जम्मू आणि काश्मीरमधील रहिवासी म्हणाले – चिनाब नदीत २ फूट पाणी शिल्लक आहे, ती लवकरच पूर्णपणे सुकून जाईलजम्मू आणि काश्मीरमधील अखनूरमध्ये राहणारे रामसूर शर्मा म्हणाले – मी ७५ वर्षांचा आहे, पण चिनाब नदीचे पाणी थांबवल्याचे मी पहिल्यांदाच पाहिले आहे. मी पंतप्रधान मोदींचे त्यांच्या निर्णयाबद्दल आभार मानतो. नदीत फक्त १.५-२ फूट पाणी शिल्लक आहे. पुढील २ तासांत हे पाणीही सुकून जाईल.
ट्रम्प यांना विचारून पाकिस्तानवर कारवाई करणार का?जेसन मिलर यांची नियुक्ती का केली? प्रकाश आंबेडकरांनी मोदी सरकारकडे मागितले स्पष्टीकरण
पहलगामच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधील सलाहकार जेसन मिलर यांची नेमणूक केली, असे वृत्त पाकिस्तानमधील डॉन या वृत्तपत्राने दिले आहे. या प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारला थेट सवाल केला असून, एका सार्वभौम राष्ट्राला परकीय व्यक्तीची वकिली का लागावी, असा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच जेसन मिलरकडून परवानगी आल्याशिवाय आपण पहलगाम प्रकरणी काही कारवाई करणार नाही का? याचा खुलासा भारतीय जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सांगावे की, अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधील सलाहकार जेसन मिलर यांची नेमणूक केली आहे का?
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 5, 2025
जेसन मिलरकडून परवानगी आल्याशिवाय आपण पहलगाम प्रकरणी काही कारवाई करणार नाही का ? याचा खुलासा… pic.twitter.com/KsZuqqqqzb
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जनता पाकिस्तानच्या विरोधात कारवाईची मागणी करत आहे. हल्ल्याच्या घटनेला आठवडा उलटून गेला आहे. मात्र, सरकारकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले, अशी परिस्थिती दिसत आहे. सामान्य जीवन सुरू असल्याची परिस्थिती भासवली जात असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणालेत. पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्रात एक बातमी आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र जेसन मिलर नावाच्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक नेमकी पाकिस्तानवर जी कारवाई करायची आहे, ती करण्यासाठी या सल्लागाराकडून परवानगी मागितली जाणार का? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारून पाकिस्तानवर कारवाई करणार का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
देशाकडे स्वतःचे परराष्ट्र मंत्रालय असताना भारताला परकीय सल्लागाराची गरज भासते हे चिंताजनक आहे, असे म्हणत आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला. भारत सरकारने या प्रकरणात पारदर्शकता दाखवावी आणि नेमणुकीचे कारण व उद्दिष्ट देशातील नागरिकांसमोर ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणात आंबेडकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे प्रश्न उपस्थित केले आहेत. जेसन मिलर यांची नेमणूक केंद्र सरकारने केली का? जर हो, तर त्यामागचे कारण काय आहे? असा थेट सवाल करत त्यांनी या बाबतीत केंद्र सरकारने खुलासा करावा, अशी मागणी केली. भारत सरकार आता जेसन मिलर यांच्या परवानगीशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही का? असा गंभीर सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जर एखाद्या विदेशी व्यक्तीला भारतात धोरणात्मक जबाबदारी दिली जात असेल, तर त्याबाबत संपूर्ण पारदर्शकता व उत्तरदायित्व असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
जेसन मिलर हे यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार होते. अशा पार्श्वभूमीच्या व्यक्तीची भारतासारख्या देशात नियुक्ती होणे, हे अनेक प्रश्न निर्माण करणारे ठरत आहे. परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत भारत स्वतः सक्षम असून, विदेशी व्यक्तीच्या सल्ल्याची आवश्यकता का भासली, हे केंद्र सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी आंबेडकरांनी केली. या संपूर्ण प्रकरणावर तातडीने उत्तर देत केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणते पावले उचलली आहेत, हे सांगणे गरजेचे असल्याचे आंबेडकरांनी म्हटले आहे. देशाच्या धोरणांत कोणताही परकीय हस्तक्षेप होऊ नये, यासाठी सरकारने स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
एक साडेचार फुटी मंत्री म्हणतो- धर्म विचारून सामान घ्या:काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची नीतेश राणे यांच्यावर टीका
देशात व राज्यात सध्या जातीयवादाचे विष पेरले जात आहे. बीडमध्ये तर दोन जाती एकमेकांपुढे उभ्या टाकल्या जात आहेत. अशा स्थितीत महायुती सरकारचा एक साडेचार फुटांचा मंत्री नागरिकांना धर्म विचारून दुकानातून सामान विकत घेण्याचे सांगत आहे, अशा तिखट शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी नुकतेच दापोली येथील सभेत हिंदू धर्मियांना दुकानदारांकडून धर्म विचारून खरेदी-विक्री करण्याचा सल्ला दिला होता. दुकानदाराला धर्म विचारून वस्तू खरेदी करा. विशेषतः त्याच्या धर्माविषयी शंका आल्यास त्याला हनुमान चालीसा म्हणायला लावा, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत असताना विजय वडेट्टीवार यांनी उपरोक्त शब्दांत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. सद्यस्थितीत देशात व राज्यात जातीयतेचे विष पेरले जात आहे. बीडमध्ये दोन जाती एकमेकांच्या विरोधात उभ्या केल्या जात आहेत. त्यातच आता राज्य सरकारचा साडेचार फुटाचा एक मंत्री जनतेला जात विचारून दुकानातून सामान घेण्याचे सांगत आहे, असे ते म्हणाले.
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सत्ताधारी भाजपवरही निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसला फोडून रिकामे करण्याची वल्गना करत आहेत. पण आमचे दिवस आले तर आम्हीही चुनचुनके मारू. एकनाथ शिंदे व अजित पवारांची काय परिस्थिती आहे. त्यांचा केवळ वापर केला जात आहे. पुढच्या निवडणुकीत ते कुठे असतील हे पहावे लागेल. सरकारने सीबीआय व ईडीला बाजूला करावे. त्यानंतर काय होते ते पहावे.
या सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली. यांना 10 दिवस लोटले तरी पहलगाम अतिरेकी हल्ल्यातील आरोपी सापडत नाहीत. ते कधी ते सापडणार? हे या सरकारने सांगावे. अतिरेक्यांचे कपडे भेटले, लोकेशन भेटले, मग अतिरेकी का सापडत नाहीत.
..तर राज – उद्धव ठाकरेंचा सत्कार करणार
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही भाष्य केले. तसेच असे खरेच घडले तर त्यांचा सत्कार करण्याचेही संकेत दिले. दोन भाऊ एकत्र येत असताना त्याची चिंता भाजपला लागली आहे. पण हे दोन भाऊ खरेच एकत्र येत असले तर त्यांनी सर्वधर्म समभाव घेऊन सोबत यावे. आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार घेऊन त्यांनी एकत्र यावे. असे झाल्यास आम्ही स्वतः त्यांचा सत्कार करू, असे ते म्हणाले.
आर्यंश कंसल आणि वरद मांडे यांनी जागतिक स्तरावर दाखवली भाषिक प्रतिभा
पुणे, ५ मे – भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने मंजूर केलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड २०२४-२५ मध्ये पुण्यातील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. इयत्ता पाचवीच्या वरद मांडे ने स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला, तर इयत्ता चौथीच्या आर्यंश कंसलने आठवा क्रमांक मिळवून शाळेचा आणि देशाचा अभिमान वाढविला.
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र आणि प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला. हे यश त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि हिंदी भाषेवरील प्रेमाचे फळ आहे.
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना शाळेचे संचालक यशवर्धन मालपाणी म्हणाले, “आमच्या विद्यार्थ्यांनी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट भाषिक प्रतिभा दाखवली आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि आम्हाला विश्वास आहे की भविष्यातही ते जागतिक स्तरावर हिंदी भाषेला आदर मिळवून देत राहतील.”
मुख्याध्यापिका संगीता राऊत म्हणाल्या, “या मुलांचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, जे त्यांना भाषा आणि साहित्यात रस वाढवण्यास प्रोत्साहित करेल.”
तसेच यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली.
हे यश केवळ शाळेसाठी अभिमानाची गोष्ट नाही तर समर्पण आणि वचनबद्धता असेल तर भाषेतील अडथळे देखील पार करता येतात हे देखील ते दर्शवते.
ब्राह्मण कार्यालयाच्या वतीने जनकल्याण रक्तपेढीला साडेसहा लाखांचा रेफ्रिजरेटर भेट
पुणे : ब्राह्मण कार्यालय संस्था शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील जनकल्याण रक्तपेढी या संस्थेला त्यांच्या आवश्यकतेनुसार साडेसहा लाख रुपये किमतीचा ८०० लिटर साठवण क्षमतेचा आणि दोन अंश तापमानापर्यंत कार्यक्षम असणारा मोठा रेफ्रिजरेटर भेट म्हणून देण्यात आला.
स्वारगेट येथील जनकल्याण रक्तपेढी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्राह्मण कार्यालय संस्थेचे उपाध्यक्ष रमेश भागवत उपस्थित होते. या प्रसंगी जनकल्याण रक्तपेढी तर्फे डॉ. अतुल कुलकर्णी यांनी संस्थेचे आभार मानले. डॉ. माधुरी बर्वे यांनी रक्तपेढीच्या संपूर्ण कामकाजाची माहिती दिली.
डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, ब्राह्मण कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या नवीन रेफ्रिजरेटरमुळे रक्त साठवणुकीची क्षमता लक्षणीय वाढणार आहे. परिणामी पुणे शहरातील रक्तसाठा व्यवस्थापन अधिक सक्षम होईल. पैशाअभावी रक्त मिळणार नाही, याची आम्ही विशेष काळजी घेतो. थॅलेसेमिया ग्रस्त लहान मुलांना दरवर्षी ४ हजार रक्तपिशव्या रक्तपेढीच्या वतीने विनामूल्य दिल्या जातात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रमेश भागवत म्हणाले , ब्राह्मण कार्यालय संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जनकल्याण रक्तपेढी यांना त्यांची गरज ओळखून केवळ रक्त पेढीसाठी उपयुक्त असणारा रेफ्रिजरेटर देण्यात आला. नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेलाही सुरक्षा कॅमेरा बसविण्यात आर्थिक मदत संस्थेमार्फत करण्यात आली आहे. समाजाच्या कल्याणासाठी अशा कार्यात सहभागी होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भविष्यातही ब्राह्मण कार्यालय संस्था अशाच कार्यासाठी पुढे राहील, असेही त्यांनी सांगितले.
बारामती येथील अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी, आरोपीना अटक करून कडक कारवाई करावी : डॉ.नीलम गो-हे
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
पुणे जिल्हय़ातील बारामती तालुक्यातील महादेव मळा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेडाछेड केल्याच्या घटनेतील आरोपींवर पॉस्को आणि एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर त्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी,असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांना दिले.
पुणे जिल्हय़ातील बारामती तालुक्यातील महादेव मळा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना 13 एप्रिल रोजी घडली.त्यावेळी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी स्थानिक पोलिसांकडे याबाबतची तक्रार देताच, आरोपी विरोधात विविध कलम लावून पॉस्को आणि एट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला.पण त्या आरोपींना अटक करण्यात आली नाही.यामुळे पीडित कुटुंबियांनी नाराजी व्यक्ती केली आहे.पीडित मुलीसोबत घडलेला प्रकार आणि सध्या गावातील एकूणच वातावरण, याबाबत पिडीत मुलींच्या कुटुंबियांनी मला सविस्तर माहिती दिली आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांनी तात्काळ ग्रामीण अधीक्षक पंकज देशमुख यांना फोन लावून,त्या घटनेतील सध्याची माहिती जाणून घेतली.त्यावेळी पोलीस तपास पथकाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करीत,पीडित मुलीच्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन केले पाहिजे,असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
भाजपा व रा. स्व. संघाकडून जाती धर्माच्या नावावर विष पसरवून समाजात दुही माजवण्याचे काम: रमेश चेन्नीथला.
जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल: हर्षवर्धन सपकाळ
सद्भावना यात्रेच्या माध्यमातून दुभंगलेली मने जोडण्याचे काम: विजय वडेट्टीवार.
काँग्रेसच्या संविधान बचाओ पदयात्रेला परभणीकरांचा मोठा प्रतिसाद.
परभणी, दि. ५ मे २०२५
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे. म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी काँग्रेस ही यात्रा काढत असून यापुढेही राज्यात अशाच यात्रा काढण्यात येतील, असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा नेतृत्वाखाली आज परभणी शहर काँग्रेस कार्यालयापासून संविधान बचाओ पदयात्रा काढण्यात आली. या यात्रेची सांगता अक्षता मंगल कार्यालयात संविधान संमेलनाने झाली. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणितीताई शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, यु. बी. व्यंकटेश, खा. डॉ. कल्याण काळे, खा. रविंद्र चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष व यात्रेचे समन्वयक मोहन जोशी,
आ. अमित झनक, माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, इंटकचे प्रदेशाध्यक्ष कैलाश कदम, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर, शहराध्यक्ष नदीम इमानदार, बुलढाणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रदेश सरचिटणीस ब्रीज दत्त, रामचंद्र दळवी जितेंद्र देहाडे, सचिव विश्वजीत हाप्पे, बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनावणे, धाराशिव जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, प्रदेश सचिव विश्वजीत हाप्पे, धनराज राठोड, मुजाहिद खान, जफर खान, अभय देशमुख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व परभणीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्यावर झालेल्या अन्यायाप्रश्नी राहुल गांधी यांनी आवाज उठवला, या घटनेला तीन महिने झाले तरी तरी अद्याप सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर सरकारने कोणतीच कारवाई केलेली नाही, मुख्यमंत्री फडणीस यावर काही बोलत नाहीत. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही. राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायासाठी जातीजनगणनेचा मुद्दा उपस्थित केला, याचा फायदा मागास, वंचित, पीडित लोकांना होईल. जातनिहाय जनगणनेचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा भाजपा व मोदी यांनी त्याला विरोध केला पण शेवटी मोदी सरकारला जनगणनेचा निर्णय घ्यावाच लागला. मोदींवर जनतेचा विश्वास राहिला नाही, महिला आरक्षण विधेयक पास केले पण त्याची अंमलबजवाणी केली नाही. जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला पण तो कधी होईल हे जाहीर करत नाहीत.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरल्याने मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला. जातनिहाय जनगणना झाली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. ओबीसीला २७ टक्के आरक्षण आहे ते सुद्धा ६५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. भाजपा मात्र जाती जातीत भांडणे लावत आहे अशावेळी बहुजन समाज एकत्र असणे ही काळाची गरज आहे. राज्यात रोज ६ शेतकरी आत्महत्या होत आहेत, मुलांना नोकरी मिळत नाही आणि सरकारला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून अदानी अंबानींचे हित महत्वाचे वाटत आहे. गरज नसताना ८८ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यात सरकार प्राधान्य देत आहेत.
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, सद्भावना यात्रेच्या माध्यमातून दुभंगलेली मने जोडण्याचे काम केले जात आहे, समाजा-समाजाला जोडण्याचे काम होत आहे. भाजपा २०१४ पासून देशात व राज्यात जातीयतेचे व धर्मांधतेचे विष पेरत आहे.आता भाजपा नेते काँग्रेस फोडण्याची भाषा करत आहेत. दुसऱ्याची घरे फोडण्याची सवय भाजपाला लागली आहे. आमची वेळ आल्यावर याचा बदला घेऊ. काही लोक पक्ष सोडून जात आहेत पण दुसऱ्याच्या मागे चालण्यापेक्षा स्वतःचा रस्ता स्वतः तयार करा, असे वडेट्टीवार म्हणाले.
संविधान वाचले तर सद्भाव कायम राहिल..
माजी मंत्री नसीम खान म्हणाले की, भाजपा व रा. स्व. संघ जाती धर्मात वाद निर्माण करत तोडण्याचे काम करत आहे तर काँग्रेस जोडण्याचे काम करत आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता राहुल गांधी यांनी देशभर पदयात्रा काढली. देशावर संकट येते, सामाजिक सौहार्द बिघडते तेव्हा सर्वात आधी काँग्रेस पक्ष समोर येतो. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, पोलीस कोठडीत सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या करण्यात आली पण भाजपा युती सरकारवर त्याचा काही फरक पडला नाही. राहुल गांधी यांनी परभणीत येऊन सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आज देशात संविधान व लोकशाही वाचवण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे. संविधान वाचले तर सद्भाव कायम राहिल, संविधान वाचले तर सर्व जाती धर्माला न्याय मिळेल, असे नसीम खान म्हणाले.
भाजपाला संविधान बदलून मनुवाद आणायचा आहे.
खासदार चंद्रकांत हांडोरे यावेळी म्हणाले की, भाजपा, रा. स्व. संघ, बजरंग दल देशात अराजक माजवण्याचे काम करत असून भाजपा सरकार त्यांना पाठबळ देते. भाजपा सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरली असल्याने जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी जाती धर्मात भांडणे लावण्याचे काम केले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात पवित्र संविधान दिले, सर्वांन समान अधिकार,हक्क दिले आहेत पण भाजपाला हे संविधान बदलायचे आहे आणि मनुवाद आणायचा आहे. देशात सद्भाव वाढला पाहिजे यासाठी काँग्रेस संविधान बचाव व सद्भावना यात्रा काढत आहे. सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला त्यास दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत विजय वाकोडे यांचे स्मारक सरकारने बांधले नाही तर खासदार निधीतून आपण करू अशी ग्वाही दिली.
महायुतीत ‘तीन तिघाडा व काम बिघाडा’ !
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, पहलगामला अतिरेकी हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी पहलगामला गेले, हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली पण पंतप्रधान मोदी बिहारला प्रचार सभेला गेले. इंदिराजी गांधी यांनी धाडस करून पाकिस्तानला धडा शिकवला मग नरेंद्र मोदी कशाची वाट पहात आहेत. भाजपा काँग्रेसला कमकुवत करण्याची भाषा करत आहे पण काँग्रेस कमकुवत होणार नाही उलट महायुतीतच तिन तिघाडा व काम बिघाडा झाली आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केले तर आभार शहराध्यक्ष नदीम इनामदार यांनी मानले.
शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकाससारख्या क्षेत्रांसाठी कृत्रीम बुद्धीमत्तेचे स्वतंत्र कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
–‘मायक्रोसॉफ्ट’सारख्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या कृत्रीम बुद्धीमत्ता कौशल्यवृद्धी सहकार्यात
उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी
–शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य क्षेत्रांमध्ये
कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचाचा वापर वाढवणे काळाची गरज
-कृत्रीम बुद्धीमत्ता क्षेत्रात कौशल्यवृद्धीसाठी मदत करणाऱ्या
मायक्रोसॉफ्टसह सर्वांचे स्वागत, सर्वांनासहकार्याची भूमिका
मुंबई, दि. 5 :- शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करुन कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रे स्थापन करण्यासह एआय तंत्रज्ञानाच्या प्रभावी उपयोगासाठी ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि राज्य शासन यांच्यात सामंजस्य करार झाला असून एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्समुळे प्रशासनात कार्यक्षमता, पारदर्शकता, डिजिटल साक्षरता वाढणार आहे. नॉयडातील मायक्रोसॉफ्ट सेंटर ऑफ एक्सलन्स आणि तेलंगणातील हैदराबाद इथल्या गुगुलच्या आयटी पार्कच्या धर्तीवर बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकारातून शहरात आयटी पार्क किंवा इनोव्हेशन सेंटर उभारण्याचा प्रयत्न असून त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला कौशल्यविकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, नियोजन विकास विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कौशल्यविकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, उद्योग सचिव डॉ. अनबलनग पी., एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, मायक्रोसॉफ्टच्या उद्योग संचालक व कृषी तज्ञ सपना नौहारिया, रतन टाटा कौशल्यविकास विद्यापीठाच्या कुलगुरु अपूर्वा पालकर, कौशल्यविकास आयुक्त नितीन पाटील, बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे, विद्या प्रतिष्ठानचे किरण गुजर आदींसह शेती, उद्योग, व्यापार, माहितीतंत्रज्ञान, कौशल्यविकास आदी क्षेत्रातील तज्ञ तसेच शासनाच्या संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विद्या प्रतिष्ठानच्या बारामतीतील प्रस्तावित सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ आर्टीफिशिएल इंटलिजन्स केंद्रासोबत राज्यात मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा उभारणे, बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात कृत्रीम बुद्धीमत्ता वापराचे प्रशिक्षण सुरु करणे, कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, मायक्रोसॉफ्ट व शासनाच्या सहकार्यातून ज्ञान व माहितीचे आदान-प्रदान, एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, डिजिटील कौशल्यवृद्धी, संशोधन केंद्रे सुरु करणे, कर्करुग्णांवरील उपचारप्रक्रियेत वापरले जाणारे मायक्रोसॉफ्टचे इ-संजीवनी तंत्रज्ञान बारामतीतील वैद्यकीय महाविद्यालय, सिल्वर ज्युबिली रुग्णालय, राज्यातील अन्य रुग्णालयांना उपलब्ध करुन देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
राज्य शासनाचे सर्व विभाग, शेती, उद्योग, व्यापार, सहकार अशा अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रीम बुद्धीमत्तेचा वापर वाढवणे ही काळाची गरज बनली असून या क्षेत्रात राज्याला मदत करण्यासाठी पुढे येणा्ऱ्या मायक्रोसॉफ्टसह सर्वांचे स्वागत करण्यात येईल. सर्वांना शक्य ते संपूर्ण सहकार्य, मदत केली जाईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिला.
वाणी कपूर ‘रेड 2’ च्या यशानंतर आनंदित
“बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणं हे नेहमीच स्वप्नवत वाटतं!” :
वाणी कपूर अजय देवगणसोबतच्या तिच्या नवीन चित्रपट ‘रेड 2’ ला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे अत्यंत आनंदित आहे. केवळ चार दिवसांतच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे आणि तिकीट खिडकीवर भरघोस कमाई करत आहे.
वाढवलेल्या ओपनिंग वीकेंडमध्ये ‘रेड 2’ ने आतापर्यंत 70.75 कोटी रुपये कमावले आहेत आणि लवकरच हा चित्रपट 100 कोटी क्लबमध्ये सामील होण्याच्या मार्गावर आहे.
या यशावर प्रतिक्रिया देताना वाणी म्हणाली,“बॉक्स ऑफिसवर यशस्वी होणं हे नेहमीच एक स्वप्नासारखं वाटतं. एखाद्या अशा चित्रपटाचा भाग होणं, जो प्रेक्षकांच्या हृदयाशी जोडला जातो, ही खूप समाधानाची गोष्ट आहे. ‘रेड 2’ ला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद अत्यंत प्रेरणादायक आहे आणि मी या प्रवासाचा भाग असल्याबद्दल अत्यंत कृतज्ञ आहे.”
वाणी कपूरच्या भूमिकेचे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही कौतुक केले आहे, आणि तिने यशस्वी चित्रपटात काम केल्याने ती नम्रतेने भारावून गेली आहे.
वाणी पुढे म्हणाली,“चित्रपटाची कथा खूपच ताकदीची आहे. राज कुमार गुप्ता सरांच्या दूरदृष्टीने दिग्दर्शित या प्रोजेक्टवर काम करणं माझ्यासाठी एक समृद्ध अनुभव होता. माझ्या भूमिकेसाठी मिळणाऱ्या कौतुकाबद्दल मी माध्यमांचे, समीक्षकांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानते.”
ती पुढे म्हणाली,“अजय सर आणि राज कुमार गुप्ता सर यांच्यासोबत काम करताना मला एक कलाकार म्हणून खूप काही शिकायला मिळालं. ‘रेड 2’ चे यश माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टमुळे मला अधिक मेहनत करायची प्रेरणा मिळते आणि सतत प्रगती करत राहायचं बळ मिळतं.”
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री आलिया भटचे पदार्पण
लोरिएल पॅरिसची ब्रॅण्ड अम्बेसिडर म्हणून २८ व्या भागीदारी सोहळ्यात आलिया भट हजर राहणार
आलियासोबत अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनही उपस्थित राहणार
पुणे , ५ मे २०२५ – लोरिएल पॅरिस हा जगप्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन उत्पादनांचा ब्रॅण्ड आता कान्स फिल्म फॅस्टिवलमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. १३ ते २४ मे दरम्यान कान्स फिल्म फॅस्टिवल सोहळा पार पडेल. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लोरिएल पॅरिसचे ब्युटी पार्टनर म्हणून यंदाचे २८ वे वर्ष आहे. लाइट्स, ब्युटी एण्ड एक्शन ही संकल्पना यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये राबवली जाईल. प्रत्येकाच्या अंतरंगात एक आकर्षक सौंदर्य दडलेलं आहे, हे सौंदर्य तुमचा खरा आत्मविश्वास आहे, असा संदेश या संकल्पनेतून मांडण्यात आला आहे.
आपल्या अभिनयाने सर्वांना घायाळ करणारी प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट ही यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलचे प्रमुख आकर्षण ठरेल. लोरिएल पॅरिसची जागतिक ब्रॅण्ड एम्बेसिडर म्हणून आलिया कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करेल. आलियासोबतच माजी विश्वसुंदरी, प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायही यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उपस्थित असेल. गेली कित्येक वर्षे ऐश्वर्या राय या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लोरिएल पॅरिससाठी ब्रॅण्ड एम्बेसिडर म्हणून प्रतिनिधीत्व करत आहे. अभिनय आणि सौंदर्याचा सुरेख संगम असलेल्या या दोन कसदार अभिनेत्रींची हजेरी ही सौंदर्यांची सकारात्मक व्याख्या असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश लोरिएल पॅरिस देत आहे. सर्वसमावेशक सक्षमीकरण हा सकारात्मक विचार पसरवण्यासाठी लोरिएल पॅरिस कटिबद्ध आहे.
कान्स फिल्म सोहळ्याबद्दल अभिनेत्री, निर्माती आणि उद्योजिका आलिया भटने आपण प्रचंड उत्सुक असल्याचे सांगितले. आयुष्यात पहिल्यांदाच घडणा-या अनेक गोष्टींबाबत आपल्याला कुतुहूल असते. यंदाच्या वर्षी मी पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाऊल ठेवणार आहे. सिनेमाच्या या अंतरंगी दुनियेत प्रवेश करण्यासाठी मी नक्कीच उत्सुक आहे. लाइट्स, ब्युटी एण्ड एक्शन ही संकल्पना यंदा राबवली जाईल. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेणे ही माझ्यासाठी निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. माझ्यासाठी सौंदर्य म्हणजे प्रत्येक माणसाच्या वेगळेपणाचा, आत्मविश्वासाचा आणि आत्म-सन्मानाचा उत्सव आहे. या विचारांचे सौंदर्य अमर्याद आणि अद्वितीय असते. स्त्रियांच्या अस्तित्वाचा आदर करणा-या आणि त्यांना स्वतःच्या प्रकाशाच चमकण्यासाठी सक्षण करणा-या लोरिएल पॅरिससोबत काम करणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, असे आलिया भट्ट म्हणाली.
लोरिएल पॅरिस इंडियाचे महाव्यवस्थापक डारिओ झिझ्झी यांनीही कान्स फिल्म फेस्टिव्हलबद्दल आपले मत मांडले. ते म्हणाले, ‘‘कान्स फिल्म फेस्टिव्हल हा नेहमीच कथाकथानक, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक संवादासाठी एक प्रभावी व्यासपीठ राहिला आहे. ही मूल्ये लोरिएल पॅरिसच्या विचारधारेशी जुळतात. या फिल्म फेस्टिव्हलचा अधिकृत मेकअप भागीदार म्हणून आम्ही २८ वर्ष पूर्ण करत आहोत. या जागतिक व्यासपीठावर आलिया भटचे स्वागत करताना आम्हांला आनंद होत आहे. या मंचावर गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ ऐश्वर्या राय बच्चन आमच्यासाठी उपस्थित राहिल्या आहेत. यंदाही त्यांचा सहभाग आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. या फेस्टिव्हलमध्ये आलिया भटचे पदार्पण हे जागतिक पातळीवर भारतीय सिनेमाचा वाढता प्रभाव दर्शवते. तिचे पदार्पण आमच्या ब्रॅण्डच्या जगभरातील विविध सौंदर्य आणि महिला सक्षणीकरणाचा उत्सव साजरा करण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.’’
लोरिएल पॅरिसने यावर्षी सामरिक भागीदारीसाठी देशातील प्रसिद्ध ऑनलाईन खरेदीचे व्यासपीठ नायकासोबत ब्युटी पार्टनर म्हणून भागीदारी केली आहे. या भागीदारीतून नायकाच्या ऑनलाईन खरेदीतून सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना महिलांना कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेट लूकही तयार करण्याची माहिती दिली जाईल. आता लोरिएल पॅरिसचे सर्वात जास्त मागणी असलेले प्लम्प एमबिशस लिप ऑईल नायकावर खास उपलब्ध झाले आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरु असेपर्यंत नायकावर लोरिएलचे हे प्रसिद्ध लिप ऑईल खरेदी करता येईल.
लोरिएल पॅरिससोबतच्या भागीदारीबद्दल नायका ब्युटीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंचित नायर यांनीही आपली भूमिका जाहीर केली. ते म्हणाले, ‘‘ गेल्या ३० वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लोरिएल पॅरिसची उपस्थिती आहे. इतक्या वर्षांपासून लोरिएल पॅरिस जागतिक स्तरावर सौंदर्याचा उत्सव साजरा करत आहे. भारतात लोरिएल पॅरिसचा अधिकृत सौंदर्य भागीदार म्हणून नायकाला हा सहयोग आपल्या ग्राहकांना मिळवून देता येत आहे. नायकाच्या ४ कोटींहून अधिक ग्राहकांना आणि २०० हून अधिक स्टोअर्सला या भागीदारासून या फेस्टिव्हलची अनुभूती देता येईल. हे आमच्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आहे. या जागतिक व्यासपीठावर भारतीय सौंदर्याचा सन्मान होत आहे. आपल्या सौंदर्यांवर नितळ विश्वास ठेवणा-या प्रत्येकाचा हा सन्मान आहे. ’’
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये लोरिएल पॅरिसच्या जागतिक ब्रॅण्ड एम्बेसिडर इव्हा लॉन्गोरिया, व्हायोला डेव्हिस, जेन फोंडा, अजा नाऔमी किंग, अँकी मॅकडॉवेल, सिमोन अश्ले, एल फॅनिंग, बेबे विओ आणि यसेल्ट आदी नामवंत कलाकार उपस्थित राहतील. हे सर्वजण लोरिएल पॅरिसच्या अस्सल सौंदर्याचा उत्सव साजरा करण्याच्या ध्येयाचे प्रतिनिधीत्व करतात.
यावेळी लोरिएल पॅरिसकडून लाइट्स ऑन वुमेन्स अर्थ हा पुरस्कारही दिला जाईल. चित्रपटांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. महिला चित्रपट निर्मात्यांना प्रकाशझोतात आणण्यासाठी तसेच त्यांना प्रोस्ताहित करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन केले जाते. हा पुरस्कार महिलांच्या कलेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि चित्रपट उद्योगातील त्यांच्या व्यावसायिक प्रवासाला गती देण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे.
या संपूर्ण महोत्सवात लोरिएल पॅरिसकडून वेगवेगळे मेकअप लूक प्रसिद्ध केले जातील. या आकर्षक लूकची संपूर्ण जबाबदारी ही जगप्रसिद्ध मेकअप क्रिएटीव्ह डायरेक्टर हॅरोल्ड जेम्स करतील. लोरिएल पॅरिससाठी ही जबाबदारी पेलण्यासाठी नुकताच हॅरोल्ड जेम्स यांनी हा कार्यभार स्विकारला आहे.
गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या साक्षीने जुळले दृष्टीहिन जोडप्यांचे ‘सुस्वर’
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे दृष्टीहिन जोडप्याचा विवाह सोहळा
पुणे : सनईचे मंगलमय सूर…कार्यकर्त्यांची सुरु असलेली लगबग….वाजत गाजत काढलेली वरात…भांड्यांपासून कपाट आणि सोफ्यापर्यंत विविध वस्तूंनी सजलेले रुखवत… वाद्यांचा गजर आणि वैदीक मंत्रोच्चाराचे सूर अशा मंगलमय वातावरणात गायिका असणारी शितल केंद्रे आणि सुनील पवार या दृष्टीहिन जोडप्याचा विवाह सोहळा संपन्न झाला. गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या साक्षीने शितल आणि सुनील यांनी प्रेमाची व नव्या स्वप्नाची गाठ बांधली.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे या अनोख्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक, कर्नल भार्गव, किशोर सरपोतदार, सुभाष सरपाले, मंडळाचे अध्यक्ष पराग शिंदे, अमर लांडे, सचिन ससाणे, रोहिणी चेन्नूर, सुनेत्रा राचेल्ला यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शितल केंद्रे ही मूळची नांदेडची तर सुनील पवार हा संगमनेरचा आहे. दोघेही वाघोलीच्या लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेत असतात. शितल ही संस्थेच्या ऑर्केस्ट्रा मध्ये गायिका असून दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. विवाह सोहळ्यात साखरपुडा, हळदी समारंभ विवाहाचे धार्मिक विधी पार पडले. लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेच्या सहयोगाने दरवर्षी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
गणेशोत्सव मंडळातील पदाधिका-यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मुलींचे मामा म्हणून कन्यादान केले. मेहेंदी, साखरपुडा, हळदी समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला.
९ वर्षीय मुलींवर अत्याचाराच्या पुण्यात २ घटना
पुणे- धनकवडी आणि कोंढवा अशा २ ठिकाणी प्रत्येकी ९/९ वर्षे वयाच्या २ मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी सहकारनगर आणि कोंढवा पोलिसांनी दोन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे.
एका नऊ वर्षाच्या चिमुरडीसाेबत एका तरुणाने अश्लील वर्तन करुन तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. घडलेला प्रकार पीडित मुलीने तिच्या कुटुंबियांना सांगितल्यानंतर मुलीच्या 34 वर्षीय आईने पोलिसांकडे धाव घेत आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे.
त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी आराेपी राहुल राम कुमार (वय- 21,रा. धनकवडी,पुणे) या आराेपी विराेधात सहकारनगर पोलिस ठाण्यात विनयभंग आणि पाेक्साे कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार 2/5/2025 ते 3/5/2025 यादरम्यान झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी राहुल कुमार हा पीडित मुलीच्या घराच्या जवळ रहाण्यासाठी आहे. पीडित मुलगी हीचा पाठलाग करुन ती एकटी असताना तिच्या साेबत आराेपी तरुणाने अश्लील वर्तन केले. त्यानंतर तिला झालेला प्रकार काेणाला सांगू नकाे असा दबाव टाकत, घडलेला प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस काळे पुढील तपास करत आहे.
काेंढवा परिसरात रहाणाऱ्या एका कुटुंबातील नऊ वर्षीय मुलीस बाथरुमला जात असताना, साहिल अन्वर शेख (रा.काेंढवा,पुणे) या तरुणाने तिला बाथरुम मध्ये बळजबरीने ताेंड दाबून ओढून नेले. त्यानंतर दरवाजा लावून मुलीचे कपडे काढून त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. तसेच मुलगी याप्रकाराने घाबरुन ओरडल्यानंतर आराेपीने तिला ही गाेष्ट काेणाला सांगू नकाे नाहीतर तुला मी जीवे ठार मारुन टाकेन. त्यामुळे मुलगी बाथरुमचा दरवाजा उघडल्यानंतर पळतच तिच्या आईकडे जाऊन तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या 26 वर्षीय आईने याबाबत काेंढवा पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे.
बारावी परीक्षेचा निकाल जाहीर:राज्यात 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण, राज्यात कोकण प्रथम तर पुणे सहाव्या स्थानी
कोकणचा सर्वाधिक अव्वल तर लातूरचा सर्वात कमी निकाल
पुणे-सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९६.७४%). सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा (८९.४६ %) आहे.
कोकण – 96.74%,कोल्हापूर – 93.64%,मुंबई – 92.93%,संभाजीनगर – 92.24%,अमरावती – 91.43%,पुणे – 91.32%,नाशिक – 91.31%,नागपूर – 90.52%,लातूर – 89.46%
असा उत्तीर्ण निकाल लागला आहे.
एचएससी बोर्डाने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला आहे. यंदा तब्बल 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी सांगितले की, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत झालेल्या या परीक्षेचा निकाल विषयनिहाय गुणांसह 9 विविध संकेतस्थळांवर उपलब्ध होईल.
यंदा राज्यात बारावी परीक्षा निकाल 91.88%टक्के लागला आहे. फेब्रुवारी-मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के होता. फेब्रुवारी-मार्च 2024 च्या तुलनेत फेब्रुवारी-मार्च 2025 चा निकाल 1.49 टक्केने कमी आहे.परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावर्षी एकूण 91.88%विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाने सर्वाधिक 97.99% निकालासह अव्वल स्थान पटकावले. मुलींनी यंदाही मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. निकाल mahresult.nic.in, mahahsscboard.in आणि इतर अधिकृत वेबसाइट्सवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना रोल नंबर व आईचे नाव वापरून निकाल पाहता येईल.
कोणत्या विभागाचा किती निकाल?
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे.
खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६,१३३ एवढी असून त्यापैकी ३५,६९७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३ आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,२५८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६,७०५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३८ आहे.
इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९६.७४%). सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा (८९.४६ %) आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८% असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ % आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७% ने जास्त आहे.
एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल १००% आहे.
खालील वेबसाइट्सवर निकाल पाहता येतील
https://results.digilocker.gov.in
http://hscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
निकाल कसा चेक कराल?
सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर जा.
होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. तसेच सोबत आईचे नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
या निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
ICSE, ISC बोर्डाचे निकाल जाहीर
दरम्यान, भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने म्हणजेच CISCE ने 30 एप्रिल रोजी ISC आणि ICSE बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले. यामध्ये 99.64 टक्के मुले आणि 99.45 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. आयएससी बारावीच्या परीक्षा 13 फेब्रुवारी ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत झाल्या होत्या, तर आयसीएसई दहावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारी ते 27 मार्च 2025 या कालावधीत झाल्या होत्या. बारावीच्या परीक्षेत 1.06 लाख विद्यार्थी बसले होते तर दहावीच्या परीक्षेत 2.53 लाख विद्यार्थी बसले होते.
निकाल पाहण्यासाठी आवश्यक माहिती:
रोल नंबर
आईचे पहिले नाव
निकाल पाहण्याची पद्धत:
वरीलपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
‘HSC Result 2025’ लिंकवर क्लिक करा.
आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव टाका.
‘View Result’ किंवा ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
आपला निकाल स्क्रीनवर दिसेल; तो डाउनलोड करून प्रिंट काढा
सुबद्ध संगीत समारोह रसिकांसाठी ठर ला पर्वणी
गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सुबद्ध संगीत समारोहात विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या रागांचे प्रतिथयश कलाकारांनी सादरीकरण केले. शुद्ध सारंग, झिंझोटी, अल्हैया बिलावल, खमाज, मुलतानी, मारवा, अहिरभैरव, शामकल्याण, रागेश्री, हंसध्वनी, शंकरा, पुरिया धनाश्री, गावती अशा विविध रागांचे सादरीकरण तीन दिवसीय समारोहात झाले.
दि. 1 ते 3 मे या कालावधीत गांधर्व महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात सुबद्ध संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्तसुरांमध्ये रंगलेला समारोह रसिकांसाठी पर्वणी ठरला. समारोहाच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात डॉ. राजश्री महाजनी यांनी शुद्ध सारंग रागातील ‘आयी सब मिल देवो मुबारक बतिया’ ही बंदिशीने केली. त्यानंतर झिंझोटी रागातील दोन बंदिशी सादर करून शुद्ध सारंगमधील ‘अब मोरी बात मानले पिहरवा’ या बंदिशीने सांगता केली.
यानंतर स्वानंदी सडोलीकर यांचे सुश्राव्य गायन झाले. त्यांनी अल्हैया बिलावल रागातील ‘माई इक तो कथा’ ही बंदिश सादर करून हिंडोल रागातील ‘पैंजनिया मोरी बाजन लागी’ आणि ‘सजनवा आ मोरे ’ या बंदिशी सादर केल्या. लहान मुलांना शास्त्रीय संगीताची गोडी लागावी या हेतूने कार्यरत असणाऱ्या सडोलीकर यांनी दीपचंदी रागात ‘कितना मजा आता होगा, सायकल जब वो चलाता होगा’ या कवितेचे सादरीकरण करून रसिकांना चकित केले.
पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात सूरमणी धनंजय जोशी यांचे सुरेल गायन झाले. सुरुवातीस त्यांनी रागेश्री रागातील ‘राखो पत मोरी’ ही रचनासादर केली.
समारोहाच्या दुसऱ्या दिवशी हर्षद डोंगरे यांनी राग मुलतानीमधील दोन पारंपरिक रचना सादर केल्या. यासह मारवा रागातील गुणीदास रचित ‘हो गुणियन मिल गावो बजावो’ तसेच जयजयवंती रागातील ‘माने ना मोरा जियरा’ ही स्वरचित बंदिश सादर केली. त्यानंतर सवाई गंधर्व यांच्या पणतसून श्रुती देशपांडे यांचे सुमधूर गायन झाले. त्यांनी अहिरभैरव रागातील ‘ए रसिया म्हारा’ ही रचना सादर करून गुरू पद्माताई देशपांडे यांनी रचलेली श्यामकल्याण रागातील ‘रघुनंदन खेलन मांगे चांद’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली. दुसऱ्या दिवसाची सांगता डॉ. रवी फडके यांच्या गायनाने झाली. त्यांनी रागेश्री रागातील छोटे ख्याल आणि राग हंसध्वनी सादर करून आपल्या मैफलीची सांगता मेहंदी हसन यांनी सुप्रसिद्ध केलेल्या ‘तनहा तनहा मत सोचा कर’ या गझल सादरीकरणाने केली.
समारोहाचा सुरेल समारोप शुभदा देशपांडे, शिल्पा आठले, राधिका ताम्हनकर, सावनी गोगटे यांच्या गायनाने झाला. शुभदा देशपांडे यांनी शंकरा रागातील विलंबित ख्यालातील रचनेने सादरीकरणाची सुरुवात केली. मिश्र पिलू रागातील रचना सादर करून होरी ऐकविली. अखेरीस मास्टर दिनानाथ यांचे ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला’ नाट्यगीत सादर केले. त्यानंतर शिल्पा आठले यांनी पूरिया धनाश्री रागातील ‘पायलिया झनकार मोरी’ ही पारंपरिक बंदिश ऐकविली. त्यानंतर कलावती रागातील विलंबित रूपक आणि तराणा सादर केला.
राधिका ताम्हनकर यांनी मैफलीची सुरुवात राग गावतीने केली. त्यानंतर तराणा सादर केला. गुरू पंडित हेमंत पेंडसे यांच्या ‘यदुवर लागत हे मोहे प्यारो’ या उपशास्त्रीय गायकीतील बंदिश सादर करून रसिकांची मने जिंकली.
तीन दिवसीय सांगीतिक समारोहाचा समारोप सावनी गोगटे यांच्या गायनाने झाला. राग हमीरमधील पारंपरिक बंदिश सादर करून ‘पनघट पे जल भरन रे मै कैसे जाऊ’ या राग बहारमधील बंदिशीने त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
कलाकारांना अभिजित बारटक्के, ऋषिकेश जगताप, संजय करंदीकर (तबला), पंडित प्रमोद मराठे, निलय साळवी, अमेय बिचू, अंशुला मोरे (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली. कलाकारांचे स्वागत पंडित प्रमोद मराठे, डॉ. माधुरी डोंगरे, डॉ. प्रकाश कुलकर्णी, पंडित हेमंत पेंडसे यांनी केले.
हास्ययोग चळवळ समाजाला सकारात्मक, सुदृढ बनवतेय-चंद्रशेखर बावनकुळे
नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे जागतिक हास्ययोग दिन साजरा
पुणे: “नवचैतन्य हास्ययोग परिवार ही समाज सकारात्मक करणारी आरोग्याची चळवळ आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच हास्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. जगामध्ये आज १२० देशात जागतिक हास्यदिन साजरा होत आहे. हास्यामुळे सकारात्मकता येते. सकारात्मक विचारांची माणसे समाजात चांगला बदल घडवतात. मनाने प्रसन्न असणारी माणसे दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी मदत करतात. म्हणूनच ज्येष्ठांबरोबरच तरुण माणसेही या पद्धतीचा उपयोग करत आहेत,” असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
जागतिक हास्ययोग दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजिलेल्या विशेष हास्ययोग कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. प्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांचे ‘आनंदाच्या वाटा’ या विषयावर व्याख्यान झाले. प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे, जयराज ग्रुपचे राजेश शहा, प्रसिद्ध व्यावसायिक प्रकाश धोका, पितांबरी प्रोडक्ट्सचे महेश जोशी, किरण दगडे पाटील, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे व सुमन काटे (व्हर्च्युअली), हास्ययोग परिवाराचे मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजय भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी, खजिनदार ऍड. रामचंद्र राऊत, विश्वस्त जयंत दशपुत्रे, प्रमोद ढेपे, दत्तात्रय कुंदेन, ऍड. एकनाथ सुगावकर, सुनील देशपांडे, अतुल सलाग्रे, हरीश पाठक आदी उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “जीवन सकारात्मक असेल, तर शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. आनंदी व सुदृढ समाजासाठी ही चळवळ मोलाचे योगदान देत आहे. ताणतणावापासून दूर राहण्यास हास्ययोगाचा उपयोग होतो. एखाद्या चिकित्सेप्रमाणे आज हास्ययोग काम करत असून, जागतिक स्तरावर याला मान्यता आहे. विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू यांच्या पुढाकाराने एक लाख लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचणार, यात काही शंका नाही. पुण्यात सुरु झालेली ही चळवळ नागपुरातही सुरु व्हावी.”
‘आनंद वाटा’वर विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. संजय कळमकर म्हणाले, “आपण जीवन जगताना आनंदातही चुका शोधत बसतो. तसे न चुकांमध्येही आनंद शोधण्याची सवय लावून घ्यायला हवी. सकारात्मक वृत्तीने आनंदाचा शोध घेत वाटचाल करत राहिलो, तर जीवन अधिक आनंदी होते. हास्ययोग ही सकारात्मक जीवन जगण्यासाठीची संजीवनी आहे.”
राजेश शहा यांनी हास्ययोग समाजात सकारात्मकता पेरत असल्याचे सांगितले. आगामी काळात एच. व्ही. देसाई हॉस्पिटलच्या माध्यमातून पुण्याला मोतीबिंदू मुक्त करण्याचा उपक्रम राबवणार आहोत. अधिकाधिक नागरिकांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. देसाई रुग्णालयात मोफत डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात येईल, असे शहा यांनी नमूद केले.
गेल्या २८ वर्षांपासून नियमित हास्ययोग करत असल्याने आजवर कोणताही आजार झाला नाही. त्यामुळे हास्ययोग खूप महत्वाचा असल्याचे प्रकाश धोका म्हणाले. महेश जोशी यांनी हास्ययोग चळवळ अधिक व्यापक व्हावी. ती घराघरात पोहोचावी. सध्याच्या धकाधकीच्या काळात लोकांच्या चेहऱ्यावर हसू परत आणण्याचे काम ही चळवळ करत असल्याचे ते म्हणाले.
मकरंद टिल्लू म्हणाले, “जगामध्ये हास्य क्लब ही चळवळ सुरू होण्याचे हे तिसावे वर्ष आहे. नवचैतन्य हास्ययोग परिवार २३५ शाखांच्या माध्यमातून २५ हजार लोकांना रोज हास्ययोग करायला लावते. एक लाख लोकांना या हास्य चळवळीत जोडून घेण्याचे उद्दिष्ट्य आहे.”
यानिमित्ताने हास्ययोगाचे प्रकार, मनोगते, मान्यवरांचे सत्कार झाले. बालगंधर्व रंगमंदिर खचाखच भरून गेले होते. उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हास्ययोग केला. विजय भोसले यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. हर्षदा टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. एकनाथ सुगावकर यांनी आभार मानले.
