवा खुलासा बाहेर आला आहे. त्यानुसार, दिशा आपल्या वडिलांच्या अफेअरमुळे तणावात होती. संबंधितांना पैसे देऊन ती पुरती थकली होती. यामुळे आलेल्या आर्थिक वैफल्यातून तिने स्वतःचे आयुष्य संपवून घेतले, असे मालवणी पोलिसांच्या यापूर्वीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत. त्यातच आता मालवणी पोलिसांनी यापूर्वी दाखल केलेल्या आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये वरील नवी माहिती उजेडात आली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, दिशा सालियान वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसे देऊन थकली होती. कष्टाने कमावलेला पैसा नको त्या गोष्टींवर खर्च होत असल्यामुळे ती खचली होती. तिने आपल्या मित्रांशीही ही गोष्ट बोलून दाखवली होती. याच आर्थिक तणावातून नंतर तिने आत्महत्या केली. यापूर्वी झालेल्या शवविच्छेदन अहवालात दिशावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या अहवालात डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.

दिशा सालियनने 8 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मालवणी पोलिसांनी तपास करुन एक अहवाल सादर केला होता. त्यात दिशाचे काही प्रोजेक्ट्स अयशस्वी झाले होते, मित्रांशी खटके उडाले होते, अशा कारणांचा उल्लेख होता. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे दिशाच्या वडिलांनीच लेकीने कष्टाने कमावलेले पैसे आपल्या ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यावर उधळल्याचेही यात नमूद आहे. दिशाने ही गोष्ट तिच्या काही मैत्रिणींना आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्यालाही सांगितली होती. 2 जून 20202 रोजी दिशाने यासंबंधी आपल्या वडिलांना जाब विचारला आणि त्यानंतर ती तिचा होणारा नवरा रोहन रॉय याच्या जनकल्याण नगरमधील फ्लॅटवर राहायला गेली.

दिशाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पुरावे गोळा केले आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यानंतर त्यांनी दिशाने आत्महत्या केल्याचा अंतिम निष्कर्ष काढला. 4 फेब्रुवारी 2021 रोजी हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. सतीश सालियन यांनी आता पुन्हा याचिका दाखल करून काही बड्या असामींवर आरोप केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.उल्लेखनीय बाब म्हणजे दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. त्यानंतर 3 दिवसांनी तिचे शवविच्छेदन झाले होते. त्यात दिशाच्या हात, पाय व छातीवर जखमा झाल्याचा उल्लेख आहे. विशेषतः तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे या रिपोर्टमध्ये नमूद आहे. एवढेच नाही तर दिशाच्या नाक व तोंडातून रक्त येत असल्याचेही या रिपोर्टमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. पण तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झाल्याची नोंद त्यामध्ये नाही.

दुसरीकडे, दिशा सालियनच्या वडिलांनी आपल्या वकिलांसह नुकतीच मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मुलीच्या कथित हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करत या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा त्यांचा आरोप आहे. एवढेच नाही तर आदित्य ठाकरे यांचा ड्रगजच्या व्यापारात हात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे राज्याचे राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा म्हणाले की, आम्ही आमची तक्रार मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे (गुन्हे) दिली आहे. त्यांनी सीपींशी चर्चा करून आमची तक्रार दाखल करून घेतली आहे. आता आरोपींना केव्हा अटक करणार? याची जबाबदारी पोलिसांवर आहे. आरोपींमध्ये आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सुरज पंचोली, त्यांचे अंगरक्षक, परमबीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती यांचा समावेश आहे.

परमबीर सिंह यांनी हे प्रकरण दाबण्याच्या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड आहेत. परमबीर यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आल्यानंतर कव्हरअप करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळी कोणताही राजकारणी आला नसल्याचा दावा केला. पण मोबाईल टॉवरच्या लोकेशनपासून प्रत्यक्षदर्शींच्या जबाबापर्यंत सर्वच गोष्टी त्यांचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करतात. इतरही अनेक गोष्टी आमच्या तक्रारीत नमूद आहेत. या गोष्टी संपूर्ण देशासाठी धक्कादायक आहेत.

मंत्री थर्ड डिग्रीची भाषा करत असेल तर महाराष्ट्रात तालिबानी राज्य:हिंदू राष्ट्र म्हणणारे इस्लामी राष्ट्राप्रमाणे शिक्षा देताय, गद्दारांना तशीच शिक्षा…- संजय राऊत

मुंबई-एखादा मंत्री जर थर्ड डिग्री देण्याची भाषा करत असेल तर याचा अर्थ महाराष्ट्रात तालिबानी राज्य आहे. तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणत आहात आणि इस्लामी राष्ट्राप्रमाणे शिक्षा देत आहात, मग तसे असेल तर इस्लामिक कायद्याप्रमाणे गद्दारांना कोणती शिक्षा देता माहिती आहे का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला विचारला आहे.संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, इस्लामिक कायद्याप्रमाणे गद्दारांना काय शिक्षा दिली जाते , हे पाहायचे असेल तर इराणमध्ये जा आणि बघा. तिथे गद्दाराला भर चौकात उघडे करत पार्श्वभागावर 100 फटके मारले जातात आणि मग फासावर लटकवतात. तुम्ही कुणालला तशी शिक्षा देणार असाल तर तशीच तुमच्या मंत्र्यांना मान्य आहे का? तसा एखादा प्रस्ताव आणू.

