Home Blog Page 313

पुण्यातील मातब्बर नेते दीपक मानकर यांचा अजित पवारांकडे राजीनामा…

पुणे- शहरातील मातब्बर म्हणून गणल्या जाणाऱ्या आणि नेतृत्वाच्या मुख्य प्रवाहात कायम राहून,आपल्यावरआपले राजकीय अस्तित्व संपविण्याच्या दृष्टीने होणारे हल्ल्यावर हल्ले पचवून पुन्हा पुन्हा उभारी घेत पुढे येत असलेल्या पुण्याच्या दीपक मानकर यांनी आपला राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो असलेले नेते अजित पवार यांच्याकडे सोपविला आहे. पोलिसांच्या मदतीने मानकर यांची राजकीय कारकीर्द संपविण्याचे कायम प्रयत्न झाले. पण गेली ४ दशके त्यांची राजकीय कारकीर्द संपविण्यात कोणालाही यश आले नाही.कॉंग्रेस मध्ये असताना सुरेश कलमाडी यांनी त्यांना डावलून त्यांच्या नेतुत्वाला खच्ची करण्याचे प्रयत्न केले.त्यानंतर ते कॉंग्रेस मधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादीत आले . त्यानंतर भाजपचे राज्यात सरकार असताना त्यांनी कोथरूड च्या शिवसृष्टी साठी आवाज टाकला आणि पुन्हा त्यांचे पोलीसंकरवी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. पुढे अजित पवार भाजपच्या सरकार मध्ये सामील झाल्यावर त्यांनी अजित दादांचे नेतृत्व स्वीकारले आणि राष्ट्रवादीची धुरा आक्रमकपणे शहरात राबविली. याच वेळी आपल्या आजवरच्या कामाचे श्रेय आमदारकीच्या रूपातून तरी मिळावे या राजकीय महत्त्वाकांक्षेच्यासाठी नेत्यांची दारे ठोठावली पण त्यांना आश्वासना शिवाय काही मिळाले नाहीच तरीही त्यांनी पक्षाचे काम अविरत पणे सुरु ठेवले. आता महापालिका निवडणुका समोर असताना आणि खुद्द अजित दादा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असतानाही मानकर यांच्यावर पोलिसांनी एका जमिनीच्या व्यवहारात त्यांना मिळालेल्या रकमेबाबतचे कागदपत्रे बोगस असल्याचा दावा करत मानकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.हा त्यांना मोठा धक्का होता . खुद्द अजित दादा पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याच शहर अध्यक्षांवर गुन्हा दाखल होण्यापूर्वीच हि माहिती अजितदादांना नसेल असे मानायला कोणी तयार नसताना आज पुन्हा भावनिक होऊन दीपक मानकर यांनी अखेरीस आपल्या शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

मानकर यांनी अजितदादांना दिलेल्या पत्रात काय म्हटले आहे वाचा जसेच्या तसे …..

आदरणीय दादा,आपल्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली मी सन २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश केल्यानंतर पक्ष वाढीसाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी मी सदैव प्रामाणिक प्रयत्न केले. आपण मला विधानसभा निवडणूक २०१४ मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली तेव्हापासून आजपर्यंत उपमहापौर, नगरसेवक, शहराध्यक्ष ह्या विविध पदांची जबाबदारी देऊन मला सामाजिक व राजकीय काम करण्याची संधी दिली.
जुलै २०२३ मध्ये झालेल्या राजकीय बदलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे विभाजन झाले व आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी क्षणाचा न विचारता मी आपल्यासारख्या भक्कम नेतृत्वासमवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आपणही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत दिनांक ६ जुलै २०२३ रोजी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.
मला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मी त्यावेळी पक्षाचे नाव व चिन्ह यांचा निर्णय होण्याअगोदर पक्षाला पाठींबा म्हणून मा. सर्वोच्च न्यायालयात जी प्रतिज्ञापत्र द्यायची होती त्यामध्ये पुणे शहरातून मी सुमारे ९५०० प्रतिज्ञापत्र गोळा करून महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, मुंबई येथे जमा केले आहेत. शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असताना महाराष्ट्रात नसेल इतकी मोठी जम्बो कार्यकारिणी करत फादर बॉडी, महिला, युवक, युवती, विद्यार्थी यांसह विविध सेलवर सुमारे १५०० पेक्षा जास्त पदाधिकात्यांची नियुक्ती करून पक्षाचे व आपले काम करण्याची संधी देत पुणे शहरात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराअंतर्गत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य, साहित्य-कला, क्रीडा, वारकरी सांप्रदाय, सांस्कृतिक यासह विविध क्षेत्रात २०० पेक्षा जास्त कार्यक्रम घेत तळागाळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची व आपली भूमिका स्पष्टपणे पोहचवली. तसेच माझ्या माध्यमातून पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुमारे १ लाख सभासद करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सभासद नोंदणी पुस्तिकांचे आमदार, नगरसेवक, तसेच पदाधिकारी यांना वाटप करण्यात आलेले आहे. त्यातील अनेक सभासद नोंदणी पुस्तिका पक्ष कार्यालय येथे जमा झालेले आहेत. आपल्या आदेशाप्रमाणे तसेच प्रदेशाध्यक्ष खा.श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सुचनेनुसार आपला पक्ष व पक्षाची विचारधारा ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुणे शहरातील सर्व घटकातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवत असून नागरिकांच्या समस्या आजही सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
मात्र माझा वाढता राजकीय आलेख पाहता, काही समाजकंटकाकडून माझी राजकीय बदनामी केली जात आहे. मी काही वर्षापूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता ३-४ दिवसांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. सदर गुन्ह्यातील सत्यता न पडताळता येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक तसेच माझे राजकीय कारकीर्द मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सदर आर्थिक व्यवहार हा माझ्या जमिनीसंदर्भात झालेला असून त्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फसवणुकीचा प्रकार झालेला नाही. या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. आदरणीय दादा, आपण आणि प्रदेशाध्यक्ष खा.श्री.सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कायम ठेवण्यासाठी मी अध्यक्ष झाल्यापासून प्रामाणिक प्रयत्न करीत आलेलो आहे.
तरी आपणास नम्र विनंती करतो की, माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा.

पुण्याचा महापौर भारतीय जनता पार्टीचाच होणार हा विश्वास – धीरज घाटे

पुणे ता १३ ;- लोकसभा निवडणूक खासदार , विधानसभे मध्ये ६ आमदार निवडून देत पुण्यात भारतीय जनता पक्षाचे ५.५०लक्ष सदस्य नोंदणी करत भारतीय जनता पक्षाने येणाऱ्या महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचाच महापौर असेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केला
आज भारतीय जनता पार्टी च्या ५८ जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली या मध्ये घाटे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली यावर बोलताना घाटे पुढे म्हणाले की,’ पक्षाने परत संधी देऊन जो विश्वास दाखवला तो सार्थ करून पक्षाची ध्येयधोरणे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे या निवडी बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यध्यक्ष रवींद्र चव्हाण , राज्याच्या समाजकल्याण मंत्री माधुरी मिसाळ , केंद्रीय नागरी उड्डाण राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांचे आभार घाटे यांनी मानले

धीरज घाटे हेच पुन्हा भाजपचे शहर अध्यक्ष…

पुणे :भारतीय जनता पार्टीने आज (ता.13 मे) राज्यातील जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती घोषित केली आहे. भाजप पुणे शहराच्या अध्यक्षपदी धीरज घाटे.यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे तर , भाजप पुणे उत्तर (मावळ) अध्यक्षपदी प्रदीप कंद तर भाजप पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी शत्रुघ्न काटे यांची निवड करण्यात आली आहे.
राज्यातील जिल्ह्यांच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची माहिती महाराष्ट्र भाजपने पत्रक जाहीर करून दिली. त्यानुसार जिल्हावार जिल्हाध्यक्षांची नावे पुढे दिली आहेत.

कोकण विभाग:

  1. सिंधुदुर्ग- प्रभाकर सावंत
  2. रत्नागिरी उत्तर- सतिष मोरे
  3. रत्नागिरी दक्षिण- राजेश सावंत
  4. रायगड उत्तर- अविनाश कोळी
  5. रायगड दक्षिण- धैर्यशील पाटील
  6. ठाणे शहर- संदिप लेले
  7. ठाणे ग्रामीण- जितेंद्र डाकी
  8. भिवंडी- रविकांत सावंत
  9. मिरा भाईंदर- दिलीप जैन
  10. नवी मुंबई- डॉ. राजेश पाटील
  11. कल्याण- नंदु परब
  12. उल्हासनगर- राजेश वधारिया

पश्चिम महाराष्ट्र:

  1. पुणे शहर- धिरज घाटे
  2. पुणे उत्तर (मावळ)- प्रदिप कंद
  3. पिंपरी चिंचवड शहर- शत्रुघ्न काटे
  4. सोलापूर शहर- श्रीमती रोहिणी तडवळकर
  5. सोलापूर पूर्व- शशिकांत चव्हाण
  6. सोलापूर पश्चिम- चेतनसिंग केदार
  7. सातारा- अतुल भोसले
  8. कोल्हापूर पूर्व (हातकणंगले)- राजवर्धन निंबाळकर
  9. कोल्हापूर पश्चिम (करवीर)- नाथाजी पाटील
  10. सांगली शहर- प्रकाश ढंग
  11. सांगली ग्रामीण- सम्राट महाडिक

उत्तर महाराष्ट्र:

  1. नंदुरबार- निलेश माळी
  2. धुळे शहर- गजेंद्र अंपाळकर
  3. धुळे ग्रामीण- बापु खलाने
  4. मालेगांव- निलेश कचवे
  5. जळगांव शहर- दिपक सुर्यवंशी
  6. जळगाव पूर्व- चंद्रकांत बाविस्कर
  7. जळगाव पश्चिम- राध्येश्याम चौधरी
  8. अहिल्यानगर उत्तर- नितीन दिनकर
  9. अहिल्यानगर दक्षिण- दिलीप भालसिंग

मराठवाडा विभाग:

  1. नांदेड महानगर- अमर राजूरकर
  2. परभणी महानगर- शिवाजी भरोसे
  3. हिंगोली- गजानन घुगे
  4. जालना महानगर- भास्करराव मुकुंदराव दानवे
  5. जालना ग्रामीण- नारायण कुचे
  6. छत्रपती संभाजीनगर उत्तर- सुभाष शिरसाठ
  7. छत्रपती संभाजीनगर पश्चिम- संजय खंबायते
  8. धाराशिव- दत्ता कुलकर्णी

विदर्भ विभाग:

  1. बुलढाणा- विजयराज शिंदे
  2. खामगांव- सचिन देशमुख
  3. अकोला महानगर- जयवंतराव मसणे
  4. अकोला ग्रामीण- संतोष शिवरकर
  5. वाशिम- पुरुषोत्तम चितलांगे
  6. अमरावती शहर- डॉ. नितीन धांडे
  7. अमरावती ग्रामीण (मोरणी)- रविराज देशमुख
  8. यवतमाळ- प्रफुल्ल चव्हाण
  9. पुसद- श्रीमती डॉ. आरती फुफाटे
  10. मेळघाट- प्रभुदास भिलावेकर
  11. नागपूर महानगर- दयाशंकर तिवारी
  12. नागपूर ग्रामीण (रामटेक)- अनंतराव राऊत
  13. नागपूर ग्रामीण (काटोल)- मनोहर कुंभारे
  14. भंडारा- आशु गोंडाने
  15. गोंदिया- श्रीमती सिता रहांगडाले
  16. उत्तर मुंबई- दिपक बाळा तावडे
  17. उत्तर पूर्व मुंबई- दिपक दळवी
  18. उत्तर मध्य मुंबई- विरेंद्र म्हात्रे

पुणे विद्यार्थी गृहाचा ११६ वा वर्धापनदिन उत्साहात

कुलगुरू दादासाहेब केतकर यांना अभिवादन

पुणे : गरीब व होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत पुणे विद्यार्थी गृह संस्थेचा ११६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. संस्थेचे संस्थापक कुलगुरू दादासाहेब केतकर, डॉ. अण्णासाहेब खैर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेच्या आवारातील धनुर्धारी श्रीराम मंदिरात सकाळी संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे यांच्या हस्ते शास्त्रोक्त पूजा, अभिषेक व महाआरती, तर दुपारी वेदघोष करण्यात आला. सायंकाळी माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतकांसाठी मेळाव्याचेही आयोजन केले होते. 

पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या नियामक मंडळाचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ माजी विद्यार्थी शिक्षणतज्ज्ञ श्रीधर पाटणकर, सदस्या पौर्णिमा लिखिते, संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, उपकार्याध्यक्ष सुभाष जिर्गे व अमोल जोशी, कार्यवाह संजय गुंजाळ, कोषाध्यक्ष कृष्णाजी कुलकर्णी, कुलसचिव दिनेश मिसाळ, संचालक मंडळातील सदस्य आनंद कुलकर्णी, सुनील रेडेकर, राजेंद्र कडुस्कर, रमेश कुलकर्णी, डॉ. राजेंद्र कांबळे यांच्यासह सल्लागार व कार्यकारी मंडळाचे सदस्य, माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

पुण्यातील नामांकित कायदेतज्ज्ञ ऍड. श्रीकांत कानेटकर, माजी विद्यार्थी न्यायाधीश श्रीपाद देशपांडे, संस्थेच्या सल्लागार मंडळाचे सदस्य डॉ. सतीश देसाई यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी, देणगीदार यांनी संस्थेला वर्धापनदिनाच्या निमित्ताने देणगी देऊन उपकृत केले. हा सोहळा पुणे विद्यार्थी गृहाच्या सदाशिव पेठेतील मुख्यालयात झाला. वर्धापनदिनाच्या निमित्ताने ११ व १२ मे या दोन दिवशी संस्थेत आयोजित निवासी संमेलनात राज्यभरातील ९५ वर्षे वयापर्यंतचे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.

धानोरी ते चऱ्होली डी. पी. रस्त्यासाठी वनविभागाची परवानगी मिळावी; आमदार बापूसाहेब पठारे यांची मागणी

सद्यस्थितीला रस्ता नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय; पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यासाठी तातडीने परवानगी द्यावी

मुंबई: धानोरी ते चऱ्होली प्रस्तावित डी. पी. रस्त्यासाठी आवश्यक असलेली वनविभागाची परवानगी तातडीने मिळावी, अशी मागणी आमदार बापूसाहेब पठारे यांनी महाराष्ट्र राज्य वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. पठारे यांनी भेट घेऊन निवेदन दिले.

धानोरी सर्व्हे नंबर ५ ते चऱ्होली हद्द या दरम्यानच्या डी. पी. रस्त्याचे काम पुणे महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आले आहे. मात्र, प्रस्तावित मार्गिकेतील काही भाग वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्या ठिकाणी ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे रस्त्याच्या कामात अडथळा येत आहे व नागरिकांना यामुळे मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे.

या संदर्भात बोलताना आमदार पठारे म्हणाले, “धानोरी, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, कळस, येरवडा, लोहगाव व चऱ्होली या भागातील रहिवाशांसाठी धानोरी ते चऱ्होली जोडणारा हा रस्ता खूप महत्त्वाचा आहे. सद्यस्थितीत पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. पावसाळा जवळ आल्याने हा रस्ता तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे.”

वनमंत्री गणेश नाईक यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संबंधित वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लवकरात लवकर या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिल्याचे आमदार पठारे यांनी सांगितले.

बी.एससी-एचएचए अभ्यासक्रमाकरीता ३१ मेअखेर अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि.13: नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, नोएडा, आयएचएम यांच्या वतीने एनसीएचएमसीटीशी संलग्न असलेल्या आयएचएम सोलापूर येथे बी.एससी-एचएचए (हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन) अभ्यासक्रमाच्या प्रवेश घेण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ३१ मे २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाकडून कोणत्याही विद्याशाखेत १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. इयत्ता बारावीत इंग्रजी विषय घेऊन परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. प्रवेशाकरिता वयाची अट नाही. प्रवेशासाठी सरकारी नियमांनुसार आरक्षण राहील. हा अभ्यासक्रम जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून मान्यताप्राप्त असून विद्यापीठाकडून अंतिम पदवी प्रदान करण्यात येईल.

इच्छुक उमेदवाराने दाखल्यांच्या प्रती जोडून संस्थेत अर्ज करावा. अर्ज पोस्टाने किंवा वर नमूद केल्याप्रमाणे ईमेलद्वारे देखील पाठवता येतील. प्रवेश अर्ज आणि इतर तपशील https://ssmihm.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीकरीता मृणाल एम ९७६७२५७०२१ यांच्याशी संपर्क साधावा.

एनसीएचएमसीटीद्वारे घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जाईल. याबाबतच्या तारखा पात्र अर्जदारांना कळविण्यात येतील. लेखी परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती मिळविण्यासाठी उमेदवारांनी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे विभागीय पर्यटन कार्यालयाच्या उप संचालक शमा पवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

चाटेंच्या विद्यार्थ्यांची यंदाही दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी – प्रा.फुलचंद चाटे

पुणे -फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी बोर्ड परीक्षेमध्ये चाटे शिक्षण समुहाच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश मिळाले आहे.महाराष्ट्रातील चाटे शिक्षण समुहाचा प्रत्येक विद्यार्थ्यी हा आजच्या दिवसाची वाट आतुरतेने बघत होता.कारण आत्मविश्वास सांगत होता.चाटे म्हणजे यश आणि यश म्हणजे चाटे हे समीकरण साध्य करण्यासाठीच.आज दहावीचा निकाल लागल्यानंतर चाटे शिक्षण समुहाने सातारा रोड चाटे कोचिंग क्लासेस च्या शाखेवरती सत्कार समारंभ आयोजित केला होता. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे .प्रा.फुलचंद चाटे यांनी अभिनंदन केले, या वेळी प्रा विजय बोबडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. दुपारी एक वाजत निकाल पाहिल्यानंतर चाटेंच्या प्रत्येक पालकांच्या चेहर्‍यावरील स्मितहास्य हेच सांगत होते कि चाटेंचा पॅटर्न सक्सेसफुल झाल्यामुळेच आपल्या पाल्याचा निकाल उत्तम लागला आणि स्वप्नाची सुरूवात छान झाली.आजच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी एस.एस.सी बोर्ड चे उपस्थित गुणवंत विद्यार्थी पर्नवी कुलकर्णी 99.60% तेजस्वी सावंत 98.40% जाधव श्लोक 98.00% यदित काळे 97.80% बर्नवाला त्वीषा 97.80 अनुज तांबे 97.80 शिंदे दुर्वेश मुक्ता देशमुख 97.00% 96.40% दिक्षीत इशान 96.40% फाटक जाई 96.40% तनिष नलगे 95.80 मृनाली गावडे 95.80% सिध्दी तळे 95.60% पियुषा नाईक 95.60% व सी.बी.एस.ई बोर्ड मधून सृष्टी वाडकर 95.08% गार्गी घुटे 94.60%
सावरदा ठाकरे 94.40% आयुष इंगळे 94.00% पुजा भोसले 93.60% अनिल कोल्हे 93.40% प्रज्वल जाधव 93.40% ओंकार सोनाकुल 93.00% सिंग सजल 92.80% अहिरराव इशान 92.40% बांगल पृथ्वीराज 92.40% तांबे ॠतुपर्ण 91.20% ताजवे सई 91.20%
यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

चाटे शिक्षण समुहाचे पुणे विभागीय संचालक प्रा.फुलचंद चाटे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालक वर्ग यांना अभिनंदन करून दहावी नंतर पुढे काय? याबद्दलही मार्गदर्शन केले.आजचे हे सक्सेस हे एक/दोन दिवसांचे नसून नववी पासूनच शिक्षकांनी करून घेतलेली मेहनत आहे व तुमच्यासारख्या पालकांनी दिलेली प्रेरणा आहे.त्यामुळे चाटे पॅटर्न आज फलित ठरला आहे.आजच्या निकालावरती न थांबता लगेच पुढचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी अकरावी/बारावी नंतर च्या प्रवेश प्रक्रियेच्या तयारीला सर्वानी तयारीला लागणे गरजेचे आहे.कारण दहावीच्या परीक्षेपेक्षा जेईई नीट सीईटी अशा उच्च शिक्षणासाठीच्या स्पर्धेत्मक परीक्षेचा पॅटर्न वेगळा असतो.अकरावी व बारावी साठी वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या घराजवळील आणि ज्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेची तयारी करून घेतली जाते अशाठिकाणी अकरावी सायन्स चा प्रवेश घेणे गरजेचे आहे. मित्र किंवा नातेवाईक म्हणतात म्हणून नव्हे तर आपल्या आवडीनुसार विषय व दिशा ठरवा.प्रत्येकाला जीवनाच्या प्रवासात पुढे जायचे असेल तर आपण काय करणार आहोत हे अगोदर निश्चित केले पाहीजे.त्यासाठी प्रथम स्वत:ला ओळखा स्वत: मधील गुण ओळखा सकारात्मक विचार करा.स्वप्न साकार करण्यावर भर द्या वेळ कोणासाठी थांबत नाही त्यासाठी परीक्षेच्या काही दिवस अगोदर अभ्यास करण्यापेक्षा आतापासूनच दोन वर्ष अभ्यास करा प्रत्येक दिवस आपला आहे असं समजून तयारीला लागा यश तुमचेच आहे कारण तुमच्यासोबत चाटे शिक्षण समूह आहे चाटे शिक्षण समूह आहे.राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षा व त्याचा अभ्यासक्रम इंजिनिअरिंग मेडिकल व विज्ञान शाखेतील शिक्षण आणि अकरावी बारावी सह जेईई नीट सीईटी एनडीए यासारख्या परीक्षेनंतर देशातील नामांकित संस्था आयआयटी एनआयटी बीआयटी व्हीआयटी आयआयएससी आयआयएसईआर एनआयएसईआर याबाबत ही पालकांना मौलिक मार्गदर्शन केले.चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष गोपीचंद चाटे सर यांनी फोनद्वारे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आजच्या सत्कार समारंभ प्रसंगी सातारा रोड बालाजी नगर शाखेवरती पुणे विभागीय व्यवस्थापक प्रा.विजय बोबडे सर, प्राचार्य नवनीत राजपाल ,रणजीत जगताप , नामदेव माने शाखा व्यवस्थापक रत्नाकर सोनवणे श्री अनंतराव इंगळे विष्णु पालवे , प्रविण जावळे प्रा.सचिन ढाकणे, महेश ढबाले , गणेश ढाकणे, प्रा.प्रशांत जाधव इतर पुण्यातील सर्व शाखा व्यवस्थापक व आदी शिक्षक शिक्षिकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.

भरत नाट्य मंदिरातील तंत्रज्ञांचा सत्कार

पुणे : भरत नाट्य मंदिरात वर्षानुवर्षे नेपथ्य, प्रकाश योजना, कपडेपट तसेच तिकिट विक्रीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या पडद्यामागील तंत्रज्ञांचा आज (दि. 13) रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
निमित्त होते ते 33व्या वासंतिक नाट्य महोत्सवाच्या समारोप सोहळ्याचे. भरत नाट्य संशोधन मंदिराची निर्मिती असलेल्या ‌‘कट्यार काळजात घुसली‌’ या नाटकाने महोत्सवाचा समारोप झाला.
रंगमंचावर अभिनय करणारे कलाकार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, पेहरावात दिसतात. रंगमंचावरील कलाकारांच्या पाठीमागे असलेले नेपथ्य तसेच प्रसंग उठावदार करणारी प्रकाशयोजना प्रेक्षकांना भुरळ घालते. कलाकारांच्या जोडीने तंत्रज्ञ आणि पडद्यामागील सहाय्यकांमुळे नाटकामध्ये अनोखे रंग भरले जातात. पडद्यामागे झटणाऱ्या तंत्रज्ञांना प्रेक्षकांसमोर येण्याची कधी संधी मिळत नाही. ही संधी भरत नाट्य संशोधन मंदिराच्या व्यवस्थापनाने आज त्यांचा जाहीर सत्कार करून अनोख्या पद्धतीने दिली. उपस्थित प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या गजरात पडद्यामागील कलाकारांचे कौतुक केले. विठ्ठल हुलावळे, रामचंद्र घावारे, जितेंद्र सुतार, अभिजित गायकवाड, शंतनू कोतवाल, विनायक कापरे, सुधीर फडतरे, पुष्कर केळकर, नरेंद्र वीर, संदीप देशमुख, राकेश घोलप आणि गणेश भोसले यांचा सत्कार भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कार सोहळ्याची संकल्पना कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी विशद केली.

महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचालित शाळांचा उज्ज्वल निकाल – गुणवत्तेची परंपरा कायम 

पुणे – महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचालित शाळांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे. पुणे, कोळविहिरे, कोंढवा आणि बारामती येथील चारही शाखांचा निकाल अत्यंत समाधानकारक लागला असून विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षकांचे परिश्रम अधोरेखित करणारा ठरला आहे.

अशोक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, टिळक रोड, पुणे या शाळेचा निकाल 93.33 टक्के लागला आहे.

या शाळेतील नाईक शौर्या पुष्कर हिने 97.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

गायकवाड आरव किशोर (90.80%) आणि देशपांडे विहान विशाल (90.20%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला.

या यशाबद्दल मुख्याध्यापिका उर्मिला केशव भोसले यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

महर्षी वाल्मिक विद्यालय, कोळविहिरे या ग्रामीण भागातील शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यार्थिनी मस्के नम्रता रोहिदास हिने 83 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

या यशामागे शाळेच्या शिक्षकवृंदासह मुख्याध्यापक अशोक चव्हाण यांचे मोलाचे योगदान आहे.

जडाबाई दुगड विद्यालय, कोंढवा या शाळेने 94.18 टक्के निकालाची नोंद करत उत्तम कामगिरी बजावली आहे.

मुख्याध्यापिका जयश्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली शाळेने हे यश संपादन केले.

शारदा निकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, बारामती या शाळेने 100 टक्के निकालाची नोंद केली असून विद्यार्थिनी खक्कल प्रतीक्षा महेश हिने 81.5 टक्के गुण मिळवत यश मिळवले आहे.

मुख्याध्यापक खान शबान यांचे मार्गदर्शन शाळेच्या गुणवत्तापूर्ण यशामागे आहे.

या सर्व यशस्वी निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. मोहनदादा जोशी, सचिव प्रसाद आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, संचालक गौरव आबनावे व प्रज्योत आबनावे यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व मुख्याध्यापकांचे अभिनंदन केले.

 संस्थेचे सचिव प्रसाद आबनावे यांनी याप्रसंगी सांगितले, “निकाल ही केवळ शैक्षणिक टक्केवारी नव्हे, तर संस्थेच्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीचे प्रतीक आहे. हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच शिक्षक व शाळा व्यवस्थापनाच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.”* 

या यशस्वी निकालामुळे मंडळाच्या शाळा गुणवत्तेच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत असल्याचा विश्वास पालक व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

पाकचे २ तुकडे झालेच असते ,पण .. मोदींनी घात केला, सैन्याला थांबविले..ट्रम्प यांच्यामुळे त्यांनी शेपूट घातले- संजय राऊतांची टीका


मोदी-शहा फक्त राजकीय पक्ष तोडू शकतात, पाकिस्तान नाही:तशी त्यांच्यात हिंमतच नाही, संजय राऊत यांची टीका

मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कालचे भाषण हे राष्ट्र प्रमुखांचे भाषण नव्हते. एकिकडे आमचे सैन्यदल, हवाई दल, नौदल पूर्णपणे पाकिस्तान तोडण्याच्या तयारीमध्ये असताना, मोदींनी त्यांचा घात केला, त्याना थांबवण्यात आले. वास्तविक पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे झाले असते. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

मात्र, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे ईडी आणि सीबीआयच्या मदतीने केवळ राजकीय पक्ष तोडू शकतात. त्यांची तेवढीच लायकी आहे. केवळ पक्ष तोडणे आणि पक्ष विकत घेणे एवढेच काम ते करु शकतात. पाकिस्तान तोडण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. हिंमत असती तर पुढच्या दोन दिवसांमध्ये पाकिस्तान तुटला असता, आमच्या सैनिकांची तशी तयारी होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे त्यांनी शेपूट घातले, असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

भारताच्या तिरंग्याला हात लावण्याची त्यांची लायकी नाही. त्यांनी अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा. आता हे तिरंगा यात्रा काढायला निघाले आहेत. भारतीय जनता पक्षाने आता अमेरिकेचा झेंडा हातात घ्यावा आणि मोदी बरोबर ट्रम्प यांचा फोटो लावून तिरंगा यात्रा काढावी. असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. आता सावरकरांचे नाव घेण्याचा अधिकार त्यांना नाही. कारण अखंड हिंदुस्तानाचे वीर सावरकर यांचे स्वप्न साकार करण्याची यांच्याकडे संधी होती. मात्र त्यांनी ते पूर्ण केले नाही. त्यांनी केवळ व्यापार केला. त्यांनी गौतम अदानी, अंबानी यांच्यासाठी व्यापार केला, असा आरोप राऊत यांनी केला. त्यांच्यासाठी व्यापार मोठा आहे, देश मोठा नाही. भविष्यात हे सर्व सौदे बाहेर येतील, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषद आहे. ते या गोष्टी बोलणारच असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे.

संरक्षण संदर्भात चर्चा करताना कोणत्याही मर्यादा येत नाहीत. जर आमच्या देशाने गुडघे टेकले आहेत. आमच्या देशाचे नेतृत्व ट्रम्प करणार असतील तर त्याविषयी आम्ही चर्चा करणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी संरक्षण विषयी प्रश्नावर अधिवेशनात चर्चा करता येणार नसल्याचे म्हटले होते. त्याबद्दल संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शरद पवार अजूनही अंधारात आहेत. त्यांची राष्ट्रभक्ती वेगळे आहे आणि आमची राष्ट्रभक्ती टोकाची असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला देश विकला असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? हा विषय चर्चेचा नाही. त्यामुळे मी त्याविषयी काही बोलणार नाही. राज ठाकरे यांनी भूमिका व्यक्त केली होती. त्याला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता राज ठाकरे यांच्या दुसऱ्या प्रतिसादाची आम्ही वाट पाहत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्ही शांत असल्याचे देखील ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या पक्षातील इतर नेते काय म्हणत आहेत? त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आम्ही राज ठाकरे यांना मानतो. राज ठाकरे यांच्या बोलण्याचा अर्थ आम्ही वेगळा घेतला असे त्यांचे नेते म्हणत असतील तर ते राज ठाकरे यांनी स्पष्ट करावे. आम्ही केवळ लोक भावनेचा आदर केला आहे. आमचे मन खुले आहे. आमचे मन प्रभु रामाचे आणि हनुमानाचे मन आहे. मोकळ मन असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सारस बाग,पेशवे उद्यान.. पुण्यातील पर्यटन स्थळांचा सर्वनाश होताना पहा निमुटपणे…

पुणे-छोटेसे प्राणी संग्रहालय , फुलराणी,नौका विहाराचे तळे, आणि बाजूला मोठ्ठी प्रशस्त सारस बाग .. पुण्याचे आणि पर्यटकांचे आकर्षण म्हणून इतिहासात नोंद असलेली सारस बाग आज जॉगिंग ट्रक म्हणूनही वापरणे सोयीचे ठेवलेले नाही . सणस मैदानावर भरणारी सर्कस तर लुप्तच झाली . पण हा परिसर एकूणच अतिक्रमणे आणि आरोग्य विषयक प्रश्नांनी ग्रासला आहे आणि इथले ऐतिहासिक पर्यटन स्थळ नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचले आहे. महापालिकेने या भागाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करायचा अशा दृष्टीकोनातून न पाहता , आजी माजी लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांच्या पोटापाण्याची सोय म्हणूनच याकडे पाहून या पर्यटन स्थळाचा नाश चालविला आहे. इथले सर्व व्यावसायिक गरीब पोटार्थी नाहीत , कोणीही हातावर पोट असलेला नाही .पण त्यांच्यासाठी महापालिका आजवर पायघड्या घालीत आली आहे.आणि त्यांच्यामुळे सारस बागेची शान लयाला चालली आहे.


दररोज बागेत सकाळी फिरायला येणारे ५९ वर्षीय रहिवासी नितिन काकडे म्हणाले, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सनी पदपथावर अतिक्रमण केले आहे टेबल आणि खुर्च्या ठेवण्यासाठी त्यापलीकडेही वाढ केली आहे. योग्य ड्रेनेज नाही. रात्री जेव्हा ते त्यांचे स्टॉल धुतात तेव्हा घाणेरडे पाणी थेट रस्त्यावर येते. यामुळे केवळ दुर्गंधी निर्माण होत नाही तर अरुंद रस्त्यामुळे वाहनांनाही धोका निर्माण होतो. लोक त्यांचे दोन्ही बाजूला वाहने पार्क देखील करतात.पुण्याच्या प्रमुख ऐतिहासिक बागांपैकी एक असलेल्या सारस बाग येथे अतिक्रमण, देखभालीचा अभाव आणि खराब स्वच्छता यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकां मध्ये चिंता निर्माण झाली आहे, ज्यामुळे पुणे महानगरपालिकेची (पीएमसी) पर्यटन स्थळांच्या जतनाबद्दलची उदासीनता दिसून येते.नानासाहेब पेशवे यांनी बांधलेले आणि पर्वतीच्या पायथ्याशी असलेले सारस बाग हे शहराच्या मध्यभागी एक प्रमुख आकर्षण आहे. तथापि, नागरिकांचा आरोप आहे की त्याची बिकट स्थिती डोळ्यांना त्रास देणारी आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी आहे. मुख्य प्रवेशद्वार आहे खराब स्थिती, जवळच्या रस्त्यावर अन्नपदार्थांच्या दुकानांनी अतिक्रमण केले आहे, ज्यामुळे पर्यटकांना अरुंद आणि अस्वच्छ रस्त्यांवरून जावे लागते.

“ते ठिकाण पवित्र आहे, आणि तरीही तिथे खूप घाण आहे. बागेत कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ते पर्यटकांना घाबरवतात आणि चावतातही. संपूर्ण रस्त्यावर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे आणि लोकांना मोकळेपणाने चालण्यासाठी जागा नाही.अशाच भावना शुक्रवार पेठेतील रहिवासी अजित शाह जे दररोज सारसबाग गणपतीला प्रार्थना करण्यासाठी सारसबागला भेट देतात त्यांनी व्यक्त केली आहे


“खाण्यापिण्याच्या दुकानांनी आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांनी फूटपाथवर अतिक्रमण केले आहे आणि त्यांचे टेबल आणि खुर्च्या ठेवण्यासाठी त्यापलीकडेही विस्तार केला आहे. योग्य ड्रेनेज नाही. रात्री, जेव्हा ते त्यांचे स्टॉल धुतात तेव्हा घाणेरडे पाणी थेट रस्त्यावर येते.-प्रेमा देव , वय ५०, मॉर्निंग वॉकर

“संपूर्ण रस्ता दुकानदारांनी अतिक्रमित केला आहे आणि लोकांना मोकळेपणाने चालण्यासाठी जागा नाही. अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी.”
-अरूण गुजराथी , वय ७२ , रा. बिबवेवाडी.

सर्व प्रतिक्रिया -Rajvant Singh

आता बोला..:नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमला गवई यांनाही EVM वर नाही विश्वास,म्हणाल्या,’निवडणूक बॅलेट पेपरवरच घ्या

मुंबई-देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती बी आर गवई यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली. तत्पूर्वी, त्यांच्या मातोश्री कमला गवई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ईव्हीएमपेक्षा बॅलेट पेपरवर निवडणूक घेणे केव्हाही चांगले असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.देशातील काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष देशात मतपत्रिकेवर अर्थात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत. त्यातच अमेरिकन गुप्तहेर संघटनेने ईव्हीएम हॅक होऊ शकते असे निरीक्षण नोंदवल्याने भारतातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या मातोश्री कमला गवई यांना ईव्हीएमच्या मुद्यावर नव्या सरन्यायाधीशांनी एखादा निर्णय घेतला पाहिजे का? असा प्रश्न केला होता. त्यावर बोलताना कमला गवई यांनी आपले वरील प्रांजळ मत व्यक्त केले.

त्या म्हणाल्या, मी नव्या सरन्यायाधीशांची आई आहे. पण तो त्या खुर्चीत बसल्यानंतर त्याला योग्य वाटेल तोच निर्णय घेईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लोकांनाच केंद्रस्थानी ठेवले आहे. त्यामुळे लोकांमधील एक व्यक्ती म्हणून मी तुम्हाला काय सांगणार आहे हे माहिती आहे. पण तुमची इच्छाच असेल तर बॅलेट पेपर केव्हाही चांगले आहे. पूर्वी देखील बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हायच्या.

कमला गवई यांनी यावेळी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या बालपणीच्या आठवणीही सांगितल्या. घरातील ज्येष्ठ मुलगा असल्यामुळे भूषण लहान वयातच परिपक्व झाला. 1971 साली झालेल्या भारत-पाक युद्धावेळी अमरावतीच्या फ्रेजारपुरा भागात आम्ही सैनिकांसाठी भाकऱ्या बनवायला मदत केली होती, असे त्या म्हणाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना आज आपल्या पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली.

न्यायमूर्ती भूषण गवई यांचे वडील रा.सू. गवई हे आंबेडकरी चळवळीतील काही प्रमुख नेत्यांपैकी एक होते. त्यांनी अमरावतीच्या खासदारकीसह बिहार, सिक्कीम व केरळ राज्याचे राज्यपालपदही भूषवले होते.

लोकअदालतीमध्ये वीजबिलांसंबंधी दीड कोटींचे ३४१ प्रकरणे निकाली

पुणे, दि. १३ मे २०२५: महावितरणच्या पुणे परिमंडलमधील १ कोटी ४५ लाख ५८ हजार ८६ रुपयांच्या थकीत वीजबिलासंबंधी न्यायप्रविष्ट असलेली ३४१ प्रकरणे नुकत्याच झालेल्या येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली निघाली आहेत. यामध्ये दोन वीजचोरीच्या प्रकरणांतील वीजबिल व तडजोड शुल्काच्या ५९ लाख २७ हजार रुपयांचा समावेश आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाच्या वतीने आयोजित नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पुणे परिमंडलातील थकीत वीजबिलांबाबत न्यायप्रविष्ट असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक रास्तापेठ मंडलमधील ६५ लाख २५ हजार ९५६ रुपयांची २६६ प्रकरणे, पुणे ग्रामीण मंडलमधील ४३ लाख ६५ हजार रुपयांची ४२ तर गणेशखिंड मंडलमधील ३६ लाख ६७ हजार रुपयांची ३३ प्रकरणे असे एकूण १ कोटी ४५ लाख ५८ हजार रुपयांचे ६७० प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच कलम १३५ अन्वये दोन वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये वीजबिल व तडजोड शुल्कापोटी एकूण ५९ लाख २७ हजार रुपयांचा भरणा केला.

या लोकअदालतमध्ये महावितरणकडून प्रभारी विधी सल्लागार श्री. दिनकर तिडके, विधी अधिकारी नीतल हासे, गणेश सातपुते, अंजली चौगुले यांच्यासह अभियंते, लेखा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

‘तिची गोष्ट’ सांगण्यासाठी आले एकत्र…

कलाप्रेमींना उत्तम ते देण्याचा आमचा मानस – गौरी कालेलकर-चौधर

कलेचे माध्यम कोणतेही असो नवीन, सर्जनशील विचारांची निर्मिती आणि त्याची देवाणघेवाण होणे गरजेचे असते. नवनवीन कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ घडत जातात तेव्हाच सर्जनशीलतेला वाव मिळत असतो. मनोरंजनविश्वात आपला ठसा उमटवत काहीतरी वेगळं करू पाहणारी अशीच काही मंडळी एकत्र आली आहेत.

कै.मधुसूदन कालेलकर हे नाव कलाप्रेमींसाठी नवं नाही. ख्यातनाम नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य / चित्रपट निर्माता अशा बहुविध भूमिकेतून रसिकांना अखंड रिझवणारे ज्येष्ठ लेखक कै.मधुसूदन कालेलकर यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत त्यांच्या नातीने गौरी कालेलकर-चौधरी आणि तिचे पती सिद्धेश चौधरी यांनी  ‘मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन्स’ या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. कलासंस्कृतीचे व्रत जोपासणाऱ्या या निर्मिती संस्थेने, संस्थेचे सदस्य परी तेलंग आणि शंतनू तेंडुलकर ह्यांच्या सहकार्याने व ‘थिएटरऑन एंटरटेनमेंट’ आणि ‘पी एस डी जी स्टुडिओज प्रोडक्शन’ यांच्या साथीने “एक तिची गोष्ट” रंगमंचावर आणली आहे.

११ मे ला ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ मध्ये झालेल्या शुभारंभाच्या प्रयोगाला नाट्यरसिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नृत्य,संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली “एक तिची गोष्ट” चे  पुढील प्रयोग शनिवार १७ मे पुण्याच्या भारत नाट्य मंदिर येथे रात्रौ ९.३० वा. आणि शनिवार २४ मे रात्रौ ८.३० वा. श्री शिवाजी  मंदिर दादर येथे होणार आहेत. 

मनमोहक नृत्य, त्याला अर्थपूर्ण संगीताची आणि उत्तम अभिनय, निवेदनाची जोड मिळाल्यावर उभी राहणारी सुंदर कलाकृती आनंदाची अनुभूती देऊन जाते,  हीच  अनुभूती “एक तिची गोष्ट” च्या माध्यमातून नाट्यरसिकांना मिळणार आहे. या सृजनशील कलाकृतीचं खास आकर्षण म्हणजे फुलवा खामकर आणि त्यांची मुलगी आस्मा खामकर यांच्या नृत्याची अदाकारी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी, सूरज पारसनीस यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.आर्या आंबेकर, वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे  यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. संगीत निषाद गोलांब्रे यांचे आहे. चाळीशीतली अनया आणि तिच्या आयुष्यात आलेली एक किशोरवयीन मुलगी या दोघींच्या भावविश्वातून या नृत्यनाटिकेची कथा उलगडते.  

येत्या काळात मराठी कला, साहित्य आणि संस्कृती सर्वदूर पोहोचवणं हे  ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’चं उद्दिष्ट असल्याचं गौरी कालेलकर-चौधरी यांनी स्प्ष्ट केलं. भविष्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या व विषयाच्या माध्यमातून सांस्कृतिक उपक्रम राबवणार असून ज्यात कला संस्कृतीपासून तरुणांच्या कल्पनाशक्तीला, सृजनशक्तीला वाव देण्याचा प्रयत्न असल्याचे गौरी कालेलकर-चौधरी यांनी सांगितले.

ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा परिपूर्ण तात्विक जीवन जगल्या: ॲड.आशिष शेलार

ज्येष्ठ गायिका पद्मश्री श्रीमती माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच. यंदाचे वर्ष ‘माणिक वर्मा फाउंडेशनच्या सौजन्याने’ ‘माणिक स्वर शताब्दी’ २०२४-२०२५ म्हणून साजरं केलं जाणार आहे. त्या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमाचे उदघाटन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार आणि अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी केले. गायिका राणी वर्मा यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी माणिक वर्मा फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभाग यांच्या विद्यमाने ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्यावरील श्रीमती शोभा बोंद्रे लिखित आणि राजहंस प्रकाशित ‘माणिक मोती’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकात खुद्द माणिकताईंनी आपल्या संगीत कारकीर्दीविषयी सांगितलेल्या आठवणी आहेत. या आठवणी या पुस्तकात क्यूआर कोडच्या सहाय्याने गायिका राणी वर्मा यांनी वाचकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. हे पुस्तक केवळ पुस्तक नाही तर आईच्या आठवणींचा पेटारा आहे अशा शब्दांत मनोगत व्यक्त करताना, या पुस्तकासाठी हातभर लागलेल्या सर्व मंडळींचे आभार गायिका राणी वर्मा यांनी मानले.

ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर नजर टाकली तर असंख्य पैलू आपल्याला दिसतील. ‘परिपूर्ण तात्विक असं जीवन गायिका माणिक वर्मा या जगल्या ‘माणिक मोती’ या पुस्तकातून त्यांच्या जीवनाचे हे सार फार सुरेखरित्या उलगडण्यात आलं असल्याचं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी याप्रसंगी केले’. 

‘कलाकार म्हणून एकमेव’ असं माणिक वर्मा यांचं व्यक्तिमत्व असल्याचा गौरव लेखिका शोभा बोंद्रे यांनी यावेळी केला. ‘भारतात जो पर्यंत संगीत जिवंत आहे तोपर्यंत दैवी गायिका असलेल्या माणिक वर्मा यांचे नाव जिवंत असणार असं सांगत,माणिकताई यांच्या गाण्याबद्दलच्या अनेक आठवणी अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी यावेळी सांगितल्या’. 

एका पेक्षा एक अमूल्य अशा गीतांचा नजराणा सादर करणाऱ्या गायिका माणिक वर्मा या मला सर्वश्रेष्ठ वाटत आल्या आहेत. माणिक वर्मा यांच्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले याचा आनंद व्यक्त करताना लेखक अच्युत गोडबोले यांनी या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा दिल्या. विकास कशाळकर, चैतन्य कुंटे, शैला दातार, यांनीही माणिक वर्मा यांच्या आठवणींना उजळा दिला.

माणिकताईंच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्याबरोबरच ‘हसले मनी चांदणे’ हा माणिक वर्मा यांच्या गीतांचा खास कार्यक्रम  संगीतकार कौशल इनामदार आणि त्यांच्या  सहकाऱ्यांनी सादर केला. माणिक वर्मा यांच्या गीतांची झलक यावेळी उपस्थितांची दाद मिळवून गेली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिरा गुजर यांनी केले. राणी वर्मा, वंदना गुप्ते, भारती आचरेकर,अरुणा जयप्रकाश या माणिक वर्मा यांच्या चारही कन्या यावेळी उपस्थित होत्या. 

१६ मे ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा जन्मदिवस असून याप्रसंगी ख्यातनाम शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांना ‘माणिक रत्न’ पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार तालयोगी प. सुरेश तळवलकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. याच दिवशी चौरंगचे अशॊक हांडे आणि माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे माणिक वर्मा यांच्या जीवनावरील ‘माणिक मोती’ हा कार्यक्रम यशवंत नाट्यगृह येथे सायंकाळी ७.३०वा. सादर होईल. हा कार्यक्रम ‘महाराष्ट्र स्टेट  रोड  डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी पुरस्कृत केला आहे. माणिक वर्मा यांच्या जन्म शताब्दीवर्षा निमित्ताने यंदा माणिक वर्मा फाउंडेशनतर्फे वेगवेगळ्या सांगीतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.