Home Blog Page 3017

चीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी-डॉ. कल्याण गंगवाल

0

पुणे : मकरसंक्रातीच्या निमित्ताने पतंग उडविण्याची धामधूम सुरु झाली आहे. पतंग आणि मांजा बाजारात आला आहे. चीनी आणि नायलॉन मांजामुळे गेल्या काही वर्षात अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. या मांजाच्या वापरावर कायद्याने बंदी आहे. मात्र, छुप्या पद्धतीने हा चीनी मांजा विकला जात आहे. त्यामुळे माणसांच्या जीवावर बेतणार्‍या या चीनी मांजा विकणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केली. या मांजामुळे जखमी होणार्‍या पक्ष्यांच्या बचावासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पतंगबाजी करणार्‍यांची लगबग सुरु होते. बाजारात विविध प्रकारचा मांजा येतो. बोहरी आळीसह शहर आणि उपनगरांतील छोट्या-मोठ्या दुकानांत हा मांजा विकला जातो. यात बहुतांश मांजा चीनी किंवा नायलॉनचा असतो. त्यामुळे अपघातांचे प्रकार वारंवार घडताना आपण पाहिले आहे. गेल्या वर्षी सुवर्णा मुजुमदार या महिलेला शनिवारवाड्याजवळील पुलावर मांजाने गळा कापल्याने आपला जीव गमवावा लागला. अशा मांजाची निर्मिती, विक्री, साठवण, खरेदी व वापर यावर कायद्याने बंदी आहे. चीनी मांजा सापडल्यास संबंधितांवर पाच वर्षांचा तुरुंगवास व एक लाखाच्या आर्थिक दंडाची तरतूद आहे. मात्र, शासकीय यंत्रणेच्या ढिलेपणामुळे हा मांजा बाजारात विकला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याआधी घटलेल्या दुर्घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन चीनी मांजा विक्री करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी. तसेच राष्ट्रीय हरित लवादाने याप्रकरणी लक्ष घालावे. ”

“या मांजाला अनेक पक्षीही बळी पडतात. त्यामध्ये कबुतरे, कावळे, घुबड, पोपट, घार आणि फुलपाखरे यांचा समावेश आहे. जखमी पक्ष्यांच्या बचावासाठी सर्वजीव मंगल प्रतिष्ठान गेल्या 15 वर्षांपासून काम करीत आहे. गेल्या चार पाच वर्षात जवळपास 150 पक्ष्यांना वाचविण्यात यश आले आहे. यंदाही एक अ‍ॅम्ब्युलन्स, एक पशुवैद्यकीय डॉक्टर आणि चार-पाच कार्यकर्ते ही बचावकार्य मोहिम राबविणार आहेत. त्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून, डॉ. गंगवाल (9823017343), सुनील परदेशी (9823209184), अनिल अवचिते (9422349789) यांच्याकडे जखमी पक्ष्यांबाबत माहिती द्यावी. या मोहिमेत अहिंसाप्रेमी नागरिकांनी सहकार्य करावे,” असे डॉ. गंगवाल यांनी नमूद केले.

‘एंगेजमिन्ट्स’ वाढवणार कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता:पुण्यातील तरुणांचे संशोधन

0
पुणे : एकविसाव्या शतकात तंत्रज्ञान, फेसबुक, व्हॉट्सऍप या सोशल माध्यमांनी एकमेकांना जवळ आणले आहे. मात्र, या सोशल साईट्सवर व्यग्र राहण्याच्या नादात आपापसांतील प्रतिबद्धता झपाट्याने कमी झाली आहे. नातेसंबंध जपण्यापेक्षा सोशल मीडियावर पडीक राहण्यात त्यांचा अधिक वेळ जात आहे. त्यातूनच स्वमग्नतेकडे आणि नैराश्य येण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. सध्याच्या ‘टेक्नोसॅव्ही’ सवयीचा लाभ घेत लोकांना एकमेकांत गुंतवण्याचा प्रयत्न पुण्यातील ‘एंगेजमिन्ट्स’ या ऑनलाईन व्यासपीठाकडून केले जात आहेत, अशी माहिती ‘एंगेजमिन्ट्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक सचिन पारेख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. प्रसंगी मुख्य उत्पादन अधिकारी सतीश बोरा, सरव्यवस्थापक आरती साठे उपस्थित होते.
कोणत्याही संस्थेच्या कार्यक्षमतेत व्यवस्थापन, कर्मचारी, सहकारी, ग्राहक यांच्यातील नाते महत्वपूर्ण असते. एकमेकांना जोडून ठेवण्यासाठी पारंपरिक उपक्रम आजच्या डिजिटल युगात पुरेसे नाहीत. त्यामुळे डिजिटल आणि पारंपरिक याचा मेळ घालत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न ‘एंगेजमिन्ट्स’ने हाती घेतला आहे. संस्थेतील वातावरण खेळीमेळीचे आणि संवादाचे राहावे, यासाठी एंगेजमिन्ट्सकडून संशोधनाअंती ‘गेमिफिकेशन’ हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. संस्थेअंतर्गत सहकाऱ्यांची चांगली टीम राहण्यासाठी ‘गेमिफिकेशन’ उपयुक्त ठरणार आहे, असे पारेख यांनी नमूद केले.
या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून त्यांना येणाऱ्या अडचणी आणि ताण समजून घेऊन ‘एंगेजमिन्ट्स’ तयार करण्यात आले आहे. कर्मचारी कामाच्या वेळेत काही मिनिटांसाठी एंगेजमिन्ट्सवर भेट देऊन आनंदी आणि सकारात्मक संवाद साधून आल्हाददायी वातावरण राहील व कामाचा वेळही वाया जाणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. यामागे गेमिंग किंवा सट्टा किंवा बाष्कळ मनोरंजन एवढाच उद्देश नाही, तर डिजिटल प्लॅटफॉर्म वापरून सकारात्मक दृष्टीकोन व प्रतिबद्धता कायम राखण्याचा आहे.
एचआर वर्गासाठी हे उपयुक्त असे ऍप्लिकेशन आहे. www.EngageMints.com/epl यावर जाऊन एचआर विनाशुल्क नोंदणी करू शकतात आणि त्याचा अनुभव घेऊ शकतात. तसेच बक्षीसे जिंकू शकतात. अनेक एचआर व ग्राहकांनी याचा अनुभव घेतला असून, हे अतिशय नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त असे व्यासपीठ असल्याचे म्हटले आहे. उत्पादन क्षमता वाढण्यासह कर्मचारी, ग्राहक, डीलर्स व सहकारी यांच्याप्रती प्रामाणिकता वाढण्यातही महत्वपूर्ण ठरणार आहे. हे व्यासपीठ डिजिटल असल्याने कंपन्याना आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘एंगेजमेंट प्रोग्रॅम’ घेताना जागा आणि इतर गोष्टींचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे अतिशय स्वस्त आणि मस्त अशा या गेमिफिकेशनचा आपण लाभ घ्यायला हवा, असे सचिन पारेख यांनी म्हटले आहे.
विचारांना चालना देणारे विविध खेळ
या उपक्रमांतर्गत विविध गोष्टी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये क्रिकेट, फुटबॉल यांसारखे खेळ, प्रश्नमंजुषा, विचार करायला लावणारे इतर ऍक्टिव्हिटीजचा समावेश आहे. शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गोष्टींचाही यात समावेश आहे. त्यावर खेळत राहण्यापेक्षा विचारांना चालना देण्यात, तसेच तणावविरहित काम करण्यासाठीही या गोष्टी उपयुक्त ठरणार आहेत. हे केवळ मनोरंजनासाठी नसून संस्थेशी कटिबद्धता जोपासण्यासाठी आणि टीम बिल्डिंग, ब्रॅंडिंगसाठीही महत्वाचे ठरणार आहे.

