Home Blog Page 384

खासगी बस प्रवासी भाडे दुप्पट-तिप्पट वाढले:सुट्टीच्या हंगामात प्रवाशांची लूट रोखण्यासाठी भाजप नेते खर्डेकरांची परिवहन मंत्र्यांकडे तक्रार

पुणे-सुट्ट्यांचा हंगाम सुरु झाला की, नागरिकांना मूळ गावी जाण्याचे किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी अथवा पर्यटनाला जाण्याचे वेध लागतात. ह्या काळात रेल्वेला असलेली गर्दी, प्रतीक्षा यादी बघता सामान्य नागरिक हा खासगी प्रवासी बसद्वारे प्रवासाला प्राधान्य देतो.मात्र ,नेमकी प्रवाश्यांची ही गरज ओळखून खासगी बस मालक प्रचंड भाडेवाढ करतात आणि ग्राहकांची पिळवणूक करतात. आज ऑनलाईन बुकिंगसाठी वेबसाईट तपासली असता पुणे ते हैद्राबाद, इंदूर, बैंगलोर,नागपूर यासह विविध ठिकाणी प्रवासाला जाण्याचे आजचे दर आवाक्यातील आणि हजार बाराशे असे असल्याचे दिसून येते. तर सुट्टीच्या काळात मे महिन्याचे दर हे दुप्पट तिप्पट असल्याचे दिसून येते. त्यामुळे खासगी बस चालकांकडून प्रवाश्यांची होणारी लूटमार थांबविण्याची मागणी राज्य परिवहन मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती राज्य भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी येथे दिली आहे.

खर्डेकर म्हणाले,प्रादेशिक परिवहन अधिकारी याप्रकरणाकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करतात आणि सर्वज्ञात कारणांनी ह्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यास धजावत नाहीत. नागरिक अथवा स्वयंसेवी संस्थांनी थोडा आरडाओरडा केला तर जुजबी कारवाई करताना आरटीओ विभाग दिसतात. मात्र कडक कारवाई करून याला आळा घालण्याचा आर.टी.ओ.चा कोणताही मानस दिसून येत नाही.

ही परिस्थिती पाहता सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने परिवहन मंत्री यांनी त्वरित प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात तसेच वेळप्रसंगी स्वतः खासगी बस मालक चालकांची बैठक घेऊन त्यांना ह्या पिळवणुकीबाबत जाब विचारावा अशी आग्रही मागणी करण्यात आली ह्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पहिले जाईल आणि केवळ पुणेकरांनाच नव्हे तर राज्यातील नागरिकांना दिलासा दिला जाईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पुण्यात घरफोडी करणाऱ्या कर्नाटकच्या चोराला अटक

पुणे-कर्नाटकातून पुणे शहरात दुचाकीवर येऊन वारजे माळवाडी परिसरात घरफोडी करुन पसार झालेल्या कर्नाटकातील आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. व्यंकटेश रमेश व्यंकी (वय २२, रा. गांधीनगर, चल्लाकेरे, जि. चित्रदुर्ग, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून दुचाकी, तसेच कटावणी, कटर, पाना असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी व्यंकटेश व्यंकी हा मूळचा कर्नाटक राज्यातील रहिवासी आहे. तो कर्नाटक मधून पुण्यात दुचाकीवर येऊन घरफोडीचे गुन्हे करत आणि परत जात असल्याची माहिती वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर चित्ते आणि गणेश शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने कर्वेनगर भागात आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांच्या जाळ्यात व्यंकी आल्यावर त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची दुचाकी जप्त करून दुचाकीची डिकी तपासणी केली.त्यामध्ये डिकीत कटर, कटावणी, पाना, स्क्रु ड्रायव्हर मिळून आला आहे. पोलिसांनी व्यंकी याची सखोल चौकशी केल्यावर चौकशीत त्याने लोणीकंद, आंबेगाव, बावधन परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती दिली आहे. त्याच्याकडे असलेली दुचाकी त्याने हडपसर भागातून चोरल्याचे उघड झाले आहे.

परिमंडळ तीनचे पाेलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस कर्मचारी वाकसे, कळंबे, चित्ते, शिंदे, पोळ, कुंभार, काटे, तांगडे, कपाटे, जाधव, शेलार यांनी ही कामगिरी केली आहे.

