Home Blog Page 3042

भाजपच्या ‘बड्या’नेत्याकडून देशभर ‘इ बस घोटाळा ‘(व्हिडीओ)

पुणे-आजवर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही ,अशा भाजपच्या राज्याचा प्रमुख संबोधल्या जाणाऱ्या एका ‘बड्या ‘ नेत्यावर आज राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ,आणि महापालिकेतील मावळते विपक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी आज घोटाळ्याचा आरोप केला आहे. पुण्यात २६ जानेवारी पासून पीएमपीएमएलच्या सेवेत इ बसेस आणल्या जात आहेत,या पार्श्वभूमिवर तुपे पाटील यांनी अशा बसेस मार्फत जिथे जिथे भाजपची सत्ता आहे अशा राज्यातील प्रमुख शहरात इ बसेस भाडे तत्वावर घेऊन जनतेची लुट केली जात असल्याचा आरोप केला आहे. जिथे भाजपची सत्ता नाही तिथे या बसेस स्वस्त दराने ,प्रती किलोमीटर पद्धतीने सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी उपलब्ध होत असताना ,जिथे भाजपची सत्ता आहे तिथे मात्र याच बसेस जास्त भाडे दर देवून लुट केली जात आहे असे चेतन तुपे पाटील यांनी म्हटले आहे. शिवाय ,या मागे मुंबईतील बड्या नेत्याचा हाथ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कर्नाटकातील बेंगलोर मध्ये इ बस सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी 29 रुपये प्रती किमी दराने उपलब्ध करून दिलेली आहे तर हीच बस आता पुण्यात मात्र ४० रुपये प्रतिकिमी दराने उपलब्ध करवून घेण्यात येत आहे . जयपूर, अहमदाबाद व मुंबई येथे अनुक्रमे ७० रुपये ,५९रुपये आणि ५७रुपये असा दर दिला गेला आहे. याच कंपनीने हैद्राबाद मध्ये मात्र ३६ रुपये दराने इ बसेस पुरविल्या आहेत .
पुण्यातून 25 बसेस मागे १८ कोटी रुपये जास्त मोजले जाणार असल्याचे ते म्हणाले …पहा आणि ऐका ..त्यांच्याच शब्दात जसेच्या तसे …नेमके चेतन पाटील काय म्हणाले आहेत ….

पुण्याच्या नियोमी डे ठरल्या ‘मिसेस महाराष्ट्र २०१८’

0
पुणे : गृहिणी असलेल्या पुण्याच्या नियोमी डे यांनी उल्लेखनीय सादरीकरण करत ‘मिसेस महाराष्ट्र २०१८’ स्पर्धेवर आपले नाव कोरले. कुटुंबातील सर्वांकडूनच प्रोत्साहन मिळाल्याने हा सन्मान मिळवू शकले, अशी भावना नियोमी डे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. याप्रसंगी नियोमी यांच्या आई मेघना खांडेकर, दिवा पेजेंटचे अंजना मास्कारेन्हास आणि कार्ल मास्कारेन्हास आदी उपस्थित होते.
दिवा पेजेंटतर्फे ‘मिसेस महाराष्ट्र २०१८’ स्पर्धेचे पुण्यात नुकतेच आयोजन करण्यात आले होते. घर सांभाळतानाही आपण महिला सक्षमपणे आपल्यातील कलागुणांना वाव देऊ शकतो, हे या स्पर्धेतून सिद्ध झाले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत राज्यभरातून ४० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये २० ते ३३ या वयोगटात (सिल्व्हर कॅटेगरी) २० स्पर्धक, तर ३३ च्या पुढे (गोल्ड कॅटेगरी) २० स्पर्धकांचा समावेश होता.
तत्पूर्वी, राज्यातून पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर येथून निवड चाचणी घेण्यात आली होती. जवळपास ३०० महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ओळख परेड, रॅम्प वॉक, प्रश्नोत्तरे आदी निकषांवर ही निवड करण्यात येते. नियोमी या ज्येष्ठ पत्रकार संपादक सुकृत खांडेकर यांच्या कन्या, तर कर्नल सौरव नारायण डे यांच्या पत्नी आहेत. कर्नल सौरव डे सध्या काश्मीर येथे ३५ आरआर (राष्ट्रीय रायफल्स) चे नेतृत्व करीत आहेत. त्यांना पाच वर्षाचा मुलगा आहे.
नियोमी यांचा जन्म व शालेय शिक्षण मुंबईत, तर पदवीचे शिक्षण पुण्यातील नेस वाडिया महाविद्यालयात झाले. माध्यम क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन येथून टीव्ही आणि व्हिडीओ प्रॉडक्शनचे शिक्षण घेतले. सहायक दिग्दर्शक व सहायक निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले. अंतहीन या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बंगाली चित्रपटासाठी दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांच्याबरोबर काम केले आहे. त्या प्रमाणित रिबॉक ट्रेनर आणि झुंबा इन्स्ट्रक्टर आहेत.
या यशाबद्दल नियोमी डे म्हणाल्या, “कुटुंबाचा पाठिंबा आणि अंजना मॅडम व कार्ल सर यांच्या मार्गदर्शनामुळे हा किताब पटकावू शकले. माझ्यातील घरात बसलेली स्त्री त्यांनी बाहेर काढली. सॉफ्ट स्किल्स ट्रेनर असल्याने स्पर्धेतील सर्व गोष्टी सहजपणे करता आल्या. या यशामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. यापुढे आता मिसेस इंडिया, मिसेस युनिव्हर्ससाठी उत्सुक आहे.”

