Home Blog Page 3196

ऋषभ आणि पूजा ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर

0

आगामी अॅट्रॉसिटी चित्रपटाद्वारे करणार पदार्पण

 रुपेरी पडद्यावर आजवर बऱ्याच जोड्या  लोकप्रिय  झाल्यात. यातील सर्व जोड्या कधी ना कधी प्रथमच एकत्र आल्या  होत्या.त्यातील अनेकांनी ऑंनस्क्रीन केमेस्ट्री बळावर रसिकांना मोहिनी घातली आहे. आर.पी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या अॅट्रॉसिटी या आगामी  मराठी चित्रपटातील ऋषभ व पूजाची नवी जोडी रसिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झाली आहे. या जोडीचा हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. २३ फेब्रुवारीला अॅट्रॉसिटीप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नवीन असल्यामुळे सुरुवातीला काम करताना अवघडल्यासारखं वाटलं, पण दिग्दर्शक दिपक कदम यांनी आम्हाला समजून घेतल्यामुळे काम करताना मजा आली. आम्ही दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं असून आमची केमेस्ट्री प्रेक्षकांना निश्चितच भावेल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला.

 ‘अॅट्रॉसिटी या कायद्याबाबत समाजात विशेष जागृती नाही ही जागृती व्हावी या उद्देशाने डॉ. राजेंद्र पडोळ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन दिपक कदम यांचे आहे. या  दोघांसोबत या चित्रपटात यतिन कार्येकर, विजय कदम, गणेश यादव,  लेखा राणे, सुरेखा कुडची, डॉ. निशिगंधा वाड, निखिल चव्हाण, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा संकल्पना डॉ. राजेंद्र पडोळे यांची असून राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. छायांकन राजेश सोमनाथ तर संकलन विनोद चौरसिया यांचे आहे. संगीत अमर रामलक्ष्मण यांचे आहे.

अॅट्रॉसिटी हा सिनेमा २३ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

अखेर तुकाराम मुंडे आणि प्रेरणा देशभ्रतार यांची बदली – हा तर भिमालेंचा दणका ?

पुणे-एककल्ली. हुकुमशाही कारभार हाकणारे म्हणून ज्यांची राज्यकर्त्यांनी पुण्यात गणना केली ते तुकाराम मुंडे आणि महापालिकेत ज्या राज्यकर्त्यांना नेहमी  वारंवार  अडथळा ठरत होत्या  , एका बैठकीत सभागृह नेत्यांना ढोस भरला होता अशा महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची बदली करविण्यात अखेर सभागृह् नेत्यांना यश आल्याचे वृत्त आहे. तुकाराम मुंडे यांची बदली नाशिक महापालिका आयुक्त पदावर तर प्रेरणा देशभ्रतार यांची मंत्रालयात सामाजिक न्याय विभागात उपसचिव पदावर बदली झाल्याचे वृत्त आहे. तुकाराम मुंडे यांच्या जागेवर वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांची नियुक्ती झाली आहे .

कालच्या मुंबई वारीत चक्क सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी कित्येक निशाने साधल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. शिवसृष्टी चांदणी चौकात ढकलल्यानंतर .. काल रात्री मुख्यमंत्र्यांनी बदल्यांच्या या आदेशाबाबत निर्णय घेतल्याचे वृत्त आहे . यामध्ये  एकूण 6 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे समजते .एमएसआर डीसी चे के व्ही कुरुंदकर यांची कृषी विभागाच्या सचिव पदी मंत्रालयात बदली झाली तर ,नाशिक महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची एमआयडीसी मुंबई येथे बदली झाली .मीना दीपक कुमार यांची महाराष्ट्र राज्य दुध संघावर नियुक्ती झाली आहे .

प्रेरणा देशभ्रतार यांनी पुणे महापालिकेतील बोगस कर्मचाऱ्यांना महापालिकेत बसण्यास आणि कामकाज करण्यास मज्जाव केला होता .  नव्या भरतीला शासन मान्यता घेवून भरती करा असा आग्रह धरला होता. भूमी जिंदगी चे सतीश कुलकर्णी हे जे काल मुंबई वारीला गेले होते त्यांनी आपल्या कार्यालयात एक बोगस कर्मचारी रंगेहाथ पकडला गेल्यानंतर देखील त्याला अभय दिले होते. आणि त्याच्या वर पोलिसात गुन्हा दाखल न करता त्याला वाचविण्याचे कटकारस्थान यशस्वीपणे राबविले होते . एका भाजपा नगरसेवकाचा हाथ डोक्यावर असल्याने हा बोगस कर्मचारी येथे कार्यरत होता .यावरून देशभ्रतार यांनी कुलकर्णी यांची खरडपट्टी काढली होती.

दरम्यान या पूर्वी महापौर यांच्या विशेष दालनात झालेल्या एका गटनेत्यांच्या बैठकीत देशभ्रतार यांनी सभागृह्नेत्यांना अरेकारी करत ढोस भरल्याची चर्चा झाली होती . त्यानंतर मुख्य सभेत सभागृह्नेत्यांनी देशभ्रतार यांना माघारी शासनाकडे पाठवू असा सज्जड दम दिला होता .एकीकडे महापालिकेत प्रेरणा देशभ्रतार या पालिकेतील मुख्य राजकीय नेत्यांना आपल्या कामात अडथळा ठरल्या होत्या .तर दुसरीकडे कामगारांवर  धडाधड कारवाई करत पीएमपीएमएल मध्ये मुंडे वादग्रस्त ठरत होते . हे सर्व कामगार भिमालेंकडे येवून बसत . पण मुंडे मात्र भिमाले यांना जुमानीत नसत .

मनपा शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी निधी कमी पडु देणार नाही – योगेश गोगावले

0
पुणे- मनपाच्या सर्व शाळांमध्ये गुणवत्तावाढीसाठी नियोजन केले असुन आमचे सर्व नगरसेवक यासाठी प्रयत्नशील राहतील व या शाळांच्या विकासासाठी आम्ही निधीची कमतरता भासू देणार नाही असे भाजपचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले.भाजप चे प्रभाग क्र १३ मधील नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे व नगरसेवक दीपक पोटे यांच्या निधीतून एरंडवण्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेतील ७ वर्ग खोल्या बांधणे,मैदान विकसित करणे,वैज्ञानिक खेळणी बसविणे व कंपाउंड वॉल वर बोलक्या भिंती करणे (त्यावर उत्तम चित्र काढणे) यासह विविध विकास कामांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.भाजप पुणे शहरात दहा शाळांत क्रीडा केंद्र उभारणार असून त्यातील पहिला मान या शाळेने मिळविला असून ही शाळा आदर्श शाळा म्हणून नावलौकिक मिळवेल असा विश्वास वाटतो असे ही मत योगेश गोगावले यांनी व्यक्त केले.नगरसेवक दीपक पोटे म्हणाले ” मी ह्या शाळेतील मैदान बघितल्यावर त्याचे उत्तम क्रीडांगणात रूपांतर करता येउ शकते हे ओळखले व युवा मोर्चा शहर अध्यक्ष म्हणून क्रीडा परिषदेच्या वेळी योगेशदादा नी क्रीडा केंद्र निर्माण करण्याची केलेली घोषणा आठवली व या मैदानासाठी निधी ची तरतूद केली.येथे चांगले खेळाडू निर्माण होतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या ” मी शिक्षण मंडळ सदस्य असल्यापासून या शाळेतील विविध विकास कामे व उपक्रमांशी जोडले गेले व येथील ७०० ची पटसंख्या बघून या शाळेच्या विकासावर लक्ष केंद्रित केले.येथील गरज लक्षात घेऊन शाळेतील शिक्षण आठवी पर्यंत करुन घेतले आहे व पुढील वर्षापासून येथे नववी दहावी चे वर्ग ही सुरु होतील असे ही त्यांनी सांगितले.तसेच ह्या शाळेशेजारीच अनेक नावाजलेल्या शाळा आहेत मात्र आमचे विद्यार्थी ही गुणवान असून त्यांना खासगी शाळांच्या तोडीस तोड सुविधा मिळाव्यात यासाठी येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन केले आहे.
नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी शिक्षकांची संख्या वाढवली पाहिजे असे सांगतानाच प्रभागातील दोन्ही शाळा अद्ययावत करणार असल्याची ग्वाही दिली.तसेच अभ्यासाबरोबरच मुलांनी खेळात ही प्रगती केली पाहिजे असे ही त्या म्हणाल्या.
यावेळी नगरसेवक जयंत भावे,भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,राजेंद्र येडे,बाळासाहेब धनवे,राज तांबोळी,सुयश गोडबोले,माणिकताई दीक्षीत,एड प्राची बगाटे,अपर्णा लोणारे,जनार्दन क्षीरसागर,प्रतीक ढावरे,इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे,मराठी माध्यमाच्या शशिकला चव्हाण मॅडम,पालक शिक्षक संघाचे श्री बहादूर इ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजपचे अल्पसंख्यांक आघाडीचे शहर सरचिटणीस राज तांबोळी  यांचा वाढदिवसानिमित्त विशेष  सत्कार करण्यात आला.मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे यांनी प्रास्ताविक तर सविता जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.

ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी सेवाशुल्क माफक

0

मुंबई-महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांना ऑनलाईन पध्दतीद्वारे वीजदेयक भरण्याची सुविधा 2005 पासून उपलब्ध करुन दिली आहे. ग्राहक महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल ऍ़पद्वारे केंव्हाही व कुठूनही ऑनलाईन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करु शकतो. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सदर पध्दतीमध्ये वीजग्राहक त्यांच्या वीजदेयकाचा भरणा क्रेडीट / डेबीट कार्ड, नेट बँकींग व यु.पी.आय. इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत करु शकतो. या सुविधेसाठी सेवाशुल्क अत्यंत माफक आहेत.  त्यामुळे या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

ऑनलाईन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून, सदर पध्दतीस आर.बी.आय.च्या पेमेंट व सेटलमेंट कायदा 2007 च्या तरतूदी लागू आहेत. ऑनलाईनने वीजदेयक भरणा केल्यास ग्राहकांना त्वरीत एसएमएस व भरणा पावती दिली जाते. सद्यस्थितीत महावितरणचे 30 लाख ग्राहक सदर सुविधेचा लाभ घेत असून यातून दरमहा महावितरणला ऑनलाईन वीजबील भरणा पध्दतीद्वारे साधारणत: रु. 600 कोटी महसुलाची प्राप्ती होते.

अशा प्रकारच्या देयकभरणा प्रणालीमध्ये मास्टर, व्हीजासारख्या संस्था (Payment Gateway Service Provider Agencies) क्रेडीट/ डेबीट कार्ड, इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत देयक अदा करण्याच्या सुविधांसाठी सुविधा शुल्क आकारतात. याबाबतीत महावितरणच्या ग्राहकांना आकारले जाणारे सुविधा शुल्क अत्यंत माफक व वाजवी आहेत. इतर राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या तुलनेत महावितरणच्या ग्राहकांना आकारले जाणारे सुविधा शुल्क अत्यंत कमी आहेत.

महावितरणच्या ग्राहकाने क्रेडीट/डेबीट कार्ड, यु.पी.आय. मार्फत वीज देयकाचा भरणा केल्यास रुपये 500 पर्यंत कोणतेही सुविधा शुल्क आकारले जात नाही. तसेच नेटबँकींगद्वारे कितीही रकमेपर्यंतचा वीजदेयकाचा भरणा केल्यास त्याला कोणत्याही प्रकारचे सुविधा शुल्क भरावे लागत नाही. या दोन्हीही पर्यायासाठीच्या सुविधा शुल्काचा भरणा महावितरण मार्फत करण्यात येतो.

ऑनलाईन पध्दतीने वीजबिल भरणा करण्याबाबत काही अडचणी असल्यास व त्यासंदर्भातील तक्रारी निवारण करण्यासाठी महावितरणने एक स्वतंत्र मदत कक्ष स्थापन केला असून, helpdesk_pg@mahadiscom.in या ई-मेल आयडीवर मेल केल्यास ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येते. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी महावितरणचे मोबाईल ऍ़प व संकेतस्थळामार्फत ऑनलाईनद्वारेच वीजबील भरावे व या सुविधेचा लाभ घ्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

​​’कृषी पदवीधर संघटेने’चा ’युवा प्रताप पुरस्कार’ वितरण सोहळा रविवारी पुण्यात

0
पुणे ः
 
कृषी पदवीधर संघटनेचे ’युवा प्रताप पुरस्कार’ जाहीर झाले असून, पुरस्कार वितरण सोहळा 11 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष आहे.
 
पुरस्कारचे वितरण ’शेतकरी कामगार पक्षा’चे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. आमदार प्रताप पाटील-चिखलीकर, आमदार बच्चू कडू, आमदार बाळाराम पाटील, आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत होणार आहे. ’शेतकरी कामगार पक्षा’चे चिटणीस प्रवीण गायकवाड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. 
 
कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष महेश कडूस-पाटील यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
 
प्रगतीशील शेतकरी, उद्योजक, कृषी संशोधक, कृषी शिक्षक, महिला सक्षमीकरण क्षेत्रातील कार्यकर्ते, कृषी विषय हाताळणारे पत्रकार अशा 48 व्यक्ती आणि संस्थांना या सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे.
 
इस्त्रायल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याच्या कृषी क्षेत्राला कसे पुढे नेता येईल आणि शेतीतील नैराश्य दूर करण्यासाठी काय करता येईल, याबाबत या सोहळ्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती महेश कडूस यांनी दिली. 

पुणेकर खवय्यांसाठी बर्बिक्यू नेशनचे ‘ज्वेल्स ऑफ दि सी’ हे सी फूड फेस्टिवल

0

पुणे : भारतात कॅजूअल डायनिंग विभागात मोडणाऱ्या रेस्टॉरंट॒स मध्ये बर्बिक्यू नेशन अग्रगण्य आहे. ३१ जानेवारी ते १८ फेब्रुवारी ह्या काळात ‘ज्वेल्स ऑफ दि सी’ हे सी फूड फेस्टिवल पुणेकर खवय्यांसाठी खास आयोजित करण्यात आले आहे. डेक्कन, पिंपरी, चिंचवड, वाकड, कल्याणी नगर आणि अमनोरा येथील सर्व शाखांमध्ये पुणेकरांना उत्तमोत्तम सी फूडची मेजवानी मिळणार आहे.

विविध अरोमॅटिक मसाल्यांनी बनविलेली लाल, झणझणीत अंगारा कोळंबी त्याचबरोबर फ्राइड कलमरी विथ क्रिमी गेर्कीन सॉस खास पदार्थांपैकी एक असणार आहे. स्मोकी स्वादाचे तंदुरी खेकडे ही खेकडेप्रेमींसाठी खास आकर्षण असून हे विशेष स्टार्टर॒सपैकी एक आहे. मास्यांशिवाय सी फूड अपूर्णच त्यामुळे क्रिस्पी फ्राइड मांदेली फिश आणि ग्रीन चेर्मुला फिश हे न चुकविण्यासारखे आहे. शाकाहारींना अनोख्या मसाल्यांनी बनविलेले व सर्वोत्तम असे पहाडी मश्रूम चाखायला मिळणार आहे. गोड, तिखट क्रिमी पनीर असलेल्या अंजिरी पनीर हे स्टार्टर शाकाहारींकरिता मस्ट ट्राय पैकी एक असेल.

सी फूड, मिठाई, एक्झोटिक वेजिटेबल्स आणि सलाद ह्यांचे विविध लाइव्ह काउंटर राहणार असून अशा विविध पर्यायांपैकी निवडण्याची संधी खवय्यांना मिळणार आहे. पीनट होसिन सॉस, पाच स्पाइस आंबा सॉस, मस्टड सॉस आणि शझुआन सॉस ह्यांपैकी तुमच्या पसंतीचे सॉस निवडून टोफू, वॉटर चेस्टनट, पनीर आणि सोया चापचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकता. इंडियन सॅल्मन, स्क्विड, टुना आणि पॅम्ब्रेट मांसाहारींसाठी आहे.

ज्वेल्स ऑफ दि सी हे फक्त  खाण्यापुरते मर्यादित नसून, प्रत्येक शाखेचा साजेसा अम्बियंस आणि डेकोरेशन असून तशी वातावरण निर्मिती करण्याचा बर्बिक्यू नेशनचा प्रयत्न आहे. काही स्टाफ नाविक म्हणून, वेटर्स फ्लोरल प्रिंटेड कपडे परिधान करून तर लाइव काऊंटरवरील शेफ पारंपारिक कोळी मासेमाराच्या वेशभूषेत असतील.

फूड फेस्टिवल आम्हाला ओवरबोर्ड जाण्याची संधी देते व बर्बिक्युचे सी फूड फेस्टिवल तर न चुक्विण्यासारखे असते असे मत  श्री समीर भसीन – मुख्य कार्यकारी अधिकारी, बारबेक्यू नेशन हॉस्पिटॅलिटी लि.यांनी व्यक्त केले. मुंबई हे विविध खाद्यसंस्कृतीचे माहेरघर असून आम्हाला ते आमच्या पद्धतीने प्रदर्शित करता येत असल्याचा आम्हाला आत्यंतिक आनंद आहे.

मेट्रो आणि शिवसृष्टी …काय सोपे ..काय कठीण ?

पुणे- चांदणी चौकात जिथे वर्षानुवर्षे बीडीपी चे आरक्षण आहे तिथे शिवसृष्टी उभारणे म्हणजे ..शिवसृष्टीला विलंब करणे तर नाही असा प्रश्न उपस्थित होत असताना  .दुसरीकडे आपण आज दिल्लीत आहोत, शिवसृष्टीच्या निर्णयाबाबत अद्याप काही माहिती नाही  महाराष्ट्रात आल्यावर माहिती घेवूनच बोलू ..असे स्पष्टीकरण माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी चे नेते अजित पवार यांनी दिले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला राजकीय कचाट्यात तर पकडून भाजपने शिवसृष्टीच्या विषयाचे राजकारण केले नाही ना ? अशी शंका आता राजकीय समीक्षकांकडून घेण्यात येवू लागली आहे .
वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन होवून काम कधीच सुरु झालेले आहे . कोथरूड च्या कचरा डेपोच्या जागेवर जिथे मेट्रोचा डेपो होतो आहे . तिथेच शिवसृष्टी उभारता येईल असे आजतागायत महामेट्रो च्या कडून सांगण्यात येत होते . अनेकदा असे स्पष्टीकरण महापालिकेच्या  मुख्य सभेत झालेले आहे . आणि महामेट्रोच्या वतीने हि पालिकेच्या सभागृहात असे स्पष्ट केले गेलेले आहे . आणि तसाच आग्रह धरून शिवसृष्टीसाठी वारंवार आंदोलनाचे इशारे दिले गेले .या सर्वाचा कडेलोट झाल्यानंतर ..(बहुधा बरेच दिवस काखेत दडवून ठेवलेले राजकारण बाहेर काढले गेले .. ?)जिथे मेट्रोचा डेपो तिथेच शिवसृष्टी होऊ शकते म्हणणारे तज्ञांचे मत बदलले . एकाच ठिकाणी हे शक्य नाही असे सांगत ..तसे नवे सादरीकरण झाले .आणि तिथून 6 किलोमीटर अंतरावरील  बीडीपी च्या जागेत शिवसृष्टी करू  ..हवा तेवढा निधी देवू, विशेष अधिकारात करू … अशा घोषणा करत शिवसृष्टीचा मार्ग खरोखर सुकर करण्यात आला आहे कि, शिवप्रेमींची गोची  करण्यात आली आहे ? यावर खल होऊ शकणार आहे .
आता जर भाजपच्या वतीने स्वतःच्या जबाबदारीवर शिवसृष्टी बीडीपी च्या जागेवर करण्याची घोषणा करण्यात येते आहे . तर त्यास जाहीर विरोध कसा करायचा ? या प्रश्नामुळे तर  राष्ट्रवादीची गोची झाली नाही ?जागेचा वाद ..कोणी निर्माण केला हे ठाऊक असतानाही (जर विरोध केला तर )त्याचे खापर मात्र राष्ट्रवादीवर ,किंवा आपल्यावर फोडले जावू शकते .. हि कोंडी लक्षात आल्याने तर सर्वच राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेत या निर्णयाकडे पाहिले नाही ?…. 

आणि म्हटले ..बरे ठीक आहे करा .. तुम्ही तातडीने शिवसृष्टी …..
पण आता या पुढे खरी  कसोटी लागणार आहे भाजपची …
मेट्रो तर जाईल सुसाट .. पण शिवसृष्टी ….?
होय.. आता जिथे शिवसृष्टी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे . तिथे 50 एकर जागेचे १७० शेतकरी मालक आहेत . त्यांच्या या जागेवर बीडीपी चे आरक्षण वर्षानुवर्षे आहे . आजतागायत आरक्षण आणि कायद्याचा बडगा दाखवीत त्यांना त्यांच्या जागेवर बांधकाम करू दिलेले नाही . नाही त्या जागेतून बाजारमूल्यावर किंवा व्यावहारावर आधारित कमाई करू दिलेली नाही . आता त्यांची जागा महापालिका ताब्यात घेणार ..आणि तिथे शिवसृष्टी करणार ?
बीडीपी चे आरक्षण असलेल्या जागेवर शिवसृष्टी .. हीच मुळात बेकायदेशीर बाब ठरणार नाही काय ? आता आपली घोषणा कायद्यात बसविण्यासाठी .. आरक्षण बदलाची प्रक्रिया  सत्ताधाऱ्यांना राबवावी  लागणार आहे . म्हणजे महापालिकेच्या मुख्य सभेत त्याबाबतचा ठराव संमत करणे , त्यानंतर त्यावर नागरिकांच्या सूचना हरकती मागविणे ,त्यावर सुनावणी ठेवणे … आणि नंतर आरक्षण बदल संमत करवून घेणे ..अशा कायदेशीर पद्धतीचा अवलंब त्यासाठी करावा लागणार आहे . आता यासाठी कितीही सुपरफास्ट काम केले तरी 1 वर्षाचा कालावधी लागणे शक्य आहे . आणि त्यात कोणी जागेवरील आरक्षणाचा हेतू सफल न करता , तो डावलून शेतकऱ्यांची जागा राजकीय स्वार्थासाठी हडपण्याचा प्रयत्न झाल्याचा असा आरोप  करत कोर्टात गेले कि रखडले …
म्हणजे शिवसृष्टीचा मार्ग खडतर बनवून ठेवला आहे काय ? या प्रश्नावर आता विचार होऊ शकेल अशी स्थिती आहे .
खरे तर महापालिकेच्या मुख्य सभेत झालेला ठराव .. आणि त्यानुसार कारवाई करणे किती अवघड होते ? सोपे नव्हते काय ? 170 शेतकऱ्यांची जागा घेवून तिथे शिवसृष्टी करणे सोपे होते कि जी जागा महापालिकेच्या ताब्यातच आहे ..तिथे शिवसृष्टी आणि मेट्रो स्थानक एकत्र उभारून मोठ्ठे लक्ष्यवेधी पर्यटनस्थळ बनविणे  अवघड होते ? दोन्ही पर्यायांचा खर्च किती होता .. ?
या सर्व बाबी तपासून पाहिल्या तर  .. शिवसृष्टीचा मार्ग आता खडतर तर नाही बनला  ?असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय रहाणार नाही  ….येत्या विधानसभा निवडणुकीसमयी शिवसृष्टी बघायला मिळणार काय ? याचे उत्तर तेव्हाच मिळेल … , कि निवडणुकीत हा विषय कोण कोण कोणत्या प्रकारे हाताळणार एवढेच  बघायला मिळेल ? हे देखील तेव्हाच समजणार आहे .

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाच्या कामाला वेग -महामेट्रो

0

पुणे –

आज कोथरूड डेपोच्या जागेवर शिवसृष्टी का मेट्रो स्टेशन या बाबतचा  महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती मध्ये मुंबई येथे घेण्यात आला यामध्ये कोथरूड येथे मेट्रो स्टेशन होणार यांवर शिकामोर्तब करण्यात आले आहे. त्या पार्श्ववभूमीवर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित यांनी पत्रकार परिषदचे आयोजन केले होते.  यावेळी दीक्षित म्हणाले कि कोथरूड येथेल २८ एकर जागा मेट्रो स्टेशनला देण्याबाबत आज महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गाच्या कामाला वेग मिळणार आहे. तसेच मेट्रोला आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यामुळे पुढील कालावधीत सर्वाचं मार्गिकांवरचे काम वेगाने होणार असून प्रत्येक मार्गिकेवर प्रतिमहिना २५ पिलर उभारण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने समोर ठेवले असल्याचे ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. तसेच पुणे महापालिकेच्या मागणी नुसार स्वारगेट ते कात्रज मार्गाचे तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मागणीनुसार चिंचवड ते निगडी मर्गाचा डीपीआर बनवण्याचे काम हाती घेण्यात आले असून पुढील ४ महिन्यात ते पूर्ण होणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले

महापालिकेच्या मागणी नुसार स्वारगेट ते कात्रज मार्गाचे तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मागणीनुसार चिंचवड ते निगडी मार्गाचा डीपीआर बनवण्याचे काम मेट्रोने हाती घेतले   असून ते  पुढील ४ महिन्यात  पूर्ण होणार असल्याचे ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.मेट्रोला आवश्यक असणाऱ्या सर्व परवागी  आणि जागांची उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पुढील कालावधीत पुणे मेट्रोच्या कामाला वेग मिळणार असून प्रत्येक मार्गावर प्रति महिना २५ पिलर उभरण्याचे उद्दिष्ट्य महामेट्रोने ठेवले असल्याची माहित महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.

.

शिवसृष्टी – भाजप नगरसेवकांचा महापालिकेत जल्लोष …

0

पुणे-कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर मेट्रो रेल्वेचे यार्डच करण्यात येईल. लगतच्या सर्वे  नंबर 99 व 100 मधील बीडीपी क्षेत्रात शिवसृष्टी करूयात. यासाठी आरक्षण बदल व जागा ताब्यात घेण्यासाठी येणारा खर्च याचा विस्तृत आराखडा तयार करावा असा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिले. यामुळे मेट्रो आणि शिवसृष्टी या दोन्हीचा मार्ग अलग आणि स्पष्ट  झाला आहे याचा जल्लोष महापालिकेत भाजप कडून करण्यात आला.

तर दुसरीकडे  चांदणी चौकातील BDP मधील जागेत शिवसृष्टी आणि मेट्रो डेपो, या दोन्हीचं उद्घाटन  एकाच वेळी होईल अशा दृष्टीने काम करण्याच्या अटीवर आपण शिवसृष्टीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं.BDP ची जागा महापालिकेला ताब्यात घेण्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी देणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शिवाय लवकरच वनाजपासून चांदणी चौकापर्यंत मेट्रो मार्ग वाढवण्यात येणार असून शिवसृष्टी स्थानकाची निर्मिती होणार आहे. म्हणजेच मेट्रोची पहिली मार्गिका शिवसृष्टी ते रामवाडी अशी नावारूपाला येणार आहे. त्यामुळे आपलं ११ फेब्रुवारीपासून होणारं नियोजित आंदोलन आपण तूर्त स्थगित करत आहोत.असे माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी म्हटल्याचे वृत्त आहे .

 

महापालिकेने कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. परंतु महामेट्रोने या जागेवर मेट्रो डेपोचे नियोजन केले आहे. महापालिकेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी आणि या जागेवर शिवसृष्टी उभारावी यासाठी नगरसेवक दीपक मानकर आणि कोथरूड येथील नगरसेवक सातत्याने पाठपुरावा करत आहेत. महापौर मुक्ता टिळक यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांन सोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज मुंबई येथील सह्याद्री भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.

टिळक म्हणाल्या, कि मेट्रो यार्ड चे काम त्याच ठिकाणी होईल. तसे तांत्रिक नियोजन करूनच आराखडा तयार करण्यात आला आहे. हे काम थांबवू नये असे आवाहन त्यांनी यावेळी विरोधकांना केले. या जागेलगतच बिडीपी चे क्षेत्र आहे. यापैकी 28 एकर जागेवर शिवसृष्टी उभारण्याचे नियोजन करू. यासाठी आरक्षण बदल करण्यासोबत भूसंपादनासाठी येणारा खर्च याचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश त्यांनी महापालिका आयुक्तांना दिला.

मेट्रोचे अधिकारी तसेच कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी यावेळी अनुक्रमे मेट्रो व शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रेसेंटशन केले. याप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधीपक्ष नेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यावेळी उपस्थित होते.

अखेर वंदना चव्हाणांनी धाडस केलं..म्हणाल्या शिव विचाराच्या विरोधातील निर्णय मागे घ्या -पुण्याची शिवसृष्टी

पुणे: बीडीपी बांधकामाला परवानगी देणे, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा पराभव आहे. त्यामुळे चांदणी चौकातील “बीडीपी’च्या आरक्षित जागी शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय मागे घ्यावा आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत महाराजांच्या विचारांची शिकवण देणारी अभिनव शिवसृष्टी साकारावी, अशी अपेक्षा खासदार आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा  वंदना चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केली. अशा निर्णयामुळे “बीडीपी’च्या उद्देशाला धक्का बसणार आहे, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.शिवसृष्टी कोणत्या जागेत उभारावी ? असा प्रश्न उपस्थित करत शिवसृष्टीचा विषय लांबणीवर टाकण्यात येत होता .. अखेरीस भाजप ने स्वतःला राजकीय दृष्ट्या सबल करणारा निर्णय घेतल्याची समीक्षकांकडून कुजबुज सुरु होत असताना दुसरीकडे भाजपकडून दबावतंत्राचा अवलंब होत असल्याचा संशय व्यक्त होत असतानाही खासदा वंदना चव्हाण यांनी आपली स्पष्ट प्रतिक्रिया नोंदविण्याचे धाडस केल्याचे मानले जात आहे . कोथरुड येथील कचरा डेपोच्या जागेत मेट्रोचे स्टेशन उभारण्यात येणार असल्याचे चांदणी चौक येथील “बीडीपी’च्या तब्बल 50 एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. या प्रकल्पाचे काम वेगाने करण्याकरिता येथे विशेष बाब म्हणून बांधकामाला परवानगी देण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला केली आहे. या पार्श्‍वभूमीवर “बीडीपी’त बांधकामाला परवानगी देण्याच्या निर्णयाला खासदार चव्हाण यांनी विरोध दर्शविला आहे. राज्याच्या प्रमुखांनी पर्यावरणाला छेद देणारे निर्णय घेणे योग्य नसल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे. “पर्यावरणाबाबत महाराजांची भूमिका अत्यंत चांगली होती. त्यातून झाडे आणि त्यांच्या फांद्या तोडण्यालाही त्यांचा प्रखर विरोध होता. ज्यामुळे रयतेला कोणताही त्रास होऊ नये, अशी महाराजांची भूमिका होती. त्यामुळे महाराजांच्या भूमिकेची जोपसना करण्याऐवजी, पर्यावरणावर घाला घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आहे. “बीडीपी’ बांधकामे होणार असल्याने महाराजांच्या शिकवणीची अवहेलना करण्यासारखे आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसृष्टी उभारणीचा निर्णय मागे घेऊन महाराजांच्या विचारांचा सन्मान करावी, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

ऊस तोड कामगारांच्या मूलभूत सोयी,मजुरी दर, पक्क्या साखर शाळांसाठी साखर आयुक्तांना निवेदन, आंदोलनाचा इशारा

0
पुणे :‘ऊसतोड कामगार संघटना’ यांच्या वतीने राज्यातील ऊस तोड कामगारांच्या मूलभूत सोयी,मजुरी दर, पक्क्या साखर शाळा इत्यादी मागण्यांसाठी साखर आयुक्त संभाजी कडू – पाटील यांना  निवेदन देण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक दहिफळे, उपाध्यक्ष विठ्ठल बडे, सल्लागार सॉलिसिटर प्रसाद शिंदे, निवृत्तीनाथ आंबेकर, स्वाती मोराळे इत्यादी पदाधिकारी व संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कारखान्याजवळ शौचालय असावे, रुग्णवाहिका, सकस आहार, शुद्ध पाणी, सर्पदंशावर उपचाराची लस, हातमोजे,हेल्मेट इत्यादी मूलभूत सुविधा मिळाव्यात, अपघाती मृत्यू झाल्यास २ महिन्यात नुकसान भरपाई मिळावी,अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
ऊसतोड कामगारांना कारखान्यांना ऊसतोडणी काळात किमान २ किलो साखर देण्याचे औदार्य दाखवावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला.‘संघटनेच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करु आणि सर्व साखर कारखान्यांशी संपर्क साधू, असे आश्वासन सहकार आयुक्त संभाजी कडू – पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले.

राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचे 15 व 16 फेब्रुवारी 2018 रोजी आयोजन

0

पुणेदि6- अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणेच्या वतीने राज्यातील दिव्यांग व्यक्तींना कौशल्य विकास विषयक प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने दि. 15 व 16 फेब्रुवारी 2018, रोजी अल्पबचत भवन, पुणे येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत ‘ दिव्यांगासाठी दिशा कौशल्य विकासाची ’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्याशाळेच्या माध्यामातून दिव्यांग व्यक्तींना त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्यांचा विकास कसा करावा, याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे, त्यासाठी नामाकिंत तज्ञ व्यक्तींना बोलवण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे तसेच त्यांना आत्मनिर्भर बनविणे यादृष्टीने या कार्यशाळेत प्रयत्न केला जाणार आहेत, असे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी कळविले आहे.

‘शिवसृष्टी’ निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांचे गिरीश बापटांकडून अभिनंदन

0

पुणे-

‘चांदणी चौकातील बीडीपीच्या पन्नास एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याच्या निर्णयावर आज मुंबईत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले . शिवसृष्टीसाठी मी आग्रही होतो. याबाबत तोडगा काढण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली होती. यानुसार आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आज या प्रकल्पाची घोषणा केली. त्यासाठी निधी देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.  त्यामुळे आता वनाज- रामवाडी मेट्रोच्या  कामालाही गती मिळणारं आहे. आम्ही दिलेल्या आश्वासनातील दोन महत्वाकांक्षी प्रकल्पातील अडथळे दूर झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढल्याबद्दल यांचे खास अभिनंदन.’

 

–        गिरीश बापट( पालकमंत्री, पुणे)

 

पुण्यातील शिवसृष्टी बीडीपी जागेतच ….मेट्रो आणि शिवसृष्टी एकाच ठिकाणी नाही ..मुख्यमंत्र्यांचा निर्णय ..

0

मुंबई : पुण्यातील बहुचर्चित शिवसृष्टी साकारण्याचा अंतिम मार्ग मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जाहीर केला. चांदणी चौकाजवळील जैववैविध्य आरक्षण उद्यानाच्या (बीडीपी) जागेतच  तब्बल 50 एकर जागेत शिवसृष्टी करण्याचा आपला निर्णय स्पष्ट केला  . त्यासाठी आवश्यक तेवढा पुरेसा निधी विनाविलंब देण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली,यामुळे 11 फेब्रुवारीपासून मेट्रोचे काम बंद पाडण्याचे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांनी केली.

पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह महापालिकेतील सर्व राजकीय पक्षांचे गटनेते या बैठकीत उपस्थित होते. ‘सह्याद्री’वर सुमारे दीड वाजता सुरू झालेली बैठक  दोनच्या सुमारास यशस्वीरित्या पार पडली.
वनाज -रामवाडी मेट्रो मार्गावर पौड रस्त्यावर जुन्या कचरा डेपोच्या जागेत शिवसृष्टी उभारण्याचा ठराव महापालिकेन या पूर्वी केला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावाही सुरू आहे. मात्र, मेट्रो मार्गावर या जागेवर मेट्रोचा डेपो उभारायचा असल्याचे महामेट्रोने म्हटले होते. शिवसृष्टी आणि त्या खाली भुयारी मेट्रोचा डेपो उभारावा, अशीही मागणी झाली होती . मात्र, अचानक शिवसृष्टी आणि मेट्रोचा डेपो हे दोन्ही एकाच ठिकाणी उभारणे शक्‍य नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितल्याचे समजले .

या पार्श्‍वभूमीवर बैठकीच्या अगोदरच चांदणी चौकातील बीडीपीच्या जागेत शिवसृष्टी उभारण्याचा प्रस्ताव मान्य करावा, यासाठी मोर्चेबांधणी झाली होती. आणि बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शिवसृष्टीसाठी लागणारी ‘बीडीपी’मधील जागा महापालिका संपादित करणार आहे. त्यासाठी मोबदल्याचे धोरण राज्य सरकार लवकरच जाहीर करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पुणे परिमंडलात वीजबिल थकबाकीविरुद्ध महावितरणचा एल्गार

0

थकबाकी असल्यास वीजपुरवठा खंडितच होणार – प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे

पुणे: पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील 6 लाख 78 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांकडे असलेली 132 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी शून्य करण्यासाठी पुन्हा एकदा ‘शून्य थकबाकी’ मोहिम मंगळवारी (दि. 6) आक्रमक करण्यात आली.

या मोहिमेत सहभागी झालेल्या पुणे परिमंडलातील सुमारे 1400 अभियंते, अधिकारी व जनमित्रांशी सेनापती बापट मार्गावरील ‘प्रकाशभवन’ येथे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी थेट संवाद साधला. यावेळी मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे, अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. सुंदर लटपटे, श्री. राजेंद्ग पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे म्हणाले, की सद्यस्थितीत वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरणसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शून्य थकबाकी मोहिमेत गेल्या नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये तसे चांगले काम झाले. परंतु या महिन्यात संपूर्ण थकबाकी शून्य करण्याच्या ध्येयानेच काम करणे आवश्यक आहे व थकबाकी असल्यास वीजपुरवठा खंडितच होणार असा संदेश या मोहिमेद्वारे थकबाकीदारांना द्यावा. ही मोहीम पूर्ण आक्रमकपणे राबविल्या गेली पाहिजे व थकबाकी पूर्णपणे याच महिन्यात वसूल झाली पाहिजे, असे निर्देशही प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी यावेळी दिले. यासोबतच सर्व अधिकारी व जनमित्रांनी वीजबिलांचे अचूक रिडींग घेऊन वीजग्राहकांना वीजवापराचे योग्य बिल मिळेल यासाठी उपाययोजना कराव्यात. यात हयगय करणार्‍या रिडींग एजन्सीजविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे सुद्धा निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी मनोगतामध्ये पुणे परिमंडलाला वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त करण्याचे आवाहन केले.

शून्य थकबाकी मोहिमेवर निघालेल्या अभियंता, जनमित्रांनी प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत थकबाकी वसुलीचा निर्धार केला. थकबाकीदारांची नावे असलेल्या अद्ययावत ‘डीडीएल’ (डेली डिस्कनेक्शन लिस्ट) याद्या घेऊन सुमारे 25 ते 50 जणांच्या एका पथकाद्वारे जनमित्रांनी लगेचच वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केली. तसेच ज्या ग्राहकांची थकबाकी एक हजार रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांच्या नावांची यादी महावितरणच्या विविध कार्यालयांत दर्शनी भागात लावण्याचे यावेळी ठरविण्यात आले. जेणेकरून वीजग्राहकांना थकीत वीजबिलाची माहिती उपलब्ध होईल.

पुणे परिमंडलातील पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यात सद्यस्थितीत 6 लाख 78 हजार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे 132 कोटी 48 लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. आजपासून आक्रमपणे सुरु झालेल्या ‘शून्य थकबाकी मोहिमे’त अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांचे प्रमुख अभियंते, लेखा अधिकारी तसेच हजारो जनमित्र सहभागी झाले होते.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर थकीत वीजबिलांचा भरणा करणे, संबंधित कार्यालयात पावती दाखवून, रिकनेक्शन चार्जेस भरून वीजपुरवठा सुरु करून घ्यावा लागणार आहे. याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध तात्काळ फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

थकीत वीजबिलांचा संबंधित ग्राहकांनी तात्काळ भरणा करावा अन्यथा वीजपुरवठा खंडितच केला जाणार आहे. ही कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केंद्गे तसेच घरबसल्या ‘ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.