Home Blog Page 3143

आघाडी होवो अथवा न होवो पुण्याची जागा काँग्रेसच लढवणार-बागवे

पुणे: लोकसभेसाठी मित्रपक्षाने पुण्याच्या जागेवर कितीही हक्क सांगण्याचा प्रयत्न केला तरी ही काँग्रेसची परंपरागत जागा आहे. त्यामुळे ती सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट पुण्याची जागा यावेळी प्रचंड मताधिक्याने जिंकून आणण्याची शपथ आम्ही एकजुटीने घेतली असल्याचे, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या नेत्यांनी  सांगितले.
केंद्रातील मोदी सरकारच्या ४ वर्षांच्या कारकिर्दीच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने येत्या सोमवारी (दि. २८) काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकारांच्या बैठकीत सर्वच नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघावर केलेल्या दाव्याची खिल्ली उडवली. या बैठकीला शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, अ‍ॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, नगरसेवक अविनाश बागवे, लता राजगुरू, संगिता तिवारी, नीता रजपूत, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, कामगार संघटनेचे सुनिल शिंदे, रमेश अय्यर, सुनिल पंडित आदी उपस्थित होते.
बागवे म्हणाले, आघाडी होवो अथवा न होवो पुण्याची जागा काँग्रेसच लढवणार आहे. मोदी सरकारने गेली ४ वर्षे देशातील जनतेची फसवणूक चालवली आहे. वर्षाला २ कोटी युवकांना रोजगार यासारखी आश्वासने देत मोदी सत्तेवर आले मात्र त्यांचा प्रत्येक निर्णय देशासाठी घातक ठरला आहे. नोटाबंदीमुळे उद्योग बुडाले, त्यातून नोकºया गेल्या, शिष्यवृती बंद केल्यामुळे विद्यार्थी दिशाहीन झाले. दुष्काळ संपला तरीही पेट्रोलवर लावलेला कर अजून सुरूच आहे. सर्वच बाबतीत जनतेला आश्वासित करण्यात मोदी सरकारला अपयश आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम भारतीय जनतेला सहन करावा लागतो आहे.
शिवरकर म्हणाले, लोकसभेचा पुणे मतदार संघ हा काँग्रेसचा परंपरागत मतदार संघ आहे. तो आम्ही घटक पक्षाला देऊ शकत नाही. आमच्याकडे सक्षम उमेदवारांची वाणवा नाही. पक्ष देईल तो उमेदवार मान्य करू. गटबाजीचा काय त्रास होतो त्याचा अनुभव पक्षाला आता आला आहे. त्यामुळेच गटबाजी विसरून हा मतदारसंघ परत काबीज करायचाच अशी शपथच नेते मंडळींनी एकत्रितपणे घेतली आहे. मूक मोर्चा सोमवारी सकाळी साडेदहा वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरू होईल व स्वारगेट येथील केशवराव जेधे पुतळ्याजवर विसर्जीत होईल अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

आकर्षक क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

पुणे :दुचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरुन
चारचाकी तसेच दुचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत,असे प्रादेशिक
परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहीत तीनपट शुल्कभरुन
दुचाकी वाहनांसाठी हवे असतील त्यांनी दिनांक28मे 2018 व दुचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्याकरिता कार्यालयीन
वेळेत सकाळी11ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यात अर्ज करावा.
अर्ज प्रादेशिक कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डी.डी,पत्त्याचा पुरावा,ओळखपत्र,पॅनकार्डच्या
साक्षांकित प्रतीसह जमा करावा.डी.डी.R.T.O Pune या नावाने राष्ट्रीयीकृत/शेड्युल्ड बँक,पुणे येथील असणे आवश्यक
आहे.डीडी हा अर्जदाराने स्वत: च्या बँक खात्यातून काढल्याचे हमी पत्र जोडणे आवश्यक आहे.अर्जदाराने अर्जासोबत
फोटो ओळखपत्र,उदा.आधार कार्डकिंवानिवडणूक आयोगाचे ओळखपत्रकिंवापासपोर्टकिंवापॅन कार्ड आदीची
साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.
दुचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरुन राखून ठेवण्याकरीता
एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक 29मे2018 रोजी व दुचाकी वाहनांसाठी सूरु
होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरिता दिनांक 29मे2018 रोजी सकाळी 10.30
वा.कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात येणार आहे.लिलावाकरिता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा
असेल तर त्यांनी त्याच दिवशी दुपारी 3.30वाजेपर्यंत सीलबंद पाकीटात प्रादेशिक कार्यालयात जमा करावा.त्याच
दिवशी दुपारी 4.30वा.सहकार सभागृह,प्रादेशिक परिवहन कार्यालय,पुणे येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व
सहा.प्रादेशिक अधिकारी यांच्या उपस्थित पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून अर्जदाराने विनिर्दीष्ट
शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डी.डी.सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल.राखून
ठेवलेला क्रमांक 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला क्रमांक आपोआप रद्द होईल
व शुल्क सरकारजमा होईल.शुल्क कोणत्याही परिस्थिती परत केले जाणार नाही अथवा समायोजन करता येणार
नाही,असे प्रसिध्दी पत्रकाद्वामध्येनमूद केले आहे.

कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत औद्योगिक ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना

0

राज्यातील 97 हजार ग्राहकांना लाभ घेता येणार

मुंबई

      वीज बिल न भरल्यामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली असून या योजनेत सहभागी होणाऱ्या औद्योगिक ग्राहकांच्या मुळ थकबाकीवरील व्याज व विलंब आकार माफ करण्यात येणार आहे. राज्यात सुमारे 97 हजार 464 औद्योगिक ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल व त्याद्वारे सुमारे 231 कोटीचा व्याज व विलंब आकारावरील सवलत मिळवता येईल.

