पुणे : एकविसाव्या शतकात तंत्रज्ञान, फेसबुक, व्हॉट्सऍप या सोशल माध्यमांनी एकमेकांना जवळ आणले आहे. मात्र, या सोशल साईट्सवर व्यग्र राहण्याच्या नादात आपापसांतील प्रतिबद्धता झपाट्याने कमी झाली आहे. नातेसंबंध जपण्यापेक्षा सोशल मीडियावर पडीक राहण्यात त्यांचा अधिक वेळ जात आहे. त्यातूनच स्वमग्नतेकडे आणि नैराश्य येण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. सध्याच्या ‘टेक्नोसॅव्ही’ सवयीचा लाभ घेत लोकांना एकमेकांत गुंतवण्याचा प्रयत्न पुण्यातील ‘एंगेजमिन्ट्स’ या ऑनलाईन व्यासपीठाकडून केले जात आहेत, अशी माहिती ‘एंगेजमिन्ट्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक सचिन पारेख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. प्रसंगी मुख्य उत्पादन अधिकारी सतीश बोरा, सरव्यवस्थापक आरती साठे उपस्थित होते.
कोणत्याही संस्थेच्या कार्यक्षमतेत व्यवस्थापन, कर्मचारी, सहकारी, ग्राहक यांच्यातील नाते महत्वपूर्ण असते. एकमेकांना जोडून ठेवण्यासाठी पारंपरिक उपक्रम आजच्या डिजिटल युगात पुरेसे नाहीत. त्यामुळे डिजिटल आणि पारंपरिक याचा मेळ घालत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा प्रयत्न ‘एंगेजमिन्ट्स’ने हाती घेतला आहे. संस्थेतील वातावरण खेळीमेळीचे आणि संवादाचे राहावे, यासाठी एंगेजमिन्ट्सकडून संशोधनाअंती ‘गेमिफिकेशन’ हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. संस्थेअंतर्गत सहकाऱ्यांची चांगली टीम राहण्यासाठी ‘गेमिफिकेशन’ उपयुक्त ठरणार आहे, असे पारेख यांनी नमूद केले.
या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून त्यांना येणाऱ्या अडचणी आणि ताण समजून घेऊन ‘एंगेजमिन्ट्स’ तयार करण्यात आले आहे. कर्मचारी कामाच्या वेळेत काही मिनिटांसाठी एंगेजमिन्ट्सवर भेट देऊन आनंदी आणि सकारात्मक संवाद साधून आल्हाददायी वातावरण राहील व कामाचा वेळही वाया जाणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. यामागे गेमिंग किंवा सट्टा किंवा बाष्कळ मनोरंजन एवढाच उद्देश नाही, तर डिजिटल प्लॅटफॉर्म वापरून सकारात्मक दृष्टीकोन व प्रतिबद्धता कायम राखण्याचा आहे.
एचआर वर्गासाठी हे उपयुक्त असे ऍप्लिकेशन आहे. www.EngageMints.com/epl यावर जाऊन एचआर विनाशुल्क नोंदणी करू शकतात आणि त्याचा अनुभव घेऊ शकतात. तसेच बक्षीसे जिंकू शकतात. अनेक एचआर व ग्राहकांनी याचा अनुभव घेतला असून, हे अतिशय नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त असे व्यासपीठ असल्याचे म्हटले आहे. उत्पादन क्षमता वाढण्यासह कर्मचारी, ग्राहक, डीलर्स व सहकारी यांच्याप्रती प्रामाणिकता वाढण्यातही महत्वपूर्ण ठरणार आहे. हे व्यासपीठ डिजिटल असल्याने कंपन्याना आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘एंगेजमेंट प्रोग्रॅम’ घेताना जागा आणि इतर गोष्टींचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे अतिशय स्वस्त आणि मस्त अशा या गेमिफिकेशनचा आपण लाभ घ्यायला हवा, असे सचिन पारेख यांनी म्हटले आहे.
विचारांना चालना देणारे विविध खेळ
या उपक्रमांतर्गत विविध गोष्टी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये क्रिकेट, फुटबॉल यांसारखे खेळ, प्रश्नमंजुषा, विचार करायला लावणारे इतर ऍक्टिव्हिटीजचा समावेश आहे. शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गोष्टींचाही यात समावेश आहे. त्यावर खेळत राहण्यापेक्षा विचारांना चालना देण्यात, तसेच तणावविरहित काम करण्यासाठीही या गोष्टी उपयुक्त ठरणार आहेत. हे केवळ मनोरंजनासाठी नसून संस्थेशी कटिबद्धता जोपासण्यासाठी आणि टीम बिल्डिंग, ब्रॅंडिंगसाठीही महत्वाचे ठरणार आहे.