अतिक्रमण विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना रोजंदारी पद्धतीने सामावून घ्यावे – दीपक मानकर

पुणे- महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना रोजंदारी पद्धतीने सामावून घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

मानकर यांनी असे सांगितले कि,’ पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात सर्वच क्षेत्रीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सुमारे 269 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संवेदनशील खात्यात हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. कंत्राटी पद्धतीने काम करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुणे महानगरपालिकेकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांची नोंद नसल्याने त्यांना कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत. ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या या सेवकांना तुटपुंजे वेतन असून, आहे त्या वेतनामध्ये ते विनातक्रार काम करतात. तसेच कोरोना काळामध्येही या सेवकांनी कोणतीही तक्रार न करता अतिशय प्रामाणिकपणे काम केले आहे. आता या सेवकांची बदली ही राहत्या घरापासून सुमारे 20 ते 25 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर करण्यात आलेली आहे. त्यांना मिळणारे वेतन, त्यामध्ये प्रवासखर्च तसेच घराची जबाबदारी यामुळे या सेवकांवर मोठा आर्थिक ताण येत असून याचा परिणाम हा अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर पडत आहे. बदली केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आहे त्याच ठिकाणी किंवा त्यांच्या राहत्या घरापासून जवळच्या अंतरावर असलेल्या क्षेत्रीय कार्यालयामध्येच बदली करण्यात यावी. जेणेकरून त्यांना पडणारा ताण काही प्रमाणात कमी होऊ शकतो. तसेच या सर्व कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेत रोजंदारी सेवेत सामावून घेण्यात यावे.यासंदर्भात आज आयुक्त साहेबांची भेट घेऊन योग्य ती कार्यवाही त्वरित करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. यावर आयुक्त साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

महाबळेश्वर येथे २ ते ४ मे दरम्यान पर्यटन महोत्सव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सव बोधचिन्हाचे अनावरण

मुंबई, दि. ०१ : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी २ ते ४ मे २०२५ या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, एमटीडीसीचे मुख्य लेखा वित्त अधिकारी जितेंद्र सोनवणे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे २ मे २०२५ रोजी उद्घाटन होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. पर्यटन विभाग व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवात प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला – संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

या महोत्सवात स्थानिक लोकसंस्कृतीचा समावेश असलेले कार्यक्रम तसेच नामांकित कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, महाबळेश्वर परिसरातील उदा. पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले दर्शन व इतर पर्यटनस्थळ, दर्शन सहलीचे आयोजन, पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी करण्यात येणार आहे. पॅराग्लाडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबींग, घोडेस्वारी आदी विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्री दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत. या महोत्सवात विशेषतः देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारक, प्रवासी संस्थांचे प्रतिनिधी, ट्रॅव्हल एजेंट, टूर ऑपरेटर्स, सोशल मीडिया प्रभावक यांना आमंत्रित करुन त्यांचा समावेश असलेल्या परिचय सहलीचे आयोजन करण्यात येईल.

महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्रसपाटीपासून सुमारे ४,५०० फूट उंचीवर वसलेले गिरीस्थान आहे. जुन्या बॉम्बे प्रेसीडेन्सीची महाबळेश्वर पूर्वी ऊन्हाळी राजधानीचे ठिकाण होते. येथील विलक्षण हिरवळ सुंदर बागा आणि श्वास रोखून धरणारे दृश्य हे पर्यटकांना भुरळ घालतात. ब्रिटीश काळात बांधलेल्या असंख्य भव्य वास्तू आजही गत स्मृतींची आठवण करुन देतात. या ठिकाणी स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त असंख्य नद्या, भव्य कॅस्केड, भव्य शिखरे, प्राचीन मंदिरे, बोर्डींग स्कूल, सुंदर आणि हिरवेगार घनदाट जंगल, धबधबे, टेकड्या व दऱ्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे.

पर्यटकांसाठी  पर्यटन महोत्सव कालावधीत विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध असून येथे ५० निवासी टेंट पर्यटक आणि मान्यवरांसाठी उपलब्ध होणार आहेत. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि घोडेस्वारी यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येईल. तसेच, स्थानिक बाजारापेठांमध्ये फेरफटका, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वादही पर्यटकांना घेता येईल. रोजच्या दिनक्रमातून दूर जात अनुभव समृद्ध पर्यटनासाठी हा महोत्सव उत्तम पर्याय आहे.

‘लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करावी’स्टेप बाय स्टेप कामराचे अनुभव कथन

मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीनंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडला आहे. एका विडंबनात्मक गाण्यातून टीका केल्यानंतर त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर, कुणाल सोशल मीडियावर सतत सक्रिय आहे आणि एकामागून एक पोस्ट करत आहे. आज देखील त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने ‘लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करावी’ याबाबत लिहिले आहे.

कुणाल कामराचे नेमके ट्विट काय?

कुणालने आज मंगळवारी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करावी?’ असे कॅप्शन कुणालने आपल्या पोस्टला दिले आहे. तर पोस्टमध्ये ‘एखाद्या कलाकाराला कसे मारायचे याबद्दल काही सूचना’ असे लिहित काही मुद्दे लिहिले आहेत.

