Home Blog Page 364

सह्याद्री रुग्णालयाला, सिम्बोयसीस कॉलेजला महापालिकेने दिलेल्या जागा आणि सोयी सुविधांची माहिती जाहीर करा

पुणे- महापालिकेने सह्याद्री रुग्णालयाला पालिकेची जागा दिली आहे. ही जागा काही वर्षांच्या कराराने कोकण विकास महामंडळाला दिली होती. मात्र, कोकण विकास महामंडळाने ही जागा सह्याद्री ट्रस्टला दिली.मात्र, ही जागा सह्याद्री ट्रस्टने कॅनडाच्या कुठल्यातरी कंपनीला हस्तांतरित केल्याची माहिती आहे. त्यामुळे या जागेचे करारपत्रक व इतर माहिती पालिकेने पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते व भाजपचे नेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रकाश बधे यांनी केली आहे.

पुणे महानगरपालिकेने शहरातील अनेक संस्थांना विविध कारणांसाठी काही अटी-शर्तींच्या नियमाने जागा दिल्या आहेत. यात सह्याद्री रुग्णालयाचा देखील समावेश आहे. विविध संस्थांना दिलेल्या या जागा नेमक्या कोणत्या कारणांसाठी दिल्या, याचा तपशील काढावा आणि तो पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करावा.

सह्याद्रीसोबतच एरंडवणा येथील अभिनव शाळेला, सिम्बायोसिस संस्थेला देखील मनपाने जागा दिली आहे. त्यांच्या अटी-शर्ती काय आहेत ते देखील जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सेलिब्रम आयटी पार्कमधील हॉटेल युनिकॉर्न हाऊसवर पोलीस कारवाई

पुणे- येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेलिब्रम आयटी पार्क, कल्याण नगर येथे असलेल्या हॉटेल युनिकॉर्न हाऊस येथे 11 एप्रिलला मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींमध्ये वाद व भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी रात्री 1.45 च्या सुमारास हॉटेलची पाहणी केली असता हॉटेल बंद असून साफसफाई सुरू असल्याचे आढळून आले. मात्र, या वादासंदर्भात कोणत्याही व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.

यापूर्वीही या हॉटेलविरोधात दोन गुन्हे आणि 10 खटले दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करत महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 च्या कलम 142(2) अन्वये दिनांक 11 एप्रिल रोजी हॉटेल युनिकॉर्न हाऊस सील केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.

पुतण्याचा काकावर गोळीबार

पुणे:येथे जमिनीच्या वादातून पुतण्याने काकावर गोळी झाडल्याची घटना घडली आहे. मात्र, गोळी कानापासून गेल्यामुळे काकाचा जीव वाचला आहे. ही घटना पुण्यातील ढोकळवाडी वारक येथे घडली आहे.सोपान चिंधु ढोकळे असं गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर नवनाथ ढोकळे असं पुतण्याचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपान ढोकळे यांची वडिलोपार्जित शेती आहे. मागील काही दिवसांपासून याबाबत ढोकळे कुटुंबामध्ये वाद होता. काही दिवसांपूर्वी सोपान ढोकळे यांनी शेतामध्ये पत्र्याचा शेड बांधला होता. त्यांचा पुतण्या नवनाथ ढोकळे याला मात्र ज्या जागेवर शेड बांधलं होतं त्याचा मनात राग होता. बांधलेले शेड काढून टाकावे, यावरून त्यांच्यात वाद सुरु होता.

दरम्यान, रागातून पुतण्या नवनाथ याने त्याच्याजवळ असणाऱ्या छऱ्याच्या बंदुकीतून काका सोपान ढोकळे यांच्यावर गोळी झाडली. सुदैवाने, गोळी त्यांच्या डोक्याला लागली नाही. मात्र, गोळी कानाजवळून गेल्याने कानाला मोठ्या प्रमाणात जखम झाली आहे. त्यानंतर ढोकळे यांना तातडीनेजवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

सोपान ढोकळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छऱ्याची बंदूक ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी पुतण्या नवनाथ नामदेव ढोकळे याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे

पुणे महापालिकेतील कार्यालय अधिक्षकेची पोलीस अंमलदाराने केली ६१ लाखांची फसवणूक

पुणे : पुणे महापालिकेतील कार्यालय अधिक्षक महिलेची पोलीस अंमलदाराने ६१ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे . हा पोलीस अंमलदार आणि महापलिके कार्यालय अधीक्षिका हे दोघे एकमेकांचे नातलग आहेत .याबाबत रजनी हनुमंत वाघमोडे (वय ५०, रा. रायकरनगर, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सचिन कल्याण वाघमोडे (रा. मांजरी, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान घडला .