राज्यातील ज्या औद्योगिक ग्राहकांचा वीजपूरवठा कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला आहे अशा ग्राहकांसाठी महावितरणने दि. 1 जून 2018 ते दि. 31 ऑगस्ट 2018 या तीन महिन्यांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. ज्या वीजग्राहकांचा वीज पुरवठा दि. 31 डिसेंबर 2017 पूर्वी कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला आहे. अशा ग्राहकांनी योजनेच्या पहिल्या महिन्यात मुळ थकबाकीची रक्कम भरल्यास त्यांना 100 टक्के व्याज व विलंब आकाराची सवलत मिळणार आहे. दि. 1 जूलै 2018 ते दि. 31 ऑगस्ट 2018 या दरम्यान ग्राहकाने मुळ थकबाकीची रक्कम व व्याजाची 25 टक्के रक्कम भरली तर उर्वरित 75 टक्के व्याज व 100 टक्के विलंब आकाराची माफी ग्राहकाला मिळणार आहे.

जे न्यायालयीन प्रकरण 12 वर्षापेक्षा अधिकचे असेल व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली असेल तर संबंधित ग्राहकांनी डिक्रीची रक्कम एकाच वेळी पूर्ण भरल्यास त्या ग्राहकाला 100 टक्के व्याजाची माफी मिळणार आहे. तसेच जे न्यायालयीन प्रकरण 12 वर्षेपर्यंतचे आहे व न्यायालयाने डिक्रीची रक्कम दिली आहे. अशा ग्राहकांनी एका टप्प्यात डिक्रीची रक्कम भरल्यास त्यांना 50 टक्के व्याजमाफीची सूट मिळणार आहे. यासर्व प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च संबंधित ग्राहकाला करावा लागणार आहे.

ग्राहकाला थकबाकीची रक्कम रोख /नेटपेमेंट/चेक या माध्यमातून करता येईल. थकबाकीची रक्कम भरल्यानंतर महावितरणच्या नियमानुसार संबंधित ग्राहकाला वीजजोडणी देण्यात येईल. या अभय योजनेत ज्या ग्राहकाला आपल्या थकबाकीच्या रकमेची माहिती घ्यावयाची आहे अशा ग्राहकांनी महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in यावरील ‘AMNESTY SCHEME 2018 या लिंकवर जावून ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट टाकल्यास या योजनेची व ग्राहकाच्या थकबाकीची संपुर्ण माहिती उपलब्ध होईल. या योजनेत दि. 1 जून 2018 पासून ग्राहकांना सहभागी होता येईल. याबाबतचे परिपत्रक महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडीत जास्तीत जास्त औद्योगिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये काँग्रेसचा सिहांचा वाटा-माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके

पुणे-आधुनिक भारताच्या वाटचालीत काँग्रेसचे योगदान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण  मंत्री व काँग्रेस पक्षाचे नेते  वसंत पुरके  यांनी केले . सोमवार पेठमधील संत गाडगे महाराज मठामध्ये पुणे कॅन्टोन्मेट विधानसभा मतदार संघाच्यावतीने आयोजित काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्याच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते . यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी सांगितले कि , २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने  देशाच्या जनतेला अनेक आश्वासने दिली . परंतु , हि सर्व आश्वासने पोकळ ठरली . यु पी ए सरकारच्या कारकिर्दीत देशाच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.  त्यामध्ये माहितीचा अधिकार , शिक्षण हक्क कायदा , अन्नधान्य सुरक्षा व वस्तू सेवा कर कायदा (जी. एस. टी.) असे अनेक कल्याणकारी योजना राबविल्या . स्वत्रंत्र मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले . भाक्रानांगल धरण प्रकल्प , नॅशनल डिफेन्स अकादमी , हिंदुस्थान ऍरनॉटिक्स लिमिटेड , भिलाई स्टील प्लांट , हिंदुस्थान अँटिबायोटिक्स सारखे मोठे प्रकल्प उभारले . स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी गोरगरिबांच्या हितासाठी २० कलमी कार्यक्रम बँकेचे राष्ट्रीयकरण व देशाच्या सुरक्षेसाठी पोखरण अणुचाचणी व १९७१ ला पाकिस्तानशी युध्द जिंकून बांगलादेशची निर्मिती केली . स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशात संगणक क्रांती आणली . विज्ञान , तंत्रज्ञानावर भर दिला . त्यामुळे भारत जगामध्ये नावलौकिक झाले . आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये काँग्रेसचा सिहांचा  वाटा आहे .

यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले कि , पुणे शहराचा विकास काँग्रेस पक्षामुळे झाला आहे . त्यामुळे काँग्रेस पक्षाला गतवैभव आणण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे तसेच पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे . या मतदार संघामधून काँग्रेस पक्षाला मताधिक्य प्राप्त होते . मोदी सरकारच्या राजवटीत सामान्य जनतेला दिलासा मिळालेला नाही . या सरकारमुळे सामान्य लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे . सध्याच्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी  २५२ अध्यादेश काढले . या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्यामुळे शिक्षणाचा विनोद झाला आहे . कर्नाटकाच्या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने घटनेची पायमल्ली केली . सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपनंतर कर्नाटकामध्ये काँग्रेस जनता दलाची सत्ता आली . कर्नाटकामध्ये भाजपने लोकशाहीचा एन्काऊंटर केला आहे . भाजपने देशामध्ये लोकशाहीचे राज्य आणले आहे .

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेशदादा बागवे यांनी सांगितले कि , मोदी सरकारला उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसचा विचार घराघरापर्यंत पोहोचवा . आपापसामधील गटतट मिटवून काँग्रेस पक्षाचे काम जोमाने करा .मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आज शेतकरी शेतमजूर कामगार व गरीब जनता हवालदिल झाला आहे . येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीत जनता बी जे पी ला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही . कार्यकर्त्यांनी मतदारापुढे साठ वर्षात काँग्रेस पक्षाने देशाच्या प्रगतीसाठी केलेले काम पोचवावे . जेणेकरून जनतेमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या बाबतीत विश्वास निर्माण होईल . आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाला निवडून आणतील .

 यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले .

या मेळाव्यास  आमदार अनंत गाडगीळ , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी , अभय छाजेड ,अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल  व्यवहारे ,मनपा गटनेते अरविंद शिंदे , माजी नगरसेवक शिवाजी केदारी , प्रांतिक प्रतिनिधी सदानंद शेट्टी , नीता रजपूत , शानी नौशाद , नगरसेविका लता राजगुरू , सुजाता शेट्टी चाँदबी नदाफ , नगरसेवक रविंद्र धंगेकर  .महाराष्ट्र प्रदेश एन एस यु आयचे अध्यक्ष अमीर शेख पुणे जिल्हा काँग्रेस सरचिटणीस रमेश अय्यर , संगीता तिवारी , नुरुद्दीन सोमजी ,सुजित यादव विठ्ठल थोरात , रशीद खिजर , वाल्मिक जगताप , भगवान धुमाळ , पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा युवक अध्यक्ष साहिल केदारी , भवानी ब्लॉक अध्यक्ष सुनील घाडगे , पुणे स्टेशन ब्लॉक अध्यक्ष मीरा शिंदे , पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉक अध्यक्ष प्रदीप परदेशी , सुनील दैठणकर आदी मान्यवर उपस्थित होते .

या मेळाव्याचे सूत्रसंचालन नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले तर आभार नगरसेवक अजित दरेकर यांनी मानले .

बॅंक ऑफ महाराष्ट्राने वाहतूक पोलिस अधिकार्यांना मदत करण्यासाठी कॅप्स व मास्क वितरीत केले

   पुणे -बँक ऑफ महाराष्‍ट्र तर्फे शिवाजीनगर पोलिस ट्रॅफीक कर्मचा-यांसाठी मास्‍क आणि टोपी भेट देण्‍याचा कार्यक्रम,बँक ऑफ महाराष्‍ट्र पुणे शहर अंचल चे महाप्रबंधक व अंचल प्रबंधक श्री. प्रशांत खटावकर व सहायक पोलिस आयुक्‍त श्री. प्रभाकर ढमाले यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न झाला.

 पुणे शहरामध्‍ये मोठया प्रमाणावर वाहतुकीचे नियम न पाळल्‍यामूळे अपघात घडतात. वाहतुकीच्‍या नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन केले तर अपघातांची संख्‍या खुपच आटोक्‍यात येईल असे हया प्रसंगी सहायक पोलिस आयुक्‍त श्री. प्रभाकर ढमाले यांनी सांगितले.

वाहतुकपोलिस कर्मचारी हे वाहतुकीचे व्‍यवस्‍थापन करताना खुपच खडतर परिस्थितीमध्‍ये काम करतात त्‍यांच्‍या सुविधेसाठी अल्‍प मदत म्‍हणून धुळ आणी उन्‍हाच्‍या स्‍वरक्षणासाठी मास्‍क व टोपी देत आहोत असे बँक ऑफ महाराष्‍ट्र पुणे शहर अंचल चे महाप्रबंधक व अंचल प्रबंधक श्री. प्रशांत खटावकर यांनी याप्रसंगी मनोगत व्‍यक्‍त केले.याप्रसंगी महाबँकेचे सहायक महाप्रबंधक श्री. अनिल गर्दे, पोलिस निरीक्षक श्री. शिंदे तसेच शिवाजीनगर ट्रॅफीक ऑफीसचे कर्मचारी व बँक ऑफ महाराष्‍ट्रचे कर्मचारी उपस्थित होते.

6व्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत सेल २ वर्ल्ड संघाला विजेतेपद

पुणे: स्पोर्टीलव व महाराष्ट्र क्रीडा यांच्या तर्फे 6व्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत  सेल २ वर्ल्ड   संघाने फुजीस्तु संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लवळे क्रिकेट मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात हर्षद शोखच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर  सेल २ वर्ल्ड संघाने फुजीस्तु संघाचा 8 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिल्यांदा खेळताना  हर्षद शोखच्या अचूक गोलंदाजी  पुढे फुजीस्तु संघ 9 षटकात 7 बाद 16 धावांत गारद झाला. 16 धावांचे लक्ष राजिंदर पानेसरच्या नाबाद 10 तर प्रतिक हर्षेच्या नाबाद 12 धावांसह  सेल २ वर्ल्ड संघाने केवळ 3.4 षटकात 1 बाद 17 धावांसह पुर्ण केले. हर्षद शेख सामनावीर ठरला.

विजेत्या  सेल २ वर्ल्ड संघाला करंडक व 35,000/- तर उपविजेत्या फुजीस्तू संघाला करंडक व 20,000/- व मालीकावीर   नितिन चौधरीला 5000/- अशी पारितोषिके देण्यात आली.  स्पर्धेचे पारितोषिक वितरण सिंबायोसीस स्कुल ऑफ कलिनरी आर्टसे संचालक अतुल ए गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:  फुजीस्तु: 9 षटकात 7 बाद 16 धावा(मधु कामत 17, हर्षद शोख 3-12) पराभुत वि सेल २ वर्ल्ड – 3.4 षटकात 1 बाद 17 धावा(राजिंदर पानेसर नाबाद 10, प्रतिक हर्षे नाबाद 12, नितिन चौधरी 1-6) सामनावीर- हर्षद शेख

सेल टू वर्ड संघाने 8 गडी राखून सामना जिंकला. 

