Home Blog Page 3263

सुहाना सफर ये मौसम हसीं…दिलीप राज देवच्या चाहत्यानी मोहनगरीतून केली संगीत सफर

0

पुणे – सुहाना सफर ये मोसम हसीं……या मधुमतीतील दिलीपकुमारच्या गाण्याने सुरू झालेली दिलीप – राज – देवच्या सुवर्णंमय युगाची संगीतमय सफर त्यांच्या चाहत्यांनी अभी ना जाओ छोडकर अभी दिल भरा नहिं……..असं गुणगुणत भरल्या अंतकरणाने संपवली. सर्वजण त्यांच्या काळातील आठवणी मनात साठवत निरोप घेत असताना साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांनी मराठी माणसाचा उत्सवी आनंद साजरा करण्याच्या “चटकदार खमंग….फराळ……नवे कपडे आणि सोबतीला टीपॉयवर किमान दोनतरी दिवाळी अंक हवेतच” या केलेल्या व्याख्येची प्रचिती येत होती.

निमित्त होते “मोहनगरी” या दिपीलकुमार – राजकपूर – देवानंद यांच्या मोहमयी….सुवर्णयुगाच्या दिवाळी विशेष अंकाच्या प्रकाशनाचे. मोहनगरीचा हा पहिलाच दिवाळी अंक असून तो दिलीप राज देव विशेषांक म्हणून संपादक आनंद लाकटक यांनी काढला आहे. अंकाचे प्रकाशन खास समारंभात न करता त्यांनी दिलीप राज देव यांच्या चाहत्यांना त्यांच्या युगाची आठवण त्यांच्याच गाजलेल्या चित्रपट गीतातून करून दिली. अंकाचे प्रकाशन विनोदी साहित्यिक मुकुंद टाकसाळे यांनी केले आणि मराठी माणसाच्या आनंदाची व्याख्या ही फक्त खमंग फराळ खाणंपिण आणि नवे कपडे यापुरती मर्यादित नसून ती वाचनाशीही निगडीत असल्याने किमान दोन तरी दिवाळी अंक टेबलावर लागतातच असे नमूद केले. हिंदी चित्रपट सृष्टी हा सुद्धा मराठी माणसाच्या किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे समोरच्या रसिकांच्या गर्दीने अधोरेखीत केले.

संपादक आनंद लाटकर यांनी, चित्रपट सृष्टीशी संबंधित अंकाची संख्या तुलनेत कमी असल्याने मोहनगरी हा दिलीप राज देव विशेष दिवाळी अंक काढण्याचे धाडस केले आणि ते अनेकांच्या मदतीने पूर्णत्वास गेले. कॉलेजच्या दिवसात मॅटिनी चित्रपट बघण्यापासून सुरू झालेली हिंदी चित्रपट कलाकारांबद्दलची आवड आज परिपक्व होत असून हा इमोशनल मॅडनेस असल्याचे त्यांनी निख्खळपणे कबूलही केले. यापुढे असेच वेगवेगळ्या विषयावरील दिवाळी अंक काढण्याचेही जाहीर केले.

हा दिवाळी अंकाचा टिपिकल प्रकाशन सोहळा नव्हता तर दिलीप राज देवानंदच्या सदाहबार युगाची संगीतमय सफऱ होती. झलकच्या यांच्या वाद्यावृंदाच्या साथीने अविनाश वैजापूरकर, आनंद लाटकर अभिजीत वाडेकर, प्रतिभा देशपांडे, श्रृती देवस्थळी आदींनी दिलीपकुमारच्या मधुमती, लीडर, राम और शाम, गंगाजमुना, राजकपूरच्या अनाडी, चोरीचोरी, मेरा नाम जोकर, श्री ४२०, छलिया, देवानंदच्या गाईड, हमदोनो, प्रेमपुजारी, तेरे घर के सामने, सोलनां साल,  अशा गाजलेल्या निवडक पंधरा गाण्यांतून त्यांच्या चाहत्यांना ही सफर घडवून आणली. या संगीतमय सफरीचा शेवट अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहिं….या गाजलेल्या गाण्याने झाली. हेच शब्द गुणगुणत… आपल्या तरूणपणच्या दिवसातील आठवणीत रमत रसिकांनीही निरोप घेतला.

‘आई’ पणाची नाती’ (अभिनेता विजय कोटस्थाने- दिवाळी विशेष )

0

 

पणजी, आजी, आई

बायको, मुलगी, नात

स्त्री नाती अनुभवली

पुरुष जीवनात !! १ !!

प्रत्येक नात्यातलं आईपण

सांभाळत गेलं मला

स्त्री म्हणजे आदिशक्ती

कळत गेलं मला !! २ !!

मावशी, मामी, आत्यांनी

सतत केली माया

आनंदाने मला शिकवले

हसतमुखाने जगाया !! ३ !!

बहिणीने मला राखी बांधून

निर्मळतेचा सांधला दुवा

‘औक्षण’ आणि ‘रक्षण’ करून

सावरून घेतले भावा !! ४ !!

आई पणाची नाती

अनुभवतो या जगती

म्हणूनच पृथ्वी आहे

माता धरती

माता धरती !! ५ !!

Regards

Vijay Kotasthane
9325019330

कात्रज-गुजरवाडी फाटा येथे रस्त्यातील खड्ड्यांचे पुजन करून प्रशासनासह लोकप्रतिनिधींचा निषेध

0

पुणे -सातारारोड वरील गुजरवाडी फाटा पासून ते भिलारेवाडी पर्यंतच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहे .
या रस्त्याची दुरावस्था कित्येक दिवसांपासून तशीच आहे.लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला वारंवार या गोष्टीचा पाठपुरवठा करुन , सांगून सुद्धा याबाबत दखल घेतली जात नाही अशी परिस्थिती आहेया पार्शवभूमीवर शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने सुवासिनींच्या हाताने रस्त्यावरील खड्डयाचे पुजन करुन तिथे वृक्षारोपण करून निषेध व्यक्त करण्यात आला .

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूकीला मोठा अडथळा होऊन जनतेला आणि वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. मोठा अपघात होऊन बळी जाण्याची शक्यता असून कोणी दखल घेत नाही.प्रशासन नवीन टेंडर लागणार असून नवीन रस्ता होणार आहे,खड्डे दोन दिवसात बुजवून देतो अशी वारंवार उत्तरेमिळत असल्याचे सांगण्यात येते प्रत्यक्षात मात्र जैसे थे परिस्थिती वारंवार दिसते आहे .
या पावसाळ्याच्या दिवसामध्ये येथे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे,असा आरोप करीत शिवशंभू प्रतिष्ठान व महेश कदम यांनी हे खड्डे बुजवण्याचे व रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे.नाहीतर यापेक्षा तीव्र आंदोलन शिवशंभू प्रतिष्ठान कडून करण्यात येईल असा इशारा आता दिला आहे .

दलित मतांची दलाली थांबावी :तुषार गांधी

0
पुणे :
अनेक दशकांच्या लढ्यानंतरही बहिष्कृत समाजाचे प्रश्न सुटले नसून मनातील जात संपली नाही ,म्हणून व्यापक जातीअंताची आणि परिवर्तनाची लढाई लढावी लागेल ,तसे करताना दलित मतांची दलाली थांबावी ‘ असा सूर आज सायंकाळी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह ‘ आयोजित परिसंवादात उमटला .
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित  ‘जाती संस्था और वर्तमान दलित राजनीती ‘ या विषयावरील परिसंवादाने राष्ट्रपिता गांधी सप्ताह चा समारोप झाला . समारोपाच्या परिसंवादात  महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी ,गुजरातच्या दलित चळवळीतील युवा नेते जिग्नेश मेवाणी ,जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (दिल्ली ) मधील प्राध्यापक डॉ  मिलिंद आव्हाड सहभागी झाले . अध्यक्षस्थानी डॉ कुमार सप्तर्षी होते .
तुषार गांधी म्हणाले ,’जाती व्यवस्था संपली नाही या विषयावर आज बोलावे लागत आहे ,हीच दुःखदायक गोष्ट आहे . आजही दलित ,मागास समाजावर अत्याचार -अन्याय होत आहेत . आरक्षणाला नावे ठेवली जात आहेत . प्रत्यक्षात दलितांचे शोषण होत असून त्यांच्या मतांची दलाली थांबली पाहिजे . दलितांवर होणारे अत्याचार थांबले नाहीत याला दलित राजकारणही कारणीभूत आहे . कोणत्याही एका समाजघटकावर  अन्याय होताना इतर समाजघटक गप्प बसतात ,हेही धक्कादायक आहे  ‘
डॉ मिलिंद आव्हाड म्हणाले ,’भारतातील जात व्यवस्था भांडवली दृष्टीकोनातून झालेली नाही ,तर ती धार्मिक संचितातून झालेली आहे . त्याचे ‘घेट्टोकरण ‘झाले असून ते विवेकाने तोडले पाहिजे . आजही दलितांवर अन्याय होत आहे ,बहिष्कृत समाजाचे ,महिलांचे प्रश्न सुटलेले नाहीत . काय खावे ,कसे वावरावे असे सांगणारा गंभीर काळ आला आहे . अभिव्यक्ती स्वातंत्र्य ,खान-पान स्वातंत्र्य संपवले जात आहे ,अशा परिस्थितीत व्यापक परिवर्तनाचा पर्यायी मंच उभा केला पाहिजे . ‘
जिग्नेश मेवाणी म्हणाले ,’गुजरातमधील सबका साथ -सबका विकास ‘ ची कहाणी खोटी आहे . तेथील विकास दलितांना बरोबर घेत नाही . तेथे अदानी ,अंबानी याना पाहिजे एव्हडी जमीन मिळते ,पण दलित भूमिहीनांना सरकारने दिलेली १ लाख १७ हजार एकर जमीन प्रत्यक्षात ताब्यात मिळत नाही ,कारण तेथे सवर्णांनी अतिक्रमण केलेलं आहे . गांधी आणि आंबेडकर यांचे विचार घेऊन वर्णवर्चस्व वादी ,फॅसिस्ट विचारांविरुद्ध रस्त्यावर मोठा लढा उभारावा लागणार आहे .
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ कुमार सप्तर्षी म्हणाले ,’जात विरहीत झाल्याशिवाय क्रांतीच्या गोष्टी बोलता येणार नाहीत . डोक्यात जात बसल्याने नवे महापुरुष ,क्रांतिकारक ,नवे विचार स्वीकारले जात नाहीत . अशा परिस्थितीत शांत राहणे हाच एक कट असून  अहिंसक  आक्रमकतेची गरज आहे ‘

महागाईविरोधात सोशलिस्ट पार्टी (इंडिया) चे आंदोलन

0

पुणेः केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल-डिझेलचे भाव
गगनाला भिडले आहेत, अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीही सर्वसामान्यांच्या
आवाक्याबाहेर गेल्या आहेत. दूध, साखर, डाळी, तेल आदी जीवनावश्यक वस्तूंचे
दरही भरमसाठ वाढले आहेत. ऐन सणासुदीला झालेल्या या महागाईमुळे
सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात ठेवण्यात केंद्र
व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. दुसरीकडे नोटबंदी, जीएसटीच्या
बडग्यामुळे व्यापारी-व्यावसायिक वर्गही त्रस्त झाला आहे. अच्छे दिनाचे स्वप्न
दाखवून सत्तेत आलेले सरकार केवळ बड्या धनदांडग्यांसाठी फायद्याची धोरणे
राबवित असून आम आदमीचा मात्र तोटा होत आहे. त्यामुळे सर्वसामान्याच्या
संसाराचे आर्थिक गणित कोसळ्त आहे, अशी टीका सोशलिस्ट पार्टी (इंडिया)चे
पुणे शहर अध्यक्ष: अ‍ॅड. संतोष म्हस्के यांनी केली.
सरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ आणि महागाई रोखण्यासाठी
तातडीने उपाययोजना कराव्या, या मागणीसाठी सोशलिस्ट पार्टी (इंडिया)
पक्षातर्फे शुक्रवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी सायं. 7 वाजता दीप बंगला चौक(बँक
महर्षी चि. वि. जोग चौक) येथे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी
सोशलिस्ट पार्टी (इंडिया)चे कार्यकर्ते श्रीकृष्ण कुलकर्णी, वर्षा सपकाळ, संतोष
पवार, मंगल निकम, शकुंतला भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सोशलिस्ट पार्टी (इंडिया) चे सेक्रेटरी श्रीकृष्ण कुलकर्णी म्हणाले की,
आपल्या कराचा पैसासुद्धा आपल्यासाठी खर्च न करता उद्योगपतींची पोटं
भरायला वापरला जात आहे. एका बाजूला आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सेवा
कर वाढवले जात आहे आणि दुसरीकडे उद्योगपतींना कॉपोरेट कर कमी केला
आहे. शिक्षण, रेशन, औषधांवर खर्च कमी केला आहे, आणि उद्योगपतींना ५.७५
लाख कोटींचा कर माफ केला आहे! या सरकारला जाब विचारलाच पाहिजे!
महागाई विरुद्ध आपण सर्वांनी एक मोठी चळवळ उभी केली पाहिजे अशी
मागणीही त्यांनी केली.

चायनीज एज्युकेशन मिनिस्ट्री ‘च्या चिनी निबंध वाचन स्पर्धेत तन्मय साळवेकर तिसरा

0
‘पुणे :
‘चायनीज एज्युकेशन मिनिस्ट्री ‘च्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निबंध वाचन स्पर्धेत मिलेनियम नॅशनल स्कुल च्या तन्मय साळवेकर ला तिसरे पारितोषिक मिळाले . ‘माझी चिनी भाषा शिक्षिका ‘ या विषयावरील निबंधाचे वाचन तन्मय साळवेकरने केले होते. तन्मयचा  सत्कार मिलेनियम स्कुल चे संचालक अन्वित फाटक यांच्याहस्ते करण्यात आला . या वेळी ‘येह चायना ‘ संस्थेच्या संचालक उषा साहू ,’यिन -यांग ‘ सेंटर फॉर चायनीज लँग्वेज च्या संचालक यशोधरा गाडगीळ उपस्थित होत्या .
मिलेनियम नॅशनल स्कुल मध्ये २ वर्षांपासून चिनी भाषेचे वर्ग घेतले जातात . या उपक्रमात ६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असून त्यांना विविध परीक्षांत यश मिळाले आहे . या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव देखील यावेळी करण्यात आला .
——–

येत्या १७ नोव्हेंबरला राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘दशक्रिया’!

0

विविध चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसोबतच ३ राष्ट्रीय व ११ महाराष्ट्र राज्य पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या  सौ. कल्पना विलास कोठारी यांच्या ‘रंगनील क्रिएशन्स’ निर्मित व संजय कृष्णाजी पाटील लिखित – प्रस्तुत आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित ‘दशक्रिया’ या बहुचर्चीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चीत करण्यात आली असून येत्या १७ नोव्हेंबर २०१७ रोजी हा चित्रपट मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोवा इत्यादी ठिकाणी प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक संदिप भालचंद्र पाटील यांनी प्रथम पदार्पणातच ३ राष्ट्रीय आणि ११ राज्य पुरस्कारांवर आपले नाव कोरून विविध आंतरराष्ट्रीय सन्मान मिळून आपली दिग्दर्शनातील चुणूक दाखून दिली आहे. तसेच दर्जेदार चित्रपट निर्मितीची कास धरून सौ. कल्पना विलास कोठारी यांनी मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले आहे. यापूर्वी त्यांनी अभिनय आणि निर्मिती करीत नाट्यसृष्टीत दर्जेदार बालनाट्यकृती आणि व्यावसायिक नाट्यनिर्मिती केली आहे. ‘दशक्रिया’ सारख्या एका अत्यंत वेगळ्या विषयावरील निर्मिती करून त्यांनी चित्रपट निर्मितीत आपले भक्कम पाय रोवले आहेत. ‘जोगवा’, ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’सारख्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक प्रस्तुतकर्ते संजय कृष्णाजी पाटील यांनी  ‘दशक्रिया’ चे पटकथा, संवाद, गीते लिहिली आहेत. दशक्रियाची कथा जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ विजेत्या ‘दशक्रिया’ या साहित्यकृतीवर आधारित आहे.

६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘दशक्रिया’ला सर्वोत्कृष्ठ प्रादेशिक मराठी चित्रपट, सर्वोत्कृष्ठ पटकथा (रुपांतरीत), सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेता अश्या तीन सर्वोत्कृष्ठ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला तब्बल ११ पुरस्कारांनी गौरवण्यात आले. ‘कान्स’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ व बर्लिन येथे ‘इंडिया विक’ या विशेष विभागात महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने ‘दशक्रिया’ने जगभरातल्या सुजान आणि अभ्यासू रसिकांची वाहवा मिळविली आहे. तसेच भारतातील १० व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबातच संस्कृती कला दर्पणचे ४ पुरस्कार, सकाळ प्रीमिअर पुरस्कारांमध्ये स्पेशल ‘सोशल इम्पॅकट’ या विशेष पुरस्काराने गौरव, निफ मध्ये १३ विभागांसाठी नामांकने तर झी चित्रगौरव मध्ये एक नामांकन आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये २ पुरस्कार अशा विविध पारितोषिकांनी‘दशक्रिया’ला गौरवण्यात आले आहे.

‘दशक्रिया’ या चित्रपटातून आजच्या दांभिक समाजव्यवस्थेसोबतच वैचारिक जीवनाचं प्रतिबिंब दाखवीत जीवन आणि मरणाच्या दोन्ही बाजू रसिकप्रेक्षकांच्या हृदयाला भिडतात. जगभरातील चित्रपट महोत्सवांद्वारे भारतीय संस्कृती आणि परंपरेचे वेगळे दर्शन घडवण्याचे काम हा चित्रपट करीत आहे. या चित्रपटात जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, बालकलाकार आर्य आढाव, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, अशा शेलार, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर, उमेश मिटकरी, पंकज चेंबूरकर, मनाली सागर रायसोनी, रुचा मयुरेश शिवडे, अनुश्री फडणीस, रसिका चव्हाण, संदीप जुवाटकर, विद्यासागर अध्यापक, प्रशांत तपस्वी, अनिल राबाडे, संस्कृती रांगणेकर, राहुल शिरसाट, सोनाली मगर, उमेश बोलके, अभिजित झुंझारराव, गणेश चंदनशिवे, प्रफुल्ल घाग, मनोहर गोसावी, तृप्ती अटकेकर, विनोद दोंदे बालकलाकार विनायक घाडीगावकर, कैवल्य पिसे, आदित्य धुरी, क्षितिजा पंडित, श्रेया चौघुले, यांच्यासोबत जवळपास १५० नवोदितांना अभिनयाची संधी मिळाली असून आनंदा कारेकर, जयवंत वाडकर व कल्पना कोठारी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत.

जेष्ठ सिनेमॅटोग्राफर महेश आणे यांनी ‘दशक्रिया’चा कॅनव्हास जिवंत केला आहे. अमितराज यांचे संगीत चित्रपटाचे माधुर्य वाढविण्यात यशस्वी झाले असून स्वप्नील बांदोडकर, बालशाहिर पृथ्वीराज माळी, कस्तुरी वावरे, आरती केळकर, आरोही म्हात्रे यांनी स्वरांची उधळण केली आहे. नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले असून चंद्रशेखर मोरे यांनी कलादिग्दर्शन केले आहे. स्टोरीबोर्ड आर्टिस्ट अनिल जाधव असून महावीर साबण्णवार यांनी सिंकसाऊण्ड डिझाईन केले आहे. रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी आकर्षक रंगभूषा केली असून वेशभूषा सचिन लोवलेकर यांची आहे. निर्मिती संकल्पना सौ.स्वाती संजय पाटील यांची असून सुनील जाधव यांनी संकलन केले आहे. पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, मिलिंद जोशी यांनी दिले आहे तर स्थिर चित्रण किशोर निकम यांनी केले आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली चक्क देवेंद्र फडणवीसांची आरती…आरती वाचा जशीच्या तशी …

0

पुणे- राष्ट्रवादीचे नगरसेवक, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी आज चक्क मुख्यमंत्री , भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेची येथे आरती केली .कोथरूडला मेट्रो प्रकल्प आणि हडपसरला कचरा प्रकल्प … कोथरूड चा  कचरा डेपो जसा बंद करून त्यांना न्याय दिला मग हडपसर वर  अन्याय का ? अशा स्वरूपाच्या तक्रारी करत  कचरा प्रकल्पाला विरोध म्हणून हि आरती करण्यात आली .
हडपसर रामटेकडी कचरा प्रकल्प हटाव कृती समिती कडुन हडपसर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेची आरती ही प्रतिकात्मक म्हणून केली रामटेकडी येथील  कचरा प्रकल्पास विरोध म्हणून सर्व हडपसर वासीय एकत्र आले आहेत.त्यांनी कृती समिती स्थापन केली. असे सांगून  राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले  कि ,1 ऑक्टोबर रोजी सर्व स्थानिक नागरिकांनी एकत्र येउन मोर्चा केला.आयुक्त यांना निवेदन देण्यात आले तरीही नागरिकांचा विरोध लक्षात  न घेता पुणे मनपा व राज्य शासन मिळून हा प्रकल्प आमच्या वर लादत आहे.पुढील दिशा ठरविण्यासाठी आज मारुती मंदिर हडपसर येथे बैठक झाली.ह्या बैठकी नंतर मुख्यमंत्री ह्यांच्या प्रतिमेची प्रतिकात्मक आरती करण्यात आली.

आज मारूती मंदिरात देवा समाेर या मुख्यमंत्र्यांना सद्बुध्दी देण्यासाठी साकडे घालुन खालील आरती म्हटली गांधी चौकात मुख्यमंत्र्यांची आरती उपहासात्मक.
———————————-

जय देव जय देव जय मुख्यमंत्री
नका वाजवू तुम्ही आमची वाजंत्री

कचरा प्रकल्प का लादता हडपसरवरती
हिच का माया तुमची आमच्यावरती

जय देव जय देव जय मुख्यमंत्री
नका वाजवू तुम्ही आमची वाजंत्री

ज्या जनतेने दिली ताकद तुम्हांला त्यांच्याच आरोग्यावर घालता का घाला

कोथरूडला आणता मेट्रो प्रकल्प
हडपसरला मात्र कचरा संकल्प

जय देव जय देव जय मुख्यमंत्री
नका वाजवू तुम्ही आमची वाजंत्री

हडपसरवासी का दुर्लक्षीत केले
आम्हांला तुम्ही सावत्र समजले

आम्हांला तुम्ही लांब फेकले
आमच्याच माथी कचरा प्रकल्प लादले

आरोग्य आमचा हक्क मानावा
सुरक्षीत विकास हडपसरचा व्हावा.

हडपसरवासीयांचा ऐका हा आक्रोश
कचरा प्रकल्प हलवा आणि टाळा विनाश.

जय देव जय देव जय मुख्यमंत्री
नका वाजवू तुम्ही आमची वाजंत्री

जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत आझम कॅम्पस विजयी

0
पुणे :
जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे पालिकेचा शिक्षण विभाग आयोजित जिल्हास्तरीय सॉफ्ट बॉल स्पर्धेत आझम कॅम्पस ने विविध गटात विजय मिळवला . १९ वर्षाखालील मुलींच्या गटात आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाने मॉडर्न  कनिष्ठ महाविद्यालयाचा १-० होमरनने पराभव केला . १७ वर्षाखालील मुलांच्या गटात अँग्लो उर्दू  हायस्कुल -कनिष्ठ महाविद्यालयाने सेंट व्हिन्सेंट संघाचा १५-३ होमरनने पराभव केला . १४ वर्षाखालील मुलांच्या गटात एम .सी . एस . इंग्रजी माध्यम प्रशालेने मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर चा ८-१ होमरनने पराभव केला .१४ वर्षाखालील मुलींच्या गटात  एम .सी . एस . इंग्रजी माध्यम प्रशालेने मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड चा १५-४ होमरनने पराभव केला
विजयी संघांचे  पी ए इनामदार ,आबेदा इनामदार ,लतीफ मगदूम ,गुलझार शेख यांनी अभिनंदन केले

माझे काम वाढवू नका -पुण्याच्या रस्त्यावर अवतरले यमराज ..वाहतूक जनजागृतीसाठी..

0

  पुणे- द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबज डिस्ट्रिक्ट ३२३४ डी  २ रिजन  ५  व विश्रामबाग वाहतूक पोलिस विभाग परिमंडळ १ च्या संयुक्त विद्यमाने वाढत्या वाहनांच्या समस्यांवर जनजागृती व वाहतूक सुरक्षा विषयी जनजागृती कार्यक्रम अलका टॉकीज चौकात करण्यात आला .यावेळी यमराजाच्या वेशातील कलाकारांकडून वाहनचालकांना सावध रहा , आवर वेगाला , नियमबाह्य कृतींना आणि सावरा जीवाला असे संदेश देण्यात आले .

       यावेळी लायन्स क्लबच्या सदस्यांनी हातामध्ये वाहतूक जनजागृतीपर संदेशाचे फलक धरून वाहतूक नियमनाविषयी जनजागृती केली .  हेल्मेट घालण्याचे फायदे व अपघातापासून सुरक्षित राहण्यासाठी दुचाकी वाहनचालकांना प्रत्यक्षात यमराज  व चित्रगुप्त यांच्या वेशभूषेत असलेल्या कलाकारांनी  हेल्मेटधारकांना कॅडबरीचे वाटप करण्यात आले .

          आवरा वेगाला , सावरा जीवाला , वाहनचालविताना मोबाइलवर बोलू नका , यमराजासोबत जाण्याची घाई करू नका , रस्त्याचा आदर करा , दारू पियुन वाहन चालवू नका , मत करो इतनी मस्ती जिंदगी नही हे सस्ती , आपली सुरक्षा हीच आपल्या परिवाराची सुरक्षा आदी जनजागृतीपर संदेश देण्यात आले . तसेच , वाहतूक पोलीस कर्मचारी बांधवाना मास्क वाटप करण्यात आले . चारचाकी वाहनचालकांना सीट बेल्टचे महत्व सांगण्यात आले . पी एम पी एलच्या बसचालकांना व अन्य वाहनांना सुध्दा स्टॉप लाईन अगोदर थांबण्याची विनंती करण्यात आली .  यावेळी  विजय सारडा ,अभय शास्त्री , परमानंद शर्मा ,  सुमित देसर्डा , विनोद जैन ,  सचिन धोका ,  नितीन खोंड , इंद्रजित डोंगरे ,शशांक माळवदे व लायन  राहुल खैरे  आदींनी विशेष परिश्रम घेतले .या कार्यक्रमास ३०० आदिवासी बांधव उपस्थित होते .

    यावेळी संभाजी पोलिस चौकीचे वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील , विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वाहतूक विभागाचे परिमंडळ एकच्या सहाय्यक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड यांना सन्मानित  करण्यात आले .

तंत्राआधी कथेकडे लक्ष द्यावे : महेंद्र तेरेदेसाई

0
गांधी सप्ताह निमित्त आयोजित ‘ लघुपट निर्मिती’  कार्यशाळेला चांगला प्रतिसाद 
पुणे :
 ‘लघुपट निर्मितीच्या क्षेत्रात येण्यापूर्वी  माध्यम कळणे  महत्वाचे आहे ‘ असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी केले .
गांधी सप्ताह निमित्त  नवमहाराष्ट्र युवा अभियान ,प्रयोग (मालाड ) आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित ‘ लघुपट निर्मिती’  या विषयावर गांधी भवन येथे झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते . या कार्यशाळेत दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई ,प्रदीप देवरुखकर यांनीही मार्गदर्शन केले .
अशोक राणे म्हणाले ,’चित्रपट ,लघुपट ,माहितीपट यातील फरक समजावून घेतला पाहिजे . या निर्मिती क्षेत्रात कारकीर्द घडविण्याच्या भरपूर संधी आहेत मात्र त्याआधी हे माध्यम काय आहे ,हे समजावून घेतले पाहिजे . ‘फिल्म एकॅडेमिक्स ‘विषयातही भरपूर काम होण्याची गरज असून तरुणांनी त्यातही रस घ्यावा असे अशोक राणे यांनी सुचवले
सतत चित्रपट पाहणाऱ्या माणसाला समाजात वाया गेलेला माणूस समजले जाते ,मात्र ,सर्व प्रकारचे आणि सर्व भाषेतील चित्रपट पाहणे या क्षेत्रात येणाऱ्यासाठी आवश्यक गोष्ट आहे  .
  महेंद्र तेरेदेसाई म्हणाले ,’लघुपट हेही अभिव्यक्तीचे माध्यम आहे ,त्यातून आपण जे मांडणार ती गोष्ट महत्वाची असते . अनेकदा तंत्राकडे अधिक लक्ष दिले जाते ,आणि गोष्टीकडे दुर्लक्ष होते . गोष्ट चांगली असेल तरच तंत्र आपल्याला मदत करते . गोष्ट सुचताना ती दृश्य भाषेत सुचणे ही या क्षेत्रातील यशाची पहिली पायरी असते . ‘
 श्रीराम टेकाळे यांनी प्रास्ताविक केले . रविवारी झालेल्या या कार्यशाळेला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पारंपारिक पोशाखाच्या स्टोअरचे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते अनावरण.

0
जयहिंदचे विशेष पारंपारिक मेवार पोशाख आता पुणेकरांसाठी उपलब्ध.  
पुणे ८ अॅाक्टोबर २०१७  – 1980 पासूनच्या गुणवत्तापूर्ण कपडे व राजेशाही समृद्धीचा एक वारसा पुढे न्हेत जयहिंदने पुण्यातील कॅम्प येथे मेवार शोरूम या त्यांच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या विशेष पारंपरिक पद्धतीच्या कपड्यांचे शोरूम लाँच केले आहे. या शोरुमचे अनावरण पुण्याच्या महापौर आदरणीय मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाच्या वेळी संचालक दिनेश जैन, प्रविन जैन आणि विनोद जैन उपस्थीत होते.
पुण्यातील लक्ष्मी रोड, कोथरूड, औंध, कॅम्प, पुणे-सातारा रोड, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर येथील मल्टी-ब्रँड रिटेल स्टोअर द्वारे लोकांच्या पसंतीस उतरलेल्या जयहिंदने वस्त्रे व फॅशन उद्योगातील आपल्या समृद्ध अनुभवावरून पुरुषांसाठी सर्वोत्तम पारंपरिक पोशाख उपलब्ध करून देण्याची गरज ओळखली. याच कल्पनेवर अंमल करत जयहिंदने मेवार या विशेष भारतीय पारंपरिक पोशाखाचे पुण्यातील कॅम्प येथे भव्य मेवार शोरूम लाँच केले.
पुरुषांसाठीच्या पारंपरिक पोशाखांच्या उत्कृष्ट श्रेणीतील शेरवानी, बंधगला, इंडो-वेस्टर्न, चुडीदार कुर्ता, डिझाइनर सूट, पठाणी,फॅब्रीक   रेडी मेड्स व फेस्टिव्ह स्पेशॅलिटीतील अत्यंत दर्जेदार अलंकार, क्राफ्टवर्क आणि भरतकाम केलेले सर्वोत्तम वस्त्रे  शोरूम मध्ये आजच्या आधुनिक काळातील पुरुषांसाठी उपलब्ध होणार आहेत. कॅम्प मधील न्यूक्लियस मॉल मधील मेवार त्याच्या अभ्यागतांसाठी सर्वोत्तम वस्त्रांच्या श्रेणींसोबत आकर्षक ऑफर देखील घेऊन येणार आहे.

‘देशाला बौद्धिकदृष्ट्या विकलांग करण्याचा संघाचा प्रयत्न’

0
पुणे :
‘इतिहास घडविण्यापेक्षा इतिहासाचे विकृतीकरण करणे सोपे असल्याने, देशाला बौद्धिकदृष्ट्या विकलांग करण्याचे प्रयत्न संघाकडून सुरु आहेत’, असा आरोप महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी केला.
‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह’ मध्ये ‘जाती भेद आणि वर्तमान’ या विषयावर खुल्या संवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. कुमार सप्तर्षी होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक मिलिंद आव्हाड हे ही या संवाद कार्यक्रमात सहभागी होते.
गांधी हत्येची पुन्हा सुनावणी करण्याची मागणी हा गांधी हत्येबाबत सत्य आणि तथ्य दडविण्याच्या प्रयत्नाचा पुढील अध्याय आहे. खोटेपणा प्रमाणित करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका ही तुषार गांधी यांनी या कार्यक्रमात केली. गांधी तत्वाला विरोध करत प्रतिगामी शक्तींना गांधींच्या मांडीवर बसायचे आहे. इतिहासाचे विकृतीकरण करायचे आहे. अशा वेळी लोकशाहीवादी विचारांच्या आणि चळवळींमधील विखुरलेल्या, उदासीनता अधिक धोकादायक आहे.
महात्मा गांधी भय, कमजोरी, त्रुटी यावर मात कर महात्मा झाले. पण, सध्याच्या नेतृत्वात हा प्रामाणिकपणा नाही. ५६ इंची नेतृत्वात घमंड जास्त आणि जबाबदारीची भावना कमी आहे. त्यांच्यातील पोकळपणा आपल्याला आता दिसू लागला आहे.
मोदी किंवा भाजपाने आपल्याला मूर्ख बनवले नाही , तर आपण मूर्ख होतो, त्याचा फायदा घेतला. प्रतिगामी शक्तींनी समाजाचे नियोजनपूर्वक ध्रुवीकरण केले. २०१० पासून त्यांची गुजरातमध्ये सुरु असलेली प्रयोगशाळा आपल्या लक्षात उशिरा आली. हि प्रयोगशाळा आता भगव्या कपड्यातील व्यक्तीला उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री करून तेथे सुरु झाली आहे.
प्रा. मिलिंद आव्हाड म्हणाले, ‘पूर्वीच्या राजवटीतील राजकीय वाद आणि आत्ताच्या राजवटीतील राजकीय वाद पाहिले की धोका लक्षात येतो. कन्हैयाकुमार, जेएनयू विद्यार्थ्यांवरील आरोप, गोरक्षकांचा उना मधील धिंगाणा, लव्हजिहाद, घर वापसी असे नॉन इश्यू पुढे आणले जात आहेत.
लोकशाहीवादी संस्था, चळवळी संपवल्या जात आहेत. सत्याचा अपलाप करून वेगळीच कथा प्रसवणे, हे उजव्या शक्तींचे प्रमुख काम आहे. उजव्या शक्तींच्या राजकीय, सामाजिक धोरणांपेक्षा आता आर्थिक धोरणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ” वाईट कृत्ये करताना काँग्रेस जनांना अपराधीपणा वाटायचा, तो किमान खासगीत व्यक्त तरी व्हायचा, आता वाल्याचा वाल्मिकी करून आपल्याकडे घेण्यासाठी न  थांबता ‘वाल्या’ च पक्षात घेतला जात आहे. या सर्व प्रतापांविरुद्ध अखिल भारतीय पातळीवर एकत्र येण्याची गरज आहे.”
यावेळी अभय छाजेड, अरुण खोरे, महावीर जोंधळे, डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन, संदीप बर्वे, उपस्थितीत होते. गांधीभवन येथे शनिवारी सकाळी हा खुला संवाद झाला.

स्फूर्ती महिला मंडळाच्या ‘स्माईल’ संस्थेच्या वतीने दिवाळी निमित्त प्रदर्शन

0

पुणे :

‘स्माईल’(सावित्री मार्केटिंग इन्स्टिट्यूट फॉर लेडिज एम्पावरमेंट) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने महिला बचत गट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दिनांक 12 ऑक्टोबर पासून ते 15 ऑक्टोबर 2017 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत विश्रामबाग वाडा येथे सर्वांसाठी खुले राहणार आहेे.

‘स्फूर्ती महिला मंडळा’च्या अध्यक्ष, खासदार अ‍ॅड वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले ‘स्माईल’ हे विक्री केंद्र गेली 17 वर्षे लोकमान्य नगर, कात्रज आणि विश्रामबाग वाडा येथे सुरू आहे.

दिवाळीनिमित्त आयोजित या प्रदर्शनामध्ये ‘स्माईल’ संस्थेच्या बचट गटातील महिला उद्योजकांनी खण आणि जूटपासून तयार केलेल्या बॅग, दिवाळी फराळ, विविध प्रकारच्या पणत्या, भेट वस्तू, आकाशकंदील, ज्वेलरी आदी वस्तूंचा समावेश या प्रदर्शनात आहे.

‘उद्योजक महिलांच्या सुप्त कलेला योग्य वाट देण्याकरीता, महिलांचे सक्षमीकरण तसेच त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी हक्काचे विक्री केंद्र असलेल्या ‘स्माईल’ (सावित्री मार्केटिंग इन्स्टिट्यूट फॉर लेडिज एम्पावरमेंट) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आयोजित दिवाळी प्रदर्शन महिलांसाठी उपयुक्त ठरेल.

तरी पुणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन खा.वंदना चव्हाण (‘स्फूर्ती महिला मंडळा’च्या अध्यक्ष) यांनी केले आहे.

पिंपरी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

0

पुणे, दि. 7: खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना मनुष्यबळ त्वरीत मिळवुन देण्यासाठी तसेच उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पिंपरी आणि सिहगड टेक्नीकल एज्युकेशन सोसायटीचे, सिहगड इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड कॉमप्युटर ॲप्लीकेशन पुणे-मुंबई हायवे नर्ऱ्हे आंबेगाव व सॉप्टझिल टेक्नॉलजिस प्रा.लि डेक्कन, पुणे यांच्या संयुकत विद्यमाने गुरुवार 12 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सिहगड टेक्नीकल एज्युकेशन सोसायटीचे, सिहगड इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट ऍ़न्ड कॉमप्युटर ऍ़प्लीकेशन पुणे-मुंबई हायवे नर्ऱ्हे आंबेगाव, पुणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या मेळाव्यासाठी  नामांकित उद्योजक सहभागी होणार असून विविध प्रकाराची रिक्तपदे रोजगार मेळाव्यासाठी नोंदविण्यात आलेली आहेत. या मेळाव्यात कंपन्यांकडुन उमेदवारांच्या जागेवरच मुलाखती घेऊन उमेदवारांना  निवडीची संधी  उपलब्ध होणार आहे. तसेच उद्योजकांना त्यांचेकडील रिक्तपदे तातडीने भरणे सोईचे होणार आहे. या रोजगार मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ठय असे आहे की, या रोजगार मेळाव्यात ज्या उमेदवारांनी एम्प्लॉयमेंटचे कार्ड काढलेले नाही अशा  उमेदवाराला ऑनलाईन नविन कार्ड काढण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी वि.वि.कानिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.