Home Blog Page 3117

विठुरायाच्या भेटीस हरिनामाच्या गजरात चालला वैष्णवांचा मेळा…!

0

सलग २५ वे रौप्य महोत्सवी वर्षे


पुणे-आज रिपरिपता पावसाच्या सरीं व नयनरम्य सकाळी टाळ मृदुंगाच्या तालावर विठुरायाच्या नामघोषाचा गजर करत आज बाणेर बालेवाडी पाषाण येथील नागरीक आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीस निघाले. सालाबादप्रमाणे निमित्त होते बालेवाडी ते पंढरपुर मोफत यात्रेचे. यंदा या यात्रेचे रौप्य महोत्सवी वर्ष असुन सालाबादप्रमाणे या वारीस सुमारे ५३७ भाविक भक्तांनी नाव नोंदणी करुन या मोफत यात्रेचा लाभ घेतला. यावेळी या सर्व भक्तांची दर्शनाची सोय तसेच भोजनाची सोय यात्रेच्या संयोजकांच्या वतीने करण्यात आले होते. या यात्रेचा शुभारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रमुख कैलासजी सोनटक्के, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत सहधर्म जागरण संयोजक बाळासाहेबजी दळवी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. ” *या यात्रेच्या माध्यमातुन समस्त वारकरी संप्रदायाची सेवा गेली २५ वर्षे आमच्या हातुन घडत असुन समस्त वारकरी मायबापांचे आशिर्वाद यातुन मिळत आहेत, तसेच सांप्रदाय क्षेत्राची हि सेवा करत असल्याचे समाधान यातुन मिळत आहे*” असे यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट चे अध्यक्ष संजय बालवडकर, राहुलदादा बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, श्रीशिवशरण, अनिल बालवडकर, संजय बालवडकर, किसन बालवडकर, समस्त महिला भजनी मंडळ व भक्त उपस्थित होते.

उद्योजकांना मिळाली “स्टार्टअप इंडिया” ची साथ..

0

पुणे-आज बाणेर-बालेवाडी-पाषाण-औंध परिसरातील (प्र.क्र.०९ )विविध नविन जुण्या उद्योजकांना स्टार्टअप इडियाच्या माध्यमातुन आपल्या उद्योगांचा विकासित करण्याची संधी मिळाली. यापरिसरातील नागरीकांमध्ये उद्योजक वृत्तीचा वाढ व्हावी यासाठी १०० दिवसांचा मोफत उद्योजकता विकाय कार्यक्रम औंध-बाणेर प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक अमोल बालवडकर व राष्ट्रिय युवा पुरस्कार विजेते रविजी घाटे यांच्या संकल्पनेतुन आयोजित केला गेला .
” स्मार्ट सिटी स्मार्ट स्टार्टअप या उपक्रमाच्या माध्यमातुन निश्चीतच या परिसरातील नागरीकांमध्ये प्रामुख्याने युवा पिढी उद्योजकतेकडे वाटचाल करेल व या उपक्रमाच्या माध्यमातुन उद्योजकांना उद्योगजगताकडे वळण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली असल्याचे” यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर म्हणाले.
तसेच “अशा उपक्रमांमधुन नविन उद्योजकांना प्रेरणा मिळणार असुन त्यांच्या नवनविन कल्पनांमधुन उभारीस येणारे उद्योग हे सामाजिक दृष्ट्या व देशाच्या विकासात नक्किच हातभार लावतील असा विश्वास वाटतो व तसेच स्मार्ट सिटी संक्लपनेत यांच्या कल्पनांचा व उद्योजकांचा निश्चितच समावेश करुन घेवु” असे आश्वासन स्मार्ट सिटी पर्कल्पाचे सी.ई.ओ.श्री.राजेंन्द्र जगताप यांनी दिले.
भाजपा प्रवक्त्या श्वेताजी शालिनी यांनी या उपक्रमाचे उदघाटन करत स्टार्टअप चे स्वप्न मनी बाळगणाऱ्या नवं उद्योजकांचे मार्गदर्शन केले. सर्व आयोजकांचे कौतुक करतानाच त्या सर्वांना उद्देशून म्हणाल्या, “मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मा. मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी स्टार्टअप साठी तयार केलेले पोषक वातावरण समाज्यातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपा नगरसेवक अमोलजी बालवडकर यांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अमोल बालवाडकरांसारखे तरुण व उत्साही व्यक्तिमत्वच अशा उपक्रमांना पुढे आणून स्मार्ट सिटी ची कल्पना खऱ्या अर्थाने सामाज्यापुढे आणि देशापुढे मांडत आहेत. त्यांच्या सारखेच अनेक तरुण जर आज पुढे आले तर देश खऱ्या अर्थाने व वेगाने सर्व समाजघटकांना सामावून पुढे घेऊन जाऊ शकतो व सरकारच्या अशा लोककल्याणकारी उमक्रमांचा फायदा घेऊ शकतो. माझ्या मते महाराष्ट्रातील १० शहरेच स्मार्ट सिटी होण्या पेक्षा सर्व महानगरपालिका, सर्व गावे स्मार्ट झाली पाहिजेत व असे उपक्रम सर्वत्र राबवले गेले पाहिजेत.”
या शिबिरास याभागातील १२८ उद्योजकांना पहिल्या टप्प्यात संधी दिली गेली असुन यामार्फत त्यांना उद्योग वाढीसाठी लागणारे मार्गदर्शन, जाहिरात यांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.
यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा प्रवक्या श्वेता शालिनी, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सी.ई.ओ.राजेंद्र जगताप, सह संयोजक रवि घाटे, मंदार राराविकर, शिशिर तरळ, अभय बागल, श्री अय्यर व परिसरातील विविध उद्योजक व नागरीक उपस्थित होते.

फत्तेचंद रांका यांची रेल्वे सल्लागार समितीवर निवड

0

पुणे- येथील प्रख्यात सराफ आणि व्यापारी संघटनांचे नेते फत्तेचंद रांका यांची केंद्र सरकारने रेल्वे सल्लागार समितीवर निवड केली आहे . पुण्यातून देशभरातील महत्वाच्या शहरात सातत्याने व्यापारी आणि ग्राहक, वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या संस्था आणि व्यावसायिक तसेच कंपन्या यांचा संपर्क राहण्यासाठी रेल्वेची सुविधा कशाप्रकारे हवी ,आहे आणि देता येईल याबाबत ते सातत्याने पाठपुरावा करीत असतात . देशभरातील विविध व्यापारी आणि ग्राहक संघटनाशी त्यांचा दांडगा संपर्क आहे .या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांची नियुक्ती केल्याने विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येते आहे .

उंडवडी येथील पालखी तळांची प्रांताधिकारी हेमंत निकम यांचेकडून पाहणी

0

बारामती  : – यंदा आषाढी वारी निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात आगमन होत आहे.या पालखीचा दिनांक 12 जुलै 2018 रोजी उंडवडी गवळयाची– येथे मुक्काम होणार आहे. त्यानिमित्ताने तेथील पालखी तळांची पाहणी प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी  आज केली.

या पाहणी वेळी तहसिलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विश्वास ओव्हाळ, सहायक पोलीस निरिक्षक विकास बडवे,  आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, महावितरण विभाग, नगरपरिषद विभाग, दूरसंचार व   विविध प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या पाहणी मध्ये प्रांताधिकारी निकम यांनी पालखी तळांची पाहणी करून  संबंधित गावातील प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी पालखी मुक्कामाच्या वेळी करावयाच्या सोयी सुविधा, स्वच्छता व घ्यावयाच्या दक्षतेबाबत आरोग्य विभागाच्या अधिका-यांशी सविस्तर  चर्चा करून वारकऱ्यांना पालखी तळावर प्रशासनातर्फे  देण्यात येणाऱ्या सुविधा बद्दल  संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी वारक-यांना पुरविण्यात येणा-या गॅस, केरोसीनच्या उपलब्धतेबाबत तसेच वाटपाबाबत सूचना केल्या. पोलीस विभागाच्या अधिका-यांकडून या काळात करण्यात येणा-या वाहतुक नियोजनाचा आढावा घेतला. वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये याकडे सर्व प्रशासकीय विभागांनी लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

हतनूर वेटलँड ‘ चे पक्षी वैविध्य जपण्याची गरज : अनील महाजन

0

‘सेव्ह वेटलँड हतनूर’  व्याख्यानाला निसर्गप्रेमींचा चांगला प्रतिसाद 

 
पुणे :’ भुसावळ जवळील हतनूरच्या धरणाच्या पाणथळ क्षेत्रात २५ हजाराहून अधिक पक्षी ,२८० प्रजाती सापडतात ,त्यामुळे पाणथळ जागांसाठी जागतिक  पातळीवरचा ‘रामसर साईट  ‘चा दर्जा मिळवण्यासाठी  जनजागृती करण्याची गरज आहे ,तसेच हतनूर हे पक्षी अभयारण्य म्हणून घोषित होण्याची गरज आहे ,’असे प्रतिपादन पक्षी निरीक्षक अनिल महाजन यांनी केले .
 ‘जीविधा’, ‘देवराई फाऊंडेशन‘, ‘निसर्गसेवक’ या संस्थांच्या वतीने निसर्ग अभ्यासक आणि पक्षीनिरीक्षक अनील महाजन यांच्या व्याख्यानाचे बुधवारी सायंकाळी  आयोजन करण्यात आले होते .
 इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र (राजेंद्रनगर) येथे झालेल्या व्याख्यानात अनिल महाजन बोलत होते .
 
यावेळी अनिल महाजन आणि त्यांचे सहकारी राणा राजपूत यांचा  उष:प्रभा पागे ,डॉ . विनया घाटे ,धनंजय शेडबाळे ,राजीव पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
अनिल महाजन म्हणाले ,’१९८० च्या दशकापासून हतनूर धरणाच्या परिसरात तापी ,पूर्णा नद्यांच्या संगमामुळे पाणथळ क्षेत्र तयार झाले आर्क्टिक परदेशातूनही येथे ‘रेड फलरोप ‘ सारखे दुर्मिळ स्थलांतरित पक्षी येऊ लागले .   येथे २८० प्रकारचे पक्षी दिसू लागले . २०१२ च्या पक्षिगणने नुसार त्यांची संख्या २५ हजार असल्याचे लक्षात आले .  मात्र ,अभयारण्य नसल्याने आणि मासेमारी ,गाळ वाढणे ,निसर्ग कमी होणे ,प्रदूषण अशा येथील जैव वैविध्य धोक्यात येऊ शकते .
हतनूरचे  जैव वैविध्य राखण्यासाठी हे क्षेत्र पक्षी अभयारण्य होणे आवश्यक आहे . अभयारण्य झाले की येणाऱ्या संभाव्य बंधनांना स्थानिकांचा विरोध आहे . राजकारण्यांची अनास्था आहे . इराणच्या ‘रामसर ‘ पाणथळ क्षेत्राच्या धर्तीवर पक्षी जैव वैविध्य असणाऱ्या पाणथळ क्षेत्रांना जागतिक संरक्षित दर्जा दिला जातो . तसा दर्जा हतनूर ला मिळण्यासाठी राज्य ,केंद्र सरकारने  प्रस्ताव  करणे आवश्यक आहे . या प्रक्रियेत जनजागृती होणे गरजेचे आहे .
हतनूर प्रमाणे उजनी येथेही पक्षी वैविध्य आहे . स्थानिकांच्या विरोधामुळे तेथेही पक्षी अभयारण्य घोषित होऊ शकले नाही ,अशी खंतही महाजन यांनी व्यक्त केली .
जायकवाडी ,वेंगुर्ला रॉक ,मेहुल शिवडी ,नांदूर मध्यमेश्वर (नासिक ),ठाणे क्रिक ,लोणार ही पाणथळे संरक्षित आहेत . मात्र ,नवेगाव ,उजनी ,हतनूर सारखी पाणथळे अजून संरक्षित होऊ शकली नाहीत ,असेही ते म्हणाले .
‘‘जीविधा’ संस्थेचे संचालक राजीव पंडीत यांनी प्रास्तविक केले ,धनंजय शेडबाळे यांनी आभार मानले

तिसर्‍या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट सुपर कप फुटबॉल स्पर्धेत कॉग्निझंट संघाचा मोठा विजय

0

पुणे,- राजेश वाधवान समुह व बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी यांच्या तर्फे    नेस्टअवेफास्ट अँड अपस्कार्टर्समॅकडॉनडल्सझुमकारउबेर इट्सरॅडिसन ब्लू(हिंजेवाडी)  संलग्नतेने आयोजित तिसऱ्या एफसी पुणे सिटी कॉर्पोरेट फुटबॉल स्पर्धेत  साखळी  फेरीत    कॉग्निझंट संघाने  वोडाफोन संघाचा 9-0 असा एकतर्फी मोठा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.   नैनान के व  राहूल छाबडा यांनी प्रत्येकी दोन गोल करत संघाचा डाव भक्कम केला. 

 मामुर्डी येथील एफसी पुणे सिटीच्या सराव मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत  प्रकाश थोरातच्या एका गोलाच्या बळावर  फिनआयक्यु संघाने  टीसीएस संघाचा 1-2 असा पराभव करत आपल्या विजयी मालिके सातत्य राखले.  अंकीत सहाच्या देन गोलांच्या जोरावर  बार्कलेज संघाने  विप्रो संघाचा 3-0 असा पराभव केला तर  अॅमडॉक्स संघाने  हनिवेल संघाचा 3-1 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

फिनआयक्यु – 1(प्रकाश थोरात 12मी) वि.वि टीसीएस-0

बार्कलेज- 3(अंकीत सहा 9,16मी, सोनु वलाईल 19मी) वि.वि विप्रो-0

अॅमडॉक्स – 3(विमल कंदुरी 10मी, प्रिताज देवल 14मी, विनित कोद्रे 17मी) वि.वि हनिवेल-1(एल्डोे अब्राहीम 15मी)

कॉग्निझंट– 9(स्नेहल ठाकुर 4मी, नैनान के 7,12मी, सौरभ मुळीक 10मी, सौमील वावीकर 14मी, आदित्य देसाई 16मी, राहूल छाबडा 5,18मी, विलियम फर्रांडीझ 20मी) वि.वि वोडाफोन-0

केपीआयटी-1(देबज्योती सेन 15मी) वि.वि  अमेझॅन- 0

ग्लॅमरस दुनियेची सफर ‘परी हुँ मैं’ या मराठी चित्रपटातून

0

  गाजलेल्या वेगे वगे धावूएकांकिकेवर आधारित

टीव्हीच्या स्मॉल स्क्रीनमध्ये मोठी ताकद आहे, या छोट्या पडद्याने आपल्या घराचा ताबा कधी मिळविला हे आपल्या ध्यानातही आले नाही. मोठ्या कलाकारांसह लहान मुलांना नवी ओळख देणाऱ्या या छोट्या पडद्याचं विश्वच निराळं आहे. टिव्ही जगताच्या ग्लॅमरस आणि टीआरपीच्या विश्वाची सफर घडवणारा ‘‘परी हुँ मैं’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि योगायतन फिल्मस निर्मित ‘परी हुँ मैं’ या चित्रपटाची निर्मिती डॉ. राजेंद्र प्रताप सिंग आणि शिला सिंग यांनी केली असून संजय गुजर हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत तर रोहित दास शिलवंत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

लहान मुले टार्गेट ठेउन टीव्हीवर अनेक कार्यक्रम होतात, चंदेरी दुनियेचा हाच विषय लेखिका इरावती कर्णिक यांनी ‘वेगे वेगे धावू’ या एकांकिकेमधून मांडला होता, त्यावर आधारीत हा चित्रपट आहे. आधी एकांकिका, मग दीर्घांक म्हणूनही याचे सादरीकरण झाले असून त्याचे दिग्दर्शनही रोहित दास शिलवंत यांनीच केले होते.

अभिनेते नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे,  फ्लोरा सैनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘परी हुँ मैं’ या चित्रपटाची पटकथा मच्छिंद्र बुगडे, रोहित दास शिलवंत आणि संकेत माने यांची असून संवाद योगेश मार्कंडे यांचे आहेत. अभिषेक खणकर आणि सचिन पाठक यांच्या गीतांना संगीतकार समीर सप्तीसकर यांनी स्वरबद्ध केले तर शंकर महादेवन, अमृता फडणवीस, जिया वाडकर आणि मंदार पिलवळकर यांचा आवाज गीतांना लाभला आहे. चित्रपटाला पार्श्वसंगीत अनुराग गोडबोले यांनी दिले आहे, तर संकलन नितीन राठोड, कलादिग्दर्शन नरेंद्र भगत, डीओपी रोहन मडकइकर आणि प्रोजेक्ट हेड भूषण सावळे,  हर्षदा सावे आहेत. अत्यंत हटके विषयामुळे चर्चेत असलेला ‘परी हुँ मैं’ येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

भक्तिमय मैफलीतून परब्रम्हाची अनुभूती

0

पुणे-गायन,वादन,नृत्य यांना एकत्रितपणे संगीत असे म्हणतात आणि संगीतातील बारकावे भाक्तीरासातून प्रकट करणे ही
एक कला आहे . भाकीरस आणि संगीत यांचा जवळचा संबंध आहे . स्वरातून परब्रम्हाची अनुभूती ही संगीताच्या
माध्यमातून मिळते . शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतातून आनंद आणि त्यातून मिळणारा परमानंद हा काही वेगळाच
असतो, याची अनुभूती सर्वांनी अनुभवली ती , आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुण्यात झालेल्या मैफलीत.या मैफलीत
सर्व महिला कलाकारांचा सहभाग लाभला होता .महिला वाद्यावृन्दासह ही मैफल रंगली .
श्रीराम मंदिर तुळशीबाग इथे स्वराशारदा संस्थे तर्फे महिला वाद्यवृंदाची भक्ती संगीताची मैफल
पार पडली. जय जय राम कृष्ण हरी , कानडा राजा पंढरीचा ,पाहू द्या रे, म्हणा श्रीराम,राधे राधे ,नागर नंदजीना लाल
,मूळपीठ तू आंबे ,रणधीरा,गुरु महाराज गुरु जय जय परब्रम्ह सद्गुरू ,निघालो घेऊन दत्ताची पालखी ,अशा भक्तीपर
रचना सादर करून कलाकरांनी रसिकांची ब्रम्हानंदी टाळीच लावली. त्याच प्रमाणे तुझी शेतीवाडी विठूचा देव्हारा
,अभंग प्रांजली पाध्ये यांनी हार्मोनियम वाजवत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.व भाग्यदा लाक्ष्मि बाराम्मा, या
अभंगातून लाक्शिमीची आणि तिच्या दागिन्यांचे वर्णन कन्नड मधून पाध्ये यांनी रंगवले
त्यानंतर नाम विठोबाचे घ्यावे ,रखुमाई रखुमाई ,कबीराचे विणतो माधवी राजे यांनी सादर केल्याने सर्व उपस्थितांना
परब्रह्मच गवसले. अतिशय अभ्यासपूर्ण आणि भक्ती संप्रदायातील बारकावे आणि संतांचे ,महत्व यावेळी रसिकांनी
निवेदनाच्या माध्यमातून अनुभवले .या मैफलीला तबला साथ आणि भक्तिमय निवेदन निवेदिता मेहेंदळे यांचे लाभले
,तालवाद्यांची साथ संध्या साठे यांनी केली तर अंजली पंचाक्षरी आणि वर्षा हार्डीकर यांनीही गायन सादरीकरण केले
.हर्मोनियामची सुरेल साथ प्रांजली पाध्ये यांची लाभली.

जबड्याच्या सांध्यातील ​गुंतागुंतीच्या ​ट्युमर​ शस्त्रक्रियेतून 21 वर्षीय​ काश्मिरी रूग्णाची सुटका !

0
डॉ. जे.बी.गार्डे यांनी केली दुर्मिळ गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
पुणे :
​जम्मू-काश्मीरमधील 21 वर्षीय रुग्ण मुलीच्या जबड्याच्या सांध्यातील ट्युमरवरील दुर्मिळ, अवघड शस्त्रक्रिया पुण्यातील ‘एम.ए.रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर’मध्ये  यशस्वीरित्या पार पडली.
 ​डॉ. जे.बी.गार्डे (एम.ए.रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेसच्या ‘ओरल अ‍ॅण्ड मॅक्सिलोफेशिअल’ चे विभाग प्रमुख​) यांनी दिनांक 9 जुलै रोजी सलग सहा तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली.​ आज ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे रिपोर्ट आले.
या ​दुर्मिळ​ शस्त्रक्रियेमध्ये डॉ. जे.बी.गार्डे​ यांना डॉ.हर्षल भागवत, डॉ. गौरव खुटवड, डॉ.मनिषा बिजलानी, रंगूनवाला डेंटल सायन्सेस महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ चे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार, डॉ.परवेझ इनामदार (व्यवस्थापकिय संचालक, इनामदार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल), डॉ.रमणदीप दुग्गल (प्राचार्य, एम.ए.रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस), आर.ए.शेख ( रजिस्ट्रार ) यांनी ​ही  ​शस्त्रक्रिया​ विनामूल्य करण्यासाठी डॉक्टर चमूला ​​प्रोत्साहन दिले. डॉ.जे.बी.गार्डे यांनी ही शस्त्रक्रिया विना​ मानधन केली.
‘​रूग्णाचा उजव्या बाजूचा जबडा हा ट्युमरमुळे मोठा झाला होता. रुग्णाच्या जबड्याच्या सांध्यात (Temporomandibular Joint) मध्ये ट्युमर झाला होता. ही सांध्यामध्ये झालेली गाठ काढण्यात आली व कॉस्मॅटिक सर्जरी करुन वाढलेले खालच्या जबड्याचे हाड कमी केले गेले’, असे डॉ. जे. बी. गार्डे ​​यांनी सांगितले.
‘ ​यास्मिन ​शेख ही मूळची जम्मू-काश्मीर येथील सीमेवर उरी सेक्टर भागात भारतीय लष्कराच्याजवळ राहणारी 21 वर्षीय मुलगी आहे. वयाच्या 15 व्या वर्षी तिचा चेहरा जबड्यामुळे वाकडा होत असल्याचे लक्षात आले. जम्मू-काश्मीर, श्रीनगर येथील अनेक हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेस प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु जम्मू- काश्मीरमधील ‘असीम फाऊंडेशन’ या काश्मीरमध्ये शैक्षणिक, सामाजिक, रोजगार निर्मितीचे काम करणार्‍या पुण्यातील तरुणांच्या संघटनेच्या बेकरीत काम करणार्‍या ​यास्मिनला न्याय मिळवून देण्याचे संघटनेने ठरवले. संस्थेचे काम करणार्‍या पुण्यातील दंतचिकित्सक डॉ. संजय करवडे आणि ऑर्थोपेडिक डॉ. मिलिंद मोडक यांना याबाबत कळवले. या दोघांनी डॉ.जे.बी.गार्डे​​ यांना रुग्ण समस्येबाबत माहिती देताच डॉक्टरांनी या दुर्मिळ शस्त्रक्रियेस होकार दिला. त्यामुळे आमच्या मुलीस नवीन जीवन मिळाले’, अशी माहिती ​यास्मिनच्या पालकांनी दिली.
यामध्ये ‘असीम फाऊंडेशन’च्या निरूता किल्लेदार आणि सई बर्वे यांनी खूप सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले.
असीम फाऊंडेशन : 
असीम फाऊंडेशन ही भारतातील सीमावर्ती भागात विशेषत: जम्मू-काश्मीर राज्यात कार्यरत असलेली संस्था आहे. संस्थेचे 10 वर्षांहून अधिक काळ हे काम सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक नागरिकांमध्ये संवाद, विश्‍वास आणि विकासाचे प्रामुख्याने ही संस्था करते. जम्मू-काश्मीर राज्यात उरी येथे अ‍ॅपल वॉलनट कुकीजच्या निर्मितीसाठी महिलांसाठी बेकरी सुरू करण्यात आली आहे. या बेकरीमध्ये ही रूग्ण कार्यरत आहे. पुण्यातील युवक नोकऱ्या करून पगाराचा काही भाग संस्थेला देऊन सामाजिक उपक्रम करतात. संस्थेचे संस्थापक सारंग गोसावी आहेत.
‘ओरल अ‍ॅण्ड मॅक्सिलोफेशिअल सर्जन म्हणून ​डॉ. जे.बी. गार्डे ​पुण्यात गेली 20 वर्षे कार्यरत आहे​त​. ​त्यांचे ​सातारा रोड येथे ‘अ‍ॅडव्हान्स्ड डेंटल क्लिनिक’ आहे, ​सामाजिक बांधिलकीतून अनेक शस्त्रक्रिया ते विनामूल्य करतात.

शिक्षकांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आंदोलन मागे घेण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आवाहन

0

नागपूर, दि. 12 : राज्य शासन शिक्षकांच्या मागण्याबाबत नेहमीच सकारात्मक आहे. वाढीव तुकड्यांसह विविध मागण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात येईल. राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीने विविध मागण्यासाठी सुरू केलेले आंदोलन त्वरित मागे घेण्याचे आवाहन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे केले.

राज्यातील कायम शब्द वगळण्यात आल्यानंतर अनुदानास पात्र घोषित केलेल्या विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांना आणि तुकड्यांना सरसकट 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार 1 व 2 जुलै, 2016 ला प्राथमिक व माध्यमिक शाळा अनुदानास पात्र करण्यात आल्या आहेत. या शाळांना आणि तुकड्यांना 20 टक्के अनुदान देण्याबाबतची पुरवणी मागणी जुलै, 2018 नागपूर येथील अधिवेशनात मंजूर करण्यात आली आहे. शिवाय उच्च माध्यमिक विद्यालयांना 20 टक्के अनुदान देणे, 1 व 2 जुलै 2016 नंतरच्या उर्वरित सर्व अघोषित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि तुकड्यांच्या मूल्यांकनानंतर अनुदानास पात्र घोषित करणे, तसेच ज्या शाळांना यापूर्वीच 20 टक्के अनुदान सुरु झालेले आहे, अशा शाळांना पुढील टप्प्यातील अनुदान अदा करण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.

राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीने 20 टक्के अनुदान प्राप्त झालेल्या सर्व शाळांना प्रचलित नियमानुसार 100 टक्के अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यासाठी मंगळवारी विधानभवनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शिक्षणमंत्री श्री. तावडे यांची मोर्चातील शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली होती. श्री. तावडे यांनी मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार श्री. तावडे यांनी गुरूवारी विधानपरिषदेत निवेदन करून विविध शिक्षक संघटनांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

पेण अर्बन बँकेतील घोटाळा प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – मुख्यमंत्री

0

नागपूर, दि. 12 : रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. अंमलबजावणी संचालनालय तसेच गृह विभागाने या प्रकरणी लक्ष घालून घोटाळ्यातील कोणीही दोषी सुटणार नाही असे पहावे. तसेच ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी बँकेच्या प्रॉपर्टीज विकण्याच्या दृष्टीने अॅक्शन प्लॅन तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.

येथील विधानभवनात आज यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पेण अर्बन सहकारी बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सहकार मंत्री सुभाष देशमुख, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव  एस. एस. संधू यांच्यासह रायगडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, अंमलबजावणी संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.

पेण अर्बन सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्याचा फटका हा बँकेच्या सुमारे अडीच लाख ठेवीदारांना बसला आहे. अनेकांनी आपल्या आयुष्याची पुंजी यात गुंतविली आहे. या ठेवीदारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने या प्रकरणी गंभीर कार्यवाही होणे गरजेचे आहे. दोषींकडून वसुली करणे, त्यांच्या प्रॉपर्टींची जप्ती करणे, बँकेच्या प्रॉपर्टीची विक्री करणे यासंदर्भात सर्व संबंधित विभागांनी कठोरपणे कारवाई करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. ते म्हणाले, या घोटाळ्यातील कोणत्याही दोषी व्यक्तिला पाठीशी घालण्यात येऊ नये. पोलीस यंत्रणेने तसेच अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी नि:पक्षपणे कारवाई करावी. यासाठी शासन आपल्या पाठीशी राहील. गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांनीही याप्रकरणी स्वत: लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, सिडकोच्या क्षेत्रातील पेण अर्बन बँकेच्या ज्या प्रॉपर्टी सिडकोला खरेदी करणे शक्य आहेत त्या त्यांनी खरेदी कराव्यात. इतर भागातील प्रॉपर्टीजची खरेदी प्रधानमंत्री आवास योजनेच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी करण्यास म्हाडाला सांगण्यात येईल. या प्रॉपर्टीजच्या विक्रीतून जास्तीत जास्त ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात येऊ शकतील, असे ते म्हणाले. दोषींवर कडक कारवाई होणे, कोणालाही पाठीशी न घालणे आणि ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याच्या दृष्टीने यंत्रणेने कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

अतिरिक्त आयुक्त शीतल उगलेंंच्या हेकेखोरपणामुळे पुण्याच्या विकासाला खिळ- राणी भोसले (व्हिडीओ)

पुणे- अधिकाऱ्यांच्या हेकेखोर स्वभावामुळे पुण्याचे नुकसानहोत असल्याचा आरोप करत आज भाजपच्या नगरसेविका आणि महिला बालकल्याण समितीच्या माजी अध्यक्षा राणी रायबा भोसले यांनी थेट अतिरिक्त आयुक्तांवर आणि त्यांच्या स्वभावावर प्रहार करत त्यांची बदली करण्याची मागणी केली आहे .तर याच वेळी महापालिकेतील सर्वच कामगारांचा पगार कमी करण्याचा डाव याच अतिरिक्त आयुक्त यांनी रचल्याचा आरोप करत या प्रकाराविरुद्ध १७ जुलै रोजी पीएमसी एम्प्लॉईज युनियन ने महापालिका भवनासमोर सर्व कामगार ,कर्मचारी आणि अधिकारी यांना घेवून मोठे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे . 

ग्रेड पे च्या नावाने , महाराष्ट्र शासनाच्या वेतन पद्धतीच्या नावाने महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचा घाट अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी घातल्याचा दावा या युनियनचे अध्यक्ष बापू पवार आणि सेक्रेटरी चंद्रकांत शितोळे यांनी केला आहे . तर नगरसेविका राणी भोसले यांनी सांगितले कि , महापालिकेतील सर्व खाते , अधिकारी यांची मान्यता असते पण केवळ या अतिरिक्त आयुक्तानांच तो अमान्य होतो असे ७० ते ८० प्रस्ताव त्यांनी रिजेक्ट केले आहेत . नगरसेविका आणि नगरसेवक आपापली कामे घेवून त्यांच्या कार्यालयात गेले कि त्या रागानेच बोलतात . अरेरावी आणि हेकेखोरपणा यामुळे त्यांनी चालविलेला कारभार पाहता त्यांची तातडीने बदली करायला हवी . प्रत्यक्ष नागरिकांना उत्तरे देणे , आणि आमच्या कारकिर्दीत  काय केले हे आम्हाला सांगावे लागते आणि अशा अधिकाऱ्यांमुले आम्हाला नागरिकांचा रोष पत्करावा लागतो आहे . …पहा नेमके या संदर्भात नगरसेवका भोसले आणि कामगार युनियनचे पदाधिकारी नेमके काय म्हणाले ……

आध्यात्मिक गुरू दादा वासवानी यांचे निधन

0

पुणे : साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा जे. पी. वासवानी (वय 99) यांचे आज (गुरुवार) सकाळी पुण्यात निधन झाले. सिंधी समाजाचे धर्मगुरु म्हणून त्यांची ओळख होती.

साधू वासवानी मिशनचे प्रमुख आणि आध्यात्मिक गुरू दादा जे. पी. वासवानी हे शाकाहाराच्या प्रसारासाठी काम करत होते. तसेच प्राणीहक्कासाठी ते लढत होते. पुण्यात मुख्यालय असलेल्या साधू वासवानी मिशनचे प्रमुख म्हणून ते काम पाहत होते. त्यांनी 150 हून अधिक प्रेरणादायी पुस्तके लिहिली आहेत.

दादा वासवानी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1918 रोजी हैदराबाद येथे झाला होता. त्यांनी ऑक्सफर्ड, शिकागो, लंडन आणि न्यूयॉर्क येथे आध्यात्मिक विषयावर व्याख्यान दिले होते. दादा वासवानी हे सतत जागतिक शांततेसाठी कार्यरत होते. साधू वासवानी हे त्यांचे गुरु होते. संयुक्त राष्ट्रसंघाकडून देण्यात येणारा यू थन्स शांतता पुरस्कार त्यांना मिळाला होता.

राज्यातील सुमारे 1.20 कोटी ग्राहकांच्या दरात 8 पैसे वाढ-महावितरणची मध्यावधी फेरआढावा याचिका

0

मुंबई : महावितरणने सुमारे 34, 646 कोटी रुपयांच्या बहुवार्षिक महसुली तुटीच्या वसुलीसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे मध्यावधी फेरआढावा याचिका दाखल केली आहे. या प्रस्तावात राज्यातील सुमारे 1.20 कोटी ग्राहकांच्या वीजदरात केवळ 8 पैसे एवढी अत्यल्प दरवाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहे. या याचिकेत राज्यात येणाऱ्या नवीन उद्योजकांना प्रतियुनिट 1 रुपया सवलत, ऑनलाईन वीजबील भरणाऱ्या वीजबिलांवर 0.5 टक्के सूट या याचिकेत प्रस्तावित करण्यात आली आहे. याशिवाय 2019-20 करिता कोणतीही दरवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही.असा दावा महावितरण कडून करण्यात आला आहे .

महावितरण कंपनीची आर्थिक व्यवहार्यता टिकवुन ठेवण्याकरिता तसेच महागाई निर्देशांकाच्या अनुषंगाने विविध खर्चाचा आढावा, महावितरणच्या वीजयंत्रणेच्या संचालन व दुरुस्तीवरील वाढता खर्च आणि ग्राहकसेवेकरिता पायाभूत आराखड्यांतर्गत करण्यात येत असलेली मोठी कामे  व विविध घटकांमुळे निर्माण होणारे वाढीव खर्च, जे महावितरणच्या नियंत्रणाबाहेर आहेत, ते भरुन काढण्याकरिता आवश्यक आहेत. त्यासाठी प्रस्तावित दरवाढ आवश्यक आहे. तसेच ग्राहक वर्गवारीनिहाय वीजवापरातील बदल आणि 2015-16 व 2016-17 दरम्यान मुक्त प्रवेश वापरात झालेली वाढ यामुळे महावितरणच्या महसूलावर विपरित परिणाम झाला असून महसुली तुट निर्माण झाली आहे.

महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांमध्ये 0 ते 100 युनिटपर्यंत वीजवापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या अंदाजे 1.20 कोटी आहे. वीजआकार व वहनआकार यांचा एकत्रित विचार केल्यास 0 ते 100 युनिट या वर्गवारीत आर्थिकवर्ष 2018-19 मध्ये लागू असलेल्या (प्रति युनिट रु. 4.25) दरात 8 पैसे एवढीच अत्यल्प वाढ (प्रति युनिट रु. 4.33) आर्थिक वर्ष 2018-19 साठी प्रस्तावित केली आहे. ऑनलाईन वीज बिल भरण्यास प्रोत्साहन देण्याकरीता महावितरणने जे लघुदाब ग्राहक ऑनलाईन वीजदेयक भरतात त्यांच्या करीता वीज बीलावर 0.5 टक्के सुट प्रस्तावित केली आहे.

महाराष्ट्रात नवीन उद्योग यावेत तसेच विद्यमान उच्चदाब ग्राहकांनी आपला वीज वापर वाढवावा यासाठी महावितरणने विशेष प्रोत्साहनपर सवलती आपल्या मध्यावधी आढावा याचिकेत प्रस्तावित केल्या आहेत. या प्रस्तावामध्ये राज्यात नवीन उद्योगांना आकर्षित करण्यासाठी नवीन उपवर्गवारी प्रस्तावित करून विद्यमान ग्राहकांना (औद्योगीक, वाणिज्यिक व रेल्वे) वाढीव वीजवापरावर तसेच नवीन येणाऱ्या औद्योगिक, वाणिज्यिक  व रेल्वे ग्राहकांच्या वीजदरात 1 रुपये प्रतीयुनिट सवलत प्रस्तावित केली आहे. तसेच मोठया प्रमाणावर वीजवापर करणा-या (0.5 द.ल.यु पेक्षा जास्त) ग्राहकांना वीज आकारात 1% पासुन 10% पर्यंत सवलत देण्याचा प्रस्ताव आहे.

याशिवाय उच्चदाब ग्राहकांना सध्या उपलब्ध असणाऱ्या सवलतींचा (पॉवर फॅक्टर/ लोड फॅक्टर) व त्याचा महावितरणच्या इतर ग्राहकांवर पडणारा भार याचे सुसूत्रिकरण प्रस्तावित केले आहे. प्रस्तावित केलेल्या बदलांमुळे असे ग्राहक विजेचा अधिक कार्यक्षमतेने वापर करण्यास उद्युक्त होतील व त्याचा फायदा संपुर्ण वितरण प्रणालीला होईल. त्यामुळे वितरण व्यवस्थेतील प्रत्येक ग्राहकांना व भागधारकांना त्याचा फायदा होईल.

यापूर्वी 2016 मध्ये महावितरणने प्रस्तावित केलेल्या एकूण रु. 56,372 कोटी महसुली तुटीच्या तुलनेत  आयोगाने  9,149 कोटी इतक्या महसुली तुटीस मान्यता दिली होती. यात 19,373 कोटी इतक्या इंधन समायोजन खर्चापासून मिळणा-या महसुलाचा समावेश केला होता. सदर आदेशानुसार आयोगाने आर्थिक वर्ष 2016-17 ते आर्थिक वर्ष 2019-20 या कालावधीकरीता केवळ 1.20% ते 2.00% एवढ्याच दरवाढीस मान्यता दिली होती.  प्रचलित महागाईचा दर 5 % ते 6 % एवढा असताना आयोगाने मान्य केलेली दरवाढ ही महावितरणचा एकूण दैनंदिन खर्चाची पूर्तता करण्यास पुरेशी नव्हती.

आयोगाच्या दि. 3 नोव्हेंबरü 2016 च्या वीजदर आदेशामध्ये त्रुटी असल्यामुळे महावितरणतर्फे आयोगाच्या विनियमातील तरतुदीच्या आधारे आर्थिक वर्ष 2016-17 ते आर्थिक वर्ष 2019-20 या कालावधी करिता पुर्नविचारü याचिका दि.16.12.2016 रोजी आयोगाकडे दाखल केली होती. रु. 24,251 कोटीच्या तुटीत प्रामुख्याने गणनेतील त्रुटी / चुका, प्रचलित नियामकúú तरतुदीनुसारü आदेश न देणे, काही बाबी वास्तवास धरून मान्य न करणे यांचा समावेश होता. सदर पुर्नविचार याचिके संदर्भात आयोगाने दि. 20 नोव्हेंबर 2017 रोजी आदेश दिला. परंतू सदर आदेशात आयोगाने महावितरणच्या काही मागण्यांना मान्यता देऊन त्यांचा अंतर्भाव मध्यावधी याचिकेत करण्याचे आदेश दिले होते. तसेच बहुवार्षिक वीजदर विनियम 2015 मधील संचलन व सुव्यवस्थेवरील खर्चाबाबत असलेल्या त्रुटी दुर करुन आयोगाने दि. 29.11.2017 रोजीच्या आदेशान्वये दुरुस्ती केली आहे व या बदलाचा परिणामस्वरुप त्याच्याशी निगडीत असलेल्या खर्चाचा समावेश (अंदाजे रु. 4,846 कोटी) महसुली तुटीत केला. वरीलप्रमाणे विविध रक्कमेच्या वसुलीची परवानगी वेळेत न मिळाल्यामुळे उद्भवलेल्या रु. 3,880 कोटी रकमेच्या कॅरींग कॉस्टचा अंतर्भाव महसुल तुटीत केलेला आहे.

उपरोक्त नमुद कारणांमुळे जसे की, आयोगाच्या निर्णयाच्या अनुषंगाने कमी झालेली वसुली तसेच इतर खर्चातील बदल यांच्या परिणामस्वरुप मध्यावधी आढावा याचिकेमध्ये महसुली तुट 34,646 कोटी असुन त्यात कॅरींग कॉस्टचाही समावेश केला आहे. तसेच महानिर्मितीने देखील त्यांची मध्यावधी आढावा याचिका आयोगाकडे दाखल केली असून 2018-19 व 2019-20 वार्षिक स्थिर आकारात वाढ प्रस्तावित केली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून रु. 950 कोटी महावितरणच्या मध्यावधी आढावा याचिकेमध्ये समाविष्ट केलेला आहे.

महावितरणने 2018-19 साठी मंजूर केलेल्या वीजदरात 15% वाढ प्रस्तावित केली आहे. भविष्यातील कॅरींग कॉस्ट टाळण्याकरीता सदर प्रस्तावित दरांवर 2019-20 करीता दरवाढ प्रस्तावित केलेली नाही. ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी महावितरणला निधीची गरज असते. त्यामुळे महावितरणने प्रस्तावित केलेल्या दरवाढीला मान्यता देणे आवश्यक आहे.

खुनाचा छडा लावणा-या पोलिसांना तीस हजाराचे बक्षिस.

0
पुणे-घोरपडे पेठेतील शिवाजी रोडवर 4 जून रोजी मध्यरात्री कचरू गणपत गवळी (वय-32) या इसमाचा अज्ञात आरोपीने चाकुचे वार करून खून केला होता. ही घटना मध्यरात्री घडली असल्याने पोलिसांना याप्रकरणी कोणतेही धागेदोरे मिळत नव्हते. तरीसुध्दा पोलिसांनी तब्बल 22 दिवस अहोरात्र मेहनत घेऊन अत्यंत क्लिष्ट अशा खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावला असून यातील प्रमुख आरोपीला अटक केली. खडक पोलिसांच्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी कौतुक केले असून प्रशस्तीपत्रक आणि तीस हजार रुपये बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला.
मयत इसमाच्या मारेक-यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान पुणे शहरातील बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, शिवाजी रोड, स्वारगेट, सातारा रोड, बिबवेवाडी रोड आदी ठिकाणची 80 सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. यामध्ये पांढ-या व काळ्या रंगाच्या डिओ स्कुटरवरून फिरणा-या एका व्यक्तीचा आणि मयताचा वाद झाल्याचे दिसून आले होते. त्यानुसार पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध सुरू केला.
यासाठी पोलिसांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील दोन हजार डिओ गाड्यांची माहिती गोळा केली आणि त्यातील निवडक 116 डिओ मोपेडच्या मालकांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी केली. या चौकशीदरम्यान पोलिसांना एका संशयीत इसमाची  माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अश्विन विकास गवळी (वय-19, रा.विघ्नहर्ताकूंज बिल्डींग, आंबेगाव पठार, कात्रज) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने पुर्ववैमनस्यातून कचरू गणपत गवळी याचा खून केल्याचे कबूल केले.
या क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्याची उकल केल्याबद्दल पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी खडक पोलिसांच्या पथकाला बक्षिस मिळावे यासाठी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे शिफारस केली होती. त्यानुसार रश्मी शुक्ला यांनी खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के, सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, आनंत व्यवहारे पोलीस कर्मचारी सतिश नागुल, विनोद जाधव, बापु शिंदे, विश्वनाथ शिंदे, संदिप कांबळे, अशिष चव्हाण, अनिकेत बाबर, समीर माळवदकर, विनोद जाधव, इम्रान नदाफ, रविंद्र लोखंडे, गणेश सातपुते, सागर घाडगे, महेश कांबळे, तानाजी सरडे, राहुल जोशी यांचे कौतुक करून प्रशस्तिपत्र व तीस हजार रुपये बक्षिस देऊन सर्वांचा सत्कार केला.