Home Blog Page 37

टीईटी पेपरफुटीच्या वृत्ताचे परीक्षा परिषदेकडून खंडन

पुणे, दि. २५: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे नियंत्रण राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हा आयोजन व सनियंत्रण समिती कक्षाकडून अतिशय काटेकोरपणे करण्यात आले असून ‘‘टीईटी’ चा पेपर ३ लाखांत! शिक्षकांची टोळीच जेरबंद’ या आशयाच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या 24 नोव्हेंबर रोजीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने परिषदेकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत गोपनीयरित्या प्रश्नसंच तयार करून तज्ञांमार्फत स्वतंत्र पाकिटात सीलबंद केले जातात. तयार केलेल्या संचांपैकी यादृच्छिकपणे प्रश्नसंच निवडून गोपनीय मुद्रणालयाकडे दिला जातो. गोपनीय मुद्रणालयामार्फत प्रश्नपत्रिका छापून वर्गखोलीनुसार पाकिटे तयार करून केंद्रनिहाय बॉक्समध्ये सिलबंद पॅकिंग केले जाते. सदर बॉक्सेस सिलबंद गाड्यांमार्फत जिल्हा कस्टडीमध्ये पाठविले जातात. जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रश्नपत्रिकांची कस्टडी ही शक्यतो जिल्हा कोषागार कार्यालय असते अथवा सी.सी.टी.व्ही. व हत्यारबंद पोलिस बंदोबस्त असलेल्या ठिकाणी असते. गोपनीय मुद्रणालयाकडून आलेल्या प्रश्नपत्रिकांचे बॉक्स हे सिलबंद गाडीतून आले असल्याची व बॉक्सेस व्यवस्थित सिलबंद असल्याची खातरजमा करूनच जिल्हा परीरक्षक व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) याच्या उपस्थितीत, कस्टडीमध्ये सदर साहित्य घेतले जाते.

परीक्षेच्या दिवशी जिल्हा परीरक्षक व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या उपस्थितीत व्हिडीओ रेकॉर्डिंग (चित्रीकरण) करूनच झोनल ऑफिसरकडे केंद्रनिहाय प्रश्न पत्रिकांचे बॉक्स दिले जातात. झोनल ऑफिसर कस्टडी ते केंद्रावर सदर बॉक्सेस पोहोच करतांना या प्रवासाचेही चित्रिकरण केले जाते. केंद्रावर सदर बॉक्सेस मधून प्रश्नपत्रिकांची ब्लॉक निहाय पाकिटे काढून, ब्लॉकमध्ये सिलबंद पाकिटे वाटली जातात. उमेदवारांच्या, परीक्षार्थीच्या समोर सदर पाकिटे उघडली जातात. याच पद्धतीने या परीक्षेच्यावेळीही कार्यवाही झालेली आहे.

राज्यभरातून कोणत्याही ठिकाणाहून प्रश्नपत्रिकांची गाडी सिलबंद नसल्याबाबत अथवा गोपनीय प्रश्नपत्रिकांचे बॉक्सेस अथवा पाकिटे सिलबंद नसल्याची तक्रार प्राप्त झालेली नाही. अथवा असे निदर्शनास आले नाही. म्हणजेच गोपनीय मुद्रणालय ते परीक्षा केंद्र हा प्रश्नपत्रिकांचा प्रवास अत्यंत काटेकोरपणे झालेला दिसून येत आहे. या कोल्हापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे कामकाज उपरोक्त नमूद कार्यपद्धतीनुसार झाल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा या प्रकरणाशी संबंध नाही, असेही श्रीमती ओक यांनी स्पष्ट केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल

पुणे, दि. २५ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक (इयत्ता ५ वी) व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता ही परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेला राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक प्रविष्ठ झालेले असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

‘सिद्धी साधनेचा’ महाआशीर्वाद

पुणे : सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रह्मर्षी गुरुदेव हे तब्बल 68 दिवसांच्या महासाधने नंतर आपले दिव्य आशीर्वाद देण्यासाठी प्रथम पुण्यात येत आहेत. त्यांच्या सिद्धी साधनेच्या महाआशीर्वादाचा लाभ पुणेकरांना मिळावा यासाठी विश्व धर्म चेतना मंच,पुणे, पीसीएमसी परिवार यांच्या वतीने ‘सिद्धी साधनेचा महाआशीर्वाद’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा येत्या 29 नोव्हेंबर रोजी शनिवारी सायंकाळी 5 वाजता, वर्धमान सांस्कृतिक केंद्र, गंगाधाम, कोंढवा रोड, बिबवेवाडी, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती आयोजक उत्तम बाठिया व सुमित चंगेडिया यांनी दिली आहे.

यावेळी सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रह्मर्षी गुरूदेव यांचे व्याख्यान देखील होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोफत पासची व्यवस्था करण्यात आली असून ते कार्यक्रमस्थळी (स्वागत कक्ष येथे )दिले जाणार आहेत. या दिव्य सोहळ्याचा जास्तीत जास्त पुणेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

हिंदी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त डॉ. सविता सिंह भूषविणार अध्यक्षपद

साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या हीरक महोत्सवी वर्षाची होणार सांगता

पुणे : स्त्रियांच्या साहित्यावर सातत्याने अभ्यास करणारी साहित्यिक व सांस्कृतिक संस्था असा लौकिक संपादन केलेल्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षाची सांगता 41व्या स्त्री साहित्य संमेलनाने होत आहे. संमेलन रविवार, दि. 30 नोव्हेंबर 2025 रोजी पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान हिंदी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध कवयित्री, समीक्षक, विचारवंत डॉ. सविता सिंह भूषविणार आहेत.

संमेलन सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीज, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या, ज्येष्ठ कवयित्री अध्यक्ष अंजली कुलकर्णी व कार्यवाह शलाका माटे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

संमेलनाचे उद्घाटन मराठवाडा मित्र मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिकांच्या कलाकृतींचा रसास्वाद मांडणाऱ्या ‌‘सप्तधारा‌’ या ग्रंथाचे प्रकाशन साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा संशोधन विभाग व संस्कृती प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. या वेळी ज्येष्ठ लेखिकांचे प्रातिनिधीक सत्कार तसेच वार्षिक पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. हे. वि. इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‌‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी जीवन‌’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात डॉ. दीपक शिकारपूर आणि डॉ. सुजाता महाजन यांचा सहभाग असणार आहे. त्यांच्याशी डॉ. प्रांजली देशपांडे संवाद साधणार आहेत.

प्रबंध एकादशी समिती पुरस्कृत डॉ. ह. वि. सरदेसाई पुरस्काराने प्रा. डॉ. आशालता कांबळे यांना गौरविले जाणार आहे.

तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ साहित्यप्रेमी भगिनींचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यांनतर ज्येष्ठ लेखक, अभिनेते अभिराम भडकमकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यांच्याशी शैला मुकुंद संवाद साधणार आहेत.

‌‘गोष्टीवेल्हाळ तात्या‌’ या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथांचे अभिवाचन अक्षय वाटवे आणि सहकारी करणार आहेत. संमेलनाच्या समारोप समारंभास डॉ. कीर्ती मुळीक असणार आहेत.

संमेलन सर्वांसाठी खुले आहे.

डॉ. सविता सिंह यांच्याविषयी ..

डॉ. सविता सिंह यांनी दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात एम.ए., एम.फिल., पी. एच.डी. केली आहे. मॉन्ट्रियाल (कॅनडा) येथील मॅकगिल विद्यापीठात त्यांनी साडेचार वर्षे संशोधन आणि अध्यापनाचे काम केले. ‌‘भारतात आधुनिकतेचा विमर्श‌’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. सध्या त्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात प्रोफेसर आणि स्कूल ऑफ जेंडर अँड डेव्हलपमेंट स्टडीजच्या संस्थापक संचालक म्हणून कार्यरत आहेत. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय हर्बर्ट मारक्यूस सोसायटीच्या संचालक मंडळाच्या सदस्या आणि को-चेअर आहेत.

प्रकाशित कविता संग्रह : अपने जैसा जीवन, नींद थी और रात थी, स्वप्न समय, खोई चीज़ों का शोक.

द्विभाषिक काव्यसंग्रह : रोविंग टुगेदर (इंग्रजी-हिंदी) आणि ज स्वी ला मेजों दे जेत्वाल (फ्रेंच-हिंदी).

राजकीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात रियलिटी अँड इट्स डेप्थ : ए कन्वर्सेशन बिटवीन सविता सिंह अँड रॉय भास्कर प्रकाशित.

आधुनिकता, भारतीय राजकीय सिद्धांत आणि भारतातील नारीवाद अशा विषयांवर तीन मोठ्या प्रकल्पांवर त्यांचे काम सुरू आहे.

पुरस्कार : हिंदी अकादमी आणि रजा फाउंडेशन व्यतिरिक्त महादेवी वर्मा पुरस्कार. युनिस डी सूजा अवॉर्ड आणि केदार सन्मान.

पारदर्शक व्यवहार, विश्वासार्ह व ग्राहकाभिमुख सेवेसाठी तत्पर-उदयन माने

दी प्रोफेशनल रिअल्टर्स ऑफ पुणे (प्रॉप) वेल्फेअर असोसिशनच्याअध्यक्षपदी उदयन माने; सचिवपदी मनीष दीडमिसे

पुणे: बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांच्या हितासाठी कार्यरत दी प्रोफेशनल रिअल्टर्स ऑफ पुणे (प्रॉप) वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी उदयन माने, उपाध्यक्षपदी तनुज नगरानी व नीरज सिंग, सचिवपदी मनीष दीडमिसे, तर खजिनदारपदी मुरली रमणी यांची निवड झाली आहे. २०२५-२०२७ या कालावधीसाठी ‘प्रॉप’च्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीमध्ये संचालक म्हणून ऍड. महेश यादव (प्रॉप ग्रोथ), दिनेश राठी (प्रशिक्षण व मेंटरशिप सर्कल्स), विक्रम मलिक (बिझनेस एक्स्चेंज व क्रॉस सेल), सारंग मद्रेवार (क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम), रवींद्र यादव (डिजिटल, पीआर व मीडिया) आणि प्रीत कोहली (इव्हेंट्स, एंगेजमेंट व नेटवर्किंग) यांची नियुक्ती झाली. मावळते अध्यक्ष दर्शन चावला, संस्थापक अध्यक्ष किशन मिलानी, खालिद मेनन सल्लागार मंडळात, तर ‘एनएआर इंडिया’चे चेअरमन रवी वर्मा मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहतील.

उदयन माने म्हणाले, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील रिअल इस्टेट व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणारी ‘प्रॉप’ ही संस्था नॅशनल असोसिएशन ऑफ रिअल्टर्स-इंडियाशी संलग्नित आहे. पुणे हे बांधकाम क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असलेले शहर आहे. त्यामुळे रिअल इस्टेट व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, प्रमाणित सदस्यांची डायरी आणि घर खरेदी-विक्री प्रक्रियेत ग्राहकांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी जनजागृती सत्रांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विकसक, कायदा विशेषज्ञ आणि नियामक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होईल.”

‘प्रॉप’चे सर्व सदस्य ‘रेरा’ नोंदणीकृत असून त्यांनी ‘रेरा’ परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. हे सर्व सदस्य विविध शहरांत रिअल इस्टेट सेवा देण्यास सक्षम आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे सदस्यांना जागतिक सर्वोत्तम पद्धतींची ओळख होते. तसेच ‘नरडेको’ आणि ‘क्रेडाई’ यांच्याशी असलेल्या द्विपक्षीय संलग्नतेमुळे उद्योगातील समन्वय आणि धोरणात्मक संवाद अधिक मजबूत झाला आहे, असेही उदयन माने यांनी नमूद केले.

‘प्रॉप’चे स्वतःचे प्रशिक्षण केंद्र असून, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिअल इस्टेटमार्फत (आयआयआरई) सदस्यांसाठी विशेष कौशल्य-वृद्धी कार्यक्रम राबवले जातात. ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेवर व सुबद्ध निराकरण करण्यासाठी ‘प्रॉप’ने स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा देखील विकसित केली आहे. पारदर्शक व्यवहार, माहितीपूर्ण ग्राहक व प्रशिक्षित रिअल इस्टेट सल्लागार तयार करण्यासह ग्राहकांचा विश्वास दृढ करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे दर्शन चावला यांनी सांगितले.

अमृतांजन हेल्थकेअरचा ग्राहकांचा आवडता पिवळा बाम पुन्हा तयार होणार!

गेल्या १३० वर्षांहून अधिक काळ अमृतांजनचा पिवळा बाम म्हणज अनेक भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहेभारतीयांच्या घरी रात्री पलंगावर हा बाम हमखास आढळतो. प्रवासातही हा बाम वापरणारी अनेक मंडळी दिसून येतातघरातील कुणालाही डोकेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास झाल्यास एका हातातून दुसया हातात प्रेमाने दिलेला हा बाम आश्वासक स्पर्शाने आधार देतोशांत आणि सुखद सुगंधाने वेदनेपासून आराम मिळतोकित्येक वर्षांच्या आधारामुळे आणि  या बामच्या अस्तित्वामुळे अनेकांच्या सुंदर आठवणी तयार झाल्या आहेतअमृतांजन हेल्थकेअरचा पिवळा बाम अनेकांच्या कुटुंबांचा अविभाज्य भाग बनला आहेहा विश्वास गेल्या १३० वर्षांतील कधीही  डगमगलेल्या खात्रीचे प्रतीक आहे

जुन्या आठवणींना उजाळा देत अमृतांजन हेल्थकेअरने आपल्या लोकप्रिय आणि आयकॉनिक पिवळ्या बामला पुन्हा त्याच पॅकेजिंगमध्ये बाजारात आणले आहेक्लासिक काचेच्या बाटलीतील पिवळा बाम लोकांना सर्वात जास्त आवडतोपिवळ्या बामचि पुनरावृत्ती अविस्मरणीय असावी याकरिता प्रत्येक बाटलीत २५ टक्के अतिरिक्त बाम देण्यात आला आहेअमृतांजनच्या विश्वासावर आणि आरामदायी उपचारांवर पिढ्यानपिढ्या जपलेले ग्राहक उत्तरोत्तर वाढत राहतील, असा विश्वास अमृतांजन कंपनीने व्यक्त केला.

बाजारात पिवळा बाम परत येत असल्याची माहिती सर्व ग्राहकांना पोहोचवण्यासाठी अमृतांजनने दोन नव्या जाहिरातींची निर्मिती केली आहेशारीरीक वेदना कार्यालयीन ठिकाण, प्रवास ते अगदी साध्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या कामकाजांत व्यत्यय आणतातदैनंदिन कामकाजात व्यत्यय आणणाया वेदनांवर अमृतांजनचा पिवळा बाम लोकांना सहज मुक्त करतोवेदनेच्या भागावर बाम लावताचक्षणी लोकांना नैसर्गिकरित्या झटपट दिलासा मिळतोबामचा वापर केल्यानंतर लोकांना त्या क्षणांचा पूरेपूर आनंद घेता येतोअमृताजनंच्या या बामची ही किमया दोन्ही जाहिरातींमध्ये प्रभावीपणे मांडली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अमृतांजनचा पिवळा बाम औषधाव्यतिरिक्त दैनंदिन जीवनातील विश्वासार्ह सोबती म्हणून वावरला आहेया बामच्या वापराने अनेकांना पिढ्यानपिढ्या आराम मिळाला आहेआता हा बाम जुन्या आकर्षक काचेच्या बाटलीत शक्तीशाली जाहिरातींसह पुन्हा सर्वांसमोर येत आहेनव्याने सादर झालेला हा बाम वेदनाशमनाचे आश्वासन पाळतोअमृतांजन कंपनी आपल्या ग्राहकांना शाश्वत आराम देण्याची आधुनिक काळाची जबाबदारी पार पाडत मूल्यांच्या अपेक्षाही पूर्ण करते.

अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीएससंभू म्हणाले, ‘‘गेल्या शतकांहून अधिक काळ भारतातील अनेक कुटुंबांनी त्यांच्या रोजच्या वेदना निवारण क्षणांसाठी अमृतांजन बामवर विश्वास ठेवला आहे१८९३ मध्ये पहिल्यांदा अमृतांजन वेदनाशमन बामचे बाजारात अनावरण झाले होतेगेल्या अनेक वर्षांच्या काळात अनेक घरांत पिढ्यानपिढ्या अमृतांजनच्या पिवळ्या बामचे अस्तित्व टिकून आहेआता बाजारात पुन्हा उपलब्ध होताना ग्राहकांना अपेक्षित गोष्टींची पूर्तता केली आहेग्राहकांना अजून चांगला आराम मिळेल, अगोदरपेक्षा जास्त बाम वापरता येईल तसेच पर्यावरणपूरक पॅकेजिंग राहील याकडे आम्ही लक्ष दिले आहेकाचेच्या बाटलीत मिळणारा हा पिवळा बाम केवळ इतिहासाची पुनरावृत्ती नसून, आमची १३० वर्षांची अविरहित वचनबद्धताही दर्शवतेगेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांसाठी दर्शवलेली काळजी आता अजूनच सक्षम झाली आहे.’’

अमृतांजन हेल्थकेअर लिमिटेडचे मुख्य मार्केटिंग अधिकारी श्रीमणीभगवतीश्वरन म्हणाले, हा पिवळा बाम ग्राहकांसाठी औषधोपचारांसह ओळख आणि विश्वासाही भावना आहेप्रत्येक कुटुंबासाठी या बामसोबत एक आठवण जोडलेली आहेया पुनप्रेक्षणाने आम्ही नवीन आठणी निर्माण करु इच्छितोबामसाठी काचेच्या बाटल्यांचे वेष्टन हे जबाबदारीक आणि भावनिक निर्णयात्मक पाऊल आहेअमृतांजन आपल्या मूळ तत्त्वांशी पुन्हा जोडला गेला आहेनव्या पिढ्यांसाठीही हा बाम प्रभावी आणि महत्त्वाचा ब्रँण्ड राहील याची खात्री आहे.

बाजारात पिवळा बाम पुन्हा उपलब्ध करुन देत अमृतांजनने ग्राहकांच्या वेदनाशमनाची आणि आरामाची परंपरा कायम ठेवली आहेही अखंड परंपरा यापुढेही प्रत्येक घरात कायम राहील, असा विश्वास अमृतांजन कंपनीने व्यक्त केला.

शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन व ‘नेट-झिरो’साठी पुढाकार,आरती अहिवळे यांची माहिती

0

 ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल व ईपीडी ग्लोबल यांच्यात आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार

पुणे: शाश्वत विकास, पर्यावरणाचे संवर्धन, कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यासह २०७० पर्यंत भारताने ठेवलेले ‘नेट-झिरो’चे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी प्रयत्नशील आहोत. हरित व पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी पुणेस्थित ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल व नॉर्वेस्थित ईपीडी ग्लोबल यांच्यातील भागीदारी महत्वपूर्ण ठरेल. शाश्वत विकासासाठी घेतलेला हा पुढाकार आहे,” अशी माहिती ग्रीन सोल्यूशन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सागर अहिवळे आणि आरती भोसले-अहिवळे दिली.

ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल आणि ईपीडी ग्लोबल यांच्यामध्ये पर्यावरणीय उत्पादन घोषणेची ( एन्व्हायर्नमेंटल प्रॉडक्ट डिक्लेरेशन-ईपीडी) सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक करार करण्यात आला. ईपीडी ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॅकॉन हाऊआन आणि ‘ग्रीनएक्स’चे सागर अहिवळे व आरती भोसले-अहिवळे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली. प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पिटके उपस्थित होते. तीन वर्षांकरीता हा करार झाला असून, भारतीय उद्योगसमूहांनी तयार केलेल्या उत्पादनांचे पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण ईपीडी ग्लोबलमार्फत अधिकृतपणे ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल करणार आहे. संबंधित उत्पादनाचा ईपीडी दस्तऐवज त्या उत्पादनावर, तसेच उत्पादकाच्या संकेतस्थळावर ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

आरती भोसले-अहिवळे म्हणाल्या, “या सहकार्यातून ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल भारतातील ईपीडी जनरेशन सेवांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून काम पाहणार आहे. यामुळे देशभरात पर्यावरणीय उत्पादन विस्ताराला गती मिळणार आहे. शाश्वत विकास, पर्यावरणीय पारदर्शकता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यावरण अहवाल व मानदंड यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या दोन्ही संस्था एकत्र येत आहेत. या उपक्रमातून भारतात अधिक जबाबदार, हरित आणि नवोन्मेषी उद्योगसंस्कृती घडविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ग्रीनएक्सने गेल्या काही वर्षांत रसायने, अभियांत्रिकी, धातू, अन्न उद्योग अशा विविध क्षेत्रांतील ५० पेक्षा अधिक व्यवसायांसोबत ईपीडी प्रकल्प राबविले आहेत. ईपीडी ग्लोबलसोबतचा करार भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा उपलब्ध करून देईल आणि प्रमाणपत्रांच्या खर्चात सुमारे ७० टक्के घट होईल.”

सागर अहिवळे म्हणाले, “भारतातील छोट्या-मोठ्या उद्योगांचे जागतिक बाजारातील प्रदर्शन उल्लेखनीय आहे. ईपीडी असलेली उत्पादने जगभरात अधिक प्राधान्याने स्वीकारली जात आहेत. त्यामुळे भारतीय एमएसएमई उत्पादकांना निर्यात वाढविण्यास आणि चांगला दर मिळविण्यास याचा मोठा फायदा होईल. पारदर्शकता वाढवणे, शाश्वततेकडे वाटचाल सुलभ करणे आणि जागतिक बाजारपेठेच्या निकषांनुसार स्वतःला सिद्ध करणे, हा या सहयोगाचा प्रमुख उद्देश आहे. सध्या ईपीडी अनिवार्य नसली तरी पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी जगभरातील सरकारे त्यावर भर देत आहेत. आगामी काळात हा आवश्यक निकष ठरणार आहे.”

ही भागीदारी भारतासह संपूर्ण प्रदेशातील शाश्वतता क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. उद्योगांची स्पर्धात्मकता वाढविणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब वेगवान करणे, यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. भारताच्या २०७० पर्यंत ‘नेट झिरो’ ध्येयाच्या पूर्ततेसाठीही ही भागीदारी अर्थपूर्ण योगदान देणार आहे. पुणे, मुंबई, गुजरात आणि दुबई येथे ग्रीनेक्सची कार्यालये असून, देशातील इतर प्रमुख १० पेक्षा अधिक औद्योगिक शहरांत विस्तार करण्यात येणार आहे. १०० पेक्षा अधिक पर्यावरणीय सल्लागार, तसेच या प्रक्रियेशी संबंधित मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे,” असे सागर अहिवळे यांनी नमूद केले.

भारतीय उद्योगांना पर्यावरणीय उत्पादन घोषणेची ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटलसोबत झालेला हा करार महत्वाचे पाऊल ठरेल. भारतात आमच्या सेवा विस्तारण्यासाठी ‘ग्रीनएक्स’च्या स्वरूपात एक विश्वासू सहकारी आम्हाला मिळाला आहे. या दोन्ही संस्थांची भागीदारी भारतीय उद्योग क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल.

– हॅकॉन हाऊआन, मुख्य कार्यकारी अधिकारी, ईपीडी ग्लोबल नॉर्वे

बासरी, हार्मोनियम, रुद्र वीणा वादनाचा नादमधुर त्रिवेणी‌ संगम

‘त्रिवेणी‌’ मैफलीतून साधला सुमधुर संगीत योग

ऋत्विक फाऊंडेशनतर्फे विशेष सांगीतिक मैफलीचे आयोजन

पुणे : हार्मोनिमय वादनातून साकारलेले नादमधुर सूर, रूद्र वीणेतून निर्मित झालेले धीरगंभीर स्वर आणि नादमाधुर्य दर्शविणारे बासरीचे सुमधुर गुंजन यातून एका अनोख्या संगीत योगाची पर्वणी रसिकांना मिळाली.

ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍आयोजित ‌‘त्रिवेणी‌’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमात हार्मोनियम वादक मिलिंद वासुदेव, भारतातील पहिल्या रुद्र वीणा वादक ज्योती हेगडे यांच्यासह प्रसिद्ध बासरी वादक पंडित राजेंद्र कुलकर्णी यांची सांगीतिक मैफल रंगली. ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌‍ येथे या अनोख्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.

मिलिंद वासुदेव यांनी हार्मोनियम वादनातून मधुवंती रागाचे माधुर्य साकारताना सुरुवातीस धृपद अंगाने आलाप, जोड आलाप आणि जोड झाला सादर करत मध्यलय रूपकमधील एक गत तसेच मध्यलय तीन तालातील एक गत घेऊन अतिद्रुत तीन तालामध्ये झाला सादर केला. या सादरीकरणात पारंपरिक पद्धतीची वाट न चोखाळता मिलिंद वासुदेव यांनी धामा या वाद्याबरोबर जोड आलाप आणि जोड झालाचे सादरीकरण रसिकांना विशेष भावले. त्यांना आशय कुलकर्णी (धामा आणि तबला), स्वरा किरपेकर (तानपुरा), नचिकेत हरिदास (स्वरमंडल) यांनी समर्पक साथसंगत केली.

भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील पहिल्या रुद्र वीणा वादक म्हणून ख्याती प्राप्त विदुषी ज्योती हेगडे यांनी रुद्र वीणा या प्राचीन वाद्याचे वैशिष्ट्य सांगून वादनाची सुरुवात राग यमनने केली. त्यानंतर दुर्गा सादर केला. रुद्र वीणेतून साकारणाऱ्या धृपद शैलीच्या सूरांशी तादात्म्य होताना रसिकांना अद्‌भुत ध्यानावस्थेची अनुभूती आली. ज्योती हेगडे यांनी वीणा वादनाची सांगता चौतालमधील बंदिशीने केली. अनुजा बोरुडे-शिंदे यांनी पखवाजवर दमदार साथ करत मैफलीत रंग भरले.

विख्यात बासरी वादक पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी आपल्या बासरी वादनाची सुरुवात राग बागेश्रीने केली. सुरुवातीस पखवाजच्या साथीने त्यांनी तंत्रकारी अंगाने सुरेल बासरी वादन केले तर तबल्याच्या साथीने वादन करताना पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी गायकी अंगाने बासरी वादन करून दोन्ही शैलींवरील प्रभुत्व दर्शविले. बागेश्री रागाचे सौंदर्य उलगडताना पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी बडे गुलाम अली खान यांचे वैशिष्ट्य दर्शविणाऱ्या जागांचे मोहक दर्शन घडविले. कार्यक्रमाची सांगता करताना पंडित पन्नालाल घोष यांनी आपल्या बासरी वादनातून अजरामर केलेल्या बंदिशीचे स्वर्गीय स्वर पंडित राजेंद्र कुलकर्णी यांच्या बासरीतून प्रभावीपणे उमटले. ऋषिकेश जगताप (तबला), मोहित पुराणकर (बासरी), ऋग्वेद जगताप (पखवाज) यांनी आपल्या प्रभावी साथीतून मैफल उत्तरोत्तर रंगवत नेली.

रसिकांनी या तिनही वादकांना भरभरून दाद देत मैफलीचा स्वराविष्कार अनुभवला.

कलाकारांचे स्वागत ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌च्या संचालिका चेतना कडले यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद देशपांडे यांनी केले.

‘यहा भैय्या का राज चलता है’, म्हणणाऱ्या रिक्षाचालकाने हात जोडून मागितली माफी, म्हणतो ‘माननीय राजसाहेब…’

0

कान पकडून मागितली माफी
ठाणे -ठाण्यामध्ये एका परप्रांतीय रिक्षाचालकाने दारु पिऊन धुडगूस घातला होता. यावेळी त्याने “ये ठाणे का गांधीनगर है, यहा भैय्या का राज चलता है” अशा शब्दांत आव्हान दिलं होतं. इतकंच नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात अयोग्य व अभद्र भाषा वापरली होती. मूळचा उत्तर प्रदेशचा असणाऱ्या रिक्षाचालकाने किरकोळ वादातून वाद घातल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे प्रकरण तापल्यानंतर त्याने आता मराठी माणसाची आणि राज ठाकरेंची कान पकडून माफी मागितली आहे. मनसैनिकांच्या हाती लागण्याआधीच परप्रांतीय रिक्षा चालकाने पोलीस स्टेशन गाठले आणि शरणागती घेतली ठाण्यात पोखरण रोड नं. 2, गांधीनगर येथील अनिल वाइन्स समोर रविवारी रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली होती. किरकोळ वादातून एका ऑटोचालकाने, जो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते त्याने राज ठाकरे आणि ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याबद्दल अयोग्य व अभद्र भाषा वापरली.

⁠”ये ठाणे का गांधीनगर है, यहा भैय्या का राज चलता है”, ⁠”इधर कोई भी मराठी आया तो उसकी…”, अशा शब्दांत त्याने धमकावलं होतं. गाडी लावण्यावरुन झालेल्या वादातून परप्रातींयाने दारु पिवून धुडगूस घातला होता.ठाण्यातील गांधीनगर परिसरातील काही परप्रांतीय तरुणांनी मराठी तरुणाला शिविगाळ करुन हुसकावून लावले. ठाणे गांधीनगर पोखरण रोड नंबर 2 येथील घटना आहे.

रिक्षाचालकाने अखेर मराठी माणसाची आणि राज ठाकरेंची कान पकडून माफी मागितली आहे. रिक्षा चालकांचं नाव शैलेंद्र यादव आणि राकेश यादव आहे. शैलेंद्र यादव याला पोलिसांनी अटक केली आहे तर राकेश यादव हा आरोपी फरार आहे.मनसैनिकांच्या हाती लागण्याआधीच परप्रांतीय रिक्षाचालकाने पोलीस स्टेशन गाठले आणि शरणागती घेतली. मात्र मनसैनिक अजूनही संतापले असून याला मनसे स्टाईल उत्तर देण्यावर ठाम आहेत.”मी विनंती करत आहे आणि सर्वांची माफी मागत आहे. मी काल गांधीनगर येथे शिवसेना कार्यालयासमोर रिक्षा लावत होतो. त्यावेळी तिथे एक व्यक्ती आली असता त्याच्याशी वाद झाला. यावेळी मराठी आणि भैय्या असा वाद झाला. माझ्या तोंडून माननीय राजसाहेब आणि अविनाश जाधव साहेब यांना शिवी दिली. यासाठी मी हात जोडून माफी मागत आहे,” असं तो माफी मागताना म्हणाला आहे.

कौन राज ठाकरे, कौन अविनाश जाधव; ठाण्यात परप्रांतीय तरुणांचा गोंधळ म्हणाले यहां भैय्याओं का राज चलता है

0

ठाणे -मुंबई आणि ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद पुन्हा उफाळलेला आहे. हिंदी सक्तीबाबतचा निर्णय, त्यानंतरचे सामाजिक वाद आणि त्यावरून वाढणारा तणाव यामुळे अनेक ठिकाणी वातावरण तापलेले दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक 2 वरील गांधीनगर भागात घडलेली एक घटना मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. येथे काही परप्रांतीय तरुणांनी एका किरकोळ वादातून मराठी तरुणाशी अर्वाच्य भाषेत बोलत गोंधळ घातल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या तरुणांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि नेते अविनाश जाधव यांच्याबद्दलही अत्यंत विटंबन करणारे शब्द वापरल्याचे समोर आले आहे.

ही संपूर्ण घटना एका वाहन पार्किंगच्या वादातून सुरू झाली. स्थानिक माहितीनुसार, गाडी लावण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये सुरुवातीला सामान्य शब्दांचा वाद झाला. मात्र हा वाद काही क्षणांतच गंभीर वळणाला गेला. घटनेत सहभागी असलेल्या काही परप्रांतीय तरुणांनी दारूच्या नशेत मराठी तरुणाला दमदाटी केली आणि अपमानकारक शिव्या दिल्या. ये ठाणे का गांधीनगर है, यहां भैय्याओं का राज चलता है… अशा शब्दांत त्यांनी आपली दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच कौन राज ठाकरे, कौन अविनाश जाधव… अशा अत्यंत निंदनीय पद्धतीने मनसे नेतृत्वाचा उल्लेख केला असल्याचेही सांगण्यात येत आहे.

घटनेदरम्यान या तरुणांनी मराठी युवकाला अक्षरशः हुसकावून लावल्याचे व्हिडीओमध्ये दिसले. इधर कोई भी मराठी आया तो उसकी… अशा धमकीच्या भाषेत बोलून त्यांनी परिसरातील वातावरण आणखी बिघडवले. काही तरुण दारूच्या नशेत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. ही घटना घडत असतानाच काहींनी व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकला आणि काही तासांतच हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर राज्यभरातील मनसैनिक आणि स्थानिक मराठी समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.

या घटनेनंतर गांधीनगर परिसरात तणावाचे सावट निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली असून आरोपी तरुणांना शोधून काढण्याची मागणी केली जात आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक संघटनांनीही या प्रकाराला विरोध दर्शवला आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, एखादा वाद एवढा वाढवून त्यात जातीय किंवा प्रांतीय रंग देणे हा चिंतेचा विषय आहे. मराठी अथवा परप्रांतीय कोणताही असो, हिंसाचार किंवा धमकावणे हा उपाय नाही, असे नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, राजकीय पातळीवरही या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. मनसे कार्यकर्ते संतप्त असून अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी ते करत आहेत. व्हिडीओमधील सर्व तरुणांची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिस करत असल्याची माहिती मिळत आहे. शहरात शांतता बिघडू नये यासाठी पोलिसांनी गांधीनगर परिसरात गस्त वाढवली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मुंबई आणि ठाण्यातील मराठी-परप्रांतीय तणाव समोर आला असून प्रशासनाला ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिक दक्ष राहावे लागणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन

0

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. ८९ वर्षीय त्यांनी सोमवारी दुपारी त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर विले पार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्यात सलमान खान, संजय दत्त, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला एका युगाच्या अंताचा संकेत म्हटले आहे.

दुपारी त्यांच्या घराबाहेर एक रुग्णवाहिका आली आणि विले पार्ले स्मशानभूमीत सुरक्षा वाढवण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेण्यात आले.

धर्मेंद्र यांच्या घराबाहेर दुपारी १ वाजताच्या सुमारास एक रुग्णवाहिका आली.
घराबाहेर बॅरिकेडिंग आणि सुरक्षा वाढवण्यात आली.
दुपारी १:१० वाजता, आयएएनएसने धर्मेंद्र यांच्या मृत्यूची घोषणा केली.
विलेपार्ले स्मशानभूमीतील सुरक्षा वाढवण्यात आली. अमिताभ बच्चन आणि सलमान खानसह अनेक सेलिब्रिटी स्मशानभूमीत पोहोचले.
धर्मेंद्र यांच्यावर दुपारी ३ वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
धर्मेंद्र काही काळापासून वयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते. १० नोव्हेंबर रोजी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला आणि त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या काळात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूच्या बातम्याही माध्यमांमध्ये आल्या, ज्या त्यांच्या कुटुंबीयांनी नाकारल्या. १२ नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि डॉक्टरांनी त्यांना घरीच उपचार सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.

आमिर खानला आर.के. लक्ष्मण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

24th Nov 2025 – Pune : गहुंजे येथील एमसीए क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित ए.आर. रहमान लाईव्ह कॉन्सर्ट आणि आर.के. लक्ष्मण अवॉर्ड फॉर एक्सलन्सचा समारोप अत्यंत यशस्वीरीत्या झाला. बोमन इराणी यांनी प्रदान केलेला हा पहिला पुरस्कार आमिर खान यांनी स्वीकारला. दोन्ही कलाकारांनी एकमेकांचे मनापासून कौतुक केले आणि दिग्गज व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

संध्याकाळी ए.आर. रहमान यांच्यासह हरिहरन, चिन्मयी, सुखविंदर सिंह, धनुष आणि नीती मोहन यांनी अप्रतिम संगीतमय सादरीकरणे केली, ज्यामुळे प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव मिळाला. संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला आणि उत्साही प्रेक्षकांच्या उपस्थितीत कला, संगीत आणि वारशाचा एक संस्मरणीय उत्सव साजरा करण्यात आला.

‘‘तुला कोणत्या पिस्टलमधून गोळी घालू,’’ सिनेस्टाइल ने धमक्या देत दहशत माजविणाऱ्या श्र्वेतांग निकाळजेला पकडला.२ पिस्तुलं जप्त

पुणे : मित्राचे लग्न असताना मोबाईल टॉवरच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे द्यावे, यासाठी त्याचे घरातून अपहण करुन दोन पिस्तुलं काढून त्याच्या डोक्याला लावून ‘‘तुला कोणत्या पिस्टलमधून गोळी घालू,’’ अशी धमकी देणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगार श्र्वेतांग निकाळजे याला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्यांच्याकडून २ पिस्टल जप्त केले आहेत.

श्र्वेतांग भास्कर निकाळजे (वय ३७, रा. भीमनगर, मंगळवार पेठ) आणि ओम संजय गायकवाड (वय २६, रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़.श्र्वेतांग निकाळजे याची मंगळवार पेठ, तसेच भारती विद्यापीठ भागात दहशत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा पिस्तुल बाळगणे, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे निकाळजे याच्याविरुद्ध फरासखाना, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल आहेत. येरवडा कारागृहात काही वर्षांपूर्वी निकाळजे आणि साथीदारांनी सांगलीतील एका गुंडावर हल्ला केला होता. या घटनेत गुंड गंभीर जखमी झाला होता. शिवाजीनगर न्यायालयासमोर निकाळजे आणि साथीदारांनी एका साक्षीदारावर पिस्तुलातून गोळीबार केला होता.

याबाबत शिवा धनराज मुत्याळ (वय ३१, रा. धाबाडी, आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी यांचा सिंहगड कॉलेज परिसरात स्टॉल असून त्यांनी व निकाळजे यांनी एअरटेल कंपनीचे टॉवरचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. त्याचे पैसे द्यावेत, यासाठी शिवा मुत्याळ याचे लग्न असताना दोन साथीदारांच्या मदतीने श्र्वेतांग निकाळजे याने ८ नोव्हेबर रोजी रात्री पावणे बारा वाजता त्याचे अपहरण केले होते. भोर रोडवर उतरुन त्याच्याकडील दोन पिस्टल काढून ते फिर्यादीच्या डोक्यावर लावून ‘‘तुला कोणत्या पिस्टलमधून गोळी घालू,’’ अशी धमकी दिली होती. इतर दोघा साथीदारांनी ‘तू भाऊचे ऐकत नाहीस तुझ्या डोक्यात कोयता टाकतो,’ अशी धमकी दिली होती. त्यांच्या तावडीतून ते पळून गेल्याच्या रागातून त्या तिघांनी त्यांना शिवाजीनगर येथे गाठून मारहाण करुन पिस्टल लावून धमकाविले होते. याबाबतचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.

या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अभिनय चौधरी यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीवरुन पोलिसांनी श्र्वेतांग निकाळजे आणि ओम गायकवाड यांना अटक केली. त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर निकाळजे याच्याकडून २ पिस्टल व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ६ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी केली आहे.

मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणूक नको-पुण्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मनपा आयुक्तांकडे मागणी

पुणे -महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदारांची प्रभाग निहाय अंतिम ड्राफ्ट यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. या यादीमध्ये असंख्य चुका असून ३ लाखांपेक्षा जास्त मतदारांची दुबार नोंदणी असल्याची कबुली खुद्द महानगरपालिका आयुक्तांनी दिली आहे. अनेक ठिकाणी मतदारांना गैरसोयीचे दूरच्या भागातील मतदारांची नोंदणी अनेक प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका प्रशासन सत्ताधारी भाजपच्या प्रभावाखाली काम करत असल्याची शंका विरोधी पक्षांकडून व्यक्त केली जात आहे.

त्याहून दुर्दैवी बाब म्हणजे या ड्राफ्ट यादीवर हरकती नोंदवण्यासाठी केवळ ८ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. एक प्रकारे सदोष मतदार यादी पुढे रेटून निवडणुका घेण्याचा हा डाव असल्याची भावना सर्वसामान्य पुणेकर व्यक्त करत आहेत.

हीच भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, समाजवादि पार्टी यांच्यासह इतरही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त शिष्ट मंडळाच्या माध्यमातून मनपा अतिरिक्त आयुक्त मंगेश दिवटे यांची भेट घेतली. मतदार यादी मध्ये मोठा घोळ असल्याची बाब स्वतः आयुक्तांनी मान्य केली आहे. या माध्यमातून सदोष पद्धतीने निवडणुका घेऊ नये, आधी मतदार याद्या पूर्णपणे निर्दोष कराव्यात व त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.

या सर्वपक्षीय शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बाप्पुसाहेब पठारे, अरविंद शिंदे, साईनाथ बाबर, संजय मोरे, गजानन थरकुडे, वंचीत चे अरविंद तायडे, बाळासाहेब शिवरकर, बाबु वागसकर, आश्विनीताईं कदम, अंकुशआण्णा काकडे, जयदेवराव गायकवाड, रविंद्र माळवदकर,. अभय छाजेड, मनोहर जांबूवंत, सचिन दोडके आदी
उपस्थित होते.

बीडमध्ये 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार:पीडित आईला गुन्हा दाखल करण्यासाठी जाऊ दिले नाही ; मुलीला 4 दिवस उपचारासाठीही जाऊ दिले नाही

0

बीड-एका 5 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. विशेष म्हणजे बलात्काराची घटना घडल्यानंतर गावातील काही लोकांनी सदर मुलीला तब्बल 4 दिवस उपचारासाठी जाऊ दिले नाही. तसेच तिच्या आईवरही या प्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकला. पण अखेर आपल्या मुलीची वेदना पाहून या महिलेने पोलिस ठाणे गाठून या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

यासंबंधीच्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळे येथील एका 3 वर्षीय चिमुकलीवर नुकताच बलात्कार व हत्या झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे अवघे समाजमन सुन्न झाले असताना आता बीड जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील ताज्या घटनेत एका 5 वर्षीय लैंगिक अत्याचार झाला आहे. नात्यातीलच एका मुलाने हा घात केला आहे. पीडित मुलीवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना गत 11 नोव्हेंबर रोजी घडली. पण ती आज समोर आली.

ही घटना घडल्यानंतर गावातील काही नागरिकांनी पीडित मुलीच्या आईवर गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकला. या प्रकरणी बदनामी टाळण्यासाठी त्यांनी चक्क 4 बैठका घेतल्या. या कालावधीत मुलगी तशीच तडफडत आपल्या घरी होती. ग्रामस्थांनी तब्बल 4 दिवस तिला घरीच रोखून धरले. पण मुलीच्या नातलगांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी थेट पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी संपर्क् साधला. त्यानंतर वेगाने सूत्रे हालत शिरूर कासार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 4 दिवस वेदना असह्य झाल्यानंतर अखेर मुलीच्या आईने उपचारासाठी बीड गाठले. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित मातेला झाला प्रकार सांगताना अश्रू अनावर होत होते.

दुसरीकडे, बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी या प्रकरणी शिरूर कासार पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेची आपबिती सांगताना पीडित मुलीच्या आईला अश्रू अनावर झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे. विशेषतः या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या शिरूर कासार पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे. पीडित मुलीच्या आईवर नातेवाईक व गावकऱ्यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव टाकला होता. पण मुलीची आई मॅनेज झाली नाही. त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला, असे ते म्हणाले.