‘यशस्वी’ संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत यशस्वी चे प्रशासन विभाग प्रमुख प्रसाद शाळीग्राम, जनसंपर्क प्रमुख योगेश रांगणेकर, कौशल्यसेतू अभियान समन्वयक श्रीकांत तिकोने, ग्राफिक डिझायनर शाम वायचळ, प्रथमेश पाटील, संदीप खेंगरे, अक्षय नाणेकर आदी उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिम्मित ‘यशस्वी’ संस्थेतर्फे अभिवादन
माजी नगरसेवक दत्ता बनकर यांचे निधन
पुणे -कॉंग्रेस आय पक्षात आपली कारकीर्द घालविलेले माजी नगरसेवक दत्ता नाना बनकर यांचे आज बुधवारी (दि.9) पहाटे पाच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कॉंग्रेस भवनात नेहमी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होईल अशा दृष्टीने संवाद कायम ठेवला होता. दत्ता बनकर यांच्या राजकीय पार्श्वभूमीवरच त्यांचे सुपुत्र माजी नगरसेवक सुनील बनकर यांचा आणि सून बाईमाजी महापौर वैशाली बनकर यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली .
भुजबळांच्या भाषणाबाबत औत्स्युक्य…
पुणे-बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी दोन वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात घालविल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. सध्या त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर परत एकदा राज्याच्या राजकारणात कमबॅक करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. पुणे शहरात 10 जून रोजी होणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते जाहीर भाषण करणार आहेत
आपल्या वेगळ्या भाषणशैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या भुजबळ यांच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. भुजबळ यांची सुटका झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला होता. त्यांच्या समर्थकांनी कुठे डिजेच्या तालावर ठेका धरला तर कुणी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. पुण्यातही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दगडुशेठ गणपतीची आरती करून आणि पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा केला होता.
भुजबळ यांच्या सुटकेनंतर काही कार्यकर्त्यांनी केईएम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. परंतु, अजुनही अनेक कार्यकर्त्यांना भुजबळ समोर येण्याची उत्सुकता लागली आहे. कार्यकर्त्यांची ही उत्सुकता लवकरच संपणार असून 10 जून रोजी पुण्यात होणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भुजबळ यांची तोफ धडाडणार हे निश्चित झाले आहे.
बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी छगन भुजबळ 14 मार्च 2016 पासून मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहात होते. त्यांनी 2 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर शुक्रवारी (4 एप्रिल) न्यायालयाने भुजबळांना दिलासा देत त्यांचा जामीन मंजूर केला होता. यापूर्वी त्यांनी तब्बल 9 वेळा जामिनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते, मात्र त्यांना यश येत नव्हते.
‘ड्राय डे’ नावाप्रमाणे सिनेमातील गाणीदेखील ठरताहेत सुपरहिट
११ मे रोजी कवी विंदा करंदीकर यांचे ५५ वे पुष्प
माधुरी म्हणते ‘होऊन जाऊ द्या!’
लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘बकेट लिस्ट’ या माधुरी दीक्षितच्या आगामी मराठी
चित्रपटाचं’;होऊन जाऊ द्या!’ हे पहिलं-वहिलं गाणं आज दिनांक 9 मे रोजी सोशल मीडियावर प्रसारीत
झाले आहे.लाखो लोकांना आपल्या नृत्याने मोहून टाकणारी आपली मराठमोळी मोहिनी ‘माधुरी दीक्षित’
पुन्हा एकदा’बकेट लिस्ट’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या संपूर्ण कास्ट बरोबर नृत्याचा ठेका पकडत
आपल्या सर्वांना त्यावर नाचायला लावण्यासाठी सज्ज झाली आहे.’बकेट लिस्ट’हा चित्रपट व्यक्तीच्या
मनातील एका गूढ कोपऱ्यात असणाऱ्या ईच्छा, आकांक्षांना उजाळा देणारा असल्यामुळे त्यातील सर्वच
गाणी देखील प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस येतील.
