मुंबई-स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या आद्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मौजे नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मौजे नायगाव येथील या स्मारकासाठी 142 कोटी 60 लाख रुपये तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67 लाख 17 हजार रुपयांच्या तरतूदीस मंजूरी देण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्मारकाची घोषणा केली होती. त्यानुसार आज मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचे हे स्मारक त्यांच्या कार्याला अभिवादन ठरणार आहे. तसेच सोबतच उभे राहणारे महिला प्रशिक्षण केंद्र या परिसरातील महिलांसाठी सबलीकरणासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. महिला प्रशिक्षण केंद्राचे दीर्घकालीन व्यवस्थापन, प्रशासन, तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी सातारा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, यशदा, कौशल्य विकास विभाग तसेच ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रतिनिधी यांचा समावेश राहणार आहे.
111 दिवसांत 23,838 रुपयांनी महाग इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमच्या किमतीत ३,३३० रुपयांची वाढ होऊन ती १ लाख रुपयांवर पोहोचली आहे. पूर्वी १० ग्रॅम सोन्याची किंमत ₹९६,६७० होती.त्यानंतर ती ९९१०० झाली आणि संध्याकाळी पुन्हा ८९४८४ वर आली . सोन्या भावातील या अस्थिरतेने मार्केट मधील व्यापाऱ्यांच्या कडील ग्राहक वर्ग दिसेनासा होत चालला आहे.
दिल्ली: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९३,०५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १,०१,५०० रुपये आहे. मुंबई: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९२,९०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १,०१,३५० रुपये आहे. कोलकाता: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९२,९०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १,०१,३५० रुपये आहे. चेन्नई: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९२,९०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत १,०१,३५० रुपये आहे. भोपाळ: २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९०,२०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९८,४०० रुपये आहे.
त्याच वेळी, आज एक किलो चांदीची किंमत ₹३४२ ने घसरून ₹९५,९०० प्रति किलो झाली आहे. पूर्वी चांदीची किंमत प्रति किलो ₹ 96,242 होती. २८ मार्च रोजी चांदीने १,००,९३४ रुपयांचा उच्चांक गाठला होता. १११ दिवसांत सोने २३,८३८ रुपयांनी महागले या वर्षी, १ जानेवारीपासून आतापर्यंत, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ७६,१६२ रुपयांवरून १ लाख रुपयांपर्यंत २३,८३८ रुपयांनी वाढली आहे. त्याच वेळी, चांदीची किंमत देखील ९,८८३ रुपयांनी वाढून ८६,०१७ रुपये प्रति किलोवरून ९५,९०० रुपये झाली आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये सोने १२,८१० रुपयांनी महाग झाले होते.
स्वातंत्र्याच्या वेळी सोने ८८.६२ रुपये ग्रॅम होते १९४७ मध्ये जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सोन्याचा भाव ८८.६२ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो आता १ लाख रुपये आहे. म्हणजेच, तेव्हापासून आतापर्यंत सोने ११०४ पट (११०४८४%) महाग झाले आहे. १९४७ मध्ये चांदीची किंमत प्रति किलो सुमारे १०७ रुपये होती आणि आता ती ९५,९०० रुपये आहे.
मुंबई- महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेवरून वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदी सक्तीला विरोध केला आहे. राज्य शासनाच्या सुकाणू समितीत असलेल्या शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे यांनी देखील हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची करणे चुकीचा निर्णय असल्याचे म्हटले आहे. आता या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. हिंदी भाषेच्या वापरासाठी आम्ही अनिवार्य हा शब्द वापरला होता. आता या शब्दाला शासन स्थगिती देत आहे. हिंदी भाषा ही बंधनकारक असणार नाही, असे दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना दादा भुसे म्हणाले, मी स्पष्टपणे नमूद करतो की, हिंदी भाषेच्या संदर्भात केंद्राकडून थपवले जात आहे असे सांगितले जात आहे, असा कुठलाही भाग नाही. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये स्पष्टपणे भाषेच्या संदर्भात पॅराग्राफ आहे. तीन भाषा शिकवण्यासंदर्भात, तीन भाषेचा फॉर्म्युला तिथे दिला आहे. केंद्राने कोणतीही भाषा राज्यासाठी बंधनकारक केलेली नाही, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना दादा भुसे म्हणाले, 2020 चे शैक्षणिक धोरण आहे. त्यानुसार 9 सप्टेंबर 2024 ला तीन भाषांपैकी दोन भाषा आपल्या देशाच्या संबंधित असल्या पाहिजेत, असे सांगण्यात आले आहे. राज्य सुकणू समितीच्या बैठकीत तिसरी भाषा हिंदी म्हणून स्वीकारण्याचा निर्णय झाला होता. तसेच या संदर्भातील शासन निर्णयात हिंदी भाषा ‘अनिवार्य’ असा उल्लेख झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे अनिवार्य या शब्दाला स्थगिती देत आहोत आणि पुढील शासन निर्णय यथावकाश निर्गमित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी विषय बंधनकारक आहेच. पण, इतर माध्यमाच्या शाळांमध्ये सुद्धा मराठी भाषा विषय बंधनकारक केला गेला आहे. त्या शाळेत मराठी शिकवणारे शिक्षक सुद्धा मराठी भाषेत पदवी मिळवलेले असले पाहिजे याचेही बंधन असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले आहे.
सीबीएसईच्या चांगल्या बाबीचा स्वीकार आपल्या अभ्यासक्रमात करणार आहोत. चांगले मुद्दे आपण सीबीएसईकडून घेणार आहोत. व्यापक स्वरूपात इतिहास भूगोल अभ्यासक्रमात दिसेल. तसेच, शिक्षक भरती सुद्धा आपण करत आहोत. 10,500 शिक्षकांची भरती आपण करत आहोत. पवित्र पोर्टलवरुन ही भरती होणार आहे.
शिक्षण विभागाचे 8 विभाग आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी आपण शाळा तयार करणार आहोत. जे खेळामध्ये प्रविण्य दाखवतात त्यांना निवासी सोयीसुविधा उपलब्ध करून देता येईल. राज्यव्यापी वेगवेगळ्या पद्धतीचे आनंद गुरुकुल निवासी शाळा सुरू होतील, ज्या स्पेशालिटी शिक्षण देतील अशा शाळा तयार करत आहोत, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.