संताप अशा पद्धतीने आणि इतका प्रचंड व्यक्त करायचा की तो अनेक ब्रांड्सना काम करताना अडचण झाली पाहिजे.
त्यानंतर संताप आणि निषेधाचं प्रमाण आणखी वाढवायचं जेणेकरुन संस्थात्मक किंवा व्यक्तीगत कार्यक्रम करण्याआधी कलाकाराला दहादा विचार करावा लागेल.
संतापाचं आणि निषेधाचं, आरडा ओरडा करण्याचं प्रमाण इतकं वाढवा की मोठी हॉटेल्स, स्टुडिओ तुमचा कार्यक्रम घेण्याची रिस्क घ्यायला नको.
संतापाला आता हिंसेचे रुप द्या, म्हणजे छोट्या छोट्या जागा, स्टुडिओ हेदेखील दहशतीने त्यांची दारे बंद करतील.
स्टँड अप कॉमेडीसाठी उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांना समन्स पाठवा, असे केल्याने कलाकाराचा मंच हा एखादा क्राईम सीन होऊन जाईल.
हे सगळे केले की कलाकाराकडे फक्त दोन पर्याय उरतात.

पहिला पर्याय म्हणजे स्वत:चा आत्मा विकायचा आणि त्यांच्या हातचे बाहुले व्हायचे किंवा दुसरा पर्याय शांत बसायचे. मी सांगतोय हे एखादे प्लेबुक नाही. तर राजकीय हत्यार आहे. ज्यामुळे कलाकाराची लोकशाही पद्धतीने पद्धतशीर हत्या करता येते.

श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय:राज्यातील नवजात बालिकांच्या नावे 10,000 रुपये

मुंबई-श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण विकासासाठी श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेवर सादर करण्याबाबतची घोषणा अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

राज्यातील मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, मुलीना सक्षम बनवण्यास प्रयत्न करणे या उद्देशांना हातभार लागावा यासाठी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरतर्फे नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मास आलेल्या बालिकांच्या नावाने 10 हजार रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट स्वरूपात त्यांच्या आईच्या बँक खात्यावर ठेवण्याबाबतची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेला न्यास व्यवस्थापन समितीकडून या अभिनव योजनेला मंजूरी देण्यात आली आहे. तसेच शासनाच्या मान्यतेनंतर योजनेसाठीचे निकष जाहीर कारणयात येतील, अशी माहिती सिद्धिविनायक ट्रस्टकडून देण्यात आली आहे.श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्यात येत असून याला न्यास या व्यवस्थापन समितीने यास मान्यता दिली आहे.

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक 31 मार्च रोजी संस्थेचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाचा सन 2024-25 चे वार्षिक विवरणपत्र तसेच सन 2025-26 चे अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक या बैठकीत सादर करण्यात आले. 2024-25 या वर्षात न्यासाचे उत्पन्न 114 कोटी इतके अपेक्षित होते ते विक्रमी 133 कोटींच्या घरात गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही जवळपास 15 टक्के वाढ आहे. आता पुढील उत्पन्न हे 154 कोटी इतके गृहीत धरण्यात आले आहे.

राज्यात ई-बाइक टॅक्सीला परवानगी:राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; सरकारच्या वतीने दहा हजार रुपये अनुदान देखील देण्यात येणार

केवळ पिवळ्या रंगात इलेक्ट्रिक बाइकला परवानगी

मुंबई-राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाइक टॅक्सीला परवानगी देण्यात आली असून राज्यात केवळ ई-बाइक टॅक्सीला परवानगी असणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. ई-बाइक टॅक्सीसाठी राज्य सरकारच्या वतीने दहा हजार रुपये अनुदान देखील देण्यात येणार आहे. तसेच कमीत कमी खर्चात प्रवाशांना सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. यासोबतच महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बाइक टॅक्सला मंजुरी देण्यात आली असल्याचा माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमाशी बोलताना दिली. कमी खर्चामध्ये चांगला प्रवास करता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र यामध्ये पेट्रोल बाइकला परवानगी देण्यात येणार नाही. तर केवळ इलेक्ट्रिक बाइकला परवानगी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या ई-बाइक टॅक्सीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार असल्याचेही प्रताप सरनाईक माध्यमांशी बोलताना म्हणाले. इलेक्ट्रिक बाइकला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दहा हजार रुपये अनुदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या माध्यमातून दहा हजारांपेक्षा अधिक रोजगार निर्मिती मुंबईत तर वीस हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मिती ही महाराष्ट्रात होइल, असा विश्वास देखील प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी (बाइक) टॅक्सी समुच्चयक ॲग्रीगेटर सेवा सुरू करण्याबाबतचे धोरण लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीत बाईक टॅक्सी वाहनांचे समुच्चयक धोरण ठरविण्यासाठी गठीत केलेल्या रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार हे धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे राज्यातील नागरिकांसाठी वाहतुकीचा किफायतशीर आणि सोयीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या धोरणांतर्गत बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्या समुच्चयकांकडून (Aggregators) इलेक्ट्रिक बाईक वापराव्या लागणार आहेत. त्या पिवळ्या रंगात रंगवलेल्या असतील. हा पर्याय पर्यावरणपूरक व रोजगार उपलब्ध करून देणारा हा पर्याय आहे. यातून मोठी रोजगारनिर्मिती होणार असून महिला चालकांना देखील प्रोत्साहीत केले जाणार आहे.या धोरणांतर्गत सेवा देणाऱ्या अँग्रीगेटरच्या वाहनांना जीपीएस लावणे, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, चालक व प्रवाशी या दोन्हींकरीता विमा संरक्षण, स्वच्छता दर्जा राखणे आदी बाबी आवश्यक करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच दुचाकी चालकांची निवड करताना त्यांची पार्श्वभूमी तपासून सुरक्षेबातच्या सर्व निकषांची पूर्तता करणे आवश्यक करण्यात आले आहे.

