Home Blog Page 3015

‘सारे तुझ्याच साठी’ मध्ये साजरी होणार श्रुती आणि कार्तिकच्या लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत

0

सोनी मराठीवरील ‘सारे तुझ्याच साठी’ मालिकेला प्रेक्षकांनी पहिल्या एपिसोडपासून ते आताच्या
एपिसोडपर्यंत भरभरुन प्रेम दिलं आहे. या मालिकेतील श्रुती आणि कार्तिकची जोडी, त्यांचा मैत्री ते
लग्नापर्यंतचा प्रवास, दिवसेंदिवस त्यांचे एकमेकांवरचे वाढणारे प्रेम, विश्वास, कडू-गोड आठवणी,
अप्स अँड डाऊन परिस्थितीत पण एकमेकांची असणारी सोबत या सर्व गोष्टींचा साक्षीदार
बनलेल्या प्रेक्षकांनी या मालिकेला नेहमीच पसंती दर्शवली आहे. महाराष्ट्राने श्रुती आणि
कार्तिकच्या लग्नसोहळ्याचा खास आनंद घेतला. लग्नानंतर श्रुती आणि कार्तिकची जुळलेली
केमिस्ट्री प्रेक्षकांची या मालिकेप्रती उत्सुकता वाढवत होती. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे
मकर संक्रांत. या सणाच्या निमित्ताने ‘सारे तुझ्याच साठी’ मध्ये काय पाहायला मिळणार याची
आतुरता प्रेक्षकांना नक्कीच असणार.


मकर संक्रांत म्हटंलं की पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे तीळगुळाचे लाडू. ‘तीळगूळ घ्या गोड
गोड बोला’ हे प्रत्येकजण तीळगूळ देताना बोलतो… आता या सणाच्या निमित्ताने ‘सारे तुझ्याच
साठी’ च्या कुटुंबातील गोडवा आणि प्रेम अजून वाढणार. तीळगुळाची तयारी तर जोरात सुरु
झालीच आहे. तसेच या वर्षाची मकर संक्रात ही श्रुती आणि कार्तिकच्या लग्नानंतरची पहिली
मकर संक्रांत आहे. या सणाला अजून प्रेमळ बनवण्यासाठी कार्तिक श्रुतीला ‘काळ्या रंगाची साडी’
गिफ्ट म्हणून देणार आहे. हलव्याच्या दागिन्याने नटलेली आणि काळ्या रंगाची साडी नेसलेली
आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन श्रुतीला पाहिल्यावर कार्तिक तर पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडेलच,
पण महाराष्ट्रालाही या जोडीवर आणि मालिकेवर पुन्हा एकदा प्रेम करण्यासाठी आणखी एक
कारण नक्कीच मिळेल.

कंगना राणावतने सांगितली पॅशन टू पे चेक ची यशोगाथा

0

पुणे-दि  सिग्नेचर मास्टरक्लास या  सिग्नेचर पॅकेज्ड ड्र‍िंकिंग वॉटर प्रायोजित कार्यक्रमाची सुरूवात पुण्यात अगदी आनंदी आणि उत्साहात करण्यात आली,  या वेळी आपली यशोगाथा व आपल्या संघर्षपूर्ण जीवना विषयी व  तिच्या चित्रपट सृष्‍टीतील  प्रवासाची  कहाणी राष्‍ट्रीय पुरस्कार विजेती कंगना राणावत  हिनें आपल्या चाहत्यांसमोर उलगडून दाखवली.  सिग्नेचर मास्टरक्लास हा एक अनोखा असा मंच असून या मंचाच्या माध्यमातून पुण्यातील दि वेस्टन मध्ये लोकांना आपल्या आवडीच्या मार्गाने कशा प्रकारे यश  मिळवले याची माहिती देण्यात येते.

 एका क्रांतिकारी मुलीपासून सुरू झालेला हा प्रवास करता करता चित्रपटांची तसेच  पात्रांची  निवड करतांना  सुध्दा क्रांतिकारी विचार करून स्टारडम प्राप्त करणारी कंगना राणावत हीने  आपली पॅशन टू पे चेक ची यशोगाथा सांगितली. तीनें आपल्या पौगंडावस्थेत किती कठीण प्रसंगातून मार्ग काढले आणि त्यानंतर कशा प्रकारे जर आपल्याकडे एखादी गोष्‍ट  मिळवण्याची  जिद्दअसेल तर त्यांतून नशीबावर हवाला न ठेवता यशस्वी होता येते,  हे सांगितले.

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कर्तृत्वान युवक आणि युवतींचा सन्मान

0

पुणे :स्वामी विवेकानंदाच्या जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान सात युवक आणि युवतींना गौरविण्यात आले. स्वप्नील दुधाणे (कोथरूड विधानसभा अध्यक्ष) आणि सनी मानकर (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग, पश्चिम विभाग) यांच्या हस्ते पुरस्कारार्थींचा सन्मान झाला.या उपक्रमाचे २०१८-१९ हे प्रथम वर्ष होते. हा उपक्रम आज शनिवारी, १२ जानेवारी रोजी सकाळी पुणे फिल्म कास्टिंग कार्यालय, सातारा रोड येथे संपन्न झाला.या उपक्रमांतर्गत रफिक जमादार, किरणकुमार कोरे, विपुल साळुंखे,  प्रेरणा चव्हाण, कोमल बन्सल आणि आसमी जैन या सात जणांना मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

रफिक जमादार हे ‘एडीजीपीआय इंडियन आर्मी अँड नॅशनल डिफेन्स’मध्ये कार्यरत असून, राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधील तरुण प्रशिक्षणार्थी आहेत. किरणकुमार कोरे याने श्रीलंकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत भारताचं नेतृत्व करून लावणीसाठी सुवर्णपदक मिळवले आहे. तसेच “छत्रपती शासन” या चित्रपटात लावणी सादर करून किरण कोरे हा चित्रपटात लावणी करणारा पहिला मुलगा ठरला. विपुल साळुंखे कलाकार, मॉडेल आणि चित्रपट निर्माता आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेद्वारे ते प्रचलित आहेत. प्रेरणा चव्हाण या सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असून, अत्यंत कमी वयात त्यांनी अनेक पुरस्कार पटकाविले आहेत. डॉ. कोमल बन्सल यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष काम केले आहे. प्राणीमित्र आसमी जैन यांनी एका वर्षात तब्बल शंभर भटक्या वन्यजीवांना जीवनदान दिले आहे.

या सर्वांच्या अत्यंत कमी कालावधीत आदर्श कामगिरी केल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे. या वर्षीपासून दरवर्षी युवादिनी हा सन्मान उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक सनी मानकर यांनी या प्रसंगी दिली.

