Home Blog Page 38

कौन राज ठाकरे, कौन अविनाश जाधव; ठाण्यात परप्रांतीय तरुणांचा गोंधळ म्हणाले यहां भैय्याओं का राज चलता है

0

ठाणे -मुंबई आणि ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद पुन्हा उफाळलेला आहे. हिंदी सक्तीबाबतचा निर्णय, त्यानंतरचे सामाजिक वाद आणि त्यावरून वाढणारा तणाव यामुळे अनेक ठिकाणी वातावरण तापलेले दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक 2 वरील गांधीनगर भागात घडलेली एक घटना मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. येथे काही परप्रांतीय तरुणांनी एका किरकोळ वादातून मराठी तरुणाशी अर्वाच्य भाषेत बोलत गोंधळ घातल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या तरुणांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते अविनाश जाधव यांच्याबद्दलही अत्यंत विटंबन करणारे शब्द वापरल्याचे समोर आले आहे.

ही संपूर्ण घटना एका वाहन पार्किंगच्या वादातून सुरू झाली. स्थानिक माहितीनुसार, गाडी लावण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये सुरुवातीला सामान्य शब्दांचा वाद झाला. मात्र हा वाद काही क्षणांतच गंभीर वळणाला गेला. घटनेत सहभागी असलेल्या काही परप्रांतीय तरुणांनी दारूच्या नशेत मराठी तरुणाला दमदाटी केली आणि अपमानकारक शिव्या दिल्या. ये ठाणे का गांधीनगर है, यहां भैय्याओं का राज चलता है… अशा शब्दांत त्यांनी आपली दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच कौन राज ठाकरे, कौन अविनाश जाधव… अशा अत्यंत निंदनीय पद्धतीने मनसे नेतृत्वाचा उल्लेख केला असल्याचेही सांगण्यात येत आहे.

घटनेदरम्यान या तरुणांनी मराठी युवकाला अक्षरशः हुसकावून लावल्याचे व्हिडीओमध्ये दिसले. इधर कोई भी मराठी आया तो उसकी… अशा धमकीच्या भाषेत बोलून त्यांनी परिसरातील वातावरण आणखी बिघडवले. काही तरुण दारूच्या नशेत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ही घटना घडत असतानाच काहींनी व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकला आणि काही तासांतच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर राज्यभरातील मनसैनिक आणि स्थानिक मराठी समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.

या घटनेनंतर गांधीनगर परिसरात तणावाचे सावट निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली असून आरोपी तरुणांना शोधून काढण्याची मागणी केली जात आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक संघटनांनीही या प्रकाराला विरोध दर्शवला आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, एखादा वाद एवढा वाढवून त्यात जातीय किंवा प्रांतीय रंग देणे हा चिंतेचा विषय आहे. मराठी अथवा परप्रांतीय कोणताही असो, हिंसाचार किंवा धमकावणे हा उपाय नाही, असे नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, राजकीय पातळीवरही या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. मनसे कार्यकर्ते संतप्त असून अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी ते करत आहेत. व्हिडीओमधील सर्व तरुणांची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिस करत असल्याची माहिती मिळत आहे. शहरात शांतता बिघडू नये यासाठी पोलिसांनी गांधीनगर परिसरात गस्त वाढवली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मुंबई आणि ठाण्यातील मराठी-परप्रांतीय तणाव समोर आला असून प्रशासनाला ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिक दक्ष राहावे लागणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन

0

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. ८९ वर्षीय त्यांनी सोमवारी दुपारी त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर विले पार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्यात सलमान खान, संजय दत्त, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला एका युगाच्या अंताचा संकेत म्हटले आहे.

दुपारी त्यांच्या घराबाहेर एक रुग्णवाहिका आली आणि विले पार्ले स्मशानभूमीत सुरक्षा वाढवण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेण्यात आले.

धर्मेंद्र यांच्या घराबाहेर दुपारी १ वाजताच्या सुमारास एक रुग्णवाहिका आली.
घराबाहेर बॅरिकेडिंग आणि सुरक्षा वाढवण्यात आली.
दुपारी १:१० वाजता, आयएएनएसने धर्मेंद्र यांच्या मृत्यूची घोषणा केली.
विलेपार्ले स्मशानभूमीतील सुरक्षा वाढवण्यात आली. अमिताभ बच्चन आणि सलमान खानसह अनेक सेलिब्रिटी स्मशानभूमीत पोहोचले.
धर्मेंद्र यांच्यावर दुपारी ३ वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
धर्मेंद्र काही काळापासून वयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते. १० नोव्हेंबर रोजी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या काळात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूच्या बातम्याही माध्यमांमध्ये आल्या, ज्या त्यांच्या कुटुंबीयांनी नाकारल्या. १२ नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि डॉक्टरांनी त्यांना घरीच उपचार सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.

आमिर खानला आर.के. लक्ष्मण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

24th Nov 2025 – Pune : गहुंजे येथील एमसीए क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित ए.आर. रहमान लाईव्ह कॉन्सर्ट आणि आर.के. लक्ष्मण अवॉर्ड फॉर एक्सलन्सचा समारोप अत्यंत यशस्वीरीत्या झाला. बोमन इराणी यांनी प्रदान केलेला हा पहिला पुरस्कार आमिर खान यांनी स्वीकारला. दोन्ही कलाकारांनी एकमेकांचे मनापासून कौतुक केले आणि दिग्गज व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

संध्याकाळी ए.आर. रहमान यांच्यासह हरिहरन, चिन्मयी, सुखविंदर सिंह, धनुष आणि नीती मोहन यांनी अप्रतिम संगीतमय सादरीकरणे केली, ज्यामुळे प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव मिळाला. संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला आणि उत्साही प्रेक्षकांच्या उपस्थितीत कला, संगीत आणि वारशाचा एक संस्मरणीय उत्सव साजरा करण्यात आला.

