Home Blog Page 365

पुणे-नगर रस्ता बीआरटी मुक्त; बापूसाहेब पठारे यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे: पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी व अपघातांच्या लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत होते. या परिस्थितीला कारणीभूत ठरलेल्या बीआरटी मार्गिका काढण्याच्या वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मागणीला अखेर यश आले आहे. अनेक स्तरांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर काल (ता. १२) उशिरा रात्री सोमनाथ नगर चौक, खराडी बायपास व आपले घर या भागातील बीआरटी मार्गिका हटवण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा त्रास कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुणे-नगर रस्त्यावर बीआरटी मार्गिकेमुळे वर्षानुवर्षे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार बापूसाहेब पठारे यांनी या निर्णयाचे स्वागत करत म्हणाले, “नागरिक बांधवांनी गेल्या कित्येक वर्षांत अनुभवलेल्या असुविधा, अपघात, खोळंबा तसेच रोजच्या प्रवासातील नाहक त्रासातून मिळालेली मुक्तता आहे. मी अनेकदा बीआरटीबाबतचा मुद्दा विविध ठिकाणी मांडला, सभागृहात प्रश्न उपस्थित केला, प्रशासनासोबत बैठका घेतल्या. अखेर पाठपुराव्याला यश आले आहे. विकासाच्या संकल्पनेत माणूस केंद्रस्थानी असावा, ही माझी भूमिका आहे. वडगावशेरी मतदारसंघात होणारी वाहतूक कोंडी पूर्णतः नाहीशी करण्यासाठी मी कायमच विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे.”

महानगरपालिकेच्या झालेल्या उच्च स्तरीय बैठकीत गेल्या आठवड्यात (ता. ९) बीआरटी काढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. पोलीस विभागाच्या मागणीनुसार बीआरटी मार्गिका काढून तिथे यू टर्न सुविधेची शिफारस करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील कामे हाती घेण्यात येणार आहेत.

पुणे-नगर रस्त्यावरील नागरिक, वाहनचालक व व्यवसायिक यांना या निर्णयामुळे निश्चितच दिलासा मिळणार आहे. सदर कामामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय घट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

प्राचीन ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ उत्सवानिमित्त कसब्यात बगाड

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन ; पारंपरिक पद्धतीने गुलाल व फुलांची मुक्त उधळण

पुणे : श्री काळ भैरवनाथ महाराज की जय.. चा अखंड जयघोष आणि पारंपरिक वाद्य  ढोल-ताशा व बँड च्या निनादात पालखी खांद्यावर घेताच फुले आणि गुलालाची झालेली मुक्त उधळण…  अशा भक्तीमय वातावरणात कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळ भैरवनाथ महाराजांची पालखी आणि बगाड मोठया उत्साहात साजरे झाले. शेकडो वर्षांची परंपरा जपत साजरा झालेला बगाड उत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळ भैरवनाथ महाराजांच्या उत्सवांतर्गत पालखी व बगाड उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ९ वाजता मुख्य बगाड सोहळा मोठया उत्साहात पारंपरिक पद्धतीने पार पडला. त्यानंतर महापूजा व आरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी सकाळी ६.३० वाजता लघुरुद्र व आरती, दुपारी १२ वाजता अष्टोत्तरी नामावली व माध्यान्ह आरती झाली. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.

मंदिराला फुलांची आकर्षक आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूवीर्ची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. त्यामुळे या मंदिराला व येथील उत्सवाला विशेष महत्व आहे.

अधिकार भावना हा आजच्या सभ्यतेचा मोठा प्रश्न -विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार 

गीतेच्या सखोल संशोधनातून साकारलेल्या १६ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा : रामसुख अप्लाईड श्रीमद् भगवद्गीता रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजन
पुणे : आजच्या सभ्यतेचा मोठा प्रश्न म्हणजे ‘अधिकाराची भावना’. आपण एक ‘अधिकार प्रदान करणारा देश’ झालो आहोत. ‘हमारी मांगे पुरी करो, चाहे जो मजबुरी हो’, हे लोकांचे ब्रीद झाले आहे. पण हे भारताचे खरे स्वरूप नाही. पूर्वीचा भारत कर्तव्य भाव असणारा देश होता. स्वतःचे कर्तव्य हीच प्राथमिकता मानणारा समाज होता. हीच ‘कर्तव्यभावना’ भगवद्गीता आपल्याला शिकवते, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी व्यक्त केले.

श्रीमद् भगवद्गीतेच्या व्यावहारिक आणि आध्यात्मिक पैलूंवर आधारित सखोल संशोधनातून निर्माण झालेल्या १६ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रामसुख अप्लाईड श्रीमद् भगवद्गीता रिसर्च फाउंडेशन या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला होता. स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे कार्यक्रम संपन्न झाला. प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून आलोक कुमार उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संस्थेचे संस्थापक प्रल्हाद राठी तसेच सहप्रार्थी म्हणून प्रा. डॉ. मुकुंद दातार, संजय मुद्राळे, महेश पोहनेरकर, अजिंक्य कुलकर्णी, संजय भोसले, डॉ. सुनंदा राठी, डॉ. प्रज्ञा कुलकर्णी उपस्थित होते.

आलोक कुमार म्हणाले, गीता केवळ एक ग्रंथ नसून त्यात जगण्याची कला शिकवणारी मार्गदर्शक तत्वे आहेत. तिच्या प्रत्येक श्लोकातून आपल्याला आयुष्य कसे जगावे हे शिकायला मिळते. जीवनाच्या प्रत्येक भागात ती आपल्याला जागृत करते, ज्याने मनुष्य देवत्वाला प्राप्त होते. भगवंत हे आपल्या जीवनाचे सारथी आहेत.

या १६ पुस्तकांमध्ये अन्न सेवा, त्रिगुण, विवेक, बहि:करण, अंत:करण आणि स्व, आसक्ती, चिंता, सवय, स्वभाव, नातेसंबंध आणि पालकत्व, अध्ययनपद्धती, मार्गदर्शक तत्त्वे आणि कर्तव्य, कामना, प्रबोधन, सामाजिक सुधारणा, नेतृत्व, मानसशास्त्र यांसारख्या विविध विषयांचा समावेश आहे. याशिवाय प्रल्हाद राठी यांच्या वैविध्यपूर्ण लेखांचे संकलन असलेले ब्राह्ममुहूर्त हे पुस्तकही यावेळी प्रकाशित झाले. आनंद मानधनी यांनी सूत्रसंचालन केले. प्रल्हाद राठी यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.

२७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचा समारोप

मान्यवरांना ‘विश्वबंधुता दर्पण पुरस्कार’ व ‘विश्वबंधुता शब्दक्रांती पुरस्कार’ प्रदान

पुणे: “समाजात चांगल्या माणसांची संख्या कमी होत चालली आहे, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने समाजमन दूषित होतेय, याचा आपण अनेकदा खेद व्यक्त करतो. पण अशा आव्हानात्मक व निराशेच्या परिस्थितीत बंधुत्वाची भावना समाजात चांगुलपणा वृद्धिंगत करते. माणूस जोडण्याचे काम बंधुता चळवळीतून होत आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी केले.

विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २७ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी कृष्णकुमार गोयल बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात झालेल्या संमेलनात विश्वबंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे, कार्याध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे, कादंबरीकार शंकर आथरे, वरिष्ठ पत्रकार सचिन कापसे आदी उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा. डॉ. शिवलिंग मेनकुदळे, विश्वबंधुता मूल्यसंवर्धन समितीच्या सदस्या डॉ. तेजश्री पारंगे यांना ‘विश्वबंधुता दर्पण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सौ. सविता मेनकुदळे यांनी पुरस्कार स्वीकारला. अनिल गव्हाणे (बीड), गोरख पालवे (नाशिक), पुष्पा दलाल (अमरावती), अनुराधा वायकोस (परभणी), संध्या भोळे (भुसावळ), कांचन गवळी (टिटवाळा), दीपाली भोसले (पुणे), सागर काकडे (सातारा), अमीर पटेल (सांगोला), स्वाती ठुबे (अहिल्यानगर), गौसपाक मुलानी (सांगोला) व विठ्ठल संधान (नाशिक) यांना ‘विश्वबंधुता शब्दक्रांती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

तत्पूर्वी, ‘सुवर्णमहोत्सवी विश्वबंधुता चळवळीची प्रशंसनीय यशोगाथा’ या विषयावर शिवव्याख्याते प्रा. प्रदीप कदम यांचे व्याख्यान झाले. तसेच दुपारच्या सत्रात कवयित्री सीमा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ‘जल्लोष अभिजात मराठीचा’ हे काव्यसंमेलन झाले. त्यामध्ये डॉ. अशोककुमार पगारिया, मधुश्री ओव्हाळ, विनोद सावंत, प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्यासह निमंत्रित कवींनी सहभाग घेत काव्यरचना सादर केल्या. चंदन तरवडे (कोपरगाव) यांना बंधुतापर्व साहित्य पुरस्कार, शिल्पा कुलकर्णी (पुणे) यांना प्रकाशयात्री साहित्य पुरस्कार, तर सीमा झुंजारराव (मुंबई) यांना प्रकाशगाथा साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अध्यक्षीय समारोपात प्रा. सुभाष वारे म्हणाले, “मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात मन आणि शरीराच्या अफाट क्षमता नीटपणे वापरल्या गेल्या नाहीत. सहकार्य आणि सकारात्मकतेचा भावनेतून त्याचा समाजहित, देशहितासाठी चांगला उपयोग व्हायला हवा. त्यासाठी जात, धर्म, वर्ण, आर्थिक भेद, द्वेषभावना बाजूला ठेवून बंधुतेच्या विचारांची गुंफण करायला हवी. महापुरुषांनी दिलेल्या विचारांची बेरीज आणि संविधानाची सांगड घालून येणाऱ्या आव्हानांचा सामना एकोप्याने करण्याची गरज आहे.”

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “बंधुतेचा विचार घेऊन चालणारे सर्वजण तथागत भगवान बुद्धांचा वारसा पुढे नेत आहेत. संतांनी दिलेली शिकवण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि मानवतेचा, बंधुतेचा विचार देशाला एकसंध ठेवण्यासाठी पूरक आहे. ही चळवळ अधिक व्यापक व्हावी, यासाठी युवापिढीने यात सहभागी व्हावे. समाजातील द्वेष, मत्सर दूर करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे.”

पुरस्कार स्वीकारल्यानंतर सविता मेनकुदळे, डॉ. तेजश्री पारंगे यांनीही सत्काराला उत्तर देत बंधुतेची ही पताका घेऊन पुढील काळात काम करत राहू, असा विश्वास व्यक्त केला. प्रा. शंकर आथरे, संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विजय ताम्हाणे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. डॉ. अरुण आंधळे यांनी आभार मानले. मंदाकिनी रोकडे, प्रा. प्रशांत रोकडे, डॉ. बंडोपंत कांबळे, डॉ. प्रभंजन चव्हाण, प्रा. भारती जाधव, प्रा. डॉ. सविता पाटील, प्रा. सायली गोसावी यांनी संमेलनाचे संयोजन केले.

श्री देवदेवेश्वर संस्थानच्यावतीने मोफत मल्लखांब प्रशिक्षण वर्ग

श्री देवदेवेश्वर संस्थान ,सारसबाग पर्वती व कोथरुड तर्फे आयोजन; पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे: महाराष्ट्रात दोनशे वर्षांपूर्वी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात ‘मल्लखांब’ या पारंपरिक क्रीडा प्रकाराचा उगम झाला. मराठी माणसाने देशभरात मल्लखांबाला लोकमान्यता मिळवून दिली. हाच पारंपरिक खेळ जोपासण्यासाठी श्री देवदेवेश्वर संस्थान , सारसबाग,पर्वती व कोथरुडच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून पर्वती पायथ्याशी असलेल्या रमणा गणपती मंदिराच्या आवारात आणि श्री वेताळ बाबा मंदिराच्या प्रांगणामध्ये मल्लखांब प्रशिक्षण वर्गाची सुरुवात करण्यात आली आहे.

संस्थानचे विश्वस्त पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, विश्वस्त जगन्नाथ लडकत, महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचे तांत्रिक समिती सचिव मोहन झुंजे पाटील, पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे उपाध्यक्ष विकास फाटक, सचिव सचिन परदेशी, प्रशिक्षक जितेंद्र खरे, श्री वेताळ बाबा मंदिराचे अध्यक्ष किशोर ठाकूर , आनंद भाटी , अमोल हुंबरे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. हा प्रशिक्षण वर्ग मोफत असून दररोज सकाळी व सायंकाळी घेतला जाणार आहे.

रमेश भागवत म्हणाले, मल्लखांब हा कमीत कमी वेळेत शरीरातील जास्तीत जास्त भागांना व्यायाम देणारा खेळ असून मल्लखांबामुळे एकाग्रता, मनाचा कणखरपणा, निर्णयक्षमता, स्मरणशक्ती, आकलन क्षमता वाढण्यास मदत होते. तळागाळात मल्लखांब पोहोचणे तसेच इतर मराठी खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने संस्थानच्यावतीने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणेकरांना वाहन चालवण्याच्या (अनुज्ञप्ती) चाचणीसाठी मारावे लागणारे हेलपाटे थांबवा -दीपक मानकर यांची मागणी

पुणे -शहराची लोकसंख्या पाहता पुण्यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी सुसज्ज अशी जागा उपलब्ध करून वाहन चालवण्याच्या (अनुज्ञप्ती) चाचणीसाठी पुणेकरांना होणारा नाहक त्रास दूर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
दीपक मानकर यांनी निवेदनात म्हंटले आहे की, पुणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) वाहन चालवण्याच्या (अनुज्ञप्ती) चाचणी ही यापूर्वी विश्रांतवाडी रोड येथील कार्यलयात होत असे. मात्र आता चाचणी केंद्र बदलले असून पुणे शहरातील नागरिकांसाठी वाहन चालवण्याच्या (अनुज्ञप्ती) चाचणीचे असलेले केंद्र आता कासारवाडी आयडीटीआरला जोडले गेले आहे. मात्र यामुळे प्रामुख्याने अर्जदारांचा संपूर्ण दिवस वाया जात आहे. पुणे शहराच्या एका टोकापासून कासारवाडी असे कमीत-कमी ३० किलोमीटर पेक्षा जास्त अंतराचा प्रवास अर्जदाराला करावा लागत आहे. या दरम्यान तो त्रास वाचावा यासाठी पुन्हा पूर्वीच्याच ठिकाणी चाचणी घ्यावी, अशी मागणी पुणे शहरातील वाहन चालक परवाना अर्जदार करीत असून होणारे हेलपाटे कमी व्हावे, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पुणे शहरातील नागरिकांसाठी चाचणी केंद्र ठिकाण बदल्या गेल्या असल्याबाबत अद्यापही अनेक अर्जदारांपर्यंत ही माहिती पोहचलेली नाही. पुढे ते म्हणाले, पुणे शहराच्या एका टोकापासून वाहन चाचणी घेण्यासाठी अर्जदार नेहमीप्रमाणे विश्रांतवाडी येथील आरटीओ कार्यालयात जातो मात्र हे चाचणी केंद्र हलवण्यात आल्याचे तेथे गेल्यावर अर्जदारास कळते. मग त्याला तेथून पुन्हा कासारवाडी येथील आयडीटीआर कार्यालयामध्ये जाण्यास सांगितले जाते. त्यामुळे अर्जदाराचा वेळ आणि पैशाचा देखील अपव्यय होत असल्याचे निदर्शनास येत आहे. विश्रांतवाडी येथे अर्जदार आला की त्याला पुन्हा तेथून कासारवाडी या ठिकाणी जाण्याची वेळ येते. तर कागदपत्रांची पूर्तता व प्रक्रियेसाठी पुन्हा विश्रांतवाडी येथील आरटीओ कार्यालयात जावे लागते. कागदपत्रांची पूर्तता झाल्यांनतर विश्रांतवाडी येथून पुन्हा आयडीटीआर, कासारवाडी मध्ये पोहोचावे लागते. अशाप्रकारे अर्जदारांना एकाच दिवशी हेलपाटे मारावे लागतात. परिणामी, त्यांचा संपूर्ण दिवस या कामासाठी लागत आहे. त्यामुळे पुणे शहराची लोकसंख्या पाहता पुण्यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी सुसज्ज अशी जागा उपलब्ध झाल्यास वाहन चालवण्याच्या (अनुज्ञप्ती) चाचणी होण्यासाठी पुणेकरांना होणारा नाहक त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते, अशी पत्राद्वारे विनंती केलेली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मध्यवर्ती समितीकडून सर्वपक्षीय संयुक्त अभिवादन समारंभ

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 134 व्या जयंती निमित्त पुणे ससून हॉस्पिटल समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय व सर्व समावेश संयुक्त अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.

यंदाच्या वर्षी प्रथमच भीमजयंती मध्यवर्ती समितीच्या वतीने आयोजित संयुक्त अभिवादन कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार , केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ , राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील , मनपा आयुक्त , पोलीस आयुक्त , जिल्हाधिकारी यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी यांच्यासह पुणे शहरांमधील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व पक्षांचे शहराध्यक्ष व मान्यवर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

यावेळी आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्ष संघटनांचे नेते व आजी-माजी लोकप्रतिनिधी हे देखील अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच एका स्टेजवर उपस्थित राहून अभिवादनासाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करणार आहेत.

सदर कार्यक्रमाचे आयोजन मध्यवर्ती समितीचे राहुल डंबाळे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , रिपाई नेते परशुराम वाडेकर व रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे यांचेकडून करण्यात आले आहे.

​​​​​​​मोरेश्वरासह 5 गणपती मंदिरांत ड्रेसकोड:दर्शनाला जाताना पुरुषांनी सभ्य अन् महिलांनी पारंपरिक वस्त्रे घालण्याची ताकीद

पुणे-अष्टविनायकांपैकी मोरेगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी व सिद्धटेकच्या सिद्धिविनायकासह इतर 2 गणपती मंदिरांसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टने वस्त्रसंहिता जारी केली आहे. या संहितेनुसार, या गणपतींच्या दर्शनासाठी येणाऱ्या पुरुष भाविकांना सभ्य पोशाख परिधान करावा लागणार आहे. तर महिलांनाही पारंपरिक पोशाख किंवा मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असणारे आदरयुक्त वस्त्र परिधान करावे लागणार आहेत.

चिंचवड देवस्थान ट्रस्टकडे मोरेगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी व सिद्धटेकच्या सिद्धिविनायक या अष्टविनायकांपैकी 3 मंदिरांसह चिंचवडचा मोरया गोसावी संजीवन मंदिर व खार नारंगी मंदिराचे नियंत्रण आहे. त्यानुसार, या ट्रस्टने या पाचही गणपती मंदिरांसाठी वस्त्रसंहिता लागू करत भाविकांसाठी पोशाख नियमावली जारी केली आहे. ट्रस्टने ही नियमावली म्हणजे सक्ती नसून, आम्ही भाविकांना मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी तोकडे कपडे परिधान करून दर्शनाला न येण्याची विनंती आहे, असे स्पष्ट केले आहे.

ट्रस्टने आपल्या पत्रात म्हटले आहे की, संपूर्ण श्रद्धा व भक्तीभावाने महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे व श्री मंगलमूर्ती वाडा येथे दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने विनम्र विनंती करण्यात येत आहे. महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे व श्री मंगलमूर्ती वाडा या केवळ वास्तू नसून, ते संस्कृती आणि भक्तीचा केंद्रबिंदू आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताने मंदिराच्या पवित्रतेचा आदर राखावा. भक्तीपर वातावरण टिकवण्यासाठी सहकार्य करावे. आपली उपस्थिती आणि वर्तन मंदिराच्या शुद्धतेला अनुसरून असावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. मंदिराच्या पवित्रतेचा सन्मान राखण्यासाठी, चिंचवड देवस्थान ट्रस्ट तर्फे वस्त्रसंहिता लागू करण्यात येत आहे. श्रींच्या मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी मंदिरात प्रवेशासाठी खालीलप्रमाणे योग्य पोशाख परिधान करावा.

पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा. शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पँट किंवा धोतर, कुर्ता पायजमा असा मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा.
महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा. मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे.
कुणीही अतिआधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके, शरीरप्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये.

उल्लेखनीय बाब म्हणजे, अष्टविनायक यात्रा महाराष्ट्रातील गणपती दर्शनासाठी प्रसिद्ध असलेली यात्रा आहे. पुण्यापासून सुमारे 850 किलोमीटर प्रवास करत रायगड आणि पुणे जिल्ह्यातील श्री गणेश मंदिरांचे दर्शन भाविकांना करायला मिळते. या यात्रेसाठी जवळपास 2 दिवस आणि 1 रात्र एवढा कालावधी लागतो. या यात्रेत परंपरेनुसार मोरेगावच्या मोरेश्वराचे सर्वप्रथम दर्शन घेतले जाते. त्यानंतर पुढील 4 मंदिरे पुण्यापासून खूप दूर आहेत. मोरेश्वर मोरेगाव, सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री, ओझर आणि पुण्यातील रांजणगावचा आहे.

दीनानाथ रुग्णालयाने समाजसेवक प्रकाश आमटेंकडूनही 5 लाख घेतले

मुंबई-काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबीयांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने प्रकाश आमटेंकडून 5 लाख रुपयांचे बिल घेतले होते. एवढेच नाही तर हे रुग्णालय धर्मादाय पद्धतीचे असूनही त्यातील 7 वा मजला हा पूर्णतः मंगेशकर कुटुंबीयांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. धर्मादाय रुग्णालय असूनही येथे तपासणीसाठी 20 रुपयांऐवजी 600 रुपये घेतले जातात, असे ते म्हणालेत.

विजय वडेट्टीवार शनिवारी पत्रकारांशी बोलताना मंगेशकर कुटुंबीयांचे वेगवेगळे किस्से सांगितले. ते म्हणाले, दीनानाथ रुग्णालयाचा 7 वा माळा मंगेशकर कुटुंबीयांसाठी राखीव आहे. तिथे ते व त्यांच्या आप्तेष्टांचे उपचार होतात. हे चॅरिटी हॉस्पिटल आहे. पेशंट तपासणीसाठी आला की त्याला 20 रुपये घ्यावे लागतात. पण इथे 600 रुपये घेतले जातात. ही लूट नाही का? जर हे दीनानाथ हॉस्पिटल सत्ताधारी आमदारांच्या पीएकडून 10 लाख रुपये घेतल्याशिवाय उपचार करू शकत नाही, तर गरिबांची सेवा करणारे रुग्णालय आहे का? हे चॅरिटी हॉस्पिटल आहे का? याचाही विचार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी करावा. उगीच भावनेच्या भरात काहीतरी वाचवण्याचा व सपोर्ट करण्याचा प्रयत्न करू नये अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. मी कुणावरही टीका करत नाही. मी केवळ वस्तुस्थिती मांडत आहे.

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, प्रकाश आमटे यांना कॅन्सर डिटेक्ट झाला त्यावेळी एका मध्यस्थीने दीनानाथ रुग्णालयाच्या प्रशासनाला उपचारासंबंधी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आमटे यांना अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. त्यांनी आम्ही प्रकाश आमटेंकडून एकही रुपया घेणार नाही, त्यांच्यावर मोफत उपचार करू अशी ग्वाहीही दिली. पण नंतर बाहेरून औषधी मागवण्याचे कारण सांगत आमटे यांच्या आप्तेष्टांकडून 5 लाख रुपये वसूल केले.

ते पुढे म्हणाले, परभणीला एक साहित्य संमेलन होते. नारायण सुर्वे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. या कार्यक्रमात आशाताई भोसले यांच्या गायनाचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता. तेथील तत्कालीन खासदारांचे नाव मला आठवत नाही. पण ते आशादीदींकडे गेले. त्यांनी त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. पण त्यांनी त्यांच्याकडे 2 लाख रुपये देण्याची मागणी केली. नंतर कार्यक्रम जवळ आल्यानंतर त्यांनी पुन्हा 3 लाख रुपयांची मागणी केली. आयोजकांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण त्या बधल्या नाहीत. पैसे मिळाल्याशिवाय मी येणार नाही असे त्या म्हणाल्या.

चेक नको, रोख द्या, आणि पावती मिळणार नाही या हट्टाने कार्यक्रम रद्द

वडेट्टीवार यांनी यावेळी आणखी एका कार्यक्रमाचाही किस्सा सांगितला. ते म्हणाले, नागपूर कॉर्पोरेशनचा एक कार्यक्रम होता. त्यावेळी लतादीदींनी विदर्भ साहित्य संमेलनाच्या मंचावर मोफत गाण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे आयोजकांनी कार्यक्रमाची तारीख ठरवून त्यांच्याशी संपर्क साधला. तिकडून निरोप आला की, आमची सोय पंचतारांकित हॉटेलमध्ये करा. आमच्या वाद्य संचाला तुम्हाला पैसे द्यावे लागतील. एवढेच नाही तर आमच्यासाठी विशेष विमानाचीही सोय करावी लागेल. त्यावर आयोजकांनी यासाठी किती खर्च येईल अशी विचारणा केली. त्यावर त्यांना 22 लाख लागतील असे सांगण्यात आले.त्यानंतरही आयोजकांनी लतादीदींच्या कार्यक्रमासाठी एवढा मोठा खर्च करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर त्यांनी या रकमेचा चेक देण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी हृदयनाथ मंगेशकर यांनी हे पैसे चेकने नव्हे तर कॅशमध्ये मागितले. त्यावर आयोजकांनी आमची नोंदणीकृत संस्था आहे. त्याचे ऑडिट होते. त्यामुळे आम्ही तुम्हाला रोख रक्कम देऊ शकत नाही असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर त्यांनी पैसे देण्याची तयारी दर्शवली, पण त्याची रिसिप्ट मागितली. मंगेशकर ही रिसिप्ट देण्यासही तयार झाले नाही. त्यानंतर लतादीदींशी संपर्क साधण्यात आला. पण लतादीदींनी हृदयनाथ जे सांगेल तेच होईल असे सांगत आयोजकांना परत पाठवले. यामुळे हा कार्यक्रमच रद्द करावा लागला ही वस्तुस्थिती आहे. अर्थात पैशांशिवाय आम्ही गाणार नाही हा त्यांचा उद्देश होता.

पंडित नेहरूंपुढेही मोफत कार्यक्रम झाला नाही

विजय वडेट्टीवार यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापुढे मंगेशकरांचा झालेला गायनाचा कार्यक्रमही मोफत नव्हता असा दावा केला. ते म्हणाले, जवाहरलाल नेहरू यांच्यापुढे गायनाचा कार्यक्रम ठरला होता, त्यावेळी लतादीदींना नव्हे तर आशादीदींना असाईमेंट देण्यात आले होते. आशादीदींकडून ते लतादीदींनी घेतले. त्या गायल्या. पण तो कार्यक्रमही मोफत नव्हता. मी पुन्हा जबाबदारीने सांगतो की, त्या मोफत गायल्या नव्हत्या.

ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याचा उत्तरार्ध सुखाने जावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत – संदीप खर्डेकर

क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुपच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघांना उपयोगी वस्तू देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ

पुणे- मी अमेरिका दौऱ्यावर गेलो असताना मी बघितलं की तेथील समस्यांमध्ये “एकाकी ज्येष्ठ आणि वैफल्यग्रस्त तरुण” ही समस्या फार मोठी आहे. तेव्हाच ठरविले की आपल्या कडे ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा वृद्धापकाळ आनंदाने, सुखाने व्यतीत करता येईल यासाठी प्रयत्न करायचे असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याचा उत्तरार्ध सुखाने जावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत आणि समाजाने त्यांना सन्मानाची वागणूक द्यायला हवी असेही श्री. खर्डेकर म्हणाले.आयुष्यभर कष्ट करून जे आपल्याला सुखात ठेवण्यासाठी धडपडत असतात त्यांना आनंदाने आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत करता यावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, वृद्धापकाळ हे दुसरे बालपण असते म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा समजून घेऊन त्यांना मदत करावी असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
याच भूमिकेला अनुसरून आज हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमेनिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप तर्फे ज्येष्ठ नागरिक संघांना उपयुक्त वस्तू भेट देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.
यावेळी मा. नगरसेविका व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर,डहाणूकर कॉलनी हैप्पी कॉलोनी ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यवाह डॉ.शिरीष अमृतकर,सह कार्यवाह,राजेश टेंबे,खजिनदार शांताराम वाणी, सहकार्यवाह दत्तात्रय घाटे, उपाध्यक्ष सीमा माळवकर, सह खजिनदार चंद्रकांत टिकेकर,शैलाताई सातपुते,हरिभाऊ नेरकर इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाला वॉटर कुलर डिस्पेन्सर भेट देण्यात आले.
आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात आणि सर्व सभासद एकोप्याने संघात पडेल ते काम करतात असे संघाचे कार्यवाह डॉ. शिरीष अमृतकर म्हणाले. आमच्या संघाला इंटरनॅशनल लॉन्जेव्हिटी सेंटर तर्फे कै.बी. जी. देशमुख सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ 2024 हा पुरस्कार देण्यात आला असेही डॉ. अमृतकर म्हणाले. डॉ. रघुनाथ माशेलकर व श्री. जयंत उमराणिकर यांच्या हस्ते मिळालेल्या पुरस्काराने आमचा उत्साह दुणावला असून आम्ही अधिक जोमाने कार्यरत राहू असेही संघाच्या सदस्यांनी एकमुखाने जाहीर केले.आमच्या यशात संघाचे माजी अध्यक्ष व कार्यवाह यांचा मोठा सहभाग असल्याने नुकतेच त्यांचेही सत्कार करण्यात आल्याचे डॉ. अमृतकर म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन उत्तम सामाजिक काम करत असून आम्ही त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो असे सांगून संघातर्फे संदीप खर्डेकर व मंजुश्री खर्डेकर यांना सन्मानित करण्यात आले. यापुढे क्रिएटिव्ह फाउंडेशन, ग्लोबल ग्रूप, मुकुलमाधव फाउंडेशन, नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट, वेस्टर्न इंडिया फोर्जिंग च्या वतीने अधिकाधिक सेवाकार्य करणार असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी जाहीर केले.

लोकशाही टिकवायची असेल तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक हवी, ईव्हीएमवर निवडणूक आयोग व सरकारने भूमिका स्पष्ट करावी.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येस फडणवीस सरकारच जबाबदार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: हर्षवर्धन सपकाळ.

