Home Blog Page 375

कोंढव्यात श्रीराम नवमी व जन्मोत्सव साजरा

श्रीराम सेवक पवन बन्सल व परिवारातर्फे उपक्रमाचे आयोजन

पुणे – कोंढवा खुर्दच्या एनआयबीएम रोडवरील संकट मोचन महादेव मंदिर परिसरातील राम मंदिरातै रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमी व जन्मोत्सवाचा कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर राममय झाल्याचे पहायला मिळाले. या उपक्रमासाठी श्रीराम सेवक पवन बन्सल व परिवारातर्फे पुढाकार घेण्यात आला, तसेच माजी नगरसेवक तानाजी लोणकर यांचे या सोहळ्याला मोठे सहकार्य लाभले.

रामनवनमी निमित्ताने मंदिर परिसरात भव्य अशी सजावट करण्यात आली होती. दुपारी ठीक १२ वाजता रामजन्मोत्सव सोहळ्याला सुरवात झाली. या वेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रभू श्रीराम व सीता माता यांची मनोभावे पूजा व  आरती करण्यात आली. तत्पूर्वी मंदिर परिसरात रामनाम व सीतानामाचा जप तसेच भजन कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला पवन बन्सल यांच्यासह पुणे अग्रवाल समाज के अध्यक्ष ईश्वर गोयल,  पवन बन्सल, सुनीता बन्सल, अनिता रिषभ बन्सल, असीम बन्सल, जयभगवान गोयल, नरेंद्र गोयल, गुंजन नवल, संजय बन्सल, जीतेश बन्सल, संजय बन्सल, जीतेश अग्रवाल, शैलेश खंडेलवाल, योगेश जैन, पवन चमाडिया, सागर अग्रवाल रमेश अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने कोंढवा परिसर व शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमासंदर्भात बोलताना पवन बन्सल म्हणाले की, आज या ठिकाणी राम नवमीनिमित्ताने हजारोंच्या संख्येत रामभक्तांनी येऊन प्रभू श्रीराम व माता सीतेचे दर्शन घेतले. या शिवाय या ठिकाणी रामायण मन का पाठ, महाअभिषेक, महाआरती करण्यात आली. त्यानंतर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

बन्सल यांनी सांगितले की, ब्रदरहूडच्या वतीने राम नवमी निमित्ताने सोमवार ७ एप्रिल रोजी अल्पबचत भवन येथे संध्या काळी ५ वाजता भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुप्रसिद्ध गायक आदित्य गोयल आणि रितु पांचाल रामाची भजने सादर करणार आहेत. या भक्तिमयपूर्ण कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

वक्फ सुधारणा कायद्यानंतर भाजपा सरकारचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव.

हर्षवर्धन सपकाळांचा संविधान हाती घेऊन सहकाऱ्यांसह ऐतिहासिक काळाराम मंदिरात प्रवेश.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम हे सर्वांचे, भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग.

“समतेचा, बंधुत्वाचा, संविधानाचा विचार नांदू दे”, अशी प्रभू रामाच्या चरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कामना.

नाशिक, दि, ६ एप्रिल २०२५

नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले होते पण तत्कालीन व्यवस्थेने त्यांना मंदिर प्रवेश नाकराला होता. आज रामनवमीचे औचित्य साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारताचा नागरिक या नात्याने बाबासाहेबांनी लिहिलेले पवित्र संविधान हाती घेऊन काळाराम मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड, खा. शोभा बच्छाव व शेकडो कार्यकर्त्यांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले.

आज राम नवमी निमित्त कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे महंत सुधीरदास तसेच काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात डॉ आंबेडकर यांच्या सोबत असलेले कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड देखील उपस्थित होते. यावेळी महंत सुधीरदास यांनी १९३० साली मंदिरात प्रवेशापासून अडवणारे महंत हे माझे आजोबाच असल्याचे सांगून त्याबद्दल माफी मागून कुणाल गायकवाड यांचे मंदिरात स्वागत केले. यावेळी सपकाळ यांनी महंत सुधीरदास यांना भारतीय संविधानाची प्रत भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम हे सर्वांचे आहेत, ते भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत. आज राम नवमीनिमित्त काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेतले व “देशात व राज्यात समतेचा, बंधुत्वाचा व संविधनाचा विचार नांदावा”, अशी कामना व्यक्त केली. या काळाराम मंदिराला मोठा इतिहास आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी १९३० ते १९३५ अशी पाच वर्ष १७ दिवस सत्याग्रह केला पण त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला. मंदिराचे चारही दरवाजे बंद करण्यात आले होते. यावेळी दंगल होऊन त्यात बाबासाहेब आंबेडकर जखमी झाले होते. दुसऱ्या वर्षी ते गोलमेज परिषदेला गेले असता दादासाहेब गायकवाड, साने गुरुजी यांनी सत्याग्रहाची धुरा सांभाळली पण पाच वर्ष सत्याग्रह करूनही त्यावेळच्या व्यवस्थेने त्यांना प्रवेश दिला नव्हता. पण आज दादासाहेबांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड यांच्यासह आम्ही आज प्रभू रामाचे दर्शन घेतले आणि मंदिरात महंतांनी आमचे स्वागत केले.

काँग्रेस कार्यकर्ता मेळावा..
नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला, यावेळी मेळाव्याला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, देशात महागाई प्रचंड वाढलेली आहे, मराठी शाळा बंद होत आहेत, रोजगार नाहीत पण केंद्र सरकारने एक खेळणे हाती दिले असून आपण हातावर हात ठेवून पहात बसलो आहोत ते म्हणजे वक्फ बोर्ड… इंग्रजांनी दिल्लीत राजधानी वसवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भू संपादन करताना प्रार्थना स्थळे सुरक्षित रहावित अशी मागणी झाली, त्यासाठी १९१३ साली पुनर्वसनासाठी बनवलेल्या कायद्यातून वक्फ बोर्ड बनले. सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सुरक्षित रहावित यासाठी ते बनवले होते, त्यात मंदिर, मशिद, गुरुद्वारा यांना विशेष अधिकार दिले होते. वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला तरी याच्याआडून पद्मनाभ मंदिरातील प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या सोन्यावर त्यांना डल्ला मारायचा आहे आणि त्यासाठीच हा सर्व खेळ सुरु आहे, असे सपकाळ म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापुरकरच्या घराला पोलीस संरक्षण दिले जाते, प्रशांत कोरटकरनेही महाराजांचा अपमान केला आता त्याच्यावर कारवाईचे नाटक सुरु आहे पण या प्रवृत्तींना कोणाचे पाठबळ आहे ते सर्वांना माहित आहे. गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकातही छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावरील लिखाण केलेले आहे. आता भाजपाचा कोणी केंद्रीय मंत्री रायजगडाला भेट देणार आहे असे समजले. भाजपाला जर खऱेच छत्रपतींबद्दल अभिमान असेल तर कोरटकर, सोलापुरकरवर कठोर कारवाई करा आणि ‘बंच ऑफ थॉट’वर बंदी घाला, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

यावेळी प्रदेशाध्यक्षांसोबत खा. डॉ. शोभाताई बच्छाव, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड, माजी आ. शिरीष कोतवाल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व नाशिकचे प्रभारी ब्रीज दत्त यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुळशीबागेत २६४ व्या श्रीरामनवमी उत्सवात श्रीरामजन्म सोहळा थाटात साजरा

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने आयोजन

पुणे : बाळा जो जो रे… कुलभूषणा दशरथ नंदना… बाळा जो जो रे… चे स्वर पेशवेकालीन तुळशीबाग श्रीराम मंदिरात निनादले आणि रविवारी दुपारी १२.४० वाजता श्रीरामजन्म सोहळा थाटात साजरा झाला. यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्ताने मंदिराला फुलांच्या आकर्षक आरास आणि विद्युतरोषणाई देखील करण्यात आली.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात श्रीरामजन्म सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली हे देखणे मंदिर स्थापन केले आहे.

मुख्य पूजेनंतर रविवारी सकाळी १०.३० वाजता ह.भ.प. दर्शन बुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली. श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा झाल्यानंतर पागोट्याचा प्रसाद घेण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर, सायंकाळी ७.३० वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. त्याचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

श्रीरामराज्याभिषेक सोहळा मंगळवारी (दि.८)
मंगळवार, दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता ह.भ.प. दर्शनबुवा वझे यांचे लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. तर, शनिवार, दिनांक १२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ६ वाजता ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.दर्शनबुवा वझे यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन होणार आहे. बुधवार, दि. १६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीसत्यनारायण महापूजेने श्रीराम जन्मोत्सव उत्सवाची सांगता होणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन भरत तुळशीबागवाले यांनी केले आहे.

सरकारी नौकऱ्यांचे आमिष दाखवून अनेकांना लुटणाऱ्या तोतया महसूल सचिवाबरोबर त्याला सहाय्य करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यालाही पुणे पोलिसांनी पकडले

पुणे-महाराष्ट्र शासनाचे महसुल, वन विभाग व पोलीस खात्यामध्ये वर्ग १ व वर्ग २ नोकरीचे अमिष दाखवून अनेक नागरीकांना लुटणाऱ्या भामट्याला गुन्हे शाखा युनिट २ ने पकडून गजाआड केले आहे. महादेव बाबूराव दराडे वय ३२ वर्ष रा फॅलट क्रमांक ५०५ व्हाईट फिल्ड सोसायटी काळा खडक वाकड,पुणे असे या भामट्याचे नाव आहे. लोकांना तो महसूल सचिव म्हणून त्याची ओळख करुन देत महसुल विभागात सहायक क्लर्क म्हणून काम करणारा रणजीत लक्ष्मण चौरे वय ३५ वर्ष रा. धायरी पुणे हा या तोतयाला गुन्हयात नियुक्तीपत्र बनवून देणे , अन्य कागदपत्रे याबाबत सहाय्य करत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यालाही पकडले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रंमाक १०६/२०२५ बी एन एस कलम ३१६/२,३१८,३१९, मधील फिर्यादी रा.मुं पो काष्टी स्टेशन गाव तालुका श्रीगोंदा जि. अहमदनगर याचे तक्रारीवरुन इसम नामे महादेव बाबूराव दराडे वय ३२ वर्ष रा फॅलट क्रमांक ५०५ व्हाईट फिल्ड सोसायटी काळा खडक वाकड पुणे याने तो स्वता महसुल सचिव असल्याचे भासवून सन २०२२ ते २०२५ दरम्यान पुणे शहर व परिसरात पोलीस उप निरीक्षक पदावर नियुक्ती देतो म्हणून विश्वास संपादन करुन १० लाख रु घेवुन फसवणुक केले बाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
हा आरोपी हा रियल इस्टेट एजंट म्हणून काम करीत असताना कामानिमीत्त शासकीय ऑफीसेस मध्ये जाणे येणे असल्याने त्याला शासकीय कामकाज व नोकरी व त्याच्या नियुक्तीबाबत ज्ञान झाल्याने सदर शासकीय कार्यालयातील त्याच्या नियमीतच्या वावराने तेथील येणा-या जाणा-या लोकांना तो महसूल सचिव म्हणून त्याची ओळख करुन देवू लागला त्यामध्ये तो ब-याच लोकांना शासकीय अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग पदावर नियुक्ती व नेमणुका करुन दिली आहेत असे भासवून आरोपीने सन २०२२ ते २०२५ दरम्यान महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयातील सुमारे २० ते ३० नागरीकांकडून १ लाख रु पासून २० लाख रु. पर्यंत वेगवेगळ्या रक्कमा घेवुन महसुल पोलीस व वन विभागात नोक-या देण्याचे अमिष दाखवून त्यांची फसवणुक केल्याची शक्यता असून त्याचेकडून महाराष्ट्र शासनाचे शिक्क्यांचे वापर करुन लेटर पॅडवर महसुल, पोलीस व वन विभागात विविध उमेदवार यांना नेमणुका बाबत पत्रे ओळखपत्रे, विविध शासनाच्या शिक्यांचे पत्रे, शासकिय चिन्हांचा वापर करुन स्वताचे नावाने शासकिय अधिकारी असल्याचे भासवणा-या डाय-या, शासनाचे सेवापुस्तके, शासनाचे ओळखपत्रे, विविध बँकांचे चेक्स बुक्स व कार्ड शासकिय शिक्के असा दस्ताऐवज हस्तगत करण्यात आलेला आह. यामध्ये अनेक नागरीकांना नोकरीचे अमिष दाखवुन फसवणुक केल्याची शक्यता दिसून येते तसेच सदर गुन्हयाचे तपासामध्ये महसुल विभागात सहायक क्लर्क म्हणून काम करणारे रणजीत लक्ष्मण चौरे वय ३५ वर्ष रा. धायरी पुणे याचा गुन्हयात उमेदवारांची नियुक्तीपत्र बनवून देण्यामध्ये सहभाग असलेबाबत निष्पन्न झाले असून त्यासदेखील ताब्यात घेण्यात आले आहे गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.
अशाप्रकारे वरील दोन्मही आरोपींनी म हाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयातील नागरिकांना नोकरीचे अमीष दाखवून गंडा घातला असण्याची शक्यता असल्याने त्यांनी पोलीस विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ट्रम्प कर : भारताची निर्यात घटणार,त्यामुळे टीव्ही-खाद्यतेलासह बरेच काही स्वस्त होणार:थायलंड-व्हिएतनामसारखे देशात माल पाठवतील

अमेरिकेचे नागरिक महागाईने आणखी हैराण होतील

मुंबई-ट्रम्प यांच्या आयात करामुळे २०२५-२६ मध्ये भारतीय उत्पादनांची अमेरिकेची वार्षिक निर्यात ८५ हजार कोटी रुपयांपर्यंत घटू शकते. भारताच्या जीडीपीवर ०.२ टक्के परिणाम होईल, परंतु भारतात एक वर्षात खाद्यतेल, यंत्रे-इलेक्ट्रॉनिक सामानाच्या किमती घटू शकतात. हे सामान ट्रम्प यांच्या कराचा मारा सोसणाऱ्या देशांतून येते.

एसबीआयच्या ताज्या अहवालानुसार चीन, व्हिएतनाम, थायलंड, तैवानसारख्या देशांतून आयात सामान स्वस्त होईल. हे देश अमेरिकेला पाठवले जाणारे सामान भारतात पाठवू शकतात. कर युद्धामुळे अमेरिकेत महागाई दर २.२ टक्के वाढू शकतो. अमेरिकन अर्थव्यवस्था व बाजारातील घसरण पुढच्या काळात आणखी वाढू शकते. त्यामुळे अमेरिकेला नजीकच्या काळात दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत.

भारताच्या रत्ने अलंकार क्षेत्राला सर्वात जास्त फटका बसणार

अभियांत्रिकी साहित्य : इंजिनिअरिंग गुड्स क्षेत्रावर कराचा परिणाम दिसेल. यातून पुरवठादार व्यवस्थेला फटका बसेल. निर्यात महसूल घटेल.
रत्ने-दागिने : जेम अँड ज्वेलरी क्षेत्राला कराचा जास्त परिणाम दिसू शकतो. या क्षेत्राचा कर शून्यावरून २० टक्के केला आहे. अमेरिकेला दरवर्षी भारतात १० अब्ज डॉलर्सचे रत्न व दागिन्यांची निर्यात होते.
कृषी क्षेत्र : या क्षेत्रात भारताची अमेरिकेला निर्यात एप्रिल ते डिसेंबरदरम्यान १.५ अब्ज डॉलर होती. एकूण निर्यातीपैकी ३ टक्के एवढा वाटा आहे. त्यात प्रगती होण्याची शक्यता आहे.
यंदा जगातील निर्यात १.३ टक्क्यापर्यंत घटण्याचा अंदाज

एसबीआयनुसार करामुळे भारताच्या जीडीपीमध्ये ६६ हजार कोटी रुपये (०.२ टक्के) घट. ३ वर्षांत जीडीपीवर ०.५% परिणाम झाला.
जगभरात निर्यात २०२४ मध्ये २.९ टक्के घटली होती. २०२५-२६ ही घसरण १.३ टक्के राहू शकते.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कर लावण्याची घोषणा केल्यानंतर पहिल्याच दिवशी शेअर निर्देशांक डाऊ जोन्स ३.९८ टक्के घसरला. एसअँडपी ४.८४ टक्के, नॅस्डॅक-५.९७ टक्के अंकांनी घसरला. जपान, कोरिया, स्वतंत्रपणे हाँगकाँगचा बाजार कोसळला.
डॉलर निर्देशांक १.७ टक्के ​​घसरून १०२ अंकांवर आला. रुपयाची मोठी घसरण झाली.
कोणत्या देशातून येणारा माल स्वस्त हे जाणून घेऊया

चीनवर अमेरिकेने ३४ टक्के कर लादला. भारत खनिज इंधन-तेल आयात चीनमधून करतो. त्याचे दर घटू शकतात.
अहवालानुसार व्हिएतनामवर ४६ टक्के कर लावला. तेथून भारतात मोती, रत्नांसह इतर गोष्टींची आयात होते. त्याचे दर कमी होण्याची शक्यता सांगितली जाते.
तैवानवर अमेरिकेने ३२ टक्के कर लावला आहे. या देशातून भारतात इलेक्ट्रिकल यंत्रे, टीव्ही, साउंड रेकॉर्डरची आयात केली जाते.
स्वित्झर्लंडवर ३२ टक्के कर लावला आहे. तेथून भारतात मेकॅनिकल सामान आयात होते. त्याच्या किमतीही कमी होऊ शकतात.
थायलंडवर ३७ टक्के कर लावला आहे. तेथून भारतात तेलाची आयात केली जाते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेला १० टक्के बेसलाइन कर भारतासह ६० देशांत शनिवारी लागू झाला. त्यावरून अमेरिका व युरोपात ट्रम्पविरोधी निदर्शने केली जात आहेत. व्यापार युद्धामुळे कोणाचेही भले होणार नाही, असे लोक म्हणून लागले आहेत. अमेरिकेचे नागरिक आधीच महागाईने हैराण झाले आहेत.

ट्रम्प यांनी शनिवारी पुन्हा घोषणा केली. कराला मागे घेणार नाही. ते म्हणाले, अमेरिका आपल्या आर्थिक हितांचे संरक्षण करेल.
त्याच्या उत्तरात चीनने कठोर शब्द वापरले. ट्रम्प कराच्या आडून दादागिरी करत आहेत. आम्ही मागे हटणार नाहीत.

जबरदस्तीने मोबाईल हिसकावुन चोरी करुन पळुन जाणा-या सराईतांना पोलिसांनी पकडले

पुणे-
दि.०२/०४/२०२५ रोजी फिर्यादी हे त्यांचे दुकानाबाहेर उभे असताना ०३ अनोळखी इसम त्यांचेकडील लालकाळ्या रंगाचे मोटरसायकल वरुन फिर्यादी यांचे जवळ येवुन फिर्यादीचे हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन चोरी करुन पळुन गेले असलेबाबत दि.०३/०४/२०२५ रोजी समर्थ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यावरुन गु.र.न.६५/२०२५ भा. न्या. संहीता कलम ३०४ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्हा उघडकीस आणने करीता वरिष्ठांच्या आदेशाने समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथक हे सदर परीसरातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनिय बातमीदार यांचे मदतीने आरोपींचा शोध घेत असताना उतारा चौक, सोमवारपेठ येथे एका मोटरसायकलवर ०३ संशयीत इसम मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन समर्थ पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अनिकेत अमर ढगे वय २५ वर्षे, रा. कात्रज कोंढवा रोड, खोपडे नगर, पुणे २) साहील नासीर सय्यद वय २७ वर्षे, रा. घोरपडी पेठ, पिएमसी कॉलनी, पुणे ३) प्रणव प्रकाश ठाकुर वय २४ वर्षे, रा. फुलवाला चौक, २०४ रविवार पेठ, पुणे असे असल्याचे सांगीतले यांचे पुर्व गुन्हे अभिलेख तपासले असता यातील आरोपी क्र.०१ याचेवर ०७ जबरी चोरी व शरीराविरुद्धचे गुन्हे, आरोपी क्र.०२ याचेवर ०७ चोरी व शरीराविरुद्धचे गुन्हे व आरोपी क्र.०३ याचेवर ०३ चोरी व शरिराविरुद्धचे गुन्हे दाखल असल्याची माहीती प्राप्त झाल्यानंतर पंचांसमक्ष सदर इसमांची व त्यांचेकडील मोटरसायकलची झडती घेतली असता त्यांचेकडे असलेल्या मोटरसायकलचे डिक्कीमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे ०४ मोबाईल फोन मिळून आल्याने सदरबाबत त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी हे मोबाईल फोन पुणे शहर परीसरातुन चोरी केल्याची कबुली दिली . या बाबत माहीती घेतली असता त्यातील रेड मी कंपनीचा मोबाईल फोन चोरी गेल्याबाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.न.६५/२०२५ गु.र भा.न्या.सं. कलम ३०४(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाल्याने नमुद आरोपींना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन चोरीचे ०४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
ही कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग,प्रविण पाटील पोलीस उप-आयुक्त परि.०१, संदीपसिंह गिल्ल सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग श्रीमती अनुजा देशमाने, समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकउमेश गित्ते यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक जालिदर फडतरे, सहा. पोलीस उप-निरीक्षक संतोष पागार, पोलीस अंमलदार रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, रविंद्र औचरे, रहीम शेख, अमोल गावडे, कल्याण बोराडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली आहे.

