Home Blog Page 302

सर्वसामान्य, दुर्बलांचे घराचे स्वप्न सहज साकारणार; राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मुंबई, दि. २० : राज्यातील सर्वसामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरे मिळण्याचा मार्ग राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणामुळे प्रशस्त झाला आहे. हे एक क्रांतिकारी धोरण असून यामुळे राज्याच्या नगरविकास आणि गृहनिर्माणाला एक नवे रूप मिळेल. शिवाय या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येऊन महाराष्ट्राच्या १ ट्रीलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टास मोठे बळ मिळेल अशा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत “माझे घर-माझे अधिकार” हे ब्रीदवाक्य असलेल्या  “राज्य गृहनिर्माण धोरण २०२५” ला मंजुरी देण्यात आली. हे धोरण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसह सर्व घटकांना परवडणारी, शाश्वत आणि समावेशक घरे मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरेल असे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने २०३० पर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न  गटांसाठी ३५ लाख घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, सर्वसामान्यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक घटकासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.

गृहनिर्माण माहिती पोर्टल

या धोरणाची महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगतांना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, यामध्ये ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिला, विद्यार्थी, औद्योगिक कामगार, पत्रकार, दिव्यांग, माजी सैनिक या सर्वांच्या घरांचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून राज्य गृहनिर्माण माहिती पोर्टल केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून तयार करण्यात येईल. घरांची मागणी आणि पुरवठा संदर्भात डेटा, सदानिकांचे जिओ टॅगिंग, निधी वितरण, जिल्हानिहाय भूमी अधिकोष आणि महारेरा, महाभुलेख आणि पीएम गती शक्तिसारख्या प्रणालींशी याद्वारे समन्वय साधला जाईल.

शासकीय जमिनीची बँक 

निवासी वापरासाठी योग्य असलेल्या शासकीय जमिनींची एक बँक निर्माण करण्यात येईल.  महसूल व वन विभाग, एमएसआरडीसी, एमआयडीसी, जलसंपदा विभाग इत्यादींच्या समन्वयाने २०२६ पर्यंत ही राज्यव्यापी लँड बँक विकसित केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

वॉक टू वर्क

पंतप्रधानांनी नेहमीच कामाच्या ठिकाणाजवळ घरे असावीत अशी संकल्पना मांडली आहे.  वॉक टू वर्क या संकल्पनेच्या अनुषंगाने या धोरणात रोजगार केंद्रांच्या जवळ, विशेषतः औद्योगिक क्षेत्रांतील घरांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. एमआयडीसी क्षेत्रातील सुविधा भूखंडाकरिता आरक्षित असणाऱ्या २० टक्के जागेपैकी १० ते ३० टक्के जागा केवळ निवासी वापरासाठी राखीव ठेवण्याचे देखील ठरविण्यात आले आहे. वाढते शहरीकरण पाहून केवळ १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मोठ्या महानगरपालिकाच नव्हे तर सर्व महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांना सर्वसमावेशक घरांचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुनर्विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करणार

स्वयंपुनर्विकास कक्ष नियोजन, निधी, विकासक निवड आणि प्रकल्प अंमलबजावणीच्या माध्यमातून सोसायट्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समर्पित स्वयंपुनर्विकास कक्ष प्रस्तावित आहे. त्यासाठी सुरुवातीचा निधी २,००० कोटी रुपये ठेवणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

मुंबई महानगराच्या जी हबवरील नीति आयोगाच्या शिफारशींनुसार, परवडणाऱ्या आणि सर्वसमावेशक गृहनिर्माण क्षेत्रात गुंतवणूक सुरू करण्यासाठी राज्य शासनाने परवडणाऱ्या गृहनिर्माण निधीच्या माध्यमातून अंदाजे २०,००० कोटी रुपयांच्या व्यवहार्यता तफावत निधीचा महत्त्वपूर्ण भाग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.

हे धोरण ग्रीन बिल्डिंग पद्धतींना प्रोत्साहन देणारे आहे. पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांच्या एकत्रिकरणास प्रोत्साहित करून शहरांचे अधिक हरितीकरण करण्यावर भर दिला आहे असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शाश्वत, आपत्ती-रोधक, किफायतशीर आणि हवामान योग्य बांधकाम पद्धतीसाठी ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंजअंतर्गत नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानासह उष्णता, पूर आणि भूकंपासह हवामानाच्या जोखमींचा सामना करण्यासाठी नवीन बांधकामांची योजना आखली जाईल.

सर्व पुनर्विकास प्रकल्पांमध्ये सोसायटी, विकासक आणि प्राधिकरण यांच्यात त्रिपक्षीय करार असणे आवश्यक आहे, रहिवाशांच्या संरक्षणासाठी आगाऊ भाडे आणि बँक गॅरंटीसाठी एस्त्रो खाते असणे आवश्यक केले आहे. किफायतशीर आणि सामाजिक गृहनिर्माण प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी सीएसआरमार्फत निधी गोळा केला जाईल. आयआयटी, आयआयएम युडीआरआय, डब्ल्यूआरआई यांची नॉलेज पार्टनर म्हणून नियुक्ती करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली.