‘‘तुला कोणत्या पिस्टलमधून गोळी घालू,’’ सिनेस्टाइल ने धमक्या देत दहशत माजविणाऱ्या श्र्वेतांग निकाळजेला पकडला.२ पिस्तुलं जप्त

पुणे : मित्राचे लग्न असताना मोबाईल टॉवरच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे द्यावे, यासाठी त्याचे घरातून अपहण करुन दोन पिस्तुलं काढून त्याच्या डोक्याला लावून ‘‘तुला कोणत्या पिस्टलमधून गोळी घालू,’’ अशी धमकी देणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगार श्र्वेतांग निकाळजे याला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्यांच्याकडून २ पिस्टल जप्त केले आहेत.

श्र्वेतांग भास्कर निकाळजे (वय ३७, रा. भीमनगर, मंगळवार पेठ) आणि ओम संजय गायकवाड (वय २६, रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़.श्र्वेतांग निकाळजे याची मंगळवार पेठ, तसेच भारती विद्यापीठ भागात दहशत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा पिस्तुल बाळगणे, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे निकाळजे याच्याविरुद्ध फरासखाना, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल आहेत. येरवडा कारागृहात काही वर्षांपूर्वी निकाळजे आणि साथीदारांनी सांगलीतील एका गुंडावर हल्ला केला होता. या घटनेत गुंड गंभीर जखमी झाला होता. शिवाजीनगर न्यायालयासमोर निकाळजे आणि साथीदारांनी एका साक्षीदारावर पिस्तुलातून गोळीबार केला होता.

याबाबत शिवा धनराज मुत्याळ (वय ३१, रा. धाबाडी, आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी यांचा सिंहगड कॉलेज परिसरात स्टॉल असून त्यांनी व निकाळजे यांनी एअरटेल कंपनीचे टॉवरचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. त्याचे पैसे द्यावेत, यासाठी शिवा मुत्याळ याचे लग्न असताना दोन साथीदारांच्या मदतीने श्र्वेतांग निकाळजे याने ८ नोव्हेबर रोजी रात्री पावणे बारा वाजता त्याचे अपहरण केले होते. भोर रोडवर उतरुन त्याच्याकडील दोन पिस्टल काढून ते फिर्यादीच्या डोक्यावर लावून ‘‘तुला कोणत्या पिस्टलमधून गोळी घालू,’’ अशी धमकी दिली होती. इतर दोघा साथीदारांनी ‘तू भाऊचे ऐकत नाहीस तुझ्या डोक्यात कोयता टाकतो,’ अशी धमकी दिली होती. त्यांच्या तावडीतून ते पळून गेल्याच्या रागातून त्या तिघांनी त्यांना शिवाजीनगर येथे गाठून मारहाण करुन पिस्टल लावून धमकाविले होते. याबाबतचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.

या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अभिनय चौधरी यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीवरुन पोलिसांनी श्र्वेतांग निकाळजे आणि ओम गायकवाड यांना अटक केली. त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर निकाळजे याच्याकडून २ पिस्टल व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ६ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी केली आहे.

मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणूक नको-पुण्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मनपा आयुक्तांकडे मागणी

पुणे -महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदारांची प्रभाग निहाय अंतिम ड्राफ्ट यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. या यादीमध्ये असंख्य चुका असून ३ लाखांपेक्षा जास्त मतदारांची दुबार नोंदणी असल्याची कबुली खुद्द महानगरपालिका आयुक्तांनी दिली आहे. अनेक ठिकाणी मतदारांना गैरसोयीचे दूरच्या भागातील मतदारांची नोंदणी अनेक प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका प्रशासन सत्ताधारी भाजपच्या प्रभावाखाली काम करत असल्याची शंका विरोधी पक्षांकडून व्यक्त केली जात आहे.

त्याहून दुर्दैवी बाब म्हणजे या ड्राफ्ट यादीवर हरकती नोंदवण्यासाठी केवळ ८ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. एक प्रकारे सदोष मतदार यादी पुढे रेटून निवडणुका घेण्याचा हा डाव असल्याची भावना सर्वसामान्य पुणेकर व्यक्त करत आहेत.

हीच भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, समाजवादि पार्टी यांच्यासह इतरही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त शिष्ट मंडळाच्या माध्यमातून मनपा अतिरिक्त आयुक्त मंगेश दिवटे यांची भेट घेतली. मतदार यादी मध्ये मोठा घोळ असल्याची बाब स्वतः आयुक्तांनी मान्य केली आहे. या माध्यमातून सदोष पद्धतीने निवडणुका घेऊ नये, आधी मतदार याद्या पूर्णपणे निर्दोष कराव्यात व त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.

या सर्वपक्षीय शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बाप्पुसाहेब पठारे, अरविंद शिंदे, साईनाथ बाबर, संजय मोरे, गजानन थरकुडे, वंचीत चे अरविंद तायडे, बाळासाहेब शिवरकर, बाबु वागसकर, आश्विनीताईं कदम, अंकुशआण्णा काकडे, जयदेवराव गायकवाड, रविंद्र माळवदकर,. अभय छाजेड, मनोहर जांबूवंत, सचिन दोडके आदी
उपस्थित होते.

बीडमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार:पीडित आईला गुन्हा दाखल करण्यासाठी जाऊ दिले नाही ; मुलीला 4 दिवस उपचारासाठीही जाऊ दिले नाही

0

बीड-एका 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. विशेष म्हणजे बलात्काराची घटना घडल्यानंतर गावातील काही लोकांनी सदर मुलीला तब्बल 4 दिवस उपचारासाठी जाऊ दिले नाही. तसेच तिच्या आईवरही या प्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकला. पण अखेर आपल्या मुलीची वेदना पाहून या महिलेने पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

यासंबंधीच्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळे येथील एका 3 वर्षीय चिमुकलीवर नुकताच बलात्कार व हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे अवघे समाजमन सुन्न झाले असताना आता बीड जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील ताज्या घटनेत एका 5 वर्षीय लैंगिक अत्याचार झाला आहे. नात्यातीलच एका मुलाने हा घात केला आहे. पीडित मुलीवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना गत 11 नोव्हेंबर रोजी घडली. पण ती आज समोर आली.

ही घटना घडल्यानंतर गावातील काही नागरिकांनी पीडित मुलीच्या आईवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकला. या प्रकरणी बदनामी टाळण्यासाठी त्यांनी चक्क 4 बैठका घेतल्या. या कालावधीत मुलगी तशीच तडफडत आपल्या घरी होती. ग्रामस्थांनी तब्बल 4 दिवस तिला घरीच रोखून धरले. पण मुलीच्या नातलगांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी थेट पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क् साधला. त्यानंतर वेगाने सूत्रे हालत शिरूर कासार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 4 दिवस वेदना असह्य झाल्यानंतर अखेर मुलीच्या आईने उपचारासाठी बीड गाठले. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित मातेला झाला प्रकार सांगताना अश्रू अनावर होत होते.

दुसरीकडे, बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी या प्रकरणी शिरूर कासार पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेची आपबिती सांगताना पीडित मुलीच्या आईला अश्रू अनावर झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे. विशेषतः या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या शिरूर कासार पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे. पीडित मुलीच्या आईवर नातेवाईक व गावकऱ्यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकला होता. पण मुलीची आई मॅनेज झाली नाही. त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला, असे ते म्हणाले.

अपोलो हॉस्पिटल्सचे पुण्यात नवे अत्याधुनिक रुग्णालय सुरू:महाराष्ट्रातील तिसरे, ४०० बेड्सची क्वाटर्नरी केअर सुविधा उपलब्ध

पुणे-अपोलो हॉस्पिटल्सने पुण्याच्या स्वारगेट परिसरात आपले नवे अत्याधुनिक रुग्णालय सुरू केले आहे. महाराष्ट्रातील हे अपोलोचे तिसरे, तर पुण्यातील पहिले रुग्णालय आहे. पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर येथे ४०० बेड्स उपलब्ध होतील, सध्या पहिल्या टप्प्यात २५० बेड्स कार्यान्वित करण्यात आले आहेत.

हे रुग्णालय क्वाटर्नरी केअर (अतिविशेष दर्जाची वैद्यकीय सेवा) पुरवणार आहे. हृदयरोग, कर्करोग, न्यूरोसर्जरी, ऑर्गन ट्रान्सप्लांट आणि प्रगत रोबोटिक शस्त्रक्रिया यासारख्या जटिल उपचारांसाठी हे विशेष सुसज्ज असेल. पुण्याच्या वेगाने बदलत्या आरोग्य गरजा लक्षात घेऊन अपोलोने हा विस्तार केला आहे.

अपोलो हॉस्पिटल्सचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रताप रेड्डी यांनी यावेळी सांगितले की, “भारताला जागतिक आरोग्यसेवेचे केंद्र बनवणे हे आमचे स्वप्न आहे. ‘हील इन इंडिया, हील बाय इंडिया’ या दृष्टिकोनातून आम्ही जगातील रुग्णांना भारतातच उत्कृष्ट उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहोत. पुणे आणि परिसरातील प्रत्येक कुटुंबात आरोग्यदायी असावे अशी आमची इच्छा आहे.”

कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. प्रीता रेड्डी म्हणाल्या, “चार दशकांहून अधिक काळाचा अपोलोचा वारसा आता पुण्यात अवतरला आहे. क्लिनिकल उत्कृष्टता, करुणामय देखभाल आणि सतत नावीन्य यावर आमचा भर आहे.” व्यवस्थापकीय संचालिका सुनीता रेड्डी यांनी नमूद केले की, “पुणे हे भारतातील सर्वात वेगाने वाढणारे आरोग्य बाजारपेठ आहे. येथे अपोलोची संपूर्ण एकात्मिक आरोग्य परिसंस्था आणून आम्ही अधिकाधिक लोकांना उच्चस्तरीय क्वाटर्नरी केअर उपलब्ध करून देणार आहोत.”

समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मधू ससिधर यांनी सांगितले की, हे रुग्णालय रुग्ण-केंद्रित संस्कृती, पुराव्यावर आधारित वैद्यकीय पद्धती आणि सुरक्षिततेवर आधारित आहे. पुणे रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनीषा कर्माकर यांनी सांगितले की, “आयटी व इनोव्हेशनचे केंद्र असलेल्या पुण्याच्या प्रगतीत अपोलो आता सहभागी होत आहे. पुणे-मुंबई-पनवेल पट्ट्यातील रुग्णांना आता जगातील सर्वोत्तम उपचार घराजवळ मिळणार आहेत.”

साईनामाच्या जयघोषात श्री सद्गुरु साईबाबांचा पालखी सोहळा उत्साहातकर्वेनगर मधील श्री सद्गुरू साईबाबा सेवा संस्था

पुणे: ‘जय साईराम… साईबाबा की जय’ असा अखंड साईनामाचा जयघोष करीत श्री सद्गुरू साईबाबा संस्थेचा पालखी सोहळा उत्साहात पार पडला. भाविकांनी केलेल्या या जयघोषाने संपूर्ण वातावरण भारावून गेले. साईभक्तांनी साईनामाचा गजर करीत पालखीचे स्वागत केले. पालखी मार्गावर  फुलांची उधळण, सजवलेला रथ आणि भक्तिरसात न्हाऊन गेलेल्या भाविकांसोबत पालखी प्रदक्षिणा पार पडली.

यावेळी श्री सद्गुरू साईबाबा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुषार कैलास झेंडे, वैभव नवसे, उमेश झेंडे, विजय मोरे, कुमार लांडे, कैलास जाधव, ओमकार लांडगे, अमोल शिंदे, संजय पवळे, संदीप गवळी, दिनेश गालफाडे, विजय साळवे आणि मित्र परिवार उपस्थित होते. दिनांक २३ ते ३० नोव्हेंबर दरम्यान साई उत्सव होणार आहे.

 तुषार झेंडे म्हणाले, साई उत्सवानिमित्त विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये साई मूर्तीचे मंगल स्नान, साई पादुकांची महापूजा व अभिषेक श्री साई सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद साईबाबांची सांज आरती व महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लाईव्ह गाण्यांचा कार्यक्रम तसेच भव्य रक्तदान शिबिर देखील उत्सवात होणार आहे.

संजय भोसलेंच्या ऑफीसच्या जवळ २५ वर्षाच्या तरुणाला पकडला अन २१ लाखाचा गुटखा जप्त केला

पुणे- येरवडा पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करून एका २५ वर्षीय तरुणाला पकडून त्याच्या कडून २०,७०,५००/- रू किं चा गुटखा हा तंबाखुजन्य
पदार्थ जप्त केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी सांगितले कि,’दि.२४/११/२०२५ रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये अंमली पदार्थ विरोधी मोहिम येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत राबवित असताना अंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, तसेच पोलीस अंमलदार राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दत्तात्रय खरपुडे, सुनील महाडीक, ऋषीकेश ताकवणे संदिप देवकाते, गणेश गोसावी, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, शुभांगी म्हाळसेकर यांना वेद प्रोव्हीजन स्टोअर्स सर्वे नं. १४, संजय भोसले यांच्या ऑफीसच्या जवळ, नाईक नगर, येरवडा पुणे या दुकानामागे मागील गोडावुन मध्ये आरोपी नामे जमनाराम ऊर्फ गणेश बलराम जाट, वय-२५ वर्ष रा. सर्वे. नंबर १४, संजय भोसले यांच्या ऑफीसच्या जवळ, नाईक नगर, येरवडा पुणे याचे ताब्यात २०,७०,५००/- किं.चा प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
नमुद आरोपीविरुध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३,२७४, २७५, सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम ७ (२) व२० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६, चे कलम २६(२) (i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम काम चालु आहे.

अवकाश विज्ञान आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देते-पद्मश्री डॉ. प्रमोद काळे 

एमआयटी डब्ल्यूपीयूत
३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन
डॉ. प्रमोद काळे यांना समर्पित जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत

पुणे, दि.२५ नोव्हेंबर “अवकाश विज्ञान आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देत असल्यामुळे देशांमध्ये शांततापूर्ण संबंध निर्माण होण्यास मदत होते. मनुष्याला जन्मतःच अंतराळाबद्दल प्रचंड आकर्षण राहिले आहे. कालानुसार अंतराळ क्षेत्राबद्दल होणारा विकास अंतराळातील संशोधन, संप्रेषण, अंतराळातील मानवी उपस्थिती, संशोधन व अध्ययन या सर्व गोष्टी मानवाच्या उत्थानासाठी व शांती मिळण्यासाठी महत्वपूर्ण आहे. यामध्ये होणारे बदल आता मानवाच्या नजरेतून सूट शकत नाहीत.” असे विचार स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर इस्त्रोचे माजी संचालक पद्मश्री डॉ.प्रमोद काळे यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधित आयोजित ३०वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी नवी दिल्ली येथील आध्यात्मिक शास्त्रज्ञ डॉ. सी.के.भारद्वाज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
 तसेच, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, माईर्सचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी व व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
ही व्याख्यानमाला माईर्स एमआयटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे.
या प्रसंगी पद्मश्री डॉ.प्रमोद काळे यांना मान्यवरांच्या हस्ते समर्पित जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
पद्मश्री डॉ.प्रमोद काळे म्हणाले,” अवकाशातून पृथ्वी अवलोकन करतांना जमीन आधारित, हवाई आणि उपग्रहांच्या माध्यमातून पृथ्वी वरील पाणी व वायुमंडलाची माहिती एकत्रित करणे. प्राकृतिक घटना, संकट आणि मानवीय गतिविधिंवर नजर ठेवली जाते. अंतराळ संप्रेषणामध्ये संप्रेरण उपग्रह, ग्राउंड स्टेशन आणि डीप स्पेस नेटवर्क सारख्या तंत्रज्ञानाचा वापर होतो. अंतराळातील वेगवेगळ्या बिंदूमधील किंवा पृथ्वी आणि अवकाशातील माहिती व डेटाचे प्रसारण केले जाते.”
“अंतराळातील वातावरण हे पृथ्वीवरील वातावरणापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. त्यात हवा नाही व्हॅक्यूम आहे, प्रचंड तापमान आणि रेडिएशनसारखे अनेक धोके आहेत. हे वातावरण गुरूत्वाकर्षण, रेडिएशन, सूक्ष्म उल्कापिंडापासून बनलेले आहे.”
डॉ. सी.के.भारद्वाज म्हणाले,” सध्या संपूर्ण जगात अध्यात्म आणि शांतीची गरज आहे. अध्ययन क्षेत्रामध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची संकल्पना रुजविणे गरजेचे आहे. मानव जातीच्या व स्वतःच्या उत्थानासाठी युनिवर्सलमधील उर्जेचा योग्य वापर करावा. कोणत्याही सृजनात्मक निर्मितीसाठी व कार्यासाठी उर्जा अत्यंत आवश्यक असते. बॉडी, माइंड अ‍ॅण्ड सोल या तीन्ही गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” रामेश्वर येथे निर्मित करण्यात आलेल्या विश्वधर्मी मानवतातीर्थ भवनातून जगाला विश्वशांती आणि विश्व कल्याणाचा संदेश दिला जात आहे. आज तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगदगुरू तुकाराम महाराज यांचा संदेश मानवजातीपर्यंत पोहचविण्याच्या मुख्य उद्देश्याने ही व्याख्यानमाला सुरू केली आहे. येथे सद्गुणांची पूजा हीच खरी ईश्वर पूजा आहे. मन आणि आत्मा या गोष्टींचे अधिक चिंतन व्हावे. जीवनाचा हेतू व कर्तव्य काय आहे याची जाणिव यातून होते.”
डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ. मिलिंद पात्रे यांनी व्याख्यानमालेची पार्श्वभूमी सांगितली.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रत्नदीप जोशी यांनी आभार मानले.

‘माँ, उमा, पद्मा’ या चित्रपटावरील पडदा उघडल्यावर चित्रपट, स्मृती आणि वारसा यांचा झाला संगम


इफ्फीमध्ये कामरान यांच्या नवीन पुस्तकाने घटक यांच्या चित्रपटीय अद्भुततेचे केले पुनरुज्जीवन

डीपीडीने भारतीय चित्रपटांवरील आपल्या वाढत्या संग्रहात भर घातली एका नवीन शीर्षकाची

#IFFIWood,SHARAD LONKAR 24 नोव्‍हेंबर 2025 

इफ्फी मधील पत्रकार परिषदेच्या सभागृहात आज चित्रपट निर्माते आणि आयआयटी मुंबईचे प्राध्यापक मजहर कामरान यांच्या ‘माँ, उमा, पद्मा: द एपिक सिनेमा ऑफ ऋत्विक घटक’ या नवीन पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाची सुरुवात एका गंभीर कार्यक्रमाने झाली, मान्यवरांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यानंतर भारतातील सर्वात प्रभावशाली चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेल्या ऋत्विक घटक यांच्या सन्मानार्थ उबदार आणि अंतर्दृष्टीपूर्ण संवाद साधला.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाचे (डीपीडी) प्रमुख महासंचालक भूपेंद्र कैंथोला यांच्या हस्ते या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन झाले. प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी यांनी परिषदेत सहभाग घेतला आणि या प्रसंगाला सौहार्द आणि भारदस्तपणा मिळवून दिला

डीपीडीने ‘माँ, उमा, पद्मा’ प्रकाशित करण्याचा निर्णय का घेतला हे कैंथोला यांनी सविस्तरपणे सांगितले. त्यांनी वेव्हज समिट 2025 मध्ये केलेल्या घोषणेची आठवण करून दिली. हे वर्ष घटक यांच्यासह पाच दिग्गज चित्रपट व्यक्तिमत्त्वांच्या शताब्दीला समर्पित आहे. डीपीडी अशी पुस्तके प्रकाशित करते जी सर्वांना उपलब्ध असतील आणि परवडतील. कामरान यांना  या दृष्टिकोनासह काम करण्यास आनंद झाला आणि सर्वकाही जुळले,” असे त्यांनी सांगितले. त्यांनी असेही अधोरेखित केले की पुस्तकाचे मुखपृष्ठ आयआयटी मुंबईतील कामरान यांच्या स्वतःच्या विद्यार्थ्यांनी डिझाइन केले आहे. असे  सर्जनशील सहकार्य लाभल्याने लेखकाचा आनंद द्विगुणित झाला, असेही कंथोला यांनी सांगितले.

कामरान यांनी आपल्या शब्दांना पुस्तकाच्या रूपात आकार घेताना पाहिल्यावर त्यांच्या मनात उमटलेल्या भावना कल्लोळाबद्दल सांगितले. वाचक कधीकधी त्यांच्याशी सहमत असतील किंवा कधीकधी त्यांच्याशी मतभेद असतील हे मान्य करून त्यांनी प्रत्येक शब्द लिहिला आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय चित्रपटसृष्टीतील घटक यांच्या स्थानाबद्दल बोलताना कामरान म्हणाले की जरी आज ऋत्विक घटक यांचा गौरव केला जात असला तरीही घटक हे बऱ्याचदा दुर्लक्षित राहिले. त्यांच्याकडे दूरदृष्टीची ताकद असूनही त्यांना त्यांचे चित्रपट बनवण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागला. ” आपण जेंव्हा भारतीय चित्रपटांचा काळानुसार विचार करतो, तेव्हा घटक यांचा एक चित्रपट नेहमीच तिथे असतो,” असे कामरान यांनी स्पष्ट केले.

कामरान यांनी ऋत्विक घटक यांच्याकडे औपचारिक फिल्म स्कूल प्रशिक्षणाच्या आभावाबद्दल असलेला गैरसमज दूर केला. “ते अत्यंत कठोर पद्धतीने शिकले होते,” असे कामरान यांनी सांगितले. घटक यांचे प्रारंभीच्या काळातील लेखन, त्यांच्या समकालीन महान व्यक्तींसोबतचे त्यांचे सहकार्य तसेच आयझेनस्टाईन आणि स्टॅनिस्लाव्हस्की यांच्या कामांशी त्यांचा सखोल नात्याचा कामरान यांनी उल्लेख केला. घटक यांनी काही काळासाठी एफ टी आय आय मध्ये अध्यापनही केले होते याची त्यांनी आठवण करून दिली.  यातून चित्रपट विषयक शिक्षण अनेक मार्गांनी घडू शकते हे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ही चर्चा लवकरच प्रकाशन विभाग संचालनालयाच्या भारतीय चित्रपटांवरील पुस्तकांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या व्यापक उपक्रमाकडे वळली. अलिकडच्या काळात 12 पुस्तके प्रकाशित झाली आहेत, ज्यात फाळके पुरस्कार विजेत्यांवर अलिकडचा खंड आणि एफ टी आय आय च्या लेन्साइट जर्नलमधील लेखांचा आगामी संग्रह समाविष्ट असून सुलभता वाढविण्यासाठी आता तो हिंदी भाषेत प्रकाशित होत आहे, अशी माहिती भूपेंद्र कैंथोला यांनी दिली. अजून पाच पुस्तके तयार होत आहेत ज्यात लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि लता मंगेशकर यांच्यासारख्या व्यक्तींचा समावेश असेल, अशी घोषणा त्यांनी केली.

ही चर्चा अखेर ऋत्विक घटक यांच्या कार्यात वारंवार दिसून येणाऱी स्त्री-प्रतिमा, जी कामरान यांच्या शीर्षकातील ‘माँ, उमा आणि पद्मा—यात दिसते, त्याकडे वळली. मातृत्व ही स्त्रीत्वाची सर्वांत गूढ आणि गहन अभिव्यक्ती आहे, अशी घटक यांची समजूत असून ती त्यांच्या चित्रपटांमध्ये नदी पद्मा या शाश्वत प्रतीकाशी अगदी घट्टपणे जोडलेली आहे, असेही कामरान यांनी सांगितले.