‘होऊन जाऊ द्या!’ हे गाणं आपल्याला आयुष्य जगायला, जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायला व
सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास प्रोत्साहीत करते आहे. ह्या गाण्याचं विशेष म्हणजे धकधक गर्ल
माधुरी दीक्षितने स्वतः ह्या मराठी गाण्यावर नृत्याचा ताल धरलेला असून तिच्यासमवेत सुमित
राघवन, वंदना गुप्ते, शुभा खोटे, प्रदीप वेलणकर, सुमेध मुडगलकर, दिलीप प्रभावळकर, इला भाटे, रेणुका
शहाणे, कृतिका देव, मिलिंद पाठक, शालवा किंजवडेकर या ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने
तालात ताल मिसळलेला दिसून येतो आहे.
श्रेया घोषाल, साधना सरगम आणि शान या सुराधिशांच्या स्वरांनी सजलेलं ‘होऊन जाऊ द्या!’; हे सूर
मधुर गाणं रोहन-रोहन या संगीतकार जोड गोळीने संगीतबद्ध केलेलं आहे. तर मंदार चोळकर यांच्या
लेखणीतून ते अवतरलं आहे.
धर्मा, करण जोहर आणि ए ए फिल्म्स प्रस्तुत, दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित , डार्क
हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित चित्रपट ‘बकेट लिस्ट’ येत्या
25 मे ला संपुर्ण जगभरात प्रदर्शित होणार असून मराठमोळ्या गाण्यावर माधुरीने धरलेला आपल्या
नृत्याचा ताल सर्वांना घायाळ करेल यात काही शंकाच नाही.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण बैठकीत पत्रकार व नागरिकांना प्रवेश देण्याची मागणी
शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विभागप्रमुख मनोज घाटे यांची मागणी
पुणे- कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण बैठकीत पत्रकार व नागरिकांना प्रवेश देण्याची मागणी शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विभागप्रमुख मनोज घाटे यांनी केली आहे . नुकत्याच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण बैठकीत पत्रकाराना बसण्यास विरोध करण्यात आला . लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमे आपली काम करीत असतात . बोर्डाच्या बैठीकीमधील होणारे महत्वपूर्ण निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम ते आपल्या लेखनीतुन करीत असतात , परंतु , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर राजीव सेठी यांनी अंतर्गत बैठक असल्याचे सांगून पत्रकारांना बैठकीस बसण्यास विरोध केला . त्यामुळे शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभागाच्यावतीने अशा वागणुकीचा निषेध करण्यात आला .
या निषेधांमध्ये प्रणव गणदेविया , , सचिन हिरवे , अरविंद निंबाळकर , सुरज पैलवान , कैलास भोज व अन्य शिवसैनिकांनी पदाधिकारी सहभागी झाले होते
औद्योगिक बर्फ ओळखण्याचा महाराष्ट्र पॅटर्न आता देशात सर्वत्र लागू
सर्वसामान्यांना ही आता खाद्य बर्फ ओळखता येणार
पुणे : राज्याच्या अन्न व औषध प्रसासनाने औद्योगिक बर्फ आणि खाद्य बर्फ वेगळा असावा यासाठी बर्फाच्या उत्पादना संदर्भातील अधिसूचना काढली होती. याबाबतचे निवेदन विधानसभेच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले होते. या पॅटर्नला केंद्राने ही मंजुरी दिली असून हा पॅटर्न देशातील सर्वच राज्यांना लागू केला आहे. याबाबत अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी पाठपुरावा केला होता.
बर्फामध्ये होणाऱ्या भेसळीमुळे मानवी आरोग्यवर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करून, सर्वसामान्यांना खाद्य व अखाद्य बर्फ समजून यावा यासाठी उपाययोजना करण्याबद्दल अन्न औषध मंत्री बापट यांनी आदेश दिला होता. याबाबत अभ्यास केल्यानंतर प्रशासनाने अखाद्य बर्फ समजण्यासाठी त्यात खाण्यास योग्य असा फिकट निळा रंग वापरण्यात यावा असा प्रस्ताव तयार केला होता. खाद्य बर्फ मात्र पिण्यास योग्य पाणी वापरून पारदर्शक करण्यात यावा असे या प्रस्तावात म्हटले आहे. मासे, मटण अशा विविध पदार्थांच्या साठवणीसाठी अखाद्य पदार्थ वापरला जातो. त्यामुळे हा रंग खाण्यात आला तरी त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत असा त्यापाठीमागे उद्देश आहे. राज्यात ही अधिसूचना लागू केल्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे ही पाठवण्यात आला होता. केंद्राच्या फूड सेफ्टी अथोरिटी ऑफ इंडिया या संस्थेने महाराष्ट्राचा हा प्रस्ताव स्वीकारला असून देशातील इतर राज्यात ही या नियमाचा अवलंब करण्याचे आदेश दिले आहेत.
देशभरात १ जून२०१८ पासून याबाबतचा आदेश लागू होणार असून या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या बर्फ उत्पादकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
ग्रंथालयांनी समान निधी योजनेसाठी प्रस्ताव पाठवावेत
पुणे दि. 9- राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयास समान निधी योजनेतून अर्थसहाय्य देण्यात येते. समान निधी योजना 2017-18 अंतर्गत ग्रंथालयांनी निधीच्या मागणीकरीता दिनांक 15 मे पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानाच्या सहकार्याने शासकीय सार्वजनिक ग्रंथालयांना कार्यान्वीत करण्यासाठी समान निधी तसेच सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत विस्तार-बांधणीसाठी अर्थसहाय्य (कमाल मर्यादा 10 लक्ष) योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत इच्छूकांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे आवश्यक कागदपत्रासह इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील चार प्रतिसह दिनांक 15 मेपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, अधिक माहितीसाठी कार्यालयाचे संकेतस्थळ www.rrrlf.nic.in वर संपर्क करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालनालय मुंबईचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी केले आहे.
तब्बल 25 वर्षानंतर पुन्हा घुमणार स्वप्नीलच्या बासरीचे सूर
गोड चेहरा, लांब केस, डोक्यावर मोरपंखी मुकूट आणि हातात बासरी… कृष्णाचं हे एकंदर वर्णन ऐकलं की सगळ्यात
आधी डोळ्यासमोर येणारा चेहरा म्हणजे स्वप्नील जोशी… कृष्णाची छवी आपल्या सगळ्यांच्या मनात बसवणारा
रामानंद सागर यांचा हा कृष्णा रणांगण चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या बासरीच्या सूरांनी प्रेक्षकांना
मंत्रमुग्ध करण्यास सज्ज झाला आहे.
कृष्णातल्या स्वप्नीलची एक वेगळी जागा आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे आता बासरी हातात घेऊन स्वप्नील
खलनायकाच्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा कोपरा काबिज करणार आहे. कृष्णातला गोड स्वप्नील आता
खलनायकाच्या डोळ्यात दिसणारा रोष आपल्यासमोर घेऊन येतो आहे. या रोषामागचं कारण चित्रपटात स्पष्ट होणार
असलं तरी एकंदर ट्रेलर पाहता स्वप्नीलने साकारलेल्या या खलनायकाची भिती नायिकेच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट
दिसते. यावरून कृष्णाची भूमिका साकारणारा हा तोच अभिनेता आहे, यावर विश्वासच बसत नाही. बासरी सोडली तर या
दोन्ही भूमिकांमध्ये तसं बघितलं तर कोणतंही साम्य नाही. असं असलं तरी कृष्णाला मिळालेली प्रसिध्दी श्लोकलाही मिळेल असा
विश्वास प्रेक्षकांकडून व्यक्त होत आहे.