कष्टकरी तृतीय पंथीयांचा विशेष सन्मान

पुणे : आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्यता दिवसानिमित्त (ट्रान्सजेंडर व्हिजिबिलीटी) अभिनव सोशल फाउंडेशनतर्फे अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. लोकांपुढे हात पसरून पैसे न मागता स्वकष्टाने आयुष्य जगणाऱ्या तृतीय पंथीयांचा धान्याचे कीट व सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
पारलिंगी लोकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ३१ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्यता दिन साजरा करण्यात येतो. जगभरातील पारलिंगी लोकांविषयी जनसामान्यांच्या मनात भेदभावाची भावना असते; ही एक शारीरिक स्थिती असल्याचे समाजभान त्यांच्या मनात रुजलेले नसते. परंतु या पारलिंगी व्यक्तींची समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी या दिनाचे आयोजन केले जाते.
समाजात दुलर्क्षित असलेल्या या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी अभिनव सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय गायकवाड, उद्योजक अभी होमकर, दीपक सोनटक्के, ॲड. मयुरेश चोंधे, अमोल गायकवाड, सचिन बांदल, अमोल डांगे यांनी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कारणाची संकल्पना साईनाथ मंडळ ट्रस्टचे पियुष शहा यांची होती, श्री शनि मारुती मंडळाचे सचिन पवार यांची विशेष उपस्थिती होती. एरंडवणे येथील श्री शनि मारुती मंडळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे महापालिकेत नोकरी करणाऱ्या आराध्या राठोड, जान्हवी काळे, काजल शर्मा, आरुष कुशाळकर, ऋतुजा साळुंके यांचा या वेळी धान्याचे कीट देऊन तसेच मानाचे फेटे बांधून विशेष सन्मान करण्यात आला.
या वेळी बोलताना सेजल बल्लोळी म्हणाल्या, आमच्यातीलच काही लोक आम्हाला टोमणे मारतात. आम्ही स्वकष्टाने पोट भरतो म्हणून आम्हाला हिणवतात. परंतु भीक मागून पोट भरण्यापेक्षा कष्टकरून मिळणारा पैसा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. कष्ट करून पोट भरत असल्यामुळेच आमचा येथे सन्मान होत आहे, हे आमच्यासाठी गौरवास्पद आहे.
आपण जे आहोत, जसे आहोत त्याचा आनंदाने स्वीकार करत आणि कष्टाने काम करत सन्मानाने जगायचे असते. सन्मानाने काम करणाऱ्यांना सन्मान मिळतो. त्याचप्रमाणे आपल्या पंखाना बळ मिळते, आपल्यात कुठल्याही कमतरता नाहीत याची जाणीव जागृत होते आणि इतरांना आपल्यासारखे सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळू शकते, असे मत पियुष शहा यांनी व्यक्त केले.
फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर दीपक सोनटक्के यांनी आभार मानले.

औंध येथील नवीन बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेसच्या फेऱ्या वाढवणार

औंध गाव जुन्या जकात नाक्याच्या जागेवर नवीन बसस्थानकाचे उद्घाटन संपन्न

पुणेऔंध गाव जुन्या जकात नाक्यावरून बसेसच्या ३ नवीन मार्गांचे उद्घाटन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिध्दार्थ शिरोळे यांचे प्रमुख उपस्थितीत व पीएमपीएमएल च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ-मुंडे यांचे हस्ते करण्यात आले

पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, शहरांलगतची उपनगरे व पीएमआरडीए कार्यक्षेत्रात प्रवाशी बससेवा पुरविण्यात येते. पुणे व पिंपरी चिंचवड शहरांच्या मध्यभागी असलेल्या औंध या भागात सततच्या वाहतूक कोंडीमुळे संचलनात असलेल्या मार्गांवरील नियोजित खेपा पूर्ण होणे शक्य होत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. जास्त फेऱ्या,जास्त बसेस उपलब्ध करणे अडचणीचे होते.यामुळे परिवहन महामंडळाच्या संचलन कार्यक्षेत्रातील प्रवाशांना तत्पर व विश्वसनीय सुलभ बससेवा देण्याच्या दृष्टीने महामंडळामार्फत दोन्ही शहरांच्या मध्यभागी असलेल्या औंध जकात नाक्याची जागा आता बस स्थानकामध्ये विकसित करण्यात आली आहे.
या औंध बसस्थानकातून बसमार्ग क्र. ३४ औंध ते मुकाई चौक रावेत, बसमार्ग क्र. १२४ औंध ते निलसॉफ्ट कंपनी
हिंजवडी फेज ३ व बसमार्ग क्र. ३६०अ औंध ते आळंदी हे नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत.
तरी सर्व नागरिकांनी औंध बसस्थानकातून संचलनात सुरू झालेल्या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन
परिवहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.

पतीचा खून करताच पत्नीला प्रियकरासह ३ तासात पोलिसांनी केले गजाआड:लोणी काळभोरची घटना

पुणे -अनैतिक संबधास बाधा आणणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने ठार मारले पण अवघ्या ३ तासांमध्ये पोलिसांनी हा खुनाचा गंभीर गुन्हा उघडकीस आणुन या दोघांना अटक केली आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०१/०४/२०२५ रोजी नियंत्रण कक्ष पुणे शहर यांचे मार्फत रायवाडी रोड, वडाळे वस्ती, लोणी काळभोर, पुणे याठिकाणी एक इसम जखमी व बेशुध्द अवस्थेत पडला असलेबाबत कॉल प्राप्त झाला. सदर कॉल चे पुर्ततेकामी लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे हे पोलीस स्टाफसह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. सदर घटनास्थळी इसम नामे रविंद्र काशीनाथ काळभोर वय ४५ वर्षे रा. रायवाडी रोड, वडाळे वस्ती, लोणी काळभोर हा त्याचे राहते घराचे बाहेर पलंगावर रक्ताचे थारोळ्यात जखमी व बेशुध्द अवस्थेत पडला असल्याचे पोलीसांना दिसुन आले. तदनंतर लोणी काळभोर पोलीसांनी लागलीच आय कार, डॉग स्कॉड व अॅम्ब्युलन्स ला पाचारण केले व अॅम्ब्युलन्सव्दारे जखमी इसमास प्राथमिक आरोग्यकेंद्र लोणी काळभोर पुणे येथे नेले. परंतु सदर इसम उपचारापुर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. त्यावरुन सदर इसमाचा कोणीतरी अज्ञात कारणावरुन खुन केल्याची प्राथमिक माहिती पोलीसांना प्राप्त झाली.
तदनंतर पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, राजकुमार शिंदे, व सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर, अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पो. स्टे. राजेद्र पन्हाळे यांचे मार्गदर्शनाखाली, तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर ठिकाणचे आजबाजुचे परिसरातील लोकांकडे परिस्थीतीजन्य पुराव्यांचे आधारे चौकशी करुन माहिती घेतली. त्यावर मयत इसमाची पत्नी यांचे इसम नामे गोरख त्र्यंबक काळभोर वय ४१ वर्षे यांचेशी अनैतीक संबध असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरुन लोणी काळभोर पोलीसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता, चौकशी दरम्यान गोरख त्र्यंबक काळभोर व मयताची पत्नी या दोघांनी आपसांत संगणमत करुन त्यांचे संबंधात मयत इसम बाधा निर्माण करत असल्याने, मयत इसम हा दि. ३१/०३/२०२५ रोजी रात्री ११/०० वा. चे नंतर त्याचे राहते घराचे बाहेर झोपला असताना त्याचे डोक्यात कोणत्यातरी हत्याराने वार करुन, गंभिर जखमी करुन, त्यास जिवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कष्ट, कल्पकतेद्वारे ग्रामीण उद्योजकांना यशप्राप्ती : सत्यजित तांबे

पुणे : देशात कामांच्या संधी मुबलक आहेत; परंतु नोकऱ्यांची कमतरता आहे. कोणतेही सरकार सगळ्यांसाठी नोकऱ्या निर्माण करूच शकत नाही. जेव्हा तरुण रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतील तेव्हाच नोकऱ्याही निर्माण होतील. म्हणूनच युवा पिढीने नोकरीच्या मागे न लागता उद्योग क्षेत्रात नेटाने, जिद्दिने आणि ऊर्जेने परिपूर्ण राहून कार्यरत होण्याची आवश्यकता आहे, असे ठाम प्रतिपादन पर्सिस्टंटचे संस्थापक संचालक डॉ. आनंद देशपांडे यांनी आज (दि.1) येथे केले.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील उद्योजकांचे सक्षमीकरण करण्यासाठी कॉमसेन्स टेक्नॉलॉजिस्‌‍चे अध्यक्ष सागर बाबर व महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‌‘रुरल आंत्रप्रिन्युअर्स कनेक्ट इनिशिएटिव्ह‌’ या उपक्रमाचा शुभारंभ डॉ. देशपांडे आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमात या दोघांची प्रकट मुलाखत सागर बाबर यांनी घेतली.

