क्रेडाईच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनास हजारपेक्षा जास्त सभासद सहभागी
‘विश्वरंग’ चित्रकला व फोटोग्राफी स्पर्धेला उत्फूर्त प्रतिसाद दहा हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी
पुणे- : खळखळ वाहणारा धबधबा… हिरव्यागार डोंगरदऱ्या अन् खडकवासला धरणाचा
अथांग जलाशय… अशा निसर्गाला आपल्या चित्र व छायाचित्रांमध्ये टिपण्याचा आनंद
चिमुकल्यांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांनी शनिवारी व रविवारी घेतला. निमित्त होते,
“डीएसके विश्वरंग’ या स्पर्धेचे. डीएसके डेव्ह्लपर्स तर्फे घेण्यात आलेल्या दोन
दिवसीय ‘विश्वरंग’ या चित्रकला व फोटोग्राफी स्पर्धेमध्ये पुण्यातील आणि इतर
शहरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही स्पर्धा डीएसके विश्व येथे घेण्यात आली
होती तसेच या स्पर्धेमध्ये एकूण सहा हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी दोन हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला
होता. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवती, व त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांनी
देखील हिरारीने सहभाग घेतला.”किलबिल’, “जल्लोष’, “रिमझिम’ व “सावली’ अशा चार
वयोगटांची रचना स्पर्धेसाठी करण्यात आली होती. सिद्धिविनायक मंदिर, पु.ल. देशपांडे कट्टा,
नेचर पार्क, खडकवासला, सिंहगड पॉइंट, जॉगिंग ट्रॅक, व्हॅली व्ह्यू अशा सहा खास ठिकाणे
लोकांच्या विशेष आकर्षण ठरली. निसर्गाच्या सानिध्यात आणि पावसाळी वातावरणाने या
‘विश्वरंगा’ मध्ये आणखी रंग भरले होते. काही आजी आजोबा आपल्या नातवंडासमवेत चित्र
काढत होते तर काही आई वडील आपल्या मुलांना वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणी नेऊन
मुलांना चित्र काढण्यास प्रोत्साहन देत होते. जवळील काही कंपन्यामधील कर्मचारी सुद्धा या
स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते तर कॉलेज मध्ये जाणारे विद्यार्थीसुद्धा ग्रुपनेच या स्पर्धेचा
आनंद लुटत होते. तसेच काही व्यावसायिक चित्रकार अगदी गंभीरपणे परंतु आनंदात मग्न
होऊन चित्र काढताना दिसत होते. ज्येष्ठ नागरिकांनी देखील यात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता. या
कार्यक्रमामुळे खूप वर्षानी आमच्यातला कलाकार पुन्हा समोर आला अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
या स्पर्धेचा निकाल ४ ऑक्टोबर रोजी असून त्याचवेळी बक्षिस समारंभ असणार आहे.३ व ४
ऑक्टोबर रोजी ‘डीएसके स्कूल’ येथे स्पर्धेमध्ये काढण्यात आलेलीचित्रे व फोटोंच्या प्रदर्शनाचे
आयोजनही यावेळी करण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्यस्तरीय ढोल ताशा वादन स्पर्धा
मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्यस्तरीय ढोल ताशा वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, इच्छुक संघांनी १६ सप्टेंबर २०१५ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहा महसूली विभागात प्राथमिक फेरी आयोजित करण्यात येणार असून, प्रत्येकी तीन संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे. अंतिम फेरीचे आयोजन पुणे येथे करण्यात येईल. प्राथमिक फेरी विविध महसूली विभागांत १८ व १९ सप्टेंबर २०१५ या कालावधीत तर, अंतिम फेरी पुणे येथे २२ व २३ सप्टेंबर २०१५ रोजी होणार आहे.