पॉवर फॅक्टर सवलतीचा योग्य वापर करणाऱ्या ग्राहकांना रकमेचा परतावा

0

डिजिटल पेमेंट लाभासाठी प्रॉम्ट पेमेंट आवश्यक

मुंबई-महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने स्पष्ट केल्यानुसार, जे ग्राहक पॉवर फॅक्टर सवलतीचा योग्य वापर करतील अशा ग्राहकांना त्यासाठी आकारलेल्या रकमेचा परतावा महावितरणकडून करण्यात येणार आहे. तसेच डिजिटल पेमेंटची सवलत मिळण्यासाठी लघुदाब ग्राहकांना वीजबिलाचा भरणा निर्धारित वेळेत करणे व थकबाकी निरंक असणे अनिवार्य राहणार आहे. याशिवाय सर्व ग्राहकांना करार मागणीच्या पातळीची मर्यादा कायम राखने क्रमप्राप्त आहे. आयोगाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने महावितरणने याबाबत निर्णय घेतले आहेत.

विद्युत आयोगाने महावितरणच्या मध्यावधी वीज दर आढावा याचिकेवर दि.12 सप्टेंबर 2018 रोजी आदेश दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी दि.01 सप्टेंबर 2018 पासून करण्यात आलेली आहे. या आदेशाच्या अनुषंगाने महावितरण कंपनी तसेच विविध ग्राहक व ग्राहक संघटनांनी मा. आयोगाकडे पुर्नविचार याचिका दाखल केल्या होत्या. यात लोड फॅक्टर इन्सेंटिव्हच्या सूत्रात सुधारणा, लघुदाब ग्राहकांकरीता डिजिटल पेमेंटची अंमलबजावणी प्रॉम्ट पेमेंटच्या धर्तीवर करणे व करार मागणीची पातळी वर्षात तीन वेळा ओलांडल्यास संबंधित ग्राहकाच्या करार मागणीमध्ये सुधारणा करणे तसेच पॉवर फॅक्टर संबंधित बदल अंतर्भूत होता.

आयोगाच्या सुधारित आदेशांमुळें डिजिटल पेमेंटच्या इन्सेंटिव्हचा लाभ मिळण्याकरीता संबंधित लघुदाब ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरणा प्रॉम्ट पेमेंट डिस्काऊंटच्या निर्धारित वेळेत डिजिटल माध्यमाद्वारे करणे आवश्यक आहे. तसेच हा लाभ प्राप्त करण्याकरिता संबंधित ग्राहकाची थकबाकी निरंक असणे आवश्यक आहे. या सुधारित आदेशाची अंमलबजावणी दि. 01 सप्टेंबर 2018 पासून करण्यात येत आहे.

विद्युत प्रणाली सक्षम राखण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या विनियम 2005 (विद्युत पुरवठा संहिता आणि पुरवठयाच्या इतर अटी) अन्वये करार मागणीची पातळी राखण्यासाठी व तीन वेळेची निर्धारित मर्यादा ओलांडणाऱ्या ग्राहकांना शिस्त लावण्याकरीता महावितरण कंपनीद्वारे त्यांची करार मागणी पुर्नस्थापित करण्यात येईल, अशी विनियमात सुधारणा केलेली आहे. परिणामी सर्व ग्राहकांना करार मागणीच्या पातळीची मर्यादा कायम राखणे आवश्यक आहे. या सुधारित आदेशाची अंमलबजावणी दि. 01 जानेवारी 2019 पासून करण्यात येत आहे.

मा. आयोगाच्या दि. 02 जानेवारी 2019 रोजीच्या पॉवर फॅक्टर संबंधातील आदेशात यापूर्वी दिलेल्या दि. 12 सप्टेंबर 2018 च्या वीजदर आदेशातील सरासरी पॉवर फॅक्टरच्या गणनेत लीड रिअ‍ॅक्टीव्ह पॉवर (RKVAH Lead) मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच पॉवर फॅक्टर सवलत व दंडाच्या टक्केवारीमध्येही कुठलाही बदल आयोगाने केलेला नाही. परंतु विद्युत प्रणालीत सुधारणा व्हाव्यात व त्या करण्यासाठी ग्राहकांना आवश्यक ते बदल करता यावेत व ग्राहकांना योग्य तो पॉवर फॅक्टर राखता यावा, ग्राहकांना त्यांच्या प्रणालीत सुधारणा करण्यासाठी वेळ मिळावा याचा सर्वांगीण विचार करुंन पॉवर फॅक्टर अनुज्ञेय मर्यादेत राखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याकरिता ग्राहकांना दि. 31 मार्च 2019 पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.

आयोगाच्या आदेशामध्ये पुढील सुधारणा केलेल्या आहेत. त्यात पॉवर फॅक्टर सवलतीमध्ये बदल करून आता 0.95 पेक्षा अधिक (लीड किंवा लॅग) पॉवर फॅक्टरला सदर सवलत लागू राहणार आहे. या बदलामुळे 0.95 पेक्षा अधिक लीड पॉवर फॅक्टर असणाऱ्या पात्र ग्राहकांना फरकाच्या रक्कमेचा परतावा तीन समान हप्त्यांमध्ये जानेवारी 2019 (वीज वापर) च्या बिलींगपासून वीज देयकाद्वारे समायोजित करण्यात येणार आहे. तसेच मा. आयोगाने निर्देशीत केलेल्या सूत्राप्रमाणे एप्रिल 2019 मध्ये आपला सरासरी पॉवर फॅक्टर अनुज्ञेय मर्यादेत म्हणजेच 0.90 व त्यापेक्षा अधिक (लीड व लॅग) राखणाऱ्या ग्राहकांना दि. 01 सप्टेंबर 2018 ते 31 मार्च 2019 या कालावधीतील लीड पॉवर फॅक्टर दंडाच्या रक्कमेचा परताव्याकरिता पात्र ठरविण्यात येणार आहे. अशा पात्र ग्राहकांना परताव्याची रक्कम त्यांच्या पुढील वीज देयकामध्ये एप्रिल 2019 पासून समान मासिक हप्त्यात समायोजित करण्यात येईल. तथापि, ग्राहकाचा पुढील एखाद्या महिन्यात पॉवर फॅक्टर हा 0.90 (लीड किंवा लॅग) पेक्षा कमी राहिल्यास त्या महिन्यातील परताव्याचा हक्क रद्द होईल.

लोड फॅक्टर इन्सेटिव्ह सूत्रामध्ये Maximum Consumption Possible ची गणना करताना आता Actual Power Factor ऐवजी Unity Power Factor (1.0) चा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या सुधारित आदेशाची व सुधारित अधिनियमाची अंमलबजावणीसुध्दा दि. 01 जानेवारी 2019 पासून करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्यांचे पॉवर फॅक्टर अनुज्ञेय मर्यादेत (0.90 किंवा त्यापेक्षा जास्त लीड किंवा लॅग) राखणे अनिवार्य आहे. महावितरणच्या सर्व ग्राहकांनी वरील आदेशाबाबत नोंद घेवून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

कमिशन खोरांनो..दलाल चोरांनो..चौकीदार झोपत नाही, अंधार झाल्यावर चोरांना पकडतो, मोदींची विरोधकांवर टीका

0

सोलापूर- ‘केवळ हेलिकॉप्टरच नव्हे तर लढाऊ विमानांच्या घोटाळ्यातही हात असलेल्यांचे मिशेल मामा कनेक्शन आता शोधावेच लागणार आहे. त्यांचा भ्रष्टाचार बाहेर येत असल्यामुळेच घाम फुटलेले आता चौकीदाराला चोर म्हणून हिणवत आहे,’ या भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राफेल आरोप’प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. कमिशन खोरांनो.. दलाल चोरांनो.. 2022 मध्ये चौकीदाराच्या हस्तेच 30 हजार घरांचे उद्घाटन होणार, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या दौऱ्यात सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत झालेल्या कामाचे उद्घाटन, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे तब्बल 30 हजार असंघटित कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांची पायाभरणी, उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे भूमिपूजन, सोलापूर-उस्मानाबाद-येडशी महामार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस, केंद्रीय वाहतूक व भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी, राज्यपाल के.विद्यासागरराव यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते.

चौकीदार झोपत नाही, अंधार झाल्यावर चोरांना पकडतो- मोदी
ख्रिश्चन मिशेल याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर घोटाळ्यात सामील दलाला पकडून भारतात आणले आहे. जेलमध्ये बंद असलेल्या या दलालाने धक्कादायक खुलासा केला आहे. तो केवळ हेलिकॉप्टरच्या डीलमध्ये सहभागी नव्हता, तर आधीच्या सरकारच्या काळात फ्रान्ससोबत लढाऊ विमानांचा जो सौदा केला जात होता, त्यातही त्याची भूमिका होती. मिशेल मामाचा काँग्रेसशी काय संबंध आहे? चौकीदाराने जागे राहावे की झोपावे? तुमचा आशीर्वाद आहे, त्यामुळे चौकीदार लढत आहे. चौकीदार झोपत नाही, अंधार झाल्यावर चोरांना पकडतो, अशा शब्दांत मोदींनी विरोधाकांवर टीका केली.

मोदी म्हणाले, देशाची जनता चौकीदाराच्या पाठीशी उभी आहे म्हणून अनेक बड्या-बड्या लोकांचे आव्हान हा चौकीदार समर्थपणे पेलत आहे

मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणाऱ्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण

0

सोलापूर- येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणाऱ्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. पोलिसांच्या दडपशाही धोरणाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना आणि काँग्रेसच्या काही नगरसेवकांनाही पोलिसांनी आज (बुधवार) पहाटेच ताब्यात घेतले होते. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर आणीबाणी सदृश स्थिती निर्माण केल्याचा आरोप केला होता. एकंदर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेमुळे विरोधकांकडून संताप व्यक्त होत आहे.

पंतप्रधान मोदी हे सभास्थळी जात असताना प्रारंभी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा दिला. काही अंतरावर असलेल्या एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी या वाहन ताफ्याला काळे झेंडे दाखवले. त्यामुळे चिडलेल्या पोलिसांनी या कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी थेट मारहाण करण्यास सुरूवात केली. नंतर ५ जणांना पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ आकाशात काळे फुगेही सोडण्यात आले होते.

हेल्मेट सक्ती- मुख्यमंत्र्यांपुढे आज तरी उघडतील काय आमदार, खासदारांची तोंडे- मुख्यमंत्री खेचणार काय ‘या ‘ पोलीस अधिकाऱ्यांचे कान ?

0

– मुख्यमंत्री खेचणार काय ‘या ‘ पोलीस अधिकाऱ्यांचे कान ?

पुणे- हेल्मेट सक्तीवर अगोदर  शिवलेली आणि अखेरीस उचकटू पाहणी तोंडं आज पुण्यात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांसमोर तरी आ वासून बोलतील काय ? आणि पोलीस कमिशनर आणि डेप्युटी कमिशनरांनी चालविलेल्या हेल्मेट सक्ती चा फज्जा उडविण्यासाठी ‘सीएम शस्त्र’ वापरतील काय हे आजच पुणेकरांना दिसून येणार आहे .
आज दुपारी दिड वाजता पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत . आणि ते प्रथम पोलीस कमिशनरांच्या कार्यालयात जाणार आहेत . आता तिथे ते त्यांना शाबासकी देतात कि ,’थांब भाऊ ..आता पुरे ‘ असे म्हणत पुणेकरांना ‘दिलासा देतात .. ते पहायचे आहे .आणि त्याबरोबरच भाजपचे 8 आमदार 1 खासदार आणि दुसरे सहयोगी खासदार यापैकी कोण कोण आज मुख्यमंत्र्यांना पुण्यात भेटतील ..आणि भेटल्यानंतर ते हेल्मेट सक्ती वर त्यांच्यापुढे तोंड कसे उघडतील ..हे देखील . असे तसे ..किंवा तातडीने किंवा उशिरा का होईनात समजणार आहे . आणि त्याचा मुख्यमंत्र्यावर किती प्रभाव पडतो तेही समजणार आहे . तेव्हा .. आता पाहू यात .. दुपारी मुख्यमंत्री पुण्यात आल्यावर माध्यमे काय काय बातम्या देताहेत त्याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहणार आहे ….
दरम्यान …भाजप मधील कोथरूडच्या आमदार 2 वर्षापूर्वी हेल्मेट सक्तीच्या विरोधात आंदोलन करताना काय बोलल्या होत्या त्याचा जुना व्हिडीओ आम्ही येथे देत आहोत.तो पहाच …

व्‍यंगचित्रकलेचा ध्‍यास घेतलेले सुरेश क्षीरसागर

सुमारे 13 वर्षे कापडावर कारागीरी करत असतांना कागदावर व्‍यंगचित्रकलेच्‍या रुपाने व्‍यक्‍त होण्‍याची संधी मिळाली आणि पुढे हीच व्‍यंगचित्रकला जीवनाचा ध्‍यास होऊन गेली. गेल्‍या 51 वर्षांहून अधिक काळ व्‍यंगचित्रकला क्षेत्रात आपल्‍या नावाचा ठसा उमटवलेले सुरेश सायबण्‍णा क्षीरसागर हे एक ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार. महाराष्‍ट्रात राजकीय व्‍यंगचित्रकारांमध्‍ये त्यांचे स्‍थान अव्वल आहे. ठसठशीत रेषा आणि विचारांची स्‍पष्‍टता हे त्‍यांच्‍या व्‍यंगचित्रांचे वैशिष्‍ट्य म्‍हणावे लागेल.

सुरेश क्षीरसागर यांचा जन्‍म सोलापूरला  21 ऑगस्ट 1949 ला झाला.  कळत्या वयात सुरुवातीला 13 वर्षे ते शिंपीकाम हा व्यवसाय करत होते. याच दरम्‍यान अशोक माहिमकरांच्या ‘फुलबाग’ मध्ये  1967 मध्ये त्‍यांचे पहिले व्यंगचित्र प्रकाशित झाले. नंतर 1980 पासून पुढे 25 वर्षे मुंबईत इंडियन एक्स्प्रेस ग्रुपमध्ये आर्टिस्ट म्हणून त्‍यांनी काम केले. त्‍यानंतर आर्टिस्ट सुपरव्हायजर पदावरुन त्‍यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. नवाकाळ, लोकसत्ता, लोकमत, पुढारी, तरुण भारत, मुंबई सकाळ, इंडियन एक्स्प्रेस या दैनिकांत आणि पोलीस दलाच्‍या  दक्षता या मासिकांत त्‍यांनी असंख्‍य व्‍यंगचित्रे रेखाटली.  दैनिके, मासिके व नियतकालिकांत त्‍यांची आतापर्यंत 16 हजारांहून अधिक व्यंगचित्रे प्रसिध्द झाली आहेत. याशिवाय  दिवाळी अंकांची मुखपृष्ठे, राजकीय व्यंगचित्रे, अर्कचित्रे, कथाचित्रे, कॉमिक्स स्ट्रीप्स यासारखे कलाप्रकार त्‍यांनी सातत्याने हाताळले आहेत. व्यंगचित्र या विषयावर सप्रयोग व्याख्यान सादर करण्याचा त्‍यांना अनुभव आहे.  दुबईच्या ‘दै. खलिज टाइम्स’ व ब्राझिलच्या ‘इडिपी’ मासिकातही त्‍यांची  व्यंगचित्रे प्रसिध्द झाली आहेत. ‘सपाटून हसा’ हा हास्‍यचित्र संग्रह आणि ‘हास्‍यवर्दी’  हे  व्‍यंगचित्रांचे पुस्‍तक प्रसिध्द झाले आहे.

पोलीस दलाच्‍या ‘दक्षता’ मासिकासाठी व्‍यंगचित्रे रेखाटण्‍यासाठी निमंत्रण आले, तेव्‍हाचा गमतीदार प्रसंग क्षीरसागर यांनी कथन केला. आमच्या घरातील फोन वाजला आणि माझ्या पत्नीने तो उचलला’ ‘पोलिस मुख्यालयातून मी श्रीमंत जाधव बोलतोय, क्षीरसागर आहेत काय? माझ्या श्रीमतीच्या हातातून रिसीव्हर गळून पडला आणि कशीबशी मला म्हणाली ‘अहो, काय लफडं करुन ठेवलंत? कोणाविरुध्द कसलं व्यंगचित्र रेखाटलंत? बघा, घ्या! आता पोलीस स्टेशनवरुन फोन आलाय’. ‘मीही खरोखर मनातून घाबरलो. खरं तर पाचावरच धारण बसली. पण वर-वर उसनं अवसान आणून ‘अगं, मी काय केलंय? उगाच तुझं काहीतरी!’  असे म्हणत थरथरत्या हाताने रिसीव्हर कानाला लावला. मी माऊथ पीस (कानाला ऐकायची बाजू) तोंडाकडे पकडला होता आणि भीतभीतच ‘मी क्षीरसागर बोलतोय!’ असं म्‍हणालो. पण पलिकडून काहीच रिस्पॉन्स आला नाही. म्हणून मी रिसीव्हर तोंडासमोर धरला आणि माझी चूक माझ्या नजरेत आली. तेव्हा परत रिसीव्हर फिरवून पकडला आणि संवाद साधला. पलिकडून श्री. जाधव मला व्यंगचित्र पाठवण्याबाबत बोलले तेव्हा कोठे माझा जीव भांड्यात का कशात पडला म्हणतात तसा पडला. माझा वाढलेला बीपी नॉर्मलवर आला.

दक्षता मासिकासाठी पोलिसांवरील व्‍यंगचित्रे रेखाटणे हे आव्‍हानच होते. पण ते क्षीरसागर यांनी  नियमित अभ्‍यास, वाचनवृत्‍ती यांच्‍या सहाय्याने लिलया पेलले. पोलीस, गुन्हेगार, चोर, वकील, न्यायाधीश, खाकी वर्दी, राजकारण आणि एकंदरीत त्यातून निर्माण होऊ शकणा-या विनोदाची कल्पना करुन व्यंगचित्रे रेखाटण्‍यात ते यशस्‍वी झाले.  गुन्‍हेगारी विश्‍वातील मसालेदार प्रसंगांवरील वस्‍तुनिष्‍ठ व्‍यंगचित्रे वाचकांना मोहीत करुन गेलीत.

ते म्‍हणतात, आपण दरोड्याच्या बातम्या ऐकतो. दरोडे पडतात, काहींची उकल होते. काहींची कधीच होत नाही, हे वास्तव आहे. पण म्हणून पोलिसांचे कर्तृत्व कमी लेखणं म्हणजे कृतघ्नपणा ठरेल. पोलीस हा जनतेचा मित्र आहे. पोलिसांची संगत नको म्हणून मध्यमवर्गीयांनी दूर पळण्याची वृत्ती ठेऊन चालणार नाही. पोलिसांच्या अडचणी, दु:ख, यातना समाजाने समजून घेतल्‍या पाहिजेत. पोलीस हा समाजाचाच एक घटक आहे. पोलिसांनाही मन आहे. तीसुध्दा माणसेच आहेत. कर्तव्य कठोर होताना काही अतिरेक होत असेल तर त्याचा विरोध जरुर करा. पण सर्वच पोलिसांचा द्वेष करु नका. त्यांच्यातील अवगुणांचा द्वेष करा, असेही ते आवर्जून सांगतात. पोलिसांवरील व्‍यंगचित्रे काढणे म्‍हणजे त्यांच्‍यातील चित्‍तवृत्‍तीला हळूवार फुंकर घालणेच होते, असंही ते नम्रपणे सांगतात.

राजेंद्र सरग

9423245456

हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ पुण्यात दशक्रिया विधी

0

पुणे -शहरात हेल्मेट सक्तीच्या विरोधात आठवडाभरापासून विविध भागात राजकीय पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे. मंगळवारी पुणे शहरातील विविध संघटनांनी एकत्र येऊन हेल्मेटविरोधी कृती समितीच्या वतीने हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी करण्यात आला.

पुण्यात सध्या हेल्मेट सक्तीवरुन वाद सुरु आहे. वाहतूक पोलिसांनी हेल्मेट सक्तीचा पवित्रा घेतला असून पुणेकरांनी मात्र याला विरोध दर्शवला आहे. हेल्मेटसक्तीविरोधात हेल्मेटविरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. मंगळवारी कृती समितीच्या वतीने हेल्मेट सक्तीच्या निषेधार्थ वैकुंठ स्मशानभूमीत दशक्रिया विधी करण्यात आला. या दशक्रिया विधीमध्ये हेल्मेट विरोधी कृती समितीचे संयोजक माजी महापौर अंकुश काकडे, शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, भाजप नेते संदीप खर्डेकर,नगरसेवक विशाल धनवडे , माजी नगरसेवक धनंजय जाधव, उमेश वाघ,काँग्रेस सरचिटणीस संदीप मोरे तसेच शहरातील विविध संघटनेचे आजी- माजी पदाधिकारी उपस्थित होते.

माजी आमदार महादेव बाबर म्हणाले की, मागील आठवडाभरापासून पुणे वाहतूक पोलिसाकडून कायद्याचा धाक दाखवत हेल्मेट सक्ती केली जात आहे. ही निषेधार्ह बाब असून पुणे शहराच्या वाहतुकीचा वेग लक्षात घेता, हेल्मेट सक्ती राबवणे चुकीचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. वाहतुक पोलिसांनी ही कारवाई मागे न घेतल्यास भविष्यात आधिक तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा त्यांनी दिला.

पीएमपीच्या कोट्यवधींच्या तोट्यामागे दडलंय काय ?माजी उपमहापौर आबा बागुल यांचा सवाल

0
पुणे
 शहराची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पीएमपीला होत असलेला कोट्यवधींचा तोटा आता संशयाच्या फेऱ्यात सापडला आहे. तत्कालीन पीएमटी फायद्यात होती मग आता स्वतंत्र कंपनी म्हणून अस्तित्वात आलेल्या पीएमपीला कोट्यवधी रुपयांचा तोटा कसा काय होत आहे ,त्यामागे गौडबंगाल काय ? असा सवाल उपस्थित करून माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी ही सेवा  पूर्ववत स्वतंत्र प्राधिकरणामार्फत चालविण्याची मागणी केली आहे.
 याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, सद्यस्थितीत सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पीएमपी बससेवेची अवस्था नियोजनाचा अभाव, लोकप्रतिनिधींचा अंकुश नाही  आणि प्रशासनाचा ढासळत असलेला कारभार यामुळे बिकट झाली आहे. आता तर पीएमपीची तूट दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे आणि पिंपरी – चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांना सुमारे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये तुटीपोटी भुर्दंड पडत आहे. परिणामी विकासकामांवर परिणाम होत आहे. विकासकामे कमी करून पीएमपीला तुटीपोटी मोठी रक्कम यापुढे देता येणार नाही. कारण ही सेवा आता स्वतंत्र प्राधिकरणामार्फत चालविण्याची वेळ आली आहे. जेणेकरून या यंत्रणेवर मुख्यसभेचा अंकुश राहील यादृष्टीने आता दोन्ही महानगरपालिकेसाठी स्वतंत्र प्राधिकरण केल्यास ते उपयुक्त ठरेल.
तत्कालीन पीएमटीवेळी पुणे महानगरपालिकेला एक रुपयाही द्यावा लागत नव्हता. त्यावेळी जी प्रवाशांची संख्या होती, तीच संख्या आजमितीस आहे.याकडे लक्ष वेधून आबा बागुल म्हणाले कि ,  स्वतंत्र कंपनी करून काही प्रगती झालेली नाही उलट प्रवाशांना आता मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी पीएमटीची सेवा सक्षम होती. त्यावेळी एक रुपयाही महापालिकेला पीएमटीसाठी द्यावा लागत नव्हता. केवळ बोनस पोटी एक कोटी रुपये द्यावे लागत होते. मात्र आता स्वतंत्र कंपनी होऊनही पीएमपीला कोट्यवधी रुपये अदा करावे लागत आहेत. वास्तविक स्वतंत्र कंपनीला कायद्यानुसार अशी रक्कम देता येत नाही. त्यात  सध्या महापालिकेचे  उत्पनाचे साधन पाहता  यापुढे पीएमपीला तुटीपोटी रक्कम देणे शक्य होणार नाही. तसेच या सार्वजनिक वाहतूक असलेल्या बससेवेवर मुख्यसभेमार्फत अंकुश राहण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची शिफारस मुख्यसभेद्वारे राज्यशासनाकडे करण्यात येणार आहे. त्यानुसार ठराव मुख्यसभेसमोर सादर करण्यात आला आहे. असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले.

‘२१ व्या शतकात भारत ‘विश्‍वगुरु’ होणार!’ या विषयावर ३ दिवसीय ज्ञान-जागर

0

पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणेतर्फे भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकांनंद यांच्या १५६ व्या जयंतीचे औचित्य साधून गुरुवार, दि. १० ते शनिवार दि. १२ जानेवारी २०१९ या कालावधीत ‘२१ व्या शतकात भारत ‘विश्‍वगुरू’ होणार!’ या स्वामीजींच्या सन १८९७ च्या वचनांवर आधारित, ‘ज्ञान जागर’ हा आगळा-वेगळा कार्यक्रम, विश्‍वराजबाग, लोणीकाळभोर, पुणे येथील जगातील सर्वात मोठा घुमट असलेल्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशांती सभागृह आणि विश्‍व शांती ग्रंथालयात आयोजित करण्यात आला आहे.
भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी १८९७ साली असे भाकीत केले होते, की ‘२१ व्या शतकात माझी भारतमाता जगात ‘ज्ञानाचे दालन’ म्हणून उदयास येईल व विश्‍वगुरु म्हणून तिची जगासमोर ओळख निर्माण होईल’. त्यांच्या या वचनावर आधारित एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठातर्फे ‘२१ व्या शतकात भारत ‘विश्‍वगुरु’ होणार! या विषयावर तीन दिवसीय ‘ज्ञानजागरा’चे आयोजन केले आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीचे व परंपरेचे वर्णन करताना एक गोष्ट प्रामुख्याने ध्यानी येते, ती म्हणजे हजारो वर्षापासून या आपल्या मातृभूमीमध्ये मुख्यत्वे दोन गोष्टींची पूजा केली गेली. त्यातील पहिली ‘ज्ञानाची पूजा’ आणि दुसरी ‘सत्याची पूजा’. संपूर्ण विश्‍वामध्ये ज्ञान हेच एकमेव सत्य! या विश्‍वाचे एक अंतिम चैतन्यस्वरूप हे सुध्दा ज्ञानस्वरूपच होय! संत शिरोमणी श्री ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या खालील उक्तीनुसार याची प्रचिती येते..

ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्व संवेद्या । आत्मरूपा ॥

या पार्श्‍वभूमीवर एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाने पहिल्यांदाच विश्‍वात्मक चैतन्यस्वरूप ‘ज्ञान’ या विषयावर नामवंत वक्त्यांची व्याख्याने आणि कीर्तन / प्रवचने आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये गुरुवार, दि. १० जानेवारी २०१९ रोजी दु. ३.३० वा. संतवृत्तीचे थोर शास्त्रज्ञ, परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या शुभहस्ते या ज्ञानजागरचे उद्घाटन होणार असून डॉ. विजय भटकर आणि ‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाचा ओवीबध्द इंग्रजी अनुवार करणार्‍या स्वामी राधिकानंद सरस्वती यांचे ‘ज्ञान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर संध्या. ५.३० वा. सुप्रसिद्ध गायक डॉ. महेश काळे हे ज्ञानस्वरूप भक्ती-संगीत कीर्तन सादर करतील.

शुक्रवार, दि. ११ जानेवारी २०१९ रोजी हिमालयस्थित गुरू श्री. योगी अमरनाथजी व विज्ञानवादी वैदिक अभ्यासक श्री. प्रविण राजपाल यांची ‘ज्ञान’ विषयावर व्याख्यानं होणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.१५ वा. औसा संस्थानचे प्रमुख ह.भ.प. श्री. गुरूबाबा महाराज औसेकर यांचे भजन/कीर्तन होणार आहे.

शनिवार, दि. १२ जानेवारी २०१९ रोजी, भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, संतस्वरूप व ज्ञानस्वरूप विभूती उडुपी, कर्नाटक येथील पेजावर मठाचे ज्ञानमठाधिपती प.पू. आदरणीय श्री विश्‍वेशतीर्थ स्वामीजींना शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल आणि विश्‍वशांती व विश्‍वकल्याणाच्या कार्याबद्दल, ‘तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर माऊली ज्ञान-ब्रह्म ऋषी’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार डॉ. विजय पां. भटकर आणि शांतिब्रह्म ह.भ.प. श्री. मारूती महाराज कुर्‍हेकर यांच्या शुभहस्ते आदरपूर्वक अर्पण करण्यात येईल.

अशी माहिती विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड आणि जगप्रसिद्ध संगणकतज्ञ डॉ. विजय पां. भटकर यांनी दिली.

पत्रकार रोहिदास विठ्ठल डोंगरे यांच्या निधनाने जुन्नर तालुक्यात हळहळ

0
ओतुर –
  एकीकडे सर्वत्र पत्रकार दिन साजरा होत असताना दुसरीकडे मात्र पत्रकार दिनाच्या दिवशीच  पत्रकार रोहिदास विठ्ठल
डोंगरे यांचे ह्रुदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाल्याची घटना घडल्याने जुन्नर तालुक्यातून मात्र हळहळ व्यक्त होत आहे .
सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो पत्रकार दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच  जुन्नर तालुक्यातील साळवाडी गावचे पत्रकार रोहिदास विठ्ठल  डोंगरे यांच्यावर काळाने घाला घातला  ते आपल्या काही मित्रांसमवेत आणे येथे सुरु असलेल्या रंगदास स्वामी उस्तवाच्या बातमीचे व्रुत्त संकलन करण्यासाठी गेले होते त्यानंतर सायंकाळी त्यांच्या छातीत दुखु लागल्याने त्यांना उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्यांचे निधन झाले लहाणपणीच वडीलांचे छत्र हरपल्यामुळे त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी होती ते फॅब्रीकेशनचा व्यवसाय सांभाळून पत्रकारिता करत होते  ते सध्या दैनिक प्रभातमधुन बातमीदार म्हणून काम करत होते त्यांनी काही काळ दैनिक पुढारीमध्येही बातमीदार म्हणून काम केले आहे पत्रकार दिनाच्या दिवशीच त्यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे एक शांत संयमी आणि मनमिळाऊ मित्र हरपल्याची भावना पत्रकार मित्रांमधुन व्यक्त केली जात आहे त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी तांबेवाडी येथील वैकुंठभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पत्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती त्यांच्यामागे आई पत्नी व चार मुली असा परीवार आहे

संभाजी ब्रिगेड हि आता लोकसभेच्या रणांगणात …

पुणे – महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेड आगामी पुणे लोकसभा निवडणूक तसेच विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी पुण्यात लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक लढवण्या संदर्भातली घोषणा करण्यात आली. संभाजी ब्रिगेडकडून लोकसभेसाठी 40 जागांवर तर विधानसभेसाठी 100 जागांवर उमेदवार उभे केले जाणार आहेत.
या वेळी संभाजी ब्रिगेडकडून मोदी सरकारवर टीका करण्यात आली. शेतकरी, कष्टकरी, श्रमिक, सुशिक्षित बेरोजगार तरुण, छोटे-मोठे लघु-मध्यम व्यापारी तसेच सामान्य नागरिकांना उध्वस्त करून संपविण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहे. राज्यातही देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सर्वसामान्यांच्या जीवावर उठले आहे. या सरकारला धडा शिकवण्यासाठी संभाजी ब्रिगेडने कंबर कसली असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी सभागृहात भांडायला कोणीही उरले नाही. अशा परिस्थितीत संभाजी ब्रिगेड सामान्यांचा आवाज म्हणून सभागृहात जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. राज्यासह देशात प्रस्थापित आणि जातीय विद्वेषामुळे राजकारणात तरुण चेहऱ्यांना संधी द्यायला कोणी तयार नाहीत. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पुणे लोकसभा निवडणूक लढवणार असून राज्यातही अशाच प्रकारे राजकारणात चांगले काम करून संभाजी ब्रिगेड आपली स्वतःची जागा निर्माण करणार असल्याचे यावेळी घोषित करण्यात आले. तसेच आगामी मनपा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही संभाजी ब्रिगेड उतरणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
शेतकरी प्रश्न, दारूबंदीचा प्रश्न, झोपडपट्टी विरहित शहर, पाणीप्रश्न, चांगले रस्ते, धर्मनिरपेक्ष समाज यांसारख्या मुलभूत प्रश्नांवर संभाजी ब्रिगेड भर देणार असून विधानसभेच्या तसेच लोकसभेच्या जागेवर ५० टक्के महिलांना संधी देण्यात येणार आहे. शंभर टक्के राजकारण आणि शंभर टक्के समाजकारण हे ब्रीद घेऊनच संभाजी ब्रिगेड शेतकरी तरुणांच्या मुलभूत प्रश्नांवर रणांगणात उतरणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. संभाजी ब्रिगेडकडे राज्यभरामध्ये सक्षम पर्याय उपलब्ध असून नवीन मतदारांचा हक्काचा आवाज म्हणून संभाजी ब्रिगेडकडे अनेकांचा ओढा असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. 

भाजपने लोकसभेसाठी महाराष्ट्राची जबाबदारी सोपविली या 6 नेत्यांवर …

0

मुंबई. भाजपाने लोकसभा निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आणि वेगवेगळ्या मुख्य कार्यांसाठी महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या जवाबदायाही निश्चित झाल्या आहेत. ह्या जवाबदायांमध्ये महाराष्ट्रातील ज्या फक्त 6 नेत्यांना जवाबदाया सोपवण्यात आल्या आहेत, त्यांमध्येनितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, नारायण राणे, मंगल प्रभात लोढा आणि विनय सहस्त्रबुद्धे आहेत. भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने लोकसभा निवडणूक अभियानाच्या विविध समित्यांची ही सूची जाहीर केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या जवाबदायांसाठी भाजपाने अनेक समित्या बनवल्या आहेत. त्यात पक्षाचे संकल्पपत्र समिती (निवडणूक घोषणापत्र समिती) मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे को ह्यांना मुख्य स्थान मिळाले आहे. राणेंच्या शिवाय रेल्वे मंत्री पीयूष गोयलसुद्धा संकल्पपत्र समितीमध्ये आहेत. केंद्रीय रस्ता वहन मंत्री नितीन गडकरींना सामाजिक व स्वयंसेवी संघटना संपर्क समितीमध्ये तर राज्यसभा सांसद विनय सहस्त्रबुद्धेंना साहित्य निर्माण समितीमध्ये घेण्यात आले आहे. त्याशिवाय केंद्रीय मनुष्यबळ विकास प्रकाश जावड़ेकर ह्यांना प्रबुद्ध संमेलन समितीमध्ये घेतले गेले आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ आमदार मंगल प्रभात लोढ़ा असे एकमेव नेते आहेत ज्यांन दोन समित्यांमध्ये स्थान दिले गेले आहे. लोढ़ा ह्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये प्रवास व विमान समिती तसेच लाभार्थी संपर्क समितीमध्ये स्थान मिळाले आहे. ह्या सूचीत माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचे नाव भुवया उंचावणारे आहे. ते भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले सांसद आहेत.

आपल्या निवडणूक अभियान टीममध्ये राणे, गडकरी, गोयल, जावड़ेकर, सहस्त्रबुद्धे आणि लोढ़ा अशांना लोकसभा निवडणुकीचे व्यवस्थापन, प्रचार व संचालनमध्ये दिग्गज असलेल्या नेत्यांना स्थान देऊन भाजपा अध्यक्ष अमित शाह ह्यांनी ह्यावेळी लोकसभा निवडणूक किती भक्कम प्रकारे लढवली जाईल, हेच दर्शवले आहे.

आयुक्त साहेब , वेळीच शहाणे व्हा -हिटलरगिरी सोडा -हेल्मेटसक्तीवरून पुण्यात तणावाची चिन्हे

पुणे- पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांनी पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सामान्य पुणेकरांच्या मनात दहशत पसरविण्याचे कृत्य चालविले असून कायद्याच्या नावाखाली शहरात अवैध धंदे वाढत असताना त्यंच्यावर कारवाई करण्याचे सोडून हेल्मेट सक्ती च्या नावाखाली पुणेकरांची लुट सुरु ठेवली आहे .या विरोधात आंदोलने करणाऱ्या विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी गुन्हे दाखल करणे, त्यांना आंदोलनाला परवानगी न देणे एवढेच काय तर त्यांचे अर्ज देखील न स्वीकारणे अशा पद्धतीने आंदोलकांना दुर्लक्षित वागणूक एकीकडे द्यायची आणि दुसरीकडे काही माध्यमे हाताशी धरून पुणेकरांवर जोरदार  कारवाई सुरु ठेवायची असे धोरण राबविताना दिसत आहेत . या पार्श्वभूमीवर आपला दाबला जाणारा आवाज आता उठवायचा कसा ? या प्रश्नाने हेल्मेट विरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांना भेडसावले जात असताना अखेरीस त्यांना शिवसेनेच्या महादेव बाबर यांनी वैकुंठ स्मशानभूमीत हेल्मेटचा दहावा असे आंदोलन केले त्यात कृती समितीचे सर्व कार्यकर्ते नेते सहभागी झाले .यावेळी मायमराठी शी बोलताना या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांच्याबद्दल संताप व्यक्त केला ..आयुक्त ,उपायुक्त आणि आंदोलक यांच्यात जणू आता वानवा पेटणार याची चिन्हे यावेळी जाणवली ….पहा यावेळी नेमके हेल्मेट विरोधी कृती समितीचे अंकुश काकडे आणि संदीप खर्डेकर यांनी काय म्हटले आहे ….

ध्येयाने वेडे होऊन अभ्यास करा- प्रा चाटे

0

चाटे शिक्षण समूह पुणे विभागाचे वतीने शैक्षणिक मार्गदर्शन

पुणे-
वाढत्या जीवघेन्या स्पर्धेच्या युगात तुम्हाला काय व्हायचे आहे हे ठरवा व तशी वाटचाल करा. पुढचा टप्प्यावर तुम्हाला काय करायचय याची अंतिम क्षणापर्यंत पाहु नका, दहावीची बोर्ड परीक्षा तुमच्या करियरची सुरवात आसते. त्याचा कोणताही दबाव अथवा प्रेशर घेऊ नका. वेळेचे योग्य प्रकारे नियोजन करा,  पेपर लिहीत असताना देखील कॉन्फिडन्स असला पाहिजे.स्पर्धा परीक्षा देश पातळीवरची 17 लाख विद्यार्थ्याबरोबर असल्याने तयारी तेवढी चांगली असेल तर रिझल्ट तसाच मिळेल.सखोल ज्ञानाने शन्यातून विश्व निर्माण होते. वारंवार अभ्यासक्रम बदली होत असल्याने वेळ खडतर आहे, त्यासाठी आत्मविश्वास वाढवला पाहिजे. पालकांनी विद्यार्थ्याची मानसिकता बदलणे गरजेचा असून मुलांना जबाबदारी ची जाणीव करून द्या. विद्यार्थ्यांनी देखील पालकांच्या स्वप्नाचा चकनाचूर करू नका, त्याची मान अभिमानाने उंच होईल असे करा, दशा बदलण्यासाठी दिशा बदला. करिअर घडवण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत, प्लानिंग कराच त्याच बरोबर सोशल मीडिया आणि मोबाईल व टीव्हीच्या पासून दूर रहा. पुढील अभ्यासावर परिणाम होत असल्याने झालेल्याची निरर्थक चर्चा करू नका. पूर्वी पासून ध्येय व करिअर ठरवून उत्तुंग यशाचा पाठलाग करण्याचे आवाहन चाटे शिक्षण समूहाचे सचालक प्रा फुलचंद चाटे यांनी केले.
ते काल यश लॉन्स येथील दहावी बोर्ड परीक्षा व स्पर्धा परिक्षा करियर मार्गदर्शन शिबीरामध्ये बोलत होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे चाटे शिक्षण समूहाचे अध्यक्ष  प्रा. गोपीचंदजी चाटे, प्रा विजय बोबडे, प्रा भारत खराटे, प्रा. रमेश बनकर प्रा.बापूसाहेब काटकर, प्राचार्य समर जामदार, यांच्यासह हजारोच्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय शिक्षण घेत असलेला सौरभ निंबाळकर तसेच आय आय टी क्षेत्रात पी एच डी करणारा मंगेश शेंडकर व विद्यार्थीनी आदिती शेवते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा शुभारंभ गायत्री कुलकर्णीच्या गणेश वंदनेने करण्यात आली.
प्रा गोपीचंद चाटे यांनी अध्यक्षीय भाषणात खुमासदार शैलीत विद्यार्थी व पालकांना अवाहन करताना यशाच्या शिखरावर जाण्यासाठी सर्व वेळ चागला असतो, विद्यार्थ्याणी दबावाखाली नको मात्र आस्था व कष्ठाशिवाय पर्याय नाही. शॉर्टकटचे यश ज्यास्तवेळ टिकत नाही. मार्ग काटेदार आहे,  विद्यार्थ्यांना बंधनात राहायला आवडत नसल्याने त्यांना नजरेच्या आवाक्यात ठेवत त्यांच्या सोबत संवाद घडवा, टेक्नॉलॉजीचे दुष्परिणाम ओळखून बिघडण्या इतपत अडकू नका, जगण्यासाठी जेवढी धडपड करता तेवढी यश मिळवण्यासाठी करावेत. चाटे शिक्षण समूहाची ख्याती पाया मजबूत करून उच्च पदापर्यंत पोहचवण्याची असल्याने हजारो संख्येने विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर व वरिष्ठ पातळीवर आहेत. दहावीची परीक्षा केवळ अभ्यास नसून करियरसाठी आहे व ही संधी सर्वांसाठी उपलब्ध असून तुमच्यातील उर्जेला योग्य दिशा देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समर जामदार यांनी केले.
तसेच 30 डिसेंबर रोजी एन्टरन्स टेस्ट घेतली त्याचा 6 जानेवारी रोजी निकाल लागला, या परीक्षेतील दहावीची परीक्षा, अभ्यासाच्या वेळेचे गमक, पेपर सोडवताना ध्यान द्यायच्या बाबी व उत्तर पत्रिका सोडवण्याचे गमक याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सातारा रस्ता विभागाकडील विद्यार्थ्यांना मार्केट यार्ड येथील उत्सव हॉटेलच्या प्रशस्त हॉलमध्ये  तर वारजे भागातील विद्यार्थ्यांना वारजे येथे पार पडले. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.