Home Blog Page 326

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध

पुणे, दि. ५: महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले असून परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी सुधारित तरतूदीबाबत शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.सुधारित तरतुदीनुसार व्यावसायिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ठ असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवारही या चाचणी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करु शकतील. पात्र उमेदवारांनी http://ibpsonline.ibps.in/mscepmar25 या लिंकद्वारे विहित मुदतीत आवेदन पत्र सादर करावेत, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.

0000

13 वर्षाच्या विद्यार्थ्यांशी शिक्षिकेचे प्रेमप्रकरण,गर्भवती झाली,अन् विद्यार्थ्यांबरोबर पळूनही गेली,राजस्थान सीमेवर पकडले गेले.

सुरत : १३ वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेलेल्या २३ वर्षीय गर्भवती शिक्षिकेला पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली. चार दिवसांनंतर पोलिसांना शिक्षिकेला अटक करण्यात यश आले.चौकशीदरम्यान महिला शिक्षिकेने पोलिसांना सांगितले की, ती पाच महिन्यांची गर्भवती आहे. हे मूल त्या १३ वर्षीय विद्यार्थ्याचे आहे. यामुळे ती विद्यार्थ्यासोबत पळून गेली. तर आता त्या मुलाचा डीएनए अहवाल समोर आला आहे. यातून एक मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे.

पोलीस चौकशीदरम्यान, विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली दिली. विद्यार्थ्याचा वैद्यकीय अहवालही धक्कादायक आहे. अहवालात असे दिसून आले की तो वडील होण्यास सक्षम आहे. पोलीस न जन्मलेल्या बाळाची आणि विद्यार्थ्याची डीएनए चाचणी करण्याची तयारी करत आहेत. पोलिसांनी आधीच शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता POCSO कायद्यातील कलमे देखील जोडण्यात आली आहेत.

हे प्रकरण सुरतमधील आहे. २५ एप्रिल रोजी शिक्षिका येथे राहणाऱ्या एका १३ वर्षीय विद्यार्थ्यासह पळून गेली होती. अखेर ३० एप्रिल रोजी पोलिसांनी दोघांनाही जयपूरहून अहमदाबादला जाणाऱ्या बसमध्ये राजस्थान सीमेजवळ पकडले. चौकशीदरम्यान, शिक्षिकेने अनेक धक्कादायक खुलासे केले. तिने सांगितले की, दोघेही सुरतहून पळून गेले आणि वडोदरा येथे पोहोचले. हॉटेलमध्ये रात्र घालवल्यानंतर आम्ही सकाळी अहमदाबादला पोहोचलो.

अहमदाबादमध्ये संपूर्ण दिवस घालवल्यानंतर आम्ही रात्रीच्या बसने जयपूरला पोहोचलो. दोघेही जयपूरमध्ये एक दिवस राहिले. नंतर दिल्लीला पोहोचलो. दिल्लीहून वृंदावनला पोहोचलो आणि मंदिराचे दर्शन घेतले. मग दोघेही जयपूरला परतले. शिक्षिकेने सांगितले की, या काळात दोघांनीही अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. तिचे गेल्या दोन वर्षांपासून तिच्या विद्यार्थ्यासोबत प्रेमसंबंध होते. तिचे त्या विद्यार्थ्याशी सुमारे एक वर्षापासून शारिरीक संबंध होते.

अलिकडेच, जेव्हा तिला तिच्या गरोदरपणाबद्दल कळले तेव्हा ती त्या विद्यार्थिनीसोबत पळून गेली. तिची योजना त्या विद्यार्थ्यासोबत दुसऱ्या शहरात लपण्याची होती. शिक्षिकेने तिच्या जबाबात म्हटले आहे की, जेव्हा तिला समजले की ती गर्भवती आहे, तेव्हा तिने त्या मुलासोबत पळून जाण्याचा विचार केला. यासाठी तिने विद्यार्थ्याला दोन-तीन जोड्या कपडे पाठवण्यास सांगितले होते. पळून जाण्याच्या फक्त दोन दिवस आधी तिने एक नवीन ट्रॉली बॅग, स्कूल बॅग आणि सिम कार्ड देखील खरेदी केले होते. २५ एप्रिल रोजी दुपारी सुरतहून पळून जाण्यापूर्वी शिक्षिकेने मुलासाठी एक जोडी नवीन कपडे आणि बूट देखील खरेदी केले होते.

शिक्षिका म्हणते की, जेव्हा विद्यार्थी पाचवीत शिकत होता तेव्हा ती त्याच्या घरी जाऊन त्याला शिकवणी शिकवत असे. यानंतर तिने विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी घरी बोलावण्यास सुरुवात केली. शिक्षिकेने अनेकदा त्याच्या घरी मुलाचे शारीरिक शोषण केले होते. सुरतच्या पुणे पोलिसांनी शिक्षकाला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. सीसीटीव्ही फुटेजसह इतर पुरावे देखील गोळा केले जातील. सुरुवातीला विद्यार्थ्याचे वय १३ वर्षे असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु पोलीस तपासात तो विद्यार्थी १३ वर्षांपेक्षा जास्त वयाचा असल्याचे समोर आले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

पुरंदरमध्ये लड्डा, लोढा ‘शेतकरी’ कधी झाले? मंत्रालयातील गद्दार, दलालांच्या टोळय़ांकडून जमिनीची सौदेबाजी


मंत्रालयातील काही दलालांनी येथील गद्दारांना हाताशी धरून पुरंदर विमानतळासाठी गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात घेऊन चढय़ा दराने विकण्याची सौदेबाजी सुरू केली आहे. हा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही.विमानतळासाठी संपादित होणाऱ्या जमिनी लड्डा, लोढा आणि काही अग्रवाल यांच्या आहेत. ते पुरंदरमध्ये ‘शेतकरी’ कधी झाले?’ असा सवाल करून, ‘पुरंदरच्या विमानतळासाठी शेतकऱ्यांची इंचभरदेखील जमीन घेऊ दिली जाणार नाही,’ असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला दिला.

पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर काल (शनिवारी) बेछूट लाठीहल्ला करण्यात आला. यामध्ये अनेक शेतकरी आंदोलक जखमी झाले आहेत. तसेच आपले घरदार, जमीन विमानतळासाठी जाणार, याचा ताण आल्याने काल आंदोलनाच्या वेळीच पुंभारवळण येथील अंजनाबाई कामठे यांचा मृत्यू झाला. त्यांचे सांत्वन करण्यासाठी व विमानतळबाधित शेतकरी आंदोलकांची भूमिका समजून घेण्यासाठी आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुंभारवळण येथे भेट दिली. त्यांच्यासमवेत शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर, उपनेत्या सुषमा अंधारे, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, तालुकाप्रमुख अभिजित जगताप, किरण दावलकर, राजेंद्र जगताप, राजेंद्र क्षीरसागर, शुभम झिंझुर्पे, पुंभारवळण गावच्या सरपंच अंजुश्री गायकवाड, उपसरपंच संदीप कामठे उपस्थित होते.

यावेळी पुंभारवळण येथे झालेल्या शोकसभेत बोलताना दानवे म्हणाले, ‘भूसंपादन अधिकाऱ्यांना, कलेक्टरला शेतकऱ्यांच्या वेदना कळणार नाहीत. जमीन, घरदार जाण्याच्या वेदनेतूनच अंजनाबाई कामठे यांचे निधन झाले. याला सरकार जबाबदार आहे. विमानतळासाठी 2673 हेक्टर जमीन संपादित केली जात आहे. यातील 10 हेक्टर जमीन बिनशेतीची, तर 428 हेक्टर जमीन जिराईत आहे. 2232 हेक्टर बागायत क्षेत्र आहे. म्हणजे 85 टक्के जमीन बागायती आहे. कायद्यानुसार बागायत जमीन सरकारला घेता येणार नाही. आंदोलकांनी भावनिक होऊ नये. आपण कायदेशीर लढा देऊ.’

दानवे म्हणाले, ‘पोलिसांच्या लाठीमारात हे आंदोलक जखमी झालेत. काल पोलिसांनी पकडलेल्या शेतकरी आंदोलकांवर 307, 353 यांसारखी कलमे लावली. पोलिसांनी यांना जखमी केले आहे. त्यामुळे पोलिसांवरही कलमे लावली पाहिजेत. कायदा सर्वांना सारखा आहे. आमचा लढा शासनाशी आहे, पोलिसांशी नाही.

भारत-पाकिस्तान युद्ध ; ७ मे ला देशभरात ब्लॅकआऊट अन्,मॉक ड्रिल, गृहमंत्रालयाचा आदेश तरी काय?

मॉक ड्रिलमध्ये काय?

  • हवाई हल्ल्याचा इशारा देणारे भोंगे वाजणार
  • नागरिक, विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण
  • वीज बंद करून ब्लॅक आउटसाठीची तयारी
  • महत्त्वाच्या सुविधा अन् कृती लपवून ठेवणे
  • आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाने कृती
    पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृह मंत्रालयानेही संभाव्य सुरक्षेसाठी सर्व राज्यांना ७ मे रोजी रंगीत तालीम घेण्याचे आदेश दिले आहेत.एकीकडे दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची या अनुषंगाने दूरध्वनीवरून चर्चा झाली.

दहशतवादाविरोधातील लढाईत आम्ही भारताच्या पाठीशी आहोत असे सांगत असे पुतीन यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. जपाननेही भारताला पाठिंबा दिला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या संभाव्य लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरी संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी ( ता. ७ ) सर्वसमावेशक सज्जतेची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्याचे आदेश दिले आहेत. याअंतर्गत अनेक महत्त्वाच्या उपाययोजना आखण्यात येतील.

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी सोमवारी संरक्षण सचिव राजेशकुमारसिंह यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्याबाबतची माहिती जाणून घेतली. पंतप्रधान मोदींनी कालच (ता. ४) हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांच्याकडून हवाई दलाच्या सज्जतेची माहिती घेतली होती. त्यानंतर नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनीही शनिवारी (ता. ३) पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यानंतर आज संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह पंतप्रधानांना भेटले. लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.

या बैठकीचा तपशील जाहीर करण्यात आला नसला तरी पाकिस्तानविरुद्धच्या संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठकांच्या मालिकेत संरक्षण सचिवांसोबतची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाबद्दल भारताने जी-२० देशाच्या राजदूतांना पुराव्यासह माहिती दिली आहे. दहशतवाद्यांना आणि दहशतवादाची पडद्याआडून सूत्रे हालविणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्याची जाहीर घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीच केली होती. त्यानंतर संभाव्य कारवाईसाठी सरकारने सैन्यदलांना योग्य वेळ आणि योग्य उद्दिष्ट ठरविण्याची मुभा दिली आहे.आतापर्यंत काय?

  • सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती
  • पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द
  • आयात- निर्यात व्यापार थांबला
  • भारतीय जहाजांना बंदरांत प्रवेश नाही
  • तिन्ही सेनादल प्रमुखांच्या बैठका
  • सर्वपक्षीय बैठकीत प्रतिहल्ल्याचा निर्धार
  • विरोधकांचा सरकारला कारवाईसाठी पाठिंबा

अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.७३ टक्के

  • सलग बारा वर्षे उज्ज्वल यशाची परंपरा; गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे पुण्यातील महत्त्वपूर्ण केंद्र

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ संचलित अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही आपली गुणवत्ता सिद्ध करत ९९.७३ टक्के निकालाची उज्ज्वल कामगिरी केली आहे. सलग बारा वर्षांपासूनची यशाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे.

विज्ञान शाखेतील प्रथम तीन गुणवंत:
प्रथम: परब निखिल अजय – ५४२ गुण (९०.३३%)
द्वितीय: रंधवे सार्थक दिनेश – ५३५ गुण (८९.१७%)
ततीय: निंबाळकर राज बिरोबा – ५३० गुण (८८.३३%)

विशेष विषयांतील उल्लेखनीय कामगिरी:
गणित: मंदारपुरकर अर्पिता अतुल – ९७ गुण
जीवशास्त्र: ईशा अमोल वेदपाठक – ९४ गुण
माहिती तंत्रज्ञान (IT):
घारे ऋतुजा वसंत, गुमासे सिद्धी दीपक, ९९ गुण
संगणक शास्त्र: मृदुल दाखलकर – १९८ गुण (२०० पैकी)
इतर शाखांतील यशस्वी विद्यार्थी:
कला विभाग – प्रथम: उजळमकर मिथाली मिलिंद – ८७.५०%
वाणिज्य विभाग – प्रथम: सौंदांकर अंशिता प्रशांत – ८७.००%

या घवघवीत यशामागे संस्थेच्या प्राचार्या उर्मिला भोसले, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभारी रेखा दराडे, वाणिज्य विभागाच्या इनचार्ज मनीषा मोलावणे यांचे मार्गदर्शन तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे.
संस्थेचे अध्यक्ष मोहन जोशी, सचिव प्रसाद आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, सदस्य प्रज्योत आबनावे, गौरव आबनावे, शीतल आबनावे, विभा कांबळे-आबनावे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

“गुणवत्तापूर्ण शिक्षण, नैतिक मूल्यांची जपणूक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारे अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे पुण्यातील एक महत्त्वपूर्ण व विश्वासार्ह शैक्षणिक केंद्र बनले आहे. संस्थेचा निकाल हे केवळ टक्केवारीचे यश नसून, शिक्षकांची निष्ठा, विद्यार्थ्यांची मेहनत आणि व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे.”

  • प्रथमेश आबनावे, खजिनदार, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ

व्यक्त, अव्यक्ताचा अनोखा आविष्कार : ‌‘मिलाप – अ कपल ऑफ मेनी थिंग्ज‌’


कलासक्त कल्चरल फाऊंडेशन आयोजित कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त दाद

पुणे : तबला आणि नृत्य बोलांची संवादरूपी जुगलबंदी, ताल आणि नृत्यातून घेतलेला काव्याचा मागोवा, भाषेची सुंदर गुंफण करत नादात्मक काव्यनिर्मिती अशा अनोख्या संकल्पनेतून साकारलेल्या ‌‘मिलाप – अ कपल ऑफ मेनी थिंग्ज‌’चा अनोखा अविष्कार रसिकांना मोहित करून गेला.
कलासक्त कल्चरल फाऊंडेशनतर्फे आज (दि.5) या विशेष कार्यक्रमाचे आयोजन एस. एम. जोशी सभागृहात करण्यात आले होते. प्रसिद्ध तबलावादक निखिल फाटक आणि प्रसिद्ध कथक नृत्यांगना, अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांनी कार्यक्रम सादर केला.
सुरुवातीस झपतालातील पेशकार सादर करताना शास्त्रीय संगीताचा गाभा असलेली उत्स्फूर्तता, अमूर्तता निखिल फाटक यांनी तबला वादनातून दर्शविली. त्यानंतर कथक नृत्य शैलीतील पेशकाराच्या अंगाने जाणारा थाट शर्वरी जमेनिस यांनी सादर केला. तालाशी एकरूप होत ध्यानधारणेचा आनंद देणारा हा थाट सादर करताना शर्वरी यांनी दागिन्यांच्या वैविध्यतेतून प्रेरणा घेऊन नृत्याविष्कार सादर केला. तीन तालातील काव्यमय बंदिशी सादर करत काही नृत्यरचना तर काही पढंत उलगडत नेले.
वाद्य, नृत्यबोल, पक्षांचा आवाज याचा संगम साधणारा ‌‘परमेलू‌’ हा प्रकार सादर करताना तिहाईतील बंदिश सादर करून रसिकांची मने जिंकली. रोजच्या आयुष्या घडणाऱ्या काही घटना, जसे आईने मुलाला भरविणे, तो खात नाही म्हणून तिचे रागविणे, पती-पत्नीचा संवाद दर्शविताना विलंबित, मध्य आणि द्रुत लयीतील बंदिश तसेच लहान मुलाचा खेळायचा हट्ट तर आईने अभ्यास करण्यासाठी धरलेला आग्रह अशा रचनाही नृत्य आणि तबल्याच्या बोलातून सादर झाल्या. पदन्यासातून काव्यात्मकता निर्माण करताना शर्वरी जमेनिस यांनी आपले नृत्यावरील प्रभुत्व दर्शविले.

कविराज भूषण यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील एक एक छंद, काव्य, त्याचा अर्थ समजावत वाचिक अभिनयातून साकारताना त्या काळाची सामाजिक परिस्थिती, कवी भूषण यांनी औरंजेबाच्या जुलमी कारभारावर केलेली टीका, वीररस निर्माण करणारे काव्य, छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य पाहून शिव-पार्वतीमध्ये घडलेला संवाद गायन आणि अभिनयातून त्यांनी साकारला. यास रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कथा आणि काव्याची सांगड घालत महाभारतातील द्यूत खेळाच्या प्रसंगावर आधारित रचना साकारताना सध्याच्या सामाजिक परिस्थितीत महिलांच्या असुरक्षिततेवर भाष्य करत नृत्याविष्कार साकारत स्त्रीने सक्षम व्हावे हा संदेश अधोरेखित केला.
माणिकप्रभू यांनी रचलेल्या काव्यावर सादरीकरण करून महाराष्ट्राची लोककला दर्शविणारी लावणी शर्वरी यांनी सादर केली. ‌‘याद पिया की आए‌’ ही ठुमरी, ‌‘रंगी सारी गुलाबी चुनरिया रे‌’ ही होरी तर ‌‘बरसन लागे बदरिया रुमझुमके‌’ ही कजरी शर्वरी यांनी साभिनय नृत्याविष्कारातून सादर केली. अबोली देशपांडे (गायन), अमृता ठाकूरदेसाई (की-बोर्ड) यांनी साथसंगत केली.
व्यक्त आणि अव्यक्त काव्याचा मागोवा, नृत्य आणि तबल्याच्या परिभाषेतून रंगत जाणारा संवाद, बंदिशींचे उलगडत जाणारे सौंदर्य, कवी भूषण यांच्या काव्यरचना, लावणी, ठुमरी, होरी, कजरी यांच्या सादरीकरणाने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला आणि रसिकांच्या पसंतीस उतरला.
कलासक्त कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी आणि विनिता आपटे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कलाकारांचा सत्कार श्रीरंग कुलकर्णी, विनिता आपटे, माधुरी वैद्य, महेश गावसकर यांनी केला.

जलतरणात महाराष्ट्राची पदक सप्‍तमी, आदितीला सुवर्ण : ७ वी खेलो इंडिया युवा स्‍पर्धा, बिहार २०२५


गया : जलतरणात सलग दुसऱ्यांदा आदिती हेगडेने सुवर्णपदकाची लुट करीत ७व्‍या खेलो इंडिया महाराष्ट्रासाठी पदकाचे खाते उघडले. आदितीच्‍या १ सुवर्णासह १ रौप्‍य व ४ कांस्य पदकाची कमाई करीत महाराष्टाने आज पदकाची सप्‍तमी साजरी केली.
गया शहरातील बीआयपीएआरडीच्‍या जलतरणात तलावावर अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्‍या जलतरणपटूंनी पदकांची लयलूट केली. आदिती हेगडेने १ सुवर्ण,१ कांस्य, समाईरा मल्‍होत्राने १ रौप्‍य तर शुभम जोशी, झारा बक्षी, वेदांत तांदळे, रूतुजा राजाज्ञाने कांस्य पदके जिंकून दिवस गाजविला.
मुलींच्‍या २०० मीटर फ्रीस्‍टाईल प्रकारात मुंबईच्‍या आदिती हेगडे २.०९.५१ वेळेत शर्यत पूर्ण करून महाराष्ट्रासाठी स्‍पर्धेतील पहिले पदक जिकले. चुरशीच्‍या शर्यतीत ७ शतांश सेकंदाने दिल्‍लीच्‍या तितिक्षा रावतला मागे टाकून आदितीने बाजी मारली. ८०० मीट फ्रीस्‍टाईल प्रकारात आदितीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आदितीचे खेलो इंडिया स्‍पर्धेतील हे ६ वे पदक आहे. गत तामिळनाडू स्‍पर्धेत तीने पदकाचा चौकार झळकविला होता, मुंबईतील खेलो इंडिया ॲकडमीत ती सराव करत असते.
मुलींच्‍या १०० मीटर .ब्रिस्‍टस्‍ट्रोक प्रकरात महाराष्ट्राचा डबल धमाका पहाण्यास मिळाला. मुंबईच्‍या समाईरा मल्‍होत्रा व झारा बक्षी यांनी अनुक्रम रूपेरी व कांस्य पदकाला गवसणी घातली. कर्नाटकच्‍या मानवी वर्माने सुवर्णपदक जिंकले. मुलांच्‍या १०० मीटर .ब्रिस्‍टस्‍ट्रोक प्रकरात ठाणेच्‍या शुभम जोशीने कांस्यपदकाची कमाई केली. कर्नाटकच्‍या क्रीश सुकुमारने सुवर्ण पदकां पल्‍ला पार केला.

शेत, पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यासह मोजणी आता पोलिस बंदोबस्तात

महसूलमंत्र्यांचा पाठपुरावा, गृहविभागाचे निर्देश

मुंबई, दि. ५ : शेत व पाणंद रस्त्यांचे अतिक्रमण काढताना तसेच, सर्व प्रकारच्या रस्त्यांची मोजणी करण्यासाठी पोलिस बंदोबस्त मोफत देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. जे शेतकरी अतिक्रमण काढताना व मोजणी करताना अडवणूक करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशा सूचनाही क्षेत्रीय पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

महसूल, नियोजन व रोहयो विभागाच्या शासन निर्णयानुसार आता गृह विभागाने स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. या निर्देशाने, राज्यातील शेतीला आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत रस्ता उपलब्ध होण्यासह पाणंद रस्त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाणंद रस्त्यांच्या अंमलबजावणीबाबत गेल्या महिन्यांत दोन वेळा बैठका घेऊन अंमलबजावणीत स्पष्टता यावी यासाठी प्रयत्न केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन मोफत पोलीस बंदोबस्त देण्याचा निर्णय करुन घेतला. तालुका पातळीवरचे पोलीस निरीक्षक हे क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार पोलिस बंदोबस्त पुरविण्याचा निर्णय घेतील.
शेतापर्यंत जोपर्यंत रस्ता, वीज आणि पाणी व महत्वाची शेतीपूरक वाहने जात नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही. यासाठी पाणंद रस्त्याची विशेष मोहीम राज्यभर राबवित आहोत. त्याला चांगले यश येत असून शेतकऱ्यांना पोलीस बंदोबस्तासाठी थांबावे लागत होते. आर्थिक भार सहन करावा लागत होता. आता या दोन्ही अडचणी काढून टाकल्या आहेत. यामुळे योजनेला आणखी गती येईल.

चंद्रशेखर बावनकुळे,
महसूलमंत्री, महाराष्ट्र

३१ व्या अखिल भारतीय नवोदित साहित्य संमेलनाचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार

यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत भरणार साहित्यिकांची मांदियाळी

कराड, दि. ५ : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्यावतीने कराड येथे ३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत शुक्रवार, दि.९ व शनिवार, दि.१० मे रोजी होत असून माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उ‌द्घाटन होणार आहे. संमेलन अध्यक्ष म्हणून साहित्यिक प्रवीण गायकवाड आहेत तर स्वागताध्यक्ष सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आहेत.

यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील, आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, ऍड. उदयसिंह पाटील, न्यूज १८ लोकमतचे संपादक मंदार फणसे, लोकशाही न्यूजचे संपादक विशाल पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.

या साहित्य संमेलनात साहित्य संमेलन शुभारंभ, ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, कवी संमेलन, कथाकथन, खुले चर्चासत्र, परिसंवाद अशी साहित्यिक मेजवानी होणार असून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे, प्रदेश उपाध्यक्ष हनुमंत चिकणे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. नितीन नाळे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विक्रम शिंदे, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष विकास भोसले, सातारा जिल्हाध्यक्ष संदीप पवार, सातारा जिल्हा महिला अध्यक्षा सुषमा अलेकरी यांनी केले आहे.

या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यातून ३५० हून अधिक कवी व ४०० साहित्यिक कराड येथे येणार असून शुक्रवार, ९ मे रोजी सकाळी ८ वाजता साहित्य संमेलन शुभारंभ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण साहेब समाधीस्थळ प्रीतिसंगम येथून होणार आहे. शुक्रवार, दि.९ मे रोजी सकाळी ९ वाजता भव्य ग्रंथदिंडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, दत्त चौक कराड येथून सुरु होणार असून यशवंतराव चव्हाण साहित्य नगरी टाऊन हॉलपर्यंत ही ग्रंथदिंडी निघणार आहे. 

सकाळी १० वाजता पहिले सत्र कवी संमेलन होणार असून कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी मुंबई येथील सुप्रसिद्ध कवी राजश्री बोहरा आहेत. दुसरे सत्र दुपारी १२.३० वाजता होणार असून या कवी संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध ग्रामीण कवी लक्ष्मण हेमाडे, मंगळवेढा, जि. सोलापूर हे भूषविणार आहेत. दुपारी दोन वाजता खुले चर्चासत्र होणार असून मुंबई येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ. अलका नाईक या अध्यक्षस्थानी आहेत. दुपारी ३ वाजता नाशिक येथील प्रसिद्ध ग्रामीण कथाकार नवनाथ नाईकर यांचा कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे.

दुपारी ४ वाजता शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. यावेळी राज्यभरातील विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी ७ वाजता दैनिक लोकमत, पुणेचे संपादक संजय आवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसंवाद होणार असून ‘सशक्त लोकशाहीसाठी अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गरज व भूमिका’ या विषयावर विस्तृत चर्चा होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील ज्येष्ठ विचारवंत दत्ता बाळ सराफ हे आपले विचार व्यक्त करणार आहेत. रात्री ९ वाजता कवी संमेलनाचे तिसरे सत्र होणार असून या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी कराड येथील प्रसिद्ध कवी व गझलकार फरजाना इकबाल डांगे या असतील.

दुसऱ्या दिवशी शनिवार, दि.१० मे रोजी सकाळी ९.३० वाजता कवी संमेलन पहिले सत्र गोवा येथील प्रसिद्ध कवी चित्रा क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सकाळी ११.३० वाजता दुसरे सत्रकवी संमेलन पुणे येथील प्रसिद्ध कवी सूर्यकांत नामुगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. तिसरे सत्र कवी संमेलन दुपारी १२.३० वाजता कराड येथील सुप्रसिद्ध कवयित्री सौ. विजया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. 

दुपारी ३ वाजता माजी खा. राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यावेळी ‘कृषक समाज काल आज आणि उद्या’ या विषयावर विस्तृत मंथन होणार असून या परिसंवादासाठी दैनिक लोकमत, कोल्हापूरचे माजी संपादक वसंत भोसले, न्यूज १८ लोकमतचे संपादक मंदार फणसे, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी चार वाजता साहित्य संमेलनाचा समारोप होणार असून यावेळी खा.श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. मनोज घोरपडे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ऍड. उदयसिंह पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख हे उपस्थित राहणार आहेत.

या साहित्य संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी साहित्यिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने केले आहे. 

भारताचा सर्वात वेगवान १०० मीटर धावपटू प्रणव गुरव याचा आरबीएल बँकेने केला सत्कार

मुंबई, ५ मे २०२५ : पुण्याचा २३ वर्षीय धावपटू प्रणव प्रमोद गुरव याने कोची येथे २५ एप्रिल रोजी पार
पडलेल्या २८व्या नॅशनल फेडरेशन कप सीनियर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीमध्ये
१०.२७ सेकंदात सुवर्णपदक पटकावले आणि देशाला अचंबित केले. या कामगिरीने त्याने भारतातील
आतापर्यंतच्या सहा सर्वात जलद धावपटूंमधील चार जणांना मागे टाकले असून तो सध्या भारताचा सर्वात
वेगवान १०० मीटर धावपटू ठरला आहे.
भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देऊ शकणाऱ्या तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या
उद्देशाने आरबीएल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आर. सुब्रमणियाकुमार
यांनी मुंबईतील बँकेच्या मुख्य कार्यालयात प्रणवचा सत्कार केला आणि त्याच्या उल्लेखनीय कामगिरीचे
कौतुक केले. तरुण प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेचा हा भाग म्हणून बँकेने प्रणवला ५०,०००
रुपयांचे पारितोषिकही दिले.
प्रणवची वाटचाल ही जिद्द आणि उत्कटतेची कहाणी आहे. पुण्याजवळील दौंड येथील रहिवासी असलेल्या
प्रणवने सुरुवातीला कोणतीही योग्य सुविधा वा साहित्य नसताना प्रशिक्षण सुरू केले. स्थानिक स्पर्धेत
१३.५ सेकंदांची धाव घेत त्याने आपली छाप पाडली. बाबुराव सणस स्टेडियमवर त्याने नियमित प्रशिक्षण
घेतले. दररोज १६० किमी प्रवास करत शिक्षणही सांभाळले. एआयएसएसएमएस कॉलेजमधून सिव्हिल
इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर तो सध्या भारतीय रेल्वेमध्ये दुसऱ्या श्रेणीचा अधिकारी म्हणून पुण्यात
कार्यरत आहे.
२०२२ मध्ये २३ वर्षांखालील गटात राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, तर २०२३ आणि २०२५ मधील राष्ट्रीय क्रीडा
स्पर्धेत रौप्यपदक पटकावल्यावर, प्रणव भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये एक उगवता तारा म्हणून नावारूपाला
येत आहे.

भाजपा आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू बनत आहेत.

बावनकुळेंचे विधान म्हणजे विचारांची नव्हे केवळ सत्तेसाठी ची लढाई हीच भाजप ची एकमेव दिशा

पुणे-भाजपचे बावनकुळे यांनी काल पुण्यात बोलताना काँग्रेस फोडा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये सामील करून घ्या असे जाहीर आवाहन केले आहे.आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी यावर जोरदार टीका केली आहे.’ एकेकाळी भाजप स्वतःला ‘ पार्टी विथ डिफरन्स ‘ म्हणून घेत असे आणि तत्त्वांवर चालणारी कार्यकर्त्यांची फळी असल्याचा दावा करीत असे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये आयात उमेदवारांवरच भाजपचा भर दिसून आलेला आहे. आता उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांनाही भाजप दरवाजे खुले करीत आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यामधील हिंदुत्वाचा मुद्दा सोडता इतर कुठल्या मुद्द्यांच्या बाबतीत मतभेद नाहीत हे उघड आहे. शिक्षण, आरोग्य,रोजगार आदी धोरणात्मक बाबींवर काम करताना काँग्रेसच्या कामगिरीत आणि भाजपच्या कामगिरीत फारसे उजवे डावे करता येणार नाही अशी स्थिती आहे.’ असे आप प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी आणि महायुती सरकार मधले पक्ष नावाने जरी वेगवेगळे असले तरी त्यातील अनेक मंत्री तेच आहेत. काँग्रेस मधीलच सरंजामदार आणि घराणेशाही असलेले नेते भाजपने उचलून त्यांना महत्त्वाची पदे दिली आहेत. त्यासाठी जरूर तिथे इडी सीबीआयचा वापर करूनही हे केले आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मोदींच्या हुकूमशाही विरुद्ध लढणारे काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार आता भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेस यांच्या मधला सेतू खुला झाला आहे.

या पुढच्या राजकारणात आम आदमी पार्टी सारखा पर्याय जनतेच्या प्रश्नाला उत्तर काढू शकेल. राजकारणातील हा लढाईचा टप्पा कठोर परिश्रमाचा आहे परंतु स्थानिक निवडणुकीच्या द्वारे आम आदमी पार्टी हा व्यवस्था परिवर्तनाचा पर्याय मतदारांसमोर उभा करेल असेही मुकुंद किर्दत (Mukund Kirdat)यांनी म्हटले आहे.

नाकर्ते सरकार, बेजबाबदार शहरी नागरिकांमुळे पाणी समस्या

पुणे-मुंबई शहरात पाण्याचा अतिवापर : लक्ष्मीकांत देशमुख यांची टीका : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे जलदूत देवांग जानी यांचा गौरव
पुणे : पाण्याविषयी सरकारचा नाकर्तेपणा आणि शहरांमधील बेजबाबदार नागरिकांमुळे पाणीसमस्या उद्भवली आहे. मोठ्या शहरांमध्ये पाण्याचा अपव्यय सुरू राहिल्यास खेड्या-पाड्यांमधील भेडसावणारा भीषण पाणीप्रश्न भविष्यात शहरांमध्ये निर्माण होऊ शकतो, असा इशारा ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिला. पाणी टंचाईची भीषण परिस्थिती समजून न घेता पुणे-मुंबईसारख्या शहरातील नागरिक अमाप आणि अयोग्य पद्धतीने पाणी वापर करीत असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केली.
पाणीविषयक मोलाचे कार्य करणारे नाशिक येथील गोदाप्रेमी समितीचे अध्यक्ष, जलदूत देवांग जानी यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे आज (दि. 5) पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, काव्य विभागाच्या संचालिका प्रज्ञा महाजन मंचावर होते. शाल, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रम झाला.
देशमुख पुढे म्हणाले, मानवाने प्रत्येक नदीशी खेळ केला आहे. नदी कोरडी होणे म्हणजे जणू स्त्री अब्रू घेणे आहे. जसजशी शहरे श्रीमंत होत गेली तसतशा नद्या कोरड्या पडत गेल्या. हे समजून घेताना नदीने आत्महत्या केली की, दुराग्रही माणसाने त्यांचा खून केला याचा विचार होणे आवश्यक आहे. लोकसंख्या वाढीमुळे पाण्याची गरज व तहान वाढली आहे. परंतु पिण्याचे पाणी हे अक्षय नाही. पाणी वापराबरोबरच त्याचे पुनर्भरण होते की नाही याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. पाणी मुबलक आहे म्हणून उधळू नका. विहिरी, तलाव, हौद, उपनद्या पुनर्जिवित करा, अशी सूचनाही त्यांनी केली.
पुणेकर हट्टी
पुणे शहरात मुबलक पाणी उपलब्धी आहे म्हणून त्याचा अविवेकी वापर केला जात आहे. याविषयी जागृती करूनही पुणेकर पाण्याचा निष्काळजीपूर्वक वापर करीत आहेत. आम्ही पैसे देतो त्यामुळे आम्हाला पाहिजे त्या वेळी आणि पाहिजे तेवढे पाणी मिळावे अशी पुणेकरांची दुराग्रही आणि हट्टी भूमिका आहे, अशी टीका लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली.

नद्यांमध्ये मानवी हस्तक्षेप वर्जित : देवांग जानी
आपल्या कार्याची माहिती देताना देवांग जानी म्हणाले, नाशिक महापालिकेने गोदावरी पात्रातील 17 प्राचीन कुंडे बुजविल्याने नदीतील जीवंत पाण्याचे स्रोत नष्ट झाले होते. त्याविरुद्ध शासनाशी लढा देत नदीपात्रातील पाच कुंडातील सुमारे पाच लाख किलो सिमेंट काढण्यात यश आले. त्यातून स्रोत जीवंत झाले. गोदावरी नदी ही नाशिक शहराचे हृदय आहे तर उपनद्या म्हणजे वाहिन्या आहेत. उपनद्या जीवंत राहिल्यास मुख्य नदी जीवित राहते, या करिता पाण्याचे नैसर्गिक स्रोत, उपनद्या जीवंत ठेवण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीनुसार नद्यांना आईचा दर्जा दिला जातो, त्यामुळे नद्या प्रदुषित करणे म्हणजे आईचा आपमान करण्यासारखे आहे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, नैसर्गिक स्रोतांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. निसर्गाकडून आपण फक्त ओरबाडून घेत आहोत त्याला परत काहीच देत नाही ही मानवाची मोठी चूक आहे. नद्या निसर्गनिर्मित आहेत, त्यांच्यात मानवी हस्तक्षेप वर्जित आहे.
ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात देवांग जानी यांच्या कार्याची माहिती दिली. ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींचे काम समाजापुढे आणावे, ज्या योगे सकारात्मकता निर्माण होईल, यासाठी उपक्रमांचे आयोजन केले जाते.
भविष्यात कुणालाही पाणी फुकट मिळणार नाही. तर पाण्यासाठी पैसा मोजावा लागेल, असे प्रज्ञा महाजन म्हणाल्या. मानपत्राचे वाचन आणि सूत्रसंचालन वैजयंती आपटे यांनी केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रितांचे पाणी या विषयावर कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.

प्रतिभावान, हौशी छायाचित्रकारांचे प्रदर्शन ‌‘प्रतिबिंब‌’

पुणे : पुणे कॉटन कंपनी, देहम्‌‍ नेचर क्युअर आणि कृतार्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 ते 10 मे या कालावधीत हौशी छायाचित्रकारांच्या ‌‘प्रतिबिंब‌’ या छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
छायाचित्र प्रदर्शनी बालगंधर्व कला दालनात भरविण्यात येणार असून उद्घाटन दि. 8 रोजी सकाळी 10:30 वाजता सुप्रसिद्ध पक्षी छायाचित्रकार डॉ. सुधीर हसमनीस यांच्या हस्ते होणार आहे. देहम्‌‍ नेचर क्युअरचे संचालक डॉ. सुजय लोढा, डॉ. कोमल लोढा, कृतार्थचे संचालक निलेश शुक्ला, दिपाली शुक्ला, क्रिकेट विश्लेषक-समालोचक सुनंदन लेले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रदर्शन तीनही दिवस सकाळी 10 ते रात्री 8 या कालावधीत सर्वांसाठी खुले असणार आहे.
अमर अतितकर, अमेय वाळवेकर, ओंकार मुळगुंद, केदार दंडगे, विलास तोळसंकर, समीर अय्यर, विश्वेश बेहरे, अनंतप्रसाद देशपांडे, अमोद फडके आणि सागर मुथा यांची व्यन्यजीव, पक्षी, निसर्ग या विषयांवरील अनोखी छायाचित्रे प्रदर्शनात असणार आहेत. प्रदर्शनात हसभागी छायाचित्रकार वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असून छायाचित्रणाची आवड जोपासत आहेत. प्रदर्शनाची रचना ओंकार मुळगुंद यांची आहे. हौशी, प्रतिभावान छायाचित्रकारांची वैविध्यपूर्ण छायाचित्रे अनुभवण्याचा आनंद पुणेकरांना मिळणार आहे.

महापालिकेच्या बांधकाम सल्लागाराच्या घरातील 26 लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीने मारला डल्ला

पुणे महानगरपालिकेत बांधकाम सल्लागार म्हणून काम करणाऱ्या विपुल कुमार चाँदकुमार गर्ग (वय- ५४) यांच्या बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लब रस्त्यावर उच्चभ्रू सोसायटी असलेल्या सुप्रीम अॅमडोर येथील फ्लॅट क्रमांक १४०२ मध्ये मागील चार महिन्यापासून एक ३० वर्षीय महिला घरकाम करत होती. सदर महिलेने गर्ग यांच्या घरातील बेडरूम मधील कपाटाच्या ड्रावर मध्ये ठेवलेले २५ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी विपुलकुमार गर्ग यांनी बाणेर पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार २७/२/२०२५ ते २७/४/२०२५ यादरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घरकामगार महिला ही गर्ग यांचे घरी मागील चार महिन्यापासून काम करत आहे. तिने घरातील लोकांचा विश्वास संपादन करुन घरातील बेडरूम मध्ये नियमित साफसफाई करत होती. यादरम्यान तिने घरातील लोकांची नजर चुकवून बेडरूममधील कपाटाच्या ड्रावर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने घरात काम करत असताना, टप्प्याटप्प्याने चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. गर्ग कुटुंबीय एका लग्नासाठी जाताना त्यांनी कपाटातील दागिन्यांची पाहणी केली असता ते मिळून आले नाही. त्यामुळे घरकामगार महिलेची विचारपूस केली असता ती पसार झाल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी आरोपी महिलेवर गर्ग कुटुंबीयांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने दागिने चोरी केल्याचा गुन्हा बाणेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली आहे.

विमानतळाबाबतची भूमिका बदलणार नाही,सर्वेक्षण थांबवले:आम्ही शेतकऱ्यांना ऑफर देऊ, त्यांनी आम्हाला ऑफर द्यावी – चंद्रशेखर बावनकुळे

पुणे-पुरंदर विमानतळ प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या विरोधासाठी शनिवारी झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. या पार्श्वभूमीवर सरकारने सध्या तरी पुरंदर विमानतळाच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आम्ही शेतकऱ्यांना ऑफर देऊ, शेतकऱ्यांनी आम्हाला ऑफर द्यावी. त्यांनी विमानतळ होऊ न देण्याचा हट्ट सोडावा, असेही बावनकुळे म्हणाले.

पुरंदर येथे होणाऱ्या विमानतळाला 7 गावातील ग्रामस्थांचा मोठा विरोध आहे. दोन दिवसांपूर्वी विमानतळाच्या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी पथक आले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी पथकाला सर्वेक्षण करण्यास विरोध करत आंदोलन केले. या दरम्यान, पोलिस आणि ग्रामस्थ यांच्यात धक्काबुक्की होऊन आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावर आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुरंदर विमानतळाबाबत सुरू असलेले सर्वेक्षण थांबवण्यात आलेले आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मुळावर उठून आम्हाला काही करायचे नाही. मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. आमची शेतकऱ्यांना ऑफर आहे, त्यांनी विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट सोडावा, असेही ते म्हणाले. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला विरोध असणाऱ्या अनेक मान्यवरांशी आम्ही चर्चा केली. परवा जी घटना घडली त्याचासुद्धा आम्ही आढावा घेतला असून शेतकऱ्यांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते कमी केले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे म्हणाले, पुरंदर विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे, शेतकऱ्यांचा माल निर्यात होऊ शकतो, पुण्याच्या विकासाबाबत मुंबई, दिल्लीनंतर नाव येते. त्यामुळे हे संभाव्य विमानतळ करण्याचा मानस आहे आणि ती भूमिका शासनाची बदलणार नाही. मी शेतकऱ्यांना विनंती करतोय की, 7 दिवसात तुम्ही तुमच्या मागण्या काय आहेत हे आम्हाला कळवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खिशात काय टाकता येईल, अशी भूमिका आम्ही मांडली आहे.

शासन एखादी घोषणा करेल तेव्हा सरकारने आमचे चांगले केले, असे शेतकऱ्यांना वाटेल. आम्ही शेतकऱ्यांना ऑफर देऊ, शेतकऱ्यांनी आम्हाला ऑफर द्यावी, टेबलवर बसून तिढा सुटेल. पुढील 15 दिवसात पुन्हा चर्चा करू, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

परवा घडलेल्या घटनेचा सुद्धा आढावा आम्ही घेतल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेतले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. गुन्ह्यात जे लोक प्रत्यक्ष सहभागी आहेत, त्यांचा वेगळा विचार करायला लागेल. जे निरपराध आहेत त्यांचे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उद्या याबाबत चर्चा करेन. असेही बावनकुळे म्हणाले.