प्राथमिक फेरी व अंतिम फेरी यश मिळवणाऱ्या प्रथम तीन क्रमांकाच्या संघांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेच्या अटी, शर्ती व प्रवेशिकेचा नमुना maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या मथळ्याखाली उपलब्ध आहे. संपूर्ण भरलेल्या प्रवेशिका mahaculture@gmail.com या ईमेल पत्त्यावर १६ सप्टेंबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भाविकांनी घेतला रामकुंडावर दुसऱ्या पर्वणीचा आनंद
प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे उत्साहाचे वातावरण
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीसाठी जमलेल्या लाखो भाविकांच्या साक्षीने आखाड्यांच्या महंतानी मोठ्या उत्साहात शाही स्नान केले. अतिशय शांततेत व उत्साही वातावरणात दुसऱ्या पर्वणीतील शाहीस्नान रविवारी सकाळी पार पडले.
सकाळी सहा वाजता साधुग्राममधून निघालेल्या शाही मिरवणुकीची सांगता रामकुंडावरील शाही स्नानाने झाली. तिन्ही आखड्याच्या साधु महंतांनी लाखो लोकांच्या साक्षीने रामकुंडावर स्नान केले. अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्याच्या महंतांचे प्रथम रामकुंडावर आगमन झाले. तेथे त्यांचे स्वागत नाशिकचे पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे आदींनी केले. गोदावरीच्या दोन्ही तीरावर लाखो भाविकांनी हा शाही सोहळा पाहण्यासाठी उपस्थिती लावली होती. निर्मोही आखाड्याच्या शाही स्नानानंतर श्री पंच दिगंबर आखाडा व अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी आखाड्याच्या खालशांनी शाही स्नान केले.
शाही पर्वणीबरोबरच अमावास्या आल्यामुळे देशभराबरोबरच जगभरातून मोठ्या संख्येने भाविकांनी गोदातीरी स्नानासाठी गर्दी केली होती. रामकुंड बरोबरच लक्ष्मीनारायण घाट, रोकडोबा मैदान, टाळकुटेश्वर याबरोबरच गोदातीरावरील इतरही घाटांवर भाविकांनी लाखोंच्या संख्येने स्नानाचा आनंद लुटला. प्रौढांबरोबरच तरुणांचाही या शाही सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग होता. शाही मार्गावरुन मोठ्या थाटात आलेल्या आखाड्याच्या महंतांनी गोदावरीचे पूजन करून स्नान केले. त्यांच्या शाही स्नानानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी घाट मोकळे करण्यात आले होते. त्यामुळे भाविकांची गोदावरीच्या पवित्र पाण्यात डुबकी मारण्यासाठी गोदावरीच्या दोन्ही तीरावर झुंबड उडली होती.
शाही मार्गावर तसेच रामकुंडावर पोलीस प्रशासनाने केलेल्या शिस्तबद्ध नियोजनामुळे शाही स्नान मोठ्या उत्साहात पार पडले. तसेच आरोग्य सेवेची तत्काळ उपलब्धता, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तातडीने केलेली स्वच्छता यामुळे शाही सोहळा आणखीनच खास झाला. प्रशासनाच्या नियोजनावर पालकमंत्री गिरीष महाजन स्वतः देखरेख ठेवत होते. साधु महंतांच्या शाहीस्नानानंतर पालकमंत्री श्री. महाजन यांनीही पवित्र स्नान केले.
विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांची रामकुंड येथील माध्यम केंद्रास भेट
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत दुसऱ्या पर्वणीच्या दिवशी रामकुंड येथील माध्यम केंद्रास विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी भेट देत पत्रकारांशी संवाद साधला. श्री. डवले यांनी माध्यम केंद्राची पाहणी करीत समाधान व्यक्त केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यातर्फे रामकुंड, साधूग्राम आणि त्र्यंबकेश्वर येथे माध्यम केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. रामकुंड येथील माध्यम केंद्र श्री खिमजी भगवानदास आरोग्य भवन, सरदार चौक, नाशिक येथे कालपासून कार्यरत आहे. या केंद्राचे कामकाज 24 तास सुरू आहे. आज सकाळपासूनच पत्रकार बांधवांनी माध्यम केंद्रास भेट देत इंटरनेट, ई- मेल, फॅक्स, सोशल मीडिया या अत्याधुनिक साधनांचा लाभ घेतला.