अ‍ॅड. जैन यांचे विविध क्षेत्रातील कार्यपुण्याच्या सामाजिक विकासाला पूरक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

पुणे दि.५: समाजाचं समाजाला परत देण्याची भावना नेहमी अंगीकारणारे नामवंत ज्येष्ठ वकील एस के जैन यांचे कार्य पुण्याच्या सामाजिक विकासाला पूरक आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.ज्येष्ठ वकील अ‍ॅड. एस. के. जैन यांच्या अमृत महोत्सवा निमित्त शिवाजीनगर येथील सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.

या कार्यक्रमास केंद्रीय सहकार तथा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री, चंद्रकांत दादा पाटील, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, नगर विकास व सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, महाराष्ट्राचे महा अधिवक्ता बिरेंद्र सराफ, सौ. पुष्पा जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, एस के जैन यांनी वकिली क्षेत्रात मोठे नावलौकिक मिळविले आहे. वकिली करीत असताना त्यांनी अनेक वकील घडविले. आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास टाकून त्यांना अधिकार आणि जबाबदाऱ्या देऊन मोठे केले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहता वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. वकिली सोबतच त्यांनी अनेक क्षेत्रात काम करत असताना विश्वस्ताची भावना कधीही सोडली नाही, आपण मालक नसून विश्वस्ताची जबाबदारी पार पाडत आहोत असे मानुन, आपल्याला जी जबाबदारी दिली ती लोकाभिमुख कशी करता येईल या दृष्टीने त्यांनी काम केले. श्री जैन यांचा संपर्क व्यापक असून त्यांनी गरजूंना नेहमी मदतीची केली आहे.

याप्रसंगी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अ‍ॅड.एस के जैन यांच्या कार्याविषयी आपले विचार व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एस के जैन यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.

श्री जैन मनोगतात म्हणाले, हा सत्कार माझा नसून सर्व समाजसेवकांचा सत्कार आहे. समाजाने मला खूप दिलं आहे ते कधीही विसरण्यासारखं नाही. त्यामुळे मी सर्वांचा ऋणी आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. जैन यांच्या कार्याची चित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, विधीज्ञ, समाज बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  00000

विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, नाविन्यतेला प्रोत्साहन देण्याकरीता राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 5 : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून नवकल्पनांना चालना देण्यासाठी इन्यक्यूबेशन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. अशा कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी भांडवल पुरविण्याच्यादृष्टीने राज्याने भारतीय लघू उद्योग विकास बँकेसोबत 100 कोटी रुपयांचा निधीअंतर्गत निधी तयार केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विद्यार्थ्यांनो, आपल्या प्रकल्पांपुरते मर्यादित न राहता कल्पनामधील त्रुटी शोधा, यशस्वी उद्योजकाशी संवाद साधून त्यांच्या मागणीप्रमाणे व्यवसायिक आणि कौशल्याधिष्ठित मॉडेल तयार करा, याकरीता केंद्र व राज्य शासन आपल्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ मैदान, शिवाजीनगर येथे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, सीओईपी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र व गोवा आणि सृजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डीपेक्स-२०२५’ राज्यस्तरीय चलप्रतिकृती प्रदर्शनाला दिलेल्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार सुनील कांबळे आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, गेल्या दशकापासून तरुणांमधील ज्ञान, कौशल्य आणि त्यांच्यामधील नाविन्यता एकत्रित मांडण्याची संधी ‘डीपेक्स’च्या माध्यमातून मिळत आहे. या मंचावरील संकल्पना विविध प्रयोगामध्ये रूपांतरित झाल्या आहेत.

महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप राजधानी
तुमच्या मनातील कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी तंत्रज्ञानाने उपलब्ध होत आहे. आज छोटीशी कल्पना व्यवसायिक संधीमध्ये परावर्तित होत असल्याचे आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्र ही स्टार्टअप जननी आहे. तसेच स्टार्ट अप इंडियाचा अहवालानुसार देशात सर्वाधिक स्टार्टअप आणि त्यामाध्यमातून होणारी गुतंवणूक असल्यामुळे देशाची स्टार्ट अप राजधानी ही महाराष्ट्र आहे.

‘विकसित भारत -2047’ या संकल्पेच्या मुळाशी देशातील युवाशक्ती व नवोन्मेषक
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत -2047’ या संकल्पेच्या मुळाशी देशातील युवाशक्ती व नवोन्मेषक होते. हीच युवाशक्ती देशाला विकासाकडे नेईल. ‘मेक इन इंडिया-मेक फॉर वर्ड’ च्या माध्यमातून इतर कुठल्याही देशाकडे नसलेले विविध उच्च प्रतीचे साहित्य आपल्या देशात तयार होत आहे. संरक्षण क्षेत्रात सुमारे ३० ते ३५ हजार कोटी रुपयांचे संरक्षण साहित्य भारत देश जगाला निर्यात करीत आहे. त्यामुळे विकसित भारताचे स्वप्न बघतांना स्वावलंबी भारत, स्वयंपूर्ण भारत आणि आत्मनिर्भर भारत अत्यंत महत्वाचा आहे. आत्मनिर्भर भारताकडे जात असताना तंत्रज्ञानयुक्त स्टार्टअप आणि त्यामाध्यमातून नाविन्यता महत्वाची आहे. यामुळे देशात आज विविध यशस्वी स्टार्टअप बघायला मिळतात. प्रत्येक टाकाऊ वस्तू ही उर्जा निर्मितीचे साधन आहे, त्यामुळे विविध नवनवीन प्रयोग, र्स्टाट अप आणि तंत्रज्ञानाद्वारे त्यावर प्रकिया करुन ऊर्जा निर्मिती भर देण्यात आहे, यामुळे रोजगाराला चालना मिळत आहे. टाकाऊ वस्तूपासून पुनर्वापर त्यामाध्यमातून शाश्वत विकास हेच विकसित भारताचे उद्दिष्ट आहे.

स्टार्टअपच्या परिसंस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा नाविन्यतेवर भर
आज टियर 2 आणि टियर 3 शहरामधील औद्योगिक संस्था, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी शाखेत विद्यार्थी मोठ्याप्रमाणात स्टार्टअप परिसंस्थेच्या माध्यमातून नाविन्यतेवर भर देत आहे. ते गटस्वरुपात कल्पना उदयास आणून इज ऑफ लिव्हिंग, इज ऑफ बिझिनेस तयार होतात. इज ऑफ लिव्हिंगसोबतच व्यवसायिक कल्पनेत परिवर्तन केल्यास स्वत:सोबतच अनेकांना रोजगार उपलबध् करुन देता येते.

उर्जा सुरक्षिततेकडे भारताची वाटचाल
इथेनॉल, सौर उर्जेच्या माध्यमातून उर्जा सुरक्षिततेकडे भारताची वाटचाल सुरु आहे. सौर उर्जेकरीता लागणारे सर्व साहित्य देशात निर्माण होत आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याकरीता राज्य शासन प्रयत्नशील आहे, पुढच्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांना लागणारी १६ हजार मेगावॅट वीज सोलरच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळाल्यामुळे त्यांच्या पैशांची तसेच अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या शासनाच्या अनुदानातही बचत होणार आहे. यातून दरवर्षी विजेच्या दरात होणारी वाढ कमी करून नागरिकांना दिलासा देण्याच्या प्रयत्न करीत आहोत. नाविन्यतेच्या माध्यमातून स्वच्छ उर्जा, हरीत उर्जेकडे वाटचाल होत आहे.

