Home Blog Page 318

मूल्यांकनात महाराष्ट्र अग्रगण्य; काही निकषांवर मात्र पीछेहाट !

“केअर” या सर्वांगीण पतदर्जा मूल्यमापन करणाऱ्या संस्थेच्या “केअर एज” विभागाने देशातील सर्व राज्यांचे नुकतेच व्यापक मूल्यांकन केले. यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेले राज्य म्हणून संमीश्र मुल्यांकनात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला असला तरी त्यातील अनेक महत्त्वाच्या निकषांवर महाराष्ट्राची पीछेहाट झालेली आढळते. या अहवालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या कामगिरीचा लेखाजोखा.

“केअर” या नामवंत पत दर्जा देणाऱ्या संस्थेच्या केअर एज या विभागाने नुकताच देशातील सर्व राज्यांचे विविध निकषांवर मूल्यांकन करणारा अहवाल 2025 मध्ये प्रकाशित केला. यामध्ये मोठ्या राज्यांच्या संमिश्र क्रमवारी मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून त्या खालोखाल गुजरात व कर्नाटक यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ईशान्य भारत, डोंगराळ प्रदेश व लहान राज्ये या गटामध्ये गोवा प्रथम क्रमांकावर आला असून त्या खालोखाल उत्तराखंड व सिक्कीम यांनी बाजी मारली आहे.

प्रत्येक राज्याचे मूल्यांकन करण्यासाठी राज्याची आर्थिक कामगिरी, एकूण वित्तीय व्यवस्थापन, वित्तीय क्षेत्रात नोंदवलेली वाढ, पायाभूत सुविधांचा विकास, सामाजिक विकास, प्रशासनाची गुणवत्ता व पर्यावरणीय शाश्वतता हे महत्त्वाचे निकष ठरवण्यात आले होते. लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाल्याची व राज्य कर्जाच्या डोंगराखाली दबले गेले असल्याची टीका विरोधी पक्ष करत असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे या तिघांच्या नेतृत्वाखाली राज्याची कामगिरी काहीशी सरस झाल्याचे चित्र या मूल्यांकनामध्ये दिसत आहे. एका बाजूला विद्यमान सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावयाची झाली तरी सुद्धा काही निकषांवर राज्याने गंभीर चिंतन करण्याची व त्यात सुधारणा करण्याची निश्चित गरज आहे. सर्व राज्यांत प्रथम क्रमांक मिळवला म्हणून कौतुक करून न घेता आपण अनेक निकषांवर अग्रस्थानी नाही या वस्तुस्थितीची जाणीव असली पाहिजे. वरील सात निकषांपैकी फक्त एकाच निकषामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. वित्तीय क्षेत्रात नोंदवलेली वाढ या निकषांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक आघाडीवर आहे. याचे प्रमुख कारण देशातील प्रमुख विमा कंपन्या आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या कामगिरीमुळे राज्याला चांगला हातभार लागलेला आहे.

एकूण आर्थिक कामगिरीमध्ये गुजरात राज्य अग्रगण्य असून थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ त्यांच्याकडे जास्त आहे. त्याचप्रमाणे सकल राज्य देशांतर्गत उत्पादन ( त्याला ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट – जीएसडीपी म्हणतात) निकषावर गुजरातची कामगिरी सर्वाधिक चांगली आहे. तेथे स्थिर भांडवलाची निर्मिती सर्वाधिक आहे. वित्तीय व्यवस्थापनाच्या बाबतीत कमी महसुली तूट व कर्जावरील योग्य नियंत्रण या निकषांमध्ये ओडिशा हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांच्या निकषावर पंजाब व हरियाणा या दोन राज्यांनी आघाडी घेतलेली असून छोट्या राज्यांमध्ये गोव्यातील पायाभूत सुविधा विकास चांगल्या पद्धतीने झालेला आहे. सामाजिक विकासाच्या निकषावर बोलावयाचे झाले तर साक्षरतेचा तळागाळापर्यंत झालेला प्रसार व राज्याचा आरोग्य निर्देशांक या निकषांवर केरळने लक्षणीय कामगिरी केल्याने त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

विविध राज्यांच्या प्रशासनाची गुणवत्ता पाहिली तर महाराष्ट्राचे चित्र समाधानकारक नाही. या निकषावर आंध्र प्रदेशाने सर्वाधिक गुण मिळवलेले असून कार्यक्षम न्यायव्यवस्था व डिजिटल प्रशासन यामध्ये हे राज्य अग्रस्थानावर आहे. गेल्या काही वर्षात राज्याचे पर्यावरण योग्य मार्गावर आहे किंवा कसे याचा विचार केला तर महाराष्ट्र त्यात पिछाडीवर आहे. कर्नाटक हे राज्य या निकषावर अग्रस्थानावर असून तेथील हवेची गुणवत्ता खूप चांगली आहे व त्याचप्रमाणे अपारंपारिक ऊर्जेची निर्मिती व वापर म्हणजे अक्षय ऊर्जेच्या वापरातही त्यांनी आघाडी घेतलेली आहे.

वरील सात प्रमुख निकषांवर सर्व राज्यांचे मूल्यांकन केलेले असले तरी त्यासाठी विविध प्रकारचे पन्नास निर्देशांक वापरण्यात आलेले आहेत. यामध्ये राज्याच्या आर्थिक व वित्तीय व्यवस्थापनाला सर्वाधिक म्हणजे 45 गुण ठेवण्यात आले असून त्या खालोखाल वित्तीय विकास, पायाभूत सुविधा यासाठी प्रत्येकी 15 गुण ठेवण्यात आले आहेत. सामाजिक व प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी प्रत्येकी 10 गुण असून पर्यावरणीय शाश्वतता यासाठी 5 गुण ठेवले होते. एकूण 100 पैकी 50 पेक्षा जास्त गुण महाराष्ट्र (55.50 ), गुजरात (52.40), कर्नाटक (51.9) व तेलंगणा (51.4) या राज्यांनाच मिळाले असून तामिळनाडूला अगदी काठावर म्हणजे 50.1 गुण मिळालेले आहेत.बिहार सारख्या राज्याला 35 टक्क्यांपेक्षाही कमी मार्क पडलेले आहेत. याच निकषांवर ईशान्येकडील राज्ये,डोंगराळ प्रदेश व छोटी राज्ये समूहाचा विचार करता गोव्याला 62.10 गुण मिळालेले आहेत.त्या खालोखाल उत्तराखंडला 48.20 गुण तर सिक्कीमला 47.2गुण मिळालेले आहेत. या राज्यांमध्ये नागालँडला सुद्धा सर्वात कमी म्हणजे 38.20 गुण मिळालेले आहेत.