या पार्श्वभूमीवर श्री. डवले यांनी माध्यम केंद्रात पत्रकारांशी संवाद साधला. माध्यम केंद्राचा आम्हाला लाभच झाला, असे पत्रकारांनी सगितले. पर्वणी कालावधीत भक्तांना सोयी पुविण्याचा राज्य शासनाने आटोकाट प्रयत्न केले आहेत. भक्तांना कमीत कमी पायी चालता यावे म्हणून फेरनियोजन केले. त्यामुळे त्यांना विनाप्रयास पवित्र स्नान करता आले, असेही पत्रकारांनी आवर्जून नमूद केले.
नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे सर्वांच्या समन्वयातून कुंभमेळा यशस्वी होईल, असे आयुक्त श्री. डवले यांनी सांगितले. यावेळी माहिती उपसंचालक सतीश लळीत, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, राजेंद्र सरग (जिल्हा माहिती अधिकारी, अहमदनगर), डॉ. राजू पाटोदकर (जिल्हा माहिती अधिकारी, रायगड), रणजितसिंह राजपूत (जिल्हा माहिती अधिकारी, धुळे व नंदुरबार), दिलीप गवळी (जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड), विलास बोडके, नंदकुमार वाघमारे, किरण वाघ, जगन्नाथ पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी जपानी कंपन्यांचा पुढाकार
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्याला अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला असून या दौऱ्याच्या माध्यमातून झालेल्या महाराष्ट्राच्या सकारात्मक प्रतिमानिर्मितीमुळे जपानमधील अनेक आघाडीच्या कंपन्यांनी राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यात दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी मिझुहो बँकेशी झालेल्या एका महत्त्वपूर्ण करारामुळे अनेक जपानी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज एमआयडीसी आणि मिझुहो बँक यांच्यात भारतातील गुंतवणूक प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारामुळे जपानी कंपन्यांना भारतात, विशेषत: महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने मोठी चालना मिळणार आहे. मिझुहो ही जागतिक पातळीवरील आघाडीची वित्तीय संस्था असून असंख्य जपानी गुंतवणूकदार त्यांचे ग्राहक आहेत. जपानमध्ये नोंदणीकृत असलेल्या किमान ७० टक्के कंपन्या या मिझुहो बँकेशी जोडल्या गेल्या आहेत. ‘फॉर्च्युन १०००’ मधील सुमारे २५० वर कंपन्यांशी या बँकेचे व्यावसायिक सहकार्य आहे.
हे तिन्ही करार करण्यात फ्रेंडस ऑफ जपान असोसिएशनने अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका वठविली आहे. फ्रेंडस ऑफ जपान असोसिएशनच्या वतीने आज एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित होते. महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक यावी, या हेतूने समन्वयकाच्या भूमिकेतून काम करण्याची तयारी या असोसिएशनने दर्शविली आहे आणि तशा आशयाचे पत्रही एमआयडीसीला दिले आहे.
या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज जपानमधील योकोहामा बंदराला (पोर्ट) भेट दिली. या बंदराच्या माध्यमातून सुमारे २७ दशलक्ष टन इतकी मालवाहतूक केली जाते. योकोहामा पोर्टशी संबंधित अनेक मान्यवरांसोबत एक बैठकही यावेळी झाली आणि याठिकाणी होत असलेल्या विकास कामांचीही माहिती राज्याच्या शिष्टमंडळाने जाणून घेतली. योकोहामाच्या महापौर श्रीमती फुमिको हायाशी यांचीही मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी भेट घेतली.
शंखनाद, मंत्रोच्चाराच्या जयघोषात दुसऱ्या पर्वणीचे शाही स्नान उत्साहात
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीचे शाही स्नान त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ध्वज, पताका, शंखनाद आणि ‘हर हर महादेव’ च्या नामघोषात विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी मिरवणूकीद्वारे कुशावर्त येथे येऊन शाही स्नान केले. देश-विदेशातून आलेल्या लाखो भाविकांनी त्र्यंबकेश्वर येथे येऊन शाही स्नानाची कुंभमेळ्यातील दुसरी पर्वणी साधली.
शाही स्नानाप्रसंगी कुंभमेळा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, नगराध्यक्ष अनघा फडके, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मेळा अधिकारी महेश पाटील, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांनी कुशावर्त परिसरात उपस्थित राहून प्रत्यक्ष नियोजनावर लक्ष ठेवले. आखाड्यांच्या शाही स्नानासाठी विविध सोयी-सुविधांचे नियोजन केले. विशेष पोलीस महानिरीक्षक जे. जे. सिंह, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, सहायक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
त्र्यंबकेश्वर शहरात शनिवारी सकाळपासूनच देश-विदेशातील भाविक शाही स्नानासाठी दाखल झाले होते. दिवसभरात लाखो भाविकांनी कुशावर्तात स्नान केले. रविवारी पहाटे तीन वाजल्यापासूनच त्र्यंबकेश्वर शहरातून विविध आखाड्यांच्या साधू-महंतांनी शाहीस्नानासाठी कुशावर्त कुंडाकडे सवाद्य मिरवणुकीसह प्रयाण केले. शाही मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या घालून आणि पुष्प सजावट करण्यात आली होती. साधू-महंतांच्या दर्शनासाठी भाविक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते.
‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’ चा गजर करत विविध आखाड्यांच्या शाही मिरवणुका कुशावर्ताकडे दाखल झाल्या. प्रशासनाचे योग्य नियोजन आणि पोलीसांचा चोख बंदोबस्त यामुळे निर्धारित वेळेत सर्व आखाड्यांचे शाही स्नान पार पडले. प्रशासनामार्फत कुशावर्त परिसरात शाही स्नानासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मिरवणुकांचे येण्याचे आणि परत जाण्याचे मार्ग वेगवेगळे असल्याने कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता शाही स्नान शांततेत पार पडले.
कुशावर्त परिसरात मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना वार्तांकनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. कुशावर्ताच्या समोर उभारण्यात आलेल्या टेहळणी टॉवरमार्फत परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून होते. कुशावर्तमध्ये शनिवारी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सर्वसामान्य भाविकांनी स्नान केले. त्यानंतर पहाटे विविध आखाड्यांच्या शाही स्नानास प्रारंभ झाला.
शाहीस्नानाचा पहिला मान तपोनिधी पंचायती निरंजनी आखाड्याला मिळाला. पहाटे 3.20 वाजता या आखाड्याची मिरवणूक निघाली. महंत आशिषगिरीजी महाराजांनी स्नान करुन शाहीस्नान पर्वणीचा प्रारंभ केला. त्यानंतर तपोनिधी पंचायती आनंद आखाडा, शंभु पंचदशनाम जुना आखाडा, पंचायती दशनाम आवाहन आखाडा, श्री पंच अग्नी आखाडा, महानिर्वाणि आखाडा, पंचायती अटल आखाडा, पंचायती बडा उदासीन आखाडा, पंचायती नवा उदासिन आखाडा आणि पंचायती निर्मल आखाडा यांनीही भाविकांसह शाहीस्नानाची पर्वणी साधली.
पहाटे सुरु झालेले विविध आखाड्यांचे शाही स्नान सकाळपर्यंत सुरु होते. त्यानंतर दुपारी 12 वाजेपासून सर्वसामान्य भाविकांनी स्नानासाठी कुशावर्तावर गर्दी केली. दिवसभर लाखो भाविकांनी आजच्या या शाहीस्नानाचा लाभ घेतला. प्रारंभी शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी कुशावर्तात स्नान केले. दरम्यान, आजच्या या शाहीस्नानाच्या दिवशी मध्य प्रदेशचे कुंभमेळा मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्यासह विविध मान्यवरांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली.
श्री माळी महाराज मठात नागनाथ महाराज यांचा समाधी उत्सव
पुणे-सोमवार पेठेतील श्री माळी महाराज मठात नागनाथ महाराज यांचा समाधी उत्सव दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी महापूजा करण्यात आली . त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले . त्यानंतर सांयकाळी किर्तनाचा कार्यक्रम झाला . या समाधी उत्सव सोहळयाचे आयोजन राजू लांडगे , अशोक लांडगे , उषा लांडगे , कस्तुरी लांडगे , सौरभ लांडगे , सचिन लांडगे, सुखदेव कशिद्कर यांनी केले होते .
या समाधी उत्सव सोहळयास राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , माजी आमदार रामभाऊ मोझे , माजी महापौर विठ्ठलराव लडकत , माजी नगरसेवक सदानंद शेट्टी , दिलीप उंबरकर , योगेश पिंगळे , माथेरानचे नगराध्यक्ष विवेक चौधरी , नितीन भुजबळ , पोपट गायकवाड , राजा पाटील , इंद्रजीत रायकर , यशवंत कुदळे , प्रिती कुदळे आदी मान्यवर उपस्थित होते . सांयकाळी प्रभा रहाळकर व उल्का देशपांडे यांची जुगलबंदी कीर्तन संपन्न झाले .
” पर्युवषन पर्व ” निमित नवग्रह जैन सेवा मंडळातर्फे १५०० शालेय विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धा
पुणे- जैन धर्मियांचे सर्वात पवित्र असणारे ” पर्युवषन पर्व “निमित नवग्रह जैन सेवा मंडळातर्फे सेलस्बरी पार्कमधील महावीर प्रतिष्ठानमध्ये सुमारे १५०० शालेय विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धा भरविण्यात आली होती . या स्पर्धेचे उद्घाटन विक्री कर आयुक्त सुमेर काळे यांच्याहस्ते करण्यात आले . या विद्यार्थ्यांना संगणक , सायकल , टेब व इतर वस्तू बक्षीस वितरण नगरसेवक अभय छाजेड व अचल जैन यांच्या हस्ते करण्यात आले . या चित्रकला स्पर्धेमध्ये भगवान महावीर यांच्या जीवनावरील आधारित जीवन या विषयावर चित्रे विद्यार्थ्यांनी रेखाटली . या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद फडे , विजयकांत कोठारे , नगरसेविका मनीषा चोरबेले , प्रविण चोरबेले आदी मान्यवर उपस्थित होते .
या चित्रकला स्पर्धेचे आयोजन नवग्रह जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष किशोर जैन , मितेश जैन , पंकज परमार , अजित राठोड , विनय पोरवाल , जितेंद्र जैन , आनंद जैन , बंटी जैन , शीतल जैन , सचिन ओसवाल , भरत मेहता , चेतन सोनिग्रा , अमित ओसवाल आदींनी विशेष परिश्रम घेतले . मुलांमधील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशानेच मंडळाने हि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
पोलिसांसाठी ” मोफत हृद्य रोग तपासणी शिबीर ” संपन्न
पुणे- पुणे कॅंटोन्मेंट शांतता समिती , लष्कर पोलिस ठाणे , हिंद तरुण महिला मंडळ व सह्याद्री हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे कॅम्प भागातील लष्कर पोलिस ठाणे मध्ये सवांद सभागृहात पोलिस बांधवासाठी ” मोफत हृद्य रोग तपासणी शिबीर ” संपन्न झाले . या शिबिरात २१० पोलिस बांधवांची हृद्य रोग तपासणी करण्यात आली .
या शिबिराचे उद्घाटन लष्कर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त आत्मचरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीषक बरकत मुजावर , गुन्हे शाखा पोलिस निरीषक अनिल नाडे ,पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक दिलीप गिरमकर , हिंद तरुण महिला मंडळाच्या अध्यक्षा माधुरी गिरमकर , सह्याद्री हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक घोणे , पुणे कॅंटोन्मेंट शांतता समिती सदस्य मनजितसिंग विरदी , संदीप भोसले , बलबीरसिंग कलसी आदी मान्यवर व अन्य सदस्य उपस्थित होते .
या शिबीराचे आयोजन हिंद तरुण महिला मंडळाच्या अध्यक्षा माधुरी गिरमकर ,आशा गिरमकर , माधवी मेटेल्लु . अर्चना दंडे , सविता ठाकूर , प्रियांका भंडार , मंगल परदेशी , राजश्री कुराडे , विद्या कोतवाल , निशा कुराडे आदींनी केले होते .
शिबिरासाठी सह्याद्री हॉस्पिटलचे हृद्यरोग तज्ञ डॉ. महेंद्र बाफना , डॉ. जगदीश देवरे , डॉ. मनिषा जगदाळे , टेक्निशियन हरीश ब्रदर , हिमानी पवार , कर्मचारी वर्ग शरद काथवटे , मंगेश पाटील , दीपक कालिगंदा आदींनी विशेष परिश्रम घेतले
” खडकवासला विधानसभा मतदारसंघात ६७ मुस्लिम बंधु भगिनींचा शिवसेनेत प्रवेश
पुणे-शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख श्री. दत्तात्रय टेमघरे यांच्या उपस्थितीत व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख श्री. सत्यवान उभे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच असिफ पटेल, युनूस शेख, हैदर बागवान व अयुब मकानदार यांच्या नेतृत्वाखाली आज खेडशिवापूर मधील ६७ मुस्लिम बंधु भगिनींनी शिवसेनेत प्रवेश केला. याच बरोबर खेडशिवापूर मधील इतर १५२ कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी जिल्हा प्रमुख श्री.टेमघरे म्हणाले कि, ” आज मला विशेष आनंद होतोय कि शिवसेना हा सर्वसामन्यांचा पक्ष आहे व गोर गरीब व शेतकरी व पीडित महिलांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो आणि यातच जर समाजातले सर्व घटक बरोबर असतील तर पक्षाचे काम खूप सोपे होईल. आज जो माझ्या मुस्लिम बंधु भगिनींनी शिवसेना पक्ष निवडला, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. शिवसेनेने नेहमीच सर्व धर्मांचा आदर केला आहे आणि यापुढे ही करणार”. भवानी पेठ पोलीस लाइन मधील सामाजिक कार्यकर्ते आसिफ पटेल यांनी विशेष प्रयत्न करून सर्वांचे प्रवेश करून घेतले.
यावेळी जिल्हा प्रमुख दत्तात्रय टेमघरे जिल्हा महिला संघटक कल्पना थोरवे उपजिल्हा प्रमुख रमेश कोंडे उपजिल्हा प्रमुख ज्ञानदेव शेडगे तालुका प्रमुख महेश मतेभगवान वांजळे, अनिल मते, सुरेश मारणे, मनोज साठे, तानाजी थोपटे, चंद्रकांत कुडले, संदीप कोंडे, स्वप्नील कोंडे, अप्पा रायकर, हर्षद कोंडे, सतीश खळदकर, अमोल टेमघरे व मनोज टेमघरे आदी मान्यवर उपस्थित होते
तलवार फिल्म देखना चाहते है आरुषि तलवार के परिवार वाले।
फिल्म बनाने से पहले पूरी तरह से रिसर्च की गई थी। सी.बी.आई जांच और पुलिस के बयान के आधार पर ही फिल्म बनाई गई है। तलवार में तहक़ीक़ात के तीन दृष्टिकोण को दर्शाया गया है ।
तलवार परिवार ने अपने वकीलों के माध्यम से निवेदन किया है फिल्म देखने के लिए। हाल ही में हुई शीना बोरा केस को मीडिया की इतनी तवज्जो मिलने के बाद, आरुषि केस का उल्लेख बार बार किया जा रहा है। दोनों ही केस में कई सारी समानताएं नज़र आ रही हैं।
जैसा कि हर संवेदनशील मुद्दों पर फिल्में बनने के बाद होता है, इस बार भी वकीलों ने फिल्म की टीम संपर्क किया और तुरंत फिल्म दिखाने का निवेदन किया।
निर्मताओ ने थोड़ा समय माँगा है, जैसे ही वो टोरंटो फिल्म फेस्टिवल से लौटेंगे उसके बाद ही फिल्म दिखा पाएंगे ।
तलवार फिल्म 2 अक्टूबर 2015 को रिलीज़ होगी ।
इरफ़ान खान, कोंकणा सेन और नीरज कबि अहम भूमिका में है। विशाल भरद्वाज ने फिल्म लिखी है और निर्देशन मेघना गुलज़ार ने किया है ।
अमरावती विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी अनिल अग्रवाल यांची निवड
अमरावती : विभागीय अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत अध्यक्षपदी अनिल अग्रवाल यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली.