डॉ. देशपांडे आणि तांबे यांनी उद्योजकता या विषयावर परखड मते मांडली. पत्रकार भवनाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात तरुणांचा तसेच युवा उद्योजकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी तौरल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ भारत गिते, निबे गु्रपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे प्रमुख पाहुणे होते. या प्रसंगी ‌‘रुरल आंत्रप्रिन्युअर्स कनेक्ट इनिशिएटिव्ह‌’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आनंद देशपांडे म्हणाले की, उद्योगात येणाऱ्याला त्याच्या उत्पादनाची समाजाला अर्थात ग्राहकाला असलेली गरज आणि वैशिष्ट्य समजले पाहिजे. बाजारपेठेत उत्पादनाची गुणवत्ता उत्कृष्ट असली पाहिजे. वित्तीय व्यवस्थापन, ग्राहकांची मागणी आणि विक्री कौशल्यांचा सुयोग्य तऱ्हेने अवलंब केल्यास उद्योजकता प्रगत होईल.

ते म्हणाले, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून बाजारपेठेतील विक्रीच्या संधी, वित्तीय व्यवस्थापन याविषयी सखोल अभ्यास करून उद्योजक विविध क्षेत्रात यश संपादन करू शकतात. आजच्या काळात आपले कार्यक्षेत्र सतत बदलत ठेवणे आवश्यक आहे. नोकरी शोधण्याऐवजी नोकरी देण्याच्या संधींचा अवलंब करत तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून नवउद्योजकांनी कार्यरत राहणे गरजेचे आहे. व्यवसायाविषयी अर्धवट ज्ञान आणि अपुरे शिक्षण असल्यास उद्योजकता क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकणार नाही.

छोट्या उद्योजकांशिवाय देशाची प्रगती होणे शक्य नाही. कॉर्पोरेट क्षेत्र आणि शासनाने एकत्रितरित्या वाटचाल केल्यास रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील. ग्रामीण युवक प्रतिकूल परिस्थितीत कष्टाला न घाबरता तग धरून राहतो यामुळे उद्योजकता क्षेत्रात त्याला निश्चितच यशप्रप्ती होईल, असे आमदार सत्यजित तांबे म्हणाले. झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ-मोठे उद्योजक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने नोकरीच्या संधी कमी होत आहेत. ग्रामीण भागातील युवा उद्योजकांकडे प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून यश मिळविण्याची अधिक जिद्द असते. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील युवकांना उद्योग सुरू करण्याच्या संधी उपलब्ध होणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांच्या कल्पकतेला दिशा मिळेल. नवउद्योजकांसाठी अनेक सरकारी योजना उपलब्ध असून देखील कर्जपुरवठा होताना अनेक अडचणी येतात. यामागे उद्योजकांची मानसिकताच कारणीभूत ठरते. सरकारी योजनेच्या माध्यमातून घेतलेले कर्ज फेडायचे नसते तर बुडवायचे असते ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे, असे तांबे यांनी सांगितले.

प्रास्ताविकात सचिन ईटकर यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रात सुधारणा होऊन ग्रामीण भागातील नवउद्योजकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने ‌‘रुरल आंत्रप्रिन्युअर्स कनेक्ट इनिशिएटिव्ह‌’च्या स्थापनेमागची संकल्पना स्पष्ट केली.
या उपक्रमाविषयी माहिती देताना सागर बाबर म्हणाले, ग्रामीण भागातील उद्योजकांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात येण्यासाठी प्रवृत्त करावे या हेतूने या उपक्रमाची सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील नवउद्योजकांच्या अडचणींचाही मागोवा घेतला जाणार आहे. शिक्षण, वित्त, तंत्रज्ञान आणि बाजारापेठांतील संधी या चतु:सूत्रीची अवलंब करत संस्था कार्यरत राहणार आहे.

गणेश निबे आणि भारत गिते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.

विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळेद्वारे विश्व तुमच्या दारी… खगोलशास्त्रात रस असणार्‍या प्रेक्षकांना, संशोधकांना मेजवानी

पुणे, दि.१ एप्रिल : खगोलशास्त्रात रस असणार्‍या प्रेक्षक, संशोधक आणि सर्वसामान्यांना अद्वितीय अनुभव देण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्र विभागाच्या कॉसमॉस अ‍ॅस्ट्रॉनाॅमी क्लबच्या वतिने सेलेस्टिया२०२५ हा अभिनव उपक्रम दि.४ एप्रिल रोजी दुपारी १.००वा.च्या पुढे एमआयटी डब्ल्यूपीयूच्या परिसरात राबविण्यात येत आहे. अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस व प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विज्ञानाच्या जिज्ञासेला आणि खगोलशास्त्रीय संशोधनाला चालना देण्यासाठी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी “विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळा“ स्थापन केली आहे. या कार्याला पुढे नेण्यासाठी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांचे विशेष योगदान आहे.
सेलेस्टिया २०२५ याच्या माध्यमातून नागरिक अत्याधुनिक दुर्बिणीतून विश्वाचा अनुभव घेऊ शकतील. तसेच, सूर्याचे निरीक्षण सत्रे असतील. दुर्बिणीतून सूर्यावरील डाग (सनस्पॉट्स) दाखवले जातील. तसेच प्रदर्शन स्टॉलवर आम्ही काढलेली खगोलीय छायाचित्रे आणि उपग्रहांची प्रतिमा प्रदर्शित केली जातील. विद्यार्थी खगोलशास्त्र, खगोलभौतिकी आणि अंतराळविज्ञान या विविध विषयांवर पोस्टर सादर करतील. माजी उपजिल्हाधिकारी व खगोलशास्त्रातील रस असलेले दत्ता देवगावंकर हे “खगोलशास्त्र लोकांपर्यंत पोहोचवणे“ यावर विचार मांडतील.  
नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमी — टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च चे विशिष्ट प्रा. डॉ. यशवंत गुप्ता हे “रेडिओ डोळ्यांनी विश्वाचा शोध“ यावर माहिती देतील. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स चे वरिष्ठ संशोधक  LIGO-India  सह गुरुत्वाकर्षण लहरींच्या खगोलशास्त्राचे भविष्य“ यावर बोलणार आहेत, या नंतर वेधशाळेत आकाश प्रदर्शन आणि तारे निरीक्षण सत्रे आहे ज्यात गहन आकाश आणि ग्रहांचे निरीक्षण समाविष्ट असेल.

सेलेस्टियाचा मुख्य उद्देश जिज्ञासा जागृत करणे, वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि अंतराळातील आश्चर्य समुदायापर्यंत पोहोचवणे हा आहे.
तसेच, १८ एप्रिल रोजी एचएएम रेडिओ प्रात्यक्षिक आणि पुरातन रेडिओचे प्रदर्शनीचे आयोजीत केली आहेे. हे असे तंत्रज्ञान आहे जे शोध-बचाव, रहदारी नियंत्रण आणि इतर समुदाय कार्यक्रमांसारख्या उपक्रमांना मदत करते. नैसर्गिक आपत्ती, सार्वजनिक आणीबाणी किंवा इतर परिस्थितीत जेथे पारंपारिक संप्रेषण प्रणाली अयशस्वी होते, तेथे एचएएम रेडिओ महत्त्वाची भूमिका बजावते. यावेळी एचएएम रेडिओ ऑपरेटर दत्ता देवगावंकर हे रेडिओ संप्रेषणाच्या मूलभूत गोष्टींसह एचएएम रेडिओ तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. तसेच देवगांवकर यांच्या मालकीच्या पुरातन रेडिओ संचांचे प्रदर्शनही पाहावयास मिळेल.
आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. अनुप काळे, डॉ. प्रसाद जोगळेकर, प्रा. अनघा कर्णे व विद्यार्थी ओजस धुमाळ उपस्थित होते.

अनंतराव पवार अभियांत्रिकीची अश्विनी केदारी एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम

पुणे-राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२३ च्या PSI पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. एकूण ३७४ पदांसाठी घेण्यात आलेल्या  परीक्षेत अश्विनी बाबुराव केदारी हिने २८१.५  गुण मिळवून महिला प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. एमपीएससी परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेली अश्विनी बाबुराव केदारी मूळची पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाळू गावची आहे. तिचे वडील बाबुराव केदारी हे  शेतकरी आहेत.  अश्विनी  ने इंजिनीअरिंग करत असताना  स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरवात केली होती. इंजिनीअरिंग चे शिक्षण पुण्यातील अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲड रिसर्च पर्वती या महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातून पूर्ण केलेआहे.  स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे असा मोलाचा सल्ला अश्विनी केदारी हिने दिला. अश्विनीच्या या यशाबद्दल मा.किशोरराजे निंबाळकर, माजी अध्यक्ष, राज्य लोकसेवा आयोग  व डॉ.नवनाथ पासलकर माजी सदस्य, राज्य लोकसेवा आयोग यांचे हस्ते अश्विनीचा सत्कार करून कौतुक करण्यात आले.

