Home Blog Page 33

देवेंद्र फडणवीस हे लोकशाही आणि महाराष्ट्र धर्माला फासावर लटकवणारे ‘जल्लाद’: हर्षवर्धन सपकाळ

अहिल्यानगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या अपहरण प्रकरणी काँग्रेसचे श्रीरामपूरमध्ये दिवसभर ठिय्या आंदोलन,

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी श्रीरामपूरला जाऊन गुजर यांची विचारपूस केली, पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना विचारला जाब.

मुंबई, दि. २६ नोव्हेंबर २०२५
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेब व नथुरामसारखा थंड डोक्याने कारस्थाने करणारा आहे. फडणवीस हे केवळ दरिंदे (क्रूर) नाहीत तर आता ते लोकशाही, माणुसकी, संस्कृती व भारताच्या संविधानाला फाशी देत आहेत. देवेंद्र फडणवीस हे लोकशाही आणि महाराष्ट्र धर्माला फासावर लटकणारे जल्लाद आहेत, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

अहिल्यानगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना भाजपच्या गुंडांनी अपहरण करून मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याविरोधात काँग्रेस पक्षाने दिवसभर ठिय्या दिला. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी तातडीने श्रीरामपूरला भेट दिली आणि स्थानिक आमदार हेमंत ओगले यांच्यासह जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. यावेळी श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाणे उपस्थित होते.

हर्षवर्धन सपकाळ यांनी, पोलीस हे कुणाच्या दबावाखाली काम करीत आहेत? दडपशाही करणाऱ्या स्थानिक गुंडांना पोलीस कुणाच्या आशिर्वादाने पाठीशी घालत आहेत, असा जाब विचारत पोलिसांची आणि स्थानिक गुंडांना पाठीशी घालणाऱ्यांची दडपशाही खपवून घेणार नाही असा सज्जड दम दिला. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिवसभर ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शेवटी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधान रक्षणाची शपथ घेतली.
यावेळी माजी सभापती बाबासाहेब दिघे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे पंचायत समितीचे माजी सभापती वंदनाताई मुरकुटे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सरकार विरोधातील आवाज दडपण्यासाठी नरेंद्र मोदींकडून सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या अस्त्रांचा गैरवापर.

संविधान दिनानिमित्त टिळक भवन येथे डॉ. आनंद तेलतुंबडे यांचे ‘प्रजासत्ताक: आभास का वास्तव’ विषयावर व्याख्यान.

मुंबई, दि. २६ नोव्हेंबर २०२५.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ साली केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर मोदी यांनी (पीएमओ) पंतप्रधान कार्यालय हे सर्वात शक्तीशाली केंद्र निर्माण केले. याच्या माध्यमातूनच सर्व निर्णय घेतले जात असून मंत्रीमंडळ व संसद यांचे महत्व कमी केले आहे. सरकार विरोधातील आवाज दडपण्यासाठी नरेंद्र मोदींकडून सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या अस्त्रांचा गैरवापर केला जात आहे, असा गंभीर आरोप सुप्रसिद्ध घटनातज्ज्ञ व विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी केला आहे.

संविधान दिनानिमित्त प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे सुप्रसिद्ध घटना तज्ज्ञ व विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांचे, प्रजासत्ताक आभास का वास्तव, या विषयावर व्याखान झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार पद्मश्री कुमार केतकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले, ॲड. भाऊसाहेब आजबे, ॲड. संदेश कोंडविलकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तेलतुंबडे पुढे म्हणाले की, भारत कसा असायला पाहिजे हे संविधानाच्या प्रास्ताविकेत सांगितले आहे, तसा भारत आपण कधी पाहिला आहे का? संविधान आभास उरला आहे असे का वाटते, असा प्रश्न उपस्थित करून मोदींनी मागील ११ वर्षात संविधान, सर्व कायदे, नियम व स्वायत्त संस्था यांना कसे गुंडाळून टाकले आहे ते सांगितले. सध्या मंत्री वा सचिवाला काहीही महत्व राहिलेले नाही. सचिवाला पीएमओमधून निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मंत्र्यांना निर्णय घेण्याचे अधिकारच ठेवले नाहीत. पीएमओ आधीही होतेच पण मोदींनी सर्व शक्ती पीएमओकडे घेतली आहे. सीबीआय, एनआयए, ईडी, आयकर, निवडणूक आयोग या सर्व अस्त्राचा वापर नरेंद्र मोदी प्रभावीपणे करत आहेत. याच अस्त्रांच्या मदतीने मोदी विरोधी पक्ष व सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाची गळचेपी करतात. आज देशात विरोधकांना जागाच ठेवलेली नाही.

स्वायत्त संस्थांमधील पद नियुक्ती वा बढतीचे अधिकारही पीएमओच्या हातात घेतलेले आहेत. निवडणूक आयुक्त नियुक्तीचा अधिकारही मोदींनी आपल्याच हाती घेतला, त्यासाठी कायद्यात बदल करण्यात आला. प्रशासनाने सत्ताधारी पक्षाशी निष्ठावान राहिले पाहिजे नाहीतर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतीत अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. ११ वर्षात पंतप्रधान मोदी यांनी एकही पत्रकार परिषदेत घेतली नाही हे जगातील एकमेव उदाहरण आहे. ते फक्त मन की बात करतात. देशात सध्या अघोषीत आणीबाणी सुरु आहे. देशाचा संपूर्ण ढांचाच मोदींनी गुंडाळून ठेवला असून मागील ११ वर्षात जे झाले त्यातून आता देशाची घडी पुन्हा बसवता येईल असे वाटत नाही असे आनंद तेलतुंबडे म्हणाले..

ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार कुमार केतकर यावेळी म्हणाले की, भारताच्या राज्यघटनेची निर्मीती होत होती त्यावेळची देशातील व आंतरराष्ट्रीय परिस्थिती ही अत्यंत वेगळी व आव्हानात्मक होती. १९४६ साली राज्यघटना समिती स्थापना झाली, १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले, १९४८ साली महात्मा गांधी यांची हत्या झाली. आणि त्याच वेळी आंतराराष्ट्रीय पातळीवर शीत युद्ध सुरु झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यघटना बनली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी ते त्यांना जास्त काळ टिकवता येणार नाही अशी चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जात होती. यातूनच भारतात अनेक राज्य निर्माण होतील असे म्हटले जात होते. भारताचे अनेक तुकडे व्हावेत ही ब्रिटीशांची इच्छा होती. स्वातंत्र्य देताना ते संस्थानांना परत देऊ असा प्रवाह ब्रिटनमध्ये त्यावेळी होता.
१९६७ साली सात राज्यात काँग्रेस विरोधी पक्षांची सरकारे आली त्यावेळीही भारताचे तुकडे करण्याचा सीआयएचा डाव होता. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा सत्तेत येऊ नये यासाठी काही शक्तींनी डावपेच खेळले गेले. २०१९ ला काँग्रेस २०६ जागावरून २०२४ साली थेट ४४ वर कसा काय आली? सीआयए व मोसाद या संस्था यामागे असल्याचा दावा कुमार केतकर यांनी केला. त्यांना अनुकुल असणारे सरकार भारतात आणायचे होते. २०२४ साली भाजपाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. त्यावेळी पार्लमेंटरी पार्टी बैठक झाली नाही, मोदींची नेता निवड झाली नाही. एनडीएची बैठक झाली असे दाखवले व मोदींचा शपथविधी उरकण्यात आला. आता देशात जे सुरु आहे त्याचा बोलविता धनी हा कोणी बाहरेचा आहे असेही कुमार केतकर म्हणाले.

मतदारांचा डेटा विक्री करणाऱ्या कंपन्या बोकाळल्या, फोटोसह डेटा अॅप एका प्रभागासाठी 10 ते 30 हजार रुपयांना विक्री

0
उमेदवारांची व राजकीय पक्षांची लूट करणाऱ्या कंपन्यांवर निवडणूक आयोगाने सक्त कारवाई करावी प्राबचे मागणी निवेदन

पुणे- दुबार, तिबार मतदार, एकाच पत्यावर अनेक मतदार यासह अनेक घोळ मतदार यादीत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असताना आता प्रशासनातून बेकायदेशीर मतदारांचा प्रसिद्धीस मनाई असलेला तपशील डेटा खासगी कंपन्यांपर्यंत पोहोचवला जात असून संभाव्य उमेदवार व राजकीय पक्षांना अनधिकृत मतदारांचा डेटा विक्री करणाऱ्या कंपन्या त्यामुळे बोकाळल्या आहेत. कोट्यावधी रुपयांची बेगमी या विक्रीतून होत असून डेटा बेकायदेशीर विक्री करणारे संबंधित  प्रशासकीय अधिकारी मालमाल होत आहे या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष करुन राज्य निवडणूक आयोगाकडून एकप्रकारे अभय मिळत आहे असा समज सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे. नियमांचा भंग करुन फोटोसह डेटा अप बाजारात खुलेआम विक्री केले जात आहे त्यामध्ये प्रदर्शित फोटोमुळे महिला मतदारांची मात्र कुचंबणा झाली आहे. कलर फोटो या अॅप मध्ये समाविष्ट केले असून त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित बेकायदेशीरपणे  मतदारांचा डेटा विक्री करणाऱ्या संबंधीत कंपन्यावर सक्त कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना कलर फोटोसह मतदार यादी पुरविणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील फौजदारी गुन्हे तत्काळ दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेतर्फे राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. 

अनधिकृत मतदारांचा डेटा विक्रीची कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असून यामध्ये प्रशासनातील अनेक बडे अधिकारी सामील आहेत हे मतदारांचा डेटा विक्रीचे रॅकेट असून त्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर फोटो विरहित मतदार याद्या पीडिएफ व इमेज स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतात. वास्तविक सदरील माहिती वर्ड व एक्सेल फॉरमॅट स्वरूपात प्रसिद्ध करावयास हव्यात. जेणेकरुन उमेदवार व राजकीय पक्ष विश्लेषण करु शकतील. मात्र जाणीवपूर्वक  राज्य निवडणूक आयोग मतदार याद्या पीडिएफ व इमेज स्वरूपात प्रसिद्ध करतात व त्याचा तपशील डेटा तत्काळ खासगी कंपन्या प्राप्त करुन बेकायदेशीरपणे बाजारात विक्री करतात त्याला उमेदवार व राजकीय पक्ष बळी पडून आर्थिक शोषण व फसवणूक होत आहे. नियमांचा भंग करुन फोटोसह डेटा अॅप एका प्रभागासाठी 10 ते 30 हजार रुपयांना विक्री केले जात असून कोट्यावधी रुपयांची बेगमी होत आहे. 

मतदाराचा फोटो हा त्याची वैयक्तीक बाब असल्यामुळे तो फोटो सार्वजनिक रित्या वेबसाइटवर प्रसिद्ध करता येत नाही.  त्यामुळे मतदार फोटो सहीत मतदार यादीच्या पीडीएफ फाईल कोणालाही देवु नयेत अशी सुचना राज्य निवडणुक आयोगाने केलेली आहे. अशा स्वरुपाचा परिपत्रक जीआर राज्य निवडणूक आयोगाने 2016 मध्येच जारी केलेला आहे. सदर जीआर संदर्भ नं. क्र.रानिआ-2016/प्र.क्र.11/ सं.कक्ष असा आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध  झालेल्या मतदार याद्या ह्या फोटो विरहीत आहेत. परंतु खासगी कंपन्या रंगीत मतदारांच्या फोटोसह डेटा अॅप खुलेआमपणे विक्री करीत आहेत. भविष्यात फोटो चे मार्फींग करुन गैर प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः महिलांच्या मुलींच्या छायाचित्रांचा दुरूपयोग होण्याची शक्यता असून त्याची जबाबदारी कोंण घेणार हा प्रश्न असून कायदा व सुव्यवस्था दृष्टीने देखील गंभीर व चिंताजनक बाब आहे.  सदरील गैरप्रकार व बेकायदेशीर मतदार यादीचा मनाई असलेला तपशील विक्री करणाऱ्यांना कंपन्यांवर कारवाई करावी तसेच त्यांना कलर फोटोची मतदार यादी डेटा पुरविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य चे आयुक्तांना पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेतर्फे पाठविण्यात आलेले आहे. 

साधु वासवानी यांच्या १४६व्या जयंतीनिमित्त जगभर साजरा झाला आंतरराष्ट्रीय शाकाहारी दिन

 करुणा, अहिंसा आणि पर्यावरण संरक्षणाचा जागतिक संदेश
पुणे-साधु टी.एल. वासवानी यांच्या १४६व्या जयंतीनिमित्त २५ नोव्हेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय शाकाहारी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मानवता, करुणा आणि सर्व जीवांबद्दल आदर या मूल्यांचा जागतिक प्रचार करण्यासाठी विविध देशांमध्ये भव्य उपक्रम राबविण्यात आले.
या मोहिमेला जागतिक प्रतिसाद मिळत ३२,९९,४१३ लोकांनी २५ नोव्हेंबर ‘शाकाहारी दिन’ म्हणून पाळण्याची प्रतिज्ञा केली, तर ८,९१,८०,७५९ लोकांनी या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला. याशिवाय २,६४७ व्यक्तींनी आजीवन शाकाहारी राहण्याचा संकल्प करून करुणापूर्ण जीवनशैलीचा स्वीकार केला. भारतातील अनेक शहरांमध्ये या निमित्ताने कत्तलखाने पूर्ण दिवसासाठी बंद ठेवण्यात आले—करुणा आणि अहिंसेच्या संदेशाला असामान्य प्रतिसाद मिळाला.

जगभरातील ठळक उपक्रम
आंतरराष्ट्रीय पाककला उपक्रम — ‘Feast for Peace’
अमेरिकेत आयोजित ‘Feast for Peace’ कार्यक्रमात प्रतिष्ठित मिशेलिन-स्टार शेफ विकास खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी व खाद्यप्रेमींनी एकत्र येऊन शाकाहारी पाककला शिकली. वनस्पती-आधारित आहाराचे आरोग्य आणि पर्यावरणीय फायदे यांची माहिती देण्यात आली. अशाच कार्यशाळा सेंट थॉमस, डॅलस, जकार्ता तसेच भारतातील बेंगळुरू आणि दिल्लीतील केंद्रांमध्येही आयोजित करण्यात आल्या.
शांतता रॅल्या
पुणे, उल्हासनगर, बिलासपूर, इंदौर, अहमदाबाद यांसारख्या अनेक शहरांत शांतता रॅल्या काढण्यात आल्या. साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल, प्राधिकरण येथे आयोजित भव्य रॅलीत तब्बल ३,२०० विद्यार्थी सहभागी झाले. दिदी कृष्णा, अध्यक्षा – साधु वासवानी मिशन, यांनी रॅलीचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना शाकाहार आणि अहिंसेचा संदेश समाजात पोहोचविण्याचे आवाहन केले.
प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचा सहभाग
• शेफ संजीव कपूर यांनी फूडफूड चॅनेलच्या इंस्टाग्रामवरून शाकाहारी दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
• अमेरिकेतील केंद्राने आयोजित केलेला ग्रीनहॅण्ड्स हा विशेष पर्यावरण-जागरुकता उपक्रम मोठ्या प्रमाणावर प्रशंसित झाला.
सरकारी निर्णय
उत्तर प्रदेश राज्य तसेच भोपाल, कोंढवा-पुणे, लोणावळा, ग्रेटर बेंगळुरू, अहमदाबाद, इंदौर, वडोदरा, सहारनपूर या शहरांनी २५ नोव्हेंबर रोजी सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला—करुणा-दिवसाच्या पालनाचा हा एक ऐतिहासिक उपक्रम ठरला.
आंतरराष्ट्रीय व्याख्याने
पेनांग, मलेशिया येथे डॉ. केल्विन कोय यांनी ‘आहार आणि हवामान बदल’ या विषयावर प्रभावी प्रवचन दिले. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक नेते, शिक्षक आणि नागरिकांनी शाकाहारी जीवनशैली स्वेच्छेने स्वीकारली.
हॉटेल्सचा सहभाग
पश्चिम आफ्रिका, पनामा, अहमदाबाद आणि पुणे येथे अनेक रेस्टॉरंट्स व हॉटेल्सनी विशेष शाकाहारी मेनू जाहीर केला. काहींनी सवलती दिल्या, तर काही प्रतिष्ठानांनी पूर्ण दिवसासाठी बंद राहून शाकाहारी दिनाला पाठिंबा दर्शविला.

मुख्यालय, पुणे — मुख्य कार्यक्रम

पुण्यातील साधु वासवानी मिशन मुख्यालयात साधु टी.एल. वासवानी यांची १४६ वी जयंती अत्यंत भक्तिभावाने साजरी करण्यात आली. दिवसाची सुरुवात मंगल भजन, प्रार्थना व ध्यानधारणा यांद्वारे शांतमय वातावरणात झाली.
विशेष सेवाकार्यात अंगविकल बांधवांसाठी कृत्रिम अवयवांचे वितरण करण्यात आले. जे.के. योग संस्थापक स्वामी मुकुंदानंद यांनी साधू वासवानी यांच्या करुणा-तत्त्वज्ञानाचे महत्त्व सांगत उपस्थितांना मार्गदर्शन केले. मिशनच्या अध्यक्षा दिदी कृष्णा यांनीही प्रेरणादायी संदेश दिला.
यानंतर सामुदायिक लंगर आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये हजारो भक्तांनी प्रसाद ग्रहण केला. संध्याकाळी भजन-कीर्तनांनी वातावरण अधिक भक्तिमय झाले. मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिलेल्या विशेष सत्संगासह दिवसाची सांगता आनंद, शांतता आणि समाधानाच्या वातावरणात झाली.

 आंतरराष्ट्रीय शाकाहारी दिन २०२५ हा केवळ एक उत्सव नव्हता, तर जीवनाचा, करुणेचा आणि पृथ्वीप्रती जबाबदारीचा जागतिक संकल्प होता. साधु वासवानी यांच्या संदेशातून प्रेरित हा मानवीय उपक्रम जगाला अहिंसा आणि प्रेमाच्या मूल्यांची आठवण करून देणारा ठरला.

सामाजिक काम सर्वसमावेशक आणि अमर्याद असावे- ना. चंद्रकांतदादा पाटील

कोथरुडमधील अनेक दिव्यांगांचे सक्षमीकरणना. चंद्रकांतदादा पाटील यांचा पुढाकार

पुणे -सामाजिक काम हे प्रातिनिधिक नसावे, तर सर्वसमावेशक आणि अमर्याद असावे, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिशण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. तसेच, सामाजिक कामासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्ती सढळ हाताने मदत करण्यास तत्पर असतात, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि भारत विकास परिषद, मिशिलिन, इंडो फ्रेंच चेंबर ॲाफ कॅामर्स, फ्यूप्रो ( टीव्ही शो शार्क टॅंकमध्ये भाग घेणारी आणि उत्कृष्ट स्टार्टअपसाठी भांडवल मिळालेली कंपनी), समुत्कर्ष सोशल फाऊंडेशन आणि तार्क फाऊंडेशनच्या संयुक्त संयोजनातून कोथरुड मध्ये दिव्यांग सेवा सहय्यता अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमाचा शुभारंभ ना. चंद्रकांतदादा पाटील आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी भारत विकास परिषदेचे दत्ताजी चितळे, राजेंद्र जोग, सुनील लोढा, निमिष मिश्रा, लक्षणा सक्सेना, माजी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, वृषाली चौधरी, पुणे जिल्हा नियोजन समिती डॉ. संदीप बुटाला, भाजप कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, पुणे शहर चिटणीस प्रा. अनुराधा एडके, गायत्री लांडे, ॲड. प्राची बगाटे, अपर्णा लोणारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड मधील दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी माझ्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरु आहेत. पण दिव्यांगांना अजून सक्षम करुन स्वत: च्या पायावर उभे करण्यासाठी सदर उपक्रमाचा प्रस्ताव माझ्या समोर आला, तेव्हा त्याला तात्काळ मान्यता देऊन सुरुवात केली. कारण सामाजिक काम हे केवळ प्रातिनिधिक नसावे, तर सर्व समावेशक, समाजाची गरज ओळखून आणि अमर्याद स्वरूपाचे असले पाहिजे. त्यामुळे ह्या उपक्रमाची व्याप्ती भविष्यात वाढली पाहिजे, अशी भावना व्यक्त करतानाच, सामाजिक कामासाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्ती सढळ हाताने मदत करण्यास तत्पर असतात असेही त्यांनी यावेळी नमूद केली.

ते पुढे म्हणाले की, खानदेशात यजुवेंद्र महाजन सारखा तरुण दिव्यांगांसाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून देऊन काम करतो. दिव्यांगांमधील न्यूनगंड बाजूला करुन त्यांना प्रशिक्षण देऊन स्पर्धा परिक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करतो. त्याच्या याच प्रयत्नातून आज असंख्य दिव्यांग तरुण-तरुणी एमपीएससी-यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करुन प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून देशसेवा करत आहेत. त्याचे हे काम आता पुण्यातही सुरु झाले असून, इथेही त्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले की, दिव्यांगांना सहानुभूतीची आवश्यकता नाही. अनेक वैज्ञानिकांनी आपल्या दिव्यांगत्वावर मात करून जगाला मोठमोठी संशोधने दिले. स्टीफन हॅाकिग्स हे सर्वांना माहिती आहेत. त्यामुळे दिव्यांगांना सहानुभूती नव्हे, तर प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असतो. दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ३ डिसेंबर साठी महापालिकेच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

यावेळी भारत विकास परिषदेचे दत्ताभाऊ चितळे, निमिष मिश्रा, लक्षणा सक्सेना यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

… तर मिळकत करापोटी पालिकेला दर वर्षी १० ते १५ हजार कोटींचे उत्पन्न ! ‘कम्प्लिशन फॉर ऑल’ हे धोरण लागू कराल: आबा बागुल

पुणे -.
पुणे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मिळकतकर आहे. मात्र आजपर्यंत सुमारे साडे चार ते पाच लाख मिळकती अद्याप कर आकारणीच्या कक्षेत आलेल्या नाहीत.जर त्या मिळकती कर आकारणीच्या कक्षेत आणण्याबरोबरच ‘हाउसिंग फॉर ऑल’ प्रमाणे आता ‘कम्प्लिशन फॉर ऑल’ हे धोरण लागू केले तर पालिकेच्या तिजोरीत दर वर्षी १० ते १५ हजार कोटींचे उत्पन्न विक्रमी जमा होईल असा ठाम दावा माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केला आहे.

याबाबत पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात आबा बागुल यांनी म्हटले आहे कि, आम्ही अनेकवेळा लक्ष वेधले असतानाही कोणतीही ठोस कार्यवाही आजमितीस झालेली नाही. त्यामुळे या सर्व मिळकती अधिकृत आहेत कि अनधिकृत याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून अशा सर्व मिळकतींना तातडीने करआकारणीच्या कक्षेत आणणे अत्यंत आवश्यक आहे.
एकीकडे थकीत कर वसुलीसाठी अभय योजना राबविली जाते, परंतु वास्तविकता अशी आहे की, गेल्या तीस वर्षांत सतत अभय योजना जाहीर होऊन देखील कर चुकवेगिरीचे प्रमाण कमी न होता तितकेच कायम आहे. त्यामुळे अभय योजना म्हणावी तशी प्रभावी ठरत नाही.

याचबरोबर, आज पुणे शहरात सुमारे दोन कोटीहून अधिक सदनिकांचे बांधकाम पूर्ण असले तरी त्यांचे ‘कम्प्लिशन’ घेण्यात आलेले नाही. त्यामुळे बांधकाम परवानग्यांच्या धर्तीवर मिळकतकर आकारणीसाठी स्पष्ट धोरणाची आवश्यकता आहे. ‘हाउसिंग फॉर ऑल’ प्रमाणे आता ‘कम्प्लिशन फॉर ऑल’ हे धोरण लागू केले पाहिजे. अशा धोरणामुळे बांधकाम क्षेत्रातील अनियंत्रित फुगवटा रोखण्यास मदत होईल तसेच घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ शकतील.म्हणून शहरातील सुमारे एक कोटीहून अधिक कम्प्लिशन नसलेल्या सदनिकांना तातडीने कम्प्लिशन देण्यात यावे. त्यानंतर अशा सदनिकांना मर्यादित कालावधी (उदा. दोन महिने) ‘अभय योजना’राबवून मिळकतकर भरण्यास सवलत दिल्यास पालिकेला प्रती वर्षी १० ते १५ हजार कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळू शकते. तसेच जे कर भरणार नाहीत अशा सदनिकाधारकांवर मागील सहा वर्षांचा दंड आकारण्याची ठोस कारवाई झाल्यास ही योजना प्रभावी ठरेल.असेही माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे.

साक्षीभावाने जगण्याची कला शिकावी-स्वामी कृष्ण चैतन्य

३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

पुणे, दि.२६ नोव्हेंबर, “आधुनिकीकरणाच्या वातावरणात अध्यात्माची चुकीची धारणा वाढतांना दिसते. केवळ भितीपोटी मनुष्य अध्यात्माचा आधार घेतो. याचा अनुभव घ्यायचा असेल तर पूर्णत्व आणि समत्वाने जगावे. मनुष्य वर्तमान काळात जगण्याचे सोडून भूत आणि भविष्यात अधिक काळ रमतो जे दुखाःचे सर्वात मोठे कारण आहे. साक्षीभावाने जगण्याची कला शिकली तर तो शांती आणि सुखात राहू शकतो.” असे विचार किमया आश्रमचे संस्थापक स्वामी कृष्ण चैतन्य यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत ३०व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘आधुनिक जीवन पद्धती आणि अध्यात्म’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
 तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस,  प्रा.गायकवाड व ३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
स्वामी कृष्ण चैतन्य म्हणाले,” अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी भिन्न स्वरूपाच्या आहेत. स्वतःला मिटविण्यासाठी अध्यात्म असून त्यातून आनंद व शांती मिळते. मौन आणि शांतीचा मार्गच परमेश्वराकडे जाणारा आहे. विज्ञान हे नवीन संशोधनासाठी असून त्यातूनच मनुष्य जीविंत राहू शकतो.”

तत्पूर्वी सकाळच्या सत्रात प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये आणि किंकर विठ्ठल रामानूज व किंकर विश्वेशरैय्या आनंदा यांची व्याख्याने झाली.  
सकाळच्या सत्रात प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांनी ‘ मी, माझे हट्ट आणि मनःशांती’ या विषयावर विचार मांडताना सांगितले की, त्रेतायुगा पासून कलियुगापर्यंतचे जग हट्टावर चालले आहे. हट्ट ऐकणे आणि न ऐकणे दोन्ही विनाशाकडे जाते. त्रेतायुगात कैकयी ने जो हट्ट केला त्यातून दशरथाला हो म्हणावे लागले. हट्ट जेव्हा हक्काच्या वर येते त्यावेळेस धर्म म्हणून उदयास येते. हे जग हट्टावरच चालले आहे. त्यात बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट हा वेगळाच असतो. आनंद आणि शांतीच्या प्राप्तीसाठी मी ला घट्ट चिकटलेला हट्ट बाजूला सारावा.
 प्रा.दत्ता दंडगे यांनी आभार मानले.  प्रा.डॉ. मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले.

लाडकी बहीण योजना मी सुरु केली एकनाथ शिंदेंचा श्रेय लाटू पाहणाऱ्या भाजपला थेट इशारा

वणी, यवतमाळनगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आपला हक्क सांगत आक्रमक भूमिका घेतली आहे. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली. ही योजना माझ्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा निर्णय होता. अनेक अडथळे आले, विरोधही झाला, पण आम्ही ठाम होतो. कितीही टीका झाली, कितीही अडथळे आले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

महायुतीतील पक्षच काही ठिकाणी एकमेकांविरोधात लढत असल्याने लाडक्या बहिणींचे मत कोणाकडे वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच शिंदे यांनी केलेले हे विधान म्हणजे लाडकी बहीण योजनेचे श्रेय कोणाचे? या राजकीय वादात भर टाकणारे ठरत आहे. राज्यातील महिला मतदार हेच पुढील निवडणुकांचे गेमचेंजर ठरणार असल्याचे सर्व पक्षांना ठाऊक असल्याने, या योजनेभोवती प्रचंड राजकीय धुमाकूळ सुरू आहे.

राज्यात निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. 2 डिसेंबर रोजी अनेक नगरपालिकांच्या निवडणुका होणार असून त्यासाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी जोरात सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर महिला मतदारांनी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला पाठिंबा दिला होता. परिणामी सत्ता मिळवण्यात महिलांच्या मतांची मोठी भूमिका ठरली. त्यामुळे आता होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही लाडक्या बहिणी कोणत्या पक्षाच्या बाजूने मतदान करणार, याकडे राज्याचे राजकीय लक्ष लागले आहे. त्यातच स्थानिक राजकीय समीकरणांमुळे महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे राहत असल्याने महिलांचे मत नेमके कुठे जाईल? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाचे उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू केली. महायुती सरकार म्हणून आम्ही टीममध्ये मिळून हा निर्णय घेतला होता. या योजनेला राजकारणात किती विरोध, अडथळे आले, किती टीका झाली, हे सर्वज्ञात आहे. परंतु जनतेला, विशेषतः महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून ही योजना बंद होणारच नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या विधानातून शिंदे यांनी महिलांच्या मतांची दिशा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विदर्भातील प्रचारसभांमध्ये मोठा उत्साह असल्याची माहितीही एकनाथ शिंदेंनी दिली. त्यांनी सांगितले की, प्रत्येक सभेत महिलांची प्रचंड उपस्थिती दिसत आहे. लाडक्या बहिणींचा उत्साह आणि विश्वास पाहून शिवसेनेच्या उमेदवारांना निश्चितच फायदा होईल, असा त्यांचा दावा आहे. तरुणांपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत विविध वयोगटातील मतदार प्रचारात सक्रियपणे सहभाग घेत आहेत. यावरून स्थानिक नागरिकांचा विकासावर आधारित मतदानाचा कल अधिक जाणवतो, असे शिंदेंचे म्हणणे आहे.

शिंदे पुढे म्हणाले की, विकास हा आमचा मुख्य अजेंडा आहे. मी मुख्यमंत्री असताना ज्या नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष नव्हते, तिथेही विकासकामांसाठी निधी दिला. पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, रस्ते, मैदानं, उद्यानं, आरोग्य सुविधा अशा सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारने निधीची कमतरता भासू दिली नाही. राजकारणापेक्षा जनतेचा प्रश्न महत्वाचा, अशी भूमिका त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. त्यामुळे आता लोक कोणत्या पक्षावर विश्वास ठेवतात आणि विकासाच्या मुद्द्यावर कोण विजयी ठरणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

नगरपालिका निवडणुकांमध्ये महिलांचे मतांचे गणित नेहमीच निर्णायक ठरते. पण या वेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण महायुतीतच असलेले वेगवेगळे पक्ष स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढत असल्याने महिलांना कोणाला मतदान करायचे? हा प्रश्न पडला आहे. पण सरकारने दिलेला लाभ, आर्थिक मदत आणि भविष्याच्या आशा या गोष्टी महिलांच्या मतांवर परिणाम करणार हे निश्चित. त्यामुळे आता 2 डिसेंबर रोजी महिलांचा कल कोणत्या दिशेला झुकतो, यावर अनेक नगरपालिकांचे भविष्य ठरणार आहे आणि त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

खराडी, हडपसर, स्वारगेट मार्गे खडकवासल्यापर्यंत ३१.६ किलोमीटर च्या मेट्रोला मंजुरी

  • खराडी-खडकवासला आणि नळस्टॉप ते माणिकबाग मार्गिकांना मान्यता
  • ⁠केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रोच्या ३१.६ किलोमीटर अंतराच्या दोन विस्तारित मार्गिकांना मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो शहराच्या चारही बाजूला विस्तारणार असून पुण्याची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान होणार आहे.

शहरातील मेट्रो मार्गाच्या विस्तारासाठी खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. मेट्रो मार्गांच्या मंजुरीसाठी मोहोळ यांनी नगरविकास मंत्री मनोहर लाल खट्टर यांची नुकतीच भेट घेतली होती.

बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात मार्गिका क्रमांक 4 – खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला व मार्गिका क्रमांक 4 अ नळस्टॉप-वारजे-माणिकबाग या दोन मार्गिकांचा समावेश आहे. या दोन्ही मार्गिकांसाठी हडपसर हे इंटरचेंज स्थानक असेल. या दोन्ही उन्नत (एलिव्हेटेड) मार्गिकांची एकत्रित लांबी ३१.६० किलोमीटर असून त्यावर एकूण २८ स्थानके असतील. यासाठी ९८५७ कोटी ८५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून हे काम पाच वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

या नव्या मार्गिकांमुळे शहरातील रहिवासी भाग, आयटी पार्क व बाजारपेठांशी मेट्रोने जोडला जाईल. तसेच या दोन्ही मार्गिका सध्याच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गिकांच्या जवळून धावणार असल्याने मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी उपलब्ध होईल, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने कायमच शहरांच्या सर्वांगीण, सुनियोजित आणि शाश्वत विकासावर भर दिला आहे. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या विस्ताराला प्राधान्य दिले गेले आहे. मेट्रो हा त्यातील प्रमुख घटक असून शहरातील मेट्रोचे जाळे लवकरच शंभर किलोमीटरहून अधिक विस्तारेल, असे मोहोळ यांनी नमूद केले.

पुणेकरांसाठीच्या सर्वंकष वाहतूक आराखड्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गिकांना मान्यता दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी पुणेकरांच्या वतीने आभार मानतो. यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचेही मी आभार मानतो, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले.

अजित पवारांचा राजीनामा घ्या, नाही तर दिल्ली गाठणार:अंजली दमानिया यांचा सरकारला अल्टिमेटम

0

पुणे-मुंढवा येथील सरकारी जमिनीच्या वादग्रस्त व्यवहारावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन या व्यवहारातील तथाकथित गैरव्यवहार उघड केला. दमानिया यांनी सांगितलेल्या तपशीलानुसार, पुण्यातील 40 एकर सरकारी जमिनीसंदर्भात अमेडिया कंपनीने डेटा सेंटर सुरू करणार असल्याचे खोटे दाखवून फक्त 500 रुपयांत स्टॅम्प ड्युटी माफी मिळवली, असा आरोप त्यांनी केला. त्यावरून त्यांनी अजित पवार यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.

अंजली दमानिया यांनी ठामपणे सांगितले की, अमेडिया कंपनीकडून सबमिट केलेल्या लीज डीड आणि कागदपत्रांमध्ये डेटा मायनिंग, आयटी सेवा व सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याचा उल्लेख आहे. यामध्ये 98 लाखांची गुंतवणूक असल्याचेही नमूद करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात हा व्यवहार जमीन विकत घेण्यासाठीचा असल्याचा संशय आहे. बाजारमूल्य शेकडो कोटी असलेल्या जमिनीवर फक्त 500 रुपयांत व्यवहार करण्याचे कट कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला. एवढे मोठे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांना न सांगता झाले, हे कसे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दमानिया यांनी यानुसार, केंद्र सरकारने या प्रकरणात 16 जूनलाच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्वरित हस्तक्षेप करण्याचे आदेश दिले होते. मात्र स्थानिक प्रशासनाने या निर्देशांकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे संपूर्ण प्रकरणात राजकीय दबाव आणि संरक्षण मिळाले, असा त्यांचा दावा आहे. जमीन व्यवहाराची किंमत सुमारे 1800 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या मोठ्या गैरव्यवहारात संबंधित मंत्र्यांची अनभिज्ञता पटत नाही, असेही दमानिया म्हणाल्या.

या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांनी राज्य सरकारला चव्हाट्यावर आणले आहे. त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करावी आणि अजित पवारांचा उपमुख्यमंत्री व पालकमंत्री पदाचा राजीनामा त्वरित घ्यावा. राजीनामा घेतला नाही तर मी सर्व पुरावे घेऊन अमित शहा यांची भेट घेईन, असा थेट इशारा दमानिया यांनी दिला. तसेच या प्रकरणात नेमलेल्या एसआयटीवरही अविश्वास व्यक्त करून, त्या समितीला बरखास्त करण्याची मागणी त्यांनी पुढे केली. तपास पथकात जिल्ह्याचे अधिकारी मोठ्या प्रमाणात असणे हा तपासावर परिणाम करू शकतो, असे त्या म्हणाल्या.

राजकीय क्षेत्रात या आरोपांमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. राज्यात निवडणुका तोंडावर असताना विरोधकांना हत्यार मिळाले आहे. अजित पवार हे कामकाजावर आधारित नेतृत्त्व मानले जाते. मात्र वारंवार त्यांचे नाव जमीन, सिंचन वा आर्थिक गैरव्यवहारांत येत राहणे त्यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का ठरू शकतो. या आरोपांवर अजित पवार नेमकी काय प्रतिक्रिया देतात आठवडाभर राज्याचे लक्ष लागून राहणार आहे. गुजरात ते दिल्लीपर्यंत पोहोचणारे हे प्रकरण महायुती सरकारच्या प्रतिमेलाही मोठी तडा देऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

संविधानाची प्रस्तावना वाचण्याआधीच पोलिसांकडून मुंबई युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची धरपकड.

भाजपच्या राजवटीत संविधान दिन साजरा करणे गुन्हा, संविधान रक्षणासाठी लढत राहू: झीनत शबरीन.

मुंबई, दि. २५ नोव्हेंबर

भाजपच्या राजवटीत संविधान दिन साजरा करणे आणि संविधानाची प्रस्तावना वाचणे हा गुन्हा ठरला आहे. आज संपूर्ण भारत संविधान दिन साजरा करत असताना मुंबई युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संविधानाची प्रस्तावना वाचण्यापासून पोलिसांनी रोखले व ताब्यात घेतले, हा लोकशाही मूल्यांवरचा थेट हल्ला आहे. संविधान आणि लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न एकत्रितपणे हाणून पाडू, असे मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झीनत शबरीन यांनी म्हटले आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वोटचोरी विरोधात बोलू नये म्हणून सार्वजनिक पत्र लिहून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणा-या २७२ सेवानिवृत्त IAS, IPS, IRS अधिका-यांपैकी एक अधिकारी ए. के. गौतम यांच्या मुंबईतील निवासस्थानासमोर संविधान दिनानिमित्त मुंबई युवक काँग्रेस संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून त्यांना संविधानिक मूल्यांची आठवण करून देणार होते पण पोलिसांनी दडपशाही करून लोकशाहीचा गळा घोटला आहे. भाजपा सरकारने पोलिसांच्या मदतीने केलेला हा प्रकार निषेधार्ह असून लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा हा लढा सुरुच राहिल असे झीनत शबरीन यांनी सांगितले.

युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी मरीन ड्राईव्ह येथून ताब्यात घेऊन आझाद मैदान येथे घेऊन गेले. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदान येथे व संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंत्रालया जवळच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केले.

आपल्या प्रभागात १० हजार मतदार बोगस – घ्या पुरावे : पत्रकार परिषदेत अविनाश बागवेंचा हल्लाबोल

पुणे-आपल्या प्रभागात , दुबार, शेजारच्या प्रभागातील , किंवा पूर्ण नाव नसलेले अशा सुमारे १० हजार मतदारांच्या डुप्लिकेट अथवा बोगस म्हणता येतील अशा नावांचा समावेश करण्यात आल्याचा गौप्यस्फोट माजी नगरसेवक कॉंग्रेसचे युवा नेते अविनाश रमेश बागवे यांनी आज संविधान दिनी काढलेल्या यात्रेनंतर पत्रकार परिषदेतून केला आणि थेट पुरावे देत विचारले याहून अधिक कोणते हवेत पुरावे …..?

ते म्हणाले,’ प्रभाग क्र. 22 मधील मतदार यादीतील गंभीर अनियमितता व मतदारांच्या नावांची झालेली मोठ्याप्रमाणावरची गडबड हे नजरचुकूने झालेले आहे कि हेतुपुरस्सर दूषित हेतूने केले आहे हे तपासणे गरजेचे आहे.महाविकास आघाडीने नुकतेच पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना एक सविस्तर निवेदन दिले आहेच
मोठ्या प्रमाणात Duplicate Entries (डुप्लिकेट नावे), एकाच व्यक्तीची एकाहून अधिक वेळा नोंदवली गेली आहेत. यामुळे मतदार यादीची सत्यता धोक्यात आली आहे आणि निवडणुकीची पारदर्शकता कमी झाली आहे.माझ्या मनपा प्रभाग क्र 22 काशिवाडी डायसप्लॉट मध्ये एकूण 3600 दुबार मतदार आहे. तसेच शेजारील प्रभाग क्र 23 रविवार पेठ – नानापेठ मध्ये 2154 व प्रभाग क्र. 26 गुरुवार पेठ घोरपडे पेठ मध्ये 1278 इतके मोठ्या प्रमाणात दुबार मतदार आहेत. तसेच इतर प्रभागातील अंदाजे 5200 मतदार माझ्या प्रभाग क्र 22 मध्ये समाविष्ट झालेले आहे. वरील त्रुटी मुळे जवळ जवळ 10000 मतदारांवर परिणाम होत आहे जे अत्यंत गंभीर आहे. प्रभाग 22 काशिवाडी- डायसप्लॉट मध्ये मृत व्यक्तींची नावे हटवली गेलेली नाहीत. माझ्या स्वतःच्या कुटुंबातील आजी, चुलते व इतर 3 मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत आहे. ही नावे रद्द करण्यासाठी मी स्वतः दोन वेळा अर्ज केलेला आहे. हे अत्यंत चिंताजनक असून चुकीच्या मतदानाला व गैरप्रकारांना वाव देते.
मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेले मतदार अद्याप यादीत असून गेल्या काही वर्षांत हजारो नागरिक पुण्याच्या उपनगरात स्थलांतरित झाले आहेत. परंतु त्यांची नावे मतदार यादीतून आत्तापर्यंत काढलेली नाहीत.तसेच प्रभाग क्र. 22 मधील मतदार प्रभाग क्र 23 व 26 मध्ये समाविष्ट केलेले आहे.

तसेच माझ्या प्रभागात हजारो संदिग्ध मतदारांच्या नावांचा समावेश आहे. कोणाचे केवळ पहिले नाव आहे तर कोणाचे आडनाव नसलेले नाव आहे या नावावरून एखा‌द्या विशिष्ट व्यक्तीची ओळख पटू शकत नाही. जसे की तसेच अनेक मतदारांचे मतदान केंद्र दुसऱ्या प्रभागात आहे. तेही तत्काळ दुरुस्त करावे. BLO व Electoral Registration Officer ERO यांच्या तपासणीतील त्रुटी प्रत्यक्ष पत्ते पडताळणी योग्य पद्धतीने करण्यात आलेली नाही. मतदार नाव नोंदणीच्या व्हेरिफिकेशनमध्ये प्रचंड दुर्लक्ष झाले आहे.

मुग्धा वीरा गोडसे यांच्या ‘कृष्ण वंदना’ने उजळले पुणे– भक्ति, माधुर्य आणि आध्यात्मिक सौंदर्याचा दिव्य संगम

पुणे-अभिनेत्री आणि आध्यात्मिक गायिका मुग्धा वीरा गोडसे यांनी आपल्या पहिल्याच भजन संगीताच्या प्रस्तुतीद्वारे पुण्यात एक शांत, दिव्य आणि सौम्य संध्याकाळ साकारली, जेव्हा त्यांनी पी. एल. देशपांडे उद्यानातील कलाग्राम  येथे‘कृष्ण वंदना’ सादर केली. सूर्यास्तानंतर सुरू झालेल्या या कार्यक्रमात सुरेल भजन, ध्यानमय मंत्रोच्चार आणि आत्म्याला स्पर्शून जाणारे वातावरण एकत्र येऊन एक अद्वितीय आध्यात्मिक अनुभव निर्माण झाला.

कार्यक्रमाची सुरुवात पवित्र मंत्र  नमो भगवते वासुदेवाय यांच्या विशेष दिव्य धूनमध्ये झाली, ही धून त्यांच्या पूज्य गुरुदेव श्री तर्नेव जी यांनी प्रकट केलेली आहे. त्यानंतर मुग्धांनी आपल्या भावपूर्ण आवाजात सादर केलेली कृष्ण वंदना – भगवान कृष्णांच्या १०८ नावांना आणि गुणांना अर्पण केलेली त्यांची मूळ रचना – श्रोतृवर्गाला भावविभोर करून गेली. गुरुदेवांच्या कृपेने सजलेल्या या रचना, धून आणि संगीताने उपस्थितांना आनंद, शांतता आणि कृतज्ञतेच्या सागरात बुडवले, आणि सर्वांच्या मनात एकच भावना उमटली – हे अजून चालू राहावे.

संगीताच्या टीमनेही कार्यक्रमाला अधिक उंची दिली. सुप्रसिद्ध भक्तिगायक अवीरास आणि त्यांच्या समूहाने मनोहारी भजन आणि कीर्तन सादर केले, तर बासरीवादक पंरवीशंकर मिश्रा यांनी त्यांच्या सुरेल रागांनी समग्र वातावरणात एक अद्भुत अध्यात्मिक थर तयार केला.

या प्रसंगी कृष्णा वंदना पुस्तकाचे सहलेखक आणि मुग्धांच्या आध्यात्मिक प्रवासातील महत्त्वाचा आधारस्तंभ राहुल देव यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला आणखी उबदारपणा आणि अर्थ प्राप्त झाला. सर्व अतिथींना या पुस्तकाची एक खास प्रती स्मृतिचिन्ह म्हणून देण्यात आली.

कार्यक्रमाचा एक हृदयस्पर्शी भाग म्हणजे पुणे कृष्ण वंदना परिवाराचा सहृदय सहभाग. आविया सचदेव (अवीरासची आई), तसेच मुग्धाची बहीण मधुरा आणि आई सविता गोडसे यांनी प्रत्येक पाहुण्याचे अत्यंत आत्मीयतेने स्वागत केले, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात एक स्नेहपूर्ण, शांत आणि सौम्य वातावरण निर्माण झाले.

अनुभवाबद्दल बोलताना मुग्धा म्हणाल्या, “आज येथे जाणवलेले प्रेम, एकात्मता आणि भक्ति खरंच दिव्य होते. माझ्यासाठी हा जणू ‘जीवनाचा पूर्ण एक चक्र पूर्ण झाल्याचा क्षण’ होता – ज्या शहरात मी वाढले, त्याच ठिकाणी माझ्या कुटुंबाच्या, बालमैत्रिणींच्या आणि मला नव्या रूपात पाहणाऱ्या लोकांसमोर प्रस्तुती देणे माझ्यासाठी अत्यंत भावनिक होते. माझ्या पूज्य गुरुदेवांच्या कृपेने मिळालेला प्रतिसाद माझ्यासाठी मोठा आशीर्वाद आहे. ही फक्त सुरुवात आहे – पुढे मला खूप वाटचाल करायची आहे. पण सध्या माझ्या मनात एका नवीन आरंभाची आणि आनंदाची भावना भरली आहे.”

मुग्धा पुढे म्हणाल्या, “कलाग्रामचे शांत, रम्य आणि कलात्मक वातावरण या प्रमाणातल्या भक्तिमय संध्येसाठी अगदी योग्य ठरले. पुण्याच्या प्रमुख सांस्कृतिक स्थळांपैकी एक म्हणून हे स्थान लवकरच विशेष स्थान मिळवेल.”

कलाग्राम हे शिक्षणतज्ज्ञ पूजासतीश मिसाळ  यांनी संकल्पित केलेले नवे सांस्कृतिक केंद्र आहे. पुणे महानगरपालिकेद्वारे व्यवस्थापित हे सुंदर स्थळ कला, संस्कृती आणि समुदाय एकत्र येण्यासाठी अत्यंत आकर्षक ठिकाण म्हणून वेगाने उदयास येत आहे.कार्यक्रमाचा समारोप प्रसाद वितरणाने झाला, जिथे उपस्थित प्रत्येकजण आध्यात्मिक समाधान, ऊब आणि भक्तिभावाची अनुभूती घेऊन परतला.

मंत्री राधाकृष्ण विखेंच्या गुंडागिरीला फडणवीसांच्या पोलिसांची साथ, काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण व मारहाण महागात पडेल.

देवेंद्र फडणवीसांच्या बगलबच्यांनी संविधान दिनी अहिल्यानगरमध्ये लोकशाहीचा खून पाडला, भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही: हर्षवर्धन सपकाळ

सत्ताधारी भाजपाचा निवडणुकीत नंगानाच, देवेंद्र फडणवीसजी, भाजपाच्या गुंडांना आवारा, सत्तेचा माज उतरायला वेळ लागत नाही.

ऐन निवडणुकीत काँग्रेसच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षाचे अपहरण व मारहाणीच्या घटनेचा तीव्र धिक्कार व निषेध.

मुंबई, दि. २६ नोव्हेंबर २०२५

अहिल्यानगर जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आलेली घटना अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे. आज संविधान दिनाच्या दिवशी भाजपने सकाळी सकाळी लोकशाहीची हत्या केली आहे. २६-११ च्या दिवशी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केला होता तोच मुहूर्त साधून अहिल्यानगर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बगलबच्यांनी लोकशाहीचा खून पाडला आहे. ऐन निवडणुकीत एका राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला अपहरण करून मारहाण होते, हे काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खरपूर समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नगर जिल्ह्यात घडलेली ही घटना अत्यंत निषेधार्ह व गंभीर आहेच परंतु महाराष्ट्रात लोकशाही अस्तित्वात आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित करणारी आहे. भाजपा सरकारने आपले कारनामे दाखवायला सुरुवात केली आहे. नगरमध्ये झालेली ही काही पहिलीच घटना नाही. नगरपालिकेची निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या काँग्रेसच्या दोघांना याआधी रात्री अटक करून कस्टडीत टाकण्यात आले, त्यांना मारहाण करण्यात आली, त्यानंतर पोलीसांनी त्यांच्या गाडीतून या दोघांना भाजपाचा माजी खासदार सुजय विखे पाटील व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे घेऊन गेले, त्यांना दमदाटी करण्यात आली, हा सर्व प्रकार चित्रपटात दाखवतात तसा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेबा सारखा आहे, त्यांची मोडस ऑपरेंडी नथुराम गोडसे सारखी थंड डोक्यानी हत्या करणारी आहे आणि फडणवीसांना दरिंदा म्हटले, त्याच्या त्यांना व त्यांच्या बगलबच्च्यांना मिरच्या झोंबल्या. पण आम्ही जे बोललो ते योग्यच होते ही अहिल्यानगरच्या घटनेने ते पुन्हा एकदा दाखवूनही दिले आहे. भाजपाला लोकशाही व संविधान मान्य नसून ठोकशाही सुरु केली आहे. विरोधी पक्षाने निवडणूका लढवायच्या की नाही, असा प्रश्न या घटनेवरून उपस्थित होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गुंड बगलबच्यांना आवर घालावा, सत्तेचा माज उतरायला वेळ लागत नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं !

तुम्ही बॉम्बेचे नाव मुंबई केले नाही हे फार चांगले केले, केंद्रीय मंत्र्याच्या विधानावर संताप – राज ठाकरे म्हणाले मराठी माणसा आता तरी तुला कळायला हव , जागा हो …

मुंबई – केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, ‘आयआयटीच्या नावातील बाँबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं’. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय.या मंत्र्याने केलेले हे विधान आपल्या बॉसला खुश करण्यासाठी केलाय आणि बॉस ला मुंबई महाराष्ट्रापास्य्न तोडून गुजरातला जोडायची असल्याने हे विधान केलय ,आता तरी मराठी माणसाला हे कळायला हवे असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी आयआयटीच्या नावात बॉम्बे हे नाव तसेच राहिले, त्याचे मुंबई झाले नाही हे चांगले झाले, असा उल्लेख केला. या एका वाक्याने मराठी जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. मुंबईचे नाव मराठी इतिहास, मराठी संस्कृती आणि या भूमीच्या मूळ देवी मुंबाशी जोडलेले आहे. त्यामुळे मुंबईऐवजी बॉम्बेचा आग्रह व्यक्त करणे ही महाराष्ट्राच्या अभिमानावर घाला असल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

या वादाला उत्तर देत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी थेट प्रहार केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून भाजप नेतृत्वावर आणि केंद्रीय मंत्र्यांवर जोरदार टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, जितेंद्र सिंह यांचं विधान हे केंद्र सरकारच्या मानसिकतेचं दर्शन घडवतं. मुंबई जी मराठी माणसाची आहे, तिला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आजही शिजतोय. त्यांनी इशारा दिला की काही शक्ती मुंबई व आजूबाजूचा एमएमआर परिसर गुजरातमध्ये जोडण्याचे प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने अलीकडेच चंदीगडचा मुद्दा उचलून धरण्याची आठवण देत राज ठाकरे यांनी मराठी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

राज ठाकरे यांनी जितेंद्र सिंह यांच्या मूळ प्रदेशाचा उल्लेख करत म्हणाले, त्यांचा मुंबईशी, महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही. तरीही ते येऊन मुंबईच्या नावावर भाष्य करतात. फक्त दिल्लीतील नेतृत्वाची मर्जी ठेवण्यासाठी ही वक्तव्ये केली जातात. त्यांनी केंद्रावर आरोप केला की मुंबई नेहमीच डोळ्यात खुपते, कारण ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असून इथे मराठी ओळख दृढ आहे. सुरुवातीपासूनच काही जण मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आले आहेत. परंतु महाराष्ट्रातील जनतेने तो प्रत्येकवेळी हाणून पाडला आहे. मुंबई ही मराठी माणसाचीच आहे, आणि राहणार, हे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
आयआयटीप्रमाणेच अनेक राष्ट्रीय संस्थांच्या नावात बॉम्बे, मद्रास अशी जुनी नावे कायम आहेत. मात्र, मुंबईच्या नावाचा संदर्भ आल्यानंतर नेहमीच राजकीय वादंग निर्माण होतो. मराठी ओळख, भाषा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा संघर्ष कायम आहे. त्यामुळे या विधानाने महाराष्ट्रातील मराठी जनतेला जणू पुन्हा एकदा सज्जतेचा इशारा मिळाला आहे. मुंबई आपलीच आहे आणि राहील, हे संदेश अनेकांनी दिला आहे. आता केंद्र सरकार व भाजप यांची पुढील भूमिका काय असते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

राज ठाकरे यांनी केलेले आवाहन वाचा….

केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, ‘आयआयटीच्या नावातील बाँबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं’. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय.

आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे !
खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे.

या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना ‘मुंबई’ हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय.

आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. ‘मुंबई’ नको ‘बाँबे’च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच !

आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं !
राज ठाकरे ।