Home Blog Page 3233

जिल्हा खनिज प्रतिष्ठाणची बैठक संपन्न

0

पुणे,दि. 30:  जिल्ह्यातील खनिजकर्मविषयक कामासंदर्भात तसेच योजनासंदर्भात जिल्हा खनिज प्रतिष्ठाणची   बैठक शासकीय विश्रामगृह येथे अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री गिरीश  बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली.

यावेळी आमदार सुरेश गोरे, बाबुराव पाचर्णे, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, आदी मान्यवर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित अधिकाऱ्यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियोजित कामांविषयी सादरीकरणाद्वारे बापट यांना सविस्तर माहिती दिली. श्री. बापट यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कामासंदर्भात सूचना तसेच मार्गदर्शन केले.

गतिमान निर्णयांसाठी रेरा अपिलेट लवादाची स्थापना त्वरित करा क्रेडाई महाराष्ट्राची राज्य सरकारकडे पुन्हा आग्रही मागणी

0

पुणे : रियल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी (रेरा) प्रकरणांची गतिमान सुनावणी करून निर्णय देण्यासाठी राज्य सरकारने रेरा अपिलेट लवादाची त्वरित स्थापना करावी, अशी आग्रही मागणी बांधकाम उद्योजकांची संघटना असलेल्या क्रेडाई महाराष्ट्र यांनी राज्य सरकारकडे केली आहे. अशी यंत्रणा अस्तित्वात नसल्याने बांधकाम व्यावसायिक आणि नागरिक आपली प्रकरणे अपरिहार्यपणे उच्च न्यायालयात नेत असून यामुळे खर्च व विलंब वाढत आहे, असे क्रेडाईने म्हटले आहे.

क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी या संदर्भात एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. राजस्थानमध्ये फक्त अपिलेट लवाद नेमण्यात आलेतत्यामुळे  संपूर्ण भारतात ही मागणी व्हायला हवी आणि क्रेडाईच्या सर्व राज्य अध्यक्षांनी आपापल्या राज्य सरकारांकडे रेरा लवादाची स्थापना करण्यासाठी आग्रह धरावा,  असे कटारिया यांनी निवेदनात म्हटले आहे.

“अपीलीय लवाद नसल्यामुळे रेरा अधिकाऱ्यांनी सुनावणी केलेली प्रकरणे अपिलात उच्च न्यायालयात जात असून यामुळे नागरिकांना गैरसोय होत आहे. तसे ते स्थापन झाले, तर या लवादामुळे भविष्यात आमचे काम सुरळीत होईल. नवीन स्वतंत्र लवाद हे अधिक प्रभावी आणि जलद ठरेल,” अस्तित्वात असलेल्या एखाद्या लवादाकडे हि प्रकरणे देणे उचित होणार नाही असे या निवेदनात म्हटले आहे.

रेरा कायद्याच्या कलम ४३(१) अंतर्गत या वर्षीच्या १ मे पूर्वी रियल इस्टेट विनियामन प्राधिकरण (आरईआरए)  अपीलीय लवाद स्थापन होण्याची गरज होती. मात्र राज्य सरकाराने ते  केले नसल्याने ग्राहक व बिल्डर्स नाराज आहेत. हा लवाद नसल्यामुळे महरेरा निकालाने समाधानी नसलेल्या  महारेराच्या आदेशांचा विरोधात जाण्याकरिता उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. हा अत्यंत खर्चिक आणि कटकटीचा विषय ठरला आहे.

“महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी १ मे रोजी रेरा कायद्याची  अंमलबजावणी करून कौतुकास्पद आघाडी घेतली आहे. मात्र वर्षभरात अपीलीय न्यायाधिकरण करू शकले नाहीत.  या वर्षी १ मे रोजी ते अस्तित्वात यायला हवे होते,” असे श्री. कटारिया म्हणाले.

घरबांधणी क्षेत्राशी संबंधित मुद्दे सोपे आणि कार्यक्षम करणे हे रेरा कायद्याचे उद्दिष्ट होते,

याकडे क्रेडाई महाराष्ट्रने लक्ष वेधले आहे.

महारेराच्या निर्णय अधिकाऱ्यांनी रेरा कायद्यांतर्गत अनेक आदेश दिले आहेत. त्यातील अनेकांना, लवाद नसल्यामुळे उच्च न्यायालयात आव्हान दिले जात आहे.

रेरा आणि भागधारकांचा गेल्या सहा महिन्यांच्या अनुभवाचा आढावा घेतल्यानंतर नियमांमध्ये आवश्यक बदल/स्पष्टीकरण करण्याचा  राज्य सरकारने विचार करावा, अशीही मागणी श्री. कटारिया यांनी केली आहे.

“रेरा कायदा २०१६ च्या कलम ९१ अनुसार दोन वर्षांच्या आत कायद्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याची तरतूद असून १८ महिने आधीच उलटलेले आहेत. त्यामुळे केंद्रानेही या तरतुदींचा विचार करून निर्णय घ्यावा, “असे क्रेडाई महाराष्ट्रने म्हटले आहे.

अनधिकृत फेरीवाले हटविण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविणार -महापौर टिळक (व्हिडीओ)

0

पुणे- शहर आणि महापालिका हद्दीतील अनधिकृत फेरीवाले यांना कायमस्वरूपी हटविण्यासाठी महापालिका नियोजनबद्ध कार्यक्रम राबविणार असून त्यासाठी आज महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात बैठक घेण्यात आली .
आयुक्त कुणालकुमार , सभागृहनेते श्रीनाथ भिमाले ,विरोधीपक्ष नेते चेतन तुपे पाटील आणि अधिकारी वर्ग या बैठकीला उपस्थित होता .अनधिकृत फेरीवाले ओळखता यावेत या साठी अधिकृत फेरीवाल्यांना ओळखपत्र आणि त्यांच्या व्यावसायिक दुकानाला ठरलेले रंग देण्यात येतील आणि अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई साठी पालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकात आणखी १६२ निरीक्षकांची ठेका पद्धतीने भरती करण्यात येईल . हॉकर्स झोन पैकी १९८ जागांची निश्चिती झाली असून आणखी ९० जागांची निश्चिती महिनाभरात करण्यात येणार आहे
या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना पहा आणि ऐका महापौर मुक्ता टिळक यांनी काय सांगितले .

राजपत्रित अधिकारी महासंघांतर्गत दुर्गा महिला मंचच्‍या पुणे जिल्हाध्यक्षपदी सुवर्णा पवार

0

पुणे – महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघांतर्गत  दुर्गा महिला  मंचच्‍या  पुणे जिल्हाध्यक्षपदी महिला  व बालविकास विभागाच्‍या सहायक आयुक्त श्रीमती सुवर्णा पवार यांची  निवड करण्‍यात आली.

राजपत्रित अधिकारी महासंघाच्‍या पुणे समन्वय समितीची बैठक महासंघ कार्यालयात संपन्‍न झाली. त्‍यावेळी ही निवड जाहीर करण्‍यात आली. निवडीबद्दल महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व सरचिटणीस पुणे इंजि विनायक लहाडे, कोषाध्‍यक्ष मोहन साळवी, राज्‍य संघटक ए.ए. मोहिते, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पी.डी. शेंडगे, एस.डी. कुलकर्णी आदींनी अभिनंदन केले.

दुर्गामंचच्‍या इतर सदस्‍यपदी इंजिनिअर शीतल सेवतकर, बार्टीच्‍या निबंधक सविता नलावडे, सहायक आयुक्‍त धर्मदाय कांचन जाधव, बालविकास प्रकल्‍प अधिकारी सुहिता ओहाळ, सामाजिक न्‍याय विभागाच्‍या अनुराधा ओक, आरोग्‍य विभागाच्‍या भावना चौधरी,

माहिती अधिकारी वृषाली पाटील आदींचा समावेश आहे.  दुर्गा मंचच्‍या वतीने सर्व शासकीय खात्यात महिला बैठका घेण्यात येणार  असून सर्व विभागातील महिला अधिका-यांनी दुर्गा मंचमध्‍ये सहभागी व्‍हावे, असे आवाहन सुवर्णा पवार यांनी केले.   महासंघाच्‍या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली.  5 डिसेंबर रोजी  मुंबई  येथे होणा-या राज्य बैठकीची माहिती देण्यात येऊन सर्वांना  उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच अभियांत्रिकी कालेज,(सीओइपी) पुणे च्या प्राध्यापक संघटनेच्‍या  11 डिसेंबरच्‍या  बेमुदत उपोषण आंदोलनास महाराष्‍ट्र  राजपत्रित अधिकारी महासंघाने  पाठिंबा जाहीर करण्‍यात आला.

 

पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघातर्फे मार्गदर्शक मेळावा संपन्न

0

पुणे- जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघातर्फे सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शक मेळाव्याचे आयोजन हडपसरमधील साधना विद्यालय आणि आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेजचे कर्मवीर सभागृहमध्ये करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, सहाय्यक निबंधक  सतीश ढमाळ, असिस्टट हेल्थ ऑफिसर डॉ. कल्पना बळीवंत, अॅड. नीता संग्राम साळुंके,  अॅड. अजित अर्जुन चौगुले , माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी विविध विषयांवर संस्थांना मार्गदर्शन केले. तसेच  राज्य उत्पादन शुल्क  विभागाचे माजी उप-अधिक्षक अर्जुन सिताराम चौगुले ,  व शिवाजी मराठा सोसायटीचे संचालक पुणे  तानाजी गंगाराम घारे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याचे संयोजन अॅड. अजित अर्जुन चौगुले यांनी केले होते .

सुहास पटवर्धन यांनी महासंघाची माहिती सांगून उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मा. सतीश ढमाळ यांनी डीम्ड कन्व्हेअन्स बद्दलशंकांचे समाधान केले व शासनाच्या वतीने सहकार्याने सहकार्याचे आश्वासन दिले. डॉ. कल्पना बळीवंत यांनी सध्या झपाट्याने पसरणाऱ्या डेंगू, मलेरिया, चिकुनगुनिया या आजारांबाबत चित्रफितीद्वारे सादरीकरणकेले व जागृतीसाठी पुणे मनपाचे प्रयत्न सुरु असून नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती केली.

अॅड. अजित अर्जुन चौगुले यांनी कन्व्हेअन्स व डीम्ड कन्व्हेअन्स या विषयावर सविस्तर माहिती दिली. संस्थांनी लवकरात लवकर डीम्ड कन्व्हेअन्स करून घ्यावे असे आवाहन केले.अॅड. नीता संग्राम साळुंके, यांनी सह. गृह. संस्थेतील त्रासदायक असणाऱ्या थकबाकी वसुलीची कायदेशीर प्रक्रिया, त्याचे महत्त्व, यांचीमाहिती देऊन उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी मेळावा आयोजित केल्याबद्दल महासंघाचे आभार मानले. तसेच सह. गृह. संस्थांनी प्रदूषण कमी करणे, झाडे लावणे, कचरा व्यवस्थापन याद्वारे पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. त्यासाठी त्या स्वतः पुढाकार घेऊन मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाचे नियोजन महासंघाच्या सचिव मनीषा कोष्टी यांनी केले. सूत्रसंचालन  चारुहास कुलकर्णी यांनी केले. सह. गृह. संस्थांच्या प्रतिनिधींनी मेळावा आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

कोपर्डी निकालाचे सांगवीत विद्यार्थिनीनी केले फटाके वाजवून स्वागत

0

पिंपरी :देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर स्कूलच्या विद्यार्थिनीनी फटाके वाजवून निकालाचे स्वागत केले. यावेळी संस्थेच्या सचिव आरती राव, माजी स्थायी समिति अध्यक्ष अतुल शितोळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. चौधरी, श्री. चोपड़े, अविनाश मारणे,  तेजल कोळसे पाटील, आशा घोरपड़े, हर्षा बाठिया, विद्यार्थिनी, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे पीडितेला अखेर न्याय मिळाला, अशा शब्दात संस्थेच्या सचिव आरती  राव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. हा निकाल न्यायव्यावस्थेवरील विश्वास दृढ़ करणारा आहे. न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला जरब बसेल. वरिष्ठ न्यायालयातही हा निकाल कायम राहवा. त्यामुळे आरोपींची फाशीची शिक्षा कायम राहिल, याची जबाबदारी सरकारची आहे. तसेच महिला अत्यचाराबाबतच्या इतर खटल्याचा निकालही जलदगतीने लागण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षाही आरती राव यांनी व्यक्त केली.

माजी स्थायी समिति अध्यक्ष अतुल शितोळे म्हणाले, ही दुर्दैवी घटना होती. नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी मराठे मोर्चे निघाले. तपास यंत्रणानी केलेला कसुन तपास आणि सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी मांडलेली बाजू, यामुळे  नराधमांना फाशीची शिक्षा झाली. यामुळे तपास यंत्रणा आणि ऍड. उज्ज्वल निकम यांना धन्यवाद द्यायला हवेत. वाईट प्रवृत्तीचे लोक या शिक्षेमुळे गुन्हा करताना दहावेळा विचार करतील. हा निकाल म्हणजे वाईट प्रवृत्तीचा पराजय आहे. फाशीच्या शिक्षेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला जरब बसेल. वरिष्ठ न्यायालयातही हा निकाल कायम राहवा. त्यामुळे आरोपींची फाशीची शिक्षा कायम राहिल, याची जबाबदारी सरकारची आहे.

20 टक्क्यांपर्यंत खात्रीशीर बचत – 20 जीबीपर्यंत खात्रीशीर अतिरिक्त डेटा- व्होडाफोनची रेड टूगेदर योजना

0

मुंब – व्होडाफोनचे प्रीपेड ग्राहक असाल, तर तुम्ही एकत्र असणे चांगले! भारतातील एक आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी व्होडाफोन इंडियाने आज रेड टूगेदर या अनोख्या आणि सोयीच्या योजनेची घोषणा केली. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या रेड पोस्टपेड योजनेद्वारे एकत्र येता येऊन ग्रुपवरील भाड्यात 20 टक्क्यांपर्यंत खात्रीशीर बचत करता येईल, तसेच 20 जीबीपर्यंत अतिरिक्त डेटा मोफत मिळेल.

 याशिवाय रेड टूगेदरच्या ग्राहकांना ग्रुपसाठी एकच बिल देण्याची सोयही उपलब्ध होईल. रेड टूगेदर ही योजना केवळ कुटुंबांसाठी मर्यादित नाही, तर ग्राहकांना त्यांचे मित्र आणि त्यांची इतर उपकरणेही या योजनेत एकत्र आणता येतील. 399 रुपये भाडे असलेल्या रेड बेसिक या योजनेपासून सुरू होणा-या कोणत्याही नव्या रेड पोस्टपेड योजनेचे ग्राहक नव्या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

 ग्राहकांना त्यांच्या मूळ रेड पोस्टपेड योजनेचे लाभही या जोडीने मिळतच राहतील.

 व्होडाफोन इंडियाच्या ग्राहक व्यवसाय विभागाचे सहयोगी संचालक अवनीश खोसला म्हणाले, रेड टूगेदर ही अत्यंत लाभदायक योजना असून, आमच्या ग्राहकांना बचतीची खात्री देणारी आहे. नुकत्याच नव्याने आणलेल्या व्होडाफोन रेड पोस्टपेड योजनांवरही ही योजना उपलब्ध असल्याने व्होडाफोन रेडचे भारतातील सर्वोत्तम पोस्टपेड योजना म्हणून असलेले स्थान आणखी बळकट करणारी आहे.

 रेड टूगेदरशिवाय नव्या व्होडाफोन रेड पोस्टपेड योजनांमध्ये पुढील सुविधा आहेत

  1. नॅशनल रोमिंग मोफत असल्याने ग्राहकांना भारतातून भारतात केलेल्या कोणत्याही कॉलसाठी पैसे भरावे लागणार नाहीत.
  2. डेटा रोल ओव्हर सुविधेमुळे ग्राहकांचा विनावापर पडून राहिलेला डेटा वाया जाणार नाही. विनावापर पडून राहिलेला 200 जीबीपर्यंतचा डेटा त्यांना या सुविधेमुळे नंतरही वापरता येईल.
  3. नेटफ्लिक्स, व्होडाफोन प्ले आणि मॅगझ्टरच्या माध्यमातून ग्राहकांना 12 महिन्यांपर्यंत सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद घेता येईल.
  4. रेड शिल्ड या हँडसेट सुरक्षा सुविधेमुळे ग्राहकांना हँडसेटची चोरी किंवा नुकसान झाले, तर सुरक्षा कवच मिळेल.

 नव्या योजना सध्या आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, जम्मू आणि काश्मीर, तसेच हिमाचल प्रदेश या परिमंडळांमध्ये लागू नाहीत.

बिबट्याला मारणे हे मंत्र्यांचे काम आहे का ?-हल्लाबोल मोर्चा दरम्यान अजित पवारांची टीका

0

पुणे-गिरीश महाजन कमरेला बंदूक लावून एका कार्यक्रमात वावरत होते. महाजन यांना बंदुकीचा परवाना प्राणी मारायला दिला आहे का . बिबट्याला मारणे हे मंत्र्यांचे काम आहे का, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात केला. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल मोर्चा काढला. त्याचं नेतृत्व अजित पवार यांनी केलं. त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार यांनी राज्यसरकारवार टीका करताना म्हटले, ” मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा घोटाळ्या प्रकरणी कुलुगुरुंना हटवण्यात आलं. तर, कर्जमाफीतील गोंधळाच्या प्रकरणात सचिव विजय गौतम यांना हटवण्यात आलं. मात्र, कुलगुरू आणि सचिवांना हटवून काय उपयोग? संबंधित खात्याच्या मंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी” राज्य सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही. कारवाई करताना फक्त प्रशासनावर केली जाते.प्रशासनावर नियंत्रण असणाऱ्या मंत्र्यांची मुख्य जबाबदारी असते. त्यांच्यावर कधी कारवाई करणार, असा सवाल अजित पवार यांनी केला.

” गिरीश महाजन यांना काही समजतं की नाही हेच समजत नाही. गिरीश महाजन कमरेला बंदूक लावून एका कार्यक्रमात वावरत होते. महाजन यांना परवाना प्राणी मारायला दिला आहे का ? बिबट्याला मारणे हे मंत्र्यांचे काम आहे का?” असा सवालही त्यांनी यावेळी केला.

महागाई, पेट्रोल दरवाढ, नोटाबंदी, जीएसटी यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यात हल्लाबोल मोर्चा

0
पुणे : ‘भाजपची सत्ता आली तशी देशात, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढायला लागली. शेतकरी आत्महत्या करतोय तर माता-भगिनींवर अत्याचार वाढत चाललेत. कायदा-सुव्यवस्था बिघडत चालली असून सर्वसामान्य माणसांचे जगणे मुश्कील झाले आहे. केवळ फसवेगिरी करणारे, हे सरकार आहे असा ‘हल्लाबोल’ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
महागाई, पेट्रोल दरवाढ, नोटाबंदी, जीएसटी यावरून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भाजपा सरकार विरोधात आज बुधवारी पुण्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी यांनी मोर्चा काढला होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा अलका टॉकीज येथून, केळकर रस्ता, शनिवार पेठ, कन्याशाळा, अप्पा बळवंत चौक, प्रभात टॉकीज, शनिवारवाडा, सूर्या हॉस्पिटल, साततोटी चौक, कमला नेहरू हॉस्पिटल, सदानंद नगर झोपडपट्टी मार्गे नरपतगिरी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उप जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
  आंदोलनात महिला व तरुणांची संख्या लक्षणीय होती. यावेळी जीएसटी रद्द झालाच पाहिजे, दुधाला भाव मिळायलाच हवा अशा प्रकारचे फलक आंदोलक महिलांच्या हातात होते. या आंदोलनात पुणे शहराध्यक्ष खा. वंदना चव्हाण,महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील,वैशाली बनकर, चंचला कोद्रे, अश्विनी कदम, सुभाष जगताप, विशाल तांबे, प्रदीप गायकवाड, योगेश ससाणे, महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, नंदा लोणकर, रुपाली चाकणकर, जालिंदर कामठे,  अंकुश काकडे, भगवान साळुंखे, रवींद्र माळवदकर, माजी आमदार कमल ढोले-पाटील, बापू पठारे, अशोक पवार,   राकेश कामठे, स्वप्नील खडके, ऋषी परदेशी, इकबाल शेख, भोलासिंग अरोरा, शशिकांत तापकीर, मिलिंद वालवडकर, नंदकिशोर काळभोर, वैशाली नागोडे, सुरेश घुले, पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्या करिता हे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन राज्यव्यापी असून, राज्याचे महत्वाचे प्रश्न या आंदोलनाद्वारे मांडण्यात येणार आहे. भाजप आणि शिवसेना सत्तेवर येऊन ३ वर्षे ओलांडली आहेत. या काळात ते अपयशी ठरले आहेत, केवळ पोकळ आश्वासन देणे आणि जनतेची फसवणूक या सरकारने केली आहे. दिनांक १ ते १२ डिसेंबरमध्ये यवतमाळ ते नागपूर असा १५३ किलोमीटर पदयात्रेद्वारे आंदोलन करण्याचा संकल्प राष्ट्रवादी पक्षाने केला आहे. नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत या राज्यव्यापी आंदोलनाचा समारोप होणार आहे,’ असे अजित पवार यांनी सांगितले.
‘सर्व स्तरावर राज्य सरकार भरकटलेले आहे. अनेक पोकळ अश्वासने देऊन त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. विना अट आणि सरसकट कर्ज माफी, शेतीमालासाठी हमी भाव, विषारी औषध फवारणीमुळे बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबीयांना मदत, महिला सुरक्षा, वाढती महागाई, पेट्रोल, डीझेल, गॅस दरवाढ, शिक्षण आणि शिष्यवृत्तीमधील गोंधळ, भारनियमन, नोटबंदी, जीएसटी, निकृष्ट नागरी सुविधा आणि आरोग्य व्यवस्था, कुपोषण, बालमृत्यू, शेती, उद्योग, बेरोजगारी, अर्थव्यवस्था यांचा बोजवारा आणि सरकारच्या एकूणच अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी व तसेच दुर्बल घटकांच्या न्यायासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सरकारवर हल्लाबोल करणार आहे. हे आंदोलन समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे. त्यामुळे सर्वांनीच या आंदोलनात सहभागी व्हावे,’ असे खा. वंदना चव्हाण म्हणाल्या.

शरद पवार आणि राणेंबद्दल बोलण्यास डॉक्टरांची मनाई : रामदास कदम

0

पुणे: “राज्यात पुढच्या वर्षी प्लॅस्टिक बंदी करण्यावर माझा भर असणार आहे. त्याचा कायदा बनविण्याचे महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे मी राजकारणावर भाष्य करणार नाही. विधानपरिषद निवडणुका, भाजप, शरद पवार, नारायण राणे यांच्याबद्दल बोलण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. घशाला त्रास होतो,” असे सांगत राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज राजकीय भाष्य करणे टाळले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्लॅस्टिक बंदीबाबत विधानभवन  येथे पुणे महसुली  विभागस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती,  यावेळी ते बोलत होते. यावेळी  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी तसेच पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मुख्याधिकारी उपस्थित होते.या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकीय भाष्य करणे टाळले.

श्री. कदम म्हणाले,  वाढत्या लोकसंख्येबरोबरच  प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग वापरणाऱ्यावर कारवाई करण्याबरोबरच अशा वस्तूंचे उत्पादन थांबविण्याबाबत तसेच उत्पादन करणाऱ्या उद्योजकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.  प्लॅस्टिकच्या दैनंदिन वापरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. यामध्ये आपण सर्वजण जबाबदार घटक असून प्लॅस्टिकबंदीची सुरुवात मी स्वतःपासून केली असून आपणही स्वतः चे घर, कार्यालयात प्लॅस्टिक शिवाय अन्य वस्तूंच्या वापरावर भर देऊन इतरांनाही याबाबत प्रेरित करावे.  सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे  राबविण्यात येत असलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

श्री. कदम यांनी पाचही जिल्ह्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी प्लॅस्टिक वापराबाबतच्या सद्य:स्थितीचा आढावा घेऊन प्लॅस्टिक बंदीबाबत विविध सूचनांवर चर्चा केली.  श्री. कदम म्हणाले, प्लॅस्टिकबंदीला प्रोत्साहन देण्यासाठी  विविध उपक्रम राबविण्याबाबत विचार करता येईल. प्लॅस्टिकमुक्त ग्रामपंचायत अभियान, प्लॅस्टिकमुक्त ग्रामपंचायती, महानगरपालिकांना रोख रकमेची बक्षीसे देण्याबाबत विचार करता येईल.  प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरावर भर देण्यासाठी  प्रथम  या पिशव्या मोठया प्रमाणात तयार कराव्या लागतील.  हे काम बचतगटातील महिलांना दिल्यास  महिलांना रोजगार मिळेल व कापूस उत्पादित शेतकऱ्यांनाही फायदा होईल. पर्यावरण संरक्षणाबाबत  प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दक्षता बाळगावी.

आता शिक्षेची अंमलबजावणी व्हावी – खासदार सुप्रिया सुळे

0

खासदार सुप्रिया सुळे यांनी कोपर्डी प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘कोपर्डीच्या आमच्या पीडित भगिनीला अखेर न्याय मिळाला याचे आंतरिक समाधान आहे. माननीय न्यायालयाने सुनावलेल्या कठोर शिक्षेमुळे या वृत्तींना धरबंद बसेल अशी अपेक्षा आहे. या निकालामुळे पीडितांना, महिला व युवतींना दिलासा मिळाला आहे. आरोपींना सुनावण्यात आलेल्या शिक्षेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी.’ अशी मागणी त्यांनी केली.

कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खूनप्रकरणी आज जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे (वय 25), संतोष गोरख भवाळ (वय 30), नितीन गोपीनाथ भैलूमे (वय 26) या तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाने 18 नोव्हेंबरला त्यांना दोषी ठरविले होते.

फाशीची शिक्षा हि अजूनही भीती निर्माण करत नाही ही गंभीर बाब- खा. वंदना चव्हाण

0

कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपींना ‘फाशी’ हा निर्णय अपेक्षितच होता. सर्वोच्च न्यायालयाने ही फाशीची शिक्षा Rarest of rare case मध्ये व्हावी अशी संकल्पना मांडली होती. कोपर्डी घटनेत निरपराध मुलीवर झालेला बलात्कार आणि खून हे या कक्षेत बसत असल्याने नराधमांना हि शिक्षा ठोठावणे योग्यच आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. परंतु गेलेल्या जीवामुळे कुटुंबियांच्या जीवनात निर्माण झालेले दुःख आणि पोकळी भरून येणार नाही. तसेच अशा प्रकरणामध्ये न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा हि अजूनही दुष्कृत्य करणाऱ्या नराधमांमध्ये भीती निर्माण करत नाही ही गंभीर बाब आहे. असे कृत्य घडू नये या साठी शासन अजूनही ठोस पावले उचलत नाही हि मोठी शोकांतिका आहे. 

– खासदार वंदना चव्हाण 

महावितरणचा राष्ट्रीयस्तरावरील बेस्ट पॉवर युटिलिटीसह तीन ऍ़वार्डने गौरव

0

मुंबई   दिल्ली येथे इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या विद्यमाने आयोजित 11 व्या इंडियन एनर्जी समिटमध्ये महावितरणचा बेस्ट पॉवर युटिलीटीमध्ये द्वितीय क्रमांकाच्या ऍ़वार्डने गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमात महावितरणला प्रथम क्रमांकाचा मोस्ट इनोव्हिटीव्ह डिसकॉम ऍ़वार्ड तसेच ग्रिन ग्रिडमध्ये द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या विद्यमाने इंडियन एनर्जी समिट 2017 या कार्यक्रमाचे आयोजन 28 29 नोव्हेबर 2017 रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध राज्यातील वीज वितरण कंपन्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यात महावितरणने ऊर्जा क्षेत्रात केलेल्या प्रभावी कामगिरीबद्दल बेस्ट पॉवर युटिलिटीच्या द्वितीय क्रमांकाच्या ऍ़वार्डने गौरविण्यात आले.

ग्राहकसेवेंतर्गत अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल महावितरणला प्रथम क्रमांकाचा मोस्ट इनोव्हिटीव्ह डिसकॉम ऍ़वार्ड तसेच अपारंपारिक ऊर्जेच्या क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल ग्रिन ग्रिडमध्येही द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शहीद सौरभ फराटे यांच्या स्मारकाचा विषय स्थायी समितीत मंजूर

0

पुणे- शहीद सौरभ फराटे यांच्या स्मारकाचा विषय आज महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला .
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान सौरभ नंदकुमार फराटे यांचे स्मारक डिसेंबर महिन्यापर्यंत उभारु, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांच्याकडून देण्यात आले होते. फुरसुंगी येथील गंगानगर परिसरात राहणारे नंदकुमार फराटे यांना १७ डिसेंबर २०१७ रोजी वीरमरण आले होते. त्यानंतर त्यांचे स्मारक उभारण्याच्या घोषणा करण्यात आली होती .
हडपसर येथील गाडीतळ येथे स्मारक उभारण्यात यावे. तसेच बनकर स्कूलच्या परिसरात शहीद सौरभ फराटे यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी मंगल फराटे यांनी महापौरांकडे केली होती यावेळी महापौरांनी डिसेंबरपर्यंत या स्मारक उभारु, असे आश्वासन दिले होते २४ ऑक्टोबरला मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करुन कामावर रुजू झाल्यानंतर सीमारेषेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सौरभ फराटे यांना वीरमरण आले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांचा धाकटा भाऊदेखील सैन्यदलात आहे.
स्थायी समितीच्या मान्यतेनंतर स्मारकाच्या कामाला वेग येईल असे चित्र आहे .
दरम्यान याबाबत स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पहा आणि ऐका काय म्हटले आहे …..

सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन (व्हिडीओ)

0

पुणे-काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा सप्ताहाचे तेरावे वर्ष असून दिनांक 2 ते 9 डिसेंबर 2017 दरम्यान महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे मार्गदर्शन, काँग्रेस कनेक्ट अभियानाचा प्रारंभ, 125 वर्षे पूर्ण झालेल्या गणेशोत्सव मंडळांचा सन्मान, विद्यापीठे आणि विद्यमान सरकारची धोरणे, रेडिओचे सामाजिक प्रश्न सोडविण्यातील योगदान याबद्दल परिसंवाद, दिव्यांग मुलांसोबत आनंदोत्सव, चित्रकला स्पर्धा, सशस्त्र सुरक्षा दलाचा ध्वज दिन कार्यक्रम, तरुणांसाठी नोकरी मेळावा, जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रमात बचत गटातील महिलांचा स्व. इंदिरा गांधी जन्मशताब्दी उद्योगिनी सन्मान यांसह विविध कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

सप्ताहाचे उद्घघाटन महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (दि. 2 डिसेंबर) सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे असणार आहेत. सप्ताहातील विविध कार्यक्रमांमध्ये शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे ,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार, शरद रणपिसे,  अनंत गाडगीळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर, जागतिक अपंग दिनानिमित्त कोरेगाव पार्क येथील अंधशाळेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. 3 डिसेंबर) दुपारी करण्यात आले आहे.

* काँग्रेस कनेक्ट अभियानाचा प्रारंभ –

काँग्रेस पक्षाने गेल्या 60 वर्षांच्या काळात व्यापक प्रमाणात युवकांपर्यंत पोहोचवून त्यांना पुन्हा काँग्रेसकडे वळविण्याकरिता काँग्रेस कनेक्ट हे अभियान राबविण्यात येणार असून त्याचा प्रारंभ पुण्यामध्ये होत आहे. या उपक्रमांतर्गत आयटी, बँका, सेवा, औद्योगिक क्षेत्र तसेच इतरही क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा पिढीला, सुशिक्षीत मध्यम वर्गीयांना काँग्रेसने देश उभारणीत दिलेल्या कार्याची माहिती देणे, काँग्रेसविषयीचे गैरसमज दूर करणे, त्यांच्याशी सतत संपर्कात राहून काँग्रेसविषयी अधिकाधिक माहिती देणे आदी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. काँग्रेस कनेक्ट या अभियानाचा प्रारंभ (शनिवारी, दि. 2 डिसेंबर) सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे उद्घाटन सोहळ्यादरम्यान अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

* विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा :-

इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांकरीता भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सारसबागेत ही स्पर्धा शनिवारी, (दि. 2 डिसेंबर) सकाळी होणार आहे. शिल्पकार विवेक खटावकर हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे आयोजित स्पर्धेत आत्तापर्यंत 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी, (दि. 8 डिसेंबर) दुपारी घोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी येथे होईल.

* 125 वर्षे झालेल्या गणेशोत्सव मंडळांचा सन्मान :-

पुण्याच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक क्षेत्राचा कणा असलेल्या गणेशोत्सव मंडळांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षे पूर्ण होत असताना पुण्यातील अनेक मंडळांना देखील 125 वर्षे पूर्ण झाली आहेत. जगाच्या नकाशावर पुण्याच्या गणेशोत्सवाचे आणि गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे. गणेश मंडळांनी सातत्याने 125 वर्षे समाजाच्या तळागाळात काम केले असून या कार्याबद्दल मंडळांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. सोमवारी (दि.4 डिसेंबर) सायंकाळी घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक सभागृह येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरु पी.डी.पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

* विद्यापीठे आणि विद्यमान सरकार – परिसंवाद :-

शिक्षणक्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणारा आगळावेगळा कार्यक्रम सप्ताहात आयोजित करण्यात आला आहे. नुकतेच मुंबई विद्यापीठामध्ये झालेला गोंधळ, शिक्षणमंत्र्यांसह इतर जबाबदार पदाधिका-यांची भूमिका या पार्श्वभूमीवर विद्यापीठे आणि विद्यमान सरकार – शैक्षणिक स्वायत्तता धोक्यात आणणारी निती याविषयावरील चर्चासत्राचे आयोजन मंगळवारी, (दि 5 डिसेंबर) सायंकाळी नवी पेठेतील पत्रकार भवन सभागृहात करण्यात आले आहे. यावेळी माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, प्रा.श्रीरंजन आवटे आदी उपस्थित राहणार आहेत.

* सामाजिक प्रश्नांमध्ये रेडिओचे योगदान – चर्चासत्र :-

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, टि.व्ही., इंटरनेटसारखी प्रसारमाध्यमे असताना देखील रेडिओचे सामाजिक प्रश्न सोडविण्यामध्ये मोठे योगदान आहे. त्यामुळे तरुणाईमध्ये रेडिओचा वापर मोठया प्रमाणात आजही होताना दिसतो. यंदा सप्ताहामध्ये याविषयी वेगळा कार्यक्रम होत असून रेडिओचे सामाजिक प्रश्न सोडविण्यातील योगदान याविषयावर बुधवारी (दि. 6 डिसेंबर) सायंकाळी स.प.महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये चर्चासत्र होणार आहे. यामध्ये विविध रेडिओ माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून असा कार्यक्रम पुण्यामध्ये प्रथमच होत आहे.

* सशस्त्र सुरक्षा दलाचा ध्वज दिन :-

सशस्त्र सुरक्षा दलाचा ध्वज दिन कार्यक्रम गुरुवारी (दि. 7 डिसेंबर) दुपारी अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटरसमोर असलेल्या नूतन मराठी शाळेमध्ये होणार आहे. यावेळी 20 बाय 10 आकारातील भव्य रंगावली काढण्यात येणार असून शाळेतील 500 हून अधिक विद्यार्थी सेनाधिका-यांना मानवंदना देणार आहेत. कार्यक्रमाला लष्करातील सेनाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

* करिअर मार्गदर्शन शिबीर आणि नोकरी मेळावा :-

शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर करिअरच्या वाटा शोधणा-या विद्यार्थ्यांकरीता दरवर्षीप्रमाणे यंदाही नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. लोहियानगरमधील सावित्रीबाई फुले सभागृह येथे गुरुवारी (दि. 7 डिसेंबर) सकाळी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात पुणे आणि परिसरातील अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.

* इंदिरा गांधी जन्मशताब्दी उद्योगिनी सन्मान सोहळा व समारोप :-

इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बचत गटांची चळवळ उभारुन अनेक महिलांना स्वत:च्या पायावर उभ्या करणा-या बचतगटांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उस्मानाबाद येथील उद्योजिका कमल कुंभारे यांचा बचत गटातील कार्याबद्दल सन्मान होणार आहे. यावेळी विविध कंपन्यांचे मार्केटिंग प्रमुख देखील महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी, (दि. 9 डिसेंबर) दुपारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा व समारोप समारंभ पार पडणार आहे.

याशिवाय अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सप्ताहामध्ये करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमांना मोफत प्रवेश असून नागरिकांनी यामध्ये मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.