Home Blog Page 389

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित नाट्य कार्यशाळेचा समारोप

पुणे : नाटक हे जीवंतपणाचे लक्षण असून व्यक्तिमत्व विकासाचे मोलाचे साधन आहे. मुलांना विविध विषयांवरील बालनाट्ये दाखविल्यास, बालनाट्याविषयी त्यांच्याशी चर्चा केल्यास ती सर्वार्थाने प्रगल्भ होतील, असा प्रतिपादन वंदेमातरम्‌‍चे अभ्यासक, बालनाट्य चळवळीतील मार्गदर्शक मिलिंद सबनीस यांनी केले.
नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे 5 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांसाठी नाट्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमात सबनीस आणि रंगकर्मी रवींद्र सातपुते यांच्या हस्ते मुलांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. त्यावेळी सबनीस यांनी कार्यशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला. टिळक रोड वरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस कार्यशाळेतील मुलांनी विविध नाटिका, नाट्यछटांचे सादरीकरण केले. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, विश्वस्त संध्या कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी, अश्विनी आरे, पूजा पारखी, राधिका देशपांडे, हर्षदा टिल्लू यांची उपस्थिती होती. नाट्यकार्यशाळेचे संयोजन प्रतीक पारखी यांनी केले होते. कार्यशाळेतील लहान गटातून अबीर वाळिंबे आणि आद्या पटवर्धन तर मोठ्या गटातून श्रावणी गोरे यांची सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा या वेळी विशेष गौरव करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत असलेल्या ललित कला केंद्र आणि नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या बारावी नंतरच्या मोठ्यांसाठीच्या अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना या प्रसंगी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
रवींद्र सातपुते म्हणाले, नाट्य प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक मुलगा किंवा मुलगी अभिनेता-अभिनेत्री होईलच असे नाही. मात्र नाट्य कलेचे प्रशिक्षण घेतलेला विद्यार्थी भविष्यात चांगला माणूस मात्र नक्की घडू शकतो. चांगला चांगला नट किंवा प्रेक्षक घडण्याची प्रक्रिया नाटकाच्या माध्यमातून घडू शकते.
प्रास्ताविकात नाट्यसंस्कारचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी म्हणाले, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नाटक ही कला खूप उपयुक्त आहे. नाट्य प्रशिक्षणाकडे क्रमिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणूनच बघावे. संस्थेच्यावतीने पुण्यातील काही शाळांमध्ये अभ्यासनाट्य चळवळ राबविण्यात येत आहे. कंटाळवाणे विषयही मुलांना नाट्यात्मक पद्धतीने शिकविले जात असल्यामुळे त्याचा मुलांच्या अभ्यासावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अभ्यासनाट्य चळवळ भविष्यात संपूर्ण राज्यात राबविण्याचा विचार आहे.

कुणाल कामराला त्वरित अटक करा-हडपसर भाजपा महिला कार्यकर्त्यांचे पोलिसांना निवेदन

पुणे: उच्चपदस्थ नेत्यांवर अवमानकारक टीका करणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कुणाल कामरावर देशद्रोहासह विविध गंभीर गुन्हे दाखल करून त्याला त्वरित अटक करावी, अशी मागणी हडपसर विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी महिला मोर्चाच्या सरचिटणीस छाया संजीव गदादे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात निवेदन दिले.

यावेळी नलिनी मोरे, संगीता पाटील, अश्विनी सूर्यवंशी, रेखा अबनावे, भावना कांबळे, मीरा फडणवीस, जयश्री गदादे व निकिता उबाळे उपस्थित होत्या.  योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली  निवेदन देण्यात आले.

छाया गदादे म्हणाल्या, कुणाल कामरा या कलाकाराने भारताचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्याविषयी अतिशय खालच्या पातळीवर टीका करत अपमानास्पद कविता केली आहे. या तथाकथित ‘कॉमेडी शो’ मध्ये त्याने पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर अनेक उच्चपदस्थ नेत्यांवरही अवमानकारक वक्तव्ये केली आहेत.

 नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. ही प्रगती काही लोकांना खटकत असावी आणि त्यामुळे अशा लोकांकडून योजनाबद्धपणे बदनामीकारक प्रचार केला जात असावा. त्यामुळे याची सखोल चौकशी करून कुणाल कामरावर कठोर कारवाई करावी.

या वेळी पुणे शहर ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीस स्मिता गायकवाड यांनी देखील कुणाल कामरावर त्वरित कारवाई करून त्याच्या कार्यक्रमासह यूट्यूब चॅनेलवर आजीवन बंदी घालण्याची मागणी केली.

गौतमी पाटीलने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शेअर केलं “कृष्ण मुरारी” गाण्याचं पोस्टर

आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर गौतमी पाटीलने साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या गाण्याचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहे. या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायिका गायत्री शेलार हिने हे गाणं गायलं असून विशाल शेलार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. मनीष महाजन या गाण्याचे दिग्दर्शक आहे. तर या गाण्याचे संगीत आयोजन आदित्य पाटेकर व करण वावरे यांनी केले आहे. या गाण्याची उत्सुकता गौतमीच्या सर्व चाहत्यांना लागली आहे.

गौतमी तिच्या पहिल्या गवळण गीताविषयी सांगते, “लोकसंगीतातील गवळण हा नृत्यप्रकार मला फार आवडतो. माझी खूप दिवसांपासून गवळण करण्याची इच्छा होती. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या गाण्यामुळे माझी इच्छापूर्ती झाली. मी सोशल मीडियावर या गाण्याच पोस्टर नुकतच शेअर केल आहे. प्रेक्षकांचा या गाण्याच्या पोस्टरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याचा टीज़र ३ एप्रिलला प्रदर्शित होईल.”

परंपरेबरोबरच, विकासाची गुढी उभारावी -डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे दि. ३० मार्च : गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. गुढी उभारून आनंद, समृद्धी आणि परंपरेला अभिवादन करण्याची ही परंपरा आहे. यानिमित्ताने प्रभू श्रीराम आणि माता सीता अयोध्येत परतल्यावर त्यांच्या स्वागतार्थ उभारलेल्या गुढ्यांचे महत्त्व सांगत, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संदेश दिला.

“आज आमच्या घरी, सिल्वर रॉक्स येथे मी आणि माझी भगिनी जेहलम जोशी यांनी गुढी उभारली आहे. मात्र खरी गरज आहे ती प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद, उत्साह, आशा आणि विकासाची गुढी उभारण्याची,” असे त्यांनी सांगितले.

