Home Blog Page 3284

राजा परांजपे प्रोडक्शन्सचे नवीन नाटक रंगभूमीवर

0

ब्रँड बाजा बारात मधून उलघडणार लग्नाबद्दलच्या नव्या संकल्पना.

दोन पिढ्यांचा विचारसंकल्पना आणि भावना मांडणारे नाटक ब्रँड बाजा बारात

 पुणे-राजा परांजपे प्रोडक्शन्सचे नवीन दोन अंकी नाटक अर्थात ब्रंड बाजा बारात रंगभूमीवर आले आहे. १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंच येथे ह्या नाटकाचे सादरीकरण होईल. आणि १५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता शिवाजी नाट्य मंदिर, दादर, मुंबई येथे देखील नाटकाचे सादरीकरण होईल. लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची घटना असते. “अरे, असा वागशील तर कोणी मुलगी कशी देईल?” “झालीस न आता २५ ची लाडू कधी मग आता?”, “इकडेच अशी वागशील तर सासरी काय करणार?” हे आणि असे काही संवाद आपण आजूबाजूला नेहमीच ऐकतो. लग्न हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो.

पण ज्याप्रमाणे काळ बदलतो त्याच प्रमाणे पद्धतीपण बदलतात. आजकाल प्रत्येक गोष्टींचे सोहळ्यात रूपांतर होत आहे. त्यातून लग्न ह्या संस्काराचेही आजकाल ब्रंडिंग होऊ लागले आहे. मग पंगतीचे बुफे मध्ये रुपांतर होणे असेल किंवा आमंत्रण पत्रिकांचे व्हाट्स एप इन्विटेशन होणे, हे सगळे त्याचेच प्रकार. कालानुरूप काही गोष्टी बदलतात. पुढची पिढी कालानुरूप स्वतःत बदल घडवत जाते पण जुनी पिढी मात्र काही गोष्टी संस्कार भावना म्हणून धरून ठेवतात आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीत सुवर्णमध्य काढून दोन्हीपिढ्या एकमेकांचा हात हातात घेऊन सुखाने नांदतात. याच धर्तीवर आधारित आहे, हे नवीन नाटक ब्रंड बाजा बारात. ‘अंकुर’, ‘आम्ही मराठी’ अशी आशयघन नाटके देणाऱ्या लेखक दिग्दर्शक जोडगोळीने हे नवीन नाटक रसिकांसमोर आणले आहे. लेखक अक्षय जोशी याने लिहिलेले हे नाटक दिग्दर्शक अर्चना राणे यांच्या संकल्पनांवर आधारित आहे.

एक मुलगी आणि तिच्या वडिलांमधील निखळ संवाद म्हणजे हे नाटक. पुढे काय होणार हा विचार प्रेक्षकांना करायला लावत हे नाटक पुढे सरकते. दोन पिढ्यांच्या विचारधारा, स्पष्ट मते ती मांडताना असणारे दुसर्या पिढीबद्दलचे प्रेम, भावनिक नातेसंबंध ह्या नाटकातून मांडण्यात आले आहे. मुलीचे लग्न हा प्रत्येक बापासाठी अत्यंत महत्वाचा विचार असतो. बर्याचदा मुलीने विशी गाठली कि प्रत्येक बापाचे त्याअनुशंघाने प्लॉनिंग सुरु होते आणि खऱ्या अर्थाने भावनिक उहापोह देखील सुरु होतो. मुलीचे देखील त्यासंबंधी वेगेळे विचार सुरु होतात. नव्या पिढीकडे असलेली विचारांची स्पष्टता बर्याचदा काही गोष्टी सोयीस्कर करून टाकतात. दोनही पिढ्यांचे विचार समाजातील होत जाणारे बदल अधोरेखित करत शेवट गोड करून प्रेक्षकांची निखळ करमणूक करतात. रंगमंच्यावर बाप लेकीची जुगलबंदी सादर करणारे कलावंत आहेत श्रुती अत्रे आणि अतुल कासवा. श्रुती अत्रे हिला आजवर आपण झी युवाच्या बनमस्का या मालिकेतून पाहिले आहे तर अतुल कासवा यांनी आजवर झी मराठीच्या उंच माझा झोका दिल दोस्ती दुनियादारी तसेच सोनीच्या क्राईम पेट्रोल स्टार प्रवाहाच्या नकुशी अश्या कार्यक्रमातून पाहत आलो आहोत.

साधारण लग्नाळू मुलींच्या बापाला जी शंका येऊ लागते कि ‘हिचे कुठेतरी जमले आहे’ या संशयाने नाटकाची सुरुवात होते. आणि तिच्याकडून माहिती घेत असताना बाप स्वतःची देखील कहाणी सांगू लागतो. बाबांच्या वेळची हूरहूर, रुसवा, नातेसंबंध याविषयी बाबा सांगू लागतात आणि हे प्रसंग रसिकांसमोर फ्लॉशबॅक तंत्राने येतात आणि ह्या गोष्ट प्रेक्षकांना त्यांच्या आठवणींशी जोडतात. संगीत ही कला प्रत्येकाला भावते, या नाटकात असणारी गाणी नेमके हेच उद्दिष्ट साध्य करतात, आणि ते उत्तम सादर करण्याचे काम पार पडतात आजच्या पिढीतील सुरेल गायक धवल चांदवडकर आणि रमा कुलकर्णी. शास्त्रीय रागदारीत असलेली गाणी असल्याने तरुण पिढी संगीत नाटकापासून लांब जात असताना, त्यांना आवडणारे संगीत नाटकात आणून त्यांनाही या कार्यक्रमाशी जोडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अर्चना राणे यांनी केलेला आहे. तर या गाण्यांवर उत्तम सादरीकरण बसवण्याची कामगिरी पडली आहे ती अनघा हरकरे आणि पायल जाधव यांनी. कधी कल्पना, कधी भूतकाळातील प्रसंग कधी उद्विग्न भावना तर कधी प्रेमळ अनुभव अश्या भावनांना त्यांनी रसिकांसमोर आणले आहे. त्यास पार्थ राणे, अमेय बर्वे, अनघा हरकरे आणि पायल जाधव यांनी उत्तम साथ दिली आहे. तसेच तांत्रिक गोष्टींसाठी नेपथ्य सुरेश चौधरी अजिंक्य माने, संगीत संयोजन अजिंक्य माने, प्रकाश योजना सचिन लेले, ध्वनी निलेश यादव यांनी साथ दिलेली आहे.

एकूणच, एक उत्तम कलाकृतीची निर्मिती अर्चना राणे यांनी राजा परांजपे प्रोडक्शन्स च्या माध्यमातून निर्मिली आहे. तसेच या नाटकाला महाराष्ट्र शासनाचे व्यावसायिक नाटकासाठीचे अनुदानही नुकतेच जाहीर झाले आहे. म्हणजेच समीक्षकांनीही यास त्यांची पोचपावती दिलेली आहे. सदर नाटकाचे प्रयोग आता महाराष्ट्रात चालू असून रसिकांनी त्यांच्या पसंतीची पोचपावती दिलेली आहे. रसिकांनी त्याच्या प्रयोगांना हजर राहून एका चांगल्या आणि टवटवीत कलाकृतीचा अनुभव घ्यावा असे आवाहन दिग्दर्शिका अर्चना राणे यांच्याकडून करण्यात आले आहे.

व्होडाफोनतर्फे कॅम्पस सर्व्हायव्हल किट- 1 जीबी प्रतिदिन डेटा आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा

0

पुणे-
आपले खर्च मर्यादित रकमेत भागवणे, ही प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी एक मोठी कसरत असते. या कसरतीला
सामोरे जाण्यासाठी स्पर्धेच्या युगात व्होडाफोन इंडियाने व्होडाफोन कॅम्पस सर्व्हायव्हल किट ही एक स्मार्ट योजना सादर केली असून,त्यामध्ये आपल्या मित्रांबरोबर, तसेच कुटुंबाबरोबर सातत्याने संपर्कात राहण्यासाठी अमर्याद कॉलिंग आणि प्रतिदिन 1 जीबी डेटा अशी सुविधा मिळणार आहे. विशेष योजनांची माहिती देणारी एक पुस्तिकाही प्रत्येक किटबरोबर मिळणार आहे.
व्होडाफोन कॅम्पस सर्व्हायव्हल किटची घोषणा करताना, व्होडाफोन इंडियाच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे
व्यवसाय प्रमुख आशिष चंद्रा म्हणाले, ‘कॉलेज जीवनाची सुरुवात ही युवकांसाठी संधी आणि अनुभवांचे जग खुले करत
असते. त्यांना नव्याने सापडलेले त्यांचे स्वातंत्र्य या संधी शोधण्यासाठी वापरायचे असते, पण मर्यादित पॉकेट मनीमध्ये ते
आव्हानात्मक बनून जाते. हे आव्हान पार करण्यासाठी आणि साधनसमृद्ध, तसेच परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी ते अनेक
मार्ग शोधत असतात. कॅम्पस सर्व्हायव्हल किट हा असा उपक्रम आहे, जो त्यांना टेलको आणि नॉन-टेलको योजनांनी
सुसज्ज करतो.’
या मोहिमेचा एक भाग म्हणून व्होडाफोनने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या
मर्यादित पॉकेट मनीमध्ये कॅम्पस जीवनाचा पुरेपूर आनंद कसा घेऊ शकतील, याबाबतचा तो व्हिडिओ
(https://youtu.be/eRQqkj8mVhk) आहे. तुमचा खिसा पूर्ण रिकामा न करताही कॅम्पस जीवन अधिक मजेदार कसे
करता येईल, याबाबतच्या काही रोचक क्लृप्त्या पाठविण्याचे आवाहनही व्होडाफोन करत आहे. या व्हिडिओवरील कमेंट
म्हणूनही या क्लृप्त्या शेअर करू शकता येतील. त्यातील अधिकाधिक रोचक क्लृप्त्यांचा अन्य एका व्हिडिओमध्ये समावेश
करण्यात येईल.

पुणे महापालिकेला धरणातील हवे 2.95 द.ल.घ.मी.पाणी …

0

पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली

कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

पुणे-खडकवासला, चासकमान व पवना प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक येथील विधान भवनात अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस खा. सुप्रिया सुळे, आ. अजित पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, आ. दत्तात्रय भरणे, आ. बाळा भेगडे, आ. बापू पाचर्णे, आ. भिमराव तापकीर, आ. सुरेश गोरे, जिल्हाधिकारी सौरभ राव, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर , पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, सिंचन विभागाचे अधीक्षक   अभियंता चोपडे आदि अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्ह्यातील खडकवासला, चासकमान व पवना प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना शेतीसाठी व शहरातील लोकांना पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करा अशा सूचना पालकमंत्री  बापट यांनी सिंचन विभागाला दिल्या.

खडकवासला प्रकल्पांतर्गत पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला ही धरणे येतात. खडकवासला प्रकल्पांतर्गत सिंचनासाठी 25 हजार हेक्टर क्षेत्र तर अनुज्ञेय पाणीवापर 5.46 द.ल.घ.मी. आहे. जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना वरवंड व शिर्सुफळ तलाव भरण्यासाठी 0.28 द.ल.घ.मी. , दौंड, इंदापूर नगरपालिकेतील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी 0.14 द.ल.घ.मी., पुणे महानगरपालिकेसाठी 2.95 द.ल.घ.मी.पाणी आवश्यक असल्याची माहिती  बैठकीत देण्यात आली.  बैठकीला जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आंदोलकांचां अवमान केल्याची तक्रार ….

0

पुणे- पॅनकार्ड क्लब कंपनीच्या गुंतवणुकदारांसाठी सुरु असलेल्या खासदाराच्या घराबाहेर आंदोलन या संकल्पनेलाच  विरोध करीत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आंदोलकांना झिडकारून लावले आणि अशी आंदोलने होता कामा नये याबाबत पोलीस आयुक्तांना आदेश देतो असे सांगून  त्यांनी आंदोलकांचा अवमान केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे .तर दुसरीकडे मात्र खासदार अनिल शिरोळे आणि सध्या भाजपवासी झालेले खासदार संजय काकडे यांनी मात्र आंदोलकांशी चर्चा करून प्रश्न समजावून घेत याबाबत अर्थमंत्रालयाकडे पाठपुरावा सुरु केल्याचे दाखवून दिले आहे .शहरात विविध प्रश्नांना आता विविध स्तरावरून अशा जातीय वर्तुणूकीतून पाहिले जाऊ लागल्याचे गंभीर चित्र दिसून येवू लागले आहे .

राष्ट्रशक्तीचे माऊली दारवटकर यांनी जावडेकरांनी दिलेली वागणूक चव्हाट्यावर मांडली आहे . याबाबत मंत्री जावडेकर यांच्याशी त्यांची बाजू समजून घेण्यासाठी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही .दरम्यान या प्रकरणी  राष्ट्रशक्तीचे माऊली दारवटकर यांनी म्हटले आहे कि,पॅनकार्ड क्लब कंपनीच्या गुंतवणुकदारांचा आक्रोश पुण्यातील सर्व खासदारांच्या घराबाहेर घंटानाद आंदोलनाने मांडण्यात आला …खासदार वंदना चव्हाण,खा.अनिल शिरोळे,खा.संजय काकडे यांनी गुंतवणुकदारांशी चर्चा करून त्यांना दिलासा दिला.या ऊपरोक्त खा.संजय काकडे यांनी या पुर्वी दिलेल्या पहिल्या निवेदना नंतर लगेचच अर्थमंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केल्याचे पत्र दिले..तर अर्थमंत्री अरूण जेठली यांचा पुण्यातला दौरा असल्याने निवेदन मिळाल्यावर लगेचच दुपारी खा. शिरोळे यांनी त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करून लवकर तोडगा काढण्याची विनंती केली..तर खा.सुप्रीयाताई सुळे यांनी या पुर्वीच या विषयाचा पाठपुरावा सुरू केला आहे..मात्र मणुष्यबळ विकासमंत्रीपद बक्षिस म्हणुन मिळालेल्या खा.जावडेकर यांनी मात्र..आंदोलकांना निराश केले… या संघसेवकाने अशी आंदोलने थांबवण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना देतो असे उद्दाम पणे  सांगीतले…विशेष म्हणजे त्यांना या आंदोलनाची पुर्वसुचना दिलेली असतानाही मला माहीतीच नाही अशी भुमीका त्यांनी घेतली…त्यावर त्यांना त्यांच्या घरी देण्यात आलेले निवेदनाची पोच दाखवताच त्यांनी “आता घरच्यांनाही अशी निवेदने न स्विकारण्याची सुचना देतो” असे ही सांगीतले..त्या नंतर संतप्त गुंतवणुकदारांनी प्रचंड घोषणा देत जावडेकर यांचा  निषेध नोंदवत ठिय्या आंदोलन केले…माऊली दारवटकर यांनी असे ही म्हटले आहे कि,कदाचित गुरूजी पितृपक्षात अशी निवेदने घेत नसावेत.. आता राज्यातल्या प्रत्येक मेळाव्यात व आंदोलनात गुरूजीचा निषेध करूनच आमची सुरूवात होईल.

 

नातीला शनवार वाडा दाखवुन केंद्रीय मंत्री जावडेकरांनी केला ‘ग्रंँड पेरेंटन्स डे’ संपन्न (पहा फोटोज)

0

पुणे-‘ग्रंड पेरेंटन्स डे’चे औचित्य साधून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज (१० सप्टेंबर) त्यांची नात आरोही हिच्या समवेत शनिवारवाडा, लाल महाल आणि विश्रामबागवाड्याला भेट दिली. यावेळी श्री जावडेकर यांनी या ऐतिहासिक स्थळांचा इतिहास व महत्व नातीला समजावून सांगितले.
आजी-आजोबांचे जीवनात अनन्यसाधारण महत्व असते. ते नातवंडांची काळजी घेतच असतात. नातवंडांना आजी-आजोबांचे पाठबळ महत्वाचे असते. आपल्याला मिळालेली जबाबदारी अधिक सजगपणे पार पाडण्याची आवश्यकता असल्याचे मत श्री. जावडेकर यांनी व्यक्त केले.

 

 

 

आंबेडकरी संघटनांना नक्षलवादी ठरविणाऱ्या खासदार अमर साबळे यांच्याविरोधात ” जोडे मारो आंदोलन “

0

पुणे-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बोलाविलेल्या खासदारांच्या बैठकीत खासदार अमर साबळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात आंबेडकरी संघटनांना नक्षलवादी मदत करीत असून आंबेडकरी चळवळीतील एक नेते यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असून ते सतत भाजप विरोधात प्रचार करतात अशा प्रकारचे बेजाबदार व बेताल वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण आंबेडकरी चळवळीत त्यांच्याबद्दल चीड व असंतोष निर्माण झाला आहे . या निषेधार्थ भीम आर्मी पुणे शहर शाखेच्यावतीने जिल्हाप्रमुख दत्ता पोळ यांच्या नेर्तृत्वाखाली बालगंधर्व चौकात  ” जोडे मारो आंदोलन ”  करण्यात आले .

वास्तविक खासदार अमर साबळे हे दलित जरी असले त्यांचा सामाजिक जन्मच संघ शाखेच्या विचारधारेत झाला असल्याने त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ , आंदोलने आणि समाजाचे प्रश्न याबाबत ते अज्ञभिज्ञ आहेत . जात्यांध धर्मांध व संविधान विरोधी विचार प्रवाहाचा पगडा त्यांच्यावर असल्याने अशा प्रकारचे बेअक्कल विधान तेच करू शकतात .

त्यांच्या अशा आरोपांच्या प्रकारच्या आरोपामुळे बाबासाहेबाना स्वातंत्र्य , समता व बंधुतेचा विचार पुढे घेउन जाणाऱ्या समस्त आंबेडकरी चळवळीचा अपमान झाला असून त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी या विषयी पुरावे द्यावेत अन्यथा त्यांना आंबेडकरी तरुणाच्या रोषाचा सामना करावा लागेल . बाबासाहेबाची चळवळ बदनाम करून दलित तरुणांना नक्षलवादी ठरवून त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याची भाजप , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यासारख्या संघटनाची नियोजनबध्द योजना आहे . त्याचाच एक भाग म्हणून अमर साबळे यांच्या सारखा प्रामाणिक स्वयंसेवक अशा प्रकारची विधाने करीत आहे . त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तांना भीम आर्मी पुणे शहर जिल्हा शाखेच्या वतीने लेखी तक्रार सुध्दा देण्यात आली आहे .

भीम आर्मी या विधानाचा तीव्र निषेध करीत असून अमर साबळे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी या संदर्भात पुरावे द्यावेत असे जाहीर आवाहन भीम आर्मीच्यावतीने करण्यात आले आहे .

या आंदोलनात आंबेडकरी चळवळीतील नेते कृष्णा कांबळे , आबा सावंत , शरद घोडके , प्रदीप कांबळे , प्रकाश निंबाळकर , शब्बीर तांबोळी , बाळासाहेब लालसरे , सुनील बेंगळी , मुकेश गायकवाड , संदीप शिंदे , महादेव खळगे , प्रिती पिल्ले , अप्प्पा आखाडे , श्रीकांत शेडगे , दीपक बलाढे, बळीराम शेजवळ , सदा देवनार , बाळासाहेब गायकवाड , करण गायकवाड , दलितानंद तांदळे , हुसेन राजनाळ , विवेक सावंत , धनंजय लोहार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .

‘आरोग्‍याचा चातुर्मास’ ही अभिनव संकल्पना – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

पुणे- ‘आरोग्‍याचा चातुर्मास’ ही अभिनव संकल्पना असून ‍या माध्‍यमातून प्रत्‍येक व्‍यक्‍तीपर्यंत आरोग्‍य सुविधा मोफत पोहोचवण्‍यात आली आहे. आमदार विजय काळे यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्‍पद असून असे उपक्रम राज्‍यभरात राबविण्‍यात यावेत, असे आवाहन  मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बोपोडी येथील डॉ. राजेंद्रप्रसाद विद्यामंदिर येथे  महिलांसाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या  मोफत आरोग्‍य तपासणी शिबीरास मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस यांनी  भेट देऊन पहाणी केली.  त्‍यानंतर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्‍याय राज्‍य मंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, सुरेश कांबळे, आदित्‍य माळवे, कमलेश चासकर, अभय सावंत, कार्तिकी हिवरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस म्‍हणाले, नागरिकांना आरोग्‍यविषयक सुविधा देण्‍यासाठी शासन प्राधान्‍य देत असून  शासनाच्‍या आरोग्‍यविषयक विविध योजनांमधून कर्करोग, ह्दयरोग यासारख्‍या दुर्धर आजारांवर मोफत शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या आहेत.  आतापर्यंत सुमारे 20 हजार रुग्‍णांवर अशा प्रकारच्‍या शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या आहेत. ‘आरोग्‍याचा चातुर्मास’ ही नवीन संकल्‍पना असून या संकल्‍पनेमध्‍ये केवळ आरोग्‍य तपासणीच होत नाही तर आवश्‍यकता भासल्‍यास शस्‍त्रक्रिया केली जाणार आहे. शासनाच्‍या विविध आरोग्‍यविषयक योजना तसेच मुख्‍यमंत्री सहायता निधीतून या उपक्रमासाठी  आवश्‍यक ती मदत करण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.

आमदार विजय काळे यांनी आरोग्‍य शिबीराच्‍या आयोजनामागचा हेतू विशद केला. ते म्‍हणाले, आजच्‍या शिबीरात आतापर्यंत 900 महिलांची आरोग्‍य तपासणी करण्‍यात आली असून  सायंकाळपर्यंत 2 हजार महिलांची तपासणी होईल. शहरात अन्‍य ठिकाणीही  अशाच प्रकारची आरोग्‍य तपासणी शिबीरे आयोजित करण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

कार्यक्रमास महिलांसह इतर नागरिक, पदाधिकारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

योगी आदित्यनाथ यांची कट्टर हिंदुत्वादी प्रतिमा चुकीची –शांतनु गुप्ता

0

पुणे-उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकसभेतील कारकीर्द, कामकाजातील विविध विषयातील चर्चेतील सहभाग आणि त्यांचे कार्य बघता राजकारणातील कट्टर हिंदुत्वादी ही त्यांची प्रतिमा चुकीची असल्याचे मत योगी आदित्यनाथ यांच्या जीवना चरित्रावरील ‘द मॉन्क हू बिकेम चीफ मिनिस्टर’ या पुस्तकाचे लेखक शांतनु गुप्ता यांनी व्यक्त केले. पुण्यातील यशदा येथे आयोजित पाचव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टीव्हलमध्ये शांतनू गुप्ता यांची लेखक शेफाली वैद्य यांनी मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी वैद्य यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.

गुप्ता म्हणाले, तरुणांनी राजकारणात यावे असे आपण नेहेमी म्हणतो. योगी आदित्यनाथ हे ४४ वर्षांचे तरुण मुख्यमंत्री आहेत. त्यांचा लोकसभेतील अनुभव २० वर्षांचा आहे. त्यांनी विविध विषयांवर चर्चेत सहभाग घेतला आहे. त्यांची उपस्थिती, प्रश्न विचारणे हे राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट आहे. गेल्या ३ वर्षात तर आपले सरकार असताना त्यांनी मानव विकास निर्देशांक, युपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न, पिक विमा, सौर उर्जा, भारत –चीन संबंध विविध विषयांवरचे सुमारे ३०० प्रश्न विचारले आहेत. त्यांनी विचारलेले प्रश्न हे ९५ टक्के हे विविध समस्या आणि विकासाच्या बाबतीतले आहेत तर ५ टक्के हे सांस्कृतिक विषयातील आहेत. त्यामुळे त्यांची राजकारणातील कट्टर हिंदुत्ववादी ही प्रतिमा जी तयार केली आहे ती चुकीची आहे.

भाजपाचा इतिहास बघ
ता लोकप्रिय आणि क्षमता असलेल्या व्यक्तीला सर्वोच्च पदाचा मान देते हे भाजपचे नेते लालकृष्ण अडवानी, पंतप्रधान मोदी यांच्या उदाहरणावरून लक्षात येते असे सांगून गुप्ता म्हणाले, इतर नेते असताना योगी आदित्यनाथ यांनाच मुख्यमंत्री का केले हे आपल्या लक्षात येते. त्यांच्या लोकप्रियतेचे दाखले देताना ते म्हणाले, त्यांच्या मठामध्ये जनता दरबार पूर्वीपासून भरला जातो. उत्तर प्रदेशात नेताजींचे (मुलायमसिंग) यांचे सरकार असो वा बहनजींचे ( मायावती) योगी आदित्यनाथ यांच्या चिठ्ठीने कामे होतात ही सर्वसामान्य लोकांची भावना आहे. त्यांच्याकडे कोणी टेंडर पास करण्यासाठी जात नाहीत तर पेन्शन, शेती अशा प्रश्नांसंदर्भात लोक जातात. त्यांच्या चिठ्ठीने त्यांची कामे होतात म्हणून लोक त्याला ‘जादू की चिठ्ठी’ असे म्हणतात असे गुप्त यांनी सांगितले. त्यांच्या मठामध्ये २२ संस्था आहेत आणि ५५,००० विद्यार्थी आहेत. या दृष्टीने योगी आदित्यनाथ यांच्याकडे पहिले जावे अशी अपेक्षा गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केली.

वैदिक धर्म अल्पसंख्यंकच!- सोनवणी

0
पुणे: भारतातील वैदिक ब्राह्मण समाजाला अल्पसंख्यांक धर्माचा दर्जा मिळावा ही मागणी विश्व ब्राह्मण संघटना तसेच पूर्वोत्तर बहुभाषिक ब्राह्मण महासभेने राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाकडे केली आहे. या मागणीला आदिम हिंदू परिषदेचा पाठिंबा असून आयोगाने ही मागणी नाकारण्याचे कोणतेही संयुक्त कारण नाही असे अध्यक्ष संजय सोनवणी यांनी म्हटले आहे. वैदिक धर्म हा सुरुवातीपासून ते आजतागायत स्वतंत्र धर्म असून त्या धर्मातील धर्मग्रंथांच्या पठणाचे ते वेदोक्त कर्मकांडांचे अधिकार फक्त वैदिक लोकांना असतात. हिंदुंना ते अधिकारच नसल्याने वैदिक धर्म हा हिंदू धर्माचा भाग होऊ शकत नाही. वैदिक धर्मियांचे धर्मजीवन पुर्णतया स्वतंत्र आहे. त्यामुळे वैदिक हे हिंदू धर्माचे अविभाज्य भाग असल्याचे आयोगाचे निरिक्षण चुकीचे आहे असेही सोनवणी म्हणाले.
राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाकडे दोन संघटनांची मागणी केंद्रानेच शिफारशींसाठी पाठवली होती. भारतातील अल्पसंख्यंक धर्मांत आधीच बौद्ध, जैन, शिखादि धर्म सामील आहेत. अल्पसंख्यंक धर्माचा दर्जा दिल्यावर त्यांना विशेष सवलती देण्यात येतात. वैदिक धर्मालाही हा दर्जा दिला तर हिंदू धर्मात फूट पडेल हा आयोगाचा दावा हास्यास्पद असल्याचे सांगून सोनवणी म्हणाले की आपण हिंदू आहोत हेच मुळात वैदिक धर्मियांना मान्य नसता व वैदिक-वैदिकेतर वाद हा भारतात गेली हजार वर्ष जीवंत असतांना दोघांनाही एकधर्मीय समजणे ही आयोगाची चूक आहे. या संदर्भात आपण अल्पसंख्यंक आयोगाला सविस्तर पत्र लिहिणार असून त्यात विश्व ब्राह्मण संघटना तसेच पूर्वोत्तर बहुभाषिक ब्राह्मण महासभेच्या मागणीला पाठिंबा देत हे दोन धर्म कसे मुलत: वेगळे आहेत याचे पुरावे सादर करणार आहोत असेही संजय सोनवणी यांनी सांगितले.

स्वस्त धान्य दुकानात मिळणार गॅस सिलेंडर

0

मुंबई – आता स्वस्त धान्य दुकानांमधून पाच किलोचे गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याशिवाय खुल्या बाजारात रॉकेलची विक्री करण्यासचीही परवानगी दिली आहे. अशी माहिती अन्न औषध व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागमंत्री गिरीश बापट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

शिधापत्रिकेवर वाटपासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला रॉकेलचा पुरवठा केला जातो. त्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने रॉकेलच्या अनुदानात कपात केली आहे. तसेच राज्य सरकारला मंजूर करण्यात येणाऱ्या दर महिन्यांच्या कोट्यातही कपात करण्यात आली आहे. परिणामी स्वस्त धान्य दुकानदारांना राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून दरमहा होणारा पुरवठा कमी झाला आहे.

 

स्वयंपाक आणि दिवाबत्ती व्यतिरिक्त अन्य कामांसाठी रॉकेलचा वापर करण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अनुदानित रॉकेलवरील ताण कमी करण्यासाठी आणि वाढत्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी खुल्या  बाजारात रॉकेलची विक्री करण्यास स्वस्त धान्य दुकानदारांना परवानगी देण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू होता. त्यानुसार या दुकानदारांना रॉकेल आणि सिलिंडरची विक्री करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारने  घेतला आहे. त्यामुळे खुल्या बाजारात रॉकेलसह पाच किलो वजनाचे सिलिंडरची विक्री करणे या दुकानदारांना आता शक्‍य होणार आहे. यासाठी काही घाऊक पुरवठादार म्हणजेच एसकेओ एजंट्‌स यांनी रेशन दुकानदारांना या वस्तु पुरविण्याची तयारी दर्शविली. ऑइल कंपन्यांकडून निश्‍चित करण्यात आलेल्या निकष व मार्गदर्शक सूचना पूर्ण करणाऱ्यांना रॉकेलचा पुरवठा करण्यात येणार आहे. असं श्री बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

सहकारातील चांगल्या संस्थाच्या मागे सरकार ठामपणे उभे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

पुणे दि. १० : राज्यातील ११ हजार विविध कार्यकारी संस्थांना पुनर्जीवित करुन सहकार समाजाच्या तळापर्यंत नेण्यासाठी सरकारचे काम सुरू आहे. सहकार क्षेत्रातील अपप्रवृत्तींवर अंकुश लावण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली असली तरी सहकारातील चांगल्या संस्थांच्यामागे सरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाही देत येत्या ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

 

            येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात श्री. देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार उपस्थित होते. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री गिरीष बापट, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार वंदना चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव एस. एस. संधू, बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक राजेंद्र कुलकर्णी, कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह, सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय भोसले उपस्थित होते.

 

            देवेंद्र फडणवीस म्हणाले, आर्थिक संकटात अडकलेला शेतकरी आत्महत्येकडे वळतो अशा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्याचे काम सहकारी संस्था करत असतात. राज्यातील ४४ लाख शेतकरी संस्थात्मक कर्ज घेण्यास अपात्र होते. अशा शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देऊन त्यांना संस्थात्मक कर्जास पात्र करण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आखली आहे. या कर्जमाफी योजनेत थकीत कर्जदाराबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ होणार आहे. मात्र, ही कर्जमाफी करताना चुकीच्या आणि अपात्र लोकांना कर्जमाफी मिळू नये यासाठी ऑनलाईन अर्जांची प्रक्रिया करण्यात आली आहे. राज्यभरातून ऑनलाईन कर्जमाफी प्रक्रीयेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही ऑनलाईन कर्जमाफीचे अर्ज स्वीकारण्यात आघाडीवर आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करून त्यांची दिवाळी गोड करण्याचे काम सरकार करणार आहे.

 

            कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या उत्थानाचा उपाय नाही. त्यासाठी शेतीमधील गुंतवणूक वाढविण्याची गरज आहे. शेतीमधील गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला दर देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने सरकार पावले उचलत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सावकारांच्या पाशातून मुक्ती मिळविण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्यात आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी आणण्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मोठा वाटा आहे. माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लेस कॅशसह कॅश लेसचे स्वप्न साकारण्यासाठी हे उपयुक्त आहे.

 

केंद्रीय मंत्री अरुण जेटली म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात जागतिक स्तरावर सुरु असणाऱ्या पहिल्या महायुद्धाच्या कालावधीत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली. अशा कठीण काळात सुरु झालेल्या बँकेचे काम योग्य नियोजनामुळे चांगल्या प्रकारे सुरु आहे. या यशस्वीतेमागे संस्थेचा सचोटीचा व्यवहार कारणीभूत आहे. शेतकऱ्यांना कमी व्याजदराने पैसे देण्याचे काम या बँकेने केले आहे.

 

देशातील ग्रामीण भागांना रस्त्यांनी जोडण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने हाती घेतले आहे. त्याचबरोबर प्रत्येक घरात वीज पोहोचविण्याच्या कामालाही प्राधान्य देण्यात आले आहे. देशातील ५५ टक्के जनता ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. सिंचन व्यवस्था हीच कृषी क्षेत्रासमोरील प्रमुख समस्या आहे. या सिंचन क्षेत्रावर केंद्र व राज्य सरकार अधिक खर्च करत असून सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.

 

पद्मभूषण शरद पवारांचे काम हे राजकारण्याच्या पलीकडचे असून त्यांनी कायमच देशहिताला प्राधान्य दिले आहे. शेती आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचे योगदान मोठे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे काम चांगल्या प्रकारे सुरु असल्याचे श्री. जेटली यांनी सांगितले.

 

            श्री. शरद पवार म्हणाले, लोकमान्य टिळकांचे अनुयायी न. चि. केळकर यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना केली. धनंजयराव गाडगीळांसारख्या मोठ्या व्यक्तींचे नेतृत्त्व या बँकेला लाभले. त्यामुळे या बँकेची वाटचाल योग्य प्रकारे सुरु आहे. या बँकेने सहा हजार कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा जिल्ह्यातील सर्वसामान्यांपर्यंत  केला आहे. या बँकेमुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलली. दुष्काळासह इतर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सहकारी बँकाच उभ्या राहतात. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने सहकारी बँकेच्या पाठीशी उभे राहावे.

 

            सुभाष देशमुख म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र समृद्ध व्हावा हेच शासनाचे धोरण आहे. त्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करत आहे.राज्यातील अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांना सुस्थितीत असलेल्या इतर बँकांनी हात देण्याचे गरज आहे. राज्यातील सहकार टिकविण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

            यावेळी बँकेच्या शताब्दी स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ‘को-ऑपरेशन बियोंड बँकिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पद्मविभूषण सन्मान मिळाल्याबद्दल शरद पवार यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्यावतीने श्री. जेटली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएम मोबाईल व्हॅनचे उद्घाटन आणि ‘गाथा पीडीसीसी बँकेची’ या ध्वनीचित्रफितीचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते पोस्ट कार्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विशेष पाकिटाचे प्रकाशन करण्यात आले.

 

            यावेळी माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, रमेश थोरात यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय भोसले यांनी केले. तर आभार अर्चना घारे यांनी मानले.

******

​दिवाळी अंक ही साहित्यकर्मी घडविण्याची कार्यशाळा :राजन खान

0
पुणे : ‘लायन्स क्लब ऑफ़ पुणे औंध -पाषाण’ च्या   दिवाळी अंक परिसंवादा​त ‘दिवाळी अंक -अपेक्षा आणि अपेक्षाभंग ‘ या विषयावर  चर्चा रंगली

दिवाळी अंक ही साहित्यकर्मी घडविण्याची कार्यशाळा असे राजन खान यांनी सांगितले तर
दिवाळी अंकांनी वैश्विक आव्हाने पेलावीत अशी अपेक्षा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली .

‘लायन्स क्लब ऑफ़ पुणे औंध -पाषाण’ च्या वतीने  ‘दिवाळी अंक : अपेक्षा आणि अपेक्षाभंग ‘ विषयावर  आयोजित परिसंवादाला  शुक्रवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र साहित्य परिषद् सभागृह, टिळक रोड, पुणे येथे हा कार्यक्रम सायंकाळी   झाला.
 कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. सतीश देसाई (अध्यक्ष : लायन्स् क्लब ऑफ पुणे औंध – पाषाण) हे होते.
डॉ. अनिल अवचट, राजन खान, ह. मो. मराठे, अरुण जाखडे, संजय भास्कर जोशी हे वक़्ते या परिसंवादात सहभागी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाल सबनीस होते.
​अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्रीपाल सबनीस म्हणाले ,’सातत्य आणि सांस्कृतिक लोकशाही या दिवाळी अंकांच्या परंपरेच्या जमेच्या बाजू आहेत ,मात्र ,केवळ   रंजन आणि जाहिरातींसाठी दिवाळी अंक असावेत का ,याचा विचार झाला पाहिजे . ​दिवाळी अंकात विश्वात्मक जाणिवा उमटणे आवश्यक असून संपादकांना विश्वाची आव्हाने शोधण्याची क्षमता असली पाहिजे ‘
​’राजन खान म्हणाले ,’दिवाळी अंक ही साहित्यिकांपासून कलाकारांपर्यंत अनेकांना घडविणारी कार्यशाळा आहे . या दिवाळी अंकातील साहित्यात रुक्षपणा येत असून त्यातून मानवी ओलाव्याचे लेखन आले पाहिजे ​. साक्षेपी संपादकांची पिढी हरवली आहे . त्याचबरोबर मराठी भाषा शिकण्याची आच संपत असून मुद्रितशोधनही मागे पडत आहे . अशा अनेक  आव्हानांवर विचारविनिमय करण्यासाठी केवळ दिवाळी अंक या विषयावर दोन दिवस संमेलन होण्याची गरज आहे .
अरुण जाखडे म्हणाले ‘समाज वाङमयविन्मूख होत आहे आणि आस्वादक्षमता कमी होत आहे ,अशा काळात वाचनशरणता पत्करून उपयोग नाही तर सकस दिवाळी अंकच काढला पाहिजे . एखादा दिवस अंक उशिरा प्रकाशित झाला तर वितरकांनी तो शिळा झाला असे समजू नये . मराठी बुक सेलर पेक्षा बुक मर्चंट तयार व्हायला हवेत .
ह .मो . मराठे म्हणाले ,’दिवाळी अंकांबद्दलची उत्सुकता कायम आहे . तरी दहा वर्षानंतर काय परिस्थिती असेल ते सांगता येत नाही . दिवाळी अंकात ललितेतर साहित्य वाढत आहे आणि पुरस्कार वाढले तरी दर्जेदार अंक निघत नाहीत . ‘
डॉ अनिल अवचट म्हणाले ,’पूर्वी संपादक आणि लेखकात दिवाळी अंकामुळे नाते निर्माण व्हायचे ,तसे आताही झाले पाहिजे . जुन्या -नव्याचा संगम घडवून जाहिरातींची फिकीर न करणारे काही दर्जेदार अंक निर्माण झाले पाहिजेत आणि सुसंकृत समाजाने ते उचलून धरले पाहिजेत ‘
संजय भास्कर जोशी म्हणाले ,’नामवंत दिवाळी अंकांनी ठरवून नवोदितांना संधी दिली पाहिजे आणि नव्या अंकांमध्येच नामवंतांनी लिहिले पाहिजे . वाचन ही गोष्ट जगण्याच्या केंद्रस्थानी आणण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत ‘
डॉ . सतीश देसाई यांनी प्रास्ताविक केले . रवी चौधरी यांनी स्वागत केले तर प्रदीप बर्गे यांनी आभार मानले
साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासह अनेक मान्यवर सभागृहात उपस्थित होते

भ्रष्टाचार टाळण्यासाठी थेट विद्यार्थ्याच्या खात्यात जमा होणार रक्कम ..

0

पुणे- आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना खानावाळीसाठी दरमहा २१५० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करून देण्यात यावी अशा आशयाचा प्रस्ताव महापालिकेतील स्थायी समितीने मंजूर केला आहे. खानावळीचा ठेका देण्यावरून भ्रष्टाचाराचे, गैरव्यवहाराचे आरोप होत . येथील विद्यार्थ्यांना जेवणासाठी नाश्ता ,चहा साठी 50 टक्के अनुदान महापालिका देत असते. आता असा ठेका देण्याएवजी मुलांच्या खात्यात थेट रक्कम जमा करून त्यांना जेवणासाठी स्वातंत्र्य मिळणार आहे . याबाबत महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ पहा आणि ऐका नेमके काय म्हणाले ….

डॉ. मेधा खोले यांच्या निषेधार्थ निदर्शने

0
पुणे :
         अंधश्रद्धेला खतपाणी घालून समाजात तेढ निर्माण करीत असल्याबद्दल हवामान तज्ञ डॉ. मेधा खोले यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसने निदर्शने करून शुक्रवारी जोरदार आंदोलन केले.
   युवती काँग्रेसच्या शहराध्यक्ष मनाली भिलारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. शिवाजी नगर एसटी स्टँडच्या समोर डॉ. खोले यांच्या निवास स्थानासमोर निदर्शने आंदोलन झाले. डॉ. खोले यांनी अंधश्रद्धा बाळगून समाजात तेढ निर्माण होईल असे वर्तन केल्याबद्दल आंदोलनात सहभागी झालेल्या युवतींनी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.
     मनाली भिलारे म्हणाल्या, ”देशाची वाटचाल 21 व्या शतकाकडे होत असताना समाजात वाद निर्माण करणे, जातीय संघर्ष निर्माण करणे हे चुकीचे आहे. माणसाला माणूस म्हणून सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. त्यासाठी संघर्ष करावा लागला तर राष्ट्रवादी युवती काँग्रेस आघाडीवर असेल तसेच खोले प्रकरणात दाखल झालेला गुन्हा सामोपचाराने मागे घ्यावा, अशीही मागणी आम्ही करीत आहेत. तसेच या प्रकरणाला जातीय रंग दिला जाऊ नये, असे आवाहन मी या ठिकाणी करते”
              या आंदोलनात भिलारे यांच्या नेतृत्वाखाली युवती पदाधिकार रिना शिंदे,शिवानी माळवदकर,सोनाली गाडे,कोमल टिंगरे,तेजवंती कपले,अक्षता राजगुरू,मेघा पंडित,स्नेहल शिंनगारे, मयूरी हांडोरे ,योगिता रोकडे व आदी युवती सदस्य व शिवाजीनगर मतदार संघ अध्यक्ष शैलेश बडदे, राष्ट्रवादीच्या काॅंग्रेस रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बापू धुमाळ देखील उपस्थित
होते.
हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांच्याविरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पुणे वेधशाळेच्या कार्यालयाबाहेर ही निदर्शने करण्यात आली. यावेळी मेधा खोले यांच्याविरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही निदर्शने केली. मेधा खोलेंनी मराठा महिलेविरोधात केलेल्या जातीवाचक व्यवहाराचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान या प्रकारामुळे आयएमडी कार्यालयाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कॉनक्वेस्ट महाविद्यालयात शिक्षकदिन उत्साहात साजरा

0

पिंपरी । प्रतिनिधी
चिखली येथील कॉनक्वेस्ट महाविद्यालयात शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आली. महाराष्ट्र विकास केंद्राचे अध्यक्ष जलतज्ज्ञ अनिल पाटील, संचालिका प्रा. नेहा बोकील व प्राचार्य प्रदीप कदम यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करून शिक्षकदिन समारंभाचे करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी रोपटे देऊन शिक्षकांचे स्वागत केले. अनिल पाटील म्हणाले, शिक्षक हा भारतीय संस्कृतीला जपणारा कणा आहे आणि त्या आधारावरच या देशाच्या पिढीचे भवितव्य अवलंबून आहे . प्रा. बोकील, प्रा. योगेश आत्तरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्राचार्य प्रदीप कदम यांनी युवकांच्या भुमिका व शिक्षण, महापुरुषांचे प्रेरणादायी विचार व कृती, शिक्षकांचा आदर्श व संशोधनात्मक दृष्टिकोन भारताला महासत्ता बनवण्यासाठी उपयुक्त आहे, असे मत व्यक्त केले.
यावेळी रासेयोचे प्रा. दयानंद ओव्हाळ, प्रा. अनिता जाधव, प्रा. स्मिता वैराट, प्रा. संतोष शिंदे, प्रा. अमोल कवडे, प्रा. वैभव पताळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राज काळजे याने केले. सुत्रसंचालन सुमित बधाले यांनी, तर किशोर राठोड या विद्यार्थ्यांने आभार व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.नयना सरोदे, प्रा. सारिका भोसले, प्रा. धनश्री भारंबे, प्रा. पल्लवी धांडे, प्रा. रेखांजली गाडेकर यांनी परिश्रम घेतले.