चिंतन, आदर आणि पुनर्शोध यांनी विणलेले या परिषदेत ऋत्विक घटक यांच्या कलात्मक वारशाला आदरांजली वाहण्यात आली तसेच कामरान यांच्या सखोल संशोधित आणि भावपूर्ण कार्याचाही उत्सव साजरा करण्यात आला. ‘माँ, उमा, पद्मा’ हे पुस्तक भारतीय चित्रपटांवरील चर्चेला अधिक समृद्ध करणारे– सुलभ, सूक्ष्म उत्कटतेने प्रेरित ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.  

सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये दुर्मिळ मेकॅनिकल थ्रोम्‍बेक्‍टॉमी प्रक्रिया,जीवघेण्‍या पल्‍मनरी एम्‍बोलिझम केसमध्‍ये १८० ग्रॅम रक्‍ताची गाठ काढण्‍यात यश  

पुणे, नोव्हेंबर २४, २०२५ – पल्‍मनरी एम्‍बोलिझम सह व्‍यापक डीप वेन थ्रोम्‍बोसिसच्‍या (Pulmonary Embolism with extensive deep vein thrombosis) असाधारण आणि उच्‍च जोखीम असलेल्‍या केसमध्‍ये पुण्‍यातील सह्याद्रि हॉस्पिटल्‍समधील डॉक्‍टरांनी सर्वात प्रगत एआय-सक्षम मेकॅनिकल थ्रोम्‍बेस्‍क्‍टॉमी (Mechanical Thrombectomy) सिस्‍टमचा वापर करत ३७ वर्षीय पुरूष रूग्‍णामधील मोठी १८० ग्रॅम वजन असलेली रक्‍ताची गाठ यशस्‍वीरित्‍या काढून टाकली. हडपसर येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. कौरभी झाडे यांनी ही किमान इन्‍वेसिव्‍ह, जीवनदायी प्रक्रिया केली. 

रूग्‍णाला हॉस्पिटलमध्‍ये आणण्‍यात आले तेव्‍हा त्‍याच्‍या दोन्‍ही पायांना मोठ्या प्रमाणात सूज होती.  ज्‍यामुळे  रक्‍तवाहिन्‍यांमध्‍ये रक्‍ताच्‍या गाठी निर्माण होऊन डीव्‍हीटीचे लक्षण दिसत होती. नैदानिक तपासणीसोबत सीटी पल्‍मनरी अँजिओग्राफीमधून (CT Pulmonary Angiography) फुफ्फुसामधील मुख्‍य धमन्‍यांमध्‍ये अनेक रक्‍ताच्‍या गाठी असल्‍याचे आढळून आले. तसेच विकसित होत असलेल्‍या पल्‍मनरी एम्‍बोलिझमचे निदान झाले. या स्थितीमध्‍ये रक्‍ताची गाठ फुफ्फुसापर्यंत जाते आणि रक्‍तपुरवठा थांबू शकतो, ज्‍यामुळे त्‍वरित उपचार न केल्‍यास अचानक चक्‍कर येऊ शकते किंवा माणूस मृत्‍यूमुखी पडू शकतो.  

या केसमधील चिंताजनक बाब म्‍हणजे थ्रोम्‍बसचे उच्‍च प्रमाण, जे क्‍वचितच दिसून येते. अशा स्थितींमध्ये फक्त रक्त पातळ करणाऱ्या औषधांवर अवलंबून राहिल्यास रुग्णाची प्रकृती त्वरीत खालावण्याचा धोका जास्त असतो.

अधिक गुंतागुंती टाळण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटलमधील वैद्यकीय टीमने प्रगत किमान इन्वेसिव्ह मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी (advanced minimally invasive Mechanical Thrombectomy) ही प्रक्रिया निवडली. या प्रक्रियेमध्‍ये रक्‍ताची गाठ काढण्‍यासाठी प्रबळ सक्‍शन पॉवर असलेली पातळ नळी (Catheter) रक्‍तवाहिनीमध्‍ये टाकली जाते. या प्रक्रियेमध्‍ये थ्रोम्‍बोलायटिक औषधांमुळे रक्‍तस्‍त्रावाचा धोका, ओपन सर्जरीची प्रखरता आणि हळूहळू रक्‍ताची गाठ विरघळण्‍यास होणारा विलंब कमी होतो, तसेच अधिक सुव्‍यवस्थित उपचाराची खात्री मिळते.

या केसमध्ये, प्रगत मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी तंत्राचा वापर निर्णायक ठरला. अशा मोठ्या प्रमाणातील गाठेस फक्त औषधोपचारावर ठेवले असते, तर ती विरघळण्यासाठी लागणारा वेळ रुग्णासाठी जीवघेणा ठरू शकत होता — अचानक श्वसनक्रिया बिघडणे, रक्तदाब कोसळणे किंवा फुफ्फुसांना कायमस्वरूपी हानी होण्याचा धोका लक्षणीयपणे वाढला असता. या प्रक्रियेद्वारे टीमला नियंत्रित, स्थिर आणि रिअल-टाइम मार्गदर्शनाखाली संपूर्ण १८० ग्रॅम रक्तगाठ एकाच सत्रात सुरक्षितपणे काढता आली. त्यामुळे रुग्णाची श्वसनक्षमता त्वरित सुधारली, गुंतागुंतींचा धोका कमी झाला आणि जीवन वाचविण्याची संधी मोठ्या प्रमाणात वाढली. 

प्रक्रियेनंतर रूग्‍णाला आयसीयूमध्‍ये ठेवण्‍यात आले, जेथे हडपसर येथील सह्याद्रि हॉस्पिटल्‍समधील आयसीयू व क्रिटीकल केअर मेडिसीनचे संचालक डॉ. कपिल बोरावके आणि क्रिटीकल केअर टीमच्‍या देखरेखीअंतर्गत रूग्‍णाची काळजी घेण्‍यात आली. रूग्‍णाची प्रकृती झपाट्याने स्थिर झाली, ऑक्सिजनेशन सुधारले आणि समकालीन उपचारासह अपेक्षेपेक्षा लवकर रूग्‍ण रिकव्‍हर झाला.

रूग्‍णाच्‍या रिकव्‍हरीबाबत बोलताना हडपसर येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील आयसीयू व क्रिटीकल केअर मेडिसीनचे संचालक डॉ. कपिल बोरावके म्‍हणाले, ”अशी मोठी रक्‍ताची गाठ असलेल्‍या रूग्‍णांची प्रकृती त्‍वरित अस्थिर होऊ शकते. लवकर हस्‍तक्षेप आणि इंटरव्‍हेंशनल व क्रिटीकल केअर टीम्‍समधील विनासायास समन्‍वयाने रूग्‍णाची प्रकृती स्थिर करण्‍यामध्‍ये आणि त्‍वरित रिकव्‍हरीमध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली.”

या केसच्‍या, तसेच वेळेवर कृती करण्‍याच्‍या महत्त्वाबाबत मत व्‍यक्‍त करताना डॉ. झाडे म्‍हणाल्‍या, ”डीव्‍हीटी केसेस सामान्‍य आहेत आणि अनेक रूग्‍ण औषधोपचारासह बरे होताना दिसतात. पण थ्रोम्‍बसचे प्रमाण जास्‍त असेल तर फक्‍त समकालीन थेरपी अपूरी ठरते. मेकॅनिकल थ्रोम्‍बेक्‍टॉमीने आम्‍हाला जीवघेण्‍या स्थितीवर यशस्‍वीपणे उपचार करण्‍यास मदत केली, ज्‍यामुळे रूग्‍णाची प्रकृती सुधारली आणि रूग्‍ण लवकर बरा झाला.”  त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, ”पायामध्‍ये वेदना, सूज व श्‍वास घेण्‍यास त्रास होणे यांसारखी चेतावणी देणारी लक्षणे लवकर ओळखणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. इमेजिंगच्‍या माध्‍यमातून वेळेवर निदान आणि त्‍वरित विशेषीकृत केंद्रांमध्‍ये रेफरल केल्‍यास डीव्‍हीटी व पल्‍मनरी एम्‍बोलिझममध्‍ये व्‍यक्‍तींचे जीवन वाचू शकते.”

या केसमधून रक्‍तवाहिन्‍यांमधील गुंतागूंतीच्‍या स्थितींचे व्‍यवस्‍थापन करण्‍यामध्‍ये इंटरव्‍हेंशनल रेडिओलॉजीची वाढती भूमिका दिसून येते, तसेच नेक्‍स्‍ट-जनेरशन, एआय-संचालित तंत्रज्ञानाचा वापर करत उच्‍च जोखीम असलेल्‍या रूग्‍णांवर उपचार करण्‍यामध्‍ये सह्याद्रि हॉस्पिटल्‍सच्‍या प्रगत क्षमता देखील निदर्शनास येतात.      

उद्धव आणि राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिले पत्र:10 बाय10 च्या खोलीत 50 मतदार कसे

मुंबई-मुंबईतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या प्रारूप मतदार यादीत मोठे गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, मतदार यादीसारख्या महत्त्वाच्या दस्तऐवजात जाणूनबुजून फेरफार करण्यात आल्याचे त्यांना अनेक ठिकाणी आढळले आहे. त्यांच्या मते, काही विशिष्ट वॉर्डांतील मतदारांचे नावे अचानक अन्य वॉर्डांमध्ये हलवण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी मतदारांची संख्या अनैसर्गिकरीत्या वाढवण्यात आली आहे. या सर्वातून सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी संगनमताने आणि योजनाबद्ध पद्धतीने गोंधळ घालण्यात आल्याचा त्यांनी दावा केला.

आदित्य ठाकरे यांनी सांगितले की आम्ही आत्ताच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेले पत्र देऊन आलो आहे. या पत्रामध्ये आम्ही काही ठराविक मागण्या केल्या आहेत अशी माहिती देखील आदित्य ठाकरे यांनी दिली. या पत्रात अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रारुप मतदार यादी बाबत 21 दिवात काम करण्याची ही मागणी त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मतदार यादीतील चुकांना साधा प्रशासनिक घोळ म्हणावे की एक गंभीर कट, असा प्रश्न सतत उपस्थित होत आहे. परंतु जर त्यांच्याकडे विचारणा केली, तर हे सर्व एकप्रकारे लोकशाहीला मारक ठरणारे कृत्य असून, स्पष्टपणे देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या श्रेणीत बसणारे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मतदार यादीत जाणूनबुजून बदल करणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेचा गैरवापर असून लोकशाही व्यवस्थेचा पाया हादरवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या मते, या मुद्द्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे भविष्यातील निवडणुका न्याय्य राहतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणे.

या प्रकरणी फक्त शिवसेना ठाकरे गटच नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, मनसे आणि इतर विरोधी पक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, या अनियमिततेच्या पूर्ण चौकशीची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, अनेक वॉर्डांमध्ये अत्यंत विचित्र उदाहरणे आढळली आहेत. काही 10 बाय 10 फूटांच्या छोट्या खोलीत 40 ते 50 मतदार दाखवले गेल्याची उदाहरणे त्यांनी दिली, ज्यावरून मतदार याद्यांची विश्वसनीयता गंभीरपणे प्रश्नांकित होते. अशा प्रकारच्या यादीने प्रत्यक्ष वास्तवाशी संबंधच राहत नाही आणि वॉर्डनिहाय मतदारसंख्येचा ताळमेळ पूर्णपणे बिघडतो, असे त्यांनी नमूद केले.

याचबरोबर त्यांनी आणखी एक गंभीर मुद्दा मांडला. प्रारूप मतदार यादी मशीन-रिडेबल स्वरूपात उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल स्वरूपात माहिती उपलब्ध नसल्याने संबंधित माहितीचे विश्लेषण करणे किंवा नागरिकांनी स्वतःची पडताळणी करणे कठीण होते. त्यातून पारदर्शकतेचा अभाव जाणवत असून, हा मुद्दाम केलेला डाव असल्याचे त्यांनी सूचित केले. पारदर्शकतेचा अभाव म्हणजे नागरिकांना त्यांचे नाव यादीत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी अनावश्यक अडथळे निर्माण होणे. मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेत सर्वात मूलभूत गोष्ट असून, तिला जाणूनबुजून गुंतागुंतीचे स्वरूप देणे अत्यंत चिंताजनक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने तातडीने हस्तक्षेप करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यांच्या मते, जर या अनियमितता वेळेत दुरुस्त झाल्या नाहीत, तर आगामी निवडणुकांवरील जनतेचा विश्वास कमी होईल आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात येईल. त्यांनी नागरिकांनाही आवाहन केले की आपल्या नावाची नोंद निश्चित आहे की नाही याची त्वरित खात्री करावी आणि विसंगती आढळल्यास तक्रार नोंदवावी. लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर मतदार यादीसारख्या छोट्या गोष्टीतीलही प्रामाणिकपणा अत्यावश्यक आहे, असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी प्रकरण गंभीरतेने हाताळण्याची विनंती केली.

⁠तब्बल १० हजार रक्तपिशव्यांचे महाअभियानात संकलन

पुणेकरांच्या प्रेमाने भारावून गेलो’ :मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली कृतज्ञता

पुणे : शहरात रक्ताचा तुटवडा गंभीर होत असताना, पुणेकरांनी पुन्हा एकदा सामाजिक उत्तरदायित्वाच्या उच्च परंपरेचे जतन करीत, खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान महाअभियानात ५६ रक्तदान शिबिरांमधून तब्बल १० हजार ३३८ रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन केले. दरवर्षी होणाऱ्या या उपक्रमाला पुणेकरांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मोहोळ यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मोहोळ म्हणाले, “पुणेकरांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा सहभाग लाभला. हा विश्वास माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. शहराने पुन्हा एकदा दाखवून दिले की ऐक्य, सहकार्य आणि सामाजिक संवेदनशीलता हीच त्याची खरी ओळख आहे. हजारो पुणेकरांनी घराबाहेर पडून केलेले रक्तदान, हे केवळ वाढदिवसाचे औचित्य नव्हते, तर समाजबंध दृढ करण्याचे प्रतीक होते. मी पुणेकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. पुणेकरांनी दाखवलेले प्रेम म्हणजेच माझी खरी ताकद आहे.

मोहोळ पुढे म्हणाले, “वर्षभरात आपत्कालीन प्रसंगी तत्काळ रक्त उपलब्ध करता यावे यासाठी स्वेच्छेने रक्तदान करण्यास सदैव तयार असलेल्या पुणेकरांची सूची तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या यादीमध्ये विशेषतः दुर्मिळ रक्तगटाचे दाते समाविष्ट केले जातील, ज्याचा थेट लाभ गरजू रुग्णांना मिळू शकेल.”

रक्तदाते आणि रुग्ण यांच्यासाठी एक विशेष ऑनलाईन पोर्टल विकसित करीत आहोत. या पोर्टलवर रक्त देण्यास इच्छुक दाते नोंदणी करू शकतील. गरज पडल्यास रुग्ण किंवा रुग्णालयांना याच प्लॅटफॉर्मवरून थेट संपर्क साधता येईल. यामुळे रक्त मिळवण्यासाठी दवाखान्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर धावाधाव करावी लागणार नाही.” असे मोहोळ यांनी सांगितले.

औंध परिसरात पहाटे बिबट्या; नागरिकांना सतर्क राहण्याचे वन विभागाचे आवाहन!

‘”नागरिकांनी आपली कुत्री मोकाळ्या ठिकाणी सोडू नयेत. पहाटे शौचास जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी. आम्ही बिबट्यांचा शोध घेत आहोत.थर्मल ड्रोन’च्या माध्यमातून शोध मोहीम सुरू करण्यात येत आहे.;मनोज बारबेले , वन परिक्षेत्र अधिकारी

पुणे:
जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्यांच्या दहशत वाढली असतानाच, आता शहरातही बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे. औंध परिसरातील रहिवाशांना आज पहाटेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं.आरबीआय कॉलनी आणि सिंध सोसायटीच्या आसपास हा बिबट्या फिरताना दिसल्याची माहिती नागरिकांनी दिली.

सकाळी नागरिकांनी ही माहिती देताच पुणे वन विभाग तातडीने सतर्क झाला. लगेच RESQ CT टीमसह संयुक्त पथक औंधमध्ये दाखल झाले. बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी सर्व तांत्रिक साधनांचा वापर सुरू असून, पथके पूर्ण तयारीत आहेत. बिबट्या दिसल्यास त्याला पकडण्यासाठी सापळे आणि आवश्यक उपकरणांसह सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, परिसरातील सर्व सोसायट्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना सावध राहणे आणि पाळीव प्राण्यांना मोकळे न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुणे वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ४ नंतर बिबट्याचे कोणतेही दर्शन झालेले नाही. तरीही पथके रात्रीदेखील परिसरात शोध व देखरेख ठेवणार आहेत. कॅमेरे, ट्रॅप आणि पथकांची गस्त याद्वारे बिबट्याचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर वनविभागाचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगण्यात आले.

औंधसारख्या व्यस्त आणि दाट वस्तीच्या शहरभागात बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली असून वनविभागाची कारवाई निर्णायक ठरणार आहे.
रविवारी पहाटे औंध येथील ब्रेमेन चौक परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभाग आणि वन्यजीव बचाव पथकांनी तत्काळ शोध मोहीम राबवली. बिबट्या पहाटे चार’च्या सुमारास दिसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
त्यानंतर नागरिकांना प्रत्यक्ष कुठेही बिबट्या दिसून आला नाही. परिसरातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता, बिबट्या दिसून आल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.

वन विभागाच्या वतीने रविवारी रात्री उशीरा पर्यंत शोध मोहीम सुरू होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, औंध, बाणेर, चतु: श्रुंगी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.