Home Blog Page 36

स.प.महाविद्यालय, मुख्य इमारत शताब्दी निमित्ताने, माजी विद्यार्थी सनदी अधिकारी मेळावा

शिक्षण प्रसारक मंडळी च्या पुढाकाराने आयोजन
पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने प्रशासकीय सेवेत अधिकारी असणाऱ्या आपल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शनिवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता लेडी रमाबाई सभागृहामध्ये आयोजित केला आहे. शिक्षण प्रसारक मंडळीच्या पुढाकारातून हा मेळावा संपन्न होत आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश मोहरील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला स.प.महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश मोहरील आणि डॉ. संज्योत आपटे उपस्थित होते.

शिक्षण प्रसारक मंडळीने मागील वर्षापासून बी.ए, सिव्हिल सर्विसेस हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. महाविद्यालयाच्या ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या इमारतीचे हे शताब्दी वर्ष आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे ही हे शताब्दी वर्ष आहे. या सर्व गोष्टींचा संगम साधून महाविद्यालयाने हा मेळावा आयोजित केला आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाविद्यालयाच्या प्रांगणात हा मेळावा असेल.

लेडी रमाबाई सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता  शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष सदानंद फडके, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड.एस.के.जैन, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, सचिव डॉ. राधिका इनामदार व शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन होईल.  

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश मोहरील म्हणाले, संसदेचे माजी सदस्य, सिक्कीमचे माजी राज्यपाल, प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले आय.ए.एस अधिकारी व महाविद्यालयाचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी  श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल. या उद्घाटन समारंभात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असणारे असे प्रशासकीय सेवेतील पन्नासहून अधिक अधिकारी सहभागी होतील. या सर्वांचे स्वागत व सत्कार या समारंभात करण्यात येईल.

उद्घाटन समारंभानंतर नागरी सेवेत काम करण्यास इच्छुक असणाऱ्या व त्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध गटांमध्ये प्रशासकीय अधिकारी सहभागी होतील. त्यांच्या तेथील व्याख्यानांमधून ते विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेबाबत मार्गदर्शन करतील. महाविद्यालयाचे विद्यार्थी यावेळेस या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधतील. या संवादातून सध्याच्या या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेतील विविध संधींची माहिती मिळेल, ते प्रेरित होतील, राष्ट्रहित,राष्ट्राचा विकास, सामाजिक बांधिलकी यासाठी ते जागरूक होतील, अशी आशा आहे.

यानंतर विद्यार्थ्यांसमवेत हे अधिकारी महाविद्यालयाच्या परिसरात फिरतील. त्यांच्या काळात कार्यरत असणाऱ्या महाविद्यालयाच्या माजी शिक्षकांशी त्यांच्या भेटीगाठी होतील. जुने ऋणानुबंध पुन्हा जागे होतील व या अधिकाऱ्यांच्या महाविद्यालयातील आपल्या स्मृतींना उजाळा मिळेल. महाविद्यालयाशी असणारा त्यांचा अनुबंध घट्ट होईल. यानंतर महाविद्यालयातील कला मंडळाच्या विद्यमान विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने मेळाव्याचा समारोप होईल. मेळाव्यात आय.ए.एस, आय.पी.एस, आय.आर.एस व इतर प्रशासकीय सेवेतील अधिकारी त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या विविध संवर्ग सेवेतील अधिकारी या मेळाव्यात सहभागी होत आहेत.

*स.प. महाविद्यालय इमारतीच्या शताब्दी वर्षात विविध कार्यक्रम
शिक्षण प्रसारक मंडळीने सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या इमारतीच्या या शताब्दी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्र बांधणी व देशाचा विकास, सामाजिक बांधिलकी व सामाजिक कार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग ही उद्दिष्टे निश्चित करून विविध कार्यक्रमांचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळी वर्षभर करणार आहे. नागरी सेवेत अधिकारी असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा हा यातील पहिला कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

*संस्था व महाविद्यालयाविषयी
शिक्षण प्रसारक मंडळी ही पुण्यातील एक नामवंत अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेला शंभर वर्षांहून मोठी उज्ज्वल परंपरा आहे. या संस्थेकडून १९१६ मध्ये पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. आज हे महाविद्यालय अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय आहे. मोठी परंपरा व वारसा असणाऱ्या या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविल्या आहेत. या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आज हे विद्यार्थी समाजामध्ये प्रतिष्ठित नागरिक आहेत. आम्ही सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत; हे ते अभिमानाने सांगतात. महाविद्यालयाबरोबरचे त्यांचे बंध भक्कम राहिले आहेत. महाविद्यालयातील अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत असतात. मूल्यात्मक शिक्षण, राष्ट्रहित व राष्ट्राचा विकास हे महाविद्यालयाचे नेहमीच धोरण राहिले आहे. उज्ज्वल परंपरा, वर्तमानाचे भान व भविष्याचा वेध घेत हे महाविद्यालय आपली शतकोत्तरी वाटचाल करीत आले आहे.