उर्जा क्षेत्रात ‘नेट झिरो’कडे जाण्याचा शासनाचा प्रयत्न
पारंपरिक स्त्रोतातून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होत आहे. वातावरणीय बदलामुळे होणाऱ्या परिणाम लक्षात घेऊन हरीत उर्जेद्वारे कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत आणायचे आहे. राज्याला लागणाऱ्या विजेपैकी सन 2030 पर्यंत 52 टक्के वीज अपारंपारिक स्त्रोतून निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. हरित ऊजेच्या माध्यमातून २०४७ पर्यत ऊर्जा क्षेत्रात ‘नेट झिरो’कडे जाण्याचा प्रयत्न आहे,असेही श्री. फडणवीस म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘डीपेक्स-२०२५- प्रोजेक्ट डिरेक्टरी’चे विमोचन करण्यात आले. तसेच त्यांनी प्रत्यक्ष दालनात जावून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रोजेक्टबाबत माहिती घेत आहेत.

सृजनचे विश्वस्त डॉ. भरत अमळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

यावेळी ‘डीपेक्स २०२५’ स्वागत समिती अध्यक्ष डॉ. प्रकाश धोका, सचिव प्रसेनजीत फडणवीस, निमंत्रक संकल्प फळदेसाई, अथर्व कुलकर्णी महाविद्यालयांचे कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
0000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे महानगर प्रदेश विकास परिषदेअंतर्गत विकास कामांचा आढावा

पुणे, दि. ५: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगर प्रदेश विकास परिषदेअंतर्गत जिल्हा विकास आराखड्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (ए आय) वापर, पर्यावरण व परिपूरक अर्थव्यवस्था, उद्योग क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी विविध संस्थाकडून सविस्तर आढावा घेतला.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, मैत्री संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच विविध संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार ३ ट्रिलियन वरुन ३० ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढविण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. राज्यात जलद आणि सर्वसमावेशक विकासासाठी, खासगी क्षेत्र व अशासकीय संस्थांच्या सहभागाद्वारे काम करणाऱ्या मैत्री संस्थेवर राज्यातील महत्त्वाच्या शहरातील विविध विकासात्मक कामे करण्याची जबाबदारी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, तळेगाव येथे टूल हब साठी ३०० एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. पुरंदर येथील विमानतळाच्या जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करा, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी सेंद्रिय कचऱ्यातून गॅस निर्मिती प्रकल्प राबविण्याबाबत कार्यवाही करावी, डी. पी. रोड आखून घ्या, सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करा, रस्ते जास्तीत जास्त रुंद करा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डुडी यांनी ॲग्री हॅकेथॉन आयोजित करण्यात आल्याचे सांगून कृषी, पर्यटन व उद्योग विकास आराखडा सादर केला. बैठकीत खाजगी गुंतवणूक वाढवणे, झोपडपट्टीमुक्त पुणे, कृषी क्षेत्रात एआयचा वापर, वाहतूक व्यवस्था, रिंग रोडसाठीचे भूसंपादन, निर्यात वृद्धीसाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय, उद्योग सेवा केंद्र स्थापन करणे, पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविणे, बायो-एनर्जी प्लांट, मेट्रोमार्गाचा विस्तार वाढविणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0000

एरंडवणे भागात प्रेरणा मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा थाटात संपन्न

पुणे- अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानलं जातं. त्यामुळे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला खास महत्व आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन महाराष्ट्रभर तसेच श्री स्वामी समर्थ यांची जयंती महोत्सव येथे मोठ्या दिमाखात साजरा झाला. एरंडवणे भागातील पूरग्रस्त वसाहत येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्टान तर्फे स्वामींच्या “प्रेरणा मंदिर” चा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. दोन दिवस झालेल्या सोहळ्यात संपूर्ण परिसर भक्तीमय झालेलं पहायला मिळाले.
“प्रेरणा मंदिर” या स्वामींच्या मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्याला दिनांक २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते श्री स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करून सुरुवात झाली. दिवसभर भजनी मंडळाने अतिशय सुंदर असे भजन गायले. दुसऱ्यादिवशी त्या नंतर श्रींच्या मूर्ती व कळसाचे पूजन करून श्री स्वामींची पालखी काढण्यात आली. पूजन, होमहवन व मूर्ती स्थापना प्रतिष्ठापना झाल्यानंतर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाआरती झाली त्यानंतर महाप्रसाद व भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यात शास्त्र शुद्ध मंत्र पठण होमहवनसाठी मंदार खळदकर गुरुजी सह एकूण आठ ब्राम्हण हजर होते. मंदीर दर्शनाला खुले केल्यावर दर्शनाला व महाप्रसादासाठी स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने रांग लागली होती. वेळी टाळ मृदुंग गजरात अंभग भजनात तल्लीन भक्त, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, युवती,लहान मुले आदी सहभागी झाले होते.

प्रसिद्ध लँडस्केप डिझायनर व वास्तुविशारद महेश नामपूरकर, पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार, बांधकाम व्यावसायिक गिरीश दरोडे, CA असोसिएशनचे अध्यक्ष सर्वेश जोशी यांनी या श्री स्वामींच्या प्रेरणा मंदिराचे स्व खर्चातून बांधकाम करून या भागातील नागरिकांना करून दिले आहे. तसेच प्रेरणा मंदिराचे डिझाईन ही नुकत्याच इटलीमधील कोमो येथे डिझाइन क्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला ‘ए डिझाइन अॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आलेले लँडस्केप डिझायनर व वास्तुविशारद महेश नामपूरकर, पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार यांनी केलेलं आहे.
पुण्यातील ‘सूसमध्ये असलेल्या ‘सनीज वर्ल्ड’ येथे महेश नामपूरकर यांनी कल्पक लँडस्केपिंगद्वारे पडीक दगडखाणीचे रुपांतर उत्तम अशा ‘ट्रॉपिकल लीजर डेस्टिनेशन’मध्ये केले आहे आणि वापी येथील ‘अवध हेलिकोनिया’ या प्रकल्पांसाठी त्यांना ए डिझाइन अॅवॉर्ड अँड काँपिटिशन’ स्पर्धेत विविध क्षेत्रांमधील उपयुक्त व नावीन्यपूर्ण डिझाइन्सचा या स्पर्धेत कांस्य पदक प्रदान करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमध्ये २२ देशांमधील परीक्षकांनी ३५०० स्पर्धकांमधून विजेत्यांची निवड केली. प्रेरणा मंदिराची उभारणी करणाऱ्या महेश नामपूरकर,गजेंद्र पवार,गिरीश दरोडे, सर्वेश जोशी यांनी कोणतीही प्रसिद्धी मानपान न स्वीकारता केलेल्या या निस्वार्थ सेवेची चर्चा या सोहळ्यात ऐकायला मिळाली. तसेच लाईट व्यवस्था दादा रणपिसे, साऊंड व माईक व्यवस्था साळुंखे बंधू, महाप्रसाद बनविणारे आचारी,मंडप व्यवस्था, पूजा करणारे गुरुजी, आदींचे सर्वेश जोशी यांच्या हस्ते सत्कार करून आभार मानण्यात आले.
भव्य दिव्य अश्या या प्रेरणा मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, दादा ठोंबरे, दिपक पोटे, जयंत भावे, सौ.मंजुश्री खर्डेकर, भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ.संदीप बुटाला, प्रेरणा मंदिर अध्यक्ष दर्शन अशोक पोटे, युवा नेतृत्व अजय कंधारे, मंदिराचे बांधकाम पाहणारे अक्षय पाटील, ऋषिकेश शेडगे, वैभव पानगावकर, तेजस वाशिवले, मधुकर काळे, पंकज गोरखे,राहुल जाधव, एकनाथ साठे, अमोल डांगे,माने काका, दशरथ पिसे,चैतन्य पोटे, भारती पानगावकर, सुजाता पोटे, नमिता पोटे, श्रद्धा पानगावकर, पूनम जाधव,शुभम काळे, अजिंक्य पोटे,आणि मोठ्या संख्येने स्वामीभक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

प्रभू श्रीरामांनी माणसांना जीवन जगण्याचे मुल्य दिले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ५ : प्रभु श्रीरामांना आपण सर्वजण ईश्वररुपी मानतो. त्यांनी देवत्वाचा वापर न करता पशु, पक्षी व वानर यांची मदत घेऊन विश्वातील मोठी आसुरी शक्ती असणाऱ्या रावणाचा निपात केला. सर्वसामान्य माणूस सत्त्यासाठी लढला तर त्याचा विजय निश्चित आहे हे प्रभु श्रीरामांनी करुन दाखविले आहे. प्रभू श्रीरामांनी खऱ्या अर्थाने माणसांना जीवन जगण्याचे मुल्य दिले असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सखी गीतरामायण व सीता स्वयंवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे पुजन केले. या प्रसंगी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासणे, सद्‌गुरु शंकर महाराज मठाचे अध्यक्ष डॉ. मीहिर कुलकर्णी, चित्रा देशपांडे आदी उपस्थित होते.

युगपुरुषांमध्ये प्रभू श्रीराम यांना अनन्य साधारण महत्व आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, श्रीरामांचे आयुष्य हे वेगवेगळ्या स्वरुपाचे राहिले आहे. त्यांच्यामध्ये बुद्धीमत्ता, स्थिरता, संस्कार, उत्कृष्ट शासक असे अनेक गुण होते. त्यांनी घालून दिलेल्या मुल्यांवर आपण जीवन जगले पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

गीत रामायण हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. रामायणातील रामचरित्रातील विविध प्रसंगांवर ग.दि. माडगुळकर यांनी रचना केल्या आहेत व त्याला तितक्याच सुमधूर चाली सुधीर फडके बाबुजींनी दिल्या आहेत. या गीतरामायणामध्ये आनंद, दुख, अश्रु व हास्य यासह विविध भावना पहायला मिळतात. रामनवमीच्या पूर्वसंध्येला पुण्यात गीतरामयणाचा कार्यक्रम होत असल्याचा आनंदही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मीहिर कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन सुप्रिया गोडबोले यांनी केले. या गीतरामायण कार्यक्रमास नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0000

दिनानाथ रुग्णालयाचा स्वतःला क्लिनचीट देण्याचा प्रयत्न:त्यांच्या अहवालाला महत्त्व नाही, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचे विधान

सरकारच्या समितीचा अहवाल सोमवारी येणार

पुणे-तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाने आपल्या अहवालात स्वतःला क्लिनचीट देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या अहवालाला कोणतेही महत्त्व नाही, असे महत्त्वपूर्ण विधान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे दीनानाथ रुग्णालयाभोवतीचा कारवाईचा फास अधिकच घट्ट आवळला जाण्याची शक्यता आहे.

तनिषा भिसे यांना दीनानाथ रुग्णालयात गंभीर स्थितीत प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना 10 लाखांचे डिपॉझिट भरल्यानंतरच दाखल करून घेण्याची भूमिका घेतली होती. परिणामी, उपचारास विलंब झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही घटना उजेडात आल्यानंतर या रुग्णालयावर चौफेर टीकेची झोड उठली असताना रुपाली चाकणकर यांनी वरील भूमिका घेतली आहे.रुपाली चाकणकर म्हणाल्या की, प्रस्तुत प्रकरणात पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर चौकशी केली जाईल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने यासंबंधी स्वतःचाच एक चौकशी अहवाल सादर केला आहे. पण त्याला फारसे महत्त्व व गांभीर्य नाही. कारण, हा स्वतःलाच क्लिनचीट देण्याचा प्रकार आहे. या प्रकरणी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती सोमवारी सकाळी पुणे पोलिस आयुक्तांना आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालातील माहितीनुसार पुढील कारवाई केली जाईल.

” स्मार्ट सिटी मिशन” अपयशातून धडा घेण्याची गरज !

२०१५ मध्ये सुरू झालेल्या “स्मार्ट सिटी मिशन” योजनेची दहा वर्षाची मुदत ३१ मार्च २०२५ रोजी संपली. देशपातळीवरील या योजनेचा आढावा घेतला तर प्रशासकीय अकार्यक्षमता, राजकीय नेत्यांचे आर्थिक हितसंबंध आणि चुकीच्या पद्धतीचे नियोजन व ढिसाळ अंमलबजावणी यामुळे आजच्या घडीला तरी या चांगल्या योजनेचा बोजवारा उडालेला दिसतो. या पार्श्वभूमीवर दहा वर्षात झालेल्या चुकांमधून राज्य व केंद्र शासन काही धडा घेणार का हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. गेल्या दहा वर्षातील चुका सुधारल्या तरच हे मिशन यशस्वी होईल अन्यथा या ‘स्मार्ट ‘ शहरांची आणखी “माती” व्हायला आणखी वेळ लागणार नाही. या योजनेचा घेतलेला आढावा.

(लेखक: प्रा नंदकुमार काकिर्डे)

मोदी सरकारने बरोबर दहा वर्षांपूर्वी “स्मार्ट सिटीज मिशन” ( एससीएम) हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. देशातील शंभर शहरांचे पुनर्नवीकरण व त्यांच्यात सुधारणा करण्याची ही योजना आहे. या सर्व शहरांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे व आर्थिक विकासाला चालना देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्याचप्रमाणे या 100 शहरांवर आधारित त्याची नक्कल करून त्याचे एक आदर्श मॉडेल तयार करणे हे सुद्धा या योजनेचे उद्दिष्ट होते.

2016 मध्ये देशातील पहिल्या वीस शहरांची यादी जाहीर करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर या दोन शहरांचा समावेश करण्यात आला होता. याशिवाय देशातील सर्व प्रमुख राज्यांमधील प्रमुख शहरांमध्ये स्मार्ट सिटी मिशन राबवण्याचे जाहीर करण्यात आले होते.