प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती पत्र देण्यासंबंधी दिनांक 13 ऑगस्ट 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृती समिती स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्याअनुषंगाने विभागीय माहिती कार्यालय येथे उपसंचालक(माहिती) मोहन राठोड यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष निवडीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीस समितीचे सदस्य शौकतअली मीर साहेब, प्रदीप देशपांडे, संजय शेंडे, गिरीश शेरेकर तसेच जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, सहायक संचालक अशोक खडसे व माहिती सहाय्यक विजय राऊत आदी उपस्थित होते.
प्रारंभी श्री. राठोड यांनी सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बैठकीचे आयोजन अध्यक्ष निवडीसाठी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सदस्य संजय शेंडे यांनी अध्यक्षपदासाठी अनिल अग्रवाल यांचे नाव सुचविले त्यास सदस्य शौकतअली मीर साहेब यांनी अनुमोदन दिले. यानंतर सर्व सहमतीने अध्यक्ष म्हणून अनिल अग्रवाल यांची निवड करण्यात आल्याचे सदस्य सचिव मोहन राठोड यांनी जाहीर केले. अनिल अग्रवाल हे दैनिक अमरावती मंडल वृत्तपत्राचे संपादक आहेत. बैठकीनंतर जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार यांनी उपस्थित समिती सदस्यांचे आभार मानले.
मुंबईहून हज यात्रेसाठी जाणाऱ्या पहिल्या विमानाला एकनाथराव खडसे यांनी दाखविला हिरवा झेंडा
मुंबई : हज यात्रेसाठी मुंबई येथून जाणाऱ्या पहिल्या विमानाला अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथराव खडसे यांनी हिरवा झेंडा दाखविला. गुरुवार पहाटे पाचच्या सुमारास छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र हज कमिटीच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. हज यात्रेसाठी निघालेल्या 340 यात्रेकरुंना धार्मिक ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन श्री.खडसे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष इब्राहिम शेख, ऊर्दू अकादमीचे कार्याध्यक्ष रौफ खान, माजी मंत्री नसीम खान, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान ऊर्फ अमीर खान, अल्पसंख्याक विभागाच्या सह सचिव अैनुल अत्तार आदी उपस्थित होते.
हज यात्रेसाठी जाणे हे प्रत्येक मुस्लीम बांधवाचे स्वप्न असते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत असल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे निर्मुलन व्हावे आणि देशात सुख, शांती नांदावी यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही श्री.खडसे यांनी यावेळी यात्रेकरुंना केले.
शेततळी-बंधारे भूजल पातळीत वाढ ;राज्यातील दमदार पावसामुळे ‘जलयुक्त शिवार’ यशस्वितेकडे
मुंबई : पावसाने ओढ दिल्याने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्राचे भविष्य बदलण्याची ताकद असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या मोठ्या प्रमाणावरील कामांमुळे शेततळी, बंधारे भरण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून जलाशयांमुळे भूजल पातळी वाढण्यात मदत होणार आहे. भविष्यातील पाणी व चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास यामुळे निश्चितच मदत होणार आहे.
“मराठवाड्यावर पावसाने कृपा केल्याने मी निसर्गाचे आभार मानतो. असाच दिलासा संपूर्ण राज्याला मिळू दे अशी प्रार्थना करतो. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधलेली शेततळी आणि बंधारे पावसाच्या पाण्याने भरले. ही समाधानाची बाब आहे. ही योजना शाश्वत सिंचनाचा मार्ग निश्चितपणे प्रशस्त करेल”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे. जपान दौऱ्यावर असतानाही राज्यातील परिस्थितीचा ते सातत्याने आढावा घेत आहेत.
यंदा पुरेसा पाऊस न पडल्याने राज्यात टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकरी व प्रशासनाने पाणी व चारा टंचाईबाबत उपाययोजना करण्यास सुरूवात केली होती. मात्र तीन दिवस पावसाने सतत हजेरी लावल्याने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केलेल्या बांधबंदिस्ती, नाला खोलीकरण, ओढ्यांचे सरळीकरण व खोलीकरण यासारख्या कामांमुळे तीनच दिवसात या ठिकाणी पाणी झुळूझुळू लागले आहे. याबरोबरच विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. या अभियानाच्या पहिल्याच वर्षी राज्यात सुमारे 6 हजार गावात एक लाखांहून अधिक कामे झाली आहेत. प्रचंड प्रमाणात लोकसहभाग हे अभियानाचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य ठरले आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे हे अभियान यशस्वितेच्या मार्गावर आहे.
लातूर जिल्ह्यात अगदी काही दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा राहिला होता. मांजरा धरणात केवळ 1.3 दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) पाणी उरले होते. या पावसामुळे ते 3 द.ल.घ.मी. झाले आहे. निम्न तेरणा धरणातून निलंगा शहराला पाणीपुरवठा होतो. तिथे 2 द.ल.घ.मी. पर्यंत पाणी उरले हाते. या पावसामुळे ते 5 द.ल.घ.मी. एवढे झाले आहे. आता शहराला तीन महिने पाणी पुरेल एवढा साठा उपलब्ध झाला आहे. येत्या काही दिवसात असाच पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जेथे कामे झाली आहेत, तेथे पाण्याचा साठा दिसू लागला आहे. पावसाने ओढ दिल्याने पेरण्या उशिरा झाल्या होत्या. हा पाऊस रब्बी पिकांसाठीही उपयुक्त ठरेल, असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
परभणी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सरासरी 50 मि.मी. पाऊस पडला. जलयुक्त शिवार अंतर्गत तयार झालेल्या साठवणूक नाला, बंधारे यात पाणी साठले आहे. या जिल्ह्यात जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात झालेली असल्यामुळे पावसाचे पाणी जास्त जिरले आहे. कापूस, सोयाबीन तसेच रब्बीतील पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे. जायगाव, भारसवाडा, झरी, कौडगाव ता. गंगाखेड, चारठाणा या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता राहणार नाही.
उस्मानाबाद जिल्ह्यात तीन दिवस सतत चांगला पाऊस पडला असल्याने सरासरी 36 मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. कळंब, खर्डा या गावांना टँकरने पाणी देण्याबाबतची मागणी होती. मात्र आता त्याची आवश्यकता राहणार नाही. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून जलयुक्त शिवारातील पाणी साठ्यांमध्येही वाढ झाली आहे.
बीडमधील लघु व मध्यम प्रकल्पातील धरणांमध्ये समाधानकारक पाऊस पडल्याने पाणी साठू लागले आहे. टँकरची संख्या कमी झाली आहे. पाटोदा, गेवराई येथील टँकर बंद करण्यात आले आहेत. या जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 4 हजार कामे हाती घेण्यात आली असून पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पाण्याची पातळी वाढली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील खांबेगाव, आंबेसावंगी या जिल्ह्यांना भेट दिली असता त्यावेळी येथील पाणीसाठे कोरडे होते. आता गावातही पाणीसाठा पुरेशा प्रमाणात झाला आहे. विहिरी, नाला यात पाणी भरु लागले आहे. चारा टंचाई जाणवणार नाही असे चित्र निर्माण झाले आहे. येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत 3 हजार 121 कामे पूर्ण झाली असून 457 कामे प्रगतीपथावर आहेत. याशिवाय यापुर्वीच 1 हजार विहिरींच्या पुनर्भरणाचे कामही झाले आहे.
हिंगोली जिल्ह्यात सरासरी 46 टक्के पाऊस पडल्याने पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला आहे. पुढचे 10 दिवस असाच पाऊस पडत राहिल्यास जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण होऊन रब्बी पिकास त्याचा फायदा मिळणार आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत 33 सिमेंट नाला बांधणीचे काम झाले असून समाधानकारक पाणी साठा दिसून येत आहे.