महाराष्ट्राला संमिश्र मूल्यांकनात प्रथम क्रमांक मिळण्याचे कारण म्हणजे राज्यातील वित्तीय,आर्थिक व सामाजिक विकास या तीन निकषांवर सर्वाधिक गुण लाभले आहेत. परंतु पश्चिम भारतातील राज्यांनी वित्तीय, आर्थिक व विकासाच्या क्षेत्रावर बाजी मारली असली तरी दक्षिणेतील राज्यांनी पर्यावरण प्रशासकीय कार्यक्षमता आर्थिक व वित्तीय विकास या सर्व क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. छोट्या राज्यांच्या गटांमध्ये गोव्याने पाच निकषांवर सर्वात चांगली कामगिरी केली असून त्यात वित्तीय विकास पायाभूत सुविधा सामाजिक विकास व वित्तीय तुटी वरील नियंत्रण यामध्ये सर्वाधिक चांगली कामगिरी केली आहे. वित्तीय तूट,कर्जांची परतफेड,कर्ज व्यवस्थापन व एकूण खर्चाची गुणवत्ता आणि महसूल निर्माण करण्याची क्षमता याबाबत मात्र ओडिशा आणि गुजरात महाराष्ट्राच्या पुढे आहेत. त्या खालोखाल कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा यांचा क्रमांक लागतो. या निकषावर सर्वात वाईट अवस्था पंजाब व बिहार यांची आहे. राज्य सहकारी बँका किंवा बिगर बँकिंग वित्त संस्था यांना कर्ज वाटप देण्यात तसेच म्युच्युअल फंड व आरोग्य विमा या क्षेत्रात शहरी व ग्रामीण भागात पोहोचण्यामध्ये महाराष्ट्राला चांगले यश लाभलेले आहे. त्या खालोखाल तेलंगणा व तामिळनाडू यांचा क्रमांक लागतो. परंतु बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांची कामगिरी असमाधान कारक आहे. छोट्या राज्यांमध्ये मणिपूर, नागालँड व मिझोराम यांची स्थिती खूपच प्रतिकूल आहे.

पायाभूत सुविधा निर्माण करण्यात पंजाब, हरियाणा व तेलंगणा ही राज्ये आघाडीवर असून महाराष्ट्राला त्यात केवळ 35.9 गुण पडले आहेत. उच्च शिक्षण साक्षरता,बालमृत्युदर,बहुपर्यायी गरिबी निर्देशांक व बेरोजगारीचा दर या निकषांवर केरळ व तामिळनाडू यांची कामगिरी सर्वाधिक चांगली आहे. महाराष्ट्राचा यात तिसरा क्रमांक आहे. छोट्या राज्यांमध्ये बहुतेक सर्व राज्यांची कामगिरी 50 टक्क्यांपेक्षा जास्त चांगली आहे. प्रशासकीय कार्यक्षमतेमध्ये महाराष्ट्र देशात सातव्या क्रमांकावर आहे. व्यवसाय करण्यासाठी पूरक वातावरण, पोलीस यंत्रणेची शक्ती, न्यायालयांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण,अल्प वेळात खटले निकाली निघण्याची यंत्रणा, सार्वजनिक सेवांची कार्यक्षमता आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा ही सहा राज्ये महाराष्ट्रापेक्षा जास्त कार्यक्षम ठरलेली आहेत. ओडिशा हे राज्य प्रशासकीय कार्यक्षमतेमध्ये 35 टक्के ही गुण मिळू शकले नाही. पर्यावरण, गुणवत्ता, जंगलांचे राज्यांना लाभलेले आवरण, पर्यायी ऊर्जानिर्मिती आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता या निकषांवर महाराष्ट्र केवळ 46.80 गुण मिळवून आठव्या क्रमांकावर आहे. ही अत्यंत खेददायक बाब आहे.यामध्ये कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, गुजरात व केरळ ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत. मात्र झारखंड, पश्चिम बंगाल,बिहार, व राजस्थान या राज्यांना 35 टक्क्यांपेक्षाही कमी गुण मिळालेले आहेत.

एकंदरीत महाराष्ट्रातील सर्व पक्षांच्या राज्यकर्त्यांनी व प्रशासनाने एकत्र येऊन गंभीरपणे या सर्व कमतरता, त्रुटी व अकार्यक्षमतेचा आढावा घेऊन प्रत्येक निकषांवर महाराष्ट्र अग्रभागी राहील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आजच्या स्थितीला “वासरात लंगडी गाय शहाणी” या न्यायाने आपला प्रथम क्रमांक दिसत आहे इतकेच. परंतु भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, राजकीय पक्षांची साठमारी, वाढती गुन्हेगारी, शहरांचे वाढते भकासीकरण याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे याच शंका नाही.

लेखक: प्रा. नंदकुमार काकिर्डे (लेखक पुणेस्थित अर्थविषयक जेष्ठ पत्रकार असून माजी बँक संचालक आहेत)

मुरलीधर मोहोळांनी युद्धाचं केलं राजकारण सुरु,रोहित पवारांचे प्रत्युत्तर तर अरविंद शंदे यांचे थेट मैदानात येऊन जाहीर वादविवाद चर्चेचे आवाहन

कॉंग्रेसने स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून पुढे शून्यातून देश घडविण्यात दिलेल्या योगदानाबाबत चुकीच्या अफवा पसरविणे भाजपचे काम-कॉंग्रेस

पुणे-काश्मीर मध्ये कधीही झाला नव्हता अशा पद्धतीचा धर्म विचारून पर्यटकांवर पहिलाच हल्ला सुरक्षेच्या चुकीच्या कारणास्तव पहलगाम मध्ये झाला, यावर राजकारण न करता, विरोधी पक्षांनी या वरून केंद्र सरकार आणि भारतीय लष्कर जी काही कारवाई करेल तिला पाठींबा देऊन मोठेपणा दाखविला असे मत मांडून केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समाज माध्यमावर एका POST द्वारे युद्धाचे राजकारण सुरु केल्याचे ठपका ठेऊन त्यांच्या या कृत्यावर त्यांना ट्रोल करण्यात येऊ लागले आहे. मुरलीधर मोहोळांनी युद्धाचं केलं राजकारण सुरु अशा आशयाचे रोहित पवारांचे प्रत्युत्तर तर अरविंद शंदे यांचे थेट मैदानात येऊन जाहीर वादविवाद चर्चेचे आवाहन त्यावर आले आहे .कॉंग्रेसने स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून पुढे शून्यातून देश घडविण्यात दिलेल्या योगदानाबाबत चुकीच्या अफवा पसरविणे हेच भाजपचे काम असल्याचे कॉंग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम (pahalgam terror attack) येथे दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. एप्रिलमध्ये या हल्ल्यात 26 नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरला सुरुवात केलीये. भारताने पाकिस्तानातील लष्करी तळांना लक्ष केलं आहे. यावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ग्राफिक शेअर करताना त्यावर ‘जेव्हा देशात मजबूत सरकार असते…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीए सरकारच्या कार्यकाळात ज्या-ज्या वेळी दहशतवादी हल्ले झाले. त्यावेळी भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र काँग्रेसचे सरकार असताना असे झाले नाही…’ असे कॅप्शन दिले आहे. यावरून मुरलीधर मोहोळ यांनी थेट तत्कालीन काँग्रेस सरकारवर निशाणा साधून राजकारण सुरु केलं आहे.