इतर पारितोषिके:

सर्वोत्कृष्ट फलंदाज: अक्षय गवळी (सेल टू वर्ड)

सर्वोत्कृष्ट गोलंदाज: प्रतिक हर्षे  (सेल टू वर्ड)

भाजप नेते फुकनाळे-वसंतराव पुरकेंच्या भाषणाला जोरदार दाद (व्हिडीओ)

पुणे- आम्ही चळवळ ,योगदान  आणि ज्ञानेश्वर,तुकाराम,गाडगे महाराज अशा अनंत संतांची कास धरली .. आणि या फुकनळ्यांनी राम रहीमसारख्या साधूंची  पूजा केली . आम्ही समतेची,मानवतेची विज्ञानाची कास धरली ,यांनी …हिंदुत्वराष्ट्र आणि चमत्कारांची कास धरली .. कॉंग्रेसला ६० वर्षे दिली ,मला ६० महिने तर देवून पहा .. असे सांगणाऱ्या चमत्कारांच्या भाकड गर्जनांवर विश्वास ठेवू नका असे सांगत कॉंग्रेस चे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी मोदींसह भाजपच्या नेत्यांवर जोरदार तर केलीच पण त्या बरोबर  कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना हि आज खडे बोल सुनावले .. पुरकेंच्या वकृत्वाच्या  विनोदी शैलीने कॉंग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांना जोरदार दाद दिली .
पुणे कॅटोंमेंट विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते . माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ,अनंतराव गाडगीळ ,शहराध्यक्ष रमेश बागवे ,मोहन जोशी, कमल व्यवहारे ,अभय छाजेड,अविनाश बागवे ,अरविंद शिंदे, अजित दरेकर,नीता परदेशी,संगीता तिवारी, विठ्ठल थोरात ,वाल्मिक जगताप ,रमेश अय्यर ,एडविन रोबर्ट,माधवराव बारणे,मधुकर चांदणे आदी यावेळी उपस्थित होते .
पंडित नेहरू ,लालबहादूर शास्त्री,इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशाची कशी प्रगती केली .. देशात काय होते आणि काय बदल कॉंग्रेस ने केला ,या सर्वांचे देशासाठी योगदान काय ? हे सांगत पुरके म्हणाले फुकनळ्यांनी ठोकलेल्या चमत्काराच्या गर्जनांवर  तुम्ही विश्वास ठेवला . आता काळ बदलला आहे . नेहरुंनंतर देखील २०/२५ वर्षे  वर्षे दगडे उभी केली तरी लोक निवडून देत होते .पण आता इतिहासाच्या आधारावर  तुम्हाला लढता येणार नाही .तुम्हाला इतिहास निर्माण करावा लागेल आणि २०१९ च्या निवडणुकीच्या माध्यमातून तो घडविण्याची संधी आहे .कार्यकर्त्यांनी पराकाष्ठा केली पाहिजे .तिकिटे दिली तर कॉंग्रेस नाही तर विरोधात खेचा खेची हे धोरण ताबडतोब थांबविले पाहिजे . कॉंग्रेसने तुम्हाला खूप काही दिले पण आता कॉंग्रेस वाचेल तर देश वाचेल अशी स्थिती आहे . तेव्हा भाकड गर्जनांना तिलांजली देवून देशासाठी काही करायची तयारी म्हणून कामाला लागा असे ते म्हणाले …. नेमके पुरके यांनी काय म्हटले ते पहा आणि ऐका …
(संपर्ण भाषण नाही एडीटेड)

‘मस्का’चा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दिमाखात संपन्न

सस्पेन्स, थ्रिलर ‘मस्का’ १ जुन रोजी होणार प्रदर्शित

धम्माल विनोदासह सस्पेन्स आणि थ्रीलरचा तडका असलेल्या अमोल जोशी प्रोडक्शन्स व स्वरूप रिक्रीएशन्स  अँड  मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि मोरेश्वर प्रॉडक्शन्स  निर्मित आगामी ‘मस्का’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबई येथे दिमाखदार सोहळ्यात मोठ्या उत्साहात पार पडला.

अभिनेता, नाट्य दिग्दर्शक अशी ओळख असलेला प्रियदर्शन जाधव ‘मस्का’ मधून चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. या सोहळ्याला अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, अनिकेत विश्वासराव, चिन्मय मांडलेकर, प्रणव रावराणे, शशांक शेंडे आणि विद्याधर जोशी, संगीतकार चिनार आणि महेश, गायक महालक्ष्मी अय्यर, अवधूत गुप्ते, गणेश चंदनशिवे, गीतकार मंगेश कांगणे, व्हीडीओ पॅलेसचे नानूभाई सिंघानीया ,  निर्माते प्रशांत पाटील, प्रस्तुतकर्ते सचिन नारकर, विकास पवार, आकाश पेंढारकर, विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

‘मस्का’ चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये अनिकेत विश्वासराव हा काहीसा हतबल दिसत असून शशांक शेंडे हे कधी चिंतीत तर कधी नाट्यमय प्रसंगात दिसत आहेत, तर प्रणव रावराणे हा एका स्पेशल चाईल्ड असल्याचे दिसते. तसेच चिन्मय मंडलेकर पहिल्यांदाच विनोदी शैलीत दिसणार आहे, आजवर अनेक चित्रपटातून सोज्वळ भूमिका साकारणारी अभिनेत्री .प्रार्थना बेहेरे प्रथमच हटके अशा बोल्ड अंदाज मध्ये पडद्यावर आपल्याला बघायला मिळेल. तिचा हा हटके अंदाज सर्वांनाच भुरळ पाडतोय.

चित्रपटाच्या ट्रेलर सोशल मिडीयावर उत्तम प्रतिसाद मिळाला असून ‘मस्का’ चित्रपटातील गाणी देखील अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. गणेश चंदनशिवे यांनी गायलेले ‘बया’ गाणे तरुणाईने चांगलेच डोक्यावर घेतले आहे तर ‘चला पटकन पकडा पोकेमॉन’ या गाण्याचीही तरुणाईला भुरळ पडल्याचे दिसते.

मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित, अमोल जोशी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप रिक्रिएशन्स अँड मिडिया प्रा. ली. प्रस्तुत ‘मस्का’ चे प्रशांत पुरुषोत्तम पाटील निर्माते आहेत, तर प्रस्तुतकर्ता सायली जोशी,सचिन नारकर, विकास पवार आणि सह प्रस्तुतकर्ता आकाश पेंढारकर आणि विनोद सताव आहेत. अत्यंत हटके विषयावरील सस्पेन्स, थ्रीलर आणि कॉमेडी असा मनोरंजनाचा फुल टू तडका असलेला ‘मस्का’ हा चित्रपट येत्या १ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अंध जोडप्यानी लुटला अधिकमासातील धोंड्याचा आनंद व पाहुणचार

पुणे- – चौरंगाभोवती  आकर्षक फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी … सनईचे मंजूळ सूर …आणि  सासरंचकडचा आग्रह…अशा वातावरणात  विवाहित अंध जोडप्यानी आज दुपारी कस्तुरे चौकातील श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात अधिकमासानिमित्त धोंड्याचा आनंद लुटला .
गणेश पेठेतील श्री काळभैरवनाथ तरुण मंडळाने हा अनोखा योग जुळवून आणला. वाघोली येथील लुई ब्रेल अंध अपंग संस्थेतील हि जोडपी होती . आज मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सासरची भूमिका बजावली . त्यांनी आपल्या पाहुणे म्हणून आलेल्या जावयांचा व मुलीचा पारंपरिक व धार्मिक पद्धतीने खास सन्मान केला .
आज दुपारी १२ वाजता या संस्थेतील पांच जोडप्यांचे आगमन झाले . त्यांचे खास स्वागत केल्यानतर  विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दुपारची आरती करण्यात आली  त्यानंतर लुई ब्रेल संस्थेचे संस्थापक श्री अर्जुन कंधारे व त्यांची पत्नी सौ नूतन होळकर , नवनाथ गाडे व त्यांची पत्नी निर्मला , सोमनाथ गायकवाड व त्यांची पत्नी सुमित्रा , योगेश वाघमारे आणि त्यांची पत्नी संगीता  व शिवाजी शिंदे आणि त्यांनी त्यांची पत्नी नंदा यांची मंडळाचे कार्यकर्ते  व प्रमुख पाहुण्यांनी पूजा केली त्यानंतर पोशाख , साडी चोळी , चांदीच्या जोडव्या ,तांब्याची भांडी , ताट वाटी ,अनारसे ताम्हण निरंजन देऊन खास सन्मान करण्यात आला  त्यानंतर आमरस पुरी , भाजीचा भोजनाचा आस्वाद घेण्यात आला . .
याप्रसंगी श्री लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, तुळशीबाग मंडळाचे नितीन पंडित , कुमार रेणुसे , पियुष शाह शाहीर हेमंत मावळे , सामाजिक कार्यकर्ते आंनद सराफ ,व त्यांचा पत्नी कल्याणी सराफ , सौ . विजया पवार , सौ संगीता  मावळे आदींच्या हस्ते या अंध जोडप्यांना धोंड्यांचा खास सन्मान करण्यात आला .
या उपक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष चेतन शिवले , उमेश सपकाळ , सागर पवार , विकास शिवले , शिवाजी महाडिक , सुरज आणवेकर , ओंकार सपकाळ आदी कार्यकर्त्यांनी या अनोख्या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले .
या उपक्रमाविषयी बोलतांना  लुई ब्रेल संस्थेचे संस्थापक अर्जुन कंधारे म्हणाले कि , हा आमच्या आयुष्यातील वेगळा आनंद आहे , आजपर्यंत अधिकमासानिमित्त धोंड्याचा सन्मान कुणी केला नव्हता . हा योग  आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच येत आहे .

पेट्रोल दर वाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे-

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुणे शहराच्या कसबा मतदारसंघाच्यावतीने पेट्रोल दर वाढीच्या विरोधात  शहराध्यक्ष
तथा खासदार वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अभिनव चौक येथे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष तथा खासदार वंदना चव्हाण भाजप सरकारच्या दरवाढीबद्दल निषेध व्यक्त करताना
म्हटल्या, “गेले ३-४ वर्षे सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढीला भारतीय नागरीकांना सामोरे जावे लागत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरेल इंधनाचा दर कमी असताना वा काही प्रमाणात स्थिर असताना देखील
ही दरवाढ रोखण्यात भाजप सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. त्यामुळे सर्वात अधिक दराने इंधन
उपलब्ध होत असल्याचा नविन विश्व विक्रम भारत देश प्रस्थापित करेल यात मात्र शंका नाही. दुसरया
बाजूने विचार करता, इंधन पुरवठा करणारया देशांमध्ये युध्दजन्य परिस्थिती असताना भविष्याचा वेध
घेऊन मुबलक इंधनाची तरतूद करणे आवश्यक असताना देखील केंद्रपातळीवरून याबाबत कोणतेच
नियोजन करण्यात आले नाही हेच या सत्ताधारयांचे अपयश आहे.” सत्ताधार्यांचा खरपूस समाचार घेताना पुढे
म्हटल्या, “आज वाचनात आले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेगळेच तारे तोडले आहे ते म्हटले ही
इंधन दरवाढ रोखायची असल्यास विविध कल्याणकारी योजना बंद कराव्या लागतील. असे विधान केले
म्हणजे पुन्हा एकदा हे सरकार सामान्य नागरिकांच्या कल्याणाच्या विरोधात आहे.सातत्याने होत असलेली
दरवाढ ही सामान्य नागरिकांच्या एकूण बजेटवर प्रतिकूल परिणाम करणारी आहे आणि म्हणूनच सामान्य
नागरिकांची चालेली आर्थिक परवड थांबावी यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने संपुर्ण
शहरात विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आंदोलन नियोजन केले आहे. त्यानुसार कॅंन्टोमेंट,पर्वती
विधानसभा मतदारसंघात आंदोलन करण्यात आले व उर्वरित मतदारसंघात उद्या दिवसभरात हे आंदोलन
होणार आहे” अशी माहिती वंदना चव्हाण यांनी दिली .
यावेळी माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर, शहर उपाध्यक्ष अशोक राठी, सुनिल खाटपे,स्वप्निल खडके,
युवती अध्यक्ष मनाली भिलारे, युवक अध्यक्ष राकेश कामठे, विपुल म्हैसुरकर, नितीन जाधव, युसुफ शेख,
रजनी पाटील, तोष बेंद्रे, धनश्री गायकवाड, मृणाली वाणी व तसेच कसबा मतदारसंघाचे पदाधिकारी व
कार्यकर्त्ये उपस्थित होते.