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रजनी वाघमोडे या पुणे महानगर पालिकेत कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. सचिन वाघमोडे हा पुणे शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेत पोलीस अंमलदार आहे. रजनी वाघमोडे यांचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील नजिक पिंपरी हे मुळ गाव आहे. त्या गावाकडे जमीन खरेदी करण्याचे शोधात होत्या. त्यांच्या शेत जमिनी लगत चुलत पुतण्या सचिन वाघमोडे यांची शेत जमीन आहे. त्यांनी आम्हाला शेत जमीन विकायची असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्यात बोलणे झाले. सचिन वाघमोडे, सरस्वती वाघमोडे, नितीन वाघमोडे व इतरांची सर्व मिळून १२ एकर जमिनीचा दर १ कोटी ८ लाख रुपये ठरवला होता. त्यानुसार त्यांनी सर्वांना मिळून एकूण ८० लाख रुपये रोख व धनादेशाद्वारे दिले. जमिनीचे साठे खत व खरेदीखत कधी करुन देणार असे त्यांनी सचिन वाघमोडे यांना विचारले.तेव्हा सचिन वाघमोडे याने तुम्ही उर्वरित पैसे द्या, मग आपण खरेदी खत करुन घेऊ, असे सांगितले. त्यानंतर सचिन वाघमोडे हा पत्नी व मुलासह त्यांना भेटायला कार्यालयात आला होता. तेव्हा त्यांनी खरेदीखताविषयी विचारल्यावर त्याने २८ लाख दिले की खरेदीखत करुन घेऊ, असे बोलला. तेव्हा रजनी वाघमोडे यांनी अगोदरच तीन चतुर्थांश रक्कम दिलेली आहे. तुम्ही खरेदीखत अगोदर करुन द्या, मग मी तुम्हाला उर्वरित पैसे देते, असे सांगितले. त्यावर सचिन वाघमोडे म्हणाला की, आमची जमीन आम्हाला तुम्हाला द्यायची नाही. तुम्हाला काय करायचे ते करा, माझी नोकरी गेली तरी चालेल, पण तुम्हाला जमीन विकणार नाही. त्याने खरेदी खत करुन देण्यास नकार दिला.

१ फेब्रुवारी २०२५ रोजी सचिन वाघमोडे याने इतरत्र जमिनीचा व्यवहार केला असल्याचे रजनी वाघमोडे यांना समजले. जमिनीच्या व्यवहारात त्यांच्याबरोबर व्यवहार चालू असताना त्याने दुसरीकडे व्यवहार करुन ती जमीन फिर्यादी यांना न देता दुसरीकडे खरेदी खत करुन विक्री केली आहे. या जमिनीच्या नोंदीबाबत फिर्यादी यांनी टाकळी सिकंदरचे मंडल अधिकारी यांच्याकडे अर्ज करुन हरकत घेतली होती. परंतु, सचिन वाघमोडे याने मंडल अधिकारी यांना खोटी माहिती दिल्याने त्यांची तक्रार निकाली काढण्यात आली. रजनी वाघमोडे या फसवणुकीची तक्रार करणार हे समजल्यावर सचिन वाघमोडे, नितीन वाघमोडे व इतरांनी ८० लाखांपैकी वेगवेगळ्या कारणासाठी दिलेले १९ लाख रुपये त्यांच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केले. उर्वरित ६१ लाख रुपये परत न करता फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे तपास करीत आहेत.

खडवली (कल्याण) पोक्सो प्रकरणावरून उपसभापती नीलम गो-हे यांची तातडीच्या कारवाईची व अवैध बालगृहे तपासणी मोहिमेची मागणी

मुंबई, दि. १३ एप्रिल २०२५:
ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील ‘पसायदान’ नावाच्या संस्थेत लहान मुलांवर कथित लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणावरून महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणात संबंधित संस्थेतील काही पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, POCSO कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. बालकांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे असा दावा करणाऱ्या संस्थेकडून घोर दुर्लक्ष झाल्याने पीडित मुलांवर मानसिक व शारीरिक अत्याचार झाले, असे उपसभापतींनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

उपसभापती गो-हे यांनी पुढील मागण्या केल्या आहेत:
• दोषींवर POCSO कायदा, JJ Act आणि IPC अंतर्गत कठोर कारवाई करावी
• प्रकरणी निष्णात वकिलांची नेमणूक करून न्यायप्रक्रियेला गती द्यावी
• उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी समिती गठीत करावी
• संस्थेची धर्मादाय कायद्याच्या अनुसार नोंदणी रद्द करावी
• पीडित बालकांसाठी समुपदेशन व पुनर्वसनाची विशेष व्यवस्था करावी
• राज्यभरात बेकायदेशीर बाल वसतिगृहांविरोधात मोहीम राबवावी

उपसभापतींनी याआधीही अशा घटनांवर सातत्याने निवेदने दिली असून, तरीही शासनाकडून ठोस पावले उचलली न गेल्याची खंत व्यक्त केली आहे. कळंबोली येथील प्रकरणात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही राज्यात अशा घटनांची पुनरावृत्ती ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“बालकांच्या मूलभूत हक्कांवर आघात करणाऱ्या अशा घटनांवर सरकारने कठोर भूमिका घेऊन आदर्श निर्माण करावा,” अशी मागणी उपसभापती नीलम गो-हे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

महाराजांचा एकेरी उल्लेख, अन औरंग्याच्या थडग्याला समाधीचा दर्जा देणाऱ्या अमित शहांवर मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करावा- संजय राऊत

औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झाला म्हणून अमित शहा यांचे त्याच्यावर प्रेम आहे का?

त्याच्या थडग्याला त्यांनी रायगडावर उभे राहून समाधीचा दर्जा दिला हे एवढं प्रेम?

औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला त्याचा हा परिणाम आहे का?


मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून शिवरायांचा अवमान करण्यात आला आहे. ते गुजराती आहे म्हणून त्यांना सर्व काही माफ आहे का? आम्ही हे सहन करणार नाही, शिवबांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या गृहमंत्री शहांवर मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, औरंगजेबचा जन्म गुजरातमध्ये झाला म्हणून अमित शहा यांचे त्याच्यावर प्रेम आहे का? त्याच्या थडग्याला त्यांनी रायगडावर उभे राहून समाधीचा दर्जा दिला हे एवढं प्रेम?, या लोकांनी आम्हाला छत्रपती शिवराय काय होते हे सांगू नये.

संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अमित शहांनी आम्हाला काही सांगावे एवढी वाईट वेळ राज्यावर आली नाही. औरंगजेबाचे थडग उखडून टाकण्याच्या विचाराने भाजपने लोकं भारावून गेले होते. औरंगजेबाची कबर काढून टाकू त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाचे प्रदर्शन केले. त्यातून लोकं पेटले. आम्ही ज्याला थडगं म्हणतो त्या गोष्टीला अमित शहा यांनी समाधीचा दर्जा दिला. औरंगजेबाची समाधी असा उल्लेख त्यांनी रायगडावरुन केला. आता यापेक्षा वाईट महाराष्ट्रात काय होणार? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, तुम्हाला जर औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा द्यायचा होता तर इतक्या हाणामारी आणि दंगली का घडवल्या? औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला त्याचा हा परिणाम आहे का? एवढं प्रेम. महाराष्ट्राच्या शत्रूला हिंदुत्वाच्या शत्रूच्या थडग्याला समाधीच्या दर्जा देण्यासंदर्भात वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बाजूला बसलेले असताना करतात. त्यांच्या वंशजांना या गोष्टीचा त्रास व्हायला हवा होता.

संजय राऊत म्हणाले की, औरंगजेबाची समाधी हा शब्द जर दुसऱ्या कुणाच्या तोंडून निघाला असता तर देवाभाऊ, आणि शिंदे या दोघांनी थयथयाट केला असता. अजित पवार संयमी आहेत. हिंदुत्वाचा कडेलोट झाला असे म्हटले असते पण काल यांच्या तोंडून काही निघाले नाही. अमित शहांनी कालच्या भाषणामध्ये महाराजांचा एकेरी उल्लेख केला. हा शिवरायांचा अपमान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. नकली हिंदुत्ववादी शिंदे गटाचे लोकं कुठे आहे. महायुतीमध्ये एकोपा आहे असे रायगडावरील कार्यक्रमात दिसून आले नाही. शिंदे गटाचे नेते स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला नव्हते.

पसायदान नावाच्या खासगी वसतिगृहात 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

मुंबई-कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पसायदान नावाच्या खासगी वसतिगृहात 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तर शाळेतील मुलांना अनेक दिवसांपासून मारहाण केली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.

