Home Blog Page 339

महाराष्ट्राविषयी काश्मिरी युवक कृतज्ञ,महाराष्ट्रात घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग काश्मिरी जनतेसाठी करणार

पुणे : सरहद, पुणेच्या माध्यमातून काश्मीरमधील अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्रात मुख्यत्वे करून पुण्यात राहात आहेत. महाराष्ट्रातील जनतेशी आमचे स्नेहबंध जोडले गेले आहेत. महाराष्ट्राविषयी आम्हाला आपुलकी आहे. महाराष्ट्रातून काश्मीरमध्ये परतलेल्या विद्यार्थ्यांनी पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्या मराठी पर्यटकांना मानसिक आधार देत त्यांची काळजी घेतली. महाराष्ट्रात शिकलेला काश्मिरी युवकवर्ग आपल्या ज्ञानाचा उपयोग काश्मीरमधील विद्यार्थ्यांसाठी करू इच्छित आहे. ज्या योगे त्यांना काश्मीर पलिकडील भारताची मुख्यत्वे करून महाराष्ट्राची माहिती होईल. त्यांना प्रमुख प्रवाहाशी जोडण्याची चळवळ उभी केली जाईल. दहशवादी हल्ल्यानंतर या युवकांमध्ये अस्वस्थता आहे. भारतातील काही ठिकाणी काश्मीरमधून शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ले झाले आहेत या पार्श्वभूमीवर आज (दि. 27) काश्मीरमधील पुण्यात शिकलेल्या विद्यार्थ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अर्हम संस्थेचे प्रमुख डॉ. शैलेश पगारिया, सरहद, पुणेचे समन्वयक लेशपाल जवळगे तसेच अकीब भट (आरागाम), मंझूर बशीर (बांदिपोरा) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी महम्मद शफी (बडगाम), गुलशन काद्री, दिलबर खोजा (कुपवाडा), मारिया गुलजार (गंदेरबल), असिफ डर हे काश्मिरी युवक उपस्थित होते. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा निषेध करीत मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहून काश्मिरी युवकांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशाच्या विविध भागात शिक्षण-व्यवसायानिमित्त असलेल्या काश्मिरी तरुणांना धमकावले गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातही असे किरकोळ प्रकार झाल्यानंतर उद्या (दि. 28) पोलीस आयुक्तांची भेट घेऊन परिस्थितीविषयी अवगत केले जाणार आहे. मात्र आमची कोणाविरुद्ध तक्रार नाही. पोलिसांनी आम्हाला सदैव मदत केली आहे. त्या बद्दल त्यांचे आभारही मानणार आहे, अशी माहिती देऊन अकीब भट म्हणाले, सरहद संस्थेशी आम्ही जोडले गेलो असून याच माध्यमातून पुण्यातून शिक्षण घेऊन परत काश्मीरमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांनी दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांची काळजी घेतली. या मागचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील जनता आणि काश्मिरी युवक यांच्यात भावबंध जुळलेले आहेत. पुण्यात घेतलेल्या शिक्षणाचा वसा आम्हाला काश्मीरमधील पुढच्या पिढीकडे पोहोचवायची इच्छा आहे.
मंझूर बशीर म्हणाले, महाराष्ट्रातील वास्तव्यामुळे मला मराठी भाषा समजते आणि बोलताही येते. मी काही मराठी चित्रपटांमध्येही काम केले असून नृत्य दिग्दर्शनही करत आहे. यातून माझा पुण्या-मुंबईतील मराठी माणसांशी स्नेहबंध जुळला आहे. सरहद, पुणेच्या माध्यमातून मला मिळालेल्या शिक्षणाने माझ्यातील आत्मविश्वास व सकारात्मकता वाढीस लागली आहे. मी स्वत: काश्मीरमधील दहशतवादाने पिडीत आहे. आम काश्मिरी जनता दहशतवाद्यांचा नेहमीच विरोध करत आली आहे. काश्मीरमधील पर्यटन बंद पाडून तेथील आर्थिक व्यवहार ठप्प होणे आम्हाला योग्य वाटत नाही. तसेच आम्ही घेतलेले शिक्षण सरदह संस्थेच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील आमच्या मूळ गावातील विद्यार्थ्यांना देऊन त्यांनाही आत्मविश्वासू व स्वयंपूर्ण बनविण्याचा आमचा मानस आहे. या करीता काश्मीर व महाराष्ट्रातील एकात्मता, प्रेम, जिव्हाळा अखंडित रहावा, अशी आम्हा काश्मिरी युवकांची इच्छा आहे. महाराष्ट्रातून काश्मीरला येणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र दूत म्हणून आम्ही काम करणार आहोत.

बॉलीवूड मधला धर्मात्मा फिरोज खान यांचा आज १८वा स्मृतिदिन

बॉलीवूड चा हि एक काळ होता, चेहरे आणि नावे पाहून सिनेमांना गर्दी व्हायची.. सिनेमा तिकीट खिडकी पुढे जी रांग असायची त्या रांगेतील लोकांच्या खांद्यावर पाय देत पुढे जाऊन तिकीट खिडकीतून तिकिटे घेणारी बहाद्दर रसिक तेव्हा होते , सिनेमा पाहण्यासाठी त्याच्या तिकिटासाठी एवढी मेहनत लोक घेत धक्काबुकीत रांगेत उभेत राहून घुसून एकमेकांच्या अंगावर चढून तिकिटे काढत यामुळे थिएटर चालकांना तिकीट विक्री सुरु करताना पोलीस बंदोबस्त बोलवावा लागत … आज काळ पेड पब्लिसिटी,प्रमोशन करून नट नट्या प्रत्यक्षात बोलावूनही गर्दी काय कोणी धुनही पाहत नाही त्याला कारणही तसेच आहे तेव्हा आपल्या चित्रपटाची निर्मिती साठी घरदार सोडून दिवस रात्र मेहनत घेणारे निर्माते,अभिनेते , दिग्दर्शक आणि संगीतकार होते. असंख्य चित्रपट संगीत या एका गुणावर अजरामर झाले. ज्याच आज स्मृती दिन आहे तो बॉलीवूड मधला धर्मात्मा फिरोज खान अशाच अविस्मरणीय बॉलीवूड च्या कारकिर्दीतला एक मोहरा ठरला .फिरोझ खान यांचे २७ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.त्यांचा जन्म. २५ सप्टेंबर १९३९चा.
भारतीय फिल्म इंडस्ट्रीत असे फार कमी लोक आहेत, ज्यांना अनेक कामात कौशल्य प्राप्त आहे. अशाच काही मोजक्या लोकांपैकी एक नाव होते फिरोज खान. फिरोज खान यांनी भारतीय सिनेसृष्टीत अभिनेता, एडिटर, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. फिरोज खान हे अफगाण वंशाचे होते. त्यांचे वडील अफगाणिस्तानच्या गजनी भागातील तर आई ईराणी होती. १९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘दीदी’ या चित्रपटाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘टारझन गोज टू इंडिया’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी व्यक्तिरेखा साकारली होती. १९६५ साली प्रदर्शित झालेला ‘ऊँचे लोग’ हा चित्रपट त्यांचा पहिला ‘हिट’ चित्रपट ठरला. त्यानंतर आलेल्या ‘आरजू’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील स्थान पक्के केले आणि सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी फिरोझ खान यांना पसंती देण्यात येऊ लागली.‘आदमी और इन्सान’मधील भूमिकेसाठी त्यांना पहिला सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ते दिग्दर्शक-निर्मातेसुध्दा होते. त्यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ‘धर्मात्मा’ या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला खूप लोकप्रियता लाभली. सत्तर-ऐंशीच्या दशकात फिरोझ खान यांचा चाहतावर्ग तयार झाला. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘कुर्बानी’ ‘जाँबाज’ आणि ‘दयावान’ हे चित्रपटही हीट ठरले. १९९२ साली दिग्दर्शित केलेल्या ‘यल्गार’नंतर फिरोझ खान चित्रपटसृष्टीपासून दूर गेले होते. पुत्र फरदीन खानला ‘लॉँच’ करण्यासाठी १९९८ साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश लाभले नाही. ‘वेलकम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘आरडीएक्स’ नावाच्या आंतरराष्ट्रीय डॉनची भूमिका लोकप्रिय झाली होती. ‘वेलकम’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.
त्याकाळात फिरोज खान आणि मुमताज यांची जोडी खूप लोकप्रिय झाली होती. रील लाइफपेक्षा वेगळे रिअल लाइफमध्येसुध्दा दोघे जवळचे मित्र होते, मैत्रीसोबतचे दोघे व्याहीसुध्दा होते. २००५ मध्ये फिरोज यांचा मुलगा फरदीनने मुमताज यांची मुलगी नताशासोबत लग्न केले.

सोने तस्करी प्रकरणात अभिनेत्री रान्या रावला 1 वर्ष जामीन मिळणार नाही, 12 कोटींच्या सोन्यासह विमानतळावर पकडले होते

सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रान्या राव विरुद्ध अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ३ मार्च २०२५ रोजी, अभिनेत्रीला बंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळावर १२.५६ कोटी रुपयांच्या सोन्यासह पकडण्यात आले. तपासात असे दिसून आले की ही अभिनेत्री बऱ्याच काळापासून सोन्याची तस्करी करत आहे, ज्याचे लंडन, युरोप आणि दुबईशी संबंध आहेत. आता त्याच प्रकरणात, २६ एप्रिल रोजी, कन्नड अभिनेत्री रान्या राव हिच्याविरुद्ध COFEPOSA (परकीय चलन संवर्धन आणि तस्करी प्रतिबंधक क्रियाकलाप) अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे रान्याला किमान एक वर्ष जामीन मिळू शकणार नाही.

तपास अधिकाऱ्यांच्या मते, रान्या राव तपासात मदत करत नव्हती. तिने अनेक वेळा जामीन अर्ज दाखल केला होता. तिला पुन्हा या बेकायदेशीर कृत्यात सहभागी होण्यापासून रोखता यावे म्हणून हे कलम लावण्यात आले आहे.कन्नड अभिनेत्री आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी रान्या राव ३ मार्च रोजी बंगळुरूमधील केम्पेगौडा विमानतळावर उतरली.साधारण ६ वाजता रान्या बाहेर पडण्याच्या गेटकडे निघाली. बाहेर पडण्यासाठी ती ग्रीन चॅनेलकडे निघाली. ग्रीन चॅनेल अशा प्रवाशांसाठी आहे ज्यांच्याकडे तपासणीसाठी सामान नाही.रान्या पूर्वीही अशाच पद्धतीने विमानतळाबाहेर येत असे. त्या दिवशी, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या म्हणजेच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तिला रोखले. विचारले- तुमच्याकडे सोने किंवा इतर काही आहे का ज्याबद्दल तुम्हाला सांगायचे आहे? रान्याने उत्तर दिले- नाही.या संभाषणामुळेच रान्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी दोन महिला अधिकाऱ्यांना बोलावले आणि त्यांना रान्याला तपासण्यास सांगितले. तिची झडती घेतली असता तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात सोने आढळून आले. तिच्याकडून एकूण १४.२ किलो सोने जप्त करण्यात आले, ज्याची किंमत १२.५६ कोटी रुपये आहे.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही: नरहरी झिरवाळांसारख्या नेत्याला लागली राजकारणी हवा

जळगाव-लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे कुणीच म्हटले नाही, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. तसेच लाडक्या बहिणी या 1500 रुपयांत खुश असल्याचेही ते म्हणालेत.राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी दिले होते. महायुती सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार, असा प्रश्न विचारला जात होता. तेव्हा अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतात, असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते. 10 मार्च रोजी अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. मात्र या योजनेचा सन्मान निधी वाढवण्याबाबत कोणतीही घोषणा झाली नाही. त्यानंतर आता नरहरी झिरवाळ 2100 रुपयांबाबत स्पष्ट बोलले आहेत.

लाडक्या बहिणींना 2100 ऐवजी 1500 रुपयेच मिळत आहेत. तेही नियमित मिळत नसल्याने लाडक्या बहिणी नाराज आहेत. असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत मंत्री नरहरी झिरवाळ यांना विचारला. यावर बोलताना लाडक्या बहिणी नाराज आहेत, हे आपण सांगत असता किंवा विरोधक सांगत असतात. पण सर्व बाजूंनी लाडक्या बहिणी खूश आहेत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे कोणीही जाहीर केलेले नाही, असे मंत्री नरहरी झिरवाळ म्हणालेत.

विरोधकांनी आधी म्हटले की महायुती लाडक्या बहिणींना 1500 रुपये देणार नाही. कारण त्यांच्याकडे 1500 रुपये देण्याची ऐपत नाही अशी टीका केली होती. त्यानंतर त्यांनी म्हटले की 2100 रुपये देणार आणि मग 1500 रुपये दिले नाहीत तर 2100 कसे देणार? अशी टीका केली. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले तर आता 2100 रुपये देण्यावर विरोधक जोर देत आहेत. मात्र, असा काही प्रकार नाही. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देखील परिपूर्ण आहेत. लाडक्या बहिणी 1500 रुपयांमध्ये खूश आहेत, असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आर्थिक परिस्थिती सुधारली की बहिणींना 2100 रुपये देऊ, असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सभागृहात निवदेन देताना म्हटले होते. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही, असे म्हटलेलो नाही. सगळी सोंग करता येतात, पैशाचे सोंग करता येत नाही, त्या पद्धतीने आमचे काम चाललेले आहे. आम्ही त्या खात्याच्या मंत्री अदिती तटकरे, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचे सांगितलेले आहे. मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार आहोत. सध्या आम्ही 1500 रुपये कबुल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढची रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ती देऊ, असे अजित पवार म्हणाले होते.

मेरे दिल मे आज क्या है…. ५२ वर्षानंतरही ऐकावेसे ,पाहावेसे वाटणारे ..

यश चोप्रा दिग्दर्शित ‘ दाग ‘ ला ५२ वर्षे पूर्ण

गुलशन नंदा यांची ‘मैली चांदनी’ यांच्या कादंबरीवर आधारित यश चोप्रा निर्मित आणि दिग्दर्शित यशराज फिल्मचा ‘दाग ‘ २७ एप्रिल १९७३ ला रिलीज झाला. ‘दाग ‘ हा यशराज फिल्मचा पहिला चित्रपट आहे.या चित्रपटाचा मुहूर्त परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत दिलीपकुमारच्या हस्ते झाला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनास आज ५२ वर्षे पूर्ण झालीत . मुंबईतील मेन थिएटर मिनर्व्हा ला हा चित्रपट झळकला होताच शिवाय येथे या चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश मिळवले.

बी. आर. फिल्म या बॅनरसाठी ‘धूल का फूल ‘, ‘वक्त ‘, ‘इत्तेफाक ‘ इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानंतर यश चोप्रा यांनी यशराज फिल्म ही आपली निर्मिती संस्था स्थापन केली, त्याचे कार्यालय राजकमलमध्ये होते.

डाग या चित्रपटाचे मध्यवर्ती कथासूत्र अगदी साधे सुधे वाटावे असे होते पण राजेश खन्ना , शर्मिला टागोर, राखी ,प्रेम चोप्रा यांच्या भूमिका गीत-, संगीत आणि एकूणच सादरीकरणाने या चित्रपटाने बॉलीवूडवर आपली सोनेरी छाप सोडली ., सुनील (राजेश खन्ना) सौंदर्यवती सोनियाच्या (शर्मिला टागोर) प्रेमात पडतो आणि दोघं विवाहबद्ध होतात. मधुचंद्राला जाताना त्यांना एका बंगल्यात रात्र काढावी लागते. सोनियावर धीरज(प्रेम चोप्रा) बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो. सुनीलच्या हातून त्याची हत्या होते. त्याला फाशीची शिक्षा होते. यानंतर कथा वेगळं वळण घेते. तो या चित्रपटाचा नाट्यमय उत्तरार्ध आहे. या चित्रपटात राजेश खन्ना, शर्मिला टागोर, राखी, प्रेम चोप्रा इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची गीते साहिर यांची तर संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे आहे. चित्रपटातील मेरे दिल में आज क्या है, अब चाहे मा रुठे या बाबा, हम और तुम तुम और हम, मैं तो कुछ भी नहीं, नी मैं यार मना नी, हवा चले कैसे , ‘जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग’ ही गाणी कायमस्वरूपी लोकप्रिय ठरली . .

पूनावाला फिनकॉर्पचा  कन्झ्युमर ड्युरेबल लोन मार्केटमध्ये  प्रवेश

मुंबई – सायरस पूनावाला ग्रुपने प्रमोट केलेल्या एनबीएफसी आणि ग्राहक तसेच एमएसएमई कर्ज
देण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (पीएफएल) ने आज त्यांच्या कन्झ्युमर ड्युरेबल लोन
व्यवसायाची घोषणा केली. कंपनीने आधीच लिमिट्स घातलेले डिजिटल ईएमआय कार्ड सादर केले आहे, ज्यामुळे
ग्राहकांना ग्राहक टिकाऊ उत्पादने अधिक सोयीस्करपणे खरेदी करता येतील. या लाँचमुळे वेगाने वाढणाऱ्या किरकोळ
कर्ज देण्याच्या आणि वैविध्यपूर्ण विभागात कंपनीचा धोरणात्मक प्रवेश झाला आहे, ज्यामुळे नफा आणि आजीवन ग्राहक
मूल्य वाढून सखोल, अधिक स्केलेबल रिटेल फ्रँचायझी तयार करण्याची क्षमता बळकट होते.
ग्राहकोपयोगी टिकाऊ कर्जे पीएफएलला त्वरित, गरजेसाठी थेट कर्ज आणि डिजिटल ऑनबोर्डिंगद्वारे जलद ग्राहक
फ्रँचायझी वाढीची धोरणात्मक संधी देतात. यामुळे रिअल-टाइम ग्राहक संपादन आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य देत
कार्यक्षमतेने स्केल तयार करणे शक्य होते. याव्यतिरिक्त, ही ऑफर एक मजबूत क्रॉस-सेल फ्लायव्हील तयार करते, कारण
कन्झ्युमर ड्युरेबल लोन घेणारे ग्राहक वैयक्तिक कर्जे, विमा आणि इतर आर्थिक उत्पादनांसाठी तयारी करतात. या
उत्पादनांसाठी शहरे आणि त्याचे ठरावीक पॉकेट्समध्ये चांगले वातावरण निर्माण करते.
पूनावाला फिनकॉर्पचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. अरविंद कपिल या लाँचबद्दल म्हणाले, “हे केवळ एक
उत्पादन लाँच नाही – तर आमच्या किरकोळ व्यवसायाला जलद, अधिक सक्षम आणि अधिक फायदेशीर बनवण्यासाठी हे
एक धोरणात्मक पाऊल आहे. लाखो नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी काम करण्याची संधी आम्हाला मिळते.
या नवीन उत्पादनामुळे अवघ्या 5 मिनिटांत जलद कर्ज मंजुरी शक्य होते, ज्यामुळे नोकरदार आणि स्वयंरोजगार
असलेल्या व्यक्तींना एक वेगळाच अनुभव मिळतो. हे लवचिक ईएमआय संरचना, स्पर्धात्मक व्याजदर आणि विस्तृत
रिटेल भागीदार नेटवर्कची उपलब्धता प्रदान करते. ही ऑफर केवळ वित्तपुरवठ्याची उपलब्धता सुलभ करत नाही तर
ग्राहकांच्या टिकाऊ कर्जाच्या वाढत्या मागणीशी देखील जुळते – एक उच्च-वाढीचा, उच्च-फ्रिक्वेन्सी विभाग ज्यामध्ये
औपचारिक क्रेडिट प्रवेशाची लक्षणीय क्षमता आहे.
भारतातील ग्राहकोपयोगी वस्तूंची बाजारपेठ तेजीत आहे, टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये वित्तपुरवठा लक्षणीयरीत्या
वाढत आहे. पीएफएलच्या मते, ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये सध्याचा वित्तपुरवठा 30 टक्के आहे आणि या भागात तो वेगाने
वाढतो आहे. पहिल्यांदाच कर्ज घेणारे लाखो कर्जदार ईएमआयद्वारे स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणांसाठी
वित्तपुरवठा शोधत असल्याने, ग्राहकांना लवकरात लवकर मदत करणे आणि ग्राहकांसोबत दीर्घकालीन संबंध प्रस्थापित
करणे यासाठी ही उत्तम संधी असल्याचे पूनावाला फिनकॉर्प मानते. योग्य डिजिटल स्टॅक आणि इकोसिस्टम भागीदारीसह
कंपनी योग्य वेळी बाजारात प्रवेश करत आहे. स्थानिक बाजारपेठेच्या गतिशीलतेशी जुळवून घेत ग्राहकांच्या गरजा पूर्ण
करून एक विश्वासार्ह घरगुती ब्रँड बनण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
पीएफएलची प्राथमिकता म्हणजे पहिल्या 90 दिवसांत त्यांच्या अधिग्रहण प्रक्रियांना एंड-टू-एंड करणे आणि त्यांच्या
जोखीम-प्रथम दृष्टिकोनानुसार, हळूहळू भौगोलिक क्षेत्रांमध्ये व्यवसायाचे प्रमाण वाढवणे. पहिल्या टप्प्यात, पीएफएल
प्रमुख महानगरांमध्ये तसेच टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये 70 ठिकाणी विस्तार करण्याची योजना आखत आहे,
ज्यामध्ये प्रादेशिक किरकोळ विक्रेते आणि स्थानिकदृष्ट्या मजबूत असलेल्या लघू व्यवसायांसह 5,000 डीलर्ससोबत
सहकार्य केले जाईल. याव्यतिरिक्त, कंपनी विविध प्रदेशांमध्ये बाजारपेठेतील लक्षणीय वाटा असलेल्या आघाडीच्या
ओईएमसोबतही भागीदारी करत आहे.

भिमतर्फे विश्वासार्ह युजर्सना सुरक्षितपणे पेमेंट करता यावे यासाठी पार्शियल डेलिगेशनसह युपीआय सर्कल लाँच

युजर्सना पाच विश्वासार्ह कॉन्टॅक्ट्सना रियल- टाइम अप्रुवलसह युपीआय अ‍ॅक्सेस देता येणार
मुंबई – एनपीसीआय भिम सर्व्हिसेस लिमिटेड (एनबीएसएल) या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ
इंडियाच्या (एनपीसीआय) संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने आज युपीआय सर्कल विथ पार्शियल डेलिगेशन ही सेवा भिम
अ‍ॅपवर लाँच केली आहे. या सेवेमुळे युजर्सना सुनिश्चित मर्यादा व संपूर्ण पारदर्शकता राखत विश्वासार्ह व्यक्तींना युपीआय
व्यवहार करण्याचे अधिकार देता येतील.
युपीआय सर्कलमुळे प्रायमरी युजर, युपीआय खातेधारकाला पाच सेकंडरी युजर्सना त्यांच्या खात्यातून युपीआय पेमेंट
करण्याचे अधिकार देता येणार आहेत. सेकंडरी युजरला प्रत्येक व्यवहार करण्यासाठी त्यांच्या प्रायमरी युजरकडून खास
अप्रुवल त्यांच्या युपीआय पिनद्वारे नव्या भिम अ‍ॅपवर घ्यावी लागणार आहे. सेकंडरी युजर्सद्वारे केले जाणारे सर्व व्यवहार
प्रायमरी युजरला त्यांच्या नव्या भिम अ‍ॅपवर रियल टाइम पाहाता येतील आणि पर्यायाने पारदर्शकता कायम ठेवत
देखरेख करता येईल.
या सुविधेच्या लाँचविषयी एनबीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ललिता नटराज
म्हणाल्या, ‘भिमवरील युपीआय सर्कल ही केवळ एक सुविधा नाही, तर ते सर्वसमावेशक आणि कनेक्टेड आर्थिक यंत्रणा
उभारण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. आर्थिक जबाबदारी दुसऱ्याकडे देण्याचा सुरक्षित व लवचिक मार्ग उपलब्ध
करत युपीआय सर्कलने आपल्या पैशांचे योग्य व्यवस्थापन करून एकमेकांशी जोडलेला समाज उभारणीचा मार्ग खुला
केला आहे. अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण सुविधेसह आम्ही डिजिटल पेमेंट्स यंत्रणा प्रत्येकासाठी अधिक उपयुक्त व
सहजपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टासाठी महत्त्वाचे योगदान देत आहोत.’
त्याशिवाय युपीआय सर्कलद्वारे युपीआय- लिंक्ड बँक खाती नसलेल्या लोकांमध्ये आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना
मिळावी यासाठी विश्वासार्ह युजरकडून पेमेंट रिक्वेस्ट करता येणार आहे. त्या युजरला नव्या भिम अ‍ॅपवर रियल टाइम हे
व्यवहार अप्रुव करता येईल.
महत्त्वाचे लाभ
 ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर – ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याद्वारे अधिकृतता देऊन त्यांच्या वतीने
प्रत्येक पेमेंटला अप्रुवल देता येईल. बरेचसे ज्येष्ठ नागरिक डिजिटल पेमेंट सुविधा वापरताना कचरतात आणि यामुळे
त्यांना विश्वासार्ह व सुरक्षितपणे व्यवहार करता येतील.
 तरुण मुलांना सक्षम करणारे : पालकांना त्यांच्या तरुण मुलांना त्यांचे दैनंदिन किंवा शैक्षणिक खर्च नियंत्रित,
मर्यादित अक्सेससह आणि सुरक्षेबाबत तडजोड न करता रियल टाइम अप्रुवलसह करण्याची सोय देता येईल.
 लहान व्यवसायांसाठी सुरक्षित डेलिगेशन – व्यवसाय मालकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना रोजच्या खर्चाची पेमेंट्स
करण्याचे अधिकार देता येतील. उदा. इंधन, टोल किंवा व्हेंडर पेमेंट्स, रोख पैसे न हाताळता त्यांना जबाबदारी देणे
मालकांना शक्य होईल.

डिजिटल सुविधांचा अनुभव नसलेल्यांसाठी मदतीचे – नोकरदार व्यावसायिकांना त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना
किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्सची पुरेशी माहिती नसलेल्यांना रियल- टाइम मॉनटरिंग व अप्रुवलद्वारे पेमेंट करण्याची
सोय देता येईल.
युपीआय सर्कल नव्या भिम पेमेंट्स अ‍ॅपच्या अद्ययावत व्हर्जनवर (४.०.२ व्हर्जन) अपग्रेडमध्ये समाविष्ट करण्यात आले
आहे. त्याशिवाय यामध्ये स्पिल्ट एक्सपेन्सेस, फॅमिली मोड, स्पेंड्स डॅशबोर्ड, मल्टीलिंग्वल सपोर्ट आणि युजरसाठी नवीन
अनुभव यांचा समावेश आहे. भारत का अपना पेमेंट्स अ‍ॅप ही भूमिका निभावण्यासाठी आणि भारताच्या डिजिटल
स्थित्यंतरासाठी सुरक्षित, व्यापक, सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज आहे.
भिमवर युपीआय सर्कल कसे वापरावे

  1. भिम अ‍ॅपओपन करा आणि होम स्क्रीन किंवा मेन्यूमध्ये युपीआय सर्कल सेक्शनमध्ये जा.
  2. ‘अ‍ॅड सेकंडरी युजर’वर टॅप करा आणि त्यांचा युपीआय आयडी द्या किंवा क्यूआर कोड स्कॅन करा.
  3. डेलिगेशन टाइपमध्ये ‘अप्रुव एव्हरी पेमेंट’ (पार्शियल डेलिगेशन) निवडा.
  4. सेकंडरी युजरला रिक्वेस्ट येईल. इन्व्हाइट स्वीकारल्यानंतर त्यांना प्रायमरी युजरच्या खात्याचा वापर करून पेमेंट्स
    करता येतील व भिम अ‍ॅपद्वारे प्रायमरीला रियल- टाइममध्ये पेमेंट अप्रुव करण्याची रिक्वेस्ट पाठवता येईल.

सीयूई 120 नावाचे व्हेअरीएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह सादर

पुणे,: पंपिंग सुविधा पुरवणारी एक जागतिक पुरवठादार कंपनी गृन्डफॉसने भारतीय बाजारपेठेसाठी भारतात विकसित केलेले सीयूई 120 नावाचे व्हेअरीएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह सादर केले आहे. या नव्या उत्पादनाचा उद्देश पंपच्या कार्यक्षमतेवर अधिक अचूक नियंत्रण ठेवणे आणि ऊर्जा कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे आहे.

संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की सध्या सुमारे 70% व्हेअरीएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह्ज (VFDs) फॅक्टरीच्या डीफॉल्ट सेटिंग्सवर कार्यरत आहेत. त्या बर्‍याचदा त्यांच्या विशिष्ट अनुप्रयोगांसाठी अनुकूल नसतात. अशा प्रकारच्या अनुकूल नसण्याच्या अभावामुळे ऊर्जा कार्यक्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे अनावश्यक ऊर्जा वापर आणि कामकाज खर्च वाढतो. परिणामी, अनेक प्रणाली कार्बन उत्सर्जन कमी करण्यात आणि कार्यक्षमता वाढविण्यात त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यात अपयशी ठरतात.

सीयूई 120 हे उत्पादन या समस्यांवर उपाय म्हणून डिझाइन करण्यात आले असून, हे भारतीय बाजारपेठेसाठी विशिष्ट सानुकूलित उपाय सादर करते. त्यामुळे अधिक अचूक नियंत्रण व स्थानिक गरजांनुसार ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारणा शक्य होते.

गृन्डफॉस सीयूई 120 सादर करताना कंट्री प्रेसिडेंट इंडिया उषा सुब्रम्हण्यम् म्हणाल्या, “गृन्डफॉस सीयूई 120 हे केवळ एक उत्पादन नाही तर नवकल्पना आणि शाश्वततेसाठी असलेल्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. भारतासाठी डिझाइन केलेले हे उत्पादन उद्योग, इमारती आणि समुदायांना अधिक स्मार्ट, ऊर्जा कार्यक्षम पंपिंग सोल्यूशन्स देऊन एक हरित भविष्य शक्य करत आहे. आंतरविभागीय सहकार्याच्या माध्यमातून साध्य झालेले आमचे हे स्थानिक पातळीवर विकसित केलेले पहिले उत्पादन असल्यामुळे हे सादरीकरण गृन्डफॉस इंडियासाठी एक ऐतिहासिक टप्पा आहे.”

22 kW पर्यंतच्या मोटर्ससाठी ऑप्टिमाइझ केलेले सीयूई 120 कोणत्याही गृन्डफॉस पंप रेंजसोबत सहजपणे एकत्रित होते आणि उत्कृष्ट कार्यक्षमता व परिणामकारकता देते. हे ऊर्जा वापर सुधारण्यासाठी, खर्च कमी करण्यासाठी आणि विश्वसनीयता वाढवण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. त्यायोगे भारतातील उद्योग, महापालिका आणि व्यवसायांना अधिक सुसंगत आणि शाश्वत कार्यप्रणाली प्राप्त होते.

इंडो विभागाचे विक्री विभाग प्रमुख शंकर राजाराम म्हणाले, “भारतीय बाजारपेठेसाठी एक परवडणारे आणि सहज उपलब्ध ड्राइव्ह तयार करणे याकरता गृन्डफॉस सीयूई 120 ही एक स्पष्ट दृष्टिकोनातून तयार झालेली कल्पना आहे. सखोल बाजार विश्लेषणाद्वारे आम्ही जोडणी करायला सोपा, वापरायला आणि नियंत्रण ठेवायला सहज सुलभ असा ड्राइव्ह तयार करण्याची गरज ओळखली. कार्यक्षमता आणि किफायतशीरपणा हा केंद्रबिंदू ठेवून डिझाइन केलेले सीयूई 120 ग्राहकांना अखंड कार्यक्षमतेसह सक्षम करते. त्यायोगे शाश्वत पंपिंग शक्य होते.”

अस्तित्वात असलेल्या पंप्स आणि प्रणालींच्या कार्यक्षमतेत अधिकतम सुधारणा करून, सीयूई 120 अधिक स्मार्ट कामगिरी घडवून आणतो आणि पर्यावरणावरील प्रभाव कमी करतो. भविष्यात kW क्षमतेत वाढ करण्याच्या योजनांसह, गृन्डफॉस कार्यक्षमतेच्या मर्यादा अधिक विस्तारित करत आहे. त्यामुळे भविष्यातील गरजांसाठी अधिक लवचिकता व विस्तार सुनिश्चित होतो.

गृन्डफॉस सर्वांना या पंप तंत्रज्ञानातील परिवर्तनशील झेप अनुभवण्याचे आणि शाश्वत भविष्यासाठी त्यांच्यासोबत वाटचाल करण्याचे आवाहन करत आहे.

मुंबई विमानतळावरून हँड- कॅरेज दागिन्यांच्या निर्यातीचे १ मे रोजी लाँच – जीजेईपीसी

मुंबई – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १ मे २०२५ रोजी हँड- कॅरेज दागिन्यांच्या
निर्यातीची सोय सुरू केली जाणार असून हा भारताच्या जेम अँड ज्वेलरी क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. सेंट्रल बोर्ड
ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्सने (सीबीआयसी) परिपत्रक क्रमांक 09/2025- कस्टम्सच्या माध्यमातून, २८
मार्च २०२५ रोजी या प्रक्रियेचे फॉर्मलायझेशन केले आहे. पर्यायाने आयात/निर्यात वैयक्तिक कॅरेजद्वारे शक्य होणार
आहे.
२४ एप्रिल २०२५ रोजी मॉक ड्रिलचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यासाठी भारत डायमंड बोर्स (बीडीबी),
बीव्हीसी, प्रेशियस कार्गो कस्टम्स क्लियरन्स सेंटर (पीसीसीसीसी), एयरपोर्ट कस्टम्स आणि जीजेईपीसी यांचे
सहकार्य लाभले. श्री. रूपेश सुकुरामन, अतिरिक्त आयुक्त, कस्टम्स, पीसीसीसीसी यांनी मॉड ड्रिलवर देखरेख करत
प्रवासी निर्यातीचा प्रसंग तयार केला, ज्यामध्ये जीजेईपीसी सचिवांनी निर्यातदाराची भूमिका केली.
‘१ मे २०२५ रोजी मुंबई विमानतळावरून हँड -कॅरेज दागिन्यांची निर्यात सुरू करत आम्ही भारताच्या जेम अँड
ज्वेलरी व्यापाराच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहोत,’ असे जीजेईपीसीचे अध्यक्ष डॉ. किरीट भन्साळी म्हणाले. ‘या
उपक्रमामुळे आमच्या सदस्यांसाठी – विशेषतः उदयोन्मुख निर्यातदारांसाठी लॉजिस्टिक्स सोपे होईल. त्याचप्रमाणे
भारताचे आघाडीच्या जागतिक दागिने केंद्राचे स्थान आणखी बळकट होण्यास मदत होईल. आमच्या क्षेत्रात विकास
घडवून आणण्यासाठी विशेषतः एमएसएमईजच्या विकासाला हातभार लावण्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण सुविधा
तयार करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.’
जीजेईपीसीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे मोठे पाऊल उचलले गेले आहे. डीजी यंत्रणांद्वारे आगामी
अडव्हायजरीमुळे मुंबई कस्टम्सला हँड कॅरी निर्यातीसाठी स्डँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) वितरित करण्याचा
मार्ग खुला होईल.
या उपक्रमामुळे उद्योन्मुख निर्यातदारांना विशेष मदत होईल व त्यांना स्वतःच दागिने जागतिक बाजारपेठांमध्ये
घेऊन जाता येतील. जीजेईपीसीने हँड कॅरी प्रक्रियेत सदस्यांना सहकार्य करण्यासाठी विमानतळावर ऑफिस सुरू केले
आहे.

गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे हेच खरे समाजकार्य : विद्याधर अनास्कर.

भोलासिंग अरोरा यांना आडकर फौंडेशनतर्फे जिद्द जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पुणे : खरे समाजकार्य म्हणजे ज्याला मदत करायची त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे होय. तुम्ही केलेल्या मदतीचे ओझे, दबलेपण मदत घेणाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसता कामा नये. लंगरच्या माध्यमातून सर्व समाजातील गरजू, भुकेलेल्यांना भोलासिंग अरोरा देवाचे कार्य मानून अन्नदान करीत खरेखुरे समाजकार्य करीत आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ बँकींग तज्ज्ञ, शिखर बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी काढले. कुटुंबिय व समाजाला सार्थ अभिमान वाटावा असे कार्य भोलासिंग अरोरा यांच्याकडून जिद्दिने व सातत्याने केले जात आहे, असेही ते म्हणाले.
आडकर फौंडेशनतर्फे गुरुद्वारा श्री गुरू सिंघ सभाचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा यांचा आज (दि. 27) जिद्द जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण अनास्कर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड, आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर मंचावर होते.
समाजात उत्तम काम करणाऱ्या व्यक्तींची पारख करून त्यांचे कार्य समाजापुढे आणणे आडकर फौंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सातत्याने केले जात आहे या विषयी अनास्कर यांनी आनंद व्यक्त केला.

कुणी उपाशीपोटी झोपू नये हे ध्येय : भोलासिंग अरोरा
सत्काराला उत्तर देताना भोलासिंग अरोरा म्हणाले, एकदा हातात घेतलेले काम जिद्दीने, वेळेत आणि उत्तमरित्या करणे यावर माझा विश्वास आहे. हा पुरस्कार माझ्या कार्यासाठी शाबासकीची थाप आहे. गुरू नानकदेव महाराज यांचे कार्य मी पुढे नेत आहे या भावनेने लंगर वाटतो आहे. तिरस्कार नव्हे तर कामाचा पुरस्कार व्हावा या भावना असलेल्या व्यक्तींच्या हातून माझ्या कार्याचा केला जाणारा गौरव महत्त्वाचा आहे. ध्येयवेडा या शब्दाला जागून माझ्या हातून कार्य घडत आहे. पुणे शहरात कोणीही व्यक्ती रिकाम्या पोटी झोपू नये हे ध्येय घेऊन माझी पुढील वाटचाल अखंडितपणे सुरूच राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
सचिन ईटकर म्हणाले, भोलासिंग अरोरा यांचे समाजकार्य समाजाप्रती असलेल्या प्रेमातून घडत आहे. समाजात आदर्शवत काम करणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजापुढे आल्यास सामाजिक नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक भावना वाढीस लागेल. विठ्ठल गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागतपर प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, जिद्द पुरस्कारातून प्रेरणा घेऊन समाजकार्य करणारे हात निर्माण व्हावेत या हेतूने पुरस्काराचे वितरण केले जात आहे. भोलासिंग अरोरा हे कार्यसम्राट व्यक्ती असून भुकेलेल्यांना उत्तम प्रतीचे अन्नदान करणे ते लंगरच्या माध्यमातून अनेक वर्षे सातत्याने करीत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृदुला कुलकर्णी-खैरनार यांनी तर सन्मान पत्राचे वाचन पल्लवी पाठक यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित ‌‘जिद्द‌’ कविसंमेलनात प्रभा सोनवणे, क्षिप्रा शहाणे, वर्षा कुलकर्णी, डॉ. मिलिंद शेंडे, प्रतिभा जोशी, प्रतिमा कुलकर्णी, स्वाती दाढे, विद्या सराफ, विजय सातपुते, सुजित कदम, प्रतिभा मगर, कांचन पडळकर यांचा सहभाग होता.

शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे अर्बन डायलॉग आव्हाने आणि उपाय’ कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. २७: आज महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतो. यासाठी ‘पुणे अर्बन डायलॉग’ सारखे मंथन आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यशदा, बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट, इंटरनॅशनल सेंटर आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने यशदा येथे आयोजित ‘पुणे अर्बन डायलॉग-आव्हाने आणि उपाय’ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, विजय शिवतारे, बापुसाहेब पठारे, हेमंत रासने, माजी मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा संपूर्ण विकास आराखडा रद्द करून पहिल्यांदा रस्त्यांचे जाळे निर्माण करायचे आणि नगर रचना योजनांचा उपयोग करण्याचा विचार आहे. आज आपण पीएमआरडीएच्या माध्यमातून भविष्यातील पुणे असलेले नवीन शहर अथवा वसाहत तयार करत असताना मोठे रस्ते आवश्यक आहेत. त्याचबरोबर नागरी वाहतूक महत्वाचा विषय असून महानगर एकीकृत वाहतूक प्राधिकरण तयार करण्यात येत आहे. प्रवासाच्या शेवटापर्यंत वाहतुकीची सुविधा मिळाल्याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर होत नाही.

मुंबईमध्ये एकच तिकिटावर उपनगरी रेल्वे, मेट्रो, मोनो आणल्या असून वॉटर टॅक्सीदेखील त्यात उपलब्ध असतील. यात कोणत्याही व्यक्तीला प्रवासाच्या आराखडा ज्यात त्याच्या २०० मीटरवरून प्रवासाची साधने आणि गंतव्य स्थानापर्यंतचे प्रवासाचे पर्याय मिळतील. याची पहिल्या टप्प्यात पुढच्या ६ महिन्यात मुंबईत अंमलबजावणी होणार असून पुढे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात होणार आहे.

पुढील काळात मार्गांचे मॅपिंग करणार असून त्यासाठी गुगल सोबत करार करत आहोत. त्यातून सिग्नलचे सिमुलेशन करून वाहतूक व्यवस्थापन करण्यात येणार आहे. पुण्यात पीएमपीएमएल बस व्यवस्थेला मेट्रोचे जोड देऊन वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रोला फिडर सेवा करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. पुण्यात त्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (पुम्टा) तयार केले आहे.

शासनाने गेल्या काळात पहिल्या टप्प्यात पूर्वी कधीच झाले नव्हते ते १७ क्षेत्रीय आराखडे केले. मुंबई, पुणे महानगरपालिका, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आदी क्षेत्रांचे विकास आराखडे केले. ते करताना विकास हा नजरेसमोर ठेवल्याने कोणतेही वाद निर्माण झाले नाहीत. आज नागरीकरणाच्या प्रक्रियेत आपण मोठ्या प्रमाणात नगरपालिका, नगरपंचायती तयार केल्या असून अशा ठिकाणी व्यवस्थित नियोजनाने गुंतवणूक करून वाढणाऱ्या हद्दीमध्ये नागरिकांसाठी सुगम जीवनशैली आणण्याची संधी आपल्यासमोर आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, देशातील शहरे आज बकाल झालेली दिसतात. ग्रामीण भागातील नागरिक शिक्षण, आरोग्य, नोकरी, संधी, मनोरंजन आदी साठी शहरात येतात. अशा परिस्थितीत आपण गृहनिर्माण केले नाही तर झोपडपट्टी तयार होतात, नदी नाले बुजवून अतिक्रमणे होतात. शहरे वाढल्यामुळे घनकचरा, सांडपाणी, पिण्याच्या पाण्याची समस्या, निर्माण होते आणि शहरे व्यवस्थापनाच्या बाहेर गेलेली, शाश्वत आणि राहण्यायोग्य राहिली नाहीत हे अचानक लक्षात येते.

महाराष्ट्रात वाढत्या नागरिककरणाच्या पार्श्वभूमीवर केवळ दोन तीन शहरेच नव्याने वसवली (ग्रीन फील्ड) आहेत. मात्र इतर अस्तित्वातील शहरात नवीन सुविधा करणे आवश्यक असून ते आव्हान आहे. आपण जो नागरी आराखडा करतो तो अंमलबजावणी योग्य असला पाहिजे, अंमलबजावणीची व्यूव्हरचना, त्यासाठी निधी उभारणीची व्यूव्हरचना पाहिजे, तसेच अंमलबजावणीची इच्छाशक्ती असली पाहिजे, असे श्री. फडणवीस म्हणाले.

या चर्चासत्रात घेतलेला नागरी प्रशासनाचा विषय महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे. आता तंत्रज्ञानाचा उपयोग करून छोट्यात छोट्या नगरपंचायतीचेही सु-प्रशासन करू शकतो. त्यामुळे नागरी प्रशासनाचा पुनर्विचार आणि पुनर्रचना करणे गरजेचे आहे. वातावरणातील बदलामुळे अचानक मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनाबाबत विचार विनिमय होणे महत्वाचे आहे. चर्चासत्र पुण्याला केंद्रस्थानी ठेऊन होत असले तरी संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चर्चेतून समोर आलेले मुद्दे शासनाला मिळाल्यावर एक रोड मॅप करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

स. गो. बर्वे यांना १११ व्या जयंती निमित्त अभिवादन करून पुण्याचे पहिले प्रशासक असलेले स. गो. बर्वे हे एक दृष्टे प्रशासक होते. नागरीकरणाच्या काळात नगरनियोजनाबाबत जेवढा विचार होत नव्हता त्या काळातही तसा दृष्टिकोन ठेवणारे अधिकारी होते. त्यांनी तयार केलेले अनेक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आजही कालसुसंगत आहेत, अशा शब्दात बर्वे यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केलं.

नागरिकांना पायाभूत सुविधा मिळण्याकरीता विकास आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

राज्यशासनाकडून विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. आगामी काळात उर्वरित विकास आराखड्यांना मंजुरी देण्याचे काम करण्यात येईल. नगर विकास आराखडा तयार करताना स्वछता, पाणीपुरवठा, वाहतूक, पर्यावरण, प्रदूषण, स्वछता, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, झोपडपट्टी पुनर्वसन आदी बाबीचा समावेश करण्यात येतो. नागरिकांना पायाभूत सुविधा मिळण्याकरीता या मंजूर विकास आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. आगामी काळात या विकास आराखड्यात ‘अर्बन डिझायनिंग’ या संकल्पनेचाही समावेश केला पाहिजे. स्वच्छ आणि सुंदर शहर विकसित करण्याकरीता अतिक्रमणे, अनाधिकृत बांधकाम आणि जाहिरात फलकांची उभारणी होणार नाही,याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या करण्याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयांनी काम केले पाहिजे.

मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवस उपक्रमाअंतर्गत नगर विकास विभागाच्या नियोजन करण्यात आले आहे, यामध्ये नगर विकासाची विविध कामे करताना ती वेळेत पुर्ण झाली पाहिजेत, येणाऱ्या अडचणींवर मात करता आली पाहिजे, यामुळे आगामी काळात विविध प्रकल्प मार्गी लावून नागरिकांना सोई-सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही श्रीमती मिसाळ म्हणाल्या.

डॉ. करीर प्रास्ताविकात म्हणाले, वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे उद्भवणाऱ्या शहरी समस्यांवर विचारमंथन करणे आणि त्यांचे निराकरण शोधणे हा या परिसंवादाचा उद्देश आहे. शहरीकरणाचे फायदे, शहरीकरणाचे अर्थशास्त्र आणि वाढती लोकसंख्या तसेच पायाभूत सुविधांवरील दबाव यांसारख्या आव्हानांना सामोरे जातांना नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर चर्चा करणे हा उद्देश आहे, असेही ते म्हणाले.

स.गो. बर्वे हे पुण्याचे माजी प्रशासक आणि महानगरपालिका आयुक्त होते. त्यांना एक प्रतिष्ठित सनदी अधिकारी म्हणून गौरवण्यात येते. त्यांनी नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, विशेषतः गृहनिर्माण आणि प्रशासकीय सुधारणांवरील अहवालांद्वारे त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते स.गो. बर्वे ट्रस्टच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जम्मू काश्मिर येथील पहलगम येथे मृत्यू झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आभार महानगर पालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी मानले.
**

PoK मध्ये झेलम नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढ-मशिदींमधून अलर्ट जारी; भारतावर जाणूनबुजून जास्त पाणी सोडल्याचा आरोप

शनिवारी दुपारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) झेलम नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली, ज्यामुळे अनेक भागात पूर आला. यानंतर, अधिकाऱ्यांनी अलर्ट जारी केला आणि स्थानिक लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले.वृत्तानुसार, प्रशासनाने हत्तीयन बाला परिसरात पाणी आणीबाणी जाहीर केली आहे. त्याच वेळी, मशिदींमधून सतत इशारे दिले जात आहेत.

राजधानी मुझफ्फराबादचे उपायुक्त मुदस्सर फारूख यांनी स्थानिक रहिवाशांना झेलम नदीजवळील भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. झेलममध्ये अतिरिक्त पाणी सोडणे हे भारताने जाणीवपूर्वक उचललेले पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.उपायुक्त फारूक म्हणाले की, भारताने झेलम नदीत सामान्यपेक्षा जास्त पाणी सोडले आहे, ज्यामुळे पूर आला आहे. सध्या काळजी करण्यासारखे काही नाही. तरीसुद्धा, आम्ही लोकांना नदीच्या परिसरापासून दूर राहण्याचे आणि तिथे प्राण्यांना नेऊ नये असे आवाहन केले आहे.

त्याच वेळी, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (SDMA) संचालक म्हणाले की त्यांना जास्त पाणी सोडण्याबाबत कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती. ते पुढे म्हणाले की, मंगला धरणात पाणी पोहोचण्यास वेळ लागेल. सध्या, सखल भागात सुरक्षा उपाययोजना आधीच लागू करण्यात आल्या आहेत.अहवालानुसार, मुझफ्फराबादच्या झेलममध्ये दर सेकंदाला २२,००० घनफूट पाणी वाहत आहे. यामुळे गारी दुपट्टा, माझोई आणि मुझफ्फराबाद सारख्या भागात राहणाऱ्या लोकांमध्ये चिंता वाढली आहे.

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, सिंधू पाणी करारांतर्गत, भारत झेलम, चिनाब आणि सिंधू नद्यांमध्ये पाणी सोडण्याच्या किंवा थांबवण्याच्या बाबतीत प्रथम पाकिस्तानला कळवत असे. पण यावेळी भारताकडून याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही.पुरामुळे अद्याप कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. झेलममध्ये अधिक पाणी सोडण्याबाबत भारताने कोणतेही विधान केलेले नाही.

ED चे कार्यालय असलेल्या इमारतीला मध्यरात्री २ वाजता आग

0

मुंबई-दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील बलार्ड इस्टेटमधील कैसर-ए-हिंद इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मध्यरात्री दोन अडीचच्या सुमारास भीषण आग लागली. सक्तवसुली संचालनालयाचे कार्यालय या इमारतीत आहे.आग विझवण्याचे काम मुंबई अग्निशमन दलाकडून सकाळी देखील सुरु आहे.फोर्ट परिसरात बेलार्ड इस्टेट परिसरात असलेल्या या इमारतीत शनिवारी मध्यरात्री २ वाजल्यानंतर ही आग लागली. आग लागल्यावर अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीचे गांभीर्य वाढल्यामुळे आग दोन आणि तीन स्तराची असल्याचे घोषित करण्यात आले.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी ८ अग्निशमन इंजिन, ६ जंबो टँकर, १ एरियल वॉटर टॉवर टेंडर, १ ब्रीदिंग अॅपरेटस व्हॅन,१ वॉटर क्विक रिस्पॉन्स वाहन आणि १०८ रुग्णवाहिका असा मोठा ताफा तैनात आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत.आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू आहे.

महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही-मुख्यमंत्री फडणवीस

पुणे-मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे. एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही. सगळे बाहेर चालले आहेत. सगळ्यांची घालवायची व्यवस्था केली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत सगळ्यांना पाकिस्तानात पाठवलं जाईल.” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. २२ एप्रिलच्या दिवशी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह या मुद्द्यावर अधिकाऱ्यांसोबत सतत बैठकांचं सत्र सुरु होतं. पंतप्रधान मोदींनी बुधवारी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची ची सुमारे २ तास बैठक घेतली आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान महाराष्ट्रात काही पाकिस्तानी नागरिक हरवल्याची चर्चा सुरु होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

विधान गृहराज्यमंत्र्यांचे .. मुख्यमंत्र्यांचा रोख माध्यमांवर …

राज्यातील 48 शहरांत तब्बल 5023 पाकिस्तानी नागरिक आढळल्याचा दावा राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केला आहे.योगेश कदम ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले होते कि की, अमित शहा यांच्या आदेशानंतर राज्यातील पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. त्यात राज्यातील 48 शहरांत 5023 पाकिस्तानी नागरीक आढळलेत. यापैकी 107 जण बेपत्ता असून, त्यांचा कोणताही पत्ता तपास यंत्रणांना लागत नाही. राज्यात सर्वाधिक 2458 पाकिस्तानी नागपूर शहरात आढळलेत. त्यानंतर ठाण्यात 1106, तर मुंबईत 14 पाकिस्तानी राहत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे यापैकी केवळ 51 पाक नागरिकांकडेच वैध दस्तऐवज आढळलेत.

पहलगाम हल्ल्यावर वादग्रस्त पोस्ट, 7 राज्यांमध्ये 26 जणांना अटक: आमदार, पत्रकार, वकील आणि विद्यार्थी यांचा समावेश

नवी दिल्ली-पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सोशल मीडियावर वादग्रस्त टिप्पण्या केल्याबद्दल ७ राज्यांमधून २६ जणांना अटक करण्यात आली. या सर्व अटकेत आसामच्या विरोधी पक्ष एआययूडीएफचा एक आमदार, एक पत्रकार, एक विद्यार्थी आणि एक वकील यांचा समावेश आहे.
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याबद्दल देशभरातील अनेक राज्यांमध्ये अटक करण्यात आली. यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे. आसाममधून सर्वाधिक १४ जणांना अटक करण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्यावर सोशल मीडियावर वादग्रस्त टिप्पण्या केल्याबद्दल आसामच्या एका आमदाराला २४ एप्रिल रोजी पहिली अटक करण्यात आली. अटक केलेले आमदार अमिनुल इस्लाम हे आसामच्या विरोधी पक्ष एआययूडीएफचे आहेत. त्यांनी २०१९ चा पुलवामा हल्ला आणि २२ एप्रिलचा पहलगाम हल्ला ‘सरकारी कट’ असल्याचे वर्णन केले होते. त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि २५ एप्रिल रोजी त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पहलगाम हल्ल्यावरील वादग्रस्त टिप्पण्यांसाठी ३ राज्यांमधून अटक

आसाम – १४ जण
मध्य प्रदेश – ४ जण
त्रिपुरा – ४ जण
उत्तर प्रदेश – १ व्यक्ती
छत्तीसगड – १ व्यक्ती
झारखंड – १ व्यक्ती
मेघालय – १ व्यक्ती

२५ एप्रिल रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ येथील एका महाविद्यालयात अतिथी व्याख्याता असलेल्या नसीम बानो यांनी पहलगाम हल्ल्याबाबत व्हॉट्सअॅपवर एक वादग्रस्त व्हिडिओ शेअर केला. यावर पोलिसांनी व्याख्यात्याला ताब्यात घेतले. विद्यार्थी संघटना अभाविपने कठोर कारवाईची मागणी केली आहे.तथापि, व्याख्यात्याने दावा केला की त्याने व्हिडिओ बनवला नव्हता. चुकून तो व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेटसवर पोस्ट झाला. यापूर्वी राज्यात अशा प्रकरणांमध्ये ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
आसाममधील पत्रकार-विद्यार्थी आणि त्रिपुरातील २ निवृत्त शिक्षकांना अटक२५ एप्रिल रोजी वादग्रस्त टिप्पणी प्रकरणात आसाममधून ६ जणांना अटक करण्यात आली. यामध्ये एक पत्रकार, एक विद्यार्थी आणि एक वकील यांचा समावेश होता. या आरोपींनी सोशल मीडियावर सरकारविरोधी आणि देशविरोधी टिप्पण्या केल्या होत्या.त्रिपुरामध्ये आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात दोन निवृत्त शिक्षकांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगडमधून प्रत्येकी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, गरज पडल्यास या अटकेवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) देखील लागू केला जाईल. आम्ही सर्व सोशल मीडिया पोस्ट तपासत आहोत आणि जर कोणी देशद्रोही आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. भारत आणि पाकिस्तानमध्ये काहीही साम्य नाही. दोन्ही देश एकमेकांचे शत्रू आहेत.