अश्विनीच्या या यशाबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील ठाकरे, प्रा. गणेश कोंढाळकर, डॉ.दत्तात्रय कांबळे, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

उद्योजिका सन्मान सोहळा उत्साहात

महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्याची गरज – ॲड. गणेश सातपुते

पुणे- शिव उद्योगबोधिनी यांच्या वतीने उद्योजिका महिलांचा नुकताच येथे सन्मान करण्यात आला . यावेळी काँग्रेस शिव उद्योग प्रबोधिनीचे अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते, उपाध्यक्ष महेश महाले, कार्याध्यक्ष शुभांगी सातपुते, सचिव सुर्यकांत माडे सर्व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवार दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

अथक परिश्रम, चिकाटी एकाच वेळी आघात आत्मविश्वासावर काम करताना कसब असे उद्योजक होण्यासाठी आवश्यक गुण महिलांकडे उपजतच असतात. महिलांचे उद्योग प्रमाण वाढवण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देणे योग्य आहे, असे मत ॲड. गणेश सातपुते यांनी व्यक्त केले.

वंदना खके (मुद्रण व्यवसाय), सोनाली पाटोळे (शर्मा मोल शॉपी), मुग्धा मित्तल (शिक्षक संस्था), नेहा सातपुते (ए७, व्हाईज शॉपी), स्मिता धुमाळ (हॉटेल व्यवसाय) या महिला महिलांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

स्मिता धुमाळ यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या ,’ उद्योगात महिलांची कसरत असते. पण महिलानी खचून न जाता विविध क्षेत्रांमध्ये उद्योगांसाठी जोडले पाहिजे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश महाले व सूर्यकांत माडे यांनी केले.

महापालिकेच्या जलतरण तलावावर प्रशिक्षण घेत आहेत राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू…

पुणे –

तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने बाणेर येथील पुणे महानगरपालिकेच्या कै.धनंजय मधुकर ताम्हाणे जलतरण तलावावर पोहण्यासाठी तसेच पोहणे शिकण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे .सुट्ट्यांमुळे लहान मुले पोहण्यासाठी गर्दी करत आहेत त्यामुळे जलतरण तलाव फुल होत आहेत.

द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ तपन कुमार पाणिग्रही हे या ठिकाणी मुलांना दर्जेदार पद्धतीने होण्याचे प्रशिक्षण देत आहेत. अत्यल्प फी मध्ये दर्जेदार पद्धतीने महानगरपालिकेच्या जलतरण तलावामध्ये मुलांना प्रशिक्षण लाभत असल्यामुळे या ठिकाणी अनेक राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू सराव करण्यासाठी येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला आहे त्यामुळे उन्हापासून सुटका मिळावी यासाठी जलतरण तलावावर पोहण्यास नागरिक गर्दी करू लागले आहेत लहान मुलांबरोबरच त्यांचे पालक देखील पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी जलतरण तलावांवर येत आहेत. बच्चे कंपनी या जलतरण तलावावर सकाळपासूनच गर्दी करत आहेत.

बाणेर परिसरातील इतर जलतरण तलावांच्या मानाने महानगरपालिकेच्या जलतरण तलावावर माफक दरामध्ये नागरिकांसाठी कोचिंग तसेच पोहण्याच्या तलावाची सोय उपलब्ध केली असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोहण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र महिला प्रशिक्षकाचे देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाणेर परिसरातील खाजगी जलतरण तलावांवर पोहणे शिकण्यासाठी पाच ते सात हजार फी आकारले जाते त्यामुळे सामान्य नागरिकांना ही फी परवडत नाही परंतु महानगरपालिकेच्या जलतरण तलावांवर अत्यंत कमी फी मध्ये कोचिंग उपलब्ध करून दिल्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांना देखील या ठिकाणी पोहण्यासाठी दर्जेदार कोचिंग मिळत आहे.

बाणेर येथील महानगरपालिकेच्या ताम्हाणे जलतरण तलावामध्ये मिळणाऱ्या सुविधा दर्जेदार असल्यामुळे परिसरातील नागरिक पोहण्यासाठी या जलतरण तलावाला प्राधान्य देत आहेत. या ठिकाणी चेंजिंग रूम तसेच शॉवरची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच पोहण्यासाठी पोहण्याचा ड्रेस कंपल्सरी करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिकेने अत्यंत अल्प दरामध्ये बाणेर परिसरामध्ये पोहोण्याचा तलाव नागरिकांना उपलब्ध करून दिल्यामुळे परिसरातील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत तसेच लहान मुलांबरोबरच पालक देखील या तलावामध्ये पोहण्याचा आनंद लुटत आहेत.