जिल्हा महिला बाल कल्याण समितीकडून पाहणीदरम्यान हा प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठत कारवाई सुरू केली असून या प्रकरणी आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. यात आश्रम शाळा चालवणारा संचालक बबन शिंदे, त्याचा मुलगा प्रसन्न शिंदे, त्याची पत्नी आशा शिंदे , शिक्षिका दर्शना पंडित आणि कामगार प्रकाश गुप्ता यांचा समावेश आहे.

खडवलीली पसायनदान या खाजगी आश्रम शालेत बेघर, निराधार आणि गोर-गरीब मुलांना शिक्षण दिले जाते. काही दिवसांपूर्वी खडवली येथील खासगी आश्रम शाळेत मुलांना बेदम मारहाण केली जात असल्याची तक्रार ठामे जिल्हा महिला बाल कल्याण समितीकडे प्राप्त झाली होती. तक्रारीची गंभीर दखल समितीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. समितीच्या अधिकारी वर्गाने थेट पसायदान या खाजगी आश्रमशाळेची पाहणी केली. या वसतिगृहात 12 ते 15 मुलं राहतात त्यांच्याकडे समितीच्या सदस्यांनी विचारपूस केली. तेव्हा मुलांना मारहाण केली जात होती. प्रकाश गुप्ता या कर्मचाऱ्याने दोन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे कल्याण तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. निराधार मुलांवर अत्याचार करणाऱ्या या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कल्याण तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सुटका करण्यात आलेल्या बालकांपैकी काही खडवली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत होते. त्यांची आगामी परीक्षा लक्षात घेता शिक्षण विभागाने त्यांच्या परीक्षेसाठी विशेष व्यवस्था करावी, यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधण्यात येत आहे. बालकल्याण समितीच्या आदेशानुसार सर्व बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सध्या या बालकांना उल्हासनगर येथील मुलींच्या विशेष गृहात ठेवण्यात आले आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांनी सांगितले.

सिंहगडावर विदेशी पर्यटकासोबत टवाळखोरांचे गैरवर्तन:तरुणांनी अश्लील शिवीगाळ करायला लावली, चौघांविरोधात गुन्हा दाखल

पुणे-
पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर आलेल्या एका विदेशी पर्यटकाला महाराष्ट्रातील तरुणांच्या टोळक्याने अश्लील शिव्या शिकवल्या आणि त्या उच्चारायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेवरून शिवप्रेमी, नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर कलंक लावण्याचा प्रकार या तरुणांनी केला असल्याचे प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओमधील चार तरुणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 3 एप्रिल रोजी न्यूझीलंड येथील एक पर्यटक सिंहगडावर ट्रेकसाठी आला होता. त्यावेळी संभाजीनगर येथील आठ ते दहा तरुणांचा ग्रुपही ट्रेक करत होता. या ट्रेकदरम्यान एका लिंबू शरबताच्या स्टॉलसमोर हे तरुण थांबले होते. चार तरुणांनी न्यूझीलंडच्या पर्यटकाशी गप्पा मारल्या व त्याला मराठी येत नसल्याचे समजल्यावर त्याला मराठीतील गलिच्छ व अश्लील शिव्या शिकवल्या. तसेच तरुणांनी एकमेकांना अश्लील शिव्या दिल्याची नक्कल पर्यटकाकडून करवून घेतली. नंतर ”हे शब्द इतरांना जाऊन बोला.” असे त्याला सांगितले. मराठी भाषा अजिबात माहित नसल्याने तो पर्यटक हसत-हसत हे शब्द इतरांजवळ उच्चारू लागला. मात्र पुढे या पर्यटकाला काहीतरी चुकीचे शिकवले, याची जाणीव झाल्यानंतर तो तिथून निघून गेला. इथे पुन्हा येणार नाही असे त्या पर्यटकाने व्हिडिओ मध्ये उल्लेख केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे गडकिल्ले प्रेमी, शिवप्रेमींनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली.

या प्रकरणी चार तरुणांवर हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार संतोष भापकर यांनी या चौघांविरोधात फिर्याद दिली. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेतर्फे हवेली पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. यावेळी इतिहास संशोधक डॉ. नंदकिशोर मते, शिवसेना ठाकरे गट विधानसभा प्रमुख नितीन वाघ, विभागप्रमुख महेश पोकळे, संघटक तानाजी गाढवे, केतन शिंदे, महेश विटे, राहुल वाळुंजकर, बाळासाहेब हणमगर, बाळासाहेब मंडलिक, अंगराज पिसे, आकाश साळुंके आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचलेली आहे. महाराजांच्या पराक्रमाने प्रेरित होऊन अनेक परदेशी पर्यटक महाराष्ट्रातील गड-किल्ले पाहण्यासाठी येतात. अशा पाहुण्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचे सोडून त्यांच्यासोबत अशाप्रकारचे गैरवर्तन केले जात असेल, तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांना कलंक लावणारे आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती याला डाग लागला असल्याचे बोलले जात आहे.