घरकुल योजनेतील सर्व कामांना प्राधान्य द्यावे-विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर

पुणे- सर्व घरकुल योजनांमधुन लाभार्थ्यांना लाभ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी घरकुल योजने अंतर्गत चालु असणाऱ्या सर्व बांधकामाकडे लक्ष द्यावे तसेच वंचित लाभार्थ्यांना देखील तातडीने घरे मिळतील यासाठी प्राधान्य देऊन  काम करावे अशा सूचना विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी दिल्या.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात घरकूल योजनांच्या संबंधीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण चे संचालक धनंजय माळी तसेच पुणे विभागातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.

श्री. म्हैसेकर म्हणाले, सर्व घरकुल योजनांच्या अंतर्गत 2016-17 सालच्या घरकुलाच्या बांधकामांची सूरुवात झाली किंवा मंजूरी मिळाली अशा घरकुलांची अपूर्ण कामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करा. तसेच काही कारणास्ताव जर घर रद्द करण्यात आले असेल तर संबंधीतांनी दिलेले पहिले हफ्ते देखील परत घ्या. प्रलंबित कामांमध्ये सुधारणा न झाल्यास संबंधीतांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या तसेच सोलापूर व सातारा जिल्ह्यातील उत्कृष्ट कामासाठी श्री. म्हैसेकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन देखील केले.

यावेळी त्यांनी इंदिरा आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी, पारधी आवास योजना, तसेच पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य योजना अशा विविध केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांचा आढावा घेताला.

देशभरात आवास योजना सप्ताह साजरा करावा

क्रेडाई महाराष्ट्राचे पंतप्रधान कार्यालयास विनंती पत्र

पुणे- ‘सबका साथ, सबका विकास’ याप्रमाणे २०२२ पर्यंत ‘सबको निवास’ हे ध्येयही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केले आहे. या ध्येयपूर्तीसाठी क्रेडाई महाराष्ट्राने सक्रीय पुढाकार घेतला असून या योजनेच्या जनजागृतीसाठी देशभरात ‘प्रधानमंत्री आवास योजना सप्ताह’ साजरा करावा, अशी विनंती करणारे पत्र पंतप्रधान कार्यालयास त्यांनी सुपूर्त केले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी क्रेडाईने याआधी केंद्र व राज्य सरकारशी सामंजस्य करार केला आहे. परंतु, या महत्वाकांक्षी योजनेच्या पूर्ततेसाठी विकसक आणि नागरिक यांच्यात जनजागृती होणे आवश्यक आहे. या उद्देश समोर ठेऊन क्रेडाईने जागतिक पर्यावरण दिनापासून (५ जूनपासून) पुढील आठवडा ‘प्रधानमंत्री आवास योजना सप्ताह’ म्हणून देशभरात साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला आहे.

ते पुढे म्हणाले की, अतिशय व्यापक दृष्टिकोनातून आम्ही या सप्ताहाकडे बघत असून परवडणारी घरांच्या  निर्मितीसाठी विकसकांना प्रोत्साहित करणे हा आमचा प्रमुख हेतू आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त सहकार्याने विविध उपक्रम राबविण्याचा आमचा मानस देखील आहे. यामध्ये नावीन्यपूर्ण रचनांची निर्मिती करणारे वास्तू विशारद तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने किफायतशीर प्रकल्प साकारणारे बांधकाम व्यावसायिक यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करणे, प्रसार माध्यमाच्या साहाय्याने सप्ताहाविषयी जनजागृती करणे, प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रदर्शन भरविणे, विकसक, तंत्रज्ञ यांच्यात उत्साह प्रस्थापित करण्यासाठी स्पर्धा घेणे, आवास योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणाऱ्या शहरास अथवा राज्यास उत्कृष्ठ कामगिरीचा पुरस्कार देणे आदी  नावीन्यपूर्ण उपक्रम आपण राबवू शकतो, ज्यायोगे परडवणाऱ्या घरांचे स्वप्न आपण संयुक्तिक प्रयत्नातून अल्पावधीत पूर्ण करू शकतो, असे आम्ही पत्रात नमूद केले असल्याचेही शांतिलाल कटारिया यांनी सांगितले आहे.

भारतात दररोज 174 बालके हरवतात, त्यातील निम्म्या बालकांचा पत्ता लागत नाही

0

(बालक व बालकाच्या कुटुंबाची ओळख गुप्त राखण्यासाठी नावे बदलली आहे)

नवी दिल्ली: अपरात्री आलेला फोन कॉल अगदी क्वचित कधी चांगली बातमी देणारा असतो. एमोल* कुटुंबाने घेतलेला अनुभव धक्कादायक होताच, शिवाय त्यांचे आयुष्य कायमचे बदलून टाकणारा होता. महिनाभरापूर्वी, त्यांची मुलगी ज्युली* हिला परदेशातून नोकरीची संधी आली होती व त्यामुळे हे कुटुंब अतिशय आनंदात होते. नोकरी देणाऱ्य एजन्सीने तिला व अन्य सात मुलींना निवडले होते. या कुटुंबाला उज्वल भविष्याची उत्सुकता लागली होती. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती घातक, अंधकारमय व चिंताजनक असेल, याची त्यांना तेव्हा कल्पनाही नव्हती. ज्युली व अन्य मुलींना म्यानमारला नेण्यात आले व तेथे त्यांची ओळख बदलून टाकण्यात आली. तेथून त्यांना सिंगापूरला नेण्यात आले. आपण नेमके कोठे जाणार आहोत, हे माहीतच नसल्याचे या मुलींच्या लक्षात आले. नशिब बलवत्तर म्हणून कदाचित या मुलींना सिंगापूरला जात असताना यानगॉन येथील एका हॉटेलमध्ये राहण्याची सक्ती करण्यात आली व सुदैवाने तेथून ज्युलीला घरी फोन करण्याची संधी मिळाली.

मणिपूरमधील चुराचंदपूर जिल्ह्यातील डोंगराळ भागातील घरात राहणाऱ्या तिच्या कुटुंबियांना काहीच कल्पना नव्हती. त्यांनी तातडीने मणिपूर अलायन्स फॉर चाइल्ड राइट्स (एमएसीआर) या राज्यातील बालकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या व क्राय – चाइल्ड राइट्स अँड यू संस्थेचा पाठिंबा असलेल्या संस्थेच्या सदस्याशी संपर्क साधला.

स्थानिक पोलिस विभाग, राज्य पोलिसांचे विशेष तपास पथक यांनी तातडीने उचललेली पावले व भारतीय दूतावास, राज्य सरकार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व यानगॉन पोलिस यांचे प्रचंड सहकार्य यामुळे बालकांची म्यानमार येथून सुटका करण्यात आली व सहा व्यक्तींना अटक करण्यात आली.

याविषयी बोलताना, मणिपूर कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सचे (एमसीपीसीआर) सदस्य केशम प्रदिपकुमार यांनी सांगितले, “मणिपूरमध्ये सीमेपलीकडे मोठ्या प्रमाणात ह्युमन ट्रॅफिकिंग होत आहेच, शिवाय गुन्हा करत असताना सोपा ट्रान्झिट मार्ग म्हणूनही या राज्याकडे पाहिले जात आहे. बालकांना लक्ष्य करणे सोपे जाते. राज्यापुढे हा निश्चितच एक ज्वलंत प्रश्न आहे.”

“माझा जणू पुनर्जन्म झाला. मी अजूनही भीतीच्या सावटाखाली असले तरी मी माझ्या कुटुंबाकडे पुन्हा परत येऊ शकले, हे माझे सुदैव आहे. प्रत्येक जण माझ्यासारखा नशीबवान नसतो. अनेक जण बेपत्ता होतात व त्यांचा काहीच ठाव लागत नाही,” असे ज्युली म्हणाली.

दुर्दैवाने, ज्युलीचे म्हणणे खरे आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी) अहवालाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार व गृह मंत्रालयाने (एमएचए) संसदेत दिलेल्या माहितीनुसार (LS Q NO. 3928, 20-03-2018), 2016 या वर्षापर्यंत एक लाखाहून अधिक बालके (खरा आकडा 1,11,569) हरवली असल्याची नोंद करण्यात आली आहे व वर्षाअखेरीपर्यंत त्यापैकी 55,625 बालकांचा काहीच पत्ता लागलेला नाही. थोडक्यात सांगायचे तर, भारतात 2016 मध्ये दररोज 174 बालके हरवली आणि त्यापेक्षा चिंतेची बाब म्हणजे, त्यापैकी केवळ निम्मी बालके त्याच कालावधीत परत आली (MHA – 2016). दहाच्या प्रमाणानुसार विचार केल्यास, 2016 पर्यंत हरवलेल्या प्रत्येका दहामधील पाच बालके अद्यापही बेपत्ता होती.

एमएचएने जाहीर केलेल्या आकडेवारीच्या अधिक विश्लेषणातून समोर आले की, देशातील सर्व बेपत्ता बालकांपैकी निम्म्याहून अधिक बालके केवळ पाच राज्यांमधली आहेत, ती राज्ये आहेत – पश्चिम बंगाल, दिल्ली यूटी, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व बिहार. 2016 मधील, देशातील सर्व बेपत्ता बालकांपैकी तब्बल 15.13% प्रमाण नोंदवून पश्चिम बंगाल पहिल्या स्थानावर आहे, तर दिल्ली यूटीमधील प्रमाण त्याच कालावधीत 13.14% होते. भारतातील बेपत्ता बालकांमधील अनुक्रमे 10.8%, 8.9% व 5.2% बालके अनुक्रमे मध्य प्रदेश, महाराष्ट्र व बिहार या राज्यांतील आहेत.

बेपत्त बालकांचा संघटित गुन्ह्यांशी असलेल्या निकटच्या संबंधाविषयी माहिती देताना, क्राय – चाइल्ड राइट्स अँड यूच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा मरवाहा यांनी सांगितले, “बालके बेपत्ता होतात व आण त्यांना परत आणू शकत नाही, ही बाब अस्वस्थ करणारी आहे. यासंदर्भातील पुरावे व आकडेवारी सांगते की, बेपत्ता असलेल्या अनेक बालकांचे खरे तर ट्रॅफिकिंग झालेले असते, अपहरण किंवा त्यांना पळवून नेलेले असते.”

भारताने स्वाक्षरी केलेल्या, ट्रॅफिकिंगवरील ऑप्शनल प्रोटोकॉलमध्ये म्हटले आहे की, ट्रॅफिकिंग हा एक संघटित स्वरूपाचा गुन्हा आहे. शस्त्रे व अमली पदार्थ यानंतर, विविध देशांमध्ये ट्रॅफिकिंगच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात बेकायदा व्यापार केला जातो. भारतही यास अपवाद नाही, कारण अवयव व्यापार व बालकामगार यापासून व्यावसायिक लैंगिक शोषण इथपर्यंत विविध कारणांसाठी शोषण करण्याच्या हेतूने बालके संपादित करण्यासाठी व वापरण्यासाठी विस्तृत व कमी जोखमीची बाजारपेठ असा दर्जा भारताला झपाट्याने मिळत आहे. “दोन तितकच्याच सक्षम कारणांमुळे भारतात बालकांचे अपहरण व ट्रॅफिकिंग वाढते आहे – यातील बळी अठरा विश्व दारिद्र्य सहन करत असतात आणि मध्यस्थ व ट्रॅफिकर यांना आर्थिक चालना देईल अशी घाणेरड्या, घातक व कठीण सेवांना मागणी वाढते आहे,” असे पूजा यांनी सांगितले.

आता, ट्रॅफिकिंग ऑफ पर्सन्स (प्रिव्हेन्शन, प्रोटेक्शन अँड रीहॅबिलिटेशन) विधेयक, 2018 आता प्रगतीपथावर असल्याने, तसेच ट्रॅकचाइल्ड, ऑपरेशन स्माइल व मुस्कान असे सरकारी उपक्रम बेपत्ता मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याने, ही समस्या तातडीने व चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी देशात ठोस पावले उचलली जातील, याची अपेक्षा करायला हरकत नाही.पूजा यांनी सांगितले, “एकीकडे, समाजाला मोठ्या प्रमाणात पोखरणाऱ्या व विविध स्वरूपातल्या वंचितपणाची कारणे शोधणे अतिशय गरजेचे आहे, तर दुसरीकडे, हरवलेल्या बालकांना शोधून पुन्हा घरी आणण्यासाठी आपण वापरत असलेल्या पद्धतींमध्ये व प्रयत्नांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे – राज्यांतर्गत व आंतरराज्य समन्वय साधणे, सुटका करणे व पुनर्वसन करणे यासाठी व्यवस्था निर्माण करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक स्तरावर पुरेशी संसाधने व प्रशिक्षित कर्मचारी यांची तरतूद करण्यासाठी गुंतवणूक करणे. एखादे बालक बेपत्ता झाल्याने केवळ बेपत्ता बालकांची संख्या वाढत नसून, एक बालपण हरवले जाते, एक अनुभव हरवतो व बालकाच्या जवळच्या व्यक्तींना अविस्मरणीय क्षण हरवावे लागतात.”

क्राय – चाइल्ड राइट्स अँड यू (पूर्वीचे नाव चाइल्ड रीलिफ अँड यू) या भारतीय एनजीओच्या मते प्रत्येक बालकाला बालपणाचा अधिकार आहे – जगणे, शिकणे, वाढणे आणि खेळणे. गेली 40 वर्षे, 20 लाखांहून अधिक वंचित बालकांच्या जीवनात कायमस्वरूपी बदल घडवून आणण्यासाठी क्राय आणि क्रायचे भागीदार पालक व समुदायांसोबत काम करत आहेत. अधिक माहितीसाठी पाहा www.cry.org.

अधिक माहितीसाठी संपर्क : अभिक भट्टाचार्य, मीडिया अडव्होकसी, क्राय,  abhik.bhattacharya@crymail.org / +91 90516 68304

 

ठणकावून सांगतो ; पुण्याच्या लोकसभेची जागा कॉंग्रेसचीच -हर्षवर्धन पाटील

पुणे- दोन तीन वेळा वर्तमान पत्रातून वाचले, म्हणून खुलासा करतो ;ठणकावून सांगतो , पुण्याच्या लोकसभेची जागा हि कॉंग्रेसचीच आहे ,आणि कॉंग्रेसच ती लढवणार आहे …पुण्याचा आज जो काही विकास झाला तो कॉंग्रेसनेच केला आहे असा स्पष्ट इशारा आज माजी मंत्री आणि पुण्याचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी येथे दिला .
पुणे कॅटोंमेंट विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते . शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सर्व समाजाला बरोबर घेवून कॉंग्रेसचे मजबूत संघटन येथे केले आहे . पुण्यातील आठ हि विधानसभा मतदार संघात विजय मिळवीत असताना या मतदार संघातून बागवेंच्या रूपाने सर्वाधिक मताधिक्याने येथून विजय मिळविण्याचे सुतोवाच हि यावेळी त्यांनी केले .माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्या भाषणाचे कौतुक करीत ते म्हणाले पुरके साहेब तुमच्या सारख्यांचे मार्गदर्शन आज कार्यकर्त्यांना होणे गरजेचे आहे .
मोहन जोशी, कमल व्यवहारे ,अभय छाजेड,अविनाश बागवे ,अरविंद शिंदे, नीता परदेशी,संगीता तिवारी, विठ्ठल थोरात ,एडविन रोबर्ट,माधवराव बारणे,मधुकर चांदणे आदी यावेळी उपस्थित होते .
नेमके काय म्हणाले …हर्षवर्धन पाटील ते ऐका त्यांच्याच शब्दात ….

सभागृहनेत्यांच्या वक्तव्याने बदनामी :कॉंग्रेस गटनेत्याचा पोलिसात तक्रारअर्ज

पुणे :सभागृह्नेत्यांनी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात केलेल्या वक्तव्याने आपली बदनामी झाली असून याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज कॉंग्रेसचे गटनेते यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांच्याकडे दिला आहे .

सोमवारी झालेल्या महापालिकेतील सर्वसाधारण सभेत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यात बाचाबाची बघायला मिळाली. यावेळी भीमाले यांनी रौद्ररूप धारण केले होते.त्यानंतर महापौर मुक्ता टिळक आणि इतर गटनेत्यांनी हस्तक्षेप केल्यावर हा वाद संपले असं वाटत असताना नवे वळण मिळाले आहे. शिंदे यांनी भाजप गटनेत्याने माझी बदनामी केली असून त्यांच्यावर अब्रू नुकसानी केल्याबद्दलचा गुन्हा दाखल व्हावा असे पत्र शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिले आहे. त्यामुळे केवळ राजकीय आखाड्यात दिसणारे हे भांडण कायदेशीर लढाईत बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिंदे यांना इतर पक्षांनीही साथ दिली असून मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी तर महापौरांना पत्र लिहिले आहे. त्यात राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो. पण सभागृहनेत्यांची वागणूक कायम आम्हा गटनेत्यांसोबत वादाची राहिली आहे. जर आमचे काही चुकत असेल तर चुका दाखवा आम्ही माफी मागू असेही त्यांनी नमूद केले आहे.

याशिवाय माजी महापौर अंकुश काकडे यांनीही या वादात उडी घेतली असून भिमाले यांच्या वागण्याचा निषेध केला आहे. त्यांनी महापौरांना लिहिलेल्या पत्रात सभागृह नेता हा सर्व सभासदांचा नेता असतो. मोठ्या भावाप्रमाणे त्याची वागणूक असायला हवी असे म्हटले आहे.संभाजी ब्रिगेड संघटनेनेही सभागृह नेत्याची असभ्यता सुसंस्कृत पुण्यात खपवून घेतली जाणार नाही या आशयाचे पत्र आयुक्तांना दिले आहे. शिंदे यांच्या विरोधात पुरावे नसतील तर भिमाले यांनी सभागृहाची माफी मागावी. असे झाले नाही तर त्यांच्या विरोधात महापौर आणि आयुक्तांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी यात करण्यात आली आहे.