पुणे:साळुंखे विहार रस्त्यावर अवैधरित्या तंबाखुजन्य हुक्का पार्लरचा पर्दाफाश करण्यास वानवडी पोलिसांना शनिवारी (ता. 10) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास यश आले आहे. पोलिसांनी या छाप्यात हॉटेल चालकासह 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.तर 3 हजार 215 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नारायण मगर थापा (वय-33 रा. शिवनेरीनगर, लेन नं.15 .कोंढवा, पुणे), चंदनकुमार श्रीतेवन राय (वय 22, रा. दि स्पाईसी फ्लोअर कॅफे अॅण्ड क्लाऊड किचन, सुपर मॉल दुसरा मजला, साळुंखे विहार रोड, वानवडी पुणे), इनायत मजिद सल्ला (वय-52, रा. भाग्योदयनगर, कोंढवा, पुणे) व जावेद मलिक शेख (वय-42 रा. पूना कॉलेज समोरील वस्ती, गोळीबार मैदान, कॅम्प, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरामध्ये अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वेळोवेळी सुचना दिल्या असुन, पुणे शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे होणार नाहीत. यासाठी पाठपुरावा केला जात असुन, अवैध धंदे समुळ नष्ट करण्याचे काम सुरु आहे.
मिळालेल्या आदेशाच्या अनुषंगाने वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे व त्याच्या सहकारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलीस हवालदार अमोल पिलाने व पोलीस अंमलदार अभिजीत चव्हाण यांना दि स्पाईसी फ्लोअर कॅफे अॅण्ड क्लाऊड किचन या हॉटेलमध्ये अवैध हुक्का पार्लर सुरु आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून पर्दापाश केला आहे. याप्रकरणी हॉटेल चालकासह 4 जणांवर सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018 चे कलम 4-अ, 21-अ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे गोविंद जाधव, उपनिरीक्षकधनाजी टोणे, रमेश साबळे, पोलीस हवालदार अमोल पिलाणे, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, बालाजी वाघमारे, गोपाळ मदने, विष्णु सुतार, यतीन भोसले दया शेगर, व सोमनाथ कांबळे यांच्या पथकाने केली आहे.
नांदेड दि.११ :- देगलूर तालुक्यातील तमलूर गावाचे सुपुत्र, भारतीय लष्करातील शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज देगलूर येथील त्यांच्या राहत्या घरी सांत्वनपर भेट घेतली. शहीद सचिन यांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार जितेश अंतापूरकर, उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे आदिंची यावेळी उपस्थिती होती.
श्री. पवार म्हणाले की, भारतीय लष्करातील जवान सचिन यांचा मृत्यू ही अतिशय दुःखद घटना आहे. सचिन यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या घरकुल योजनेतून घर दिले जाईल. त्यांच्या पत्नी वा भावाला नोकरी दिली जाईल. त्यांच्या मुलीच्या शिक्षण व उज्वल भविष्यासाठी शासनाच्यावतीने तरतूद करण्यात येईल.
त्यांच्या पेन्शनची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी स्वतः तहसीलदारांनी लक्ष द्यावे, अशी यावेळी सूचना करून श्री. पवार यांनी शहीद सचिन वनंजे यांना शहिदाचा दर्जा मिळावा यासाठी देखील शासन प्रयत्न करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बीए एलएलबी,बीबीए एलएलबी,एलएलबी,एलएलएम या अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे.अधिक माहिती ९१४५४३००७२ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच https://bvducet.bharatividyapeeth.edu या लिंकवर मिळू शकेल.या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी
एमएचसीईटी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. मात्र,भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठची सीईटी परीक्षा द्यावी लागेल.
भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ.उज्वला बेंडाळे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.बीए एलएलबी,बीबीए एलएलबीसाठी अर्ज करण्याची मुदत १३ जून २०२५ आहे,तर एलएलबीसाठी अर्ज करण्याची मुदत १२ जून २०२५ आहे.एलएलएमसाठी अर्ज करण्याची मुदत १० जुलै २०२५ आहे.
पुणे :, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित’गांधी दर्शन’ शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. रविवार,दि.११ मे २०२५ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच या वेळेत कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात हे शिबीर पार पडले.१९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक राणायांनी ‘मिथक चिकित्सा’,तर लोकसंस्कृतीच्या अभ्यासक स्नेहा टोम्पे यांनी ‘मातृत्वतत्त्वांची मिथके’ याविषयावर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी शिबिराच्या अध्यक्षस्थानी होते. ‘ गांधी दर्शन’ विषयावरचे हे विसावे शिबीर होते.प्रा. मच्छिन्द्र गोर्डे, अन्वर राजन, विकास लवांडे,अजय भारदे,स्वप्नील तोंडे,संदीप बर्वे, अरुणा तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
प्रा.राणा म्हणाले,’भारत हा पुराणकथात वावरणारा देश आहे.कारण मिथक आणि वास्तव यातील फरक भारतीय जनमानसाला ठाऊक नाही.आपल्या दैनंदिन जीवनात घडणारी मिथके,पुराणकथांशी संबंध जोडून त्यावर आधारित विचारसरणी स्वीकारण्याबद्दल भारतीयांना धन्यता वाटते.त्यातून नीतिबोध घ्यावा,दिशा घ्यावी अशी अपेक्षा असते,पण तसे होत नाही.वास्तवाची दाहकता टाळण्यासाठी कल्पनाविलासाकडे त्याचे मन वळते.चमत्कृतीने नटलेली मिथके जनमानसाचा ठाव घेतात.ही कल्पनांची पुटे बाजूला सारून चिकित्सेला तयार राहिले पाहिजे’.
स्नेहा टोम्पे म्हणाल्या,’भविष्याची बीजे इतिहासात असतात. म्हणून पुराण कथा, मिथक, देवता यावर बोलण्याची गरज असते.पुरातत्विय, राज्यशास्त्रीय, समाजशास्त्रीय दृष्टीकोणातून पाहण्याची गरज आहे.प्रजननक्षमतेमुळे, सृजनक्षमतेमुळे जगभर मातृदेवता निर्माण झाल्या.त्यांची प्रतिके, पूजा सुरु झाली.योनीपूजेमुळे वारूळ, कवडीची पूजा सुरु झाली.नाग, लिंगपूजा हा असाच प्रघात आहे.कुंभ, घट हे गर्भाशयांचे प्रतीक मानले गेले.गुढी देखील सृजनाचे प्रतीक आहे.मिथक ही घडून गेलेल्या घटनांची स्पष्टीकरणे असतात.मिथक समजून घेताना तर्क लावले पाहिजेत. समता निर्माण करण्याचे उद्दिष्ट असले पाहिजे’.
डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले,’ कथातून मिथक पुढे आणली जात आहेत.त्याचे शास्त्र झाले. हा तुलनात्मक अभ्यास केला पाहिजे. वर्चस्व कबूल करण्यासाठी, उच्च -नीच श्रेणी निर्माण करण्यासाठी मिथकांचा वापर केला जातो.साहित्य म्हणजे इतिहास नव्हे,हे लक्षात घेतले पाहिजे. दंगे घडविण्यासाठी खोटी मिथके वापरली जातात.युद्धांचा देखील खरे-खोटेपणा इतिहास दाखवला जातो.सत्य समजण्यासाठी सामुदायिक शहाणपण,विवेक असला पाहिजे’.
पुणे: व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून न बघता आनंद म्हणून बघायला पाहिजे. काहीतरी वेगळे करण्यासाठी जिद्द असावी लागते. पैशांपेक्षा आपण कमावलेले माणसे हा नफा असला पाहिजे. चांगले गिऱ्हाईक, चांगले कारागीर असतील तर व्यवसाय आपोआपच चांगला होतो. व्यवसाय वाढतो तेव्हा ती कला राहत नाही तर व्यवसाय हे विज्ञान होते. व्यवसायात आकडेवारी, माहिती ही फार महत्वाची असते, असे मत पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शतकोत्तर रौप्य महोत्सवी (१२५) वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्त ‘तुळशीबाग व्यापारी कट्टा’ या विशेष मुलाखत सत्रातून पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांचा उद्योग प्रवास उलगडण्यात आला. पूना गेस्ट हाऊस येथे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी गाडगीळ यांची मुलाखत घेतली. यावेळी अध्यक्ष विकास पवार, विनायक कदम उपस्थित होते.
पुणे शहर हे सांस्कृतिक शहर, शिक्षणाचे माहेरघर आणि आता माहिती तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखले जाते परंतु पुणे शहर हे व्यापाऱ्यांचेही शहर असून येथील काही व्यापाऱ्यांनी पुण्यातच नव्हे तर देशात परदेशात आपला नावलौकिक केला आहे. अश्याच पुण्यातील प्रथितयश व्यापारी आणि उद्योगपती यांची यशोगाथा तुळशीबाग व्यापारी कट्ट्याच्या माध्यमातून उलगडणार आहे.
दर सोमवारी सदर कट्टा लक्ष्मी रस्त्यावरील ऐतिहासिक पूना गेस्ट हाऊस या वास्तूत सुरु केला आहे. पुण्यातील जगप्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाल्यांचे संजय चितळे यांच्या मुलाखतीने तुळशीबाग व्यापारी कट्टा सुरु झाला. तसेच जयराज बासमती चे राजेश शहा, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, हाॅटेल सुकांता चे विजयकुमार मर्लेचा यांच्या सदर कट्ट्यावर मुलाखती झाल्या असून व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती सुद्धा होणार आहेत.
सौरभ गाडगीळ म्हणाले, पुण्यातील ग्राहक जितका चोखंदळ आहे. तितकाच तो प्रेम करणारा देखील आहे. इतर शहरातील ग्राहक मनासारखी डिझाइन मिळाली नाही तर इतर दुकानात जातात परंतु पुणेकर ग्राहक हवी ती डिझाइन पीएनजी मध्येच बनवून द्या असे सांगतात. त्यामुळे पुणेकरांसारखे निष्ठावान ग्राहक कुठेच नाहीत. एकूण ग्राहकांपैकी ४५ ते ५० टक्के ग्राहक हे पीएनजीमध्ये कायम येणारे आहेत. मी व्यवसायात येण्यापूर्वी व्यवसाय करण्याचा दृष्टिकोन खूप पारंपरिक होता. नवीन गोष्टी लोकांना दाखविण्यासाठी ब्रॅण्डिंगची गरज असते, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, अडचणी येतात, निर्णय चुकतात, नुकसान होते, पण या सगळ्यातून शिकायला हवे. तरुण उद्योजक आणि आताची पिढी यांच्यासाठी आजच्या काळात खूप गोष्टी सोप्या झालेल्या आहेत, कारण स्टार्टअप संस्कृतीचा उदय झाला आहे. स्वप्न पाहून जर दररोज त्या स्वप्नांसोबत जगायला लागलो, तर ती स्वप्ने पूर्ण होतात. शॉर्टकटचा मार्ग नको, असेही त्यांनी सांगितले.
द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया पुणे विभागाचा हीरक महोत्सव
पुणे : युद्ध ही कोणतीही रोमँटिक गोष्ट नाही, ना ती एखादी बॉलिवूडची चित्रपटाची कथा आहे. मृत्यू, निर्वासित समस्या, कुटुंबांचे विघटन असे अदृश्य पण खोल सामाजिक नुकसान युद्धामुळे होते. युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणूनच पाहायला हवे. अविवेकी लोकांनी आपल्यावर युद्ध लादले. युद्धासाठी आनंद व्यक्त करणे योग्य नाही. प्रत्येक समस्येचा पहिला उपाय संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच असावा. युद्धातून कोणाचाही खरा विजय होत नाही. शांतता हाच खरा विजय आहे, असे मत भारतीय सैन्याचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केले.
द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया या देशातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे विभागाच्या हीरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात नरवणे बोलत होते. एरंडवणे येथील डॉ. कलमाडी शामराव शाळेच्या शकुंतला शेट्टी आॅडिटोरियम मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किशोर पंप प्रायव्हेट लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक किशोर देसाई, माजी अध्यक्ष सीएमए डॉ. धनंजय जोशी, इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया (आयसीएमए) माजी अध्यक्ष सीएमए अमित आपटे, माजी केंद्रीय समिती सदस्य सीएमए संजय भार्गवे, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया, पुणे शाखा अध्यक्ष निलेश भास्कर केकाण, केंद्रीय समिती सदस्य सीएमए नीरज जोशी, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल माजी अध्यक्ष सीएमए चैतन्य मोहरीर आदी यावेळी उपस्थित होते.