झोपडपट्टी पुनर्वसनाला प्राधान्य

या धोरणात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाच्या जमिनीचा वापर प्रस्तावित आहे असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, केंद्र शासन व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठीच्या संयुक्तपणे योजना राबविता येऊ शकतात. तसेच संबंधित केंद्र शासन विभागाकडून निधी घेण्यात येईल. एसआरए प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी हे धोरण माहिती तंत्रज्ञानावर आधारित करण्यात येईल. यामुळे लाभार्थींची निश्चिती, प्रकल्पाची स्थिती , निधी व्यवस्थापन यासारख्या बाबी शक्य होतील, असेही त्यांनी सांगितले.

गैरप्रकार होणार नाहीत

झोपडपट्ट्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी धोरणात्मक दृष्टिकोन म्हणून क्लस्टर पुनर्विकासाला या धोरणात प्रोत्साहन देण्यात आले आहे. प्रगती न झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये नवीन सक्षम विकासकांची निवड निविदा प्रक्रियेतून केली जाईल. विलंब टाळून गैरप्रकार पूर्णपणे बंद केले जातील याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

त्यांनी भारतातील खगोलशास्त्र संशोधनाला नवी दिशा दिली….

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानप्रसारक, लेखक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

डॉ. जयंत नारळीकर यांनी आपल्या संशोधन, लेखन आणि विज्ञानप्रसाराच्या कार्यातून विज्ञानाला सामान्य जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांनी स्थिर स्थिती विश्वसिद्धांतावर केलेले संशोधन आणि ‘हॉयल-नारळीकर सिद्धांत’ हे त्यांच्या वैज्ञानिक योगदानाचे महत्त्वपूर्ण भाग आहेत.महापौरपदावर असताना डॉ. नारळीकर यांची भेट घेतली होती. शरीर थकलेले असतानाही त्यांच्यातील उत्साह माझ्यासारख्यालाही लाजवणारा होता. संशोधक म्हणून असणारी त्यांची उंची उत्तुंग तर होतीच, पण त्यांच्यातील माणूसपणही भावणारे होते.सामान्यांमध्येही विज्ञानाची गोडी निर्माण करण्यात डॉ. नारळीकर यांच्या लेखणीचा मोठा वाटा होता. या लेखणीमुळे अनेकांना खगोल विश्वाकडे, विशेषतः संशोधनाकडे आकर्षित केलं.‘आयुका’च्या स्थापनेद्वारे त्यांनी भारतातील खगोलशास्त्र संशोधनाला नवी दिशा दिली. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने विज्ञानजगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे !

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

निवडणूक प्रभाग रचनेचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना द्या

पुणे- पुणे , पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकी साठी प्रभाग रचनेचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना द्या अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव
डॉक्टर गोविंदराज यांच्याकडे केली आहे .

या संदर्भात गोविंदराज यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि,’ आपल्या खात्याने ठेवलेल्या प्रस्तावानुसार राज्य मंत्रिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रभाग रचना तयार करण्याची जबाबदारी सरकार म्हणून स्वीकारली आहे. यापूर्वी राज्य निवडणूक आयोग प्रभाग रचना करत होती, आणि जाहीर करत होती. प्रक्रिया करत होती. बदलत्या परिस्थितीत आता नवीन कार्यपद्धती कशी अवलंबवयाची यासंदर्भामध्ये आमच्या सूचना आहेत.
जिल्हाधिकारी हे शासनाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यामध्ये काम करत असतात. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही ठिकाणी प्रभाग रचना तयार करण्याची जबाबदारी शासनाचे प्रतिनिधी म्हणून श्री जितेंद्र डूडी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे सोपवावे. पुणे महानगरपालिकेमध्ये आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासक असल्यामुळे आणि दोन्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांचा कार्यकाल लवकरच संपत असल्यामुळे नवीन आयुक्त येऊन त्यांना सगळी घडी बसवण्यासाठी वेळ लागेल आणि मग न्यायालयाने दिलेल्या वेळापत्रकांप्रमाणे निवडणुका घेता येणे शक्य होईल असे वाटत नाही. म्हणून किमान पुण्या पुरते तरी तातडीने जिल्हाधिकारी पुणे यांना प्रभाग रचना करण्याची जबाबदारी सोपवावी.
त्यांच्या अधिपत्याखाली दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत ते एकेक महानगरपालिकेमध्ये लक्ष देऊ शकतात. पुणे महानगरपालिकेची यंत्रणा वापरली तर नव्याने होणाऱ्या प्रभाग रचनेवर राजकीय प्रभाव राहील, याचा विचार करून तातडीने कार्यवाही करावी.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या वाहनावर गोळीबार

पुणे-शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारेच्या वाहनावर गोळीबार केले की धक्कादायक घटना घडली आहे. वारजे माळवाडी येथे दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातंकडून अचानक फायरिंग केल्याने खळबळ उडाली आहे.निलेश घारे हे घराकडे जात असताना ही घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे.

पुणे शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींनी वारजे माळवाडी येथे गोळीबार केल्याने सदर परिसरात तणाव निर्माण झाला. दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी घारे यांच्या चारचाकी कारवर मंगळवारी रात्री 12वाजता फायरींग केले .यावेळी घारे हे आपले काम उरकून घराकडे निघाले होते. दरम्यान सहकारींसोबत गणपती माथा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात ते आले असताना, बाहेर पार्किंग केलेल्या घारे यांच्या काळ्या रंगाच्या गाडीवर गोळी झाडण्यात आली.शिवसेनेच्या शिंदे गटाचे घारे युवा सेना जिल्हाप्रमुख असून त्यांच्या वाहनावरच राहत्या घराच्या परिसरात गोळीबार झाल्याने सदर भागात भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वारजे पोलिस यांच्यासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दुचाकीवर आलेल्या अज्ञात आरोपींची माहिती काढण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे .याबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान घारे यांचे कोणाशी यापूर्वी वाद आहे का किंवा पूर्ववैमानस्यातून सदरचा प्रकार केला आहे का याबाबत देखील पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.

मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्याचा कट रचणाऱ्या ओंकार मोरेला अटक

पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची मागील वर्षी भरदिवसा हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. शहर आणि परिसरात मोठं वर्चस्व असणाऱ्या मोहोळच्या हत्येने गुन्हेगारी विश्वही हादरले होते. तसंच या हत्येचा बदला घेण्यासाठी मोहोळ टोळी सक्रिय झाली होती. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्यासाठी कट रचणाऱ्या ओंकार सचिन मोरे वय २३ वर्ष रा. मुठा कॉलनी पुणे याला अटक केली आहे. मोरे याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे असून या प्रकरणात यापूर्वी शरद मालपोटे आणि संदेश कडू यांना अटक करण्यात आली .

याबाबतची सविस्तर हकीकत अशी की, शरद मोहोळ याची ५ जानेवारी २०२४ रोजी कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत १३ आरोपींना अटक केली होती, ज्यामध्ये दोन वकिलांचाही समावेश होता. या प्रकरणात मुख्य आरोपी साहील उर्फ मुन्ना पोळेकर, धनंजय मटकर, सतीश शेंडगे, नितीन खैरे, नामदेव कानगुडे, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गाव्हणकर, विठ्ठल गांदले, अॅड. रवींद्र पवार, अॅड. संजय उडान आणि आदित्य गोळे यांचा समावेश होता.
या हत्येच्या पार्श्वभूमीवर, पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत १६ आरोपींवर कारवाई केली होती. या आरोपींमध्ये गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांचाही समावेश होता. गणेश मारणे हा शरद मोहोळ हत्येचा मुख्य सूत्रधार मानला जातो. मारणे याला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी तीन राज्यांमध्ये शोध मोहीम राबवली होती. गणेश मारणे हा तुळजापूर, कर्नाटक, केरळ आणि ओडिशा येथे लपून बसला होता. अखेर पुणे पोलिसांनी नाशिकजवळ मोशी टोलनाक्याजवळ पाठलाग करून त्याला अटक केली होती.

दरम्यान, शरद मोहोळ हत्येच्या प्रकरणात आता ओंकार मोरेची अटक झाल्याने पोलिसांच्या तपासाला अधिक बळ मिळाले आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अतिरीक्त कार्यभार मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ गणेश इंगळे यांचे मागदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सपोनि आशिष कवठेकर, सपोनि अमोल रसाळ, पोउपनि नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, विजयकुमार पवार, नागनाथ राख, ओमकार कुंभार, हनुमंत काबंळे, अमोल सरडे, विनोद चव्हाण, गणेश थोरात, निखिल जाधव, साधना ताम्हाणे, पुष्पेंद्र चव्हाण व नागेश राख यांनी केली आहे.

पुण्यात मुसळधार पाऊस; वाघोलीजवळ होर्डिंग कोसळून दुचाक्यांचे नुकसान

पुणे-शहरात सलग दुसऱ्या दिवशी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. मध्यवर्ती भागांसह अनेक भागांत जोरदार सरी कोसळल्या असून, हवामानात मोठा बदल पाहायला मिळतो आहे. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळील सणसवाडी येथे पावसामुळे एक भलंमोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या होर्डिंगखाली 7 ते 8 दुचाक्या अडकल्या असून, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुण्यात मुसळधार पावसात भलंमोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या होर्डिंगखाली 7 ते 8 दुचाकी अडकल्या आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ सणसवाडी येथे ही हार्डिंग कोसळल्याची घटना घडली.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे काम तातडीने सुरू केले. सदर होर्डिंग अधिकृत परवानगीने उभारण्यात आले होते की नाही, याची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र, संबंधित जाहिरात कंपनीने या होर्डिंगचा सांगाडा कमकुवत झालेला असताना देखील दुर्लक्ष केल का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. आता या होर्डिंगच्या कंपनीवर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे आहे.गेल्या 3-4 दिवसांपासून पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरला अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसत आहे. आज सायंकाळी सुद्धा पुण्याला जोरदार पावसाने झोडपले. अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे -अन् महावितरणची कसोटी

पुणे, दि. २० मे २०२५यंदा मान्सूनचे लवकरच आगमन होईल अशी सध्या स्थिती आहे. मात्र दररोज अवकाळी पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. त्यातच पावसाशी संबंधित विविध कारणांमुळे सुरळीत वीजपुरवठ्यावर परिणाम होत आहे. वीजपुरवठा खंडित होणे हे वीजग्राहकांना जेवढे नकोसे आहे तेवढेच महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांना देखील नकोसे आहे. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अभियंते व कर्मचारी रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहे. परंतु कोणत्याही कारणाने वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम पर्यायी वीजयंत्रणेमधून वीजपुरवठा सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.

ज्या भागात उपरी (ओव्हरहेड) वीजवाहिन्या आहेत, तेथील वीज खांबावर असणारे चॉकलेटी रंगाचे पीन किंवा डीस्क इन्सूलेटर तसेच डबलपोल स्ट्रक्चरवर असणारे पोस्ट इन्सूलेटर हे चिनी मातीचे असतात. विजेचा प्रवाह लोखंडी वीजखांबात उतरू नये यासाठी हे इन्सूलेटर अतिशय महत्वाचे असतात. उन्हात चिनी मातीचे इन्सूलेटर तापतात. त्यानंतर पावसाचे दोन-चार थेंब पडले की इन्सूलेटरला तडे जातात. त्यामुळे विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालिन यंत्रणा (ब्रेकर) कार्यान्वित होते व वाहिनीमधील वीज प्रवाह खंडित होतो.

वीजपुरवठा खंडित होण्याचे आणखी कारण म्हणजे वादळ वाऱ्यांमुळे वीजयंत्रणेवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे. वीज कोसळणे वा कडकडाटामुळे दाब वाढणे तसेच अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्याने फिडर पिलर, रिंग मेन युनिट अशा वीजयंत्रणेत पाणी शिरते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. खोलगट व सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करून ठेवावा लागतो.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये भूमिगत वीजवाहिन्यांचे प्रमाण अधिक आहे. पीएमसी, पीसीएमसी, एमएनजीएल, मेट्रो, स्मार्ट सिटी, राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण व इतर संस्थांच्या विविध कामांसाठी जेसीबीद्वारे खोदकाम करण्यात येते आहे. यात काही ठिकाणी भूमिगत वाहिन्या तोडल्या जातात व वीजपुरवठा खंडित होतो. तर काही भूमिगत वाहिन्याचे थोडेफार नुकसान होते. मात्र वीजपुरवठा खंडित होत नाही. परंतु पावसाला सुरवात झाली की साचलेले पाणी या वाहिन्यांमध्ये शिरते व बिघाड होतो. किंवा संततधार पावसामुळे भूमिगत वाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होते. त्यामुळेही वीजपुरवठा खंडित होतो. केबल टेस्टींग व्हॅनच्या सहाय्याने भूमिगत वाहिन्यांमधील दोष शोधणे, दुरूस्तीसाठी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जाईंट लावणे आदी कामे अविश्रांत करावी लागतात.

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, रोहित्र, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स, डबल पोल स्ट्रक्चर अशा वीजयंत्रणेजवळ घरगुती सुका व खाद्य पदार्थांचा ओला कचरा टाकण्यात येतो. खाद्यपदार्थामुळे मांजर, उंदीर, घुस, पक्षी आदींसह सरपटणारे प्राणी तेथे येतात. वीजयंत्रणेला या प्राण्यांचा स्पर्श झाला की शॉर्टसर्कीट होऊन वीजपुरवठा खंडित होतो. गेल्या दोन महिन्यांमध्ये वीजयंत्रणेजवळ सुका कचरा, उस किंवा गवत पेटल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे तब्बल ८ प्रकार घडले आहेत. त्याचा सुमारे ७ लाख ६५ हजारांवर ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसला आहे.

संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध- वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सर्वप्रथम पर्यायी वीजपुरवठ्यासाठी उपकेंद्रांशी संपर्क करणे, बिघाड शोधण्यासाठी पेट्रोलिंग करणे, झाडे, फांद्या हटविण्यासाठी विविध यंत्रणेशी संबंध, दुरूस्ती कामांसाठी वीजसुरक्षेचे परमीट, अंतर्गत संपर्क, साहित्य व इतर पाठपुराव्याची विविध कामे आदींसाठी स्थानिक अभियंते किंवा जनमित्रांचे मोबाईल प्रामुख्याने वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर सातत्याने व्यस्त असतात.

त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या तक्रारी करण्यासाठी किंवा माहिती विचारण्यासाठी वीजग्राहकांकरिता महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. या टोल फ्री क्रमाकांवर ग्राहकांच्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाते व लगेचच संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांना ‘एसएमएस’द्वारे कळविली जाते. यासह खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल देण्याची किंवा मोबाइलवरून NOPOWER<ग्राहक क्रमांक> हा संदेश टाईप करुन ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठविण्याची सोय उपलब्ध आहे.

पावसाळ्यात खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंते व जनमित्रांची खर्‍या अर्थाने कसोटी असते. प्रतिकूल परिस्थितीत रात्री-बेरात्री दुरुस्तीचे काम करण्याचे काम अतिशय आव्हानात्मक असते. वीज दिसत नाही तसेच ती अनुभवी किंवा नवख्या कर्मचार्‍यांना ओळखतही नाही. त्यामुळे धोका सर्वांना सारखाच असतो. भरपावसात, रात्री-बेरात्री खंडित विजेचा बिघाड शोधणारे, अविश्रांत दुरूस्तीचे काम करणाऱ्या अभियंते व जनमित्रांसाठी पावसाळी दिवस अतिशय आव्हानात्मक आहेत.

ज्ञानवृक्ष उन्मळून पडला…मंत्री चंद्रकांत पाटलांची भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. विज्ञान विषयातला ज्ञानवृक्ष असेच नारळीकर यांचे वर्णन करावे लागेल. खगोलशास्त्रातील त्यांचे श्रेष्ठत्व आणि ज्येष्ठत्व जगमान्य आहे. रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहून त्यांनी विज्ञानासारखा रुक्ष विषय सुबोध केला. केंब्रीज विद्यापीठात शिक्षण, टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम, आयुका संस्थेची उभारणी, २०२१ नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद असा त्यांच्या कार्याचा आवाका होता. त्यांच्या निधनाने ज्ञानवृक्ष उन्मळून पडला. हे महाराष्ट्राचेच नाही, तर देशाचे देखील अपरिमित नुकसान आहे. नारळीकर यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना.

ना. चंद्रकांतदादा पाटील

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

पुणे 20– “डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण देशाच्या विज्ञानविश्वाला हानी झाली आहे. ते केवळ एक महान खगोलशास्त्रज्ञ नव्हते, तर विज्ञानाच्या लोकाभिमुखतेचे जनकवी होते,” अशा शब्दांत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, पद्मभूषण डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

राज्यमंत्री मिसाळ शोक संदेशात म्हणाल्या की, “ज्ञान, प्रज्ञा, सुलभता आणि साधेपणा यांचा संगम असलेल्या नारळीकर यांनी विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. त्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार करत विज्ञानवादी विचार समाजात रुजविले. त्यांनी केंब्रिजमधून घेतलेले शिक्षण, टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील योगदान, आयुका (IUCAA) ची स्थापना आणि मराठीतून विज्ञानलेखन हे सर्वच भारतीय विज्ञानविश्वासाठी दीपस्तंभ ठरले. आज आपण एका ज्ञानवृक्षाला मुकलो आहोत. त्यांची जाण ही केवळ वैज्ञानिक समुदायासाठीच नव्हे, तर प्रत्येक जिज्ञासू मनासाठी मोठी पोकळी निर्माण करणारी आहे. ही पोकळी भरून निघणं अशक्य आहे,” असेही त्या म्हणाल्या.
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी डॉ. नारळीकर यांच्या कार्यास कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या परिवाराप्रती संवेदना व्यक्त केल्या .
000

अमेरिकेला आंबा निर्यातीसाठी विकिरण प्रक्रिया व निर्यात सुरळीत

पुणे, दि. २०: अमेरिका येथे आंबा निर्यातीसाठी आंब्यातील कोयकिड्याचा अमेरिकेमध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून निर्यातीपूर्वी आंब्यावर विकिरण प्रक्रिया सुरळीत चालू असून ११ मे २०२५ पासून पुनश्च निर्यात सुरळीत झाल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

अमेरिकेला आंबा निर्यातीसाठी विकिरण प्रक्रिया बंधनकारक आहे. त्यानुसार पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रावरून अमेरिकन निरीक्षकाच्या उपस्थितीमध्ये १ एप्रिल २०२५ पासून सदर प्रक्रिया करण्यात येत असून त्यांच्या तपासणीअंती आंब्याची निर्यात केली जाते. ८ व ९ मे २०२५ रोजी निर्यात झालेल्या काही कन्साईनमेंट मधील त्रुटीमुळे सदर आंबा कन्साईनमेंट अमेरिका येथे थांबवण्यात आल्या अशा आशयाच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या असून याबाबत कृषी पणन मंडळाकडून या बाबींच्या तपासणीचे कामकाज प्रगतीपथावर आहे.

८ व ९ मे २०२५ रोजी सुविधेवरील विकीरण प्रक्रियेची कॉम्पुटराईज्ड स्काडा सॉफ्टवेअरमधील माहितीची तपासणी केली असता किमान व कमाल डोस हा विहित मर्यादेमध्ये आढळून आलेला असून आंब्याला विकीरण प्रक्रिया व्यवस्थितरित्या, परिणामकारक व नियमानुसार पुर्ण झालेली असल्याचे निदर्शनास आले आहे. तद्नंतर अमेरिकन निरीक्षकांनी तपासणी व खात्री करून, डोझीमीटरचे रीडिंग मधील किमान व कमाल डोस हा विहित मर्यादेत योग्य असल्यामुळे निर्यातीकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र-२०३ स्वाक्षरीत करून दिलेले आहे व तद्नंतरच सदरहू आंबा अमेरिका येथे निर्यात झालेला आहे.

तथापि, त्यानंतर अमेरिकन निरीक्षक यांनी ८ व ९ मे २०२५ रोजी प्रक्रिया केलेल्या व अमेरिकेमध्ये पोहोचलेल्या १५ कन्साईनमेंटच्या डोजीमेट्री मध्ये काही त्रुटी आहेत असे कळविल्यामुळे १० निर्यातदारांच्या एकूण २५ मे. टन आंब्याच्या कन्साईनमेंट्स अमेरिकेमध्ये नाकारण्यात आल्या. मात्र येथे विशेषत्वाने असे नमूद करण्यात येते की, विकिरण प्रक्रिया संदर्भातील यु. एस. डी. ए., भारतीय एन.पी.पी.ओ. व अपेडा यांच्या दरम्यान स्वाक्षरीत झालेल्या ‘ऑपरेशनल वर्क प्लान’ मधील मुद्दा क्र. ११ मधील नमुद तरतुदीनुसार विकीरण प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आढळल्यास, त्याबाबत सदरहू त्रूटी सुविधा केंद्राच्या निदर्शनास आणून देणेबाबत व त्रुटी दुरुस्त करण्याबाबत त्यांना संधी उपलब्ध करुन देण्यात येईल अशी तरतूद आहे.

मात्र, अमेरिकन निरीक्षकांनी असे न करता, इतर संबंधित यंत्रणांशी विचारविनीमय न करता थेट त्यांच्या अमेरिकेमधील वरीष्ठ कार्यालयास कथीत त्रुटींबाबत अवगत केले व त्यामुळे सदर १५ कन्साईनमेंट्स अमेरीकेमध्ये नाकारण्यात आल्या. सुविधेवरील अमेरीकन निरीक्षकांनी प्रमाणपत्र-२०३ देण्यापुर्वी सदर त्रुटी सुविधेवरील संबंधीत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून त्रुटींची पुर्तता करण्याकरिता संधी दिली असती तर आंब्याच्या निर्यातीमधील नुकसान टाळता आले असते.

अमेरिका येथे आंबा निर्यातीसाठीच्या प्रि-क्लिअरन्स प्रोग्रामचे संचालक श्रीमती इरीका ग्रोवर यांनी १० मे २०२५ रोजी दिलेल्या ई-मेलमध्ये सूचित केल्याप्रमाणे सुविधा केंद्र प्रमुख यांनी केलेल्या उपाययोजनाचा अहवाल यु.एस.डी.ए. च्या विहित नमुन्यांमध्ये ११ मे, २०२५ रोजी सादर करण्यात आला असून त्याआधारे त्याच दिवसापासून अमेरिकेला आंबा निर्यातीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

वाशी येथील सुविधेवरुन ११ मे २०२५ पासून १८ मे २०२५ पर्यंत सुमारे ३९ कन्साईनमेंट द्वारे ५३ हजार ७२ बॉक्सेस (१८५.७५ मे. टन) आंबा अमेरीका येथे निर्यात करण्यात आला असून सदर आंबा अमेरिकन बाजारपेठेमध्ये विक्री केला जात आहे.. सदर आंब्यामध्ये राज्यातील हापूस, केशर, पायरी तर दक्षिण भारतामधील बैगनपल्ली, हिमायत व इतर वाणांची आंबा निर्यात सुरु आहे. उत्तर भारतामधील रसालु, लंगरा, चौसा, दशहरी आदी आंबा देखील विकीरण प्रकिया करुन निर्यात सुरळीत सुरु आहे.

सद्यस्थितीत वाशी येथील विकीरण सुविधेवरुन आतापर्यंत १ हजार ४१३ मे. टन आंब्याची अमेरिका येथे निर्यात झाली असुन सुमारे २ हजार मे. टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया येथे २७ मे. टन आंब्याची निर्यात करण्यात आली आहे, असेही पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
0000

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करावे-राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

पुणे, दि. 20: हाताने मैला उचलणारे सफाई कर्मचारी अजूनही मल:निस्सारण वाहिनीमध्ये कामे करीत असल्याचे निदर्शनास येत आहे, या कामातून त्यांची सुटका करण्यासोबतच त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याकरीता प्रशासनाने एक कालमर्यादा निश्चित करावी, असे निर्देश राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (19 मे) आयोजित हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध घालणे व त्यांचे पुनर्वसन करणे, २०१३ या अधिनियमांची अमलंबजावणी तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व त्यांच्या निराकरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद खैरनार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, ससून रुग्णालयाचे प्रतिनिधी, अशासकीय सदस्य, विविध संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, शासकीय कार्यालयातील सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील लहान बालके, युवक-युवती, वयोवृद्धांचे पुनर्वसन करण्याच्यादृष्टीने सर्वेक्षण करावे. या सर्व बालकांना शाळेत 100 टक्के प्रवेश देण्यात यावा. युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्याकरीता पीएम-विश्वकर्मा योजना अशा कौशल्य विषयक केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा. वयोवृद्ध नागरिकांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्रतेप्रमाणे लाभ देण्याची कार्यवाही करावी. तसेच बेघर नागरिकांना शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल उपलब्ध करुन द्यावे.

सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांची उन्नती साधण्यासाठी लाड पागे समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही करावी. किमान वेतन कायदा तसेच कामगार कायद्यानुसार सफाई कामगारांच्या खात्यात कत्रांटदारांने वेळेत वेतन अदा करावे, याबाबीचे उल्लघंन करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. डुडी म्हणाले.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाने नियमानुसार शासनास प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करावा, असे असेही श्री.डुडी म्हणाले.
0000

भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ वैज्ञानिक, खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
  • मंत्रिमंडळाच्या बैठकीतही श्रद्धांजली अर्पण

मुंबईदि. २०:  भारताची विज्ञानाधिष्ठीत प्रतिमा उजळवणारा आणि खगोल शास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा महान वैज्ञानिक सुपूत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्भविभूषण, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला, असे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना महाराष्ट्रातील नागरिकांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

डॉ. नारळीकर यांच्या कन्या श्रीमती गिरीजा यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना सांत्वना दिली.

डॉ. नारळीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणाना दिले. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉ. नारळीकर यांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘भारतीय खगोलशास्त्राचा भक्कम पाया घालण्यात डॉ. नारळीकर यांनी अमूल्य योगदान दिले. गणितज्ज्ञ वडीलांकडून मिळालेला वारसा घेऊन डॉ. नारळीकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खगोलीय शास्त्रातील संशोधनात मोलाची भर घातली. त्यांच्या संशोधनात्मक कार्याला जगभरातील विद्यापीठांनी, संशोधनात्मक संस्थांनी मान्यता दिली. भारतात परतल्यावर त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रोनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA)’ ‘आयुका’ या संस्थेच्या उभारणीची जबाबदारी सोपवली. तीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. या संस्थेलाही त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र अशी ख्याती मिळवून दिली. ‘बिग-बँग थिअरी’ला पर्यायी संकल्पनाही त्यांनी मांडली होती. त्यांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाच्या कॉस्मोलॉजी कमिशनचे अध्यक्षपदही भूषवले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रचार-प्रसारातील डॉ. नारळीकर यांचे कार्य देखील असेच भरीव राहिले. त्यांनी विज्ञान लेखक म्हणून केलेली कामगिरी साहित्यिकदृष्ट्या अजरामर अशीच राहील. कारण त्यांनी रसाळ आणि ओघवत्या भाषेत केलेल्या लेखनामुळे नव्या पिढीत, विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढीस लागली. ‘आकाशाशी जडले नाते’ असे पुस्तकरुपातून सांगणाऱ्या डॉ. नारळीकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या ‘चार नगरांतले माझे विश्व’ या आत्मचरित्रालाही साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. यातूनही त्यांच्या साहित्यकृतींचे वैशिष्ट्य आणि गुणवत्ता लक्षात यावी.

डॉ. जयंत नारळीकर, पुणे या इतक्या पत्त्यावर त्यांच्याकडे लहानथोरांची शेकडो पत्र येत. या पत्रातील विज्ञान विषयक शंका-प्रश्नांचे ते आवर्जून समाधान करत. निखळ वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसारासाठी ते अखेरपर्यंत निरलसपणे कार्यरत राहीले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक – भारतीय खगोलशास्त्राचे अध्वर्यू ते शाळा-महाविद्यालये-विद्यापीठांमध्ये पोहचून विज्ञान आणि त्यातील गणिती सिद्धांताच्या प्रसारासाठी झटणारा प्रसारक अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची व्यापकता होती. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे भारतीय वैज्ञानिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. डॉ. नारळीकर यांच्या परिवारावरही आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ज्ञ डॉ. नारळीकर यांना महाराष्ट्राच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन:पुण्यातील राहत्या घरी 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे-भारताचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ तथा लेखक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांना कोणताही आजार नव्हता. त्यांनी झोपेतच शांतपणे अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या निधनामुळे एक थोर वैज्ञानिक, साहित्यिक व शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा मावळल्याची भावना व्यक्त होत आहे.डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ज्ञ व वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. तर आई सुमती ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचा विवाह 1966 साली मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ज्ञ) यांच्याशी झाला. त्यांना गीता, गिरीजा व लीलावती अशा 3 कन्या या दाम्पत्याला आहेत. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत नारळीकरांना कोणताही गंभीर आजार नव्हता. पण वयोमानानुसार त्यांची प्रकृती काहीशी कमी-जास्त होत होती. त्यांनी मंगळवारी पहाटे झोपेतच अखेरचा श्वास घेतला. दोनच वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी आणि गणितज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन झाले होते. तेव्हापासून ते काहीसे खचले होते.

जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसीतच झाले. 1957 साली त्यांनी विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. 1972 मध्ये ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुखपद स्वीकारले. त्यानंतर 1988 मध्ये त्यांची पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. जनसामान्यांना विज्ञानातील गूढ रहस्य कळवीत म्हणून डॉ. नारळीकर यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतून विज्ञान साहित्याची निर्मिती केली. विविध मराठी नियतकालिकांतून त्यांचे विज्ञानविषयक ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत. या माध्यमातून त्यांनी देशभरात विज्ञान प्रसरणाची ज्योत पेटवली. त्यांची पुस्तके जगातील विविध भाषांमध्ये भाषांतरित झालेली आहेत.

डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या कार्याची दखल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली आहे. भारत सरकारने खगोल क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाविषयी 1965 मध्ये त्यांचा पद्मभूषण, तर 2004 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरव केला. याशिवाय त्यांनी रँग्लर या पदवीसह खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतरही अनेक सन्मानांवर आपली मोहोर उमटवली आहे. नारळीकरांनी जागतिक पातळीवरही शास्त्रज्ञ म्हणून स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. त्यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासमवेत ‘कन्फॉर्मल ग्रँव्हिटी थिअरी’ मांडून जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले.

जयंत नारळीकरांनी केवळ संशोधन क्षेत्रातच कार्यरत न राहता लेखनाच्या माध्यमातूनही विज्ञानवादाचा प्रसार केला. त्यांची ‘अंतराळातील भस्मासूर’, ‘अंतराळ आणि विज्ञान’, ‘आकाशाशी जडले नाते’, ‘सूर्याचा प्रकोप’ ही पुस्तके चांगलीच गाजली. ‘चार नगरांतले माझे विश्व’ या त्यांच्या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तर ‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला. याशिवाय अमेरिकेतील एका संस्थेने त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले.

वाळूगट, खाणपट्टयांच्या परवानगीचा कालावधी कमी करा !

महसूल मंत्री बावनकुळे यांची पर्यावरण विभागाला सूचना

मुंबई – वाळूगट अन् खाणपट्टयांसाठी आवश्यक असणारे पर्यावरण मंजुरीचे प्रस्ताव राज्याच्या पर्यावरण विभागाने तातडीने मंजूर करावेत तसेच, पर्यावरण विभागाकडून देण्यात येणाऱ्या परवानगीचा कालावधी कमी करून, त्रृटी असतील तर तर त्यांची विनाविलंब पूर्तता करुन घ्यावी, अशी सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित केलेल्या बैठकीवेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचना केली. मंत्री पंकजाताई मुंडे, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नदीमधील वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा होऊ नये आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी नवीन एम सँण्ड धोरण सरकारने मंजूर केले आहे. एका जिल्ह्यात ५० क्रशरना परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांनाही पर्यावरणीय परवानगी जलदगतीने मिळावी अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली.

  • प्रत्येक आठवड्याला सुनावणी घेणार

वाळू धोरणाबाबत ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रस्ताव जिल्हा स्तरावरुन आले तर तर ते लवकर मंजूर करुन देता येतील. त्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात याव्यात. असे पर्यावरण सचिव जयश्री भोज म्हणाल्या. त्यासाठी प्रत्येक आठवड्याला सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढली जातील अशी सकारात्मकताही त्यांनी दर्शविली.

प्रस्ताव योग्य पद्धतीने आले तर तातडीने मंजूर करुन देण्यात काहीच अडचण येणार नाही. या विभागाचे सहकार्य महसूल विभागाला असेल. सरकारी विभागांमध्ये समन्वय ठेवून या परवानग्या जलद दिल्या जातील.-पंकजा मुंडे, पर्यावरण मंत्री

सर्वसामान्य लोकांना सहज वाळू उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने नवीन वाळू धोरण आणले आहे. या धोरणांतर्गत वाळू ठेक्यांचे लिलाव करुन सरकारला मोठ्या प्रमाणावर रॉयल्टी मिळते. या वर्षभरात साधारणतः ३ हजार कोटी रुपये महसूल शासनाला मिळणे अपेक्षित आहे.-चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

फडणवीस यांच्या माध्यमातून अमित शहांना फोन..अन भुजबळ मंत्री झाले

NCP ने धनंजय मुंडेंची पोकळी भरून काढली-

मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी सकाळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुती सरकारच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादीने ऐनवेळी त्यांचे मंत्रिपद कापले होते. यामुळे भुजबळ प्रचंड नाराज झाले होते. पण आता त्यांना मंत्रिमंडळात घेऊन पक्षाने त्यांची नाराजी दूर केली आहे. पण मुळात राष्ट्रवादीने भुजबळांना मंत्रिपद देऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे दूर गेलेला ओबीसी समाज पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा 5 डिसेंबर 2024 रोजी शपथविधी झाला. त्यावेळी छगन भुजबळ यांना सहजपणे मंत्रिमंडळात स्थान मिळेल असा दावा केला जात होता. पण ऐनवेळी राष्ट्रवादीने त्यांचा पत्ता कापला. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. भुजबळ हे राज्यातील बडे ओबीसी नेते आहेत. ओबीसी समुदायात त्यांचा एक्का चालतो. पण राष्ट्रवादीने त्यांनाच मंत्रिमंडळाबाहेर ठेवल्यामुळे भुजबळ प्रचंड नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली. या प्रकरणी त्यांनी थेट अजित पवारांवर निशाणाही साधला. एवढेच नाही तर त्यांनी शरद पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधत वेगळी वाट निवडण्याचे संकेतही दिले.

छगन भुजबळांनी आपल्यावर लोकसभा निवडणुकीवेळीही अन्याय झाल्याचा आरोप करून अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे हे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अडचणीत सापडले. या प्रकरणात त्यांचे मंत्रिपदही गेले. यामु्ळे ओबीसी समुदायाचा एक मोठा नेते मंत्रिमंडळातून बाहेर पडला. तेव्हाच मुंडे यांच्या जागी भुजबळांना संधी दिली जाईल असा दावा राजकीय वर्तुळात केला जात होता. त्यानुसार, छगन भुजबळांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. आता त्यांना धनंजय मुंडे यांचेच अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वरळी येथील निवासस्थानी 8 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक पार पडली. या भेटीनंतर छगन भुजबळ व देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीनंतर फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बोलणे झाले. त्यानंतर भुजबळांचे मंत्रिपद निश्चित करण्यात आले. ओबीसी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आल्यामुळे ओबीसी समुदायात नाराजी पसरली होती. त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला जबर फटका बसण्याची भीती होती. त्यामुळे ओबीसींची नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

छगन भुजबळ यांचा शपथविधी पार पडताच मंत्रालयात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मंत्रालयातील धनंजय मुंडे यांचा 204 क्रमांकाचे दालन जवळपास 2 महिन्यांनंतर उघडण्यात आले आहे. तिथे युद्ध पातळीवर साफसफाईचे काम सुरू आहे. त्यामुळे भुजबळांना हेच दालन मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भुजबळांना मुंडेंचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयही मिळण्याची शक्यता आहे. भुजबळांनी मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी नेटाने पार पाडण्याची तयारी दर्शवली आहे. मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मंत्रिमंडळात संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत.