Home Blog Page 387

पुण्यात संगीत आणि साहित्योत्सवाने होणार ग्रंथाली’च्या सुवर्ण महोत्सवाची सांगता


सांगीतिक मैफल व जन्मशताब्दी स्मृतिजागर
पुणे : ग्रंथाली वाचनप्रसार आणि संस्कृतिकारण करणारी संस्था सर्वदूर मराठी मुलाखत प्रसिद्ध आहे. 1974मध्ये आरंभ करत ग्रंथालीने अनेक साहित्यात्रा योजल्या. ग्रंथयात्रा, ग्रंथमोहोळ, ग्रंथएल्गार, बहुजन साहित्य यात्रा, विपुल ग्रंथयात्रा, विजय तेंडुलकर संवादयात्रा…. यातील बर्‍याच यात्रांची सांगता पुण्यात झाली. या वाटचालीत अनेक जण सहभागी होत गेले. नवविचारांची, नवलेखकांची पुस्तकं ग्रंथालीने प्रसिद्ध केली. बहुजनांच्या दुःखाचा हुंकार त्यात होता. विविध विषय नव्याने पुढे येत होते, नवे लेखक घडत होते. त्याचवेळी ग्रंथाली सामाजिक-सांस्कृतिक भान राखत जगण्याच्या सर्वांगांना भिडणार्‍या कलांचेही व्यासपीठ झाली.
गेल्या वर्षी 4 एप्रिल रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या ग्रंथालीने डिजिटल माध्यमातही आपली वाट चोखाळली आहे. विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
नुकताच विलेपार्ले येथे जयवंत दळवी, गंगाधर गाडगीळ आणि विद्याधर पुंडलीक यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या साहित्याचा स्मृतिजागर घडवला.
सुवर्ण महोत्सवाची सांगता करतानाही, शुक्रवार, 4 एप्रिल ते रविवार 6 एप्रिल 2025, असे तीन दिवस ग्रंथालीने भव्य संगीत आणि साहित्योत्सव योजला आहे. तो संवाद, पुणे, महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने व पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने होईल.
यामध्ये 4 एप्रिल रोजी, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत सांगीतिक मैफल रंगणार आहेत. नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, विदुषी अश्‍विनी भिडे-देशपांडे आणि भुवनेश कोमकली यांच्या गायनाने सांगता समारंभाची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर लाइव्ह पोर्ट्रेट रेखाटन करणार आहेत.
जयवंत दळवी आणि गंगाधर गाडगीळ यांचे साहित्य आणि व्यक्तित्व उलगडणारे कार्यक्रम शनिवार, 5 तारखेला ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत होईल. तर रविवारी, 6 तारखेला सकाळी 10.30 ते 1 या वेळेत विद्याधर पुंडलीक यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम होईल. रामदास भटकळ, कुमार केतकर यांच्या मार्गदर्शनात आखलेल्या या कार्यक्रमाच्या संहिता राजीव नाईक व मोनिका गजेंद्रगडकर यांनी लिहिल्या आहेत. प्रत्येक साहित्यिकावर निर्मित लघुचित्रफीत त्यांचे जीवन व कार्य सांगेल. त्याचे लेखन संपादन राजीव जोशी यांनी केले आहे. यामध्ये अभिवाचन, पुस्तिका प्रकाशन, नाट्यप्रवेश असेल. मराठी रंगभूमी, सिनेमा-मालिकांतील ख्यातनाम कलावंत या साहित्याच्या आविष्कार आपल्या वाचिक अभिनयातून चित्रदर्शी साकार करतील. चंद्रकांत काळे, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, प्रमोद पवार, स्वाती चिटणीस, शैलेश दातार, प्राजक्त देशमुख, ऐश्‍वर्या नारकर, रजनी वेलणकर, मधुरा वेलणकर-साटम, पुष्कर श्रोत्री, अनिता दाते, अभिजित खांडकेकर, गौतमी देशपांडे, पूर्वा पवार, मोहित वैद्य, विशाख म्हामणकर आणि मोनिका गजेंद्रगडकर असे कलावंत यात सहभागी होत आहेत.
याचबरोबर या दोन्ही कार्यक्रमांत ग्रंथालीच्या 50 वर्षांतील उपक्रम व कार्यक्रमांचा आढावा ग्रंथालीचे विश्‍वस्त सुदेश हिंगलासपूरकर, डॉ. मृण्मयी भजक मांडतील. तसेच ग्रंथप्रदर्शन व सवलतीत विक्री होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. पुढील काही रांगा राखीव असतील. 4 तारखेच्या कार्यक्रमासाठी प्रवेशिका मिळण्यासाठी सुनील महाजन 9371010432 (संवाद, पुणे) आणि 5 व 6 तारखेच्या प्रवेशिकांसाठी राजेश देशमुख 8698580739 (सचिव, महाराष्ट्र कल्चरल सेंटर) आणि दोन्ही कार्यक्रमांसाठी आर्या करंगुटकर 9004949656 व धनश्री धारप 9223466860 या क्रमांकांवर संपर्क साधावा. प्रवेशिक दोन्ही थिएटरवर 1 एप्रिल 2025 पासून उपलब्ध असतील, असे ग्रंथालीच्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारप कळवतात.

ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत भारतीय नौदलाची जहाजे मदत सामग्रीसह रवाना

मुंबई-म्यानमार आणि थायलंडमध्ये 28 मार्च 2025 रोजी झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर, भारत सरकारने म्यानमारला मदत करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या (एमइए) निर्देशांनुसार, एकात्मिक संरक्षण स्टाफ मुख्यालय, भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या सहकार्याने मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (एचएडीआर) प्रयत्न सुरू आहेत.

एचएडीआर अंतर्गत भारतीय नौदलाच्या त्वरित प्रतिसादाचा भाग म्हणून, पूर्वी नौदल कमांड मधील सातपुडा आणि सावित्री ही भारतीय नौदलाची जहाजे 29 मार्च 2025 रोजी यंगून साठी रवाना झाली आहेत.  ही भारतीय नौदलाची आपत्कालीन मानवतावादी मदत व आपत्ती निवारण (एचएडीआर) प्रतिसादाची तात्काळ कारवाई आहे.तसेच, अंदमान आणि निकोबार कमांड मधील भारतीय नौदलाची जहाजे कर्मुक आणि एलसीयू 52 देखील 30 मार्च 2025 रोजी यंगून कडे मदतकार्यासाठी रवाना होतील.

या जहाजांवर सुमारे 52 टन मदत सामग्री चढवण्यात आली

आहे, ज्यामध्ये आवश्यक कपडे, पिण्याचे पाणी, अन्न, औषधे आणि आपत्कालीन वस्तूंचा समावेश आहे. भारतीय नौदल हा या प्रदेशातील “पहिला प्रतिसादकर्ता” (फर्स्ट रिस्पॉन्डर) म्हणून कार्य करण्याच्या भारताच्या संकल्पनेप्रति पूर्णतः कटिबद्ध आहे.

संरक्षण मंत्रालयात पदवीधर, बारावी पाससाठी भरती; वयोमर्यादा 55 वर्षे आणि पगार 47,000 पर्यंत

संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आर्मर्ड व्हेइकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (AVNL) ने स्टोअर कीपर, असिस्टंट, टेक्निशियन आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार अधिकृत वेबसाइट avnl.co.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. ही रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने भरली जात आहे. उमेदवारांना फॉर्म ऑफलाइन भरावा लागेल.

रिक्त पदांची माहिती:

ज्युनिअर मॅनेजर एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग: ०१ जागा
डिप्लोमा टेक्निशियन (सीएनसी ऑपरेटर): ०१ जागा
डिप्लोमा टेक्निशियन टूल डिझाइन: ०२
सहाय्यक कायदेशीर: ०१
दुकाने/एमएम/खरेदी: २
ज्युनिअर मॅनेजर/मेकॅनिकल: ०१ जागा
स्टोअर कीपर: ०२ जागा
एकूण पदांची संख्या: १०
शैक्षणिक पात्रता:

ज्युनिअर मॅनेजर एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग-

पर्यावरण अभियांत्रिकी पदवी
डिप्लोमा तंत्रज्ञ-

संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा
सहाय्यक कायदेशीर-

बीएसएल, एलएलबी
स्टोअर कीपर-

१२वी पास
वयोमर्यादा:

जास्तीत जास्त ५५ वर्षे
पगार:

दरमहा ₹३७,००० – ₹४७,०००
निवड प्रक्रिया:

स्क्रीनिंग चाचण्या
मुलाखत किंवा लेखी परीक्षा
अर्ज पाठविण्याचा पत्ता:

आर्म्ड व्हेईकल कॉर्पोरेशन लिमिटेड, मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी

ऑर्डनन्स इस्टेट, अंबरनाथ-४२१५०२, ठाणे, महाराष्ट्र


राष्ट्रीय आरोग्य अभियानात बारावी उत्तीर्ण डॉक्टरांची भरती; वयोमर्यादा ४३ वर्षे, ७० हजारांपर्यंत पगार

राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र मध्ये ९४ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार nrhm.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ एप्रिल निश्चित करण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये ५०० कंडक्टर पदांसाठी भरती; अर्ज आजपासून सुरू, वयोमर्यादा ४० वर्षे

राजस्थान कर्मचारी निवड मंडळाने राजस्थान राज्य परिवहनमध्ये ५०० कंडक्टर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट rssb.rajasthan.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

पाच हजार जलज्योतींनी केला 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प

जनसेवा न्यास, हडपसर आणि अमनोरा येस्स फाऊंडेशनतर्फे गुढीपाडव्यानिमित्त महिलांची भव्य रॅली

पुणे : जनसेवा न्यास, हडपसरतर्फे अमनोरा येस्स फाऊंडेशनच्या सहकार्याने गुढीपाडव्यानिमित्त रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या हिंदू महिला महोत्सवात सहभागी झालेल्या हडपसर परिसरातील सुमारे पाच हजार जलज्योतींनी येत्या वर्षभरात 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प केला. रॅलीत सहभागी झालेली प्रत्येक महिला एका कुटुंबाला पाण्याच्या बचतीसाठी उद्युक्त करणार आहे.

हडपसर परिसरातील माळवाडी, वैदुवाडी, रामटेकडी, ससाणे नगर, गोंधळे नगर/सातववाडी, फुरसुंगी/भेकराई नगर, बी. टी. कवडे रोड, मगरपट्टा, अमनोरा, शेवाळवाडी, मुंढवा/मांजरी, कुमार पिकासो, उंड्री/पिसोळी, व्हिनस वर्ल्ड स्कूल, अमरसृष्टी तसेच अमनोरामधील महिलांची अस्पायर टॉवर्स आणि अवंतिकांची मेट्रो टॉवर्स समोरून अशा एकूण 17 ठिकाणांहून सायंकाळी महिलांच्या दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. नऊवारी साडी या पारंपरिक वेशभूषेत महिला मराठमोळा फेटा बांधून रॅलीत सहभागी झाल्या होत्या. दुचाकी रॅलीची सांगता अमनोरा क्रिकेट ग्राउंड, एड्रिनो टॉवर समोर, अमनोरा, हडपसर येथे झाली. प्रयागराज येथील जलकलशाचे पूजन करून 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प करण्यात आला. समारोपस्थळी दुचाकीद्वारे आलेल्या महिलांचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.
अमनोरा येस्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, राष्ट्र सेविका समितीच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य चंदाताई साठे, प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, जनसेवा न्यासाचे कार्यकारी विश्वस्त माधव राऊत, विश्वस्त भूषण तुपे, सी. ई. ओ. चेतन कुलकर्णी, अमनोरा येस्स फाऊंडेशनचे विवेक कुलकर्णी, प्रविण पाताळे, महेश करपे यांची मंचावर प्रमुख उपस्थित होती. कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाली. या वेळी जलज्योती संकल्पनेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पाणी बचतीसंदर्भात जनजागृतीला येत्या काही दिवसात सुरुवात होणार असून या गणेशोत्सवापासून पुढील गणेशोत्सवापर्यंत 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प पूर्ण केला जाणार असल्याचे अमनोरा येस्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. ते पुढे म्हणाले, देशात महिला शक्ती मोठ्या प्रमाणात कार्यरत असून त्यांनी कुटुंबातील प्रत्येकाला पाणी बचतीचे महत्त्व पटवून देत त्याची साखळी निर्माण केल्यास 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प नक्कीच पूर्णत्वास जाईल.

प्रार्थना बेहेरे म्हणाल्या, आज उपस्थित नारीशक्तीचे दर्शन अत्यंत सकारात्मक असून प्रत्येक स्त्रीने आपल्या कुटुंबाला पाणी बचतीचे महत्त्व पटवून देत जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय संपत्तीचा ऱ्हास थांबविणे या संकल्पनेतून साकार झालेला हा उपक्रम अभिनंदनीय आहे.

चंदाताई साठे म्हणाल्या, मराठी नवीन वर्षाची सुरुवात पाणी बचतीच्या संकल्पाने होत आहे, ही आनंददायक बाब आहे. आज उपस्थित असलेल्या महिला शक्तीच्या बळावर ही संकल्पना नक्कीच पूर्णत्वास जाईल, असा विश्वास वाटतो. वसुधैव कुटुंबकम्‌‍ आणि सर्वे भवन्तु सुखिन: या संस्कृतीची जपणूक भारतीय हिंदू परंपरा करत आहे. ही संस्कृती पुढील पिढीपर्यंत प्रवाहित ठेवण्यासाठी आजच्या पिढीने तार्किक, ऐतिकहासिक, शास्त्रियदृष्ट्या सखोल अभ्यास करून त्यांच्यापर्यंत हिंदू संस्कृतीचे महत्व पोहोचविणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेला आई-बहिण मानण्याची हिंदू संस्कृती घराघरात प्रस्थापित होणे आजच्या काळाची गरज आहे.

उपजिल्हाधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न; पत्नी आणि तिच्या मित्रासह 6 जणांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर- उपजिल्हाधिकारी असलेल्या आपल्या पतीचा खून मित्राच्या मदतीने करणारी पत्नी आणि तिच्या मित्रासह पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या पत्नीने मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकाऱ्याला ठार मारण्याचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके (५०, रा. जालाननगर) यांनी तक्रार दिली. पत्नी सारिका हिने आपल्या कुटुंबीयांसह कट रचून विषप्रयोग, अघोरी विद्येचा वापर आणि हत्येचा प्रयत्न केला. पत्नीच्या मित्राने केंब्रिज चौकात पिस्तूल रोखले, असा आरोप त्यांनी केला आहे. कटके यांच्या तक्रारीवरून पत्नी, तिचा मित्र विनोद उबाळे (३८) आणि भाऊ आतिष देशमुख (४२) यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

कटके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी २००० मध्ये सारिका हिच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर काही दिवसांतच सारिकाने त्यांच्याकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरला. मात्र, आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनुसूचित जातीचे लाभ बंद केल्याबाबत शासन निर्णय झाला. त्यानंतर आपल्याला हे लाभ मिळणार नाहीत हे लक्षात येताच तिचे वर्तन बदलले. कटके यांच्याकडे स्कोडा कार (एमएच २१, एएक्स ०१०५) आहे. ती कार पत्नी वापरते.

सुरक्षेसाठी या कारला ‘जीपीएस’ यंत्रणा बसवली आहे. ३ मार्च रोजी ही कार वेगळ्या मार्गाने येत असल्याचा जीपीएस अलर्ट कटके यांना आला. त्यांनी लगेचच गाडीचा पाठलाग सुरू केला. रात्री साडेआठ वाजता केंब्रिज चौकात ही कार दिसली. तेथे बाजूलाच दुसरी कार (एमएच २१ बीयू ८१११) उभी होती. ती कार विनोद उबाळे वापरत असल्याचे कटके यांना माहिती होते. तेथेच उबाळेने देवेंद्र कटके यांच्यावर पिस्तूल रोखले. जातिवाचक बोलून ‘आडवा आलास तर उडवून टाकील,’ अशी धमकी दिली होती. तसेच घरी सारिकाने जातिवाचक शिवीगाळ केली. घरातील नोकरांसमोरच, ‘तू कलेक्टर झाला तरी खालच्या जातीचाच आहेत,’ असे बोलून अपमान केला. ‘काय व्हायचे ते होऊ दे, रक्तपात झाला तरी चालेल,’ अशा धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सारिका, विनोद उबाळे, सारिकाची आई सुवर्णाबाई, भाऊ आतिष, मोलकरीण छायाबाई, संगीताबाई या सर्वांनी कट रचून कटके यांच्यावर अघोरी विद्येचे प्रयोग केले. त्यांना जेवणातून विषबाधा करून मारण्याचा कट रचला. घरात देवेंद्र यांच्या गादीखाली काळे झालेले लिंबू, सुई टोचलेली बाहुली आढळली. फुलदाणीत बिबे, स्मशानातील राख, कोळसा, लवंगांची माळ, शेंदूर असे साहित्य दिसून आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

२०२१ मध्ये सारिकाने शाळा सुरू करण्याबाबत हट्ट धरला. त्यामुळे जालना जिल्ह्यातील बोरखडी शिवारात ग्रीनलँड इंग्लिश स्कूल सुरू करून दिली. शाळेचा संपूर्ण कारभार सारिका सांभाळायला लागली. शाळेच्या जवळच आरोपी विनोद उबाळे याचे सद्गुरू सदानंद नावाचे हॉटेल होते. शाळेच्या कार्यक्रमात जेवणाच्या ऑर्डर तो घेत होता. त्या वेळी त्यांची ओळख झाली. तो मनोज जरांगे यांचा कार्यकर्ता आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. तिघांना २ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

मशिदीच्या खिडकीतून येत पुरली स्फोटके,नंतर दोघे लपले मक्याच्या शेतात‎..मोबाइल लोकेशनवरुन अटक,५ दिवसांची‎ कोठडी

गेवराईमशिदीत जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट घडवल्याची घटना ‎अर्धमसला (ता.गेवराई) गावात घडली. या घटनेनंतर दोन्ही ‎संशयित विजय गव्हाणे व अशोक तागडे हे दुचाकीने ३५‎किमीवरील शिंपेगाव येथे पळून गेले. शिंपेगाव हे संशयित‎गव्हाणेच्या मावशीचे गाव आहे. दोघे त्या गावात मावशीच्या‎मक्याच्या शेतात लपून बसले होते. गेवराई पोलिसांनी घटनेनंतर ३‎तासांतच रविवारी सकाळी ६ वाजता दोघांना शेतातून अटक‎ केली. दोघांनी स्फोटासाठी मशिदीच्या मागील खिडकीतून प्रवेश‎करत खड्डा खोदून जिलेटिन पुरले होते. मोबाइल लोकेशनवरून‎त्यांना पोलिसांनी पकडले.‎अर्धमसला येथील शेतकरी जना कांदे‎ यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरु‎आहे. त्या कामावरून संशयित विजय‎ गव्हाणे याने जिलेटीनच्या कांड्या चोरून‎आणल्या होत्या. त्यांचा वापर‎स्फोटासाठी केला. दोघांना गेवराई‎ न्यायालयाने ३ एप्रिलपर्यंत ५ दिवसांची‎ पोलिस कोठडी सुनावली आहे.‎

पोलिस अधीक्षक‎नवनीत काँवत, संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस‎ महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी अर्धमसला गावात जाऊन ‎व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून पंचनामा करत पाहणी केली.‎जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनीही गावात जाऊन माहिती ‎घेतली आहे. राशेदअली हुसेन सय्यद (६९) यांनी तलवाडा‎ पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर भारतीय न्याय संहिता‎२०२३ अंतर्गत समाजात तेढ निर्माण करणे, कट रचणे,‎जातिवाचक शिवीगाळ, स्फोट घडवणे, धार्मिक भावना दुखावणे‎कलम २९८, २९९, १९६, ३२६(जी), ३५१(२), ३५२, ६१(२),‎३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० मिनिटांत‎ पोलिसांना कळवले अर्धमसला गावातील माजी सरपंच‎ बाळासाहेब राऊत यांनी स्फोटाची माहिती पोलिसांना दिली.‎घटनेनंतर गावात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.‎

या गुन्ह्यातील संशयित विजय‎ गव्हाणे याचे घर मशिदीपासून २००‎ मीटर अंतरावर आहे. घटनास्थळी‎ पोलिसांना एक टॉर्च , फरशीचे‎ तुकडे मिळाले. संशयिताने ‎मशिदीपासून वायर टाकून घरात‎ बसूनच स्फोट घडवला असावा‎ असा अंदाज आहे.‎

घटनेच्या निषेधार्थ गेवराई‎शहरातील शास्त्री चौकात‎शहर बंद करण्याचा निर्णय‎ घेतला होता, तर काही‎ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकाने‎बंद ठेवली होती. गेवराईचे‎आमदार विजयसिंह पंडित‎यांनी मध्यस्थी केली.‎तपासात हलगर्जीपणा ‎झाल्यास आंदोलन‎ करण्याचा इशारा त्यांनी‎दिला. त्यामुळे गेवराई शहर‎बंदचा निर्णय मागे घेण्यात‎आला. तर दुसरीकडे‎घटनेचा निषेध म्हणून ‎तलवाडा येथील व्यापारी ‎बांधवांनी दुकाने बंद ठेवली ‎होती. मात्र, आरोपींना अटक ‎होताच बाजारपेठ पुन्हा सुरू‎केली. व्यापाऱ्यांनी घटनेचा ‎निषेध नोंदवला.‎

शिवमणी च्या ‘पुष्पांजली’ ने ‘दगडूशेठ’ संगीत महोत्सवात नादब्रह्मची अनुभूती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा ४१ वा वर्धापनपदिन ; बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. प्रशालेच्या प्रांगणात आयोजित महोत्सवाचे उद्घाटन

पुणे : ड्रम, डफ, घुंगरू, शंख यांसह विविध वाद्यांवर नाद उमटवित रसिकांना मंत्रमुग्ध करणारे वादन सादर करताना प्रख्यात ड्रम वादक शिवमणी, रुना रिझवी शिवमणी, पंडित रविचारी व सहका-यांनी ‘पुष्पांजली’ स्वरमैफलीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या संगीत महोत्सवाचा प्रारंभ झाला. पुणेकरांनी हे वाद्यवादन प्रत्यक्ष अनुभवताना नादब्रह्माची अनुभूती घेतली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४१ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडव्यापासून बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेच्या प्रांगणात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पदमश्री शिवमणी यांच्या हस्ते झाले.

यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपासिंग गिल, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुष्पांजली कार्यक्रमाचा प्रारंभ गणेश वंदनेने झाला. त्यापूर्वी बहारदार सनई वादनाने मैफलीचा प्रारंभ झाला. यावेळी प्रथम तुला वंदितो, तुज मागतो मी आता, बाप्पा मोरया रे., चिक मोत्याची माळ, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया.. या गीतांचे स्वर सनई या पारंपरिक वाद्यातून रसिकांना ऐकायला मिळाले.

प्रास्ताविकात ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले, चौदा विद्या चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणरायासमोर ही संगीत सेवा रसिकांसाठी अनेक वर्षांपासून उपलब्ध करून दिली जात आहे. यंदा ३ एप्रिल पर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील दिग्गज कलाकारांचा कलाविष्कार अनुभविण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० यावेळेत हे कार्यक्रम होणार आहेत. यंदाचा संगीत महोत्सव वैविध्यपूर्ण कलांनी सजलेला असून महोत्सवात वाद्यवादन, शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत, नाट्यपदे व भक्तीगीते, लोकगीते, भारुड, चित्रपटगीतांसह बाबुजी आणि मी, भावसरगम या सुप्रसिद्ध कार्यक्रमांचा समावेश आहे.

रसिकांसाठी वाहने पार्किंग व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटर समोरील नू.म.वि.प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. संगीत महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

धर्माच्या नावावर तुम्हाला देश नाही बांधता येत, हे तुर्की ना अगोदर समजले : राज ठाकरे….

धर्म घराच्या उंबरठ्याच्या आत सांभाळला पाहिजे:राज ठाकरे

महाराष्ट्रातील 55 नदीपट्टे प्रदूषित, मुंबईतील चार नद्या मारल्या – ठाकरे
महाराष्ट्रातील नद्यांची परिस्थितीही बिकट आहे. कोकणातील सावित्री नदी केमिकलने भरली आहे. महाराष्ट्रातील 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत. यामध्ये सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या उल्हास, मिठी, मुळा-मुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, वैनगंगा, चंद्रभागा, मुचकुंडा, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, ढोरणा या नदीपात्रांमधील पाणी हे अत्यंत वाईट आहे. हा माझा रिपोर्ट नाही, असे राज ठाकरे म्हणाले. मुंबईत पाच नद्या होत्या. त्यातील चार मेल्या. म्हणजे त्या मारल्या. सांडपाणी, झोपडपट्टी यांमुळे त्या चार नद्या मेल्या. आता पाचवीही मिठी नदी मरायला आली आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
तर चीनची भिंत बांधली गेली असती
प्रत्येकाला आपापला धर्म प्यारा असतो. प्रत्येकाने आपापल्या धर्मामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत. ज्यावेळेला गंगेवरच्या या सगळ्या गोष्टी पाहत होतो, त्यावेळी मला कळेना हे कसे काय चालले. काय म्हणे 65 कोटी लोक येऊन गेले. म्हणजे अर्धा भारत आला का? असे म्हणत राज ठाकरे यांनी कुंभमेळ्याला आलेल्या आकडेवारीवर सवाल उपस्थित केला. त्यातील 5 लाख आपण व्हिआयपी आणि व्हिव्हिआयपी पकडू. बाकीचे काठावरच बसले असतील. प्रत्येकाची जरी दोनशे दोनशे ग्रॅम पकडली, तर चीनची भिंत बांधता आली असती, असे राज ठाकरे म्हणाले.
देशाच्या नैसर्गिक गोष्टींवर अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल, तर त्याचे काय करायचे?
ही गंगेची परिस्थिती आहे. आतापर्यंत 33 हजार कोटी रुपये खर्च झाले त्यावर. नुसते अग्नी दिल्यासारखे करतात आणि तसेच प्रेत पाण्यात ढकलून देतात. हा कोणता धर्म? देशाच्या नैसर्गिक गोष्टींवर अशा प्रकारचा धर्म आडवा येत असेल, तर त्याचे काय करायचे? असा सवाल राज ठाकरे यांची केला. आपल्या गोष्टींमध्ये आपण सुधारणा करायला नको का? असेही ते म्हणाले. काळ बदलला, लोकसंख्या वाढली. हजार वर्षांपूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या. आताच्या गोष्टी वेगळ्या आहेत. हे सर्व विधी करण्यासाठी वेगळ्या घाटावर एखादी जागा करता येत नाही का? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
गंगेत अंघोळ केल्यानंतर अनेक जण आजारी पडले – राज ठाकरे
निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय झाले. अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे आणि शुभेच्छांचे अनेक फोन नेमके आजच आले. आज का आले? याचा अर्थ मला समजतो. गेले काही दिवस ज्या काही घटना घडल्या? त्यातील काही गोष्टी तुम्हाला सांगणे आवश्यक आहे, असे मला वाटते.
त्यातील पहिला विषय म्हणजे कुंभमेळा. आमच्या बाळा नांदगावकरांनी पाणी आणले. मी ते पिण्यास नकार दिला. नव्याने वारे शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटले मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहात का? आपल्या देशातील नद्यांची भीषण अवस्था आहे. जिला आपण माता म्हणतो, देवी म्हणतो त्या नद्यांकडे आजचे राज्यकर्ते नाही, खूप वर्षांपासूनचे गंगा साफ करावी, असे बोलणारी पहिली व्यक्ती म्हणजे राजीव गांधी. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी गंगा साफ करण्याचे काम सुरू केले. तेव्हापासून अजून गंगा साफ करत आहेत. त्यानंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्यांनीही गंगा साफ करणार असे सांगितले.
आपल्याकडील देशामधील नद्यांची अशी अवस्था आहे की, पाणी पिणे लांबची गोष्ट, तुम्ही अंघोळ करू शकत नाहीत. माझ्याकडे उत्तरेतील लोक येऊन गेले. त्यांनी सांगितले की, कित्येक लाखो लोक इथे अंघोळ केल्यानंतर आजारी पडलेले आहेत. प्रश्न हा गंगेच्या, कुंभमेळ्याच्या अपमानाचा नाहीये. तर प्रश्न हा पाण्याच्या स्थितीचा आहे. कशाप्रकारचे पाणी तिथे असते, होते. त्या गोष्टी अजूनही थांबवले जात नाही, असे राज ठाकरे म्हणाले. एका मिनिटासाठी गंगेची स्थिती काय आहे, हे मी तुम्हाला दाखवतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी गंगा नदीचा एक व्हिडिओ दाखवला.
ईव्हीएमवरून राज ठाकरेंचा पुन्हा एकदा निशाणा
गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून ज्यांची मते दिसली. त्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो. ज्या मतदारांनी मनसेला मतदान करून देखील ईव्हीएममध्ये त्यांची मते दिसली नाहीत, त्यांचेही मी आभार मानतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवरून निशाणा साधला. निवडणुका कशा झाल्या? काय काय गोष्टी घडल्या? यावर माझे बोलून झालेले आहे. आता जे झाले ते झाले. आता यापुढचे बघायचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

अग्निशमन केंद्रातील जवानांविषयी कृतज्ञता:गुढी पाडव्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

संजीवनी मित्र मंडळ आणि साईनाथ मंडळ ट्रस्टचा पुढाकार

पुणे : गुढी पाडवा अर्थात मराठी नववर्षाच्या निमित्ताने अग्निशमन दलातील जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि आगामी वर्ष सुरक्षित जावो, अशा शुभेच्छा देण्यात आल्या.
सहकार नगरमधील संजीवनी मित्र मंडळ आणि बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे एरंडवणे येथील अग्निशमन केंद्रात ‌‘शूरा आम्ही वंदितो‌’ या कार्यक्रमाचे आयोजन आज (दि. 30) करण्यात आले होते. साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस प्रसिद्ध गायिका मंजुश्री ओक यांनी ‌‘शूरा मी वंदितो‌’ हे नाट्यगीत सादर केले. अग्निशमन केंद्रातील 25 जवानांसमवेत मंडळांचे कार्यकर्ते आणि चिमुकल्यांनी अनोख्या पद्धतीने मराठी नववर्ष साजरे केले. सुरुवातीस विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत जवानांचे औक्षण केले. प्रत्येक जवानास आकर्षक गुढी भेट देण्यात आली.
प्रास्ताविकात पियूष शहा म्हणाले, शहरात आगीची घटना घडल्यानंतर अग्निशमन केंद्रातील जवान स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीव वाचवितात. संपत्तीचे नुकसान होऊ नये याचीही काळजी घेतात. नागरिकांवरील संकट टाळण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी बोलताना प्रकाश गोरे म्हणाले, पुण्याची लोकसंख्या बघता अग्निशमन केंद्र आणि कर्मचाऱ्यांची संख्या त्या मानाने खूपच कमी आहे. शहरात कुठे आग लागल्यास गणेश मंडळांचे कार्यकर्ते सर्वात आधी मदतीसाठी धावून येतात. मंडळांच्या कार्यकर्त्यांमुळे आम्हाला नागरिकांचा जीव वाचविण्यास आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यास मदत होते. एखादी दुर्घटना घडल्यास नागरिकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे. अग्निशामक अधिकारी कमलेश चौधरी, स्टेशन ऑफिसर सुभाष जाधव, प्रकाश गोऱ्हे व फायर मॅन दिलीप घडशी, कैलास पवार, सचिन वाघोले तसेच संजीवनी मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय विद्वंस, प्रसाद दिवटे, पुष्पक शिंदे, निलेश कोंढापुरे, राकेश घोडके, सागर खोत, मनीष शेलार, साईनाथ ट्रस्टचे नरेंद्र व्यास, नंदू ओव्हाळ, गंधाली शहा, प्रमुख पाहुण्या गायिका मंजुश्री ओक , सामजिक कार्यकर्ते सचिन पवार उपस्थित होते. स्टेशन ऑफिसर राजेश जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले, पियूष शाह यांनी प्रास्ताविक केले तर प्रकाश गोऱ्हे यांनी आभार मानले

“विराट हिंदू संत संमेलन” घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची मंजूरी-प्रज्ञा सिंह ठाकूर यांना “हिंदू वीर पुरस्कार”

मुंबई- मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना “विराट हिंदू संत संमेलन” नावाचा कार्यक्रम आयोजित करण्याची आणि “हिंदू वीर पुरस्कार” प्रदान करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने एका हिंदू संघटनेला दिली आहे. या प्रकरणात होणाऱ्या विरोधाला न जुमानता, या कार्यक्रमामुळे प्रक्षोभक भाषणे आणि सांप्रदायिक तणाव निर्माण होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त केली जात होती.

या संदर्भात न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर, भारतीय जनता विविध धर्मांचा आदर करणे आणि सांप्रदायिक सलोखा राखण्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी पुरेशी सुज्ञ आणि सुशिक्षित आहे. 30 मार्च रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु काही विशिष्ट अटींसह, ज्यामध्ये विशिष्ट वेळ (सकाळी 7 ते संध्याकाळी 5) आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याची जागा टाळण्यासाठी एक निश्चित नियमांचाही समावेश आहे.

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटात प्रमुख आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर कथित भूमिकेसाठी सध्या खटल्याला सामोरे जात आहेत. ज्यामध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला होता आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. या खटल्यात आरोग्याच्या कारणास्तव प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता होणाऱ्या या कार्यक्रमामुळे वाद निर्माण झाला आहे, काहींनी बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांमुळे ठाकूर यांना पुरस्कार देण्यास विरोध केला आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर या एक भारतीय राजकारणी आणि माजी खासदार आहेत. त्यांनी लोकसभेत भोपाळचे प्रतिनिधित्व केले होते. त्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. 2 फेब्रुवारी 1970 रोजी जन्मलेल्या ठाकून यांना साध्वी प्रज्ञा म्हणूनही ओळखले जाते. ठाकूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यासह विविध संघटनांमध्ये सहभागी आहेत.त्यांनी 2019 ची भारतीय सार्वत्रिक निवडणूक भोपाळ मतदारसंघातून लढवली आणि 3,64,822 मतांच्या लक्षणीय फरकाने जिंकली होती. त्या अनेक वादात देखील अडकलेल्या आहेत. विशेषतः 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटात कथित सहभागाबद्दल दहशतवादी आरोपांवरून अटक करण्यात आली होती. सध्या देखील बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत अनेक आरोपांसाठी खटला सुरू आहे. ठाकूर यांनी संसदेत केलेल्या भाष्यांबद्दलही त्यांच्यावर टीका झाली आहे. ज्यात गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हणणे याचाही सामवेश आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण संसदीय समिती आणि भाजप संसदीय पक्षाच्या बैठकींमधून काढून टाकण्यात आले होते.

मातृशक्तीला नमन करीत मध्य पुण्यात भव्य शोभायात्रा 

हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजन ; विविध चित्ररथांचा सहभाग
पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी  होळकर रथ…वंदे मातरम या काव्याला १५० वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल माहितीपूर्ण रथ…पर्यावरणचे भान राखून प्रबोधनपर पाणी या विषयावर  जनजागृती रथ यांसह छत्रपती शिवाजी महाराज रथ अशा एकापाठोपाठ एक आलेल्या चित्ररथांचा सहभाग आणि पारंपरिक वेशात सहभागी पुणेकरांनी शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रेत सहभागी होत मातृशक्तीला नमन केले.

गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रेचे आयोजन  करण्यात आले होते. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी शोभायात्रेला प्रारंभ झाला. यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, रा.स्व.संघ मोतीबाग नगर संघचालक अ‍ॅड. शरद चंद्रचूड, समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर व सहसंयोजक अश्विन देवळणकर यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे डॉ. मेधा कुलकर्णी यांसह निवेदिता एकबोटे, गायत्री खडके, पुणे शहर भाजपा महिला उपाध्यक्ष हर्षदा फरांदे, प्राची वाईकर, दीप्ती शिदोरे, सीमा गोवंडे यांच्या हस्ते ग्राम गुढी उभारण्यात आली. यात्रा प्रमुख म्हणून अथर्व दातार व चैतन्य कुसूरकर यांनी नियोजन केले.  

ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, मर्दानी खेळ, वेत्रचर्म पथक देखील सहभागी झाले होते. याशिवाय सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे यांचा रथ, मराठी अभिजात भाषा रथ यांसह अनेक विशेष रथ देखील शोभायात्रेत सहभागी झाले. तुळशीबाग मंडळ, नवनीत मित्र मंडळ, कडबे आळी तालीम मंडळ, अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव समिती, कालिका माता देवस्थान समिती, चिमण्या गणपती मंडळ यांनी देखील सहभाग घेतला.  

याशिवाय विविध भजनी मंडळे, अध्यात्मिक समूह, सनातन धर्माभिमानी मंडळी, प्रभू राम-लक्ष्मण-सीता हनुमान यांच्या मूर्ती, पारंपरिक वेषभूषा आणि ऐतिहासिक, अध्यात्मिक, स्वातंत्र्यलढ्यातील थोर व्यक्ती इत्यादींचा आदर्श ठेवून केलेल्या वेशभूषेतील नागरिक मोठ्या संख्येत शोभायात्रेत होते. लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरु झालेली शोभायात्रा तुळशीबाग राममंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर पर्यंत काढण्यात आली.

अवास्तव अपेक्षा, अपराधी भाव यामुळे स्त्रिया घेतात टोकाचा निर्णय’

कनेक्टिंग ट्रस्ट’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त ‘लिसनिंग टू द व्हाईसेस ऑफ वुमेन’वर आयोजित परिसंवादामध्ये उमटला सूर

पुणे, ता. ३०: “भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रिया बहुतेकवेळा अवास्तव अपेक्षा आणि स्वतःविषयीचा अपराधी भाव घेऊन जगतात. त्यामुळे त्या मुक्त संवादापासून वंचित राहतात. सतत दडपण, दबाव यामुळे त्यांचे म्हणणे ऐकून घेणारे कुणीच नाही, या भावनेचा ताण असह्य होऊन अनेक स्त्रिया आत्मघातकी विचारांपर्यंत पोचतात,” असे निरीक्षण मान्यवर वक्त्यांनी परिसंवादात नोंदवले.

काही प्रसंगाने निराश, दुःखी किंवा आत्मघातकी विचारांचा प्रभाव असल्यास, त्यापासून परावृत्त करण्याचे महत्त्वाचे सामाजिक कार्य करणाऱ्या ‘कनेक्टिंग ट्रस्ट’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त (२० वर्षे) ‘लिसनिंग टू द व्हाईसेस ऑफ वुमेन’ या विशेष परिसंवादाचे आयोजन केले होते. एकेएस फाऊंडेशनच्या संस्थापक बरखा बजाज, ‘माहेर’ संस्थेच्या संस्थापक सिस्टर ल्यूसी कुरियन, विधिज्ञ संध्या देशपांडे, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या कादंबरी शेख व वरिष्ठ संपादक कोरिना मॅन्यूअल यांनी विचार मांडले. समाजशास्त्र अभ्यासक डॉ. मेघा देऊसकर यांनी परिसंवादाचे संचलन केले.

यावेळी कनेक्टिंग ट्रस्टच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अर्नवाज दमानिया उपस्थित होत्या. थरमॅक्स लिमिटेडच्या अध्यक्ष मेहेर पदमजी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. परिसंवादापूर्वी मुसकान संस्थेच्या कीर्ती, स्त्री मुक्ती संघटनेच्या स्वप्नाली यांनी मनोगत व्यक्त केले. फरिदा आणि सुहासिनी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.

कादंबरी शेख यांनी ‘ट्रान्सजेंडर व्यक्तींचे भावविश्व अधिक गुंतागुंतीचे असते. सर्वप्रथम कुटुंबच त्यांना नाकारते, मग समाज नाकारतो आणि विशिष्ट जीवनशैली अनुसरायला भाग पाडतो. माझ्याही वाट्याला अनेक भीषण अनुभव आले. पण मी प्रयत्नपूर्वक सगळे सोसून बाहेर पडले. द्विपदवीधर झाले. मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. पण समाजाचा, कुटुंबाचा दबाव मर्यादा आणतो’, असे मत मांडले.  

सिस्टर ल्यूसी यांनी तळागाळातील स्त्रियांच्या दडपणाचे चित्र उदाहरणासह मांडले. ‘निरक्षर, अर्धशिक्षित स्त्रियांचे प्रश्न अधिक गंभीर आहेत. त्यांच्या वाट्याला हतबलता, असहायता अधिक येते’, असे त्या म्हणाल्या. संध्या देशपांडे यांनी वकील म्हणून काम करताना कौटुंबिक स्तरावरचे विदारक वास्तव सोदाहरण सांगितले. ‘दडपल्या गेलेल्या स्त्रियांना बोलण्याच्या अवस्थेत आणणे, हेच मोठे आव्हान असते’, असे त्या म्हणाल्या.

बरखा बजाज यांनी नातेसंबंधांचा ताण आणि दडपण स्त्रियांवर अधिक प्रतिकूल परिणाम करते. संकोच, लाज, भीती, लोक काय म्हणतील, या भावनेचे दडपण स्त्रिया अधिक बाळगतात, असे मत मांडले. कोरिना मॅन्युअल यांनी आपण सदैव एकमेकींसाठी आहोत, हा विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे मत मांडले. गायत्री दातार यांनी सूत्रसंचालन केले.

अर्नवाझ दमानिया यांनी ट्रस्टचे सर्व सहकारी आणि पदाधिकारी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. स्त्रीपण हा एक आव्हानात्मक प्रवास असतो, असे सांगून ट्रस्टचे काम २० वर्षे सुरू ठेवण्यात सहकाऱ्यांचे परिश्रम, सातत्य, निष्ठा आणि समाजाप्रती सहसंवेदना मोलाची ठरत असल्याचे त्या म्हणाल्या.

समाज स्त्रीचे ऐकतो, तेव्हा तिचे कर्तृत्व
आभाळभर होते : मेहेर पदमजी
शतकानुशतके स्त्रियांचा आवाज दाबला गेला आहे. विशेषतः मोकळेपणाने बोलू न शकल्याने दडपण असह्य होऊन आत्महत्येला प्रवृत्त होणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण भारतात अधिक आहे. त्यामुळे स्त्रियांना मोकळेपणाने बोलता येणे, संवादासाठी त्यांना त्यांचा अवकाश मिळणे, गरजेचे आहे. समाज जेव्हा स्त्रीचे ऐकतो, तेव्हा तिचे कर्तृत्व आभाळभर होते, असे प्रतिपादन थरमक्स लिमिटेडच्या अध्यक्ष मेहेर पदमजी यांनी केले. ऐकणे आणि ऐकून घेणे, ही जगण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. कनेक्टिंग ट्रस्टच्या माध्यमातून स्त्रियांचे असे अ-बोलणे समजून घेण्याचा अवकाश मिळतो, त्या मोकळ्या होत जातात, हे महत्त्वाचे आहे, असे मेहेर पदमजी यांनी सांगितले.

अवीट सुरावटींनी उजाडली पाडव्याची ‘सुरेल पहाट’

पद्मश्री सुरेश वाडकर, पंडित रघुनंदन पणशीकर व मनीषा निश्चल यांचे बहारदार गायन

पुणे: ‘ओंकार स्वरूपा, सद्गुरू समर्था’ भजन असो की, ‘देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी’ हरिपाठ, ‘बाजे रे मुरलीया बाजे’ हे पटदीप रागातील भजन असो की, ‘मोगरा फुलला’ भावगीत, ‘मेघा रे मेघा रे’, ‘चिंब पावसानं रान झालं’ अशा अजरामर गीतांच्या अवीट सुरावटींनी गुढी पाडव्याची सुरेल पहाट उजाडली.या विशेष संगीत मैफलीने पुणेकरांना भक्तिरसात न्हाल्याचा आनंद दिला.

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गीत-संगीताने नटलेल्या गायिका मनीषा निश्चल्स महक प्रस्तुत ‘सुरेल पहाट’ या सांगीतिक मैफलीचे गेट सेट गो हॉलिडेज व पूना गेस्ट हाऊस यांच्या वतीने आयोजन केले होते. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारच्या भल्या पहाटे पुणेकरांनी ‘सुरेल पहाट’ची ही पर्वणी अनुभवली. पद्मश्री सुरेश वाडकर, पंडित रघुनंदन पणशीकर व गायिका मनीषा निश्चल यांच्या सुमधुर गायनाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग व भक्तिसंगीताच्या सुरावटींनी पहाटेचे वातावरण भारावून गेले. पं रघुनंदन पणशीकर यांनी शास्त्रीय रचनांमधून पहाटेच्या रागांचा सुरेल आविष्कार घडवला. मनीषा निश्चल यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायन केले. तर सुरेश वाडकर यांनी ‘ओंकार स्वरुपाने’ ने स्वतःच्या गायनाची सुरुवात केली. पंडित रघुनंदन पणशीकर यांनी ‘सहेला रे’, ‘राम का गुणगान’, ‘बोलावा विठ्ठल’, ‘बाजे रे मुरलीया बाजे’ ही भजने, तर मनीषा निश्चल यांच्यासोबत ‘हे शाम सुंदर राजसा’ युगुलगीत सादर केले. 

मनीषा निश्चल यांच्या ‘मोगरा फुलला’, ‘सूर येती  विरून जाती’ ‘मै एक सादि से’, ‘केंव्हा तरी पहाटे’, ‘मोहे नैहर से अब तो’ या अजरामर गीतांना ‘वन्स मोअर’ची दाद मिळाली. तर ‘पाहिले न मी तुला’, ‘काळ देहासी’, ‘ए जिंदगी गले लगा ले’, ‘चप्पा चप्पा’ या गीतांनी पद्मश्री सुरेश वाडकर यांनी मैफल टिपेला नेली. तसेच ‘चिंब पावसानं’ व ‘मेघारे मेघारे’ या सुरेश वाडकर व मनिषा निश्चल यानी गायलेल्या युगुलगीतांना श्रोत्यांनी वन्समोअरसह टाळ्यांची उत्स्फूर्त दाद दिली.

विघ्नेश जोशी यांच्या ओघवत्या निवेदनाने श्रोत्यांच्या आनंदात भर घातली. अमर ओक (बासरी), सत्यजित प्रभू (कीबोर्ड), डॉ. राजेंद्र दूरकर (पखवाज) व विनायक नेटके (तबला), अभिजित भदे (आक्टोपॕड) यांनी वाद्यांवर साथसंगत केली. कार्यक्रमास संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे कौतुक केले. नववर्षाच्या स्वागताला संगीताचा सुरेल सोहळा लाभल्याने उपस्थितांना अनोखी अनुभूती मिळाली.

रेल्वेला मालवाहतुकीतून मिळालेल्या महसुलात  गेल्या 4 वर्षात 54,805 कोटी रुपयांनी वाढ 

प्रवासी महसूल  4 वर्षात 20,024 कोटी रुपयांनी वाढला

गेल्या पाच वर्षात भारतीय रेल्वेने मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीतून मिळविलेल्या महसूलाचा तपशील  पुढीलप्रमाणे आहे: –

Financial YearRevenue (₹ in Cr)
FreightPassenger
2019-201,13,48850,669
2020-21*1,17,23215,248
2021-22*1,41,09639,214
2022-231,62,26363,417
2023-241,68,29370,693

*कोविड वर्षे

भारतीय रेल्वेने 2019-20 ते 2023-24 या कालावधीत फ्लेक्सी भाडे, तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ याद्वारे कमावलेला महसूल प्रवासी सेवांमधून कमावलेल्या एकूण महसुलाच्या अंदाजे 5.7% इतका आहे.  तिकीट रद्द केल्यानंतर  जमा झालेली रक्कम वेगळी मोजली जात नाही.

01.04.24 पर्यंत माहितीनुसार, रेल्वे सेवा चालवण्यासाठी सुमारे 79,000 डब्यांचा वापर करण्यात आला आहे आहेत. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

ClassNo. of coachesNo. of seats
General and non-AC Sleeper~56,000(70% of total) ~51 lakhs
AC Coaches~ 23,000~14 lakhs
Total~ 79,000~ 65 lakhs

2019-20 ते 2023-24 या कालावधीतील, प्रवासी सीट्स आणि मिळालेला महसूल यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

ClassAvg %share of total seats during
 2019-20 to 2023-24
Avg % share of total passenger revenue during2019-20 to 2023-24
Non-AC coaches (General / Sleeper etc.)~ 82%~  53%
AC Coaches~ 18%~  47%

ही माहिती  रेल्वेमंत्री  अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.

आरएसएस स्वयंसेवकासाठी सेवा हेच जीवन:आपण देवापासून देश-रामापासून राष्ट्र या मंत्राने पुढे जातोय- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानांची नागपूर येथील स्मृती मंदिराला भेट

पंतप्रधान  नरेंद्र मोदी आज नागपुर येथील स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. के. बी. हेडगेवार आणि  एम. एस. गोळवलकर यांना  आदराजली अर्पण केली.

एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:

“नागपूर येथील स्मृती मंदिराला भेट देणे हा एक विशेष अनुभव आहे.आजची ही भेट आणखी खास यासाठी आहे, कारण ती वर्षप्रतिपदेच्या शुभदिनी झाली आहे, जो परम पूज्य डॉक्टरसाहेबांचा जयंती दिवस देखील आहे.माझ्यासारख्या असंख्य लोकांना परम पूज्य डॉक्टरसाहेब आणि पूज्य गुरुजी यांच्या विचारांतून प्रेरणा आणि शक्ती मिळते. या दोन महान व्यक्तींना  आदरांजली अर्पण करण्याचा सन्मान मिळाला, असून ज्यांनी एक मजबूत, समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या गर्व करण्याजोग्या भारताची कल्पना केली होती.”

पंतप्रधान मोदी रविवारी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय केशव कुंज येथे पोहोचले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी) यांच्या स्मृती मंदिराला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली.

यानंतर ते दीक्षाभूमीला गेले आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. दीक्षाभूमी हे आरएसएस कार्यालयाच्या अगदी जवळ आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी येथे येऊन ध्यानधारणा केली होती.यानंतर, पंतप्रधानांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन विस्तारित इमारतीची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, आमचे सरकार जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून गरिबांना स्वस्त दरात औषधे पुरवत आहे. डायलिसिस सेंटर्स खुली आहेत, जिथे मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध आहेत. आपण देशाला प्रगतीच्या नवीन उंचीवर घेऊन जाऊ.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आयोजित बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मोदी शेवटचे १६ जुलै २०१३ रोजी संघाच्या मुख्यालयात गेले होते. २०१२ मध्ये संघ प्रमुख के एस सुदर्शन यांच्या निधनानंतरही ते येथे आले होते. पंतप्रधान पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देत आहेत.हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी संघ कार्यालयात होणाऱ्या प्रतिपदा कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहतील. ते कार्यक्रमाला संबोधित देखील करू शकतात.पंतप्रधानांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित आहेत.