मनोज नरवणे म्हणाले, संरक्षणासाठी किती खर्च करावा आणि शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यांसाठी किती खर्च करावा हा वाद फार जुना आहे. संरक्षणातील खर्च ही उधळपट्टी नसून देशासाठी आवश्यक ‘इंश्योरेंस’ आहे. सज्ज लष्करामुळे संघर्ष टळतो आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते. युद्ध महागडे असते त्याची नुकसान भरपाई खर्चिक असते. म्हणून ही गुंतवणूक देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे.
युद्धानंतर भारतीय सैन्य नेहमीच शांततेकडे परतते आणि तसेच राहायला हवे. विशेषतः मातृदिनाच्या निमित्ताने हे सांगणे महत्त्वाचे आहे की कोणत्याही आईला आपले मुल युद्धात गमवावा लागू नये. आपण राष्ट्रीय सुरक्षेकडे बघताना बहुतांश वेळा ते केवळ लष्करी दृष्टिकोनातून पाहतो. तर आपापल्या क्षेत्रात काम करत असताना आपण सर्व जण देशाच्या सुरक्षेसाठी काही ना काही योगदान देतो.
किशोर देसाई म्हणाले, देशासाठी आपण छोट्या प्रमाणात का होईना, काही ना काही योगदान नक्की देऊ शकतो. सैन्याचा त्याग हा सर्वोच्च असतो, तो आपण करू शकणार नाही, पण त्यांच्या समर्पणातून आपण प्रेरणा नक्कीच घेऊ शकतो. व्यवसाय नेहमी एका स्वप्नातून सुरू होतो, आणि त्यातूनच त्याचा प्रवास घडू लागतो. सामाजिक कार्य करत राहा. फक्त बॅलन्स शीटचीच चिंता करू नका, असेही त्यांनी सांगितले.
सीएमए चैतन्य मोहरीर म्हणाले, सन १९६५ साली पुण्यात स्थापन झालेल्या या विभागाने आजवर ४० हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले असून २२०० हून अधिक विद्यार्थी प्रमाणित कॉस्ट अकाउंटंट्स म्हणून घडवले आहेत. इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया ही संस्था जागतिक स्तरावरील उद्योगांच्या आर्थिक नेतृत्वासाठी संसाधने आणि व्यावसायिकांची प्राधान्याने निवडलेली स्त्रोत संस्था असेल, हे संस्थेचे व्हिजन आहे, तर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट व्यावसायिक जागतिक स्तरावर नैतिकतेने उद्योग चालवतील आणि धोरण, व्यवस्थापन व लेखा यांचे एकत्रित कौशल्य वापरून सामाजिक-आर्थिक संदर्भात भागधारकांसाठी मूल्यनिर्मिती करतील हे संस्थेचे ध्येय आहे, असेही त्यांनी सांगितले. निलेश केकाण यांनी प्रास्ताविक केले. नीरज जोशी यांनी संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या प्रवासाबद्दल माहिती दिली.
बोपोडी : डॉक्टर आणि परिचारिका आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची काळजी घेऊन देखभाल करून सेवा करातात हि कामगिरी फार मोठी आहे आजारी असणाऱ्या पेशंट जवळ आपले नातेवाईक सुद्धा जवळ जाण्यास घाबरतात परंतु अशा वेळेस डॉक्टर आणि परिचारिका त्यांना जीवन दान देतात हे माझ्या दृष्टीकोनातून फार मोठी गोस्ट आहे त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्यच आहे असे गौरवोद्गार प्रसिध्द उद्योजक मा. कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले. पुणे शहर रुग्ण सेवा समितीतर्फे फ्लोरन्स लाईट सिंगल पुरस्कार सो योगिता डामसे यांना पुणे मनपाच्या उप आरोग्य प्रमुख डॉक्टर कल्पना बळवंत मॅडम ज्येष्ठ उद्योजक माननीय कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जागतिक पारिचारिका दिनानिमित्त दरवर्षी रुग्ण सेवा समितीच्या वतीने गेले 33 वर्ष हा पुरस्कार देण्यात येतो. हॉस्पिटल मधील परिचारिका रुग्णांची सेवाभावी ने करतात. अशा पुणे शहर जिल्हा हॉस्पिटलमधील परिचारिका यांना समितीतर्फे सन्मानचिन्ह चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी योगिता रामभाऊ डामसे पाषाण हॉस्पिटल यांना सन्मानित करण्यात आले. तसेच तसेच विविध रुग्णालयातील 11 परिचिका यांना त्यांच्या विशेष सेवेबद्दल यांना सन्मानित करण्यात आले. यापैकी सौ नंदा मिसाळ, संगीता ठोंबरे, रूपाली मुदगे, अलिजा बेग पिल्ले, अर्चना राजगुरू, कांता मरळ, निर्मला पुलकमवार, प्रतीक्षा कांबळे, हेमांगी गायकवाड, प्रभा पिल्ले, कल्पना चोपडे, या 11 परिचकिरांचा सन्मानचिन्ह गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र भुतडा, हे होते. यावेळी इंद्रजीत भालेराव, प्रशांत टेके, विशाल जाधव, अनिल भिसे, अखिल मोगल, अन्वर शेख ,गणेश सार वाण, सुभाष निमकर, श्रीकांत जगताप, बाबा तांबोळी , निलेश मोरे, संदीप भिसे, विठ्ठल आरुडे, आदित्य ओव्हाळ, विजय सरोदे, अजित थेरे, विनोद सोनवणे, संतोष दिघे, विजय सोनीग्रा, सिल्वराच्या अंतोनी, राजेश माने, दत्ता सूर्यवंशी, रितेश गायकवाड, अफजल खान, तसेच महिला आघाडी प्रमुख कार्यकर्ते श्रीमती ज्योतीताई परदेशी, सौ मनीषा ओव्हाळ, चंदा अंगिर, माया मोरे,सौ रेशमा कांबळे, सौ आखतरी शेख, श्रीमती शुभांगी नाईक, राधिका भालेराव, रेणुका जोगदंड, इत्यादी पुणे शहर रुग्णसेवा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. मदर्स डे निम्मित राधिका भालेराव यांनी आपल्या मातेस मिळालेल्या पुरस्कारा बद्दल रुग्ण समितीचे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले. पाहुण्यांचे स्वागत प्रशांत टेके, प्रास्ताविक विशाल जाधव, सूत्रसंचालन इंद्रजित भालेराव, आणि आभार अनिल भिसे यांनी मानले.
