Home Blog Page 329

पुण्यातील नवले ब्रीज जवळ पुन्हा ‘हिट अँड रन’:भरधाव मर्सिडीजच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा दुर्देवी मृत्यु

पुणे- पहाटेच्या सुमारास भरधाव जाणार्‍या मर्सिडीज कारने नवले पुलाचे कठडे तोडून खाली असलेल्या सर्व्हिस रोडवरील पडली. ही कार नेमकी सर्व्हिस रोडवरुन जात असलेल्या दुचाकीवर पडली. त्यात दुचाकीवरील सहप्रवासी याचा मृत्यु झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दुसरीकडे मर्सिडीज कारमधील एअरबॅगमुळे चालक व इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.
हिट अँड रनचा प्रकार पुण्यातील नवले ब्रीज जवळ घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत एका मर्सिडीज (एमएच ०१ बीके ४६२५) कारचालकाने रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकीला जाेरात धडक दिल्याने कुणाल हुशार (रा. चिंचवड,पुणे) या तरुणाचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. संबंधित कारचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आराेप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

या अपघातातबाबत पाेलिस उपायुक्त संभाजी पाटील यांनी सांगितले की, शनिवारी पहाटे साडेचार वाजता बंगळुरु -पुणे महामार्गावर वडगाव ब्रीज जवळ विशाल हाॅटेल समाेर एका भरधाव वेगात असलेल्या मर्सिीडीज कारची स्प्लेंडर दुचाकीला जाेरात धडक बसली. या अपघातात माेटारसायकल चालकाचा दुर्देवीरित्या मृत्यु झाला असून त्याचा सहकारी जखमी झाला आहे. या अपघातानंतर मर्सिडीज कार वडगाव ब्रिजवरील बॅरिकेड ताेडून खाली असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर पडली. मर्सिडीज कारचे यात माेठे नुकसान झाले असले तरी कार मधील एअरबॅगमुळे चालक आणि मर्सिडीज मधील इतर प्रवाशांना किरकाेळ दुखापत झाली आहे.

याप्रकरणी आराेपींची वैद्यकीय चाचणी पाेलिसांनी केली असून त्यांच्यावर बीएनएस (सदाेष मनुष्यवध) कलम १०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दाेन आराेपींना ताब्यात घेण्यात आले असून दाेन आरोपी जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं आहे पण तो योग जुळून येईना ;दादांनी बोलून दाखवली भावना…

मुंबई दि. २ मे- महिलांना संधी मिळाली पाहिजे. लाडक्या बहिणीसाठी चांगला निर्णय सरकारने घेतला आहे. त्यांच्या कुटुंबांना आधार देण्याचे काम केले आहे. राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांना वाटते पण ते अद्याप शक्य झालेले नाही… कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं आहे पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.आज महिलांचा गौरव करत आहोत हे सांगतानाच महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात यश मिळविले आहे. आम्ही पण अनेक महिलांना संधी देण्याचे काम करत आहोत हेही आवर्जून अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात पायाभूत सुविधा उभ्या केल्या व या राज्याला सुसंस्कृत राजकारण दिले त्यांचा वारसा घेऊन काम करत असल्याचेही अजितदादा पवार यावेळी म्हणाले.अनेक महिलांचे कर्तुत्व राज्याने पाहिले आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असावे मनभेद होता कामा नये असे सांगतानाच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात ज्यांनी योगदान दिले त्यांचा उद्या गौरव करणार असल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले.यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार सुनेत्रा पवार, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र महोत्सव-२०२५ च्या दुसर्‍या दिवशी मध्ये आज महाराष्ट्रातील कर्तबगार भगिनींचा ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये देश व राज्यपातळीवर महाराष्ट्राची स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या पद्मश्री अनुराधा पौडवाल, ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पार्श्वगायिका बेला शेंडे, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे, अर्जुन पुरस्कार विजेत्या धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार विजेत्या नेमबाज राही सरनोबत यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.

याशिवाय राज्यसभेच्या तालिका सभापती म्हणून नियुक्ती झाली त्याबद्दल खासदार सुनेत्रा पवार यांचा सन्मान करण्यात आला.

सर्वच क्षेत्रात महिला आज पुढे गेल्या आहेत. आपल्यासमोर परिस्थिती येईपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही असे सांगतानाच मी अनवाणी पायांनी खेळाकडे वळल्याचे धावपटू ललिता बाबर यांनी सांगितले. ललिता बाबरसारख्या अनेक खेळाडू महाराष्ट्रातून मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.लोकांनी आपल्याकडून आशेने व्यक्त केलेल्या अपेक्षा आहेत. या क्षेत्रात चांगले काम करायला हवे असेही सोनाली कुलकर्णी म्हणाल्या.दादा आमचा तुम्हाला आमचा अभिमान वाटेल असे काम करु अशी ग्वाही सोनाली कुलकर्णी यांनी दिली.हा माझा सन्मान मानत नाही यामागे अनेकांचा त्याग आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार मानतानाच जडणघडण ही आईवडील आणि गुरूंनी घडवली आहे.यांच्या बळावर २५ वर्षाचा टप्पा गाठला असल्याचे बेला शेंडे यांनी स्पष्ट केले.यावेळी फोल्क आख्यान पार पडले.

CM/DCM साहेब…पुण्यात पुन्हा भररस्त्यात कोयता हल्ल्याचा थरार.. रस्त्यावरील गुन्हेगारांची दहशत नष्ट होणार कधी ?

गृहमंत्री-पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे- रोहित पवार

पुणे- महाराष्ट्राच्या राजकारणात सुरत , गुवाहाटी झाली शिवसेनेची आणि नंतर राष्ट्रवादीची देखील शकले झाली , CM हे DCM झाले, DCM हे CM झाले … रशिया युक्रेन च्या लढाईत मध्यस्थी झाली , विश्वभर भारताचा डंका वाजला .. पण …पण साहेब साऊथच्या सिनेमांनी गुन्हेगारी तरुणाईच्या हाथी दिलेला कोयता पुण्यात तळपतच आहे…भर रस्त्यात होणारे कोयत्याचे थरार होताच आहेत. भले टोळ्या असो नसो ..पण रस्त्यावरची दहशत आणि भीती थांबेनासी झालीय. कधी कोण कोयता काढील आणि कोणावरही हल्ला करेल सांगता येत नाही , तरुणाईची भडकलेली माथी आणि त्यांना सहज सुलभ मिळालेले कोयता नावाचे रस्त्यावर कोणी धक्के मारून गेले , भयंकर वेगाने भीती आणि संतापदायक पद्धतीने गाडी घासून गेले तरी कोणी बोलायची हिंमत करेनासे झालेय कारण कधी कोण कोयता काढेल याचा भरवसा उरलेला नाही , एवढेच काय १६ /१७ वर्षांच्या पोरांच्या खिशात आता कट्टे म्हणजे बंदुका दिसू लागल्यात सहज मिळणाऱ्या या हत्यारांनी आणि अल्पवयीन तरुणाईच्या भडकलेल्या माथ्यांनी पुण्यात दह्स्त निर्माण होते आहे . साहेब तुम्हाला आहे इकडे लक्ष द्यायला वेळ …? अशा स्वरुपाची प्रतिक्रिया आता पुण्यातून उमटू लागली आहे . त्यातच आज एका अशाच घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झाले आहे. याकडे आमदार रोहित पवार यांनी लक्ष वेधले आहे.
पवार यांनी म्हटले आहे कि,’ 17 एप्रिलला कोयत्या गँगने एका जणावर हल्ला चढवला. . या गँगवर कारवाई करावी अशी मागणी मी अधिवेशनात केली होती पण अशी गँग नाही असे मुख्यमंत्री म्हणाले आता याकडे गृहमंत्री-पालकमंत्री यांनी लक्ष घालावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी सराईत गुन्हेगार सुरज भिसे, सुमित भिसे, आदित्य पवार, सतीश पवार यांना बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांनी अटक करून आरोपींना न्यायालयात हजर केले. कोर्टाने भिसे व पवार या सगळ्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

रोहित पवार म्हणाले की, पुण्यातल्या कोयता गँग चा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे सांगितले होते, आणि हा बघा कोयता गँग चा कालचा थरार! पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, ही विनंती!.
पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेता त्यांना जामीन दिल्यास ते पुरावे नष्ट करू शकतात किंवा पुन्हा गुन्हा करु शकतात. घटनेमागचे नेमके कारण काय होते, हे शोधण्यासाठी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. तसेच आरोपींच्या मोबाईल तपासणीद्वारे कोणत्या टोळीशी त्यांचा संबंध आहे का, हे शोधले जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसून येत आहे की, तरुणांच्या एका गटात भररस्त्यात तुफान हाणामारी सुरु आहे आणि एकाने हातात कोयता घेऊन दुसऱ्या तरुणावर तो उगारला आहे.

अखेर आमदार पठारे यांचे १२ तासानंतर उपोषण मागे

फॉरेस्ट पार्क व गोठण ओढा मार्गे जाणाऱ्या ३०० मीटरचा रस्ता करण्यासाठी झोपलेल्या महानगरपालिका प्रशासनाला आमदार बापूसाहेब पठारे यांच्या आमरण उपोषणाने खडबडून जाग

पालिका प्रशासनाची दखल; काम सुरू

लोहगाव, पुणे: लोहगाव–वाघोली मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या फॉरेस्ट पार्क व गोठण ओढा मार्गे जाणाऱ्या अवघ्या ३०० मीटर अपूर्ण रस्त्याच्या कामासाठी अखेर वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी २ मे रोजी सकाळी ८.३० वाजता आमरण उपोषण सुरू केले. गेली ८-१० वर्षे या रस्त्याची मागणी होत असतानाही पुणे महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे या रस्त्याचे काम रखडले होते.

सदर अपूर्ण रस्त्यामुळे नागरिक, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका यांना दररोज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या रस्त्यावर अपघात, मणक्यांचे त्रास आणि सार्वजनिक वाहतूक अडथळ्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. तरीही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत होते.

याविरोधात ठाम भूमिका घेत वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी थेट रस्त्याच्या ठिकाणी उपोषण सुरू केले. नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला. “गेली ८-१० वर्षे या रस्त्याकडे कोणतेही अधिकारी गांभीर्याने बघायला तयार नाहीत. मालक तयार असूनही मोजणी, कागदपत्रे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत प्रशासन कुचराई करतेय. नागरिकांचे जीवन धोक्यात असतानाही, ‘करतो’, बघतो, ‘पाहतो’, इतकेच उत्तर मिळतेय आणि ही मानसिकता मान्य नाही,” अशी थेट टीका आमदार बापूसाहेब पठारे महापालिका प्रशासन व अधिकारी वर्गावर केली.

उपोषणाच्या अवघ्या काही तासांतच प्रशासनाने हालचाल सुरू केली. पुणे महानगरपालिका पथविभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, परिमंडळ १ चे उपआयुक्त राजेंद्र जगताप, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश भुतकर, पथविभागाचे कार्यकारी अभियंता संजय धारव यांच्यासह संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामास सुरुवात केली. मात्र, फक्त वरवर पाहणी व सुरुवात पुरेशी नसल्याचे स्पष्ट करत आमदार पठारे यांनी उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले होते.

यानंतर संध्याकाळी उशिरा अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर काम पूर्ण होईल, अशी हमी दिल्यानंतर पठारे यांनी १२ तासांनी उपोषण मागे घेतले. तथापि, उपोषण मागे घेताना पठारे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला, की “फक्त काम सुरू झाले म्हणून मी शांत बसणार नाही. जोपर्यंत हा रस्ता पूर्ण होणार नाही, नागरिकांना प्रत्यक्ष डांबरीकरण झालेला चालण्यायोग्य रस्ता मिळणार नाही, तोपर्यंत लक्ष ठेवणार आहे. काम वेळेत आणि मुख्य म्हणजे दर्जा राखून पूर्ण झाले पाहिजे.”

नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यवस्थेला जागे करायचे असेल, तर संघर्षाची ठिणगी पेटवावीच लागते. आमदार बापूसाहेब पठारे यांनी तो संघर्ष वारंवार आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवला. उपोषणाला यश आल्याबद्दल व काम सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी आमदार बापुसाहबे पठारे यांचे अभिनंदन व आभार मानले. तसेच, सर्वत्र या यशस्वी उपोषणाची चर्चा होत असल्याचे समजते.

खडकी रेल्वे अंडरब्रीज प्रकल्पआराखडा मान्यतेसाठी रेल्वे खात्याकडे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – रेंज हिल्स आणि खडकी पोलीस स्टेशन जवळील रेल्वे अंडरब्रीज प्रकल्पाचा आराखडा तयार असून, मान्यतेसाठी तो रेल्वे खात्याकडे पाठविला आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) प्रसारमाध्यमांना दिली.

या प्रकल्पाला रेल्वे खात्याकडून मान्यता मिळताच निविदा मागविण्यात येऊन काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असे आश्वासन शिरोळे यांनी दिले.

पुणे महानगरपालिकेचे मुख्य अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्याशी रेंज हिल्स व खडकी पोलिस स्टेशनजवळील रेल्वे अंडरब्रिज प्रकल्पाच्या रुंदीकरण संदर्भात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सविस्तर चर्चा केली. या चर्चेमध्ये साडे चार बाय दहा मीटर चे बोगदे प्रस्तावित केले असून त्याचे जीएडी ड्रॉइंग मान्यता करिता रेल्वे कडे पाठवण्यात आले आहे, अशी माहिती देशमुख यांनी आमदार शिरोळे यांना दिली.

तसेच खडकी स्टेशन रोडच्या रुंदीकरणाबाबत आणि नाल्याच्या कामाबद्दल आमदारांनी सविस्तर चर्चा केली.

हे दोन्ही विषय नागरिकांसाठी महत्त्वाचे असल्याने ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना तातडीने चौकशीचे निर्देश

पालघर, दि. २ मे २०२५ : डहाणू तालुक्यातील केनाळ बायगुडा येथे सायबु निंजरे सावार (वय २५) या गर्भवती महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचाराच्या अभावामुळे मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य संचालक, पालघर यांना तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या प्रकरणी प्रसारमाध्यमांमध्ये २७ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीचा दाखला देत डॉ. गोऱ्हे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सदर महिलेला प्रसूतीसाठी वेळेत वैद्यकीय सेवा मिळाल्या नसल्याने व त्यानंतरही आवश्यक उपचार न मिळाल्याने तिचा व बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला, असे आरोप करण्यात आले आहेत. या घटनेमुळे स्थानिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, तसेच केनाळ बायगुडा व परिसरातील आरोग्य केंद्रांत आवश्यक सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर व औषधोपचार तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी स्पष्ट मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. यासोबतच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याचेही त्यांनी सुचवले आहे.

“ही घटना केवळ एका कुटुंबाचे नुकसान नाही, तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे,” असे मत व्यक्त करत डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन केले आहे.

…अखेर पुणे शहरात पाणीकपात, पाणीपुरवठा प्रमुखांचे नियोजन फेल..

पुणे: पुण्याला नेहमीच भरभरून निसर्गानं जल दान दिलं, पण ते वितरणाचे नियोजन करता न आल्याने 24 तास पाणीपुरवठ्याचं गाजर दाखवत गेली 10 वर्षे जादा पाणी कर वसूल करत आलेल्या महापालिकेवर आता पाणी पुरवठ्यात कपात सुरू करावी लागत आहे.

नियोजन ढासळले अन् क डक उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली पाण्याच्या मागणी एवढा पुरवठा करणे शक्य नसल्याने महापालिकेकडून अखेर शहरात पाण्याची कपात करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
दक्षिण पुण्यातील कात्रज, आंबेगाव, धायरी, सिंहगड रस्ता परिसरापासून ही सुरूवात करण्यात आली आहे. या भागात आता आठवडयातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार आहे. या परिसरात महापालिकेच्या वडगाव जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, उपलब्ध असलेले पाणी कमी पडत असल्याने कात्रज परिसरात मोठया प्रमाणात पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याने सर्व भागात पुरेसे पाणी देण्यासाठी आठवडयातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवार ( दि,५ मे) पासून केली जाणार आहे. या भागात चक्राकार पध्दतीने पाणी दिले जाणार आहे.

वार आणि पाणी पुरवठा बंद असणारा भाग
सोमवार
बालाजीनगर : बालाजीनगर, श्रीहरी सोसयाटी, गुरूदत्त सोसायटी, साईकृपा सोसायटी, सर्वे नं २३, गुलमोहर सोसायटी, पवार हाॅस्पीटल परिसर
कात्रज : उत्कर्ष सोसायटी परिसर, गुजर वस्ती, कात्रज तलावा लगतचा पूर्व भाग, चौधरी गोठा
कोंढवा : साईनगर, गजानन महाराज नगर, शांतीनगर सोसायटी, महानंदा सोसायटी, सावंत काॅलनी, श्रीकृष्ण काॅलनी.

मंगळवार
सनसिटी : सनसिटी संपूर्ण, माणिकबाग, सनसिटी परिसर, समर्थ नगर, महालक्ष्मी सोसायटी, मधुकर हाॅस्पीटल परिसर, विठ्ठलवाडी, विठठलनगर
जुनी धायरी : संपूर्ण जुनी धायरी, उज्वल टेरेस, बारंगणी मळा, दळवीवाडी, पारी कंपनी रस्ता
कात्रज : राजस सोसायटी परिसर, निरंजन सोसायटी, कमला सिटी, स्टेट बॅंक सोसायटी, नवीन पोस्ट आॅफिसचा भाग
कोंढवा : कामठे पाटील नगर, खडीमशिन चौक, सिंहगड काॅलेज, हब टाऊन सोसायटी, कोलते पाटील सोसायटी, प्रभाग ३७

बुधवार
वडगाव हिंगणे : वडगाव बुद्रूक, वडगाव हिंगणे, पेरूची बाग, धावडी, जाधवनगर, वडगाव गावठाण, जाधवनगर, खोरड वस्ती, सुदत्त संकूल, समर्थ नगर, संतोष मागील परिसर, हिंगणे, महादेवनगर, आंनद विहार, राजीव गांधी वसाहत
कात्रज : वघजाईनगर, भांडेआळी, सुखदा-वरदा सोसायटी, सम्राट टाॅवर, आंबामाता मंदीर पाठीमागील परिसर. शिवशंभोनगर गल्ली १ , माऊलीनगर, सिल्वहर ओक सोसायटी, बलकवडे नगर
कोंढवा : सुखसागर नगर २, शिवशंभोनगर ( कात्रज- कोंढवा रस्ता) स्वामी समर्थ नगर

गुरुवार
धनकवडी : सर्वे नं. २,३ धनकवडी गावठाण, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, चित्तविहारी सोसायटी, अक्षयनगर, दौलतनगर, कलानगर, गुलाबनगर, चैतन्यनगर, सर्वे. नं. ३४,३५,३६,३७सह्याद्रीनगर, आदर्शनगर, प्रतिभानगर तळजाई पठार सर्व्हे नं.४,५,७,८, गणेशदत्त सोसायटी, टिळकनगर, सावरकर सोसायटी, आंबेडकर वसाहत, ग्रीन पार्क, अविष्कार सोसायटी, सन्मित्र सोसायटी, सागर सोसायटी, सहकारनगर भाग १, दाते बसस्टॉप
कात्रज : सुखसागरनगर भाग १, मॅजेस्टीक टॉवर, रोहितदास महाराज मठ, शिवशंभोनगर, स्वामी समर्थनगर (डोंगर भाग) निलया सोसायटी, महादेवनगर भाग – २.
कोंढवा : सावकाशनगर, काकडे वस्ती, शिवशंभोनगर (काकडे वस्तीचा भाग) गोकुळनगर (रस्त्याचा व डोंगर भाग), वृंदावननगर.

शुक्रवार
आंबेगाव पठार : आंबेगाव पठार सर्वे नं. १५ ते सर्वे नं. ३०, महाराणा प्रताप चौक, सर्वे नं. १७ ते दत्तनगर भुयारी मार्ग, चंद्रभागानगर, त्रिमूर्ती चौक, भारती विहार सोसायटी, भारती विद्यापीठ मागील संपूर्ण परिसर
कात्रज : वसवडेनगर, पोलीस कॉलनी, जाधवनगर, जोगेश्वरीनगर, मोरे-निंबाळकर वस्ती, भारतनगर, दत्तनगर.आगम मंदिर संतोषनगर अन्जलीनगर, दत्तनगर , जांभूळवाडी रस्ता, दत्तनगर, वंडर सिटी परिसर, साईनगर
कोंढवा: कोंढवा बु. (गावठाण), वटेश्वर मंदिर, भोलेनाथ फर्निचर, हिल व्यू सोसायटी, मरळ नगर, कांतिन अपार्टमेंट, विष्णू ठोसरनगर, कोंढवा बु. (भाऊ कामठे गल्ली) कपिलनगर, लक्ष्मीनगर संपूर्ण.आचल फार्म

शनिवार
कात्रज : , कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, अखील नवीन वसाहत कात्रज
कोंढवा : राजीवगांधी वसाहत संर्पूण, चैत्रबन वसाहत, कुष्णनगर, झांबरे वस्ती, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क, काकडेवस्ती गल्ली क्रमांक १ शिवशक्ती नगर, अशरफ नगर गल्ली क्रमांक ७,८ आणि ११


रविवार
कात्रज : महादेवनगर भाग १ , आनंद नगर, विद्या नगर, महावीर नगर
कोंढवा : शिवप्लाझा पिसोळी रस्ता, एच अॅड एम सोसायटी, पारगे नगर, १५ नंबर, आंबेडकर नगर संपूर्ण, पुण्यधाम आश्रम रस्ता,हगवणे नगर, अशरफ नगर पूर्ण

बांधकाम व्यावसायिकांसाठी गौणखनिज उत्खननाची परवानगी घेणे आवश्यक

पुणे, दि. 2: जिल्ह्यात सुरू असलेले विकास प्रकल्प व बांधकामांसाठी वाळू, खडी, मुरुम, दगड आदी बांधकाम साहित्य वापरताना महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन अधिनियम-२०१३ नुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

बांधकामांसाठी बांधकाम नकाशे व आराखडे मंजूर झाल्यानंतर बांधकामांच्या तळघर खोदाईकरिता उत्खनन व वाहतूक करावयाची असल्यास तसेच बांधकामासाठीही गौणखनिजाची आवश्यकता असल्यास अशी परवानगी घेणे आवश्यक आहे. ५०० ब्रासपर्यंत गौणखनिज उत्खनन व वाहतुकीची परवानगी देण्याचे अधिकार तहसिलदारांना असून उपविभागीय अधिकाऱ्यांना ५०१ ते २ हजार ब्रासपर्यंत आणि २ हजार १ ते २५ हजार ब्रासपर्यंतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत.

परवानगीसाठी https://mahakhanij.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत ऑटो डीसीआर प्रणाली ही महाखनिज प्रणालीशी एपीआयद्वारे जोडणी करण्यात आली असल्याने महानगरपालिका हद्दीतील प्रकल्पांसाठी पुन्हा कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
0000

आमदार बापूसाहेब पठारे यांचे आमरण उपोषण सुरु होताच..रस्त्याचे काम सुरु ..पण

काम पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेण्यास पठारे यांचा नकार

पुणे: लोहगाव–वाघोली मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या फॉरेस्ट पार्क व गोठण ओढा मार्गे जाणाऱ्या अवघ्या ३०० मीटर अपूर्ण रस्त्याच्या कामासाठी अखेर वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी आमरण उपोषणाची भूमिका घेतली. गेली ८-१० वर्षे या रस्त्याची मागणी होत होती. अपूर्ण रस्त्यामुळे दररोज नागरिक, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिका यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या रस्त्याची अवस्था इतकी खराब होती, की नागरिकांचे मणके मोडले, काही जणांचे अपघातात हातपाय मोडले असून हे चित्र प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे झाले असल्याचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी ठामपणे सांगितले.सदर पार्श्वभूमीवर २ मे रोजी सकाळी ८.३० वाजता आमदार पठारे यांनी प्रत्यक्ष त्या ३०० मीटर अपूर्ण रस्त्याच्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू झाले. उपोषणामुळे स्थानिकांमध्ये उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली. अनेक नागरिकांनी, स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला.

बापूसाहेब पठारे यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढताना स्पष्ट केले, की “गेली आठ-दहा वर्षे महापालिका अधिकारी या रस्त्याकडे बघायला तयार नाहीत. रस्त्याचे मालक स्वतः तयार असूनसुद्धा मोजणी, कागदपत्रे आणि कामाच्या अंमलबजावणीत प्रशासन कुचराई करतेय. डीपी रोड जोडले गेले नाहीत म्हणून मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होतेय, अपघात होताय, पण महापालिकेला त्याचे गांभीर्य नाही. फक्त ‘बघतो, करतो, होईल’ म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांकडे खऱ्या अर्थाने मानसिकता नाही,” अशी परखड टीका करत त्यांनी हे उपोषण लोकांच्या हक्कांसाठी आहे. यामध्ये कसलेही राजकारण नाही, हेही मांडले.उपोषणाच्या काही तासांतच पुणे महानगरपालिकेचे परिमंडळ १ उपआयुक्त राजेंद्र जगताप, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश भुतकर, पथविभागाचे कार्यकारी अभियंता संजय धारव आणि अन्य अभियंत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामास सुरुवातही केली.

मात्र, आमदार पठारे यांनी सुनावले, की “फक्त पाहणी किंवा प्रतिकात्मक पद्धतीची सुरुवात पुरेशी नाही. जोपर्यंत हा रस्ता पूर्ण होणार नाही, नागरिकांना प्रत्यक्ष डांबरीकरण झालेला, चालण्यायोग्य रस्ता मिळणार नाही, तोपर्यंत मी हे आमरण उपोषण थांबवणार नाही,” ही भूमिका घेतली.पठारे यांच्या आमरण उपोषणातून प्रशासनाच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वडगावशेरीसारख्या विकसित होत असलेल्या भागात अशा मूलभूत सुविधांसाठीही लोकप्रतिनिधींना रस्त्यावर उतरावे लागते, हे चित्र दुर्दैवी आहे. मात्र, नागरिकांच्या हक्कासाठी कुणी रस्त्यावर उतरले तर त्याची दखल घेतली जाते, हेही या उपोषणातून अधोरेखित झाले. रस्त्याचे काम सुरू झाले असले तरी ते वेळेत पूर्ण होणार का, याकडे आता संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.

पंकजा मुंडे यांना 25 वर्षीय तरुणाने पाठवले अश्लील मेसेज-कोठडीत रवानगी

पुणे–भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करून त्रास दिल्याच्या आरोपाखाली अमोल काळे या 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील रहिवासी असलेल्या या आरोपीने आपली चूक देखील मान्य केली आहे. आरोपीला आयटी कायद्याअंतर्गत पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात मुंबईच्या नरिमन पॉईंट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालयातील सोशल मीडिया समन्वयक म्हणून काम करणारे निखिल भामरे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. आरोपी अमोल काळे हा गेल्या काही दिवसांपासून मुंडे यांना कॉल आणि मेसेज द्वारे त्रास देत होता. त्यानंतर अखेर भामरे यांनी पोलिसांना तक्रार दिल्यानंतर काळे याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 78 आणि 79 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.

तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी काळे ज्या मोबाईल नंबरचा वापर करून कॉल करत होता, तो ट्रेस करत पोलिसांनी लोकेशन शोधून काढले. त्यावेळी ही व्यक्ती पुण्यातील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आरोपी अमोल काळे याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने पंकजा मुंडे यांना कॉल केल्याचे कबूल केले.

अमोल काळे हा एक विद्यार्थी असून पंकजा मुंडे यांना त्रास देण्यामागे त्याचा हेतू काय होता? याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. तसेच अमोल काळे हा मूळ बीड जिल्ह्यातील परळी या पंकजा मुंडे यांच्या मतदार संघातीलच रहिवासी असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

मानवी भावना, सुंदर अभिनय अन चांगले कथानक, असलेले चित्रपट प्रेक्षकांना भावतात

मुंबई, दि.२: देशात विविध भाषा, जाती, धर्माचे नागरिक राहतात. भाषा कुठलीही असो, चित्रपटात जर मानवी भाव-भावना, सहज सुंदर अभिनय आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले तर तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. भाषा, प्रेक्षक कोणतेही असले तरी तो भारतीय सिनेमा असतो हे महत्वाचे असल्याचे मत दाक्षिणात्य अभिनेते, अभिनेत्री यांनी व्यक्त केले.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये आयोजित ‘पॅन इंडियन सिनेमा माइथ ऑर मोमेंटम’ या विषयावर चर्चासत्र झाले. चर्चासत्रात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन, कारथी, अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सहभाग घेतला तर त्यांना नमन रामचंद्रन यांनी बोलते केले.

काही वेळा फक्त हिंदी कलाकार घेऊन किंवा सिनेमा डब करून तो पॅन-इंडिया ठरत नाही. कथेला सर्व भारतीय प्रेक्षकांनी समजून घ्यायला हवे, असाही सूर चर्चासत्रात उमटला.

श्रीमती खुशबू म्हणाल्या, आजच्या काळात प्रेक्षकांना भावणारी कथा वेगळी नसते तर तिची मांडणी वेगळी असते, साऊथ आणि हिंदी सिनेमात जास्त फरक नाही. विविध कलाकार साऊथमधून आले आणि हिंदी सिनेमात स्थिरच नाहीतर नावही कमावले. प्रादेशिक भाषेतील सिनेमाला वेगळे समजू नये, तोही भारतीय सिनेमा आहे.

नागार्जुन म्हणाले की, चित्रपटाची भाषा महत्वाची नसते, तर त्यामध्ये भारतीय संस्कृती आणि मानवी भावना यांचा स्पर्श असेल तर तो सिनेमा अधिक लोकप्रिय होतो. तो सिनेमा बॉलिवूड असो की टॉलिवूड फरक पडत नाही. विविध प्रादेशिक भाषेतील सिनेमांचे हिंदीमध्ये डबिंग झाले आहे, होत आहेत.

कारथी म्हणाले की, प्रामाणिकपणा हा कोणताही सिनेमा असो थोडा रंगवलेला असला तरी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. म्हणूनच प्रत्येक दिग्दर्शक यशस्वी होतोच असं नाही. पहिला चित्रपट प्रामाणिक असतो, त्यातला अभिनय स्वतःच्या अनुभवांवर आधारित असतो. त्यानंतर कलाकार त्याच भावनेची नक्कल करत राहतो आणि तेव्हा ते खोटं वाटायला लागतं.

अनुपम खेर म्हणाले की, आता कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ विविध भाषांमध्ये सहज काम करत आहेत. यामुळे प्रादेशिक भिंती कमी होत आहेत. मी तेलगू, तमिळमध्ये काम केले, मात्र हिंदीवर जास्त प्रेम आहे. दाक्षिणात्य सिनेमामध्ये कोविडनंतर खूप बदल पाहायला मिळतात, मात्र तो कोणत्याही भाषेतील असला तरी तो भारतीय सिनेमा म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. चित्रपट केवळ भारतापुरता मर्यादित न ठेवता जगभर पोहोचवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

हडपसर (पुणे) ते जोधपूर 3 मे, 2025 पासून नवीन एक्‍सप्रेस गाडी

पुणे, 2 मे 2025
पुणे विभाग, मध्य रेल्वेच्यातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि जोडणी वाढवण्यासाठी हडपसर (पुणे) – जोधपूर दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरु करण्यात येत आहे. या मार्गावर गाडी क्रमांक 01401 हडपसर (पुणे) – जोधपूर ही नवीन एक्सप्रेस गाडी पहिल्यांदाच दिनांक 03.05.2025 (शनिवार) ला धावेल. ही गाडी हडपसर (पुणे) येथून 17:30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 14:00 वाजता जोधपूर येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 01402 जोधपूर – हडपसर (पुणे) एकमार्ग टीओडी विशेष दिनांक 04.05.2025 (रविवार) ला धावेल. ही गाडी जोधपूर येथून 20:30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी 17:00 वाजता पुणे येथे पोहोचेल.

हडपसर (पुणे) येथून निघणा-या गाडीचे थांबे पुढील प्रमाणे असतील : चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सूरत, वडोदरा, अहमदाबाद, मेहसाणा, पालनपूर, आबू रोड, पिंडवाडा, जवाई बांध, फालना, राणी, मारवाड, पाली मारवाड, लूणी.

या एक्सप्रेस गाडीला 1 एसी 2-टियर, 4 एसी 3-टियर इकॉनॉमी, 5 स्लीपर क्लास, 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 जनरेटर कार, 1 सामान आणि गार्ड यासाठी ब्रेक व्हॅन असणार आहे.

आरक्षणाची सुविधा: गाडी क्रमांक 01401 साठी आरक्षण 02.05.2025 रोजी संध्याकाळी 16:00 वाजता सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरु होईल.

अनारक्षित कोचचे तिकीट ‘UTS App’ वरून सुपरफास्ट मेल/एक्सप्रेससाठी लागू असलेल्या दरामध्‍ये काढता येईल.

मुकेश अंबानी यांनी मांडली भारताच्या नेतृत्वातील जागतिक मनोरंजन विश्वाच्या क्रांतीची कल्पना

मुंबई,: दि.२ : भारत केवळ एक देश नाही ती कथांची एक अशी समाजव्यवस्था आहे, जिथे कथात्मक मांडणी ही एक जीवनशैलीच आहे,” असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी नुकतेच जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेतील भाषणात केले.

कथात्मक मांडणी ही भारतीय जीवनशैलीशी घट्टपणे विणलेली वीण असून, इथल्या महाकाव्यांपासून पौराणिक कथांपर्यंत, कथात्मक मांडणी हा भारताचा वारसा राहिला. आशय हा महत्वपूर्ण असून, चांगल्या कथांना कायमच बाजारपेठेत मोल मिळते. हे कालातीत तत्त्व असून, हेच जागतिक मनोरंजनाचा आधार आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी अंबानी यांनी भारत हा जगाच्या मनोरंजन उद्योग क्षेत्राचे मुख्य केंद्र बनणार असल्याची कल्पना उपस्थितांसमोर मांडली. आपल्या संबोधनातून त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनाची प्रेरणा देणार्‍या दृष्टिकोनाबाबत प्रशंसा केली तसेच वेव्हज शिखर परिषद ही याच भविष्याच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे गौरवोद्गारही काढले.

आपल्या भाषणातून अंबानी यांनी जागतिक संस्कृती आणि सर्जनशीलतेच्या क्षेत्रात भारताचा वाढत्या प्रभावावावरही शिक्कामोर्तब केले. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र ही भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ अर्थात राजकीय क्षेत्रापलीकडची सांस्कृतिक ताकद असल्याचे लोक म्हणतात, मात्र ही भारताची खरी ताकद असल्याचे आपण मानतो असे त्यांनी सांगितले.

श्री.अंबानी म्हणाले की, आकर्षक आशय मांडणी, गतिमान लोकसंख्याशास्त्र आणि तंत्रज्ञानात्मक नेतृत्व या तीन स्तंभांनी बळकट असलेल्या मनोरंजन क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी देश सज्ज आहे. भारताची डिजिटल क्रांती ही केवळ व्यापकतेची कथा नाही तर ती आकांक्षा, महत्त्वाकांक्षा आणि परिवर्तनाची कहाणी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
00000

बंदिश निर्गुण निराकार रागाची सगुण साकार मूर्ती : डॉ. माधुरी डोंगरे

गांधर्व महाविद्यालय, पुणे तर्फे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती गुरू गौरव पुरस्काराने सन्मान

पुणे : संगीत साधनेतून रागसंगीताचा ओढा वाढला त्यातून अध्यात्माशी जोडले गेले, त्या ध्यासातून स्वरांशी अनुसंधान साधत नवनिर्मितीचा आनंद घेतला. निर्गुण निराकार रागांची उपासना करणे अवघड आहे. बंदिशींच्या माध्यमातून या निर्गुण निराकार रागांची सगुण साकार मूर्ती तयार होते. नाद देवतेची भक्ती करताना भक्त वेगवेगळ्या भावातून, भूमिकेतून रचना साकारत असतो, असे प्रतिपादन शास्त्रीय गायिका, गुरू आणि प्रसिद्ध बंदिशरचनाकार डॉ. माधुरी डोंगरे यांनी केले.

भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर स्मृती गुरू गौरव पुरस्काराने डॉ. माधुरी डोंगरे यांचा गौरव करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. पुरस्काराचे वितरण जीएसटी आयुक्त दिनेश भोयर यांच्या हस्ते झाले. गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे यांची उपस्थिती होती. पुरस्काराचे स्वरूप भेटवस्तू आणि 21 हजार रुपये असे होते. डॉ. डोंगरे यांच्याशी मंजिरी जोशी यांनी संवाद साधला.

गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी महाविद्यालयाला दोन लाख रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच गुरुकुलातील विद्यार्थी मयुरेश गाडगीळ, सविता हेगडे, विजय तुळसकर, आर्यन देशपांडे यांना संवादिनी भेट दिली.

डॉ. डोंगरे म्हणाल्या, पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी दर्शविलेल्या वाटेवर चालण्याचा मी प्रयत्न केला आहे. गुरू पंडित विनायकबुवा पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या गांधर्व महाविद्यालयात सत्कार होत या विषयी कृतज्ञ आणि कृतार्थ आहे. माझ्यावर नाददेवतेचा कृपाआशीर्वाद कायम रहावा.

त्या पुढे म्हणाल्या, सहज मिळालेली संगीत कला सुलभ नाही, त्यासाठी रियाज करणे आवश्यक आहे. गुरू होणे सोपे नाही. मी स्वत:ला गुरू नव्हे तर शिक्षकाच्या भूमिकेत पाहते. शिक्षकाने विद्यार्थ्याला शास्त्रीय संगीताची गोडी लावणे हे अवघड काम आहे. गुरू म्हणजे तळमळ, त्याला विद्यार्थ्याच्या प्रगतीची तळमळ असणे आवश्यक आहे.

संगीत क्षेत्रात महाविद्यालयीन शिक्षण आवश्यक असून त्याने विद्यार्थ्याचा पाया पक्का होती. त्याची गाणे शिकण्याची तयारी होते. फ्युजन, ऑन लाईन शिक्षण, यू-ट्यूब ही काळाची गरज आहे. फ्युजनच्या क्षेत्रात सर्जनशीलतेने काम करताना अभिजाततेचा गाभा सुटता कामा नये. विद्यार्थ्याने शरणागत भावाने नाद देवतेची प्रार्थना करत राहणे आवश्यक आहे, असे डॉ. डोंगरे म्हणाल्या.

दिनेश भोयर म्हणाले, कलाकाराने अभिजात शास्त्रीय संगीतातील शुद्ध भाव जपावेत.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. डोंगरे यांनी रचलेल्या बंदिशी त्यांच्या शिष्या पौरवी साठे, रमा कुलकर्णी, गायत्री गोखले, कस्तुरी जोशी यांनी सादर केल्या. त्यांना पुष्कर महाजन (तबला), मीनल नांदेडकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेधा ढाके यांनी केले.

अमानोरा येस फाऊंडेशनचा रोटरीतर्फे गौरव

सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रातील कार्याची दखल
पुणे : पाणी बचतीसह आरोग्य, पर्यावरणीय उपक्रम तसेच कौशल्य विकासातून सामाजिक वृद्धी, महिला सशक्तीकरण आणि आदिवासी आश्रमशाळा अशा सामाजिक उपक्रमांसाठी भरीव योगदान देणाऱ्या अमानोरा येस फाऊंडेशनचा रोटरी इंटरनॅशलन डिस्ट्रिक्ट 3131च्या वतीने सीएसआर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
सामाजिक क्षेत्रात सकारात्मक आणि भरीव कार्यातून योगदान देत मूलभूत बदल घडविण्यासाठी नामांकित उद्योग समूहांचा गौरव करण्यात येतो. हयात रिजन्सी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक अर्थव्यवस्थेतील उल्लेखनीय सेवेबद्दल अमानोरा येस फाऊंडेशनचा गौरव करण्यात आला. फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी पुरस्कार स्वीकारला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शितल शहा यांच्यासह व्हाईस ॲडमिरल कमांडट (एनडीए) गुरुचरण सिंह, राकेश भार्गव, रवी कपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्यसेवा, पर्यावरण संवर्धन तसेच ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रातील सामाजिक उपक्रमांसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 52 आस्थापनांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला.
अमानोरा टाऊनशिप येथे पाणी बचतीचा संदेश देत पाण्याचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. निरोगी समाजाचे ध्येय मनात ठेऊन समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून येस फाऊंडेशनच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जातात. कौशल्य विकास साधल्यास सामाजिक वृद्धी होते या भावनेतून कौशल्य शिक्षणासोबतच सामुदायिक जाणीव निर्माण केली जाते. समाजातील विविध घटक आजही शिक्षणापासून वंचित राहिले आहेत या पैकी पारधी समाजातील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे या करीता यस फाऊंडेशनतर्फे खामगाव येथे सूर्येादय पारधी आश्रमशाळा दत्तक घेतली आहे. तसेच महिला सशक्तीकरण, क्षुधा-शांती योजना आणि सूर्योदय बालगृह देखील चालविले जाते. या कार्याची दखल घेऊन रोटरी इंटरनॅशलन डिस्ट्रिक्ट 3131तर्फे गौरव करण्यात आला आहे.
गुरुचरण सिंह म्हणाले, रोटरीच्या माध्यमातून विविध सामाजिक, लोकोपयोगी कार्ये निस्पृह भावनेने घडत आहेत. प्रास्ताविक मंजू फडके यांनी केले तर मोहन चौबेल यांनी आभार मानले.