संजय राऊत म्हणाले की, आमच्यावर अनेकदा टीका झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अनेक चुकीची वक्तव्य केली गेली पण त्यांनी ती सहन केली. तुम्ही त्याला शब्दाने किंवा कायद्याने त्याला विरोध करू शकतात. कायद्याचे राज्य जर टिकवायचे असेल तर अभिव्यक्ती स्वतंत्र जपले पाहिजे.दिशा सालियान हिच्या वडीलांनी मुलीच्या मृत्यूचे राजकारण करू नये. तिचे वडील असे का वागत आहे, त्यांनाच माहिती पण आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दिशा सालियान प्रकरणी सत्य पहिलेच समोर आले आहे. काय झाले हे पूर्वीच् समोर आले आहे. दिशाच्या वडीलासंच्या आडून काही राजकीय लोकं काय करण्याचा प्रयत्न करत आहे हे तुम्हाला लक्षात यायला हवे.

संजय राऊत म्हणाले की, ठाकरे कुटुबियांवर चिखलफेक करणारे काही लोकं आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचारवाहक आहोत असे म्हणतात, त्यांना असे राजकारण करताना लाज वाटली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय पुरुष आहेत, त्यांचा फोटो कुणीही वापरू शकते. शिंदेदेखील बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरतात. पण बाळासाहेब जर असते तर त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चाबकाने फोडले असते.संजय राऊत म्हणाले की, सत्तेतील लोकं म्हणतात कुणाल कामराला टायरमध्ये टाकून मारले पाहिजे. द्या ना थर्ड डिग्री, चांगली गोष्ट आहे. पाहूना तोपर्यंत कुणाची सत्ता राहते. तुम्हाला दुखावणारे वक्तव्य जर कुणी केले असेल तर त्यासाठी देशात कायदा आहे, हे असे वक्तव्य म्हणजे ही सत्तेची मस्ती आहे.

कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देणार…मंत्री देसाईंची भाषा

मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीतातून टीका करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिंदेसेनेत अजूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काही शिवसैनिकांनी कुणालच्या मुंबईतील हॅबिटेट स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यावर ‘अॅक्शनची रिअॅक्शन येणारच’ असे सांगून शिंदे यांनी या कृतीचे समर्थन केले होते. आता त्यांच्या पक्षाचे नेते व राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी तर थेट कायदा हाती घेऊन कुणालला ‘थर्ड डिग्री’ देण्याची धमकीच दिली आहे. कायद्याचे राज्य असताना कायदेशीर कारवाई ऐवजी ‘थर्ड डिग्री’ ची म्हणजे बेदम मारहाणीची भाषा करून मोगलाई च्या राज्याची आठवण शंभूराज देसाई यांनी करून दिल्याची टीका आता होऊ लागली आहे.

शंभूराज म्हणालेे, ‘कुणालने मर्यादा ओलांडली आहे. आता पाणी डोक्यावरून वाहत असून त्याला प्रसाद देण्याची वेळ आली आहे. शिवसैनिकांनी त्याच्या स्टुडिओत प्रसाद दिला. तरीही आता तो मुद्दाम रोज एक नवा व्हिडिओ पोस्ट करत आहे. त्यामुळे आता तो कोणत्याही बिळात लपला तरी त्याला तेथून बाहेर काढून रस्त्यावर पटकले जाईल. त्याला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री दिली जाईल,’ असा इशारा देसाई यांनी दिला.शिंदे यांची बदनामी केल्याच्या तक्रारीवरून कुणाल कामरावर खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दोन वेळा त्याला समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले आहे. पण सध्या तो तामिळनाडूतील मूळ गावी गेलेला आहे. कुणालच्या वकिलांनी २ एप्रिलपर्यंत हजर राहण्यासाठी मुदत मिळावी, अशी विनंती केली होती. पण ती फेटाळण्यात आली आहे. ३१ मार्च रोजी चौकशीस हजर राहावे, असे आदेश पोलिसांनी बजावले आहेत. त्यामुळे आता कुणाल हजर होतो की कोर्टात जाऊन दिलासा मिळवतो, याकडे लक्ष लागले.

कुणालचे समर्थक मात्र खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहिलेत. गेल्या दोन दिवसांत देश-विदेशातून त्याच्या खात्यात ४ कोटी सात लाख ८० हजार रुपये क्राऊड फंडिंग जमा झालाय. व्यवस्थेविरोधात भाष्य करण्याचे धाडस दाखवणाऱ्या कुणालला नेत्यांनी दाखल केलेल्या कायदेशीर कारवाईत लढण्यासाठी मदत म्हणून ही रक्कम पाठवली जात असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. विरोधी पक्षातील काही नेते पैसे देऊन कुणालला सत्ताधाऱ्यांविरोधात बोलायला लावत असल्याचा आरोप होतो. पण ‘तुम्ही माझे खाते तपासू शकता,’ असे सांगून कुणालने आरोपाचे खंडन केले.

शिंदेसेनेचे स्थानिक नेते राहुल कनाल यांनी खार पोलिसात तक्रार देऊन कुणाल कामराच्या यूट्यूब चॅनलला टेरर फंडिंग मिळत असल्याचा आरोप केला आहे. राहुल कनाल म्हणाले की, ‘कुणाल पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्व मोठ्या नेत्यांवर बोलतो. ‘हम होंगे कामयाब’ असे देशाचे गाणे आहे. या गाण्याला ‘हम होंगे कंगाल’ असे विडंबन त्याने केले आहे. कॅनडा, यूएसए आणि पाकिस्तानमधून त्याला ४०० डॉलर पाठवण्यात आले आहेत, त्याची चौकशी करून कारवाई करा. कुणालचे यूट्यूब अकाउंट बंद करा,’ अशी मागणीही त्यांनी केली.