या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन राकेश सारंग यांचं असून 52 विक्स एंटरटेनमेंट आणि हार्वे फिल्म्स प्रस्तुत आणि ग्लोबल
एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) निर्मित रणांगण चित्रपटाची निर्मिती करिष्मा जैन आणि जो राजन यांनी
केली आहे. तर सहनिर्मिती अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी केली आहे.
हा चित्रपट येत्या 11 मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
– ट्रेलरमधून माधुरीबरोबर दिसली रणबीरची ही झलक
प्रेक्षक आवर्जून वाट पाहत असलेल्या बकेट लिस्ट चित्रपटाचा ट्रेलर माधुरी
दिक्षित आणि करण जोहर यांच्या उपस्थितीत दणक्यात पार पडला.
यावेळी माधुरीबरोबरच सुमित राघवन, वंदना गुप्ते, शुभा खोटे, प्रदीप
वेलणकर, सुमेध मुद्गलकर आणि इतर कलाकार मंडळी उपस्थित होती.
तर चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर आणि चित्रपटाचे
निर्माते जमाष बापुना, अमित पंकज पारिख, अरूण रंगाचारी, विवेक
रंगाचारी, आरती सुभेदार आणि अशोक सुभेदार यांच्या उपस्थितीत हा
सोहळा पार पडला.
प्रेक्षकांना आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या बकेट
लिस्ट सिनेमाच्या ट्रेलरचं वैशिष्ट्य म्हणजे यात दिसलेली रणबीरची
झलक… त्यामुळे माधुरीबरोबरच रणबीरचे चाहतेही सुखावले आहेत.
डार्क हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स
निर्मित ‘बकेट लिस्ट’ करणच्या वाढदिवशी म्हणजेच 25 मे ला जगभरात
प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसलेली ही बॉलिवूडची
मराठमोळी अप्सरा बकेट लिस्ट चित्रपटातून प्रेक्षकांना हसत-खेळत
जगण्याची नवी भाषा शिकवून जाणार आहे, एवढं नक्की.
बचतीची तज’वीज’
महाराष्ट्रात विजेच्या टंचाईसोबतच लोडशेडींग नावाचा प्रकार आता पूर्णपणे संपुष्टात आला आहे. भर उन्हाळ्यात सुमारे 23,700 मेगावॉट विजेची राज्यातील उच्चांकी मागणी ही एकाच वेळी पारेषण व वितरण यंत्रणेतून यशस्वीपणे वहन करून गेल्या 23 एप्रिल रोजी पूर्ण केली आहे. विजेची उपलब्धता वाढत असली तरी पारंपरिक पद्धतीच्या वीजनिर्मितीचे इंधन संपुष्टात येत असल्यामुळे अपारंपरिक व विशेषतः सौर उर्जा निर्मितीला वेग देण्यात येत आहे. सध्या राज्यात विजेचा पुरवठा मागणीनुसार उपलब्ध असला तरी वीजबचतीचे राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी बजावणे ही काळाची गरज आहे.
महावितरण कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात 2 कोटी 49 लाख वीजग्राहक आहेत. यामधील सर्वाधिक 74 टक्के घरगुती वीजग्राहक सुमारे 21 टक्के विजेचा वापर करतात सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत अन्न, हवा व पाणी यांची गरज असते तेवढीच गरज आता विजेची झालेली आहे. दैनंदिन कामातील कित्येक कामे ही विजेवरच अवलंबून असतात. अशा स्थितीत वीजबचतीचे काही साधारण उपाय केले तरी साहजिकच विजेची अन् पैशाचीही बचत होते.
