Home Blog Page 321

अनेक पुरस्कारप्राप्त ‌‘वंश‌’ लघुपटाला पुणेकरांची पसंती

पुणे : जी. ए. कुलकर्णी हे प्रतिभावान लेखक होते. त्यांच्या कथांचा भावार्थ समजणे अवघड असते. त्यांच्या ‌‘वंश‌’ या कथेवर साकारलेल्या लघुपटाद्वारे उत्तम वातावरण निर्मिती झाली असून पात्रांच्या भावना प्रेक्षकांपर्यंत सहजतेने पोहोचत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी केले.
जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशातब्दीनिमित्त सावी आर्टस्‌‍ आणि वाईड विंग्ज मीडियातर्फे दोन वर्षांपूर्वी ‌‘वंश‌’ या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. या लघुपटाला देश-विदेशात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून कान्स चित्रपट महोत्सवातही हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला होता. बीएमसीसीमध्ये आयोजित चित्रपटाच्या प्रदर्शन सोहळ्यात डॉ. आगाशे बोलत होते. जी. ए. कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर, प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी, प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुखथनकर तसेच लघुपटातील कलावंत डॉ. वरदा जाधव, सूरज सातव, मैत्रेयी दाते उपस्थित होते. पुणेकरांनी या लघुपटावर पसंतीची मोहोर उमटविली. ‌‘वंश‌’ हा लघुपट यू-ट्यूबवरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
लघुपटाविषयी बोलताना नंदा पैठणकर म्हणाल्या, ‌‘वंश‌’ ही कथा समजायला आणि माध्यमांतर करायला खूप अवघड आहे. पण सर्व कलाकारांनी मेहनतीने भूमिका साकारून प्रसंग उठावदार केले आहेत.
निर्मितीविषयी बोलताना गणेश जाधव म्हणाले, जीएंचा वेगळा चाहता वाचकवर्ग देश-परदेशात आहे. परदेशातील चाहत्यांपर्यंत लघुपटाच्या माध्यमातून कथा पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
गिरीश कुलकर्णी म्हणाले, जी. ए. कुलकर्णी यांचे लिखाण जागतिक पातळीवरील आहे. अशा थोर लेखकाच्या साहित्यकृतीचे माध्यमांतर करणे फार जबाबदारीचे असते. तरुण कलाकार-तंत्रज्ञांनी अवघड जबाबदाऱ्या पेलून पार पाडणे यासारखे सुख नाही. नवनव्या प्रयोगातून सुसंस्कृत समाज घडण्यास मदत होते.
सुनील सुखथनकर म्हणाले, जीएंच्या कथांचे माध्यमांतर व्हावे याविषयी अनेकवेळा नंदाताई यांच्याबरोबर चर्चा झाली. ही अवघड प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली त्याबद्दल कलाकार-तंत्रज्ञांचे अभिनंदन. जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांमध्ये नियतीचा स्पर्श असतो. ‌‘वंश‌’ या कथेतून त्यांनी सामाजिक विषयासंदर्भात जाणीवही करून दिली आहे. लघुपटाच्या माध्यमातून केलेली मांडणी खूप समाधानकारक आहे.
डॉ. वरदा जाधव यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम, सूरज सातव, मैत्रेयी दाते यांच्या या लघुपटात भूमिका असून दिग्दर्शन ऋषी मनोहर यांनी केले आहे. निर्मिती गणेश जाधव यांची आहे तर पटकथा व संवाद गौरव बर्वे यांचे आहेत.

पुण्यामध्ये १,१०० कोटी रुपयांचा रेसकोर्स थीम्ड मेगा टाऊनशिप प्रकल्प

डेला रिसॉर्ट्स अँड ऍडव्हेंचर आणि हिरानंदानी कम्युनिटीज अँड क्रिसला डेव्हलपर्स ची भागीदारी

मुंबई, ८ मे २०२५: डेला रिसॉर्ट्स अँड ऍडव्हेंचरने हिरानंदानी कम्युनिटीज अँड क्रिसला डेव्हलपर्ससोबत
प्रोप्रायटरी सीडीडीएमओ TM मॉडेलसाठी हातमिळवणी केली आहे. तब्बल ११०० कोटी रुपये उत्पन्न मिळवून
देण्याची क्षमता असलेली रेसकोर्स थीम्ड मेगा टाऊनशिप उभारण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे भारतीय स्थावर मालमत्ता उद्योगक्षेत्रात हे पाऊल पहिल्यांदाच उचलले गेले आहे. विशिष्ट
संकल्पनेवर आधारित, हॉस्पिटॅलिटी-चलित मॉडेलने स्थावर मालमत्ता क्षेत्रात एक नवीन गुंतवणूक वर्ग खुला
आहे, ज्यामध्ये गुंतवणुकीवर ९% पर्यंत परतावा देण्याची क्षमता आहे. या मॉडेलमुळे हा मूल्य प्रस्ताव स्थावर
मालमत्तेच्या पलीकडे जाऊन, एक खास निवडण्यात आलेली लाईफस्टाईल इकोसिस्टिम निर्माण करतो,
ज्यामध्ये अतुलनीय लक्झरी, कम्युनिटी आणि अनुभवात्मक हॉस्पिटॅलिटी यांचा मिलाप आहे.
पुण्यातील वेगाने विकसित होत असलेल्या उत्तर हिंजवडीमध्ये तब्बल ४० एकरांहून मोठ्या परिसरात
वसवण्यात येणार असलेल्या या टाऊनशिपमध्ये ८ एकरांचे रेसकोर्स आणि इंटरनॅशनल पोलो क्लब, १२८
खाजगी व्हिला प्लॉट्स, ११२ रिसॉर्ट खाजगी निवास, ३०० खोल्यांचे पंचतारांकित लक्झरी रिसॉर्ट, ९ वेडिंग
डेस्टिनेशन व्हेन्यू, १२ कॉर्पोरेट आणि माईस व्हेन्यू, एक्स्ट्रीम ऍडव्हेंचर पार्क, डेला रेन्ज गोल्फ, वेलनेस सुविधा
आणि डेलाची खासियत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिझाईन संवेदनांनी सजलेल्या एक्स्पेरिएन्शियल जागा
यांचा समावेश असेल. या टाऊनशिपची आधुनिक ऑरगॅनिक आणि ब्रिटिश कलोनियल आर्किटेक्चरल आणि
डिझाईन शैली अनुभवात्मक जगणे, स्थिर परतावा आणि दीर्घकालीन संपत्ती वृद्धी यांना महत्त्व देणाऱ्या
घरमालकांच्या व गुंतवणूकदारांच्या नवीन पिढीच्या सौंदर्याशी संबंधित आवडीनिवडींना पुरेपूर अनुरूप आहे.
डेला रिसॉर्ट्स अँड ऍडव्हेंचरचे संस्थापक आणि अध्यक्ष तसेच या महत्त्वपूर्ण विकासामागे ज्यांची दूरदृष्टी आहे
असे श्री जिमी मिस्त्री यांनी सांगितले, “ही केवळ एक टाऊनशिप नाही तर भारतामध्ये आजवर कधीही पहिले न
गेलेल्या स्थावर मालमत्ता मॉडेलचा हा उदय आहे. सीडीडीएमओ दृष्टिकोनासह आम्ही स्थावर मालमत्तेला
केवळ उत्पादन नव्हे तर अनुभव म्हणून निर्माण करू इच्छितो. आमची इच्छा आहे की, स्थावर मालमत्ता ही
केवळ एक स्थिर संपत्ती बनून राहू नये तर, गतिशील, परतावा मिळवून देणारी गुंतवणूक बनावी. पहिल्यांदाच
निवासी स्थावर मालमत्तेमध्ये उद्योगक्षेत्रातील आजवरच्यापेक्षा म्हणजे ३% पेक्षा जास्त परतावा मिळत आहे,
स्थावर मालमत्ता गुंतवणुकीवर पारंपरिक अपेक्षांपेक्षा जास्त ९% पर्यंत खात्रीशीर परतावा दिला जात आहे. हे
लक्झरी फ्यूचर फिट लिव्हिंग आहे, अचूकपणे डिझाईन करण्यात आले आहे आणि डिझाईन, नावीन्य व
संचालनातील उत्कृष्टता याचा आधार आहे.”उद्योगक्षेत्रातील दिग्गज, हिरानंदानी कम्युनिटीजचे अध्यक्ष डॉ निरंजन

हिरानंदानी यांनी या भागीदारीविषयीसांगितले, “भारतीय स्थावर मालमत्ता उद्योगामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून येत

आहे, एकात्मिक, वन-स्टॉप डेस्टिनेशन्समध्ये जीवनशैलीवर भर देणाऱ्या जगण्याबाबत घरखरेदीदारांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा या
परिवर्तनाला दिशा आणि चालना देत आहेत. ग्राहककेंद्रितता वाढवण्यासाठी जागा आणि सेवा यांचे एकीकरण
करणारे ट्रेंड्स उद्योगक्षेत्राने स्वीकारले पाहिजेत. आधुनिक घरखरेदीदारांच्या आवडीनिवडी बदलत आहेत,
त्यालाच अनुसरून स्थावर मालमत्ता विकासक महत्त्वाकांक्षी भारतीय घरमालकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी
तयार करण्यात आलेल्या अभिनव इकोसिस्टिम तयार करण्यासाठी पूरक उद्योगांसोबत हातमिळवणी करत
आहेत.
नावीन्य आणि ट्रेंड्स निर्माण करणे हे नेहमीच हिरानंदानीचे हॉलमार्क्स म्हणून ओळखले जातात. उत्तर
हिंजवडी, पुण्यामध्ये १०५ एकरांच्या टाऊनशिपसाठी क्रिसला डेव्हलपर्ससोबत आमची धोरणात्मक भागीदारी
म्हणजे हिरानंदानी ग्रुपने पुण्यातील वेगाने वाढत असलेल्या स्थावर मालमत्ता बाजारपेठेत केलेले पदार्पण आहे.
शिवाय डेला ग्रुपसोबत केलेला विकास व्यवस्थापन करार विशेष निवडण्यात आलेल्या, खास अनुभव देणाऱ्या,
राहण्याच्या जागा पुरवण्याची आम्ही कटिबद्धता मजबूत करतो. जीवनशैलीची नवी व्याख्या रचणे, प्रत्यक्ष
वापर करणारे आणि गुंतवणूकदार या दोघांसाठी देखील मूल्य प्रस्ताव वाढवणे आणि भारतीय स्थावर मालमत्ता
क्षेत्रात नवीन मानके स्थापन करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे.”
क्रिसला डेव्हलपर्सचे सीएमडी श्री सागर अगरवाल म्हणाले, “हिरानंदानी कम्युनिटीजसोबत आम्ही ज्या १०५
एकरांच्या एकीकृत टाऊनशिपची संकल्पना करत आहोत, ती स्केल, सस्टेनेबिलिटी आणि स्मार्ट शहरवादावर
आधारित आहे. डेला टाऊनशिप्ससोबत ४० एकर परिसरासाठी आम्ही भागीदारी ही धोरणात्मक भागीदारी
करण्याच्या क्रिसला डेव्हलपर्सच्या मूलभूत शक्तीमुळे शक्य झाले आहे ज्यामुळे व्हिजन आणि मूल्य या
दोन्हींमध्ये वाढ झाली आहे. या सेगमेंटमुळे निवासी स्थावर मालमत्तेमध्ये अनेक गोष्टी या उद्योगक्षेत्रात
पहिल्यांदाच आणल्या जातील, प्रीमियम खाजगी व्हिला प्लॉट्स, सिग्नेचर निवास, रेसकोर्स, रिसॉर्ट, ऍडव्हेंचर
पार्क यांचा यामध्ये समावेश आहे, ज्यामुळे शहरी जीवनाच्या मध्यभागी हॉस्पिटॅलिटी प्रस्तुत केली जाईल.
उत्तर हिंजवडीमध्ये असल्याने मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून अगदी जवळ आहे, ही टाऊनशिप घर
खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघांसाठी देखील आकर्षक ठरेल. डेलासोबत आम्ही एक असे डेस्टिनेशन तयार
करत आहोत ज्यामध्ये उत्तम राहण्याच्या जागा, महत्त्वाकांक्षा आणि उच्च मूल्य गुंतवणूक यांचा मिलाप
असेल, निवासी स्थावर मालमत्तेची नवीन राष्ट्रीय मापदंड निर्माण केले जातील.”
सध्या हा प्रकल्प नियोजनाच्या खूप वरच्या टप्प्यांवर आहे, जमीन अधिग्रहण पूर्ण झालेले आहे आणि
डिझाईनला अंतिम मंजुरी देण्याचे काम सुरु आहे. टाऊनशिपचा पहिला फेज तीन महिन्यांमध्ये लॉन्च होईल
आणि रिसॉर्ट व व्हिला प्लॉट्ससाठी पुढील वर्षीच्या सुरुवातीला ताबा दिला जाण्याची शक्यता आहे. २०२६
वर्षाच्या अखेरीस खाजगी निवासांचा ताबा दिला जाईल अशी अपेक्षा आहे. शहरी जगण्याची नवी व्याख्या तयार
केली जावी आणि ही टाऊनशिप म्हणजे पुण्यातील एक सांस्कृतिक हॉटस्पॉट बनावा तसेच इतर उदयास येत
असलेल्या भारतीय महानगरांसाठी एक अनुकरणीय मॉडेल तयार केले जाते हा या हॉस्पिटॅलिटीवर आधारित
थीम्ड टाऊनशिपचा उद्देश आहे.

‘बाप्पाचा कार्यकर्ता.. रक्तदाता… उपक्रम’

थॅलेस्मियाग्रस्त मुलांसाठी कार्यकर्त्यांचे रक्तदान
जागतिक थॅलेस्मिया दिनानिमित्त उपक्रमाचा शुभारंभ
जय गणेश व्यासपीठाचा विधायक उपक्रम

पुणे : जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘बाप्पाचा कार्यकर्ता.. रक्तदाता उपक्रम’ हे आणखी एक विधायक कार्य हाती घेतले आहे. पुण्यातील एकवीस गणपती मंडळांचे कार्यकर्ते थॅलेस्मियाने ग्रस्त मुलांसाठी दर महिन्याला रक्तदान करणार आहेत.
जागतिक थॅलेस्मिया दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचा शुभारंभ आज (दि. ८) ससून रुग्णालयात करण्यात आला.
या उपक्रमात साईनाथ मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ, सेवा मित्र मंडळ, शुक्रवार पेठ, अष्टविनायक मित्र मंडळ, नवी पेठ, श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ, एरंडवणे, नवज्योत मित्र मंडळ ट्रस्ट, येरवडा, श्री पोटसुळ्या मारुती मंडळ, गणेश पेठ, एकता मित्र मंडळ, अरण्येश्वर, नवजवान मित्र मंडळ, गणेश पेठ, व्यवहार आळी चौक मित्र मंडळ, कसबा पेठ, वीर शिवराज मंडळ गुरुवार पेठ, संयुक्त मित्र मंडळ, सदाशिव पेठ नागनाथ पार चौक, नवग्रह मित्र मंडळ, कसबा पेठ, वीर हनुमान मित्र मंडळ, क्रांती चौक, बुधवार पेठ, सत्यवीर मित्र मंडळ, शिवदर्शन, श्री अष्टविनायक मित्र मंडळ, येरवडा, त्रिशुंड मयुरेश्वर विजय मंडळ ट्रस्ट, सोमवार पेठ, राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट, कसबा पेठ, युवा वाद्य ढोल पथक, जनार्दन पवळे संघ, अखिल मोहन नगर मंडळ आणि विधायक मित्र मंडळे सहभागी झाली आहेत.
या मंडळांचे कार्यकर्ते दर महिन्याला ससून रुग्णालयात थॅलेस्मियाने ग्रस्त मुलांसाठी रक्तदान करणार आहेत. वर्षभरात साधारण 250 पेक्षा अधिक कार्यकर्ते रक्तदाते होणार आहेत. गणेश मंडळांच्या वतीने रक्तादन शिबिर आयोजित करण्यात येते त्यास ससून रुग्णालयातील रक्तपेढीला प्राधान्य देणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन पियूष शाह, शिरीष मोहिते, स्वप्नील दळवी, सुधीर ढमाले,राहुल जाधव, अमित जाधव, कुणाल पवार, राकेश दाखवे, शंतनू पाटसकर, किरण सोनीवाल, आदित्य मारणे, हर्षद नवले, सचिन पवार, अभिषेक मारणे यांनी केले.
उपक्रमास ससून हॉस्पिटलचे डीन डॉ. एकनाथ पवार, अधीक्षक यल्लाप्पा जाधव, थॅलेस्मिया वॉर्डच्या डॉ. आरती किणीकर, स्टाफ विद्या सुपेकर यांचे सहकार्य लाभले.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर

पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे निमित्त साधून शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील मराठी काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांनी निकालाची घोषणा केली.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त केंद्र सरकार, राज्य सरकार व अभिजात भाषेसंदर्भात काम करणाऱ्या समितीचे आपल्या काव्यातून आभार या विषयावर राष्ट्रीय स्तरावर काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहाशेपेक्षा जास्त कवींनी भाग घेतला होता, अशी माहिती शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी दिली.
प्रथम क्रमांक मिळालेले स्पर्धक : प्रतिभा विभूते, पुणे; राजेंद्र उगले, नाशिक; संगीता भालेराव, दौंड; डॉ. प्रविण किलनाके, सुवर्णा पवार, कोल्हापूर; बी. डी. घरत, रायगड; शैलजा जाधव, चांदवड.
द्वितीय क्रमांक मिळालेले स्पर्धक : संजय कावरे, अकोला; सोनाली कांबळे, धाराशिव; श्रद्धा काळे, ठाणे; संध्या केळकर, मुंबई; स्मिता जैन, पुणे; स्नेहल येवला, ठाणे.
तृतीय क्रमांक मिळालेले स्पर्धक : शिल्पा वाघमारे, अकोला; माधुरी मंगरुळकर, पुणे; वर्षा आपटे, सांगली; दिगंबर ढोकळे, भोसरेी; रामकृष्ण महाराज पाटील, रावेत; प्रतिभा खैरनार, नांदगाव.
उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालेले स्पर्धेक : दिपा वणकुद्रे, मुबंई; सीताराम करकरे, निगडी; मंगला भोयर, यवतमाळ; स्मिता पेशवे, उस्मानाबाद; रेखा मालपुरे, कल्याण; निमिला फाटक, निगडी.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा उपक्रम अभिमानास्पद : प्रवीण तरडे

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा आनंद आहे. याचे निमित्त साधून शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने राष्ट्रीय पातळीवर मराठी भाषेत काव्य स्पर्धा आयोजित करून प्रतिभावान कवींना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच मराठी भाषेविषयी जनजागृती करण्याचे काम केले आहे. प्रतिष्ठानची ही अभिमानास्पद कामगिरी आहे, असे प्रवीण तरडे यांनी म्हणाले.

छायाचित्रकारांच्या नजरेतून जनजीवन आणि निसर्गाचे ‌‘प्रतिबिंब‌’

पुणे : पुण्यातील हौशी, प्रतिभावान छायाचित्रकारांनी काढलेल्या वैविध्यपूर्ण छायाचित्रांमधून ग्रामीण जनजीवन आणि निसर्गाचा विलोभनीय आविष्कार पुणेकरांसमोर आज आला.
पुणे कॉटन कंपनी, देहम्‌‍ नेचर क्युअर आणि कृतार्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हौशी छायाचित्रकारांच्या ‌‘प्रतिबिंब‌’ या छायाचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कला दालनात भरविण्यात आले असून प्रदर्शनाचे उद्घाटन आज (दि. 8) सुप्रसिद्ध पक्षी छायाचित्रकार डॉ. सुधीर हसमनीस आणि क्रिकेट विश्लेषक-समालोचक सुनंदन लेले यांच्या हस्ते झाले. देहम्‌‍ नेचर क्युअरचे संचालक डॉ. सुजय लोढा, डॉ. कोमल लोढा, कृतार्थचे संचालक निलेश शुक्ला, दिपाली शुक्ला, उद्योजक निरंजन देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अमर अतितकर, अमेय वाळवेकर, ओंकार मुळगुंद, केदार दंडगे, विलास तोळसंकर, समीर अय्यर, विश्वेश बेहरे, अनंतप्रसाद देशपांडे, अमोद फडके आणि सागर मुथा यांची व्यन्यजीव, पक्षी, निसर्ग आणि ग्रामीण जनजीवन या विषयांवरील अनोखी छायाचित्रे प्रदर्शनात आहेत. प्रदर्शन दि. 10 मे पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात सर्वांसाठी खुले आहे.
छायाचित्रणाची आवड कशी जोपासली याविषयी कथा विशद करून मनोगत व्यक्त करताना डॉ. सुधीर हसमनीस म्हणाले, छायाचित्रणामुळे निसर्गाच्या सान्निध्यात वारंवार गेलो. निसर्गाशी जवळीक साधल्यामुळे आयुष्यातील ताण-तणाव तर दूर झालेच पण प्रकृतीही ठणठणीत ठेवण्यात बळ मिळाले.
सुनंदन लेले म्हणाले, छायाचित्रण ही कला आहे. ती जोपासण्यासाठी संयमाची फार गरज असते. निसर्ग, निसर्गातील प्राणी-पक्ष्यांच्या हालचाली टिपताना हा संयमच उपयोगी पडतो. कॅमेऱ्याला भावना नसतात पण छायाचित्रकाराला असतात; त्यामुळेच छायाचित्रकाराच्या नजरेतून टिपलेला क्षण बरेच काही सांगून जातो.
डॉ. कोमल लोढा, निलेश शुक्ला, दिपाली शुक्ला यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत केदार दंडगे, संदीप वाळवेकर, प्रसाद न्यायाधीश, ओंकार मुळुगंद यांनी केले. तर छायाचित्रकारांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया मुळगुंद यांनी केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘बॅलेट पेपर’ वरच घ्या- बहुजन समाज पक्षाची मागणी

पुणे-राज्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुकर झाला आहे. उशीरा का होईना, न्यायालयाने लांबलेल्या निवडणुकांसंदर्भात संविधान अनुरूप निकाल दिला आहे, असे मत व्यक्त करीत बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. येत्या चार महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीसाठी सज्जा व्हा,असे आवाहन त्यांनी पक्षाच्या कॅडरला केले. यासोबतच निवडणुका ‘बॅलेट पेपर’ वर घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

चलवादी म्हणाले, सर्वसामान्यांना मतदान आणि नेतृत्व निवडीचे अधिकार बहाल करणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाहीच्या संकल्पनेनुसार निवडणुका ‘बॅलेट पेपर’वर होणे आवश्यक आहे. बूथ बळकावणे, मतपत्रिकांचा गैरवापर करणे असे प्रकार आता तंत्रज्ञानाने सुसज्जीत महाराष्ट्रात होणे शक्य नाही, त्यामुळे मत पत्रिकांवर निवडणूक घ्यावी. शोषित, पीडित, वंचित आणि उपेक्षितांचा विकासासाठी आणि ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ या नितीनुसार समाज परिवर्तनासाठी सत्तेच्या चाव्या बसपाकडे असणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनावर हत्ती निवडणूक चिन्ह असलेला बसपाचा ‘निळा झेंडा’ फडकणे आवश्यक आहे. ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी’ ही संकल्पना समोर आणत बहुजनांचे नेतृत्व करणारी बसपा पूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणार आहे. शहर, जिल्हा तसेच ग्रामीण पातळीवर बसप कॅडर निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येत्या चार आठवड्यांमध्ये अधिसूचना काढणे राज्य सरकारला बंधनकारक राहणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत २०२२ पूर्वीची ओबीसी आरक्षणाची स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहे. आरक्षणासंदर्भात तिढा त्यामुळे तूर्त सुटला आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले. या निवडणुकीत मतदार त्यांची फसवणूक करणाऱ्या प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवेल आणि बहुजनांच्या हक्काचे विचारपीठ असलेल्या बसपाला पाठबळ देईल, असा विश्वास डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.

 पं.मनीषा साठे यांचा  न्यूझीलंड मध्ये  ‘नृत्य संवाद’ !*

पुणे :नृत्यगुरु पं.मनीषा साठे यांच्या ‘मनीषा नृत्यालय’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘शांभवीज् इंटरनॅशनल स्कुल ऑफ कथक’  तर्फे  न्यूझीलंडमध्ये   ‘नृत्य संवाद’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ! पं.मनीषा साठे आणि त्यांची  कन्या शांभवी दांडेकर या दोघींच्या कथक नृत्याचे सादरीकरण या कार्यक्रमात होणार आहे.दि.१६ मे २०२५  रोजी ऑकलंड परफॉरमिंग  आर्ट सेंटर(ऑकलंड) ,दि.२४ मे रोजी  वेलिंग्टन,दि.२५ मे रोजी ख्राईस्टचर्च येथे हे कार्यक्रम होणार आहेत.कथक नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पं.मनीषा साठे यांचा सत्कारही न्यूझीलंडस्थित भारतीयांच्या वतीने करण्यात येणार आहे. ‘मनीषा नृत्यालय’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भारतात आणि परदेशात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून न्यूझीलंड दौरा हा त्यापैकी एक आहे. 

  पं.मनीषा साठे…’नृत्यार्पित जीवन  प्रवास
मनीषा साठे यांनी कथक नृत्याचे शिक्षण लहान वयात पुण्यात पं. बाळासाहेब गोखले यांच्याकडे घेतले. पुढे त्यांनी पं. गोपीकृष्ण यांच्याकडे मुंबई येथे शिक्षण सुरू ठेवले. प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, खजुराहो नृत्य महोत्सव, शनिवारवाडा नृत्य महोत्सव, लखनौ नृत्य महोत्सव, गोहत्ती येथील कामाख्या महोत्सव, मुंबईमधील नेहरू सेंटर आणि टाटा थिएटर अशा भारताच्या विविध ठिकाणी कथक नृत्य सादर केले आहे. तसेच भारताबाहेर अमेरिका, चीन, बहरैन, स्वित्झर्लंड, स्वीडन, जपान इ. देशांत त्यांनी कार्यक्रम केले आहेत.

कथक नृत्यात आधुनिक संगीत आणि विश्व संगीताचा वापर हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी जपानी संगीताबरोबरही कथक सादर केले आहे. जपानी संगीतकार आणि ताईको वादक यासुहितो ताकीमोतो यांच्याबरोबर त्यांनी गेल्या १५ वर्षांत अनेक फ्युजन मैफली सादर केल्या आहेत.मनीषा साठे यांनी ‘सरकारनामा’ आणि ‘वारसा लक्ष्मीचा’ यांसह अनेक चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि अल्फा टी.व्ही. पुरस्कार सोहोळ्यात त्यांना सर्वोत्तम नृत्य दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.साठे या ‘मनीषा नृत्यालय ट्रस्ट’ या नावाची कथक नृत्याचे शिक्षण देणारी संस्था चालवतात. त्यांच्या अनेक विद्यार्थिनींना भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

संरक्षण मंत्री म्हणाले- ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू,सर्वपक्षीय बैठकीनंतर रिजिजू यांनीही पुनरुच्चार केला; राहुल म्हणाले- आम्ही सरकारसोबत

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. म्हणजेच ७ मे रोजी पाकिस्तानातील ९ ठिकाणी झालेल्या हवाई हल्ल्यानंतरही कारवाई थांबलेली नाही.दिल्लीतील संसदेच्या कक्षात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संरक्षणमंत्र्यांनी हे सांगितले. सुमारे दीड तास चाललेल्या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही संरक्षणमंत्र्यांच्या विधानाचा पुनरुच्चार केला.

ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते.बैठकीपूर्वी काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीची मागणी केली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, या संकटात आम्ही देश आणि सरकारसोबत आहोत. सरकारवर टीका करण्याची गरज नाही.

राहुल गांधी म्हणाले, ‘आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले त्याप्रमाणे, त्यांनी (सरकारने) म्हटले की काही गोष्टी आहेत ज्यांवर आपण चर्चा करू इच्छित नाही.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूरसाठी मी आपल्या सशस्त्र दलांचे आणि सरकारचे कौतुक केले आहे. आपण रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेविरुद्ध जागतिक मोहीम सुरू केली पाहिजे.
गेल्या बैठकीत, सरकारने पहलगाम हल्ल्यात सुरक्षेत त्रुटी असल्याचे मान्य केले होते
१३ दिवसांपूर्वी घडले सर्वपक्षीय बैठकीत, केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्यात सुरक्षेत त्रुटी असल्याचे मान्य केले होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले होते की, आयबी आणि गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सुरक्षेतील त्रुटींबद्दल विरोधी नेत्यांना माहिती दिली.

त्याचवेळी, विरोधकांनी सांगितले की ते सरकारसोबत आहेत. विरोधी पक्षाच्या खासदारांनी दहशतवादी छावण्या नष्ट करण्याची मागणी केली. सरकारने दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे ते म्हणाले. बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले – सरकारच्या प्रत्येक कृतीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. सर्वपक्षीय बैठक दोन तास चालली.
सर्वपक्षीय बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते की, आजच्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व पक्षांचे लोक आले होते. आम्ही म्हटले होते की या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती आवश्यक आहे कारण अंतिम निर्णय तेच घेतील. आजच्या बैठकीचे निष्कर्ष आम्ही पंतप्रधानांना सांगू असे मंत्र्यांनी सांगितले. आम्ही म्हणालो की एखाद्याला सांगणे ही एक गोष्ट आहे आणि स्वतः एखाद्याचे ऐकणे आणि नंतर निर्णय घेणे ही दुसरी गोष्ट आहे.

आम्ही म्हणालो की तिथे तीन-स्तरीय सुरक्षा आहे, मग सुरक्षेत चूक कशी झाली? एक हजार लोक तिथे पोहोचले होते. हे सुरक्षेचे अपयश आणि गुप्तचर यंत्रणेचे निष्काळजीपणा आहे. दहशतवादी हल्ला झाला, सरकारला जलद आणि जलद कारवाई करावी लागली, जी झाली नाही. सर्व नेत्यांनी एकत्रितपणे सांगितले की, सरकार देशाच्या हितासाठी जो काही निर्णय घेईल, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. या मुद्द्यावर आपण सर्वजण एक आहोत.

लाहोर,कराची,रावळपिंडीसह 9 ठिकाणी ड्रोन हल्ले:​​​​​​​भारताने पाकिस्तानच्या 3 हवाई संरक्षण प्रणाली केल्या नष्ट; पाकचा दावा- 25 ड्रोन पाडले

भारताने पाकिस्तानातील ३ शहरांत HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली आहे. वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. भारताने इस्रायली ड्रोन हार्पीने पाकिस्तानवर हल्ला केला आहे.यापूर्वी, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले होते की, लाहोर, रावळपिंडी आणि कराचीसह अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले झाले आहेत.पाकिस्तानी सैन्याने ९ ठिकाणी किमान २५ भारतीय ड्रोन पाडण्यात यश मिळवले आहे. दुसऱ्या ड्रोनने नुकसान करण्यात यश मिळवले, असे प्रवक्त्याने सांगितले. चौधरी यांच्या मते, गुरुवारी लाहोरमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे चार सैनिक जखमी झाले. मियानमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानकडून चिनी शस्त्रांच्या वापरावर बीजिंगने म्हटले- माहिती नाही
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात चिनी लढाऊ विमानांचा सहभाग असल्याच्या वृत्ताबाबत, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की त्यांच्याकडे याबद्दल कोणतीही माहिती नाही.बुधवारी भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल हल्ल्यात पाकिस्तानने चिनी लढाऊ विमानांचा वापर केल्याचा दावा केला जात आहे.
इस्लामाबादेत खोटे सायरन वाजवून दहशत पसरवणाऱ्यांना इशारा
इस्लामाबादच्या उपायुक्त कार्यालयाने म्हटले आहे की काही लोक खोटे सायरन वाजवून दहशत पसरवत आहेत. अशा लोकांना इशारा देण्यात आला आहे. लोकांना अशा अफवांपासून दूर राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

आपत्कालीन परिस्थितीत, फक्त जिल्हा प्रशासनच टीव्ही आणि सोशल मीडियावर त्याबद्दल माहिती देईल. जिल्हा प्रशासनाकडून पुष्टी मिळाल्याशिवाय कोणतीही माहिती वैध मानली जाणार नाही.
भारतीय दूतावासाने म्हटले- ग्लोबल टाईम्सने चुकीची माहिती पसरवू नये
पाकिस्तानने भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने पाडल्याचे वृत्त बीजिंगमधील भारतीय दूतावासाने फेटाळून लावले आहे
.

चीनच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या वृत्तावर, भारतीय दूतावासाने लिहिले की अशा चुकीच्या माहितीची उलटतपासणी केली पाहिजे आणि ती पसरवण्यापूर्वी त्याचे स्रोत तपासले पाहिजेत.

भारताच्या १५ लष्करी तळांवर हल्ला करण्याचा पाकचा प्रयत्न फसला-भारताने पाकची डिफेन्स मिसाइल-रडार सिस्टीम केली नष्ट

S-400 ने मिसाइल पाडले

पाकिस्तानकडून तणाव वाढवण्याचा प्रयत्न निष्फळ – भारताचे जशास तसे प्रत्युत्तर

नवी दिल्‍ली, 8 मे 2025

‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई  संदर्भातील 07 मे 2025 रोजी  घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक असल्याचे म्हटले होते. यावेळी हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. तसेच, यापुढे  भारतातील कोणत्याही लष्करी ठिकाणावर हल्ला केला गेला तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल, हेही पुन्हा अधोरेखित करण्यात आले.या इशा-यानंतरही  07-08 मे 2025 च्या रात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणी लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि  क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताकडून हे हल्ले ‘इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड’ व ‘एअर डिफेन्स सिस्टम’ने निष्फळ ठरवले. या हल्ल्यांचे पुरावे म्हणून विविध ठिकाणी आढळून आलेले अवशेष सध्या जमा करण्यात येत आहेत.

आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारताचे प्रत्युत्तर त्याच स्तरावर आणि त्याच तीव्रतेने होते. यासंदर्भात विश्‍वसनीय सूत्राकडून आलेल्या माहितीप्रमाणे, लाहोरमधील एक हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आली आहे.

सोळा निरपराध नागरिकांचे प्राण गेले

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरून (एलओसी) विनाकारण गोळीबार वाढवला आहे. त्यांनी कमी क्षमता असलेली तोफ  आणि त्याचबरोबर उच्च क्षमता असलेल्या तोफांचा वापर करून जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुला, उरी, पुंछ, मेंधार आणि राजौरी या भागांमध्ये गोळीबार केला.या पाकिस्तानी गोळीबारामुळे तीन महिला आणि  पाच लहान मुलांसह सोळा निरपराध नागरिकांचे प्राण गेले.  सामान्य निष्‍पाप लोकांचा बळी जात असल्यामुळे या परिस्थितीत भारताला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडले गेले आहे. भारताने दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे पाकिस्तानकडून होणारा लहान तोफांचा आणि जास्‍त क्षमतेच्या तोफांचा गोळीबार थांबवण्यात आला.भारतीय सशस्त्र दलांनी पुन्हा एकदा आपली गैर-उत्तेजक भूमिकेची बांधिलकी अधोरेखित केली आहे. पाकिस्तानी लष्करानेही भारताने स्वीकारलेल्या भूमिकेचा सन्मान केला, तरच भारताला ही भूमिका कायम ठेवणे शक्य होणार आहे.


परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा इशारा – जर पाकिस्तानने हल्ला केला तर आम्ही निश्चितच योग्य उत्तर दे
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत सांगितले की, पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांविरुद्ध केलेली कारवाई जाणीवपूर्वक आणि मर्यादित होती. त्याचा हेतू तणाव वाढवण्याचा नाही. पण जर भारतावर कोणताही लष्करी हल्ला झाला तर त्याचे प्रत्युत्तर खूप कडक आणि निर्णायक असेल. ते म्हणाले – शेजारी आणि महत्त्वाचा भागीदार असल्याने, इराणला परिस्थितीबद्दल स्पष्ट आणि योग्य माहिती असणे महत्वाचे आहे, जेणेकरून कोणताही गैरसमज होणार नाही.

सैन्याला सलाम… पण.. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही मोकाट..

पुणे : भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करुन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर केलेल्या या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘व्यंगचित्र प्रदर्शन आणि कार्यशाळा’ या कार्यक्रमाचा समारोप आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत मनसेचे नेते अमित ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, “भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जेवढं दुःख मला झालं होतं, तेवढं समाधान आज मला मिळत नाहीये, कारण ते दहशतवादी अजूनही फिरत आहेत. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही मोकाट फिरत आहेत, म्हणून मला तो आनंद मिळालेला नाही. न्याय तेव्हा मिळेल जेव्हा ते दहशतवादी मारले जातील.”
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने देखील भारताला इशारा दिला. याबाबत अमित ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की “त्यांच्या नऊ ठिकाणी जाऊन आपण हल्ले केले आहेत. आता ते काय आपल्याला इशारा देतील. युद्ध हे उत्तर नाही. ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे, त्यांना ठेचून मारलं पाहिजे. सामान्य लोकांचा का बळी घेत आहेत. आपल्या सैन्याला सलाम असून, त्यांना जे सांगितलं जात आहे ते करत आहेत. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही मोकाट फिरत आहेत, म्हणून मला तो आनंद अजून मिळालेला नाही.”

प्रवाशांना ‘बेस्ट’ बसेसची रिअल-टाईम माहिती देणारी सुविधा उपयुक्त -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,  दि. ७  : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळे आता बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार आहे. प्रवाश्यांच्या वेळेची बचत करुन त्यांच्या सुलभ प्रवाशांच्या दृष्टीने ही एक उपयुक्त सुविधा उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गुगल मॅपवर बसमार्गाची माहिती या प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना यांच्यासह संबंधित उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या वेळी कोणती बस उपलब्ध होईल, ती बस मिळण्याची अचूक वेळ या गोष्टी सहजतेने आता उपलब्ध असणार आहेत, ज्यामुळे प्रवाश्यांच्या वेळेची बचत होईल आणि सोयीस्कर प्रवास करणे त्यांना शक्य होणार आहे. बेस्ट आणि गुगल मॅप यांच्यातील हे सहकार्य मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या गुणवत्तापूर्ण सुविधेच्या दिशेने  एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे ‘बेस्ट’च्या ग्राहकांच्या संख्येतही वाढ होईल. प्रवाश्यांना  या सुविधेचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी प्रत्येक बसस्थानकावर या सुविधेबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध करुन द्यावी,असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या डिजिटल उपक्रमाचे स्वागत केले आणि त्याचे कौतुक केले.

‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवास, म्हणाले, गुगल मॅपसोबतच्या सहकार्यामुळे मुंबईकरांना त्यांच्या प्रवासाची आखणी अधिक सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने करता येणार आहे.” या सहकार्यामुळे प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवरच बस कुठे आहे, किती वेळात येईल, विलंब झाला आहे का, याची माहिती मिळणार आहे. गुगल मॅपवर ही माहिती हिरव्या आणि लाल रंगात दाखवली जाईल.  हिरवा रंग वेळेत येणाऱ्या तर लाल रंग उशीर होणाऱ्या बसेस दर्शवेल.गुगल मॅप्सच्या भारत प्रमुख रोलि अग्रवाल म्हणाल्या, बेस्टसोबतच्या या सहकार्यामुळे आम्ही मुंबईतील प्रवाशांना रिअल-टाईम सार्वजनिक वाहतूक माहिती देण्यास सक्षम झालो आहोत. सार्वजनिक वाहतुकीची अचूक आणि संपूर्ण माहिती देणे हे गुगल मॅप्सचे प्राधान्य आहे आणि हे सहकार्य त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

हा उपक्रम गुगलच्या भारतभरातील सार्वजनिक वाहतुकीची माहिती सुधारण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. सध्या गुगलने भारतातील १५ पेक्षा अधिक शहरांमध्ये मेट्रो, ट्रेन, बस यांसारख्या वाहतूक सेवांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा मराठी व हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. गुगल मॅपच्या सेटिंग्जमध्ये किंवा फोनच्या भाषेच्या सेटिंग्जमध्ये जाऊन वापरकर्ता आपली भाषा निवडू शकतो.

महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सविस्तर सादरीकरण केले.

प्रवाशांनी रिअल-टाईम बस माहिती पाहण्यासाठी ही पद्धत वापरावी:

एखाद्या बस स्टॉपसाठी सर्च करूनही रिअल-टाईम बस माहिती पाहता येईल.

आपल्या Android किंवा iOS डिव्हाईसवर Google Maps अ‍ॅप उघडा.

आपल्या प्रवासाचे गंतव्यस्थान टाका आणि ‘Go’ आयकॉनवर क्लिक करा.

ट्रामच्या चिन्हावर टॅप करून ‘Public Transport’ मोड निवडा.

सुचवलेली सेवा निवडून बसचे थांबे आणि रिअल-टाईम माहिती तपासा.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाक कडून बेछूट गोळीबार; पूंछमध्ये ४ मुलांसह ११ जणांचा मृत्यू


जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेसह सीमावर्ती भागात पाकिस्तानी सैन्याकडून सुरू असलेल्या गोळीबारात बुधवारी ११ जणांचा मृत्यू झाला असून यात चार लहान मुलांचाही समावेश आहे.तर जवळपास ४० लोक जखमी असल्याची माहिती मिळत आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत होते. मात्र बुधवारी झालेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या गोळीबाराची तीव्रता वाढली आहे.

काश्मीर खोऱ्यातील उरी आणि तंगधार सेक्टरमध्येही गोळीबार आणि तोफगोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे. जम्मूतील पूंछ शहरात १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाण, निवासी आणि सरकारी इमारतींवर तोफगोळ्यांचा मारा करण्यात येत आहे.भारताने ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या गोळीबाराची तीव्रता वाढली असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानच्या या आगळीकीला भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यात शत्रूच्या अनेक चौक्या उध्वस्त झाल्या असून पाकिस्तानातही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त पीटीआयने लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूंछमधील नियंत्रण रेषेवरील बालाकोट, मेंढर, मानकोट, कृष्णा घाडी, गुलपूर, केर्नी आणि पूंछ जिल्ह्य मुख्यालयासह अनेक भागात गोळीबार झाला. या हल्ल्यात डझनभर घरे आणि अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाने चांडक, लस्साना, सनई आणि सात्रा येथे सुरक्षित व्यवस्था उभारली असून स्थानिक लोकांना तिथे हलविले आहे.जम्मूतील पूंछ जिल्ह्यात शीख बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. याठिकाणी असलेल्या गुरुद्वारावरही गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून गुरुद्वाराचे मोठे नुकसान झाले आहे. शिरोमणी अकाली दलाने या हल्ल्याचा निषेध केला.गोळीबारात ११ जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन महिला आणि चार मुलांचा समावेश आहे. सध्याची परिस्थिती पाहता जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना आज बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी दिले होते.

आता POK ताब्यात घ्या:बाबा रामदेव

Baba Ramdev on Operation Sindoor

ऑपरेशन सिंदूर च्या कारवाईने भारतीय लष्कराच्या या शौर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, योगगुरू रामदेव बाबा यांनीही यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. आता आपण लाहोर आणि कराचीमध्येही तिरंगा फडकवला पाहिजे, असे रामदेव म्हणाले आहेत. ते एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

रामदेव बाबा म्हणाले, “आता आपण लाहोर आणि कराचीमध्येही तिरंगा फडकवला पाहिजे. सैन्याने आपले शौर्य दाखवले आहे. त्यांनी आमच्या निष्पाप नागरिकांना मारले आणि आमच्या माता-भगिनींचे कुंकू पुसून टाकले, म्हणून आमच्या सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत त्या दहशतवाद्यांना ठार मारले.

बाबा रामदेव म्हणाले, आता आपल्या सैन्याने पीओके परत घ्यावे. आपण कराची आणि लाहोरमध्ये आपला तिरंगा फडकवला पाहिजे. पाकिस्तानात लपून बसलेल्या १०० हून अधिक दहशतवाद्यांना लष्कराने ठार मारले आहे. दहशतवाद्यांना नरकातल्या हुरींमध्ये जाण्याची घाई होती, म्हणून सैन्याने त्यांना तिथे पाठवले.” रामदेव बाबा यांनी सिंध आणि बलुचिस्तानमध्ये उठणाऱ्या निषेधाच्या आवाजाचाही उल्लेख केला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारतात तीव्र संताप व्यक्त केली जात होती. पाकिस्तानला धडा शिकवला जावा, अशी मागणी केली जात होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारताला समर्थन मिळत होतं. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठका होत असताना लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याचं उत्तर आता मिळालं असून भारतानं पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (POJK) आणि थेट पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमीपर्यंत कारवाई करत तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत.

तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली असून त्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यात आली. या बैठकीत एअर स्ट्राईक आणि उद्ध्वस्त झालेले दहशतवादी तळ याचीही माहिती मोदींनी राष्ट्रपतींना दिली.

ऑपरेशन सिंदूर… भारताचे सामर्थ्य आणि निर्धार जगाला दाखवून देणारा निर्णय: पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे :जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानातील ४ आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ५ असे एकूण ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहेत. भारताच्या या कारवाईनंतर देशभरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. भारताचे सामर्थ्य आणि निर्धार जगाला दाखवून देणारा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन!, असे पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले कि ,पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सुरक्षा दलानी पुरेपूर बदला घेतला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तब्बल ९ तळ क्षेपणास्त्र हल्ल्यात उद्धवस्त करण्यात आले. यात जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या संघटनाच्या तळांचा समावेश आहे. जिवाची बाजी लावून भारतीय सुरक्षा दलानी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. भारतीय सुरक्षा दलांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याच्या संदर्भात मोदी सरकारच्या प्रत्येक कृतीच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत, असे पाटील यांनी म्हटले. जगातील महत्वाच्या देशांशी संवाद साधून आणि भारताची न्याय्य बाजू पटवून देत, अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेण्यात आला. भारताचे सामर्थ्य आणि निर्धार जगाला दाखवून देणारा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन!, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.