Home Blog Page 3132

एलएनटी फायनान्सच्या १०००व्या मीटिंग सेंटरचे उद्घाटन – तात्काळ कर्ज मंजूर करणाऱ्या अॅपचे अनावरण

देशभरातील १४ राज्यांमध्ये कार्यान्वित

 मुंबई : सूक्ष्म कर्जाच्या व्यवसायासाठी एलएनटी फायनान्सने (एलटीएफ) पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे १०००व्या मीटिंग सेंटर सुरू केले आहे. एलटीएफ ही भारतातील आघाडीची नॉन-बँकिंग वित्तीय सेवा कंपनी (एनबीएफसी) असलेल्या एलएनटी फायनान्स होल्डिंगची (एलटीएफएच) उपकंपनी आहे. एलटीएफने गेल्या दोन महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये १४ नवी मीटिंग सेंटर्स सुरू केली आहेत. त्यामुळे या राज्यात एलटीएफच्या सेंटर्सची संख्या १२६वर पोहोचली आहे.

याशिवाय, कंपनीने एक अॅपचे अनावरण केले असून याद्वारे ग्राहकांना सहजपणे तात्काळ कर्ज मंजूर करून देण्यात येणार आहे. कर्ज मंजुरी, गट स्थापना, ई-स्वाक्षरी, पावती देणे, रिस्क ऑडिट यासारख्या विविध प्रकारच्या सेवा ग्राहकांना सुलभरीत्या देण्यासाठी सूक्ष्म कर्ज व्यवसाय डिजिटल करण्यात आला आहे.

३१ मार्च २०१८ला संपलेल्या वित्तीय वर्षात एलटीएफकडे ७.५४९ कोटी रुपयांच्या सूक्ष्म कर्जांची मागणी झाली. त्यात ५७,५०० गावांतील सुमारे ३८.२ लाख महिलांचा समावेश आहे. देशाच्या इतर भागातही जलदगतीने सूक्ष्म कर्ज व्यवसायाचा विस्तार करण्यास एलटीएफने सुरुवात केली असून २०१८ या आर्थिक वर्षात एलटीएफने तीन राज्यांत कामकाजास सुरुवात केली आहे. २०१८ या अर्थिक वर्षात एलटीएफने एकूण ७२१४ कोटी रुपयांच्या कर्जांचे वाटप केले असून यापैकी सुमारे ३० टक्के व्यवसाय हा या कालावधित सुरु केलेल्या नव्या मीटिंग सेंटरच्या माध्यमातून मिळाला आहे. उत्पन्न मिळवून देणाऱ्या साधनाची उभारणी करण्यासाठी महिला उद्योजकांना एलटीएफ पाठबळ देते. कंपनी दर महिन्याला साधारणपणे ३ लाख ग्राहकांना अशी संधी उपलब्ध करून देते.

मीटिंग सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामीण वित्तपुरवठा आणि मुख्य मनुष्यबळ अधिकारी श्री. सुनील प्रभुणे म्हणाले की, `१०००व्या मीटिंग केंद्राचे उद्घाटन म्हणजे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. बँकेपासून अद्याप दूर असलेल्या ग्राहकांपर्यंत पोहचण्याचे आमचे धोरण असून त्याचदृष्टीने आम्ही नव्या-नव्या भागात सातत्याने स्वत:चे अस्तित्त्व निर्माण करीत आहोत.`

श्री. प्रभुणे पुढे म्हणाले की, `ग्राहकांना सुखद अनुभव देण्याबरोबरच डिजिटल सेवा आणखी सक्षम करण्याची भूमिका हे नवे अॅप सुरू करण्यामागे आहे. ग्रामीण भागातील लोकांना शाश्वत असे उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सतत नवीन-नवीन उपाययोजना पुरवितो.`

तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, आसाम, बिहार, छत्तीसगढ, त्रिपुरा आणि झारखंड या १४ राज्यांमध्ये एलटीएफची मीटिंग सेंटर्स आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विश्लेषणावर आधारित व्यवसायनिर्मिती आणि मजबूत असे रिस्क गव्हर्नन्स फ्रेमवर्क याच्या जोरावर कंपनी भारतातील आघाडीची सूक्ष्म कर्ज पुरवणारी कंपनी बनली आहे.

 

एलएनटी फायनान्स होल्डिंग्स लिमिटेड (एलटीएफएच) कंपनीची माहिती –

एलटीएफएच ही नॉन-बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस होल्डिंग कंपनी आहे. एलएनटी फायनान्स लिमिटेड (आधीची फॅमिली क्रेडिट लि.), एलएनटी हाऊसिंग फायनान्स लि., एलएनटी इन्फ्रास्टचर फायनान्स कंपनी, लि., एलएनटी इन्व्हेस्टमेन्ट मॅनेजमेन्ट लि. आणि एलएनटी कॅपिटल मार्केट्स लि. या उपकंपन्यांच्या माध्यमातून ही कंपनी ग्रामीण, गृह तसेच घाऊक वित्तपुरवठा क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारची वित्तीय उत्पादने आणि सेवा तसेच म्युच्युअल फंड उत्पादने आणि मालमत्ता व्यवस्थापन सेवा पुरविते. CIC-ND-SI म्हणून एटीएफएचची आरबीआयकडे नोंदणी आहे. अभियांत्रिकी, बांधकाम, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने आणि सेवा तसेच आयटी आणि वित्तीय सेवा आदींमध्ये भारताच्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये गणली जाणाऱ्या लार्सन अॅण्ड टुर्बो (एलएनटी) ही एलटीएफएचची प्रवर्तक आहे.

एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन

0

पुणे: नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ) आणि रन बडिज क्लब यांच्या तर्फे चौथ्या एनआयओ व्हिजन अर्ध मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. 22 जुलै 2018 या दिवशी होणार आहे. स्पर्धेत 2000 हुन अधिक स्पर्धकांसह 500 महिला सहभागी होणार आहेत.

पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना एनआयओचे संचालक आणि पुण्यातील प्रमुख नेत्रतज्ञ डॉ.आदित्य केळकर, एनआयओच्या संचालिका जाई केळकर आणि रन बडिज क्लबचे अरविंद बिजवे व निखिल शहा यांनी सांगितले की, एनआयओ व्हिजन मॅराथॉनचे आयोजन विशेषकरून टाळत्या येण्याजोग्या अंधत्वाविषयी जनजागृतीसाठी करण्यात आले आहे. आपल्यापैकी अनेक पालक किंवा आपल्या पैकी अनेकजण अशा वयोगटात आहेत की, जेव्हा ग्लाकोमा, मोतीबिंदू किंवा मधुमेह यांसारखे आजार होऊ शकतील. यापैकी अनेक व्यक्तींना गेलेली दृष्टी परत येऊ शकत नाही. पण नियमितपणे डोळ्यांची तपासणी केल्यामुळे यातील कायमचा अंधत्वाचा धोका टाळता येतो.

आम्ही एनआयओच्या माध्यमातून टाळता येण्यासारख्या अंधत्वाचे समाजातून निर्मुलन करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि त्यासाठी डोळ्यांची देखरेख व तपासणीचे आयोजन करीत आहोत. त्यादृष्टीने गेलेले अंधत्व पुन्हा मिळवण्यात येणारे अपयश टाळण्यासाठी पहिली पायरी म्हणून आम्ही डोळ्याच्या रूग्णांमध्ये जागृती निर्माण करीत आहोत. तसेच, त्यांना याविषयी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहोत. असे डॉ. केळकर म्हणाले.

एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धा यावर्षी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. युके मधे डोळेबांधून धावण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याशिवाय या मॅराथॉनचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे या वर्षी शाश्वत शुक्ला या महिला धावपटू 5 कि.मी. अंतर अनवाणी जलदगतीने धावण्याचा जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

रनबडिज्‌ क्लब या शहरांतील महत्वाच्या संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा 3कि.मी, 5कि.मी, 10कि.मी, 15कि.मी आणि 21कि.मी.या प्रकारात होणार आहे. यामध्ये यापैकी कुठल्याही शर्यतीत तुम्ही एक साथीदार डोळेबांधून धावू शकता किंवा अर्धे तुम्ही धावायचे आणि अर्धे तुमच्या साथीदाराने धावायचे अशा अनोख्या व नाविन्यपूर्ण संकल्पनेचा यात समावेश आहे. तसेच, याशिवाय दृष्टिहीनांबरोबरही एक शर्यत आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनाही एक वेगळ्या प्रकारचा आनंददायक अनुभव घेता येईल. 10 वर्षावरील व्यक्ती या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. यामध्ये 2 कि.मी चे अंतर पार करायचे आहे. 1 कि.मी अंतरावरू परत फिरत हे अंतर पुर्ण करायचे आहे. यामध्ये सहभागी दोन्ही स्पर्धकांना बुक ऑफ वर्ल्ड रेकॅर्डचे ऑफिशिअल प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.

22 जुलै 2018 रोजी 8.30 वाजता रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर  येथे  स्पर्धेचा फ्लॅग ऑफ होईल.  स्पर्धेचा मार्ग रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर येथुन स्पर्धेला प्रारंभ होणार असून औधच्या दिशेने पुन्हा फिरून रविंद्रनाथ टागोर स्कुल ऑफ ऑक्सलेन्स, बाणेर असा मार्ग असणार आहे. एनआयओ व्हिजन मॅराथॉन मधे नोंदणी केलेल्या सहभागी सदस्यांनाच मोफत प्रवेश करता येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

एनआयओ व्हिजन मॅराथॉन स्पर्धेत पुण्यांतील तसेच, हिंजवडी भागांतील सर्व आयटी कंपन्यांतील स्पर्धक सहभागी होत आहेत.  यामध्ये या कंपन्यांतील सगळ्यांना आपाआपले कंपनीचे व्यवस्थापन किती चांगल्या पध्दतीने कार्य करते याचे प्रदर्शन करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑपथेलमॉलजी(एनआयओ)ला तुम्ही देणगी देऊ शकता.

पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक ज्ञान आवश्यक – सी. पी. त्रिपाठी

0

पुणे  :-  दैनंदिन आयुष्य जगत असताना विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यक्षिक ज्ञान उपयोगी पडत असते. प्रात्यक्षिक ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना जगाची माहिती अधिक मिळते आणि हीच माहिती त्यांना जीवन जगण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे पुस्तकी ज्ञानासोबतच  प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना देणे अधिक आवश्यक आहे. शाळेत मिळालेल्या या ज्ञानाच्या आधारे ते नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्यातून समाजात नवे परिवर्तन घडवून आणू शकतील. शिक्षणाची गंगोत्री गावोगाव पोहचवून देशाच्या विकासात आम्हीही खारीचा वाटा उचलू असे ही ते यावेळी म्हणाले. अशी भावना बजाज ऑटोच्या सीएसआर विभागाचे सल्लागार  सी. पी. त्रिपाठी यांनी व्यक्त केली.

पुणे राऊंड टेबल १५ ,बजाज ऑटो आणि साने गुरुजी शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने

वडकी येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या विस्तारित इमारतीचे  उद्घाटन  त्यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पुणे राऊंड टेबल १५ चे अध्यक्ष देवेश जतिया, विरोधी पक्षनेते  व साने गुरुजी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष चेतन तुपे, राऊंड टेबल इंडिया राष्ट्रीय खजिनदार अक्षय दुगर , राऊंड टेबल इंडियाचे राष्ट्रीय समन्वयक मोर्य फिलीप   , सरपंच,मुख्याध्यापक व समस्त शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते.

वडकी येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या ७ वर्गांचे नूतनीकरण आणि ४ नवीन वर्ग तयार  करण्यात आले असल्यामुळे याचा फायदा २०० हुन अधिक मुलांना होणार आहे.
प्रत्येक मुलाला शिक्षण मिळवण्याचा अधिकार आहे त्यामुळेच आपल्या देशाचे भविष्य घडवणाऱ्या या पिढीला ते मिळवून देणे आमचे कर्तव्य आहे. आमच्या राऊंड टेबल इंडियच्या ( “शिक्षणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य”( “Freedom Through Education या संकल्पनेअंतर्गत ज्या शाळांना पायाभूत सुविधा,ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, पुस्तके, स्टेशनरी असे जे काही आवश्यक आहे ते देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी  अधिकाधिक लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. यामुळे जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता येणे शक्य होईल. असे देवेश जातिया म्हणाले .

ग्रामीण भागातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे हे आमच्या संस्थेचे उदिष्ठ आहे. या माध्यमातून या मुलांना आधुनिक जगाशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही साने गुरुजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून करत आहोत असे मनोगत चेतन तुपे यांनी मांडले.

पैसे भरून कृषीपंपांच्या वीजजोडण्या प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करावे

0

मुंबई:-मार्च-2018 अखेर राज्यात कृषीपंपांच्या वीजजोडणीसाठी पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या 2 लाख 49 हजार 358 शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीव्दारे (हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन सिस्टीम) वीजजोडणी देण्यात येणार आहे. कृषीपंपांच्या वीजजोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी 1 लाख 65 हजार 456 शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली असून उर्वरित 83 हजार 902 शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

महावितरणव्दारे सर्वच प्रकारच्या ग्राहकांना नवीन वीजजोडणी, वीजजोडणीची सद्यस्थ‍िती, वीजबिल व वीजबिलांचा भरणा, वीज स्थगीतीची सूचना, मीटर रीडींग इत्यादी एसएमएस ग्राहकांना पाठविण्यात येतात. महावितरणने कृषीपंपाना उच्चदाब वीज वितरण प्रणालीव्दारे वीजजोडणी देण्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या प्रणालीतील कामांना सुरूवात होणार आहे. या प्रणालीतील कामे कोणत्या टप्प्यात आहेत तसेच कृषीपंपाना वीजजोडणी देण्याबाबतची सद्यस्थिती काय आहे, इत्यादी माहिती शेतकऱ्यांना एसएमएसव्दारे कळविण्यात येईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केलेली नसेल त्यांनी महावितरण मोबाईल ॲप, शाखा कार्यालय किंवा  1800-102-3435/1800-233-3435/1912  या टोलफ्री क्रमांकाशी संपर्क साधून मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी.

 सध्याच्या प्रचलित पध्दतीनुसार राज्यातील 40 लाख 68 हजार 220 कृषीपंपांना वीजजोडण्या दिलेल्या असून कृषीपंपांसाठी मोठ्याप्रमाणात विजेचा वापर करण्यात येतो. या पध्दतीमुळे एकाच रोहीत्रावरून 15 ते 20 कृषीपंपांना वीजपुरवठा करण्यात येत असल्याने लघुदाब वाहिनीची लांबी वाढते. लघुदाब वाहिनीची लांबी वाढल्यामुळे कृषीपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा मिळणे, रोहित्र वारंवार बिघडणे, वीजपुरवठा खंडित होणे, वीजहानी वाढणे, वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी करणे अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

यासर्व अडचणींना कायमचे सोडवून राज्यातील शेतकऱ्यांना चांगल्या दाबाचा अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी या प्रणालीव्दारे कृषीपंपाच्या जागेपर्यंत उच्चदाब वाहिनी उभारण्यात येणर असून त्यांच्या वीजभारानुसार विविध क्षमतेचे (10,16 किंवा 25 एव्हीए) रोहित्र उभारण्यात येणार आहेत. या रोहित्रावरून एक किंवा दोन शेतकऱ्यांनाच वीजजोडणी दिली जाणार असल्यामुळे या प्रणालीचा (एचव्हीडीएस) शेतकऱ्यांना फायदाचं होणार आहे. तरी पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी तातडीने करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

…तर देशातील तमाम जनतेलाही नोटीस बजाविणार काय ? आबा बागुल यांचा सवाल

0
पुणे -अत्याचाराचा एक व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कारवाई होत असेल तर ती कौतुकाची बाब आहे मात्र कायद्याचे उल्लंघन हे कारण  पुढे करून जर  काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना राज्य बाल हक्क आयोग नोटीस पाठवीत असेल तर मग हा व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या देशातील जनतेलाही नोटिसा धाडणार का ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केला असून द्वेषापोटी कदापि राजकारण नको अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. 

जामनेर तालुक्यातील वाकडी येथे विहिरीत पोहायला गेलेल्या दोन मुलांना नग्न करून त्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणाचा व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केल्याप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना राज्य बाल हक्क आयोगाने नोटीस बजावली आहे.  राहुल यांनी मुलांचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल केल्याने या कायद्याचा भंग होत असल्याने ही नोटीस पाठवण्यात आली आहे.बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा २०१२ नुसार या आरोपींवर गुन्हा दाखल केलेला असतानाही अशा प्रकारचा कुठलाही व्हिडीओ अथवा फोटो प्रसारित करणे गुन्हा असल्याचे बाल हक्क आयोगाने म्हटले आहे.या पार्श्वभूमीवर   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, एका व्हिडीओमुळे ही घटना उघडकीस आली आणि अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कारवाई झाली ही बाब महत्वाची आहे.  ऑनलाईन प्रसारमाध्यमे, वृत्तवाहिन्या यांनीही या घटनेची दखल घेतली इतकेच नाही तर हा व्हिडीओ देशातील जनतेनेही प्रसारित केल्याने अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तींपुढे धाक निर्माण झाला आहे, असे असताना   काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना राज्य बाल हक्क आयोगाने नोटीस पाठवणे म्हणजे द्वेषापोटी राजकारण आहे का ? हा प्रश्न निर्माण होत असून तसे असेल तर राज्य बाल हक्क आयोग देशातील जनतेला नोटीस धाडणार का असा सवालही आबा बागुल यांनी केला आहे. 

नव्या इमारतीच्या उद्घाटनाची तयारी हि पूर्ण- महापौर ,सभागृहनेते यांचा दावा

0

पुणे- पुणे महापालिकेच्या मुख्य भवन परिसरातील विस्तारित इमारतीचे काम पूर्ण झाल्याचा दावा करत आज उद्घाटनाच्या कार्यक्रमाची देखील तयारी पूर्ण झाल्याचा दावा महापौर मुक्ता टिळक आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी आज केला .आज त्यांनी इमारतीची आणि सभागृहाची पाहणी केली तेव्हा माय मराठीशी बोलताना त्यांनी सांगितले कि विरोधक विनाकारण टीका करत आहेत .आमची तयारी पूर्ण आहे.

उपराष्ट्रपती करणार पहा ‘अशा’ या इमारतीचे उद्या उद्घाटन (व्हिडीओ)

कोनशिलेवर नावासाठी इमारतीची उभारणी घिसाडघाईने -चेतन तुपे पाटलांचा आरोप

पुणे- महापालिकेच्या मुख्य भवनातील एका इमारतीचे उद्घाटन आपल्याच कारकिर्दीत व्हावे आणि उद्घाटनाच्या कोनशिलेवर आपले नाव रहावे यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घाई घाईने या इमारतीचे काम पूर्णत्वाकडे नेण्याचा घाट घातल्याने …उद्या अपूर्ण इमारतीचे आणि घाईमुळे निकृष्ट दर्जाच्या इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपती यांच्या हस्ते होईल आणि त्याचा दोष सत्ताधाऱ्यांच्या माथी लागेल असा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी केला आहे .

आज त्यांनी माध्यमांना या नव्या इमारतीचे अपूर्ण काम स्वतः नेवून दाखविले  आणि हा आरोप केला .उद्या दिनांक २१ जून रोजी या इमारतीचे उद्घाटन होणार असून यासाठी अत्यंत घाई केल्याचा आरोप सर्व स्तरावरून होतो आहे .

या संदर्भात  काय  म्हणाले चेतन तुपे पाटील पहा आणि ऐका …

कोणी केला राजशिष्टाचाराचा भंग ? सभागृहातील पहा लपवाछपवी (व्हिडीओ..)

0

पुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी अखेरपर्यंत नगरसेवक विशाल तांबेच्या  प्रश्नांचे उत्तर प्रशासनाला देवू दिले नाही . मागे माता रमाई यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी राष्ट्रपती आले होते .यावेळी राजशिष्टाचाराचा भंग केला म्हणून ताशेरे ओढणारे पत्र राष्ट्रपती कार्यालयाने दिले आहे काय ?आता परवा उपराष्ट्रपती महापालिकेच्या एका इमारतीच्या उद्घाटनासाठी येत आहेत त्यासाठी काय दक्षता घेतली आहे ? असे प्रश्न तांबे यांनी विचारले होते. यावेळी मत रमाई पुतळा अनावरणासाठीच्या कार्यक्रमात डॉ. आंबेडकरांच्या नातलगांना बोलाविले नाही म्हणून निषेध करत अविनाश साळवे आणि भैय्या जाधव यांनी सभात्याग हि केला. या सर्वाकडे दुर्लक्ष करून सभागृहनेते भिमाले यांनी पहा कशी सभा गुंडाळली .

दलित संघटनाच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

0

पुणे- शहर जिल्हा मातंग समाज व दलित संघटनाच्यावतीने जळगाव येथील मातंग तरुणांची नग्न धिंड व विहीरीमध्ये  पोहल्याने विहीर बाटली म्हणुन मातंग समाजाच्या दोन युवकांची नग्न करुन धिंड काढण्यात आली व त्यांना नग्नावस्थेत बेदम मारहाण करुन त्यांचा व्हीडीओ सोशल मीडियावर प्रसारीत केल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली . यावेळी मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने  पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले .

या घटनेतील आरोपीना कठोर शासन करण्याकरिता शासनाने प्रयत्न करून पीडित कुटुंबाचे पुनर्वसन त्वरित करावे , घटनेतील तपासात कसूर केल्याप्रकरणी संबधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून अट्रॉसिटी अक्टप्रमाणे गुन्हे दाखल करावेत , महाराष्ट्रातील दलितांवरील वाढलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात शासनाने कठोर भूमिका घेऊन दलितांवरील अन्याय अत्याचाराचे गुन्हे तात्काळ नोंदवून घेण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश देण्यात यावेत , सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने अट्रॉसिटी अक्ट शिथिल करण्यात आला आहे . त्यातील बदल रद्द करून तो कायदा पूर्ववत करण्याकरिता राज्य शासन व केंद्र शासनाने प्रयत्न करावेत . अशा मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या .

या निर्दशनामध्ये  नगरसेवक अविनाश बागवे , प्रकाश वैराळ , अशोक जगताप , शंकर तडाखे,  मालती अवघडे , भगवानराव वैराट , विष्णू कसबे , विठ्ठल थोरात , शाम देडे , विकास सातारकर , दादासाहेब सोनवणे , वसंतराव साळवे , अंकल सोनवणे , दत्ता जाधव , रवी आरडे , नारायण घोरपडे , सुदीप गायकवाड , संजय शेंडगे , भास्कर नेटके , संतोष घोलप , राकेश लोंढे , संजय भिमाले , राहुल डंबाळे , अमोल तुजारे , अशोक लोखंडे , अनिल हातागळे , सनी सोनवणे , प्रशांत फुले , बाळासाहेब मोहिते , दिनेश सकट , अतिश कापसे , गणेश लांडगे , सचिन इंगळे , सचिन देडे , सचिन पेटाडे , दयाभाऊ अडागळे , शैलेश मोरे , दीपक आवळे , मंगेश जाधव , संतोष कांबळे , सुखदेव वाघमारे , एकनाथ चांदणे , वसंत कांबळे , विनोद सोने , जितेंद्र भोसले , बाळासाहेब आवारे , अश्विन दोडके , रवी मोरे , निलेश वाघमारे , आनंद वैराट , सोमनाथ शिंदे , किशोर धगाटे , गणेश जाधव आदी मान्यवर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते .

भारतीय खेळाडूंनी आपल्या खेळात भरपुर सुधारणा केल्या आहेत- समारा

0

पुणे –  अल्टीमेट टेबल टेनिस लीग मधील महाराष्ट्र यिनायटेड संघाची जागतीक क्रमवारीत 19 व्या स्थानावर असलेली एलीझाबेता समारा म्हणाली की, मी भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळताना पाहिले आहे.  त्यांचा खेळ स्पर्धात्माक आहे तसेच खेळ समजुन त्यामध्ये विकास करताना ते दिसतात.

जागतीक क्रमवारीत 19व्या स्थानावर असलेल्या रोमानीयन समाराने 11व्या स्थानावरील आरपीएसजी मावेरिंक्स् संघाच्या  हॅंगकॅंगच्या डु होई केम हीचा 3-0 असा पराभव केला. यावेळी समारा म्हणाली, हे लीग खेळाडूंचा व्यावसायीक खेळ उंचावण्यासाठी एक उत्तम संधी आहे.  लीगची रचना व नियम उत्तम आहे. मला विश्वास आहे लीगमधील सर्वच खेळाडू लीगचा आनंद लुटत असतील.

ट्राफ्ट दरम्यान समारा ही महाराष्ट्र युनायटेड संघाकडून दुस-या फेरीत सामील करून घेतलेली पहिली परदेशी महिला खेळाडू आहे.

समारा ही तीन वेळा युरोपीयन चॅम्पियन आहे. 29 वर्षीय समाराने 2008, 2012 व 2016 अशा तीन ऑलंपीक स्पर्धांमध्ये रोमानीयाचे प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या भावाला खेळताना बघुन समाराने टेबल टेनिस खेळण्यास सुरूवात केली.

समारा पुढे म्हणाली, या लीग बाबतचा अनुभव विलक्षण आहे. आत्तापर्यंत माझ्या संघातील इतर खेळाडूंनी दाखवलेल्या उत्साहामुळे मी प्रभावीत झाले आहे. प्रत्येक खेळात सुधारण्याची संधी नेहमीच असते त्यामुळे मला वाटते की भारत योग्य मार्गावर आहे.

‘महिंद्रा फायनान्स’ने मुदत ठेवींचे दर ८.७५ टक्क्यांपर्यंत वाढवले

ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या ठेवीदारांसाठी ८.७५% व्याजदर, तर ऑफलाइन बुकिंगसाठी ८.५०% व्याजदर

 मुंबई : ग्रामीण आणि निमशहरी भागातील बाजारपेठेमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘महिंद्रा फायनान्स’ या ‘नॉन बॅंकिंग’ अर्थपुरवठादार कंपनीने आपल्या मुदतठेवींच्या व्याजदारात वाढ करीत असल्याची घोषणा केली आहे. कागदरहित आणि गुंतवणूकदारांच्या सोयीच्या व्यवहारासाठी या कंपनीतर्फे ऑनलाइन गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांना ०.२५% अधिक व्याज देण्यात येणार आहेत.

कंपनीच्या या निर्णयामुळे ऑनलाइन मुदत ठेव गुंतवणूकदारांना दसादशे ८.७५% व्याज दर ऑफलाइन मुदत ठेव गुंतवणूकदारांना ८.५ % व्याज मिळणार आहे.

गुंतवणूकदार https://fixeddeposit.mahindrafinance.com या वेबसाईटवर दाखल होऊन गुंतवणुकीचा लाभ घेऊ शकतात.

‘महिंद्रा फायनान्स’चे कार्यकारी संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी श्री. व्ही. रवी मुदतठेवींच्या दरांमधील वृद्धीबाबत म्हणाले, ‌‌“मुदतठेवीचा प्रकार हा गुंतवणूदारांसाठी नेहमीच ‘एव्हरनग्रीन’ मानला गेला असून बहुतेक सर्व गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये त्याला स्थान असते. त्यामुळे आम्ही गुंतवणूकदारांसाठी हा आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करीत आहोत. ऑनलाइन गुंतवणूक करून गुंतवणूकदार अधिक व्याजदराचा लाभ घेतील, याची आम्हाला खात्री आहे.”

महिंद्रा अॅंड महिंद्रा वित्तीय सेवा लि.

‘महिंद्रा अॅंड महिंद्रा वित्तीय सर्व्हिसेस लि. (महिंद्रा फायनान्स) ही ‘महिंद्रा ग्रुप’ची विनाबॅंकिंग वित्तीय कंपनी आहे. या कंपनीचे ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये काम चालते. या कंपनीचे ५० लाख ३० हजार एवढे ग्राहक असून ‘एयूएम’ (असेस्ट्स अंडर मॅनेजमेंट) ८.४९ अब्ज डॉलर एवढा आहे. ही कंपनी प्रामुख्याने विविध प्रकारची वाहने आणि ट्रॅक्टरच्या खरेदीदारांना अर्थपुरवठा करते, मुदतठेवींवर आकर्षक व्याज देते, तसेच ‘एसएमई’जना कर्जपुरवठाही करते. या कंपनीची देशभरात १ हजार २८९ कार्यालये आहेत.

‘महिंद्रा फायनान्स’ ही भारतामधील एकमेव विनाबॅंकिंग वित्तीय गटामधील अशी कंपनी आहे की जी बाजारपेठेमधील ‘डो जोन्स सस्टेनॅबिलिटी इंडेक्स’वर नोंदणीकृत कंपनी आहे. तसेच Great Place to Work® Institute India या संस्थेने ही कंपनी भारतामधील ‘बीएफएसआय’ गटामधील सर्वोत्कृष्ट १५ कंपन्यांमध्ये समाविष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘द इकॉनॉमिक टाइम्स’ या वृत्तपत्राने या कंपनीचा ‘एवन बेस्ट इम्प्लयर २०१७’ आणि ‘बेस्ट बीएफएसआय ब्रॅंड २०१८’ असा गौरव केला आहे.

महिंद्राबद्दल थोडेसे :

‘द महिंद्रा ग्रुप’ हा २०.७ अब्ज डॉलर्स एवढी उलाढाल असलेला ग्रुप ग्राहकोपयोगी काम करणारा ग्रुप म्हणून विख्यात आहे. वाहननिर्मिती, माहिती-तंत्रज्ञान, वित्तीय सेवा आणि व्हेकेशन ओनरशिप या क्षेत्रांमध्ये ही संस्था आघाडीवर आहे. या क्षेत्रांखेरीज कृषीउद्योग, हवाई क्षेत्र, खासगी वाहने, कॉम्पोनंट्स, संरक्षण, रियल इस्टेट, ऊर्जानिर्मिती, स्पीडबोट्स आणि लोखंड निर्मिती यातही ही कंपनी अग्रस्थानी आहे. या संस्थेचे मुख्यालय मुंबई येथे असून जगभरातील १०० देशांमध्ये २ लाख ४० हजार कर्मचारी कार्यरत आहेत.

चौथ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन…

0
पुणे: संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्णयानुसार २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठ पुणेतर्फे चौथ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून गुरुवार, दि. २१ जून २०१८ रोजी सकाळी ६.३० वाजता कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या प्रांगणात योग प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीराच्या निमित्ताने एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठ, पुणे आणि माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सुमारे ५ ते ६ हजार विद्यार्थी या योग प्रशिक्षण शिबीरात सहभागी होणार आहेत.
पतंजली योग समिती (पुणे पश्‍चिमचे प्रमुख) योग शिक्षक श्री. गोविंद गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे योग प्रशिक्षण शिबीर संपन्न होणार आहे. विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे १९९६ सालापासून दरवर्षी  २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकरीता  योग प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाते. १९८३ सालापासून एमआयटी संस्थेच्या प्रांगणात धूम्रपान करण्यास बंदी आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व चारित्र्य संवर्धन व्हावे यासाठी योगाला नेहमीच प्रोत्साहन दिले जात आहे.
आजची तरुण पिढी चंगळवादी व व्यसनाधीन झालेली आहे. या पिढीची बौध्दिक व शारीरिक उन्नती व्हावी, यासाठी दररोज योगसने करावीत. याकरिता एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठाने आयोजित केलेल्या योगप्रशिक्षण शिबीराचे विशेष महत्त्व आहे, असे मत पतंजली योगपीठाचे पुण्यातील प्रतिनिधी श्री. घाडगे गुरूजी यांनी व्यक्त केले.
एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात असलेल्या या योग प्रशिक्षण शिबीरात  जास्तित जास्त लोकांनी व विशेषतः  विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठाचे  संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड व कार्याध्यक्ष  प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी केले आहे.

पालिकेच्या अंदाजपत्रकात १७०० कोटी रुपयांची तूट- भाजपकडून पुणेकरांची फसवणूक :माजी उपमहापौर आबा बागुल

पुणे
महापालिकेच्या सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात सुमारे  १७००कोटी रुपयांची तूट आल्याचा  पर्दाफाश  प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी केला असून सत्ताधारी भाजपने करदात्या  पुणेकरांची फसवणूक केल्याचा आरोपही केला आहे.
पालिकेच्या  सन २०१७-२०१८ साठी ५हजार ९१२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मुख्यसभेने मान्यता दिली मात्र सद्यस्थितीत आढावा घेतला असता केवळ ४२२६ कोटी रुपयेच जमा झाले आहे. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी  भाजपने दिलेले आश्वासने भुलथापाच ठरल्या आहेत असे स्पष्ट करून  माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, अंदाजपत्रकाचा आढावा घेतला असता महसुली खर्च [ पगार , मेंटेनन्स  ] हा २२९७कोटी रुपये असून विकासकामांना केवळ १५५० कोटी रुपयेच उपलब्ध झाल्याने त्याचा फटका शहराच्या विकासाला बसला आहे त्यामुळे निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजपने केवळ आकडे फुगवून अंदाजपत्रक सादर केले आणि  विकासाचे गाजर पुणेकरांना दाखवले हेच आता अधोरेखित  झाले आहे. एकीकडे अंदाजपत्रकात इतकी मोठी तूट असताना केंद्राकडून जीएसटीतुन तीन महिन्यांचे   सुमारे १८ कोटी आलेले नाहीत, हेही निदर्शनास आले आहे. केंद्र -राज्य सरकारकडे असलेली थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्याची गरज असताना त्याकडे सत्ताधारीच  काय प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे असेही आबा बागुल यांनी नमूद करताना एकूणच हे अंदाजपत्रक फसवे आहे का ? असा सवाल केला.
उपमहापौरपदाच्या कालावधीत शहर विकासाला चालना मिळण्यासाठी  पालिकेला उत्पनाचे स्रोत कसे वाढतील यासाठी रेव्हन्यू कमिटीची स्थापन केली होती. उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करताना जमा किती , खर्च किती याचा सातत्याने आढावा प्रशासनाबरोबर काँग्रेसकडून  घेतला जात होता मात्र सत्ताबदल झाल्यानंतर सत्ताधारी भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले परिणामी आज मोठ्याप्रमाणावर तुटीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे  रेव्हन्यू कमिटीचे महत्व लक्षात घेऊन अंदाजपत्रकात तूट का आली याचा गांभीर्याने  विचार करावा आणि अंदाजपत्रकाद्वारे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कशी करणार याचा खुलासा भाजपने करावा अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे.

अखेर महापालिकेतले भांडण महिनाभरात मिटले कसे : पहा व्हिडीओ

पुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमेकांविरोधात आरोप करणारे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचे पोलीस स्टेशन आणि न्यायालयापर्यंत पोहोचू पाहणारे सभागृहातले भांडण सभागृहातच  मिटले आहे.

 २१ मे रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरु असतानाच भिमाले व शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यात भिमाले यांनी शिंदेंना उद्देशून अशिष्ट शब्द वापरले. त्यावरून शिंदे यांनी दुसऱ्या दिवशी भिमाले यांच्या विरोधात पोलिसात फिर्यांद दिली  त्यानंतर 25 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावाही दाखल केला. त्याची दखल घेत भिमाले यांनीही शिंदे यांना वकिलामार्फत 101 कोटी रूपयांचा दावा दाखल करणार असल्याची नोटीस बजावली होती.या गटनेत्यांच्या भांडणाची चर्चा शहरासह राज्यातही रंगली होती.  अखेर आज हे भांडण मिटल्याने सर्वानीच सुटकेचा निःश्वास सोडला.   आज  झालेल्या सर्वसाधारणसभेच्या सुरूवातीलाच महापौरांनी सदस्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा सदस्यांनी कायम ठेवावी असे आवाहन  केले. त्याला शिंदे व भिमाले यांनी प्रतिसाद दिला.यावेळी शिंदे म्हणाले की, चुकीची माफी मागायला जास्त धेर्य लागतं, ते आमच्याकडे आहे. भिमाले यांनीही सभेच्या कामकाजातून ते वक्तव्ये काढून टाकावे असे सांगितले आणि संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेले भांडण मिटल्याचे स्पष्ट झाले. 

इंग्रजीच्या प्रतिष्ठेसाठी मराठीचा न्यूनगंड बाळगू नका – बिशप थॉमस डाबरे

0

पुणे – जगात अनेक देश हे महाराष्ट्रापेक्षा लोकसंख्येने लहान असूनही तेथील लोक स्थानिक भाषेतच व्यवहार करत आहेत. पण जागतिकीकरणामुळे स्थानिक भाषा. संस्कृतीला धोका निर्माण झाला असून वाढती पिढीही इंग्रजीला बळी पडत आहे हे दुर्दैव आहे. इंग्रजी बोलण्याच्या प्रतिष्ठेपोटी मराठी भाषा बोलण्याचा न्यूनगंड बाळगू नका असे परखड आवाहन तुकाराम महाराजांच्या अभंगांवर पीएचडी करणारे बिशप थॉमस डाबरे यांनी आज येथे केले.

पत्रकार भवन येथे झालेल्या मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणा-या “मराठी रत्न पुरस्कार” वितरण समारंभात बिशप डाबरे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार होते. ऍस्पयार नॉलेज ऍण्ड स्कील्स प्रा. लिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय गांधी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण प्र. वाळिंबे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यंदाचे मराठी रत्न पुरस्कार चित्रपट विषयक १४ पुस्तके लिहिणारे मधू पोतदार, अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या आणि माहेर मासिकाच्या कार्यकारी संपादिका सुजाता देशमुख आणि मुक्त पत्रकार देवीदास देशपांडे यांनी देण्यात आले. पुणेरी पगडी, पाच हजार रूपये रोख, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुणे या विद्येच्या माहेरी, राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत लोक इंग्रजीतून बोलणेच पसंत करतात अशी खंत व्यक्त करून थॉमस डाबरे म्हणाले, मी पुण्याचा, माझी मातृभाषा मराठी, त्यामुळेच मी तुकारामांचे निवड अभंग संशोधनासाठी निवडले. हे अभंग मी व्हॅटिकनसिटीत पोचवले याचा मला अभिमान आहे. मराठी भाषेतून जे भावतरंग मनात उमटतात, हृदयाला साद घालतात असे तरंग इतर कोणत्याही भाषेतून बोलले तरी उमटत नाहीत. व्यक्ती आणि तिची मातृभाषा यांचा विलक्षण संयोग असून तो व्यक्तीगत अस्मितेचा भाग आहे. मी म्हणजे मराठी भाषा या अस्मितेचं ते प्रकटरूप, मूर्तस्वरूप आहे. त्यामुळे आपण जेथे रहातो तेथे मराठीचाच वापर करू या असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

उल्हास पवार म्हणाले, माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना देशातील ९ आणि परदेशी तीन भाषा येत होत्या. त्यांनी ह. ना. आपटे यांच्या कादंबरीचे तेलगू भाषेत अनुवाद केला होता. ते पुस्तक खूपच गाजलं असं खुद्द नरसिंहराव यांनीच कराडच्या मराठी साहित्य संमेलनाच्यावेळी सांगितलं होतं. ट्रान्सलेशन याचा अर्थ एका जीवाचं दुस-या जीवात विलिनीकरण. भाषा ही संस्कृती वृद्धींगत करते, माणसं जोडण्याचं काम करते, एका अर्थी सानेगुरूजींच्या आंतर भारतीच्या निर्माणाचं काम करते. त्यामुळेच इतर भाषेतील पुस्तकांचे मराठीत अनुवाद होतात त्यापेक्षा जास्त समृद्ध मराठी साहित्यांचे अनुवाद हे इतर भाषेत झाले पाहिजेत. मराठी भाषा वृद्धींगत होईल, तिची लोकप्रियताही वाढेल आणि शंभर टक्के जगात पोचेल यात शंका नाही असा विश्वास त्यांनी शेवटी केला. संजय गांधी म्हणाले, आम्ही मुलांना कौशल्य विकासाचे शिक्षण हे मराठी भाषेतूनच देतो. आजपर्यंत महाराष्ट्रातील चाळीस हजार मुलांना असे प्रशिक्षण दिले असून आज मितीला सात हजार मुले ही आयटी कंपन्यांमध्ये लाखातील पॅकेज घेऊन काम करत आहेत. या सर्वांनाच मराठीतूनच आम्ही शिकवतो, कारण इंग्रजीतून त्यांना महिती मिळेल पण ज्ञान मिळणार नाही. सर्वांना मा मातृभाषेतून शिकवले तर मुले लवकर आणि सहजपणे शिकू शकतात असा अनुभव आहे.

यावेळी पुरस्कार्थींच्यावतीने बोलताना सुजाता देशमुख यांनी सांगितले की, भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा अन्योन्य संबंध असून दोन संस्कृतीतील संवादाचा भाषा हा सेतू असतो. मधू पोतदार म्हणाले, जगात वीस लाखांपेक्षा जास्त लोक एकच भाषा बोलतात अशा भाषांची संख्या १५ असून त्यात मराठीचा अकरावा नंबर आहे. ही अभिमानाची बाब असूनही आपण वर्षातून एक दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करून मराठी भाषेला परकं करतोय. मराठी भाषेत संतसाहित्य सारखे चिरंजीव साहित्य असल्याने धोका मराठी भाषेला नाही तर मराठीच्या बोलण्यातून कमी होत चाललेल्या बोली भाषा नष्ट होण्याचा आहे.

मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे श्रृती तिवारी, वैष्णवी टिळेकर, तन्मयी मेहेंदळे, सागर बाबर अस्मिता पाठक – राजे, अमोल बोरसे आदींचाही यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात तन्मयी मेहेंदळे यांनी सादर केलेल्या मराठी अभिमान गीताने झाली. कार्यक्रामाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष वाळिंबे यांनी मराठी भाषा संवर्धनाचे काम सन २००० पासून सुरू असून मराठी स्वाक्षरी करा, पाट्या मराठी लावा यासारख्या लहानलहान उपक्रमातून काम गेली अठरा वर्षे सुरू आहे. मराठी रत्न पुरस्कार म्हणजे मराठी भाषा वृद्धीसाठी यांनी केलेल्या कामासाठी प्रोत्साहन म्हणून दिलेले असल्याचे त्यांनी नमूद केले. शेवटी आभार प्रदर्शन करूणा पाटील यानी केले.