Home Blog Page 335

दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

0

पुणे-साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली हि आंब्यांची आरास पाहण्याबरोबरच भाविकांनी पहाटे पासूनच गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती’
पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई आणि कुटूंबियांच्या वतीनं हा महानैवैद्य देण्यात आला तत्पूर्वी पहाटे तीन वाजता ब्रह्माणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला त्यानंतर वेदश्री खाडिलकर ओक यांनी बाप्पाच्या चरणी आपली गायन सेवा सादर केली सकाळी आठ ते बारा या वेळात गणेश याग हि आयोजित करण्यात आला
.

PMPML बसने चांदणी चौकात ६ खाजगी वाहनांना उडविले , ,PMPML आणि RTOबद्दल संताप,नागरिकांची चिंता आणि सुरक्षेचा प्रश्न

पुणे- चांदणी चौकात एक भीषण अपघात घडला. कोथरूडच्या दिशेने येणाऱ्या पीएमपीएल बसचा ब्रेक अचानक फेल झाल्याने बसने वेगाने येत चार ते पाच दुचाकी आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.संध्याकाळी सहाच्या सुमारास चांदणीचौकाच्या उतारावरुन कोथरुड डेपोकडे वेगाने निघालेल्या पीएमटी बसने रस्यावर उभ्या असलेल्या रिक्षाला व पाच दुचाकी वाहनांना, व रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांना धडक देवून हॉटेल खानदेशपाशी थांबली.सुदैवाने या घटनेत जिवीत हानी झाली नाही. जीवावर बेतले होते पण ते पायावर निभावले अशी भावना जखमींनी व्यक्त केली.योगेश सोपान केमसे, (वय-४६), रा. रावेत हे गाडीत हवा भरायला उभे होते तर प्रणव अरुण साळवे, (वय-२८), रा. दौंड हा वनाज मेट्रो स्थानकाकडे पायी निघाला होता. काही कळायच्या आतच बसने त्यांना उडवले. या दोघांच्याही पायाचे हाड मोडले आहे. राजेंद्र वसंत नलावडे, रा. गुलटेकडी यांच्या रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या बोटांना दुखापत झाली आहे. इतर चार जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

चांदणी चौकातून खाली उतरताना बसचा ब्रेक अचानक निकामी झाला. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. धडकेमुळे रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमींमध्ये दुचाकीस्वार आणि रिक्षा चालकाचा समावेश आहे. सुदैवाने, या अपघातात कोणताही जीवितहानी झालेली नाही.

अपघाताची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक नियंत्रित करून परिस्थिती हाताळली. पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. बसच्या तांत्रिक स्थितीचीही तपासणी केली जाणार आहे.चांदणी चौक हा पुण्यातील वर्दळीचा परिसर आहे. येथील रस्त्यांची अवस्था आणि वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष यामुळे अशा घटना वारंवार घडतात, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. पीएमपीएल बसच्या नियमित देखभालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

2,029 कोटींची लाचखोरी प्रकरणात अदानींना क्लीन चिट:अमेरिकेच्या तपासात कोणतेही पुरावे सापडले नाहीत

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि पुतण्या सागर अदानी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या अमेरिकन न्याय विभागाच्या चौकशीत कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.अदानी ग्रीन एनर्जीने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनीच्या अध्यक्षांसह उच्च अधिकाऱ्यांच्या स्वतंत्र चौकशीत कोणतीही अनियमितता आढळली नाही.खरं तर, नोव्हेंबर २०२४ मध्ये, अदानीसह ८ जणांवर सरकारी अधिकाऱ्यांना २५० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २,०२९ कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप होता.

गेल्या वर्षी अमेरिकेत अदानीसह ८ जणांवर अब्जावधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप होता. अमेरिकन अॅटर्नी ऑफिसच्या आरोपपत्रानुसार, अदानी यांच्या कंपनीने भारतातील अक्षय ऊर्जा प्रकल्प अनुचित मार्गाने मिळवले होते. यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्यात आली.

त्याचप्रमाणे अमेरिकेतही गुंतवणूकदार आणि बँकांना खोटे बोलून पैसे गोळा केले जात होते. हे संपूर्ण प्रकरण अदानी ग्रुपची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि आणखी एका फर्मशी संबंधित होते. हा खटला २४ ऑक्टोबर २०२४ रोजी न्यू यॉर्कच्या फेडरल कोर्टात दाखल करण्यात आला.

गेल्या महिन्यात लाचखोरी आणि फसवणूक प्रकरणात यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (यूएस एसईसी) ने गौतम अदानी यांना समन्स बजावले होते. द हिंदूच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने २५ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद सत्र न्यायालयात समन्स पाठवले आहेत, जेणेकरून ते गौतम अदानी यांच्या अहमदाबादमधील शांतीवन फार्महाऊसमध्ये बजावता येईल.

हे समन्स १९६५ च्या हेग कन्व्हेन्शन अंतर्गत पाठवण्यात आले आहे. कोणत्याही कराराच्या अधीन असलेले देश एकमेकांच्या नागरिकांना कायदेशीर कागदपत्रे देण्यासाठी थेट मदत मागू शकतात. यापूर्वी २३ नोव्हेंबर रोजी, यूएस एसईसीने अदानींना आरोपांवरील त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी समन्स पाठवले होते. गौतम आणि सागर अदानी यांना २१ दिवसांच्या आत एसईसीला उत्तर देण्यासाठी समन्स बजावण्यात आले.

“पुण्यनगरीत सलोख्याचे दर्शन घडवत मंगल कलश रथयात्रेचे जल्लोषात स्वागत”

पुणेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने यंदाच्या ६५ व्या १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातून येणारी महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा आज पुणे शहरात दाखल झाली. यावेळी शहर अध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या रथयात्रेचे लालमहाल, कसबा पेठ येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील महापुरुषांच्या वास्तव्याने समृद्ध झालेल्या, त्यांच्या महान कार्यांनी प्रेरित अशा भागांतील माती, विशेष नद्या आणि संगमस्थळांहून आणलेले पाणी या मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात येणार असून १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथे आणले जाणार आहे.


महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रेचा साने गुरुजी भवन,हडपसर येथून शुभारंभ करण्यात आला. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व सावित्री माई फुले यांच्या समता भूमी, गंज पेठ येथील पुतळ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर आणि पदाधिकाऱ्यांनी हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यांनतर महात्मा फुले पेठ येथून लक्ष्मी रोड मार्गे महाराष्ट्र गौरव मंगल कलश रथयात्रा राजमाता जिजाऊ माँसाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन लालमहाल,कसबा पेठ येथे दाखल झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी “जय भवानी,जय शिवाजी”, “भारत माता की जय”, “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज” यांच्या जयघोषाने परिसर शिवमय झाला होता.
शहराध्यक्ष दीपक मानकर बोलताना म्हणाले, “महाराष्ट्र गौरव मंगल कलशामध्ये लालमहाल, सिंहगड किल्ला,शनिवारवाडा, लहूजी वस्ताद साळवे स्मारक, समता भूमी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील माती तसेच इंद्रायणी, मुळा-मुठा संगम येथील पाणी, महात्मा फुले वाडा येथील विहिरीचे पाणी हे टाकण्यात आले आहे.


सदरप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, प्रदेश सरचिटणीस लतीफ लतीफ तांबोळी, प्रदेश प्रवक्ते महेश शिंदे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, माजी नगरसेवक प्रमोद निम्हण, प्रदीप गायकवाड, बाळासाहेब बोडके, शांतीलाल मिसाळ, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष राकेश कामठे, महेश हांडे,विधानसभा अध्यक्ष हडपसर शंतनू जगदाळे, शिवाजीनगर अभिषेक बोके, महिला अध्यक्ष कसबा सुप्रिया कांबळे,पुणे कॅन्टोन्मेंट नीता गायकवाड,कोथरूड तेजल दुधाणे,शहर सेल अध्यक्ष युवती पूजा झोळे, विद्यार्थी शुभम माताळे, सोशल मिडिया अध्यक्ष शितल मेदने, आयटी सेल मोहन मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस मारुती अवरगंड, युवक अंगद माने, शहर सरचिटणीस शितल जौंजाळ, शलाका पाटील, शालिनी जगताप,उदयसिंह मुळीक, उध्वद बडदे,उपाध्यक्ष मिलिंद वालवडकर, डिंपल इंगळे, आनंद तांबे, चिटणीस शाम शेळके, चेतन मोरे,विशाल कांबळे, दिनेश अर्दाळकर, विधानसभा कार्याध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट गोरखनाथ भिकुले, शिवाजीनगर बाळासाहेब आहेर,हडपसर अमर तुपे, पदाधिकारी योगेश वराडे, शहर महिला कार्याध्यक्ष संगीता बराटे, गौरी जाधव, युवक कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, युवक उपाध्यक्ष गिरीश मानकर, सागर चंदनशिवे, सुरज गायकवाड,युवती कार्याध्यक्ष नम्रता बोंदर, लावण्या शिंदे, सामाजिक न्याय कार्याध्यक्ष विक्रम मोरे,वैद्यकीय मदत कक्ष वंदना साळवी, महिला उपाध्यक्ष मनिषा किराड, पूनम पाटोळे,रोशन कुरेशी, संघटक सचिव प्रीती डोंगरे, चिटणीस सुनिता बडेकर, सांस्कृतिक कार्याध्यक्ष अशोक जाधव, आयटी सेल संजय खंडारे,युवक अध्यक्ष कसबा गजानन लोंढे, श्वेता मिस्त्री, पुणे कॅन्टोन्मेंट प्रसाद चौगुले,विद्यार्थी अध्यक्ष कोथरूड अनिकेत मोकर, विधानसभा उपाध्यक्ष संतोष हत्ते, सुप्रिया साठे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा: हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेसच्या संविधान सद्भावना यात्रेला नाशिकरांचा उदंड प्रतिसाद.

काँग्रेसचा १ मे रोजी परळीत संविधान संकल्प सत्याग्रह तर ४ व ५ मे रोजी परभणीत संविधान बचाव यात्रा.

मुंबई/नाशिक, दि. २९ एप्रिल २०२५

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या राज्यात काही शक्ती जाणीवपूर्वक द्वेष, मत्सर पसरवत आहेत. नागपूर व नाशिकमध्ये या शक्तींनी सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम केले. नाशिकमधील हिंसक घटनेत सहभागी असलेल्यांना कठोर शिक्षा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात हुतात्मा स्मारक ते गाडगे महाराज पुलापर्यंत संविधान सद्भावना यात्रा काढण्यात आली. या यात्रेत प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, खासदार शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांच्यासह हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा विचार सर्वांसाठी प्रमाण आहे. गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यासारख्या थोर संतांच्या विचाराचा वारसा आपल्याला लाभला आहे, माणुसकीचा धर्म त्यांनी शिकवला आहे. संविधानाने शोषित, पीडित, दलित व वंचित समाजाला अधिकार दिले, महिलांना मतदानाचा अधिकार दिला, स्त्री पुरुष समानतेचे सुत्र आपण स्विकारले. मुठभर हातात राज्यसत्ता व धर्मसत्ता होती आणि हम करे सो कायदा होता पण संविधानाने ही परिस्थिती बदलली. आज काही लोक जातीजातीत व धर्माधर्मात भांडणे लावत आहेत हे महाराष्ट्राला शोभणारे नाही म्हणूनच काँग्रेस सर्वांच्या मनात सद्भावना वाढीस लागावी यासाठी राज्यात सद्भावना यात्रा काढत आहे. मस्साजोग ते बीड व नागपूर येथील सद्भावना यात्रेनंतर आज नाशिक शहरात सद्भावना यात्रा काढण्यात आली. १ मे रोजी महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी परळीमध्ये संविधान संकल्प सत्याग्रह केला जाणार आहे तर ४ व ५ मे रोजी परभणीत संविधान बचाव यात्रा आयोजित केल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

नाशिकमध्ये गतकाळात काही अप्रिय घटना घटल्या त्याचा काँग्रेस पक्ष निषेध करतो व ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांना शिक्षा द्या पण चोर सोडून संन्यासाला फाशी असे होता कामा नये. बंधुत्व, सद्भाव, संस्कृती व परंपरेचे भान असल्याशिवाय आपण गुण्या गोविंदाने राहू शकत नाही. आज महाराष्ट्रात सामाजिक सौहार्द टिकवण्याची वेळ आली असून त्यासाठीच सद्भावना यात्रा काढली जात आहे असे सांगून नाशिकमध्येही सद्भावनेची मशाल तेवत ठेवा, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

बंदिशकार डॉ. माधुरी डोंगरे यांना पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती गुरू गौरव पुरस्कार

पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती गुरू गौरव पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला असून गुरुवार ते शनिवार या कालावधीत सुबद्ध संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती गुरू गौरव पुरस्कार वितरण समारंभ दि. 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला असून प्रसिद्ध बंदिशकार, शास्त्रीय गायिका व गुरू डॉ. माधुरी डोंगरे यांचा पुरस्काराने गौरव केला जणार आहे, अशी माहिती गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. पुरस्कार सोहळ्यानिमित्त डॉ. डोंगरे यांच्या मुलाखातीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यांच्याशी मंजिरी जोशी संवाद साधणार आहेत. पुरस्काराचे वितरण जीएसटी आयुक्त दिनेश भोयर यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी पौरवी साठे, रमा कुलकर्णी, गायत्री गोखले, कस्तुरी जोशी यांचे गायन होणार आहे. त्यांना पुष्कर महाजन (तबला), मीनल नांदेडकर (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहे.
सुबद्ध संगीत समारोह दि. 1 ते 3 मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यात दि. 1 रोजी डॉ. राजश्री महाजनी, स्वानंदी सडोलिकर, धनंजय जोशी यांचे, दि. 2 रोजी हर्षद डोंगरे, श्रुती देशपांडे, रवी फडके यांचे तर दि. 3 रोजी शुभदा देशपांडे, शिल्पा आठल्ये, राधिका ताम्हनकर, सावनी गोगटे यांचे गायन होणार आहे. कलाकारांना अभिजित बारटक्के, हृषिकेश जगताप, संजय करंदीकर (तबला), निलय साळवी, अमेय बिचू, अंशुला मोरे (संवादिनी) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

‘अद्वैती सुरावली‌’तून भक्तीरसाची अनुभूती -श्रीमद्‌‍ आद्य शंकराचार्य विरचित स्तोत्रांचे भावपूर्ण सादरीकरण

पुणे : श्रीमद्‌‍ आद्य शंकराचार्य यांची जन्मकथा आणि त्यांनी केलेले कार्य विशद करत ‌‘अद्वैती सुरावली‌’ या सांगीतिक कार्यक्रमातून आद्य शंकराचार्य यांनी रचलेली संस्कृत भाषेतील अनेक स्तोत्रे अत्यंत सुरेल, रसाळ आणि शुद्ध वाणीत रसिकांना आज अनुभवायला मिळाली.
निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित ‌‘अद्वैती सुरावली‌’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे! पूना गेस्ट हाऊस येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृंदा शिंगणापूरकर आणि शर्वरी लेले यांनी गायन सेवा सादर केली तर देवेंद्र तुळशीबागवाले (तबला), प्रसाद आपटे (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली. मीनल तुळशीबागवाले यांनी निरूपण केले.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीमद्‌‍ आद्य शंकराचार्य यांनी रचलेल्या ‌‘मुदा करात्तमोदकं सदा विमुक्तीसाधकं‌’ या महागणेश पंचरत्न स्तोत्राने करण्यात आली. गुरू महिमा वर्णन करणारे ‌‘शरीरं सुरूपं तथा वा कलत्रं‌’ हे गुरू अष्टक अतिशय प्रभावीपणे सादर केले. ‌‘चिदानंदरूप: शिवोहम्‌‍ शिवोहम्‌‍‌’ हे निर्वाण अष्टक सादर करताना आपल्यातील अहंभाव नाहीसा व्हावा आणि स्व-स्वरूपाची ओळख व्हावी हा अर्थ सहजतेने उलगडला गेला.
सुवर्णमाला स्तुती स्तोत्र सादर करताना भगवान शिवाचे माहात्म्य दर्शविले गेले. श्रीमद्‌‍ आद्य शंकराचार्य यांनी समाजाला शिकवण देताना कर्तव्यात पळवाटा न शोधता वेळ मिळेल तेव्हा देवाचे नाम घ्या असा संदेश दिला. यावर रचित ‌‘भज गोविंदम्‌‍ भज गोविंदम्‌‍,भज गोविंदम्‌‍ मूढमते‌’ हे स्तोत्र सादर करत गोविंदाच्या नामघोषात भाविकांना सामावून घेतले.
अन्नपूर्णा देवीचे महत्त्व विशद करताना श्रीमद्‌‍ आद्य शंकराचार्य यांनी रचलेले अन्नपूर्णा स्तोत्र तसेच लक्ष्मी नरसिंह स्तोत्र सादर केले. भगवान कृष्णाची महती सांगणारे गोविंदाष्टक स्तोत्र सादर करून कार्यक्रमाची सांगता ‌‘अच्युतम्‌‍ केशवम्‌‍ राम नारायणम्‌‍‌’ या अच्युताष्टकाने करण्यात आली. श्रीमद्‌‍ आद्य शंकराचार्य विरचित स्तोत्रांना वृंदा शिंगणापूरकर यांनी स्वरबद्ध केले आहे. या स्तोत्रांच्या माध्यमातून निर्माण झालेले भक्तीरसपूर्ण वातावरण भाविकांना अनोख्या अनुभूतीत घेऊन गेले. किशोर सरपोतदार यांनी प्रास्ताविक केले तर संयोजन अजित कुमठेकर यांनी केले.

समाविष्ट गावांमध्ये एकूण ७०,००० एलईडी तंत्रज्ञानावर दिवे लावणार

पुणे – पुणे महानगरपालिका व महात्मा फुले नवीनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मार्य.(महाप्रीत) यांच्या संयुक्त विद्यमान पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत या प्रकल्पांचा आढावा मुंबई (बीकेसी) येथील महाप्रीत कार्यालयात मंगळवारी घेण्यात आला . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास व सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ होत्या.

या बैठकीस महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक माळी, पुणे महानगरपालिकेचे सिटी इंजिनिअर प्रशांत वाघमारे, उपायुक्त महेश पाटील, विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा सेकटकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने तसेच महाप्रीतचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली:

विद्युत दिवे एलईडीमध्ये रूपांतर : नव्याने समाविष्ट गावांमध्ये विद्युत पोलवरील जुने दिवे एलईडी तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक दिव्यांमध्ये बदलण्याचे महत्त्वाकांक्षी काम सुरू असून, एकूण ७०,००० विद्युत दिवे टप्प्याटप्प्याने बदलण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत सुमारे ९,००० दिव्यांचे रूपांतर पूर्ण झाले आहे. यामुळे ऊर्जेची बचत होण्याबरोबरच देखभाल खर्चातही मोठी घट होणार आहे.

सौरऊर्जेचा प्रभावी वापर : स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ५० मेगावॅट क्षमतेच्या सौर विद्युत निर्मिती प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. याबाबत शासन स्तरावरून प्रकिया सुरू असुन पुढील कालावधीत हा प्रकल्प पुर्ण केला जाणार आहे यासोबतच
इंटरनेट कमांड सेंटर व आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प : आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने पुणे शहरात एकात्मिक आदेश व नियंत्रण केंद्र (ICCC) स्थापन करण्यात येणार आहे. सुमारे २८३ कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत आपत्ती व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, सार्वजनिक सुरक्षितता, जल व घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या सेवा एका केंद्रीकृत प्लॅटफॉर्मवर नियंत्रित केल्या जाणार आहेत. यामुळे पुणे शहराचे व्यवस्थापन अधिक वेगवान व कार्यक्षम होणार आहे.

बैठकीत बोलताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कामांची गती वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. “प्रकल्पांची गुणवत्ता अबाधित ठेवत, वेळेचे काटेकोर नियोजन करावे व नागरिकांना वेळेत सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्य करावे,” असे आवाहन त्यांनी केले.तसेच, पुणेकरांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि नव्याने समाविष्ट गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महापालिका आणि महाप्रीत यांच्यातील सहकार्यामुळे पुणे शहराचे स्वरूप अधिक विकसित आणि स्मार्ट सिटीच्या दिशेने जलदगतीने पुढे जात आहे, हे या बैठकीतून स्पष्ट झाले.

शिवरायांच्या प्रेरणेतूनच बलशाली भारत घडेल-स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज

विदर्भ महेश असोसिएशन आणि फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना लिहिलेल्या पत्रात ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावा प्रताप श्रीमंतयोगी’ अशा शब्दांत शिवरायांच्या कार्याचे स्मरण ठेवून वाटचाल करण्याचा सल्ला दिला होता. त्याच धर्तीवर आजच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच प्रेरणेतून उद्याचा बलशाली हिंदुस्तान घडेल, असा विश्वास प.पू. स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज यांनी व्यक्त केला.

विदर्भ महेश असोसिएशन, पुणे आणि फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज – एक दृष्टा नेता’ या विषयावरील व्याख्यानात स्वामीजींनी आपले विचार मांडले. या प्रसंगी विनीत राठी, वसंत राठी, राधेश्याम गर्ग, मनोज बेहेडे, दिनेश मुंदडा, स्वप्नील काबरा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सुरेश सोडानी, जुगलकिशोर पुंगलिया, अजय किशोर लड्ढा, अशोक करवा, राधेश्याम गर्ग आणि जगदीश कदम यांचा सन्मान करण्यात आला.

स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले, “रामायण व महाभारत यांतील सदगुणांचे संपूर्ण एकत्रीकरण केले तर त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे अद्वितीय व्यक्तिमत्त्व निर्माण होते. महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा. तथापि, काही काळापूर्वी पर्यंत छत्रपतींच्या इतिहासाचे अपूर्ण आणि अप्रामाणिक चित्रण झाले होते. आजच्या पिढीसमोर त्यांच्या जीवनाचा खरा इतिहास पोहोचविणे ही काळाची गरज आहे.”

ते  पुढे म्हणाले, “आजच्या तरुणांमध्ये स्वाभिमान जागवणे अत्यावश्यक आहे आणि हे स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेशिवाय जागृत होऊ शकत नाही. म्हणूनच मी रामायणातील प्रभू श्रीराम, महाभारतातील श्रीकृष्ण यांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही कथा व्यासपीठावर मांडतो. त्यातून आजच्या तरुणांना प्रेरणा मिळते. तरुण पिढीने स्फुरण पावून चांगल्या कार्यासाठी सज्ज व्हावे आणि बलशाली भारत घडवावा, हेच माझेही स्वप्न आहे.”

याच कार्यक्रमाच्या औचित्याने पुणे चॅप्टरचे अध्यक्ष वसंत राठी यांनी आपले नेतृत्व मनोज बेहेडे यांच्याकडे सुपूर्त केले. प.पू. स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज यांच्या शुभहस्ते मनोज बेहेडे यांना नेतृत्वाची सूत्रे प्रदान करण्यात आली व त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. येथे उल्लेखनीय आहे की, वसंत राठी यांचा कार्यकाळ अत्यंत यशस्वी व ऊर्जावान ठरला. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पुणे चॅप्टरने केवळ प्रगतीच साधली नाही, तर १८० शाळांपासून सुरुवात करून ८०० शाळांपर्यंत आपले कार्यक्षेत्र विस्तारले आणि संघटनेला नव्या उंचीवर नेले.

गवताच्या आगीत ७ वीजवाहिन्या जळाल्या;तळवडे,  देहूगाव परिसरात वीजपुरवठा विस्कळीत

पुणे, दि. २९ एप्रिल २०२५:तळवडे येथे गवताच्या आगीत महावितरणच्या २२ केव्ही व ३३ केव्ही क्षमतेच्या तब्बल ७ वीजवाहिन्या जळाल्या. परिणामी तळवडे पाणीपुरवठा योजनेसह तळवडे एमआयडीसी व इंडस्ट्रीयल परिसरातील सुमारे ४५०० औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. २९) दुपारी ३.४५ सुमारास खंडित झाला. यातील सुमारे १८०० उद्योगांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. तर उर्वरित २७०० उद्योगांसह पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा रात्री १० वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात येत आहे. त्यासाठी महावितरणकडून दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरु आहे.

दरम्यान, या आगीमुळे देहूगाव, चिंचोली गावातील २५०० घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. मात्र पर्यायी व्यवस्थेतून सायंकाळी ६ वाजेपर्यंत या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. आगीमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा गेल्या २ महिन्यांतील हा नववा प्रकार आहे.

याबाबत माहिती अशी की, तळवडे येथील डोंगरावरील वाळलेल्या गवताला मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागली. ही आग सर्वत्र पसरत गेली. डोंगराशेजारी असलेल्या एका ओढ्याच्या कडेपर्यंत ही आग आली. त्याच ठिकाणी असलेल्या महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या ४ आणि ३३ केव्ही क्षमतेच्या ३ वीजवाहिन्या या आगीत जळाल्या. त्यामुळे तळवडे एमआयडीसी, इंडस्ट्रीयल परिसर तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तळवडे पाणीपुरवठा योजनेसह सुमारे ४५०० लघु व उच्चदाब औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. या सर्व परिसराला नियमित वीजपुरवठा करणाऱ्या ४ आणि पर्यायी वीजपुरवठ्यासाठी अतिरिक्त असलेल्या ३ वीजवाहिन्या जळाल्या. त्यामुळे वीजपुरवठ्याची पर्यायी सोय उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र इतर पर्यायी व्यवस्थेतून सुमारे १८०० औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा दोन तासांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला.

भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अतुल देवकर यांनी तीन कंत्राटदार व सहा जॉईंटर यांना  पाचारण करून एकाचवेळी सर्व वीजवाहिन्यांचे दुरुस्ती काम सुरु केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. किरण सरोदे, सहायक अभियंता श्री. ऋषिकेश बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन या कामाला वेग दिला. आज रात्री १० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर उर्वरित २७०० औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येणार आहे. 

पीएमआरडीएचे अधिकारी सोमवार, गुरुवारी नागरिकांना भेटणार

नागर‍िकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगर आयुक्त यांचा न‍िर्णय

पुणे (दि.२९) : नागरिकांना आपल्या अडचणी, समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडता याव्यात, या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सर्व विभागप्रमुख आठवड्यातील दोन दिवस नागरिकांच्या भेटीसाठी पूर्ण वेळ कार्यालयात उपलब्ध असणार आहे. या निर्णयाची गेल्या काही दिवसांपासून पीएमआरडीएमध्ये अंमलबजावणी करण्यात येत असून त्या अनुषंगाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी आदेश काढले आहेत. शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत कार्यालयीन स्तरावर काही न‍िर्णय घेण्यात आले असून नागर‍िकांच्या सोयीसाठी त्यातील हा एक महत्वपुर्ण न‍िर्णय आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात आपल्या कामानिमित्त अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समन्वय राहावा, या उद्देशाने आठवड्यातील पूर्ण दोन दिवस (सोमवार आणि गुरुवार) महानगर आयुक्त यांच्यासह सर्व विभागप्रमुख कार्यालयात नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध राहणार आहे. यामुळे नागरिकांना आपल्या अडचणी, समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडण्याची संधी मिळणार आहे.

पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने स्थळ पाहणी तसेच क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्यासाठी बुधवार आणि शुक्रवार निश्चित करण्यात आला आहे. यासह विभागप्रमुखांच्या अध‍िनस्त असलेल्या अधिकारी यांना भेटण्यासाठी मंगळवार, बुधवार आण‍ि शुक्रवारी दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. अध‍िकारी कर्मचारी यांच्या जेवनाची वेळ पण निश्चित केली असून ती दुपारी दीड ते दोन असणार आहे. पीएमआरडीएमध्ये येणाऱ्या नागरिकांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सोमवार किंवा गुरुवारी कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन पीएमआरडीएतर्फे करण्यात आले आहे.

संपर्कासाठी आकुर्डी कार्यालयाचा नंबर : ०२० – २७१६६०००
संपर्कासाठी औंध कार्यालयाचा नंबर : ०२० – २९९९१२७७

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण -न्यायालयाने तपास अधिकाऱ्याच्या कामकाजावर दिली स्थगिती! ; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा कोर्टात युक्तिवाद

छत्रपती संभाजीनगर – मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सोमनाथ सुर्यवंशीच्या आईने राज्य सरकार विरोधात दाखल केलेल्या याचिकेची आज दुसरी सुनावणी पार पडली.यामध्ये न्यायालयात झालेल्या महत्त्वाच्या सुनावणीत, शासनाने नेमलेल्या तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेबाबत गंभीर चर्चा करण्यात आली. संबंधित तपास अधिकाऱ्याने २८ आरोपींना नोटीस बजावून, चौकशीत त्यांनी काय बोलले पाहिजे? हे नमूद केल्याची बाब ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली व ही निष्पक्ष चौकशी नसल्याचे मांडले.

यामुळे चौकशी प्रक्रियेत निष्पक्षतेचा अभाव असून, ती दबावाखाली केली जात असल्याची बाब ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयासमोर मांडली.न्यायालयाने ही मागणी मान्य करत, संबंधित तपास अधिकाऱ्याच्या कामावर स्थगिती (Stay) दिली आहे. तसेच, त्यांनी कोणताही निर्णय घेऊ नये वा कोणताही चौकशी अहवाल सादर करू नये, असा स्पष्ट आदेश कोर्टाने दिला आहे.

SIT स्थापन करण्याबाबत निर्णय, न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर काय निर्णय घ्यावा? याबाबत कायद्यात अस्पष्टता आहे. याविषयी देखील पुढील सुनावणीला चर्चा होणार असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.न्यायालयाने सरकारने नियुक्त केलेल्या चौकशीला स्थगिती दिली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला की, ही चौकशी फॉरेन्सिक पोस्टमार्टम अहवालाच्या विरोधी दिशेने चालली आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाला सांगितले की, सरकारने नियुक्त केलेली चौकशी सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत झालेला मृत्यू श्वासोच्छवासाच्या समस्येमुळे झाल्याच्या दिशेने नेली जात होती.

ॲड. प्रकाश आंबेडकर चौकशीतील दिशाभूल व पूर्वग्रहदूषित तपास न्यायालयाच्या लक्षात आणून दिला. या प्रकरणी पुढील सूनवाई ८ मे २०२५ होणार आहे.

विजयाबाई सूर्यवंशी (शहिद सोमनाथ सूर्यवंशीच्या आई) ―◆ आम्हाला न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी लढताय. त्यांच्यावरच आमचा विश्वास आहे. मला कायद्यातील काही कळत नसले तरी बाळासाहेब आंबेडकर यांना सर्व कळतं आणि ते जे करताय ते योग्यच आहे.

महाबळेश्वर महापर्यटन धर्तीवर वाहतूक मार्गात बदल

सातारा दि. 29: 2 ते 4 मे या कालावधीत महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव 2025 हा जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विकास महामंडळामार्फत महाबळेश्वर येथे आयोजित करणेत आला आहे. महोत्सव कालावधीत महाबळेश्वर हद्दीत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून महोत्सवास महाराष्ट्र राज्यातुन मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता असून व्ही. व्ही. आयपी व व्हीआयपी हे सुध्दा पर्यटन महोत्सव कार्यक्रमास भेट देणार आहेत.

महाबळेश्वर-पांचगणी रोड अतिशय अरुंद असल्याने व घाट रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी व वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने महोत्सव कालावधीत वाई बाजुकडुन पांचगणी-महाबळेश्वरकडे जाणा-या व महाबळेश्वर पाचगणी बाजूकडुन वाई-सातारा बाजूकडे जाणा-या नागरीकांची व वाहनांची गैरसोय होऊ नये म्हणुन 2 ते 4 मे या कालावधीत डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा तथा, प्रभारी पोलीस अधीक्षक, सातारा यांनी वाहनांच्या वाहतुक मार्गात बदल करुन वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्याकरीता अधिसुचना पारित केली आहे.

वाहनांच्या वाहतुक मार्गातील बदलाबाबत वाहतुक मार्गातील बदल पुढीलप्रमाणे करणेत आला आहे.
मुंबई- पुणे- वाई बाजूकडुन येणारी सर्व प्रकारची वाहतुक ही वाई (पसरणी घाट) मार्गे पांचगणी व महाबळेश्वरकडे जाईल. सदरच्या मार्गावर एकेरी वाहतुक राहील. महाबळेश्वर वरून मुंबई- पुणे-वाई बाजूकडे जाणारी सर्वप्रकारची वाहतुक ही महाबळेश्वर-मेढा-कुडाळ-पाचवड वरुन पुणे बैंगलौर महामार्गाकडे जाईल.
महाबळेश्वरवरून भिलार-पाचगणी बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही महाबळेश्वर उदय हॉटेल चौक- आर आर कॉटेज चौक –क्षेत्र महाबळेश्वर नाका मार्गे – अवकाळी अशी जाईल. सदरच्या मार्गावर एकेरी वाहतुक राहील.
महाबळेश्वर वरुन वेण्णा लेककरीता जाणारी वाहतुक ही महाबळेश्वर मार्केट- आर आर कॉटेज चौक –क्षेत्र महाबळेश्वर नाका –नाकिंदा फाटा मार्गे वेण्णालेककडे जाईल. सदरच्या मार्गावर एकेरी वाहतुक राहील
महाबळेश्वर वरून सातारा, सांगली बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही महाबळेश्वर मेढा- सातारामार्गे पुणे –बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून सांगलीकडे जाईल.
वाहतूक बदलाबाबत ठिकाणी दिशा दर्शक फलक व पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरील वाहतुक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

नागरिकांनी आपल्या परिसरात अनधिकृत बाल संस्था सुरु असल्यास महिला व बालविकास विभागास कळवावे-महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे

पुणे, दि. 29: नागरिकांनी आपल्या परिसरात अनधिकृत संस्था सुरु असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किंवा चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ वर संपर्क साधावे; असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशिर बालगृह, वसतीगृह आणि अनाथाश्रम चालविले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत, या संस्थामध्ये बालकांना डांबून ठेवले जात असून त्याचे शारिरीक व मानसिक व लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबींचा विचार करता बालकांवरील अपराधांना प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

याबाबी बालन्याय (मुलांचे काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ आणि सुधारित अधिनियम २०२१ तसेच महाराष्ट्र राज्य बालन्याय (मुलांचे काळजी व संरक्षण) नियम २०१८ मधील तरतुदींचे उल्लघंन करणाऱ्या आहेत. या कायद्यानुसार मान्यता, नोंदणी प्रमाणपत्र नसलेल्या संस्था चालविणाऱ्या व्यक्तीस एक वर्षाचा कारावास आणि एक लाख रुपये किंवा त्याहुन अधिक दंडाची तरतूद आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

मुंबईत होणारी ‘वेव्हज्’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.२९: मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा (वेव्हज्) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या समिटच्या तयारीची पाहणी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

वेव्हज् २०२५ परिषद मुंबईत होतेय हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. जागतिकस्तरावर मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ही परिषद ‘दावोस’ ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दुपारी तीनच्या सुमारास उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिओ वर्ल्ड सेंटरला भेट दिली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री.अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसु आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी परिषदेबाबत सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाला मिळाले ही अभिमानाची बाब असून असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीतू‌न ही परिषद साकार होत आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री श्री. मोदी १ मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत.

भारत जगात आघाडीवर आहे हे सिद्ध करण्यासाठी ही परिषद महत्वाची असून मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे तसेच मिडिया आणि मनोरंजनाचे हे केंद्र असल्याने या परिषदेमुळे मनोरंजन क्षेत्राला तांत्रिकदृष्ट्या नवी ओळख मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या परिषदेमुळे आंतरराष्ट्रीय स्टुडिओज, प्रोडक्शन हाऊसेस, टेक कंपन्यांची भागीदारीची याची दारे खुली होतील असेही ते म्हणाले.