आज समाज निरर्थक विचार, वादात गुरफटलेला,कालानुरूप नव्या वैचारिक क्रांतीची गरज:संजय सोनवणी

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार,दि. १३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात हे शिबीर झाले.या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

संजय सोनवणी (भारतातील वैचारिक बंडांचा इतिहास),सर्फराज अहमद (दख्खनचा मध्ययुगीन इतिहास आणि विपर्यास), लक्ष्मीकांत देशमुख आणि डॉ.कुमार सप्तर्षी या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. ‘ गांधी दर्शन’ विषयावरचे हे १९ वे शिबीर होते.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, अन्वर राजन,एड.स्वप्नील तोंडे,तेजस भालेराव ,एड.राजेश तोंडे,रमेश आढाव,अप्पा अनारसे उपस्थित होते.यावेळी संजय सोनवणी म्हणाले,’विचारमृत होण्याकडे आपली वाटचाल झाली आहे. समाज निरर्थक विचार, वादात गुरफटलेला आहे. नवसृजनाची प्रक्रिया थांबलेली आहे. भारतात वैचारिक बंडांची कल्पना पुरातन आहे. वैचारिक सृजन नसेल तर त्या संस्कृतीला संस्कृतीच म्हणता येत नाही.आज नव्या कालानुरूप वैचारिक क्रांतीची गरज आहे.

यावेळी बोलताना सर्फराज अहमद म्हणाले,’उत्तरेच्या विरोधात केंद्रीय सत्तेत असणाऱ्या विरुद्ध दखनी सत्तांनी म्हणजे मराठ्यांनी लढा दिला. हा धर्म संघर्ष नव्हता. मराठी संस्कृतीकारणाला धर्माचा रंग देता कामा नये . इतिहासातील सत्ताधीशांच्या एकाहून अनेक कबरी आहेत. त्यामुळे त्यांच्या पाडापाडीत जाण्यात अर्थ नाही. नावे बदलून कोणत्याही समाजाला राष्ट्रातून वगळता येणार नाही. तसे करून दुहीची बीजे पेरली जात आहेत’, असा आरोप सर्फराज अहमद यांनी केला.

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले,’ दखनी वारसा मन आणि बुद्धीने समजून घेतला पाहिजे. हा अतिशय महत्वाचा इतिहास आहे. मुस्लिमांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ देता कामा नये. पुरोगामी महाराष्ट्राने धर्मद्वेष्टे होऊ नये. नव्याने पुरावे शोधून सर्वसमावेशक संस्कृतीचे पुनर्लेखन केले पाहिजे.’

समता सप्ताहानिमित्त महिला मेळावा, आरोग्य शिबिराचे आयोजन

पुणे, दि. १२: ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येरवडा येथे महिला मेळावा आणि आरोग्य शिबिराचे आज आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत जनाबाई मुलींचे शासकीय वस्तीगृहाच्या गृहपाल श्रीमती सुक्षाला शेलार होत्या. प्रमुख पाहुणे व वक्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील युवा व्याख्याते सागर सोनकांबळे, समर्थ सोशल अँड वेलफेअर फाउंडेशनचे आरोग्य सल्लागार निवास पोवार, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी इंदल चव्हाण, कार्यालय अधीक्षक संतोष होगाडे आदी उपस्थित होते.

श्री. सोनकांबळे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. मनुस्मृतीने नाकारलेले सर्व अधिकार महिलांना मिळवून देण्यासाठी १९१९ पासून महिलांना मतांचा अधिकार, अस्पृश्यता निवारण, ग्रंथ लिखाण, स्थानिक प्रश्नानुसार लिखाण, कामगारांच्या न्यायासाठी काम, महिलांचे अधिकार, शिक्षण, महिलांसाठी कायदे, महिला आयोगाची स्थापना, विषमतेला छेद देणारे कायदे, चवदार तळे सत्याग्रहामध्ये प्रत्येक घरातून किमान एक महिला उपस्थित रहावी यासाठी आग्रही डॉ. आंबेडकर राहिले.

संविधानात कलम ३५६ आणिबाणी कायदा निर्माण करून भारत एकसंघ ठेवला, कलम १४ मध्ये समतेचा अधिकार दिला, कलम १५ जात, धर्म, भाषा यावरुन भेदभाव निर्माण होऊ नये म्हणून कायदा केला असून डॉ. बाबासाहेबांच्या या कार्यातून समाज उत्थानाचे मौलिक कार्य घडले असल्याचे नमूद केले.

दुपारच्या सत्रामध्ये निवास पवार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन व सल्ले दिले. त्यानंतर उपस्थित महिला, विद्यार्थीनी तसेच कर्मचारी वृंदांची आरोग्य तपासणी करण्यात आली, अशी माहिती सहायक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनार यांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे अन् अमित शहांमध्ये बंद दाराआड चर्चा:भेटीनंतर शिंदेंनी भरत गोगावलेंना तातडीने मुंबईला बोलावले, पडद्यामागील घडामोडींना वेग

मुंबई-अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज सह्याद्री अतिथीगृहावर अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेनंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईला बोलावून घेतले. त्यामुळे आता मुंबईत रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत निर्णायक चर्चा होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जाण्यापूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे नाराज झाले आणि देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही नावांना स्थगिती दिली. रायगडमध्ये शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातच काल अमित शहा हे रायगडला पोहोचल्यानंतर थेट सुनील तटकरे यांच्या घरी गेल्याने विविध चर्चांना उधाण आले. भरत गोगावले यांना तटकरे यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण असताना देखील त्यांनी दांडी मारली होती.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी अमित शहा यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत कुणीही नव्हते. विशेष म्हणजे या भेटीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित नव्हते. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावलेंना तातडीने मुंबईला बोलावून घेतले. अमित शाह यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदे यांना काही संदेश दिला असावा का? याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

एकनाथ शिंदेंनी तातडीने मुंबईला बोलावण्याबाबत भरत गोगावले यांना विचारले असता, पक्षाच्या कामासाठी शिंदेंनी बोलावले आहे. पक्षाच्या काही गोष्टी असतात, शेवटी पक्षबांधणी आणि पक्ष वाढवणे महत्वाचे आहे आणि जी काही जबाबदारी आमच्यावर दिली आहे ती आम्हाला पार पाडायची आहे, असे भरत गोगावले म्हणाले.

अमित शाह आणि सुनील तटकरे यांच्यात जेवणावेळी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत चर्चा झाली आहे का, असा प्रश्न भरत गोगावले यांना विचारला असता, आम्ही त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो. परंतु आम्ही काल त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना यासंदर्भात चर्चा झाली का, असे विचारले असता अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. सुनील तटकरे यांच्या सुतार वाडीतील निवासस्थानी काल अमित शहा यांच्यासोबत फक्त फोटोसेशन आणि भोजनाव्यतिरिक काहीच झाले नाही. सुनील तटकरे यांनी अमित शहा यांना दिल्लीत माझे घर तुमच्या रायगड दौऱ्यावेळी रस्त्यात लागेल. त्यामुळे तुम्ही तिकडे या, असे निमंत्रण दिले होते. त्यामुळे त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन अमित शहा काल सुतारवाडीत गेले, असा दावा भरत गोगावले यांनी केला.

आंबेडकर जयंतीनिमित्त मोतीबागेत रक्तदान शिबिर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोतीबागनगर व भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेतर्फे १४ एप्रिल रोजी
सकाळी ९ ते दुपारी १ यावेळेत आयोजन

पुणे-(प्रतिनिधी)
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भारतीय संस्कृती संवर्धक संस्था व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोतीबाग नगर,कसबा भाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक १४ एप्रिल रोजी संस्थेच्या शनिवार पेठ येथील मोतीबाग कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
१४ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर आयोजनाचे यंदाचे हे ९ वे वर्ष असून जनकल्याण रक्तपेढी यांचे सहकार्य लाभणार आहे.
१४ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत हे रक्तदान शिबिर होणार असून या शिबिराचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता “ज्ञानदीप अकॅडमी” चे संचालक महेश शिंदे ह्यांचे हस्ते होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा भागाचे कार्यवाह राहुल पुंडे यांची मुख्य उपस्थिती असणार आहे.
तरी जास्तीत जास्त जणांनी या शिबिरामध्ये रक्तदान करावे असे आवाहन रक्तदान शिबिर संयोजक सागर दरेकर व भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी,कार्यवाह प्रसाद खेडकर यांनी केले आहे.
रक्तदात्यांनी अधिक माहितीसाठी व नांव नोंदणीसाठी मयंक ९०९६७२५२६२ किंवा सागर ७०२८१४२३८८ यांचेशी संपर्क करावा.

पेट्रोल, डिझेलचे भाव लिटरमागे १५ रुपये कमी करा,आणि नफेखोरी थांबवा -माजी आमदार मोहन जोशी

पुणे – महागाईने होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवर अबकारी कर लावून नफेखोरी करण्याऐवजी दर १५ रुपये प्रति लिटर कमी करायला हवेत आणि तेल कंपन्यांचीही नफेखोरी थांबवायला हवी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर ६५.४१ डॉलर प्रति बॅरल असा झालेला आहे. गेल्या चार वर्षातील हा निचांकी दर आहे. कच्च्या तेलाचे भाव घसरलेले आहेत, अशा वेळी इंधनाचे भाव कमी असणं अपेक्षित आहे. इंधनाचे भाव कमी न करता अबकारी कर वाढवून सरकारने नफेखोरीच केलेली आहे आणि गेली चार वर्षे सरकारी कंपन्याही नफेखोरीच करीत आहेत. या नफेखोरीबद्दल वारंवार आंदोलने केली, तरीही सरकार दाद देत नाही, सरकारची ही मनमानी संतापजनक आहे.

करोना साथीच्या काळात म्हणजे चार वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर ६३.४० डॉलर प्रति बॅरल होता. कच्च्या तेलाचे दर घसरलेले असतानाही मोदी सरकारने इंधनाचे दर कमी केले नाहीत. कंपन्यांची नफेखोरी थांबविली नाही. जनतेच्या विरोधातीलच धोरणे राबविली. एप्रिल २०२२मध्ये कच्च्या तेलाचा दर १०२.९७ डॉलर प्रति बॅरल होता. तेव्हा भारतात पेट्रोलचा दर ११५.०७ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९८.२६ रुपये प्रति लिटर असा होता. एप्रिल २०२३ मध्ये कच्च्या तेलाचे दर घसरले ८३.७६ डॉलर प्रति बॅरल झाले. भारतात पेट्रोलचा दर अवघ्या ७ रुपयांनी कमी करून १०८.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९३.८८ रूपये प्रति लिटर राहिला. एप्रिल २०२४ मध्ये कच्च्या तेलाचा दर ८९.४४ डॉलर प्रति बॅरल झाला तेव्हा पेट्रोलचा दर १०६.५१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९१.८८ रूपये प्रति लिटर असा राहिला. १२ एप्रिल २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर ६५.४१ डॉलर प्रति बॅरल असा राहिला आणि पेट्रोल चा दर १०६.५१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९१.८२ रुपये प्रति लिटर असा आहे. हे दरपत्रक पाहिले तर मोदी सरकारने नफेखोरी थांबवून पेट्रोल आणि डिझेलचे दर १५ रुपये प्रति लिटर इतके कमी केले पाहिजेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

पेट्रोल, डिझेल दरवाढीवरून आंदोलने करून मोदी सरकार पुढे जनतेचा आवाज मांडलेला आहे. याही पुढे जनतेची मागणी मांडण्यासाठी कॉंग्रेस पक्ष विविध मार्गांनी आंदोलने करेलच, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

1008 तास संवादिनी सराव वादनाची संकल्पपूर्ती

गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांचा उपक्रम
पुणे : कला आणि ज्ञानाच्या क्षेत्रात सरावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे जाणून गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य, ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित प्रमोद मराठे यांच्या संकल्पनेतून ‌‘रामनवमी सराव‌’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडवा ते हनुमान जयंती या कालावधीत गुरुंसह शिष्यांनी 1008 तास संवादिनी सराव वादन संकल्पाची पूर्तता केली.
14 दिवसांच्या या कालावधीत दररोज 18 तास संवादिनी सराव वादन करण्यात आले. उपक्रमात 7 ते 70 या वयोगटातील 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक तासात चार ते पाच विद्यार्थी सामूहिक संवादिनी सराव वादन करत होते. विद्यार्थ्यांनी विविध राग, पलटे यांचा सराव केला. वादनात एकसुरीपणा येऊ नये यासाठी दर अर्ध्या तासाने पलटा बददला जात होता.
विद्यार्थ्यांमध्ये सराव करण्याची इच्छा आणि गोडी निर्माण व्हावी याकरिता हा संकल्प केला असल्याचे पंडित प्रमोद मराठे म्हणाले. 1983 सालापासून सामूहिक संवादिनी सराव वादनाचा उपक्रम सुरू असून सुरुवातीस फक्त राम नवमीच्या दिवशी 6 किंवा 12 तास सराव वादन केले जात असे. सुमारे 25 वर्षांपूर्वी विद्यार्थी संख्या वाढत गेल्यानंतर हे सराववादन 24 तास केले जात असे. 6 वर्षांपूर्वीपासून गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 9 असे सलग 15 तास सराव वादन करून 108 तासांचा टप्पा गाठला गेला. 1008 तास सामूहिक सराव वादन करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे, असेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमात कर्नाटकमधील यल्लापूर जवळील लहानशा गावातून आलेल्या सविता हेगडे या गुरुकुलातील विद्यार्थिनीने 108 तास सराव केला तसेच मयुरेश गाडगीळ या गुरुकुलातीलच अंध विद्यार्थ्याने 108 तास सरावाची संकल्पपूर्ती केली. पुण्याबाहेरीलही काही विद्यार्थी या कालावधीत महाविद्यालयात येऊन सरावात सामिल झाले होते. सराव वादन उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना उपप्राचार्या परिणिता मराठे यांचेही मार्गदर्शन लाभले.

मराठी गझलकाराने सौंदर्याची उपासना करावी : भारत सासणे

रंगत-संगत प्रतिष्ठान, करम प्रतिष्ठानतर्फे सुधाकर कदम यांचा गझलमित्र पुरस्काराने सन्मान

पुणे : मराठी गझलकाराने सौंदर्याची उपासना करावी. धक्कातंत्र अथवा चिमटा काढण्याच्या प्रेमात न पडता आशय व्यक्त करण्याची क्लृप्ती साधणे आवश्यक आहे. शब्दांचे गारुड किती प्रमाणात पसरावे याचे भानही कवीला असणे आवश्यक आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांनी व्यक्त केले. उच्चकोटीचे शब्दखेळ करण्याची क्षमता ओळखून चिंतन होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 13) आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय गझल संमेलनात गझलगंधर्व सुधाकर कदम यांचा गझलमित्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण सासणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन मंचावर होते. सन्मानपत्र आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे आणि व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य केले जात आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवी-गझलकारांना ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार असून ही बौद्धिक मेजवानीच ठरणार आहे.

उपक्रमाविषयी माहिती देऊन भूषण कटककर म्हणाले, गझल ही आत्ममग्नतेतून आविष्कृत व्हायला हवी. आस्वादकाच्या अभिरुचीवर गझलेची निर्मिती विसंबून नसावी. रसिकांची दाद हा फक्त दृश्य परिणाम आहे. प्रत्यक्षात गझल लिहून झाल्यावर कवीला कोणत्यातरी व्यथेपासून सुटका झाल्यासारखे वाटायला हवे.

भारत सासणे पुढे म्हणाले, कवीला भाषेचे, शब्दांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. विरामचिन्हांची ताकद ओळखून त्यांचा प्रभावी वापर केल्यास काव्यातून अथवा गझलेतून अपेक्षित अर्थ प्रवाहित होतो; शब्दांच्या पलिकडील आशय प्रकट होतो. कवीला वाट पाहण्याची तयारी हवी. त्याने आत्ममग्न राहून लिहिते राहण्याची साधना साधणे गरजेचे आहे. सातत्याने साधना केल्यानंतर कवी पक्व होतो आणि त्याच्या काव्यातून आनंदनिर्मिती होते आणि उत्तम काव्य अथवा गझल प्रकट होते. या उपक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातील कवी, गझलकार एकत्र आल्याने वैचारिक आदान-प्रदान होण्यास मदत होईल.

सत्काराला उत्तर देताना सुधाकर कदम म्हणाले, माझ्या आयुष्यात अनेक योगायोग आले. गझलमित्र पुरस्काराने झालेला सन्मान माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. कवी सुरेश भट यांच्या भेटीतून आपली काव्यप्रतिभा फुलत गेली. माझ्या कलेला स्वीकारले हे रसिकांचे मोठेपणच आहे. काव्य-गझल आणि संगीत क्षेत्रातील प्रवास त्यांनी उलगडला.

सुरुवातीस गझलकारा सुप्रिया जाधव, गझलकार सतिश दराडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचा परिचय वैजयंती आपटे यांनी करून दिला तर सन्मानपत्राचे वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले. गझल संमेलनाच्या यशस्वीतेसाठी वैशाली माळी, निरुपमा महाजन, मुक्ता भुजबले, वासंती वैद्य यांनी प्रयत्न केले.