Home Blog Page 32

शंकरमहाराज मठासमोर बसच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

पुणे- पुणे-सातारा रस्त्यावर पीएमपी बसच्या धडकेत एका अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. श्री शंकरमहाराज मठासमोर ही घटना घडली. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पळून गेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावरील श्री शंकरमहाराज मठासमोरील बीआरटी मार्गातून जात असलेल्या एका पादचाऱ्याला भरधाव वेगात आलेल्या पीएमपी बसने धडक दिली. पादचारी गंभीर जखमी झाला होता.

जखमी पादचाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अद्याप मृताची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी पोलीस शिपाई अकिल तडवी यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीएमपी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एन. काळे पुढील तपास करत आहेत.

हिंजवडीतील अंगणवाडीत 20 निरागस लहानग्यांना बंद करून, सेविका आणि मदतनीस गेल्या बैठकीला

पुणे स्मार्त सिटीतील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंगणवाडी क्रमांक 3 मध्ये वीस निरागस लहानग्यांना आत बंद करून सेविका आणि मदतनीस अंगणवाडीत कुलूप टाकून बाहेर गेल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मुलं आतमध्ये भयभीत होऊन रडत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पालक आणि स्थानिक नागरिक प्रचंड संतापले आहेत. या व्हिडिओमध्ये मुलांचा गोंधळ, आक्रोश आणि भीतीचा स्पष्ट आवाज ऐकू येत आहे. हा प्रकार काही क्षणासाठी नव्हे तर जवळपास एक तास घडल्याचे सांगितले जाते. शिक्षण आणि संरक्षणासाठी असलेल्या अंगणवाडीतच मुलांना धोका निर्माण झाल्याने सर्वत्र तिव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडीतील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना ग्रामपंचायतीतील एका माजी सरपंचाने बोलावलेल्या बैठकीसाठी जावे लागणार होते. त्यामुळे या दोघींनी अंगणवाडीतील सुमारे 20 मुलांना आतच बंद केले आणि स्वतः बाहेर जाऊन कुलूप लावले. उद्देश काहीही असो पण एवढ्या लहान मुलांना संपूर्णतः एकटे सोडणे ही अत्यंत निष्काळजीपणाची आणि कायदेशीरदृष्ट्या धोकादायक कृती असल्याचे पालकांचे मत आहे. मुलांना काही अपघात झाला असता, आगीत अडकले असते किंवा कोणी आजारी पडले असते, तर त्याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित केला जात आहे.

घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीने मुलांची सततची हाक आणि रडण्याचे आवाज ऐकले. त्यानंतर ही बाब त्वरित मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना कळविण्यात आली. त्यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत दोन्ही सेविकांना लगेच बैठक सोडून येण्याचे आदेश दिले. काही वेळाने कुलूप उघडल्यानंतर आतून मुलं पूर्णपणे घाबरलेली, काहींना घाम फुटलेला तर काही मुलं थरथरत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. पालकांना ही माहिती मिळताच ते संतापाने अंगणवाडीत धावत पोहोचले आणि संबंधित सेविका व प्रशासनाला जाब विचारला.

ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे. आमच्या चिमुकल्यांना अशा धोकादायक स्थितीत कोणत्या परवानगीने ठेवले गेले? ज्यांच्यावर मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे त्यांनीच असा निष्काळजीपणा का केला? असे प्रश्न पालकांकडून विचारले जात आहेत. अनेक पालकांनी या दोघींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. काही पालकांनी हे अंगणवाडी व्यवस्थापनाचं अपयश असल्याचे म्हटले असून, संपूर्ण चौकशी करण्यात यावी आणि भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी कडक नियम आणावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

या घटनेनंतर आता बाल विकास विभागाकडून अधिकृत चौकशी सुरू करण्यात आली असून मुलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला आहे. व्हिडिओच्या आधारे तपास वेगाने सुरू असून निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास संबंधित सेविका आणि मदतनीस यांच्यावर निलंबनासह कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. पालकांनी मुलांना विश्वास देत त्यांना सांभाळले असले तरी त्या चिमुकल्यांच्या मनावर बसलेली ही भीतीची कायमची छाप किती मोठी आहे हे शब्दांत सांगणे कठीण आहे. या घटनेने पुन्हा एकदा बाल सुरक्षा आणि सरकारी व्यवस्थेतील त्रुटी यावर मोठा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

रवींद्र चव्हाणांचे लोक मतदारांना पैसै वाटत आहेत:नीलेश राणे यांचा गंभीर आरोप

मालवण -माझ्या पायाखालची जर वाळू सरकली असती तर एवढे पैसे रवींद्र चव्हाण तुम्ही वाटले असते का? कोणाच्या पायाखालची जमीन सरकते आहे हे स्पष्ट होत आहे. जनता तुमच्या बाजूने नाही हे स्पष्ट होत आहे त्यामुळे तुम्ही मतदान विकत घेण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही जनतेला विकत घेणार? तुम्ही मैदानात लढा ना? असे म्हणत शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

नीलेश राणे म्हणाले की, लोकांच्या हितासाठी मी काही करायला गेलो तर तुम्ही माझे नाव इकडे-तिकडे जोडणार का? मी अजूनही तुमचा आदर सोडलेला नाही. मी आजही तुमचा आदर करतो पण निवडणूक लढायची ही पद्धत नाही यावर तुम्ही बोलावे. मी लहान माणूस आहे. पण तुम्ही मोठी लोकं आहात तुम्ही का रोजच्या रोज अडकत आहात? मतदार यादी घोळ, कधी पैसे वाटप तुम्ही असे वागण्याची अपेक्षा नाही. माझ्यावर टीका करा पण हे जर थांबले नाही तर मी बोलत राहणार. तुम्हाला जे वाटेल ते करा.

नीलेश राणे म्हणाले की, चव्हाण यांनी मोठ्या पदावर काम केलेले आहे. आजही मोठ्या पदावर आहेत. पण मी काही राजकारणात नवीन आलेलो नाही. माझ्या आमदारकीची 4 वर्षे अजून बाकी आहेत यातून मला काहीच मिळणार नाही. पण हे सर्व जर थांबले नाही तर उद्या जिल्ह्याची काय अवस्था होईल म्हणून मला हे सर्व करावे लागते. कुणीही जिंकले तरी महा युतीचा विजय होणार आहे ना मग चव्हाणांनी ते कुणाचा आदर्श बाळगता हे आम्हाला समजू द्यावे. रवींद्र चव्हाण यांच्याशी आमचे काही वाकडे नाही. महायुतीसाठी आम्ही काम केले आहे.

नीलेश राणे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 50 लाख, एक कोटी रुपये रोज येत आहे. म्हणजे ही निवडणूक गेली कितीला? दहा हजार-15 हजार रुपये देत मत विकत घेतली जात आहेत. या बाजूने वाटप होत आहे हे जर समजले असते तर ते 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत गेले असते. काय संस्कृती आपण तयार करत आहोत? जिल्ह्यात काय वातावरण निर्माण करत आहोत? याचा काहीही देणंघेणं नाही जिल्हा बिघडला तरी चालेल पण निवडणूक जिंकायची ही संस्कृती जिल्ह्यात अजिबात नव्हती. हे सर्व एकच माणूस करत आहे, हे आल्यापासून हे सर्व सुरू झाले आहे. मी पोलिसांना योग्य ती कारवाई करायला सांगितले आहे. काय FIR तयार होतो याकडे माझे लक्ष आहे, असे म्हणत त्यांनी भाजपच्या रवींद्र चव्हाणांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

नीलेश राणे म्हणाले की, जिल्हाभरात माझे लक्ष आहे, मी कार्यकर्त्यांना सांगितले आहे जिथे काही वाटले तिथे कॅमेरा काढत शुट घ्या आणि मला कळवा त्यावर काय कारवाई करायची हे मी योग्य त्या अधिकाऱ्यांना सांगतो. पण मी यांची पाठ आता सोडणार नाही. ही जी रवींद्र चव्हाण यांची माणसं आहेत त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे पोलिस यंत्रणा किंवा निवडणूक अधिकारी लावले पाहिजे. नाहीतर ही लोक जिल्हा खड्यात घालतील.