तसेच, समाजातील वाढत्या आत्महत्या आणि हिंसाचाराविरोधातही त्यांनी आवाज उठवला. “तरुणांनी व शेतकऱ्यांनी आत्महत्यांना तिलांजली द्यावी. महिलांवर व गोरगरिबांवर होणारे हिंसाचार थांबवण्याची जबाबदारी शासनावर आहे. सरकारने आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आहे ,” अशी ग्वाही त्यांनी दिली

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर समाजात सकारात्मक विचार रुजवून नवी सुरुवात करण्याचा संदेश देत, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यभरातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र विधान परिषद उपसभापतींच्या उपस्थितीत कसबा गणपती मंदिरात महाआरती व मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव संपन्न

पुणे, ३० मार्च : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील श्री कसबा गणपती मंदिरात महाआरती आणि मंदिर परिसरात गुढीपाडवा उत्सव उत्साहात पार पडला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्धी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली.

यानंतर, शिवसेना पक्षाच्या वतीने कसबा गणपती मंदिर परिसरात पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक सहभागी झाले. हा सोहळा भक्तिभावाने आणि आनंदमय वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाला बाळासाहेब मालुसरे, आनंद गोयल, नितीन पवार यांच्यासह शिवसेना संपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, कार्यालयीन प्रमुख सुधीर जोशी आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

गुढीपाडवा हा विजय, समृद्धी आणि नव्या वर्षाच्या शुभारंभाचे प्रतीक मानला जातो. या निमित्ताने पारंपरिक संस्कृतीचा गौरव करण्यात आला. उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्साहात गुढीपाडव्याचा आनंद साजरा केला.

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गुढीपूजन
पुणे : रांगोळीच्या पायघड्या आणि फुलांची आकर्षक आरास, बँडचे मंगलध्वनी अशा मंगलमय वातावरणात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४१ व्या वर्धापनदिनी गुढीपाडव्याला मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सपत्नीक गणरायाला अभिषेक केला. तसेच आरती करून गुढीपूजन करीत त्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, पोलीस अधिकारी विजयमाला पवार यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरबार बँड मधील कलाकारांनी गणरायाचरणी सेवा अर्पण केली. यावेळी गणेशयाग, अभिषेकांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

अमितेश कुमार म्हणाले, पुणेकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. पुणे शहर शांत रहावे, शहरात कायदा सुव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे. पुढील काळात देखील ती चांगल्या स्थितीत राहिल, असा विश्वास आहे. शांतता आणि चांगल्या वातावरणात प्रत्येकाचे आयुष्य असावे, हीच प्रार्थना त्यांनी केली.

सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले, महाराष्ट्र सुखी समाधानी होवो, सर्वत्र शांतता प्रस्थापित होवो, जे भारताचे स्वप्न आहे की २०४७ मध्ये विकसित भारत व विश्वगुरू होण्याच्या दृष्टीने गणरायाचे आशीर्वाद मिळो. तसेच भारत हा जगातील शक्तिशाली देश व्हावा, अशी प्रार्थना त्यांनी केली.नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक भाविकाला श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या गेल्या. मंदिराच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून म्हणजेच दि. ३० मार्च ते ३ एप्रिल पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत कार्यक्रमयंदाचा संगीत महोत्सव वैविध्यपूर्ण कलांनी सजलेला असून महोत्सवात वाद्यवादन, शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत, नाटयपदे व भक्तीगीते, लोकगीते, भारुड, चित्रपटगीतांसह बाबुजी आणि मी, भावसरगम या सुप्रसिद्ध कार्यक्रमांचा समावेश आहे.

श्रीराम-लक्ष्मण-सीता मूर्तीस गुढीपाडव्यानिमित्त पवमान अभिषेक

श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सवाला सुरेल बासरीवादनाने प्रारंभ ; उत्सवाचे २६४ वे वर्ष

पुणे :श्रीराम जय राम जयजय राम… च्या निनादात ऐतिहासिक तुळशीबाग श्रीराममंदिरात गुढीपाडव्यानिमित्त श्रीराम-लक्ष्मण-सीता मूर्तीस पवमान अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर मूर्तींना पोशाख व दागिने घालण्यात आले. श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष, श्रीविष्णूसहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरूषसूक्त पठण देखील मंदिरात झाले. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी सकाळपासून मंदिरात गर्दी केली होती.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात  दि. ३० मार्च ते १६ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामधे यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक आरास व विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सकाळी हिमांशु बक्षी यांचा बासरीवादन कार्यक्रम झाला. हिमांशु बक्षी यांनी गणेश वंदना बासरीवर सादर केली. त्यानंतर त्यांनी सूरदास यांचा ‘दर्शन दे दो राम ‘ हा अभंग सुरेल वादनातून सादर केला. ‘विठ्ठल आवडी प्रेमभाव’ आणि ‘कौसल्येचा राम’ या गीतांवर बासरी वादनाने वातावरण प्रसन्न झाले. यानंतर हिमांशू बक्षी यांचे गुरु पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी राग अहिर भैरव आणि पहाडी रागात दोन बंदिश सादर केल्या. श्रीकांत भावे यांनी त्यांना तबल्यावर साथ दिली.

भरत तुळशीबागवाले म्हणाले, उत्सवादरम्यान दि. ३० मार्च ते ५ एप्रिल दररोज सायंकाळी ५.३० वाजता ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. कल्याणी नामजोशी यांचे श्रीमत् रामायण प्रवचन होणार आहे.  तर, सोमवार, दि. ३१ मार्च रोजी मंजिरी आलेगांवकर यांचे सुश्राव्य गायन, मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी दीप्ती कुलकर्णी यांचा सोलो हार्मोनियम वादन कार्यक्रम, बुधवार, दि. २ एप्रिल रोजी वृषाली मावळंकर यांचे गायन आणि शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी सानिया कुलकर्णी यांची गायनसेवा होणार आहे. हे कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होणार असून सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे.

सत्तेवर येताच अजितदादांची भाषा पलटली ..शेतकरी आणि लाडक्या बहिणींची खुलेआम फसवणूक केली

कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे, ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’: हर्षवर्धन सपकाळ.

भाजपा युती सरकारकडून शेतकरी व लाडक्या बहिणींची घोर फसवणूक, मते घेऊन सत्तेत आले आणि विसरले.

भाजपाचा सत्तेच्या विकेंद्रीकरणाकडून केंद्रीकरणाकडे उलटा प्रवास, सत्तेच्या हव्यासामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या.

मुंबई, दि. २९ मार्च २५
जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेऊन सत्ता मिळवली पण आता ३१ मार्चपूर्वी पीककर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कर्जमाफी मिळणार नाही हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, असा संताप व्यक्त करत, ‘दादा, क्या हुआ तेरा वादा?’ असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

उल्हासनगर येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारात व जाहिरनाम्यात महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते पण आजही लाडक्या बहिणींना १५०० रुपयेच दिले जात आहेत. उलट १० लाख बहिणींच्या नावांना कात्री लावत लाडकी बहिण योजनेतून बाद केले आहे. शेतकरी कर्जमाफीवर बजेटमध्ये एक शब्दही काढला नाही. ट्रिपल इंजिन सरकारचे नेते मोदी-शाह यांचे सतत गुणगाण गात असतात त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्र सरकारकडून राज्यासाठी स्पशेल पॅकेज घेऊन यावे, असेही सपकाळ म्हणाले.

मोदी सरकारच्या धोरणांचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, डॉ. मनमोहनसिंह सरकारच्या धोरणांमुळे देशात मध्यमवर्ग व उच्च मध्यमवर्ग वाढला पण मोदी सरकारच्या १० वर्षांच्या काळात या वर्गाचे कंबरडे मोडले आहे, लघू, छोटे व मध्यम उद्योग तर देशोधडीला लागले आहेत. नोटबंदी व जीएसटी नंतर या व्यवसायाला अवकळा आली आहे. नोटबंदीमुळे काळा पैसा उघड झाला नाही तर जेवढ्या नोटा होत्या तेवढा आरबीआय मध्ये जमा झाल्या आहेत. पण नोटबंदीमुळे मध्यम व्यवसाय मोडीत निघाला. उल्हासनगर सारख्या शहरातील या उद्योग व्यवसायावर संकट आले आहे. लोकशाहीमध्ये समता आणि सामाजिक न्यायाची मुल्ये आहेत. मोदी सरकारमध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरिब अधिक गरिब होत आहेत, गरिब व उपेक्षितांचा विचार झाला पाहिजे, छोट्या लघु उद्योगाला चालना मिळाली पाहिजे असेही सपकाळ म्हणाले.

काँग्रेस सरकारने सत्तेचे विकेंद्रीकरण केले पण मोदी सरकारचे धोरण मात्र सत्ता केंद्रीत करण्याचे आहे. १४० कोटी लोकसंख्येच्या देशाचे प्रतिनिधित्व केवळ काही आमदार, खासदार करणे कठीण आहे म्हणून नगरसेवक, सरपंच, सभापती, महापौर असे सत्तेचे विकेंद्रीकरण केले होते पण भाजपाला विशेषतः नरेंद्र मोदींना केंद्रात तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांना सत्ता त्यांच्या हातात हवी आहे आणि हट्टामुळेच तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासन राज सुरु असून सामान्य माणसांच्या अधिकारांवर गदा आली आहे असेही काँग्रेस प्रांताध्यक्ष म्हणाले.

काँग्रेस कार्यकर्ता मेळावा..

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज उल्हास नगर, कल्याण डोंबिवलीला भेट देऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरिब हटावची योजना राबवली, बांग्लादेशाची निर्मिती केली,बँकांचे राष्ट्रीयीकरण केले तर राजीव गांधी यांनी पंचायत राज आणले, संगणक क्रांती आणली. डॉ. मनमोहनसिंह सरकारने सर्वसामान्यांच्या हातात पैसा कसा येईल यासाठी धोरणे आखली. प्रत्येक पंतप्रधानांनी काहीही ना काही योगदान दिले आहे पण आत्ताच्या पंतप्रधानांची ओळख खोटे बोलणारा, भांडणे लावणार अशी आहे. मोदींचा कारभार म्हणजे ‘हम दो, हमारे दो’ असा आहे. आता आपल्याला लढायचे आहे आणि ही लढाई जीवन मरणाची आहे, ‘करो या मरो’ची आहे, त्यामुळे लढायची तयारी ठेवा असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

यावेळी प्रदेशाध्यक्षांसोबत माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

सैन्यदलांना निर्णय स्वातंत्र्यामुळे १९६५च्या युद्धात यश – डॉ. परांजपे

पुणे (२९ मार्च) : ‘१९६२मध्ये चीनशी झालेल्या युद्धात तत्कालीन राजकीय नेतृत्वाने सैन्यदलांना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची मुभा दिली नव्हती. मात्र, १९६५ आणि १९७१ च्या युद्धांमध्ये तत्कालीन राजकीय नेतृत्वाने सेनाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्यामुळे मोठे यश मिळू शकले’, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व सामरिक शास्त्र विषयाचे तज्ज्ञ डॉ. श्रीकांत परांजपे यांनी केले
भारत व पाकिस्तान दरम्यान १९६५मध्ये झालेल्या युद्धाला यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त माजी सैनिक व अधिकाऱ्यांची ऑलिव्ह ग्रीन संस्था आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाने या युद्धातील छायाचित्रांचे प्रदर्शन विभागाच्या फर्ग्युसन रस्त्यावरील रानडे इन्स्टिट्यूट आवारात शनिवारी आयोजित केले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. परांजपे बोलत होते.
‘प्रत्यक्ष सरंक्षण दलांमध्ये काम करणारे, युद्धात सहभाग घेतलेले अधिकारी-सैनिक आणि सैद्धांतिक मांडणी करणारे सामरिक तज्ज्ञ यांचा समन्वय सामरिक शास्त्रांचा अभ्यास परिपूर्ण होण्यासाठी आवश्यक आहे’, असे प्रतिपादन संरक्षणविषयक तज्ज्ञ डॉ. श्रीकांत परांजपे यांनी शनिवारी केले.
१९६५च्या युद्धात पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडणारे वीरचक्रविजेते एअर मार्शल प्रकाश पिंगळे (निवृत्त) यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी युद्धात सहभागी विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त) उपस्थित होते. या दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. त्यांनी प्रत्यक्ष युद्धातील अनुभव या वेळी सर्वांना सांगितले. भारतीय हवाईदलाची या युद्धाच्या यशातील भूमिका त्यांनी अधोरेखित केली.
या प्रसंगी ऑलिव्ह ग्रीनचे संचालक लेफ्टनंट कर्नल अवधूत ढमढेरे, संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट, विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य अ‍ॅड. इशानी जोशी, संरक्षणविषयक तज्ज्ञ काशीनाथ देवधर आदी उपस्थित होते. संस्थेचे जयप्रकाश भट यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. तांबट यांनी आभार मानले.
लष्करी इतिहासविषयक तज्ज्ञ नितीन शास्त्री यांनी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या सर्वांना सर्व छायाचित्रे आणि युद्धातील विविध प्रसंगांची माहिती दिली.

“community policing ” &” connectin yuths या उपक्रमा अंतर्गत जनसुरक्षा क्रिकेट चषक 2025 संपन्न

पुणे-

विमानतळ पोलीस स्टेशन यांनी सिम्बॉयसिस कॉलेज ग्राउंड विमान नगर येथे “community policing ” ” connectin yuths या उपक्रमा अंतर्गत जनसुरक्षा क्रिकेट चषक 2025″ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धेमध्ये परिमंडळ-4 मधील एकूण 16 संघानी सहभाग नोदवला. त्यामध्ये परिमंडळ 4 मधील विमानतळ, खराडी, वाघोली, येरवडा, विश्रांतवाडी, खडकी,बाणेर पोलीस ठाणे यांनी सहभाग नोंदवला.तसेच “अखिल पत्रकार महासंघ संघ पुणे” यांचा देखील सहभाग होता.तसेच विमान नगर परिसरातील नामवंत स्थानिक 8 संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला .सदरच्या स्पर्धा संपन्न होऊन त्यामध्ये प्रथम क्रमांक लोहगाव इलेव्हन, द्वितीय क्रमांक जे बॉईज क्रिकेट संघ रामवाडी, तृतीय क्रमांक विमानतळ पोलीस स्टेशन क्रिकेट संघ यांनी पटकावला.विजेत्या संघांना अनुक्रमे 21000/- ,11000/-,7000/- व चषक पारितोषिक प्रदान करण्यात आले.सदर स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून विमानतळ पोलीस स्टेशन संघाचे कर्णधार सपोनी विजय चंदन,उत्कृष्ट फलंदाज गणेश इथापे विमानतळ पोलीस स्टेशन संघ,उत्कृष्ट गोलंदाज अरविंद ठाकूर,जे बॉईज संघ यांना गौरविण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण आदरणीय अमितेश कुमार , पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आले.सदर प्रसंगी आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पर्धेत सहभागी खेळाडू व नागरिक यांच्याशी संवाद साधून मनोगत व्यक्त केले.त्यावेळी पोलीस उपायुक्त, हिम्मत जाधव, परिमंडळ 4, सा. पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलिस स्टेशन अजय संकेश्वरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस ठाणे रवींद्र कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी पोलीस ठाणे श्री. संजय चव्हाण, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदन नगर पोलीस ठाणे श्रीमती ढाकणे मॅडम, पोलीस निरीक्षक गुन्हे विमानतळ पोलीस स्टेशन श्रीमती आशालता खापरे,श्री हर्षवर्धन गाडे विमान नगर परिसरातील सर्व स्तरातील प्रतिष्ठित नागरिक हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.सदरचा कार्यक्रम हा पोलीस उपायुक्त श्री हिम्मत जाधव,पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

अन्नधान्य अनुदानाचा फेरआढावा घेण्याची गरज !

सुमारे 12 वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केंद्र सरकार उदारमतवादी धोरण स्वीकारून करत आहे. एका बाजूला देशातील गरिबीचे प्रमाण लक्षणीयरित्या घटत असताना दुसरीकडे केंद्र सरकार अन्नधान्य अनुदानावर प्रचंड पैसा खर्च करत आहे. अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या प्राधान्य कुटुंबांपैकी अनेकांना या अन्नधान्य अनुदानाची गरज नाही. या पार्श्वभूमीवर अन्नधान्य अनुदानाचा फेरआढावा घेण्याची गरज आहे. या महत्त्वाच्या समस्येचा घेतलेला धांडोळा.

केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी योजना म्हणजे देशातील अन्नधान्य अनुदान होय. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सारख्या योजनांनी लाखो नागरिकांसाठी अन्न उपलब्धता सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दारिद्र्यरेषेखालील गरीब वर्ग व असुरक्षित कुटुंबांना खऱ्या अर्थाने दोन वेळचे पोट भरण्यासाठी या अनुदानाचा प्रामुख्याने वापर केला जातो. देशातील अत्यंत गरजू व गरीब वर्गासाठी गहू, तांदूळ, साखर व केरोसीन या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून नाममात्र दराने केला जातो. यामुळे देशाच्या ग्रामीण भागातील 75 टक्के जनतेला व शहरी भागातील जवळजवळ 50 टक्के जनतेला या अन्नधान्य अनुदानाचा लाभ मिळत आहे. एकूण लोकसंख्येचा विचार करता 144 कोटी लोकसंख्येपैकी 81 कोटी भारतीयांना अन्नसुरक्षा अनुदानाचा लाभ मिळतो. केंद्र सरकारने गेल्या वर्षी 2.87 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला. या खर्चाचा मोठा परिणाम केंद्र सरकारच्या आर्थिक आरोग्यावर होतो. प्रत्येक राज्यातील एकूण लोकसंख्या, त्यांच्यातील दारिद्र्यरेषेखालील मंडळींचा आकडा, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने केलेले घरगुती वापर खर्चाचे सर्वेक्षण, तेंडुलकर समितीचा दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येचा अंदाज व कालबाह्य होत असलेली 2011 या वर्षाची लोकसंख्येची आकडेवारी या सर्वांवर आधारित देशातील गोरगरिबांना अन्नधान्य अनुदान दिले जाते. यामुळे एक प्रकारे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर होण्यासाठी सुद्धा चांगला हातभार लागतो व दरातील हेलकाव्यांचा सर्व सामान्यांना फटका बसत नाही. या अन्नसुरक्षा योजनेमुळे एकूण अर्थव्यवस्थेलाही चांगली गती व चालना लाभते कारण ग्राहक वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर हा खर्च केला जातो.

तत्वतः अन्नधान्य अनुदान योजना चांगली असली तरी त्याचा अंदाजपत्रकावर किंवा तिजोरीवर पडणारा बोजा लक्षात घेता त्याचा गांभीर्याने फेर आढावा घेण्याची वेळ आलेली आहे. या योजनेचा मोठा दोष आहे तो अकार्यक्षम वितरण व्यवस्था आणि त्याला लागणारी गळती आहे. वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे लाभार्थ्यांसाठी असलेल्या अन्नधान्याचा एक महत्त्वपूर्ण भाग काळ्या बाजारात वळवला जातो. तसेच घोटाळेबाज (अस्तित्वात नसलेले किंवा डुप्लिकेट रेशन कार्डधारक) गरजूंना फायदा न देता किंमत वाढवतात. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पुरवठा साखळी अकार्यक्षम आहे, खरेदी, साठवणूक आणि वितरणात विलंब होतो. अनधान्य साठवणुकीच्या कमकुवत सुविधा आणि गैरव्यवस्थापनामुळे अन्नधान्याची गुणवत्ता खालावते.
रेशन दुकानातील गैरप्रकारांमुळे अनेक खऱ्या लाभार्थ्यांना अजूनही त्यांचा पूर्ण हक्क मिळत नाही. त्याचप्रमाणे कृषी बाजारपेठेचे विकृतीकरण आणि तांदूळ आणि गव्हावर अतिविश्वास निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग डाळी, बाजरी आणि तेलबिया यांसारखी इतर पौष्टिक पिके घेण्यापासून परावृत्त होतात असे आढळते. यामुळे एकल शेती होऊन मातीची सुपीकता प्रभावित होते आणि पीक विविधता कमी होते. तसेच भाताची जास्त लागवड भूजल पातळी कमी करते आणि पर्यावरणीय समस्या निर्माण करते.अन्न सुरक्षा योजना उष्मांक सेवन सुनिश्चित करतात, परंतु देशातील कुपोषणाकडे पूर्ण दुर्लक्ष होते. गहू आणि तांदूळ यांच्या वितरणावर जास्त लक्ष केंद्रित केल्याने संतुलित आहारासाठी आवश्यक असलेल्या अन्य सूक्ष्म पोषक घटकांकडे दुर्लक्ष केले जाते. भारतीय अन्न महामंडळ कडे अनेकदा जास्त प्रमाणात बफर स्टॉक असतो मात्र त्याच्या अयोग्य साठवणुकीमुळे धान्य वाया जाते. योग्य गोदामाच्या सुविधांचा अभाव यामुळे धान्य कुजते व परिणामतः आर्थिक नुकसान होते.

सदोष ओळख पद्धतींमुळे अनेक पात्र गरीब कुटुंबांकडे रेशन कार्ड नाहीत. त्याच वेळी, अपात्र व्यक्तींना लाभ मिळत राहतात, ज्यामुळे अन्नधान्याचे चुकीचे वाटप होते. मोफत अन्न संस्कृतीवर अवलंबून राहणे हे कायमच मारक ठरलेले आहे. यामुळे लाभार्थी वर्ग कामात सहभागी होत नाही व स्वयंपूर्णता निर्माण होण्यासाठी अशा योजना परावृत्त करणाऱ्या ठरतात. यामुळे आर्थिक उन्नती होण्याऐवजी अवलंबित्वाची संस्कृती निर्माण होताना दिसत आहे. आदिवासी आणि दुर्गम भागात अनुदानित अन्नधान्य मिळविण्यात पुरवठा विषयक अडचणी येतात. भ्रष्टाचार आणि अखेरच्या घटकापर्यंतच्या खराब वितरण प्रणालींमुळे सर्व दुर्लक्षित गटांना या योजनेचा लाभ घेणे अवघड होते. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने आधारशी जोडलेली सार्वजनिक वितरण प्रणाली सुरू केल्याने डुप्लिकेशन कमी झाले आहे. परंतु ग्रामीण भागात बोटांच्या ठशांमध्ये जुळत नसणे, इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव आणि प्रमाणीकरणातील बिघाड यामुळे खऱ्या गरिबांना या अनुदानाचा लाभ होत नाही. दारिद्र्यरेषेखालील ज्या नागरिकांसाठी ही योजना राबवली जाते त्या तळागाळापर्यंत या योजनेचा सगळा लाभ मिळत नाही आणि मधल्या मध्ये दलाल मंडळी, व्यापारी, दुकानदार अशा विविध पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर त्यात भ्रष्टाचार होत राहिलेला आहे. या योजनेखाली विक्री करण्यात येणाऱ्या अन्नधान्याचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होताना दिसतो. मात्र या विरुद्ध कोणत्याही राज्यामध्ये कडक उपाययोजना केलेली आढळत नाही. ज्यांच्यासाठी ही योजना आहे त्या घटकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचत नाही व अन्नधान्य ही पोहोचत नाही अशी स्थिती अनेक ठिकाणी निर्माण झालेली आहे.

या पार्श्वभूमीवर या योजनेचा खऱ्या अर्थाने फेर आढावा घेण्याची वेळ आलेली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे व व्यक्तींच्या राहणीमानामध्ये तसेच उत्पन्नामध्ये होत असलेल्या बदलाचा परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेने अलीकडेच केलेल्या एका पाहणीनुसार भारताचा दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती व कुटुंबांचे गरिबीचे प्रमाण कमी झालेले आहे. त्याचप्रमाणे अति दारिद्र्यरेषेखालीही कुटुंबे राहिलेली नाहीत. एका पाहणीनुसार साधारणपणे सहा ते सात कोटी व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली आहेत. ग्रामीण भागातील गरिबीचे प्रमाण लक्षणीय रित्या घटलेले आहे त्याचप्रमाणे शहरी भागातील गरिबीमध्ये मोठा फरक पडला आहे. जागतिक बँकेने भारतातील अति गरीब असणाऱ्या व्यक्ती कुटुंबांचा केला होता. त्यामध्ये ही संख्या 13 कोटींच्या घरात असावी असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकात लक्षणीय फरक पडलेला आहे. गेल्या बारा वर्षातील एकूण गरिबीचा निर्देशांक कमी झाला असून ग्रामीण भागातही अन्नधान्यावर होणाऱ्या खर्चात समाधानकारक वाढ झालेली दिसत आहे. देशातील गरिबी निर्देशांक दहा टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे असे लक्षात घेतले तर अन्नधान्य सुरक्षा लाभ घेणाऱ्यांची संख्या निश्चित कमी होत आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेखाली अंत्योदय अन्न योजना अस्तित्वात असून गरिबातल्या गरीब कुटुंबांना व व्यक्तींना दरमहा 35 किलो अन्नधान्य दिले जाते. यात सुमारे नऊ ते दहा कोटी व्यक्तींचा समावेश होतो. भूमिहीन शेतमजूर, ग्रामीण, स्थानिक कामगार, झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा भरपूर लाभ मिळाला आहे. कोणत्याही कल्याणकारी योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत जात आहे किंवा कसे हे काही काळानंतर फेरतपासून पहाण्याची आवश्यकता असते. आजच्या घडीला देशातील वाढती बेरोजगारी हा केंद्र सरकार पुढील सर्वात मोठी महत्त्वाची समस्या आहे. मात्र अर्थव्यवस्थेमध्ये होणारे सकारात्मक बदल व या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींमध्ये होणारी घट लक्षात घेता देशाच्या अन्नसुरक्षा कायद्याचा फेर आढावा घेण्याची वेळ आली असल्याचे नमूद करावेसे वाटते.

प्रा. नंदकुमार काकिर्डे (लेखक पुणेस्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)

अवंतिका ही व्यक्तिरेखा साकारल्यानंतर मी अधिक धीट, खंबीर झाले – अभिनेत्री मृणाल कुलकर्णी

अवंतिका मालिकेतील कलाकारांचा २० वर्षांनंतर पुनर्मिलन सोहळा

पुणे, दिनांक २९ मार्च २०२५ – “अवंतिका या मालिकेतील शीर्षक भूमिकेमुळे मी अभिनेत्री आणि माणूस म्हणूनही अधिक मोकळी होत गेले. मी अंतर्मुख होते, ती जरा बदलले आणि अधिक धीट, खंबीर झाले,” असे मनोगत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

अवंतिका या सन २००० च्या दशकात दूरचित्रवाणीवर प्रक्षेपित होणाऱ्या मराठी मालिकांमध्ये लोकप्रियतेचा कळस गाठणारी व मराठी रसिक मनांवर अक्षरश: अधिराज्य गाजवणारी मालिका म्हणून झी मराठी वरील अस्मिता चित्र निर्मित ‘अवंतिका’ या मालिकेची ओळख आहे. मार्च २००५ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या घटनेस आता २० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यातील आशुतोष देशपांडे व प्रसाद कामत यांच्या पुढाकाराने व पीवायसी हिंदू जिमखानाच्या सहकार्याने सदर मालिकेत काम केलेल्या प्रमुख कलाकारांना एकत्र आणून मालिकेसंबंधी आठवणी जागविणाऱ्या एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पीवायसी हिंदू जिमखाना येथे हा पुनर्मिलन सोहळा रंगला आणि सारे वातावरण स्मृतिकातर झाले.

या सोहळयाला मृणाल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री, सुलेखा तळवलकर, सारिका निलाटकर, रोहिणी निनावे, स्वारी राजे, प्रसाद कामत, दीपा लागू, शुभांगी दामले, वंदना वाकनीस, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, वृंदा अहिरे, राहुल मेहेंदळे, राधिका काकतकर, अशोक शिंदे, बालकलाकार सार्थक केतकर, श्रीराम पेंडसे, आशुतोष देशपांडे, अनुराधा जोशी आदी पडद्यावरील व पडद्यामागील कलाकार उपस्थित होते. आर जे श्रृती यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मृणाल कुलकर्णी अवंतिका मालिकेच्या आठवणी जागवताना म्हणाल्या, “आपली फसवणूक आणि प्रतारणा झाल्याचे लक्षात आल्यावर आणि त्या धक्क्यातून बाहेर आल्यावर अवंतिका जेव्हा घर सोडण्याचा निर्णय घेते, तो भाग मला जवळचा वाटतो. तो माझा आवडता सीन आहे. या प्रसंगात अवंतिका सेल्फ मेड होते. ती धीट, खंबीर, ठामपणे निर्णय घेणारी होते. या मालिकेतील कुठलीही व्यक्तिरेखा कृष्णधवल रंगात न रंगवता, पटकथाकार रोहिणी निनावे यांनी ग्रे रंगछटेत रंगवल्या होत्या. त्यामुळे कुठल्याच व्यक्तिरेखेला नकारात्मक किंवा खलनायकी छटा नव्हती. त्या काळात मी हिंदी मालिकांमध्ये व्यग्र होते. पण स्मिताताई आणि संजय सूरकर यांनी मला मराठी मालिकेत काम करण्यासाठी तयार केले. ही मालिका लोकप्रिय ठरली, कारण यामध्ये अतिरंजित काहीच नव्हते. सगळे वास्तववादी होते.”

संदीप कुलकर्णी म्हणाले, “या मालिकेच्या निमित्ताने माझी स्मिताताईंशी प्रथमच भेट झाली. मालिकेतील दीपाताई लागू (आईची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री) यांच्यासोबतचे प्रसंग मला आजही आठवतात, इतके ते प्रभावी आणि भावणारे होते. या मालिकेने मला ओळख दिली.”

सुबोध भावे म्हणाले, “मला सेटवरचा पहिला दिवस लख्ख आठवतो. मी नवीन होतो. मालिकेतील अनेक ज्येष्ठ कलाकारांचा सहवास, ते वातावरण हे सारे खूप शिकवणारे होते.”

पुष्कर श्रोत्री यांनी मालिकेदरम्यानचे काही किस्से सांगितले. मी स्मिताताईचा प्रचंड लाडका होतो आणि मी आम्हा सर्वांसाठी जेवण तयार करायचो असे ते म्हणाले.

सुलेखा तळवलकर म्हणाल्या, “लोक आपल्या मालिकेतील व्यक्तिरेखांसोबत भावनिकदृष्ट्या गुंतलेले असतात, याचे भान या मालिकेच्या निमित्ताने आले. मालिकेतील प्रत्येक ट्रॅक स्वतंत्र असूनही, त्याचे धागे मुख्य कथानकात एकजीव झाले होते.” अभिनेत्री सारिका निलाटकर म्हणाल्या, “माझी व्यक्तिरेखा विवाहबाह्य संबंध ठेवणारी होती, पण ती खलनायिका नव्हती. कारण प्रत्येक व्यक्तिरेखेला तर्कसंगत असा न्याय मालिकेत दिला होता.”

पटकथाकार रोहिणी निनावे म्हणाल्या, “स्मिताने मला प्रथम स्नेहलता दसनूरकरांची कथा दिली. ती मूळ कथा १५ पानांची होती. पण मालिकेसाठी त्यात भर घालणे गरजेचे होते. अनेक व्यक्तिरेखा नव्याने निर्माण कराव्या लागणार होत्या. या सर्व प्रक्रियेत स्मिताने माझ्यावर विश्वास ठेवला. आमचे छान सूर जुळले आणि कधीही कुठलाही वाद झाला नाही.”

संवादलेखक स्वाती राजे यांनी पत्रकारितेची पार्श्वभूमी उपकारक ठरल्याचा उल्लेख केला. “कथानकामध्ये नंतर अनेक नवी पात्रे येत गेली. नवे ट्रॅक आले. मला लेखनाची मोकळीक दिल्याने अधिक चांगले काम करता आले.”

ज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागू यांनी या मालिकेमुळे माझा अनेक कलाकारांशी परिचय झाला असे सांगितले. मराठीमध्ये मी असे काम करू शकेन की नाही, याविषयी मी साशंक होते, पण सर्वांनी मला विश्वास दिला आणि त्या सगळ्यांविषयी मला कृतज्ञता वाटते, असे त्यांनी नमूद केले. अवंतिका मालिकेतील कामाची विचारणा हे स्वप्नवत होते. मी नागपूरहून येऊन जाऊन काम केले, अशी आठवण अनुराधा जोशी यांनी सांगितली.

यावेळी मालिकेचे शीर्षकगीत पुन्हा निनादले. याविषयी बोलताना विभावरी आपटे म्हणाल्या, “अवंतिका मालिकेइतकेच त्याचे शीर्षकगीतही लोकप्रिय झाले होते. हे गीत सौमित्र यांनी लिहिले होते तर नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केले होते, मी नवीन असूनही हे शीर्षकगीत गाण्याची संधी संगीतकार नरेंद्र भिडे यांनी मला दिली. माझ्यावर विश्वास ठेवला आणि हे माझ्या कारकिर्दीतले पहिले शीर्षकगीत ठरले.” आपटे यांनी शीर्षकगीताचा काही अंश यावेळी उपस्थितांसमोर सादर केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री लक्ष्मी नृसिंह देवतांचे दर्शन

पुणे, दि. २९: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नृसिंह देवतांचे दर्शन घेऊन पूजा केली.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय शिवतारे, राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार रणजितसिंह देशमुख, माजी आमदार राम सातपुते, मुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री नृसिंह यांची कर्पूर आरती आणि महा आरती केली. तसेच श्री लक्ष्मींचे दर्शन घेतले. मंदिराचे मुख्य पुजारी प्रसाद दंडवते यांनी पूजा केली.

प्रदक्षिणावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर विकास आराखड्यातील कामांच्या प्रगतीची अधिकाऱ्यांकडून व विश्वस्तांकडून माहिती घेतली. मुख्य विश्वस्त ज्ञानेश्वर अरगडे, विश्वस्त अभय कुमार वांकर, डॉ. प्रशांत सुरू यांनी देवस्थान ट्रस्टच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. ग्रामस्थांच्यावतीने सरपंच अर्चना सरवदे तसेच सदस्यांनी स्वागत केले.

यावेळी प्रांताधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार जीवन बनसोडे आदी उपस्थित होते.

व्हिंटेज व क्लासिक कार्स प्रदर्शनाचे योहान पूनावाला यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

पुणे-मागील शतकातील दुर्मिळ व नामवंत अशा हंबर, क्रायस्लर, ऑस्टिन, लिमोझिन, एरियलस्लोपर, मर्सिडीज बेंझ, रोल्स रॉयस, बीएमडब्ल्यू, फोर्ड, इंपाला, शेवरले, एमजी,फोक्सवॅगन, ओव्हर लँड, सिट्रॉन, फियाट अशा १०० हून अधिक दुर्मिळ व्हिंटेज आणिक्लासिक कार्स व १०० हून अधिक दुर्मिळ मोटरसायकल्स व स्कूटर्सचे भव्य प्रदर्शनाचेउद्घाटन पुण्यातील व्हिंटेज व क्लासिक कार्सचे प्रख्यात संग्राहक योहान पूनावाला यांच्या
हस्ते रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे आज संपन्न झाले. यावेळी हजारो पुणेकरांनी गर्दीकेली होती. हे प्रदर्शन रविवारी देखील सकाळी १०.०० ते सायं ६.०० पर्यंत नागरिकांसाठीविनामूल्य खुले आहे.
व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया यांनी याचे आयोजन केले असून वेस्टर्न इंडियाऑटोमोबाईल असोसिएशनचा सहयोग लाभला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारमिळाल्याबद्दल योहान पूनावाला यांचे विशेष सत्कार व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफइंडियातर्फे करण्यात आला. तसेच पुण्याचे पहिले महापौर कै. बाबुराव सणस यांच्यास्मृतीप्रित्यर्थ या प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट व्हिंटेज कार व सर्वोत्कृष्ट क्लासिक कार यांना विशेष
ट्रॉफी देण्यात आली.मिशेलिन इंडिया आणि एन एम टायर्स हे मुख्य प्रायोजक असून, रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फक्लब (RWITC) यांचे सहप्रायोजक आहे. तसेच, महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सहकार्यानेआणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन (WIAA) यांच्या संयुक्त विद्यमाने हा
सोहळा संपन्न होत आहे. वेंकीज ग्रुप हे देखील प्रायोजक आहेत.
याप्रसंगी उद्घाटन करतांना योहान पूनावाला म्हणाले की, पुण्यात व्हिंटेज आणि क्लासिककार प्रदर्शनाचे पुन्हा आयोजन होत आहे ही आनंदाची बाब आहे. या इव्हेंटला ग्लॅमर आहेतसेच हा इव्हेंट आनंदही देणारा आहे. त्यामुळेच माझ्या संग्रहातील अनेक व्हिंटेज व क्लासिक गाड्या मी यात प्रदर्शित करतो. पुणेकरांनी फार मोठा प्रतिसाद दिला याबद्दलत्यांनी पुणेकरांचे आभार मानले.
याप्रसंगी व्हिंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन डोसा,सुभाष.बी.सणस व्हिंटेज अँड क्लासिक कार म्युझियमचे सुभाष सणस, वेस्टर्न इंडियाऑटोमोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी, सरचिटणीस अर्णव एस., माजीसरचिटणीस व या प्रदर्शनाचे जज सुभाष गोरेगावकर, झवारे पूनावाला, निशांत डोसा,धनंजय बदामीकर, एनएम टायर्सचे अनिल मेहता व निशांत मेहता यांसह व्हिंटेज अँड
क्लासिक कार्सचे संग्राहक व प्रेक्षक मोठ्ये संख्येने उपस्थित होते.मुंबईचे अब्बास जसदानवाला यांची भारतातील सर्वात जुनी धावणारी १९०३ची कार हंबर, सुभाष.बी.सणस व्हिंटेज अँड क्लासिक कार म्युझियमचे सुभाष सणस यांच्यामालकीच्या १२ गाड्या असून नेताजी सुभाषचंद्र बोस कुटुंबीयांनी वापरलेली डॉज किंग्सवे,माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वापरलेली कन्व्हर्टेबल इंपाला, हॉलिवूड स्टार अलपचिनो यांची मर्सिडीज बेंझ, बाळासाहेब ठाकरे, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, चंकी पांडे यांच्या मर्सिडीज बेंझ, ब्रुनेईचे राजे यांची १९८१ मर्सिडीज-बेंझ लिमोझिन, जर्मन पोलिसप्रमुखांनी वापरलेली १९८२ मर्सिडीज-बेंझ इत्यादी, नितीन डोसा यांच्याकडील १९५२ची मद्रास गव्हर्नर यांची क्रायस्लर कन्व्हर्टिबल, यश रुईया यांच्याकडील १९४७ एमजी, योहान पूनावाला यांच्या संग्रहातील २० व्हिंटेज कार प्रदर्शनात असून त्यामध्ये १९२७ची रोल्सरॉयस २० एचपी, १९४९ची बेंटले मार्क ६, १९५९ची बीएमडब्ल्यू इसेटा ३००, १९६२ची फोक्सवॅगन बीटल, २०१५ची फेरारी अपर्टा इत्यादी, श्रीकांत आपटे यांची १९३१ची शेवरले, शेखर सावडेकर यांची १९४२ची फोर्ड जीप, १९१९ ओव्हर लँड, धनंजयबदामीकर यांच्या संग्रहातील १० व्हिंटेज कार प्रदर्शनात असून १९४६ची सिट्रॉन ट्रॅक्शनअवंत, हरित त्रिवेदी यांची १९३१ची एरियल स्लोपर, संजय साबळे यांच्या संग्रहातील ५व्हिंटेज कार, डॉ. प्रभा नेने यांची ऑस्टिन ७ व अन्य सेलिब्रिटीज यांच्या व्हिंटेज कार्सचासमावेश आहे.
या व्यतिरिक्त ‘बॉबी’ फेम राजदूत मोटार सायकल, १९३८ची सर्वात जुनी मोटारसायकलनॉर्टन 500 देखील प्रदर्शित केले आहे.
पुणेकरांनी या प्रदर्शनासाठी मोठा प्रतिसाद दिला. या बद्दल नितीन डोसा आणि सुभाष सणस यांनी पुणेकरांना धन्यवाद देऊन रविवारी पाडव्याचा दिवशी देखील हे प्रदर्शनबघण्यास यावे असा आग्रहाचे निमंत्रण दिले.

छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वढू येथे समाधी पूजन

कट्टर हिंदुत्ववादी, भाजपचे माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे व्यासपीठावर उपस्थित

वढू व तुळापूर बलीदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. २९ : छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे असून पुढील अनेक पिढ्यांना स्फूर्ती आणि ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या वढू येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलीदान स्थळाला पर्यटन क्षेत्र नव्हे तर तीर्थक्षेत्राचाच दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या पुण्यतिथी निमित्त वढू बुद्रुक येथे समाधीस्थळी आयोजित संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कट्टर हिंदुत्ववादी, भाजपचे माजी नगरसेवक मिलिंद एकबोटे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार महेश लांडगे आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महंत रामगिरी महाराज, पुरुषोत्तम मोरे, माणिक मोरे, अक्षय महाराज भोसले तसेच वढू ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र ही साधू-संतांची, वीरांची भूमी आहे. छत्रपती संभाजी महाराज हे देव, देश आणि धर्मासाठी लढणारे राजे होते. त्यांच्या स्मृती स्थळाच्या विकासासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विकास कामे करताना पावित्र्य कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. दोन्ही स्थळांचा राज्याच्या लौकिकाला साजेसा विकास करण्यात येईल. या कामाला गती देऊन दर्जेदार कामे करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगून वढू व तुळापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाहीही श्री. शिंदे यांनी दिली.

ते म्हणाले, राज्य शासन हे लोककल्याणकारी आहे. छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शावर चालणारे हे सरकार असून जनकल्याणाचा संकल्प शासनाने केला आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात अनेक विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबविल्या. तीर्थक्षेत्र, गडकोट किल्ले यांच्या विकासाला प्राधान्य दिले. गडकोट किल्ले हे आपले धरोहर आहेत. गडकोट किल्ल्यांवरील अतिक्रमण प्राधान्याने काढण्यात येईल. गड-किल्ल्यांचे पावित्र्य जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ते म्हणाले, मुंबईतील सागरी मार्गाला धर्मरक्षक संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांची जयंती गेट वे ऑफ इथे साजरी करण्यात आली, ही अभिमानाची बाब आहे.

वढू गाव हे महाराष्ट्राचे उर्जास्थान आहे. वढू हे स्वराज्य तीर्थ असून या स्वराज्य तीर्थाकडून मिळणारी शक्ती एकवटून महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन जायचे आहे, असे सांगून गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. गोशाळेला अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आवश्यकता असल्यास गोहत्या रोखण्यासाठी आणखी कडक कायदा करण्यात येईल. गोरक्षकांचे काम करणाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले. तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार दरवर्षी आजच्या बलिदान दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महंत रामगिरी व आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी आपले विचार मांडले. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराज यांना धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात धर्म रक्षणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना शंभूसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.प्रारंभी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते समाधीचे पूजन करण्यात आले. तसेच शासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते.