Home Blog Page 3118

5000 रुपयांचे त्वरित कर्ज आता मिळणार मोबिक्विक ॲपवर…

बजाज फिनसर्व्हच्या भागीदारीसह नवीन उपक्रम

 नवीदिल्ली- मोबिक्विक, भारतातीलसर्वांत मोठ्या डिजिटल वित्तीय सेवा मंचने आज भारतातील अत्यंत वैविध्यपूर्ण एनबीएफसी असलेल्या, बजाज फिनसर्व्हसोबत भागीदारीने आपल्या अ‍ॅपवर रु. 5000चे त्वरित कर्जप्राप्तकरण्याची घोषणा केली आहे. लाखो भारतीयांना सहज आणि त्वरित पत पुरवण्याच्या मोबिक्विकच्या ध्येयासह संरेखित असलेले, हे अशाप्रकारे पहिले पत वितरण उत्पादन आहे. हे उत्पादन देशामधील लाखो नवीन पत (एनटीसी) ग्राहक तसेच लहान व्यवसायिकांना लक्ष्य ठेवून तयार केले गेले आहे. बिलभरणा, कॅब बिल तसेच ऑफलाईन आणि ऑनलाईन व्यापार्‍यांना पेमेंट सारख्या विविध प्रकारच्या पेमेंटसाठी अ‍ॅपयुजरद्वारे जमा झालेल्या रकमेचा वापर केला जाऊ शकतो.

 बिलांचा निपटारा करणे, जेवण, किराणा यांसारखे दैनंदिन व्यवहार करण्यासाठी ऑफलाईन व्यापार्‍यांना पेमेंट करणे तसेच इतर पेमेंट करण्यासाठी त्वरित पेमेंट करण्याच्या आवश्यकता पूर्ण करू शकतात अशा लहान पत उत्पादनांना फार जास्त मागणी आहे. मोबिक्विकनिर्विघ्न अनुभव प्रदान करणार्‍या आणि आपल्या अ‍ॅपवर 3 साध्या टप्प्यांचे पालन करूनकेवळ10 सेकंदाच्या कालावधीमध्ये त्वरित पत वितरण करण्यास सक्षम बनवणार्‍या या महत्त्वपूर्णउत्पादनाची सुरुवात करून या समस्येला संबोधण्याचा प्रयत्न करत आहे.

या घोषणेबाबत बोलताना, श्रीम. उपासना टाकू, सह-संस्थापक आणि संचालक, मोबिक्विक म्हणाल्याकी, “लहान रकमेसाठी त्वरित पत ही प्रचंड मोठी न वापरलेली संधी आहे. या वर्षी स्मार्टफोन युजरचेप्रमाण अंदाजे 16% नी वाढण्याच्या आणि वर्षाला ऑनलाईन व्यवहारांचा यूजरपाया 30% हून अधिक वाढण्याच्या अपेक्षेसह, आजपर्यंत पतपर्यंत पोहोच नसलेल्या नव्या ग्राहक वर्गापर्यंत आम्ही पोहोचू शकू हा आम्हाला विश्वास आहे. आम्ही यापूर्वीच देशभरामध्ये लाखो ग्राहकांसाठी रु. 3500 कोटींची कर्जे पूर्व मंजूर केली आहेत. पत ही लक्षावधी-डॉलर्सची संधी आहे आणि आम्ही वैयक्तिक आणि व्यवसायिक युजरच्याव्यापक श्रेणीदरम्यान कमी रकमेच्या त्वरित पत आवश्यकतेला पूर्ण करण्यासाठी सारख्या उत्पादनांची सुरुवात करण्यावर कार्यरत आहोत.”

बजाज हा मोबिक्विकसाठी महत्त्वपूर्ण भागीदार आहे. मागच्या वर्षी मोबिक्विक आणि बजाज फिनसर्व्हने धोरणात्मक भागीदारीमध्ये प्रवेश केला होता आणि येणार्‍या 12 महिन्यांमध्ये यांनी  रु. 1 लाख कोटींची रक्कम असलेले डिजिटाईज पत निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भागीदारीचा भाग म्हणून, मोबिक्विक आणि बजाज फिनसर्व्हने, त्यांची कर्ज देणारी बाजू म्हणून बजाज फायनान्स लिमिटेडद्वारे मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ’बजाज फिनसर्व्ह वॉलेट’ मोबाईल ॲप सुरू केले होते. बजाज फिनसर्व्ह वॉलेट हे डिजिटल ईएमआय कार्डसोबत पूर्व-भारीत होऊन येते याचा अर्थ ग्राहकाला भौतिक कार्ड सोबत ठेवणे गरजेचे नसते. हे फसवेगिरीच्या व्यवहारांविरुध्द सुरक्षा प्रदान करते आणि व्यवहाराची सुगमता वाढवून कार्ड ब्लॉक किंवा अनब्लॉक करणे सहज बनवते.

 मोबिक्विकविषयी:

मोबिक्विक हेभारतातील सर्वात मोठा डिजिटल वित्तीय सेवा मंच, एकप्रमुख मोबाईल वॉलेट आणि आघाडीचे पेमेंट गेटवे आहे. मोबिक्विक ॲप हा सुमारे 3दशलक्षथेट व्यापारी आणि 260दशलक्षपेक्षा अधिक युजरचेविस्तृत जाळे असलेले आघाडीचा मोबाईल पेमेंट मंच आहे. बिपिन प्रीत सिंह आणि उपासनाटाकू यांनी सन 2009मध्ये कंपनीची स्थापना केली असून कंपनीने सेक्वाया कॅपिटल, अमेरिकनएक्स्प्रेस, ट्री लाईन एशिया, मीडियाटेक, जीएमओपेमेंट गेटवे, सिस्को इन्व्हेस्टमेंट्स नेट1आणि बजाजफायनान्स यांकडून चार फेरींचा निधी उभारला आहे.कंपनीची नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे आणिकोलकाता येथे कार्यालये आहेत. मोबिक्विक भारतातल्या डिजिटल व्यवहाराचा सर्वात मोठास्त्रोत बनण्याचेआणिसन 2022 पर्यंतअब्जावधीभारतीयांनाडिजिटलपेमेंट, कर्ज, विमाआणिगुंतवणूकीसाठीएकचमंचउपलब्धकरूनदेण्याचेउद्दिष्टठेवूनआहे.

 मोबिक्विकला ‘भागीदारीचीशक्ती’ यासंज्ञेतविश्वासअसूनसन 2017मध्येमोबिक्विकने बीएसएनएल, बजाज फिनसर्व्ह लिमिटेड आणि इंडसइंडबँक यासारख्या आघाडीच्या ब्लू-चिप ब्रँडसह एक लघु भागीदारी सुरू केली आहे. ऑगस्ट 2017मध्ये मध्ये, बीएसएनएलनेबीस्पोक मोबाईल वॉलेट सुरू करून डिजिटल क्षेत्रात आणखी एक पाऊल टाकले, जे वॉलेटमोबिक्विकद्वारे विकसित आणि पारीत करण्यात आले आहे. मोबिक्विकनेबजाज फिनसर्व्हसह भागीदारी करून भारताचे पहिले क्रेडिट वॉलेट, ईएमआयवॉलेटसुरूकेलेअसूनयामार्फतग्राहकक्रेडिट आणि लोन प्राप्त करू शकतात. मोबिक्विकने भारताचे पहिले ऑटो-लोड वॉलेट तयार केलेअसून ज्याचा लाभ इंडसइंड बँकचे 10दशलक्षपेक्षा अधिक ग्राहक घेऊशकतात. तसेच कंपनीने व्हर्च्युअल कार्डसाठी आयडीएफसी बँकसह करारही केला आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रत्यक्ष संयुक्त पाहणी

0
पुणे-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक रहिवाशी त्रस्त झाले असून याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी आज विविध खात्यातील अधिकारी आणि नागरिकांसह पाहणी  केली .
यावेळी दीर्घकालीन उपाययोजनेत डी पी रस्त्यावरून (म्हात्रे पूल ते राजाराम पूल मार्गावरून) मंगेशकर रुग्णालयात जाण्यासाठी आखण्यात आलेल्या रस्त्याचा पाठपुरावा करुन तेथून लवकरातलवकर रुग्णालयात जाण्यासाठी चा मार्ग तयार करण्यासाठी पाठपुरावा व प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले.तर तोपर्यंत येथे नागरिकांनी केलेल्या सूचना अमलात आणण्याबाबत एकमत झाले.यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक प्रभाकर ढमाले,पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी,नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,मनपाच्या पथ विभागाचे राजेश फटाले,श्री पाडळे ,अतिक्रमण विभागाचे श्री तौर,स्थानिक नागरिक रवि आठवले, दत्तात्रय आठवले,सौ मधुरा रानडे(संदीप सो.च्या अध्यक्ष)सौ विभावरी ठकार( सेक्रेटरी,एरंडवणे सोसायटी.)विवेकानंद सोसायटीचे श्री आमोद प्रधान,श्री सदानंद ठोंबरे,श्री मेढेकर (चेयरमन )सौ वाणी
सौरभ चौधरी,संकुल सोसायटीचे डा.अलकनंदा भानू,श्री दयानंद पानसे,सुहास जोगळेकर,श्री प्रशांत वाघमारे,श्री संत,मीनल गार्डनचे सेक्रेटरी श्रीमती अनघा बेल्हेकर,श्री अमित बेल्हेकर,श्री संदीप तपस्वी,श्री चाटी,श्री गुप्ते,भाजप चे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर पदाधिकारी कुलदीप सावळेकर,बाळासाहेब धनवे,राज तांबोळी,माणिकताई दीक्षीत,सुवर्णा काकडे,संगीताताई आदवडे इ उपस्थित होते.यावेळी खालील निर्णय घेण्यात आले व त्यास नागरिक,अधिकारी,दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रतिनिधी सचिन व्यवहारे,सेवासदन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राधिका ओगले दिलासा केंद्राच्या मेघना जोशी,यांनी सहमती दर्शविल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
नेमक्या कोणत्या उपाययोजना करण्याचे ठरले ….
१) हिमाली सोसायटी ते पटवर्धन बाग रस्ता नो पार्किंग झोन करणे व वाहतूक पोलिसांना रोज कारवाई करणे शक्य नसल्याने ट्रॅफिक वार्डन व नागरिकांनी नो पार्किंग मधील वाहनांचे फोटो पाठविल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करणे.
२) रुग्णालयात व सेवासदन शाळेत येणाऱ्या नागरिकांना त्यांची वाहने आतील वाहनतळावर लावण्याबाबत प्रबोधन करणे व तसे फलक लावणे.
३) तेथील अतिक्रमणांवर कारवाई करणे.
४) रिक्षा स्टॅंड ची संख्या २० रिक्षांवरुन ५ करणे…..याचा समावेश आहे.
ह्या उपाययोजना त्वरित अमलात आणण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ही मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.

फुलपाखरूच्या सेट वर मुसळधार पावसामुळे आज शूटींग रद्द

0

झी युवा वाहिनीवरील लोकप्रिय मालिका फुलपाखरूच्या सेट वर मुसळधार पावसामुळे आज शूटींगला खाडा झाला आणि संपूर्ण टीमला एक अनपेक्षित सुट्टी मिळाली. रविवार पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालंय आणि या पावसाचा परिणाम मालिकेच्या चित्रीकरणावर देखील झाला. जोरदार पावसात प्रवास करणे सुरक्षित नसल्यामुळे फुलपाखरूच्या टीमला सुट्टी देण्यात आली.

मालिकांचं चित्रीकरण हे आठवड्यातील ७ ही दिवस १२ -१२ तास चालतं त्यात अशी अनपेक्षित सुट्टी मिळाल्यामुळे फुलपाखरूची टीम सुखावली आणि हा सुट्टीचा दिवस घरी आराम करत घालवावा कि बाहेर पावसाचा आनंद लुटावा या विचारात आहे. नक्कीच दिग्दर्शकासाठी पावसामुळे पुढे ढकललं गेलेलं शूट पूर्ण करणे ही तारेवरची कसरतच असते.

पावसामुळे मिळालेल्या सुट्टी बद्दल अभिनेत्री हृता दुर्गुळे म्हणाली, “मुसळधार पावसामुळे टीम मधील काही लोकं शूटिंगसाठी पोहोचू शकले नाहीत आणि त्यामुळे आम्हाला शूटिंगला सुट्टी देण्यात आली. लहानपणी आपण शाळेत असताना आपल्याला जोरात पाऊस पडला की सुट्टी मिळायची, मालिकेचं शूटिंग करताना तसा ऑप्शन नसतो पण आज अनपेक्षितपणे सुट्टी मिळाली त्यामुळे मी माझ्या घरच्यासोबत आज वेळ घालवणार आहे आणि पावसाचा आनंद घेणार आहे.” तसेच अभिनेता यशोमन आपटे म्हणाला, “आजचा मुसळधार पाऊस बघून मला आमच्या मालिकेतील पावसाळ्यात नुकतंच शूट केलेलं गाणं आठवलं. लागोपाठ शूटिंग करत असल्यामुळे अशी अनपेक्षित सुट्टी मिळणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. आज आराम करायचं मी ठरवलंय.”

मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी म्हणाले, “पावसाळ्यात शूटिंगमध्ये काहीना काही अडथळे येतच असतात, त्यामुळे त्या दृष्टीनं आम्ही पूर्वतयारी केलेली असते. सुट्टीचा दिवस भरून काढण्यासाठी आम्ही वेळ न दवडता वेगाने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.”

शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत रहा – कैलास काटकर

0

पुणे : विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्तीला नवनिर्मितीची जोड मिळाली पाहिजे. दुसऱ्याला कॉपी करून यश कधीच मिळू शकत नाही व मिळालेले यश टिकतही नाही. त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत नाविन्याचा शोध घेत कार्यरत राहावे लागते, असे मत क्विकहिल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास काटकर यांनी आज व्यक्त केले.

पंखच्या संस्थापक अध्यक्षा स्मिती आपटे यांनी कैलास काटकर यांची आज प्रकट मुलाखत घेतली. यावेळी विद्यार्थ्यांसमोर बोलताना कैलास काटकर यांनी आयुष्यात यशाला शॉर्ट कट कधीच नसतो. आणि आपली स्पर्धा आपल्याशीच असते. इतरांबरोबर स्पर्धा करण्यात आपण विनाकारण वेळ खर्च करीत असतो, असेही सांगितले.

पंख व क्विकहिल फाउंडेशनच्या वतीने देहू येथील संत तुकाराम विद्यालय व जिजाबाई कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शाळांगण उपक्रम राबविला जातो. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच कलागुणांना वाव मिळावा म्हणून विशेष कार्यक्रम राबविले जातात. याचाच भाग म्हणून आज ‘घे भरारी’ कार्यक्रमांतर्गत क्विकहिल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक कैलास काटकर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी अक्षर भारतीच्या वतीने शाळेला पुस्तके भेट देण्यात आली. याप्रसंगी क्विकहिल फाउंडेशनचे सीएसआर प्रमुख अजय शिर्के, पंखच्या विश्वस्त कल्याणी भाबड, क्विकहिल फाउंडेशनच्या पूजा यांदे, मुख्याध्यापक विठ्ठल कदम, मुख्याध्यापिका शुभांगी पंडित, समुपदेशक सचिन करंजुळे, ज्योती कातिकर, अक्षर भारतीचे केदार तापिकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्मिता आपटे यांनी विचारलेल्या प्रश्नांना कैलास काटकर यांनी दिलखुलास उत्तरे दिली. लहानपण, शाळा, पहिला व्यवसाय ते आजपर्यंतची वाटचाल इत्यादींबाबत उत्तरे देताना काटकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढेल आणि आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक होईल याबाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. काटकर म्हणाले की, कोणतेही काम छोटे-मोठे नसते. माझ्यावर आई-वडील व अवतीभवतीच्या लोकांकडून चांगले संस्कार झाले. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत गेलो. शेवटच्या श्वासापर्यंत माणूस शिकत असतो. त्यामुळे दुसऱ्याला रोल मॉडेल समजण्यापेक्षा आपणच आपले रोल मॉडेल बनून काम करायला पाहिजे.

फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये अभिभाषण समारंभ संपन्न

0
पुणे-फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये इयत्ता ११ वी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्राचार्यांचा अभिभाषण समारंभ नुकताच संपन्न झाला.
या समारंभाप्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे व्यासपीठावर उपस्थित होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या १३३ वर्षांच्या प्रदीर्घ परंपरेचा इतिहास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एम. कुलकर्णी यांनी उलगडला उपप्राचार्या श्रीमती संध्या देशापांडे तसेच पर्यवेक्षिका डॉ. सविता केळकर यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक‘माचे सुत्रसंचलन १२ वी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थी कु. मृण्मयी चितळे, प्राची अश्मी आणि चिन्मयी कुलकर्णी यांनी केले. विज्ञान शाखेतील अभिभाषण समारंभाचे सूत्रसंचालन एकता बखले आणि सारंग पाटेकर यांनी केले. मान्यवरांचे आभार सनिका सुराणा हीने मानले. कार्यक‘माची सांगता गौरी कुलकर्णी व तीर्था सामंत यांच्या पसायदानाने झाली.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती नेहा पंडित, श्रीमती मनिषा काळे तसेच श्री. जगदीश पाटील यांनी परिश्रम घेतले.

‘संगीत सम्राट पर्व २’ कार्यक्रमात कॅप्टन्समध्ये रंगणार सुरांचा महासंगम

0

झी युवावरील ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले आणि त्यांच्या उदंड प्रतिसादानेच झी युवा ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमाचे २ रे पर्व घेऊन सज्ज झाले आहे. हे नवे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले. संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या कार्यक्रमाच्या रूपरेषेत बदल प्रेक्षक अनुभवत आहेत. या नव्या पर्वात स्पर्धक हे नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या  टीम्सचा भाग असणार आहेत आणि या टीम्सचे कॅप्टन्स सावनी रवींद्र, जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी हे हरहुन्नरी गायक आहेत. सर्व कॅप्टन्सनी त्यांच्या टीममध्ये ७ स्पर्धकांची निवड केल्यानंतर आता वेळ आली आहे ती म्हणजे खऱ्या कसोटीची.

या आठवड्यात चारही टीम्समध्ये सुरांचा महासंगम प्रेक्षक अनुभवू शकतील. टीम राहुल विरुद्ध टीम सावनी आणि टीम अभिजीत विरुद्ध टीम जुईली असा सुरांचा सामना रंगणार आहे. प्रत्येक टीम मधील स्पर्धक आपल्या विरुद्ध स्पर्धकासोबत असलेली जुगलबंदी जिंकला तर त्या टीमच्या गुणांमध्ये वाढ होईल. या आठवड्यात हरगुन एक लावणी गाऊन सर्वांची मने जिंकणार आहे तसेच नेहमीच परीक्षकांची दाद मिळवणार ४एम बँड देखील सगळ्यांना त्यांच्या परफॉर्मन्सने चकित करणार आहे.

संगीत सम्राट पर्व बुधवर ते शुक्रवार रात्री .३० वाजता झी युवा वाहिनीवर!!!

सत्ताधारी आणि विरोधी पक्ष लोकशाहीची दोन चाके – धनंजय मुंडे

0

नागपूर, दि. 11 : संसदीय लोकशाहीमध्ये विधिमंडळाला महत्वाचे स्थान आहे. विधिमंडळात जनतेच्या हिताचे निर्णय, कायदे हे सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी घडवून आणलेल्या सकारात्मक चर्चेतून होत असतात. लोकशाहीमध्ये सत्तारुढ व विरोधी पक्ष एकाच गाडीचे दोन चाके असल्याचे प्रतिपादन ,विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आज येथे केले.

विधिमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने राज्यातील राज्यशास्त्र आणि लोक प्रशासन या विषयाचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संसदीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत ‘संसदीय लोकशाहीत सत्तारुढ आणि विरोधी पक्षाचे स्थान, कर्तव्य आणि विधिमंडळातील भूमिका’ या विषयावर श्री.मुंडे बोलत होते. यावेळी आमदार विनायक मेटे, अवर सचिव सुनील झोरे राज्यातील विद्यापीठातील अधिव्याख्याते, विद्यार्थी उपस्थित होते.

श्री.मुंडे म्हणाले की, संसदीय लोकशाहीमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी एकत्र लोकाभिमुख  काम केल्यास विरोधी पक्ष देखील त्याचे स्वागत केले जाते . संसदीय आयुधाच्या माध्यमातून सभागृहामध्ये विरोधी पक्ष सत्तारुढ पक्षाला चुकीचे निर्णय होत असेल तर धारेवर धरतो. सरकारने आणलेल्या योजना, निर्णय यावर त्रुटी दाखवून दुरुस्त करण्यास भाग पाडले जाते. काही वेळेस अधिवेशन काळात सत्तारुढ पक्षाला सरकारी कामकाज पार पाडावे लागते, पुरवणी मागण्या मंजूर करुन घ्याव्या लागतात. त्यासाठी विरोधी पक्षांचे सहकार्य महत्वाचे ठरते. जनतेच्या विरोधातील विधेयक असेल तर विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना निर्णय माघारी घ्यायला भाग पाडते. सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांनी दिलेले आश्वासन खोटे ठरत असेल तर त्यावर आवाज उठवून सभागृह बंद पाडण्याचा विरोधकांना हक्क आहे.

सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधी पक्षांची तेवढीच जबाबदारी आहे. तसेच जेवढे महत्व विधानसभेला आहे तेवढेच विधान परिषदेला आहे. काही वेळा विनियोजन बील संसदीय आयुधाच्या माध्यमातून विरोधी पक्षांनी नामंजूर केल्यास अधिवेशन कालावधी वाढवला जाऊ शकतो. आपत्तीच्या किंवा महाभयंकर संकटाच्या वेळी जनतेच्या हितासाठी विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना चांगला निर्णय घेण्यास मदत करते. लोकशाहीला सदृढ व मजबूत करण्यासाठी विधिमंडळ संसदीय आयुधाच्या माध्यमातून चालायला हवे, असेही श्री. मुंडे यांनी सांगितले.

श्री. मुंडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी प्रास्तावीक केले तर आभार गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचा विद्यार्थी अक्षय वासनीक यांनी मानले.

राज्यात आतापर्यंत 20 लाख शेतकऱ्यांना 14 हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप – सहकार मंत्री सुभाष देशमुख

0

नागपूर, दि. 11 : राज्यात 10 जुलै अखेरपर्यंत 20 लाख शेतकऱ्यांना 14 हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून गावोगावी 2 हजार 945 कर्ज मेळावे घेण्यात आले आहेत. पीक कर्जापासून शेतकरी वंचित राहता कामा नये, यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविताना पारदर्शकता जपण्यासाठी ऑनलाईनचा वापर करण्यात आला. यामुळे कर्जमाफीस अपात्र शेतकऱ्यांना रक्कम लाभ घेता आला नाही. त्यामुळे राज्य शासनाचे 978 कोटी रुपयांची बचत झाली आहे, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत सांगितले.

नियम 293 अन्वये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या बाबींवर चर्चा उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना सहकार मंत्री बोलत होते. ते म्हणाले, राज्यस्तरीय बँकर्स समितीकडून कर्जमाफीसाठी 34 हजार कोटी रुपये आणि 89 लाख खातेदारांची यादी देण्यात आली होती. मात्र शासनाने त्यासंदर्भात विविध निर्णय घेऊन पात्र आणि गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. पात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळण्याकरिता ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. यामुळे या योजनेत पारदर्शकता येण्यास मदत झाली आहे.

ऑनलाईन नोंदणीचा शेतकऱ्यांना कसा फायदा झाला, याचे उदाहरण देताना सहकार मंत्री म्हणाले, गडचिरोली बँकेने खातेदारांची यादी देताना 26 हजार 328 खातेदारांची यादी दिली. मात्र ऑनलाईन नोंदणीमुळे 39 हजार 808 खातेदारांची नोंदणी झाली. यामुळे जे शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिले असते त्यांनाही ऑनलाईन नोंदणीमुळे लाभ मिळाला आहे. राज्यातील कोणताही पात्र शेतकरी यापासून वंचित राहणार नाही, अगदी शेवटच्या पात्र शेतकऱ्यापर्यंत याचा लाभ मिळेल. येत्या 15 दिवसांत शेतकऱ्यांचे चुकारे देण्यात येतील, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

या वर्षी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी गावोगावी कर्ज मेळावे घेण्यात आले. आतापर्यंत 20 लाख शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप झाले आहे. राज्यातील विविध कार्यकारी संस्थांच्या आर्थिक बळकटीकरणाकरिता राज्य शासन प्रयत्न करत आहे. या वर्षी राज्य शासनाने 88 टक्के तूर खरेदी केल्याचे श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरु असून शेतकरी बांधवांना मतदानाचा अधिकार, अटल पणन महाअभियानच्या मार्फत सहकार क्षेत्र सक्षमीकरणाचे प्रयत्न, बंद साखर कारखाने सुरु करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

छत्रपती संभाजी महाराज आणि शहीद सैनिकांच्या विजयस्तंभाचे शासनातर्फे उभारणार स्मारक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर, दि. 11 : छत्रपती संभाजी महाराज आणि शहीद सैनिकांच्या विजयस्तंभाचे शासनातर्फे स्मारक उभारणार असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

भिमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीनंतर छत्रपती संभाजी महाराज आणि शहीद सैनिकांच्या विजयस्तंभाचे स्मारक उभारणार काय, असा प्रश्न सदस्य ॲड.जयदेव गायकवाड, शरद रणपिसे यांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, या स्मारकासाठी पुणे जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यासाठीचे निर्देश दिले आहेत. या स्मारकासाठी निधीची कमतरता भासणार नाही.

भिमा-कोरेगाव दंगल प्रश्नी सदस्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, या दंगलीत घराचे नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत देण्यात आली असून आयोगाचा अहवाल आल्यानंतर नुकसानीची प्रकरणे तपासून अशा कुटुंबांनाही आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच दंगलीत सहभागी झालेल्या नऊ आरोपींपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कु.पुजा सकट हिच्या मृत्यू प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणी कुणालाही पाठीशी घालणार नाही. भिमा-कोरगाव दंगल प्रकरणी चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाला तारीख वाढवून दिली जाईल, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

संभाजी भिडे यांना दंगल आणि चुकीच्या केलेल्या वक्तव्या प्रकरणी सरकार अटक का करत नाही, असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणी पोलीस चौकशी करीत असून जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. एल्गार परिषदेशी संबधित असलेल्या कार्यकर्त्यांची नक्षलवाद्यांशी संबध असल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनाला आले आहे. त्यांची चौकशी सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, ॲड.जनार्दन चांदूरकर, प्रकाश गजभिये, कपील पाटील, जोगेंद्र कवाडे, सुनिल तटकरे आणि डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला.

राज्यातील 2 हजार 100 पुलांचे ऑडिट – राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील

0

नागपूर, दि. 11 : राज्यात गेल्या वर्षी 2 हजार 100 पुलांचे ऑडिट करण्यात आले असून ज्या भागात धोकादायक पूल आहेत, तेथे तात्काळ नवीन पुलाची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

सदस्य राजाभाऊ वाजे यांनी अस्वली स्टेशन, तालुका इगतपुरी येथील ब्रिटीश कालीन पुलाची पुनर्बांधणी करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री म्हणाले, या पुलाची उंची जास्त असल्याने कंपने जाणवत आहेत. या पुलाचे ऑडिट झाले असून पुलाच्या रुंदीकरणाच्या कामास मार्च 2018 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याला तांत्रिक मंजुरी बाकी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य श्रीमती सीमा हिरे, निर्मला गावित, सर्वश्री वैभव नाईक, दीपक चव्हाण, इम्तियाज जलिल यांनी सहभाग घेतला.

नाणार नाही लादणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर : नाणार जि. रत्नागिरी येथील मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी,नागरिकांना विश्वासात घेऊन व चर्चा करुनच याबाबत निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य संजय दत्त यांनी नाणार प्रकल्पाबाबत लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने सागरी किनार पट्टीवर मेगा रिफायनरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गुजरात, आंध्रप्रदेश व महाराष्ट्र राज्याने या रिफायनरीसाठी मागणी केली होती. तीन लाख कोटी रुपये गुंतवणूक व एक लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प आहे. नवीन रिफायनरीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे प्रदूषण होत नाही. जगात अनेक देशात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन रिफायनरी उभारल्या जात आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व रोजगार निर्मितीसाठी शासनाने नाणार प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सध्या तेथील स्थानिक नागरिक, शेतकरी व विविध संघटना यांना या प्रकल्पाबाबत प्रदूषण व अन्य बाबींविषयी शंका आहेत. त्यांचे निरसन करण्यासाठी तसेच नाणार प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी पवई, नीरी आणि गोखले इन्स्टिट्यूट या संस्थांची नियुक्ती केली आहे.

या संस्थांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि स्थानिक जनतेच्या शंका दूर झाल्याशिवाय नाणार प्रकल्पाचे काम सुरु करणार नाही. नाणार प्रकल्प हा केंद्र शासनाच्या अखत्यारित आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिसूचित करण्याचे अधिकार मुख्यमंत्री आणि उच्चाधिकार समितीला आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, भाई जगताप, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सहभाग घेतला.

मुंबईत 150 अतिरिक्त पाणी उपसा पंप बसविले

0

मुंबई व कोकण भागातील अतिवृष्टीत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे प्रशासनाला निर्देश

नागपूर : मुंबई व कोकण भागात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी प्रशासन यंत्रणा सजग आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. मुंबई मध्ये पाणी उपसा करण्यासाठी 150 अतिरिक्त ड्रेनेज पंप लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर अकरावी व बारावीच्या प्रवेशासाठीच्या प्रक्रियेला देखील गरज पडल्यास मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य अजित पवार, आशिष शेलार यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई व कोकण भगत सातत्याने अतिवृष्टी होत आहे. पालघर जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडत आहे. जिल्हा प्रशासन अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

मुंबईत अतिवृष्टीमुळे 11 ठिकाणी पाणी तुंबले असून तीन ठिकाणी रस्ते वाहतूक वळविण्यात आली आहे. वसई विरार दरम्यान रेल्वे वाहतूक बंद असून अन्यत्र मात्र लोकल सेवा सुरू आहे. रस्ता वाहतुक धिम्या गतीने सुरू आहेत. पावसाचे पाणी उपसा पूर्ण क्षमतेने होत असून 150 अतिरिक्त पंप लावण्यात आले आहेत. भरती काळात अधिक सजग राहण्यास प्रशासनास सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.  पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी आढावा घ्यावा. गरज पडल्यास अकरावी व बारावीच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ऑपरेशन ‘मुस्कान’ आणि ‘स्माईल’ अंतर्गत हरविलेली 20 हजार बालके शोधली – गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील

0

नागपूर : हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ‘मुस्कान’ आणि ‘स्माईल’ अंतर्गत 20 हजार 112 बालके शोधून त्यांच्या कुंटुबियांकडे सुपूर्द करण्यात आली. ज्या भागात अल्पवयीन मुली आहेत. विशेषत: झोपडपट्टी भागांमध्ये अशा ठिकाणी जास्त प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील, असे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.

सदस्य सुनील प्रभू यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पाटील म्हणाले, सन 2014 ते 2016 या कालावधीत 32 हजार 598 व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या त्यापैकी 29 हजार 505 व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. या कालावधीत 16 ते 25 वयोगटातील 16 हजार 281 व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या त्यातील 14 हजार 141 व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे.

 हरवलेल्या व्यक्ती सापडण्यासाठी मुंबईतील सर्व पोलिस ठाण्यात प्रमाण कार्यपद्धती (एसओपी) ठरविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 18 वर्षाखालील हरविलेल्या  लहान मुलांच्या बाबतीत तक्रार दाखल होताच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. चार महिन्याच्या आत हरविलेले मुल सापडले नाही तर त्याबाबतचा तपास अनैतिक मानवी वाहतूक माहिती कक्षामार्फत करण्यात येतो. मुंबइतील सर्व परिमंडळात असे कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

 यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री राजेंद्र पाटणे, प्रताप सरनाईक, भारती लव्हेकर यांनी भाग घेतला.

आमदार योगेश टिळेकरांना पितृशोक

0

पुणे-भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आणि हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश टिळेकर यांचे वडील आणि महापालिकेतील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका रंजना टिळेकर यांचे पती कुंडलिकराव टिळेकर यांचे आज साडेनऊ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनामुळे दुखः व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहून आज महापालिकेतील स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली .
कुंडलिकराव टिळेकर त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. मुलगा योगेश हे विद्यमान आमदार तर त्यापूर्वी २०१२ ते २०१७ दरम्यान नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे.

थायलंडमधील गुहेत अडकलेली सर्व मुलं सुखरूप बाहेर

0

थायलंड-येथील  गुहेत अडकलेल्या 12 मुलांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून नौदल कर्मचारी व डायव्हर्स यांची सुरू असलेली मोहिम आज फत्ते झाली. विशेष म्हणजे या 12 मुलांसह त्यांच्या फुटबॉल प्रशिक्षकासही गुहेतून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. गुहेत अडकलेल्या फुटबॉल संघातील चार विद्यार्थ्यांना रविवारी बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर आज हे ‘मिशन सेव्ह चाईल्ड’ पूर्ण झाले आहे. अमेरिका, इस्रायल यांच्यासह भारतानेही या रेस्क्यू मोहिमेत सहभाग घेतला होता.

थायलंडच्या या गुहेतून बाहेर काढताच मुलांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार करून मगच त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे. सोमवारी ज्या मुलांना गुहेतून बाहेर काढण्यात आले, त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुहेबाहेर रुग्णवाहिका तसेच हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले आहे. गेल्या 15 दिवसांपासून त्या गुहेमध्ये ही मुले आणि प्रशिक्षक अडकले होते. जगाचे लक्ष लागलेल्या या रेस्क्यू मोहिमेचा आज शेवट झाला. त्यानंतर, गुहेबाहेर असलेल्या सर्वच मुलांच्या पालकांचा जीव भांड्यात पडला. भारत सरकारने व केबीएलने युद्ध पातळीवर हालचाल करून त्यांचे डिझाईन प्रमुख व मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना केली. थायलंडला पोहोचताच या टीमने कामास सुरूवात केली आणि फ्लड पंप्स सुरू केले. पाण्याचा उपसा केल्यामुळे गुहेतील बचावकार्याला गती आली आणि 8 मुलांना दोन दिवसांमध्ये बाहेर काढणे शक्य झाले. त्यानंतर आज उर्वरीत 4 मुलांसह प्रशिक्षकासही बाहेर काढण्यात आले. एकंदरीत जगभरातून मिळालेल्या मदतीच्या सहाय्याने तब्बल 15 दिवसानंतर ही रेस्क्यू मोहिम फत्ते झाली आहे.