मुरलीधर मोहोळ यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मा. मोहोळ साहेब, आज संपूर्ण देश, सत्ताधारी–विरोधी असे सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत, सैन्यासोबत उभे आहेत, कारण हा विषय राजकीय नाही तर देशाच्या स्वाभिमानाचा आणि सुरक्षेचा आहे. आपण एक जबाबदार मंत्री आहात, त्यामुळं किमान सध्याला तरी अशा पोस्ट करणे संयुक्तिक वाटत नाही. राजकीय चर्चा नंतरही करता येतील कारण ही ती वेळ नाही. ही वेळ आहे देशाच्या शत्रूला धडा शिकवण्याची… त्यामुळे राजकारण बाजूला ठेवूया आणि हातात हात घेऊन भारतीय म्हणून सीमेवर लढणाऱ्या सैन्यासोबत आणि सरकारसोबत भक्कमपणे उभे राहूया, असे रोहित पवार म्हणालेत.

यावर आता पुणे शहर कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे, मोहोळ यांना थेट जाहीर वाद विवाद चर्चेचे आव्हान त्यांनी देताना म्हटले आहे कि,’ पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या समाज माध्यमांवर काल दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने आजवरच्या काँग्रेस सरकारांवर जाहीर टीका केली. आजवरच्या काँग्रेस सरकारच्या काळात देशाचे सार्वभौमत्व, संरक्षण सज्जता आणि देशांतर्गत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले प्रयत्न याबद्दल असत्य पसरवण्याचा प्रयत्न केला.

सध्या आपला देश दहशतवादी पोसणाऱ्या पाकिस्तानशी लढतोय. आपली तिनही सैन्यदलं प्राणाची बाजी लावून लढत आहेत. केंद्र सरकार, काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष, संपूर्ण भारतीय समाज एकत्र येऊन शत्रू राष्ट्र पाकिस्तान आणि जगाला आपली एकजूट दाखवणं ही प्राथमिकता, असा संदेश आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे , आमचे नेते राहुल गांधी यांनी आम्हांला दिला आहे. म्हणून आम्ही सत्ताधाऱ्यांवर सध्या कांहीही टीका टिपन्नी करणारं नाही. देशहीताला, एकजुटीला आमचं प्राधान्य. देश संकटात असताना पक्षीय राजकारण बाजूला ठेवणं आमच्या पक्षाची संस्कृती.

तरीही, मंत्री महोदय त्यांनी पोस्टमध्ये व्यक्त केलेल्या विचारांवर आणि पक्षीय राजकारणावर ठामच असतील तर आमची तयारी आहे. त्यांनी ठिकाण, वेळ सांगावी. आम्ही तिथं येऊन काँग्रेसने देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी आजवर काय केलं हें सविस्तर सांगू. काँग्रेसने देशांतर्गत दहशतवादी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारत विरोधी शक्तींचा कसा बंदोबस्त केला ते सांगू. पाकिस्तानचे तुकडे कसे केलें ते सांगू. सेना दलांना आधुनिक शस्त्रास्त सज्जता कशी केली ते सांगू. दहशतवाद्याना काँग्रेस काळात कसं शोधू शोधू पकडलं, फासावर लटकवलं, गोळ्या घालून ठार केलं ते सांगू. अन्वस्त्र सज्जता, आधुनिक पानबुडी, फायटर विमान, रणगाडे, सैन्य भरती याविषयीं माहिती देवू. संरक्षण दलासाठी काम करणाऱ्या दारुगोळा बनवणारें कारखाने, DRDO, NDA सारख्या शेकडो संस्था कशा, कोणी, कधी, कुठे उभ्या केल्या तेही सांगू.

शिवाय हल्ला झाल्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारण्याची काँग्रेस काळातील उदाहरणं ही सांगू.

संसद हल्ला, दहशतवादी पैसे देवून सोडणं, उरी, पठाणकोट, मालेगाव बॉम्बस्फ़ोट, अमरनाथ यात्रेकरू हल्ला, पुलवामा हल्ला, पहलगाम हल्ला यावर ही बोलू. सैन्याची पेन्शन, अग्निवीर योजना यावर ही बोलू. आपल्या निरोपाची आम्ही वाट पाहू

पाकच्या हल्ल्यात जम्मू चे विकास आयुक्त मृत्युमुखी, राजौरीमध्ये अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावरच पाकचे हल्ले

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये जम्मूमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेची माहिती दिली.
राज कुमार थापा असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, ते अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते. सीमेवर तणाव वाढल्यानंतर त्यांना नागरिकांच्या मदतीसाठी विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून पाकिस्तानी लष्कराकडून जम्मू आणि काश्मिरातील गावांना लक्ष्य केले जात आहे. मागील दोन दिवसांपासून पाकिस्तान ड्रोन्स, मिसाईल हल्ले सुरू केले आहेत. पाकिस्तानचे हे हल्ले हाणून पाडण्यात आले. दुसरीकडे सीमेवर पाकिस्तान लष्कराकडून उखळी तोफांचे हल्ले गावांवर केले जात असून, यात आता एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अतिरिक्त आयुक्त राज कुमार थापा यांचा पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती दिली. एक हादरवून टाकणारी बातमी राजौरीतून आली आहे. आपण जम्मू आणि काश्मीर प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याला गमावले आहे. कालच माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ते उपमुख्यमंत्र्यांसोबत हजर होते, असे अब्दुल्ला यांनी सांगितले.

राजौरीमध्ये अधिकाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानावरच पाकिस्तानकडून उखळी तोफा डागण्यात आल्या. यात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापा यांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेबद्दल व्यक्त होण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हे खूप मोठे नुकसान आहे. त्याच्या आत्म्याला शांती मिळो, अशा भावना अब्दुल्ला यांनी व्यक्त केल्या आहेत.

मोशी येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

पुणे, दि. ९ : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या २५० मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह पिंपरी-चिंचवड मोशी या संस्थेत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक मुलींनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, शारिरीकदृष्ट्या दिव्यांग व अनाथ आदी प्रवर्गातील ११ वी, बिगर व्यवसायिक आणि व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थींना वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार आहेत.

शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थींना विनामुल्य भोजन व निवासाची व्यवस्था असून क्रमीक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश व कॉलजचे ड्रेसकोड इत्यादी शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेपर्यंतची रक्कम विद्यार्थींनींच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. तसेच दरहा ९०० रुपये निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. शैक्षणिक साहित्य भत्ता ४ हजार रुपये, छत्री, रेनकोट, गमबूट भत्ता ५०० रुपये, गणवेश भत्ता २ हजार रुपये, प्रकल्प (प्रोजेक्ट) भत्ता १ हजार रुपये आदी देण्यात येते. शिवाय संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रीडासाहित्य आदी अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत.