कार्यक्रमाचे आयोजन सनी मानकर यांनी केले तर नियोजन महेश शिर्के यांचे होते. याप्रसंगी मिलिंद वालवडकर, प्रमोद शिंदे, स्वप्नील खवले, शुभम माताळे, आकाश मोहकर, सौरभ दसपुते, ऋषिकेश कडू, अमर सहाने, श्रीकांत बालघारे, शुभम झेंडे, व्यंकटेश भोंडवे, प्रणव बहिरट, रोहित पळसकर, शुभम मारणे हे उपस्थित होते.

माहेश्वरी समाजाच्या धनुर्मास उत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
मकरसंक्रातीला १५ जानेवारी रोजी उत्सवाची सांगता 
पुणे : माहेश्वरी समाजाच्या वतीने आयोजित धनुर्मास उत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. उत्सवास दिनांक १७ डिसेंबरपासून प्रारंभ झाला असून, मकरसंक्रांत दिनी १५ जानेवारी रोजी सांगता होणार आहे, अशी माहिती माहेश्वरी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भगीरथ राठी यांनी पत्रकाद्वारे दिली.
महिनाभर सुरु असलेला हा उत्सव श्री बालाजी मंदिर ट्रस्ट, नारायण पेठ येथे होत आहे. यामध्ये माहेश्वरी समाजातील पुरुष, महिला भक्तगण, सभासद, मान्यवर मोठ्या संख्येने सहभाग घेत आहेत. उत्सवाच्या ३० व्या दिवशी मकरसंक्रांतीला रंगनाथ देव आणि श्रीगोंदबाजी यांच्या विवाह महोत्सवाने उत्सवाची सांगता होते.
गेले महिनाभर सुरु असलेल्या या उत्सवात प्रभात फेरी, अनुष्ठान, भजन, कीर्तन याचा समावेश आहे. तुळशीपत्र, सुंठ, खीर (दूध, तांदूळ आणि साखर मिश्रित), खिचडी, फुलोरा आदी पदार्थांचे या मासात प्रसाद स्वरूपात सेवन करतात. गोदा, गीतावली, वेदपाठ, अर्चनावली अशा धार्मिक ग्रंथांचे पठण केले जाते.
या उत्सवाबाबत माहिती देताना राठी म्हणाले, ‘या उत्सवाला श्रीगोदंबाजी उत्सवाने देखील ओळखले जाते. या धनुर्मास उत्सवात रंगनाथ देव आणि श्रीगोदंबाजी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो त्या महिन्याला ‘धनुर्मास’ म्हणतात. माहेश्वरी समाजाच्या सर्व मठात, मंदिरात श्रद्धेने हा उत्सव साजरा होतो.’

कोट्यवधींची फसवणूक- पुण्यातील नामवंत बिल्डरला अटक

0

पुणे-
ग्राहकांच्या संमतीशिवाय प्लॅनमध्ये बदल करून तसेच पुणे महानगरपालिकेचा मंजुर नसलेला खोटा प्लॅन लावुन तो खरा असल्याचे दाखवुन खरेदीखताच्या दस्तमध्ये वापर करून कोटयावधी रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी शहरातील एका बड्या बिल्डरला अटक केली आहे. हडपसर पोलिसांच्या या कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मोठा मासा पोलिसांच्या गळाला लागल्याने बांधकाम व्यवसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे.

विश्‍वजित सुभाष झंवर (49, रा. फ्लॅट नंबर 1201, मार्कल औरम लेन नंबर 7, कोरेगाव पार्क) असे अटक करण्यात आलेल्या बिल्डरचे नाव आहे. त्याच्यासह कार्तिक धनशेखरन (36, रा. विमाननगर), संजय जस्सुभाई देसाई आणि प्रमोद तुकाराम मगर यांच्याविरूध्द भादंवि 420, 406, 409, 465, 467, 478, 471, 474, 120 (ब), 34, मोफा कायदा कलम 3,4,5,8 आणि 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश मोहनदास मनसुखानी (40, रा. दुबई) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून दुसरी फिर्याद मुकेश यांचे भाऊ नवीन मोहनदास मनसुखानी (40, रा. दुबई) यांनी दिली आहे.

फिर्यादी मनसुखानी यांनी विश्‍वजित झंवर, कार्तिक धनशेखरन, संजय देसाई, प्रमोद मगर आणि इतरांच्या मार्वल कायरा बांधकाम स्कीम स.नं. 134/2/1 व 2/2ए व 2बी/2 व 3 ए व 3 बी व 4 मगरटपट्टा (हडपसर) येथे बी विंग मधील 12 व्या मजल्यावरील 1201 डुप्लेक्स व सर्वात मोठा फ्लॅट व त्याच बरोबर 12 व्या मजल्यावर स्काय रेस्टॉरंट व 16 व्या मजल्यावर जिम अशी सुविधा असलेला व त्याचे एकुण क्षेत्रफळ 644.74 चौरस मिटर बिल्टअप एरिया 79.89 चौरस मिटर व ओपन टेरेस व दोन कार पार्किंग असा असलेला फ्लॅट आणि इतर गोष्टी दि. 5 नोव्हेंबर 2014 रोजी 5 लाख रूपये आरटीजीएस व्दारे देवुन बुक केला होता. दि. 4 एप्रिल 2015 रोजी सदर फ्लॅटचे रजिस्टर खरेदीखत केले. दि. 30 जून 2917 रोजी नंबर फिर्यादी यांनी वेळावेळी अटक आरोपी विश्‍वजित झंवर व पाहिजे असलेल्या आरोपींना फोन व ई-मेल करून फ्लॅटच्या ताब्याबद्दल विचारणा केली. त्यावेळी त्यांनी फिर्यादी मनसुखानी यांना उडवाउडवीची उत्‍तरे दिली. त्यामुळे फिर्यादी यांना शंका आली. त्यांनी भारतात येवुन आरोपींच्या कार्यालयावर जावुन व मगरपट्टा येथील मारवल कायरा स्कीमच्या बांधकाम साईटवर जावुन खात्री केली असता त्यावेळी त्यांना फक्‍त दोन बिल्डींगचे अर्धवट आरसीसी बांधकाम झाल्याचे दिसले.

खरेदीखताप्रमाणे बांधकाम केले नसल्याचे दिसल्याने त्यांनी बिल्डर झंवर यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी झंवरने केवळ दोन बिल्डींगचे काम करणार असल्याचे सांगुन तिसर्‍या बिल्डींगचे काम करणार नसल्याचे सांगितले. आरोपींनी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय प्लॅनमध्ये बदल करून फिर्यादी व इतरांना फसविण्याचा कट रचला. फिर्यादी यांच्याकडून वेळावेळी 1 कोटी 82 लाख 46 हजार 180 रूपये घेवुन त्या पैशाचा दुसरीकडे वापर केला. फिर्यादीचे भाऊ नवीन मनसुखानी यांच्याकडून देखील 1 कोटी 85 लाख 58 हजार 986 रूपये घेतले. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल तांबे गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत. विश्‍वजित सुभाष झंवर (49, रा. फ्लॅट नंबर 1201, मार्कल औरम लेन नंबर 7, कोरेगाव पार्क) याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने बिल्डर झंवरला दि. 16 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

गुंतवणूकदारांनी संपर्क साधावा….
मारवल बिल्डरच्या मगरपट्टा येथील मारवल कायरा या सोसायटीत अनेक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे, या बिल्डरच्या स्कीममध्ये फसवणूक झाली असल्यास हडपसर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा व तक्रार द्यावी
सुनील तांबे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक – हडपसर पो.स्टेशन

दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात पुण्यातील मेजर शशी नायर यांना वीरमरण

0

पुणे – राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागातील रूपमती आणि पुख्खरणी येथे शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळ पेरुन ठेवलेल्या २ आयईडी (इम्प्रोवाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइस) बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात पुणे येथील मेजर शशीधरन नायर आणि एका जवानाला वीरमरण आले.
नियंत्रण रेषेजवळ गस्त घालणाऱ्या सैन्याच्या पथकाला लक्ष्य करण्यासाठीच दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला होता. मेजर शशीधरन पुण्यातील रहिवासी होते. त्यांची पत्नी तृप्ती नायर या पुण्यातील खडकवासला येथे राहतात. मेजर शशीधरन ३३ वर्षांचे होते. ते ११ वर्षांपासून सैन्यात कार्यरत होते. त्यांचे पार्थिव विमानाने पुण्यात येणार असल्याचे सैन्यातर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, राजौरी जिल्ह्य़ातील सुंदरबनी भागात नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एका भारवाहकालाही (पोर्टर) वीरमरण आले.

बाळासाहेब ठाकरे प्रभावशाली व्यंगचित्रकार पुरस्कार राजेंद्र सरग यांना प्रदान

0

पुणेबाळासाहेब ठाकरे प्रभावशाली व्यंगचित्रकार पुरस्कार राजेंद्र सरग यांना माजी आमदार मोहन जोशी यांच्‍या हस्‍ते प्रदान करण्‍यात आला. पुणे मीडिया वॉच, सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी एका व्‍यंगचित्रकाराला हा पुरस्‍कार देण्‍यात येत असतो. कार्यक्रमास मीडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर, ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गानला, मंजिरी धाडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्रविदया विभागाचे सहाय्यक प्राध्यापक संजय विष्णू तांबट, डॉ. भगवान यादव, मनजितसिंग विरदी, भीमराव पाटोळे, संगीता आठवले, प्रा. वाल्मिक जगताप, शिवानंद हूल्ल्याळकर, श्याम सहानी, फिरोज मुल्ला, विकास भांबुरे, दिलीप भिकुले, शंकर जोग , प्रशांत फुले, संतोष गायकवाड, नितीन बाल्की, भारती अंकलेल्लू आदी उपस्थित होते. राजेंद्र सरग सध्‍या पुण्‍याचे जिल्‍हा माहिती अधिकारी म्‍हणून कार्यरत आहेत. त्‍यांना यापूर्वी महाराष्‍ट्र शासनाचा यशवंतराव चव्‍हाण उत्‍कृष्‍ट लेखन पुरस्‍कार, देवर्षी नारद व्‍यंगचित्रकारिता पुरस्‍कार, आचार्य अत्रे व्‍यंगचित्रकार पुरस्‍कार यासह इतर पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत.

जगदीश कुंटे – अंतर्मुख करणारे स्‍वतंत्र शैलीचे व्‍यंगचित्रकार

0

बेळगावातील मराठी व्‍यंगचित्रकार म्‍हणून जगदीश कुंटे यांची ओळख आहे. चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण नसतांनाही महान व्‍यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे, आर.के. लक्ष्‍मण यांच्‍यासारख्‍या तसेच लहान-मोठ्या व्‍यंगचित्रकारांची चित्रे पहात, त्‍यांचा अभ्‍यास करुन स्‍वत:ची स्‍वतंत्र व्‍यंगचित्रशैली कुंटे यांनी निर्माण केली. व्यंगचित्रातील पात्रांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि चपखल शब्‍द योजना यामुळे त्‍यांची व्‍यंगचित्रे वाचकांना वेगळा आनंद देऊन जातात. त्यांचे निरीक्षण, आकलन, भाष्य-क्षमता, विसंगती शोधण्याची ‘व्यंगदृष्टी’ उच्‍च दर्जाची आहे.

जगदीश कुंटे यांचे वडील शिक्षक होते. त्‍यांना साहित्‍य, संगीत, नाट्य यांची आवड होती. त्‍यांच्‍या वडिलांनी तीन अंकी नाटकेही लिहीलेली होती. घरांतील साहित्यिक, सांस्‍कृतिक वातावरणाचा सकारात्‍मक परिणाम जगदीश कुंटे यांच्‍यावर झाला.

दहावीत असतांना जगदीश कुंटे यांनी स्‍नेहमंडळाच्‍या ग्रंथालयात ग्रंथपाल म्‍हणून काम सुरु केले. या कामामुळे आर्थिक फायदा आणि वाचनाचा फायदा त्‍यांना झाला. मार्मिक, रसरंग, किर्लोस्‍कर, स्‍त्री, मनोहर, मराठा, महाराष्‍ट्र टाइम्‍स, स्‍वराज्‍य अशा वृत्‍तपत्रे, नियतकालिकांमुळे त्‍यांचे वाचनविश्‍व समृध्‍द होत गेले. ग्रंथपाल म्‍हणून नोकरी आणि महाविद्यालयीन शिक्षण हे दोन्‍ही एकाचवेळी चालू होते. मार्मिकमधील बाळासाहेब ठाकरे यांची आणि महाराष्‍ट्र टाइम्‍समधील आर.के. लक्ष्‍मण यांची चित्रे पाहून आपणही व्‍यंगचित्रे रेखाटावी, असे त्‍यांना वाटले. प्राध्‍यापक वर्गात येण्‍यापूर्वी फळ्यावर ते आपली व्‍यंगचित्रकला सादर करायचे. प्राध्‍यापक आणि वर्गमित्रांचे त्‍यांना नेहमीच प्रोत्‍साहन मिळत होते. लेखक रॉय किणीकर हे कुंटे यांच्‍या घरी यायचे. त्‍यांनी चित्रे पाहून अधिक चांगली डेव्‍हलप कर, असा सल्‍ला दिला. नाटककार न.ग. कमतनूरकर आणि त्‍यांच्‍या पत्‍नी सरोजिनी कमतनूरकर यांचे त्‍यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

महाविद्यालयात असतांना जगदीश कुंटे यांनी रेखाटलेले पहिले व्यंगचित्र 1979 साली ‘मार्मिक’ मध्ये प्रसिध्द झाले.  त्यानंतर जत्रा, नवप्रभा, तरुणभारत, पुढारी, इंडियन एक्सप्रेस, जनतावाणी, न्‍यूजलिंक अशा अनेक नियतकालिकांतून असंख्य व्यंगचित्रे प्रसिध्द झाली. गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ बेळगाव तरुण भारतसाठी ‘रेशमी चिमटे’ या सदराखाली नियमितपणे व्‍यंगचित्रे काढत आहेत. या सदरातील निवडक व्‍यंगचित्रांचे ‘रेशमी चिमटे’ हे पुस्‍तक आणि ‘तरुण भारत’च्या ‘अक्षरयात्रा’ या रविवारच्‍या पुरवणीतील सामाजिक व्यंगचित्रांचे ‘अक्षरहास्य’ हे पुस्‍तक प्रसिध्द झाले आहे. या पुस्तकाला वाङमय चर्चा मंडळाचा विशेष पुरस्कार तसेच मधुसूदन गोखले विनोदी साहित्य पुरस्कार मिळाला आहे. कर्नाटकातील ‘जनतावाणी’ या कन्नड दैनिकातही त्‍यांची व्यंगचित्रे प्रसिध्द झाली आहेत. ‘व्यंगचित्रे- एक बोलकी कला’ या विषयावर ते प्रात्यक्षिकासह व्याख्यान देतात.

शिक्षक, सेल्समन आणि व्यवस्थापक अशा विविध भूमिका बजावत असतानाच व्यंगचित्रकाराची वठवलेली भूमिका सर्वात आवडीची असल्‍याचे ते प्रामाणिकपणे सांगतात. ब्रुक बॉण्‍ड कंपनीमध्‍ये ते सुमारे 24 वर्षे कार्यरत होते. तिथून स्‍वेच्‍छानिवृत्‍ती घेवून ते बेळगाव तरुण भारतमध्‍ये प्रशासकीय व्‍यवस्‍थापक व कार्टूनिस्‍ट या पदावर रुजू झाले.

बेळगाव तरुण भारतसाठी दैनंदिन व्‍यंगचित्रे रेखाटण्‍याच्‍या अनुभवाबाबत ते म्‍हणतात,  ‘वृत्तपत्रातील चित्रे ताज्या घडामोडींवर भाष्य करणारी असतात. त्यामुळे ती वाचकांना भावतात पण ती लवकरच कालबाह्यही ठरतात. रोजच्या रोज नवी कल्पना घेऊन व्यंगचित्र काढणं वाटतं तितकं सोपं नाही. कल्पना सुचेपर्यंत अस्वस्थ स्थिती असते आणि चित्र पूर्ण होताच दुसऱ्या दिवशीचा विचार डोक्यात  सुरु होतो. रोजच्या रोज आपल्यासमोर असंख्य विषय येतात पण त्यांची माती व्यंगचित्र तयार होण्यासाठी सुयोग्य असेलच असे नाही. यासाठी विषयाची निवड महत्‍त्‍वाची ठरते. विषय निश्चित झाल्यावर नेमक्या रेषात-भाषेत आपला विचार वाचकापर्यंत पोचवायचा असतो. व्‍यंगचित्र पाहिल्‍यानंतर वाचकांची मिळणारी प्रतिक्रिया आनंद व कष्‍टाचं चीज झाल्‍याचं समाधान देऊन जाते’.

जगदीश कुंटे यांच्‍या व्‍यंगचित्रांबाबत ज्‍येष्‍ठ पत्रकार कुमार केतकर म्‍हणतात, ‘व्यंगचित्र हे एक भाष्य असते. कित्येकदा एक हजार शब्दांच्या लेखात वा अग्रलेखात जे भाष्य चपखलपणे केले जाऊ शकत नाही, ते व्यंगचित्रातून साध्य होऊ शकते. म्हणजेच फक्त कुंचला कौशल्य असून चालत नाही तर दृष्टिकोनही हवा. तो दृष्टिकोन असा हवा की ज्यामुळे समाजातील विसंगतीकडे निर्देश करताना वाचक अंतर्मुखही व्हायला हवा. जगदीश कुंटेंच्या व्यंगचित्रांमधून नेमका तो परिणाम साधला जातो’.

जगदीश कुंटे यांच्‍या एका व्‍यंगचित्राविषयी ते लिहीतात. एक महिला आश्चर्य व उद्वेगाने  नळावर पाणी भरायला आलेल्या पुरुषाला उद्देशून म्हणते की, “तुमच्याकडे ड्रेनेजमिश्रित पाणी येतं?….. नशिबवान आहात. आमच्याकडे तेही येत नाही.” हे भाष्य राजकारणावरचे नाही वा कोणा राजकीय व्यक्तीवरचेही नाही. बेबंद वाढणाऱ्या लहान-मोठया शहरांमधील नागरी समस्या किती भीषण झाल्या आहेत, त्याकडे हे व्यंगचित्र लक्ष वेधते. म्हटले तर त्यात कारुण्य आहे, म्हणूनच हसतानाही आपण विषण्ण होतो.

अस्सल व्यंगचित्राला वा विनोदाला कारुण्याचा स्पर्श असतोच. चार्ली चॅप्लीन असो वा लॉरेल हार्डी, त्यांनी चित्रपट माध्यमातून मांडले ते समाजातील व्यंग होते किंवा व्यक्तिमत्वातील अंतर्विरोध होता वा परिस्थितीजन्य असहायता होती. परंतू चित्रपट या माध्यमातून मोठा पट घेता येतो. व्यंगचित्रकाराला ती सुविधा नसते. एकाच तडाख्यात स्थिती आणि भाष्य व्यक्त करायचे असते. कुंटे यांच्या व्यंगचित्रांचे हे वैशिष्टय आहे. ते असा विरोधाभास दाखवून देतात. परंतु अर्थातच त्यांची तितकीच खासियत आहे ती राजकीय व्यंगचित्रांची. त्यांच्या राजकीय व्यंगचित्रांमधून ते राजकारणातील ढोंगबाजीवर, पुढाऱ्यांच्या पोकळ वल्गनांवर, निर्लज्जपणावर आणि निगरगट्टपणावर प्रखर प्रकाशझोत टाकतात. कुंटेंच्या चित्रांमधील नेमके, खटयाळ, चलाख भाष्य हे त्यांचे सामर्थ्य आहे. त्यांचे निरीक्षण, आकलन, भाष्य-क्षमता आणि अर्थातच विसंगती शोधण्याची ‘व्यंगदृष्टी’ वरच्या दर्जाची आहे.

-राजेंद्र सरग

9423245456

फ्रान्स मित्र मंडळ’च्या अध्यक्षपदी डॉ. सतीश देसाई यांची निवड

0
पुणे :पुणे आणि महाराष्ट्राला  फ्रान्स देश ,तेथील जीवन ,संस्कृतीशी जोडणाऱ्या ‘फ्रान्स मित्र मंडळ ‘ या पुण्यातील ख्यातनाम संस्थेच्या अध्यक्षपदावर  पुण्यभूषण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांची  निवड झाली.
पुण्यात झालेल्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
2019 ते 2021 या कालावधीसाठी  नवीन पदाधिकारी  निवडण्यात आले आहेत . डॉ सतीश देसाई(अध्यक्ष ),निर्मला पुरंदरे (मानद अध्यक्ष) ,डॉ उल्हास जोशी (उपाध्यक्ष),भारती भिडे(प्रमुख कार्यवाह),माणिक कोतवाल(सहकार्यवाह),डॉ दीपक मांडे(खजिनदार)डॉ वीणा दीक्षित(सदस्य),मेघना साठे(सदस्य) यांची निवड करण्यात आली आहे .
निर्मलाताई पुरंदरे यांनी दीर्घ अनुभवातून मार्गदर्शन करावे, या साठी कार्यकारिणीने त्यांना तहहयात मानद अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली.
फ्रान्स मित्र मंडळाचा नुकताच पुण्यात सुवर्णमहोत्सव पार पडला. त्यात डॉ. देसाई यांच्या  गतिमान संयोजनाचा मोठा वाटा होता.
श्री. अच्युतराव आपटे व फादर द गलरी ह्यांनी मिळून १९६७ साली फ्रान्स मित्र मंडळाची स्थापना केली. त्याची वाढ निर्मलाताई पुरन्दरे , शंतनूराव किर्लोस्कर, प्रतापराव पवार यांच्या योगदानाने झाली.
 मंडळातर्फे दर वर्षी भारतातील आठ केन्द्रांवरून साधारण पंचवीस व्यक्ती फ्रान्सला पाठवल्या जातात. ह्या व्यक्तींची निवड त्या त्या केन्द्रावर् केली जाते. समाजातील एखाद्या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीची निवड होते. तसेच दर वर्षी फ्रान्समधूनही काही लोकांचा गट भारतात येतो. आतापर्यत ६o० मराठी बांधव फ्रान्सला या माध्यमातून भेट देऊन आले आहेत, असे डॉ. देसाई यांनी सांगितले.
सांस्कृतिक देवाण घेवाण ह्या उद्देशाने हे गट परस्पर देशांना भेटी देतात. ह्या भेटींवेळी गट सदस्य एकमेकांच्या घरी राहतात. विविध स्थानिक स्थळांना भेटी देतात. परस्परांच्या चालिरिती समजून घेतात. एकंदरीने परस्पर स्नेहव्रृद्धी साधली जाते.

 

‘डॉ एस एन पठाण यांचे जीवन ‘धार्मिक सद्भावाची ज्योत ‘ : खा . राजू शेट्टी

0

पुणे :नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि विश्व शांती केंद्र (आळंदी ) चे राष्ट्रीय समन्वयक डॉ एस एन पठाण यांच्या
‘टाकीचे घाव ‘ या आत्मचरित्राच्या ‘चिजेल्स ब्लोज ‘ या इंग्रजी आवृत्ती चे प्रकाशन इचलकरंजी येथे खा . राजू शेट्टी आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते झाले .

‘टाकीचे घाव ‘ही डॉ. पठाण यांची आत्मकथा आहे.प्रा . डॉ . मंजुषा धुमाळ (अमरावती) यांनी हे इंग्रजी भाषांतर केले आहे . इंग्रजी आवृत्ती ‘विश्वकर्मा पब्लिकेशन्स ‘ने प्रकाशित केली आहे . ‘टाकीचे घाव ‘ हे मूळ आत्मवृत्त २०१३ साली प्रकाशित झाले आहे .

‘डॉ एस एन पठाण यांचे जीवनच ‘धार्मिक सद्भावाची ज्योत ‘ असून ते हिंदू -मुस्लिम समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक आहेत ‘ ,असे गौरवोद्गार राजू शेट्टी यांनी यावेळी काढले .

रयत शिक्षण संस्थेच्या “कमवा आणि शिका’ योजनेतून शिक्षण घेत अधिव्याख्यातापदापासून ,राज्याचे शिक्षण संचालक ,नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदापर्यंतचा प्रवास करणारे पठाण सरांनी या पुस्तकात आपल्यावर झालेले संस्कार, तसेच जीवनात मार्गदर्शक ठरलेल्या व्यक्तींबद्दल मोकळेपणाने लिहिले आहे दारिद्र्यावर मात करून पठाण सर ज्या तडफेने आपली वाटचाल करतात, ती अनेक तरुणांना प्रेरणादायी ठरेल,’असे उद्गार खा . राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना काढले .

यावेळी बोलताना डॉ एस एन पठाण म्हणाले,’भारतात हिंदू -मुस्लिम समाज एकोप्याने राहत आहे ,तरीही अनेक राजकारणी हा एकोपा बिघडविण्याच्या प्रयत्नात आहेत . केवळ राजकारणासाठी चालणारे हे विखारी प्रयत्न यशस्वी होऊ देता कामा नयेत . ग्रामीण भागातील माझ्यासारखा एक गरीब मुस्लिम शिक्षणाच्या वाटेने जाऊन राज्याचा शिक्षण संचालक ,कुलगुरू होतो ,याचाच अर्थ या देशात प्रगतीच्या संधी सर्वाना समान उपलब्ध आहेत ,आणि या देशात जन्माला येणे हे भाग्याचे आहे ,हे सिद्ध करणाऱ्या आहेत .

या कार्यक्रमात डॉ . पठाण याना ‘स्वातंत्र्यसैनिक निजामुद्दीन काझी ‘ यांच्या नावाचा ‘सांप्रदायिक सद्भावना पुरस्कार’ राजू शेट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला . यावेळी सौ . जे एस पठाण उपस्थित होत्या .

नुरुद्दीन काझी यांनी आभार मानले .

१८ वा आयसीएसआय नॅशनल एवॉर्ड्स आणि तिसरा आयसीएसआय सीएसआर एक्सलन्स एवॉर्ड प्रदान

0

पुणे-अठरावा आयसीएसआय नॅशनल एवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि तिसरा आयसीएसआय सीएसआर एक्सलन्स एवॉर्ड्स सीएसआर सर्वोत्तमतेतील बेस्ट गव्हर्नन्ड कंपन्या आणि बेस्ट कंपन्यांना इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय)ने आज मुंबईत आयोजित केलेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा समारोपही करण्यात आला.

डॉ. मोहन कौल, अध्यक्ष, इंडिया प्रोफेशनल्स फोरम, ब्रिटन आणि श्री. जी. एन. बाजपाई, माजी अध्यक्ष सेबी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि माननीय पाहुण्यांनी विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले.

प्रतिष्ठेचा आयसीएसआय लाइफटाइम एचिव्हमेंट एवॉर्ड श्री. अदी गोदरेज, अध्यक्ष, गोदरेज ग्रुप यांना कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील सर्वोत्तमता सत्यात उतरवण्यासाठी देण्यात आला.

आयसीएसआय आयसीएसआय नॅशनल एवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठीचा पुरस्कार सर्वोत्तम गव्हर्न्ड कंपन्या म्हणून सिप्ला लिमिटेड आणि डाबर इंडिया लिमिटेड यांना देण्यात आला आणि इतर पाच कंपन्यांना गौरव प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. (इंग्रजी आद्याक्षरांच्या क्रमाने)

1)     एसीसी लिमिटेड

2)     हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड

3)     इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड

4)     टाटा मेटॅलिक्स लिमिटेड

5)     दि इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीची संकल्पना (सीएसआर) जिची मुळे परोपकारी सेवांमध्ये आहेत, ती संकल्पना आता सामाजिक, नैतिक आणि पर्यावरणीय परिस्थितीमुळे वेगाने बदलू लागली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर तिसऱ्या आयसीएसआय सीएसआर एक्सलन्स एवॉर्ड्समधून भारतभरातील कंपन्यांकडून चांगल्या कॉर्पोरेट जबाबदारीचे वातावरण निर्माण करून कायम राखल्याचा गौरव केला जातो.

तिसरा आयसीएसआय सीएसआर एक्सलन्स एवॉर्ड्स खालील कंपन्यांना देण्यात आले.

1)   जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (उगवती वर्गवारी)

2)    टाटा पॉवर कंपनी लिमिटेड (मध्यम वर्गवारी)

3)    अंबुजा सिमेंट्स लिमिटेड (मोठी वर्गवारी)

वाणिज्य आणि उद्योग आणि नागरी हवाईउड्डाण मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे अठरावा आयसीएसआय नॅशनल एवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि तिसरा आयसीएसआय सीएसआर एक्सलन्स एवॉर्ड्स आयोजित केल्याबाबत अभिनंदन केले. ते म्हणाले की, भारतातील कॉर्पोरेट कंपन्या जागतिक दर्जाचे पालन करताना जागतिक समुदायाचा विश्वासही प्राप्त करत आहेत याची खातरजमा आयसीएसआय करेल.

ते पुढे म्हणाले की, कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे पब्लिक गव्हर्नन्सइतकेच महत्त्वाचे आहे आणि खरेतर कधीकधी ते जास्त महत्त्वाचे ठरते. कॉर्पोरट कंपन्या भारताची अर्थव्यवस्था, समाज तसेच देशाला आकार देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. कॉर्पोरेट कंपन्यांना जागतिक दर्जाचे पालन करणाऱ्या अधिक विश्वासू, आत्मविश्वास जागृत करणाऱ्या कंपन्य म्हणून स्थापित करण्यात कंपनी सेक्रेटरींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की कंपनी सचिव अशा पद्धतीने आपली कर्तव्ये पार पाडतील की हा पुढे जाऊन जगातील सर्वाधिक आवडीचा व्यवसाय ठरेल.

सन्माननीय उपस्थितांशी संवाद साधताना, डॉ. मोहन कौल, अध्यक्ष, इंडिया प्रोफेशनल फोरम, ब्रिटन म्हणाले की, भारतातील व्यावसायिकांची भारत आणि यूकेमधील एक चांगली भागीदारी कायम राखण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका हे. जीएसटीसारखी क्रांती भारतात घडून येत असताना, जगभरातील व्यावसायिक भारताकडे विविध विभागांमधील भागीदारीसाठी आशेने पाहतील यात शंका नाही. ते तसे करत असताना कंपनी सचिवांनी आघाडीवर येऊन अशा भागीदारी सत्यात उतरवण्यासाठी आणि पार पाडण्यासाठी मदत केली पाहिजे.

श्री. जी. एन बाजपाई, माजी अध्यक्ष, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी आयसीएसआयचे चांगल्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स पद्धतींना चालना देण्यासाठीच्या अथक प्रयत्नांसाठी आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून असलेल्या नियामकांच्या अपेक्षांच्या पूर्ततेत लक्ष घालण्यासाठी अभिनंदन केले.

सीएस मकरंद लेले, अध्यक्ष, आयसीएसआय यांनी प्रास्ताविक केले आणि ते म्हणाले की, कॅडबरी कमिटी रिपोर्टच्या पार्श्वभूमीवर कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या विषयावर चर्चा सुरू करणाऱ्या भारतातील पहिल्या व्यावसायिक कंपन्यांपैकी एक आयसीएसआय असून त्यांनी भारतात कॉर्पोरेट क्षेत्रात चांगल्या गव्हर्नन्सची जबाबदारी अनेक पावले उचलून घेतली आहे. चांगल्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सला चालना देणाऱ्या इन्स्टिट्यूटच्या महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक म्हणजे आयसीएसआय नॅशनल एवॉर्ड फॉर एक्सलन्स इन कॉर्पोरेट गव्हर्नन्स असून त्याची स्थापना २००१ साली कॉर्पोरेट क्षेत्रात चांगल्या गव्हर्नन्स पद्धतींना चालना देण्यासाठी आणि सवलत देण्यासाठी पात्र असलेल्या कंपन्यांना ओळखण्यासाठी झाली होती. त्यांनी संस्थेच्या प्रयत्नांची व्याप्ती जागतिक पातळीवर नेण्याच्या प्रयत्नांवर तसेच चांगल्या गव्हर्नन्स पद्धतींना मोठ्या उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने वाढवण्यावर भर दिला.

सीएस अशोक कुमार दीक्षित, ऑफिशिएटिंग सेक्रेटरी, आयसीएसआय यांनी आभार मानले आणि सांगितले की, रौप्य महोत्सवी वर्षाचा समारोप समारंभ हा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या चांगल्या कॉर्पोरेट प्रशासनाला चालना देण्याच्या अथक प्रयत्नांचा पुरावा आहे.

‘महिंद्र जीतो’च्या एक लाख विक्रीबद्दल ग्राहकांचा अभिनेते मनोज वाजपेयींकडून सन्मान

0

मुंबई : महिंद्र अॅन्ड महिंद्रच्या जीतो ट्रक्सची विक्री 1 लाखाहून अधिक झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी कंपनीतर्फे जीतोचे ब्रॅन्ड अॅम्बेसिडरअभिनेते मनोज वाजपेयी यांची ग्राहकांशी भेट घडवून आणण्याचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला.

 आपका आभारएक लाख बार या योजनेमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजेते ठरलेले देशभरातील 12 हजार भाग्यवान ग्राहक या कार्यक्रमास उपस्थित होते. मनोज वाजपेयी यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी त्यांना मिळाली. प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना या कार्यक्रमात बक्षिसे देण्यात आली. आपका आभारएक लाख बार या मोहिमेचा समारोप या कार्यक्रमात करण्यात आला.

 जीतो मिनि ट्रक जून 2015 मध्ये बाजारात सादर करण्यात आले होते. एक टनाहून कमी क्षमतेच्या श्रेणीमध्ये तब्बल 8 मॉडेल्समहिंद्रने आणली होती. यातील डिझेल इंजिनाच्या मॉडेलमध्ये एसएल आणि एक्स या श्रेणी तिचाकीमायक्रो-ट्रक आणि मिनि-ट्रक या वाहनांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.. जीतो ट्रक सीएनजी इंजिनानेदेखील युक्त आहेत.

 उत्कृष्ट कार्यक्षमता आणि 33.4 किमी प्रति लिटरएवढी इंधनक्षमता यांमुळे जीतो हे वाहन त्याच्या श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट ठरले आहे. इ-कॉमर्स उद्योगस्वच्छ भारत मोहीम आणि अन्य क्षेत्रांतही जीतो ट्रक्सना भरपूर प्रतिसाद मिळाला आहे.

 या गुणवत्तेबरोबरच ग्राहकांच्या पसंतीची पावती मिळाल्याने जीतोने अपोलो सीव्ही ऑफ द यीअर हे पारितोषिक पटकावले आहे. मेक इन तेलंगणाच्या ध्विचित्रफीतीमध्येही जीतोचे प्रदर्शन झालेले आहे.

 महिंद्रविषयी ..

महिंद्र उद्योगसमुहाची एकूण उलाढाल 20.7 अब्ज डॉलर इतकी आहे. नावीन्यपूर्ण मोटारी व एसयूव्ही बनविणेट्रॅक्टर्सच्या माध्यमातून ग्रामीण प्रगतीला चालना देणेनवीन व्यवसायांची जोपासना करणेहे या समुहाचा उद्दीष्ट आहे. तसेच युटिलिटी मोटारीमाहिती तंत्रज्ञानअर्थसेवा आणि पर्यटनविषयक सेवा आदी उद्योगांमध्ये हा समूह कार्यरत आहे. महिंद्र समुहातर्फे जगात सर्वाधिक संख्येने ट्रॅक्टर बनविले जातात. कृषी उद्योगहवाई उद्योगव्यावसायिक वाहनांची निर्मितीसुट्या भागांचे उत्पादनसंरक्षणविषयक उत्पादनेलॉजिस्टिक्सरिअल इस्टेटअपारंपारीक ऊर्जास्पीडबोटपोलाद उत्पादन अशा इतरही अनेक क्षेत्रांमध्ये महिंद्र उद्योगसमूह आपले पाय रोवून आहे. शंभर देशांमध्ये या समुहाच्या विविध कंपन्या आहेत व त्यांमध्ये दोन लाख चाळीस हजारांहून अधिक अधिक कर्मचारी काम करतात.

हेल्मेट सक्ती नको ? पाहिजे? यावर मतदान मोहीम

0

पुणे-पतित पावन संघटना पुणे शहरच्यावतीने नौरोसजी वाडिया महाविद्यालयासमोर हेल्मेट सक्ती नको ? का हेल्मेट पाहिजे यावर मतदान मोहीम राबविण्यात आले . यावेळी महाविद्यालयीन युवकांनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी होऊन मतदान केले . यावेळी पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते प्रविण झंवर , धनंजय क्षीरसागर , संतोष शेंडगे , गुरु कोळी , मनिष पवार , सिताराम खाडे , मनोज नायर ,  चेतन लंगार , हृतिक कवडे , गोकुळ शेलार , मयूर कवडे , महेश पालीमकर , आनंद कवडे , सुजित कवडे , पपू टेमगिरे ,आदी पदाधिकारी कार्य्रकर्ते सहभागी झाले होते . 

जन्मपूर्व काळजीबाबत मिथकांविषयी चर्चा – अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील डॉक्टर्स विचारमंथन करणार

0

पुणे: महिलांचे जन्मपूर्व आणि जन्मपश्चात मानसशास्त्र आणि आरोग्यविषयक काम करणारी अमेरिकेतील संस्था एपीपीपीएचआणि गेल्या 60 वर्षांपासून काम करणारी भारतीय एनजीओ मनशक्ती रिसर्च सेंटर (एमआरसी) ने एकत्र येऊन तीन दिवसीय जागतिक परिषदेचे आयोजन केले आहे. 18 जानेवारीपासून सुरु होणार्‍या या परिषदेत सहभागी डॉक्टर्स जगभरात प्रसुतीवेळी घेतल्या जाणार्‍या जन्मपूर्व काळजीबाबत विचारविनीमय करत आपले अनुभव व्यक्त करणार आहेत.

आज बाळाच्या जन्मपूर्व काळजीबाबत तरुण जोडपी तसेच डॉक्टरांमध्ये सुद्धा अनेक मिथके आणि गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी18 जानेवारीपासून लोणावळ्यात सुरु होणार्‍या या प्रकारच्या पहिल्याच जागतिक परिषदेत भारतातील जुन्या पारंपारिक तसेच आधुनिक वैज्ञानिक पध्दतींची चर्चा करण्यात येईल.

अशा संकल्पना आणि कार्यपध्दती तपासून पाहण्यासाठी वैद्यकीय विज्ञानात वूम्ब इकोलॉजी नावाची शाखा सुरु करण्यात आली आहे. परंतु दुर्दैवाने सर्वात आघाडीवर असणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकांनाही त्याबाबत फारशी माहिती नाही.

एपीपीपीएच संस्थेचे संस्थापक, डॉ. थॉमस वेर्नी यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, “आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे ‘वूम्ब इकोलॉजीला वर्ल्ड इकोलॉजी बनवणे’. बालकांच्या जन्मपूर्व आणि जन्मपश्चात आजारांचा अभ्यास करुन त्यांच्यावरील उपचारांच्या पध्दती शोधणे तसेच बालकांसोबत त्यांच्या मातापित्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यातसुधार आणण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत.”

फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रीक अँड गायनेकोलॉजीकल सोसायटीज ऑफ इंडिया (FOGSI) च्या मान्यतेने आयोजित होणार्‍या या परिषदेत जन्मपूर्व विकासाचे प्राचीन प्राचीन ज्ञान आभण अत्याधुनिक शास्त्र- गर्भातून नव्या आरोग्यदायी जगाची निर्मिती) यावर अधिक लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

धन्वंतरी पुरस्कार विजेत्या, नामांकीत बालरोगतज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी उपकुलपती डॉ. स्नेहलता देशमुख परिषदेत प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी त्या ‘माझा प्रवास- बालशल्यचिकित्सा ते संस्कार’ या विषयावर मार्गदर्शन करतील.

त्यांनी सांगितले की, “अनेक लोक जन्मपूर्व काळजीकडे एक नवीन फॅड या दृष्टीकोनातूनच पाहतात. मात्र भारतात हीच पध्दती संस्कार (सद्गुण) या नावाने खूप आधीपासून प्रचलीत आहे. या पध्दतीमधून स्पष्ट झाले आहे की, बाळ गर्भावस्थेत असल्यापासूनच गर्भ संस्काराच्या माध्यमातून त्याच्यामध्ये सद्गुण भरणे शक्य आहे. परंतु सर्वसामान्य जोडपी याबाबत अजूनही गोंधळलेल्या मन:स्थितीतच असतात.”

पुणे येथील अनुवांशिक आणि बालरोगतज्ञ डॉ. प्रकाश गंभीर सांगतात की, “याबाबतचे आणखी एक कटू सत्य म्हणजे काही पाश्चिमात्य वैद्यकीय पध्दती आणि भारतीय विचार यांच्यात खूपच तफावत दिसून येते. सध्याच्या उपचार पध्दतींमध्ये केवळ जैवीक प्रक्रियांनाच प्राधान्य दिले जाते. त्याचा पुढील टप्पा असणार्‍या मानसिक आणि सामाजिक घटकांना महत्व दिले जात नाही. मातेच्या शरीराला आवश्यक असणारे अन्न, आवश्यक असणारा व्यायाम आणि औषधे यांचीच फक्त चर्चा केली जाते. परंतु तिची मानसिक अवस्था, तिने वाचणे आवश्यक असणारे साहित्य किंवा त्या अवस्थेत ऐकावे असे संगीतही तितकेच महत्वाचे आहे.” या परिषदेत डॉ. प्रकाश गंभीर जन्मपूर्व अवस्थेत अनुवंशिक आणि एपिजेनेटिक्सची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

एमआरसी आणि त्याचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद यांनी जागतिक स्तरावर या विषयावर काम केले आहे, त्यांच्या मते,गर्भसंस्कारांनी प्राचीन ज्ञानाचा वैज्ञानिक पद्धतीने उपयोग केला आहे. स्वयंसेवकांच्या समर्पित कार्यसंघासह एमआरसी या विषयावर अव्यवसायिक स्तरावरील कार्यशाळा आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित करीत असते.

मागील एका दशकातच 1,25,000 पेक्षा जास्त पालकांनी एमआरसी च्या साप्ताहिक कार्यशाळेत भाग घेतला आहे. या एनजीओचे संशोधन संचालक, गजानन केळकर यांनी सांगितले की, “आमच्याकडून एक दिवसीय कार्यशाळा, तीन दिवसीय शिबिरे,इलेक्ट्रॉनिक चाचण्या आणि इतर अशा प्रकारच्या व्यायामांचे प्रशिक्षण घेतले जाते.”

कॅनडाच्या एपीपीपीएच संस्थापक डॉ. थॉमस वेर्नी यांच्या व्यतिरिक्त, ब्रिटनचे आघाडीचे एपिजेनिटिसिस्ट चरण सुर्धर आणि ब्राझिल, नेदरलँड आणि अमेरिकेतील अनेक तज्ञ या परिषदेस संबोधित करतील.

भारतातील प्रमुख वकत्यांमध्ये डॉ. संजय गुप्ते (पुणे), डॉ. जयदीप मल्होत्रा (FOGSI इंडियाचे अध्यक्ष) आणि बेंगलुरूच्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ मेंटल हेल्थ आणि न्यूरोसायंसेस (एनआयएमएचएन्स) यांचा डॉ. प्रभा चंद्रा यांचा समावेश आहे.

डेक्कन कॉलेज (पुणे) मधील डॉ. विनया क्षीरसागर आणि मुंबईच्या वैशाली दबके यांसारखे अनेक भारतीय तज्ज्ञ गर्भ संस्कारांचे प्राचीन संकल्पना देखील सादर करतील.

गुणवत्ता, सेवा व सचोटी ही यशस्वी उद्योगाची त्रिसूत्री -अरुणा भट

0
मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळातर्फे तीन दिवसीय ‘भारी-भरारी’ महोत्सव
पुणे : “कोणताही उद्योग करताना गुणवत्ता, ग्राहकाभिमुख सेवा आणि कामातील सचोटी महत्वाची असते. याच त्रिसूत्रीच्या जोरावर अनेक उद्योजकांनी यशाची शिखरे गाठल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. आजचा छोटा व्यावसायिक उद्याचा उद्योजक होणार असतो. अशा प्रकारच्या ‘एक्स्पो’मधून उद्योजकांना व्यवसाय वाढविण्यास मदत होते,” असे मत ‘केप्र’ मसालेच्या संचालिका अरुणा भट यांनी व्यक्त केले.
मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ आयोजित तीन दिवसीय ‘भारी भरारी’ या फन-फूड महोत्सवाचे उद्घाटन अरुणा भट व पीएनजी ग्रुपच्या वैशाली गाडगीळ यांच्या हस्ते झाले. डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे झालेल्या उद्घाटनप्रसंगी श्रीपाद करमरकर, मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ, पुणेचे अध्यक्ष संजय जोशी, सचिव प्रसाद पटवर्धन, विश्वस्त राहुल कुलकर्णी, माधव गोडबोले, धनंजय देशपांडे आदी उपस्थित होते.
वैशाली गाडगीळ म्हणाल्या, “आपल्या उत्पादन आणि सेवेच्या गुणवत्तेवर व्यवसायाची दिशा अवलंबून असते. प्रत्येक ग्राहक जोडला जातो आणि त्यातून उद्योग उभा राहतो. त्यामुळे ग्राहकाशी प्रामाणिक राहणे आणि त्याला उत्तम सेवा देणे हेच उद्योगाला यशाकडे नेण्यास उपयुक्त ठरते. या प्रदर्शनात अनेक गृहिणी आपल्यातील व्यावसायिक पैलू उलगडत आहेत. नावीन्य आणि ग्राहकाशी सुसंवाद याचेही महत्व आपण लक्षात ठेवले पाहिजे.”
रविवार, दि. १३ जानेवारी २०१९ पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत हा महोत्सव सर्वांसाठी खुला असणार आहे. जवळपास २०० च्यावर स्टॉल्स असणार आहेत. रोज संध्याकाळी चैताली माजगावकर भंडारी यांचा धम्माल हास्य व पपेट शो, तर मनीषा लताड आणि सहकाऱ्यांचा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम अनुभवता येणार आहे.
खवैय्यांसाठी खाद्यांची पर्वणी
महाराष्ट्रभरातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, वधु-वर सूचक, फॅशन, फोटोग्राफी, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, लहानांसाठी खेळ, गृहिणींसाठी मेहंदी, टॅटू असे विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत. कोल्हापुरी मिसळ, कटवडा, नागपुरी वडाभात, पुडाची वडी, खान्देशी शेवभाजी, कोकणी बिरड्याची उसळ, काळ्या रस्याची उसळ, घावन, विविध प्रकारचे थालीपीठे, विविध प्रकारचे मोदक, गुळपोळी, पुरणपोळी, खवापोळी अशा असंख्य पदार्थांची चव पुणेकरांना चाखता येईल.