पुणे, दि. २६: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक तीनच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत १ लाख १४ हजार ६२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकास मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार खेड तालुक्यात नाणेकरवाडी हद्दीतील मुत्केवाडी या ठिकाणी अवैद्य मद्यविक्री अड्ड्यावर छापा टाकून २५ नोव्हेंबर रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईत सदर ठिकाणी देशी दारू पावर लाईन पंच मद्याच्या १८० मिली व ९० मिली क्षमतेच्या एकूण ६४४ बनावट सिलबंद बाटल्या तसेच विदेशी मदयाच्या बनावट ७१ सीलबंद बाटल्या व बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य असा सर्व मिळून १लाख १४ हजार ६२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अहमदसाब पठाण व हरीष ब्रिजेश कुमार चंद्रा यांना अटक करून मे. प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी खेड यांच्यासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपींना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी मंजूर करून आरोपींची रवानगी येरवडा कारागृह पुणे येथे केली आहे.
या कारवाईत भरारी पथक क्रमांक ३ चे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक वाय. एम. चव्हाण, पी. ए. ठाकरे यांच्यासह सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस डी साठे, जवान सर्वश्री अमर कांबळे, अनिल दांगट, गिरीश माने, जगन्नाथ चव्हाण, जयदास दाते व जवान -नि- वाहनचालक शरद हांडगर यांनी सहभाग घेतला.
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित मद्य, बनावट मद्य, गावठी हातभट्टी दारू निर्मिती, विक्रीमुळे शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते, याबाबत माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.
पुणे, दि.२६ नोव्हेंबर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि सहायक आयुक्त समाजकल्याण, पुण्यातील संविधान प्रेमी नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त ‘वॉक फॉर संविधान’ रॅली आयोजित करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे,यशदाचे उप महासंचालक डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी तथा बार्टी विभागप्रमुख मारोती बोरकर, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, उपायुक्त वृषाली शिंदे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी पाटील, सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवढे, बार्टीचे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी, विविध विद्यालय, महाविद्यालयाचे विद्यार्थी, महार रेजिमेंटचे माजी सैनिक, नागरिक उपस्थित होते.
यावेळी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेच्या प्रतिमेस डॉ. पुलकुंडवार आणि श्री. वारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. रॅलीमध्ये महापुरुषाच्या वेशभूषेत शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी संविधानाच्या जागृतीचे फलक घेऊन संविधानाच्या घोषणा देत होते. ढोल ताशाच्या गजरामध्ये व लेझीम पथकाच्या निनादांमध्ये ही रॅली काढण्यात आली.
‘वॉक फॉर संविधान’ रॅलीला भिडेवाडा येथून सुरुवात झाली आणि ती पुढे लाल महाल-दारुवाला पुल-फडके हौद-१५ ऑगस्ट चौक-जुनी जिल्हा परिषद यामार्गे मार्गक्रमणकरीत पुणे स्टेशन परिसरातील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि संविधान प्रास्ताविकेचे वाचन विशाल लोंढे यांनी केले. सामुदायिक वाचन करून रॅलीचा समारोप करण्यात आला.
पुणे शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, शालेय व महाविद्यालयाचे विद्यार्थी, एनसीसी चे विद्यार्थी, अधिकारी बार्टी व सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी मान्यवर, अधिकारी,नागरिक, विद्यार्थी यांचे आभार सतीश गायकवाड यांनी मानले.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संविधानाच्या बाजूचे नेते” – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या मुख्यालय बाळासाहेब भवन येथे संविधानाची प्रस्ताविका व उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून ‘शाखा तिथे संविधान’ या शिवसेना अभियानाची भव्य सुरुवात शिवसेनेच्या नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
ही मोहीम शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवा खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवली जात आहे. या प्रसंगी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्ते व मुख्य संयोजक किरण सोनावणे, माजी आमदार राम पंडागळे, शिवसेना मीडिया समन्वयक दिनेश शिंदे, विलास जोशी तसे शिवसेना महिला विभाग प्रमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “भारतीय संविधान हे समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि संधी यांची हमी देणारे महान दस्तऐवज आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही एकदा स्पष्ट शब्दांत सांगितले होते की न्यायालयात शपथ घ्यायची असेल तर ती संविधानावर हात ठेवूनच घेतली पाहिजे. ‘शाखा तिथे संविधान’ या उपक्रमामुळे शिवसेना संविधाननिष्ठ पक्ष आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होईल.”
अभियानाचे प्रमुख संयोजक व प्रवक्ते किरण सोनावणे म्हणाले, “शिवसेनेच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसेना शाखेत संविधानाची प्रस्ताविका व प्रत ठेवून संविधानिक मूल्यांचा व्यापक प्रसार केला जाईल. एक शायर म्हणतो, ‘दोस्त, कभी फुरसत मिले तो मुझे पढ़ना, मुझमें तेरे हर उलझनों का समाधान है… मैं कोई और नहीं, तेरे देश का संविधान हूँ’.”
या अभियानांतर्गत संविधान बाग, संविधान संग्रहालय उभारणे, देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर व विमानतळावर संविधानाची प्रस्ताविका प्रदर्शित करणे, तसेच संविधानासाठी कार्यरत व्यक्ती व संस्थांचा सत्कार आयोजित करणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. लोककलावंतांचाही या अभियानामध्ये सहभाग ठेवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी आमदार राम पंडागळे यांनी केले.
सिनेमा एआय हॅकेथॉन 2025 ने जागतिक प्रतिभांना आकर्षित केले; या 48 तासांच्या स्पर्धेसाठी 14 संघांत होती चुरस
#IFFIWood,SHARAD LONKAR 25 नोव्हेंबर 2025
वेव्हज चित्रपट बाजाराच्या अंतर्गत आयोजित सिनेमा एआय हॅकेथॉन 2025 या स्पर्धेने चित्रपटनिर्मितीमधील कला, तंत्रज्ञान आणि मूल्ये यांच्या अनोख्या छेदनबिंदूचा उत्सव साजरा केला. या मंचाने जगभरातील निर्मात्यांना सर्जक परिणामांमध्ये जबाबदारी, पारदर्शकता आणि अस्सलपणा जपून ठेवून पटकथा लेखन, व्हिडीओ निर्मिती, संकलन आणि उत्पादन यांसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे संचालित साधनांचा वापर करून कथाकथनाच्या सीमा ओलांडण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.
महत्त्वाच्या सर्जनशील आणि तांत्रिक आयामांमध्ये उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी देण्यात येणाऱ्या पाच पारितोषिकांचे विजेते खालीलप्रमाणे आहेत:
आयुष राज यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘माय रेड क्रेयॉन’ या हिंदी भाषेतील चित्रपटासाठी कल्पंक या पथकाला सर्वोत्कृष्ट एआय चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.
केयूर काजवदर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रिमॉरी’ या इंग्रजी भाषेतील चित्रपट निर्मितीसाठी अटोमिस्ट गटाला एआयचा सर्वात नाविन्यपूर्ण उपयोग करण्यासाठीचे पारितोषिक देण्यात आले.
‘लॉस्ट अँड फाऊंड’ या समरेश श्रीवास्तव यांनी दिग्दर्शित केलेल्या हिंदी चित्रपटासाठी समरेश श्रीवास्तव आणि यज्ञ प्रिया गौतम यांना सर्वोत्कृष्ट कथाकथनाचे पारितोषिक देण्यात आले.
इंडीवुड संघ आणि वाँडरवॉल मिडिया नेटवर्क्स च्या ‘बीइंग’ या सुमेश लाल यांनी दिग्दर्शित केलेल्या इंग्रजी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दृश्य परिणामांसाठी पारितोषिक देण्यात आले.
राजेश भोसले यांच्या ‘मॉन्सून एको’ या इंग्रजी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ध्वनी/संगीत रचनेचा पुरस्कार देण्यात आला.
या हॅकेथॉन साठी दोन टप्प्यांतील ऑनलाईन पद्धत स्वीकारण्यात आली. पहिल्या टप्प्यात व्यक्ती अथवा गटाला (अधिकाधिक पाच सदस्यांच्या) त्यांनी आधी तयार केलेला एआय-आधारित चित्रपट (2 ते 10 मिनिटे कालावधीच्या) सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.
यासाठीची अर्जप्रक्रिया 1 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर, 2025 या कालावधीत खुली होती आणि यासाठी उदंड प्रतिसाद मिळाला कारण यात 180 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले होते. निवड समित्यांकडून त्यांचे सखोल मूल्यांकन केल्यानंतर, 14 संघांना 48 तासांच्या अंतिम स्पर्धेसाठी निवडण्यात आले.
स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात, भाग घेतलेल्या स्पर्धकांना संकल्पना देण्यात आली होती: पुनर्परिकल्पित आठवणी. स्पर्धकांना भावनिकदृष्ट्या भावणारी कथा निर्माण करण्यासाठी वास्तववाद आणि कल्पनाशक्ती यांचा मिलाफ साधत, एखाद्या गहन वैयक्तिक आठवणीचा नव्याने अर्थ लावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेली 60 ते 120 सेकंदांची चित्रपटीय कथा निर्माण करायची होती.
हे 48 तासांचे आव्हान भारतीय वेळेनुसार 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.00 वाजता सुरु झाले आणि ते 22 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता संपले.
परीक्षक पथक – सिनेमा एआय हॅकेथॉन 2025
या स्पर्धेच्या परीक्षक पथकात पुढील मान्यवरांचा समावेश होता:निर्माते, दिग्दर्शक आणि इफ्फीचे उत्सव संचालक शेखर कपूर; निर्माते, दिग्दर्शक रामदास नायडू; दिग्दर्शक, अॅनिमेटर अश्विन कुमार; भारतीय चित्रपट वारसा संस्थेतील चित्रपट इतिहासकार आशा बात्रा; एलटीआयमाइंडट्री चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि परस्पर संवादी सेवा विभागाचे जागतिक प्रमुख डॉ.सुजय सेन; डिझाईन नीती आणि क्राफ्टस्टुडीओ, एलटीआयमाइंडट्रीच्या परस्पर संवादी सेवा विभागाच्या जेष्ठ दिग्दर्शक नयना राऊत; एलटीआयमाइंडट्रीचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि संवाद, माध्यम आणि मनोरंजन विभागाचे मुख्य व्यवसाय अधिकारी दिव्येंदू हलधर आणि एलटीआयमाइंडट्री च्या मुख्य विपणन अधिकारी नेहा कथुरिया
स्पर्धकांनी दाखवलेली अस्सलता, तांत्रिक कौशल्ये आणि भावनिक खोली अधोरेखित करत परीक्षकांनी इतक्या कमी वेळात निर्माण केलेल्या चित्रपटांची अद्वितीय गुणवत्ता आणि सर्जनशीलता याबद्दल प्रचंड प्रशंसा केली.
चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाची परिवर्तनकारी क्षमता दाखवत आणि चित्रपट निर्मात्यांच्या आगामी पिढीसाठी नवी क्षितिजे खुली करत सिनेमा एआय हॅकेथॉन 2025 ही स्पर्धा म्हणजे एक महत्वाचा उपक्रम ठरली.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
ज्येष्ठांचा आदर करण्याबाबत कोणतीही तडजोड चालणार नाही: मुख्य अभिनेत्री सीमा बिस्वास
आव्हान आणि साहसाचे एक अनोखे मिश्रण: कुंभमेळ्यातील चित्रीकरणाबाबत खोया-पाया चित्रपटाच्या चमूने व्यक्त केली भावना
#IFFIWood,SHARAD LONKAR 25 नोव्हेंबर 2025
दिग्दर्शक आशुतोष सिंग यांचा पहिला चित्रपट ‘खोया पाया’ आज 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खास प्रदर्शित करण्यात आला. कुंभमेळ्याच्या प्रचंड गर्दीत सोडून दिलेल्या आईवर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट एका वृद्ध आईची कथा सांगतो, जिला तिच्या मुलाने सोडून दिले आहे. तिला अनोळखी लोकांमध्ये अनपेक्षित मित्र सापडतात आणि शेवटी विश्वासघात करणाऱ्या पश्चात्तापी मुलाला ओळखण्यास ती नकार देते.
तुडुंब भरलेल्या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकारांनी महोत्सवाच्या ठिकाणी आयोजित पीआयबी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.
आईची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी वृद्ध पालकांशी गैरवर्तन या चित्रपटाच्या विषयाबद्दल उत्कटतेने आपले मत मांडले . ही समस्या खूप व्यापक असल्याचे सांगत त्या म्हणाल्या : “मी अशी अनेक कुटुंबे पाहिली आहेत जिथे वृद्ध पालकांना वाईट वागणूक दिली जाते. सिनेमा हे एक शक्तिशाली माध्यम आहे जे समाजावर प्रभाव टाकू शकते. वृद्ध पालकांप्रति वाढती असंवेदनशीलता याबद्दल बोलले जाणे महत्त्वाचे आहे.” वृद्ध पालकांना एकाकी सोडणारी मुले भारतासारख्या समाजात जास्त पहायला मिळू नये जिथे परंपरागत तीन पिढ्या एकत्र नांदतात असे मत त्यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या की या पटकथेने त्या लगेच प्रभावित झाल्याचे सांगत त्या म्हणाल्या : “जर त्या सोडून दिलेल्या आईच्या जागी मी असते तर मी परत आले नसते. स्वाभिमान आवश्यक आहे; आदराशिवाय, कौटुंबिक बंधांना अर्थ नसतो .” या प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितले की चित्रीकरणापूर्वीच्या कार्यशाळांमुळे टीमला पात्रे उत्तम रीतीने समजून घेण्यास आणि चित्रीकरणादरम्यान “पात्रांसोबत जगण्यास ” मदत झाली.
मुलाची भूमिका करणारा अभिनेता चंदन रॉय सन्याल म्हणाला की, कलाकारांना अनेकदा सामाजिकदृष्ट्या अस्वीकारार्ह पात्रे साकारावी लागतात. त्याला वाटते की हा चित्रपट खूप प्रासंगिक आहे कारण जरी भारतात आईची पूजा केली जात असली तरी काही लोक वृद्ध पालकांना भार मानतात. त्यांनी ही भूमिका खलनायकी बनणार नाही याची काळजी घेत ही भूमिका साकारली, हे लक्षात घेऊन की दोषी व्यक्तींचेही स्वतःचे अंतर्गत समर्थन असते. त्यांच्या पात्राची अपराधीपणाची वेदनादायक जाणीव हा चित्रपटाचा एक महत्त्वाचा भावनिक भाग आहे.
अभिनेत्री अंजली पाटील यांनी सांगितले की, त्यांनी चित्रपटातील भूमिका कथेतील साधेपणासाठी स्वीकारली, जी समकालीन चित्रपटात दुर्मिळ आहे आणि दिग्गज अभिनेत्री सीमा बिस्वास यांच्याबरोबर काम करण्याची आणि शिकण्याची संधी यानिमित्ताने मिळाली.
चित्रपटाचे निर्माते हिमांशू राय यांनी आठवण सांगितली की एक वर्षापूर्वी गोव्यात पटकथा ऐकली होती आणि तिच्या ताकदीने आपण लगेच प्रभावित झालो होतो. ते म्हणाले की कथेचे सार त्यांच्याशी प्रतिध्वनीत झाले कारण ती कथा आई आणि मुलाच्या सर्वात मजबूत नात्याबद्दल आहे, जरी त्याला एक काळी बाजू देखील आहे. त्यांना वाटते की ही कथा खूप सशक्त आहे.
दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणारे आशुतोष सिंग यांनी महाकुंभातील प्रचंड गर्दीत चित्रपटाचे चित्रीकरण केले. त्यांचा गावही याच परिसरात आहे! कोट्यवधी भाविकांनी भेट दिलेल्या महाकुंभाच्या गर्दीत 10-12 दिवसांत चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. “चित्रपटाचा रंग महाकुंभातच सापडला” असे त्यांनी सांगितले. तसेच परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगमही त्यांनी अधोरेखित केला. डिजिटल उपकरणांसह फिरणारे यात्रेकरू, उत्साही लोकसंगीताचा माहोल आणि चित्रपटाच्या पोताला आकार देणारी दृश्ये – या सर्वांचे प्रतिबिंब चित्रपटात दिसून येते, असे त्यांनी नमूद केले.
आपल्या स्वतःच्या गावात चित्रीकरण करणे मजेदार असले तरीही कुंभात चित्रीकरण करणे हा सर्वात कठीण भाग होता, असे ते म्हणाले. “अशी ताकदवान कलाकारांची फळी असताना चित्रीकरण करणे म्हणजे फिल्म स्कूलमध्ये प्रशिक्षण घेण्यासारखे होते. एका चित्रपटासाठी उत्तम कलाकार असणे अत्यंत महत्त्वाचे असते”, असेही त्यांनी सांगितले.
कुंभसारख्या प्रत्यक्ष ठिकाणी चित्रीकरण करताना गर्दीचा सामना कसा करावा याबद्दल अधिक माहिती देताना, आशुतोष यांनी उघड केले की संपूर्ण कलाकार आणि तांत्रिक पथक स्थानिक लोकांसारखे कपडे घालत होते, कोणाच्याही अंगावर फॅन्सी “बोम्बैया कपडे” नव्हते. अशाप्रकारे, ते सहजपणे गर्दीचा भाग बनले! त्यांनी संगमातही डुबकी मारली. बरेच लोक व्हिडिओ कॅमेरे घेऊन फिरत असल्याने, शूटिंग उपकरणांचा वापर केल्याने ते फारसे वेगळे दिसले नाहीत, असे दिग्दर्शक म्हणाले. मात्र आव्हान एकच होते – गर्दीत चित्रपटातील पात्रे वेगळी दिसली पाहिजेत.
कुंभमेळ्यात चित्रीकरण करणे हे विलक्षण आणि आव्हानात्मक होते, परंतु साहसी आणि रोमांचक होते, असे चित्रपटाच्या मुख्य कलाकारांनी सांगितले. अंजली पाटील यांनी त्यांच्या व्यक्तीरेखेची कोणतीही दृश्ये कुंभमेळ्याची नसल्याने आपल्या दृश्यांचे तिथे चित्रीकरण न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. “गर्दीने चित्रीकरणात फार अडथळा आणला नाही, उलट खूप सहकार्य केले आणि साथ दिली, हे कदाचित आजूबाजूला असलेल्या आध्यात्मिक वातावरणामुळे घडले असावे”, असे सीमा बिस्वास यांनी सांगितले.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
पुणे- महापालिकेने शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.गेली असंख्य वर्षे धूळ खात पडलेली हही योजना भाजपला आगामी धूळ चारू शकेल असे असतानाही ती राबविण्याचा हट्ट नेमका कोणासाठी पुरविला जातो आहे,कित्येक वर्षे यापूर्वीच्या आयुक्तांनी आणि काही लोकप्रतिनिधींनी बासनात गुंडाळून ठेवलेली हि योजना आता बाहेर का काढण्यात आली आहे? कोणकोणत्या गुंडांच्या टोळ्या पोसायचे आहेत ? असा सवाल हि आता भाजप कार्यकर्त्यांच्या समवेत अजित पवारांचे कार्यकर्ते देखील करू लागले आहेत.सध्या ५ रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर हि योजना राबवून वाहतुकीची कोंडी कमी करण्याचा जाब गजब दावा महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. आणि पुढे संपूर्ण महापालिका हद्दीत असे पे -पार्क चे ठेके अनेक मुख्य रस्तोरस्ती देऊन नागरिकांचे खिसे खाली करण्याचा डाव देखील आखला जातो आहे. नागरीकांकडून कर ,टॅक्स तरी कुठे कुठे किती कसा वसूल करणार किती लुटणार ? असा सवाल आता येत्या निवडणुकीत न झाला तर नवलच वाटेल अशी स्थिती आहे.
या योजनेसाठी काही आकर्षणे दाखविण्यात येत आहेत ती अशी –ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांना आपली गाडी कुठे पार्क करता येईल, हे समजावे, यासाठी या रस्त्यांवर ‘डिजिटल स्क्रीन’ लावण्यात येणार आहेत. प्रत्येकी अडीचशे मीटर जागेवर लावलेल्या या स्क्रीन्सवर जवळपास कुठे पार्किंग उपलब्ध आहे हे समजणार आहे. त्यामुळे नागरिकांना गाडी पार्क करणे सोपे जाणार आहे.शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिस संयुक्तरीत्या प्रयत्न करीत आहेत. शहरातील प्रमुख चौक आणि रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासह वर्दळीच्या रस्त्यांवर बेशिस्त उभे राहणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘पे अँड पार्क’ योजना राबविण्यात येणार आहे. महापालिकेचे सभागृह अस्तित्वात असतानाच सुमारे सात वर्षांपूर्वी या संदर्भातील ठराव लोकप्रतिनिधींनी सर्वसाधारण सभेत मंजूर केला आहे.यानुसार लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रोड आणि जंंगली महाराज रस्ता, विमाननगर, बाणेर येथील हायस्ट्रीट आणि बिबवेवाडी येथील स्वामी विवेकानंद रस्ता या रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ योजना राबवली जाईल. त्यासाठीची निविदाप्रक्रिया सुरू असून, यासाठीची निविदापूर्व बैठकही नुकतीच पार पडली. तीन डिसेंबर रोजी यासाठीच्या निविदा सादर करण्याची अंतिम मुदत असून, चार डिसेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत.या रस्त्यांवर पार्किंगसाठी रस्त्यावर पट्टे (मार्किंग) करणे, चारचाकी, दुचाकी पार्किंगसाठीचे फलक लावणे आदी कामे केली जातील; याशिवाय या संदर्भातील अधिसूचना काढण्यासाठीचे पत्र वाहतूक पोलिसांकडे दिले आहे. पार्किंगचा ठेका मिळणाऱ्या ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे अधिकृत गणवेश व महापालिकेने मान्यता दिलेले अधिकृत ओळखपत्र असणे बंधनकारक असेल.
‘पे अँड पार्क’मधील रस्ते हे दीड ते तीन किलोमीटर लांबीचे आहेत. त्यामुळे कुठे गाडी लावण्यासाठी जागा आहे, कुठे दुचाकी आणि कुठे चारचाकी लावता येईल, हे नागरिकांना समजणे अवघड आहे. त्यामुळेच या रस्त्यांवर प्रत्येक अडीचशे मीटर अंतरावर ‘डिजिटल स्क्रीन’ लावल्या जातील. यात त्या वेळी गाडी लावण्यासाठी कुठे जागा उपलब्ध आहे, हे सहज समजेल. त्यानुसार वाहनचालक वाहन पार्क करू शकतील.
पुणे-सरकारी जमिनीवर अथवा रस्त्यांच्या बाजूला २/५ फुटाची टपरी टाकली कि कोणतीही नोटीस न देता ती उध्वस्त करून जप्ती केली जाते तिथे कोणताही नैसर्गिक न्याय चालत नाही पण मुंढवा येथील काही हजार कोटीची सरकारी जमीन हडपण्याच्या प्रकरणात मात्र नैसर्गिक न्यायला मोठे प्राधान्य सरकार देत असल्याने पार्थ अजित पवार यांचे किंवा अमेडीया कंपनीचे अद्याप केसालाही धक्का लावला जाऊ शकलेला नाही
मुंढवा येथील वादग्रस्त ४० एकर जमिनीसाठीचे २१ कोटींचे मुद्रांक शुल्क भरण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने टाळाटाळ सुरू केली आहे. १८०० कोटींचे बाजारमूल्य असलेली जमीन केवळ ३०० कोटींत खरेदी करणाचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आला. आता शुल्क मुदतवाढ देऊन पुन्हा सरकार मेहरबान झाले आहे.
हा अब्जावधी रुपयांचा व्यवहार केवळ ५०० रुपयांत करणाऱ्या अमेडिया कंपनीला या व्यवहारात २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने २१ कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावून पंधरा दिवसांची मुदत दिली होती. मुदत संपण्याच्या एक दिवस आधी कंपनीने आणखी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी कंपनीने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे केली होती.
त्यावर विभागाकडून आणखी सात दिवसांची मुदत वाढ देण्यात आली. ही मुदतही सोमवारी (२४ नोव्हेंबर) संपुष्टात आली. मात्र कंपनीने शुल्क न भरता आता वकिलांची नियुक्ती करून कायदेशीर लढाईचा मार्ग निवडण्याचा पर्याय स्वीकारला. वकिलांनी सोमवारी वकीलपत्र दाखल करताना केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ४ डिसेंबरपर्यंतची मुदत बाजू मांडण्यास दिली आहे.
जम्मू-काश्मीरमध्येही कडाक्याची थंडी आहे, पहलगाममध्ये किमान तापमान -4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. परिसरात दंव बर्फासारखे गोठले आहे. तर, उत्तराखंडमधील केदारनाथ आणि आदि कैलासमध्ये तापमान -16°C पर्यंत खाली गेले आहे.
देशातील डोंगराळ राज्यांमध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे मैदानी प्रदेशात थंडी वाढत आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 27 नोव्हेंबरपासून उदयपूर, जोधपूर, अजमेर विभागातील जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडू शकतो. यामुळे थंडी वाढेल.
मध्य प्रदेशात रात्री उष्णता आणि दिवसा थंडी वाढली आहे. वास्तविक पाहता, राज्यात वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे उत्तरेकडील वारे येत नाहीत, यामुळे रात्रीचे तापमान वाढले आहे. दुसरीकडे, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ज्यामुळे राज्यात हलके ढग आहेत. यामुळे दिवसा थंडी वाढली आहे.
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. मंगळवारी पटना, बेतिया, बगहा, समस्तीपूर, गोपालगंज, मधेपुरा, सुपौल, बेगूसराय, जहानाबादसह 10 हून अधिक जिल्ह्यांमध्ये सकाळी दाट धुके दिसून आले. पुढील 24 तासांत तापमानात 1-3 अंशांपर्यंत घट होऊ शकते.
50 टक्के आरक्षण मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे वादात सापडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत संदिग्धता कायम आहे. राज्य सरकारने निवडणुकांतील आरक्षणासंबंधी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडे आणखी वेळ मागितला.त्यानुसार ‘पुढची तारीख’ देताना न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम आदेश देणार असल्याचे संकेत दिले. तसेच बेकायदेशीरपणे निवडणुका घेतल्याचे आढळले तर त्या रद्द करू, असा सज्जड दम निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारला दिला. राज्यातील आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या 57 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालावर अवलंबून असल्याने धाकधूक वाढली आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्गांना 27 टक्के आरक्षण दिले. त्यामुळे अनेक ठिकाणी एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेबाहेर गेल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. यासंदर्भात मंगळवारी सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी सुरुवातीलाच राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आरक्षण मर्यादेबाबत भूमिका मांडण्यासाठी वाढीव मुदत मागितली. 50 टक्क्यांच्या मर्यादेबाहेर गेलेल्या आरक्षणासंबंधी निवडणूक आयोगाशी सल्लामसलत सुरू आहे. त्यामुळे भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणखी वेळ द्या, अशी विनंती मेहता यांनी सरकारतर्फे केली. त्यावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला नाही. त्याची नोंद घेत खंडपीठाने पुढील सुनावणी शुक्रवारी दुपारी 12 वाजता निश्चित केली. ही ‘पुढची तारीख’ देताना न्यायालयाने प्रकरणाच्या गुणवत्तेवर कोणतेही भाष्य करीत नसल्याचे स्पष्ट केले, मात्र तोंडी टिप्पणी करताना निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला खडे बोल सुनावले. जर निवडणुका बेकायदेशीरपणे घेतल्या गेल्याचे आढळले तर न्यायालय निवडणुका रद्द करेल. जे काही कायद्याला धरून नसेल ते सर्व रद्द केले जाईल, असे सरन्यायाधीश कांत यांनी निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारला बजावले. त्यामुळे न्यायालय शुक्रवारी निवडणुकांबाबत कोणते अंतरिम आदेश देतेय, याकडे संबंधित पक्षकारांसह राजकीय पक्ष तसेच महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे.
निवडणुका कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती
याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनी म्हणणे मांडले. ओबीसी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत सिमीत ठेवून निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलावा आणि तोपर्यंत प्रलंबित निवडणुका जाहीर करण्यास मनाई करावी, अशी विनंती न्यायालयाला केली. त्याला ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी विरोध केला. सध्या सुरू असलेल्या निवडणुका सुरू ठेवाव्यात आणि आरक्षणाबाबत सविस्तर सुनावणी घ्यावी. ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी झाले आहे, असा युक्तिवाद अॅड. जयसिंग यांनी केला. मूळ याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. देवदत्त पालोदकर यांनी पाच जिह्यांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा मोठय़ा प्रमाणावर ओलांडली असून इतर ठिकाणी निवडणुकीचा कार्यक्रम पुढे नेणे शक्य असल्याचे सांगितले. तसेच ज्येष्ठ वकील शेखर नाफडे यांनी आदिवासीबहुल भागात आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्याचे निदर्शनास आणून दिले.
जि. प., पं. समित्यांच्या निवडणुका तूर्तास नाही
निवडणूक आयोगातर्फे ज्येष्ठ वकील बलबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयापुढे बाजू मांडली. 242 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असून त्यापैकी 57 ठिकाणी एकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, असे अॅड. सिंग यांनी कळवले. तसेच शुक्रवारपर्यंत जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि इतर महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
न्यायालयाचे पूर्वीचे आदेश परस्परविरोधी
सर्वोच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी दिलेले आदेश परस्परविरोधी असल्याचे ज्येष्ठ वकील विकास सिंग यांनी निदर्शनास आणून दिले. न्यायमूर्ती खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने जुलै 2022 मध्ये बांठिया आयोगाला मान्यता दिली आणि त्या आयोगाच्या शिफारसींना अनुसरून निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. तथापि, ऑगस्ट 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते.
निवडणूक कार्यक्रम अंतिम आदेशाच्या अधीन
पहिल्या टप्प्यांतर्गत निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते का, अशी विचारणा सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केली. त्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी स्पष्टीकरण दिले. निवडणुकांसंबंधी ज्या काही प्रक्रिया घेत आहोत त्या सर्व प्रक्रिया न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन असतील, असे मेहता यांनी सांगितले.
नगरपरिषद निवडणूक निर्विघ्नपणे पार पडेल
नगरपालिका, नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या 2 तारखेला मतदान होणार आहे. ही निवडणूक निर्विघ्नपणे पार पडेल. यासंदर्भातील विनंती सर्वोच्च न्यायालय मान्य करेल अशी अपेक्षा आहे. अर्थातच हा सर्व निर्णय न्यायालयाला घ्यायचा आहे. त्यावर जास्त बोलणे उचित नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
न्यायालय काय म्हणाले…
आज 50-60 टक्क्यांच्या लढाईत नेमके काय चाललेय? जनतेला योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही. ओबीसी तसेच इतर संवर्गांना संविधानाच्या चौकटीत राहून प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. यासंदर्भात काही अस्पष्टता असेल तर हे प्रकरण मोठय़ा खंडपीठाकडे वर्ग केले जाईल.
सद्यस्थितीत सर्व स्थानिक
स्वराज्य संस्थांवर मागील अनेक वर्षांपासून प्रशासक नेमलेले आहेत. संवैधानिक तरतुदींनुसार निवडणुका लवकरात लवकर घेणे सध्या आवश्यक आहे. आयोगाने आरक्षण मर्यादेबाबत तपशीलवार अहवाल सादर करावा. सर्व पक्षकारांच्या सहकार्याने निवडणुकांचा कार्यक्रम कसा पुढे नेता येईल याविषयी शुक्रवारी युक्तिवाद ऐकले जातील.
न्यायालय निवडणुका थांबवणार नाही. आम्ही केवळ अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तळागाळातील लोकशाही पुनरुज्जीवित करण्यासाठी ही एक व्यवहार्य व्यवस्था आहे. समाजाला जातीच्या आधारावर विभागू नये. ओबीसींना वगळून लोकशाही कशी असू शकते?
भारत विकास परिषद, फ्यूप्रो, समुत्कर्ष सोशल फाऊंडेशन आणि तार्क फाऊंडेशन, मिशिलिन, इंडो फ्रेंच चेंबर ॲाफ कॅामर्स, फ्यूप्रो संयुक्त संयोजनातून उपक्रम
पुणे:अपघातात अवयव गमावलेल्या किंवा अनपेक्षित पणे अपंगत्व अलेल्या व्यक्तींना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि भारत विकास परिषद, मिशिलिन, इंडो फ्रेंच चेंबर ॲाफ कॅामर्स, फ्यूप्रो ( टीव्ही शो शार्क टॅंकमध्ये भाग घेणारी आणि उत्कृष्ट स्टार्टअपसाठी भांडवल मिळालेली कंपनी), समुत्कर्ष सोशल फाऊंडेशन आणि तार्क फाऊंडेशनच्या संयुक्त संयोजनातून एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत अपघात किंवा अनपेक्षितपणे अपंगत्व आलेल्या व्यक्तींना कृत्रिम अवयव उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत संविधान दिनाचे औचित्य साधून कोथरुड मधील अशा व्यक्तींची तपासणी करुन त्यांना कृत्रिम अवयव उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
एखादा व्यक्ति अपघातात आपला एखादा अवयव गमावतो, तेव्हा त्यांचे संपूर्ण जीवन बदलून जाते. अशा परिस्थितीत व्यक्तीला वाटते की, त्यांचे आयुष्य स्तब्ध झाले आहे आणि ते निराश होऊ शकतात. त्यातच कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रत्येकाला कृत्रिम पाय किंवा हाताची किंमत परवडतेच असे नाही. दिव्यांग आणि अंगविच्छेदनातून गेलेले लोक, ज्यांना त्यांच्या जीवनात साधन, प्रवेश किंवा निधीच्या कमतरतेमुळे पुढे जाण्यास मदत करणाऱ्या गतिशीलता सहाय्य मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
त्यामुळे अशा गरजूंना पुन्हा आपल्या पायावर उभे करण्यासाठी आवश्यक असलेली संसाधने तसेच सामान्य आणि परिपूर्ण जीवन जगण्याचा आत्मविश्वास देण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला असून, भारत विकास परिषद, मिशिलिन, इंडो फ्रेंच चेंबर ॲाफ कॅामर्स, फ्यूप्रो ( टीव्ही शो शार्क टॅंकमध्ये भाग घेणारी आणि उत्कृष्ट स्टार्टअपसाठी भांडवल मिळालेली कंपनी), समुत्कर्ष सोशल फाऊंडेशन आणि तार्क फाऊंडेशनच्या संयुक्त संयोजनातून कृत्रिम अवयव जसे की कृत्रिम पाय उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
यासाठी उद्या २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी कोथरुड मधील थरकुडे रुग्णालय येथे सकाळी ०९.३० ते सायं. ०६.०० वेळेत दिव्यांगांची तपासणी करण्यात येणार आहे. तरी कोथरुड मधील गरजूंनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ना. पाटील आणि संयोजकांनी केले आहे.
मुंबई- मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जाहीर झाला आहे. जागतिक रंगकर्मी दिवसाचे औचित्य साधून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या रंगकर्मींचा हक्काचा एक दिवस असावा आणि त्या निमित्ताने रंगकर्मींच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दरवर्षी ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ साजरा करण्यात येतो. मराठी रंगभूमीसाठी सर्वस्व वाहिलेल्या नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून २५ नोव्हेंबर हा दिवस, २०१४ या वर्षापासून कलाकार संघातर्फे ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ सन्माननीय रंगकर्मीला प्रदान केला जातो. यंदा हा पुरस्कार वंदना गुप्ते यांना जाहीर करण्यात आला आहे.
दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार सोहळा कलावंत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने आयोजित केला जातो. मात्र यंदा महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांवर ओढवलेल्या पूर परिस्थितीच्या संकटामुळे, हा सोहळा जाहीररित्या न करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे हा पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथशिंदे यांच्या हस्ते त्यांच्या दालनात लवकरच प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सदर सोहळ्यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याची माहिती मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी दिली आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही मराठी नाट्य कलाकारांची मातृसंस्था असून, मराठी नाट्य कलाकार संघ ही नाट्य परिषदेची व्यावसायिक रंगभूमीवरील रंगकर्मींसाठी कार्य करणारी अधिकृत घटक संस्था आहे. या संस्थेच्या वतीने व्यावसायिक रंगकर्मींसाठी अनेक हिताचे उपक्रम राबविण्यात येतात. आतापर्यंतच्या ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ सोहळ्यांमध्ये भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, किशोर प्रधान, शोभा प्रधान, गंगाराम गवाणकर, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, उषा नाडकर्णी, रोहिणी हट्टंगडी व मोहन जोशी या कलाकारांना मराठी नाट्य कलाकार संघातर्फे ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र.
मुंबई, दि. २५ नोव्हेंबर २०२५
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारुप मतदार यादी २० नोव्हेंबर २०२५ रोजी जाहिर झाली असून या याद्यांवर हरकती व सूचना घेण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बऱ्याच महानगरपालिकांमध्ये प्रारुप मतदार याद्यांवर हरकत व सूचना घेण्यासाठी मुदत वाढविण्याची आवश्यकता असून अवघी ७ दिवसांची मुदत अत्यंत कमी आहे, ती १५ दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार व विधान परिषद गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या संयुक्त पत्रात असे म्हटले आहे की, बऱ्याच महानगरपालिकांमध्ये प्रारुप मतदार याद्या प्रभागनिहाय योग्य पद्धतीने फोडलेल्या नाहीत, बऱ्याच मतदारांची नावे राहत असलेल्या भागांतून इतर भागांमध्ये गेलेली आहेत, ही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हरकती घेण्याची पद्धत देखील अत्यंत किचकट असून प्रत्येक व्यक्तीने विहित नमुन्यात अर्ज करावयाचा असून सोबत आधारकार्ड जोडायचे आहे, ही पद्धत किचकट व वेळकाढू आहे. कोणत्याही व्यक्ती वा राजकीय पक्षाने निवडणुकीच्या सक्षम अधिकाऱ्याच्या निदर्शनास योग्य ती हरकत व सूचना आणून दिल्यास अनेक व्यक्तींबद्दलीची तक्रार स्विकारली पाहिजे, आज तसे होताना दिसत नाही. मतदार याद्यांबाबत स्पष्टता व पारदर्शकता येण्यासाठी राजकीय पक्षांच्या व प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेणे आवश्यक आहे. प्रभागातील नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने मतदार याद्या तपासण्यास वेळ लागणार आहे म्हणून वेळ वाढवून द्यावी.
राज्यभर विशेषतः नागरी भागात कठोर नियम अंमलबजावणीची मागणी
मुंबई, दि. २५ नोव्हेंबर २०२५ : राज्यातील महानगर क्षेत्रांमध्ये वाढत चाललेल्या जड वाहनांच्या (मिक्सर, ट्रक, डंपर) अनियंत्रित वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवनास निर्माण होणारा गंभीर धोका लक्षात घेऊन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना तातडीने कठोर उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले आहे. हिंजवडी, पुणे येथे २१ नोव्हेंबर २०२५ रोजी जड वाहनासोबत झालेल्या भीषण अपघातात युवती रिदा शेख हिचा मृत्यू झाल्याच्या दुःखद घटनेचा उल्लेख करून त्यांनी संपूर्ण राज्यातील नागरी भागातील वाहतूक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे की, पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपूर या महानगरांत जड वाहनांची बेफिकीर व नियमबाह्य वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. १ जानेवारी ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जड वाहनांमुळे पुणे व पिंपरी चिंचवड भागात तब्बल १,८४७ अपघात घडले असून २१२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील इतर भागांमध्ये अपघातांची आकडेवारी पाहिल्यास ती अत्यंत भयावह आहे. त्यामुळे लाल दिवा उल्लंघन, वेगमर्यादा न पाळणे आणि अतिभार या कारणांमुळे शहरांमधील वाहतूक व्यवस्था धोक्यात येत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
राज्यात जड वाहन वाहतुकीवरील नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी २ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. या बैठकीत मिक्सर वाहतुकीचे व्यवस्थापन, नवले पुलावरील भीषण अपघात, तसेच राज्यातील जड वाहन सुरक्षेसाठी व्यापक धोरण ठरविणे यावर सविस्तर चर्चा होणार आहे. स्थानिक वाहतूक परिस्थितीचे विश्लेषण आणि आगामी सुरक्षात्मक उपाययोजना निश्चित करण्यासाठी ही बैठक निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरी भागातील जड वाहनांना निश्चित वेळेतच प्रवेश देण्याची सक्ती करणे, बांधकाम व औद्योगिक परवानगी प्रणाली काटेकोरपणे राबविणे, तसेच प्रमुख मार्गांवर जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे. GPS-आधारित स्पीड लिमिटर अनिवार्य करणे, अतिभारावरील नियंत्रणासाठी डिजिटल वजनकाटे आणि ANPR कॅमेरे असलेली तपासणी केंद्रे मजबूत करणे, तसेच नियमभंग झाल्यास वाहन ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
सिग्नल उल्लंघन व अतिवेग रोखण्यासाठी AI-आधारित RLVD कॅमेरे, स्पीड रडार, स्मार्ट सिग्नल प्रणाली बसविण्यासाठी राज्यस्तरावर आर्थिक तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दंड प्रक्रिया डिजिटल करून ती पारदर्शक ठेवणे व जड वाहन चालकांसाठी नियमित प्रशिक्षण आणि पुनर्प्रमाणन अनिवार्य करण्याची शिफारसही त्यांनी पत्रात केली आहे. अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये २४ तास तपासणी पथके तैनात ठेवणे, रात्रीच्या वेळी जड वाहनांवर नियंत्रण वाढवणे आणि रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविणे यावरही त्यांनी विशेष भर दिला.
राज्यातील नागरिकांचे प्राणरक्षण आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था उभारणे हे शासनाचे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे सांगून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परिवहन विभागाने तातडीने आवश्यक आदेश व दिशा-निर्देश जारी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या निवेदनाची प्रत परिवहन आयुक्त, जिल्हाधिकारी, तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना पाठविण्यात आली आहे.
पंतप्रधानांनी केले अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवाला संबोधित
आज संपूर्ण देश आणि संपूर्ण जग प्रभू श्री रामाच्या भावनेने भरलेले आहे: पंतप्रधान
हा धर्म ध्वज केवळ एक झेंडा नाही, तर तो भारतीय सभ्यतेच्या पुनरुत्थानाचा ध्वज आहे: पंतप्रधान
अयोध्या ही अशी भूमी आहे जिथे आदर्शांचे रुपांतर आचरणात होते: पंतप्रधान
राम मंदिराचे हे दिव्य आवार भारताच्या सामूहिक शक्तीचे चेतनेचे ठिकाणही बनत आहे: पंतप्रधान
आमचे राम भेदांमधून नाही, तर भावनांमधून लोकांना जोडतात: पंतप्रधान
आपण एक सचेतन समाज आहोत आणि येणारी दशके आणि शतके लक्षात घेऊन दूरदृष्टीने काम केले पाहिजे: पंतप्रधान
राम केवळ एक व्यक्ती नाही, तर राम एक मूल्य, एक शिस्त आणि एक दिशा आहेत: पंतप्रधान
जर भारताला 2047 सालापर्यंत विकसित करायचे असेल आणि समाजाचे सक्षमीकरण करायचे असेल, तर आपण आपल्या आतमध्ये असलेले ‘राम’ जागृत केले पाहिजेत: पंतप्रधान
राष्ट्राने पुढे जाण्यासाठी, त्याने आपल्या वारशाचा अभिमान बाळगला पाहिजे: पंतप्रधान
येत्या दहा वर्षांत, भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करणे हे आपले ध्येय असले पाहिजे: पंतप्रधान
भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि लोकशाही आपल्या डीएनए मध्ये आहेः पंतप्रधान
विकसित भारताच्या दिशेने असलेला प्रवास गतिमान करण्यासाठी, आपल्याला एका रथाची आवश्यकता आहे, ज्याची चाके शौर्य आणि संयम आहेत, ज्याचा ध्वज सत्य आणि उत्कृष्ट आचरण आहे, ज्याचे घोडे सामर्थ्य, विवेक, संयम आणि परोपकार आहेत आणि ज्याचे लगाम क्षमा, करुणा आणि समता आहेत: पंतप्रधान
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025
देशाच्या सामाजिक-सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भूमीत एका संस्मरणीय घटनेची नोंद करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील पवित्र श्री रामजन्मभूमी मंदिराच्या शिखरावर समारंभपूर्वक भगवा ध्वज फडकवला. ध्वजारोहण उत्सव मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे आणि सांस्कृतिक उत्सव तसेच राष्ट्रीय एकतेच्या एका नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याचे प्रतीक आहे.
या प्रसंगी एका सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज अयोध्या नगरी भारताच्या सांस्कृतिक चेतनेच्या आणखी एका शिखराचा अनुभव घेत आहे. “आज संपूर्ण भारत आणि संपूर्ण जग प्रभू श्री रामाच्या भावनेने भरलेले आहे,” असे मोदी यांनी नमूद केले, आणि प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात एक अद्वितीय समाधान, अमर्याद कृतज्ञता आणि प्रचंड अलौकिक आनंद भरलेला असल्याचे अधोरेखित केले. शतकानुशतके कायम राहिलेल्या जखमा आता बऱ्या होत आहेत, शतकानुशतकांचा वेदनादायक काळ संपत आहे आणि शतकांचे संकल्प आज पूर्ण होत आहेत, यावर त्यांनी भर दिला. ही एका यज्ञाची सांगता आहे, ज्याचा अग्नी 500 वर्षे प्रज्वलित राहिला, एक असा यज्ञ जो श्रद्धेमध्ये कधीही डगमगला नाही आणि एका क्षणाकरिताही विश्वास ढळला झाला नाही, अशी घोषणा त्यांनी केली. आज प्रभू श्री रामाच्या गाभाऱ्याची अनंत ऊर्जा आणि श्री राम परिवाराचे दिव्य वैभव या धर्म ध्वजाच्या रूपात सर्वात दिव्य आणि भव्य मंदिरात स्थापित झाले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
“हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही; तर भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे”, असे स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला की, त्याचा भगवा रंग, त्यावर कोरलेले सूर्यवंशाचे वैभव, चित्रीत केलेले पवित्र ओम आणि कोरलेले कोविदार म्हणजेच कांचन वृक्षाची आकृती, या सर्व गोष्टी रामराज्याच्या महानतेचे प्रतीक आहेत. पंतप्रधान मोदी ध्वजाविषयी पुढे म्हणाले,हा ध्वज संकल्प आहे, हा ध्वज यश आहे, हा ध्वज संघर्षातून निर्मितीची गाथा आहे, हा ध्वज शतकानुशतके पुढे नेलेल्या स्वप्नांचे मूर्त स्वरूप आहे आणि हा ध्वज संतांच्या तपश्चर्येचा आणि समाजाच्या सहभागाविषयीची अर्थपूर्ण पराकाष्ठा आहे.
येणारी शतकानुशतके आणि सहस्रकापर्यंत, हा धर्मध्वज भगवान रामांच्या आदर्शांचा आणि तत्त्वांचा उद्घोष करेल, असे घोषित करून पंतप्रधान मोदी यांनी यावर भर दिला की, हा विजय केवळ सत्याचा आहे, असत्याचा नाही. त्यांनी अधोरेखित केले की,सत्य स्वतः ब्रह्माचे रूप आहे आणि सत्यातच धर्म स्थापित आहे. हा धर्मध्वजाच्या प्रेरणेने जे बोलले जाते ते पूर्ण केले पाहिजे, अशा संकल्पाला प्रोत्साहन मिळेल. ते पुढे म्हणाले की,जगात कर्म आणि कर्तव्याला प्राधान्य असले पाहिजे असा संदेश या धर्मध्वजामधून मिळत आहे. या धर्मध्वजाकडे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही आणि दुःखापासून मुक्तता आहे त्याचबरोबर समाजात शांती आणि आनंदाचा भाव फुलला आहे. त्यांनी भर दिला की, या धर्मध्वजाबरोबर एक संकल्प करायचा आहे, त्यानुसार आपल्याला असा समाज निर्माण करण्याचा आहे की, जिथे गरिबी नाही आणि कोणीही दुःखी किंवा असहाय्य नाही.
आपल्या धर्मग्रंथांची आठवण करून देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जे लोक कोणत्याही कारणास्तव मंदिरात येऊ शकत नाहीत परंतु त्याच्या ध्वजापुढे नतमस्तक होतात त्यांनाही समान पुण्य प्राप्त होते. हा धर्मध्वज मंदिराच्या उद्देशाचे प्रतीक आहे आणि दूरवरून तो भगवान श्री रामांच्या आज्ञा आणि प्रेरणा मानवतेला युगानुयुगे घेऊन जात असताना राम लल्लाच्या जन्मस्थानाचे दर्शन देईल. या अविस्मरणीय आणि अद्वितीय प्रसंगी त्यांनी जगभरातील कोट्यवधी रामभक्तांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी सर्व भक्तांना नमन केले आणि राम मंदिराच्या बांधकामात योगदान देणाऱ्या प्रत्येक दात्याचे आभार मानले. त्यांनी मंदिराच्या बांधकामाशी संबंधित प्रत्येक कामगार, प्रत्येक कारागीर, प्रत्येक योजनाकार आणि प्रत्येक वास्तुविशारदाला वंदन केले.
“अयोध्या ही अशी भूमी आहे जिथे आदर्श हे आचरणामध्ये रूपांतरित होतात”, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. श्री रामांनी आपल्या जीवनाचा प्रवास जिथून सुरू केला ते हे शहर आहे. अयोध्येने जगाला दाखवून दिले की, समाजाच्या ताकदीद्वारे आणि त्याच्या मूल्यांद्वारे एक व्यक्ती पुरुषोत्तम कशी बनते. त्यांनी आठवण करून हदिली की जेव्हा श्री राम अयोध्या सोडून वनवासासाठी गेले त्यावेळी ते युवराज राम होते, परंतु ज्यावेळी ते परतले तेव्हा ते ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणून परतले. श्री रामांच्या मर्यादा पुरुषोत्तम बनण्यात महर्षी वसिष्ठांचे ज्ञान, महर्षी विश्वामित्रांची दीक्षा, महर्षी अगस्त्य यांचे मार्गदर्शन, निषादराजांची मैत्री,माता शबरीचा स्नेह आणि भक्त हनुमानाची भक्ती या सर्वांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
विकसित भारताच्या उभारणीसाठी समाजाची सामूहिक शक्ती आवश्यक आहे, यावर भर देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला की, राम मंदिराचे भव्य- दिव्य प्रांगण- परिसर हे भारताच्या सामूहिक शक्तीचे चेतनास्थळ बनत आहे. त्यांनी अधोरेखित केले की,येथे सात मंदिरे बांधली गेली आहेत, ज्यात आदिवासी समुदायाचे प्रेम आणि त्याच्या आदरातिथ्य परंपरांचे प्रतीक असलेल्या माता शबरीच्या मंदिराचाही समावेश आहे.
पंतप्रधानांनी निषादराज मंदिराचाही उल्लेख केला, जे साधनांची नव्हे तर उद्देशाची आणि त्याच्या भावनेची पूजा करणाऱ्या मैत्रीचे साक्षीदार आहे. इथे एकाच ठिकाणी माता अहिल्या , महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य आणि संत तुलसीदास आहेत जे राम लल्ला यांच्यासोबत भक्तांना दर्शन देतात असे त्यांनी नमूद केले. त्यांनी जटायू जी आणि खारीच्या पुतळ्यांचा देखील उल्लेख केला, जे महान संकल्प साध्य करण्यासाठी अगदी छोट्यातील छोट्या प्रयत्नांचेही महत्त्व दर्शवतात. त्यांनी प्रत्येक नागरिकाला आवाहन केले की जेव्हा कधी ते राम मंदिराला भेट देतील तेव्हा त्यांनी या सात मंदिरांनाही भेट द्यावी . त्यांनी अधोरेखित केले की ही मंदिरे आपली श्रद्धा बळकट करण्यासोबतच मैत्री, कर्तव्य आणि सामाजिक सौहार्दाच्या मूल्ये देखील सक्षम बनवतात .
“आपले प्रभू श्रीराम मतभेदातून नव्हे तर भावनांद्वारे जोडले जातात “, असे सांगत मोदींनी श्रीरामांसाठी वंशापेक्षा व्यक्तीची भक्ती महत्त्वाची आहे, वंशापेक्षा मूल्ये प्रिय आहेत आणि केवळ ताकदीपेक्षा सहकार्य श्रेष्ठ आहे यावर भर दिला. ते म्हणाले की आज आपणही त्याच भावनेने पुढे जात आहोत. गेल्या 11 वर्षांमध्ये महिला, दलित, मागासवर्गीय, आदिवासी, वंचित, शेतकरी, कामगार आणि तरुण – समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे यावर त्यांनी भर दिला. जेव्हा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वर्ग आणि देशातील प्रत्येक प्रदेश सक्षम होईल, तेव्हा प्रत्येकाचे प्रयत्न संकल्प पूर्ण करण्यात योगदान देतील आणि या सामूहिक प्रयत्नांद्वारेच 2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी होईल.
रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक प्रसंगाचे स्मरण करताना पंतप्रधानांनी राष्ट्राचा संकल्प भगवान रामांशी जोडण्याबद्दल म्हटले होते आणि पुढील हजार वर्षांसाठी भारताचा पाया भक्कम केला पाहिजे याची आठवण करून दिली होती. जे फक्त वर्तमानाचा विचार करतात ते भविष्यातील पिढ्यांवर अन्याय करतात यावर त्यांनी भर दिला आणि आपण केवळ आजचाच नाही तर भावी पिढ्यांचाही विचार केला पाहिजे, कारण हे राष्ट्र आपल्या आधीपासून अस्तित्वात होते आणि आपल्या नंतरही राहील. एक चैतन्यशील समाज म्हणून आपण येणाऱ्या दशके आणि शतके यांचा विचार करून दूरदृष्टीने काम केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला आणि यासाठी आपण भगवान रामांकडून शिकले पाहिजे – त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेतले पाहिजे, त्यांचे आचरण आत्मसात केले पाहिजे आणि लक्षात ठेवले पाहिजे की राम आदर्श, शिस्त आणि जीवनाचे सर्वोच्च चरित्र यांचे प्रतीक आहेत . राम म्हणजे सत्य आणि शौर्याचा संगम, धर्माच्या मार्गावर चालण्याचे मूर्त स्वरूप, लोकांच्या आनंदाला सर्वांपेक्षा वरचे स्थान देणारे , संयम आणि क्षमा यांचा महासागर, ज्ञान आणि बुद्धीचे शिखर, सौम्यतेतील दृढता, कृतज्ञतेचे सर्वोच्च उदाहरण, उदात्त संगतीची निवड करणारा, महान शक्तीतील नम्रता, सत्याचा अढळ संकल्प आणि दक्ष , शिस्तबद्ध आणि प्रामाणिक मन होय. रामाचे हे गुण आपल्याला एक मजबूत, दूरदर्शी आणि चिरंतन भारत निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करतील असे ते म्हणाले.
“राम ही केवळ एक व्यक्ती नाही तर एक मूल्य, एक शिस्त आणि एक दिशा आहे”, असे प्रतिपादन मोदी यांनी केले. जर 2047 पर्यंत भारताला विकसित बनवायचे असेल आणि समाजाला सक्षम बनवायचे असेल, तर आपल्या प्रत्येकाच्या आतील राम जागृत झाला पाहिजे, आपल्या स्वतःच्या हृदयात पवित्र झाला पाहिजे. असा संकल्प करण्यासाठी आजच्यापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही यावर त्यांनी भर दिला. 25 नोव्हेंबर हा दिवस आपल्या वारशात अभिमानाचा आणखी एक असाधारण क्षण घेऊन आला आहे, ज्याचे प्रतीक धर्मध्वजावर कोरलेले कोविदार वृक्ष आहे असे त्यांनी नमूद केले. त्यांनी स्पष्ट केले की कोविदार वृक्ष आपल्याला आठवण करून देतो की जेव्हा आपण स्वतःला आपल्या मुळांपासून तोडतो तेव्हा आपले वैभव इतिहासाच्या पानांमध्ये गाडले जाते.
भरत आपल्या सैन्यासह चित्रकूटला पोहोचतो आणि लक्ष्मण दुरूनच अयोध्येचे सैन्य ओळखतो, त्या प्रसंगाची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. वाल्मिकी ऋषींनी केलेल्या वर्णनाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला, लक्ष्मणाने रामाला सांगितले की एका मोठ्या वृक्षासारखा दिसणारा तेजस्वी, उंच ध्वज अयोध्येचा आहे, ज्यावर रक्तकांचनाचे शुभ चिन्ह आहे. पंतप्रधानांनी यावर भर दिला की आज, रक्तकांचन पुन्हा एकदा राम मंदिराच्या प्रांगणात प्रतिष्ठापित होत असून हे केवळ एका वृक्षाचे पुनरागमन नाही तर ते स्मृतीचे पुनरागमन, अस्मितेचे पुनर्जागरण आणि अभिमानास्पद संस्कृतीचा उद्घोष आहे. रक्तकांचन आपल्याला आठवण करून देते की जेव्हा आपण आपली ओळख विसरतो तेव्हा आपण स्वत्व गमावतो, परंतु जेव्हा ओळख पुन्हा प्राप्त होते तेव्हा राष्ट्राचा आत्मविश्वास देखील परत येतो. देशाला पुढे जाण्यासाठी, आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
आपल्या वारशाच्या अभिमान बाळगण्याबरोबरच गुलामगिरीच्या मानसिकतेपासून संपूर्ण मुक्तीदेखील तितकीच महत्त्वाची आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. 190 वर्षांपूर्वी 1835 मध्ये मॅकॉले नावाच्या एका ब्रिटिश संसद सदस्याने भारताला मुळापासून उपटून टाकण्याचे बीज पेरले होते आणि मानसिक गुलामगिरीचा पाया रचला होता याची आठवण त्यांनी करून दिली. सन 2035 मध्ये, त्या घटनेला दोनशे वर्षे उलटून जातील असे त्यांनी नमूद केले आणि पुढील दहा वर्षे भारताला या मानसिकतेपासून मुक्त करण्यासाठी समर्पित करावीत असे आवाहन केले. त्यांनी दुःख व्यक्त केले की सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे मॅकॉलेच्या विचारांचा खूप मोठा परिणाम झाला – भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु न्यूनगंडातून मुक्तता मिळाली नाही. जे जे परदेशी ते सर्वकाही श्रेष्ठ मानण्याची तर आपल्या स्वतःच्या परंपरा आणि व्यवस्थेत केवळ दोष पाहण्याची विकृती निर्माण झाली, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितले की,गुलामगिरीच्या मानसिकतेने सतत या समजाला बळकटी दिली की भारताने लोकशाहीची संकल्पना परदेशातून घेतली आहे आणि संविधानदेखील परदेशापासून प्रेरित आहे. मात्र सत्य हे आहे की भारत लोकशाहीची जननी आहे आणि लोकशाही आपल्या डीएनएमध्ये आहे. त्यांनी उत्तर तामिळनाडूमधील उत्तिरमेरूर या गावातील एक हजार वर्ष जुन्या शिलालेखाकडे लक्ष वेधले. त्या काळातही लोकशाही पद्धतीने शासन कसे चालवले जात होते आणि लोकांनी त्यांचे शासक कसे निवडले, याचा उल्लेख शिलालेखात आहे. त्यांनी नमूद केले की मॅग्ना कार्टाची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली गेली, मात्र भगवान बसवण्णांच्या अनुभव मंटपाविषयीचे ज्ञान मर्यादित ठेवण्यात आले. अनुभव मंटप हा एक असा मंच होता जिथे सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक मुद्द्यांवर सार्वजनिकरित्या चर्चा केली जात होती आणि सामूहिक सहमतीने निर्णय घेतले जात होते. गुलामगिरीच्या मानसिकतेमुळे, भारतातील पिढ्या त्यांच्या स्वतःच्या लोकशाही परंपरांबद्दलच्या ज्ञानापासून वंचित राहिल्याबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले.
गुलामगिरीची मानसिकता आपल्या व्यवस्थेत ठायीठायी वसली गेली, असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले.शतकानुशतके भारतीय नौदलाच्या ध्वजावर अशी चिन्हे होती ज्यांचा भारताच्या संस्कृतीशी, सामर्थ्याशी किंवा वारशाशी काहीही संबंध नव्हता. आता नौदलाच्या ध्वजावरून गुलामगिरीचे प्रत्येक प्रतीक काढून टाकण्यात आले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा स्थापित झाला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.हा केवळ प्रतिमेतील बदल नव्हता तर मानसिकतेतील परिवर्तनाचा क्षण होता, भारत यापुढे इतरांच्या वारशातून नव्हे तर स्वतःच्या प्रतीकांद्वारे आपली शक्ती परिभाषित करेल, ही घोषणा होती, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की हेच परिवर्तन आज अयोध्येत दिसून येत आहे. याच गुलामगिरीच्या मानसिकतेने गेली अनेक वर्षे रामत्वाच्या या भावनेला नाकारले यावर त्यांनी अधिक भर दिला. भगवान राम हे स्वतःच एक संपूर्ण मूल्य प्रणाली आहेत – ओरछा मधील राजा रामापासून रामेश्वरमच्या भक्त रामापर्यंत, शबरीच्या प्रभू रामांपासून मिथिलेच्या पाहुणा रामजी यांच्यापर्यंत सर्वस्वरूपांमध्ये राम आहे हे मोदी यांनी अधोरेखित केले. देशातील प्रत्येक घरात, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आणि भारताच्या प्रत्येक कणाकणात राम वसलेला आहे, तरीही गुलामीची मानसिकता इतकी वरचढ झाली की भगवान रामाला देखील कल्पनेतील व्यक्तिरेखा म्हणून जाहीर करण्यात आले.
जर आपण येत्या 10 वर्षांत गुलामीच्या मानसिकतेमधून स्वतःला संपूर्णपणे मुक्त करण्याचा निर्धार केला तर अशा आत्मविश्वासाच्या ज्वाला प्रज्वलित होतील ज्यांतून कुठलीही शक्ती 2047 पर्यंत विकसित भारत उभारण्याचे स्वप्न साकारण्यापासून रोखू शकणार नाही हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आगामी दशकात मेकॉलेचा मानसिक गुलामगिरीचा प्रकल्प संपूर्णपणे उध्वस्त झाला तरच येती हजारो वर्षे भारताचा पाया मजबूत राहील यावर त्यांनी अधिक भर दिला. अयोध्येतील राम लल्ला मंदीर संकुल दिवसेंदिवस अधिकाधिक भव्य होत जात आहे आणि अयोध्येच्या सौंदर्यीकरणाचे कार्य वेगाने सुरु आहे हे त्यांनी ठळकपणे नमूद केले. अयोध्या ही पुन्हा एकदा अशी नगरी म्हणून आकाराला येत आहे जी जगासाठी एक उदाहरण म्हणून काम करेल. त्रेतायुगात अयोध्येने मानवतेला एक आदर्श आचारसंहिता दिली आणि आता 21 व्या शतकात अयोध्या मानवतेला विकासाचे एक नवे मॉडेल देऊ करत आहे. ते पुढे म्हणाले की एकेकाळी अयोध्या ही मर्यादा केंद्र होती आणि आता अयोध्या हे विकसित भारताचा कणा म्हणून उदयाला येत आहे.
जेथे शरयू नदीचा प्रवाह आणि विकासाचा ओघ एकत्रितपणे वाहतील अशा परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफाचे मूर्त रूप म्हणून पंतप्रधानांनी अयोध्येची परिकल्पना मांडली. अयोध्या शहर अध्यात्मिकता आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांच्या दरम्यान सुसंवादाचे दर्शन घडवेल यावर त्यांनी अधिक भर दिला. राम पथ, भक्ती पथ आणि जन्मभूमी पथ हे एकत्र येऊन नव्या अयोध्येचे चित्र सादर करतात असे त्यांनी नमूद केले. येथील भव्य विमानतळ आणि आकर्षक रेल्वे स्थानक तसेच वंदे भारत आणि अमृत भारत एक्स्प्रेस गाड्या या सर्व सुविधा अयोध्येला देशाशी जोडत आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. अयोध्येतील जनतेला सुविधा पुरवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात समृद्धता आणण्यासाठी सातत्याने काम सुरु आहे हे सांगण्यावर त्यांनी भर दिला. प्राण प्रतिष्ठा झाल्यापासून तबल 45 कोटी भाविकांनी या मंदिराला भेट दिली आहे आणि त्यामुळे अयोध्या आणि परिसरातील लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. एकेकाळी अयोध्या हे शहर विकासविषयक निकषांच्या बाबतीत मागे पाडले होते मात्र आज हे शहर उत्तर प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर म्हणून उदयाला येत आहे असे ते म्हणाले.
21 व्या शतकाचे आगामी युग अत्यंत महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करत, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 70 वर्षे झाल्यानंतर भारत हा जगातील 11 व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला, तर केवळ गेल्या 11 वर्षांत भारत पाचव्या क्रमांकाची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे हे त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की आता तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला असेल. आगामी काळ हा नव्या संधी आणि नव्या शक्यतांचा आहे आणि या महत्त्वाच्या कालावधीत भगवान रामाचे विचार देशाला प्रेरित करत राहतील.
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की जेव्हा भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवण्याच्या मोठ्या आव्हानाचा सामना केला तेव्हा त्यांच्या रथाला शौर्य आणि संयम ही चाके होती, त्याचा ध्वज सत्य आणि सदाचार होता, त्याचे घोडे शक्ती, ज्ञान, संयम आणि परोपकार होते आणि त्याचा लगाम क्षमा, करुणा आणि समता या मुल्यांची होती, ज्यामुळे रथ योग्य दिशेने धावत होता.
विकसित भारताच्या प्रवासाला गती देण्यासाठी, अशाच रथाची आवश्यकता आहे ज्याची चाके शौर्य आणि संयमाची आहेत, म्हणजेच आव्हानांना तोंड देण्याचे धैर्य आणि परिणाम दिसून येईपर्यंत स्थिर राहण्याची चिकाटी त्याच्या ठायी असेल, असे पंतप्रधान म्हणाले. या रथाचा ध्वज सत्य आणि सदाचरणाचा असावा, जेणेकरून धोरण, हेतू आणि नैतिकतेशी कधीही तडजोड केली जाणार नाही, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या रथाचे घोडे शक्ती, ज्ञान, शिस्त आणि परोपकार रुपी असले पाहिजेत, ज्यामुळे शक्ती, बुद्धी, संयम आणि इतरांची सेवा करण्याची भावना जागृत राहील, असे ते म्हणाले. या रथाचे लगाम क्षमा, करुणा आणि समानतारुपी असले पाहिजेत, म्हणजेच अपयशातही यशात अहंकार असणार नाही आणि अपयशात इतरांचा अनादर केला जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. हा क्षण खांद्याला खांदा लावून उभे राहण्याचा, वाढत्या गतीचा आणि रामराज्याने प्रेरित भारताच्या उभारणीचा आहे, असे पंतप्रधानांनी आदरपूर्वक सांगितले. जेव्हा राष्ट्रीय हित स्वहितापेक्षा श्रेष्ठ मानले जाईल तेव्हाच हे शक्य होईलअसे सगुण त्यांनी समारोप केला.त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून अभिनंदन केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पार्श्वभूमी
हा कार्यक्रम मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी या शुभदिनी होत आहे, जो श्रीराम आणि सीतेच्या विवाह पंचमीच्या अभिजित मुहूर्ताशी जुळतो, जो दैवी मिलनाचे प्रतीक आहे. हाच दिवस शिखांचे नववे गुरु, गुरु तेग बहादूर जी यांचा शहीद दिवस देखील आहे, ज्यांनी 17 व्या शतकात अयोध्येत 48 तास अखंड ध्यान केले होते, ज्यामुळे या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढते.
दहा फूट उंची आणि वीस फूट लांबीच्या या त्रिकोणी ध्वजावर भगवान श्रीरामांच्या तेजाचे आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या तेजस्वी सूर्याची प्रतिमा आहे, ज्यावर ‘ॐ’ आणि रक्तकांचन वृक्षाची प्रतिमा कोरलेली आहे. हा पवित्र भगवा ध्वज रामराज्याच्या आदर्शांना मूर्त रूप देणारा असून, सन्मान, एकता आणि सांस्कृतिक सातत्य यांचा संदेश देणारा आहे.
हा ध्वज पारंपरिक उत्तर भारतीय नागर स्थापत्य शैलीत बांधलेल्या शिखरावर हा ध्वज विराजमान आहे, तर त्याच्याभोवती दक्षिण भारतीय स्थापत्य परंपरेनुसार डिझाइन केलेले 800 मीटरचा परकोटा उभारण्यात आला आहे, जे मंदिराच्या स्थापत्य विविधतेचे प्रदर्शन घडवते.
मंदिर संकुलात मुख्य मंदिराच्या बाहेरील भिंतींवर वाल्मिकी रामायणावर आधारित भगवान श्रीरामांच्या जीवनातील 87 प्रसंग दगडावर कोरण्यात आले असून परिसरातील भिंतीवर भारतीय संस्कृतीतील 79 प्रसंग दाखवले आहेत. हे सर्व घटक एकत्रितपणे सर्व पर्यटकांना एक अर्थपूर्ण आणि शैक्षणिक अनुभव प्रदान करतात, ज्यातून भगवान श्रीरामांच्या जीवनाची आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाची सखोल माहिती मिळते.