विद्यार्थी हा बाहेरगावचा परंतू पुणे, पिंपरी-चिंचवड मोशी प्राधीकरण येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. प्रवेशासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाविद्यालयाचा बोनाफाईड दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड (मुलीचे व पालकांचे), शिधापत्रिका सोबत आणाव्यात. वसतीगृह प्रवेश https://hmas.mahaait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. अधिक माहितीसाठी २५० मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, पिंपरी-चिंचवड मोशी (भ्र. ध्व. क्र. ७७७४००१९२६ आणि ७५०७५९०६४७) येथे संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहप्रमुख मीनाक्षी नरहरे यांनी केले आहे.
०००००

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभाकरीता बँक तपशील भरण्याचे आवाहन

पुणे, दि.९: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभास पात्र ठरलेल्या परंतू ऑनलाईन अर्ज करतावेळी बँक तपशिल न भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांना उपलब्ध करून देण्यात आली आहे; अशा विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरीता आपल्या महाविद्यालयास संपर्क साधून स्वाधार संकेतस्थळावरील लॉगिनमध्ये बँकेचे तपशील भरावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याकरीता विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज केले आहेत. तथापि काही विद्यार्थ्यांनी अर्जात बँक तपशिलाबाबत माहिती भरलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरूनही त्यांना अनुज्ञेय रक्कम अदा करण्यास अडचण येत आहे. या विद्यार्थ्यांना बँक तपशील भरण्याबाबत संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती श्री. खैरनार यांनी दिली आहे.
0000

बांबू लागवडीसाठी यंत्रणांनी टार्गेट घेऊन काम करावे: पाशा पटेल

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर आणि वेल्हा तालुक्यात बांबू लागवड लोकप्रिय असली तरी मोठी संधी असूनही उर्वरित पुणे जिल्ह्यात बांबू लागवड झालेली नाही, या पुढील काळात क्षेत्रिय स्तरावर कर्मचाऱ्यांना व्यक्तीशा टार्गेट देऊन पुणे जिल्ह्यात मराग्रारोहयो अंतर्गत बांबू लागवडीचे ध्येय निश्चित करण्याचे पुणे जिल्ह्यातील यंत्रणांनी ठरवले असून त्या कामी मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित कृती दलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांचे सहकार्य घेण्याचे निश्चित झाले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बांबू लागवड अभियान विषयक आढावा बैठक (ता.9) मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या महत्त्वाच्या बैठकीला उपजिल्हाधिकारी रोहयो डॉ. चारुशीला देशमुख-मोहीते, डॉ. कृपाण घोष, प्रमुख, अँग्रीमेट विभाग,के.सी.साई कृष्णन, प्रमुख, IMD पुणे,डॉ.ओ.पी श्रिजीत, शास्रज्ञ IMD, डॉ. एस.डी. सानप, D शास्रज्ञ IMD
आरती बंडकर, शास्रज्ञ IMD, नवनाथ अवताडे,उप‌प्रादेशिक अधिकारी म.प्र.निः मंडळ पुणे, आर. वाय. पाटील,कार्यकारी अभियंता, सा. ,बा.पुणे आणि सं. स. विश्वासराव, उपसंचालक,जि. अ.कृ.अ. पुणे या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. चारुशीला देशमुख-मोहीते म्हणाल्या, 2024-25 साठी 300 हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले होते. 2025-26 साठी 450 हेक्टर उद्दिष्ट देण्यात आले. एकूण पाच वर्षातील 3000 हेक्टर उद्दिष्ट पैकी २०२४-२५ मध्ये १३३.६ हेक्टर इतकी लागवड झाल्याचे सांगितले. तसेच यावर्षी सर्व यंत्रणांना मागील वर्षीचे शिल्लक उद्दिष्ट व या वर्षीचे उद्दिष्ट नुसार सर्व यंत्रणांना जास्तीच उद्दिष्ट वाटप करून प्रति ग्रामसेवक, कृषी सहाय्यक,आर एफ ओ व मृद व संधारण आणि जलसंपदा विभागाला उद्दिष्ट देऊन यावर्षी 1000 हेक्टर चे उद्दिष्ट साध्य करु असे सांगितले.
यावेळी बोलताना पाशा पटेल म्हणाले.पुणे जिल्ह्यामध्ये क्षमता असूनही बांबू लागवडी मध्ये दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.वातावरण बदलाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे.इस्रायलमधील तेल अविव आणि अमेरीकेत कैलिफोर्निया आग लागली.
2024 हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले असून दिल्ली तापमान ५२.९ डिग्री परंतु गेल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते.47 डिग्री तापमानामध्ये माणुस मरतोय. दुबई होरपळतेयं तिथे तापमान ६५ डिग्री पर्यंत पोहोचले आहे. एकंदरीतच वातावरण बदलाच्या संकटामुळे मानवजातीसमोरचे सगळे मार्ग खुंटले आहेत, असे ते म्हणाले.

कार्बन इमिशन ( उत्सर्जन) दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगत ते म्हणाले, 2050 पर्यंत समुद्र किनारी असणारे देश आणि शहरे बुडणार आहेत.कोळसा आधारित औष्णीक प्रकल्प बंद करावे लागणार आहेत.
सर्वांनाच आता पर्यावरण पुरक वस्तु वापराव्यात लागणार आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.वेगाने वाढणारा बांबु एकमेव गवत वर्गीय वृक्ष असून बांबू बहु उपयोगी ठरत आहे.

यावेळी बोलताना भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस.डी. सानप म्हणाले, ‘औद्योगिक विकासाने कार्बन उत्सर्जन वाढले आहे. पारंपारिक उर्जा स्रोत वापराने कार्बन इमिशन वाढले. त्यामुळे वातावरण बदल होऊन कृषी क्षेत्राला वातावरण बदलाचा मोठा फटका बसत आहे.

तापमानातील वाढ, कमी कालावधीत जास्त पाऊस, ढगफुटी, वादळे घटक शेती बरोबरच आरोग्य वनक्षेत्र आणि जलसंधारण या विभागांना प्रभावित करत असल्याचे कडे त्यांनी लक्ष वेधले.पुणे जिल्ह्याचा विचार करता फक्त भोर आणि बिल्ला तालुक्यांमध्ये पारंपारिक रित्या बांबूच्या गोड होत आहे परंतु क्षमता असू नये शिरूर सह आंबेगाव आणि जिल्ह्यातील अनेक भागात ज्या ठिकाणी सिंचनातून जमिनी नापीक झाल्या अशा भागात देखील बांबू लागवडीसाठी मोठी संधी असल्याचे पाशा पटेल यांनी सांगितले.
प्रत्येक यंत्रणेमध्ये क्षेत्रीय पातळीवरील कर्मचाऱ्यांना टार्गेट देऊनच यापुढील काळात बांबू लागवडीचे ध्येय गाठले जाईल,असे यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी एकमताने आश्वासित केले.

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी -पणन मंत्री जयकुमार रावल

पुणे, दि. ९ : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री साठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त १०५ खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत. काही खाजगी व थेट बाजारा बाबत शेतमाल विक्री सुविधा संदर्भात तक्रारी आहेत. खाजगी बाजारात खरेदी विक्री शेड, बाजार ओटे, गोडावुन, रस्ते या सह पायाभूत सुविधांची तपासणी करण्यात यावी. तसेच त्यांचे खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार ऑनलाईन करण्या संदर्भात सूचना देण्यात याव्या. परवाना देताना लावून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या खाजगी व थेट बाजार यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी. व्यवहार पारदर्शक नसलेल्याचे परवाने रद्द करण्याची करण्यात यावी. तसेच सर्व खाजगी व थेट बाजाराचे लेखा परीक्षण करण्यात यावे असे निर्देश राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. ते पणन संचालनायाच्या बैठकीत बोलत होते.

पणन संचालनायाची आज पुण्यात बैठक झाली. या बैठकीत पणन संचालक विकास रसाळ, उपसंचालक मोहन निंबाळकर, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे या सह अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना मंत्री श्री रावल म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समिती सह खाजगी व थेट बाजारात शेतकऱ्यांनी विकलेला मालाचे पैसे शेतकऱ्यांना २४ तासाच्या आत ऑनलाइन पद्धतीने किंवा इतर मान्य पद्धतीने देण्यात यावे. प्रत्येक महिन्यात शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना दिले का? यासंदर्भात आढावा घेण्यात यावा. शेतमाल विक्रीचे पैसे अडवून ठेवलेल्या परवानाधारकांवर परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी. नवीन परवाना देताना किंवा नूतनीकरण करताना जलद गतीने प्रक्रिया करण्यात यावी. तसेच परवाना देताना बँक गॅरंटी घेण्यात यावी. राज्यातील ग्राहक सहकारी संस्था, जिनिंग प्रेसिंग संस्था,फळे व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करावे.

राज्यात मोठ्या क्षेत्रावर फळे आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते. राज्यात ४६६ फळे व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था नोंदणीकृत असून त्यापैकी ४५३ संस्था कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून उत्पादित फळे आणि भाजीपाला पिकांची साठवणूक करणे ग्रेडिंग पॅकिंग व निर्यात करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पणन संचालयाने नियोजन करावे. महामँगो, महाग्रेप्स, महाबनाना, महाऑरेंज, महाआनार, अशा संस्थांना त्यांच्या संबंधित कृषी मालाला निर्यात करण्याचे संदर्भात चालना देण्यात यावी. असे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची शेतमाल विक्री हक्काची सनद प्रत्येक बाजार समितीत लावा
शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्री हक्काची त्यांना माहिती व्हावी,यासाठी शेतकरी हक्काची सनद प्रत्येक बाजार समितीत लावा अशी सूचना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी अधिकाऱ्यांना केली.

०००००

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतला पुणे जिल्ह्याच्या कामाकाजाचा आढावा

नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा- मेघना बोर्डीकर

पुणे, दि. ९ : शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक बाबींवर आधारित कार्यक्रमानंतर राज्य शासनाने विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर देण्यासाठी १५० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला असून या कार्यक्रमात सर्व विभागांनी सक्रीय सहभाग घ्यावा. नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी कामकाजात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आायोजित सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा जिल्हास्तरीय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या, प्रत्येक विभागाने त्यांच्या कार्यालयाची संकेतस्थळे अद्ययावत ठेवावीत. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या अडचणीचे निराकरण व्हावे.घनकचरा,प्लास्टिक व्यवस्थापनासाठी लोकचळवळ आवश्यक असून आरोग्य विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने सेवाभावी संस्था, सरपंच, आजी- माजी पदाधिकारी यांच्या सहभागाने गावस्तरापर्यंत विविध उपक्रम राबवून स्वच्छता, घनकचरा, प्लास्टिक व्यवस्थापनाविषयी जनजागृती करावी. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनाही सूचना देण्यात याव्यात. लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती करा, सोनोग्राफी केंद्रांवर लिंग तपासणी होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

त्या म्हणाल्या, १०० टक्के अंगणवाड्यांमध्ये परसबाग होतील याकडे लक्ष द्यावे. सर्वच कामांमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी सर्व विभागांनी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे. आरोग्य विभागाने आंबेगाव,भोर व जुन्नर येथील पदभरती प्रक्रिया तातडीने करावी. शासनाच्या सर्वच योजना १०० टक्के राबविल्या जातील याकडेही लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत महावितरण, महापारेषण, विद्युत निरीक्षक, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ऊर्जा, महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व त्याची सद्यस्थिती याबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली.

0000

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्रम महर्षी’ पुरस्कार प्रदान

पिंपरी चिंचवड परिसरातील कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील -पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

पुणे, दि. ९ : पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरात लहान उद्योगांच्या माध्यमातून अनेक कामगारांना रोजगार प्राप्त होत आहेत. या उद्योगांमध्ये सातारा जिल्ह्यातील कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. या कामगारांच्या समस्या आणि लहान उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स तसेच पुण्यातील श्रमिक, कामगार आणि उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले, वंदे मातरम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक पंडीत, ॲडमार्क मल्टीवेंचर कंपनीचे संचालक गणेश दरेकर, पुणे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय सोनावले, संस्थापक अरुण कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री देसाई म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स तसेच पुण्यातील श्रमिक, कामगार आणि उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रम महर्षी’ पुरस्कार देऊन आज सन्मानित करण्यात आले, ही खूप मोठी गौरवाची बाब आहे. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. सातारा जिल्ह्यात श्री. शिंदे यांचे कार्य खूप मोठे आहे. जिल्ह्यात आलेल्या आपत्ती काळात पुरात अडकलेल्या लोकांना त्यांनी वेळोवेळी मदत केली. पुरात बेघर झालेल्या ५३४ कुटुंबांना त्यांनी हक्काचे घर उपलब्ध करुन दिले आहे. यातील काही घरांचे बांधकाम झाले असून उर्वरित घरे आगामी सहा सात महिन्यात पूर्ण होतील. श्री. शिंदे यांनी त्यांच्या दरे या गावात अनेक लोकांचे प्रश्न सोडविले आहेत. श्री. शिंदे यांनी गोरगरीब लोकांसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे, असे श्री. देसाई म्हणाले.

कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना देण्यात आलेला ‘श्रम महर्षी’ पुरस्कार त्यांच्यावतीने पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वीकारला. तसेच यावेळी यशवंत भोसले यांना ‘श्रम योगी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात पवना समाचारच्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविकात विजय सोनावले यांनी पुणे सातारा चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेच्या कार्याची माहिती विषद केली. कार्यक्रमाला या परिसरातील उद्योजक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कामगार उपस्थित होते.
०००००

भरत नाट्य मंदिर आयोजित ३३व्या वासंतिक संगीत नाट्य महोत्सवाला सुरुवात

पुणे : किर्लोस्कर, देवल, गडकरी, खाडिलकर यांच्या काळात वैभवाच्या शिखरावर असलेल्या रंगभूमीला बोलपटाच्या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. नाटक कंपन्या बंद पडल्या. अनेक नट बेकार झाले. रसिक बोलपटांकडे वळले. अशा काळात नवे नाटककार आणि अभिनेते यांनी संगीत रंगभूमीची परंपरा केवळ टिकवून ठेवली नाही तर अधिक समृद्ध केली. आधुनिक युगातल्या तरुण पिढीलाही परंपरेविषयी आस्था वाटते. ही प्रयोगशील असणारी तरुण पिढी संगीत रंगभूमीला ऊर्जितावस्था देईल, असा विश्वास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. वासंतिक संगीत नाट्य महोत्सव सलग ३३ वर्षे आयोजित करीत असल्याबद्दल प्रा. जोशी यांनी भरत नाट्य मंदिराच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
भरत नाट्य संशोधन मंदिरातर्फे वासंतिक नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे ३३वे वर्ष आहे. महोत्सवाचे उद्‌घाटन भरत नाट्य मंदिर येथे प्रा. जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. भरत नाट्य मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष अभय जबडे मंचावर होते. सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नटराज पूजन झाले. ऋषी बंकिमचंद्र यांच्या कादंबरीवर आधारित संगीत आनंदमठ या नाटकाने महोत्सवाची सुरुवात झाली.

भरत नाट्य मंदिराच्या या वासंतिक नाट्य महोत्सवाची रसिक आतुरतेने वाट पाहत असतात, असे सांगून प्रा. जोशी म्हणाले, बंकिमचंद्र यांनी लिहिलेले वंदे मातरम् हे केवळ गीत नाही, तो स्फूर्ती मंत्र आहे. स्वातंत्र्य संग्रामाची प्रज्वलित झालेली ज्योत अधिक तेजस्वी करण्याचे काम या स्फूर्ती मंत्राने केले. वंदे मातरम् हे दोन शब्द उच्चारत अनेक क्रांतिकारकांनी मृत्युला कवटाळले. तरुण पिढीसाठी हा नाट्य महोत्सव त्यांच्या नव कल्पनांना प्रोत्साहन देणारा ठरला आहे.
भरत नाट्य मंदिराच्या माध्यमातून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश प्राप्त करणारे कीर्ती कस्तुरे, ऐश्वर्या भोळे, आशुतोष नेर्लेकर, मधुरा शेलार, उमा जोशी यांचा तसेच आनंदमठ या नाटकातील मिलिंद सबनीस, अनुष्का आपटे , वज्रांग आफळे, अनुजा जोशी, रवींद्र सातपुते, अजय पराड, जयंत टोले, विनिता तेलंग या कलाकार-तंत्रज्ञांचा सत्कार प्रा. जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
सुरुवातीस अभय जबडे यांनी महोत्सवाविषयी प्रास्ताविकात माहिती सांगितली तर प्रा. जोशी यांचे स्वागत पांडुरंग मुखडे यांनी केले. सूत्रसंचालन संजय डोळे यांनी केले.

हौशी छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्यावैविध्यपूर्ण छायाचित्रांचे १४ पासून प्रदर्शन

पुणे: ज्येष्ठ हौशी, मनस्वी छायाचित्रकार रमेश करमरकर यांच्या वैविध्यपूर्ण आणि पारितोषिक प्राप्त छायाचित्रांचे प्रदर्शन पुणेकरांना पाहण्याची पर्वणी आहे. येत्या १४ ते २१ मे २०२५ या कालावधीत कोथरूड येथील हॅप्पी कॉलनीमध्ये असलेल्या पु. ना. गाडगीळ अँड सन्स कला दालनात हे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (ता. १४) सकाळी ११.३० वाजता अभिनेत्री व निर्माती, कलाकार भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते होणार आहे.

गेल्या ५५ वर्षांपासून रमेश करमरकर यांनी फोटोग्राफीचा छंद जोपासला आहे. बेलोज कॅमेऱ्यापासून ते मिररलेस कॅमेऱ्याच्या वापरातून त्यांनी विविध देशांतील जीवनशैली, तेथील निसर्गसौंदर्य, सांस्कृतिक वैभव आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रथम पारितोषिकासह भारत सरकार व इतर अनेक नामांकित संस्थांची पारितोषिके त्यांच्या अनेक छायाचित्रांना मिळालेली आहेत. ही सर्व पारितोषिक प्राप्त छायाचित्रे, बैलगाड्यांची शर्यत, आयफेल टॉवरचा अद्वितीय अँगल, नायगारा धबधबा, ट्युलिप फ्लॉवर्सची मनमोहक छायाचित्रे प्रदर्शनात पाहता येणार आहेत.

गोदामांची साठवणूक क्षमता वाढवावी-पणनमंत्री जयकुमार रावल

पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या संचालक मंडळासोबत आढावा बैठक संपन्न

पुणे, दि. ९: राज्यात केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेत नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी केलेला शेतमाल तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची साठवणूकही वखार महामंडळाच्या गोदामात होते, त्यामुळे आवश्यकतेनुसार गोदाम साठवणूक क्षमतेत वाढ करण्याच्यादृष्टीने देशासह जागतिक पातळीवरील साठवणूक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा व त्यामाध्यमातून तांत्रिकदृष्ट्या अद्यावत साठवणूक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नियोजन करावे, असे प्रतिपादन पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

पुणे येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या संचालक मंडळासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते, यावेळी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सहव्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

पणन मंत्री श्री. रावल म्हणाले, राज्यात सद्यस्थितीत महामंडळाची उपलब्ध साठवणूक क्षमता ही स्वमालकीची १७.२२ लाख मेट्रिक टन आणि भाडेतत्त्वावरील ७.३३ लाख मेट्रिक टन अशी २४.५५ मेट्रिक टन आहे, येत्या काळात नवीन सुमारे ५२ हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमतेचे गोदाम निर्मितीसंदर्भात व्यवहार्य नियोजन करावे. राज्यातील गोदामाचे रेटिंग करुन घ्यावे, जेणेकरून केंद्र सरकारच्या सवलतीचा लाभ घेता येईल.

राज्यातील गोदामामध्ये सनियंत्रण तसेच कामकाजात पारदर्शकता राहण्याच्यादृष्टीने सीसीटीव्ही बसवून त्यांचे नियंत्रण कक्ष पुणे येथील वखार महामंडळाच्या कार्यालयात करावे. यामुळे राज्यातील गोदामात उपलब्ध साठवणूक क्षमतेपेक्षा अधिक साठवणूक क्षमता वाढण्यास मदत होईल.

शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यामध्ये ५० टक्के आणि शेतकरी उत्पादक संस्थांना २५ टक्के सवलत दिली जाते. साठवणूक केलेल्या मालास १०० टक्के विमा संरक्षण तसेच शेतमाल तारण कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.

धान्य साठवणूकीमुळे बाजारभाव उच्च असतांना शेतकऱ्यांच्या शेतमालाचा चांगला परतावा मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी गोदामामध्ये अधिकाधिक धान्य साठवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांचे अन्न धान्याचे कापणीनंतरचे नुकसान कमी होऊन त्यांच्या शेतमालास चांगला बाजारभाव मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.

शेतकऱ्यांचा शेतीमाल शास्त्रशुध्द पध्दतीने साठविण्यासोबतच कृषी क्षेत्रात अन्नधान्याचा साठा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. वखार महामंडळाच्या गोदामामध्ये धान्य ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचा विश्वास आणि इच्छा वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे श्री रावल म्हणाले.

श्री. दिवेगावकर यांनी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची मागील तीन वर्षाची तुलनात्मक आर्थिकस्थिती, साठवून क्षमता व साठवून क्षमता वापर, संस्थानिहाय साठवणूक क्षमता वापर, शेतकऱ्यांसाठी सोई-सुविधा, शेतमाल तारण कर्ज योजना, हमीभाव खेरेदी, साठवणूक नियोजन, गोदाम बांधकाम, प्रस्तावित गोदाम तसेच राज्य शासन, स्मार्ट प्रकल्पाकडे प्रस्तावित प्रकल्पाबाबत माहिती दिली.


जांबरगाव अग्रो लॉजिस्टिक पार्कचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते लवकरच उद्घाटन होणार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जांबरगांव येथील ॲग्रो लॉजिस्टीक पार्क निर्माण कार्य जवळजवळ पूर्ण झाले आहे.त्यामध्ये १० हजार मे. टन क्षमतेचे सायलो दोन गोदामे ६ हजार मे.टन, क्लिनिंग व ग्रेडिंग २ युनीट (५ मे.टन /तास क्षमता), पेट्रोल पंप, सामायिक सुविधा केंद्र, उपहारगृह, ट्रक टर्मिनल, अंतर्गत रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे,असे ही मंत्री श्री रावल यांनी सांगितले. त्याच बरोबर लातूर येथील १० हजार मेट्रिक टन क्षमतेचे सायलो निर्माण कार्याचे भुमिपजन करण्यात येणार आहे. असेही मंत्री श्री. रावल म्हणाले.

भारतीय संस्कृतीचा पाया कुटुंब व्यवस्था-डॉ. विश्वनाथ दा. कराड

पुणे फॅमिली कोर्ट लॉर्स असोसिएशन द्वारे ग्रंथालयाचे उद्घाटन

डॉ. कराड यांना ‘विश्वशांती व मानवता समर्पित जीवन गौरव पुरस्कार’

पुणे, दि.९ मे: ” भारती कौटुंबिक व्यवस्था ही जगातील सर्वोत्तम आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, आदर आणि सहकार्य यावर भर दिला जातो. ही व्यवस्था मजबूत आणि प्रभावशाली व्यवस्था आहे. ती व्यक्तीला सामाजिक आणि भावनिक आधार देते.” असे विचार माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
द पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन द्वारे प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड यांना ‘ विश्वशांती व मानवता समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ ने गौरिवण्यात आले. यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त केली. या प्रसंगी कोर्टात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ग्रंथालयाचे उद्धाटन डॉ. कराड व कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मनिषा काळे यांच्या हस्ते करण्यात आले. ु
यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सुधाकर आव्हाड यांची प्रमुख उपस्थित होती. तसेच पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. गणेश कवडे, उपाध्यक्ष अ‍ॅड स्मिता देशपांडे, अ‍ॅड. कल्पना डिसले निकम, सचिव अ‍ॅड, प्रथम भोईटे, सहसचिव अ‍ॅड. कोमल देशमुख, खजिनदार अ‍ॅड. भूषण कुलकर्णी उपस्थित होते.
या प्रसंगी पुणे फॅमिली भूषण पुरस्काराने अ‍ॅड. अजीत कुलकर्णी, अ‍ॅड. विजया खळतकर, अ‍ॅड, प्रफुल्ल भावसार यांचा सत्कार करण्यात आला. तसेस अ‍ॅड. रेखा कोल्हटकर यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
त्याच प्रमाणे डॉ. महेश थोरवे, स्मिता देशपांडे, रोहिणी पवार, वैशाली चांदे, दिपा मॅडम, सुधीर रेड्डी, मर्चंट मॅडम, विद्या मॅडम, सचिन झांडे पाटील, श्वेता पांडे व अंबादास बनसोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” सद्गुणांची पूजा हीच ईश्वरपूजा आहे. परंतू आज या देशाला जाती धर्माचा शाप लागलेला आहे. अशावेळेस विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून मानवकल्याणासाठी कार्य करावे. स्वाभिमान, सत्व आणि कर्तव्याची जाण सर्वाना हवी आहे. यासाठी वकिलांनी राष्ट्रीय स्तरावरील राउंड टेबल कॉन्फरन्स घ्यावी. मानवाचे अंतिम सत्य काय आहे. हे ओळखावे परंतू व्यक्ती हा चुकीच्या दिशेने जाता कामा नये. अशा वेळेस लायब्ररीची दिशा काय असेल हे पहावे.”
न्यायाधीश मनिषा काळे म्हणाल्या,” कौटुबिक न्यायालयाने आज ज्ञानाचे दरवाजे उघडले आहे. ज्ञान ही अशी गोष्ट आहे जीची भूक कधीही थांबत नाही त्यामुळे सतत वाचन सुरू ठेवावे.”
अ‍ॅड. सुधाकर आव्हाड म्हणाले,” पुस्तक हे देशाच्या संस्कृतीचे मस्तक असते. या देशात वाचन संस्कृती ही ऋग्वेदापासून होती. कालानुरूप वाचन संस्कृती वाढत असतांना १८२९ साली लायब्ररीचा उपक्रम सुरू झाला. शब्द संग्रह वाढविण्यासाठी सतत वाचन करावे. शब्द विसरून जात असतील तर लिखाण करावे. प्रत्येक व्यक्ती ने सर्वात प्रथम श्रवण, मनन, चिंतन, लेखन आणि बोलणे करावे.”
अ‍ॅड. गणेश कवडे यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, पुण्यात १९८९ या वर्षी कौटुंबिक न्यायालयाची स्थापना झाली. येथे वाचनालय सुरू करण्यासाठी बर्‍याच अडचणी आल्यात पण उच्च न्यायालयाच्या परवानगीने चला जागा मिळाली आणि अत्याधुनिक ई लाइब्ररीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. हे कोर्ट देशातील एक सर्वोत्तम मॉडल आहे.”
सूत्रसंचालन अ‍ॅड. कोमल देशमुख यांनी केले. अ‍ॅड. भूषण कुलकर्णी यांनी आभार मानले.

कृत्रिम बुद्धिमत्ता टूल्सचा वापर करताना सावधगिरी बाळगा

मुंबई, दि. 9 : डिजिटल युगात संगणक हा आपला अविभाज्य भाग बनला आहे. शिक्षण, व्यवसाय, बँकिंग, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांमध्ये संगणकाचा वापर होतो. या डिजिटल युगात  संगणकाच्या मूलभूत गोष्टींची  माहिती असणे आवश्यक आहेच, त्याचबरोबर कामामध्ये सुलभता, सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा संगणक सजग असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मास्टेक नॉसकॉमच्या प्राजक्ता तळवलकर यांनी सांगितले.

टेक – वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात ‘डिजिटली सजग बना’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. नॅसकॉमचे अधिकारी प्राजक्ता तळवलकर, राहुल मुलाने यांनी मार्गदर्शन केले.माहिती तंत्रज्ञानाच्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता वापर करताना सावधगिरीने केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना डेटा चोरी होणार नाही यासाठी सतर्क असणे आवश्यक असून चॅट जीपीटी सारख्या एआय टूल्सवर काळजीपूर्वक डेटा दिला पाहिजे असा सल्ला राहुल मुलाने यांनी उपस्थितांना दिला.

यासोबतच संगणकाचे विविध भाग, ऑपरेटिंग सिस्टीम, संगणकाचा कीबोर्ड वापरताना उपयोगी पडणारे शॉर्टकट, जीमेल वापरताना स्मार्ट ईमेल आणि दिनदर्शिकेचा वापर कसा करावा, जीमेल मधील लेबल्सचा उपयोग, गूगल नोट्स, गूगल लेन्स, डॉक्युमेंट डिजिटायझेशन याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

मेट्रो तीनच्या अंतिम मार्गाचे ऑगस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 9 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यानच्या (9.77 किमी) सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मेट्रो तीनच्या आचार्य अत्रे चौक ते कुलाबा या मार्गावरील अंतिम टप्प्याचा शुभारंभ येत्या ऑगस्ट महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

मुंबई मेट्रो लाईन-3 (फेज 2अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक) सेवेचा विस्तार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी स्थानकातून हिरवी झेंडी दाखवून केला. त्यानंतर मान्यवरांनी बीकेसी ते सिद्धीविनायक मेट्रो स्थानकादरम्यान प्रवास करत मेट्रोचा आनंद लुटला. यावेळी जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी सान, प्रभारी मुख्य सचिव राजेश कुमार, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.

मेट्रोच्या शुभारंभानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 च्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी  या 13 कि.मी. मार्गाचे लोकार्पण 7 ऑक्टोबर 2024 रोजी झाले. आता फेज 2अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्ग हा दुसरा टप्पा उद्यापासून नागरिकांसाठी खुला होणार आहे. आतापर्यंत 22 कि.मी. मेट्रो सुरू झाली आहे. मेट्रोचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत असून मेट्रो तीनचे काम अंतिम टप्प्यात पोचले आहे. येत्या ऑगस्टमध्ये मेट्रो 3 च्या अंतिम टप्प्याचा मार्गावरील मेट्रो सेवा सुरू होईल. मेट्रो 3 मुंबईतील विमानतळांशीदेखील जोडली जाणार आहे.

मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार

मेट्रोचे काम हे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा मेट्रोचा मार्ग मिठी नदीच्या खालून जात आहे. त्याचप्रमाणे गिरगाव सारख्या गर्दीच्या ठिकाणीही मेट्रोचे काम सुरळीत झाले आहे. आता अंतिम टप्प्यातील दोन स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंतच्या मेट्रोला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे या मार्गावर प्रवाशांना उत्तम कनेक्टिविटी मिळेल. या मार्गावरील सर्व मेट्रो स्थानकेही अत्याधुनिक सुविधांनीयुक्त असून प्रत्येक स्थानकावर प्रवेशासाठी अनेक प्रवेश मार्ग असल्याने गर्दीचे योग्य व्यवस्थापन होईल. तसेच मेट्रो मार्ग हे प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोची कामे मोठ्या वेगाने सुरू आहेत. याद्वारे मुंबईकर तसेच महामुंबईतील नागरिकांसाठी सुलभ व अखंड परिवहन जोडणी (सिमलेस ट्रान्स्पोर्ट सिस्टीम) यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू आहे. यावर्षी 50 कि.मी. तर पुढील वर्षी आणखी 50 कि.मी. मेट्रोचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

सिंगल प्लॅटफॉर्मवर सर्व सार्वजनिक परिवहन सेवा मिळणार

मेट्रो, बेस्ट, लोकल या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी सिंगल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यातून प्रवाशांना एकाच तिकीटावर प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत हा प्रयोग सुरू करण्यात येणार असून त्यानंतर महामुंबईतही ही सेवा देण्यात येणार आहे. सध्या यावर प्रायोगिक तत्वावर काम सुरू असून लवकरच त्याचा व्यावसायिक वापर सुरू होईल. यामुळे नागरिकांना मुंबई तसेच महामुंबई परिसरात सुलभपणे प्रवास करता येईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

बेस्टने कालच गुगल सेवेबरोबर सांमजस्य करार केला आहे. यापुढे बेस्टच्या बसेसचे रिअल टाईम लोकेशन गुगलवर मिळणार असून या ठिकाणी प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजनही करता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांना दिलासा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबईकरांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. मेट्रोमुळे मुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मेट्रोमुळे या मार्गावरील सुमारे चार ते पाच लाख वाहने कमी होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन व वेळेची बचत होणार आहे. देशातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे मुंबईत उभारण्यात येत आहे. नागरिकांची गरज ओळखून कामे होत आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मेट्रोची कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्यावरील 50 टक्के वाहने कमी होतील. त्यामुळे महामुंबईकरांसाठी मेट्रो प्रकल्प वरदान ठरणार आहे.

टप्पा 2 अ – बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाची माहिती :

– स्थानकांची संख्या – 6 (सर्व भूमिगत)

– अंतर – 9.77 किमी

– हेडवे – 6 मि 20 सेकंद

– तिकिटाचे दर – किमान भाडे रु. १०/-, कमाल भाडे रु. ४०/-

– गाड्यांची संख्या – ८

– प्रवास वेळ (बीकेसी ते आचार्य अत्रे चौक)- १५ मिनिटे २० से

– फेऱ्यांची संख्या – २४४ फेऱ्या

– प्रवास वेळ आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक- ३६ मी

– तिकिट दर आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक किमान भाडे रु. १०/-, कमाल भाडे रु. ६०/-

– एकूण एस्केलेटरची (सरकते जीने) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) २०८

– एकूण उद्वाहक (लिफ्ट) संख्या (आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक) – ६७

कनेक्टिविटी

बीकेसी, वरळी यांसारख्या बिझनेस हब्सना जोडले जाणार आहे. बीकेसी स्थानक मेट्रो मार्ग 2 बी आणि बुलेट ट्रेनशी भविष्यात जोडले जाणार असून त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होणार आहे. सिद्धिविनायक मंदिर, माहीम दर्गा आणि माहीम चर्च यासारखी धार्मिक स्थळे तसेच शिवाजी पार्क, रवींद्र नाट्य मंदिर, शिवाजी मंदिर, यशवंत नाट्य मंदिर, प्लाझा सिनेमा यासारखी मनोरंजनाची ठिकाणे देखील या मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहेत.