पुणे : ‘यशोगाथा संघर्षाची’ हे डॉ. टी. टी. पाटील यांचे आत्मकथनपर पुस्तक म्हणजे त्यांच्या आयुष्याची शिदोरी असून सफलतेची यशोगाथा आहे. पुस्तक वाचनातून उर्मी मिळते. ‘माणसात गुंतवणूक करा’, ‘जे कराल त्यावर नितांत प्रेम करा’ आणि ‘तुम्ही स्वत:च एक ब्रँड आहात’ हे त्यांचे विचार आयुष्यातील वाटचालीत प्रत्येकाला उपयोगी ठरणार आहेत, असे प्रतिपादन जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख (नि.) डॉ. सुहास दिवसे यांनी केले.
खान्देश सुपुत्र डॉ. टी. टी. पाटील लिखित ‘यशोगाथा संघर्षाची’ या आत्मकथनपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा साफा बँक्वेट हॉल, बालेवाडी हायस्ट्रीट येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी डॉ. दिवसे अध्यक्षपदावरून बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, बीव्हीजी उद्योग समूहाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, जे. एल. आर. उद्योग समूहाचे संचालक गोविंद पाटील, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्राचार्य (नि.) डॉ. सुरेश सावंत, रिचफिल्ड फर्टीलायझर्स प्रा. लि.चे अध्यक्ष व कार्यकारी संचालक डॉ. स्वप्नील बच्छाव, प्रकाशिका सिंधूबाई टी. पाटील, डॉ. पद्मश्री पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
डॉ. दिवसे पुढे म्हणाले, आदिवासी भागातील एक हुशार विद्यार्थी ते यशस्वी व्यावसायिक हा डॉ. टी. टी. पाटील यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. ज्या ज्या व्यक्ती हे पुस्तक वाचतील त्यांचे आयुष्य निश्चित बदलेल.
विजय बाविस्कर म्हणाले, माणसे उगीचच मोठी होत नाहीत. प्रत्येकाचे आयुष्य संघर्षमय असते; पण आयुष्य सुंदरही असते हे डॉ. टी. टी. पाटील यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. सिंधूताई पाटील आणि कुटुंबियांनी डॉ. टी. टी. पाटील यांचे स्वप्न पूर्ण केल्याचे आवर्जून नमूद करून बाविस्कर पुढे म्हणाले, ‘यशोगाथा संघर्षाची’ हे पुस्तक वाचून शेकडो उद्योजक तयार झाले तर ती डॉ. पाटील यांना खरी भावांजली असणार आहे.
डॉ. टी. टी. पाटील यांच्या पत्नी सिंधूताई पाटील प्रकाशक या नात्याने बोलताना म्हणाल्या डॉ. पाटील यांनी आयुष्यभर कष्ट केले. त्यांच्या हयातीत पुस्तकाचे प्रकाशन करायचे होते, पण तसे काही झाले नाही. त्यांची पुस्तक प्रकाशन करण्याची इच्छा मात्र पूर्ण केली आहे.
हणमंतराव गायकवाड म्हणाले, पुस्तक वाचताना असे वाटते की, पुस्तक आपल्याशी बोलतेच आहे. वेगळ्या वाटेने जाऊन दीपस्तंभासारखी कामे करणाऱ्या काही व्यक्ती असतात. डॉ. पाटील यांची आत्मकथा वाचल्यास दीपस्तंभासारख्या अनेक व्यक्ती निर्माण होतील.
सचिन ईटकर म्हणाले, डॉ. पाटील यांचा संघर्ष प्रेरणादायी असून त्यांनी उद्यमशीलता विकसित केली आहे. ग्रामीण भागात उद्योजकांची संख्या वाढेल तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकणार आहे.
ग्रामीण भागातही गुणवत्ता असते हा मुद्दा अधोरेखित करून योगेंद्र नेरकर म्हणाले, डॉ. पाटील यांनी विद्यार्थीदशेपासून लढा दिला असून जिंकलाही आहे. उद्योग क्षेत्रात येऊ पाहण्याऱ्यांसाठी हे पुस्तक गुरुकिल्ली आहे.
सुरेश सावंत म्हणाले, डॉ. टी. टी. पाटील यांची आत्मकथा एकलव्याची आठवण करून देणारी आहे. ही एका व्यक्तीची आत्मकथा नाही तर खान्देशी लोकजीवनाचे दर्शन यातून घडत आहे. त्यांना चाकोरीबद्ध जगणे मान्य नव्हते. त्यांच्या कार्यातून समृद्ध, बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचे दर्शन घडते. डॉ. पाटील यांची जीवनगाथा अभ्यासक्रमामध्ये असावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. संदीप बच्छाव यांनी डॉ. टी. टी. पाटील यांचा जीवनप्रवास कथन केला तर डॉ. पद्मश्री पाटील यांनी पुस्तकाचा प्रवास उलगडला.
मान्यवरांचे स्वागत डॉ. संदीप बच्छाव, पंकज पाटील, प्रतिभा बच्छाव, संदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.
गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र शासन कटिबद्ध – केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील
गावातील पाणी गावातच आडवा
शिर्डी, दि.२ :- पुढील चार वर्षांत देशातील कोणतेही गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये व देश दुष्काळमुक्त व्हावा, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी केले. शासन तर आपले काम करणारच आहे, मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे, गावातील पाणी गावातच अडवून साठवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम टप्पा १ अंतर्गत गोदावरी उजवा तट कालव्यावरील मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरण कामाचे भूमिपूजन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, आमदार आशुतोष काळे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपूर, माजी मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित होते.
केंद्रीय जलशक्ती मंत्री पाटील म्हणाले की, संपूर्ण जगाच्या १८ टक्के लोकसंख्या आणि १८ टक्के पशुधन भारतात आहे. मात्र संपूर्ण जगाच्या केवळ चार टक्के पाणी भारतात आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्याची नितांत गरज आहे.
देशात दरवर्षी सुमारे ४ हजार बीसीएम पावसाचे पाणी मिळते, मात्र आपल्याला त्यापैकी केवळ १ हजार १२० बीसीएम पाण्याची गरज असते. आपण ७५० बीसीएम जलसंचय करतो आणि धरणांमध्ये २५० बीसीएम पाणी साठवतो. तरीही पाण्याची कमतरता आहे. एक धरण उभारण्यासाठी २५ वर्षे लागतात. मात्र तेवढा वेळ आपल्या हातात नाही, म्हणून पाण्याच्या बचतीची अत्यंत गरज आहे.
यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या गावात व शेतात चार बाय चारचा सहा फूट खोल खड्डा खोदून त्यात दगड-धोंडे टाकून नैसर्गिकरित्या जलसंचय करण्याची गरज आहे. अशा एका शोषखड्ड्याच्या माध्यमातून सुमारे पाच लाख लिटर पाणी जमिनीत मुरवता येते.
देशात तेरा लाख स्ट्रक्चर खड्यांच्या माध्यमातून पाणी संचय करण्याची चळवळ राबविण्यात आली. यातून लाखो लीटर पाण्याची बचत झाली, असेही त्यांनी सांगितले.
तुमच्या भागात जर एक हजार शेतकरी तयार झाल्यास केंद्राच्या एजन्सीमार्फत याभागात पाणी संचय करणारे शोषखड्डे खोदून देण्यात येतील. या शोषखड्ड्यांद्वारे पाणी संचय झाल्यास पुढील वर्षी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही चळवळ राबवावी, अशी अपेक्षा श्री. पाटील यांनी व्यक्त केली.
नदी-नाल्यांतील पुराच्या पाण्यापासून कॅनमध्ये पाणी आणण्याची वेळ येऊ नये, यासाठी आजच आपण पाणी बचतीची चळवळ गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना असलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण देश दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आहे. उपलब्ध पाण्यात शेतीला सिंचन झाले पाहिजे यासाठी जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे. नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याचे स्वप्न पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांचे होते, ते स्वप्न माझ्या हातून होत आहे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. गोदावरी उजवा व डावा अशा दोन्ही कालव्यांचे काम पूर्ण करण्यात येईल. आज भूमिपूजन करण्यात आलेल्या कालव्याचे डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल.
राज्यशासन सुमारे एक लाख कोटींच्या खर्चातून चार नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात ८३ टीएमसी पाणी आणणार असून यातून गोदावरी खोरे कायमचे दुष्काळमुक्त होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
आमदार आशुतोष काळे, आण्णासाहेब म्हस्के पाटील यांचेही भाषण झाले.
शासनाने मागील काही वर्षांत राज्यातील १८२ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यातून २५ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले, असे प्रास्ताविकात दिपक कपूर यांनी सांगितले.
आताचा काळ द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांसाठी परवडणारे चित्रपट तयार करण्याचा : शाहरुख खान
मुंबई, 1 मे 2025
वेव्हज या शिखर परिषदेची संकल्पना मांडल्याबद्दल आणि ती प्रत्यक्षात आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अभिनेता आणि चित्रपट निर्माते शाहरुख खान यांनी चित्रपट उद्योगाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. या परिषदेमध्ये मनोरंजन उद्योगाला अधिक मजबूत करण्याची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले. हे व्यासपीठ उद्योगासाठी किती समर्पक आहे आणि ते विविध आघाड्यांवर सरकारकडून अत्यंत आवश्यक समन्वय आणि पाठबळ उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी भारत हे एक अमर्याद शक्यता असलेले स्थान असल्याचे सांगून, शाहरुख खान यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी भारत ‘शूट इन इंडिया’ कसे बनू शकते, याकडे लक्ष वेधले. याशिवाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्था आणि उद्योगांशी विविध प्रकारचे करार भारताच्या मनोरंजन उद्योगाला आकार देण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी किती महत्त्वाचे ठरू शकतात यावर त्यांनी भर दिला.
शाहरूख खान यांनी द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांतील प्रेक्षकांसाठी भारतीय सिनेमा अधिक परवडणारा बनवण्यावरही भर दिला. या शहरांमध्ये एकल पडदा असलेल्या चित्रपटगृहांमध्ये सिनेमा पाहण्याचा अनुभव निर्माण करण्याची संकल्पना त्यांनी मांडली, ज्यामुळे चित्रपट मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनीही वेव्हजचे महत्त्व आपल्या शब्दात मांडले. माध्यम आणि मनोरंजन उद्योगातील विविध माध्यमांना एकत्र आणण्याची ही अचूक वेळ असल्याचे त्या म्हणाल्या. दीपिका पदुकोण यांनी सांगितले, की या क्षेत्रातील विविध विभागांमध्ये आतापर्यंत माहितीचे आदान- प्रदान किंवा सहकार्य मर्यादित स्वरूपात केले जात होते, पण वेव्हजचे स्वरूप व्यापक आहे आणि त्यात चित्रपट, ओटीटी, ॲनिमेशन, कृत्रिम प्रज्ञा आणि इतर भासमान तंत्रज्ञाने एकत्र आणण्याची क्षमता आहे.
वेव्हज शिखर परिषदेच्या पहिल्या दिवसानिमित्त आयोजित ‘द जर्नी: फ्रॉम आउटसाइडर टू रुलर’ या सत्रात अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी चित्रपट निर्माते करण जोहर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांनी चित्रपट उद्योगातील त्यांच्या प्रवासावर आणि स्वतःचे वेगळे स्थान कसे निर्माण केले यावर चर्चा केली. शाहरुख खान यांनी ‘आउटसाइडर-इनसाइडर’ टॅग्जबद्दल आपले विचार मांडले आणि तरुणांनी इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच चित्रपट उद्योगाकडे पाहण्याचे आवाहन केले. इथेही कठोर परिश्रम आणि चिकाटीला पर्याय नाही असे त्यांनी सांगितले.

समाज माध्यमे आणि प्रतिमा व्यवस्थापनाच्या आजच्या काळात मनोरंजन उद्योगाच्या बदलत्या परिमाणांबद्दल बोलताना, खान यांनी नवीन कलाकारांना केवळ त्यांच्या विशिष्ट प्रतिमा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्यातील कौशल्यांकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यांच्यातील अद्वितीय गूण आणि क्षमतांद्वारे स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आली आहे, असे दीपिका पदुकोण यांनी पुढे नमूद केले.
आपल्या समारोपाच्या भाषणात, चित्रपट निर्माते करण जोहर यांनी भारताला ‘सॉफ्ट पॉवर’ असे संबोधित केले. आपला देश येत्या काळात ‘वेव्हज’सह उत्तुंग झेप घेण्यास सर्व सामर्थ्यानिशी सज्ज आहे असे जोहर यांनी अभिमानाने सांगितले.
