Home Blog Page 383

हिंदू शेतकरी आणि हिंदू देवस्थानच्या जमिनी परत करणार:वक्फ बोर्ड विधेयक मंजूर झाल्यावर मोठा निर्णय घेण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा

मुंबई-वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेण्याची तयारी करत असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर वक्फ बोर्डाच्या माध्यमातून हिंदू शेतकरी आणि हिंदू देवस्थानच्या ज्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत, त्या परत करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी आपल्याला दाव्याने सांगतो की, संसदेमध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याच्यात काय काय तरतुदी मंजूर झाल्या ते पाहण्यात येईल. त्यानंतर महाराष्ट्र सरकार देखील पुढाकार घेऊन हिंदू शेतकऱ्यांच्या, हिंदू मंदिरांच्या आणि संस्थानाच्या तसेच मुस्लिम समाजाच्या देखील ज्या जमिनी वक्फ बोर्डाने मोगलाई करुन बळजबरीने ताब्यात घेतल्या आहेत. त्या परत करण्यासाठी आम्ही पुढाकार घेणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र सरकार नक्कीच पुढाकार घेईल, ज्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आल्या आहेत, त्या परत केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरील मतदानावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले नसतील तर त्यांनी वक्फ बोर्डाच्या विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात वॉक आउट करणे म्हणजे वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करणे आहे. असे देखील ते म्हणाले. त्यामुळे वॉक आउट न करता विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याचे आव्हान देखील त्यांनी दिले आहे.

या संदर्भात उद्धव ठाकरे गटाने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. तरी देखील पक्षाचे खासदार संजय राऊत म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाला सुधारणा आणि विज्ञानवाद यांचा एक सपोर्ट दिला आहे. पण फडणवीस आणि त्यांचे बगलबच्चे जी बांग देत आहे ती चुकीची आहे. हिंदुंत्व हिंदुंत्वाच्या जागी आहे, तर अशी बिले त्यांच्या जागी. आम्ही 370 बिलाला, तिहेरी तलाकला विरोध केला नाही. वक्फ बोर्डासंदर्भात संध्याकाळी मतदान असून त्यामुळे आम्ही नंतर भूमिका जाहिर करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे दार उघडे ठेवावे – निरंजनकुमार सुधांशू

राज्‍यसेवेतील १४४ अधिकाऱ्यांचे यशदामध्ये पायाभूत प्रशिक्षण


पुणे दि. २ एप्रिल : शासकीय अधिकाऱ्यांकडे काम घेऊन येणाऱ्यांसाठी त्‍या अधिकाऱ्यांनी उपलब्‍ध असले पाहिजे. त्‍याचबरोबर लोकांमध्ये जाऊन त्‍यांच्या समस्‍या जाणून घेऊन त्‍यांच्या सूचना विचारात घेऊन त्‍या पद्धतीने कामकाज करायला हवे. त्‍याचबरोबर अधिकाऱ्यांनी आपल्‍या कार्यालयाचे दार सामान्यांसाठी सतत उघडे ठेवावे, असे आवाहन यशदाचे महासंचालक निरंजनकुमार सुधांशू यांनी केले.
महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाकडून नियुक्‍त झालेल्‍या राज्‍यसेवेतील वर्ग -१ च्या १४४ अधिकाऱ्यांच्या १० व्या एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) तुकडीचे पायाभूत प्रशिक्षण आजपासून यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदामध्ये सुरु झाले. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी सुधांशू बोलत होते.
राज्‍याच्या सामान्य प्रशासन विभागाने महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्‍यसेवा परीक्षेतून सरळसेवेने नियुक्‍त होणाऱ्या गट ‘अ’ व गट ‘ब’ मधील अधिकाऱ्यांसाठी एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) सन २०१४ पासून लागू केला आहे. यामध्ये एकूण ३३ संवर्गातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी जसे मसुरीच्या लालबहादूर शास्‍त्री राष्‍ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले जाते त्‍याच धर्तीवर यशदामध्ये हे प्रशिक्षण होत आहे.
गट ‘अ’ अधिकाऱ्यांसाठी यशदा व गट ‘ब’ अधिकाऱ्यांसाठी नागपूर येथील वनामती येथे पायाभूत प्रशिक्षण घेतले जाते. यावर्षी गट ‘अ’ चे १४४ अधिकारी यशदामध्ये प्रशिक्षणासाठी उपस्‍थित झाले आहेत. त्‍यामध्ये उपजिल्‍हाधिकारी-१९, तहसीलदार-१४, पोलिस उपअधीक्षक / सहायक आयुक्‍त-२१, सहायक आयुक्‍त विक्री कर-३०, उपनिबंधक सहकारी संस्‍था-२, गटविकास अधिकारी-७, महाराष्‍ट्र वित्त व लेखा अधिकारी–६, नगरपालिका मुख्याधिकारी–१, शिक्षणाधिकारी–१३, प्रकल्‍प अधिकारी / सहाय्यक आयुक्‍त आदिवासी विकास–४, महिला व बालविकास अधिकारी-१७ असे १४४ अधिकारी आहेत.
दि. २ एप्रिल २०२५ ते २७ मे २०२५ पर्यंत ५६ दिवस म्‍हणजेच ८ आठवडे हे प्रशिक्षण आहे.
उद्घाटनप्रसंगी यशदाचे अतिरिक्‍त महासंचालक शेखर गायकवाड, उपमहासंचालक पवनीत कौर, उपमहासंचालक डॉ. मल्‍लिनाथ कल्‍लशेट्टी, या प्रशिक्षणाचे सत्रसंचालक तथा उपमहासंचालक मंगेश जोशी यांची उपस्‍थिती होती. यावेळी पुढे बोलताना महासंचालक सुधांशू म्‍हणाले, अधिकाऱ्यांनी आपल्‍याकडे काम घेऊन येणाऱ्या सामान्य लोकांचे प्रश्न ऐकून घेऊन त्‍यांच्याशी विनम्रपणे बोलले पाहिजे, वागले पाहिजे, प्रसंगी कधीकधी न्यायाची भूमिका घेताना चौकटीबाहेर जाऊन सुद्धा काम केले पाहिजे. त्‍याचबरोबर अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामे वेळेत करून वेळेचे व्यवस्‍थापनही केले पाहिजे.
प्रारंभी सत्रसंचालक मंगेश जोशी यांनी एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाची सविस्‍तर रुपरेषा सांगितली. या प्रशिक्षणादरम्‍यान महाराष्‍ट्र दर्शन, दिल्‍ली भेट, शासकीय कार्यालयातील संलग्‍नता, तांत्रिक प्रशिक्षण, उजळणी प्रशिक्षण याचा पायाभूत प्रशिक्षणात समावेश असल्‍याचे त्यानी सांगितले. प्रशिक्षणाचा भाग म्‍हणून या पायाभूत प्रशिक्षणादरम्‍यान प्रशासकीय कामकाजास पूरक ठरणारी पदव्युत्तर पदवी ‘मास्‍टर ऑफ आटर्स इन डेव्हलपमेंट ॲडमिनिट्रेशन’ ही पदवी उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना गोखले राज्‍यशास्‍त्र आणि अर्थशास्‍त्र संस्‍था तसेच यशदा व वनामती यांच्या संयुक्‍त विद्यमाने देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात लोकप्रशासन, कायदा, व्यवस्‍थापन या व अन्य उपयुक्‍त ठरणाऱ्या विषयांचे प्रशिक्षण विविध क्षेत्रातील तज्ञ यांच्यामार्फत यशदा देणार आहे. सहसत्रसंचालक वीणा सुपेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. किरण धांडे यांनी केले. तर आभार रेश्मा होजगे यांनी मानले.

अजित पवारांनी काकांना आशीर्वादापुरते मर्यादीत ठेवले:देवेंद्र फडणवीसांची कोपरखळी; वक्फ बिलावरून उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई-अजित पवारांनी त्यांच्या काकांना आशीर्वादापुरते मर्यादीत ठेवले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या माध्यमातून त्यांनी अजित पवार यांना शरद पवार यांना कोपरखळी लगावली आहे. तसेच वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. बाळासाहेब ठाकरे यांचा अंश जरी बाकी असेल तर उद्धव ठाकरे गटाने या विधेयकाचे समर्थन करण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरला गेला आहे. त्याच प्रत्यंतर आपल्याला या बिलामध्ये पाहायला मिळत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या संदर्भातील कायद्यामध्ये अमर्याद अधिकार होते. चुकीच्या पद्धतीने निर्णय झाला तर त्या निर्णया विरोधात न्यायालयात जाण्याची देखील मुभा नव्हती. आता या सुधारणामुळे ती मुभा दिलेली आहे. तसेच चुका सुधारण्याची संधी दिलेली आहे. विशेषतः महिलांना प्रतिनिधित्वाची संधी मिळाली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. देशातून तीन तलाक हद्दपार झाल्यानंतर मुस्लिम महिलांना देखील यात प्रतिनिधित्व मिळत आहे. हे अतिशय पुरोगामी पाऊल असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हे विधेयक कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. कोणत्याही समाजाच्या धार्मिक आस्थांच्या विरोधात नाही. तर पूर्वी झालेल्या चुकांचा फायदा काही लोक घेत होते. त्यातून मोठ्या प्रमाणात जमिनी लाटत होते. त्यांच्यावर मात्र यामुळे टाच येणार आहे. त्यामुळे या बिलाचे मी स्वागत करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ज्यांची – ज्यांची सदसदविवेक बुद्धी जागृत आहे. ते सर्व या बिलाला समर्थन करतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. हे बिल संसदेत मांडण्यात आले असून त्यावर चर्चा सुरू आहे. याचा मला आनंद असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच हे बिल नक्कीच मंजूर होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. बाळासाहेबांच्या विचाराचा अंश असेल तरी ठाकरे गट समर्थन करेल विरोधकांनी आपल्या छातीवर हात ठेवून निर्णय घेतला तर ते या बिलाच्या बाजूनेच निर्णय घेतील. मात्र त्यांना केवळ लांगुलचलन करायचे असल्यामुळे ते या बिलाला विरोध करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. ज्यांची- ज्यांची सदसदविवेक बुद्धी जिवंत असेल आणि विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संदर्भात जर हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर अजूनही चालण्याची इच्छा असेल तर मला अपेक्षा आहे की, ते या विधेयकाला समर्थन करतील आणि या बिलाला विरोध करणार नाहीत. असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा थोडा अंश जरी बाकी असेल तरी उद्धव ठाकरे गट या विधेयकाचे समर्थन करेल असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. काकांना त्यांनी आशीर्वाद पुरतेच मर्यादीत ठेवले काकांच्या आशीर्वादाने माझे सर्व चांगले चालू असल्याचे अजित पवार यांनी बीड जिल्हा दौऱ्यावर असताना म्हटले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. काकांना त्यांनी आशीर्वाद पुरतेच मर्यादीत ठेवले असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. मोठ्यांचा आशीर्वाद घेणे ही चांगली गोष्ट असल्याचे देखील ते म्हणाले महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही मराठीच्या विषयावर सरकारची भूमिका पक्की आहे. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही. तो आग्रह कोणी धरत असेल तर ते योग्यच आहे. मात्र त्या आग्रहासाठी कोणी कायदा हातात घेतला तर त्यावर कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठीच्या आग्रहासाठी बँकांची झाडाझडती घेण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते. यावर फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

संवादिनी वादनातून घडला सुरेल सुसंवाद 

श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सवात ‘मास्टर कीज’ या दीप्ती कुलकर्णी व सहकारी यांचा कार्यक्रम ; उत्सवाचे २६४ वे वर्ष

पुणे : शाकुंतल नाटकातील अजरामर झालेली ‘पंचतुंड नररुंड मालधर…‘ या नांदी पासून ते संवादिनीवर वाजविण्यात येणाऱ्या विविध रांगांची ओळख करून देताना सादर झालेले गणेशस्तुती करणारे ‘धीमहि’ हे गीत सादर करीत रसिकांशी सुरेल सुसंवाद साधला गेला. संवादिनीला विविध वाद्यांची साथ मिळाल्यावर उमटलेले स्वर कानावर पडताच रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली. 

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘मास्टर कीज’ या दिप्ती कुलकर्णी व सहकारी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे. 

ओम नमो जी आद्या.. या गणेश गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कट्यार काळजात घुसली मधील दिल की तपिश… या गीताच्या सादरीकरणाला विशेष दाद मिळाली. कुहू कुहू बोले कोयलिया… सुरत पिया की झीन बिसराई… या हिंदी गीतांसह बाई मी विकत घेतला शाम… मन शुद्ध तुझं… कसा बेभान हा वारा… ही गीते देखील रसिकांच्या पसंतीस उतरली. 

गीतरामायणातील निवडक गीते आणि पियानिका या वाद्यावर सादर झालेले या डोळ्याची दोन पाखरे…या गीताने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. विक्रम भट, केदार परांजपे, अजय अत्रे यांनी साथसंगत केली. रवींद्र खरे यांनी निवेदन केले. शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी सानिया कुलकर्णी यांची गायनसेवा होणार आहे. हा कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होणार असून सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे.

समान पाणीपुरवठा व कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम मार्गी लावणार- आमदार टिळेकर

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद

पुणे: “शहराला समान पाणीपुरवठा, कात्रज-कोंढवा रस्त्याचे विस्तारीकरण, बेकायदेशीर बांधकामे आणि प्लॉटिंग, महावितरण कोंढवा कार्यालयाचे विभाजन, उड्डाणपुलास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यासह स्वतंत्र महानगरपालिकेचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यावर संबंधितांनी सकारात्मकता दर्शवली असून, आठवडाभरात सभापती महोदयांच्या दालनात बैठक लावण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात हे सर्व मुद्दे मार्गी लागतील,” अशी माहिती विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी योगेश टिळेकर यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रा. सचिन जायभाये, भूषण नाहाटा, बाळासाहेब घुले आदी उपस्थित होते.

योगेश टिळेकर म्हणाले, “विधानपरिषद सदस्य म्हणून मला अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३२ तारांकित प्रश्न, ११ लक्षवेधी, ९ औचित्याचे मुद्दे आणि ७ विशेष उल्लेख करण्याची संधी मिळाली. कामगार विभागाच्या विधेयकावर मत मांडता आले. पुण्यातील पाण्याचा प्रश्न, बेकायदेशीर व अनधिकृत प्लॉटिंग आणि कोंढव्यात अनधिकृत इमारतीत सुरु असलेली शाळा या लक्षवेधीना मंत्रिमहोदयांनी उत्तर देऊन यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २८० कोटींचा निधी आला, मात्र, त्याचे काम अद्यापही सुरु झाले नाही, याकडे लक्ष वेधले.”

“पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढत असून, त्याचा ताण महापालिका प्रशासनावर पडत आहे. परिणामी मुलभुत सोईसुविधा पुरविण्यामध्ये अडचणी येत आहेत. उपनगरांमधील नागरिक कर भारत असूनही त्यांना विकासकामांचा लाभ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र महानगरपालिका तयार होणे गरजेचे आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी संवाद सुरु आहे. लवकरच यावर निर्णय होईल. शहरात बकालपणा वाढतो आहे. व्यापाऱ्यांकडून, विकसकांकडून बांधकामे सुरु आहेत. ते थांबवण्यासाठी महसूलमंत्र्यांशी चर्चा झाली आहे,” असे ते म्हणाले.

योगेश टिळेकर म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाशेजारील जागेत कर्करोग रुग्णालय उभारावे आणि त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे किंवा त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे, अशी आमची मागणी आहे. ही जागा खासगी विकासकाला देता कामा नये. तसेच संगमेश्वर येथे होत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाप्रमाणे धर्मवीरगडावरही स्मारक व्हावे, अशी भूमिका मांडली. भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सभागृहात संविधानावर भाषण करण्याची संधी मिळाली. संत सावता माळी यांच्या अरण (सोलापूर) येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटी मिळावेत व त्याला ‘अ’ दर्जा मिळावा, अशी मागणी केली.”

पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

– कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम मार्गी लागणार

– २४ तास व समान पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेणार

– निकृष्ट दर्जाच्या औषधांची खरेदी झाली, त्याची चौकशी प्राधिकरणामार्फत करावी

– कोल्हापूर जिल्ह्यातील समाज कल्याणच्या अभ्यासिका इमारतीचे बांधकाम

– मुंबई-पुणे व पुणे-नाशिकला जोडणाऱ्या नवीन चार पदरी रस्त्याचे काम मार्गी लावावे

– अवैध मद्यविक्री, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस ठाण्यांची वाढती संख्या

– कात्रज उड्डाणपुलाचे काम डिसेम्बरपर्यंत पूर्ण होणार

– अनधिकृत गुंठेवारी, प्लॉटिंगवर निर्बंध आणणार

– कात्रज उड्डाणपुलास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देणार

‘स्वामी गीतगंगा’ चे प्रकाशन

पुणे दि. २ – ज्येष्ठ संपादक मनोहर कुलकर्णी यांच्या हस्ते ‘ स्वामी गीतग़गा’ या गीतसंग्रहाचे प्रकाशन उत्साहात झाले.सदाशिव पेठ येथील ब्राह्मण मंगल कार्यालय सभागृहात सोमवार, ३१ मार्च रोजी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.यावेळी गीतकार रवींद्र काशीकर,प्रकाशक मिलींद जोरी,डॉ. भाग्यश्री हर्षे, प्रा. श्रीकांत काशीकर हे मंचावर उपस्थित होते.
रवींद्र काशीकर यांच्या भगिनी व ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या निवृत्त उपप्राचार्या डॉ. भाग्यश्री हर्षे यांनी वडील गोविंदराव व आई प्रतिभा यांचे स्मरण करून प्रास्ताविकात गीत संग्रहाचा परिचय करून दिला. काशीकर कुटुंबाला लाभलेल्या अध्यात्मिक,सामाजिक व सांस्कृतिक वारश्यामुळेच माझ्या बंधूंना गीतलेखनाची प्रेरणा मिळाली. ‘भिऊ नकोस मी पाठीशी आहे’ हा श्री स्वामीचा विचार. आम्हाला सदैव आश्वस्त करतो.श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या प्रगटदिनी त्यांच्याच भक्तीचे गुणवर्णन करणारा हा ग्रंथ प्रकान
होणे हा एक शुभ योग आहे असेही त्या म्हणाल्या.
गीतकार रवींद्र काशीकर यांनी गीतलेखन कसे सुचले हे सांगितले. दहाबारा वर्षांपूर्वीच यातले काही लेखन झाले आहे. ‘स्वामी गीतगंगा’ पूर्ण झाल्यावर त्याचे सहासात कार्यक्रमही झाले. असे सांगत छत्रपती संभाजीनगरला गतवर्षी मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या व्याख्यानमालेत झालेल्या कार्यक्रमानंतर ‘स्वामी गीतगंगा’ चे पुस्तक रुपात प्रकाशन करण्याची कल्पना पुढे आली. केंद्राचे सचिव व माझे चुलतबंधु प्रा.श्रीकांत काशीकर यांनी या संदर्भात सारथी प्रकाशनचे मिलींद जोरी यांच्याशी संपर्क साधला व श्री.जोरी यांनीही यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.आणि सर्व योग जुळून आज हे पुस्तक प्रकाशित होत आहे.

ज्येष्ठ संपादक मनोहर कुलकर्णी यांनी चोपन्न गीतांचा हा भक्ती रसपूर्ण गीत संग्रह अतिशय सोप्या व सरळ भाषेत आहे हे सांगताना या गीतांमध्ये ‘लय, छंद व गेयता आहे’ हे पुस्तकाच्या प्रस्तावनेत अंजली कऱ्हाडकर यांनी केलेले वर्णन अगदी सत्य आहे हे पुस्तक वाचताना मी अनुभवले आहे असेही सांगितले.आजच्या बदलत्या वैज्ञानिक प्रगतीच्या काळातही अशा पुस्तकांची गरज आहे.अध्यात्म व विज्ञान हे दोन्ही हातात हात घालून चालणे हे राष्ट्रविकासासाठी गरजेचे आहे. असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

संत झुलेलाल, गुरु अंगददेव,श्री स्वामी अक्कलकोट महाराज यांच्या जयंतीदिनी प्रकाशित होणाऱ्या या ग्रंथरचनेमागे काशीकर कुटुंबाच्या वाचन, लेखन, मुद्रण क्षेत्रांशी असलेल्या नातेसंबंधाचाही फार मोठा भाग आहे असे मत सूत्रसंचालक प्रा. श्रीकांत काशीकर यांनी व्यक्त केले. उपस्थितांचे स्वागत व आभार प्रदर्शन सौ.गौरी काशीकर – समुद्र यांनी पाहुण्यांचा परिचय भूषण हर्षे यांनी करून दिला. ईशस्तवन चार वर्षांच्या कु.आर्या समीर काशीकर हिने सादर केले.
प्रारंभी मनोहर कुलकर्णी यांचे स्वागत रवींद्र काशीकर यांनी तर प्रकाशक मिलिंद जोशी यांचे स्वागत डॉ.भाग्यश्री हर्षे यांनी केले. याच कार्यक्रमात मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या अध्यक्षा सौ. मानसी श्रीकांत काशीकर यांनी रवींद्र काशीकर यांचा शाल व श्रीफल देऊन सन्मान केला.
कार्यक्रमास माध्यम क्षेत्रातील गोपाळ जोशी,प्रकाश देशपांडे यासह अन्यही काही मान्यवर, काशीकर परिवारातील सदस्य, तसेच स्वामी भक्त बहुसंख्येने उपस्थित होते. प्रकाशन समारंभानंतर ‘स्वामी गीतगंगा’ मधील काही गीते रवींद्र काशीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केली.

वेणू वादन अविष्कारातून साकारला कल्याण नवरंग सागर

पुणे २ – बासरीवादनातून कल्याण थाट आणि जोड रागाच्या संयोगाने विविध पंचवीस रागांचा वेणू आविष्कार कल्याण नवरंग सागर पंडित केशव गिंडे यांनी आपल्या शिष्यासमवेत साकारला.
निमित्त होते अमुल्य ज्योती प्रतिष्ठान व महाराष्ट्र एक्झिक्युटिव्ह ट्रस्ट च्या वतीने पंडित पन्नालाल घोष यांच्या जयंतीनिमित्त “अमुल्य ज्योती संगीत महोत्सवा”चे आयोजन करण्यात आले.
महामाहोपाध्याय डॉ. पं. केशव गिंडे यांनी कल्याण नवरंग सागर ही अतिशय मधुर अशी संगीत रचना आपल्या शिष्यासमवेत सादर करताना राग यमन,यमन कल्याण,राज कल्याण, शुद्ध कल्याण, हंस कल्याण,श्याम कल्याण,मारूबिहाग,चांदनी केदार आदी राग विस्तारातून हे राग अत्यंत सुरेलपणे गुंफून सारे वातावरण वेणूमय झाले.
त्यांना वेणूसाथ दीपक भानूसे,धवल जोशी,निरंजन भालेराव, जितेंद्र रोकडे, आशुतोष जातेगावकर,सुनील बंडिवाड सिध्दांत कांबळे, परंतप मयेकर या शिष्यांनी केली.
तुकाराम जाधव (तबला), प्रकाश बेहरे ( की- बोर्ड) व प्रणय सकपाळ ( पखवाज) यांनी साथ केली.
यानंतर दुसर्‍या सत्रात पं.संजय गरुड यांनी बागेश्री बडा ख्याल व छोट्या ख्यालातील ” कोन करत तोरी बिनती पिहरवा” व त्यानंतर पटदीप रागातील ” बाजे मुरलिया ” हे भजन बहारदारपणे सादर केले. शेवटी ” जो भजे हरी को ” ही भैरवी सादर केली.
त्यांना प्रकाश बेहरे ( हार्मोनियम) ऋषिकेश जगताप (तबला) व ऋग्वेद जगताप (पखवाज) यांनी साथ संगत केली.
यावेळी बासरी बनविणारे कोल्हापूर येथील सयाजी पाटील यांचा पुणेरी पगडी घालून विशेष सत्कार प्रसिद्ध बासरीवादक पं.राजेंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
मिलिंद कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.या वेळी गान रसिकांची मोठी उपस्थिती होती.

मोदी यांच्या पहिल्या ड्रीम प्रोजेक्ट ‘ स्मार्ट सिटी ‘ चा अपयशी अंत-मुकुंद किर्दत

पुणे- #smartcity #pune-मोदी यांच्या पहिल्या ड्रीम प्रोजेक्ट ‘ स्मार्ट सिटी ‘ चा अपयशी अंत झाल्याची टीका आम आदमी पार्टी चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

किर्दत म्हणाले ,’केंद्र सरकारने 2015 मध्ये स्मार्ट सिटी मिशन ची सुरुवात केली आणि स्पर्धेनंतर 100 शहरे ठरवली . स्मार्ट सिटी हे पंतप्रधान मोदी यांनी निवडून आल्यानंतर देशभर राबविलेला पहिला विकास प्रकल्प होता आणि तो अक्षरशः गुंडाळावा लागलेला आहे. भाजप सरकारच्या अनेक इतर योजनांवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले परंतु स्मार्ट सिटी मध्ये प्रत्येक गोष्टीचे संख्यात्मक आणि गुणात्मक दर्जा संदर्भात परीक्षण पडताळणी करणे शक्य आहे त्यामुळे हे मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट चे अपयश लक्षणीय ठरणारे आहे.
या योजनेमध्ये पुणेकरांनी अपेक्षा म्हणून ‘वाहतूक कोंडी’ हा मुख्य विषय लाखो सूचनाद्वारे मांडला होता व पुणे शहरासाठी त्यावर सुधारणा अपेक्षित होत्या. परंतु प्रत्यक्षात मात्र ‘क्षेत्रनिहाय’ विकास योजना राबवण्यात आली आणि त्यासाठी आधीच विकसित असलेला व मोकळ्या जागा उपलब्ध असलेला औंध व इतर परिसर निवडण्यात आला. तेव्हापासूनच हा प्रकल्प दिखावा असल्याचे लक्षात येऊ लागले होते. याचे एक उदाहरण म्हणजे स्मार्ट सिटी अंतर्गत शाळांसाठी सुविधा द्यायच्या होत्या. औंध भागात काही शाळेमध्ये या योजनेअंतर्गत वेगळे अतिरिक्त सुरक्षारक्षक पुण्यात आले आणि तेच स्मार्ट सिटी चे काम म्हणून सांगण्यात आले.
ए टी एम एस हा सिग्नल यंत्रणा प्रकल्प फायदा देत असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात त्याचा परिणाम, यश मोजणारी कुठलीही यंत्रणा अथवा परीक्षण पद्धती कंपनीने अथवा महानगरपालिकेने प्रात्यक्षिक स्वरूपात दर्शवलेली नाही. त्यामुळे त्याची यशस्विता ही संशयास्पद आहे. सायकल योजना आणि थीम बेस उद्याने हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.
या स्मार्ट सिटी प्रकल्पावर किती खर्च झाला, खर्च कुठे केला, त्याचा फायदा काय झाला याचे सविस्तर विश्लेषण स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड ने देणे आवश्यक आहे. जनतेच्या मोठ्या अपेक्षा असलेल्या या प्रोजेक्ट चा उल्लेख मोदी वा भाजप ने कुठल्याही निवडणूक प्रचारात केला नाही हे ही नोंदवण्याजोगे असल्याची टीका आम आदमी पार्टी ने केली आहे.

,

डीईएस पुणे विद्यापीठात ‘तंत्रज्ञान महोत्सव’संपन्न

पुणे-डीईएस पुणे विद्यापीठात ‘नवोन्मेष’ या दोन दिवसांच्या तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.‘कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग आणि ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरींग’ या दोन शाखांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.’महाराष्ट्र ज्ञान मंडळा’चे अध्यक्ष डाॅ. विवेक सावंत, एल अँड टी एआयचे ग्लोबल कॉर्पोरेट ग्रुप हेड डॉ. आकाश मावळे, विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर यांनी मार्गदर्शन केले.विभाग प्रमुख डॉ. प्राची जोशी, डॉ. प्राजक्ता खडकीकर, डॉ. तृप्ती पावसे यांनी संयोजन केले.

पोलिसांनी जप्त केलेला गुटख्याचा ट्रक पळवून नेणारा कुख्यात गुटखा तस्कर गजाआड

पुणे- शहरासह जिल्ह्यात लपुनछपून गुटखा तस्करी करणार्‍या व पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याचा ट्रक पळवून नेणार्‍या कुख्यात गुटखा तस्कर निजामुद्दीन महेबुब शेख (40, रा. लोहीयानगर, गंजपेठ, मयुरपंगख सोसायटी, कोंढवा) याला नुकतेच राजगड पोलिसांनी अटक केले होते. त्याची न्यायालयीन कोठडीत रवागनी झाल्यानंतर पुणे शहर पोलिसांत त्याच्यावर तीन गुन्हे दाखल असून त्याचा लवकरच ताबा घेण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.

दि. 28 मे 2023 रोजी पहाटे अडीच ते पाच वाजण्याच्या सुमारास खेडशिवापूर येथील भरामनगर येथील रोडवर गुटख्यासह 81 लाख 21 हजारांचा आयशर टेम्पो पोलिसांनी पकडला होता. तो ट्रक चौकीच्या समोर उभा असताना तो ट्रक निजामुद्दीन शेख आणि त्याच्या साथीरांनी परस्पर पळला होता. याप्रकरणात तब्बल 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील एक हा निजामुद्दीन होता.

याप्रकरणात नंतर अटक झालेल्या व जामीन झालेल्या आरोपींच्या चौकशीनंतर तब्बल 41 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. दि. 24 मार्च रोजी निजामुद्दीन शेख याला अटक करण्यात आली होती. निजामुद्दीन शेखचे दोन बँकेत खाते असून त्या खात्यामूधन करोडो रूपयांचे ट्रान्झॅक्शन झाले आहे. दि. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 दरम्यानस 8 कोटी 54 लाख 82 हजारांचे डेबीट व 7 कोटी 92 लाख 28 हजारांचे त्याच्या बँक खात्यावर क्रेडीट दिसत आहे. त्याच्याकडील तपासामध्ये तो येरवडा पोलिस ठाणे, खडक पोलिस ठाणे, काळेपडळ पोलिस ठाणे यातील फरार असलेला आरोपी होते. त्याच्यामार्फत शहरात गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती समोर आली होती. त्याची नुकताच येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

राजगडच्या गुन्ह्यातील अजूनही 30 लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या हातील लागला नाही. त्याने चोरी केलेला माल भोर येथील शिंदेवाडी येथे नेवुन दुसर्‍या वाहनाचा वापर करून ट्रक मधील गुअखा दुसराया वाहनाचा वापर करून चोरून नेल्याचेही निष्पन्न झाले. गुन्हा केल्यानंतर तो गुटख्याचा बेकायदेशिर व्यावसाय करत होता. या दरम्यान तो माल कुणाला देत होता ? तुमकुर येथे जावुन तो हा अवैध गुटखा महाराष्ट्रात आणून त्याची तस्करी करत असल्याचे त्याच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान काळेपडळ, येरवडा आणि खडक पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात तो पाहिजे असलेला आरोपी असल्याने त्याचा लवकरच ताबा घेतला जाणार असल्याचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकडे यांनी सांगितले.

वक्फ सुधारणा विधेयक अन् हिंदुत्वाचा संबंध नाही:फडणवीसांनी आम्हाला शिवसेना-हिंदुत्व शिकवू नये- संजय राऊत

भाजपला जेव्हा मिश्या फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला पिळ देत देशभर फिरतो आहोत.

संजय राऊत म्हणाले की, वक्फच्या साडेआठ लाख मालमत्ता आहेत. त्यांची किंमत अडीच लाख कोटी रुपये झाली आहे. या संपत्तीवर काही सरकारच्या लाडक्या उद्योगपतींचा डोळा आहे त्यासाठी हा कार्यक्रम सुरू आहे. त्याला हिंदुत्वाचे नाव दिले असले तरी त्यांचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही.

मुंबई-वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा संबंध नाही. उद्योजकांना वक्फ बोर्डाची जमीन खरेदी करण्यासाठी हे सर्व काही सुरू आहे असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.संजय राऊत पुढे बोलताना म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे शिकवू नये. भाजपला जेव्हा मिश्या फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला पिळ देत देशभर फिरतो आहोत.

संजय राऊत म्हणाले की, आम्ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असल्यानं कलम 370 ला पाठिंबा दिला. देशभरातील लाखो गरीब महिलांचा प्रश्न असल्याने तिहेरी तलाकलाही आमचा पाठिंबा होता. मात्र वक्फ बिलाचा मुद्दा हा हिंदुत्वाचा नाही, तर संपत्तीचा आहे. देशभरात वक्फच्या लाखो प्रॉप्रटी आहेत. त्या प्रॉपर्टीवर काही लाडक्या उद्योजकांचा डोळा आहे. त्यामुळे हे बिल आणले आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत म्हटले की, वक्फ सुधारणा विधेयकसबद्दल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना खासदारांनी एक बैठक झाली. आमच्यात विधेयकावरुन काही संदिग्धता नाही. पण काही गोष्टी ह्या मिडीयासमोर सांगायच्या नसतात, त्या सभागृहात करायच्या असतात. देवेंद्र फडणवीसांना हिंदुत्वाची जर एवढी काळजी आहे तर मुंबईमध्ये जैन धर्मीयांकडून हिंदुंना जागा नाकारली जात आहे. मुंबईत हिंदुंना जागा नाकारत आहे. एखादे बिल आणून त्यांच्यावर कारवाई होणार का? मी मराठी माणूस नाही हिंदू म्हणत आहे. कारण ते नॉनव्हेज खातात म्हणून त्यांना जागा दिली जात नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे, त्यावर जर एखादे बिल आणणार असतील तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ.

संजय राऊत म्हटले की, भाजपने औरंगजेबाची कबर तोडण्याची जी भूमिका घेतली त्यावरुन संघाने विरोध केला, अशी भूमिका घेण्याची गरज नाही असे म्हटले आहे. या बिलाबद्दल संघाची भूमिका ही तशीच असल्याची माझी माहिती आहे. त्यामुळे हिंदुत्व आणि या बिलाचा काही संबंध नाही. हे केवळ बिल आहे.

संजय राऊत म्हटले की,बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाला सुधारणा आणि विज्ञानवाद यांचा एक सपोर्ट दिला आहे. पण फडणवीस आणि त्यांचे बगलबच्चे जी बांग देत आहे ती चुकीची आहे. हिंदुंत्व हिंदुंत्वाच्या जागी आहे, तर अशी बिले त्यांच्या जागी. आम्ही 370 बिलाला, तिहेरी तलाकला विरोध केला नाही.

संजय राऊत म्हणाले की, आमच्या पक्षाची भूमिका ठरली आहे. सदनात गेल्यानंतर तुम्हाला आमची भूमिका दिसेल. आमच्या पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला, तो आमच्या खासदारांपर्यंत पोहोचला आहे. आमच्या पक्षात अगोदर बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धव ठाकरे देतात, तो आदेश अंतिम असतो. त्याचे आम्ही पालन करतो. त्यामुळे आमची भूमिका माध्यमात नाही, तर सदनात दिसून येईल.

स्मार्ट सिटीच्या कामाचा लेखाजोखा जाहीरपणे मांडा-देशात पहिले बक्षीस घेतलेल्या’पुणे स्मार्ट सिटी’ प्रकल्पाला थेट आव्हान

१४ प्रश्नांची उत्तरे जाहीर करा ….

पुणे- देशात स्मार्ट सिटीचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस घेणाऱ्या पुणे स्मार्ट सीटी प्रकल्पाने आपल्या स्मार्ट सिटीच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर जाहीरपणे मांडावा असे थेट आव्हान भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रचे प्रदेश संयोजक आणि पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेता उज्ज्वल केसकर,माजी विरोधी पक्ष नेता सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्याधिकारी यांना दिले आहे.

या तिघांनी दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे कि,’
आज पासून पुणे स्मार्ट सिटी मिशन समाप्त होत आहे.
कुठलाही महत्त्वकांक्षी केंद्रीय कार्यक्रम हा विशिष्ट कालावधीसाठी आणि विशिष्ट उद्देश पूर्तीसाठी आखला जातो त्या कालावधीमध्ये त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित असते.
उदाहरणार्थ JNURM इत्यादी
पुणे महानगरपालिकेची स्मार्ट सिटी ही अखिल भारतीय स्पर्धेमध्ये प्रथम आली होती.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी मिशन देशाला पुण्यातून अर्पण केले होते.
पुणे स्मार्ट सिटी ची खालील प्रमाणे प्रमुख वैशिष्ट्य आणि उद्देश होते.
१) पुणे स्मार्ट सिटी मोहिमेचे उद्दिष्ट पुण्याला शाश्वत, राहण्यायोग्य आणि लवचिक शहरात रूपांतरित करणे आहे.
२) अभियान शाश्वत पायाभूत सुविधा विकास, सार्वजनिक सुविधा वाढवणे आणि संसाधनांच्या कार्यक्षम वापरासाठी स्मार्ट उपाय लागू करणे.
३) शहर विश्वासार्ह आणि सुलभ सार्वजनिक सेवा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि हिरवीगार जागा प्रदान करून नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करणे
४) डिजिटल परिवर्तन आणि नवोपक्रम, डिजिटल परिवर्तन, ई-गव्हर्नन्स आणि नागरिक-केंद्रित सेवा चालविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे.
५) स्मार्ट वाहतूक व्यवस्था: बुद्धिमान वाहतूक, व्यवस्थापन, रिअल-टाइम वाहन ट्रॅकिंग आणि स्मार्ट पार्किंग उपाययोजना लागू करणे.
६) स्मार्ट ग्रिड प्रणाली वीज वितरणाचे रिअल-टाइम देखरेख आणि नियंत्रणासह बुद्धिमान ऊर्जा व्यवस्थापन सक्षम करणे.
७) नागरिकांचा सहभाग
A) मोबाइल अॅप्स, सोशल मीडिया आणि समुदाय पोहोच कार्यक्रमांद्वारे नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे.

८) पुणे स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत काही उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये हे समाविष्ट आहे.

a)डिजिटल एक्सपिरीयन्स सेंटर
b) नागरिकांना एकत्र येऊन विकास परिस्थितींवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ.
c) स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग: पारंपारिक प्रकाश योजने ऐवजी ऊर्जा-कार्यक्षम एलईडी दिवे.
d) ई-बस: वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस सादर करणे.
e) विमानतळ एक्सप्रेस सेवा,विमानतळावर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी एक समर्पित शटल सेवा.
या (smart City mission) उपक्रमांचे उद्दिष्ट पुणे शहराला त्याच्या नागरिकांसाठी अधिक राहण्यायोग्य, शाश्वत आणि लवचिक शहर बनवणे हा होता.
या संकल्पनेतून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हे मिशन सुरू केले.
आता हे मिशन संपल्यानंतर खालील बाबींचा आढावा घेणे आणि तो स्मार्ट पुणे संकेतस्थळावर टाकणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते त्यातील मुद्दे खालील प्रमाणे
१) पुणे स्मार्ट सिटी ५८ प्रकल्प स्वीकारले
२) ९०० कोटी रुपये खर्च केले.
३) स्वीकारलेले ५८ प्रकल्प कुठले ?
४) त्यातली अंमलबजावणी झालेले प्रकल्प कुठले ?
५) अंश:ता अंमलबजावणी झालेले प्रकल्प कुठले ?
६) सुरूच झाले नाहीत असे प्रकल्प कुठले ?
७) प्रत्येक प्रकल्पावर किती रक्कम खर्ची पडली ?
८) किती रक्कम देणे बाकी आहे ?
९) प्रकल्प सल्लागार कोण होते ?
१०) त्यांनी ५८ प्रकल्पाचे DPR तयार केले आहे का ?
११) त्या सल्लागारांना एकंदरीत किती सल्ला फी दिली ?
१२) उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किती रकमेची आणि किती वेळेची आवश्यकता आहे ?
१३) हे सर्व प्रकल्प पुणे महानगरपालिकेकडे वर्ग केल्यामुळे आणि महानगरपालिकेने अंदाजपत्रक मांडल्यामुळे यासाठी कुठल्या कुठल्या निधीला वर्गीकरणाद्वारे कात्री लावून या प्रकल्पाकडे पैसे वर्ग करणार ?
१४) का हे प्रकल्प वाऱ्यावर सोडणार ?

याबाबत आज अस्तित्वात असलेल्या स्मार्ट सिटी च्या मुख्याधिकाऱ्याने जाहीर केले पाहिजे ही आमची मागणी आहे.

कामराला मुंबई पोलिसांचे तिसरे समन्स पण मद्रास उच्च न्यायालयाकडून ट्रान्झिट अॅन्टिसिपेटरी जामीन मंजूर

मुंबई- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्यावरील विडंबन गाण्याच्या प्रकरणात पोलिसांनी विनोदी कलाकार कुणाल कामराला तिसरे समन्स पाठवले आहे. त्याला 5 एप्रिल रोजी खार पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. याआधी पोलिसांनी कामरा यांना दोन समन्स पाठवले होते.दुसरीकडे, कुणाल कामरा मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयात हजर झाला. त्याने दावा केला की पोलिस त्याला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्याला ट्रान्झिट अॅन्टिसिपेटरी जामीन मंजूर करावा. या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी कामरा यांना संक्रमण अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.यापूर्वी 28 मार्च रोजी उच्च न्यायालयाने कामरा याला 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

कामरा याने मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्याचे शीर्षक होते – ‘How to kill an Artist “Democratically” कामरा यांनी लिहिले-
आज कलाकारांकडे फक्त दोनच पर्याय आहेत: तुमचा आत्मा विकून डॉलरसाठी कठपुतळी व्हा, किंवा शांतपणे मरून जा.

कामरा सध्या तामिळनाडूमध्ये आहे. कामराने एका स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये एक विडंबन केले होते ज्यामध्ये शिंदे यांना गद्दार म्हटले होते. त्याच्याविरुद्ध मुंबईतील खार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला तिसरे समन्स पाठवले आहे. याआधी 31 मार्च रोजी मुंबई पोलिस शिवाजी पार्कमधील कामराच्या घरी पोहोचले होते.

मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध तीन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही प्रकरणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत दिलेल्या वादग्रस्त विधानाशी संबंधित आहेत. 29 मार्च रोजी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली तक्रार जळगावच्या महापौरांनी दाखल केली आहे तर उर्वरित प्रकरणे नाशिकमधील दोन वेगवेगळ्या व्यावसायिकांनी दाखल केली आहेत.

या प्रकरणात, मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी दोन समन्स बजावले आहेत. त्याचप्रमाणे, कामरा यांच्याविरुद्धची विशेषाधिकार भंगाची नोटीस महाराष्ट्र विधान परिषदेतही स्वीकारण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे लिहिल्यानंतर वादात सापडलेल्या विनोदी कलाकार कुणाल कामरा यांना पोलिसांनी 31 मार्च रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पोलिसांनी आतापर्यंत त्याला दोन समन्स बजावले आहेत.

36 वर्षीय स्टँड-अप कॉमेडियनने त्यांच्या शोमध्ये शिंदे यांच्या राजकीय कारकीर्दीवर टीका केली होती. कामराने ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन केले होते ज्यामध्ये शिंदे यांना गद्दार म्हटले होते. त्याने गाण्याद्वारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पडण्यावर विनोदी भाष्यही केले.

भारतातील त्वचा-सौंदर्य उपचारांसाठी एमक्युटिक्स आणि विको यांच्यात विशेष परवान्याची भागीदारी

 ‘एमक्युटिक्स’ला भारतीय बाजारपेठेसाठी पीआरएक्स-प्लस या औषधाची आयात, त्याचा प्रचार आणि
वितरण करण्याचा विशेष हक्क मिळाला.

 ‘विको’च्या पेटंटेड फॉर्म्युलाच्या मदतीने त्वचेची पुनरुत्पत्ती आणि घट्टपणा देणारा इंजेक्शनविरहित
अत्याधुनिक उपाय.

मुंबई : एमक्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेडची संपूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या एमक्युटिक्स
बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीने विको या इटलीतील नाविन्यपूर्ण आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित
उत्पादनांमध्ये विशेष कौशल्य असलेल्या वैद्यकीय उपकरण आणि डर्मा-कॉस्मेटिक कंपनीसोबत विशेष परवाना करार
जाहीर केला आहे. या धोरणात्मक भागीदारीतून ‘पीआरएक्स-प्लस’ या विकोच्या अत्याधुनिक उत्पादनाची भारतात
आयात, प्रचार, वितरण आणि विक्री करण्याचा हक्क ‘एमक्युटिक्स’ला मिळाला आहे. या सहकार्यामुळे भारतातील नॉन-
इनव्हेसिव्ह त्वचारोग उपचारांमध्ये मोठा बदल घडणार आहे.


पीआरएक्स-प्लस ही त्वचेच्या तात्काळ घट्टपणासाठी विशेष प्रभावी फॉर्म्युला असलेली उत्पादने आहेत. पारंपरिक
सौंदर्य उपचारांना पर्याय म्हणून ती इंजेक्शनविरहित, वेदनारहित प्रभावी उपाय देतात.
‘विको’च्या पेटंटेड फॉर्म्युलाचा जगभरातील ४०,००० हून अधिक त्वचारोग तज्ज्ञ आणि सौंदर्य चिकित्सक वापर
करतात. या ‘नीडल-फ्री स्किन बूस्टर’ प्रक्रियांचा ८० लाखांहून अधिक इतका जागतिक स्तरावर यशस्वी वापर २०११
पासून करण्यात आला आहे.
‘पीआरएक्स-प्लस’ हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान असलेले उत्पादन आहे. इंजेक्शनच्या शिवाय त्वचेला त्वरित उठाव देणारे ते
ड्रॉपलेट-आधारित स्किनकेअर सोल्यूशन आहे. कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी आणि कोणत्याही ऋतूत सुरक्षितपणे
वापरण्यासारखा हा एक उत्तम पर्याय आहे.
‘एमक्युटिक्स बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नारायणन म्हणाले, “भारतीय
बाजारपेठेत त्वचा रोगावर नाविन्यपूर्ण आणि उच्च-गुणवत्तेची औषधयोजना आणणे हे ‘एमक्युटिक्स’चे ध्येय आहे.
विकोसोबतची भागीदारी हे आमच्या या कटिबद्धतेतील महत्त्वाचे पाऊल आहे. ‘पीआरएक्स-प्लस’ हे अत्याधुनिक
स्किनकेअर उत्पादन बाजारात आणून आम्ही त्वचारोगावरील उपचारांसाठी नवीन मानक प्रस्थापित करीत आहोत.
‘एमक्युटिक्स’च्या मजबूत विपणन तज्ज्ञतेमुळे भारतभरातील ग्राहकांसाठी हे उत्पादन सहज उपलब्ध करून देता
येईल.”
‘विको’चे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टियन डुफेयू म्हणाले, “भारतातील एमक्युटिक्ससोबतची भागीदारी हा सौंदर्य
उपचारांमध्ये क्रांती घडवण्याच्या आमच्या प्रयत्नातील मोठा टप्पा आहे. ‘पीआरएक्स-प्लस’च्या माध्यमातून आम्ही
केवळ त्वचा घट्ट करणारा इंजेक्शनविरहित उपाय देत नाही, तर सौंदर्य उपचारांच्या प्रगत क्षेत्रात डर्माटोलॉजिस्ट आणि
रुग्णांना अधिक सुरक्षित, प्रभावी पर्याय उपलब्ध करून देत आहोत. या सहकार्यातून आम्ही विज्ञानाधारित नाविन्यपूर्ण
उत्पादने नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ करत आहोत. भारताच्या त्वचारोग क्षेत्रावर
‘पीआरएक्स-प्लस’चा मोठा प्रभाव पडेल याची आम्हाला खात्री आहे.”
भारतातील त्वचारोग उपचार बाजारपेठेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असून, वाढत्या उत्पन्नामुळे त्वचेच्या
आरोग्याबाबत जागरूकता झपाट्याने वाढत आहे. भारतीय औषध बाजार (आयपीएम) या संस्थेच्या अंदाजानुसार,
त्वचारोग बाजारपेठ सध्या १.८ अब्ज अमेरिकन डॉलर एवढी आहे आणि पुढील काही वर्षांत ११-१२ टक्के दराने
वाढण्याची शक्यता आहे.ही भागीदारी ‘एमक्युटिक्स’च्या प्रिस्क्रिप्शन आणि ग्राहकांना उपलब्ध असलेल्या

डर्माटोलॉजी उपाययोजना भारतभर पोहोचवण्याच्या कटिबद्धतेला अधोरेखित करते.

महाराष्ट्रामध्ये ई टॅक्सीला. प्रखर विरोध करणार :-बाबा कांबळे

पुणे:ई टॅक्सी ला दिलेली मंजुरी महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावी, अन्यथा या निर्णयाला पुणे पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रभर तीव्र विरोध करणार असल्याची माहिती, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, व ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले,

काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र सरकारने मुंबई येथे टू व्हीलर टॅक्सीला परवानगी दिली आहे, खरं तर मुंबई येथील ऑटो टॅक्सी संघटनांनी या निर्णयाला तीव्र विरोध करणे आवश्यक होते परंतु त्यांनी विरोध केला नाही यामुळे आता सरकारचे धाडस वाढले असून सरकारच्या वतीने महाराष्ट्रभर ई बाईक टॅक्सीला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 20 लाख ऑटो चालक मालकांचे, तसेच पाच लाख टॅक्सी चालक-मालकांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार असून, अगोदरच विविध कारणांमुळे अडचणीमध्ये आलेल्या ऑटो टॅक्सी चालकांचे जगणे मुश्किल होईल, आणि त्यांचे आर्थिक व सामाजिक प्रश्न निर्माण होतील, आज महाराष्ट्रामध्ये ई बाईक टॅक्सीची अजिबात आवश्यकता नाही, त्या तुलनेत प्रवासी देखील नाहीत, प्रवासी संख्या अत्यंत कमी झाली आहे, त्याला वेगवेगळे कारण आहेत अनेकांनी स्वतःच्या दुचाकी व चार चाकी गाड्या विकत घेतले आहेत, तसेच बस व मेट्रो यामुळे देखील प्रवाशांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहे, यामध्ये ई बाईक टॅक्सी आल्यास एका भाकरी मध्ये अनेक तुकडे होतील आणि यामध्ये कोणालाही पोटभर अन्न मिळणार नाही, गोरगरीब कष्टकऱ्यांमध्ये आपापसामध्ये प्रवाशावरून भांडण लावण्याचे काम सरकारने करू नये, ऑटो टॅक्सी चालकांचे फार मोठे नुकसान या निर्णयामुळे होणार असून, याबाबत ऑटो टॅक्सी चालकांनी एकत्र येऊन संघर्ष करणे आवश्यक असल्याचे देखील बाबा कांबळे यावेळी म्हणाले,

बाबा कांबळे म्हणाले लवकरच पुणे पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्रातील आटो टॅक्सी चालकांची बैठक बोलून यामध्ये महाराष्ट्रातील सर्व संघटनांना एकत्र घेऊन, पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल व सर्वांच्या सहमतीने याबाबत योग्य ते निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री यांची भेट घेऊन निवेदन देखील देण्यात येईल, निवेदन देऊन देखील मागण्या मान्य न झाल्यास किंवा ई टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास पुढील दिशा ठरवण्यात येईल असे यावेळी बाबा कांबळे यांनी सांगितले.