राज्यात दुष्काळाची स्थिती, गावात रोजगार नसल्याने लोकांचे पलायन, पाण्याचे दुर्भिक्ष, जलजीवन योजनाच भंकस.

MPSC चा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी पुन्हा खेळ, नोटीफिकेशन काढून ४५ दिवसानंतर परीक्षा घ्या.

मुंबई, दि. १२ एप्रिल २०२५
राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने निवडणुकीत जनतेला मोठी मोठी आश्वासने देऊन सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर जनतेचा विश्वासघात केला. लाडक्या बहिणी, एसटी कामगार व शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. शेतमालाला भाव नाही, पीक विमाची भरपाई नाही, शेतकरी कर्जमाफी नाही, अशा अस्मानी सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी जीवन संपवत आहे, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी येथील हरिदास विश्वंभर बोंबले यांनी केलेली आत्महत्या ही सरकारने घेतलेला बळी असून शेतकरी आत्महत्येप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा युती सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, नांदेड जिल्ह्यातील हरिदास बोंबलेची आत्महत्या ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना आहे. या शेतक-याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केली. अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने दिलेली नाही, कोणतीही सरकारी मदत नाही आणि कर्जमाफीचे आश्वासनही पाळले नाही, यामुळे जगणे असह्य झालेले शेतकरी गळफास लावून आपले जीवन संपवू लागले आहेत. हे आंधळे, बहिरे व मुके सरकार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत फिरण्यापेक्षा मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे व शेतकऱ्यांना मदत करावी. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे, रोजगार नसल्याने गावातून लोक शहराकडे पलायन करत आहेत, पिण्यासाठीही पाणी नाही. जलजीवन योजनेला भ्रष्टाचाराने पोखरले असून ही योजनाच भंकस आहे पण सरकारचे त्याकडे लक्ष नाही असेही सपकाळ म्हणाले.

खा. उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?
भाजपा खासदार उदयनराजे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना १० वर्षांच्या शिक्षेचा कायदा करा, अशी केवळ मागणी करून काय उपयोग. ते ज्या पक्षाचे खासदार आहेत, तो भाजपा गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकाला संविधानापेक्षा जास्त महत्व देतो. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण केलेले आहे, त्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी खासदार उदयनराजे यांनी केली असती तर बरे झाले असते. उदयनराजे यांच्या पक्षाचे सरकारच ‘महाराजांचा अपमान करा व संरक्षण मिळवा’ योजना राबवत आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

‘एमपीएससी’चा पुन्हा गोंधळात गोंधळ…
एमपीएससी ही लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सातत्याने खेळ करत आहे. २०२३ साली परिक्षेची जाहिरात आली त्यानंतर २०२४ मध्ये पूर्व परिक्षा झाली आणि त्याचा निकाल आला. आर्थिक मागास प्रवर्ग नसल्याने मुख्य परिक्षा देण्यासाठी एक अर्ज भरावा लागत आहे पण एमपीएसचे पोर्टलच सारखे बंद असते, हे पोर्टल बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी, पारदर्शक प्रक्रिया राबवा अथवा ऑफलाईन एक खिडकी योजना राबवून फॉर्म भरुन घ्या, त्यानंतर नोटीफिकेशन काढून ४५ दिवसांनंतर परिक्षा घ्या. पण एमपीएससीला परीक्षेची खूपच घाई झालेली दिसत आहे. एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु केलेला खेळ थांबवावा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

लोकशाही टिकवायची असेल तर ईव्हीएमवर चर्चा व्हायला हवी.
ईव्हीएम सहजपणे हॅक करून निवडणूक निकालांमध्ये फेरफार करता येतो असे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गॅबार्ड यांनी म्हटले आहे
यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, जगातील अनेक प्रगत देशातही ईव्हीएमवर निवडणुका होत नाहीत. ईव्हीएम संदर्भात खूप आक्षेप आहेत, त्याची निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे आणि उत्तर दिले पाहिजे पण भारतीय निवडणूक आयोग त्यावर गप्प आहे उत्तर देत नाही. ईव्हीएम व मतदारयाद्या घोटाळ्याप्रश्नी काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाला वारंवार भेटत आहे. Vvpat ची मतमोजणी करावी ही मागणीही आम्ही केली होती. पण निवडणूक काहीच बोलत पण मुख्यमंत्री फडणवीस त्यावर उत्तर देत आहेत. लोकशाही टिकवायची असेल तर निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असली पाहिजे. आता अमेरिकेनेही ईव्हीएमवर मोठा सवाल उपस्थित केला असल्याने चर्चा झाली पाहिजे. पंतप्रधान, भाजपा व एनडीए सरकारने यावर बोलले पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हनुमान जन्मोत्सवानिमित्त एमआयटी डब्ल्यूपीयूत कुस्तीचे आयोजनः खुल्या गटात तेजस मारणे विजयी

पुणे, दि.१२ एप्रिल : “बलवान आणि बुद्धिमान असा उल्लेख असलेल्या मल्ल विद्येला संजीवनी देण्यासाठी ऑगस्ट मध्ये एमआयटी डब्ल्यूपीयूत कुस्ती परिषदेचे आयोजन करण्याचे नियोजन आखले आहे.” असे मत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
हनुमान जन्म उत्सव निमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या आखाड्यात विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी तर्फे पुण्यातील पैलवानांसाठी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हेाते. त्यावेळी ते बोलत होते.
या स्पर्धेत जवळपास १०० पैलवानांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. उद्घाटनाची ८६ किलो वजनी गटात एमआयटी आखाड्यातील अनुदान चव्हाण आणि सूरज सावंत यांच्यात सलामीची लढत झाली. ज्यात अनुदान चव्हाण हा विजयी झाला.
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी एमआयटी डब्ल्यूपीयूच्या प्रांगणात असलेल्या हनुमान मंदिरात महापूजा केली. या नंतर कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस.एन.पठाण, सरकार निंबाळकर, डॉ. टी.एन.मोरे, विश्वजीत नागरगोजे, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक व पंच प्रा. विलास कथुरे, वैभव वाघ, प्रा. अभय कचरे, रोहित बागवडे, राहुल बिराजदार, पै. निखिल वणवे व बाळू सणस उपस्थित होते.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, कुस्तीमुळे ताकद आणि रणनीती विकसित होते. विद्यार्थ्यांनी व्यायामाबरोबरच अभ्यास करावा. बुध्दी आणि शक्तीच्या जोरावर कुस्ती क्रीडा प्रकारात यश मिळविता येते.
डॉ. पठाण म्हणाले, भारतीय संस्कृतीत मल्ल विद्या आहे. त्याचे जतन ग्रामीण व शहरी भागात थोड्या फार प्रमाणात होताना दिसत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणत असे की, ज्या गावात हनुमानचे मंदिर व तालिम नाही त्या गावात मी कधीही जाणार नाही. मल्ल विद्येबरोबर ज्या व्यक्तिचे आचार विचार चांगले आहेत तोच खरा व्यक्ती आहे.

वजन गट       विजेता                          उपविजेता
खुला गट       तेजस मारणे                     रमेश शिंदे
८६ किलो      अनुदान चव्हाण                सूरज सावंत
७४ किलो      शुभम दुधाणे                    सिद्धार्थ पाचंगे
७० किलो      प्रसाद टाकळकर              संकेत कांबळे
६५ किलो      स्वराज घोडके                  सिद्धार्थ भोईटे
६१ किलो      शिवम महाले                    स्वराज तापकीर
५७ किलो     महेश खमसे                     सोहम मते
५१ किलो     विशाल पवार                     आदित्य चव्हाण
४५ किलो     सर्वेश उमरदंड                  संग्राम नलावडे
४० किलो     साईराज नलावडे                तनुज मरळ
३८ किलो    अर्णव मते                          संग्राम सपकाळ

सामन्यातील सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे बाल कुस्तीपटूंचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
प्रा. विलास कथुरे यांनी प्रस्तावनेत एमआयटी तर्फे चालविल्या जाणार्‍या सर्व कुस्ती स्पर्धेची माहिती दिली. तसेच येथे देशातील सर्व नामांकित पैलवानांनी भेट दिल्याचा उल्लेख केला.
 सूत्र संचालन प्रा.विलास कथुरे यांनी केले. पै. निखिल वणवे यांनी आभार मानले.

शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते सीमित नका ठेऊ – अमित शहा

“स्वत:ला आलमगीर म्हणवणाऱ्या औरंगजेबाची समाधी महाराष्ट्रात …”स्वत:ला आलमगीर म्हणवणारा इथेच महाराष्ट्रात पराभूत झाला आणि इथेच त्याची कबर खोदली. मी महाराष्ट्राच्या जनतेला हात जोडून विनंती करायला आलोय. शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका”, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

रायगड : ‘भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडावर भाषणाला सुरुवात केली. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ, सन्मानचिन्ह आणि पुस्तकं देऊन अमित शाहांचा सन्मान करण्यात आला.
छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथीच्या या कार्यक्रमाला बोलवण्यात आलं हे मी माझं भाग्य समजतो. मी राजमाता जिजाऊंना नमन करतो. त्यांनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही तर बाल शिवाजीला त्यांनी स्वराज्य हा विचार दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलं. सुवर्ण सिंहासन ज्या ठिकाणी होतं तिथे मी शिवरायांना अभिवादन केलं त्यावेळी मनात उचंबळून आलेल्या भावना शब्दांत मांडता येणार नाहीत. मी अशा व्यक्तीच्या राज दरबारात उभा होतो ज्या व्यक्तीने स्वराज्य, स्वधर्म यासाठी त्यांना आयुष्य वेचलं. आदिलशाही, निजामशाही याने वेढलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. स्वराज्याचं स्वप्न यशस्वी झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माच्यावेळी महाराष्ट्र अंधकारात बुडाला होता. स्वराज्याची कल्पनाही कुणी करत नव्हतं. स्वधर्म आणि स्वराज्य याबाबत बोलणं लोक गुन्हा समजू लागले होते. पण शिवरायांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी, भगवा फडकवण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. मी आजवर अनेक नायकांची चरित्रं वाचली आहे. मात्र असं साहस आणि दृढ इच्छाशक्ती, अकल्पनीय रणनीती मी एकाही व्यक्तीमध्ये पाहिलं नाही. असं अमित शाह म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांकडे धन नव्हतं, भूतकाळ त्यांच्यासह नव्हता, भविष्याबाबत काही माहिती नव्हतं. मात्र स्वराज्य या संकल्पनेतून त्यांनी ते निर्माण करुन दाखवलं आणि पाहता पाहता १०० वर्षांपासून सुरु असलेली मोगालाई संपुष्टात आणून दाखवली. अटकेपर्यंत शिवाजी महाराजांचे मावळे पोहचले, तामिळनाडू, बंगालपर्यंत पोहचले तेव्हा लोकांनी सुस्कारा सोडला की आता आपला देश, आपली संस्कृती वाचली. आज आपण संकल्प सोडू की स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपला देश सगळ्याच आघाड्यांवर क्रमांक १ ला उभा असेल. या विचारांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला आहे. जिजाऊंनी छत्रपती शिवरायांमध्ये स्वराज्याचं बीज रोवलं. त्याचा पुढे वटवृक्ष झाला. शिवाजी महाराजांनंतर औरंगजेब आला होता तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, संताजी, धनाजी या सगळ्यांनी लढा दिला आणि स्वतःला आलमगीर म्हणविणाऱ्या औरंगजेबाची समाधी इथेच बांधली गेली.(कबर म्हणायला हवे होते मात्र अमित शहा यांनी समाधी असा उल्लेख केला )

मी महाराष्ट्रातल्या लोकांना हात जोडून विनंती करतो की शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका. देश आणि सगळं जग शिवरायांपासून प्रेरणा घेऊ शकतं. स्वधर्म, स्वराज्य आणि स्वभाषा अमर करणं हे तीन विचार देशाच्या सीमेशी जोडलेले नाहीत तर माणसाच्या स्वाभिमानाशी जोडले गेले आहेत. त्यांनी अशा कालखंडात हे विचार ठेवले जेव्हा आक्रमण करणाऱ्यांनी आपल्याला परास्त केलं होतं. आपण गुलामीच्या मानसिकतेत गेलो होतो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराजाच्या सूर्य दैदिप्यमान केला. मी जेव्हा इथे भाषण करायला किंवा राजकारण करायला आलो नाही. मला शिवरायांच्या स्मृतींची अनुभूती व्हावी म्हणून आलो आहे असंही अमित शाह म्हणाले.

छत्रपतींचा राज्याभिषेक झाला तो हाच रायगड किल्ला. ज्या किल्ल्यावर छत्रपतींनी अखेरचा श्वास घेतला तो किल्लाही हाच. ही पवित्र भूमी आपल्याला इतिहास सांगणारी आहे. ही पवित्र भूमि शिवस्मृती करण्यासाठी मी लोकमान्य टिळकांचेही आभार मानतो. इंग्रजांनी रायगड किल्ला जाणीवपूर्वक तोडण्याचं काम केलं. कारण हा किल्ला वर्षानुवर्षे स्वराज्याचं प्रतीक होतं. दीर्घ काळ गुलामीत ठेवण्यासाठी हे प्रतीक तोडण्यात आलं मात्र लोकमान्य टिळकांनी या स्मारकासाठी कष्ट घेतले. तसंच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हेदेखील ते म्हणाले त्यामागची प्रेरणाही छत्रपती शिवाजी महाराजच होते असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.बाबासाहेब पुरंदरे यांचेही यावेळी स्मरण शहा यांनी केले .

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटले पाहिजे,पण …-मुख्यमंत्री फडणवीस

रायगडमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना कठोर शासन करण्याप्रकरणी एक कायदा करण्याचे संकेत दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना खरेतर टकमक टोकावरून लोटले पाहिजे. पण आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामु्ळे या प्रकरणी निश्चित असे काही नियम तयार केले जातील, असे ते म्हणालेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमित शहा रायगडावर केवळ केंद्रीय गृहमंत्री म्हणून आले नाहीत, तर ते छत्रपती शिवरायांचे सेवक आणि मराठा इतिहासाचे एक संशोधक म्हणून आलेत. रघूजी राजे आंग्रे यांनी योग्य सांगितले. ज्यावेळी संपूर्ण देशात मोगलाई, कुतूबशाही, आदिलशाही होती. त्यावेळी या देशातले राजे आणि राजवाडे भंग पावत होते. मोडकळीस येत होते. लढून संपत होते. वाटत होते परकीय आक्रमकांचे राज्य संपणार नाही. तेव्हा आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांसारखा एक सूर्य उगवला. ते नसते तर आपण कुणीच नसतो. त्यांच्यामुळे आपण देश आणि धर्माचे काम करत आहोत.

छत्रपतींनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून त्यांच्यातले तेज जागृत केले. सामान्य मावळ्यांना विरांमध्ये परावर्तीत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केला. त्यानंतर हिंदवी भगवा झेंडा दिल्लीपासून अटकेपर्यंत लागला. संपूर्ण भारतावर भगव्याचा अंमल आला तो केवळ शिवरायांमुळे.

फडणवीस म्हणाले, आमच्या उदयन महाराज यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या संदर्भात योग्य ती कारवाई करायची आहे. सरकार ती करेलच. पण महापुरुषांचा अपमान छत्रपतींचा अवमान करणाऱ्यांवर टकमक टोकावरूनच लोटले पाहिजे. पण आपल्याकडे लोकशाही असल्यामुळे या प्रकरणी काही निश्चित नियम तयार केले जातील. शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास राज्य सरकारकडून तयार केला जाईल. हे काम सरकार आपल्या हातात घेईल.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अरबी समुद्रातील शिवरायांचे स्मारक कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची ग्वाहीही यावेळी दिली. ते म्हणाले, अरबी समुद्रातील स्मारक सुप्रीम कोर्टात अडकले होते. पण आता ते सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाकडे पाठवले होते. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. हार मानणार नाही. सरकार हा खटला हायकोर्टात लढून ते स्मारक मोकळे करून घेईल. कोणत्याही परिस्थितीत शिवरायांचे स्मारक झाले पाहिजे हा प्रयत्न आपला असेल, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी केली आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण मागणी आहे. मी अमित शहा यांना मदत करण्याची विनंती करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोची हेरिटेज साईट म्हणून विश्व हेरिटेज म्हणून नॉमिनेट केले आहे. आता 18 ते 21 या कालावधीत फ्रान्समध्ये युनेस्कोपुढे आमचे सादरीकरण होणार आहे. मी व आशिष शेलार तिकडे जाणार आहोत. मला विश्वास आहे की, आपले 12 किल्ले हे केवळ भारताचा नाही तर विश्व वारसा म्हणून दर्जा प्राप्त होईल.

महाराष्ट्रातील आपले सरकार छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने चालणारे आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी काम करताना आमच्यासमोर केवळ छत्रपतींचाच आदर्श असतो. छत्रपतींचा आदर्श व भारताचे संविधान या दोनच गोष्टींच्या आधारावर आमचे सरकार या ठिकाणी काम करेल हा विश्वास देतो, असेही ते यावेळी म्हणाले.

तुळशीबाग श्रीराम मंदिरात हनुमान जयंती सोहळा उत्साहात साजरा

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने आयोजन ; कीर्तनकार दर्शनबुवा वझे यांचे हनुमान जन्माचे कीर्तन

पुणे : मारुतीराया बलभीमा, भजनालागी द्या प्रेमा… श्रीराम-लक्ष्मण-जानकी… जय बोलो हनुमान की… अशा शब्दांत हनुमानाच्या चरित्राचे वर्णन करीत हनुमान जन्माचे कीर्तन पेशवेकालीन तुळशीबाग राममंदिरात पार पडले. श्रीराम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्तीसमोर असलेल्या पाषाणातील उभ्या हनुमानाच्या मूर्तीला हनुमान जयंतीनिमित्त रेशमी वस्त्रे व दागिने घालण्यात आले होते. तर, मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील राम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता हनुमान जयंतीच्या दिवशी झाली. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये यंदाचे श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे झाले.

हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्मवृंदाकडून श्रीहनुमंतास रुद्राभिषेक व सकाळी ६.३० वाजता ह.भ.प.दर्शन बुवा वझे यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन झाले. याशिवाय उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, लळीत व पायघडीचे कीर्तन आणि समस्त तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा देखील पार पडला.