कोकणात राणे विरुद्ध राणे असा राजकीय संग्राम

भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी नितेश राणेंची भेट; म्हणाले – हमाम में सब नंगे हैं

एका घरात सापडलेल्या पैशामुळे संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला आहे. प्रचाराची दिशा पूर्णपणे बदलली आहे. राणे विरुद्ध राणे असा राजकीय संग्राम कोकणकार बघत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष थेट या वादात अडकले आहेत. शिवसेना शिंदे गटानेही त्यांच्या आमदाराच्या पाठीशी उभं राहत भाजपवर हल्ले चढवले आहेत. दुसरीकडे, विरोधकांनीही भाजपचा पैशाचा खेळ असा ठपका ठेवत सरकारवर धारेवर धरले आहे. निवडणूक जितकी जवळ येतेय तितका मुद्दा धारदार होत चालला आहे. पुढील चौकशी, कारवाई आणि राजकीय प्रतिक्रिया यावर या प्रकरणाचा निकाल अवलंबून असेल. मात्र, यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, कोकणातील निवडणुकीत आता पैशाच्या राजकारणाचा मुद्दा प्रचंड गाजणार आहे.


मालवण –
कोकणातील मालवण मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर सर्वच राजकीय समीकरणं एकाच झटक्यात बदलली आहेत. अवैध रोख रक्कम ठेवून पैसे वाटपाच्या माध्यमातून निवडणूक प्रभावीत करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा नीलेश राणेंनी केला असून, या आरोपामुळे मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चा रंगली आहे. इतकंच नाही, तर आता या मुद्द्यावर राणे परिवारातील राजकीय संघर्षही समोर आला आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनीच आपल्या भावाच्या आरोपांवर प्रत्युत्तर देत, हमाम में सब नंगे हैं, अशी टोलेबाजी केली. इतकेच नाही तर नितेश राणे यांनीही भाजप पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या घरी भेट दिली.

वास्तविक 25 नोव्हेंबरच्या रात्री नीलेश राणे त्यांच्या पथकासह थेट भाजप पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या घरात पोहोचले. त्यांच्या मते, तिथे हिरव्या रंगाच्या पिशवीत सुमारे 25 लाखांची बेहिशोबी रोख रक्कम आढळून आली. संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये टिपला गेला असून, राणेंनी तो प्रसारमाध्यमांना आणि पोलिसांना दिल्याचे सांगितले. या प्रकरणामागे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचा हात असल्याचा थेट आरोप करत, जेव्हा जेव्हा चव्हाण सिंधुदुर्गात येतात, तेव्हा काहीतरी संशयास्पद घडतचं, असा घणाघात केला. मैदानात उतरा, पैशाच्या जोरावर मतं खरेदी करू नका, असा जाहीर संदेशही त्यांनी दिला.

इतक्यावरच नाही तर आणखी काही घरे आणि काही जणांकडे अशाप्रकारे काळा पैसा साठवून ठेवण्यात आल्याचा दावा करत, राणेंनी काही नावंही जाहीर केली. आमच्याकडे संपूर्ण यादी आहे. कोण कुठे, किती रक्कम देतो याचे पुरावे लवकरच देऊ, असे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या पावलानंतर विरोधकांनीही भाजपवर हल्लाबोल करत वातावरण आणखी चिघळवले आहे. मात्र, नीलेश राणेंच्या या कारवाईनंतर प्रकरण थेट भावांभाऊंच्या वैयक्तिक आणि राजकीय संघर्षात बदलत चालले आहे.

राष्ट्रीय राजकारणात राणे कुटुंबाचा उल्लेख आला की वाद हा अभिन्न भाग असतो. कोकणातील राणे बंधूंमधील मतभेद सर्वश्रुत आहेतच. परंतु या वेळी भावाभावांमधील वाद संपुष्टात येण्याऐवजी अधिकच उफाळून आला आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी स्वतःच्या पक्षाचे समर्थन करत तडाखेबाज प्रतिक्रिया दिली. खासगी व्यवसायातून कमाई झालेली रक्कम आपल्याकडे ठेवली तर त्यात चूक काय? फक्त राजकीय चष्म्यातून बघू नका, असे ते म्हणाले. आमच्या विरोधकांनी आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये. नियम जो आहे तो सर्वांनाच लागू. हमाम में सब नंगे है! अशा शब्दांत त्यांनी भावाच्या स्टिंगवर पलटवार केला. याशिवाय, युतीची चर्चा करण्याची वेळ गेली. प्रक्रियेनुसारच सर्व निर्णय होतात, असे म्हणत त्यांनी भावाच्या युतीविषयी आरोपालाही उत्तर दिले.

लोकशाहीत बंधुत्व अपरिहार्य – ज्येष्ठ विचारवंत प्रा.गौतमीपुत्र कांबळे

पुणे –

राजकीय लोकशाही टिकवण्यासाठी सामाजिक लोकशाही, बंधुता टिकवणे महत्वाचे आहे कारण, लोकशाहीत बंधुत्व अपरिहार्य आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांचे नाते एकमेकांशी सुसंगत आहे. आपल्या अवतीभोवती गरीब-श्रीमंत असे विषमता वातावरण दिसून येते पण आपण ते सहन करतो कारण, आपले अज्ञान आणि सहनशीलता उच्चकोटीची आहे. भौतिक सर्व आविर्भाव बाजूला करून मनुष्य हा समान आहे हे तत्व अंगिकारून त्यात समानता आली पाहिजे असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन एस.एम.जोशी फाऊंडेशन सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत आणि सेक्यूलर मूव्हमेंटचे प्रणेते प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी ‘सामाजिक लोकशाहीविना राजकीय लोकशाहीला अर्थ नाही’, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी ‘संविधानाच्या परिप्रेक्षात भारतीय लोकशाहीची वाटचाल – नेहरु ते मोदी’ आणि माजी अ.भा.मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘बी.एन.रावना संविधानाचे शिल्पकारत्व देण्याचा प्रयत्न’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अन्वर राजन यांच्यासह उद्घाटक अॅड.अभय छाजेड उपस्थित होते.

प्रा. कांबळे म्हणाले, आपल्या आजूबाजूला वाईट गोष्टी घडत असताना आपण नेमके काय करतो असा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. वाईटाचे चार अंग असून ते म्हणजे भय, श्रद्धा, स्वार्थ, अज्ञान या पायावर ते उभे आहे. बौद्धिक चर्चा करून जर कृती नाही केली तर केवळ चर्चांला अर्थ नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. सामाजिक विषमता देशात मोठ्या प्रमाणात असून हे चित्र बदलण्याची गरज आहे. ठराविक जात आणि धर्म आधारित प्राबल्य हे समूह हुकुमशाहीकडे वाटचाल करणारे आहे. ज्यांनी जात आणि धर्म विचारांची चौकट मोडून वाटचाल केली ते महापुरुष झाले. जाती नष्ट करण्यासाठी जातीची बंधने मोडली पाहिजे. याकरिता जातिनिर्मुलन कायदा अंमलबजावणी केली पाहिजे. प्रचलित निवडणूक पद्धत ही बदलली पाहिजे. आपल्याकडे मताला कोणते महत्व नाही याबाबत गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकशाहीचे चार खांब आज जाती,धर्म आणि भ्रष्टाचार यांनी पोखरलेले आहे त्यामुळे पाचवा खांब “सेक्युलरिझम” निर्माण झाला पाहिजे कारण तो समाजाचा डोलारा पेलू शकतो. अनुदानित शाळा मध्ये कोणतेच धर्म आधारित शिक्षण दिले नाही पाहिजे कारण ते सर्व समाजाच्या विरोधातील आहे.

राव यांना संविधान शिल्पकार म्हणणे चुकीचे

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, मसुदा समितीचे सहा सदस्य होते आणि त्याचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. डॉ.आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार असून सल्लागार बी.एन.राव यांचे नाव त्याकाळी निर्माते म्हणून कोणी घेतले नसल्याचे दिसून येते आणि ते प्रशासकीय सेवक होते. १३ विविध कमिट्यांचे अहवाल एकत्र करून त्यांनी संविधानाचा कच्चा मसुदा तयार केला. त्यात चार महिने आवश्यक ते बदल डॉ.आंबेडकर यांनी अभ्यासपूर्ण केले आणि त्यानंतर पुढे आवश्यक ते मोठे २० बदल करून अंतिम ड्राफ्ट काम केले. सहा महिने काम केल्यावर राव यांची संयुक्त राष्ट्रसंघात बदली झाली पुढे संविधान निर्मितीचे काम दीड ते दोन वर्ष सुरू होते त्यामुळे राव यांना संविधान शिल्पकार म्हणणे चुकीचे आहे.

लोकशाही मूल्यांचा ऱ्हास सध्या होतो

श्रीराम पवार म्हणाले, स्वातंत्र्यानंतर ज्याप्रकारे लोकशाही गणराज्य निर्माण झाले तसे चित्र पुर्वी कधी दिसत नव्हते. घटनेने त्याला चांगल्याप्रकारे आकार दिला आणि देशाने पुढे प्रगतीकडे वाटचाल केली. लोकशाहीचे स्वप्न सर्वसामान्य यांच्या हातात घटनेने दिले. पंडित नेहरू यांच्या काळात सर्वाधिक घटनेचे मजबुतीकरण काम झाले कारण त्यांना लोकशाही तत्वांचा प्रचंड आदर होता. नेहरू यांच्याकडे बहुमत असल्याने त्याकाळी हुकुमशाह झाले असते परंतु त्यांनी लोकशाहीची तत्वे देशात रुजवली. मात्र, आता केवळ दोनच लोक देश सध्या चालवत आहे असे चित्र निर्माण झाले आहे. त्यातून लोकशाही मूल्यांचा ऱ्हास होत आहे. देश कसा चालवावा हे घटनेने सांगितले आहे त्याची अंमलबजावणी राज्यसत्ता करत असते. परंतु ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे त्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत नाही.आता निवडणुकीत मते दिल्यावर सत्तेत सर्वसामान्य नागरिकांचा लोकसहभाग दिसत नाही. आज देशात ३० ते ३५ टक्के मते मिळाल्यावर निर्विवाद सत्ता मनमानी पद्धतीने करण्यात येत आहे. लोकशाही सोईने वापरणे पद्धत देशात सुरू आहे. धर्मनिरपेक्ष आज कोणता नेता जाहीर म्हणू शकत नाही. सरकार विरोधात कोणती गोष्ट करू नये असा नकळत संकेत आज रुजला आहे तो चिंताजनक आहे.

संविधानाची मोडतोड प्रकार सध्या सुरू

अॅड छाजेड म्हणाले, जगातील विविध गोष्टींचा अभ्यास करून देशात सर्वोत्तम संविधान तयार करण्यात आले. लोकशाही मध्ये संसद महत्वपूर्ण असून त्यात संविधान मूल्यांचे पालन होते का असा प्रश्न आज निर्माण होत आहे. संविधानाचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावणे अशी पद्धत सध्या रुढ होत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वेगवेगळे स्वातंत्र्य या हक्कावर गदा येत आहे. केशवानंद भारती खटला मध्ये संविधानाचा मूळ ढाचाला धक्का लावता येत नाही असे सांगितले, तरी सध्या विविध प्रकारे संविधानाची मोडतोड प्रकार सुरू आहे. देशात विरोधी पक्षाची राज्य ज्याठिकाणी आहे तिथे राज्यपाल मार्फत सरकारी यंत्रणेवर प्रहार करणे सुरू आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कुरुंदवाडकर यांनी केले तर गायिका मोहिनी पवार यांनी विविध गाण्यांचे गायन यावेळी केले. अध्यक्षीय समारोप विश्वस्त सचिव अन्वर राजन यांनी केल्यावर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजेश तोंडे यांनी केले.

तोडफोड करून दादा बनू पाहणाऱ्या समीर शब्बीर शेख ला पकडला

पुणे- स्वतःच्या नावाची दहशत पसरविण्यासाठी तोडफोड करणारा फरार आरोपी समीर शब्बीर शेख,( वय-२७, रा-जयजवाननगर, येरवडा, पुणे )याला अखेर पोलिसांनी गजाआड केला .
येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं.७०६/२०२५ भा.न्या.सं.क ११८ (१),१८९ (२),१९०,१९१ (२) सह भारतीय हत्यार कायदा ४ (२५) क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ३, ७ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्ह्यातील हा आरोपी येरवडा पोलीस स्टेशन रेकार्डवरील असुन यापुर्वी एमपीडीए, मकोका अंतर्गत कारवाई होऊन जामीनावर बाहेर आला होता. जामीनावर बाहेर आल्यानंतर येरवडा परीसरात तोडफोड करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची दखल घेवुन गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला असताना, आरोपींना तात्त्काळ ताब्यात घेणेबाबत वरीष्ठांनी सुचना दिल्या होत्या.
या सुचनांच्या अनुषंगाने वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस अंमलदार अमोल गायकवाड यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील आरोपी हा पवार वस्ती, लोहगाव भागात त्याच्या मित्राकडे येणार असलेबाबत खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे, पोलीस अंमलदार शैलेश वाबळे, नटराज सुतार, अमोल गायकवाड यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन समीर शेख हा त्याठिकाणी आल्यानंतर त्यास ताब्यात घेवुनअटक केली समीर स्वःतच्या नावाची दहशत करण्यासाठी गुन्हेगारी कृत्ये करत .
संबधित कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ०४ सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विजय ठाकर, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक महेश फटांगरे, पोउनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार महेद्र शिंदे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, बालाजी सोगे, भीमराव कांबळे, नटराज सुतार, अतुल जाधव, अक्षय शिंदे, अमोल गायकवाड, संदीप जायभाय यांनी केलेली आहे.

येस बँकेने ‘स्कोअर क्या हुआ’ उपक्रम केला सादर:

·         राष्ट्रव्यापी सीएसआर उपक्रम प्रत्येक भारतीयामध्ये क्रेडिट स्कोअर बाबत जागरूकता निर्माण करतो.

·         क्रेडिट शिक्षण सुलभ करण्यासाठी आयुष्यातील चार प्रमुख प्रसंगांचे वर्णन करणाऱ्या टीव्हीसीचे लॉन्चिंग

·         मोफत क्रेडिट स्कोअर तपासणी देणारी समर्पित मायक्रोसाइट ScoreKyaHua.bank.in चे अनावरण. 

मुंबई – आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सुरतमधील एका तरुण उद्योजकापासून ते पुण्यातील एका जेन झी व्यावसायिकापर्यंत, जी आयुष्यातील पहिल्याच क्रेडिट कार्डसाठी अर्ज करते आहे ते लखनऊमधील एका जोडप्यापर्यंत जे त्यांचे पहिले घर खरेदी करण्याचे नियोजन करत आहेत – भारतातील लाखो आकांक्षा प्रामुख्याने एका तीन-अंकी संख्येवर अवलंबून आहेत. विशेष म्हणजे, याची माहिती लोकांना क्वचितच असते. ही तीन अंकी संख्या म्हणजे त्यांचा क्रेडिट स्कोअर. माहितीतील ही महत्त्वाची तफावत ओळखून, येस बँकेने ‘स्कोअर क्या हुआ’ हा देशव्यापी सीएसआर उपक्रम सुरू केला आहे. जो भारतीयांना त्यांच्या आर्थिक क्षमता समजून घेण्यासाठी क्रेडिट साक्षरतेसह सक्षम करेल.

‘स्कोअर क्या हुआ’ उपक्रमाच्या केंद्रस्थानी CRIF हाय मार्क द्वारे समर्थित ScoreKyaHua.bank.in ही मायक्रोसाईट आहे, ही या उपक्रमाची नॉलेज पार्टनर आहे. मोफत क्रेडिट स्कोअर तपासणी आणि भारताच्या वेगवेगळ्या क्रेडिट लँडस्केपसाठी तयार केलेली समजण्यास सोपी अशी शैक्षणिक सामग्री देते. पहिल्यांदाच क्रेडिट शोधणाऱ्यांसाठी, क्रेडिट प्रोफाइल तयार करण्यासाठी ही मायक्रोसाईट अगदी सविस्तर मार्गदर्शन करते. त्याचप्रमाणे, विद्यमान कर्जदारांसाठी, वैयक्तिक कर्ज, कार कर्ज किंवा गृह कर्जासाठी अर्ज करत असताना, रोजच्या आर्थिक वर्तनाचा त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यास हा प्लॅटफॉर्म त्यांना मदत करतो.

येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार या प्रसंगी म्हणाले, “आमचा असा विश्वास आहे की, खरी आर्थिक समावेशकता ही क्रेडिट स्कोअरच्या उपलब्धतेपलीकडे जाते. त्याचे सूज्ञपणे व्यवस्थापन करण्यासाठी ज्ञान देखील आवश्यक असते. आपल्या ‘स्कोअर क्या हुआ’ सीएसआर उपक्रमाद्वारे येस बँक प्रत्येक भारतीयाला क्रेडिट स्कोअर म्हणजे काय आणि तो कसा सुधारायचा हे समजून घेण्यास मदत करण्यासाठी एक राष्ट्रीय चळवळ चालवत आहे. याच्या माहितीबाबत असलेली तफावत दूर करणे आणि जबाबदार क्रेडिट वर्तनाला प्रोत्साहन देऊन क्रेडिट पात्र व्यक्तींचा समूह वाढवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आर्थिक भविष्य घडविण्यासाठी आम्ही लोकांना योग्य ज्ञान आणि साधनांसह सक्षम करून आर्थिकदृष्ट्या आत्मविश्वासपूर्ण भारत निर्माण करण्यात योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत.”

CRIF हाय मार्कचे अध्यक्ष, CRIF इंडिया आणि साउथ एशियाचे प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालकसचिन सेठ म्हणाले, “CRIF क्रेडिट स्कोअर प्रदान करून ‘स्कोअर क्या हुआ’साठी नॉलेज पार्टनर म्हणून येस बँकेसोबत सहकार्य करण्यास आम्ही उत्सुक आहोत. क्रेडिट जागरूकता वाढवणे आणि तिला प्रोत्साहन देणे, हे आमचे ध्येय आहे. कारण क्रेडिट आणि त्याचा परिणाम समजून घेणे हे आर्थिक समावेशनाला चालना देण्याबरोबरच मजबूत, चिरस्थायी आर्थिक प्रवास उभारण्याच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी महत्त्वाचे आहे. व्यावहारिक दृष्टिकोन आणि साधने सामायिक करण्याचे उद्दिष्ट ठेवतो जे प्रत्येकाला त्यांच्या क्रेडिट प्रवासाची जबाबदारी स्पष्टता आणि आत्मविश्वासाने घेण्यास सक्षम करतात.”

सोप्या भाषेत क्रेडिट स्कोअर समजावून सांगण्यासाठी येस बँकेने चार टेलिव्हिजन जाहिराती तयार केल्या आहेत ज्या रोजच्या जगण्यातील आर्थिक शिक्षणाचे महत्त्व सांगतात. स्कोअर क्या हुआ हे येस बँकेच्या अशा भारताच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते जिथे आर्थिक साक्षरता हा एक मूलभूत अधिकार आहे – जिथे जयपूरमधील तरुणाला मुंबईतील तरुणाप्रमाणेच क्रेडिट ज्ञानाची माहिती आणि उपलब्धता असेल.

मायक्रोसाइटमध्ये क्युरेटेड ब्लॉग्ज, माहितीपूर्ण व्हिडिओज, क्रेडिट स्कोअरबद्दलच्या सामान्य गैरसमजुती दूर करणारे मिथ-बस्टर्स आणि एक परस्परसंवादी क्रेडिट सिम्युलेटर आहे जे वेगवेगळ्या आर्थिक निर्णयांचा त्यांच्या स्कोअरवर कसा परिणाम होऊ शकतो हे पाहण्यास ग्राहकांना मदत करते.

आर्थिक समावेशनाच्या दिशेने भारत वेगाने प्रवास करत असताना, ‘स्कोअर क्या हुआ’ हे प्रत्येक नागरिकाला त्यांच्या क्रेडिट स्कोअरची शक्ती समजून घेण्यासाठी एक खुले आमंत्रण आहे. सुरुवात करण्यासाठी ScoreKyaHua.bank.in ला भेट द्या.

संविधान दिनानिमित  रंगला ‘संविधान लोककला शाहिरी जलसा’

पुणे :

‘होता भीमराव म्हणून माय तुझ्या बोटाला लागली शाई ..’, ‘फक्त पायदळ सेना होती माझ्या भीमाकडे..’, ‘माझ्या भिमाने घटनेला हिऱ्या मोत्यांनी सजविलं..’, ‘जगातली देखणी बाई मी भीमाची लेखणी..’ अशी एकासरस एक बहारदार शाहीरी सादर करत संविधान मूल्ये, सामाजिक समता आणि लोकशाहीची ताकद लोककलेद्वारे पुणेकरांना अनुभवायला मिळाली. 

निमित्त होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित  ‘संविधान लोककला शाहिरी जलसा’ कार्यक्रमाचे. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून  “माझे संविधान – माझा अभिमान” या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाहीर शीतल साठे, सचिन माळी, सदाशिव निकम, पृथ्वीराज माळी आदी कलाकारांनी शाहीरी सादर केली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर,  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, रिपाइं पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे  प्रमुख शैलेंद्र चव्हाण,  अशोक शिरोळे, डॉ विजय खरे, सरिता वाडेकर, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, अविनाश कदम  आदी उपस्थित होते.

संविधानाच्या उद्देशीकेचे सामुहिक वाचन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर ‘भीमराया वंदाया कवन शाहिरी…’ हे गाणे सादर झाले. त्यानंतर ‘सामर्थ्य पाहिले मी आंबेडकरामध्ये..’,  छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांच्यावरील बहारदार लोकगीतं सादर होत कार्यक्रमाला रंग चढला. त्यानंतर ‘कुणी नाही केलं  माय माझ्या भिमाने केलं ..’, ‘माझी मैना गावाकड राहिली..’, ‘देश उभा केला संविधानाने..’, ‘ माझ्या भिमान भलं केलं ग बया.., ‘जगातली देखणी बाई मी भीमाची लेखणी..’, ‘चांदण्याची छाया माझा भीमराया..’ अशा अनेक लोकप्रिय गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.  

संविधानातील मूलभूत मूल्यांची जनजागृती व लोकशाही प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या विशेष कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले.

यावेळी दहा लाख रुपयांची कचरा वेचताना सापडलेली बॅग मूळ मालकास परत करणाऱ्या प्रामाणिक सफाई कामगार अंजू माने यांना रोख पाच हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला. कार्यकमांची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. ज्ञानेश्वर जाविर यांनी केले.

गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

मी मातीतला माणूस असून, लोककलेने माझे भरणपोषण केले. आज लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार स्विकारताना आनंद  होत असल्याची भावना गझलनवाझ भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केली. ‘निहाल हो गयी जिंदगी मेरी’… अशा शब्दांत भीमरावांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. १५ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद‌्‌गंध पुरस्कार २०२५’ च्या दिमाखदार समारंभात ते बोलत  होते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिषजी शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आपले अवघे आयुष्य लोककलेसाठी समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये शाहीर श्री राजेंद्र राऊत (लोककला क्षेत्र), श्री.प्रदीप शिंदे (शिल्पकला), अभिनेते श्री. जयवंत वाडकर (अभिनय क्षेत्र), श्री. परेश मोकाशी (दिग्दर्शक), श्रीमती मधुगंधा कुलकर्णी (अभिनेत्री आणि निर्माती), अभिनेत्री रिंकू राजगुरू (नवोन्मेष प्रतिभा-अभिनय क्षेत्र) यांना ‘मृद‌्‌गंध पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाचा हा  पुरस्कार आमच्यासाठी लाखमोलाचा असल्याची भावना मान्यवर पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त  केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार, अर्थतज्ज्ञ-माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, यांच्यासह संगीत-अभिनय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

‘रसिक मायपाब आणि कुटुंबाच्या साथीने मी माझ्या बाबांना आठवणीतून जिवंत ठेवू शकलो. बाबांच्या स्मरणार्थ  दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराच्या निमित्ताने आपले ऋणानुबंध आणि रसिकांचे प्रेम आमच्यावर असंच कायम राहू द्या’, असं सांगत लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव, प्रसिद्ध गायक व  विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला विठ्ठल उमप यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा पहाडी आवाज हा महाराष्ट्राच्या चळवळीचा आवाज होता. वंचितांच्या आवाजाचं प्रतिनिधित्व करत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून जो संघर्ष उभा केला ते कौतुकास्पद आहे. आता नंदेश त्यांचं कार्य ज्या पद्धतीने  पुढे नेतो आहे आणि उत्तम अशा हिऱ्यांना आपल्यासमोर घेऊन त्यांना पुरस्काररूपी  कौतुकाचं  बळ देतोय ते नक्कीच अभिनंदनीय आहे, असं सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी याप्रसंगी सांगितलं.

गॅस-आधारित वीज प्रकल्पांसाठी विक्रमी इकोलेअर® सरफेस कंडेन्सर ऑर्डरसह गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपकडून डिझाइन-नेतृत्वाखालील अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रदर्शन

100 वर्षांहून अधिक काळाच्या कामगिरीच्या आधारेहे कंडेन्सर जागतिक स्तरावर प्रमुख संयुक्त
सायकल पॉवर प्लांटना सेवा देतील

मुंबई, 27 नोव्हेंबर 2025: जागतिक वीज प्रकल्पांसाठी नऊ इकोलेअर®-आधारित सरफेस कंडेन्सर्सच्या दोन प्रमुख ऑर्डर गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या प्रोसेस इक्विपमेंट व्यवसायाने मिळवल्या आहेत.

गोदरेजची वाढती जागतिक उपस्थिती आणि जगभरातील प्रगत अभियांत्रिकी उपाय वितरित करण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेला हा टप्पा अधोरेखित करतो. तसेच गुणवत्ता, सुरक्षा आणि विश्वासार्हतेच्या कठोर मानकांची पूर्तता करत जागतिक प्रकल्पांसाठी महत्त्वाची उपकरणे पुरवण्याच्या भारताच्या क्षमतेवरील ग्राहकांचा वाढता विश्वासही दर्शवितो.

या कामगिरीबद्दल गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या प्रोसेस इक्विपमेंट बिझनेसचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख हुसेन शरियार म्हणाले, जगभरातल्या ग्राहकांनी आमच्या कौशल्यावर ठेवलेल्या विश्वासाची ही ऑर्डर पुष्टी करते. आम्हाला विश्वास आहे कीउत्कृष्टतेची सुरुवात उत्तम डिझाइनपासून होतेआमचे इकोलेअर® तंत्रज्ञान हेच तत्त्वज्ञान प्रतिबिंबित करते. जागतिक वीज प्रकल्पांसाठी प्रगत कंडेन्सरची रचना आणि उत्पादन करून आम्ही हे सिद्ध करत आहोत कीभारतीय कंपन्या नावीन्यकार्यक्षमता आणि विश्वासार्हतेवर स्पर्धा करणाऱ्या जागतिक मानकांची पूर्तता करण्यासाठी जागतिक दर्जाचे उपाय देऊ शकतात.”

गोदरेजने 2018मध्ये विकत घेतलेले इकोलेअर® सरफेस कंडेन्सर तंत्रज्ञान, शतकाहून अधिक काळ नावीन्यपूर्णता आणि उत्कृष्ट कामगिरीचे प्रतिनिधित्व करते. यामुळेच जगभरात 3,600 हून अधिक कंडेन्सर पुरवले जातात. इकोलेअर® कंडेन्सर उत्कृष्ट थर्मल कार्यक्षमता आणि विश्वासार्ह कामगिरी देण्यासाठी कस्टम-डिझाइन केलेले आहेत.

डिझाइनपासून डिस्पॅचपर्यंत, गोदरेजचा प्रक्रिया उपकरण व्यवसाय तेल आणि वायू, वीज तसेच हायड्रोजन क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण, कस्टम-इंजीनिअर्ड उपकरणे पुरवतो.

प्रगत अभियांत्रिकी आणि जबाबदार उत्पादनाची रचनात्मक विचारसरणीशी सांगड घालत,​​गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप केवळ जागतिक उद्योगांना बळ देत नाही तर अधिक शाश्वत, भविष्यासाठी योग्य अशा जगाला आकार देतो आहे – हे भारताच्या ‘मेक इन इंडिया, फॉर द वर्ल्ड’ या दृष्टिकोनाचे खरे मूर्त स्वरूप आहे.

आरोपींची घरे पाडणे ही राज्य सरकारची बेकायदा कृत्ये चिंताजनक:माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई

0

राज्य सरकार ची अशी अतिरेकी कृत्ये मूलभूत हक्कांचेही उल्लंघन: अशा प्रकरणात अधिकाऱ्यांना शिक्षा होऊ शकते

मुंबई : भारताचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी विविध राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांनी केवळ गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तींची घरे पाडण्यासाठी बुलडोझर कारवाई केल्याबद्दल कठोर शब्दांत टीका केली आहे.त्यांनी अधिकाऱ्यांचा हा न्यायालयासारखे वागण्याचा प्रकार चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.एएनआयशी बोलताना न्यायमूर्ती बी. आर. गवई म्हणाले की, ही पद्धत म्हणजे राज्य सरकार स्वतःहून दोषी कोण हे ठरवते आणि कोणतेही चुकीचे काम न केलेल्या कुटुंबियांना शिक्षा देते.

“जेव्हा एखादा नागरिक गुन्हेगारी कृत्यात सहभागी असल्याचे आढळून येते, तेव्हा त्यात त्याच्या कुटुंबियांचा काय गुन्हा असतो? त्यांचे घर का पाडायचे? अधिकारी न्यायाधीश म्हणून काम करू शकत नाहीत”, असे ते म्हणाले.सर्वोच्च न्यायालयाची बुलडोझर प्रकरणातील हस्तक्षेपाची आठवण करून देताना ते म्हणाले की, “अधिकारी अतिरेक करत आहेत. सूचना किंवा कायदेशीर प्रक्रियेशिवाय घरे पाडत आहेत हे आढळल्यानंतरच न्यायालयाने हस्तक्षेप केला. अशा कृती केवळ आरोपींच्या हक्कांचेच उल्लंघन करत नाहीत, तर त्याचे आई-वडील, भावंडे, मुले आणि इतर सर्व निष्पापांच्या मूलभूत हक्कांचेही उल्लंघन करतात. हा प्रकार कायदा स्वतःच्या हातात घेण्याशिवाय दुसरे काहीही नाही.”

न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी पुढे नमूद केले की, सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांना बुलडोझरने घरे पाडण्याचा बेकायदेशीर प्रकरणांमध्ये त्वरित उच्च न्यायालयांमध्ये जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. न्यायालयाने कडक सुरक्षा उपाय देखील आखून दिले आहेत, ज्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन केले आहे त्यांना अवमान केल्याबद्दल शिक्षा होऊ शकते असे निर्देश दिले आहेत

देशासाठी गुरू तेग बहादुर जी यांचे बलिदान अविस्मरणीय : चंद्रकांत पाटील

गुरू तेग बहादुर जी यांचा जाज्वल्य इतिहास ग्रंथालयांद्वारे समाजापर्यंत पोहोचविणार : चंद्रकांत पाटील

नांदेडच्या गुरू गोविंदसिंग अध्यासन केंद्राचे बळकटीकरण करणार : चंद्रकांत पाटील

सरहद, पुणेतर्फे गुरू तेग बहादुर जी यांच्या ३५०व्या शहीदी वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांचा शुभारंभ
‘गुरू तेग बहादुर जी’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : हिंदुस्तानवर सातत्याने होणारी परकीय आक्रमणे रोखण्यात देशातील मोजक्या राज्यांचे मोठे योगदान आहे. यात महाराष्ट्रासह पंजाबचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. गुरू तेग बहादुर जी यांचे बलिदान अविस्मरणीय असून त्यांच्या प्रयत्नातून धर्मावरचा आघात रोखला गेला. हा जाज्वल्य इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक महत्वाचे ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक ग्रंथालयात गुरू तेग बहादुर जी यांच्यावरील पुस्तक पोहोचविण्याचा तसेच नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील गुरू गोविंदसिंग अध्यासन केंद्राचे बळकटीकरण करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
सरहद, पुणेतर्फे गुरू तेग बहादुर जी यांच्या ३५०व्या शहीदी वर्षानिमित्त वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा तसेच ‘गुरू तेग बहादुर जी’ या पुस्तकाचे प्रकाशन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुनानक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संतसिंग मोखा होते तर गुरुद्वारा दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग साहनी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरहद, पुणेचे संस्थापक संजय नहार, विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, डॉ. अमोल देवळेकर, शैलेश वाडेकर, अनुज नहार मंचावर होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आज (दि. २६) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, पुस्तक माणसाच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य करते. आपल्या देशात ग्रंथांना गुरू मानले गेले आहे. ‘गुरू तेग बहादुर जी’ या पुस्तकाच्या माध्यमातून गुरू तेग बहादुर जी यांचे बलिदान जनसामान्यांपर्यंत पोहोचावे, त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी याविषयी सघन काम होणे आवश्यक आहे.
प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यात गुरू तेग बहादुर जी यांनी मोलाचे कार्य केले. त्यांच्या ३५०व्या शहीदी वर्षानिमित्त देशात येत्या वर्षभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, त्यांचा प्रारंभ या पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या द्वारे शिखांचा इतिहास देशभरात पोहोचविण्यास मदत होईल.
चरणजित साहनी म्हणाले, गुरू तेग बहादुर जी यांच्या कार्याविषयी चित्रकथेच्या माध्यमातून सोप्या शब्दात या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे. वर्षभरात शाळा-शाळांमध्ये हे पुस्तक वितरित केले जाईल, ज्या योगे गुरू तेग बहादुर जी यांचे कार्य जनसामन्यांच्या मनात रुजविले जाईल. विद्यार्थ्यांनी हा इतिहास जाणून घ्यावा असे सांगून साहनी म्हणाले गुरू तेग बहादुर जी यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित निबंध स्पर्धाही घेण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचाल लेशपाल जवळगे यांनी केले तर आभार अनुज नहार यांनी मानले. ना. चंद्रकांत पाटील यांचे स्वागत डॉ. अमोल देवळेकर, संतसिंग मोखा, चरणजितसिंग साहनी यांनी केले.

कोथरूड मध्ये आक्रित घडलं, महिलेने केला पुरूषावर बलात्कार अन् अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल

पुणे :

महिलेने पुरुषावर अत्याचार केल्याच्या घटना कोथरूड येथे नोंदविली गेली आहे. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. महिलेकडून अश्लील फोटो अन् व्हिडिओ दाखवत पुरूषाकडे वारंवार पैशांची मागणी केली जात होती, असेही सांगण्यात येत आहे. पुरूषावर बलात्कार केल्याची घटना समोर येताच एकच खळबळ उडाली आहे.
गुंगीचं औषध देऊन कोल्हापूरच्या एका व्यक्तीवर अत्याचार केला आहे. अत्याचार करतानाचे पुरूषासोबतचे अश्लील फोटो, व्हिडिओ महिलेने काढले. त्याचाच वापर करून सविता त्या व्यक्तीला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होती. मी वकील आहे, अशी धमकीही त्या महिलेने त्याला दिली होती.
कोल्हापूर येथील फिर्यादीचे घर घेण्यासाठी पुरुषावर बळजबरीचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुरुषाला बळजबरीने काशी या ठिकाणी घेऊन अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कोथरूड पोलिसाकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

पुण्यातील महिला सविता (नाव बदलेले) आम्हाला तुळजापूरला भेटली होती. मी कुटुंब आणि मित्रांसह दर्शनासाठी गेलो होतो, तेव्हा आमची ओळख झाली होती. त्यानंतर सविताने माझ्या पत्नीला कॉलवरून बोलणं सुरू केलं.आमच्या घरी येऊन राहिली. माझ्या पत्नीला म्हणाली की मला भाऊ मानणार. पण, त्यानंतर तिने जवळीक करण्यास सुरूवात केली”, असे सांगत कोल्हापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने पुण्यात राहणाऱ्या आरोपी महिलेवर गंभीर आरोप केले आहेत.

चंदगड तालुक्यातील ४७ वर्षीय व्यक्तीने पुण्यातील कोथरूडमध्ये राहणाऱ्या एका महिलेविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आले.

तक्रारदार व्यक्तीने म्हटले आहे की

, “महिला माझ्या घरी येऊन राहिली. माझ्या पत्नीसमोर मला भाऊ म्हणाली, पण नंतर तिने जवळीक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिला निघून जाण्यास आणि परत न येण्यास सांगितले. त्यानंतर तिने माझी माफी मागितली. मी तिला चंदगड स्थानकात सोडायला जात होतो. त्यावेळी ती म्हणाली की, मला वॉशरुमला जायचे आहे आणि मी उघड्यावर जात नाही.”

“मी तिला एका लॉजमध्ये जाण्यास सांगितले. ती लॉजमधील रुममध्ये गेली. नंतर मला बोलावलं. मला म्हणाली मी उच्च न्यायालयात वकील आहे. मी तुमची साथ देईन, तुमच्या मुलाला मंत्रालयातील लोकांच्या ओळखीने नोकरीला लावेन, असे म्हणत माझा हात धरला आणि जवळ ओढू लागली. मी तिला नकार दिला आणि खाली येऊन थांबलो. त्यानंतर ती पुण्याला गेली”, असे तक्रारीत म्हटले आहे.

कुंभमेळ्याला जायचं म्हणून पुण्यातील घरी घेऊन गेली

तक्रारीत या व्यक्तीने म्हटले आहे की, “फेब्रुवारीमध्ये तीन दिवस ती माझ्या घरी येऊन थांबली. पुण्याला गेल्यानंतर तिने माझ्या पत्नीला कॉल केला आणि म्हणाली की ‘माझी मैत्रीण आणि तिची फॅमिली काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी जात आहे. मी तुमच्या पतीला भाऊ म्हणून सोबत घेऊन जाणार आहे. कुंभमेळा भरला आहे. त्याला माझ्यासोबत पाठवा.’ माझ्या पत्नीने याला होकार दिला.”

“२५ फेब्रुवारी रोजी मी पुण्यात आलो. त्यानंतर ती मला स्वारगेट स्थानकात भेटली. मला एक मोबाईल दिला. मला तिच्या कोथरूडमधील घरी घेऊन गेली. मला सांगितलं की, मैत्रिणीचा प्लॅन रद्द झाला आहे. आपण दोघेच विमानाने जाऊ. त्यानंतर तिच्या बेडरुममध्ये मला झोपवले. मला तिने काहीतरी प्यायला दिले आणि माझ्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मी रागाच्या भरात तिथून निघून जात होतो. तितक्या माझा हात धरला आणि म्हणाली की, तू इथून गेला, तर तुला इथेच काहीतरी करेन. मी सांगेन तसंच राहायचं अशी धमकी दिली”, असेही तक्रारीत म्हटले आहे.

काशीला नेले आणि….

तक्रारदाराने म्हटले आहे की, “सविताने मला मुंबई विमानतळावरून काशीला नेले. मला म्हणाली की, तू आता माझ्या कब्जात आहेस, काही कूरकूर केली तर तुझ्या घरी जाऊ देणार नाही. तुझे कुटुंब उद्ध्वस्त करेन. मी देवदर्शनासाठी होकार दिला. ती मला एका पंडिताकडे घेऊन गेली. त्याने मला शनि असल्याचे सांगितले. त्यानंतर मला बळजबरी तीन दिवस तिथे ठेवून घेतले. शरीरसंबंध ठेव म्हणाली. माझ्याशी जवळीक करत होती पण माझ्या पत्नीचा कॉल आला. “

“त्यानंतर मी गावी आलो. मी माझ्या पत्नीला झालेला प्रकार सांगितला. पत्नीला सांगितलं म्हणून सविता माझ्यावर चिडली. तिने माझ्या पत्नीने तिला कॉल करून झापलं. काही दिवस सविताने कॉल केला नाही. काही दिवसांनी दुसऱ्या नंबरवरून कॉल केला आणि २ लाख रुपये दे नाहीतर, तुझे फोटो व्हायरल करेन. बदनामी करेन अशा धमक्या देऊ लागली. त्यानंतर मी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली”, असे या व्यक्तीने म्हटले आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी महिलेविरोधात धमकी देऊन वसुली करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हिंजवडी, वाघोली, शिक्रापूर येथील वाहतूककोंडी रोखण्यासाठी पीएमआरडीएकडून निर्णायक पाऊल!

0
  • पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील मुख्यालयात महानगर आयुक्तांनी घेतली सर्व विभागांची आढावा बैठक
  • 5 डिसेंबरपूर्वी खड्डेविरहित रस्ते करण्याच्या महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या सूचना
  • हिंजवडी येथील नवीन प्रस्तावित रस्ते तसेच अस्तित्वातील रस्त्यांच्या भूसंपादनाबाबत बैठकीत घेतला आढावा
  • हिंजवडी – पिरंगुट – घोटावडे राजमार्गामधील हिंजवडी फेज- 1 ते हिंजवडी फेज- 3 दरम्यानचा रस्ता व त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडोरसाठी एमआयडीसीमार्फत जिल्हाधिकारी यांना भूसंपादन प्रस्ताव सादर करणार
  • हिंजवडी मेट्रो लाईन- 3 खालील रस्त्यांचे खड्डे तातडीने भरून डांबरीकरणासह रस्ता सुस्थितीत एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याच्या मेट्रोला सूचना
  • हिंजवडी परिसरामध्ये कायमस्वरूपी वाहतूक सिग्नल्स बसविण्यासाठी पीएमआऱडीए निधी देणार
  • धोकादायक धूळ व बेदारकार डंपर चालविणा-या आरएमसी प्लॅन्ट व बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईच्या सूचना
  • पुणे – मुंबई बाह्यवळण मार्गावर विविध ठिकाणी अंडरपास तसेच राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्ते बांधणार
  • भूगाव बायपास रस्त्याचे रखडलेले भूसंपादन लवकर, कंत्राटदारास कार्यारंभ आदेश देणार
  • शिक्रापूर व वाघोली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ते बांधणार

पुणे – हिंजवडी, वाघोली, शिक्रापूर येथील वाहतूककोंडी रोखण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)कडून निर्णायक पाऊल उचलण्यात आले असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनांनुसार, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी आज (दि.26) आकुर्डी येथील मुख्यालयात विभाग प्रमुखांसह महसूल, पोलिस,एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला हिंजवडी, वाघोली येथील नागरिकांनीदेखील उपस्थित राहून सूचना मांडल्या. बैठकीत प्रामुख्याने, 5 डिसेंबरपूर्वी खड्डेविरहित रस्ते करण्याच्या सूचना डॉ. म्हसे यांनी दिल्या असून, हिंजवडी येथील प्रस्तावित रस्ते तसेच अस्तित्वातील रस्त्यांच्या भूसंपादनाबाबत आढावा घेण्यात आला. हिंजवडी – पिरंगुट – घोटावडे राजमार्गामधील हिंजवडी फेज- 1 ते हिंजवडी फेज- 3 दरम्यानचा रस्ता व त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडोरसाठी एमआयडीसीमार्फत जिल्हाधिकारी यांना भूसंपादन प्रस्ताव सादर केला जाणार असून, हिंजवडी मेट्रो लाईन- 3 खालील रस्त्यांचे खड्डे तातडीने भरून डांबरीकरणासह रस्ता सुस्थितीत एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याच्या मेट्रोला सूचनादेखील महानगर आयुक्तांनी केल्यात. तसेच, हिंजवडी परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पीएमआऱडीए निधी देणार असून, धोकादायक धूळ व बेदारकार डंपर चालविणा-या आरएमसी प्लॅन्ट व बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईच्या सूचना देऊन, पुणे – मुंबई बाह्यवळण मार्गावर विविध ठिकाणी अंडरपास तसेच राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्ते बांधणे, शिक्रापूर व वाघोली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ते बांधण्याचे नियोजनदेखील महानगर आयुक्तांनी बैठकीत स्पष्ट केले. तसेच, भूगाव बायपास रस्त्याचे रखडलेले भूसंपादन लवकरच मार्गी लावून कंत्राटदारास कार्यारंभ आदेश देणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती श्रुती नाईक यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील अनुक्रमे हिंजवडी येथील नवीन रस्ते अनुषंगिक भूसंपादन, हिंजवडी येथील मेट्रो लाईन, रामवाडी मेट्रो स्थानक, हिंजवडी येथील वाहतूक समस्या, तसेच परिसरातील अवजड वाहतुकीसाठी नियमावली तयार करणे, बालेवाडी व बाणेर येथे अंडरपास तयार करणे, हिंजवडीला जोडणारे सेवा रस्ते व अंडरपास तयार करणे, हिंजवडी फेज 1, 2 व 3 येथे पावसाळी पाण्याच्या निचऱ्याच्या अनुषंगाने नियोजन, तसेच सदर ठिकाणी मैला शुद्धिकरण प्रकल्प उभारणे, राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकामध्ये विकसित करण्यात आलेल्या फ्री-वे प्रमाणे हिंजवडी येथे विकसन करणे, तसेच हिंजवडी येथे घनकचरा व्यवस्थापन तसेच शासकीय हॉस्पिटलची उभारणी, याबाबत दि. 10 जुलै 2025 रोजी मुंबई येथे बैठक घेतली होती. या बैठकीतील निर्देशाप्रमाणे आढावा घेण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली आकुर्डी येथील मुख्यालयात आज (दि.26) आढावा बैठक पार पडली. या बैठकीला पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलिस उपायुक्त (वाहतूक) सारंग आव्हाड, मावळ-मुळशीचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन समन्वयन अधिकारी कल्याण पांढरे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह-शहर अभियंता बापू गायकवाड, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)चे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)च्या प्रादेशिक अधिकारी श्रीमती अर्चना पाठारे, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MSETCL)चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता तुषार दहागावकर, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आय़ुक्त सतीश नांदूरकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांच्यासह पीएमआरडीएचे संचालक अविनाश पाटील, सहसंचालक श्रीमती श्वेता पाटील, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी तसेच शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो लाईन-3चे सवलतकार कंपनीचे प्रतिनिधी अनिलकुमार सैनी, महामेट्रोचे राजेश जैन आदी उपस्थित होते.

या बैठकीत हिंजवडी येथील नवीन प्रस्तावित रस्ते तसेच अस्तित्वातील रस्त्यांच्या भूसंपादनाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी पीएमआरडीएकडून आजपर्यंत 18 प्रस्ताव दाखल झालेले असून, त्यापैकी तीन रस्त्यांची मोजणी पूर्ण झालेली असल्याचे सांगितले. इतर उर्वरित आखणींबाबत डॉ. योगेश म्हसे यांनी प्राधिकरणाचे संचालक अविनाश पाटील व सुरेंद्र नवले यांना मार्गदर्शनपर सूचना देवून, उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. प्रांत अधिकारी तसेच प्राधिकरणाचे सह-संचालक श्रीमती श्वेता पाटील हे पुढील दोन दिवसांमध्ये बैठक घेवून याबाबत धोरण निश्चित करणार आहेत. तसेच बैठकीत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता तसेच प्रादेशिक अधिकारी यांना तातडीने हिंजवडी – पिरंगुट – घोटावडे राज्यमार्ग – 130 मधील हिंजवडी फेज- 1 (विप्रो सर्कल फेज – 1) ते हिंजवडी फेज- 3 (माण) दरम्यानचा रस्ता व त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडोरसाठी एमआयडीसीमार्फत भूसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश दिलेत. यानंतर हिंजवडी मेट्रो लाईन- 3 खालील रस्त्याच्या खड्ड्यांबाबत चर्चा झाली. यावेळी सवलतकार कंपनी यांना निर्देश देण्यात आले की, मेट्रो लाईनचे काम सुरू करण्यापूर्वी सदर ठिकाणचा रस्ता ज्या स्थितीत होता, त्याच स्थितीमध्ये रस्ता डांबरीकरणाने पूर्ववत करून एमआयडीसीकडे हस्तांतरीत करावा. तसेच, यावेळी बैठकीत रस्त्यामधील खड्डे व होणारे अपघात याबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी पुणे – मुंबई बाह्यवळण रस्त्याच्या अनुषंगाने चर्चा झाली असता, विविध ठिकाणी अंडरपास तसेच राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्ते तातडीने बांधण्यात येत असल्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)च्या अधिकार्‍यांनी सांगितले.

हिंजवडी येथील नैसर्गिक नाल्यांच्या सर्वेक्षणाबाबत चर्चा झाली असता, एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी नाल्यांचे सर्वेक्षण सल्लागार मे. टंडन अर्बन सोल्यूशन्स यांनी पूर्ण केले असल्याचे सांगीतले. सदरचा अहवाल प्राधिकरण कार्यालयास पुढील दोन दिवसात सादर करण्यात येत आहे. बैठकीत याबाबत सह-संचालक श्रीमती श्वेता पाटील तसेच एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला यांनी एकत्रित बसून जलसंपदा विभागाच्या अहवालासह नाल्यामधील झालेली अतिक्रमणे, अडथळे याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले. या बैठकीत हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशन यांनी हिंजवडी परिसरामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत विनंती केली. याबाबत अंदाजपत्रक तयार करून पीएमआरडीए कार्यालयास सादर केल्यास पीएमआरडीए सदरची कार्यवाही करेल, असे आश्वासन महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी दिले. तसेच, या परिसरामध्ये असणारे बांधकाम व्यावसायिकांचे आरएमसी प्लॅन्ट, तसेच बांधकामाची जागा बंदिस्त न केल्याने खूप धूळ निर्माण झालेली आहे, असे बैठकीला उपस्थित हिंजवडीतील नागरिकांनी सांगीतले. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना ट्रक्स आच्छादित करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. पीएमआरडीएचे संचालक अविनाश पाटील यांना याबाबत कार्यवाही करण्याबाबतच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्यात. तसेच या परिसरातील रस्त्यांची साफसफाई करण्याबाबतचे निर्देशी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना देण्यात आले.

पुणे – कोलाड राष्ट्रीय महामार्गाच्या भूगाव गावठाण येथील वाहतूक कोंडीबाबत पीएमआरडीएने व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या भूगाव बायपास रस्त्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. सदर रस्त्याचे भूसंपादन हे पीएमआरडीएमार्फत करण्यात येत असल्याबाबत बैठकीत सांगण्यात आले. या रस्त्याची लांबी ही 850 मीटर इतकी असून, रुंदी 18 मीटर इतकी आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पुढील आठवड्यामध्ये कंत्राटदारास कार्यादेश देण्यात येत आहेत, असे एनएचएआयच्या कार्यकारी अभियंता श्रीमती श्रुती नाईक यांनी सांगितले. सूर्या हॉस्पिटल ते साखरेवस्ती यादरम्यान मोजणी वेळेस स्थानिक शेतकऱ्यांनी रस्त्याच्या आखणीच्या अनुषंगाने आक्षेप नोंदविले होते. संदर्भातही बैठकीत चर्चा होऊन, या रस्त्याची रस्ते निय़ोजन (RP) आखणी अंशत: बदलण्याबाबत सूचना करण्यात आली. तसेच, बैठकीमध्ये भूसंपादनासाठी द्यावयाच्या मोबदल्याच्या अनुषंगानेही चर्चा झाली. इतर उर्वरित आखणीबाबत महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पीएमआरडीएचे संचालक अविनाश पाटील यांना व प्रांताधिकारी नवले यांना मार्गदर्शनपर सूचना केल्यात. तसेच, उर्वरित कामे तातडीने मार्गी लावण्याबाबतचे निर्देश दिलेत.

अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर व वाघोली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच्या उपाययोजना व नियोजनांवरदेखील या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. वाघोली ते शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करायच्या दृष्टीने पुणे – अहिल्यानगर मार्गास समांतर 30 मीटर रस्ते नियोजन (आरपी) नकाशानुसार खराडी जकात नाका ते केसनंद ते बकोरी रस्ता हा वाघोली बायपास रस्ता असून, रस्त्याचे सीमांकनाचे काम पीएमआरडीएकडून पूर्ण केले आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत रस्ता विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. सदर रस्त्याच्या प्रत्यक्ष केलेल्या आखणीमध्ये व आरपी रस्त्याच्या मार्गामध्ये तफावत असल्याचे दिसते. पुणे मनपा यांच्याकडून सदर रस्ता विकसित करण्याची कार्यवाही सुरु असून ,सदर रस्त्याचे काम होण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएच्या नियोजन विभाग, विकास परवानगी विभाग, अधीक्षक भूमी अभिलेख यांनी पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाशी समन्वय साधून रस्त्याचे काम सुरू होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच, या संबंधित पीएमआरडीए क्षेत्रातील एफएसआय, टीडीआर देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही विकास परवानगी विभाग यांच्यामार्फत करण्याचे निर्देश महानगर आय़ुक्तांनी यावेळी दिलेत. वाघोली व केसनंद परिसरातील वाहतूक कोंडी कमी करून खराडीपासून केसनंद चौक बायपास करून पुणे – अहिल्यानगर मार्गावरील लोणीकंदपर्यंतच्या नवीन वाघोली,केसनंद बायपास रस्त्याच्या नवीन मार्गाबाबत प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्तावित करण्यात यावा, जेणेकरून वाघोली व केसनंद या परिसराला नवीन बायपास रस्ता उपलब्ध होईल, असेही महानगर आयुक्तांनी निर्देशित केले.

पीएमआरडीएमार्फत वाघोली अर्बन ग्रोथ सेंटर (UGC) अंतर्गत पीएमआरडीएच्या क्षेत्रातील सुरभी हॉटेल ते भावडी ,लोहगाव रस्ता, तुळापूर – भावडी – वाघेश्वर मंदिर रस्ता व आव्हाळवाडी ते मांजरी खुर्द रस्ता भूसंपादन करून विकसित करण्याबाबत कार्यवाही सूरु आहे. या मुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. शिक्रापूर चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्याचे दृष्टीने पीएमआरडीएकडून प्रस्तावित प्रादेशिक योजनेतील प्र.रा.मा. ५ – सणसवाडी ते रा.मा.55- पिंपळे जगताप जोडणारा प्रमुख मार्ग (इसपत) रस्ता करणे, तळेगाव ढमढेरे -मझाक इंडिया कंपनी – एल अॅण्ड टी फाटा – पिंपळे जगताप ते करंदी फाटा रस्ता करणे, सणसवाडी ते तळेगाव ढमढेरे रस्ता करणे, कोंढापूरी ते तळेगाव ढमढेरे रस्ता करणे, कासारी फाटा – वाबळेवाडी जातेगाव ते राज्यमार्ग ५४८-ड रस्ता करणे, शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे ते धायकर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वेळ नदीवरील पूल व पुलाच्या दोन्ही बाजूच्या पोहोच रस्त्याचे बांधकाम करणे, आदीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ही कामे मंजूर असून, भूसंपादनासह विकसित करण्याचे नियोजन आहे. यामुळे भविष्यातील शिक्रापूर चौकातील वाहतूक कोंडीकमी होण्यास मदत होणार असल्याचे पीएमआरडीएच्या मुख्य अभियंत्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

संविधान दिनानिमित्त पीएमआरडीएमध्ये प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन

पुणे – पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) मुख्यालय आकुर्डी येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रनिष्ठा आणि संविधान मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली.
दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. 1949 साली याच दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएत आयोजित कार्यक्रमास सह-आयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सह-आयुक्त दीप्ती सूर्यवंशी, सह-आयुक्त हिम्मत खराडे, उपायुक्त राजेश माशेरे आदी मान्यवरांचीही प्रमुख उपस्थिती होती. संविधानातील मूल्ये आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.