Home Blog Page 3043

मंत्रालय आणि राजभवनातही सार्वजनिक पार्किंग सुरू केले जावे- लोढ़ा

0

मुंबई. शहरातील भयावह ट्रॅफिक जाम व अडचणीच्या पार्किंग समस्येवर उपाय करण्यासाठी मुंबईमध्ये सरकारला मंत्रालय व राजभवन सहित सर्व सरकारी ठिकाणी सार्वजनिक पार्किंगची सुविधा सुरू केली पाहिजे. भाजपाचे ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढ़ा ह्यांनी विधानसभेत ही मागणी केली व असेही म्हंटले की, मुंबईच्या नियोजनबद्ध विकासासाठी वेगळे मंत्रालयही स्थापन केले जावे.

विधानसभेमध्ये सार्वजनिक महत्त्वाच्या विषयावर ‘अर्धा तास चर्चेच्या’ अंतर्गत बुधवारी मुंबईतील पार्किंग समस्या, ट्रॅफिक जाम आणि मूलभूत सुविधांच्या विकासाविषयी आपला प्रस्ताव ठेवत आमदार लोढ़ा ह्यांनी म्हंटले की, मुख्यमंत्री मुंबई व महाराष्ट्राच्या विकासासाठी अतिशय पारदर्शितेसह व वेगाने कार्यरत आहेत, मेट्रोचे काम वेगाने होत आहे. परंतु गाड्यांसाठी रस्त्यांवर जागा नाही आहे. तरीही रोज हजारो नवीन वाहनांची नोंदणी होत आहे. परिणामी अनेक तास ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडणे ह्या शहराची सर्वांत मोठी ओळख बनले आहे.

फूटपाथवर पायी चालणा-यांसाठी कुठेच जागा नाही ह्याचाही उल्लेख करून आमदार लोढ़ा ह्यांनी म्हंटले की, मुंबईतून जितका कर वसूल केला जातो, त्यातील फार थोडा मुंबईसाठी वापरला जातो. त्यांनी सरकारकडे मागणी केली की, दीर्घ काळापासून प्रलंबित हाजी अली सर्कलवर फ्लाय ओव्हरचे काम करून बाणगंगावरून रॉकी हिलकडे जाणा-या रस्त्याला तातडीने सुरू करावे. आमदार लोढ़ा ह्यांनी दु:ख व्यक्त केले की, मुंबईमधील पायाभूत सुविधांचा आराखडा बनवणा-या नाना जगन्नाथ शंकरशेठ ह्यांच्या नावे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या नामकरणाची फाईलही सरकारी विभागामध्ये अडकून पडली आहे आणि ह्याहून अधिक दुर्लक्ष योजनांकडे केले जाऊ शकत नाही. मुंबईच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी करत आमदार लोढ़ा ह्यांनी सरकारकडे मागणी केली की, मुंबईला वाचवण्यासाठी तत्काळ उपाय केले जावेत. त्यांनी म्हंटले की, जर मुंबईच्या सुनियोजित विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय बनवले तर फक्त मुंबई शहरच नाही तर राज्याचा विकासही अधिक वेगाने होईल.

कागदविरहीत गो-ग्रीन वीजबील भरण्याच्या सुविधेवर महावितरणकडून १ डिसेंबरपासून १० रुपयाची सवलत

0

मुंबई :-ग्राहकांना ऑनलाईन वीजबील भरण्यास प्रोत्साहीत करण्याकरिता महावितरणने विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. या धोरणाला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी जे वीजग्राहक छापील वीजबिलाऐवजी ई-मेल व एसएमएसचा पर्याय स्विकारतील अशा सर्व ग्राहकांना येत्या दि. १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत दिली जाणार आहे.

महावितरणच्या ग्राहकांना वीजबिलाची माहिती व वीजबील भरण्यासाठी मोबाईल ॲप व www.mahadiscom.in यावर ऑनलाईनसह विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या सर्व सुविधा उपलब्ध असतानाही महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबीलही उपलब्ध करून देण्यात येते. परंतू जे ग्राहक गो-ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात, अशा ग्राहकांना छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसद्वारे वीजबील उपलब्ध्‍ करून दिले जाते. या सर्व ग्राहकांना दि. १ डिसेंबर २०१८ पासून प्रतीबील १० रुपये सवलत मिळणार आहे. गो-ग्रीनचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या संकेत स्थळावर https://billing.mahadiscom.in/gogreen.php येथे जाऊन करावी लागणार आहे.

गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास वीजबिलावरील सवलतीसह ग्राहकांना तातडीने वीजबील मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही सोपे राहणार आहे. तसेच गो-ग्रीनचा पर्याय पर्यावरणाला पूरक असणार आहे. वीजग्राहकांनी जास्तीत जास्त कागद विरहीत गो-ग्रीन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी केले आहे.

डॉ. गंगवाल यांना ‘अहिंसा इंटरनॅशनल’तर्फे ‘शाकाहार अहिंसा पुरस्कार’ जाहीर

0
पुणे : नवी दिल्ली येथील अहिंसा इंटरनॅशनल संस्थेच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा ‘शाकाहार अहिंसा पुरस्कार’ पुण्यातील शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना जाहीर झाला आहे. रविवार, दि. २ डिसेंबर २०१८ रोजी खारवेल भवन, कुंदकुंद भारती, नवी दिल्ली येथे होणार्‍या कार्यक्रमात दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या हस्ते व केंद्र सरकारच्या आवास मंत्रालयाचे राजीव जैन यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच परमपूज्य सिद्धांतचक्रवर्ती श्वेतापिच्छाचार्य, श्री १०८ विद्यानंद मुनीराज व श्री १०८ श्रुतसागरजी मुनीराज यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह व रोख एक लाख ५१ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डॉ. कल्याण गंगवाल यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला असून, पुरस्काराची रक्कम झारखंड येथील सम्मेद शिखर परिसरातील आदिवासी पाड्यातील लोकांसाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संगमनेर आणि अकोला तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजासाठी मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्याचे काम डॉगंगवाल गेली अनेक वर्षे करीत आहेत. त्याचबरोबर समाजात अहिंसा रुजावी, व्यसनमुक्ती व्हावी आणि पशुबळी विरोधी चळवळ उभारावी, यासाठी डॉगंगवाल यांनी व्यापक काम केले आहे. 

टेनिस स्पर्धेत जॅकलिन अडीना क्रिस्टियन, कै-लीन झाँग, मरिना मेलनिकोवा, इवा गुरेरो अल्वारेज यांचा मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का

0

पुणे- नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000 डॉलर बीव्हीजी पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत एकेरीत रोमानियाच्या जॅकलिन अडीना क्रिस्टियन, चीनच्या कै-लीन झाँग, रशियाच्या मरिना मेलनिकोवा, स्पेनच्या इवा गुरेरो अल्वारे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु झालेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत रोमानियाच्या कलिन अडीना क्रिस्टियन हिने तिसऱ्या मानांकित चीनच्या जिया-जिंग लुचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 6-4असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. रशियाच्या मरिना मेलनिकोवा हिने पाचव्या मानांकित ओल्गा दोरोशीनाचा 5-7, 6-4, 6-1असा तीन सेटमध्ये पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. हा सामना 2 तास 45मिनिटे चालला.स्पेनच्या इवा गुरेरो अल्वारेज हिने सहाव्या मानांकित इस्राईलच्या डेनिझ खझानुकचा 6-3, 6-4असा संघर्षपूर्ण पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. भारताच्या दुसऱ्या मानांकित अंकिता रैना हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत क्वालिफायर रशियाच्या याशिना इक्तेरिनाचा 6-1, 5-7, 6-1असा तीन सेटमध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. हा सामना 1तास 42मिनिटे चालला. चौथ्या मानांकित भारताच्या कारमान कौर थंडीने हंगेरीच्या रेका-लुका जनीचा 6-3, 6-2असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(दुसरा फेरी):
तामरा झिदनसेक(स्लोव्हेनिया)(1)वि.वि.मरीम बोलकवडेझ(जॉर्जिया) 7-5, 4-6, 6-4;
अंकिता रैना(भारत)(2)वि.वि. याशिना इक्तेरिना(रशिया) 6-1, 5-7, 6-1;
जॅकलिन अडीना क्रिस्टियन(रोमानिया) वि.वि.जिया-जिंग लु(चीन)(3) 7-6(5), 6-4;
कै-लीन झाँग(चीन)वि.वि. क्युरिनी लेमणी(नेदरलॅंड)(8) 4-6, 7-5, 6-2;
कारमान कौर थंडी(भारत)[4] वि.वि. रेका-लुका जनी(हंगेरी) 6-3, 6-2; 1hour 15
व्हॅलेरिया स्राखोवा(युक्रेन)वि.वि. कॅथरीना गेरलेच(जर्मनी) 7-6(0), 7-5;
मरिना मेलनिकोवा(रशिया)वि.वि. ओल्गा दोरोशीना(रशिया)(5) 5-7, 6-4, 6-1; 2hour 45
इवा गुरेरो अल्वारेज(स्पेन)वि.वि.डेनिझ खझानुक(इस्राईल)(6) 6-3, 6-4;

दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी:
अमिना अंशबा(रशिया)/कनिया पॉला(पोलंड)वि.वि.जॅकलिन क्रिस्टियन(रोमनिया)/ क्युरिनी लेमणी(नेदरलॅंड) 6-3, 3-6, 10-8;


अलेक्झांड्रा नेदिनोवा(बल्जेरिया)/ तामरा झिदनसेक(स्लोव्हेनिया) वि.वि.ऍना व्हॅसलिनोविच/ याशिना इक्तेरिना(रशिया) 6-4, 6-1;


शेरॉन फिचमन(कॅनडा)/कातरझायना पीटर(पोलंड) वि.वि.कॅटी ड्युन(ग्रेट ब्रिटन)/सराह ग्रे(ग्रेट ब्रिटन) 6-3, 6-0;


अंकिता रैना(भारत)/कारमान कौर थंडी(भारत)वि.वि.ची-यु-सु(तैपेई)/जिया-जिंग लु(चीन) 7-5, 6-2 

ग्रंथ वाचनामुळे बुध्दीला चालना मिळते – डॉ.नागनाथ कोत्तापल्ले

0

पुणे वाचनसंस्कृती वाढावी आणि नवनवीन साहित्य संपदेची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी, ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळे ग्रंथ वाचण्यास मिळत असतात या ग्रंथ वाचनामुळे बुध्दीला चालना मिळत असून त्याचा लाभ सर्व नागरिकांन घ्यावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले.

            ग्रंथालय संचालनालयाच्या जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्यावतीने येथील श्री संत गाडगेमहाराज आकुल धर्मशाळा (प्रार्थनागृह) जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन आज झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले  हे होते त्यावेळ ते बोलत होते.  यावेळी सहायक ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर, कार्यावाह सोपान पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रे.श्री.गोखले, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, विजयराव कोलते, जिल्हा ग्रंथालय अध्यक्ष विकास टिंगरे, ग्रंथपाल खैरे, ग्रंथमित्र धोंडीबा सुतार, रमेश सुतार, दिलीप भिकोले, लक्ष्मण थोरात, विविध शासनमान्य सार्वजनिक वाचलनालयाचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शालेय व महाविद्यालयीन युवक युवती यावेळी उपस्थित होते.

             आपल्या देशात बऱ्याच वर्षापासून शिक्षणाची परंपरा असून देखील आपण मागे आहोत. मानवी जीवन समजून घेण्यासाठी नेहमी साहित्य वाचले पाहिजे.  त्यात काय लिहिले आहे हे समजून घेणे महत्वाचे असते. यामुळे  आपल्याला समाज, माणुस, संस्कृती कळते. राज्याच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत वाचनसंस्कृती वाढावी आणि साहित्य क्षेत्रातील घडामोडींची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी दरवर्षी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. २८ आणि २९ नोव्हेंबर या कालावधीत हा ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवात राज्यातील प्रसिध्द पुस्तक प्रकाशन संस्थांनी ग्रंथ व साहित्याचे प्रदर्शन करणारे स्टॉल लावले आहेत.

            जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह सोपान पवार म्हणाले, जिल्हयातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचक वर्ग वाढविण्याचे काम केले पाहिजे. येथून पुढे ग्रंथालय चळवळ ही व्यापक झाली पाहिजे. तालुक्यांच्या ठिकाणीही ग्रंथोत्सवाचे आयोजन केले पाहिजे असेही ते म्हणाले.

            उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे म्हणाले,  ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून अनेक लेखकांचे पुस्तके त्यामध्यील विचार आपणास पहावयास मिळते.समाजाला अडचणीतून मार्गक्रमन करण्यासाठीही पुस्तकेच उपयोगी पडतात. अनेक साहित्यिकांच्या लेखनीतून समाज पुढे गेलेला आहे. वाचनामुळे आपण आपले होणारे नुकसान टाळू शकतो असेही ते म्हणाले.

            यावेळी सहायक ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनीही आपले मानोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रे.श्री. गोखले यांनी केले तर आभार जिल्हा ग्रंथालय निरीक्षक मंगेशपेल्ली यांनी केले.

लोकराज्य स्टॉलला भेट

ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांनी उपस्थित मान्यवरांसमवेत विविध पुस्तक प्रकाशनांच्या स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. दोन दिवसीय ग्रंथोत्सवामध्ये मान्यवरांचे व्याख्यान व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामुल्य असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रे.श्री.गोखले यांनी यावेळी केले.

ग्रंथदिंडी

ग्रंथोत्सवामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी सकाळी राजा धनराज गिरजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, ताराचंद हॉस्पिटलसमोर,रास्तापेठ ते  कार्यक्रमस्थळापर्यत ग्रंथदिंडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीमध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थींनी,साहित्यीक, साहित्यप्रेमी नागरिक, वाचनालयाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

पुण्यात अग्नितांडव ; २००हून अधिक झोपड्या जळून खाक- सकाळी दक्षिणेला तर दुपारी उत्तरेला आग

0

पुणे-शिवाजीनगरच्या वाकडेवाडी येथील पाटील इस्टेटच्या झोपडपट्टीत भीषण आग लागली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीच्या भीषण तीव्रतेमुळे २००हून आधिक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या आहेत. शर्थीचे प्रयत्न करून पावणेपाच वाजता आग आटोक्यात आणण्यात आली  .झोपडपट्टीतील 10 सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग आणखी भडकली. या आगीत मोठी वित्तहानी झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.


आग लागल्याचे समजताच संगमवाडी ब्रीज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला . सिलेंडरच्या गळतीमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली . २०० हून अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना मोठे प्रयत्न करावे लागले  .

पाटील इस्टेटच्या एका बाजूला नदी वाहते असून दुसऱ्या बाजूने अंदाजे ५०० हुन अधिक मीटर अंतरावर घरे आहे. आत जाणारा रस्ता खूपच छोटा असल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना आत जाता येत नाही. पाईपद्वारे पाणी नेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला .

शहरातील पाटील इस्‍टेट येथील आगीची जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम तसेच महापालिका आयुक्‍त सौरभ राव यांनी पहाणी करुन बाधितांचे सांत्‍वन केले. यावेळी प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, महापालिकेचे आपत्‍ती निवारण अधिकारी गणेश सोनुने आदी उपस्थित होते.

सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड समोरील शिरोडकर पॅकेजिंग इंडस्ट्रीजला बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत या कंपनीतील अर्धे अधिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले . यातील माल आणि इतर साहित्य मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.


अग्निशमन दलाला रात्री तीन वाजता चौगुले इंडस्ट्रीजजवळ आग लागल्याची माहिती देणारा फोन आला होता. त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि तीन पाण्याचे टँकर तातडीने घटनास्थळी रवाना झाले. अथक प्रयत्नानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु या आगीत कंपनीतील अर्धे अधिक साहित्य जाळून खाक झाले होते.
या कंपनीत मशिनरी पॅकिंगसाठी लागणारे लाकडी बॉक्स तयार करण्यात येतात. घटनेत पॅकिंग मशिनरी, रॉ-मटेरिअल पूर्णपणे जळून खाक झाल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शार्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

सावित्रीच्या लेकींचे ज्योतिबाना अभिवादन !

0

पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीदिनानिमित्त भव्य अभिवादन मिरवणूक काढण्यात आली.

ही मिरवणूक बुधवार, दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता आझम कॅम्पस येथून निघाली.

मिरवणुकीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते झाले. तर संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. संस्थेच्या ३० आस्थापनांमधील १० हजार विद्यार्थी अभिवादन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले.अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी चे ३ विद्यार्थी ज्योतिबा फुले ,सावित्रीबाई आणि फातिमाबी शेख यांच्या वेशात बग्गीत बसून सहभागी झाले .

अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १७ वे वर्ष आहे. दरवर्षी एम.सी.ई संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. गांधी,महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी व पुण्यतिथीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.

संस्थेच्या सर्व संस्थातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यामध्ये सहभागी झाले.डॉ  एन वाय काझी , शाहिद  इनामदार ,वाहिद बियाबानी ,डॉ . शैला बुटवाला ,पटेल ,अब्दुल वहाब ,डॉ . व्ही . एन .जगताप ,प्रा . लीना देबनाथ ,प्रा . अनिता फ्रांट्झ ,प्रा . परवीन शेख ,डॉ किरण भिसे ,प्रा . अनिता बेलापूरकर उपस्थित होते .

मिरवणुकीचा मार्ग आझम कॅम्पस, पूना कॉलेज, गोल्डन ज्युब्ली, काशीवाडी, टिंबर मार्केट, सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन, बब्बनमियाँ चौक, रिझवानी मशिद, मीठगंज पोलीस चौकी, मोमीनपुरा, चाँदतारा चौक, महात्मा फुले वाडा असा होता.

मार्स, इनकॉर्पोरेटेड आणि टाटा ट्रस्टस् एकत्र येत भारतातील पोषण विषयक दरी सांधण्‍यास सहाय्य करणार

0

पुणे: मार्स, इनकॉर्पोरेटड आणि टाटा ट्रस्टस् ने आज, सर्व समाजगटातील जनतेच्या पोषणविषयक दरी सांधण्‍यास सहाय्य करत भारताचे लक्ष्य गाठण्यासाठीच्या आपल्या धोरणात्मक भागीदारीचा पुढचा टप्पा साजरा केला. अधिक चांगले पोषण देऊ करण्यासाठी ते विविध मार्गांचा अवलंब करणार आहेत. यात स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेला प्रथिनयुक्त, पोषक आहार पुरवण्याचा एक मार्ग असणार आहे. सहकार्यातून उभ्या राहिलेल्या या नव्या उपक्रमाचे उद्घाटन मार्स, इनकॉर्पोरेटेडचे अध्यक्ष श्री. स्टीफन बॅजर आणि टाटा ट्रस्टस् चे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. आर. वेंकटरमणन् यांच्या हस्ते झाले. यावेळी दोन्ही संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या भागीदारीमुळे या दोन्ही संस्थांना, समाजाला भेडसावणाऱ्या विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी आपले अधिक सहकार्य देणे शक्य होणार आहे. जसे कि, या उपक्रमात परवडणाऱ्या दरात पोषण उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मानवी आरोग्य आणि वेलनेसवर लक्ष केंद्रीत करणारा आपला विभाग मार्स एज या लक्ष्यित पोषणाच्या माध्यमातून मार्स हा उपक्रम पार पाडणार आहे. लक्षणीय आणि दृश्य परिणाम देऊ शकतील आणि दैनंदिन जीवनात सहज सामावून जातील असे सोपे, मजेदार व सुयोग्य पोषण पर्याय निर्माण करण्यासाठी आधुनिक विज्ञान, माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मार्स एजची स्थापना करण्यात आली आहे.

कुपोषणासंदर्भात टाटा ट्रस्टस् तर्फे त्रीस्तरीय दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्विसेस (आयसीडीएस) सारख्या सध्याच्या प्रणालींना सक्षम करण्यासाठी सरकारला साह्य करणे, अन्नातील पोषणद्रव्ये सुधारण्यासंदर्भातील योजना आणि त्याचा प्रसार यासाठी सरकारसोबत काम करणे आणि मार्ससोबत सध्या जी भागीदारी आहे त्यापद्धतीने परवडणाऱ्या पोषक उत्पादनांची निर्मिती आणि वितरण यात थेट साह्य करणे अशाप्रकारे ही जबाबदारी पार पाडली जाणार आहे. पोषणासंदर्भातील प्रकल्पांच्या बाबतीत या ट्रस्टस् चा विश्वास आहे की, पोषणाचे लक्ष्यित परिणाम गाठण्यासाठी गरिबी दूर करणे, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता यांसारख्या मुद्दयांमध्ये विविध क्षेत्रांचा सहभाग असायला हवा. या सर्व प्रश्नांमध्ये ट्रस्टस् तर्फे मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबवले जातात आणि त्यांना साह्य केले जाते.

मार्स, इनकॉर्पोरेटेडच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष श्री. स्टीफन जर म्हणाले, संपूर्ण जग मोठ्या प्रमाणावर सामाजिक, पर्यावरणीय आणि आरोग्य क्षेत्रातील आव्हानांचा सामना करत आहे. यासाठी दूरगामी दृष्टिकोन असणाऱ्या भागीदारी आणि सहकार्यांची आवश्यकता आहे. एक जागतिक व्यवसाय म्हणून आमचा विश्वास आहे की, परिणाम घडवून आणणाऱ्या आणि व्यवहार्य उत्पादनांची निर्मिती करून समाजाला भेडसावणाऱ्या काही समस्यांचा सामना करणे ही आमची जबाबदारी आहे आणि आमच्यामध्ये ती क्षमता आहे. भारतातील पोषण आणि जीवनमानाचा दर्जा सुधारण्याप्रति असलेल्या

टाटा ट्रस्टस् च्या घनिष्ठ बांधिलकीमुळे ते आमचे भागीदार असणे हे साहजिकच ठरते, यामुळे आम्ही रोमांचित झालो आहोत.”

टाटा ट्रस्टस् चे अध्यक्ष श्री. रतन एन. टाटा म्हणाले, एक राष्ट्र म्हणून संपूर्ण राष्ट्राला उपयुक्त ठरतील असे महत्त्वाचे मुद्दे हाती घेणे यावर टाटा ट्रस्टस् चा विश्वास आहे. पोषण हा असाच एक मुद्दा आहे कारण त्यामुळेच माणसांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या यशाचा दर्जा सुधारतो. या बहुउद्देशीय कार्यक्रमासाठीच्या संयुक्त उपक्रमात मार्स आमच्यासोबत आहेत, याचा मला आनंद आहे.”

दृष्टिकोन आणि उद्दिष्ट यांच्यातील साम्यात या भागीदारीची मुळे रोवली गेली आहेत. या सहकार्यातून दोन्ही संस्थांची वैशिष्ट्ये एकत्र होणार आहेत. मार्स एजतर्फे नाविन्यता आणि निर्मिती विकास क्षमता, विक्री आणि विपणन कौशल्य यांची भर घातली जाईल तर टाटा ट्रस्टस् चे भारतातील पोषणासंदर्भातील ज्ञान, स्थानिक समाज आणि त्यांच्या गरजांबद्दलची समज आणि वितरण जाळे या कामी वापरले जाईल.

इतर अनेक उद्दिष्टांसोबतच भारतातील पोषणाच्या समस्येवर काम करण्यासाठी मार्स आणि टाटा ट्रस्टस् ने २०१६ साली सामंजस्य करारावर सह्या केल्या. या भागीदारीतून शाळेत जाणा-या मुलांसाठी पहिले नाविन्‍यपूर्ण उत्पादन येणार आहे गोमो™ दाल क्रंचीज्. शालेय वयोगटासाठीचा हा पदार्थ प्रथिने आणि मायक्रोन्युट्रियंट्सयुक्त असणार आहे. गोमो™ दाल क्रंचीज् मार्सच्या पुण्यातील कारखान्यात तयार करण्यात येतील आणि निवडक भागीदार संस्थांच्या माध्यमातून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात वितरित करण्यात येतील.

समारोप करताना स्टीफन जर म्हणाले, उद्दिष्टांवर चालणारी कंपनी म्हणून ग्राहकाला योग्य मोल देणारी आणि सामाजिक गरजांवर लक्ष केंद्रीत करणारी नाविन्यपूर्ण उत्पादने देण्याच्या संधींमुळे आम्ही उत्साहित झालो आहोत. या एका प्रयत्नातून आम्ही जागतिक स्तरावरील आरोग्याचा प्रश्न सोडवू शकणार नाही. मात्र, हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. भारतात आम्ही जे बदल घडवू शकू त्याबद्दल आम्ही उत्साहित आहोत आणि आमच्या प्रयत्नांतून शिकण्यास उत्सुक आहोत.”

मार्स एज बद्दल

मार्स एज हा मार्स इनकॉर्पोरेटडचा, लक्ष्यित पोषणातून मानवी आरोग्य आणि वेलनेसवर लक्ष केंद्रीत करणारा नवा व्यावसायिक विभाग आहे. लोकांना अधिक चांगले आयुष्य जगता यावे असे पोषणावर भर देणारे जग निर्माण करण्यासाठी मार्स एजतर्फे इतरांसोबत भागीदारी केली जाते. लक्षणीय आणि दृश्य परिणाम देऊ शकतील आणि दैनंदिन जीवनात सहज सामावून जातील असे सोपे, मजेदार व सुयोग्य पोषण पर्याय निर्माण करण्यासाठी आधुनिक विज्ञान, माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मार्स एजची स्थापना करण्यात आली आहे.

मार्स, इनकॉर्पोरेटेड बद्दल

मार्स ही कंपनी म्हणजे एका कुटुंबाचा एक शतकाची परंपरा असलेला व वैविध्यपूर्ण उत्पादनांचा इतिहास असलेला व्यवसाय असून ग्राहकांना व त्यांच्या पाळीव प्राण्यांनाही दर्जेदार उत्पादने व सेवा पुरवण्यात या कंपनीचा हातखंडा आहे. ३५ बिलियन डॉलर्सचा वार्षिक खप असलेल्या या कंपनीचा जागतिक बाजारपेठेत एम. अॅण्ड एम.स्‌®, स्निकर्स®, ट्विक्स®, मिल्की वे®, डोव्ह®, पेडीग्री®, रॉयल कॅनीन®, व्हिक्साज®, एक्स्ट्रा®,  ऑर्बिट®, ५™, स्किटल्स®, अंकल

बेन’स्®, मार्स ड्रिंक्स®, आणि कोकोव्हिया® या उत्पादनांचा समावेश आहे. मार्स ही कंपनी पाळीव प्राण्यांच्या आरोग्यासेवाही पुरवत असून त्यात बॅनफिल्ड पेट हॉस्पिटल, ब्ल्यू पर्ल®, व्हीसीए® आणि पेट पार्टनर्स™ चा समावेश आहे. व्हीए येथील मॅक्लिन येथे मुख्य कार्यालय असलेली मार्स ही कंपनी ८० हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे.

दर्जा, जबाबदारी, परस्पर सामंजस्य, क्षमता आणि स्वातंत्र्य ही मार्स या कंपनीची पाच मूलभूत तत्वे असून जगभरातील भागीदारांना व ग्राहकांना दर्जेदार सेवा आणि उत्पादने पुरवण्यासाठी ही पाच तत्वे १००,००० अधिक सहकार्‍यांना प्रेरणा देतात.

टाटा ट्रस्ट्स विषयी :

१८९२ साली स्थापन झाल्यापासून टाटा ट्रस्ट्स या भारतातील सर्वात जुन्या धर्मादाय संस्थेने तिच्यावर अवलंबून असलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी एका जबाबदार प्रणेत्याची भूमिका बजावली आहे. संस्थेचे मूळ संस्थापक श्री. जमशेटजी टाटा यांच्या आदर्शांवर आणि दानशूरतेवर आधारलेल्या तत्वांवर आधारित असलेल्या या संस्थेचे ध्येय म्हणजे आरोग्य, संतुलित आहार, पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, ऊर्जा, ग्रामसुधार, शहरातील गरीबीचे निर्मुलन, कला, कौशल्य आणि संस्कृती या क्षेत्रात अविरतपणे सकारात्मक कार्य. टाटा ट्रस्ट्स चे उपक्रम जलद कार्यवाही, सहकारतत्व व निधीउभारणी या तत्वांवर चालतात आणि त्यांना नवनिर्मिती व देशाभिमुखतेची जोड असते.

मनुवाद संपविण्याचे बळ फुले यांच्या विचारात : शरद पवार

0

पुणे :आज प्रतिगामी विचार वेगवेगळ्या माध्यमातून समाजात पसरवले जात आहेत. सत्तेशी संबंधीत लोकांकडून मनुचे पुतळे बसविले जात आहेत. मनुवादाचा विचार अजुनही समाजातील अधिकार पदावर काम करणार्‍यांच्या डोक्यातून गेलेला नाही. मनुवादाच्या या विचारांना संपवण्याचे बळ ज्योतिबा आणि सावित्रीबाईं फुले यांच्या विचारात असून फुलेंचा विचार वाढविणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२८ व्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते शरद पवार यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करून गैरविण्यात आले. यावेळी पवार बोलत होते. गंज पेठेतील महात्मा फुले यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास महापौर मुक्ता टिळक, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री छगन भुजबळ, सीतामढीचे खासदार रामकुमार शर्मा, खा. अँड. वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नानासाहेब देवकते, पंकज भुजबळ, समीर भुजबळ उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, महात्मा फुले यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार डॉक्टरेट व इतर पुरस्कारांपेक्षा वेगळा आणि महत्त्वाचा आहे. या पुरस्कारामागे फुले दाम्पत्यांचा समतेचा विचार आहे. ज्यावेळी समाजात विसमतेचे वारे वहात होते, त्या वेळी फुले दांपत्यांनी समता, न्याय प्रस्थापित करण्याचे काम केले. महात्मा फुले आधुनिकतेचे आणि विज्ञानाचे पुरस्कर्ते होते. शेतीला अधुनिकतेची जोड देण्याचे जे आवाहन आज आपण करत आहोत, ते महात्मा फुलेंनी दीडशे वर्षापूर्वी केले होते. सध्या समाजात वाढत असलेला मनुवाद रोखण्याचे काम शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारातूनच केले जाणार आहे, त्यामुळे हा विचार प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे अहे.

पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत कॅडेन्स अकादमी, व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

0

पुणे- पीवायसी हिंदु  जिमखाना क्लब यांच्या  तर्फे  पीवायसी करंडक 14वर्षाखालील   निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत कॅडेन्स अकादमी संघाने क्रिकेट मास्टर्स अकादमी संघाचा तर व्हेरॉक  वेंगसरकर  क्रिकेट अकादमी  संघाने पुना क्लब संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. 

व्हेरॉक  वेंगसरकर  क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या सामन्यात दिग्वीजय पाटीलच्या नाबाद 78 धावांच्या बळावर कॅडेन्स अकादमी  संघाने क्रिकेट मास्टर्स अकादमी संघाचा 105 धावांनी मोठा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना कॅडेन्स अकादमी संघाने 45 षटकात 5 बाद 259 धावा केल्या. यात  मोहित दहिभातेने 43, अनिरूध्द साबळेने 33 व वेदांत जगदाळेने 31 धावा करून दिग्वीजयला सुरेख साथ दिली. 259 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना साहिल अभंगच्या  94 धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत व अरकम सय्यद व  निलय सिंघवी यांच्या आक्रमक गोलंदाजीपुढे क्रिकेट मास्टर्स अकादमी संघ 45 षटकात 9 बाद 154 धावांत गारद झाला. अरकम सय्यदने 27 धावात 3 व निलय सिंघवीने 26 धावांत 2 गडी बाद केले तर प्रथमेश थिटे व दिग्वीजय पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. नाबाद 78 धावा व 1 गडी बाद करणारा दिग्वीजय पाटील सामनावीर ठरला. 

पुना क्लब क्रिकेट मौदानावर झालेल्या सामन्यात भार्गव महाजनच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर व्हेरॉक  वेंगसरकर  क्रिकेट अकादमी संघाने पुना क्लब संघाचा 116 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्य फेरी गाठली. पहिल्यांदा खेळताना भार्गव महाजनच्या नाबाद 59 व शार्दुल विनोदेच्या 65 धावांसह व्हेरॉक  वेंगसरकर  क्रिकेट अकादमी संघाने 45 षटकात 8 बाद 248 धावांचा डोंगर रचला. 248 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ओम भाबडच्या अफलातून गोलंदाजीपुढे पुना क्लब संघाचा डाव 45 षटकात 9 बाद 132 धावांत गुंडाळला. ओम भाबडने केवळ 14 धावा देत 5 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. नाबाद 59 व 1 गडी बाद करणारा भार्गव महाजन  सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सव्स्तर निकाल- साखळी फेरी

कॅडेन्स अकादमी- 45 षटकात 5 बाद 259 धावा(दिग्वीजय पाटील नाबाद 78, मोहित दहिभाते 43, अनिरूध्द साबळे 33, वेदांत जगदाळे 31, आर्यन पवार 1-15, साहिल अभंग 1-56, पार्थ बोत्रे 1-28, रचीत वोरा 1-43, रोनक पारेख 1-17) वि.वि क्रिकेट मास्टर्स अकादमी- 45 षटकात 9 बाद 154 धावा(साहिल अभंग 94, पार्थ बोत्रे 19, अरकम सय्यद 3-27, निलय सिंघवी 2-26, प्रथमेश थिटे 1-26, दिग्वीजय पाटील 1-16) सामनावीर – दिग्वीजय पाटील

कॅडेन्स अकादमी  संघाने 105 धावांनी सामना जिंकला.  

व्हेरॉक  वेंगसरकर  क्रिकेट अकादमी- 45 षटकात 8 बाद 248 धावा(शार्दुल विनोदे 65, भार्गव महाजन नाबाद 59, अर्चीसमन दास नाबाद 20, अभिजीत पवार 31, प्रसन्न पवार 18, अथर्व पंगारे 23, हर्षवर्धन पाटील 2-49, अभिषेक कुलकर्णी 2-27, ओम माळी 1-26, हृतिक उत्तेकर 1-39, अथर्व एकबोटे 1-58) वि.वि पुना क्लब- 45 षटकात 9 बाद 132 धावा(हर्षवर्धन टिंगारे नाबाद 38, श्रेयस गारमपल्ली नाबाद 24, ओम भाबड 5-14, ओंकार राजपुत 1-16, भर्गव महाजन 1-30,अर्चीसमन दास 1-19) सामनावीर- भार्गव महाजन

व्हेरॉक  वेंगसरकर  क्रिकेट अकादमी संघाने 116 धावांनी सामना जिंकला.  

येस सिक्युरिटीजने अध्यक्ष व संशोधन प्रमुखपदी केली अमर अंबानी यांची नियुक्ती

0

मुंबई: येस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेड या येस बँकेच्या संपूर्ण मालकीच्या इन्व्हेस्टमेंट बँकिंग, मर्चंट बँकिंग, वेल्थ मॅनेजमेंट व ब्रोकिंग उपकंपनीने ब्रोकिंग व्यवसायासाठी अध्यक्ष व संशोधन प्रमुख यापदी अमर अंबानी यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.

अमर यांच्याबरोबर, संस्थात्मक ग्राहक व अल्ट्रा एचएनआय गुंतवणूकदार यांच्यासाठी अनेक यशस्वी मिडकॅप स्टॉक कल्पना मांडण्याचे श्रेय असणारी 15 पुरस्कारविजेत्या विश्लेषकांची टीमही रुजू झाली आहे. संशोधन प्रमुख ही नवी भूमिका बजावत असताना, अमर इन्स्टिट्यूशनल इक्विटीज व्यवसाय सक्षम करण्यासाठी, तसेच वेल्थ मॅनेजमेंट, वेल्थ ब्रोकिंग व इन्व्हेस्टमेंट अडव्हॉयजरी यामध्ये वाढ करण्यासाठी काम करणार आहेत. त्यांची विश्लेषकांची टीम बीएफएसआय, फार्मा, टेलिकॉम/मीडिया, मेटल्स  व कमोडिटीज, करन्सी व डेरिव्हेटिव्ह अशी महत्त्वाची क्षेत्रे समाविष्ट करणार आहे व मिड-कॅप्सवर विशेष भर देणार आहे.

येस सिक्युरिटीजमध्ये येण्यापूर्वी, अमर आयआयएफएल इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स येथे भागीदारी व संशोधन प्रमुख होते. आयआयएफएलमधील 15 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी संशोधनविषयक धोरण आखणे, वैविध्यपूर्ण गुंतवणूक योजना व उत्पादने तयार करणे, ब्रोकिंग धोरण आखणे व डिजिटल उपक्रम तयार करणे या बाबतीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सल्लाविषयक संस्कृती जोपसण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. आयआयएफएलमध्ये पदभार सांभाळत असताना, अमर यांनी गुंतवणूक समितीचीही सुरुवात केली. ही समिती संपत्तीवर्गांविषयी मते व संपत्ती विभाजन याविषयी मार्गदर्शन करायची.

फायनान्समध्ये एमबीए केलेले अमर बिझनेस प्रोसेस री-इंजिनीअरिंगमध्येही सर्टिफाइड आहेत.

याविषयी बोलताना, येस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेडचे अध्यक्ष राणा कपूर म्हणाले, “येस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेडच्या प्रवासामध्ये अमर अंबानी व त्यांच्या टीमचे स्वागत आहे. बाजाराच्या उपलब्धतेला व संपादन क्षमतांना चालना देण्यासाठी, तसेच त्यामुळे मर्चंट बँकिंग व्यवसायालाही यश मिळवून देण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. परिपूर्ण संशोधन विभाग सुरू झाल्याने कंपनीला ज्ञान व संशोधन-प्रणित दृष्टिकोन अंगिकारता येईल. तसेच, ब्रोकिंग, सल्लासेवा, संस्थात्मक विक्री व मर्चंट बँकिंग व्यवसाय यांच्यासाठीही मदत होईल.”

याविषयी बोलताना, येस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिडचे अध्यक्ष व संशोधन प्रमुख अमर अंबानी यांनी सांगितले, “येस बँकेच्या ग्राहकांना आनंद देण्यासाठी मी अप्रतिम मूल्य व उत्कृष्ट उत्पादने देण्यासाठी उत्सुक आहे. संस्थात्मक श्रेणीसाठी, आम्ही आणखी सखोल विचार करणार आहोत आणि कॉर्पोरेट सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेल्थ व रिटेल श्रेणीसाठी, संपत्ती विभाजनाबाबत मार्गदर्शनाद्वारे, त्यानंतर साधनाची निवड व मागणीनुसार सल्ला याद्वारे गुंतवणुकीसाठी उत्तेजन देणार आहोत.”

येस बँकेने या व्यवसायाप्रति बांधिलकी अधोरेखित करत व ग्राहकांना परिपूर्ण सेवा देत, येस सिक्युरिटीज (इंडिया) लिमिटेडला अलीकडेच अतिरिक्त 99 कटी रुपयांचे भांडवल दिले असून, एकूण प्रोव्हिजनल नेट-वर्थ (ऑक्टोबर 31, 2018 रोजी) 154 कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे.

धर्मादाय न्यासातर्फे १६ डिसेंबर रोजी सामुहिक विवाह सोहळा; इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणे – धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी धर्मादाय न्यासामार्फत गरीब, गरजू लोकांच्या मुला-मुलींचे मोफत सामुदायिक विवाह सोहळे करणे संदर्भात निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार पुणे शहरामध्ये १६ डिसेंबर २०१८ रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या विवाह सोहळयामध्ये  सहभागी होणाऱ्या वधू-वरांना पुणे जिल्हा मोफत सामुदायिक विवाह सोहळा समितीच्यावतीने संसारोपयोगी साहित्य, मनीमंगळसुत्र, कपडे इ. वस्तू देण्यात येणार आहेत. तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे.

वधूचे वय१८ वर्षापेक्षा कमी व वराचे वय २१ वर्षापेक्षा कमी असू नये. त्याबाबत वयाचा अधिकृत दाखला नोंदणी करताना करणे बंधनकारक असून वधू-वरांचे यापूर्वी लग्न झालेले नसलेबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक राहील.

ज्या इच्छूक वधूवरांना या सामुदायिक विवाह सोहळयामध्ये सहभागी होवून लग्न करावयाचे असेल  त्यांनी, या धर्मादायसह आयुक्त या कार्यालयाकडे ५ डिसेंबर,२०१८ रोजी पूर्वी आपला लेखी अर्ज दाखल करावा. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे धर्मादाय सह आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांनी कळविले आहे.

‘खेलो इंडिया’च्या यशस्वीतेसाठी उद्योजकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे: विविध खेळांमध्ये कौशल्य असलेल्या प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 7 ते 20 जानेवारी,2019 या कालावधीत महाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही अभिमानाची बाब आहे. या स्पर्धेच्या आयोजनात उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

खेलो इंडिया स्पर्धेच्या आयोजनाच्यानिमित्त उद्योगांनी प्रायोजकत्व स्वीकारावे यासाठी, चाकण परिसरातील उद्योजकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, सहायक क्रीडा अधिकारी नवनाथ फरकाडे यावेळी उपस्थित हेाते.

या स्पर्धेमुळे उत्कृष्ट खेळाडू तयार होतील व ते आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नांव उज्वल करणार असल्याने, उद्योजकांनी स्पर्धा आयोजनात सहकार्य असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. बैठकीला उपस्थित विविध उद्योगांच्या प्रतिनिधींनी स्पर्धेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बैठकीला चाकण औद्योगिक वसाहत संघटनेचे अमीत‍ शिंदे, सुनिता पोखरकर, सिध्दांत चोपडा, वैशाली ओसवाल, अल्ताफ पिरजादे, प्रसाद बांदोडकर, पुरातन भारती, अमीत कोच्चर, विजय भटेवरा, के.के.झुणझुणवाला, सुधीर मित्तल, आंचल मदनानी, प्रिती गोसवाडे उपस्थित होते.

दिलीप बराटे आता महापालिकेतील विरोधीपक्ष नेते …

0

पुणे- हडपसरच्या चेतन तुपे पाटलांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष केल्यानंतर आता त्यांच्याकडील महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद वारज्याच्या दिलीप बराटे यांच्याकडे देण्यात येणार आहे . आज महापालिकेतील राष्ट्रवादीच्या गटनेता पदी दिलीप बराटे यांची निवड करण्यात आल्यानंतर, मावळते विपक्ष् नेते आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले . बराटे हे माजी उपमहापौर आहेत .त्यांच्या गटनेता पदी निवड झाल्याचे पत्र आता महापौरांकडे देण्यात येईल आणि महापौर या त्यांची विपक्ष नेता पदी निवड जाहीर करतील .

लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

0

पिंपरी-जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांच्यातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.

        यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे, विशाखा भगत, रामकृष्ण हराळे, जयश्री गुरव आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होते.

मुख्याध्यापिका हर्षा बाठिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. शिक्षक रामकृष्ण हराळे, विशाखा भगत आणि जयश्री गुरव यांनी विद्यार्थ्याना संविधानातील महत्त्वाच्या बाबी, संविधानाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. याबरोबरच देशाच्या संरक्षणासाठी सिमेवर अहोरात्र पहारा देणार्‍या जवानांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांनीही संविधान दिनाबाबत माहिती सांगितली. शाळेतील विद्यार्थ्यानी व शिक्षिकांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन केले व प्रतिज्ञा घेण्यात आली.