केंद्ग शासनाच्या उजाला योजनेतून वीजग्राहकांना एलईडी (लाईट एमिटिंग डायोड) बल्बची विक्री सुरु आहे. पारंपरिक बल्बचे आयुष्य सुमारे 5 हजार तास तर एलईडी बल्बचे आयुष्य तब्बल एक लाख तास एवढे असते. ऑफीस किंवा उंच इमारतीमध्ये एलईडी बल्ब वापरल्याने देखभालीचा खर्च कमी येतो. पारंपरिक बल्बच्या तुलनेत एलईडी बल्ब वापरल्यास 80 टक्के वीजबचत होऊ शकते. या एलईडी बल्बच्या वापरातून राज्यभरात एका वर्षात वीजबचतीचे इतरही मोठे फायदे दृष्टीक्षेपात आलेले आहेत. महाराष्ट्रात 2 कोटी 71 लाख 63 हजार एलईडी बल्बची विक्री करण्यात आली आहे. या बल्बच्या वापरामुळे एका वर्षात तब्बल 280 दशलक्ष युनिट, सुमारे 1131 कोटी रुपयांचा खर्च, 22 लाख 89 हजार मेट्रीक टन कोळसा अशी बचत झाली आहे. याशिवाय विजेच्या सर्वाधिक मागणीच्या काळात 566 मेगावॉटने घट झाली आहे. राज्यात पुणे शहरात सर्वाधिक 30 लाख तर ग्रामीण भागात 9 लाख 30 हजार एलईडी बल्बची खरेदी करण्यात आली हे येथे उल्लेखनीय. (आकडेवारी 5 मे 2018 पर्यंत)
विजेच्या बचतीसाठी भरपूर असलेल्या सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करणे महत्वाचे. दिवसा सूर्यप्रकाश वापरात येईल यावर भर देता येईल. घराची सजावट व खिडक्यांची पडदे फिकट रंगाचे असणे वीजबचतीसाठी उपयुक्त आहे. ज्यावेळी उपयोगात नसतील तेव्हा घरातील विद्युत उपकरणे व लाईट बंद करणे आवश्यक आहे. यातही महत्वाचे ते पंखे. ज्या उपकरणांमध्ये कॉईलचा वापर केला जातो ती सर्वच उपकरणे वीज अधिक खातात. त्यात आघाडीवर आहे पंखा. त्यामुळे पंख्याला गरज नसताना विश्रांती देणे आवश्यकच. बर्याचदा देव्हार्यात किंवा नाईट लॅम्प म्हणून झिरो बल्बचा पूर्वीपासून वापर होत आहे. झिरो बल्बऐवजी आता आवश्यकतेनुसार योग्य क्षमतेचे एलईडीचे बल्ब लावणे आवश्यक आहे.
वीजबिलाचा सुमारे 90 टक्के भाग व्यापणारी घरातील उपकरणे म्हणजे पंखे, एअर कंडिशनर, गीझर, वाशिंग मशिन, इस्त्री, रेफ्रिजरेटर, मायक्रोव्हेव ओव्हन, ज्युसर, फूड प्रोसेसर, मिक्सर, ग्राईंडर, कॉम्प्युटर्स, चार्जर, व्हॅक्यूम क्लिनर अशा उपकरणांचा समावेश होतो. ही उपकरणे वीजबचतीच्या जाणीवेनं वापरात आणली तर निश्चितच वीजबचतीला मोठा वाव आहे अन् उपायही अगदी साधे.
वर्षभरातील घरगुती एकूण वीजवापरातील 25 टक्के वीज एकाच रेफ्रिजरेटरला लागते. त्यामुळे फ्रिजमधून वस्तु काढताना एकदाच काढाव्यात. दरवाजा सतत उघडावा लागला तर फ्रीजमधील तापमान बिघडते अन् वीज जास्त खर्च होते. सध्या टिव्ही महत्वाचाच. पण टिव्ही रिमोट कंट्रोलविना थेट स्वीचमधून बंद केले विजेची बचत होऊ शकते. मायक्रोवेवमधील पदार्थ तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी वारंवार दार उघडले की प्रत्येक वेळी सुमारे 25 अंश सेल्सिअस तापमान खाली येते व तेवढेच तापमान वाढायला अधिकची वीज खर्च होते. सिलिंग पंख्यासाठी पारंपरिक रेग्युलेटर वापरण्याऐवजी इलेक्ट्रानिक रेग्युलेटर वापरलेला बरा. योग्य प्रमाणात कपडे धुण्याची पावडर वापरून वाशिंग मशीन तसेच ओव्हनमध्ये टायमरचा वापर केल्यास अधिक खर्च होणारी वीज नियंत्रणात राहते. आंघोळीसाठी गरम पाणी लागतं म्हणून आंघोळ होईपर्यंत गिझर सुरु ठेवणे वीज खर्चाचे आणखी एक कारण आहे. त्यापेक्षा गरम झालेले पाणी एकदाच बादलीत घेऊन गिझर बंद करणे योग्य ठरते.
एअर कंडिशनरला पंख्यापेक्षा साधारणतः नऊ पट वीज अधिक लागते. त्यामुळे शक्यतो पंखाच वापरा. एसी वापरायचा असल्यास नियमितपणे फिल्टर तपासणे, स्वच्छ करणे, एसी सुरु असताना दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद करणे आवश्यक आहे. गारवा निर्माण झाला की शक्य असल्यास एसी बंद करावा. स्मार्ट मोबाईलला सतत चार्जिंग करावे लागते. त्यामुळे मोबाईल पूर्ण चार्ज झाल्यानंतर चार्जिंगचे बटण करण्याचा बंद करण्याचा कंटाळा न केलेला उत्तमच. इमारतींमध्ये दोन लिफ्ट असल्यास एखादी लिफ्ट लवकर येईल म्हणून दोन्ही लिफ्टचे बटण दाबतात. असे केल्याने बरीच वीज खर्च होते. त्यापेक्षा एकाच लिफ्टचे बटण दाबले पाहिजे. घाई नसल्यास लिफ्टचा वापर न करता शक्य तेवढ्या जिन्याच्या पायर्या चढणे किंवा उतरल्यास व्यायाम होतो आणि आपसुक वीजबचतही होते.
निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे.
—————————————————————–
एनआयपीएम पुणे विभागाच्या अध्यक्षपदी विश्वेश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड.
पुणे :नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट अर्थात एनआयपीएम या मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रातील राष्ट्रीय संस्थेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी ‘यशस्वी’ संस्थेचे विश्वेश कुलकर्णी यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.
तसेच कॅप्टन डॉ. सी.एम.चितळे व उमेश जोशी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर नरेंद्र पाटील यांची सरचिटणीसपदी, सहचिटणीसपदी झाकीर शेख, खजिनदारपदी सुनील नेवे यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारिणीच्या सदस्यपदी आर.बी.सबनीस, वाय.जी.पाटील, सदाशिव पाटील, डॉ. अमित गिरी व मीनल कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे.
पुढील दोन वर्ष या कार्यकारिणीचा कार्यकाळ असणार आहे.
लग्नाविषयीच्या चर्चेमूळे ती बनली सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी!
बॉलीवूडची स्टाइल आयकॉन सोनम कपूर लवकरच विवाहबध्द होणार आहे. बिजनेसमॅन आनंद अहुजाशी थाटामाटात होणा-या तिच्या लग्नसोहळ्याची उत्सुकता सर्वत्र आहे. तसेच नुकताच तिच्या आगामी सिनेमाचा ट्रेलरही लाँच झाला होता. त्यामूळेच गेल्या काही दिवसांमध्ये चर्चेत राहिलेली सोनम कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्स वर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनलेली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या तीन आठवड्यांपासून स्कोर ट्रेंड्सच्या लोकप्रियतेच्या चार्टवर नंबर वन स्थानी असलेल्या ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राला ह्या आठवड्यात सोनम कपूरने मागे टाकले आहे. बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या स्कोर ट्रेंड्सच्या लिस्टमध्ये बीग बी अमिताभ बच्चन ह्या आठवड्यात 70.68 अंकांनी प्रथम स्थानी आहेत. तर दूस-या स्थानावर सलमान खान आणि तिस-या क्रमांकावर संजू चित्रपटाच्या लोकप्रियतेमूळे रणबीर कपूर आहे.अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिलेली आहे.स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्विनी कौल ह्याविषयी सांगतात, “सोनम कपूरच्या ‘वीरे दे वेडिंग’ फिल्मचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये फेसबुक, ट्विटर,व्हायरल न्यूज, प्रिंट प्रकाशन आणि डिजिटल प्लैटफॉर्मवर सोनम कपूरच्या लग्नाच्या विषयी ब-याच बातम्या होत्या. ह्याचमूळे सोनम कपूर 80.92 अंकांनी बॉलीवूडमधली सर्वाधिक चर्चिली गेलेली आणि लोकप्रिय अभिनेत्री ठरलीय.”आकडेवारीनूसार, 61.32 अंकांनी प्रियंका चोप्रा दूस-या स्थानी तर 59.43 अंकांनी दीपिका पदूकोण तिस-या स्थानावर आहे.अश्वनी कौल म्हणतात, “फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश ही आकडेवारी काढताना होतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”अश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधल्या 600 बातम्यांच्या स्रोताव्दारे हा डेटा एकत्र केला आहे. मीडियामध्ये उपलब्ध आकडेवारीनुसार, हा डेटा मिळतो.”
आदर्श पुणेकर पुरस्कार सोहळा संपन्न
पुणे-आम्ही पुणेकर आवाज पुणेकरांचा सेवाभावी संघटना प्रथम वर्धापन दिन निमित्त आदर्श पुणेकर पुरस्कार सोहळा शनिवार वाडा येथे आयोजित करण्यात आला. पुणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदर्श पुणेकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले . केदार जाधव (क्रीडा) संदीप मोहिते पाटील (उद्योजक) आनंद पिंपळकर (वास्तू ज्योतिष) डॉ. सतीश देसाई (सामाजिक) ऑड.प्रताप परदेशी (कायदा) पराग करंदीकर (पत्रकार) डॉ अविनाश भोंडवे (साहित्यिक) डॉ अंबरीश दरक (वैदयकीय) विनोद सातव (लीड मीडिया) युवराज शाह (शैक्षणिक) श्री सिद्धिविनायक बिल्डर्स (उद्योग समूह) यांना पुरस्कार महापौर मुक्ता टिळक व श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट चे मा अशोक गोडसे ह्यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. आगामी मराठी चित्रपट मंकी बात,मस्का,लग्न मुबारक सिनेमातील कलाकार प्रार्थना बेहरे संस्कृती बालगुडे सलील कुलकर्णी भार्गवी चिरमुले अनिकेत विश्वासराव अनेक कलावंतांनी नृत्य संगीत सादरीकरण केले. संघटनेचे संस्थापक संकेत गलांडे म्हणाले ,”आम्ही पुणेकर आवाज पुणेकरांचा सेवाभावी संघटने चे प्रथम वर्धापन दिन निमित्त पुणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदर्श पुणेकर पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत. आपल्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटून प्रत्येक पुणेकरांना अभिमानस्पद कामगिरी करून आपली वेगळा आदर्श निर्माण केला त्यांना आम्ही प्रत्येक पुणेकरांचा वतीने सन्मानित करत आहोत ” यावेळी महापौर मुक्ता टिळक श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट चे अशोकराव गोडसे गणेश सातपुते नगरसेविका आरती कोंडरे श्वेता खोसे गलांडे हेमंत बत्ते सतीश मोहोळ योगेश पिंगळे आदी उपस्तीत होते. संस्थापक संकेत गलांडे ,मयुर जगताप, समीर शेख अथर्व दातार ,अक्षय ठोंबरे ,तुषार भोकरे , केतन मोहळ,हर्षित बेडेकर ,शुभम शिंदे , सिद्धार्थ नरवडे, अनिकेत गलांडे यांनी केले