दुहेरीत अंकिता रैना व कारमान कौर थंडी यांचा अंतिम फेरीत प्रवेश

0

पुणे- नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000 डॉलर बीव्हीजी पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या अंकिता रैना, कारमान कौर थंडी, स्लोव्हेनियाच्या तामरा झिदनसेक, स्पेनच्या इवा गुरेरो अल्वारेज या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु झालेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या दुसऱ्या मानांकित अंकिता रैना हिने आपली विजयी मालिका कायम ठेवत चीनच्या कै-लीन झाँगचा 6-0, 6-0असा सहज पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. हा सामना 53मिनिटे चालला. चौथ्या मानांकित भारताच्या कारमान कौर थंडीने युक्रेनच्या व्हॅलेरिया स्राखोवाचा टायब्रेकमध्ये 7-6(9), 6-2असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.हा सामना 1तास 54मिनिटे चालला. स्लोव्हेनियाच्या अव्वल मानांकित तामरा झिदनसेकने रशियाच्या  मरिना मेलनिकोवाचा 3-6, 6-0, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव  करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. हा सामना 1तास 45मिनीटे चालला. स्पेनच्या इवा गुरेरो अल्वारेज हिने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या रोमानियाच्या जॅकलिन अडीना क्रिस्टियनचा 6-2, 6-2असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

दुहेरीत उपांत्य फेरीत भारताच्या अंकिता रैनाने कारमान कौर थंडीच्या साथीत रशियाच्या अमिना अंशबा व पोलंडच्या कनिया पॉला यांचा 6-3, 6-3असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्यपूर्व फेरी):
कारमान कौर थंडी(भारत)[4] वि.वि. व्हॅलेरिया स्राखोवा(युक्रेन)7-6(9), 6-2;

अंकिता रैना(भारत)(2)वि.वि. कै-लीन झाँग(चीन) 6-0, 6-0; 

तामरा झिदनसेक(स्लोव्हेनिया)(1)वि.वि. मरिना मेलनिकोवा(रशिया) 3-6, 6-0, 6-3  

इवा गुरेरो अल्वारेज(स्पेन)वि.वि. जॅकलिन अडीना क्रिस्टियन(रोमानिया)6-2, 6-2;

दुहेरी गट: उपांत्य फेरी:
अंकिता रैना(भारत)/कारमान कौर थंडी(भारत)वि.वि. अमिना अंशबा(रशिया)/कनिया पॉला(पोलंड)6-3, 6-3;

अलेक्झांड्रा नेदिनोवा(बल्जेरिया)/ तामरा झिदनसेक(स्लोव्हेनिया)वि.वि.शेरॉन फिचमन(कॅनडा)/कातरझायना पीटर(पोलंड) 6-1, 6-4; 

इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एनएच वुल्वस संघाचा सलग तिसरा विजय

0

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत गुडलक हॉग्स, टायगर्स, गोल्डफिल्ड डॉल्फिन, आर्यन स्कायलार्कस, ओव्हन फ्रेश टस्कर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली तर एनएच वुल्वस संघाने आर्यन स्कायलार्कस संघाचा पराभव करत स्पर्धेत सलग तिसरा विजय संपादन केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रसाद जाधव नाबाद जलद अर्धशतकी खेळीच्या जोरावर एनएच वुल्वस संघाने आर्यन स्कायलार्कस संघाचा 51धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना प्रसाद जाधवच्या नाबाद 56 व प्रशांत वैद्यच्या नाबाद 31 धावांच्या बळावर एनएच वुल्वस संघाने 6षटकात बिनबाद 95धावा केल्या. 95 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पियुष शर्माच्या अचूक गोलंदाजीपुढे आर्यन स्कायलार्कस संघ 6 षटकात 6 बाद 44 धावांत गारद झाला. 22 चेंडूत प्रसाद जाधव नाबाद 56 व 10 धावात 1 गडी बाद करणारा प्रसाद जाधव सामनावीर ठरला.

अन्यअ लढतीत रोहन छाजेड याने केलेल्या नाबाद 34धावांच्या जोरावर गोल्डफिल्ड डॉल्फिन संघाने कासट ड्रॅगन्सचा 8गडी राखून पराभव केला. तन्मय चोभे नाबाद 56धावांच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर ओव्हन फ्रेश टस्कर्स संघाने रेड बुल्स संघावर 2धावांनी विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

एनएच वुल्वस: 6षटकात बिनबाद 95धावा(प्रसाद जाधव नाबाद 56(22), प्रशांत वैद्य नाबाद 31(14)) वि.वि आर्यन स्कायलार्कसः 6 षटकात 6 बाद 44 धावा(अंकुश जाधव 16, पियुष शर्मा 2-4, देवेंद्र राठी 1-5, प्रशांत वैद्य 1-9, अनुज लोहाडे 1-9, प्रसाद जाधव 1-10) सामनावीर प्रसाद जाधव

एनएच वुल्वस संघाने 51धावांनी सामना जिंकला.

कासट ड्रॅगन्स: 6षटकात 5बाद 68धावा(प्रतीक वांगीकर 25(10, 3×6), नितीन सरदेसाई 24(17, 2×4, 1×6), रोहन छाजेड 2-3, नचिकेत जोशी 1-17)पराभूत वि.गोल्डफिल्ड डॉल्फिन: 4.2षटकात बिनबाद 69धावा(रोहन छाजेड नाबाद 34(12,2×4,2×6), अश्विन शहा नाबाद 34(14,1×4,4×6));सामनावीर-रोहन छाजेड; गोल्डफिल्ड डॉल्फिन 8गडी राखून विजयी;.

सुपर लायन्स: 6षटकात 4बाद 50धावा(संदीप साठे नाबाद 28(19,1×4,2×6), श्री शिरोडकर नाबाद 13(4,3×4), उदय जाधव 2-3, समीर जोग 1-4, मंदार चितळे 1-5) पराभूत वि.गुडलक हॉग्स लिमये: 4.2षटकात बिनबाद 53धावा(समीर जोग नाबाद 16(15,1×6), देवेंद्र चितळे नाबाद 31(14, 1×4,3×6));सामनावीर-उदय जाधव; गुडलक हॉग्स लिमये 8गडी राखून विजयी;

टायगर्स: 6षटकात 1बाद 78धावा(मधुर इंगहाळीकर नाबाद 35(18,4×4,1×6), अभिषेक ताम्हाणे 22(12), अमित कुलकर्णी नाबाद 16, असीम देवगावकर 1-10)वि.वि.गोखले सिनर्जी कोब्राज: 6षटकात 2बाद 46धावा(विमल हंसराज 18(10), विशाल गोखले नाबाद 16(16), अमित कुलकर्णी 1-16);सामनावीर-मधुर इंगहाळीकर;

आर्यन स्कायलार्कस: 6षटकात 4बाद 65धावा(जयदीप गोडबोले 16(9), शार्दुल वाळिंबे 16(11), बाळ कुलकरन 12, पिनाकिन मराठे 2-9)वि.वि.अंजनेया ब्रेव बिअर्स: 6षटकात 5बाद 53धावा(गौरव सावगावकर 30(18,3×4), अंजनेया साठे 11, शिवकुमार जावडेकर 10, आदित्य गांधी 2-1, सोहन आंगळे 1-3);सामानावीर-आदित्य गांधी; आर्यन स्कायलार्कस 12धावांनी विजयी;

ओव्हन फ्रेश टस्कर्स: 6षटकात 4बाद 78धावा(श्रीनिवास चाफळकर 30(13, 1×4, 3×6), हर्षल गंद्रे 21(13), शिरीष आपटे 19(10), तन्मय चोभे 1-3, समीर जोशी 1-5, अभिजित खानविलकर 1-16)वि.वि.रेड बुल्स: 6षटकात 2बाद 76धावा(तन्मय चोभे नाबाद 56(21, 2×4,6×6), नंदन डोंगरे 13(13), दर्शन कांकरिया 1-5, श्रीनिवास चाफळकर 1-9);सामनावीर-तन्मय चोभे; ओव्हन फ्रेश टस्कर्स 2धावांनी विजयी.

गोवर व रुबेला लसीकरण जागृतीसाठी लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलचा पुढाकार

0
पुणे : केंद्र सरकारने हाती घेतलेल्या गोवर व रुबेला लसीकरण (एमआर) या महत्वाकांक्षी मोहिमेला समाजातील सर्व स्तरांत पोहोचवण्यासाठी लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल संघटनेतर्फे पुढाकार घेतला आहे. नऊ महिने ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना ही लस देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध माध्यमांतून गोवर व रुबेलाची लस घेण्यासंदर्भात लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल जागृती करणार आहे, अशी माहिती लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2चे प्रांतपाल रमेश शहा यांनी दिली.
गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेच्या जनजागृतीबाबत माहिती देण्यासाठी शिरोळे रस्त्यावरील हॉटेल क्लार्क इन येथे आयोजिलेल्या वार्तालापात रमेश शहा बोलत होते. प्रसंगी लायन्स क्लब्ज इंटरनॅशनलच्या आंतरराष्ट्रीय संचालिका एलिझाबेथ स्मिथ, ‘एमआर’ जनजागृती मोहिमेचे प्रमुख लायन हेमंत नाईक व इतर सभासद उपस्थित होते. गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेसाठी लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल फाउंडेशनकडून ५० लाख रुपयांचा निधी आला आहे. त्यात स्थानिक पातळीवर १५ लाखांचा निधी टाकला जाणार असून, आदिवासी पाड्यांपासून ते शिक्षित वर्गापर्यंत या मोहिमेला पोहोचवण्यासाठी लायन्स संघटना प्रयत्न करणार आहे.
रमेश शहा म्हणाले, “केंद्र सरकारने गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेला 27 नोव्हेंबर 2018 पासून प्रारंभ केला आहे. ही मोहिम समाजातल्या तळागाळातील वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाकडून लायन्स क्लब्ज इंटरनॅशनल या राष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठ्या सामाजिक संघटनेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील लायन्स क्लब्ज सरसावले आहेत. 3234 डी 2 या प्रांतातील लायन्स क्लब्जनी गोवर व रुबेला लस देण्यासाठी विविध उपक्रम घेण्याचे योजिले आहे. या मोहिमेत आमच्या प्रांतातून पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील 135 क्लब सहभागी होणार आहेत. विविध शाळांमध्ये जावून, पालक-शिक्षकांच्या बैठका घेऊन त्यांना या लसीकरणाचे महत्व पटवून दिले जाणार आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉक्टरांची टीम आम्हाला सहकार्य करीत आहेत. त्याशिवाय, जाहिरात, रेडिओ-वृत्तपत्रांतून प्रसिद्धी, होर्डिंग, पत्रके, बॅनर्स, मोबाईल व्हॅन, सोशल मीडियाच्या मदतीने या मोहिमेची जनजागृती केली जाणार आहे.”
एलिझाबेथ स्मिथ म्हणाल्या, “सामाजिक जाणिवेतून हे काम होत आहे. वंचित वर्गातली मुलांपर्यंत हे लसीकरण पोहोचावे, यासाठी लायन्स सभासद मेहनत घेत आहेत, याचा आनंद वाटतो. राज्यातील विविध लायन्स प्रांतांना भेटी देऊन लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देणार आहे.”

१५ दिवसात भारतरत्न महर्षी कर्वेंच्या पुतळ्याच्या कामास गती न मिळाल्यास तीव्र आंदोलन- डॉ दीपक वलोकर

0

पुणे- स्त्री सन्मान व स्त्री- शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेख्लीय कामगिरी करणाऱ्या भारतरत्न महर्षी डॉ धोंडो केशव कर्वे (अण्णा) यांच्या कर्वे रस्त्यावरील पुतळा शुशोभिकारणाच्या नावाखाली गेल्या तीन वर्षापासून हटविण्यात आलेला असून पुतळ्याचे काम देखील बंद अवस्थेत असल्याने अण्णांचे चाहते व बहुतांशी पुणेकरांच्या भावना दुखावल्या जात असून त्यांच्या महान कार्याचा पुणे महानगरपालिका प्रशासनास विसर पडला आहे की काय ? असा सवाल करीत १५ दिवसात महर्षी अण्णांच्या पुळ्याच्या कामास गती मिळून काम पूर्ण न झाल्यास महापौरांना भेटून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक डॉ दीपक वलोकर यांनी दिला आहे.

भारतरत्न महर्षी डॉ धोंडो केशव कर्वे (अण्णा) यांच्या कर्वे रस्त्यावरील कोथरूड परिसरात असणारा पुतळा महानगर पालिका प्रशासनाकडून काही वर्षांपासून पुतळा शुशोभिकारणाच्या नावाखाली हटविण्यात आलेला असून सद्यपरीस्थितीमध्ये पुतळ्याच्या शुशोभिकरणाचे काम जवळ –जवळ बंदच आहे किंवा कासव गतीने काम सुरु असून निदान दि ९ नोव्हेंबर या महर्षी अन्नाच्या स्मृतीदिनी तरी त्यांच्या रखडलेल्या पुतळ्याच्या कामाची पूर्तता होणे अपेक्षित असताना देखील पुतळा उभारला गेला नाही. शिवाय या कामाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी, महापौर व महानगरपालिका प्रशासन हे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत असल्याची व “बजेट” मुळे काम रखडून पडल्याची नागरिकांमध्ये चर्चा असल्यामुळे व बहुतांशी पुणे करांच्या भावना दुखावल्या जात असल्यामुळे महर्षी अण्णांच्या नवे सुरु असलेल्या आमच्या कर्वे समाज सेवा संस्थेतर्फे यामध्ये लक्ष घालून रखडलेल्या कामाबाबत महापौरांकडून आढावा घेऊन या कामाचा पाठपुरावा करण्याचा निश्चय केला असल्याची माहिती डॉ दीपक वलोकर यांनी दिली.

आज सकाळी ११ वाजल्यापासून कर्वे समाज सेवा संस्थेच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, रिसर्च व सी.एस. आर. सेल चे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कर्वेनगर येथील महाविद्यालयाच्या प्रांगणापासून ते कोथरूड येथील प्रस्तावित पुतळा ठिकाणापर्यंत भारतरत्न महर्षी डॉ धोंडो केशव कर्वे (अण्णा) यांच्या रखडलेल्या कामाच्या निषेधार्त “ काळ्या फिती बांधून व निषेधाची पोस्टर्स घेऊन मूक निषेध फेरी काढत महानगरपालिका प्रशासनाकडून होत असलेल्या पुतळ्याच्या कामाच्या दिरंगाईबद्दल निदर्शने करून निषेध व्यक्त केला. आणि महर्षी अण्णांचा पुतळा लवकरात-;लवकर उभा करावा अशी मागणी करण्यात आली.

संस्थेचे संचालक डॉ. दीपक वलोकर, डॉ. महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवाण, व्यवस्थापन समिती समन्वयक प्रसाद कोल्हटकर, प्रा. चित्रलेखा राजुस्कर, अधीक्षक सतीश खुडे यांनी निषेध फेरीमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करून मार्गदर्शन केले.

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मंजूर – फडणवीस धमाका-

मुंबई-
आठवडाभर वादाच्या भोवऱ्यात अडकलेला मराठा आरक्षणाचा कृती अहवाल (एटीआर) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर करण्यात आला. या १५ पानी अहवालात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या. गायकवाड यांच्या समितीने सादर केलेल्या मराठा आरक्षणावरचा कृती अहवाल आज विधानसभेत सादर करण्यात आला. या कृती अहवालात गायकवाड समितीच्या सर्व शिफारसी मंजूर करण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात येणार असून ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्यात आलेला नाही. पंचायतीमध्ये मात्र मराठा समाजाला आरक्षण नसेल, असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत मराठा समाजाला विशेष प्रवर्गातून आरक्षण द्यावं, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या नोकऱ्यांमध्येही या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी एटीआर सादर केल्यानंतर विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांनी गायकवाड समितीचा अहवालच विधानसभेत सादर करा, अशी मागणी केली.
मराठा आरक्षणाचा एटीआर सादर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी विधानसभेच्या आवारात जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे आमदार आवारात पेढे वाटत आहेत तर वचनपूर्तीचे नारेही देत आहेत. विधानसभेचे कामकाज दीड वाजता पुन्हा सुरू होणार असून तेव्हा एटीआरवर चर्चा करण्यात येणार आहे.

काय म्हटले आहे अहवालात ?

-मराठा समाजास सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसइबीसी) म्हणून घोषित करण्यात येत आहे.

– सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घोषित करण्यात आलेला मराठा समाज संविधानातील अनुच्छेद १५(४), १६(४) मध्ये समाविष्ट केलेल्या आरक्षणाचे लाभ व फायदे मिळण्यास हक्कदार आहे.

-शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला आरक्षण.

-मराठा समाजातील उमेदवारांना राज्यातील लोकसेवांमधील नियुक्त्या व पदे यात अशा प्रवर्गाकरिता आरक्षणाची तरतूद

– निवडणुकांच्या जागांकरिता आरक्षणाचा अंतर्भाव नसेल.

मराठा समाजासाठी गुरुवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच दिवशी बहुप्रतीक्षित मराठा आरक्षणाचा कृती अहवाल (एटीआर) आणि विधेयक अखेर विधानसभेत सादर केला. या विधेयकाला कुठल्याही चर्चेविना सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी सुद्धा एक दिलाने एकत्रित येऊन मंजुरी दिली. आता हेच विधेयक विधान परिषदेत सादर करण्यात आले. तेथे देखील या विधेयकाला मंजुरी मिळाली. यानंतर राज्यपालांची स्वाक्षरी होणार आहे. ही स्वाक्षरी सुद्धा आजच करण्यात यावी अशी मागणी आझाद मैदानावर बसलेल्या आंदोलकांनी केली आहे.

सर्वपक्षीय बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचेही आभार मानले. उल्लेखनीय बाब म्हणजे, मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांना 1 डिसेंबर रोजी जल्लोषासाठी तयार राहा असे सांगितले होते. त्यांचे हेच आश्वासन तारखेपूर्वीच प्रत्यक्षात उतरल्याचे दिसून येत आहे.

अहवाल मांडताच विरोधकांनी यावर चर्चेपूर्वी अभ्यासासाठी वेळ मागितला. सर्वप्रथम माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावर अभ्यास करण्यासाठी 2 तासांची विनंती केली. या विनंतीचे विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांच्या मुख्यमंत्र्यांनीही स्वागत केले. दुपारी ठीक 1.30 वाजता यासंदर्भातील विधेयक सुद्धा सादर करण्यात आले. त्याला आता सरकारने मंजुरी दिली.

उल्लेखनीय बाब म्हणजे, मराठा आरक्षणावर मागास वर्गाचा कृती अहवाल राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वीच मंजूर केला. कृती अहवालात मराठ्यांना SEBC अर्थात सामाजिक आणि शैक्षणिक मागास कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. या अहवालातील सर्वच तरतुदी सरकारने मान्य केल्या. 

मराठा समाजाची सद्य:स्थिती

– मराठा समाजातील व्यक्तींपैकी 13.42 टक्के निरक्षर

– 35.31 टक्के प्राथमिक शिक्षण घेतलेले

– 43.79 टक्के 10 वी 12 वी शिक्षण घेतलेले

– 6.71 टक्केच पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले

– तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेतलेल्याचे प्रमाण 0.71 टक्के

– 93 टक्के मराठा समाजाचे उत्पन्न 1 लाखांच्यापेक्षा कमी

– मराठा समाजाची बीपीएल टक्केवारी 24.2 टक्के

– 71 टक्के मराठा शेतकरी अल्पभूधारक

 

महर्षी कर्वेंची पुण्यात उपेक्षा -राष्ट्रवादीची निदर्शने

0

पुणे- गेली अडीच वर्षांपासून महर्षी कर्वेंच्या स्मारकाची अवस्था दयनीय झालेली असून अवघ्या ५० लाखापर्यंतच्या या कामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून सत्ताधारी भाजप भारतरत्न महर्षी कर्वेंची उपेक्षा करत आहे असा आरोप करत आज शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोथरूड येथे कर्वे स्मारकाचे काम चालू असलेल्या स्थळी जोरदार निदर्शने  केली .राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष महापालिकेतील मावळते विरोधीपक्षनेते चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हि निदर्शने करण्यात आली .

स्त्री सन्मान व स्त्री- शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेख्लीय कामगिरी करणाऱ्या भारतरत्न महर्षी डॉ कर्वे यांच्या कर्वे रस्त्यावरील पुतळा शुशोभिकारणाच्या नावाखाली गेल्या दोन ते तीन वर्षापासून हटविण्यात आलेला असून पुतळ्याचे काम देखील बंद अवस्थेत सुरू आहे. बहुतांशी पुणेकरांच्या  भावना दुखावल्या जात असून भारतरत्न मिळाल्यानंतर सुद्धा भाजप शिवसेनेच्या सत्ताधारी कडून विसर पडला आहे की काय ? असा सवाल करीत दोन महिन्यांपूर्वी महर्षी अण्णांच्या पुळ्याच्या कामास गती मिळून काम पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड मतदारसंघ तर्फे स्वः निधी उपलब्ध करून स्वतः श्रमदानातून पुतळा उभा करू असे  यावेळी चेतन तुपे म्हणाले..

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने, विजय (बापू) डाकले, नगरसेविका लक्ष्मीताई दुधाने, नंदिनी पानेकर अर्चना चंदनशिवे, रजनी पाचंगे, मिलिंद वाळवडकर, संजय खोपडे, किशोर कांबळे, प्रमोद शिंदे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

होंडा 2व्हीलर्सने साजरा केला व्हीएफएक्सचा करिष्मा असणाऱ्या आगामी ‘2.0’बरोबरचा सहयोग

0

   कलेचा तंत्रज्ञानाशी मेळ (सिनेमात व प्रत्यक्षात)

 अक्षय कुमार यांची स्वाक्षरी असलेल्या एक्स-ब्लेड मोटरसायकलमुळे 2.0बद्दलच्या उत्सुकतेत वाढ

चेन्नई: होंडा 2व्हीलर्स या भारतातील सर्वात विश्वासार्ह टू-व्हीलर ब्रँडने ‘2.0’ या मोठ्या प्रतीक्षेच्या 3डी सिनेमाबरोबरचा आपला सहयोग साजरा केला.

होंडा मशीनमध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीतील सक्षमतेबरोबर कलात्मकता आहे आणि या सहयोगामुळे, कला व तंत्रज्ञान यांचा विहंगम संगम असलेले उत्कृष्ट व्हीएफएक्स खऱ्या अर्थाने उठून दिसणार आहे.  

रजनीकांत यांची प्रतिकृती असणारा चिट्टी आणि होंडाचा ब्रँड अम्बेसेडर अक्षय कुमार 2.0 मध्ये स्क्रीन उजळून टाकणार असल्याचे पाहण्यासाठी सज्ज व्हा.

होंडा भारतात 2.0 ची लोकप्रियता आणखी वाढवणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याची तारिख जवळ येत असल्याने (29 नोव्हेंबर 2018), अक्षय कुमार यांची स्वाक्षरी असलेली एक्स-ब्लेड मोटरसायकल होंडा टचपॉइंट्समध्ये 2.0 चाहत्यांसाठी खास करून उपलब्ध असणार आहे.

याविषयी बोलताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले – “तंत्रज्ञानाच्या वापराच्या बाबतीत, 2.0 (#2Point0) आणि होंडा यांच्यामध्ये बरेच साम्य असल्याचे आम्हाला आढळले आहे. 2.0 या भारतीय सिनेमातील भव्य व अविस्मरणीय अनुभवाला चालना देणारा या चित्रपटविषयक सहयोग म्हणजे होंडाच्या जॉय ऑफ फन रायडिंगचा जणू विस्तार आहे. 2.0च्या सर्व चाहत्यांना, विशेष स्वाक्षरी असलेल्या एक्स-ब्लेड मोटरसायकलमुळे होंडाच्या डीएनएचा अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे, 2.0च्या निमित्ताने, ग्राहकांना सहभागी करण्याच्या होंडाच्या प्रयत्नांमध्ये भाग घ्या.

ग्राहकांसाठी ऑनलाइन व ऑन-ग्राउंड कार्यक्रम आयोजित करून विविध टचपॉइंटवर ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देण्याच्या दृष्टीने, होंडा 2.0 मधील विशेष कण्टेण्टचे अनावरण करणार आहे. या सहयोगाच्या निमित्ताने सुपरबाइक व सुपरहीरो एकत्र आले असल्याने हा सहयोग म्हणजे भारतीय सिनेमासाठी एक महत्त्वाची घटना आहे. 

खलिस्तानी दहशतवाद्यासोबत नवज्योत सिंग सिद्धूचे छायाचित्र

0

कर्तारपूर -येथील गुरुद्वारा दरबार साहिबला जोडणाऱ्या थेट मार्गिकेच्या पायाभरणी समारंभात खलिस्तानी दहशतवादी गोपाल चावला हा देखील उपस्थित असल्याचे समोर आले आहे. पंजाबमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत चावलाने छायाचित्रही काढले असून हे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर सिद्धूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अकाली दल व अन्य विरोधी पक्षांनी केली आहे.चावलाचे पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांची भेट घेतानाचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले आहे. यावर पाकिस्तानी लष्कराने ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिले आहे. लष्कर प्रमुखांनी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांचीच भेट घेतली होती. यावरुन भारतातील प्रसारमाध्यमांनी गैरअर्थ काढू नये, असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.

कर्तारपूर मार्गिकेमुळे पाकिस्तानातील कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब हे नानकदेवांचे समाधीस्थळ आणि भारतातील गुरुदासपूर येथील डेरा बाबा नानक हे ऐतिहासिक मोलाचे स्थान थेट जोडले जाणार आहे. या मार्गिकेचे काम सहा महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता असून या मार्गिकेचा पायाभरणीचा कार्यक्रम बुधवारी पार पडला. या कार्यक्रमात भारतातर्फे नवज्योसिंग सिद्धू, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि हरदीप सिंग पुरी हे सहभागी झाले होते. या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नवज्योतसिंग सिद्धूंचे भरभरुन कौतुक केले होते. मात्र, सिद्धूंचा हा दौराही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमात पाकिस्तानातील दहशतवादी हाफिज सईदशी संबंधित आणि खलिस्तानी दहशतवादी गोपाल चावला हा देखील उपस्थित होता. सिद्धूंसोबतचे चावलाचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले असून यावरुन विरोधी पक्षांनी सिद्धूंवीर टीका केली आहे.

स्वीडनमध्ये इमारतीला धडकले एअर इंडियाचे विमान

0

स्टॉकहोम – स्वीडनमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात होता-होता टळला आहे. 179 प्रवाशांना घेऊन जाणारे भारताचे विमान अचानक एका इमारतीला जाऊन धडकले. सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारच्या जीवितहानीचे वृत्त नाही. प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या अपघातातून सगळेच सुखरूप आहेत. हा अपघात नेमका कसा आणि का घडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस आणि प्रशासन या घटनेचा गांभीर्याने तपास करत आहेत. या अपघाताचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये विमानाचा एक विंग इमारतीला धडकला आणि त्याचा एक भाग तेथेच अडकल्याचे दिसून येते.

स्वीडनच्या स्थानिक वेळेनुसार, संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडला. स्वीडन विमानतळाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीप्रमाणे, फ्लाइट एअरपोर्ट टर्मिनल-5 वर उतरणे अपेक्षित होते. परंतु, रनवेपासून अवघ्या 50 मीटर अंतरावर विमान एका इमारतीला धडकले. तरीही विमान सुखरूप उतरवण्यात आले असून कुणालाही इजा झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच विमानतळावर फायर ब्रिगेडचे बंब आणि बचाव पथकांनी विमानाला घेराव घातला. सर्वच प्रवाशांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान दिल्लीहून निघाले होते.

‘तुला पाहते रे’ मालिका बंद करा अन्यथा आंदोलन

0

पुणे-झी मराठी वाहिनीवरील “तुला पाहते रे” मालिका बंद करा, अशाप्रकारची मागणी पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मालिकेत 20 वर्षांची मुलगी 40 वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचे दाखवले आहे. हे महाराष्ट्रासाठी घातक असून त्यातून चुकीचा संदेश समाजात जात असल्याचे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी म्हटले आहे.त्यांनी जिल्हाधिकारी राम किशोर नवल यांना निवेदन देऊन ही मालिका बंद करण्याची मागणी केलीय अन्यथा आंदोलन करु असा इशारा दिला आहे.

प्रदीप नाईक यांनी दिलेल्या निवेदनात या मालिकेतून समाज प्रबोधनाचा कुठलाही संदेश जात नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ऱ्हास होत असल्याचे म्हटले आहे. मालिकेत 20 वर्षाची मुलगी 40 वर्षीय इसमाच्या प्रेमात पडल्याचे दाखवले आहे. हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्रासाठी घातक आहे. या मालिकेतून आमच्या माता-भगिनींना वेगळा संदेश देण्याचा घाट घातला जात आहे. या मालिकेतील दिग्दर्शक निर्माते किंवा अभिनेते आपल्या घरातील 20 वर्षीय मुलीचे लग्न 40 वर्षीय व्यक्तीसोबत लावून देतील का? त्यामुळे या मालिकेत बदल करावा अन्यथा बंद करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

पिंपळे गुरवमध्ये भरते गरिबांच्या मुलांसाठी वस्ती शाळा

0
मराठवाडा जनविकास संघाचा अभिनव उपक्रम 
 
पिंपरी-पिंपळे गुरवमधील सृष्टी चौकाकडून भवानी मंदिराकडे जाताना रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये वस्तीतील गरिब मुलांची भरलेली शाळा नजरेस पडते. हसतमुख मुले-मुली हातात कोरी पाटी घेऊन शिक्षणाचे धडे गिरविताना दिसून येतात. बालकांना शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतू त्या योजना हातावर पोट असणाऱ्या गरिबांपर्यंत पोहोचताना दिसून येत नाहीत. म्हणूनच गरिबांच्या मुलांना शिकता यावे, यासाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने पिंपळे गुरव येथे वस्ती शाळा सुरू करण्यात आली आहे.
         या शाळेत कोणतेही वर्ग नाहीत, बसायला बाक नाहीत, परीक्षा घेणे-उत्तीर्ण करणे-पुढच्या वर्गात प्रमोट करणे असलाही प्रकार नाही; येथे फक्त पैशांअभावी अज्ञानाचा अंधार पसरलेल्या गरिबांच्या घरात ज्ञानाचा दिवा पेटविण्याचे कार्य चालते. तेही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. आज प्रत्येकजण उच्च शिक्षण घेऊन आपल्या करियरच्या वाटा निवडून पैसे कमविण्याचे स्वप्न पाहतो. परंतू आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा खर्‍या अर्थाने समाजासाठी व्हावा, म्हणून गरिबांच्या मुला-मुलींना शिकविण्याचा विचार सहसा कोणी करीत नाही. रस्त्यावरच्या कुटूंबांना रोजच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, तिथे मुलांचे शिक्षण घेणे तर अवघडच … म्हणूनच आपण केलेल्या शिक्षणाचा उपयोग योग्य रितीने व्हावा, या कल्पनेतून त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरविण्याचा विडा मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी उचलला आहे.
       मराठवाडा जनविकास संघाने उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये या चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. या शाळेत जवळपास 50 मुले-मुली शिक्षण घेत आहेत. यामध्ये बांधकाम मजुरांची, करचावेचक कामगारांची मुले-मुली शिकत आहेत.
        आपण आतापर्यंत छोटी-मोठी मजुरीची कामे करून हातावर पोट भरवित आलो आहोत, त्याचप्रमाणे आपल्या मुलांना शिक्षणासाठी शाळेत पाठवून खर्च करण्यापेक्षा त्यांनीही छोटी-मोठी कामे करून आर्थिक हातभार लावावा, अशी अपेक्षा  प्रत्येक पालकांकडून व्यक्त करण्यात येते. परंतू त्यांच्या मुलांनी जर शिक्षण घेतले, तर आणखी चांगल्या ठिकाणी नोकरी करून पैसा कमवू शकतील, हा विचार या वस्तीत राहणार्‍या पालकांच्या गळी उतरविण्यासाठी आदिती निकम ही तरुणी दारोदारी भटकून शिक्षणाचा प्रसार करीत आहे. या शाळेत मुलांना फक्त अक्षरी धडे दिले जात नाहीत, तर त्यांचे राहणीमान लक्षात घेता आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी यासोबत त्यांना व्यक्तिमत्व विकासाचे शिक्षणही दिले जाते. मुलांमधील बहुआयामीपणा-कौशल्यबहुलता यांचा विकास समांतरपणे कसा साधता येईल, मुलांना ‘माणसे’ बनण्याचे आणि ‘माणसे’ म्हणून आत्मविश्वासाने जगण्याचे बळ कसे देता येईल, त्यांच्यात सर्वांशी मिळूनमिसळून राहण्याचा संस्कार कसा रुजवता येईल, असे अनेक प्रयोग तेथे चालू आहेत, असे आदिती निकम सांगतात.
           या मुलांना शिकविण्यासाठी त्यांच्याकडे शैक्षणिक साहित्यही उपलब्ध असणे गरजेेचे आहे, हे लक्षात अरुण पवार स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून प्रत्येक मुलाला शैक्षणिक साहित्य पुरवतात. तसेच कधी कधी तर सर्व मुलांच्या न्याहरीची ही व्यवस्था करीत असतात. या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरविण्याची उत्सुकता ही आहेच, यातील विद्यार्थी हुशार देखील आहेत. या विद्यार्थ्यांना इतर शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व सोयसुविधा मिळाल्या, तर ते भविष्यात चांगले करियर घडवतील, असा विश्‍वास अरुण पवार यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य आदिती निकम भरभरून मदत करीत आहेत. वामन भरगंडे, सखाराम वाळकोळी, कृष्णाजी खडसे, कृष्णाजी फिरके, संपत गर्जे आदीनी खारीचा वाटा उचलत अरुण पवार व आदिती निकम यांना मदत करीत आहेत.

आशिष चौधरी आणि दीपा परदसानी यांची “हिंदुस्तान टॉकीज” नावाची निर्मिती संस्था !

0
अभिनेता म्हणून सिनेमाचे आणि दूरदर्शन च्या  अनेक वर्षांच्या अनुभवासह, आशिष चौधरी कौटुंबिक मित्र आणि उद्योजक दीपा परदसानी  यांच्यासह नविन निर्मिति संस्था हिंदुस्तान टॉकीज घेऊन आलेत। 
हिंदुस्तान टॉकीजने अभिनेता रितेश देशमुख अभिनीत आणि जियो स्टुडियोज तसेच मुंबई फिल्म कंपनीसह मराठी सिनेमाच्या सर्वात मोठ्या बजेट मूव्ही ‘” माउली ” चित्रपटाची सह-निर्मिती करून प्रादेशिक सिनेमापासून  सुरुवात करण्याचा सजग झाले आहेत। निर्माते म्हणून  हिंदुस्तान टॉकीज साठी आशिष आणि दीपा ह्यांचे हे  प्रयत्न असतील की योग्य विषय -आधारित क्षेत्रीय आणि व्यावसायिक सिनेमा तयार करणे आणित्यांना सहयोग  करणे.
आशीष चौधरी म्हणतात, “हिंदुस्तान टॉकीजमध्ये, आम्ही मजबूत स्क्रिप्ट मध्ये  गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहोत. दीपा आणि मी दोघांनाही दर्जेदार प्रोजेक्ट बनवण्याची इच्छा आहे. म्हणूनच, जेव्हा रितेश आणि जिओबरोबर सहकार्य करण्याची संधी आली तेव्हा ते आमच्या साठी पूर्णपणे योग्य ठरले. तसेच, मुंबई फिल्म कंपनी आणि जियो स्टुडिओसारख्या मार्केटलीडर सोबत काम करणे आनंददायी आहे. ”

दीपा परदसानी म्हणतात, “आम्ही नवीन लेखकांना सोबत काम करण्यास तयार आहोत ,आम्हाला वाटते की त्यांच्या एक सशक्त कंटेंट आहे. तसेच, ऑनलाइन प्लेटफार्म उघडणार आहोत त्यामुळे पोकळी भरून निघेल आणि ते आवश्यक आहे. आमचे विजन सर्वच प्लेटफार्म चा वापर करुण सर्व प्रदेशांत पोहोचणे हे आहे . ”

मराठी चित्रपट माउली नंतर, हिंदुस्तान टॉकीज सुरुवातीच्या काळात पंजाबी आणि बंगालीसह आणि पुढे पुढे प्रादेशिक भाषांमध्ये प्रवेश करणार आहेत, पुढील वर्षी हिंदुस्तान टॉकीज वेब क्षेत्रात देखील गुंतवणूक करणार आहेत .

धनादेशाचा अनादर झाल्यास वीजग्राहकांना 1500 रुपयांचा दंड

0

पुणे: वीजबिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर (चेक बाऊंस) झाल्यास 350 रुपयांऐवजी आता 1500 रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे.

महावितरणने वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकताच हा आदेश दिला आहे व दि. 1 नोव्हेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील सुमारे 1 लाख 75 हजार लघुदाब वीजग्राहक हे धनादेशद्वारे दरमहा वीजबिलांचा भरणा करतात. परंतु यातील सुमारे 3500 ते 4000 धनादेश दरमहा विविध कारणांमुळे बाऊंस होत आहेत. त्यासाठी संबधीत वीजग्राहकांना यापूर्वी 350 रुपये दंड लावण्यात येत होता. मात्र आता 1 नोव्हेंबरपासून धनादेशाचा अनादर झाल्यास 1500 रुपये किंवा बॅक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल तो दंड म्हणून लावण्यात येत आहे.

वीजबिल भरण्याच्या अंतीम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्यक आहे. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास साधारणतः तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास संबंधीत ग्राहकांना धनादेशद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश बाऊंस झाला आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.

महावितरणचे घरबसल्या वीजबिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप किंवा ईसीएसद्वारे सोय उपलब्ध आहे. इंटरनेट व मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पुणे परिमंडलात सद्यस्थितीत सुमारे 9 लाख 52 हजार वीजग्राहक सुमारे 177 कोटी रुपयांचा दरमहा वीजबिल भरणा करीत आहेत. तसेच ईसीएसद्वारे देयके भरणासाठी सुमारे सव्वादोन लाख वीजग्राहकांनी नोंदणी केलेली आहे आणि घरबसल्या दरमहा सुमारे 20 कोटी रुपयांचा वीजदेयकांचा भरणा ईसीएसधारक करीत आहेत. त्यामुळे धनादेशऐवजी वीजग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.