करम प्रतिष्ठानचा 10वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा स्मिता जोशी-जोहरे यांच्या ‘तरंग’ कथासंग्रहाचे प्रकाशन
पुणे : माणसाकडे भाषा असल्याने तो आपल्या विचार, कल्पना, अनुभवातून कथेची निर्मिती करू शकतो. अनुभवाला कल्पनेची जोड दिल्यास उत्तम कथा निर्माण होते. आपल्या जगण्याशी, अनुभवांशी साधर्म्य सांगणाऱ्या कथा वाचकाला विशेष भावतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कुटुंबव्यवस्थेवर परिणाम होत असताना सामाजिक विचारमंथन होण्यासाठी साहित्यप्रकारच उपयुक्त ठरतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले. साहित्याच्या क्षेत्रातील उल्लेखनिय योगदानाबद्दल करम प्रतिष्ठनच्या कार्याचा डॉ. मोरे यांनी गौरव केला.
करम प्रतिष्ठानचा दहावा वर्धापनदिन सोहळा आज (दि. 11) पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी डॉ. मोरे अध्यक्षपदावरून बोलत होते. करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, प्रज्ञा महाजन, डॉ. बाबूल पठाण, स्मिता जोशी-जोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी स्मिता जोशी-जोहरे यांच्या ‘तरंग’ या कथासंग्रहाचे प्रकाशन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. ॲड. प्रमोद आडकर, ज्योत्स्ना चांदगुडे, धनंजय तडवळकर, स्वाती सामक यांची उपस्थिती होती.
सुरुवातीस प्रास्ताविकात भूषण कटककर यांनी करम प्रतिष्ठानच्या 10 वर्षांच्या प्रवासाचा मागोवा घेत संस्थेच्या उपक्रमांविषयी माहिती सांगितली तसेच भविष्यात राबविल्या जाणाऱ्या संकल्पांविषयी अवगत केले. प्रतिष्ठनच्या उपक्रमातून अनेक थांबलेले हात लिहिते झाले असेही आवर्जून सांगितले.
कथा-वाङ्मय हा साहित्य प्रकार माणसाला जगायला, सक्षम व्हायला उपयुक्त ठरतो, असे सांगून डॉ. मोरे पुढे म्हणाले, स्मिता जोहरे यांच्या कथा संग्रहातून विवाह संस्था, स्त्रीची रूपे, वृद्धत्वाचे प्रश्न, कुटुंब व्यवस्था यावर भाष्य होत प्रस्थापित संकल्पना बदलण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. अत्यंत झपाट्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे मानवाला सतत बदलांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे आज कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे. अशा वेळी कथांचा, साहित्यकृतींचा सामाजिक मंथन होण्यासाठी नक्कीच उपयोग होतो.
माझा साहित्यप्रवास लहानसाच आहे, असे सांगून स्मिता जोशी-जोहरे म्हणाल्या, अनुभवांचा साठा, भरघोस वाचन, लोकसंग्रह आणि करम प्रतिष्ठान सारख्या समूहातून मिळालेले प्रोत्साहन यातून मी लिहिती झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले तर परिचय वासंती वैद्य यांनी करून दिला. वर्धापन दिनानिमित्त मराठी स्वरचित कवी आणि गझल संमेलनाचे संस्थेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन करण्यात आले होते. संयोजन निरुपमा महाजन, प्राजक्ता वेदपाठक, मुक्ता भुजबले, वैजयंती आपटे, वासंती वैद्य यांनी केले.
जयगणेश व्यासपीठातर्फे विघ्नहर्ता कार्यकर्ता मातृगौरव सन्मान सोहळा21 मातांचे पाद्यपूजन करून सुवासिनींनी केले औक्षण
पुणे : परमेश्वराने हे जग निर्माण केले आणि आपल्या अस्तित्वाचा प्रत्यय येत राहावा यासाठी त्याने आईची निर्मिती केली. मुलांचे भावनिक भरणपोषण करणारी आई हे जगातले सर्वोत्तम विद्यापीठ आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. जागतिक मातृदिनानिमित्त जय गणेश व्यासपीठ, पुणेतर्फे आज (दि. 11) विघ्नहर्ता कार्यकर्ता मातृगौरव सन्मान सोहळ्याचे मराठाचेंबर ऑफ कॉमर्स येथे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रा. जोशी बोलत होते. आमदार हेमंत रासने, लक्ष्य फाऊंडेशनच्या प्रमुख अनुराधा प्रभुदेसाई, ॲड. प्रताप परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराच्या विविध भागातील 21 मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मातांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर मुलांनी आपल्या आईचे पेढा भरवून तोंड गोड केले. सुरुवातीस सुवासिनींनी मातांचे औक्षण करून पाद्यपूजन केले. पियूष शहा (साईनाथ मंडळ ट्रस्ट), विश्वास भोर (अखिल मंडई मंडळ), किरण सोनीवाल (वीर शिवराज मित्र मंडळ), प्रल्हाद थोरात (श्री शिवाजी मित्र मंडळ), राहुल जाधव (ओम हरिहरेश्वर मंडळ) यांच्या पुढाकारातून या हृद्य आणि भावस्पर्शी साहळा आयोजित करण्यात आला होता. प्रा जोशी म्हणाले, या जगात जी गोष्ट आईसाठी म्हणून केली गेली ती अजरामर झाली आहे. पैशातील गुंतवणुकीइतकीच नात्यातील गुंतवणूक महत्वाची आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे .सार्वजनिक जीवनात कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्यांना हारांपेक्षा प्रहारच अधिक मिळतात. प्रसंगी टीका आणि अपमान सहन करावा लागतो. कार्यकर्त्यांनी कौतुकाने भारावून जायचे नसते आणि टीकेने व्यथित व्हायचे नसते. कसलीही अपेक्षा न ठेवता हे आभारशून्य काम करावे लागते. ते करत असताना त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. घर व्यवस्थित असेल तरच बाहेरच्या लढाया लढता येतात. प्रामाणिकपणा आणि कष्टाचे संस्कार आईकडून झाल्याचे सांगून आमदार रासने म्हणाले, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्याच्या आईचा सत्कार ही अभिवन कल्पना आहे. पुण्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख निर्माण करून देण्यात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. अनेक वर्षांपासून सामाजिक-राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे, पण पहिल्यांदाच आईचा सन्मान होताना पाहात आहे. अनुराधा प्रभुदेसाई म्हणाल्या, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचे काम बघता तेही खऱ्या अर्थाने योद्धे आहेत. समाजासाठी काम करण्यासाठी कुटुंबियांचे पाठबळ आवश्यक असते. निस्वार्थ भावनेने कार्यकत समाजासाठी काम करीत आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. सध्याची परिस्थिती बघता समाजाचा स्तर सुधारण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संकल्पनेविषयी प्रास्ताविकात माहिती देताना पियूष शहा म्हणाले, समाजासाठी वेळीअवेळी गणेश मंडळाचा कार्यकर्ता धावून जातो. समाजासाठी काम करण्याचे संस्कार आईमुळेच होतात. आईविषयी कृतार्थतेची भावना व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुरुवातीस स्मिता जोशी, श्रुती वैद्य यांनी आईविषयक गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जतीन पांडे यांनी केले. विश्वास भोर यांनी आभार मानले.
अतुलनीय योगदानाबद्दल आडकर फौंडेशनतर्फे राजेंद्र पवार यांचा गौरव
पुणे : आई-वडिलांचे आशीर्वाद आणि संस्कार लाभलेल्या राजेंद्र पवार यांचा प्रवास शून्यातून सुरू झाला. मातीशी आणि माणसांशी बांधिलकी जपत त्यांनी स्वत:च्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांशी जुळवून घेणारे असे हे कर्तव्यनिष्ठ बहुआयामी व्यक्तीमत्व आहे, अशा शब्दात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पवार यांच्या कार्याचा गौरव केला.
पुणे येथे महावितरणचे मुख्य अभियंता या पदावर कार्यरत असताना राजेंद्र पवार यांनी अतुलनीय योगदान देत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांची पदोन्नतीवर महावितरणच्या मुख्य कार्यालयात संचालकपदी (मानवसंसाधन विभाग) नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त आडकर फौंडेशनतर्फे आज (दि. 11) त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचा सत्कार डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी डॉ. सबनीस बोलत होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती दिली.
पवार यांनी माणसातील माणूसपण जपत सर्वांशी अनुबंध निर्माण केले आहेत, यातूनच त्यांचे कार्यकर्तृत्व बहरास आले आहे, असे गौरवोद्गारही डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले.
सत्काराला उत्तर देताना राजेंद्र पवार म्हणाले, माझे अस्तित्व महावितरणमुळेच आहे. ज्या क्षेत्रात आपण मोठे होतो त्या क्षेत्राला कधीही विसरू नये. महावितरणविषयी लोकांच्या मनात असलेली वाईट प्रतिमा बदलण्याचा मी कसोशिने प्रयत्न केला आहे. यात अधिकारी-कर्मचारी वर्गाचेही सहकार्य लाभले आहे. ग्राहकांपासून लांब न राहता काही तरी वेगळे करण्याच्या जिद्दिने मी कार्यरत राहिलो आहे. कार्यात पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न करत, सहकाऱ्यांचे गुण हेरून सांघिक भावनेतून कार्य करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला मिळालेले पुरस्कार माझे वैयक्तिक नसून माझ्यासह सर्व सहकाऱ्यांचे आहेत.
सचिन ईटकर म्हणाले, राजेंद्र पवार यांनी आपल्या कामातून एक स्वतंत्र पायंडा निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन खात्याचा लौकिक वाढविण्याचे कार्य व्हावे.
सामाजिक कार्यात राजेंद्र पवार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनोहर कोलते यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी तर सन्मानपत्राचे वाचन डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार यांनी केले.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या २५ तासांनंतर, तिन्ही दलाच्या सैन्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये, लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई, व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद आणि एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली.लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले – पहलगाम हल्ल्यात २६ लोक किती क्रूरतेने मारले गेले हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. यानंतर, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. यामध्ये शत्रूंचे मोठे नुकसान झाले. घई म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ७ मे रोजी केलेल्या कारवाईत आम्ही सीमेपलीकडे ९ ठिकाणी १०० दहशतवाद्यांना ठार मारले. यामध्ये कंधार अपहरण आणि पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेले ३ मोठे दहशतवादी चेहरे देखील होते.
७ मे रोजी झालेल्या कारवाईनंतर, पाकिस्तानने आपल्या सीमावर्ती राज्यांमध्ये असलेल्या लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना हवेत हाणून पाडले. एकाही लक्ष्याला यश मिळू दिले नाही.
यानंतर, आम्ही पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून कठोर कारवाई केली, ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचे 35 ते 40 सैनिक आणि अधिकारी मारले गेले. सीमा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात आपले पाच जवान शहीद झाले आहेत.
ऑपरेशन सिंदूरला हे, भारत जेव्हा जेव्हा दहशतवादाविरोधात कारवाई करतो, तेव्हा दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांसाठी सीमेपलीकडील भूमी देखील सुरक्षित ठिकाण नसते याचाच पुरावा
भारताच्या भूमीवर भारत विरोधी घटक तसेच दहशतवादी संघटनांमुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या निष्पाप कुटुंबांना न्याय मिळेल याची सुनिश्चिती सशस्त्र दलांनी केली
राजनाथ सिंह यांच्या हस्ते आभासी पद्धतीने लखनऊमधील ब्रह्मोस एकात्मिकीकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचे उद्घाटन
हे संकुल भारताच्या आत्मनिर्भरतेच्या प्रयत्नांना बळकटी देईल तसेच या प्रदेशाच्या सामाजिक – आर्थिक विकासात योगदान देईल
नवी दिल्ली
ऑपरेशन सिंदूर ही केवळ लष्करी कारवाई नव्हती, तर ती भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचे प्रतीक होती असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. राजनाथ सिंह यांनी आज 11 मे, 2025 रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे ब्रह्मोस एकात्मिकीकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले त्यावेळी ते बोलत होते. ही कारवाई म्हणजे दहशतवादाविरोधातील भारताच्या कणखर इच्छाशक्तीचे तसेच, भारताच्या भूमीवर भारत विरोधी घटक तसेच दहशतवादी संघटनांमुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या निष्पाप कुटुंबांना न्याय मिळेल याची सुनिश्चिती करणाऱ्या, सशस्त्र दलांची क्षमता आणि निर्धाराची प्रचिती देणारी कारवाई होती अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी या कारवाईचे वर्णन केले.
ऑपरेशन सिंदूरला हे, भारत जेव्हा जेव्हा दहशतवादाविरोधात कारवाई करतो, तेव्हा दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांसाठी सीमेपलीकडील भूमी देखील सुरक्षित ठिकाण नसते याचाच पुरावा असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. उरी इथल्या घटनेनंतरचा सर्जिकल स्ट्राईक, पुलवामा हल्ल्यानंतरचे हवाई हल्ले आणि आता पहलगाम हल्ल्यानंतरच्या अनेक हल्ल्यांमधून, भारताच्या भूमीवर दहशतवादी हल्ले झाल्यास भारत काय करू शकतो याचे दर्शन अवघ्या जगाला झाले असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेच्या धोरणाचा अवलंब करत, आजचा नवा भारत सीमेच्या दोन्ही बाजूंनी होणाऱ्या दहशतवादाविरोधात प्रभावी कारवाई करेल ही बाब स्पष्ट केली आहे असे त्यांनी सांगितले.
ही कारवाई केवळ पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठीच राबवली गेली, या कारवाईत निष्पाप नागरिकांना लक्ष्य करण्यात आले नव्हते ही बाबही त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली. तरी देखील पाकिस्तानने मात्र भारतातील नागरी भागांना लक्ष्य केले आणि मंदिरे, गुरुद्वारा तसेच चर्चवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असे ते म्हणाले. आपल्या सशस्त्र दलांनी शौर्य आणि संयमाचे दर्शन घडवत पाकिस्तानच्या अनेक लष्करी तळांवर हल्ला करून सडेतोड उत्तर दिले असे ते म्हणाले. आपण केवळ सीमेजवळच्याच लष्करी तळांवर कारवाई केली नाही, तर आपल्या सशस्त्र दलांचा धडाका पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडीपर्यंत पोहोचला असे ते म्हणाले.
यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्रह्मोस एकात्मिकरण आणि चाचणी सुविधा केंद्राविषयी देखील माहिती दिली. हे केंद्र संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या भारताच्या प्रयत्नांना बळकटी देईल आणि मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करून या प्रदेशाच्या सामाजिक – आर्थिक विकासातही योगदान देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनीच होत असलेल हे उद्घाटन म्हणजे एक ऐतिहासिक क्षण आहे, यातून भारताच्या वाढत्या नवोन्मेषी उर्जेचे प्रतिबिंब उमटले आहे तसेच ही घडमोड अतिमहत्त्वाच्या, अत्याधुनिक आणि आघाडीच्या तंत्रज्ञानात वेगाने होत असलेल्या जागतिक बदलांशी सुसंगत घडमोड असल्याचे ते म्हणाले.
ब्रह्मोसला म्हणजे केवळ जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक नाही, तर ते भारतीय सशस्त्र दलांच्या सामर्थ्याचा संदेश आहे, तो शत्रूंना रोखणारा संदेश आहे तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करण्याच्या अतूट वचनबद्धतेचा संदेश आहे असे ते म्हणाले. ब्रह्मोस म्हणजे भारत आणि रशियाच्या उच्च संरक्षण तंत्रज्ञानाचा मिलाफ असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
‘जोपर्यंत भारत जगासमोर उभा राहणार नाही, तोपर्यंत कोणीही आपला आदर करणार नाही. या जगात भीतीला कोणतेही स्थान नाही, केवळ सामर्थ्यच सामर्थ्याचा आदर करते’ असे भारताचे क्षेपणास्त्र पुरुष अर्थात Missile Man आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटले असल्याचा दाखला त्यांनी दिला. आणि आज भारत जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्रांपैकी एक आहे आणि हे केंद्र भारताची ताकद आणखी वाढवण्यात मदतीचे ठरेल असे त्यांनी सांगितले.
हे सुविधा केंद्र उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर (UPDIC) साठी अभिमानाची बाब असल्याचेही राजनाथ सिंह म्हणाले. या केंद्राच्या माध्यमातून या पूर्वीच सुमारे 500 प्रत्यक्ष आणि 1,000 अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत, यातून संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून राज्याची वाढत्या स्थानाची प्रचिती येते असे ते म्हणाले. राज्याला (उत्तर प्रदेश) जगातील सर्वोच्च संरक्षण उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचे केंद्र सरकारचे ध्येय आहे, त्याला अनुसरूनच ध्येयावर आधारित आहे, या कॉरिडॉरची स्थापना करावी असा दृष्टीकोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बाळगला ही बाबही राजनाथ सिंह यांनी ठळकपणे अधोरेखित केली.
उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत आतापर्यंत 34,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणुकीसह एकूण 180 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत, तसेच 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूकही या पूर्वीच झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. विमान उत्पादन, यूएव्ही, ड्रोन, दारुगोळा, मिश्रीत आणि अतिमहत्वाचे घटक, लहान शस्त्रास्त्रे, वस्त्रोद्योग आणि पॅराशूट या क्षेत्रात मोठी गुंतवणूक आली असल्याचे त्यांनी सांगितले. या गुंतवणुकीत सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रांचा सहभाग असल्याची बाबही त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली. त्याअंतर्गत लखनऊमध्येच, पीटीसी इंडस्ट्रीज लिमिटेडद्वारे टायटॅनियम आणि सुपर अलॉय मटेरियल प्रकल्प सुरू केले जात आहेत. याशिवाय अतिरिक्त सात महत्त्वाच्या प्रकल्पांचीही पायाभरणी केली जात आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना गती मिळू शकेल असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
यावेळी राजनाथ सिंह यांनी ‘मेक-इन-इंडिया, मेक-फॉर-द-वर्ल्ड’ हा केंद्र सरकारचा दृष्टीकोनही पुन्हा अधोरेखित केला. आत्मनिर्भरतेचा अर्थ केवळ भारताच्या स्वतःच्या सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी निर्मिती करण्यापुरता मर्यादीत नाही, तर त्याबरोबरीनेच देशाला जागतिक बाजारपेठेत संरक्षण उपकरणांचा प्रमुख निर्यातदार देश बनवणे असा याचा अर्थ असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अलीकडील अहवालाचा संदर्भ देत त्यांनी 2024 मध्ये जागतिक लष्करी खर्च 2,718 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला असल्याचे सांगितले. इतकी मोठी बाजारपेठ म्हणजे एक संधी असून भारताने ती साधली पाहिजे असे ते म्हणाले. ब्रह्मोस सुविधा केंद्राचे उद्घाटन हे भारताला जागतिक संरक्षण उत्पादन परिसंस्थेतील एक महत्त्वाचा देश बनवण्याच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकार, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अर्थात डीआरडीओचे शास्त्रज्ञ, अभियंते आणि इतर भागधारकांनी केवळ 40 महिन्यांच्या आत प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. सध्याची परिस्थितीत, आपण कार्यक्षमतेने आणि कालबद्ध रितीने आपली ध्येये साध्य करणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. विकास विषयक एक मजबूत परिसंस्था तयार केल्याबद्दल तसेच उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरची स्थापना, लखनऊमधील डीआरडीओचे संरक्षण तंत्रज्ञान आणि चाचणी केंद्र स्थापना आणि 2020 मध्ये संरक्षणविषयक प्रदर्शनाचे आयोजन (DefExpo) अशा उपक्रमांची अंमलबजावणी हे इथल्या राज्य सरकारचे श्रेय असल्याचे म्हणत त्यांनी राज्य सरकारचे कौतुकही केले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनस्थळावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या संबोधनातून त्यांनी लखनऊला संरक्षण उत्पादन केंद्र बनवण्याचे ध्येय पुढे नेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आभार मानले. लखनऊमधील हे सुविधा केंद्र मेक-इन-इंडिया उपक्रम, आत्मनिर्भरता आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी योगी आदित्यनाथ यांनी संरक्षण विषयक उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्य सरकार राबवत असलेल्या उपक्रमांचीही माहिती दिली. उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर सर्व सहा केंद्राअंतर्गत वेगाने कामे सुरू आहेत असे त्यांनी सांगितले. संरक्षण उत्पादन क्षेत्राअंतर्गत राज्यात स्थापन होत असलेल्या सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातल्या उद्योगांसह, विविध प्रकल्पांची माहितीही योगी आदित्यनाथ यांनी दिली.
ऑपरेशन सिंदूरने अवघ्या जगाला आता भारत दहशतवाद सहन करणार नाही असा स्पष्ट संदेश दिला, अशा शब्दांत त्यांनी या कारवाईचे महत्व अधोरेखित केले. आता दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही, असे ते म्हणाले.
लखनऊमधील ब्रह्मोस एकात्मिकरण आणि चाचणी सुविधा केंद्र एकूण 200 एकर क्षेत्रात विस्तारले आहे. या केंद्रात बूस्टर उप-असेंब्ली, एव्हियोनिक्स, प्रोपेलंट, रामजेट इंजिनचे एकात्मिकरण घडवून आणले जाईल. या केंद्राच्या संकुलाच्या संरचनेत डिझाइन आणि प्रशासकीय इमारतीसह उपक्रम केंद्राचीही नियोजनात्मक आखणी केली गेली आहे.
या संकुलाच्या उभारणीसाठी अंदाजे 300 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या संकुलामुळे दीर्घकालीन परिप्रेक्षात संरक्षण उद्योग क्षेत्र आणि संबंधित उद्योजकांसाठी कौशल्य विकासाचा मार्ग प्रशस्तर होणार आहे. या संकुलाला पाठबळ देण्याच्या उद्देशाने संकुलाच्या आसपास सहाय्यक आणि सब – असेंब्लीची संपूर्ण संरक्षण विषयक परिसंस्था विकसित केली जाणार आहे. हे केंद्र भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे विद्यार्थी, पर्यवेक्षक, अभियंत्यांना तसेच विद्यार्थ्यांच्या औद्योगिकीकरणाची प्रक्रिया आणि कौशल्य विकासात मोठ्या प्रमाणात मदतीचे ठरणार आहे. यामुळे लोकांना नोकरीच्या संधी शोधण्यासाठी स्थलांतर करण्याची गरज उरणार नाही याचीही सुनिश्चिती केली जाणार आहे.ब्रह्मोस एरोस्पेसने या सुविधा केंद्राच्या कार्यान्वयनासाठी 36 प्रशिक्षणार्थींची निवड केली आहे. नव्याने निवड झालेल्या या प्रशिक्षणार्थींपैकी पाच जणांचा मुख्यमंत्री उत्तर प्रदेश यांच्या हस्ते उद्घाटनाच्या कार्याक्रमाचा भाग म्हणून सत्कारही केला.
उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रिजेश पाठक, मुख्य सचिव मनोज कुमार सिंह, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तचेस डीआरडीओ अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत, ब्रह्मोसचे महासंचालक डॉ. जयतीर्थ आर जोशी, लोकप्रतिनिधी आणि केंद्र तसेच राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुणे: खासदार मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या एका नेत्या बद्दल आक्रमक भूमिका घेतली आहे ज्याची खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घेतली आहे.कराडच्या यशवंत सहकारी बँकेतील (Yashwant Bank) सुमारे 140 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणीभाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे नेते शेखर चरेगावकर यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. मेधा कुलकर्णी यांनी आज कराडमध्ये ठेवीदार व कर्जदारांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यानंतर त्या बोलत होत्या.भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी कराडच्या यशवंत सहकारी बँकेतील सुमारे 140 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते शेखर चरेगावकर यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली आहे. कराडमधील शासकीय विश्रामगरात ठेवीदार व कर्जदारांच्या व्यथा जाणून घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी ठेवीदारांना न्याय मिळवून देईपर्यंत लढा सुरु ठेवणार असल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी या प्रकरणी भेट घेत सीबीआय मार्फत या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आपण केली असून अमित शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती खासदार मेधा कुलकर्णी यांनी ठेवीदारांना दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी भाजप नेते शेखर चरेगावकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी घेतली दखल
दरम्यान, या प्रकरणाची केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी गांभीर्याने दखल घेतली असून येत्या दोन महिन्यांत या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सीबीआय चौकशीच्या मागणीवर शाह सकारात्मक आहेत. त्याबाबत चरेगावकर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कोरोना काळात चरेगावकर यांचे व्यक्तिगत असलेले व्यवसाय अडचणीत आले. त्यातच काही कर्जदारांनी चरेगावकर यांच्या वाई अर्बन बँकेतील थकीत कर्जाचा मुद्दा उपस्थित करीत त्यांच्या यशवंत बँकेच्या अध्यक्षपदावर आक्षेप घेतला. त्यात चरेगावकरांना यशवंत बँकेच्या अध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले. त्यानंतर नव्या अध्यक्षांनी वसुलीबाबत कठोर भूमिका घेतल्या. पण, बँकेचा ताळेबंद व्यवस्थित झालेला नाही. त्यामुळे ठेवीदारांना वेळेत व पुरेसे पैसे मिळत नसल्याने या बँकेची प्रतिमा पुन्हा मलिन झाली आहे. आता तेथे इतर कारभारी कारभार पाहत आहेत. पण, अमित शाहांकडे झालेल्या तक्रारींमुळे पुन्हा एकदा चरेगावकर मात्र चर्चेत आले आहेत.
पुणे : आंबेडकरी चळवळ नेटाने पुढे चालविणाऱ्या तसेच ही चळवळ तळागाळात पोहोचवणाऱ्या विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या कार्यकर्त्यांचा सम्यक पुरस्काराने गौरव करण्यात आला.
तथागत गौतम बुध्द, चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आणि खासदार ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सम्यक पुरस्कार वितरण सोहळ्याचे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आले होते. पुरस्काराचे यंदाचे १७ वे वर्ष आहे. आंबेडकरी विचारवंत वसंतदादा साळवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे स्वागताध्यक्ष होते. तर कार्यक्रमाचे संयोजन नागेश भारत भोसले यांनी केले.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बिशप थॉमस डाबरे, सिने अभिनेते मिलिंद शिंदे, माजी सनदी अधिकारी सदानंद कोचे, ज्येष्ठ समाजसेवक गणपत गायकवाड, ज्येष्ठ आंबेडकरी नेते ठकाजी बाबा गायकवाड, वंचित बहुजन आघाडी प्रवक्त्या दिशा पिंकी शेख, ज्येष्ठ विधिज्ञ गायत्री कांबळे, ज्येष्ठ आंबेडकरी नेते अनिल गायकवाड, शिल्पकार आणि चित्रकार गोपाळ गंगावणे, आदर्श पालक नेहा आणि विजय ननवरे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान युद्धात मरण पावलेल्या भारतीय जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. निवृत्त प्रशासकीय अधिकारी सदानंद गोचे यांनी बौद्ध धर्माच्या पाच शीलाचे पालन करा, शिका आणि समाजासाठी काम करा असे आवाहन केले. पारलिंगी समाजाला सन्मानाने जगायला शिकविले, असे मत दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे कीर्तन झाले. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲड. किरण कदम यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ कला दिग्दर्शक संतोष संखद आणि दीपक मस्के यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष: हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आदरांजली..
कराड (सातारा), मुंबई, दि. १० मे २५ काँग्रेस पक्षाचा व देशाचा डीएनए एकच आहे, काँग्रेसचा विचार व धोरणे ही भारताची संस्कृती, परंपरा व लोकजीवनातून आलेली आहेत. काँग्रेस पक्षाला एक जाज्वल्य इतिहास आहे, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व देशात लोकशाही व्यवस्था रुजवली तसेच देशाला वैभव प्राप्त करून दिले असा पक्ष संपत नसतो, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
सातारा दौऱ्यावर असताना प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्ष संपेल असा विचार जे लोक करत असतील त्यांना देशाचा इतिहासच माहित नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र सैनिकांचा मान ते राखत नाहीत व त्यांची किंमतही त्यांना कळलेली नाही. स्वातंत्र्यानंतरही काँग्रेस पक्षाच्या दोन पंतप्रधानांचे बलिदान झाले, हे ते विसरतात. महात्मा गांधी यांचा खून करणाऱ्या अतिरेक्याला ते विसरतात. अशी वक्तव्ये करणे म्हणजे राष्ट्रद्रोह असू शकतो का, असा प्रतिप्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची यशवंतराव चव्हाणांना आदरांजली.. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन काँग्रेस पक्षाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर बोलताना सपकाळ म्हणाले की, आज देशावर संकट आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा याची आज आठवण झाली. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला होता या ६० च्या दशकातील इतिहासाचे स्मरण केले, त्यावेळी विपरित परिस्थितीत भारत निकराने लढला व विजयी झाला, त्यांच्या कर्तृत्वाला साक्षी ठेवून आपण आज पुन्हा भारतीय लष्काराच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे. चव्हाण साहेबांच्या खंबीर नेतृत्वाचा जो बाणा होता त्याचा पुर्नजन्म होईल व भारतीय लष्कर मोहिम फत्ते करील याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला, त्यांच्या आचार विचारांची आठवण झाली. सार्वजनिक जीवनात वावरताना राजकारण्यांनी कसे बोलावे, वागावे याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे त्याची आठवण झाली. प्रांताध्यक्ष नात्याने काँग्रेस पक्ष पुढे घेऊन जात असताना महाराष्ट्र धर्माचा सभ्य, सुसंस्कृत राजकारणाचा नेमकेपणाने गाभा व दिशा काय असावी याचे स्मरण केले, असेही सपकाळ यांनी सांगितले.
लाड व कदम कुटुंबियांची सांत्वनपर भेट. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या कन्या, माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या भगिणी व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांच्या पत्नी भारतीताई लाड यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे जाऊन लाड व कदम कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि भारतीताईंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.