Home Blog Page 320

पुण्यात ११८८ कथक नृत्यांगनांचा विश्वविक्रम !

पुणे :राज्यातील २० शहरातून आलेल्या ११८८ कथक नृत्यांगनांनी एकत्र सादर केलेल्या नृत्याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ मध्ये झाली आहे. एकाचवेळी सर्वाधिक नृत्यांगनांनी कथक नृत्य सादर करण्याचा विश्वविक्रम यातून नोंदवला गेला. पुण्याच्या प्रेरणा फाउंडेशनच्या ‘नृत्य चक्र’ या नृत्यसमूहाने या विक्रमाची नोंद केली.

ज्योती मनसुखानी यांच्या संकल्पनेतून विविध गटांच्या एकूण ११८८ नृत्यांगनांनी एकत्र येत २० मिनिटांसाठी नृत्य सादरीकरण केले. संयोजन समितीत तेजस्विनी साठे,ज्योती मनसुखानी,अस्मिता ठाकूर, रसिका गुमास्ते आणि डॉ. माधुरी आपटे यांचा समावेश होता.कथक नृत्यांगनांनी एकाचवेळी सादर केलेल्या सर्वाधिक रचनांसाठी ही नोंद झाली.गतवर्षी २५ फेब्रुवारी रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,मात्र नोंदीचे प्रमाणपत्र १ मे २०२५ रोजी मिळाले. शास्त्रीय कथक नृत्य सादरीकरणाचा हा उपक्रम महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर झाला होता.

महिन्याभराच्या तैनाती यशस्वीरित्या पूर्ण करून आयएनएस सुकन्या (आयओएस सागर) कोचीला परतले

नवी दिल्‍ली-

भारतीय नौदलाने पहिल्यांदाच हाती घेतलेल्या भारतीय महासागरी जहाज सागर या उपक्रमात नऊ आयओआर (हिंद महासागर क्षेत्रातील देश) नौदलांतील कर्मचारी सहभागी झाले होते. आग्नेय आयओएस क्षेत्रातील महिन्याभराच्या तैनातीच्या समाप्तीनंतर हे जहाज 08 मे 2025 रोजी कोची येथे परतले. कोची येथील नौदल तळावर झालेल्या भव्य स्वागत समारंभात दक्षिणी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस अॅडमिरल व्ही श्रीनिवास यांनी भारतीय कर्मचारी तसेच नऊ मित्रदेशांच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

तैनातीच्या यशस्वी सांगतेमुळे सागरी सहकार्य क्षेत्रात एक नवा अध्याय सुरु झाला असून सामुहिक सागरी हिताचे संरक्षण, क्षमता निर्मिती तसेच आयओआर देशांशी असलेली कायमस्वरूपी भागीदारी यांच्याप्रती भारताची कटिबद्धता यातून अधोरेखित होत आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कारवार येथून दिनांक 05 एप्रिल 2025 रोजी आयओएस सागर या जहाजाला रवाना केले होते. तैनातीदरम्यान या जहाजाने दार-ईसलाम, नकाला, पोर्ट लुईस,पोर्ट व्हिक्टोरिया तसेच माले या बंदरांना भेट दिली. संयुक्त नौदल सराव, व्यावसायिक तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण तसेच टांझानिया, मोझांबिक, मॉरीशस आणि सेशेल्स या महत्त्वपूर्ण देशांमध्ये संयुक्त ईईझेड टेहळणी हे या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचे घटक होते.

कोमोरोस, केनिया,मादागास्कर,मालदीव्ज,मॉरीशस, मोझांबिक, टांझानिया, सेशेल्स आणि श्रीलंका या नऊ भागीदार देशांच्या 44 आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा अत्यंत अनोखा अनुभव ठरला कारण या सर्वांनी भारतीय नौदल कर्मचाऱ्यांसह संयुक्तपणे या जहाजावर काम करून, ‘एक महासागर, एक मोहीम’ या संकल्पनेचा खरा अर्थ दाखवून दिला.  दिनांक 25 मार्च रोजी कोची येथे एसएनसीमध्ये बंदरसंबंधित आणि सागरी प्रशिक्षण अशा संयुक्त टप्प्यासह सुरु झालेला आयओएस सागर या जहाजाचा प्रवास सर्व कर्मचाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला.आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कर्मचाऱ्यांचे एका उत्तम प्रकारची वीण असलेल्या आणि एकसंघ पथकाच्या स्वरूपातील अशा प्रकारचे व्यावसायिक आणि सुरळीत एकत्रीकरण सौहार्द आणि सागरी मैत्रीच्या उर्जेचे दर्शन घडवते. ही मोहीम म्हणजे भारत सरकारची महासागर (प्रदेशातील सुरक्षिततेसाठी परस्पर आणि समग्र आघाडी) ही धोरणात्मक संकल्पना साकार करण्यासाठी आयओआर मध्ये ‘सर्वप्रथम प्रतिसाद देणारा देश’ आणि ‘प्राधान्यक्रम असलेला संरक्षण भागीदार’ असण्याप्रती भारतीय नौदलाच्या कटिबद्धतेचा पुरावाच आहे.

अर्नाळा’ – भारतीय नौदलासाठी बनवलेली पहिली उथळ पाण्‍यामध्‍ये उपयोगी पडणारी पाणबुडीविरोधी युध्‍दनौका नौदलाकडे सुपूर्त

वी दिल्‍ली, 8 मे 2025

भारतीय नौदलासाठी बनवलेली पहिली उथळ पाण्‍यामध्‍ये उपयोगी पडणारी पाणबुडीविरोधी युध्‍दनौका -‘अर्नाळा’ (एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी) आज नौदलाकडे सुपूर्त करण्‍यात आले. ही नौका  गार्डन रीच शिपबिल्डर्स अ‍ॅन्ड इंजिनिअर्स (जीआरएसई), कोलकाता यांनी स्वदेशी पद्धतीने डिझाइन आणि निर्माण  केले आहे. 08 मे 2025 रोजी मेसर्स एल अँड टी शिपयार्ड, कट्टुपल्ली येथे ही युध्‍दनौका  भारतीय नौदलाकडे ते सुपूर्त करण्यात आले.

ही युद्धनौका इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग (आयआरएस) च्या वर्गीकरण नियमांनुसार सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत जीआरएसई आणि मेसर्स एल अँड टी शिपयार्ड यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्‍यात  आली आहे, यामुळे सहकार्यात्मक संरक्षण उत्पादनाची यशस्वीता अधोरेखित होते.

या नौकेला ‘अर्नाळा’ हे नाव, वसईजवळील ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्याच्या नावावरून देण्‍यात आले आहे. हा किल्ला भारताच्या समृद्ध सागरी वारशाचे प्रतीक आहे. 77 मीटर लांब असलेली ही युद्धनौका डीझेल इंजिन-वॉटरजेट संयोजनावर चालणारी सर्वात मोठी भारतीय नौका आहे.

हे जहाज पाण्याखालील देखरेख, शोध आणि  बचाव कार्य, तसेच कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमांसाठी (एलआयएमओ) डिझाइन केलेले आहे. या जहाजामध्ये किनारी पाण्यात पाणबुडीविरोधी क्रियाकलाप  पार पाडण्याची क्षमता असून, प्रगत ‘माईन लेइंग’ क्षमतांनी सुसज्ज आहे. या प्रकारची जहाजे नौदलाच्या किनारी पाण्यातील पाणबुडीविरोधी क्षमतांमध्ये मोठी भर घालणार आहेत.

‘अर्नाळा’  भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या वाटचालीतील आणखी एक मैलाचा दगड असून, 80% पेक्षा जास्त स्वदेशी घटकांसह केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला समर्पित आहे.

थॅलेसेमिया दिनानिमित्त, सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या ब्लड बँकेतर्फे जनजागृती रॅली

रुग्ण, त्यांचे कुटुंबीय, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ, तसेच सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अँड इम्युनोहेमॅटोलॉजी आणि थॅलेसेमिया सोसायटी पुणे चॅप्टर यांचा रॅलीमध्ये एकत्रीत सहभाग

पुणे: थॅलेसेमिया रुग्णांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात या अनुवंशिक आजारबद्दल फारशी जागरूकता नाही. आजही आपल्या देशात दरवर्षी सुमारे दहा ते बारा हजार मुले थॅलेसेमियाग्रस्त जन्माला येतात. केवळ शारीरिकच नव्हे तर रुग्ण आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक, आर्थिक आणि समाजिक जीवनावर आघात करणारा हा रक्तविकार एक सामाजिक आरोग्य समस्या म्हणून आपल्या समोर उभा ठाकला आहे. २०३५ पर्यंत ‘थॅलेसेमिया मुक्त भारत’ या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी जनजागृती व्हावी आणि अधिकाधिक लोकांनी आवश्यक खबरदारी पाळून या आजारपासून मुक्तता मिळवावी यासाठी आज जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त, सह्याद्रि हॉस्पिटलची ब्लड बँक, इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अँड इम्युनोहेमॅटोलॉजी (ISBTI) आणि थॅलेसेमिया सोसायटी पुणे चॅप्टर (TSPC) यांच्या सहकार्याने एक रॅली आयोजित करण्यात आली होती.

पुणे शहरातील या प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह अनेक थॅलेसेमियाग्रस्त मुले आणि त्यांचे पालक या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. ‘थॅलेसेमिया मुक्त भारत’ अभियानाचा भाग असलेली ही रॅली आज सकाळी ७.३० वाजता सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथून सुरू होऊन लकडी पूल, टिळक रोड आणि बाजीराव रोड मार्गे शनिवार वाड्यापाशी समाप्त झाली.

पुण्याचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) चे सहआयुक्त – श्री. गिरीश हुकरे, सह्याद्रि ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वैद्यकीय संचालक – डॉ. सुनील राव, थॅलेसेमिया सोसायटी पुणे चॅप्टर (टीएसपीसी) अध्यक्षा – डॉ. नीता मुन्शी, इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अँड इम्युनोहेमॅटोलॉजी (ISBTI) चे अध्यक्ष – डॉ. दिलीप वाणी, सह्याद्रि हॉस्पिटल्स येथील ब्लड बँकेच्या वरिष्ठ सल्लागार आणि ISBTI महाराष्ट्र चॅप्टरच्या सचिव – डॉ. पूर्णिमा राव, तसेच सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, डेक्कन जिमखाना, रक्तपेढीच्या विभागप्रमुख आणि ISBTI महाराष्ट्र चॅप्टरच्या खजिनदार – डॉ. स्मिता जोशी आदि मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्याशिवाय बिग एफएम चे सुप्रसिद्ध आरजे – संग्राम खोपडे यांनी देखील या सामाजिक उपक्रमामध्ये आपली उपस्थिती नोंदवली.

या प्रसंगी बोलताना श्री. गिरीश हुकरे म्हणाले, “थॅलेसेमिया हा आजार रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियांसाठी आयुष्यभराचे आव्हान आहे आणि त्यासाठी प्रतिबंध हा एकमेव इलाज आहे. आज सरकारतर्फे थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत रक्त आणि औषधे दिली जातात. यासारख्या सरकारी सुविधांचा जास्तीत जास्त वापर करून या आजाराशी लढा देणे आणि त्याबद्दल जागरूकता पसरवणे हाच थॅलेसेमिया मुक्त भारताकडे जाण्याचा मार्ग आहे.”

डॉ. सुनील राव म्हणाले, “थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार आहे. आईवडिलांमध्ये सौम्य लक्षणे असली तरी मुलांना गंभीर थॅलेसेमिया होऊ शकतो. यामध्ये जनुकीय दोषामुळे मुलांच्या हिमोग्लोबिन निर्मितीवर परिणाम होतो आणि त्यांच्या रक्तातील लाल पेशींचे आयुष्य कमी होते. त्यामुळे अशा मुलांना प्रत्येक २१ दिवसांनंतर कमीत-कमी एक युनिट रक्त देण्याची आवश्यकता असते. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ, आमची रक्तपेढी आणि कर्मचारी अशा थॅलेसेमिया रुग्णांना सर्वतोपरी वैद्यकीय मदत करत आहेत ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे.”

डॉ. नीता मुन्शी म्हणाल्या, “आज पुण्यामध्ये १,००० हून अधिक थॅलेसेमियाचे रुग्ण आहेत आणि त्यात महिन्यागणिक भर पडत आहे. २०३० पर्यंत पुणे तर २०३५ पर्यंत देशाला थॅलेसेमियामुक्त करणे हे आपले ध्येय आहे. आणि त्यासाठी आपण प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करून विवाहपूर्व किंवा बाळंतपणाचे नियोजन करण्यापूर्वी योग्य त्या तपासण्या करून घेणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे हा आजार पुढच्या पिढ्यांत येण्यापासून रोखता येईल.”

डॉ. दिलीप वाणी या प्रसंगी भारताला थॅलेसेमिया मुक्त करण्यासाठी आज रुग्णालये, रक्तपेढ्या, सामाजिक संस्था आणि रुग्ण व त्यांचे कुटुंबीय यांनी एकत्र येऊन या आरोग्य समस्येशी सामना करणे गरजेचे आहे, असे म्हणाले. 

डॉ. पूर्णिमा राव यांनी याप्रसंगी उपस्थितांचे आभार मानले. थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्त संक्रमण उपचारांच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आवश्यक उपचार मिळावेत यासाठी शहरभरात वारंवार रक्तदान मोहिमा राबविण्याची गरज अधोरेखित केली.

एकत्रितपणे, आपण थॅलेसेमिया मुक्त भारताचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी समाजात जागरूकता निर्माण करून या ध्येयासाठी काम करण्याचे आणि रुग्ण-केंद्रित भविष्य घडविण्यासाठी सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना केले गेले. याशिवाय, सह्याद्रि हॉस्पिटल्सतर्फे या उद्देशाप्रती रक्तपेढ्या आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षणाचे आयोजन करणार आहेत.

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद

0

– सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया

• सोळाव्या वित्त आयोगाची बैठक
• राज्याने आर्थिक वाटपासाठी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या

मुंबई, दि. ८: महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे आणि देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या भरीव योगदानाचे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी कौतुक केले. सह्याद्री अतिथीगृह येथे सोळाव्या वित्त आयोगाची बैठक झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया, सदस्य डॉ. मनोज पांडा व डॉ. सौम्यकांती घोष यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या वतीने आयोगासमोर निवेदन सादर केले. या निवेदनात आयोगाच्या कार्यसूचीनुसार राज्याच्या विविध मागण्या व सूचना मांडण्यात आल्या. महाराष्ट्र शासनाने केंद्र व राज्यांमधील विभागणी (Vertical Devolution) ४१ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. तसेच अधिभार (cesses) व उपकर (surcharges) हे मुख्य करांमध्ये समाविष्ट करावेत आणि केंद्र सरकारच्या करेतर उत्पन्नाचाही समावेश विभागणीच्या निधीत करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे.
राज्याने क्षैतिज वाटपासाठी (Horizontal Devolution) नवीन निकष सुचवले आहेत, ज्यामध्ये ‘शाश्वत विकास व हरित ऊर्जा’ आणि भारताच्या ‘जीडीपी’मध्ये राज्यांचा वृद्धीमान योगदान’ यांचा समावेश आहे. याशिवाय ‘उत्पन्न अंतर निकष’ (Income Distance Criteria) ४५ टक्क्यांवरून ३७.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती करण्यात आली आहे.
विशेष अनुदानासाठी १,२८,२३१ कोटींची मागणी
राज्याने विशेष अनुदानांतर्गत मुंबई महानगर प्रदेशाच्या आर्थिक मास्टर प्लॅनची अंमलबजावणी, नदीजोड प्रकल्प, नवीन उच्च न्यायालय संकुल, कारागृह पायाभूत सुविधा, वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर वसतीगृहे आणि इको-टूरिझमसाठी एकूण ₹१,२८,२३१ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. तसेच राज्यासाठी महसूल तूट अनुदान (Revenue Deficit Grant) सुद्धा शिफारस करण्याची विनंती आयोगाकडे करण्यात आली.
‘एसडीआरएफ’ व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वाढीव निधीची मागणी
राज्याने आपत्ती निवारण निधी (SDRF) अंतर्गत एकूण तरतूद वाढवावी आणि केंद्र-राज्य वाटपाचा हिस्सा ७५:२५ वरून ९०:१० असा करावा, अशी मागणी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अनुदान ४.२३ टक्क्यांवरून ५ टक्के विभागणी निधीतून करावे तसेच राज्यातील ग्रामीण व नागरी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार या अनुदानाचे वितरण करावे. शहरे व महानगरपालिकांसाठी सार्वजनिक बस वाहतूक व अग्निशमन सेवेसाठीही स्वतंत्र अनुदान द्यावे, अशी विनंती करण्यात आली.
या बैठकीदरम्यान आयोगाने व्यापारी व उद्योग प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली.
000

शेतमाल विक्री व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करा – पणन मंत्री जयकुमार रावल

मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली पणन संचालक मंडळाची पुण्यात बैठक

विविध विषयावर मंडळाच्या बैठकीत चर्चा

पुणे, दि. ८ :- राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीची व्यवस्था अधिक सक्षम करणे हे पणन मंडळाचे प्रमुख कार्य आहे. राज्यात उत्पादन होणारे फळे व भाजीपाला यांचे ग्रेडिंग, पॅकिंग आणि मार्केटिंगसाठी जागतिक मार्केट व्यवस्थेशी सुसंगत उपाय करणे आवश्यक आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राच्या शेतमालाचे मार्केटिंग वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाला वर्तमान व्यवस्थेशी सांगड घालून वेगाने काम करावे लागेल. राज्यातील वर्तमान शेतमाल विक्री व्यवस्था व्यवस्थित असली तरी जगाच्या कृषी माल विक्री व्यवस्थेशी स्पर्धा करण्यासाठी जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील शेतमाल कृषी व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन करावे,असे निर्देश राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न मंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन संचालक मंडळाची आज मंडळाचे मुख्य कार्यालय गुलटेकडी येथे बैठक झाली. या बैठकीत मंडळाच्या विविध विषयांचा आढावा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतला. यावेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे, सहकार आयुक्त दिपक तावरे, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, संचालक विकास रसाळ, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, व्यवस्थापक शैलेश जाधव तसेच पणन मंडळाचे सदस्य नारायण पाटील, संचालक संजय पाटील,मंडळातील संचालक व अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सेवेसाठी पणन मंडळ कार्यरत असून त्यांच्या हिताच्या सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने योजना तयार करा. त्यादृष्टीने व्यवस्था उभी करण्याचे काम पणन मंडळाचे आहे.शेतकरी उपयोगी सुविधा केंद्र असावीत अशा प्रकारे सुविधा केंद्रांचे अद्ययावतीकरण करा. शेतकऱ्यांच्या मालाला मूल्य वर्धन करण्याची उपाय – योजना, नियोजन पणन मंडळाने करावे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा अशी शासनाची भूमिका आहे. योजना किंवा सुविधांसाठी नागरिकांना ताटकळत ठेवण्याची मानसिकता बदलून अधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

ते म्हणाले, बाजार समित्या मजबूत, सक्षम व आधुनिक सुविधांनी युक्त व्हाव्यात यासाठी पणन मंडळाने प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना राज्यातील कोणत्याही बाजार समितीतील खरेदी-विक्रीचे दर कुठल्याही बाजार समितीत उपलब्ध होतील अशी यंत्रणा इ – नामच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत. ती प्रक्रिया आधिक गतिमान व पारदर्शक करावी. केवळ औपचारिक प्रक्रिया न राबवता, बाजार समित्यांचे आर्थिक स्वास्थ्य चांगले राहील याची खबरदारी घेऊन विकास कामांना गती द्यावी. बाजार समित्यांमधील विकास कामे करतांना स्टार्टअपला संधी द्यावी. ही कामे करतांना दर्जेदार होतील याकडे लक्ष द्यावे. सर्व बाजार समित्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. प्रस्तावातील मागणीच्या खर्चाचा रेशो ठरवून २५ टक्के स्वनिधी खर्च झाल्याशिवाय उर्वरित कर्ज रक्कम मंजूर करण्यात येऊ नये. उर्वरित ७५ टक्के निधीतील किमान ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणाऱ्या सुविधा निर्माण कामांसाठी वापरावी. रस्ते दुरुस्तीसाठी बाजार समित्यांनी स्वनिधी वापरावा, थकीत कर्ज वसुलीप्रकरणी विभागीय कार्यालयांनी बाजार समित्यांना भेटी द्याव्यात. ज्या बाजार समित्यांवर प्रशासक नेमलेले असतील तेथील १०० टक्के वसुली करावी, असे सांगून ठाणे जिल्ह्यातील बापगाव येथील पणन मंडळाच्या जागेवर तातडीने संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरु करावे, तसेच मंडळाने राज्यातील शेतमालाची व शेतमाल बाजार भावाची माहिती देणारे स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून द्यावे असे निर्देशही त्यांनी दिले.

तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेला देण्यात येणाऱ्या निधीत वाढ, ई-नाम योजना अंमलबजावणी, उपविभागीय कार्यालये स्थापित करण्याबाबत, वाशी येथील सुविधा केंद्र, संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणी, काजू फळपिक योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात ५ हजार मे. टन क्षमतेचे गोदाम उभारणीबाबत, सल्लागार नियुक्त करणे, वाई तालुक्यातील उपबाजार समिती पाचवड येथे सेल हॉल बांधणी प्रस्ताव, अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारा अंतर्गत व उपबाजार समिती नेप्ती येथील रस्ते दुरुस्ती, अंशदान व कर्ज वसुलीचा आढावा घेऊन विविध विकास कामांसाठी कर्ज मागणी प्रस्तावांवर विचारविनिमय करण्यात आला. तसेच मंडळाच्या थकीत कर्जाबाबत वन टाइम सेटलमेंट योजनेच्या संदर्भातही विचारविनिमय करून नवीन धोरण ठरवण्यात येत असे त्यांनी सांगितले.

00000

राष्ट्रीय लोकअदालतीचे 10 मे रोजी आयोजन

पुणे, दि.8 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आपआपसातील वाद समझोत्याने मिळविण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे शनिवार 10 मे 2025 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात आयोजन करण्यात येणार आहे. अधिकाधिक पक्षकारांनी या राष्ट्रीय लोकअदालतीत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन व सचिव सोनल पाटील यांनी केले आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार वाहन नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३२० नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, धनादेश न वटण्याची (चेक बाउन्स) प्रकरणे, जिल्ह्यातील न्यायालयातील प्रलंबित असणारी प्रकरणे तसेच बँक, वीज कंपनीची दाखल पूर्व प्रकरणे आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत येणारी प्रकरणे तडजोडी करीता ठेवण्यात आलेली आहेत

आपली प्रकरणे लोक अदालतीमध्ये तडजोडीकरीता ठेवण्याकरिता नागरिकांनी संबंधीत न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. लोक न्यायालयामध्ये प्रकरणे ठेवण्याकरिता पक्षकार त्यांच्या वकिलांचीदेखील मदत देखील घेऊ शकतात.

लोक न्यायालयामध्ये प्रकरण मिटल्यास न्यायालयीन शुल्क नियमाप्रमाणे परत मिळू शकते. प्रकरणाचा झटपट निकाल लागतो. लोक न्यायालयाच्या निकालावर अपील करता येत नाही. परस्पर संमतीने निकाल झाल्याने आपआपसात कटूता कमी होण्यास मदत होऊन वेळ व पैसा दोघांचीही बचत होते, अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 020-25534881 व मोबाईल क्र. 8591903612 तसेच इंदापूर- ०२१११-२२३१४९, भोर- ०२११३-२२२६४७, दौंड- ०२११७-२६२४२९, सासवड- ०२११५-२२२३१९, जुन्नर- ०२१३२-२२२१४१, बारामती -०२११२-२२२०१७, खेड-राजगुरुनगर- ०२१३५-२२२१७०, घोडेगाव- ०२१३३-२४४३५९, शिरुर-घोडनदी- ०२१३८-२२३२६५, वडगाव मावळ- ०२११४-२३५२१० येथे संपर्क साधावा. अशी माहिती श्रीमती पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
0000

लाहोरमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा उडवली,कारण आमच्या १५ लष्करी तळांना केलं लक्ष्य ;कर्नल सोफिया म्हणाल्या- पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर

परराष्ट्र मंत्रालयाची दुसरी पत्रकार परिषद

नवी दिल्ली- परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे… कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, पाकिस्तानने ७ एप्रिलच्या रात्री भारतातील अनेक ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने ते हाणून पाडले. अनेक ठिकाणी त्याचे अवशेष सापडले. आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणे आणि हवाई प्रणालींना लक्ष्य केले. लाहोरमधील हवाई संरक्षण यंत्रणा कुचकामी ठरली. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबाराची तीव्रता वाढवली आहे. कुपवाडा, बारामुल्ला, मेंढर आणि पूंछ येथे जोरदार गोळीबार सुरू आहे.

मंगळवारी रात्री १:०४ ते १:२८ या वेळेत २४ मिनिटांत ९ लक्ष्ये उद्ध्वस्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत आर्मी कर्नल सोफिया कुरेशी आणि एअरफोर्स विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी या ऑपरेशनची माहिती दिली. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे देखील उपस्थित होते.
परराष्ट्र सचिव मिस्री म्हणाले, ‘पठाणकोटमध्ये एक संयुक्त तपास पथक स्थापन करण्यात आले. आम्ही पाकिस्तानी टीमला हल्ल्याच्या ठिकाणी जाण्याची परवानगी दिली होती. डीएनए आणि इतर अहवाल त्यांच्यासोबत शेअर केले गेले. आम्ही दहशतवाद्यांचे पत्तेही दिले होते, जैशच्या नेत्यांची माहिती दिली होती. पण चौकशीत काहीही घडले नाही.

ते म्हणाले की मला वाटते की आमचा अनुभव सकारात्मक राहिला नाही. आम्हाला आता अशा संयुक्त तपासांवर विश्वास राहिलेला नाही. पाकिस्तानने त्या पुराव्याचा वापर फक्त दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी आणि घटना लपवण्यासाठी केला आहे. याशिवाय, तपासात अडथळा निर्माण झाला.पाकिस्तान कोणत्याही सहभागापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानी मंत्री म्हणत आहेत की तिथे दहशतवादी नाहीत. पाकिस्तानला जागतिक दहशतवादाचे केंद्र मानले जाते. जगभरातील एजन्सी आणि सरकारांकडे याचे पुरावे आहेत.
जगभरातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी दहशतवादी सहभागी आहेत. ते भारतात दहशतवाद पसरवण्यास जबाबदार आहे. तिथे दहशतवादी ओसामा बिन लादेनला शहीद म्हटले गेले.

साजिद मीरच्या मृत्यूची बातमी आली होती, नंतर तो जिवंत असल्याचे वृत्त आले. गेल्या काही दिवसांत, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे मान्य केले आहे.
जेव्हा टीआरएफला ही एक मोठी घटना असल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी आपले नाव मागे घेण्याची घोषणा केली, असे मिस्री म्हणाले. तिसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की कुरेशी, व्योमिका सिंग यांनी ही बाब तुमच्यासोबत शेअर केली आहे. भारत तणाव वाढविण्यासाठी काहीही करत नाही. २२ एप्रिलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणे हे आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. आमचा प्रतिसाद फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर लक्ष्य करण्याचा होता. आमचे लक्ष्य सैन्य नव्हते.
विक्रम मिस्री म्हणाले- मी काही गोष्टी सांगू इच्छितो की २२ एप्रिलचा हल्ला ही खरी तणाव वाढवणारी घटना होती. त्यानंतरच हा क्रम सुरू झाला. भारतीय लष्कराने काल केलेल्या कारवाईने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. दुसरे म्हणजे, रेझिस्टन्स फ्रंटने जबाबदारी घेतली. हा गट लष्करचा एक भाग आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी याबद्दल संयुक्त राष्ट्रांना आधीच माहिती दिली होती. आपण पुन्हा बैठक घेऊ आणि अपडेट देऊ. विशेष म्हणजे, जेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या परिषदेवर चर्चा होत होती, तेव्हा पाकिस्तानने टीआरएफच्या नावावर आक्षेप घेतला.
७ एप्रिलच्या रात्री पाकिस्तानने भारतातील अनेक ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे भारताने हाणून पाडले. अनेक ठिकाणी त्याचे अवशेष सापडले. आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी अनेक पाकिस्तानी हवाई यंत्रणांना लक्ष्य केले. लाहोरमधील हवाई संरक्षण यंत्रणा कुचकामी ठरली. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबाराची तीव्रता वाढवली आहे. कुपवाडा, बारामुल्ला, मेंढर आणि पूंछ येथे जोरदार गोळीबार सुरू आहे.परराष्ट्र सचिव मिस्री म्हणाले, ‘ते दावा करत आहेत की आमच्या कारवाईत फक्त नागरिकच मारले गेले. ऑपरेशन सिंदूरमध्ये फक्त दहशतवादी इमारती आणि लक्ष्ये होती. त्यांच्याकडे दहशतवाद्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. जर फक्त नागरिक मारले गेले असतील तर हाफिज सईदसोबत अधिकाऱ्यांचे फोटो का आले, दहशतवादी पाकिस्तानी ध्वजात गुंडाळलेले होते.

पाकिस्तानचा जन्म होताच खोटे बोलणे सुरू झाले-परराष्ट्र सचिव म्हणाले, पाकिस्तानने भारतीय लढाऊ विमाने पाडली का या प्रश्नावर मिस्री म्हणाले – योग्य वेळ आल्यावर तुम्हाला अधिकृतपणे कळवले जाईल. पाकिस्तानच्या जन्मापासूनच खोटे बोलण्यास सुरुवात झाली. १९४७ मध्ये संयुक्त राष्ट्रांना सांगण्यात आले की काश्मीरवर हल्ला करणारे आदिवासी होते. आमच्या सैन्याने आणि आमच्या सैन्याने तेव्हा पाहिले की पाकिस्तानचे सैन्य तिथे आहे. खोट्याचा प्रवास ७५ वर्षांपूर्वी सुरू झाला.
परराष्ट्र सचिव मिस्री म्हणाले, ‘गेल्या २ वर्षांपासून भारत पाकिस्तान सरकारशी बोलत आहे, त्यांना नोटीस पाठवत आहे आणि सिंधू करारात काही सुधारणा करण्याबाबत बोलले आहे. पाकिस्तानने आमच्याविरुद्ध युद्ध पुकारले तरीही आम्ही या कराराचा ६ दशके आदर केला. पाकिस्तानने या कराराच्या अटींचे उल्लंघन केले आहे. आपल्याला आपले हक्क वापरण्यापासून रोखले गेले. भारताचा संयम गेल्या ६५ वर्षांपासून सिंधू कराराचे पालन करत आहे. पाकिस्तानने आमच्या आवाहनाकडे लक्ष दिले नाही. हा करार ६० च्या दशकात झाला. तांत्रिक बदल आणि लोकसंख्याशास्त्रीय बदल विचारात घ्यावे लागतील. दहशतवादी हल्ल्यांमुळे या कराराला अडचणी आल्या. यानंतर, भारताने हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला.

एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला.. शरद पवारांच्या विधानाने मविआत खळबळ

एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजितने बसून ठरवावं. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेलं सगळे एकत्र होते त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकचं आहे. त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. माझे सगळे खासदार एक मताचे आहेत, आमदारामध्ये अस्वस्थता असू शकते. मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे. पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा.

मुंबई-भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, संसदेत विरोधी बाकांवर बसावं की नाही हा निर्णय सुप्रियानं घ्यावा. सुप्रिया सुळेंचं काय या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. पक्षात दोन प्रवाह, एकाला वाटते अजितसोबत जावे. दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावे या मताचा आहे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.उपमुख्यमंत्री अजित पवार (AjitPawar) यांनी जुलै 2023 मध्ये खासदार शरद पवारांच्या (SharadPawar) भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NationalistCongressParty) कोणाचा यावरुन दोन्ही नेते न्यायालयातही गेले आहेत. लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढली होती. मात्र, आता शरद पवारांच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या आहेत.

शरद पवार म्हणाले, भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालोय…आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकञ आहेत…आमचे दिल्लीतले खासदारही एकाच विचाराने बांघले गेलेले आहेत…होय, राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतं मतदारसंघातली विकासकामं करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे…पण याबाबतचा निर्णय हा मी देणार नाही त्यांचा तो एकञ बसून घ्यावा.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, उद्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आश्चर्य वाटणार नाही. याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे. कारण दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी नेते हे एकाच विचाराचे आहेत. मी आता या प्रक्रियेमध्ये नाही. भविष्यात एकञ यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला झालोय…

शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आशेचा किरण दाखवलाय. त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल. हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावं अशीच इच्छा मी व्यक्त करतो. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर मी मध्यस्थीसाठी तयार आहे, पण अजित पवार हे पवारसाहेबांच्या घरातच वाढलेत, त्यामुळे त्यांच्या मनोमिलनासाठी मध्यस्थाची गरज आहे, असं वाटत नाही.

शरद पवार यांनी The Indian Express ला दिलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाचे राजकीय मुद्दे स्पष्ट केले आहेत. या मुलाखतीतून शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर ठाम भूमिका घेत, पक्षातील मतभेद, राष्ट्रीय राजकारणातले तणाव, आणि स्वतःची राजकीय सक्रियता यावर स्पष्ट संकेत दिले. या मुलाखतीतील काही ठळक मुद्द्यांचा सारांश पहा….

अजित पवार गटासोबत जाण्याविषयी स्पष्ट वक्तव्य : त्यांनी कबूल केले की, “आमच्यातील एका गटाला अजित पवार यांच्यासोबत जावेसे वाटते. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, “चुकीच्या रस्त्यावर गेलेल्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करू, पण जर ते तयार नसतील, तर त्यांना बाजूला काढू.
सुप्रिया सुळे यांच्यावर विश्वास : संसदेमध्ये सत्ताधारी की विरोधी बाकांवर बसायचे, याचा निर्णय सुप्रिया सुळे घेईल, असे त्यांनी सांगितले. ती संसदेमध्ये आहे, निर्णय तिने घ्यायचा आहे.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विरोधकांचा कमकुवत पर्याय : शरद पवार म्हणाले की, “जनतेला मोदींना पर्याय हवा आहे, पण विरोधक तो देऊ शकलेले नाहीत. त्यांनी हे विरोधकांच्या कमकुवत नेतृत्वावर आणि समन्वयाच्या अभावावर वक्तव्य केले आहे.
कृषी कायदे आणि केंद्र सरकारवर टीका : केंद्र सरकारने “राज्यांशी चर्चा न करता तीन कृषी कायदे जबरदस्तीने लादले,” अशी टीका शरद पवार यांनी केली. कृषी हे क्षेत्र दिल्लीमध्ये बसून चालवता येत नाही,” असा दावा देखील त्यांनी केला आहे.
राजकीय निवृत्ती नाकारली : मी ना थकलोय, ना निवृत्त झालोय,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकांशी संवाद सुरू ठेवण्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला.
RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या विधानावर टिप्पणी : भागवत यांच्या “देवता-पुरुष” संदर्भातील विधानांवर “बुद्धिमान लोकांनी याची दखल घ्यावी,” अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली आहे.

भावनिक फायदे मिळवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव:पृथ्वीराज चव्हाण

युद्ध भावनांनी जिंकता येत नाही, ते शस्त्रास्त्राच्या युक्तियुक्त शास्त्राने जिंकले जाते – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई-भारत सरकारच्या वतीने पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्र नष्ट करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात आली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न भारतीय सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. त्यावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रिये नंतर आता त्यावर अनेकांनी प्रत्युत्तर दिले आहे.काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सरकारने ‘भावनिक फायदे’ मिळवण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव निवडले होते, परंतु याचा प्रत्यक्ष परिणाम होणार नाही. त्यांच्या मतपेढीला खूश करण्यासाठी, ते पहलगाम विधवांच्या भावनांवर चिखलफेक करत आहेत. दररोज ते एका नवीन पातळीला जात असल्याची टीका देखील चव्हाण यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर यावर देशभरातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पहलगाममध्ये निष्पाप लोकांची कत्तल झाल्यानंतर जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्याबद्दल मी भारत सरकार आणि भारतीय लष्कराचे अभिनंदन करू इच्छितो. 15 दिवस झाले असल्याने, काय घडत आहे याबद्दल लोक चिंतेत होते.. “हो, ‘सिंदूर’ या शब्दाशी अनेक भावना जोडल्या गेल्या आहेत, परंतु युद्ध भावनांनी जिंकता येत नाही. ते शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याने जिंकले जाते. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव सरकारने ‘भावनिक फायदे’ मिळवण्यासाठी निवडले होते, परंतु याचा जमिनीवर काहीही फायदा होणार नाही.”

‘वाडा चिरेबंदी’ ला अमेरिकेत जोरदार प्रतिसाद

प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवरांनी एकमुखाने गौरवलेल्या ‘वाडा चिरेबंदी’  या नाटकाला अमेरिकेतील महाराष्ट्रीयन प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सध्या ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाचा अमेरिका दौरा सुरू असून या अभिजात कलाकृतीच्या समारोपाचे प्रयोग मे महिन्यात अमेरिकेत होतायेत. या दौऱ्यातील प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. दि. ९ मे वॉशिंग्टन डिसी, दि. १० मे डेट्रॉईट, दि. ११ मे शिकागो, दि. १६ मे ऑस्टीन, दि. १७ मे डलास, दि. १८ मे लॉस एन्जलीस, दि. २३ मे सॅन डियागो आणि दि. २५ मे सॅन जोसे. येथे पुढील प्रयोग होणार आहेत.

बदलती एकत्र कुटुंब पद्धती, बदलता काळ त्यासोबत बदलते नातेसंबंध असा भावभावनांचा भव्यपट रंगमंचावर बघणं म्हणजे  आम्हां नाट्य रसिकांसाठी पर्वणीच होती, अशा शब्दांत अमेरिकेतील नाट्यरसिकांनी या नाट्यकृतीचे कौतुक केले. अमेरिकेत अनेक संस्था मराठी नाटकांचे आयोजन करतात. त्यांच्या या उत्साहाला प्रतिसाद देत रंजनाचा आनंद त्यांना द्यावा या भावनेने आम्ही हे समारोपाचे प्रयोग अमेरिकेत सादर केल्याचे निर्माता, दिग्दर्शकांनी सांगितले. अमेरिकेत स्थायिक असलेले शैलेश शेट्ये आणि प्रमोद पाटील यांच्या ‘फाईव्ह डायमेन्शन्स’ या संस्थेने हा दौरा आयोजित केला आहे.

‘जिगीषा-अष्टविनायक’ निर्मित, महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ नाटकात निवेदिता सराफ, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, राजश्री गढीकर, धनंजय सरदेशपांडे, विनिता शिंदे, अजिंक्य ननावरे, सिमरन सैद आणि वैभव मांगले व प्रसाद ओक या कलाकारांच्या भूमिका आहेत. दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर या नाटकाचे  निर्माते आहेत.  

महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल,दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे पूर्णत्वाकडे

पुणे, दि. ०८ मे २०२५येत्या काही दिवसांमध्ये मान्सूनचे आगमन होत आहे. पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण व महापारेषणच्या पुणे परिमंडलामधील वीज उपकेंद्रांतील व वीजवाहिन्यांवरील यंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीचे पूर्वनियोजित कामे वेगाने सुरू आहेत. मे महिन्याच्या अखेरीस सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

       पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरुस्तीचे कामे प्रामुख्याने दर गुरूवारी करण्यात येत आहेत. महापारेषण व महावितरणच्या समन्वयातून ही कामे सुरु आहेत. महावितरणकडे ग्राहक क्रमांकासोबत नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे संबंधित वीजग्राहकांना पूर्वनियोजित वीज बंदाबाबत कळविण्यात येत आहे. तसेच वृत्तपत्रांमध्ये वीज बंदचे जाहिरात निवेदन प्रसिद्ध करण्यात येत आहे. सोबतच बाधित होणाऱ्या क्षेत्रात पर्यायी अन्य वीजयंत्रणेतून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे.

पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीच्या कामांमध्ये प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या छोट्या फांद्या तोडणे, तूटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉपिंग अप, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे, गंजलेले किंवा खराब झालेले वीजखांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फिडर पिलरची साफसफाई व आवश्यकतेनुसार इन्सूलेशन स्प्रे मारणे, उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे यासह उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉपिंग अप अशा व इतर विविध दुरुस्ती कामांसह वीजपुरवठ्याच्या पर्यायी यंत्रणा सज्ज करणे आदी कामे करण्यात येत आहेत.

महापारेषण व महावितरणकडून गुरुवारी (दि. ८) नांदेड सिटी, धायरी गाव, नऱ्हे गाव, रायकर मळा, नांदेड गाव, वडगाव, देशपांडे गार्डन सोसायटी, बाजीराव रस्ता, शुक्रवार पेठ, फडतरे चौक, पेशवे पार्कचा काही भाग, कर्वेनगर, थोरात कॉलनी, आनंद निकेतन, मधुबंध कॉलनी, नवसह्याद्री सोसायटी, वसंतनगर, इंदिरा पार्क, आनंदनगर, गुजरात कॉलनी, एमआयटी कॉलेज रस्ता, रहाटणीसह खराडी व वडगाव शेरीचा काही भाग तसेच भोसरी, पिंपरी चिंचवड व तळवडे एमआयडीसी, भोसरी, देहू, मोशी, चिखलीचा काही परिसर या भागात पूर्वमाहिती देऊन वीजयंत्रणेचे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे कामे करण्यात आली.

खाजगी किंवा विविध संस्था मालकीच्या जागेतील झाडांच्या मोठ्या फांद्या वादळ व मुसळधार पावसामुळे कुंपणाबाहेरील उपरी वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. त्याचा अंदाज घेऊन वीजवाहिन्यांना संभाव्य धोका असणाऱ्या झाडांच्या मोठ्या फाद्यांची संबंधितांनी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेऊन किंवा त्यांच्या सहाय्याने छटाई करावी. यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सुमीत एसएसजी बीव्हीजी महाराष्ट्र ईएमएस प्रायव्हेट लिमिटेडने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागासोबत १० वर्षांचा केला कन्सेशन करार,१६०० कोटीची राज्यात गुंतवणूक

मुंबई: सुमीत एसएसजी बीव्हीजी महाराष्ट्र ईएमएस प्रायव्हेट लिमिटेड यांनी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागासोबत 10 वर्षांचा कन्सेशन करार केला असून, भारतातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा उद्देश आहे. या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्रातून होणार असून, एकूण अंदाजे INR 1,600 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’ (MEMS) 108 अॅम्बुलन्स प्रोग्रॅम संपूर्ण राज्यभर अंमलात आणणे हा आहे. या करारांतर्गत, भागीदार संस्था 1,756 अत्याधुनिक अॅम्बुलन्सेस तैनात करणार असून, त्या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील, जे आपत्कालीन प्रसंगी अत्यावश्यक “गोल्डन अवर”मध्ये रुग्णांना तातडीची काळजी प्रदान करतील. नवीन MEMS 108 प्रकल्पाचा प्रारंभ महाराष्ट्रभर पाच टप्प्यांत होणार असून, त्याची अंमलबजावणी नोव्हेंबर 2025 पासून सुरू होईल.

नवीन अत्याधुनिक अॅम्बुलन्सेसमध्ये मोबाइल डेटा टर्मिनल्स (MDT), टॅबलेट पीसीस, RFID, GPS, कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, CCTV आणि TRIAGE सीस्टिम्ससारखी अत्याधुनिक तंत्रज्ञानांची यंत्रणा बसविली जाईल. या वाहनांमध्ये ग्राहक संबंध व्यवस्थापन (CRM), कॉम्प्युटर-एडेड डिस्पॅच (CAD), वाहन ट्रॅकिंग आणि व्यवस्थापन (VTMS) व रुग्ण आगमन सूचना या अंतर्निहित सीस्टिम्सही समाविष्ट असतील.

या ताफ्यामध्ये अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट (ALS) अॅम्बुलन्सेस, बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) अॅम्बुलन्सेस, निओनॅटल केअर युनिट्स, फर्स्ट रेस्पॉन्डर बाइक्स, तसेच सी आणि रिव्हर बोट अॅम्बुलन्सेस समाविष्ट असतील. दीर्घकालीन दृष्टिकोनातून, MEMS 108 प्रोग्रॅमचा उद्देश मेडिकल अॅप्लिकेशन ड्रोन आणि हेलिकॉप्टर-आधारित आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रदान करण्याचा आहे.

हा उपक्रम भारतातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रासाठी एक नवीन मानक स्थापित करेल. हा अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित कार्यक्षमतेसह उच्च-गुणवत्तेच्या सेवा पुरविण्यासाठी एक दीर्घकालिक व टिकाऊ मॉडेल निर्माण करेल, तसेच भविष्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारीसाठी एक आदर्श उभा करेल.

अनेक पुरस्कारप्राप्त ‌‘वंश‌’ लघुपटाला पुणेकरांची पसंती

पुणे : जी. ए. कुलकर्णी हे प्रतिभावान लेखक होते. त्यांच्या कथांचा भावार्थ समजणे अवघड असते. त्यांच्या ‌‘वंश‌’ या कथेवर साकारलेल्या लघुपटाद्वारे उत्तम वातावरण निर्मिती झाली असून पात्रांच्या भावना प्रेक्षकांपर्यंत सहजतेने पोहोचत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी केले.
जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशातब्दीनिमित्त सावी आर्टस्‌‍ आणि वाईड विंग्ज मीडियातर्फे दोन वर्षांपूर्वी ‌‘वंश‌’ या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. या लघुपटाला देश-विदेशात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून कान्स चित्रपट महोत्सवातही हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला होता. बीएमसीसीमध्ये आयोजित चित्रपटाच्या प्रदर्शन सोहळ्यात डॉ. आगाशे बोलत होते. जी. ए. कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर, प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी, प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुखथनकर तसेच लघुपटातील कलावंत डॉ. वरदा जाधव, सूरज सातव, मैत्रेयी दाते उपस्थित होते. पुणेकरांनी या लघुपटावर पसंतीची मोहोर उमटविली. ‌‘वंश‌’ हा लघुपट यू-ट्यूबवरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
लघुपटाविषयी बोलताना नंदा पैठणकर म्हणाल्या, ‌‘वंश‌’ ही कथा समजायला आणि माध्यमांतर करायला खूप अवघड आहे. पण सर्व कलाकारांनी मेहनतीने भूमिका साकारून प्रसंग उठावदार केले आहेत.
निर्मितीविषयी बोलताना गणेश जाधव म्हणाले, जीएंचा वेगळा चाहता वाचकवर्ग देश-परदेशात आहे. परदेशातील चाहत्यांपर्यंत लघुपटाच्या माध्यमातून कथा पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
गिरीश कुलकर्णी म्हणाले, जी. ए. कुलकर्णी यांचे लिखाण जागतिक पातळीवरील आहे. अशा थोर लेखकाच्या साहित्यकृतीचे माध्यमांतर करणे फार जबाबदारीचे असते. तरुण कलाकार-तंत्रज्ञांनी अवघड जबाबदाऱ्या पेलून पार पाडणे यासारखे सुख नाही. नवनव्या प्रयोगातून सुसंस्कृत समाज घडण्यास मदत होते.
सुनील सुखथनकर म्हणाले, जीएंच्या कथांचे माध्यमांतर व्हावे याविषयी अनेकवेळा नंदाताई यांच्याबरोबर चर्चा झाली. ही अवघड प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली त्याबद्दल कलाकार-तंत्रज्ञांचे अभिनंदन. जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांमध्ये नियतीचा स्पर्श असतो. ‌‘वंश‌’ या कथेतून त्यांनी सामाजिक विषयासंदर्भात जाणीवही करून दिली आहे. लघुपटाच्या माध्यमातून केलेली मांडणी खूप समाधानकारक आहे.
डॉ. वरदा जाधव यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम, सूरज सातव, मैत्रेयी दाते यांच्या या लघुपटात भूमिका असून दिग्दर्शन ऋषी मनोहर यांनी केले आहे. निर्मिती गणेश जाधव यांची आहे तर पटकथा व संवाद गौरव बर्वे यांचे आहेत.

पुण्यामध्ये १,१०० कोटी रुपयांचा रेसकोर्स थीम्ड मेगा टाऊनशिप प्रकल्प

डेला रिसॉर्ट्स अँड ऍडव्हेंचर आणि हिरानंदानी कम्युनिटीज अँड क्रिसला डेव्हलपर्स ची भागीदारी

मुंबई, ८ मे २०२५: डेला रिसॉर्ट्स अँड ऍडव्हेंचरने हिरानंदानी कम्युनिटीज अँड क्रिसला डेव्हलपर्ससोबत
प्रोप्रायटरी सीडीडीएमओ TM मॉडेलसाठी हातमिळवणी केली आहे. तब्बल ११०० कोटी रुपये उत्पन्न मिळवून
देण्याची क्षमता असलेली रेसकोर्स थीम्ड मेगा टाऊनशिप उभारण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे.

महत्त्वाचे म्हणजे भारतीय स्थावर मालमत्ता उद्योगक्षेत्रात हे पाऊल पहिल्यांदाच उचलले गेले आहे. विशिष्ट
संकल्पनेवर आधारित, हॉस्पिटॅलिटी-चलित मॉडेलने स्थावर मालमत्ता क्षेत्रात एक नवीन गुंतवणूक वर्ग खुला
आहे, ज्यामध्ये गुंतवणुकीवर ९% पर्यंत परतावा देण्याची क्षमता आहे. या मॉडेलमुळे हा मूल्य प्रस्ताव स्थावर
मालमत्तेच्या पलीकडे जाऊन, एक खास निवडण्यात आलेली लाईफस्टाईल इकोसिस्टिम निर्माण करतो,
ज्यामध्ये अतुलनीय लक्झरी, कम्युनिटी आणि अनुभवात्मक हॉस्पिटॅलिटी यांचा मिलाप आहे.
पुण्यातील वेगाने विकसित होत असलेल्या उत्तर हिंजवडीमध्ये तब्बल ४० एकरांहून मोठ्या परिसरात
वसवण्यात येणार असलेल्या या टाऊनशिपमध्ये ८ एकरांचे रेसकोर्स आणि इंटरनॅशनल पोलो क्लब, १२८
खाजगी व्हिला प्लॉट्स, ११२ रिसॉर्ट खाजगी निवास, ३०० खोल्यांचे पंचतारांकित लक्झरी रिसॉर्ट, ९ वेडिंग
डेस्टिनेशन व्हेन्यू, १२ कॉर्पोरेट आणि माईस व्हेन्यू, एक्स्ट्रीम ऍडव्हेंचर पार्क, डेला रेन्ज गोल्फ, वेलनेस सुविधा
आणि डेलाची खासियत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिझाईन संवेदनांनी सजलेल्या एक्स्पेरिएन्शियल जागा
यांचा समावेश असेल. या टाऊनशिपची आधुनिक ऑरगॅनिक आणि ब्रिटिश कलोनियल आर्किटेक्चरल आणि
डिझाईन शैली अनुभवात्मक जगणे, स्थिर परतावा आणि दीर्घकालीन संपत्ती वृद्धी यांना महत्त्व देणाऱ्या
घरमालकांच्या व गुंतवणूकदारांच्या नवीन पिढीच्या सौंदर्याशी संबंधित आवडीनिवडींना पुरेपूर अनुरूप आहे.
डेला रिसॉर्ट्स अँड ऍडव्हेंचरचे संस्थापक आणि अध्यक्ष तसेच या महत्त्वपूर्ण विकासामागे ज्यांची दूरदृष्टी आहे
असे श्री जिमी मिस्त्री यांनी सांगितले, “ही केवळ एक टाऊनशिप नाही तर भारतामध्ये आजवर कधीही पहिले न
गेलेल्या स्थावर मालमत्ता मॉडेलचा हा उदय आहे. सीडीडीएमओ दृष्टिकोनासह आम्ही स्थावर मालमत्तेला
केवळ उत्पादन नव्हे तर अनुभव म्हणून निर्माण करू इच्छितो. आमची इच्छा आहे की, स्थावर मालमत्ता ही
केवळ एक स्थिर संपत्ती बनून राहू नये तर, गतिशील, परतावा मिळवून देणारी गुंतवणूक बनावी. पहिल्यांदाच
निवासी स्थावर मालमत्तेमध्ये उद्योगक्षेत्रातील आजवरच्यापेक्षा म्हणजे ३% पेक्षा जास्त परतावा मिळत आहे,
स्थावर मालमत्ता गुंतवणुकीवर पारंपरिक अपेक्षांपेक्षा जास्त ९% पर्यंत खात्रीशीर परतावा दिला जात आहे. हे
लक्झरी फ्यूचर फिट लिव्हिंग आहे, अचूकपणे डिझाईन करण्यात आले आहे आणि डिझाईन, नावीन्य व
संचालनातील उत्कृष्टता याचा आधार आहे.”उद्योगक्षेत्रातील दिग्गज, हिरानंदानी कम्युनिटीजचे अध्यक्ष डॉ निरंजन

हिरानंदानी यांनी या भागीदारीविषयीसांगितले, “भारतीय स्थावर मालमत्ता उद्योगामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून येत

आहे, एकात्मिक, वन-स्टॉप डेस्टिनेशन्समध्ये जीवनशैलीवर भर देणाऱ्या जगण्याबाबत घरखरेदीदारांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा या
परिवर्तनाला दिशा आणि चालना देत आहेत. ग्राहककेंद्रितता वाढवण्यासाठी जागा आणि सेवा यांचे एकीकरण
करणारे ट्रेंड्स उद्योगक्षेत्राने स्वीकारले पाहिजेत. आधुनिक घरखरेदीदारांच्या आवडीनिवडी बदलत आहेत,
त्यालाच अनुसरून स्थावर मालमत्ता विकासक महत्त्वाकांक्षी भारतीय घरमालकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी
तयार करण्यात आलेल्या अभिनव इकोसिस्टिम तयार करण्यासाठी पूरक उद्योगांसोबत हातमिळवणी करत
आहेत.
नावीन्य आणि ट्रेंड्स निर्माण करणे हे नेहमीच हिरानंदानीचे हॉलमार्क्स म्हणून ओळखले जातात. उत्तर
हिंजवडी, पुण्यामध्ये १०५ एकरांच्या टाऊनशिपसाठी क्रिसला डेव्हलपर्ससोबत आमची धोरणात्मक भागीदारी
म्हणजे हिरानंदानी ग्रुपने पुण्यातील वेगाने वाढत असलेल्या स्थावर मालमत्ता बाजारपेठेत केलेले पदार्पण आहे.
शिवाय डेला ग्रुपसोबत केलेला विकास व्यवस्थापन करार विशेष निवडण्यात आलेल्या, खास अनुभव देणाऱ्या,
राहण्याच्या जागा पुरवण्याची आम्ही कटिबद्धता मजबूत करतो. जीवनशैलीची नवी व्याख्या रचणे, प्रत्यक्ष
वापर करणारे आणि गुंतवणूकदार या दोघांसाठी देखील मूल्य प्रस्ताव वाढवणे आणि भारतीय स्थावर मालमत्ता
क्षेत्रात नवीन मानके स्थापन करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे.”
क्रिसला डेव्हलपर्सचे सीएमडी श्री सागर अगरवाल म्हणाले, “हिरानंदानी कम्युनिटीजसोबत आम्ही ज्या १०५
एकरांच्या एकीकृत टाऊनशिपची संकल्पना करत आहोत, ती स्केल, सस्टेनेबिलिटी आणि स्मार्ट शहरवादावर
आधारित आहे. डेला टाऊनशिप्ससोबत ४० एकर परिसरासाठी आम्ही भागीदारी ही धोरणात्मक भागीदारी
करण्याच्या क्रिसला डेव्हलपर्सच्या मूलभूत शक्तीमुळे शक्य झाले आहे ज्यामुळे व्हिजन आणि मूल्य या
दोन्हींमध्ये वाढ झाली आहे. या सेगमेंटमुळे निवासी स्थावर मालमत्तेमध्ये अनेक गोष्टी या उद्योगक्षेत्रात
पहिल्यांदाच आणल्या जातील, प्रीमियम खाजगी व्हिला प्लॉट्स, सिग्नेचर निवास, रेसकोर्स, रिसॉर्ट, ऍडव्हेंचर
पार्क यांचा यामध्ये समावेश आहे, ज्यामुळे शहरी जीवनाच्या मध्यभागी हॉस्पिटॅलिटी प्रस्तुत केली जाईल.
उत्तर हिंजवडीमध्ये असल्याने मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून अगदी जवळ आहे, ही टाऊनशिप घर
खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघांसाठी देखील आकर्षक ठरेल. डेलासोबत आम्ही एक असे डेस्टिनेशन तयार
करत आहोत ज्यामध्ये उत्तम राहण्याच्या जागा, महत्त्वाकांक्षा आणि उच्च मूल्य गुंतवणूक यांचा मिलाप
असेल, निवासी स्थावर मालमत्तेची नवीन राष्ट्रीय मापदंड निर्माण केले जातील.”
सध्या हा प्रकल्प नियोजनाच्या खूप वरच्या टप्प्यांवर आहे, जमीन अधिग्रहण पूर्ण झालेले आहे आणि
डिझाईनला अंतिम मंजुरी देण्याचे काम सुरु आहे. टाऊनशिपचा पहिला फेज तीन महिन्यांमध्ये लॉन्च होईल
आणि रिसॉर्ट व व्हिला प्लॉट्ससाठी पुढील वर्षीच्या सुरुवातीला ताबा दिला जाण्याची शक्यता आहे. २०२६
वर्षाच्या अखेरीस खाजगी निवासांचा ताबा दिला जाईल अशी अपेक्षा आहे. शहरी जगण्याची नवी व्याख्या तयार
केली जावी आणि ही टाऊनशिप म्हणजे पुण्यातील एक सांस्कृतिक हॉटस्पॉट बनावा तसेच इतर उदयास येत
असलेल्या भारतीय महानगरांसाठी एक अनुकरणीय मॉडेल तयार केले जाते हा या हॉस्पिटॅलिटीवर आधारित
थीम्ड टाऊनशिपचा उद्देश आहे.