पुढे बोलताना दादा भुसे म्हणाले, राज्यातील 65 शिक्षण संघटनाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यातून मोठी चर्चा झाली. शिक्षकांची इतर अशैक्षणिक काम कशी कमी करता येतील? यासाठी जीआर काढून शैक्षणिक आणि अशैक्षणिक काम बाजूला करून कमीत कमी इतर काम शिक्षकांना दिली जातील. शासन निर्णयची कडक अंमलबाजवणी केली जाईल
पुणे, दि. २२: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ बाजार समित्यांची आणि ६८ खाजगी बाजारांची सन २०२३-२४ या वर्षाच्या कामगिरीवर आधारित वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीनुसार राज्यातील १० बाजार समित्यांमध्ये पुणे विभागातील बारामती बाजार समितीने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीनुसार राज्यात पहिल्या १० बाजार समित्यांमध्ये वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समिती १७८ गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर, वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड बाजार समिती १७१.५ गुणांसह दुसऱ्या स्थानी, बारामती १६५ गुणांसह तिसऱ्या स्थानी, १५५.५ गुणासह पंढरपूर पाचव्या तर १४९ गुण मिळवून अकलूज आठव्या स्थानावर आहे. तसेच राज्यातील सहकार विभागाच्या रचनेनुसार विभागातील बारामती, पंढरपूर व अकलूज हे अनुक्रमे पहिल्या तीन स्थानावर आहेत.
बाजार समित्यांची तसेच खाजगी बाजारांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी पणन संचालनालयाकडून जागतिक बँकेच्या सुचनेनुसार शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, योजना, उपक्र म राबविण्यातील सहभाग यानुसार ३५ निकष तयार करण्यात आले होते. बाजार समित्यांच्या निकषासाठी २०० गुण व खाजगी बाजारांसाठी २५० गुण निश्चित करण्यात आले होते.
या क्रमवारीमुळे शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये तसेच खाजगी बाजारांमध्ये आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याची निकोप स्पर्धा निर्माण होण्यास चालना मिळेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समित्यांनी अधिक जोमाने कामकाज करावे, असे आवाहन पणन संचालक विकास रसाळ यांनी केले आहे.
यश राज फिल्म्स (YRF) आता रोमँस शैलीतील एक दिग्गज दिग्दर्शक मोहित सुरी यांच्यासोबत रचनात्मक सहकार्य करत आहे एका इंटेंस प्रेमकथेवर आधारित चित्रपटासाठी, ज्याचे नाव आहे ‘सैयारा’! वायआरएफ चे सीइओ अक्षय विधानी यांची पहिली निर्मिती असेल.
सैयारा या बहुप्रतीक्षित चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत दोन नवीन चेहरे – अहान पांडे आणि अनीत पड्डा – पदार्पण करत आहेत. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे.
सैयारा हाचित्रपट आदित्य चोप्रा यांच्या प्रस्तुतीखाली, मोहित सुरी यांच्या दिग्दर्शनाखाली आणि अक्षय विधानी यांच्या निर्मितीखाली साकारला गेला आहे. वायआरएफ आणि मोहित सुरी, दोघेही त्यांच्या रोमँटिक शैलीतील यशस्वी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत, आणि सैयारा ही त्यांची पहिली एकत्रित कलाकृती आहे.
Yash Raj Films & Mohit Suri’s intense love story is titled Saiyaara, film releases on July 18, 2025 in theatres worldwide!
Yash Raj Films (Yrf) is creatively collaborating with a master of the romance genre, Mohit Suri, for a love story that has been titled Saiyaara! This is the first film being produced by the company’s CEO Akshaye Widhani.
The much-awaited romantic film, Saiyaara, which introduces Ahaan Panday in the Hindi film industry and also stars Aneet Padda as the female lead, is set to release on July 18, 2025 in theatres worldwide.
Presented by Aditya Chopra, Directed by Mohit Suri & Produced by Akshaye Widhani, Saiyaara is an intense love story that brings YRF and Mohit Suri, both known for their huge generation-defining successes in the romantic genre, together for the first time!
केंद्र सरकारच्या धोरणाशी सुसंगत कार्यप्रणाली स्थानिक स्वराज्य संस्था आणि संस्थांच्या सहकार्याने वेगवेगळ्या भागांतून मलेरिया, डेंग्यू हद्दपार करण्यासाठी कंपनीचे धोरण
मुंबई,२२एप्रिल२०२५ – दरवर्षी २५ एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन साजरा केला जातो. जागतिक मलेरिया दिन काही दिवसांवर येऊन ठेपला असताना युपीएल एसएएस कंपनीने मलेरिया आणि डेंग्यूच्या समूळ उच्चाटनासाठी सर्वतोपरि प्रयत्न करित असल्याचे आश्वासन दिले आहे. कंपनीने केंद्र सरकारच्या आरोग्याविषयक धोरणांतून तसेच उपाययोजनांतून डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारावर आळा घालण्यासाठी तत्परता दर्शवली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन आराखडा आणि राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन धोरणात्मक योजना यांसारख्या सर्वसमावेशक धोरणांना पाठिंबा देण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते. येत्या दोन वर्षांत २०२७ पर्यंत देशातून मलेरियाची एकही केस सापडता कामा नये, हे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे.
युपीएल एसएएस कंपनी देशभरातील महानगरपालिकांच्या सहकार्याने जनजागृतीपर कार्यक्रमांचे नियोजन करत आहे. मलेरियाच्या केसेसवर नियंत्रण यावे म्हणून कंपनीने शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळे प्रकल्प राबवण्यावर भर दिला आहे. गुजरात येथील उदवाडा गावात डासांमुळे होणारे आजार कमी करण्यासाठी क्लीन एण्ड ग्रीन चॅरिटेबल ट्रस्टसोबत कंपनीने डासांच्या उत्पत्तीची उगमस्थाने नष्ट करण्याचा प्रकल्प हाती घेतला. तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहरातील ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेसह विविध कार्यक्रमांचे नियोजन यशस्वीरित्या अंमलात आणले गेले.
गुजरात आणि तेलंगणा राज्यातील डासांमुळे होणारया आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी कंपनीने अथक परिश्रम घेतले. दोन्ही प्रकल्पांमध्ये डासांची उत्त्पत्ती आणि संबंधित आजार कमी होत असल्याचे निदर्शनास आले. या दोन यशस्वी प्रकल्पानंतर युपीएल एसएएस कंपनीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. गुजरात, तेलंगणा या राज्यांसह कंपनी आता महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारसबोत मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध कार्यक्रम आखण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही राज्यांसोबत नव्या प्रकल्पाला सुरुवात झाल्यास कंपनीला शहरी आणि ग्रामीण भागांत राहणा-या लोकांचे जीवनमान सुधारण्यास अधिक प्रखरतेने योगदान देता येईल. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्याचे कंपनीचे मूळ उद्दिष्ट सफल होईल.
कंपनीच्या वाढत्या कार्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष डोभाल यांनी आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘ आम्ही सुरु केलेली सार्वजनिक आरोग्य मोहिम ही व्यापक क्षेत्रात सुरु आहे. ही मोहिम केवळ शेतीपुरतीच मर्यादित नसून, आम्ही विविध समूहांचा उद्धार आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासही कटिबद्ध आहोत. केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक धोऱणांना पाठिंबा देणे, सर्व भारतीयांसाठी निरोगी आणि सुरक्षित जीवनशैली निर्माण करणे हे आमचे उद्देश आहे. म्हणूनच आम्ही डास नियंत्रणासाठी विश्वासार्ह आणि प्रभावी उपाययोजना अंमलात आणली आहे. या उपाययोजनांमुळे कोट्यावधी भारतीयांचे जीवनमान सुधारेल. या बदलांसाठी स्थानिक प्रशासन आणि समुदायांचे सहकार्य गरजेचे आहे. तरच आपल्याला ख-या अर्थाने मलेरिया आणि डेंग्यूमुक्त भारताच्या दिशेने आपली यशस्वी वाटचाल करता येईल.’’
या नवनव्या उपक्रमांबद्दल तसेच कंपनीच्या विस्तारीत कार्याबद्दल कंपनीच्या सार्वजनिक आरोग्य व्यवसायाचे प्रमुख श्री. सुब्रतो पल यांनी माहिती दिली. ते म्हणाले,‘‘ डासांची उगमस्थाने आणि अळ्या नष्ट करणे आणि डासांच्या उत्त्पत्तीवर नियंत्रण ठेवणे हेच कंपनीचे मुख्य धोरण आहे. या धोरणाशी आमच्या भागदारकांनीही सहमती दर्शवली आहे. म्हणूनच आम्ही प्रकल्पाच्या सुरुवातीलाच डासांच्या उत्त्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यावर भर देतो. युपीएल एसएएस डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाटी हरित रसायनाचा वापर करणार आहे. हे रसायन देशात पहिल्यांदाच वापरले जाईल. डासांच्या उत्त्पत्तीला नष्ट करणारे हे अनोखे हरित रसायन जागतिक आरोग्य संघटनेकडून मान्यताप्राप्त असून, या रसायनाच्या वापराने मानवी आरोग्याला कोणताही धोका पोहोचत नाही. या रसायनाच्या वापराने पिण्याचे पाणीही सुरक्षित राहते. तलाव, विहिरी, वाहत्या पाण्याचा जलस्त्रोत, टाक्या, घर तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पाण्याच्या स्त्रोतात हे रसायन वापरता येईल. डासांची संख्या नियंत्रणात आल्यास डेंग्यू आणि मलेरियामुळे पसरणा-या आजारांची संख्याही आपोआप आटोक्यात येईल. या आजारांचा प्रसार रोखणे हेच कंपनीचे उद्दिष्ट आहे.’’
युपीएल एसएएसद्वारे डासांची उगमस्थाने असलेल्या जागांवर थंड धुरी देणारी यंत्रे वापरली जातात. धुरी देणारी यंत्रे वापरताना वायू प्रदूषण होणार नाही अशा रितीने डिझाईन केली आहेत. ही यंत्रे हाताळायला सोप्पी आहेत, शिवाय या यंत्रांसाठी ऊर्जाही कमी लागते. हे उपाय जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय रोगवाहक नियंत्रण कार्यक्रम या दोन्हींद्वारे मंजूर केलेल्या सूत्रीकरणावर आधारलेले आहेत. या उपाययोजनांमुळे जलपरिसंस्था, मनुष्य आणि प्राणीही सुरक्षित राहतात.
या सर्व उपाययोजना युपीएल एसएएसच्या पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाच्या व्यापक धोरणाला अधोरेखित करतात. या योजनांच्या अंमलबजावणीमुळे आता मनुष्याला निरोगी आणि सुरक्षित परिसंस्थेत आरामदायी जीवन जगता येणे शक्य आहे.
डायलिसिस चे जास्ती दर आकारणाऱ्या काही खाजगी हाॅस्पिटल्सच्या सोयीसाठी हे दर जाणूनबुजून वाढवले असावेत, अशी शंका घ्यायला नक्कीच जागा आहे. कारण या निर्णयामुळे महापालिका आता शहरी गरीब योजनेअंतर्गत सर्व हाॅस्पिटल्सना १३५० ऐवजी १९५० रुपयांचा दर डायलिसिस साठी देणार आहे. ज्यामुळे दरमहा महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहेच. याशिवाय शहरी गरीब योजनेअंतर्गत असलेली डायलिसिस उपचारांची २ लाखांची लिमिट लवकर संपून रुग्णांना उर्वरीत ट्रीटमेंट महागड्या दराने घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या नवीन समितीच्या महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान करणाऱ्या शिफारशी रद्दबातल करुन जुन्या समितीच्या शिफारशीनुसार दर निश्चित करण्यास सांगावे. -विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच
पुणे- शहरी गरीब योजनेतील डायलिसिस दरांचे सुसूत्रीकरण करुन दरनिश्चिती सुचवणाऱ्या नवीन समितीकडून आधीच्या समितीच्या एक वर्षापूर्वीच्या अहवालाला खो देऊन तब्बल ५० % ने डायलिसिस चे दर वाढवण्याची शिफारस केली आहे. याने महापालिकेचे आणि गरीब रुग्णांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. तसेच जुन्या समितीच्या शिफारशीनुसार दर निश्चित करण्यास सांगावे. अशी मागणी वेलणकर यांनी महापलिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.वेलणकर यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदन नुसार पुणे मनपा आरोग्य विभागाकडून शहरातील गरीब , गरजू व अल्प उत्पन्न असणारे व झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना तसेच पुणे मनपा आजी माजी सभासद, सेवानिवृत्त कर्मचारी व कार्यरत कर्मचारी यांचेसाठी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना राबविण्यात येते. पुणे महापालिका व खाजगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण शहरात आठ डायलिसिस सेंटरमध्ये तसेच पुणे मनपा पॅनेलवरील ३७ खाजगी रुग्णालयांमध्ये या दोन्ही योजनांतर्गत डायलिसिस उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या सर्व ठिकाणी डायलिसिस उपचार सुविधा दर वेगवेगळा आहे. ज्यामध्ये प्रति डायलिसिस १३५० रुपयांपासून ( रुबी हाॅस्पिटल, पूना हाॅस्पिटल , कृष्णा हाॅस्पिटल) प्रति डायलिसिस २९०० रुपयांपर्यंत ( रत्ना हाॅस्पिटल ) वेगवेगळे दर आकारले जातात आणि महापालिका त्याप्रमाणे पैसे अदा करते. महापालिका व खाजगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चालवल्या जाणाऱ्या सेंटर्स मध्येही हे दर प्रति डायलिसिस ४०० रुपयांपासून प्रति डायलिसिस २३५४ रुपयांपर्यंत आहेत व महापालिका त्याप्रमाणे पैसे अदा करते. शहरी गरीब योजनेतील रुग्णांना प्रतिवर्षी डायलिसिस साठी जास्तीत जास्त दोन लाख रुपये महापालिका देते. त्यापेक्षा जास्त खर्च आल्यास रुग्णांना तो स्वतः करावा लागतो आणि त्यामुळे जास्ती दर असणाऱ्या रुग्णालयात डायलिसिस उपचार घेणाऱ्या रुग्णांना दरवर्षी काही हजार रुपये स्वतः खर्च करावा लागतो.
वेलणकर यांनी पुढे म्हटले आहे कि, या गोष्टी लक्षात घेऊन पुणे महापालिका आरोग्य विभागाकडून तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांकडे डायलिसिस दरांचे सुसूत्रीकरण करुन दरनिश्चिती करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यासाठी १९/०१/२०२४ रोजी परवानगी मागितली व त्याप्रमाणे समिती स्थापन ही झाली . या समितीमध्ये भारत सरकारचे सल्लागार असलेल्या डाॅ. लोबोंसारख्या अनुभवी व्यक्ती होत्या. या समितीने संपूर्ण अभ्यास करुन १३/०३/२०२४ रोजी या संदर्भातील दरनिश्चिती सुचवली ज्यामध्ये महापालिका संयुक्त प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त ११३० तर पॅनेलवरील हाॅस्पिटल्समध्ये जास्तीतजास्त १३५० रुपयांचा डायलिसिस दर असावा अशी शिफारस केली. याशिवाय गरजेनुसार वापराव्या लागणार्या इंजेक्शनची सुद्धा दरनिश्चिती केली. या शिफारशींना अतिरिक्त आयुक्तांची मान्यता मिळणे अपेक्षित होते. मात्र त्यानंतर ८ महिन्यांनी आरोग्य विभागाने नवीनच टूम काढून या विषयावर नवीन समितीचे गठन २२/११/२०२४ रोजी केले. या समितीने आधीच्या समितीने केलेल्या शिफारशींकडे डोळेझाक करुन खाजगी हाॅस्पिटलचे डायलिसिस चे दर तब्बल ५०% ने वाढवले आहेत. आधीच्या समितीने डायलिसिस चा दर ( डायलिसिस, डायलायझर, ट्युबिंग, कन्झुमेबल्स सह) १३५० रुपये ठरवला होता. आता नवीन समितीने हा दर (डायलिसिस, डायलायझर, ट्युबिंग, कन्झुमेबल्स सह) १९५० रुपये ठरला आहे. जेंव्हा की रुबी,पूना हाॅस्पिटलसह अनेक मोठ्या हाॅस्पिटल्सचा डायलिसिस चा दर १३५० च आहे. अशी माहिती वेलणकर यांनी दिली आहे.
पुणे- अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयाच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच एरंडवणे येथील पुणे महानगरपालिकेच्या आयएसओ प्रमाणित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली. या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना पुणे सारख्या महानगरांमध्ये शाश्वत सांडपाणी प्रक्रियांची आवश्यकता समजली. विद्यार्थ्यांना प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीय श्रेणीतील सांडपाणी प्रक्रियांसाठी आवश्यक असलेले विविध टप्पे, बागकाम, स्वच्छता, बांधकाम क्रियाकलापांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी आणि गाळ विल्हेवाट लावण्याचे शाश्वत मार्ग या विषयी मार्गदर्शन मिळाले. शेवटी सर्व सहभागींनी उज्वल भविष्यासाठी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याची शपथ घेतली. या अभ्यास सहलीचे आयोजन प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ.रविराज सोरटे यांनी केले. या अभ्यास सहलीचे समन्वयक प्रा. रणजितसिंग गायकवाड, प्रा.अमृता चव्हाण यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या औद्योगिक अभ्यस सहलीत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचा, सांडपाणी प्रक्रियांचा जवळून अनुभव घेता आल्यामुळे विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाने औद्योगिक अभ्यस सहलीचे आयोजन केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ.प्रमिलाताई गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
पुणे– चतुश्रृंगी पोलिस ठाण्याचे हद्दीत पाषाण सर्कल येथे मद्यधुंद अवस्थेतील बाईकस्वारांनी हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून रस्त्यावरुन जाणाऱ्या एका कारचालकास थांबवून जाेडप्याला मारहाण करत कारच्या काचा दगडाने फाेडल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आराेपींना अटक करण्यात आले आहे.
पाषण परिसरात रहाणारे एका कुटुंबातील पती व पत्नी हे त्यांच्या कारने पाषाण सर्कल येथून जात हाेते. त्यावेळी सदर ठिकाणी पाच ते सहाजणांचे एक टाेळके त्याठिकाणी थांबलेले हाेते. त्यांनी कार थांबवून सदर जाेडप्याला मारहाण केली. त्यांनी जाब विचारला असता त्यांच्या कारवर दगडफेक करुन काचा फाेडण्यात आला. याबाबत तक्रारदार केतकी भुजबळ म्हणाल्या, 18 एप्रिल राेजी रात्री सव्वाअकरा वाजता मी व माझे पती अमरदेव रमन हे मित्रांसाेबत जेवण करुन मुकुंदनगर येथून घरी परतत हाेताे. पाषाण सर्कल येथून नेहमीप्रमाणे आम्ही जात असताना, दुचाकीवर दाेनजण त्याठिकाणी हाेते. ते मद्यधुंद अवस्थेत हाेते आणि रस्त्याचे मधून गाडी चालवत असल्याने पतीने गाडीचा हाॅर्न वाजवला. त्यांनी राग येऊन पतीच्या बाजूचा कारचा दरवाजाची खिडकी उघडण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यांना रागाने पाहून आम्ही घाबरलाे. त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, तुम्ही हाॅर्न काेणाला पाहून वाजवला आहे.
तुम्ही रस्त्याचे मध्ये गाडी चालवू नकाे बाजूने चालवा असे सांगितले. परंतु त्यांनी आम्हाला काहीवेळ पुढे जाऊनच दिले नाही. अनेकवेळ त्यांनी अडवून धरल्याने आम्ही गाडी बाजूला घेऊन पती रस्त्यावर खाली उतरले. त्यावेळी दाेघांना विचारणा करुन तुम्हाला राग येण्याचे कारण काय? तुझ्यात काय खूप ताकद आहे का? तु आम्हाला मारहाण करणार का? असे म्हणत असताना मागून तीन ते चारजण त्याठिकाणी आले. त्यांनी पतीला पाठीमागून धरुन मारहाण सुरु केली.
मुंबई-एकूण 1009 उमेदवारांनी यूपीएससी सीएसई उत्तीर्ण केले आहे. यामध्ये, सामान्य वर्गातून 335, आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातून 109, ओबीसी वर्गातून 318, अनुसूचित जातीतून 160 आणि अनुसूचित जमातीतून 87 उमेदवार पात्र ठरले आहेत.
यूपीएससी सीएसई प्रिलिम्स परीक्षा 16 जून 2024 रोजी झाली होती, तर मुख्य परीक्षा 20 ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान घेण्यात आली होती. तर मुलाखत जानेवारी ते एप्रिल 2025 दरम्यान घेण्यात आली होती. यूपीएससीने 2024 च्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. प्रयागराजची शक्ती दुबे ही ऑल इंडिया टॉपर ठरली आहे. एकूण 1009 उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत समाविष्ट आहेत. गुणवत्ता यादी upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
रँक 1 – शक्ती दुबे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील शक्ती दुबे ही ऑल इंडिया टॉपर ठरली आहे. शक्तीने अलाहाबाद विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. परीक्षेत राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे त्यांचे पर्यायी विषय होते.
रँक 2 – हर्षिता गोयल हर्षिता गोयल दुसऱ्या क्रमांकावर आहे. हर्षिता शाह मूळची हरियाणाची आहे आणि अनेक वर्षांपासून गुजरातमधील वडोदरा येथे राहत आहे. हर्षिताचा जन्म हरियाणामध्ये झाला. यानंतर हे कुटुंब गुजरातमधील वडोदरा येथे आले. ती इथेच वाढली. ती पात्रतेनुसार सीए आहे. हर्षिताने थॅलेसेमिया आणि कर्करोगाने ग्रस्त मुलांसाठी अहमदाबाद येथील बिलीफ फाउंडेशनसोबत काम केले आहे.
रँक 3 – अर्चित पराग डोंगरे अर्चितने वेल्लोरमधील व्हीआयटी येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) पदवी घेतली आहे. त्यांच्या वैकल्पिक विषयांपैकी एक तत्वज्ञान होता.
रँक 4 – मार्गी चिराग शाह अहमदाबाद येथील गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून संगणक अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या शाह मार्गीने समाजशास्त्र हा पर्यायी विषय घेऊन चौथा क्रमांक पटकावला आहे.
रँक 5 – आकाश गर्ग दिल्लीतील गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठातून संगणक विज्ञान विषयात तंत्रज्ञानाची पदवी घेतलेल्या आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या आकाश गर्गने समाजशास्त्र हा पर्यायी विषय घेऊन पाचवे स्थान पटकावले आहे.
राज्यातून यशस्वी झालेले उमेदवार
अर्चित पराग डोंगरे (03) शिवांश सुभाष जगदाळे (26) शिवानी पांचाळ (53) अदिती संजय चौघुले (63) साई चैतन्य जाधव (68) विवेक शिंदे (93) तेजस्वी प्रसाद देशपांडे (99) दिपाली मेहतो (105) ऐश्वर्या मिलिंद जाधव (161) शिल्पा चौहान (188) कृष्णा बब्रुवान पाटील (197) गौरव गंगाधर कायंदे पाटील (250) मोक्ष दिलीप राणावत (251)प्रणव कुलकर्णी (256) अंकित केशवराव जाधव (280) आकांश धुळ (295) जयकुमार शंकर आडे (300) अंकिता अनिल पाटील (303) पुष्पराज नानासाहेब खोत (304) राजत श्रीराम पात्रे (305) पंकज पाटले (329) स्वामी सुनील रामलिंग (336)अजय काशीराम डोके (364) श्रीरंग दीपक कावोरे (396) वद्यवत यशवंत नाईक (432) मानसी नानाभाऊ साकोरे (454) केतन अशोक इंगोले (458) बच्छाव कार्तिक रवींद्र (469) अमन पटेल (470) संकेत अरविंद शिंगाटे (479) राहुल रमेश आत्राम (481) चौधर अभिजीत रामदास (487) बावणे सर्वेश अनिल (503) आयुष राहुल कोकाटे (513) बुलकुंडे सावी श्रीकांत (517) पांडुरंग एस कांबळी (529) ऋषिकेश नागनाथ वीर (556) श्रुती संतोष चव्हाण (573) रोहन राजेंद्र पिंगळे (581) अश्विनी संजय धामणकर (582) अबुसलीया खान कुलकर्णी (588) सय्यद मोहम्मद आरिफ मोईन (594)वेदांत माधवराव पाटील (601) अक्षय विलास पवार (604) दिलीपकुमार कृष्ण देसाई (605) गायकवाड ऋषिकेश राजेंद्र (610) स्वप्नील बागल (620) सुशील गिट्टे (623) सौरव राजेंद्र ढाकणे (628) अपूर्व अमृत बलपांडे (649) कपिल लक्ष्मण नलावडे (662) सौरभ येवले (669) नम्रता अनिल ठाकरे (671) ओंकार राजेंद्र खुंताळे (673) यश कनवत (676) बोधे नितीन अंबादास (677) ओमप्रसाद अजय कंधारे (679) प्रांजली खांडेकर (683) सचिन गुणवंतराव बिसेन (688) प्रियंका राठोड (696) अक्षय संभाजी मुंडे (699)अभय देशमुख (704) ज्ञानेश्वर बबनराव मुखेरकर (707) विशाल महार (714) अतुल अनिल राजुरकर (727) अभिजित सहादेव आहेर (734) भाग्यश्री राजेश नायकेले (737) श्रीतेश भूपेंद्र पटेल (746) शिवांग अनिल तिवारी (752) पुष्कर लक्ष्मण घोळावे (792) योगेश ललित पाटील (811) श्रुष्टी सुरेश कुल्ये (831) संपदा धर्मराज वांगे (839) मोहिनी प्रल्हाद खंदारे (844) सोनिया जागरवार (849) अजय नामदेव सरवदे (858) राजू नामदेव वाघ (871) अभिजय पगारे (886) हेमराज हिंदुराव पनोरेकर (922) प्रथमेश सुंदर बोर्डे (926)गार्गी लोंढे (939) सुमेध मिलिंद जाधव (942) आनंद राजेश सदावर्ती (945) जगदीश प्रसाद खोकर (958) विशाखा कदम (962) सचिन देवराम लांडे (964) आदित्य अनिल बामणे (1004)
लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सची निर्मिती असलेला आणि तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट लव फिल्म्सच्या मराठी सिनेसृष्टीतील प्रवासाची सुरुवात अधोरेखित करणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
‘देवमाणूस’ मध्ये महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांसारख्या ताकदीच्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्या अभिनयामुळे चित्रपटाची कथा अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भावनिक, रहस्यपूर्ण आणि गूढ यांचा मेळ असलेला ‘देवमाणूस’ एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव देणारा चित्रपट आहे. दमदार कथानक, उत्कंठा वाढवणारे प्रसंग आणि मनाला भिडणारे संगीत यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना कथेशी जोडून ठेवेल.
चित्रपटातील दोन खास गाणी देखील सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. सोनू निगम यांच्या आवाजातील ‘पांडुरंग’ हे हृदयस्पर्शी भक्तिगीत, रोहन-रोहन यांचे संगीत आणि प्रसाद मडूपवार यांचे गीत असलेले हे गाणं श्रद्धा आणि भक्तीचा सुरेल संगम आहे. महेश मांजरेकर यांच्या वारी यात्रेतील भावनिक दृश्यांनी परिपूर्ण हे गाणे आध्यात्मिक आणि भावनिक दृष्टिकोनातून प्रेक्षकांवर प्रभाव टाकणारे आहे. तर दुसरे गाणे ‘आलेच मी’ या लावणीमध्ये, सई ताम्हणकर पहिल्यांदाच लावणीवर थिरकताना दिसत आहे. तेजस देऊस्कर लिखित या गाण्याला रोहन-रोहन यांनी संगीत दिले असून बेला शेंडे आणि रोहन प्रधान यांच्या आवाजात ते सादर झाले आहे. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशीष पाटील यांच्या संकल्पनेत साकारलेली ही लावणी प्रेक्षकांना उत्साह आणि सौंदर्याचा अनुभव देणारी ठरत आहे.
दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर म्हणतात, “‘देवमाणूस’ हा माझ्यासाठी केवळ एक चित्रपट नसून एक भावनिक प्रवास आहे. लव फिल्म्सने माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि संपूर्ण टीमची मेहनत यामुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. ट्रेलरला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहाता प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे दिसतेय. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे.”
निर्माते लव रंजन म्हणतात, “हा चित्रपट म्हणजे महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीला आमची आदरांजली आहे. ‘देवमाणूस’ केवळ आमचा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रवेश नाही, तर दर्जेदार आणि अर्थपूर्ण कथानक सादर करण्याचा संकल्प आहे.”
निर्माते अंकुर गर्ग यांचा विश्वास आहे की, “तेजस देऊस्कर यांचे प्रभावी दिग्दर्शन आणि कलाकारांची सशक्त कामगिरी ‘देवमाणूस’ला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल. आम्हाला या चित्रपटाचा भाग असल्याचा अभिमान आहे.”
लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग निर्मित ‘देवमाणूस’ २५ एप्रिल २०२५ रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पुणे, : पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या एम्प्रेस गार्डन व्यवस्थापनातर्फे आज जागतिक वसुंधरा दिनाच्या औचित्यानिमित्तप एक दुर्मिळ व आकर्षक वृक्ष अर्थात ‘उर्वशी वृक्ष’ याचे रोपण करण्यात आले. सकाळी १० वाजता संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. सुमनताई किर्लोस्कर यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार, मानद सचिव सुरेश पिंगळे, यशवंत खैरे, वनस्पती तज्ञ प्रा.श्री. द. महाजन, श्रीकांत इगळहळीकर,शर्वरी बर्वे, प्रशांत चव्हाण यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. यावेळी शिवण, पिवळा कांचन, सोनचाफा, तामन, शेंदरी आदी वृक्षाचे रोपण करण्यात आले.
उर्वशी वृक्ष मूळचा म्यानमार (ब्रम्हदेश) येथील असून, जगातील हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा अतिसुंदर वृक्षांमध्ये त्याचा वरच्या क्रमांकावर गौरवाने उल्लेख होतो. अम्हर्स्टिया नोबिलिस हा सदाहरित वृक्ष आहे आणि त्याच्या विलक्षण सौंदर्यामुळे ‘उर्वशी वृक्ष’ म्हणूनही तो प्रसिद्ध आहे.
एम्प्रेस गार्डन व्यवस्थापनाने नेहमीप्रमाणे या उपक्रमाचाही उद्देश पर्यावरण पूरकतेस प्रोत्साहन देणे, दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन करणे व नागरिकांना निसर्गाच्या सान्निध्यात एक सकारात्मक अनुभव देणे हा आहे. बागेमधील सौंदर्य व नैसर्गिक रचना अबाधित ठेवत, अशा दुर्मिळ वनस्पतींचे संकलन व रोपण करण्याचे काम संस्थेने सातत्याने चालू ठेवले आहे.
एम्प्रेस गार्डन हे केवळ वनस्पतीप्रेमींसाठीच नव्हे, तर पर्यटन व कुटुंब सहलीसाठीसुद्धा एक आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे. बागेतील निसर्गरम्य व शांत वातावरण, सुसज्ज बसण्याची व्यवस्था व वाहत्या पाण्याच्या स्रोतांनी या ठिकाणाचे महत्व अधिकच वाढवले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत एम्प्रेस गार्डनने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली आहे.
पुणे : बृहन्मुंबई महापालिकेने मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिर बुलडोझरच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या उद्ध्वस्त केल्याच्या निषेधार्थ सकल जैन संघ,पुणे तर्फे आज (दि. 22) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. “जय बोलो महावीर की” , “हम शांत है पर कमजोर नही”, “मंदिर तोडा चूप नही रहेंगे, शांतीसे मार्च करेंगे”, “हम शांतीसे चलते है, अपनी बात करते है’, “जय जयकार जैन धर्म की जय जयकार”, “जैन धर्म अमर रहे” अशा घोषणा देत जैन समाजातील हजारो स्त्री-पुरुषांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला.
संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच उद्ध्वस्त केलेल्या मंदिराचे त्याच जागेवर पुनर्निमाण व्हावे, अशा मागणीचे पत्र सकल जैन संघ, पुणेतर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने दि. 16 एप्रिल रोजी विलेपार्ले येथील जैन मंदिर चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने पाडले. सर्व कायदेशीर बाबी समजून न घेता बृहन्मुंबई महापालिकेतर्फे अत्यंत क्रूर पद्धतीने बुलडोझर व जेसीबीच्या सहाय्याने मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच मंदिर पाडताना तेथील धार्मिक ग्रंथ, पूजा साहित्य यांची विटंबना करण्यात आली आणि मंदिरातील मूर्ती देखील भंग करण्यात आली. प्रशासनाच्या या जुलमी कार्यामुळे देशातील समस्त जैन धर्मिय व समाज अत्यंत आक्रोशित झाला आहे, असे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. निषेधाचे निवेदन सकल जैन संघाच्या वतीने अचल जैन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनाच्या स्वीकार करून जैन समाजाच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले. गेल्या अनेक वर्षांपासून जैन धर्माच्या तीर्थस्थळांवर अतिक्रमण, यात्रेकरुंवर हल्ले तसेच जैन गुरू, साधू, साध्वी यांच्यावरही हल्ले असे प्रकार हेतूपूर्वक सुरू असून या मागे कोणाचा कुटील हेतू आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे. याच बरोबर जैन धर्मावर, समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी सकल जैन संघातर्फे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
या आहेत मागण्या… राज्य-देशातील सर्व जैनधर्मीय तीर्थक्षेत्रे, मंदिरे, स्थानक, उपाश्रय, साधू-साध्वींचे निवासस्थान अशा सर्व धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी सुरक्षा सुनिश्चित करणारा कायदा व्हावा, जैन धर्मिय साधू-साध्वी संतविहार करताना संपूर्ण वेळ राज्य सरकारच्यावतीने त्यांना संरक्षण देण्यात यावे, जैन धर्मियांची अत्यंत प्राचिन व हजारो वर्षांची परंपरा असलेल्या विविध तीर्थक्षेत्रांवर जसे, पालिताना, गीरनार, समद शिखरजी, राजगृही, राणकपुर तसेच अन्य ठिकाणी पूजा-भक्ती करण्यापासून विविध समाजकंटकांकडून रोखले जात आहे त्याबाबत केंद्र सरकारच्या माध्यमातून कारवाई होऊन जैन धर्मियांना संरक्षण मिळावे. मागील काही वर्षांत समाजकंटकांकडून जैन धर्मिय साधू-संतांवर वारंवार हल्ले होत आहेत. संबंधित हल्लेखोरांवर कडक कारवाई करून साधू-संतांना संरक्षण देणारा केंद्रीय स्तरावरील कायदा मंजूर करावा.
सकल जैन संघ, पुणेतर्फे अचल जैन (संयोजक) विजयकांत कोठारी, मिलिंद फडे, महावीर कटारिया यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा ते १२ या वेळात धरणे आंदोनल करण्यात आले. धरणे आंदोलनात पुणे आणि परिसरातील जैन बंधू-भगिनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती बांधून आंदोलनकर्त्यांनी “हम जैन है हम रुकेंगे नही, झुकेंगे नही”, “डरके नही, डटके खडे रहेंगे, अहिंसक है कायर नही” , “जैन मंदिर नही टूटने देंगे, हम अपनी आस्था बचाएंगे” , “हम शांत है लेकिन कमजोर नहीं”, “मंदिर पर हमला बंद करो” , “बीएमसी चोर है” , “जैन समुदाय को न्याय चाहिए”, “एक है तो सेफ है” , “हम जैनो ने ठाना है मंदिर वही बनाना है”, “जिओ और जिने दो” अशा घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. आंदोलनाच्या सुरुवातीस व शेवटी नवकार महामंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. ८७ वर्षांचे सुरेश शहा यांनी आंदोलनात सहभाग घेत मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इरादा व्यक्त केला. राजकीय पक्षातील लोकांनी अरविंद शिंदे, मोहन जोशी, प्रशांत जगताप, अभय छाजेड, अविनाश बागवे व बाळा ओसवाल, डॉ. कल्याण गंगवाल, राजेश शहा यांनी आपले विचार व्यक्त केले. जैन समाजबांधवांना संबोधित करताना मिलिंद फडे म्हणाले, मुंबईतील दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ सर्व समाजबांधव एकत्र झाले आहेत याचा आनंद असून “हम एक है तो सेफ है” असा नारा त्यांनी दिला. अचल जैन म्हणाले, समाजाच्या भावना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविणार आहोत. समाजाच्या भावनांचा जर विचार झाला नाही, न्याय मिळाला नाही तर पुढील भूमिका ठरवू.
युवराज शहा, अभय छाजेड, प्रविण चोरबेले, सुरेखा शहा, अजित पाटील, इंद्रकुमार छाजेड, प्रिती पाटील, सुरेश शहा, लक्ष्मीकांत खाबिया, सुरेंद्र गांधी, संपत जैन,सतीश शहा, समीर जैन, नितीन जैन, भरत सुराणा, ॲड. योगेश पांडे, अभय जैन, अल्पेश गोग्री यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी निषेधात्मक भावना व्यक्त करत आंदोलनाला पाठींबा दिला.
“जोखीम घेऊन, शहीदत्व स्वीकारून कसाब व अफ़ज़ल गुरू यांना काँग्रेस काळात पकडले व एनकाऊंटरने नव्हे तर न्यायीक प्रक्रियेने फाशी दिली.! ११ वर्षे सत्तेत राहून केले काय..? छड़ा लावण्या ऐवजी आरोपच करत बसणार काय..?
काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी ..
पुणे – दि २१ २६/११ केस’चे वास्तव तत्कालीन सरकारी वकील व भाजप’चे लोकसभेचे उमेदवार अँड उज्वल निकम यांचे कडुन माधव भांडारी यांनी समजून घ्यावे व मगच उथळ व हास्यास्पद आरोप करावेत असा खुलासा काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांच्या २६/११ च्या हल्ल्यात काँग्रेस चा हात” या आरोपावर, उत्तर देतांना सांगीतले. ते पुढे म्हणाले की, २६/११ अतिरेकी हल्ला तेंव्हाच्या काँग्रेस शासन काळात सक्षम पोलीस अघिकाऱ्यांनी जीवावर जोखीम घेऊन प्रसंगी शहीदत्व स्वीकारून अजमल कसाब यास पकडले व त्यास एनकाऊंटर ने नव्हे तर रितसर न्यायीक प्रक्रिया चालवून फाशी दिली.. अजमल कसाब असो वा अफजल गुरू या अतिरेक्यांना मृत्युदंडाची शिक्षा देणारे काँग्रेस सरकारच होते मात्र भाजप शासीत काळात, कंदहार येथे अतिरेक्यांना सोडण्याचे काम वा संसदेवर गोळीबाराची नामुष्की, काश्मिर पंडीतांची हत्या वा पुलवामा मधील ४० सीआरपीएफ जवानांची हत्या वा चिन कडुन घुसखोरी व २० भारतीय जवानांची हत्या हे सर्व देशास नामुष्की आणणारे प्रकार व हल्ले मात्र ‘भाजप सत्ताकाळातच’ झाले याचा खरेतर भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी आकलन करावे, बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारी व तथ्यहीन वक्तव्ये ऊठसूठ काँग्रेस वर पुन्हा करू नयेत अशी पुस्ती ही त्यांनी जोडली.
मुंबई: दूरसंचार कंपनी एमटीएनएल सात बँकांकडून आणि इतर काही ठिकाणांहून घेतलेले कर्ज फेडण्यात अपयशी ठरली आहे.सतत तोट्यात चालणाऱ्या या कंपनीने सात सरकारी बँकांकडून घेतलेले 8,346 कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. म्हणजेच ही रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. कंपनीने स्वतः नियामक फाइलिंगद्वारे शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे.31 मार्च 2025 पर्यंत, कंपनीवरील एकूण थकित कर्ज 33,568 कोटी रुपये आहे. यामध्ये 8,346 कोटी रुपये बँक कर्ज, 24,071 कोटी रुपये सॉवरेन गॅरंटी बाँड आणि 1,151 कोटी रुपये दूरसंचार विभागाकडून रोख्यांवर व्याज देण्यासाठी घेतलेले कर्ज आहे.एमटीएनएलच्या थकीत कर्जांमध्ये सर्वात मोठा वाटा युनियन बँक ऑफ इंडियाचा आहे, या बँकेकडून कंपनीने 3,633 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या व्यतिरिक्त:
इंडियन ओव्हरसीज बँक – ₹ 2,374 कोटी
बँक ऑफ इंडिया – ₹ 1,077 कोटी
पंजाब नॅशनल बँक – ₹ 464 कोटी
स्टेट बँक ऑफ इंडिया – ₹ 350 कोटी
युको बँक – ₹ 266 कोटी
इतर कर्जांसह एकूण रक्कम – ₹ 8,346 कोटी
कंपनीने म्हटले आहे की ऑगस्ट 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान या बँकांना कर्ज आणि व्याजाची परतफेड करण्यात आलेली नाही.कंपनीला होत असलेला तोटा आणि कर्जामुळे एमटीएनएलने आधीच अनेक वेळा सरकारकडे मदत मागितली आहे. आता प्रश्न असा आहे की सरकार या संकटात सापडलेल्या कंपनीला आणखी एक बेलआउट पॅकेज देणार की ही कंपनी खाजगी कंपन्यांना विकणार हा मोठा प्रश्न आहे. एमटीएनएल म्हणजेच महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ही एक सार्वजनिक क्षेत्रातील (पीएसयू) दूरसंचार कंपनी आहे. ही कंपनी 1 एप्रिल 1986 रोजी स्थापन झाली. ही कंपनी भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या (दूरसंचार विभाग – दूरसंचार विभाग) अंतर्गत येते.एमटीएनएलची सुरुवात विशेषतः दिल्ली आणि मुंबई सारख्या दोन प्रमुख महानगरांमध्ये टेलिफोन सेवा देण्यासाठी करण्यात आली होती. बीएसएनएल सारख्या मोठ्या दूरसंचार नेटवर्कला पाठिंबा देणे आणि शहरी भागात जलद, आधुनिक दूरसंचार सेवा देणे हे कंपनीचे उद्दिष्ट होते.