रामायण ही केवळ कथा नसून आदर्शाचा मार्ग  

प्रख्यात निरुपणकार डॉ. धनश्री लेले यांचे मत ; ग्रंथ पारायण दिंडी पुणे च्यावतीने अयोध्या येथे झालेल्या रामरक्षा पठण वर्षपूर्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : रामायण हा प्रभू श्रीरामाच्या जीवनाचा प्रवास नसून, सदाचार, कर्तव्यभावना आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश देणारा जीवनमार्ग आहे. आजच्या काळातील पिढीला रामायण ही फक्त प्रभू श्रीरामाची गोष्ट वाटते. मात्र रामायण म्हणजे केवळ कथा नसून श्रीरामाने आचरणात आणलेला आदर्श मार्ग आहे, असे मत निरुपणकार डॉ. धनश्री लेले यांनी व्यक्त केले.

ग्रंथ पारायण दिंडी पुणे च्यावतीने अयोध्या येथे झालेल्या रामरक्षा पठण वर्षपूर्ती, चातुर्मासातील व्रताची सांगता आणि घरोघरी रामरक्षा स्तोत्र पठाणाच्या संकल्पपूर्ती निमित्त सदाशिव पेठेतील गीता धर्म मंडळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, रा.स्व.संघ कसबा भाग संघचालक प्रशांत यादव, डाॅ. संजीव डोळे, संस्थेचे विरेंद्र कुंटे, नंदकुमार देव आदी उपस्थित होते. यावेळी देव, देश आणि धर्मासाठी कार्य करणाऱ्या संस्था आणि शालेय संस्थांचा सन्मान करून त्यांना मदतनिधी प्रदान करण्यात आला. श्री यशोधन नागरी सहकारी पतसंस्था पुणे व चौफेर प्रतिष्ठान यांचे सहाय्य लाभले.

डॉ. धनश्री लेले म्हणाल्या, जीवनात वेळेचे खूप महत्व सांगितले आहे. जर आपण ठराविक वेळेनुसार आहार घेतला तर शरीरात जैविक घड्याळे तयार होतात आणि त्या विशिष्ट वेळीच आपल्याला भूक लागते. म्हणून उपासना देखील ठराविक वेळेला केल्यास मनालाही त्या वेळेची सवय लागते आणि उपासनेची भूक निर्माण होते. ज्या वेळेला आपण नियमित उपासना करतो, त्या वेळेला परमेश्वरही आपल्या भक्तीची वाट पाहतो. आपण त्यावेळेला उपासना न केल्यास परमेश्वरच आपल्या नावाने हाक मारतो, असेही त्यांनी सांगितले.

प्रशांत यादव म्हणाले, आपल्या ग्रंथांमध्ये कर्तव्याचा स्पष्ट उपदेश देण्यात आला आहे. देव, देश आणि धर्म ही जीवनशैली प्रत्येकाने मनापासून स्वीकारली पाहिजे आणि ती दैनंदिन व्यवहाराचा भाग झाली पाहिजे. जर प्रत्येकाने या मूल्यांचे पालन केले तर भारताला महासत्ता होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. कृषीकेश रावले म्हणाले, या अशा संस्थांच्या कार्याची प्रेरणा घेवून प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून काम केले पाहिजे. मी देखील पुणे शहरासाठी काम करताना तुमच्याकडून येणाऱ्या सूचनांचा स्विकार करून काम करीन, असेही त्यांनी सांगितले.

विरेंद्र कुंटे म्हणाले, अयोध्या येथे झालेल्या रामरक्षा पठण वर्षपूर्ती, चातुर्मासातील व्रताची सांगता आणि घरोघरी रामरक्षा स्तोत्र पठाणाच्या संकल्पपूर्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त प्रत्येक घरात रामरक्षा पठण झाले पाहिजे या संकल्पाची पूर्ती झाली असली तरी देखील पुढे देखील ते कार्य असेच सुरू रहावे व जास्तीत जास्त नागरिक या संकल्पात जोडले जावेत असे प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले. अलका विंझे यांनी सूत्रसंचालन यांनी केले. विरेंद्र कुंटे यांनी आभार मानले.

प्रिंट तिकीट बंद, डिजिटल तिकिटाचा मेट्रोहट्ट: वृद्धेची आबाळ, ‘आप’ संतापली, मेट्रोला शहाणी हो, म्हणाली…

पुणे- डिजिटल इंडिया होत असताना पुण्यात काही अधिकारी एकीकडे निवडणूक आयोगाच्या नावाने डिजिटल मिडीयाला विरोध करत आहेत आणि प्रिंट ला पायघड्या घालीत आहेत तर दुसरीकडे मेट्रोने काल अचानक येरवडा मेट्रो स्टेशन वर प्रिंट तिकीट देणे बंद केले आणि डिजिटल म्हणजे मोबाईलवर तुमच्या डिजिटल तिकीट घेण्याचा आग्रह सुरु केला यामुळे अत्यंत साधा मोबाईल असलेल्या एका आजीबाईंची मोठ्ठी पंचाईत झाली पण इथे मात्र मेट्रोने डिजिटल इंडिया चा धोशा लावला आणि तुमच्या मोबाईल वर वॉट्सअ‍ॅपवर २ तिकिटे पाठविल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला . आज्जीबाई कडे ना whatsaap ना इन्टरनेट , साधा मोबाईल … त्यांनी पेपर तिकीट देण्याची विनंती केली असता, उपस्थित कर्मचारी भूषण शिंदे, रणजीत तावडे, जितेंद्र रामटेके, प्रवीण इंगळे यांनी तिकीट देण्यास नकार देत अवमानकारक वर्तन केले.या घटनेने आम आदमी पार्टीने संताप व्यक्त केला असून …. जिथे प्रिंट तिकीट देणे आवश्यक आहे तिथे असला शहाणपणा चालणार नाही असा इशारा आम आदमी पार्टीने यावेळी दिला

राज्य समन्वयक अमित म्हस्के,शहर उपाध्यक्ष श्रद्धा शेट्टी,शहराध्यक्ष, कामगार आघाडी संजय कोनेसंघटन सह-मंत्री मनोज शेट्टी,युवा आघाडी सचिव ॲड. रवी वडमारे,सदस्य अरुण केदारी यांनी येथे धाव घेतली आणि मेट्रोला सुनावले आहे.

या प्रकरणी ते म्हणाले,दिनांक २४/११/२०२५, सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता, पक्षाचे संघटन सहमंत्री मनोज शेट्टी यांच्या आई व आज्जी पुणे मेट्रोने प्रवास करण्यासाठी येरवडा मेट्रो स्टेशन येथे तिकीट काढण्यासाठी गेल्या असता अत्यंत गंभीर अशी घटना घडली.तिकीट काउंटरवर असताना एका महिला कर्मचारीने त्यांच्या मोबाईलवर डिजिटल पद्धतीने वॉट्सअ‍ॅपवर दोन प्रवासी तिकीट डाउनलोड करून दिले.
मात्र संबंधित प्रवासी निरक्षर आणि वयवृद्ध असल्याने त्यांच्याकडे फिचर फोन (साधा मोबाईल) होता व डिजिटल तिकीट वापरणे त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे पुढील प्रवास कसा करायचा, असा प्रश्न शेट्टी यांनी कर्मचाऱ्यांना विचारला.पेपर तिकीट सुविधा बंद असल्यामुळे हा त्रास निर्माण झाला असून पुणेकरांना डिजिटल तिकीटाच्या नावाखाली होणारा त्रास असह्य आहे.यामुळे आम आदमी पार्टीने पुणेकरांच्या सोयीसाठी आणि विशेषतः वरिष्ठ नागरिक,निरक्षर प्रवासी,फिचर फोन वापरणारे नागरिक आणि ज्यांना हवे त्यांना सर्व मेट्रो स्टेशनवर पेपर तिकीट तात्काळ सुरू करावे.अन्यथा…पेपर तिकीट सुरू न झाल्यास आम आदमी पार्टी च्या वतीने मेट्रो रोको आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा दिला आहे.

संविधान दिनानिमित्त राज्यातील शाळांमध्ये मूल्याधारित उपक्रम राबविण्याचे आवाहन

पुणे दि. 25 : दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस २०१५ पासून संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मसुदा समितीच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस विशेषत्वाने पाळला जातो. यावर्षीही २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा मध्ये संविधान दिन साजरा करण्याच्या सूचना श्री. राहुल रेखावार,संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी केल्या आहेत.
२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाशी सुसंगत पुढीलप्रमाणे उपक्रम राबवावेत. यात संविधान प्रभात फेरी, संविधान व्याख्यानमाला- सेमिनार, संविधान विषयक चित्रकला पोसटर स्पर्धा, संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा, संविधान विषयक पथनाट्य, पोवाडा-गणी सादरीकरण, मानवी साखळी निर्मिती, हस्तकला स्पर्धा आदि स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावेत. तसेच संवैधानिक मूल्यांवर शपथवाचन,संविधान प्रस्तावनेचे वाचन,लोकशाही मूल्यांवरील चित्रकला, निबंध, घोषवाक्य स्पर्धा,संविधान विषयक व्याख्यान, परिसंवाद,न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता याबाबत चर्चा सत्रे इ. उपक्रम राबवावेत.

अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्वाची जाणीव, सामाजिक जबाबदारी, सहकार्य, सामाजिक संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्यांची दृढ स्थापना होईल. परिणामी संविधान दिन हा मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अनुभव देणारा प्रभावी दिवस ठरेल असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, यांनी आपल्या परिपत्रकात नमुद केले आहे.

धुरंधर ट्रेलरवरील प्रचंड मागणीनंतर ‘इश्क जळाकर – कारवाँ’ प्रदर्शित

१८ नोव्हेंबरला रिलीज झालेल्या धुरंधर ट्रेलरने यूट्यूबवर तब्बल ५० दशलक्ष+ (50 million+) व्ह्यूज मिळवत प्रचंड गाजावाजा निर्माण केला. त्यानंतर प्रेक्षकांकडून आलेल्या प्रचंड मागणीमुळे सारेगामा, जिओ स्टुडिओ आणि B62 स्टुडिओ यांनी बहुप्रतिक्षित ट्रॅक ‘इश्क जळाकर – कारवाँ’ तातडीने रिलीज करण्याचा निर्णय घेतला.

ट्रेलर जसेच रिलीज झाले, प्रेक्षक तत्क्षणी त्यातील दमदार कव्वालीच्या मोहक सुरांनी भारावून गेले. शश्वत सच्चदेव आणि रोशन लाल यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत, महान रोशन लाल यांच्या सदाबहार क्लासिक ट्रॅकची परंपरा पुढे नेतं—एक असं गीत जे आजही तितकंच प्रभावी असून सारेगामाच्या अमर संगीत ठेव्याचा भाग आहे.

ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही तासांतच चाहत्यांनी गाण्यावर स्वतःचे एडिट्स, रील्स आणि शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर ओतल्या, तसेच टीमला पूर्ण गाणे लवकर रिलीज करण्याची विनंती केली. शश्वत सच्चदेव, शहझाद अली, शुभदीप दास चौधरी आणि अरमान खान यांच्या दमदार आवाजात साकारलेले आणि साहिर लुधियानवी तसेच समकालीन गीतकार इरशाद कामिल यांनी लिहिलेले हे नव्याने साकारलेले संस्करण प्रेक्षकांच्या मनाला थेट भिडले.

संगीतासोबतच रणवीर सिंगच्या स्क्रीन प्रेझेन्सला मिळालेली जबरदस्त दाद आणि धुरंधरभोवती वाढणारी उत्सुकता यांनी या गीताचा व्हायरल वेग आणखी वाढवला. शश्वत सच्चदेव यांच्या धाडसी आधुनिक सादरीकरणाचे नेटिझन्सनी कौतुक केले, ज्यामुळे गाणे अधिकृत रिलीजपूर्वीच पॉप-कल्चर चर्चेत पोहोचले.

प्रतिक्रियेबद्दल बोलताना दिग्दर्शक आदित्य धर म्हणतात,
“जे एका साध्या झलक म्हणून सुरू झाले होते, ते प्रचंड उत्साहाच्या लाटेत परिवर्तित झाले. आम्ही ‘इश्क जळाकर – कारवाँ’ इतक्या लवकर रिलीज करायचा विचार केला नव्हता, पण त्या छोट्या स्निपेटला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाने आम्हाला पर्यायच उरला नाही — गाणे लगेचच रिलीज करावे लागले!! शश्वतने ‘ना तो कारवाँ की तलाश’ या क्लासिकला अप्रतिम रीइमॅजिन केले आहे, आणि आता प्रेक्षकांना धुरंधरची आत्मा पकडणारा हा ट्रॅक ऐकायला मिळणार याचा आम्हाला आनंद आहे.”

आदित्य धर दिग्दर्शित आणि ज्योती देशपांडे व लोकेश धर निर्मित धुरंधरचा संपूर्ण संगीत अल्बम सारेगामाकडे आहे. हा चित्रपट ५ डिसेंबरला जगभरात थिएट्रिकल रिलीजसाठी सज्ज आहे.

म्युझिक व्हिडिओ सारेगामा म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे आणि ऑडिओ सर्व प्रमुख म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.

चिकनपेक्षा झाला महाग शेवगा,दर विक्रमी 400 ते 500 रुपयांवर पोहोचले

पुणे-पुणे मार्केट यार्डातील शेवग्याची आवक तब्बल 90 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे शेवग्याने चिकनला मागे टाकत बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सध्या पुण्यात चिकन 220 ते 250 रुपये किलोने मिळतंय, तर शेवगा मात्र 400 ते 500 रुपये किलोने विकला जात आहे.

सोलापूर जिल्ह्यात शेवग्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पण लांबलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे सोलापूरसह अनेक भागांतील शेवग्यांचे पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे शेवग्याचा यंदाचा हंगाम विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे. एरवी घाऊक बाजारात दररोज 4 ते 5 हजार किलो शेवग्याची आवक होत असते. पण सोमवारी केवळ 400 ते 500 किलो शेवगा आला. ही अल्पशी आवक केवळ आंध्र प्रदेशातून आली. यामुळे गत आठवड्यात जो शेवगा 140 ते 150 किलो दराने मिळत होता. तो आता थेट 500 रुपयांवर पोहोचला आहे.

घाऊक बाजारात 10 किलो शेवग्याला 3000 चा भाव मिळत आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडत संघटनेचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ आणि ज्येष्ठ व्यापारी रामदास काटकर यांनी ही माहिती दिली. मागणीच्या तुलनेत आवक अतिशय कमी झाल्यामुळे ही दरवाढ झाली. उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईसह राज्यभरातील दाक्षिणात्य उपहारगृह चालकांकडून सांबार, रसमसाठी शेवग्याला वर्षभर मोठी मागणी असते. दररोज मोठी खरेदी करणारे हे व्यावसायिक आता वाढलेल्या दरामुळे चिंतेत सापडले आहेत.

शेवगा उष्ण असल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत गृहिणींकडून शेवग्याला मोठी मागणी असते. मधुमेह व इतर आजारांसाठीही शेवगा गुणकारी असल्याने त्याचा वापर वाढला आहे. त्यातच आता शेवग्याला सोन्याचा भाव आल्यामुळे ही आरोग्यदायी भाजी आता सर्वसामान्यांच्या ताटातून हद्दपार होण्याची भीती वाढली आहे.

SC ची ओबीसी आरक्षणावरील सुनावणी पुन्हा लांबली:आता शुक्रवारी सुनावणी; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील टांगती तलवार कायम

मुंबई-महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणाऱ्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आज (25 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली. केंद्र सरकारतर्फे हजर असलेल्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारला अधिक माहिती गोळा करण्यासाठी थोडा अतिरिक्त वेळ देण्याची विनंती केली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी नियोजित केली. या निर्णयामुळे आधीच लांबलेल्या आरक्षण प्रक्रियेत पुन्हा एकदा विलंब झाला असून, राज्यातील निवडणुकांवर अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे.

याचिकाकर्त्यांनी सुनावणीदरम्यान ठामपणे सांगितले की, अनेक नगरपरिषदांमध्ये 50 टक्क्यांच्या मर्यादेचे उल्लंघन होत आहे आणि निवडणूक प्रक्रिया आधीच सुरू असल्याने आणखी वेळ देणे अयोग्य आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत पार गेल्यामुळे उमेदवार निवडणूक प्रक्रियेत सक्रिय झाले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. बांठिया आयोगापूर्वीच्या परिस्थितीत ओबीसी आरक्षण अस्तित्वात नव्हते आणि त्या काळातील कायदा सर्वोच्च न्यायालयानेच निश्चित केला होता, अशीही आठवण याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला करून दिली. त्यामुळे या टप्प्यावर बदल करणे योग्य नाही आणि वेळ वाढवून घेण्यामागे हेतुपुरस्सर विलंब दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, निवडणूक आयोगानेही सुनावणीत बाजू मांडताना सांगितले की, न्यायालयाने जर आज कोणताही निर्णय दिला तर आयोगाला नव्या आरक्षण वर्गवारीनुसार पुढील प्रक्रिया करावी लागेल. त्यामुळे स्पष्ट निर्देश मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, निवडणुका केवळ न्यायालयाने दिलेल्या अंतिम आदेशानुसारच पार पडतील आणि कोणतीही तातडीची भूमिका आज जाहीर करणे शक्य नाही. अखेर न्यायालयाने सर्वांचे मुद्दे ऐकून सुनावणी शुक्रवारी दुपारी 12 वाजता ठेवली आणि तोपर्यंत सर्व पक्षकारांनी संबंधित माहिती तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे निर्देश दिले. आता शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचे राजकीय वातावरण आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

मागील सुनावणीत कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांना जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात नोटिफिकेशन काढण्यासाठी काही काळ थांबण्याची विनंती केली. त्यामुळे या प्रकरणी सुनावणीपर्यंत नोटिफिकेशन निघणार नाही हे स्पष्ट झाले होते.

या प्रकरणी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकल बॉडीजचे नोटिफिकेशन अद्याप जाहीर झाले नाही. त्यामुळे कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांना नोटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याची विनंती केली. त्यानुसार, निवडणुकीची सध्याची प्रक्रिया आहे तशीच सुरू राहील, पण त्याचे निकाल जाहीर होणार नाहीत. या निवडणुकांना कोणतीही स्थगिती नाही. पण ज्या नवीन निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत, त्यावर मात्र निवडणुकीचे नोटिफिकेशन जाहीर होणार नाही. या सुनावणीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा उल्लेख झाला नाही. पण महापालिका निवडणुकीचे नोटिफिकेशन आले नसल्याचे सांगण्यात आले. याचा अर्थ असा होतो की, यापुढे जिल्हा परिषदेचे नोटिफिकेशनही निकालापर्यंत जाहीर होणार नाही.

या प्रकरणी यापूर्वी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्याने मराठवाड्यातील अनेक पालिकांमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षण लागू केल्यानंतर आरक्षणाचा टक्का वाढल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. विकास गवळी यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमला बागची यांच्या खंडपीठाने सुनावणीत संताप व्यक्त केला होता. त्यात कोर्ट म्हणाले होते की, त्यांच्या पूर्वीच्या आदेशातच म्हटले होते की, बांठिया आयोगाच्या आधी जी परिस्थिती होती, त्यानुसारच निवडणूक घ्याव्यात. म्हणजेच, ओबीसी आरक्षण नसतानाचा आराखडा वापरला पाहिजे. परंतु सरकारने या आदेशाचा सोयीचा अर्थ काढून आरक्षण वाढवले, अशी कठोर टिप्पणी न्यायालयाने केली.

या सुनावणीत अनेक मुद्द्यांवर तीव्र चर्चा झाली. राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे आणि काही मुदती वाढवता येणार नाहीत. मात्र, न्यायालयाने त्यांच्या या कारणांवर समाधान व्यक्त केले नाही. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, आमचा आदेश अगदी सरळ होता, पण तुमच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ केला आहे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण गेलं तर निवडणूक प्रक्रियाच आम्ही रोखू शकतो. न्यायमूर्ती जॉयमला बागची यांनीही घटनेतील आरक्षण मर्यादेचा उल्लेख करून सरकारला खबरदारीचा इशारा दिला. राज्य सरकारने अधिक वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने आज पुढील सुनावणी ठेवली असून त्यानंतर निवडणुकीचे भविष्य ठरणार आहे.

सध्या न्यायालयीन सुनावणीचे पुढील टप्पे निर्णायक ठरणार आहेत. न्यायालयाने आरक्षण मर्यादा पाळण्याचे आदेश पुन्हा कडकपणे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे सरकार आता कोणता निर्णय घेते, बांठिया आयोगाचा अहवाल कसा मांडते आणि न्यायालयाची प्रतिक्रिया काय असते, यावरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वेळेवर होतील की थांबवण्यात येतील, हे अवलंबून आहे. सर्वसामान्य नागरिक, उमेदवार आणि राजकीय पक्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा करत आहेत.

औंध, बोपोडी परिसरातील वाहतूक व्यवस्था दुर्लक्षितअतिरिक्त पोलीस आयुक्तांना निवेदन

पुणे-औंध रोड, बोपोडी, खडकी स्टेशन परिसरात वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत. या परिसरातील वाहतुकीचे नियोजन व्यवस्थितपणे केलं जात नाही त्यामुळे भविष्यात हा रस्ता मृत्यूचा सापळा होऊ शकतो. त्यामुळे आपल्या वतीने आपण वाहतूक सुरळीत करावी व लोकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती करणारे पत्र आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील यांना दिले . यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे संघटक शेलार उपस्थित होते.मनोज पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचना करत याबाबत ठोस उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या. याच आशयाचे पत्र सोमवारी महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनाही माने यांनी दिले. या पत्राद्वारे त्यांना ही कामे तातडीने हाती घेण्याची विनंती केली.
त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने दिलेल्या सूचना
१. चंद्रमणी नगर ते खडकी स्टेशनपर्यंत नव्याने रस्ता तयार करणे अतिशय आवश्यक आहे.
२. ⁠पाटील कॅाम्प्लेक्सच्या समोर रस्ता ओलांडण्याची सोय आणि बॅरिकेटींग. तसेच दोन्ही बाजूंना स्पीडब्रेकरची व्यवस्था.
३. ⁠गणेश मंदिर येथे तातडीने स्पीडब्रेकरची दोन्ही बाजूंना सोय करणे.
४. ⁠औंधरोड- सांगवी नवीन पुलाला ॲप्रोच रस्ता तयार करणे
५. ⁠खडकी रेल्वेस्टेशन येथील दुरुस्ती, पार्किंग व्यवस्था आणि सिग्नल
६. ⁠रेल्वेस्टेशनचे नवीन गेट केवळ शंकर मंदिरासमोर खुले करून तेथेच पार्किंग व्यवस्था करणे. आदी मागण्या या निवेदनाद्वारे केल्या.


मुख्य निवडणूक आयोग’ निवड प्रक्रियेतून, न्यायसंस्थेला वगळणाऱ्यांनी, न्यायसंस्थेच्या अनादराचे आरोप काँग्रेसनेते राहुल गांधी वर करणे अतार्किक व हास्यास्पद..!

‘त्रिसदस्य समितीतुन’ मुख्य न्यायाधीशांना का वगळले(?) याचे सत्ताधाऱ्यांनी ऊत्तर द्यावे..!

पुणे :
मुख्य न्यायाधीशांच्या शपथ विधी’ला ऊपस्थित राहू न शकल्याने भाजप नेते ‘विरोधीपक्ष नेते राहुलजी गांधी’ यांचेवर ‘न्यायसंस्था व संविधाना’प्रती अनादर केल्याचा तथ्यहीन व हास्यास्पद आरोप करीत असुन, सत्ताधारी नेते हेच् सर्वप्रथम नैतिक संकेत पाळत, ‘न्यायसंस्थेचा व विरोधीपक्ष नेत्या’चा किती आदर करतात(?) याचे प्रथम आत्मचिंतन करावे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिली.
या पुर्वीच्या ‘मुख्य न्यायमूर्तींच्या शपथविधी समारंभास’ विरोधी पक्ष नेते राहुल गांधी वेळोवेळी उपस्थित राहिलेले आहेत, या कडेही त्यांनी लक्ष वेधले.
त्यांचे अनुपस्थितीचे समर्थन करत नाही, मात्र काही व्यक्तिगत समस्येमुळे ते उपस्थित राहू शकले नसतील, असे सांगत या अनुपस्थितीचे राजकारण करणाऱ्या ‘सत्ताधारी भाजप नेत्यांना’ काँग्रेस ने फैलावर घेतले.
देशाच्या लोकशाही मार्गाचा पाया असलेल्या ‘मुख्य निवडणूक आयोगाची’ निवड करणाऱ्या, ‘पंतप्रधान, विरोधीपक्ष नेते व (न्यायसंस्थेचे प्रतिनिधी नात्याने) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अशा “त्रिसदस्य निवड समितीतुन” सरन्यायाधीशांना वगळुन, ‘सत्तापक्षाचे पंतप्रधान’ असताना देखील, ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहां’ना का घेतले (?) याचे सत्ताधाऱ्यांनी ऊत्तर द्यावे, मगच राहुल’जीं वर टिका करावी..अन्यथा न्यायसंस्थेवर व त्यांच्या अधिकार – निर्णयावर टिका करणाऱ्या व दबाव आणणाऱ्या ‘सत्ताधारी भाजप’ला विरोधी पक्ष नेत्याच्या अनुपस्थिती बद्दल विचारण्याचा नैतिक अधिकार नाही असे ही काँग्रेस वरींष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे. सदर चे बिल पास करताना ज्या सत्ताधारी पक्षाने लोकशाहीचा गाभा असलेल्या संसदीय चर्चेला तिलांजली देली व शेकडो खासदारांचे मनमानी पद्धतीने निलंबन करून हुकूमशाही पद्धतीने सदरचे विधेयक पास केले व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना निवड समितीत घेतले व त्यांचेच् हाता खाली काम केलेल्या सहकार खात्याचे सचिव राहिलेल्या  ज्ञानेश कुमार (गुप्ता) ना मुख्य निवडणूक आयोग नेमून त्यांचे मार्फत निवडणूक यंत्रणेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करुन जनतेच्या लोकशाही व संविधानीक हक्कांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सत्ताधारी नेत्यांना व प्रवक्त्यांना, विरोधीपक्ष नेत्यांवर टिका करण्याचा नैतिक अधिकार नाही.
तसेच “संविधानीक संस्थांची स्वायत्तता व लोकशाही मुल्याचे रक्षणा” बाबत सार्वजनिक जीवना (Public Domain) मध्ये येणाऱ्या अनेक बाबींची नोंद न्यायालयाने (सुमोटो) स्वतःहून घेण्याचे अधिकार ही ‘भारतीय राज्यघटनेने’ न्यायसंस्थेस दिले असल्याचे व न्यायसंस्थेकडून तशी अंमलबजावणीची अपेक्षा असल्याचे काँग्रेस वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदन म्हंटले आहे.

पुणे जिल्ह्यात शासकीय वसतिगृह प्रवेश अपात्र विद्यार्थ्यांना,स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पुणे दि. 25 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या पुणे जिल्ह्यातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यासाठी ऑनलाईन पोर्टलवर ‘Sent Back’ टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

त्याअनुषंगाने पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थी यांनी संबंधित शासकीय वसतिगृहाचे गृहप्रमुख आणि गृहपाल यांच्याशी संपर्क साधावा. तसेच तालुका स्तरावरील विद्यार्थ्यांनी संबंधित तालुक्यातील शासकीय वसतिगृह गृहपालांशी संपर्क करून दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ‘Sent Back’ चा पर्याय निवडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

अखिल भारतीय वन क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये महाराष्ट्र वन विभागाची उत्कृष्ट कामगिरी

पुणे दि. 25 : डेहराडून, उत्तराखंड येथे आयोजित २८ व्या अखिल भारतीय वन क्रीडा संमेलन २०२५ मध्ये महाराष्ट्र वन विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्राने या स्पर्धेत ३१ सुवर्ण, २६ रौप्य आणि २० कांस्य अशी एकूण ७७ पदके जिंकत २८६ गुणांसह देशात चौथे स्थान पटकावले. तसेच राज्यातील १३ क्रीडापटूंनी चौथे स्थान मिळवत भक्कम कामगिरीची नोंद केली.

रायपूरमध्ये पार पडलेल्या २७ व्या AIFSM 2024 मधील ८ व्या स्थानावरून महाराष्ट्राने यंदा थेट ४ थ्या स्थानावर झेप घेतली आहे.

या यशात राज्यातील ४ वन प्रशिक्षण संस्था आणि २ वन अकादमींतील प्रशिक्षणार्थींचा मोलाचा वाटा असून त्यांनी एकूण २७ पदके मिळवली. विविध ट्रॅक आणि फील्ड स्पर्धांमध्ये—धावणे, लांब पल्ला, रिले, मॅरेथॉन, लांब उडी, रेस वॉक, आलाफेक, भारोत्तोलन आणि पॉवरलिफ्टिंग—यामध्ये प्रशिक्षणार्थींनी ९ सुवर्ण, १० रौप्य आणि ८ कांस्य पदके जिंकली.

एकूणच, महाराष्ट्र वन विभागाच्या प्रशिक्षणार्थींच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र वन विभाग शिक्षण आणि प्रशिक्षण शाखेतर्फे सर्व विजेत्या खेळाडू, प्रशिक्षक व प्रशिक्षण संस्थांचे अभिनंदन करण्यात आले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज सुरळीत

  • व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख

पुणे दि. 25 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र (LOI) वितरण तात्पुरते स्थगित असले तरी, इतर सर्व कामकाज सुरळीत सुरू असून लाभार्थ्यांना देण्यात येणारा व्याज परतावा कोणत्याही अडथळ्याविना नियमितपणे वितरित केला जात आहे. सप्टेंबर 2025 अखेर होल्ड किंवा ब्लॉक केलेल्या प्रकरणांव्यतिरिक्त सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात व्याज परताव्याची रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

काही माध्यमांमध्ये महामंडळाचे कामकाज थांबले असल्याच्या प्रसारित बातम्यांवर स्पष्टीकरण देताना महामंडळाने स्पष्ट केले की, नवीन पात्रता प्रमाणपत्र प्रक्रीयेतील काही तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. मात्र, व्याज परतावा आणि बँक मंजुरीसंबंधित प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे.

अशा गैरव्यवहारांना आळा बसावा म्हणून महामंडळाने खाते प्रमाणिकरण( Account Validation) प्रणाली लागू करण्यास सुरुवात केली आहे. एजंटमार्फत दाखल झालेली संशयित प्रकरणे तात्पुरती ब्लॉक करण्यात आली आहेत. अशा लाभार्थ्यांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह संबंधित जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा. जिल्हा समन्वयकांचे संपर्क क्रमांक www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यापुढे नागरी सुविधा केंद्र वगळता, एकाच मोबाईल क्रमांक किंवा लॉगिनद्वारे केवळ एकच अर्ज दाखल करता येईल.

पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्रक्रियेमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा पूर्ण केल्यानंतर शक्य तितक्या लवकर नवीन पात्रता प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक यांनी दिली.

टीईटी पेपरफुटीच्या वृत्ताचे परीक्षा परिषदेकडून खंडन

पुणे, दि. २५: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २३ नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे नियंत्रण राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हा आयोजन व सनियंत्रण समिती कक्षाकडून अतिशय काटेकोरपणे करण्यात आले असून ‘‘टीईटी’ चा पेपर ३ लाखांत! शिक्षकांची टोळीच जेरबंद’ या आशयाच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या 24 नोव्हेंबर रोजीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने परिषदेकडून हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेत गोपनीयरित्या प्रश्नसंच तयार करून तज्ञांमार्फत स्वतंत्र पाकिटात सीलबंद केले जातात. तयार केलेल्या संचांपैकी यादृच्छिकपणे प्रश्नसंच निवडून गोपनीय मुद्रणालयाकडे दिला जातो. गोपनीय मुद्रणालयामार्फत प्रश्नपत्रिका छापून वर्गखोलीनुसार पाकिटे तयार करून केंद्रनिहाय बॉक्समध्ये सिलबंद पॅकिंग केले जाते. सदर बॉक्सेस सिलबंद गाड्यांमार्फत जिल्हा कस्टडीमध्ये पाठविले जातात. जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रश्नपत्रिकांची कस्टडी ही शक्यतो जिल्हा कोषागार कार्यालय असते अथवा सी.सी.टी.व्ही. व हत्यारबंद पोलिस बंदोबस्त असलेल्या ठिकाणी असते. गोपनीय मुद्रणालयाकडून आलेल्या प्रश्नपत्रिकांचे बॉक्स हे सिलबंद गाडीतून आले असल्याची व बॉक्सेस व्यवस्थित सिलबंद असल्याची खातरजमा करूनच जिल्हा परीरक्षक व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) याच्या उपस्थितीत, कस्टडीमध्ये सदर साहित्य घेतले जाते.

परीक्षेच्या दिवशी जिल्हा परीरक्षक व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या उपस्थितीत व्हिडीओ रेकॉर्डिंग (चित्रीकरण) करूनच झोनल ऑफिसरकडे केंद्रनिहाय प्रश्न पत्रिकांचे बॉक्स दिले जातात. झोनल ऑफिसर कस्टडी ते केंद्रावर सदर बॉक्सेस पोहोच करतांना या प्रवासाचेही चित्रिकरण केले जाते. केंद्रावर सदर बॉक्सेस मधून प्रश्नपत्रिकांची ब्लॉक निहाय पाकिटे काढून, ब्लॉकमध्ये सिलबंद पाकिटे वाटली जातात. उमेदवारांच्या, परीक्षार्थीच्या समोर सदर पाकिटे उघडली जातात. याच पद्धतीने या परीक्षेच्यावेळीही कार्यवाही झालेली आहे.

राज्यभरातून कोणत्याही ठिकाणाहून प्रश्नपत्रिकांची गाडी सिलबंद नसल्याबाबत अथवा गोपनीय प्रश्नपत्रिकांचे बॉक्सेस अथवा पाकिटे सिलबंद नसल्याची तक्रार प्राप्त झालेली नाही. अथवा असे निदर्शनास आले नाही. म्हणजेच गोपनीय मुद्रणालय ते परीक्षा केंद्र हा प्रश्नपत्रिकांचा प्रवास अत्यंत काटेकोरपणे झालेला दिसून येत आहे. या कोल्हापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे कामकाज उपरोक्त नमूद कार्यपद्धतीनुसार झाल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा या प्रकरणाशी संबंध नाही, असेही श्रीमती ओक यांनी स्पष्ट केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल

पुणे, दि. २५ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक (इयत्ता ५ वी) व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता ही परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेला राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक प्रविष्ठ झालेले असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

‘सिद्धी साधनेचा’ महाआशीर्वाद

पुणे : सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रह्मर्षी गुरुदेव हे तब्बल 68 दिवसांच्या महासाधने नंतर आपले दिव्य आशीर्वाद देण्यासाठी प्रथम पुण्यात येत आहेत. त्यांच्या सिद्धी साधनेच्या महाआशीर्वादाचा लाभ पुणेकरांना मिळावा यासाठी विश्व धर्म चेतना मंच,पुणे, पीसीएमसी परिवार यांच्या वतीने ‘सिद्धी साधनेचा महाआशीर्वाद’ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा येत्या 29 नोव्हेंबर रोजी शनिवारी सायंकाळी 5 वाजता, वर्धमान सांस्कृतिक केंद्र, गंगाधाम, कोंढवा रोड, बिबवेवाडी, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती आयोजक उत्तम बाठिया व सुमित चंगेडिया यांनी दिली आहे.

यावेळी सिद्धगुरुवर श्री सिद्धेश्वर ब्रह्मर्षी गुरूदेव यांचे व्याख्यान देखील होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोफत पासची व्यवस्था करण्यात आली असून ते कार्यक्रमस्थळी (स्वागत कक्ष येथे )दिले जाणार आहेत. या दिव्य सोहळ्याचा जास्तीत जास्त पुणेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.