Home Blog Page 3572

ऑरगॅनिक उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

0

सातारा (जिमाका) : जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून व शेतकऱ्यांच्या सहभागातून सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ऑरगॅनिक उपक्रमाचा शुभारंभ पंचायत समिती, सातारा येथे नुकताच पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल, उपाध्यक्ष रवि साळुंखे, पशुसंवर्धन सभापती शिवाजीराव शिंदे, पंचायत समितीचे सभापती कविता चव्हाण, आदी उपस्थित होते.
सेंद्रीय शेतीच्या प्रमाणीकणासाठी नोंदणी केलेल्या उत्पादक शेतकऱ्यांकडील शेतमालाची विक्री महिला बचत गटांमार्फत करण्यात येणार आहे. ही विक्री पंचायत समिती येथील डी.आर.डी.ए.कडील उभारण्यात आलेल्या गाळ्यांमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये सेंद्रीय पद्धतीने उत्पादीत केलेला भाजीपाला, गुळ, काकवी, चवळी, गहू, ज्वारी, मोहरी, हरभरा, डाळ, कांदा घेवडा विक्रीसाठी उपलब्ध आहे तसे सेंद्रीय पद्धतीने आवळा ज्यूस, फेस पॅक, शाम्पू, साबण देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
ऑरगॅनिक उपक्रम पंचायत समिती आवारात सुरु करण्यात आला असून हे विक्री केंद्र आठवड्यातून गुरुवार व रविवार या दोन दिवशी सुरु राहणार आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर क्षेत्रीय भेट देणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरणासाठी मदत करणे व कृषी विद्यापीठांमध्ये शेतकऱ्यांच्या सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा

0

सातारा (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.
मी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरुपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनियम करुन व संविधानिक मार्गानी सोडवीन, अशी प्रतिज्ञा यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, तहसीलदार चंद्रशेखर सानप, नेताजी कुंभारे, सविता लष्करे आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

11866413_1600835550177727_9006002740254501349_n

2015-16 साठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी 255.84 कोटी नियतव्यय -पालकमंत्री विजय शिवतारे

0

सातारा (जिमाका) : नियोजन विभागाने दिलेल्या मर्यादेनुसार 197.35 कोटीचा प्रारुप आराखडा तयार करुन राज्यस्तरीय बैठकीत सादर केला होता. या बैठकीत चर्चा होवून 58.49 कोटी वाढीव निधी देण्यात आल्याने सातारा जिल्ह्यासाठी सन 2015-16 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक नियतव्यय 255.84 कोटी रुपये अंतिम करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
येथील नियोजन भवनामध्ये जिल्हा नियोजन समितीची सभा आज झाली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. या बैठकीस विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, आनंदराव पाटील, महादेव जानकर, बाळासाहेब पाटील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, दिपक चव्हाण, प्रभाकर घार्गे, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी आमदार दिवंगत भाऊसाहेब गुदगे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेच्या सुरुवातीलाच सभापती श्री. नाईक-निंबाळकर यांनी राज्यात नव्याने होऊ घातलेल्या 22 जिल्ह्यांबाबत विशेषत: सातारा जिल्ह्यातून प्रस्तावित माणदेश जिल्ह्याबाबत माध्यमातून दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांबाबत खुलासा करण्याची मागणी केली. यावर पालकमंत्री श्री. शिवतारे म्हणाले, जनमाणसाच्या तसेच आपल्या सर्वांच्या भावना मुख्यमंत्री तसेच मंत्रीमंडळ यांच्यापर्यंत पोहोचविल्या जातील. निकष आणि नियमानुसार तसेच सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही पावले उचलली जाणार नाहीत. त्याचबरोबर सातारच्या जिव्हाळ्याचा असणारा वैद्यकीय महाविद्यालय आणि जिहे-कटापूर योजना पूर्ण होणार, अशी माहितीही श्री. शिवतारे यांनी सभागृहात दिली.
श्री. शिवतारे पुढे म्हणाले, नियोजन विभागाने दिलेल्या मर्यादेनुसार 197.35 कोटीचा प्रारुप आराखडा तयार करुन राज्यस्तरीय बैठकीत सादर केला होता. दि.11 फेब्रुवारी 2015 रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत या आराखड्यावरील योजनांवर चर्चा होवून 197.35 कोटीच्या आराखड्यात 58.49 कोटी रुपये वाढीव निधी देण्यात आला आहे. याप्रमाणे सन 2015-16 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक नियतव्यय 255.84 कोटी रुपये अंतिम करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. सन 2014-15 साठी जिल्ह्यासाठी एकूण 228 कोटी रुपये इतकी अर्थसंकल्पित तरतूद प्राप्त झाली होती. उपलब्ध प्राप्त तरतूदीपैकी 100 टक्के निधी खर्च झालेला आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरीच क्षेत्राचा माहे मार्च 2015 अखेरच्या खर्चाचा अहवाल सादर केला आहे. सन 2014-15 साठी मंजुर अर्थसंकल्पित तरतूद 124.30 कोटी होती. त्यापैकी रुपये 120.30 म्हणजेच रुपये 97.38 टक्के इतका खर्च झालेला आहे.सन 2014-15 साठी अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 4812 लक्ष रुपये अर्थसंकल्पित तरतुदीपैकी 3909.41 लक्ष रुपये तरतूद प्रत्यक्ष प्राप्त झाली होती. त्यापैकी मार्च 2015 अखेर 3899.21 लक्ष रुपये निधी खर्च करण्यात आलेला आहे. या तीनही उपयोजनांच्या खर्चास आजच्या सभेत मान्यता देण्यात आली.
कास पठार येथे स्थलांतरीत शौचालय सुविधा पुरविणे व रस्ता सुधारणा करणे, ओझर्डे धबधबा विकसीत करणे, महाबळेश्वर येथील पॉईंटच्या स्वच्छतेसाठी प्लॅस्टिक विल्हेवाट मशिन पुरविणे, 332 अंगणवाडी इमारत बांधकामास मान्यता देणे तसेच माण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आली. नाविन्यपूर्ण योजनेमधून जिल्ह्यातील न्यायालयाध्ये सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा बसविणे आणि पाझर तलाव दुरुस्तीसाठी यंत्रसामुग्री खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.
आजच्या या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी, निमंत्रीत, विशेष निमंत्रीत सदस्य उपस्थित होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित …

0

IMG-20150819-WA0010 Maharashtra_Bhushan_6 Maharashtra_Bhushan_11 Maharashtra_Bhushan_12

मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सगळ्यांना अभिमान वाटावे असे महान कार्य मागील 75 वर्षे केले असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशातच नव्हे तर जगभर पोहोचविला आहे. श्री. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणे हा एक गौरवाचा क्षण असून महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव जोडले गेल्याने या सन्मानाचे महत्व अधिकच वाढले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव केला.

सन 2015 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना बुधवारी राजभवन येथील दरबार हॉल येथे विशेष समारंभात राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, महापौर स्नेहल आंबेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अरविंद सावंत, खासदार संजय राऊत, सर्वश्री आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार महादेव जानकर, ॲड. आशिष शेलार, डॉ. नीलम गोऱ्हे, प्रताप सरनाईक यांच्यासह महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याच कार्यक्रमादरम्यान मान्यवर कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन प्रवास काही पोवाड्यातून सादर केला.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करुन आपल्या भाषणाची सुरुवात करणारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राजभवन येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रम का करण्यात आला असा सवाल उपस्थित केला जातो आहे. मला यानिमित्ताने सांगावेसे वाटते की, नवी दिल्ली येथे देशाचे सर्वोच्च नागरी सन्मान हे राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात प्रदान करण्याची परंपरा आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान राज्यपाल भवन म्हणजेच राजभवन येथे राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य शिवचरित्र आणि जाणता राजाच्या माध्यमातून श्री. पुरंदरे यांनी सर्वदूर पोहोचविले आहे. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाचे बीजारोपण त्यांनी याद्वारे केले आहे. जाणता राजा आणि शिवचरित्र वाचले की, तरुणांना राष्ट्रभक्ती शिकविण्याची गरज उरत नाही असे मला वाटते. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या सेवकाला राज्य शासनामार्फत सन्मानित करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपतींवरील सिनेमा, मालिकेस आर्थिक पाठबळ
मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे अनेक नेतृत्व गुण होते तसेच ते काळाच्या पुढे जाऊन विचार करीत. हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर त्यांनी राज्य कारभार कसा करावा याचे आदर्श धडे दिले आहेत. माझ्या मते आजच्या भाषेत बोलायचे झाले तर छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरु होते. त्यांनी दाखविलेली समयसूचकता, नियोजन, प्रशासकीय कौशल्य, व्यवस्थापन शास्त्र शिकण्यासारखे आहे. आजच्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य कळावे यासाठी त्यांच्यावर आधारित सिनेमा किंवा मालिका केल्यास त्याला राज्य शासनामार्फत आर्थिक पाठबळ दिले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
महाराष्ट्राला छत्रपती समजले ते बाबासाहेबांमुळे- विनोद तावडे
या कार्यक्रमात प्रास्ताविक करताना सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. तावडे म्हणाले, महाराष्ट्रात असे अनेक लोक आहेत ज्यांना कधी विचारले की तुम्हाला शिवाजी महाराजांची माहिती कशी मिळाली तर त्यांच्याकडून येणारे उत्तरे हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखनातूनच मिळाली, असे असते. यावरून बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला गाढा अभ्यास दिसून येतो. यावर्षी हा कार्यक्रम अधिक चर्चिला गेला. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की, बाबासाहेब पुरंदरे यांना शिवशाहीर ही पदवी सुमित्रा राजेंनी दिली होती. ही पदवी बाबासाहेबांना किती योग्य आणि समर्पक आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. आज या निमित्ताने सांगू इच्छितो की, आपण 10 कोटी रुपये खर्च करुन रायगड महोत्सवाचे आयोजन करीत आहोत. आजच्या पिढीला शिवकालीन इतिहास समजावा, हाच यामागचा उद्देश आहे. आज उच्च न्यायालयानेही बाबासाहेबांच्या कार्याचा सन्मान केला असून त्यांनी इतक्या वर्षांत केलेल्या कार्याचा गौरवच केला आहे, असेही श्री. तावडे म्हणाले.
बाबासाहेबांनी लिहिलेले शिवचरित्र वाचून चार पिढ्या समृद्ध झाल्या- सुभाष देसाई

मुंबईचे पालकमंत्री श्री. देसाई आपल्या भाषणात म्हणाले, आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या आनंदाच्या क्षणाचा मला साक्षीदार होण्याची संधी मिळाली, याचे मी भाग्य समजतो. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याने महाराष्ट्र भूषण ही मालिका अधिकच समृद्ध झाली आहे, असे मी म्हणेन. बाबासाहेबांनी लिहिलेले शिवचरित्र वाचून आणि ऐकून 4 पिढ्या समृद्ध झाल्या आहेत. त्यामुळे बाबासाहेबांच्या कार्याची महती परत परत सांगण्याची गरज नाही. यावेळी श्री. देसाई यांनी आपल्या भाषणात एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, एक दिवस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मला फोन आला आणि फोनवरुन त्यांनी मला चित्रकार वासुदेव कामत यांना त्यांच्या चित्र काढण्यासाठी आवश्यक असलेल्या सामग्रीसह मातोश्रीवर घेऊन येण्याच्या सूचना दिल्या. मी वासुदेव कामत यांना घेऊन मातोश्रीवर पोहोचलो असता तेथे बाबासाहेब पुरंदरे बाळासाहेबांबरोबर बसलेले होते. तेथे त्यांनी वासुदेव कामत यांना बाबासाहेब यांचे चित्र काढण्यास सांगितले. त्या दिवशी श्री. कामत यांनी ते चित्र काढल्यावर बाळासाहेबांनी स्वत: ते चित्र बाबासाहेबांना भेट दिले होते. आज जर शिवसेनाप्रमुख हयात असते तर ते नक्कीच श्री. पुरंदरे यांच्या सत्काराला राजभवन येथे उपस्थित राहिले असते. याच कार्यक्रमादरम्यान श्री. देसाई यांनी श्री. पुरंदरे यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनही केले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे मनोगतात म्हणाले, मला आज आनंद आहे की मी सोप्या आणि सरळ भाषेत केलेले लेखन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहे. कलाकाराने कधीही अहंकारी असू नये आणि सतत नवीन काहीतरी शिकण्याची तयारी ठेवावी आणि म्हणूनच आज मी जरी 94 वर्षांचा असलो तरी मला दररोज काहीतरी वाचावे, लेखन करावे असे सतत वाटत असते. राज्य शासनामार्फत देण्यात आलेला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार ही माझ्यासाठी आनंदाची आणि तितकीच जबाबदारीची बाब आहे. गेली 80 वर्षे करीत असलेले कार्य यापुढील काळातही सुरू ठेवून माझ्याकडून अधिकाधिक चांगले लेखन व्हावे यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. आज राज्य शासनामार्फत महाराष्ट्र भूषण या पुरस्काराबरोबरच 10 लाख रुपये मला रोख देण्यात आले असले तरी मी हे पैसे न घेता या पैशामध्ये माझे स्वत:चे 15 लाख रुपये घालून एकूण 25 लाख रुपये पुण्यातील मास्टर दिनानाथ आणि माई मंगेशकर रुग्णालयाला कॅन्सर रुग्णांच्या मदतीसाठी देणार आहे.

या पुरस्काराचे स्वरुप 10 लाख रूपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे. कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठित तज्ज्ञांच्या समितीने सन 2015 च्या या पुरस्कारासाठी बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांची निवड केली होती. बाबासाहेब गेली 70 वर्षे शिवचरित्रावर व्याख्यान देत असून आतापर्यंत त्यांनी 12000 हून अधिक व्याख्याने महाराष्ट्रासह जगभरात दिली आहेत. आतापर्यंत त्यांनी 25 हून अधिक ग्रंथ लिहिले आहेत. ऐतिहासिक महानाट्य ‘जाणता राजा’चे लेखन करणारे शिवशाहीर, ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत म्हणून ख्यातकीर्त असलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले लेखन लोकप्रिय आहे. संशोधनवृत्ती, संयम, चिकाटी व तीव्र स्मरणशक्ती, सखोल अभ्यासासह शिस्तबद्धता, वक्तशीरपणा ही त्यांच्या स्वभावाची खास गुणवैशिष्ट्ये. त्यांच्या विविध उपक्रमांमुळे महाराष्ट्राची गौरवशाली शिवकालीन परंपरा जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचली आहे. बाबासाहेब पुरंदरे वयाच्या 94 व्या वर्षीही त्याच तडफेने अफाट बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीच्या जोरावर शिवचरित्र आपल्या वाणीतून जिवंत उभे करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, चित्रकार वासुदेव कामत, पत्रकार राजीव खांडेकर, कीर्तनकार मंगलाताई कांबळे, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, ॲड. उज्ज्वल निकम यांचा समावेश होता. या समितीने बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाची शिफारस केली होती.

निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला राज्य शासनातर्फे दरवर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान असून हा पुरस्कार सन 1997 पासून देण्यात येतो. पु.ल.देशपांडे (साहित्य), लता मंगेशकर (संगीत), सुनील गावसकर (क्रीडा), डॉ. विजय भटकर (विज्ञान), सचिन तेंडूलकर (क्रीडा), भीमसेन जोशी (कला), डॉ. अभय बंग व राणी बंग (सामाजिक प्रबोधन), बाबा आमटे (सामाजिक प्रबोधन), डॉ. रघुनाथ माशेलकर (विज्ञान), रतन टाटा (उद्योग), रा. कृ. पाटील (सामाजिक प्रबोधन), मंगेश पाडगावकर (साहित्य), नानासाहेब धर्माधिकारी (समाज प्रबोधन), सुलोचना (मराठी चित्रपट), जयंत नारळीकर (विज्ञान), डॉ. अनिल काकोडकर (विज्ञान) यांनाही राज्य शासनामार्फत महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

 

60 परदेशी विद्यार्थ्यांनी सादरीकरणातून शोधला ‘अतुलनीय भारत’

0
‘अतुलनीय भारत’ विषयावर परदेशी विद्यार्थ्यांची
आयएमईडीमध्ये ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धा’
पुणे :
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’(आयएमईडी)मध्ये ‘आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सेल’च्या वतीने परदेशी विद्यार्थ्यांसाठी ‘पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्पर्धे’चे आयोजन केले होते. स्पर्धेचा विषय ‘अतुलनीय भारत’ हा होता. या स्पर्धेमध्ये एकूण 60 विद्यार्थी सहभागी झाले होते.
‘भारत हा विविधतेने नटलेला देश असून, त्याचे महान पैलू या परदेशी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून पहायला मिळाले. जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टि लक्षात आली. हे या स्पर्धेचे मोठे यश आहे’, असे प्रतिपादन डॉ. सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक) यांनी केले.
यावेळी डॉ.अजीत मोरे, राजलक्ष्मी वाघ (आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सेलच्या प्रमुख), डॉ. भारतभूषण सांक्ये आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
unnamed

1000 जिल्हा केंद्राचे विकसित हरित शहरात रूपांतर करण्याची गरज : अनंतराव अभंग

0
पुणे :
खेड्यातून मेगासिटीकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी देशातील 1000 जिल्हा केंद्रे प्रादेशिक संतुलित विकासाचा विचार केंद्रीभूत धरून ‘हरित विकसित शहरे’ करण्याची गरज आहे. त्यातून 70 टक्के राष्ट्रीय संपत्ती छोट्या शहरातून तयार होऊ शकेल’ असे प्रतिपादन ‘मित्र’ (मिशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन ऑफ रूबन एरिया) संस्थेचे प्रमुख अनंतराव अभंग यांनी केले.
ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक स्व. डॉ. वि. वि. तथा अप्पा पेंडसे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला काल ज्ञानप्रबोधिनीत प्रारंभ झाला. यानिमित्त ‘रूप पालटू देशाचे’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील प्रारंभीचे पुष्प अनंतराव अभंग यांनी गुंफले ‘एक हजार विकसित शहरे’ या विषयावर ते बोलत होते.
अनंतराव अभंग म्हणाले, ‘भारतात विकसनात्मक तत्त्वज्ञान (डेव्हलपमेंन्टल आयडियॉलॉजी) ची कमतरता आहे. त्यातून मोठ्या शहरांना आणखी खर्च करून मोठे बनवले जात आहे. त्या खर्चाच्या एक दशांश खर्चात जिल्हा केंद्रांसारखी प्रादेशिक समतोल विकास असलेली एक हजार हरित शहरे निर्माण होऊ शकतात.
त्यातून मोठ्या शहरांकडे होणारे स्थलांतर रोखता येईल. खेड्यांकडील रोजगार कमी झाल्याने थेट मोठ्या शहरांकडे स्थलांतर होत आहे. जिल्हा केंद्रे रोजगारासह विकसित केल्यास खेड्यातील युवकांना जिल्हा केंद्राच्या ठिकाणी रोजगार मिळेल, गावाकडे शेतीही करता येईल. यादृष्टीने हरीत उद्योग क्रांती देखील होण्याची गरज आहे.
भविष्यात 50 टक्के भारताचे शहरीकरण होण्याचा धोका आहे. 40 टक्के लोकांना झोपडपट्टीत राहावे लागत आहे. शहरात 80 कोटी लोकसंख्या राहील. पुण्याची लोकसंख्या 2 कोटी होईल. 20 वर्षांनी 40 कोटी विद्यार्थी शिक्षण घेतील. त्यातील 30 कोटी विद्यार्थ्यांना सेमी स्किल्ड, अनस्किल्ड प्रकारचा रोजगार निर्माण करावा लागेल.
यासाठी राष्ट्रीय धोरण तयार करावे लागेल. ‘मित्र’ संस्था यासाठी काम करीत आहे,’ असे त्यांनी सांगितले.
या व्याख्यानमालेत डॉ. सचिन गांधी यांनी ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्वरोउपचार’ या विषयावर व्याख्यान दिले. ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, डॉ. विवेक कुलकर्णी, प्रा. राम डिंबळे, अजित कानिटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना सुगंधी गोड दुधाचे वाटप

0

पुणे-अखिल भारतीय मजदूर कॉंग्रेसच्यावतीने पुणे कॅम्पमधील वजीर भगत संघेलिया चौकातील श्री जाहरवीर गोगादेव मंदिराजवळ शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना सुगंधी गोड दुधाचे वाटप संरक्षण विभागाचे मालमत्ता विभागाचे संचालक ए. भास्कररेड्डी यांच्याहस्ते करण्यात आले . या कार्यक्रमाचे संयोजन अखिल भारतीय मजदूर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनुप बेगी यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक विनोद मथुरावाला , नगरसेवक अतुल गायकवाड , मनजितसिंग विरदी , मन्नू कागडा , कैलाशकुमार , अरविंद चव्हाण , निखिल बेड , मुकेश चव्हाण , विशाल चव्हाण , घनश्याम सुसगोहेर , राज गौतम , अनिल चावरे , राजेश बागडी , अजय पिवाल , सुनिता गवळी , दिनेश चनाल , नवीन सुसगोहेर , संजय बेगी , रवि भिंगानिया , मनोज पटेलिया , वाहिद बियाबानी, अनिल चावरे , महेंद्र गायकवाड  आदी मान्यवर उपस्थित होते .

 नागपंचमी सणासाठी लाखो लीटर दुधाचे नुकसान होते , नाग दुध पीत नाही , त्याऐवजी तेच लाखो लीटरचे दुध अनाथ मुलांना , नागरिकांना वाटण्यात आले . समाजप्रबोधनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला .असे कार्यक्रमाचे संयोजन अखिल भारतीय मजदूर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनुप बेगी यांनी सांगितले .

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत कार्यक्रमाचे संयोजन अखिल भारतीय मजदूर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनुप बेगी यांनी केले तर सूत्रसंचालन विजय बेद यांनी केले तर आभार अरविंद चव्हाण यांनी केले .

डॉ. बाळकृष्ण दामले यांना ‘बेस्ट रिसर्च पेपर अ‍ॅवॉर्ड’ प्रदान

0
 
पुणे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक बहुमाध्यम केंद्रातील कार्यरत प्रा.डॉ.बाळकृष्ण दामले यांना ‘बेस्ट रिसर्च पेपर अ‍ॅवार्ड-2015’ प्रदान करण्यात  आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आले. यावेळी वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. सुधाकर जाधवर, डॉ.प्र.चिं.शेजवलकर, डॉ.बाबासाहेब सांगळे, डॉ. व्ही.बी.गायकवाड, डॉ. संजय कप्तान, डॉ. श्रीपाद कडवेकर, डॉ. शरद कोलते, डॉ.मुकुंद अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार प्रदान कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात पार पडला.
‘पुणे विद्यापीठाचे अनेक परदेशी विद्यापीठांशी सहकार्य करार होत असताना संशोधन, क्षमता विकसन आणि गुणवत्ता वाढीकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे’, असे प्रतिपादन यावेळी बोलताना कुलगुरूंनी केले.
‘जर्नल ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट थॉट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या डॉ. दामले यांच्या ‘अद्यापनात चित्रपट आणि नाट्याचा उपयोग’ या विषयावरील संशोधनपर लेखास हा पुरस्कार मिळाला आहे.
डॉ. संजय कप्तान हे सहलेखक आहेत. “ABEED’  जर्नलचे (Association for Business Education & Entrepreneurship Development’s Best Paper Award)संपादक डॉ.एस.व्हि.कडवेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

पुरंदरे यांच्या विरोधातील याचिका फेटाळली …

0

मुंबई – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण‘ पुरस्कार देण्यास विरोध करणारी याचिका आज (बुधवार) उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच याचिकाकर्त्यांना दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

पुरस्काराबाबत 1 सप्टेंबर 2012 च्या अध्यादेशाचे पालन करण्यात आले नाही, असा आरोप करण्यात आला होता. पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तीने ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने किमान 20 वर्षे विशेष आणि उल्लेखनीय काम करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्राबाहेरील व्यक्तीलाही पुरस्कार देता यावा यासाठी त्या व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे अशी अट ठेवण्यात आली आहे. ‘पद्म’ पुरस्कारप्राप्त मान्यवरांना त्यात प्राधान्य देण्याचाही निकष आहे, परंतु बाबासाहेब यापैकी एकाही निकषात बसत नाहीत, असा दावा याचिकाकर्ते पद्माकर कांबळे आणि राहुल पोकळे यांनी केला होता. तो कोर्टाने फेटाळून लावला. बाबासाहेब पुरंदरे यांचे कार्य फार मोठे आहे. त्यांना पुरस्कार नाकारावा असे याचिकाकर्त्यांकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत, त्यामुळे याचिकेत तथ्य नाही, असे सांगत कोर्टाने याचिका फेटाळली आणि कोर्टाचा वेळ नाहक वाया घालवला असेही याचिकाकर्त्यांना फटकारले. कोर्टाने याचिकाकर्त्यांना 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.पुरंदरेंच्या वतीने ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर यांनी युक्तीवाद केला. तर शेखर जगताप हे याचिकाकर्त्यांचे वकील होते. महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सुरुवातीपासून याचिका पब्लिसिटी स्टंट असल्याची भूमिका घेतली होती.पुरस्कार देताना सरकारने डॉ. प्रकाश आमटे, डॉ. हिंमतराव बावस्कर, डॉ. रवींद्र कोल्हे आदी पात्र व्यक्तींना डावलल्याचा अर्जदारांचा आरोप आहे. या याचिकेची सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्यासमोर झाली. नोकरदार पद्माकर कांबळे आणि शेतकरी व व्यावसायिक राहुल पोकळे यांची ही याचिका दाखल केली होती.

पुरस्कारासाठी योग्य व्यक्तींचा शोध घेणाऱ्या अशासकीय समितीसमोर आदिवासींसाठी काम करणारे डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे, विंचूदंशावर प्रतिलस शोधणारे डॉ. हिंमतराव बावस्कर, उद्योजक बाबा कल्याणी, डॉ. रवींद्र व स्मिता कोल्हे, अभिनेते दिलीपकुमार, अमिताभ बच्चन, आशा भोसले, राजदत्त आदींची नावे होती. यात पुरंदरे यांचे नाव नंतर घुसडण्यात आले, असा अर्जदारांचा दावा होता. या समितीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, राजीव खांडेकर आदी होते. न्यायालयाने याचिका फेटाळून लावताना सांगितले, की गेली पन्नास वर्षे पुरंदरेंचे काहीच काम नाही का.अर्जदार त्यांचे सर्व कार्य नाकारतात. सर्व उमेदवार पात्र असतात तेव्हा निर्णय तज्ज्ञ निवड समितीवरच सोडावा.

‘डबल सीट’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरूवात पाच दिवसांत पाच कोटींची कमाई

0

“स्वप्नं बघणा-या आणि जगणा-या माणसांची गोष्ट” असलेल्या ‘डबल सीट’ चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने पहिल्या पाच दिवसांत पाच कोटींची कमाई करत दणक्यात सुरूवात केली आहे. क्षितिज पटवर्धन यांची साधी सोपी कथा आणि समीर विद्वांसचे दिग्दर्शन आणि अंकुश चौधरी, मुक्ता बर्वेसह विद्य़ाधर जोशी , वदंना गुप्ते या कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयाने सजलेला १४ ऑगस्टला प्रदर्शित झालेला ‘डबल सीट’ चित्रपट सध्या महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांची मने जिंकतो आहे.

एस्सेल व्हिजनद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आलेला ‘डबल सीट’ चित्रपट गेल्या आठवड्यात राज्यात आणि राज्याबाहेर सुमारे तीनशे चित्रपटगृहांत झळकला. गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांतील महत्वाच्या शहरात सब टायटल्ससह प्रदर्शित झालेल्या ‘डबल सीट’ चित्रपटाला मराठी भाषिक प्रेक्षकांसोबतच अमराठी प्रेक्षकांचाही तेवढाच भरभरून प्रतिसाद मिळत आहे.  साधी सोपी कथा , श्रवणीय संगीत आणि सर्वच कलाकारांचा दमदार अभिनय या चित्रपटाच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. चित्रपटातील ‘किती सांगायचंय मला’, ‘मोहिनी’ आणि नव्या रूपात आलेलं ‘मन सुद्ध तुझं’ ही गाणी एफएम रेडिओ आणि संगीत वाहिन्यांवर टॉप लिस्टवर आहेत. सोशल नेटवर्क साइट्सवरही या चित्रपटाबद्दल प्रेक्षक उत्स्फूर्तपणे भरभरून बोलत आहेत.

मायानगरी मुंबईतील सामान्य जोडप्याची ही गोष्ट सर्वांनाच भावते आहे कारण ती त्यांच्या स्वप्नांची गोष्ट आहे. आपल्या रोजच्या जगण्यातील छोट्या स्वप्नांसोबतच आयुष्य बदलवून टाकणा-या एका मोठ्या स्वप्नाची आणि त्यासाठी घ्याव्या लागणा-या मोठ्या ‘उडीची’ ही गोष्ट. चित्रपटातील अमित आणि मंजिरीच्या आयुष्यातील या उडीचा हा समान धागा प्रेक्षकांना चित्रपटाशी जोडून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. ‘डबल सीट’ ला मिळालेल्या या यशाबद्दल एस्सेल व्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने म्हणाले की, “एका साध्या कथेला प्रेक्षकांनी दिलेला हा उदंड प्रतिसाद म्हणजे सर्व टीमच्या यशाची पावती आहे. मराठीमध्ये भव्य दिव्यतेपेक्षा चांगल्या कथानाकाला प्रेक्षक नेहमी प्राधान्य देतात हे या यशामाधून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.” तर दिग्दर्शक समीर विद्वांस म्हणाले की, “या चित्रपटाची कथा ही प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय ठरावी अशीच आहे. त्यामुळेच हा चित्रपट बनवताना तो प्रत्येकाला भिडावा असाच आमचा उद्देश होता. आज ‘डबल सीट’ ला मिळालेलं यश पाहता आम्ही आमच्या उद्देशात यशस्वी झालोय असं वाटतंय आणि याचा मला आणि पूर्ण टीमला खूप आनंद होतोय. प्रत्येक सामान्य माणसामध्ये एक ‘नायक’ दडलेला असतो. अशाच सामान्य स्त्री आणि पुरूषांमध्ये दडलेला ‘नायक’ बाहेर काढणारा आणि त्याच्यातील ‘स्पिरीट’ची जाणीव करून देणारा हा चित्रपट लोकांना आपलासा वाटतोय याबद्दल मनोमन आनंद होतोय.”

या यशाबद्दल चित्रपटाचा मुख्य अभिनेता अंकुश चौधरी म्हणतो की, “ एका सकारात्मक विचारातून तयार झालेली कथा आणि तो विचार प्रभावीपणे दिग्दर्शनातून मांडण्यात या चित्रपटाची टीम यशस्वी झाली आहे. एक चांगली कलाकृती बनली की प्रेक्षक तिला मनापासून प्रतिसाद देतातच. यामुळेच या चित्रपटाला मिळालेल्या यशाचं श्रेय मी लेखक क्षितिज पटवर्धन, दिग्दर्शक समीर विद्वांस आणि प्रेक्षकांना देतो.”

या आठवड्यात हिंदीमधील मोठ्या बॅनर्सच्या चित्रपटांचं तगडं आव्हान असतानाही ‘डबल सीट’ ची ही कामगीरी मराठी चित्रपटांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला मिळणारा जोरदार प्रतिसाद बघता येत्या काही दिवसांत हा चित्रपट काही नवे विक्रम प्रस्थापित करेल असं मत वितरण क्षेत्रातील जाणकार मंडळी व्यक्त करत आहेत.

एफटीआयआय विद्यार्थ्यांना अटक -राहुल गांधी -केजरीवाल ही संतापले … जामीन मंजूर ..

0

पुणे
-पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री फिल्म ऐंड टेलिविजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या कॅम्पसमध्ये प्रवेश करून १७ विद्यार्थ्यांपैकी पाच  जणांना अटक केलीत्यानंतर आज  न्यायालालाय्ने पाच विद्यार्थ्यांना जामीन मंजूर केला . पोलिसांनी मध्यरात्री १.१५ वाजता कॅम्पस प्रवेश करत ही कारवाई केली. मोदीजी!!  एफटीआयआयमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत,  गुन्हेगार नाहीत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी याबाबत ट्विट केलं आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही केंद्र सरकारच्या या कारभाराचा निषेध नोंदवत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. महत्वाचं म्हणजे जोवर केंद्र सरकार आपला हट्ट सोडत नाही, तोपर्यंत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीत येऊन आपल्या अभ्यासाशी निगडीत काम चालू ठेवावं. दिल्ली सरकार त्यांना आवश्यक त्या गोष्टी उपलब्ध करुन देईल, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठराबे यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घातल्याप्रकरणी आणि सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पाठराबे यांनी दिलेल्या तक्रारीत आपल्याला रोखून धरल्याची व सरकारी मालमत्तेच नुकसान केल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून डेक्कन पोलिसांनी विकास अर्च, अजयन अडाट, रणजीत नायर, राजू बिश्वास, अश्विन शर्मा, ग्यान गौरव, अमय गोरे, कृतिका पांडे, गोविंद राजू, लेफाथ सुब्बा, शिनी जे. के., विनिता नेगी, यशस्वी शर्मा, अजय यादव, हिमांशू प्रजापती, हरिशंकर नचीमुथ्थू, सचेत चौधरी यांसह इतर पंचवीस विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.   गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या मूल्यांकन पद्धतीवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला होता. त्याच्या विचारणेसाठी विद्यार्थ्यांनी संचालकांना घेराव घातला होता.   ज्या विद्यार्थ्यांविरोधात पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आले आहे यामध्ये तीन मुलींचा देखील समावेश आहे. मात्र मुलींना अटक करण्यात आलेली नाही.

राज ठाकरे यांच्या बोलण्याला मी महत्व देत नाही – शरद पवार

0

मुंबई -“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुणाविषयी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. ते काय बोलतात याला मी महत्त्व देत नाही. आजही अनेक लोकांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्या नावाचा वापर करावा लागतो”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला फेटाळून लावले आहे

आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून पुरंदरे यांची पाठराखण करीत पवारांवर टीकेचा भडीमार केला होता याबद्दल बोलताना पवार म्हणाले .” राज ठाकरेंच्या बोलण्याला मी महत्त्व देत नाही. त्यांनी कोणाबद्दल काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे.  बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल जो काही वाद सुरू आहे, त्या वादावर पडदा पडावा असे मला वाटते”, असं पवार म्हणाले.

… तर शिंगावर घेवू … पुरंदरे विरोधकांना आशिष शेलार यांचा इशारा

0

मुंबई :  ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात, जर कोणी  अंगावर आले तर त्याला शिंगावर घेवू ‘ असे म्हणतभाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी पुरंदरे विरोधकांना सज्जड दम दिला आहे ते म्हणाले ,  सोहळ्यात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कोणी केला, तर भाजपा त्याला शिंगावर घेईल, असा इशारा भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिला.तसंच महाराष्ट्रविरोधी कट रचणारा आणि महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणारा राष्ट्रवादीचा ज्येष्ठ नेता कोण, हे शोधून काढून सरकारने फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही शेलार यांनी केली.”पुरस्काराचा सन्मान कमी होण्याची भूमिका मांडणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे महाराष्ट्र द्रोह करत आहेत”, असं टीकास्त्र आशिष शेलार यांनी सोडलं आहे.

AshishShelar1

भालचंद्र नेमाडे हे साहित्य क्षेत्रातले दहशतवादी -विश्वास पाटील

0

मुंबई- ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे माझ्या दृष्टीने साहित्य क्षेत्रातले दहशतवादी आहेत तर बाबासाहेब पुरंदरेंना देण्यात येणारा सन्मान योग्य आहे, असे ‘पानिपत‘कार विश्वास पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्रभूषण‘ पुरस्कार देण्यावरून विविध नेत्यांनी वक्तव्ये केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना विश्वास पाटील म्हणाले, ‘भालचंद्र नेमाडे हे माझ्या दृष्टीने साहित्य क्षेत्रातले दहशतवादी आहेत. नेमाडे शिवछत्रपतींबद्दल बोलतात हाच मोठा विनोद आहे. नेमाडेंनी शिवचरित्रावर, छत्रपतींच्या कार्याबद्दल समोरासमोर येऊन खुलेपणाने बोलावे. नेमाडे यांनी ज्ञानपीठाची शान ठेवावी. त्यांनी आमच्या सोबत खुली चर्चा करावी. ‘बाबासाहेबांनी कधीही स्वतःचा टेंभा मिरवला नाही. ते स्वतःला इतिहासकार नव्हे तर शिवशाहीर संबोधतात. बाबासाहेबांचा सन्मान हा मराठी मातीचा सन्मान आहे. बाबासाहेबांना पुरस्कार मिळू न देणे हा पुरस्काराचा आणि त्यांचा अवमान आहे. मात्र, यावेळी साहित्यिक मुग गिळून बसले आहेत. त्यांनी पुढे येऊन बोलावे. बाबासाहेबांना लक्ष केले जात आहे, बाबासाहेबांना सन्मान मिळू न देणे हे दुर्गप्रेमींचा अवमान आहे. बाबासाहेबांनी मराठ्यांसोबत ब्राह्मण फितुरांचाही उल्लेख केला आहे. जातिभेदाच्या द्वेषातून पुरंदरेंना विरोध करणे ही दुर्दैवी बाब आहे. पुरंदरेंनी हिंदुत्ववादी शिवाजी रंगवले असे म्हणणेही चुकीचे आहे. अमेरिकन लेखक जेम्स लेनच्या लिखाणाला पुरंदरेंची मदत नाही. लेनची गाढवावरून धिंड काढली पाहिजे.‘ असेही पाटील म्हणाले.

‘महाराष्ट्र भूषण‘ प्रकरण -गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड

0

 

अहमदनगर- संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज (मंगळवार) गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना येथे घडली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण‘ पुरस्काराला संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या. रस्त्यावर पुरंदरेंना जाहीर झालेल्या पुरस्कार विरोधात घोषणाबाजी केली. शिवाय, सोबत आणलेली पत्रके तेथे टाकली.