सर्वसामान्यांना ‘स्मार्ट सिटी मिशन’ काय आहे हे समजायचे झाले तर त्या शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तसेच विविध प्रकारचा ‘डेटा’ म्हणजे माहिती संकलित करण्यासाठी विविध इलेक्ट्रॉनिक पद्धती व यंत्रणांचा वापर केला जातो. या माहिती द्वारे शहरातील कचऱ्याचे संकलन,उपयुक्त गोष्टींचा व्यवस्थित पुरवठा,शहरातील सर्व रस्त्यांवरील रहदारीची हालचाल व त्याचे योग्य नियंत्रण,पर्यावरणाचे व्यवस्थापन व सामाजिक सेवा आणखी कार्यक्षम करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना हाती घेण्याचे काम या स्मार्ट सिटी मिशन तर्फे केले जाते. माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून सर्व शहरांच्या प्राधिकरणांना अद्ययावत निरीक्षण आणि नियंत्रण करण्याची यामध्ये कल्पना असून जनसमुदायाशी सहजगत्या संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचे काम या मिशनमध्ये प्रामुख्याने आखण्यात आले होते.

एखाद्या शहराला स्मार्ट सिटी म्हणून ओळख मिळवायचे असेल तर त्या शहरात उत्तम दर्जाची व कार्यक्षम आरोग्यसेवा, शिक्षणाच्या सुविधा, गृहनिर्माण व अन्य सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्याची योजना होती. त्याचप्रमाणे स्मार्ट शहरातील सर्व नागरिकांना मूल्यवर्धित सेवा अत्यंत विश्वासार्हतेने व किफायतशीरपणे देण्याची कल्पना या मिशनमध्ये होती. एवढेच नाही तर प्रत्येक शहरांमध्ये उत्तम गृहनिर्माण प्रकल्प हाती घेणे, समाजाची आर्थिक वाढ चांगल्या प्रकारे करणे व सर्व उपलब्ध संसाधनांचे अत्यंत कार्यक्षम व प्रभारी व्यवस्थापन करण्याची जबाबदारी या मिशनवर टाकण्यात आली होती. गेल्या काही वर्षातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करण्याची जबाबदारी या मिशनमध्ये नमूद करण्यात आलेली होती.यामुळे स्थानिक पातळीवरील अर्थव्यवस्थेला चालना मिळावी व त्याचबरोबर शहरीकरण होत असताना पर्यावरणाचे रक्षण करणे तसेच हवामान बदलाच्या संदर्भात त्याचा मुकाबला करणे,शहरातील सर्व वाहतूक सुव्यवस्थित करणे व शहरी समाजाच्या विविध गरजा पुरवण्यासाठी अद्ययावत म्हणजे स्मार्ट तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त कार्यक्षमपणे वापर करणे हीच या शहराची वैशिष्ट्ये निर्माण केली जावीत असे अत्यंत चांगले उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

एवढेच नाही तर प्रत्यक्ष शहराचे एक गुणपत्रक म्हणजे स्कोअर कार्ड तयार करण्याची यात कल्पना होती. प्रत्येक शहरातील दरवर्षी होणारी प्रगती, हाती घेतलेल्या प्रत्येक मोहिमेचे परिणाम,विविध संसाधनांचे एकत्रीकरण आणि या सर्वांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अशा निकषांवर पाहणी करून त्या आधारे गुण देण्याची चांगली संकल्पना होती यात शंका नाही. प्रत्येक स्मार्ट शहरांमध्ये चांगली आधुनिक आरोग्य केंद्र, विविध शैक्षणिक संस्था,शहरभर स्वच्छतेचा प्रसार, कार्यक्षम पाणीपुरवठा, कचऱ्याचे व्यवस्थापन व नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी अधिक सुविधा देण्याची ही स्मार्ट सिटी मिशनची कल्पना होती .

केंद्र सरकारने दहा वर्षात एकूण 110 शहरांमध्ये हे मिशन राबवण्यास प्रारंभ केला. मात्र त्यापैकी केवळ 18 शहरांमध्ये विविध स्मार्ट सिटी प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यात आले. म्हणजे 92 शहरांमध्ये आजही हे सर्व काम अपूर्ण राहिले आहे. विशेष म्हणजे या 18 शहरांपैकी नऊ शहरे उत्तर प्रदेश व तामिळनाडू या दोन राज्यातील आहेत.

आज दहा वर्षानंतर या सर्व योजनांचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर बहुतेक सर्व ठिकाणी त्याची झालेली प्रगती आणि त्याला मिळालेला निधी हा अत्यंत अपुरा असल्याचे आढळले. 110 शहरांमध्ये ‘स्मार्ट सिटी मिशन “‘अंतर्गत 5151 प्रकल्प किंवा योजना हाती घेण्यात आल्या. त्यापैकी फक्त 33 टक्के योजना पूर्णत्वास गेल्या व त्यांनी फक्त 25 टक्के निधीचा वापर केला.उदाहरण द्यायचे झाले तर 2015 ते 2019 या कालावधीत 48 हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते व त्यापैकी 50 टक्के रक्कमही या काळात वापरण्यात आली नाही. शहरी विकासाची सर्वंकष चौकट तयार करण्यामध्ये या मिशनला अपयश आलेले दिसते. त्याचप्रमाणे इतक्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये शाश्वत प्रकारचा गव्हर्नन्स अद्यापही निर्माण झालेला नाही. ही शहरे निर्माण करण्यासाठी तेथील स्थानिक स्वराज्य संस्था यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती परंतु प्रत्यक्षात संबंधित सर्व संस्थाबरोबर समन्वयाचा अभाव हा प्रामुख्याने जाणवला आहे. या योजनेची उद्दीष्टे गाठण्यासाठी सर्वत्र संपूर्ण शहराचा विचारच करण्यात आला नाही. मात्र त्या त्या शहरातील काही विशिष्ट भागांमध्येच स्मार्ट सिटीचे प्रकल्प राबवण्यात आले. असा दृष्टिकोन घेऊन केलेला विकास हा ओबडधोबड विकास झालेला आढळतो. पुणे शहर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पुण्यात
1148 कोटी रुपयांचे 45 प्रकल्प पूर्ण झाले आहेत असा प्रशासनाचा दावा आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती माहित नाही. पुण्यातील स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम,स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग,डिजिटल एक्सपिरीयन्स सेंटर, ई बसेस, विमानतळापासून शहराच्या विविध भागांमध्ये कार्यक्षम वाहतूक सेवा असे प्रकल्प हाती घेतले आहेत पण अद्याप ते सर्व अपूर्ण आहेत.

या योजनेतील मोठा दोष म्हणजे प्रत्येक शहरामध्ये स्मार्ट सिटी मिशन राबवण्यासाठी स्वतंत्र विशिष्ट उद्देश कंपनी (ज्याला स्पेशल परपज व्हेईकल- एसपीव्ही) म्हणतात ती निर्माण करण्यात येऊन त्यांना काही अधिकार देण्यात आले. मात्र प्रत्येक शहरातील महानगरपालिका किंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व या संस्था यांच्यात समन्वयाचा अभाव राहिला. त्याचप्रमाणे या मिशनमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व नगण्य किंवा कमी झाल्याने त्यांना याच्यात काही रस निर्माण झाला नाही. या मिशनचे उद्दिष्ट खूप चांगले असूनही त्यातील मानवी हक्कां वर आधारित दर्जा किंवा योजनांचे मुल्यांकन करण्याची योग्य यंत्रणा नसल्यामुळे या मिशनचे काम किती टक्के पूर्ण झाले, एकूण कामाचा दर्जा काय होता याबाबत फारशी आकडेवारी हाती लागली नाही. या 110 स्मार्ट सिटी मिशन साठी पंधरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची गरज होती व त्यापैकी 12 हजार कोटी रुपये खाजगी क्षेत्राकडून मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात खाजगी क्षेत्राकडून हा निधी उपलब्ध झाला नाही त्याचाही प्रतिकूल परिणाम या स्मार्ट सिटी मिशनवर झाला.

जागतिक बँकेने स्मार्ट सिटी मिशन साठी पुढील पंधरा वर्षात भारताने 70 ट्रिलियन रुपये खर्च करावेत असे सुचवले होते. मात्र जानेवारी 2025 पर्यंत केवळ 1.5 ट्रिलियन रुपये खर्च केले गेले. यावरून निधीची मोठी कमतरता असल्याचे स्पष्ट झाले. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने याबाबत तयार केलेल्या एका अहवालामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा प्रकारचे मोठे प्रकल्प राबवण्याची क्षमता नसल्याचे नमूद केले होते. अनेक महानगरपालिका त्यांचे वाजवी उत्पन्न किंवा महसूल निर्माण करण्यात कमी पडल्याचे या अहवालात नमूद केले आहे. मराठीतील म्हणी प्रमाणे “एक ना धड व भाराभर चिंध्या” अशा स्वरूपात हा प्रकल्प बहुतेक सर्व शहरांमध्ये राबवण्यात आला. अकार्यक्षम अधिकारी, अयोग्य व अविचारी नियोजन, भ्रष्टाचारी कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांचा अनावश्यक हस्तक्षेप अशा विविध कारणांमुळे या चांगल्या मिशनचे दहा वर्षात ‘बारा’ वाजलेले दिसतात. शहरी विकासाची आव्हाने व कार्यक्षम व्यवस्थापन याबाबतीत ही योजना अपेक्षा पूर्ण करू शकली नाही अशी वस्तुस्थिती आहे. खुद्द पुणे शहरातील एकूण वाहतूक, रस्ते, हवामान, अनियमित वीज व अपुरा पाणीपुरवठा, वाढत्या झोपडपट्ट्या, सर्वत्र निर्माण होणारे कचऱ्यांचे ढीग, नागरी सुविधांची अकार्यक्षमता, आपत्कालीन सेवा सुविधा आणि पदोपदी पैसे खाण्याची सर्व स्तरांवरील प्रवृत्ती यामुळे स्मार्ट सिटी तर सोडाच पण आपण शहरी अधोगतीकडे जात आहोत याचे दर्शन प्रत्येक पुणेकराला दररोज होत आहे. पुणे शहरच नाही तर आसपासच्या सर्व उपनगरांमध्ये अत्यंत बकालपणा वाढत आहे. “स्मार्ट सिटीची भीक नको परंतु भ्रष्टाचार व अकार्यक्षमतेचे कुत्रे आवरा “असे म्हणण्याची पाळी आली आहे. केंद्र व राज्य या दोघांनी दहा वर्षाच्या निमित्ताने या सर्वच प्रकल्पांचा गंभीरपणे आढावा घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचा( एआय) चा वापर करून योग्य प्रगती व दिशा राखली तरच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी होईल. अन्यथा या शहरांची आणखी “माती ” होईल हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्य वेत्त्याची गरज लागणार नाही.

*(लेखक पुणेस्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ नेत्रदीपक लघुदर्शन सोहळा संपन्न

हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदुंगाच्या तालावर फुगड्या खेळत दंग झालेले कलाकार
वारकऱ्यांच्या पायांनी धरलेला ठेका, अंभगांच्या स्वरात चिंब झालेले मायबाप प्रेक्षक, आणि
कृतज्ञता सन्मान अशा भक्तिमय वातावरणात ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या भव्य आध्यात्मिक
चित्रपटाचा नेत्रदीपक लघुदर्शन सोहळा (ट्रेलर) आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला.
अल्पावधीतच या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत
ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन
थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही
नामांकित वितरण संस्था करीत आहे.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टविती परोपकारी।। 
संत पंरपरेत संत ज्ञानेश्वर महाराजांचे अद्वितीय योगदान आहे. मराठी भाषेचा अभिमान,
भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी, तत्त्वज्ञ, संतकवी अशा अनेकविध गोष्टींसाठी ओळखल्या
जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी  अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग
सर्वसामान्यांना दाखवला. तसेच आध्यात्मिक समतेचा आधार घेऊन त्यांनी वारकरी संप्रदायची
सुरुवात केली. ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या तिन्ही भावंडांना आयुष्यभर समाजाकडून वाईट
वागणूक मिळाली. परंतु, खचून न जाता त्यांनी आणि त्यांच्या भावंडांनी भागवत संप्रदायाच्या
शिकवणीत आपले स्थान निर्माण केले.  या भावंडांच्या संतपणाची महती सांगत मुक्ताईच्या
दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा हा चित्रपट आहे. विश्वाला
मांगल्य प्रदान करणाऱ्या या भावंडांचे अजोड कार्य व विचार आजच्या पिढीला प्रेरणा देणारे
व्हावेत, या उद्देशाने ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटाचा विषय हाती घेतल्याचे दिग्दर्शक
दिग्पाल लांजेकर यांनी याप्रसंगी सांगितले.
संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे दिसणार असून संत मुक्ताईची भूमिका नेहा
नाईक हिने साकारली आहे. संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर तर संत
सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी केली आहे. यासोबत समीर धर्माधिकारी,
मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे,
अभिजीत श्वेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्यासुद्धा चित्रपटात भूमिका आहेत.
संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायांकन संदीप शिंदे
तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि

स्थिरछायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचे आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची
जबाबदारी सौरभ कांबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनीआरेखन
निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना
यांची आहेत. सहनिर्माते सनी बक्षी आहेत. केतकी गद्रे अभ्यंकर कार्यकारी निर्मात्या आहेत.

‘वीर मुरारबाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने… अरुण गोविल,दीपिका चिखलिया एकत्र

छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत

प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी प्रत्येक घराघरांत-
मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा मिळवली आहे. या जोडीची अफाट लोकप्रियता
आजतागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार
आहे. श्रीरामनवमीच्या निमित्ताने या दोघांचे एक आकर्षक पोस्टर प्रदर्शित झाले आहे. ‘वीर
मुरारबाजी.. पुरंदरकी युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी हिंदी चित्रपटात ही जोडी छत्रपती
शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. भाऊसाहेब
आरेकर यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध
यांनी केले आहे.
ऐतिहासिक चित्रपटात एकत्रित काम करण्याचा योग या निमित्ताने जुळून आला असून या
भूमिकेसाठी आम्ही तितकेच उत्सुक होतो, असं हे दोघे सांगतात. छत्रपती शहाजीराजे भोसले
आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका करायला मिळणं आमच्यासाठी खूपच आनंददायी होतं.
ज्या उत्तुंग व्यक्तिमत्वांनी आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला,
अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते, असं प्रांजळ मत
या दोघांनी व्यक्त केलं.
पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी
धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ नरवीर मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला
प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे
मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा ‘वीर मुरारबाजी…पुरंदरकी युद्धगाथा’ या चित्रपटातून
रुपेरी पडदयावर येण्यासाठी सज्ज होत असून लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा
होणार आहे.